Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रथसप्तमीनिमित्त सामुदायिक सूर्यनमस्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील तालुका क्रीडा संकुलात जागतिक सूर्यनमस्कार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सामूहिक सूर्यनमस्कारचा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस व सहाय्यक अधिकारी केंद्रे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

येथील क्रीडाभारती, योग विद्याधाम, स्वामी विवेकानंद केंद्र, पतंजली योगपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रथसप्तमी निमित्ताने या सामुदायिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वाती मराठे या योग प्रशिक्षकेने सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक उपस्थितांना करून दाखवले. त्यानंतर मैदानात उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी सामुदायिक सूर्यनमस्कार केले.

या उपक्रमात शहरातील काकाणी विद्यालय, या. ना. जाधव, काबरा विद्यालय, वर्धमान विद्यालय आदी शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी क्रीडा भारतीचे उपाध्यक्ष नितीन पोफळे, जिल्हाध्यक्ष भानू कुलकर्णी, तुकाराम मांडवडे, दादा बहिराम, दीपक पाटील, भाग्येश कासार, निखिल पवार, श्रीकांत जोशी, सुनील वडगे, डॉ. सुरेश शास्त्री आदी उपस्थित होते. या सामुदायिक सूर्यनमस्कार उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र अलई, रविराज सोनार, प्रवीण चौधरी, देवा पाटील, रविश मारू, महेश कसार आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकच्या वस्त्रोद्योगाला विस्ताराचे दालन

$
0
0

संतोष मंडलेचा

वस्त्रोद्योगाचे नाव डोळ्यांसमोर येताच राज्यात भिवंडीसह मालेगाव अन् इचलकरंजी ही शहरे समोर येतात. यंत्रमागाची शहरे म्हणून या गावांची ओळख आहे. मोठ्या प्रमाणावर या शहरांमधून सूत उत्पादन होते. मालेगावचा तांबाकाटा आठवला की साडी व्यापार अन् उत्पादकांची बाजारपेठ नजरेसमोर येते. मालेगाव आणि भिवंडी ही शहरे नाशिकला लागूनच आहेत. साहजिकच नाशिकच्या औद्योगिकीकरणानंतर नाशिकमध्ये वस्त्रोद्योग उद्योजक वळलेले दिसतात.

कापूस व रेशीम उत्पादनाचा विचार केल्यास भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. असे असले तरीही निर्यातीमध्ये भारताचा वाटा केवळ ५ टक्के आहे. वस्त्रोद्योगाच्या बाबतीत भारताचा विचार केल्यास देशात १२०० मोठे आणि मध्यम टेक्सटाईल मिल आहेत. त्यातील सर्वात जास्त तामिळनाडू, आंध्रप्रदेश, पंजाब, कर्नाटक आणि महाराष्ट्रात आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात ७ टक्के हिस्सा आहे. तर देशाच्या जीडीपीमध्ये या उद्योगाचा हिस्सा ४ टक्के आहे.

वस्त्र निर्मितीसाठी लांब धाग्याचा कापूस लागतो. हा कापूस उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पिकतो. मात्र त्या तुलनेत या ठिकाणी वस्त्रोद्योग दिसून येत नाहीत. जळगाव, अंमळनेर, चाळीसगाव, मालेगाव या ठिकाणच्या जिनिंग प्रेस मिल, ठेंगोडे येथील सूत गिरणी असे बोटावर मोजता येतील असे उद्योग आहेत. मागणी अभावी शेतकऱ्यांच्या कापसालाही भाव मिळत नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या प्रमूख गरजा. काळानुरूप या गरजांमध्ये भरही पडली. काही दशकांपूर्वी केवळ गरजेपुरता कपड्यांची निवड होती. मात्र बदलत्या काळाने फॅशन या शब्दाला विशेष महत्त्व आहे. दिवसागणिक येणाऱ्या फॅशन नुसार कपड्यांनाही विशेष मागणी वाढली आहे. साहजिकच मोठ्या प्रमाणावर फॅशनचे कपडे आयातही केले जातात.

नाशिकचा विचार केल्यास मोठ्या प्रमाणात फॅशन डिझायनिंग, गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग, ड्रेस डिझायनिंग यांचे प्रशिक्षण देणारे कॉलेज आहेत. येथील जुन्या व नव्या शैक्षणिक संस्थांचे योगदान नाशिकच्या वस्त्रोद्योग वाढीसाठी मोलाचे आहे. या ट्रेण्डसचा फायदाही उद्योजक घेत आहेत. नाशिकमधील नामांकित वस्त्रोद्योगही फॅशन क्षेत्रातील नवे ट्रेण्डस रूजविण्याच्या प्रयत्नात आहेत. यांच्या माध्यमातून होणारी उत्पादने निर्यातीचेही उद्दिष्ट गाठत आहेत. यात हायटेक टेक्सटाईल, निशांत टेक्सटाईल, अरो टेक्सटाईल, व्हेंचुरा टेक्सटाईल, गितांजली क्लोदिंग, पोद्दार क्लोदिंग, सलोरा टेक्सटाईल यासारख्या कंपन्यांचे या वस्त्रनिर्मितीत मोठे योगदान आहे. नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टरमध्ये परमात्मने डिझाईन स्टुडिओ नावाने उद्योग सुरू आहे. या ठिकाणी सुमारे दीडशे महिलांना रोजगार मिळतो. येथे बनविण्यात येणाऱ्या अंर्तवस्त्रांची शंभर टक्के निर्यात होते. या बरोबर काठीयावाड ब्रॅण्डनेही नवनवे ट्रेंण्ड नाशिकच्या बाजारपेठेत आणली. वस्त्रोद्योगात नाशिक जिल्ह्याचा विचार करता मालेगावच्या साडीने देशात येवल्याच्या पैठणीने जगात बाजारपेठ मिळवली आहे.

मेक इन इंडिया सेंटरमध्ये राज्यातील वस्त्रोद्योग धोरणाबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नव्या वस्त्रोद्योग धोरणाची घोषणा करताना या उद्योगात ४० हजार कोटींची गुंतवणूक व ११ लाख रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारने ठेवल्याचे सांगितले होते. ८ टेक्सटाईल पार्क उभारण्याचीही घोषणा केली आहे. त्यासाठी केंद्राने १९७२ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. टेक्सटाईल पार्कसाठी राज्यात मालेगावची निवड करण्यात आली. कापड उद्योगासाठी यात चांगल्या सुविधा देण्यात येणार आहेत तर मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. नाशिकमध्येही इंडियाबुल्स सेज वस्त्रोद्योग आणि वेशभूषा उद्यान उभारण्यात येणार आहे. यामुळे नाशिकमध्ये वस्त्रोद्योग क्षेत्राला उज्ज्वल भवितव्य निर्माण झाले आहे.

(महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुरड्यांनी दिला सामाजिक संदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या रंगूबाई जुन्नरे मॉन्टेसरी विभागाचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. दादासाहेब गायकवाड सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात चिमुरड्यांनी आपल्या सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी बेटी बचाव, पर्यावरण रक्षण, प्लास्टिक मुक्ती, पाणी बचत आदी विषयावर समूहनृत्य सादर करून सामाजिक संदेश दिला. तसेच हिंदी मराठी गीतांवरही विद्यार्थ्यांनी नृत्यकला सादर केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व गौरव करण्यात आला. या प्रसंगी डॉ. गोगटे यांनी मुलांच्या आहार व अभ्यासाविषयी पालकांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विकास गोगटे आणि डॉ विनिता गोगटे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समिती अध्यक्ष प्रा. दिलीप फडके होते. तसेच उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, शशांक मदाने, राजेंद्र निकम, रमा देशपांडे यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका स्मिता वाळवेकर यांनी केले. परिचय प्रदीप सराफ यांनी केले. संस्थेचा अहवाल वाचन अर्चना भोसले यांनी केले. सूत्रसंचालन प्राची पंडित व स्वाती देशपांडे यांनी केले तर आभार माधुरी काळे यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांगीतुंगीच्या विकासासाठी कटिबध्द

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

जैन धर्मियांच्या पवित्र श्री मांगीतुंगी परिसर विकासासाठी तब्बल २७० कोटी रुपयांच्या विकास कृती आराखडा तयार आहे. आगामी काळात या माध्यमातून परिसर विकास घडवून मांगीतुंगी परिसराला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

श्री मांगीतुंगी येथे भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट उंच मूर्तीच्या पंचकल्याण महोत्सव व महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित सर्वतोभद्र महलमधील महासभेला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार दीपिका चव्हाण, आमदार राजेंद्र पटणी, राज्याचे मुख्यसचिव स्वाधिन क्षेत्रीय, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्र‌सिंह कुशवाह, जि. प. सीईओ मिलिंद शंभरकर, माजी खासदार जे. के. जैन, ज्ञानमती माताजी, चंदनामती माताजी, रवींद्रकिर्ती स्वामाजी, अनेकांतसागर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आपल्याकडून निश्चित चांगले सत्कर्म झाल्याने या पवित्र ठिकाणी येण्याचा योग आला. भारतातील साधू-संत, ऋषीमुनी यांचे कार्य अत्यंत पवित्र व अतूलनीय असल्याने त्यांची नोंद कुठल्याही पुस्तकाने अथवा रेकॉर्ड होण्याइतके छोटे नाही. भगवान ऋषभदेव हे विद्वान, पंडित, कृषी पंडित, ध्वनंतरी, साहित्य व कला क्षेत्रासह सर्वच प्रातांतील त्यांना प्रचंड ज्ञान होते. आपल्या प्रजेचे संगोपन व पालन पोषण कसे करावे त्यांचा आदर्श मापदंड त्यांनी दिला असून, त्यांचा आदर्श आजच्या शासनकर्त्यांनी घेणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले.

जैन समाजाने व्यवसाय व व्यापारात संपन्नता संपादन करूनही अध्यात्म व दातृत्वाला आजही अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. यामुळेच श्रद्धा असलेल्या समाजाचे अस्तित्व हे कुणीही नष्ट करू शकत नाही. जगातील अनेक संस्कृती नष्ट झाल्या, मात्र भारतीय संस्कृतीने श्रद्धेला महत्त्व दिल्यानेच तिचा सातत्याने सर्वत्र उत्कर्ष व उदोउदो होत आहे. आजच्या जगात भगवान ऋषभदेव यांचे कार्य सर्वांना आदर्शवादी व मार्गदर्शक असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी या परिसराल ऐतिहासिक महत्त्व असल्याने परिसर विकासाला चालना मिळण्याचे स्पष्ट केले.

खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी मांगीतुंगीला जागतिक पर्यटन दर्जा देवून परिसरातील हरणबारी व तळवाडे भामेर कालव्याच्या कामांना गती देण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांना रवींद्रकिर्ती स्वामीजी यांनी मंगलकलश, मांगीतंगी ऋषभ भगवान देव यांची प्रतिमा व धर्मराजेश्वर पदवी देवून सन्मानित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मूर्तीचे शिल्पकार सी. आर. पाटील, चांदवड नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांना सन्मानित करण्यात आले.

नवा संदेश देणारे क्षेत्र

ग्रामविकास विभागाने या परिसर विकासासाठी १९ कोटी रुपयांचा निधी देवून पहिल्या टप्प्यात पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आमागी काळात देखील शासन या ठिकाणी लक्ष केंद्रित करणार आहे. देशातील जैन समाजाचे कार्य व महती सर्वांना विषद असून, मांगीतुंगी देशाला नवा संदेश देणारे क्षेत्र असल्याचे उल्लेख ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला.

हेलिकॉफ्टरमधूनच पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे सकाळी साडेदहा वाजता आगमन होताच हेलिकॉप्टरमधूनच १०८ फूट उंच भगवान ऋषभदेव यांच्या मूर्तीची पाहणी केली.

भयाळे दुर्लक्षित

मुख्यमंत्री यावेळी शहीद जवान शंकर ‌शिंदे यांच्या गावी भेट देतील ही अपेक्षा मात्र फोल ठरली.

ऋषभदेवांची आज विश्वविक्रमी महाआरती

सटाणा : जगातील सर्वात उंच मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेवांच्या मूर्तीची आरती विश्वविक्रवी व्हावी, यासाठी सुमारे पाच हजार भाविक यात सहभागी होणार आहेत. आदिवासी भागामध्ये लख्ख उजेड व्हावा व जगाचे याकडे लक्ष जाऊन या परिसराचा विकास व्हावा, हा महाआरती मागचा उद्देश आहे.

आज (१७ फेब्रुवारी) सांयकाळी ७ वाजेच्या सुमारास सर्वतोभद्र महल सभामंडपाबाहेर सुमारे पाच हजार भक्तगण, इंद्र-इंद्रायणी महाआरतीकरिता सहभागी होणार आहेत. ही महाआरती अ‍ॅमेझिंग वर्ल्ड ठरणार असल्याची माहिती महाआरतीचे संयोजक सुवर्णा काला व पारस लोहाडे यांनी दिली. या उंच मूर्तीची महाआरती देखील विश्वविक्रमी ठरावी यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. या महाआरतीस प. पू. आर्यिका ज्ञानमती माताजी, चंदनामती माताजी, स्वामी रवींद्रकिर्तीजी व आचार्य उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारपीटग्रस्तांसाठी पाच कोटींची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशवासीयांना अच्छे दिनची स्वप्ने दाखविणाऱ्या भाजप सरकारला गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याचा साक्षात्कार तब्बल दहा महिन्यांनी झाला आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये गारपिटीमुळे नुकसान झालेल्या ७ हजार ९१५ शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने सुमारे पाच कोटींची मदत जाहीर केली आहे.

गतवर्षी ९ ते १५ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील सिन्नर, सुरगाणा, पेठ, हरसूल, त्र्यंबक, लासलगाव, घोटी, निफाड या तालुक्यांमध्ये गारपीट झाली. त्यामुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले. ७१ गावांमधील ३ हजार ८१७ हेक्टर क्षेत्र या गार‌िपिमुळे बाधित झाले. ७ हजार ९१५ शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले. टरबूज, कांदा, डाळिंब, गहू, द्राक्ष पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी गारपीटग्रस्त भागांची पाहणी करून मदत देण्याचे जाहीर केले. मात्र ही मदत अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळू शकली नाही. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने वारंवार राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. मदतनिधी म्हणून जिल्ह्यासाठी ५ कोटी १६ लाख ५९ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. सरकारने मदत जाहीर केली असून, कोरडवाहू पिकांसाठी ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर, ओलिताखालील पिकांसाठी १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर अशी मदत देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरात घुसून मारहाण अन् चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मखमलाबाद नाका परिसरातील हनुमान मंदिराजवळील घरात घुसून तीन ते चार चोरट्यांनी दोघांना मारहाण करीत जबरी चोरी केली. मखमलाबाद नाका येथील हेरंब श्रीराम जोशी (वय २०) आणि त्यांचा मावसभाऊ घरात झोपलेले असताना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीन ते चार संशयितांनी घरात बळजबरीने प्रवेश केला. तसेच, संशयितांनी दोघांना बेदम मारहाण करीत त्यांच्याकडील १४ हजार ५०० रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पादचारी ठार

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सोहनलाल कस्तुरीजी विष्णोई यांचा मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नांदूर शिवारात घडली. नांदूर शिवार ते औरंगाबाद महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून नाशिकरोड परिसरातील चिडे मळा येथील रहिवाशी असलेले बिष्णोई पायी जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात वाहनचालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

मुलीचा विनयभंग

पाठलाग करून धमकावत एका संशयिताने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना काठे गल्ली परिसरात सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. सीबीएस परिसरातील एका शाळेत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीचा काठेगल्ली परिसरात राहणारा संशयित आरोपी जुनेद तबारक चौधरी पाठलाग करीत होता. ही मुलगी सोमवारी शाळेच्या बाहेर पडत असताना संशयित चौधरीने तिला अडवून मला तुझ्याशी मैत्री करायची आहे, असे सांगून भेटण्याचा आग्रह केला. तसेच, मुलीचा पाठलाग करून तिला अश्लील हावभाव करून तू माझे ऐकले नाही, तर तुला घेऊन जाईल अशी धमकी दिली. या अगोदरही मी खून केला असल्याचे सांगणाऱ्या संशयिताविरोधात मुलीने भद्रकाली पोलिसात तक्रार दाखल केली.

दोन ठिकाणी घरफोड्या

भोर मळ्याजवळील विठ्ठल मंदिराजवळ आणि सप्तशृंगीनगर परिसरातील घर फोडून चोरट्यांनी सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ओढा रस्त्यावरील भोर मळा येथे राहणारे गोरख जयराम मोरे यांच्या बंद घराच्या खिडकीचे ग्रील कापून चोरट्यांनी सुमारे एक लाख ७७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा ऐवज चोरून नेला. सप्तशृंगीनगर येथील महेंद्र नामदेव जाधव यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल साफ केला. या घटनांबाबत नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पाकीटमारांना अटक

प्रवासादरम्यान बसमध्ये गर्दीचा फायदा घेत पाकीटमारी तसेच सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला पोलिसांना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात सातत्याने प्रवासादरम्यान चोरीच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, क्राईम ब्रँचचे अधिकारी व कर्मचारी चोरट्यांच्या मागावर होते. मंगळवारी दुपारी पोलिसांनी सापळा रचून समीर बाबू खान (मदंग चौक), सलीम नशिब खान (भारतनगर), विष्णू लक्ष्मण वाघ (असगणी गाव), मनोहर नामदेव मोरे (देवगाव), कृष्णा रामराव अणके (नवनाथनगर) आणि जमील शेख (हुसेन चौक, मनमाड) यांना निमाणी बस स्टॉपजवळ अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चारचाकी’वर जागीच कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रस्त्याच्याकडेला पार्क केलेली चारचाकी वाहने उचलताना त्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने शहर वाहतूक विभागाने आपल्या धोरणात बदल केला आहे. रविवारपासून चारचाकी वाहनचालकावर जागेवरच दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश वरिष्ठांनी दिला असून, त्यानुसार चारचाकी वाहने उचलणारी टोईंग व्हॅन पुन्हा आपल्या जागी 'पार्क' करण्यात आली आहे.

रस्त्याच्याकडेला पार्क होणारी वाहने वाहतुकीला अडथळा ठरतात. त्यांना दूर करण्यासाठी शहर वाहतूक शाखेमार्फत एका एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी तीन वाहनांच्या मदतीने आपली कारवाई सुरू केली. एकीकडे नागरिकांचा रोष असताना दुसरीकडे टोईंग व्हॅनवरील कर्मचारी मनमानी कारभार करीत असल्याचे चित्र शहरात तयार झाले. तसेच, सदर ठेकेदाराने टोईंग व्हॅन तयार करताना विविध स्पेअरपार्ट व मशिनरींचा 'जुगाड' केला. यांत्रिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या टोईंग व्हॅनचा फटका वाहनधारकांना बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतनगरात कार पेटवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतनगर येथील मोकळ्या मैदानावर उभ्या असलेल्या चारचाकीस सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांकडून आग लावण्यात आली. यात कार जळून पूर्णतः खाक झाली. याबाबत मुंबईनाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भारतनगर येथील बागवान गल्लीत राहणाऱ्या रऊफ कमरुद्दीन बागवान (वय ४१) यांनी आपल्या घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेवर त्यांची स्विफ्ट कार (एमएच १५ एपी ९२२४) उभी केली होती. रात्रीच्या सुमारास त्या चारचाकीस आग लागल्याची माहिती तेथून जाणाऱ्या अज्ञात व्यक्तीने बागवान यांना दिली. बागवान यांनी लागलीच आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत आगीने चांगलाच पेट घेतला होता. त्यामुळे बागवान यांनी आगीची घटना अग्निशामक विभागास कळवली. आग्निशामक दलाच्या जवानांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. बागवान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. बागवान यांच्या तक्रारीनुसार अज्ञात समाजकटंकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिवसाआड एक मोबाइल लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या मोबाइलवर विशेषतः महागड्या हॅण्डसेटवर चोरट्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. यंदाच्या पहिल्या ४६ दिवसात २५ मोबाइल चोरीला गेल्याची नोंद पोलिसांकडे झाली आहे. अर्थात हा आकडा वास्त​वतेला धरून नाही. बहुतांश चोरीच्या घटनानंतर मोबाइल गहाळ झाल्याचे लिहून घेतले जाते. पोलिसांकडून अशा प्रकारे चोरीच्या घटना 'बे'दखल होत असल्याने चोरट्यांचेही फावत आहे.

शहरात सन २०१४ मध्ये मोबाइल चोरीच्या १४० घटना घडल्या. सन २०१५ मध्ये १८६ गुन्ह्यांची नोंद विविध पोलिस स्टेशनमध्ये झाली. चालू वर्षात सुध्दा चोरटे मोबाइलधारकांना हिसका दाखवत आहेत. वास्तविक पोलिसांकडे दाखल झालेले गुन्हे 'हिमनगाचे टोक' आहे. नाशिक शहरात दररोज ८ ते १० किंवा त्यापेक्षा जास्त मोबाइलची चोरी होते. शहरातील भाजीबाजार, सीटीबस, मंदिर, रामकुंड, रेल्वे स्टेशन, बसस्थानके ही मोबाइल चोरट्यांची पसंतीची ठिकाणे आहेत. मोबाइल चोरीस गेल्याचे लक्षात आल्यावर सर्वसामान्यांना पोलिस स्टेशनची वाट धरावी लागते. मात्र, तिथे गेल्यावर नागरिकांवरच प्रश्नांची सरबत्ती होते. मोबाइल चोरीला गेला हा जणू आपलाच अपराध असल्याची भावना सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होते. तक्रारदाराला सन्मानपूर्वक वागणूक द्या, असे राज्याचे सत्ताधारी नेहमीच सांगतात. मात्र, सरकारचे हे धोरण कागदावरच आहे. नवीन सीम कार्डसाठी कंपनीला एफआयआरची गरज असते. मोबाइलपेक्षा सीमकार्डला महत्त्व असल्याचे सांगत 'पोलिस दादा' तक्रारदाराकडून मोबाइल गहाळ झाल्याचे लिहून घेतात. काही पोलिस स्टेशनमध्ये तर यासाठी १०० रुपयांचे प्रतिज्ञापत्र घेण्यास भाग पाडले जाते. यानंतर सदर नोंद गहाळ रजिस्टरला नोंदवून मोबाइल गहाळ झाल्याचा दाखला देण्यात येतो. हाच दाखला पूर्वीच्या सीम कार्ड नंबरसाठी कंपनी ग्राह्य मानते. क्राईम रेट काबूत ठेवण्याच्या पोलिसांच्या पध्दतीमुळे चोरट्यांचे फावत आहे. गुन्हे तत्काळ दाखल करण्यात यावे, याबाबत आदेश दिल्याचे अधिकारी सांगतात. तर, दुसरीकडे मात्र मोबाइलधारकांना वेगळाच अनुभव येतो.


चोरीचे मोबाइल जातात कुठे?

मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांची संख्या लक्षणीय असली तरी त्याची नोंद होत नाही. मोबाइल चोरीचा तपास करण्याचे काम टेक्निकल अॅनालिसीस विंग तसेच सायबर सेलमार्फत होणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होत नाही. किंबहूना एखाद्या नागरिकाने पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्याकडे पैशांची मागणी होते. असे अनुभव सार्वत्रिक असून, गृह विभाग मात्र याकडे गंभीरतेने पाहत नाही. चोरीचे मोबाइल जातात कुठे याचे ठोस उत्तर पोलिस देऊ शकत नाही. चोरीच्या मोबाइलची संख्या, त्यातून होणारी उलाढाल, सर्वसामान्यांना होणार त्रास याचा विचार करता गृह विभागाने मोबाइल व लॅपटॉप चोरीच्या तपासासाठी वेगळी यंत्रणा उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे.



ठक्कर बझारवरून मोबाइल चोरीस गेल्यानंतर सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‌ सरळ मोबाइल हरविल्याची नोंद केली. इन्शूरन्स असल्याने गयावया केली. मात्र, पोलिसांनी मलाच वेड्यात काढत घरी राहिला असेल असा युक्तिवाद केला.

- अश्विनी पाटील, तक्रारदार महिला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगाव कॉलेजच्या खेळाडूंना ब्राँझ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अमृतसरचे गुरुनानक देव विद्यापीठ, हिमाचल प्रदेशचे अटलबिहारी वाजपेयी जलक्रीडा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराणा प्रताप सागर पोंगडयामच्या विस्तीर्ण जलाशयात झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कॅनोइंग व कयाकिंग स्पर्धेत पुणे विद्यापीठ संघाला ५ ब्राँझपदके मिळाली. यातील तीन ब्राँझ पदके पिंपळगावच्या क. का. वाघ कॉलेजच्या खेळाडूंनी पटकावली. स्पर्धेचे पुरुष गटाचे सर्वसाधारण विजेतेपद गुरुनानक देव विद्यापीठाने तर महिला गटाचे सर्वसाधारण विजेतेपद पतियाळाच्या पंजाबी विद्यापीठाने पटकाविले.

पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या पिंपळगाव येथील क. का. वाघ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी कॅनोइंग या नौकानयन प्रकारात तीन ब्राँझपदके पटकावली. 'सी वन' या ५०० मीटर अंतराच्या शर्यतीत सागर गाढवे याने ब्राँझपदक पटकावले, तसेच 'सी टू' प्रकारात ५०० मीटर अंतराच्या शर्यतीत सुलतान देशमुख व सागर नागरे या जोडीला अंतिम स्पर्धेत अवघ्या काही अंतराच्या फरकाने अमृतसरच्या गुरुनानक देव विद्यापीठ व पतियाळाच्या पंजाबी विद्यापीठ संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या या जोडीला ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले.

'सी ४' प्रकाराच्या २०० मीटर अंतराच्या अतिशय अटीतटीच्या शर्यतीत बाळू कोकाटे, सागर गाढवे, सागर नागरे व सुलतान देशमुख यांच्या संघाला ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले. कयाकिंगच्या 'के १' प्रकारात २०० मीटर अंतराच्या शर्यतीत पुण्याच्या निखील बारणे याला ब्राँझ पदक मिळाले. तसेच 'के २' प्रकारात २०० मीटर अंतराच्या शर्यतीत डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या देवेंद्र सुर्वे याच्या साथीने निखील बारणे याने पुणे विद्यापीठ संघाला पाचवे ब्राँझपदक मिळवून दिले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुनानक देव विद्यापीठाचे क्रीडाविभाग प्रमुख डॉ. एच. एस. रंधावा व आंतरराष्ट्रीय पंच दिलीप बेनिवाल (दिल्ली) यांच्या हस्ते करण्यात आला. पुणे विद्यापीठ संघाचे मार्गदर्शक म्हणून प्रा. हेमंत पाटील, प्रा. विक्रांत राजोळे, प्रा. महेंद्र गायकवाड, प्रा. रामकृष्ण आहेर यांनी काम बघितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे शहर, सोलापूर, वाघोली आणि नागपूर उपांत्य फेरीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वडाळा रोड येथील जे. एम. सी. टी. (जुम्मा मस्जिद चारिटेबल ट्रस्ट ) तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतर तंत्रनिकेतन राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत पुणे शहर, सोलापूर, वाघोली आणि नागपूर या चार संघांनी आपापले उपउपांत्य सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पुणे शहर आणि नाशिक हा पहिला उपउपांत्य सामना फारच रंगतदार झाला. पहिल्या सत्रात दोन्हीही संघांनी सावध खेळ करून एकमेकांना आजमावण्याचा प्रयत्न केला. मध्यंतराला पुणे संघाने १२ गुण मिळविले तर नाशिकच्या खेळाडूंनीही तोडीस तोड खेळ करत ११ गुण आपल्या नावावर जमा केले. दुसऱ्या सत्रातही अशाच प्रकारे १ -२ गुणांचा फरक दिसून येत होता. मात्र शेवटची ३ मिनिटे बाकी असताना पुण्याच्या योगेशने सलग ३ गुण मिळविल्यामुळे पुण्याला शेवटी या सामन्यात २५- २२ असा विजय मिळवता आला. नाशिकच्या संघाकडून खेळताना संकेत पाटोळे, शेख मुनाफ, अल हसन मन्सुरी यांनी चांगले प्रयत्न केले. मात्र ते आपल्या संघाचा पराभव टाळू शकले नाहीत.

औरंगाबाद आणि सोलापूर हा दुसरा सामनाही असाच अत्यंत चुरशीचा झाला. मध्यंतराला औरंगाबादचा संघ २३- १९ अशा ४ गुणांनी आघाडीवर होता, मात्र दुसऱ्या सत्रात सोलापूरच्या खेळाडूंनी आपापसात समन्वय साधून पिछाडी तर भरून काढलीच आणि तोच समन्वय शेवटपर्यंत कायम राखत हा सामना ४०-३८ असा अवघ्या २ गुणांनी जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या उपउपांत्य सामन्यात नागपूरच्या संघाने मुंबईचा ४६ विरुद्ध ३७ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. तर वाघोली (पुणे ) विरुद्ध अहमदनगर यांच्यात झालेल्या चौथ्या उपउपांत्य सामन्यात वाघोलीच्या संघाने अहमदनगरचा २९-२१ असा सहज विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली.

सकाळी दोन्ही उपांत्य सामने होणार असून त्यानंतर अंतिम सामना होईल, अशी माहिती या स्पर्धेचे प्रमुख संयोजक प्रा. माणिक गायकवाड यांनी दिली.

सामन्यांचे निकाल

पुणे विजयी विरुद्ध नाशिक (२५ - २२)

सोलापूर विजयी विरुद्ध औरंगाबाद

(४० - ३८)

पुणे वाघोली विजयी विरुद्ध अहमदनगर (२९ - २१)

नागपूर विजयी विरुद्ध मुंबई

(४६ - ३७)

होणारे उपांत्य सामने

पुणे शहर विरुद्ध वाघोली (पुणे )

नागपूर विरुद्ध सोलापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन्यथा समिती बरखास्त करा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतींनी निर्णय घेण्याचे कोणतेच आदेश नाहीत. प्रशासन निर्णय घेण्यात आडकाठी घालते, सभापतींना साधेही चहापानही मिळत नाही. त्यामुळे ही समिती बरखास्त करा किंवा अधिकार द्या, असा आक्रोश महिला व बालकल्याण समिती सभापती वत्सला खैरे यांनी सभागृहात व्यक्त केला. त्यामुळे महापौरासंह नगरसेवकही आवाक् झाले.

क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीसाठी साधा हारही खरेदी करता येत नसेल तर ही समिती काय कामाची? असा सवाल वत्सला खैरे यांनी उपस्थित केला. अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी त्यांच्या प्रश्नांना सहमती दर्शवली आहे. तर महापौर अशोक मुर्तडक यांनी आयुक्तांसोबत बैठक घेवून नव्या जीआरनुसार कामकाज करण्याचे आदेश दिले आहेत.

महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत मंगळवारी महिला व बालकल्याण विभागाचे सभापती व सदस्यांची कोंडी आणि अधिकारांची झालेली अहवेलना समोर आली. सभापती खैरे यांनी समितीच्या कामकाजाची लक्तरे वेशीवर टांगली. सभागृहात त्यांनी समितीला व सभापतींना काही अधिकार नसल्याची खंत व्यक्त केली. सरकारच्या १५ योजना आहेत. परंतु, एकही योजनेवर निर्णय घेण्याचा अधिकार नाही. १० लाखापर्यंत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे महिला व बालकल्याण आयुक्तांनीच दिले असतांना त्यांच्यावर अंमलबजाणी केली जात नाही. सावित्रीबाई फुले जयंतीला साधा हार घेण्याचा अधिकार सुद्धा नाही ही लाजीरवाणी बाब आहे. सभापतीला साधे पाणी देण्यासाठी शिपाई सुद्धा नाही. मग अशा खुर्चीचे करायचे काय? असे सांगत त्यांनी एकतर समितीच बरखास्त करा किंवा अधिकार द्या, अशी मागणी केली. सभापती होवून अपेक्षाभंग झाल्याचे त्यांनी सांगत, अशा समितीचा काय उपयोग? अशी उद्वीग्नता खैरे यांनी व्यक्त केली. अधिकाऱ्यांकडून कामकाजापासून रोखले जात असल्याचा आरोपही

त्यांनी यावेळी केला. महापौरांसह नगरसेवकही समितीची दुर्बलता ऐकून हतबल झाले.

सर्वाधिकार आयुक्तांकडे

खैरे यांचा संताप योग्य असल्याचे सांगत अतिरिक्त आयुक्त सोनवणे यांनी महिला व बालकल्याण बाबतीचे सर्व विषय समितीमार्फत मंजुरीचे अधिकार आयुक्तांनी दिल्याचे सांगितले. उपयुक्त योजनांचा ठराव समितीने केल्यास त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

आयुक्तांसोबत बैठक

महापौर अशोक मुर्तडक यांनी खैरे यांच्या संतापाची दखल घेत तातडीने आयुक्तांसोबत बैठक घेणार असल्याचे सांगितले. आयुक्त परत आल्यानंतर गटनेते, पदाधिकारी व सभापतींची एकत्रित बैठक घेवून हा प्रश्न सोडविला जाईल. समितीला सरकारने दिलेले अधिकार असून त्यानुसार कामकाजासाठी प्रयत्न केले जातील. सरकारच्या धोरणानुसार काम समिती करू द्या, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

वडनेर-पाथर्डी रस्त्यावर एल अँन्ड टी कंपनीसमोरील मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ शिवसेना उपनेते बबन घोलप यांच्या हस्ते करण्यात आला.

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक रु. १ लाख, द्वितीय ५१ हजार, तृतीय ३१ हजार, चतुर्थ २१ हजार व चषक दिले जाणार आहे. स्पर्धेत राज्यातील ३२३ संघांना प्रवेश देण्यात आला आहे. गेल्या १० वर्षांपासून ही स्पर्धा भरवली जाते. यंदा सांगली सातारा, मुंबई, पुणे, औरंगाबाद, भुसावळ आदी शहरांतील संघांना प्रवेश देण्यात आला आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी दर्जेदार मैदान व खेळपट्टी तयार करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधारी पुन्हा तापविणार पाणीप्रश्न

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील संभाव्य पाणीटंचाई संदर्भात उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने मांडलेला ११ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तहकूब करण्यात आला आहे. या प्रस्तावावर आयुक्तांच्या उपस्थितीत स्वतंत्र महासभा घेण्याचे आदेश महापौरांनी दिल्याने पाणीप्रश्न कायम तेवत ठेवण्याचा निर्धार सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केला असून पुन्हा भाजपची कोंडी केली जाणार आहे. दरम्यान, गोदावरी सफाईसाठी एक कोटीचा ठेका देण्याच्या विषयासह, इंग्रजी शाळा संदर्भातील प्रस्तावही तहकूब करण्यात आले आहे. तर सदस्यांच्या विकासकामांचे विषय मंजूर करण्यात आले आहेत.

शहरातील संभाव्य पाणीटंचाईवर मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने ११ कोटी रुपये मिळावेत, असा प्रस्ताव महासभेत सादर केला. शहरात नव्याने बोअरवेल्स करणे, गंगापूर धरणावर नवीन पॅनल्स बसविणे, चेहेडी बंधाऱ्यावर फ्लोटिंग पंपसेट बसविणे, पाईपलाईनची दुरुस्ती, टँकर भाड्याने घेण्यासाठी ११ कोटींची गरज आहे. नाशिकचे हक्काचे पाणी पळविल्याने सरकारनेच हा निधी द्यावा, अशी मागणी सभागृहाकडून करण्यात आली. घरकूल प्रकरणी धुळे कोर्टात साक्षीसाठी गेल्याने आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम मंगळवारी अनुपस्थित होते. त्यामुळे पाण्याच्या सर्व विषयांवर आयुक्तांच्या उपस्थितीत चर्चा होणे अपेक्षित असल्याने त्यासाठी स्वतंत्र महासभाच घेणार असल्याचे महापौर अशोक मुर्तडक यांनी सांगितले. त्यामुळे पाणीकपातीवरून पुन्हा सर्वपक्षांकडून भाजपचे घेरले जाणार आहे. गोदा पात्रातील पानवेली व कचरा बोटीने काढण्यासाठी एक कोटी २ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तहकूब केला आहे. सोबतच सेमी इंग्रजी शाळांचे धोरण ठरविण्यासंदर्भातील विषयही तहकूब ठेवण्यात आले. तर सदस्यांच्या विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

तारांगण समितीची घोषणा

यशवंतराव चव्हाण तारांगण व सायन्स सेंटर सल्लागार समितीची घोषणा महापौरांनी केली. समितीत लोकप्रतिनिधींना स्थान देण्यात आले आहे. प्रशासनाने अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, या समितीत महापौरांसह पदाधिकाऱ्यांनीही घुसखोरी केली आहे. उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, गटनेते यांचा समावेश असलेल्या या समितीच्या अध्यक्षस्थानी महापौर असतील. तर आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांसह प्रशासनाने सुचविलेले सदस्य आता समितीचे सदस्य राहणार आहे.

ब्रॅण्ड अॅम्बेसिडर मंजूर

स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी ब्रॅण्ड अॅम्बेसिडर नियुक्त करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. परंतु, ब्रॅण्ड अॅम्बेसिडर एक असणार की प्रस्तावातील सर्व नावे असतील याचा निर्णय गटनेत्यांच्या उपस्थित केला जाणार आहे. धावपटू कविता राऊत, सायकलपटू डॉ. महाजन बंधू, चित्रकार सावंत बंधू, अभिनेता चिन्मय उदगीकर या सर्वांचीही निवड केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकापेक्षा जास्त ब्रॅण्ड अॅम्बेसिडर मिळण्याची शक्यता आहे.

उद्याने बचत गटांना मिळणार

महापालिकेने शहरातील २८६ उद्यानांची देखभाल व दुरुस्तीचे काम बचतगटांना दिले होते. मात्र, महापालिकेच्या या निविदा प्रक्रियेला बचतगटाकंडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महापालिकेने ठेकेदारांसाठी नियमावली तयार केली होती. ही नियमावलीच बदलण्याचा प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे. बचतगटांसाठी आवश्यक नियमात अधिका‌धिक सवलती देण्याची सूचना सदस्यांनी केली. त्याचा स्वीकार करत प्रस्ताव मंजूर झाला आहे.

शिवाजी चुंभळेंना संधी

स्थायी सभापती शिवाजी चुंभळे यांना मंगळवारच्या सभेत महापौरांच्या पिठासनावर पाच मिनिटे बसण्याची संधी मिळाली. महापौर बाहेर गेल्यास महापौरांच्या खुर्चीवर उपमहापौर गुरूमीत बग्गा बसतात. मात्र, बग्गा हे बोलण्यासाठी पिठासनावरून खाली आले. तर महापौरांना बाहेर जायचे होते. त्यामुळे महापौर अशोक मुर्तडक यांनी ज्येष्ठतेनुसार चुंभळे यांना पिठासन अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली. चुंभळे यांनीही मग पाच मिनिटासाठी पिठासन खुर्चीवर बसून महासभेचे नेतृत्व केले.

सहाणे-महापौर आमने सामने

महासभेत सदस्य एखाद्या विषयावर बोलल्यानंतर निघून जातात. त्यामुळे शेवटपर्यंत गटनेत्यांना किल्ला लढवावा लागतो. त्यामुळे मंगळवारच्या महासभेत सर्वप्रथम गटनेत्यांना बोलण्याची संधी देण्यात आली. शिवसेनेचे नगरसेवक शिवाजी सहाणे यांनी बोलू देण्याची विनंती महापौरांकडे केली. मात्र, बोलू दिले नसल्याने सहाणे संतप्त झाले. बदलेल्या नियमावलीवरून साने व महापौर आमने सामने आले. परस्पर नियमावली कशी करतात? असा सवाल सहाणे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी आयटीआयला अनुदानाचा लाभ!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील खासगी आयटीआयमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना वेतन अनुदान देण्याच्या प्रश्नावर मंत्रालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत सकारात्मक दिशेने मंथन झाले. खासगी आयटीआय संस्थांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या दालनात बैठक झाली. हे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश पाटील यांनी दिले.

खासगी आयटीआयला भेडसावणारे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. नाशिक जिल्ह्यात सुमारे २२ खासगी आयटीआय असून यातील सुमारे ५०० कर्मचाऱ्यांना संभाव्य सकारात्मक निर्णयाचा फायदा होणार आहे. तर ७०:३० या विभागणीनुसार विद्यार्थ्यांनाही शिक्षणासाठी अनुदान देण्यात येईल. यात विद्यार्थ्याची ७० टक्के फी सरकार तर ३० टक्के फी व्यवस्थापन भरण्याच्या दृष्टीनेही विचार होत आहे. या निर्णयाचाही लाभ जिल्ह्यात सुमारे १६०० विद्यार्थ्यांना होणार आहे.

राज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले, की शिक्षकांना वेतन अनुदान दिल्यानंतर संस्थाचालकांना आक्षेप असता कामा नये, म्हणून शिक्षक आणि संस्थाचालक संघटनांच्या मागण्यांचा अभ्यास करून खासगी आयटीआयचे चांगले मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक आणि सचिवांना याबाबतची संपूर्ण माहिती एकत्रित करण्यास सांगितले आहे. तीन आठवड्यानंतर याबाबतची बैठक घेऊन पुढील आराखडा तयार केला जाईल.

या संदर्भात राज्य अशासकीय आयटीआय प्राचार्य, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते यांनीही माहिती दिली. ते म्हणाले, की वैयक्तिक शैक्षणिक पद मान्यतेबाबतची सखोल चर्चा बैठकीत झाली. शिवाय संचालकांना सहसंचालकांकडून आयटीआय कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी याबाबतची माहिती संकलित करण्याचे निर्देश राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे वेतन अनुदानाचा प्रश्न बहुतांश सुटणार आहे.

मनुष्यबळाच्या कौशल्य विकसनात खासगी आयटीआयची भूमिकाही महत्त्वाची आहे. कौशल्य व उद्योजकता विकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्याकडे मंगळवारी झालेली बैठक सकारात्मक आहे. याचे फलित म्हणून कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अनेक सकारात्मक बाबी घडण्याची आशा जागृत झाली आहे.

- संजय बोरस्ते, अध्यक्ष, अशासकीय प्र्राचार्य संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टीडीआर धोरण फेटाळले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्य सरकारच्या नव्या टीडीआर धोरणाला मंगळवारी महासभेत सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविला. या धोरणामुळे शहर विकासावर दूरगामी परिणाम होणार असल्याचा ठपका ठेवत शासनाचे टीडीआर धोरण चार तासांच्या चर्चेनंतर फेटाळण्यात आले आहे. सध्याच्या धोरणातील जाचक अटी रद्द करण्याचा ठराव शासनाला पाठविण्याचे आदेश महापौर अशोक मुर्तडक यांनी दिले आहेत. त्यामुळे आता टीडीआरवरून महापालिका विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटला आहे.

टीडीआर धोरणाविरोधात मंगळवारी महासभेत सर्वपक्षीय गटनेत्यांनी प्रस्ताव सादर करीत चर्चेची मागणी केली. भाजपसह शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष गटाने या धोरणाला सभेत तीव्र विरोध केला. शहर विकासाला घातक ठरणारे हे धोरण फेटाळण्याची मागणी सदस्यांनी महापौरांकडे केली. संबंधित टीडीआर धोरण हे बड्या बिल्डरांच्या भल्याचे असून, हा नाशिकचा कणा मोडण्याचा डाव असल्याचा आरोप सदस्यांनी केला. या टीडीआर धोरणातून मुंबई व नागपूरला का वगळले, असा सवाल शिवसेना नगरसेवक शिवाजी सहाणे यांनी केला. ७० टक्के नाशिक हे सहा व साडेसात मीटर रस्त्यावर वसले आहे. त्यामुळे या धोरणामुळे शहराचा विकास थांबणार असून, सामाजिक व आर्थिक स्वास्थ्य बिघडणार आहे. महापालिकेने आतापर्यंत एक हजार कोटी रुपये किमतीची २० लाख स्क्वेअर मीटर जागा ताब्यात घेतली आहे. परंतु, नव्या निर्णयामुळे महापालिकेला एक इंच सुद्धा जागा ताब्यात घेता येणार नाही. बड्या बिल्डरांची घरे स्वस्त होणार असून, छोट्या व्यावसायिकांची घरे महागणार आहेत. त्यामुळे धोरण असंतोष निर्माण करणारे असल्याचा टाहो नगरसेवकांनी फोडला. महापौरांनी हा निर्णय अंसतोष वाढविणारा असल्याचे सांगत, जाचक अटी रद्द करण्याचा ठराव करून तो शासनाला पाठविण्याचा निर्णय जाहीर केला. पालिका बिल्डरांसह सामान्यांच्या पाठिशी उभे राहिली असून, शासन विरुद्ध महापालिका असा संघर्ष रंगणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यथा उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
बारावीची परीक्षा उद्यापासून (दि.१८) सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित मागण्या मंजूर करवून घेण्यासाठी ज्युनिअर्सच्या प्राध्यापकांनी असहकार आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कायम विनाअनुदानित मधील कायम शब्द कागदोपत्री वगळल्यानंतरही शिल्लक असणारी त्याची अंमलबजावणी, राज्यातील अधांतरी आयटी शिक्षकांचे स्थैर्य आणि संच मान्यतेमधील त्रुटी या प्रमुख मागण्यांसह तब्बल २५ मागण्यांच्या यादीसाठी ज्युनिअर्सच्या प्राध्यापकांनी उच्च व माध्यमिक बोर्डाचे नाक दाबले आहे.

वर्षानुवर्षापासून ज्युनिअर कॉलेजमधील बहुतांश प्राध्यापकांच्या मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी दोन वर्षांपूर्वी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कारही टाकण्यात आला होता. याच आंदोलनाची पुनरावृत्ती यंदा पुन्हा होते आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षकांची वस्तूस्थिती सरकारपुढे मांडण्याचा प्रयत्न असून विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याची संघटनेची भूमिका नाही, अशी माहिती संघटनेचे राज्य सरचिटणीस संजय शिंदे यांनी 'मटा' शी बोलताना दिली. या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डालाही मंगळवारी देण्यात आले.या बहिष्कार आंदोलनाच्या कालावधीत प्रत्येक दिवसाकाठी केवळ एकच उत्तरपत्रिका तपासेल, अशा पध्दतीने असहकार आंदोलन करण्यात येणार आहे. ज्युनिअर्सच्या प्राध्यापकांचे आंदोलन पेटल्यास त्यास सरकार कारणीभूत राहील, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे सचिव अनिल महाजन,उपाध्यक्ष डी. जे. दरेकर, डी. एल. कदम, महिला प्रतिनिधी एम. डी. निचळ आदी उपस्थित होते.

वेळोवेळी सामंजस्याची भूमिका घेऊनही सरकारचा योग्य प्रतिसाद नाही. आश्वासनांची पूर्तता नाहीच. विद्यार्थ्यांना वेठीला धरण्याचा उद्देश नाही. मात्र, त्यामुळे हे असहकार आंदोलन आहे.

प्राध्यापक संजय शिंदे ,

राज्य सरचिटणीस, शिक्षक महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप सरकारचा माकपकडून निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सर्वांना शिक्षण सर्वांना रोजगार मिळालाच पाहिजे, मोदी सरकार होश मे आओ, देशकी एकता टूट रही है नौजवानो एक हो जाओ, जो हिटलर की चाल चलेगा वो कुत्तेकी मौत मरेगा यांसारख्या घोषणा देत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मोदी सरकार विरोधातील रोष व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले.

पक्षाच्या केंद्रीय कार्यालयावर रविवारी हल्ला करण्यात आला. तसेच माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा पक्षाच्या शहर समितीने निषेध केला. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देणे व तत्सम घटना घडल्यास कायद्यानुसार चौकशी होऊन कारवाई करावी. मात्र, अशा घटनेचा आधार घेऊन डाव्या व पुरोगामी चळवळीतील तरुण विद्यार्थ्यांना देशद्रोहासारख्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून केला जातो आहे. धर्मांध शक्तींचा खरा चेहरा उघड होत असून आणीबाणी सदृश दहशत सर्वत्र अनुभवायला येत असल्याचा आरोप माकपच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. आंदोलनात अॅड. वसुधा कराड, श्रीधर देशपांडे, तानाजी जायभावे, सचिन भोर, सीताराम ठोंबरे, दिनेश सातभाई आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीडीआर’विरोधात सर्वपक्षीय संताप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या नव्या टीडीआर धोरणाविरोधात मंगळवारच्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकजूट दाखवत अन्यायाला वाचा फोडली. नवे टीडीआर धोरण अन्यायकारक असून त्यामुळे नाशिकच्या विकासाला ब्रेक लागणार असल्याचा आरोप करण्यात आला. सुमारे साडेतीन तास बैठकीत चर्चा होवून नवे धोरण फेटाळण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला आहे. तर टीडीआर धोरणावरून सर्वपक्षीयांनी भाजपला पुन्हा घेरले.

महासभेत नगरसेवकांनी धोरणाची चिरफाड करत, नाशिकचा विकास कसा खुंटणार याची आकडेवारीच सभागृहात सादर केला. राज्य सरकार सर्वच निर्णय नाशिकसाठी मारक घेत असल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला आहे. मनसेने भाजपला लक्ष करत सरकारचा निषेध करून भाजपवर पुन्हा हल्लाबोल केला. पाण्यापाठोपाठ टीडीआरमुळे भाजपवर दोन पाऊल मागे येण्याची वेळ आली आहे.

आमचा पक्ष नाशिककर

नव्या टीडीआर धोरणामुळे महापालिकेला पॅरीलिसीस अॅटक येणार आहे असा आरोप उपमहापौर गुरूमीत बग्गा यांनी आरोप केला. टीडीआर धोरणामुळे महापालिकेने गेल्या काळात २० लाख चौरस मीटर जागा संपादित केली असून सुमारे एक हजार कोटी रुपयांवर आहे. या निर्णयामुळे मोठ्या जागेची किंमत कमी आणि छोट्या जागेची किंमत जास्त होणार आहे. सरकार ऐकत नसेल तर मग आम्ही पक्षभेद विसरू. त्यावेळेस आमचा पक्ष हा नाशिककर असेल, असा इशारा बग्गा यांनी दिला आहे.

मोरुस्करांचे खडे बोल

भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी एकतर्फी किल्ला लढविला. हा निर्णय नव्या ले-आऊटलाच लागू करावा यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत. सरकार संवेदनशील आहे. सरकार चुकेल तिथे आवाज काढा. मात्र, कधीतरी आपणही चुकतो त्याबद्दलही सत्ताधाऱ्यांनी विचार करावा, असा टोला त्यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७९० उमेदवारांचे सदस्यत्व होणार रद्द!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गतवर्षी एप्रिलमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च अजूनही सादर न करणाऱ्या उमेदवारांना त्यांचे सदस्यत्व गमवावे लागणार आहे. खर्च सादर करण्याची शेवटची मुदत सोमवारी सायंकाळी संपली. सुमारे ७९० सदस्यांनी खर्चच सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता बळावली आहे.

गतवर्षी जिल्ह्यातील ५९७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका एप्रिलमध्ये झाल्या. निवडणुकीचे निकालही लगेचच महिनाभरात जाहीर झाले. निवडणुकीत केलेल्या खर्चाचा तपशील जिल्हा ग्रामपंचयात निवडणूक शाखेकडे सादर करणे उमेदवारांना बंधनकारक आहे. निवडणुकीत वारेमाप खर्च तर केला गेला नाही ना यावर निवडणूक विभाग लक्ष ठेऊन असतो. जिल्ह्यातील २००० हून अधिक उमेदवारांनी निवडणूक शाखेकडे खर्चच सादर केला नाही. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसाही पाठविल्या. मात्र, त्याकडेही उमेदवारांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे अशा उमेदवारांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. तत्पूर्वी उमेदवारांना शेवटची संधी देण्याचे सुचविण्यात आले. त्यानुसार खर्च सादर करण्यासाठी त्यांना आणखी एक संधी देण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी सोमवारी (दि. १५ फेब्रुवारी) रोजी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवडणुकीतील खर्चाचा तपशील आणि खुलासा सादर करणे आवश्यक होते. मात्र, या मुदतीपर्यंत केवळ एक हजार २१६ उमेदवारांनी खर्च जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. ७९० उमेदवारांनी खर्च सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाकडून केली जाण्याची शक्यता बळावली आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनाच खर्च सादर करणे बंधनकारक आहे. ज्या उमेद्वारांनी निवडणुकीपूर्वीच माघार घेतली त्यांना खर्च सादर करण्याची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images