Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आरटीई प्रवेश बुधवारपासून

$
0
0

पालकांना २ ते १६ मार्च या काळात विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन प्रवेशासाठी http://rte25admission.maharashtra.gov.in या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहे. नोंदणी १६ मार्चला बंद होऊन त्यानंतर लगेचच ड्रॉ पद्धतीला सुरुवात केली जाणार आहे. ड्रॉ १८ ते २२ मार्च दरम्यान काढले जाणार आहे.

या प्रक्रियेत किंवा नियोजनात काही बदल झाल्यास वरिष्ठ कार्यालयाकडून पालकांना त्याबाबत माहिती दिली जाणार आहे. तसेच महापालिका शिक्षण विभागाच्या शरणपूर रोडवरील कार्यालयात संपर्क साधता येणार आहे.

शाळांमध्ये मदतकेंद्र आरटीई प्रवेशाबाबत पालकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी या प्रक्रियेशी निगडित शाळांनी मदतकेंद्र सुरू करण्यात आले आहेत. शाळेच्या दर्शनी भागात २५ टक्के प्रवेशाचा फलक लावावा, फलकावर ऑनलाइन प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्राची यादी प्रसिद्ध करावी, असे आवाहनही विभागाचे प्रशासनाधिकारी उमेश डोंगरे यांनी केले आहे. विद्यार्थ्याचा पासपोर्ट फोटो, जात प्रमाणपत्र, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी पालकांच्या सक्षम प्राधिकारणाचा १ लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा दाखला, अपंग लाभार्थी बालकांसाठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र, विद्यार्थ्याचा जन्मदाखला आवश्यक आहे. तसेच पालकाचा रहिवासी पुरावा, आधारकार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसेन्स, घरपट्टी, पाणीपट्टी यापैकी एक आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाहू खैरेंचे ‘पिछे मुड’!

$
0
0

भाई जगतापांची मध्यस्थी; स्थायी सदस्यपदी लक्ष्मण जायभावे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका स्थायी समितीच्या सदस्यपदी वर्णी लागावी यासाठी कॉँग्रेसमध्ये बंडाळी झाली होती; मात्र रविवारी काँग्रेस प्रभारी भाई जगताप यांनी बैठक घेत हा तिढा सोडविला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत स्थायी सदस्यपदासाठी लक्ष्मण जायभावे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीत काँग्रेसतर्फे झालेल्या बंडळीची दखल घेत शहर प्रभारी आमदार भाई जगताप यांनी रविवारी विश्रामगृहावर बैठक घेतली. स्थायी सदस्य निवडीत पक्षाने जायभावे यांचे नाव दिले असताना गटनेते शाहू खैरे यांनी पक्षाचा आदेश डावलत स्वतःचे नाव पुढे सरकविले. त्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाळी उफाळून आली होती. गटनेताच फुटल्याने या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेत शहराध्यक्ष शरद आहेर यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीकडे त्याचा अहवाल सादर केला. त्याची दखल घेत जगताप रविवारी नाशिकमध्ये दाखल झाले. शासकीय विश्रामगृहामध्ये सकाळी ११ वाजता पक्षाचे नगरसेवक, ज्येष्ठ नेते यांच्याशी चर्चा करून सायंकाळी या प्रकरणाचा अहवाल त्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पाठविला. त्यामुळे खैरे यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

जगताप यांनी सकाळी बैठक सुरू होताच काँग्रस नगरसेवकांशी चर्चा केली. प्रत्येकाची मते जाणून घेत जायभावे यांचे नाव निश्चित केले. त्यानंतर लगेचच शाहू खैरे यांनी महापौरांकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला व सदस्यपदी लक्ष्मण जायभावे यांची नियुक्ती करावी असे पत्र दिले. बैठकीला जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, प्रभारी शहराध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री शोभा बच्छाव, हेमलता पाटील, वत्सलाताई खैरे, शिवाजी गांगुर्डे, माजी शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्यासह नगरसेवक व कॉँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबईहून पत्र उशिरा आल्याने काँग्रेस गटनेते शाहू खैरे यांनी आपले नाव स्थायी समितीच्या सदस्यासाठी दिले होते; मात्र त्यांच्यासह लक्ष्मण जायभावे यांच्याशी चर्चा केल्यानंतर तिढा सुटला. त्यामुळे स्थायी समितीच्या पदासाठी जायभावे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

- भाई जगताप, कॉँग्रेस प्रभारी

मिनिटभरानंतर 'एक्झीट'

काँग्रेस प्रभारी भाई जगताप यांच्यासोबत पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असतांना त्यांनी शाहू खैरे आणि लक्ष्मण जायभावे यांच्याशी समोरासमोर चर्चा केली. तसेच पक्षातील अन्य पदाधिकाऱ्यांचीही मते जाणून घेतली. बैठक सुरू असतांना शाहू खैरे मिनिटभरासाठी हॉलच्या बाहेर आले. त्यांची सहकाऱ्यांशी चर्चा झाली. या घडामोडीनंतर सायंकाळी त्यांनी स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा महापौरांकडे पाठविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विदर्भात गारपीट; नाशकात ‌शिडकावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक दोन प्रकारच्या हवांचे मिश्रण होऊन निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे रविवारी अमरावती जिल्ह्यात गारपीट झाली. चांदूर बाजार तालुक्यात रस्त्यांवर गारांचा थर साचला होता. तर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात हलक्या सरी कोसळल्या. येत्या दोन दिवसांत विदर्भातील ५० टक्के भागांत वादळी पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, नाशिकमध्ये रविवारी पावसाच्या हलक्या शिडकाव्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर मार्चमध्ये गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने आहे.

एकीकडे उकाड्याने घामाच्या धारा वाहू लागल्या असतानाच विदर्भ, उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र, पावसाच्या धारा लागल्या आहेत. विदर्भातील अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात रविवारी गारपीट झाली. तर नागपूर जिल्ह्यात वादळी पाऊस झाला. जळगावच्या रावेरमध्येही रविवारी वादळीवाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला. या अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्ष, डाळींब आणि रब्बी हंगामातील गहू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर जळगावच्या रावेर तालुक्यातील पाल परिसरात रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास वादळीवाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला. सातपुडा पर्वतरांगेतील पाल परिसरात लिंबाएवढ्या गारा पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले, तर गारबर्डी धरणाजवळ विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंकरलाल स्वामी अर्ध मॅरेथॉनचे विजेता

$
0
0

२१ के मॅरेथॉनसाठी धावले १० हजार नाशिककर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहर पोलिसांसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या २१ के मॅरेथॉन स्पर्धेमध्ये १० हजारांपेक्षा अधिक नाशिककरांनी सहभाग नोंदवला. आर्टीलरी सेंटरमधील शंकरलाल स्वामी यांनी २१ किलोमीटरच्या अर्ध मॅरेथॉनचा किताब पटकवला. मॅरेथॉन स्पर्धेमुळे पोलिस आणि नागरिकांचा संवादाचा पुल आणखी मजबूत झाल्याची प्रतिक्रिया पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी यावेळी व्यक्त केली.

शहर पोलिसांनी नाशिक-२१ के या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत १२ हजारांपेक्षा जास्त स्पर्धकांनी नोंदणी केली. रविवारी सकाळी गोल्फ क्लब येथून स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धा ४ गटांत पार पडली. शंकरलाल स्वामीने १ तास ९ मिनिटे आणि ५८ सेकांदात २१ किलोमीटर अंतर कापत अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे ​जेतेपद पटकावले. २१ किलोमीटरच्या ४० वर्षापुढील गटात वसंत आहिरे यांनी १ तास ३१ मिनिटे आठ सेंकदाचा कालावधी घेत पहिला क्रमांक पटकावला. शहर पोलिसांचे आंतरराष्ट्रीय धावपट्टू नंदू उगले यांना १ तास ३३ मिनिटे आणि ५२ सेकांदाचा वेळ लागला. तृतीय क्रमांकावर माणिक निकम राहिले. याच अंतरासाठी १८ ते ४० वयोगटातील महिलांमध्ये पोलिस दलातील मंजू सहाणी, योगिता वाघ आणि अंजली सहाणी यांनी बाजी मारली. मंजू यांनी १ तास ३६ मिनिटे आणि ५७ सेकांदात अंतर कापले. स्पर्धेला महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमीत बग्गा, आमदार देवयानी फरांदे, अपूर्व हिरे, जिल्हा​धिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, सभागृह नेते सलीम शेख, नगरसेवक तानाजी जायभावे, गुलझार कोकणी, दामोदर मानकर आदी मान्यवरांनी सहभाग नोंदवला. स्पर्धकांना पोलिस स्टेशन पातळीवर प्रमाणपत्र दिली जाणार आहेत.


संवाद अधिक मजबूत व्हावा

शहर पोलिसांनी झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला. याबाबत बोलताना पोलिस आयुक्त जगन्नाथन यांनी सांगितले, की सर्वसामान्य नागरिक आणि पोलिसांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे दरी निर्माण झालेली असते. मॅरेथॉनच्या आयोजनातून ती दूर करण्याची संधी मिळाली. नाशिककरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. लहान मुले, महिला, वृध्द, तरुण सर्वांनीच हिररीने सहभाग नोंदवल्याने पोलिसांचा उत्साह वाढला आहे. मॅरेथॉनच्या निमित्ताने सुरू झालेला संवाद आणखी मजबूत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

स्पर्धेतील विजेते

तीन किलोमीटर : १८ ते ४० वयोगट (पुरूष)

१) व्ही. संजय संधू, २) गणेश पवार, ३) वरुण चौधरी

तीन किलोमीटर : ४० व त्यापुढील वयोगट (पुरूष)

१) पुंडलिक महाले, २) सुभेदार राणा, ३) मोतीराम धोत्रे

तीन किलोमीटर : १८ ते ४० वयोगट (महिला)

१) वर्षा चौधरी, २) प्रगती मुळाणे, ३) विनिता भोबे

तीन किलोमीटर : ४० व त्यापुढील वयोगट (महिला)

१) शिल्पा जैन, २) विद्या भाबड, ३) हिरा रामेश्वर राजू

पाच किलोमीटर : १८ ते ४० वयोगट (पुरूष)

१) नितीन गावित, २) भागिरथ गायकवाड, ३) धर्मेद्र यादव

पाच किलोमीटर : ४० व त्यापुढील वयोगट (पुरूष)

१) पांडुरंग ताजनपुरे, २) राजेंद्र कुलकर्णी, ३) बाळासाहेब पवार

पाच किलोमीटर : १८ ते ४० वयोगट (महिला)

१) शीतल भगत, २) कोजागिरी बच्छाव, ३) रिषू सिंग

पाच किलोमीटर : ४० व त्यापुढील वयोगट (महिला)

१) कल्पना शिंदे, २) राधिका बारगळ, ३) सरिता जाधव

१० किलोमीटर : १८ ते ४० वयोगट (पुरूष)

१) रॉबीन सिंग, २) ​टिंकू यादव, ३) हरि सिंग

१० किलोमीटर : १८ ते ४० वयोगट (महिला)

१) योगिता गवळी, २) निर्माला चौधरी, ३) ललिता कांबळे

२१ किलोमीटर : १८ ते ४० वयोगट (पुरूष)

१) शंकरलाल स्वामी, २) दत्ता बारसे, २) निरज कुमार

२१ किलोमीटर : ४० व त्यापुढील वयोगट (पुरूष)

१) वसंत अहिरे, २) नंदू उगले, ३) माणिक निकम

२१ किलोमीटर : १८ ते ४० वयोगट (महिला)

१) मंजू सहाणी, २) योगिता वाघ, ३) अंजली सहाणी



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीची परीक्षा उद्यापासून

$
0
0

दोन लाख विद्यार्थ्यांचा सहभाग

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला मंगळवार, १ मार्चपासून सुरुवात होणार आहे. नाशिक विभागातील २ लाख ८ हजार ६४० विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून जिल्ह्यातील ९४ हजार १६९ विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे.

मराठी भाषेच्या पेपरने परीक्षेस सुरूवात होणार आहे. परीक्षेचा ताण विद्यार्थ्यांवर येऊ नये, यासाठी समुपदेशन व हेल्पलाईनची सुविधा मंडळातर्फे उपलब्ध करून दिली आहे. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, सिंधी या सहा भाषांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. विभागात ४१३ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असून यापैकी १८४ केंद्र नाशिक जिल्ह्यातील आहेत. परीक्षा केंद्रांवर कॉपीसारखे गैरप्रकार होऊ नये, यासाठी दक्षता पथक, शिक्षणाधिकारी यांचा सहभाग असलेली ६ भरारी पथकांची नजर केंद्रांवर असणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनसेवा

परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना ताणतणाव जाणवणे, शंका उपस्थित होणे यासारख्या समस्या जाणवू शकतात. हा ताण कमी करण्याच्या उद्देशाने विभागीय मंडळातर्फे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या संपूर्ण कालावधीत ही सेवा विद्यार्थ्यांसाठी खुली राहणार आहे.

जिल्हा....समुपदेशक...संपर्क

नाशिक......विजय हिरे............९५९५६६७८१६,

जळगाव....दयानंद महाजन........९३७०६१४९५९

धुळे.........एल. बी. पाटील.......९४२१८९०८७५

नंदुरबार....राजेंद्र माळी.............९४२३१९४२१२

असे आहे परीक्षेचे वेळापत्रक

परीक्षेच्या वेळापत्रकानुसार १ मार्चला मराठी, ३ मार्चला हिंदी, ५ मार्चला इंग्रजी, ८ मार्चला बीजगणित, १० मार्चला भूमिती, १२ मार्चला विज्ञान व तंत्रज्ञान (पेपर १), १५ मार्चला विज्ञान व तंत्रज्ञान (पेपर २), १७ मार्चला इतिहास राज्यशास्त्र, १९ मार्चला भूगोल अर्थशास्त्र, २२ मार्चला आयसीटी, २८ मार्चला संस्कृत याप्रमाणे पेपर आहेत.

....

ग्राफिक्ससाठी

जिल्हा....विद्यार्थी संख्या....केंद्र....पर्यवेक्षक

नाशिक........९४,१६१.......१८४....२५

धुळे............३०,१७१........६२.....०८

जळगाव........६३,५७९....१२७.....१८

नंदुरबार ........२०,७२१ ....४०.......०७

एकूण........२,०८,६४०....४१३.....५८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी मंत्री निहाल अहमद यांचे निधन

$
0
0

मटा प्रतिनिधी, नाशिक

माजी मंत्री व जनता दलाचे जेष्ठ नेते निहाल अहमद यांचे आज सकाळी नाशिक येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. नाशिक येथील वोक्तरा या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांचा निधनाच्या वृत्तानंतर मालेगावमध्ये सर्वच स्तरातून शोक व्यक्त होतो आहे. आज रात्री ९ वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गरिबांचा नेता अशी त्यांची राजकारणात आणि समाजात ओळख होती. त्यामुळे मालेगावची गरीब मजूर जनता पोरकी झाल्याची भावना व्यक्त होते आहे.

निहाल अहमद यांचे वडील स्वतंत्र्य सैनिक होते. त्यामुळे सामाजिक कार्याचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला होता. भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी १९४७ ला सोशालिस्ट पक्षात प्रवेश करून आपल्या राजकीय करकीर्दीला सुरवात केली. मालेगाव शहरातील गरीब जनतेच्या यंत्रमाग कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आंदोलनं केली. त्यामुळे गरिबांचे नेते अशी लोकप्रिय ओळख त्यांनी निर्माण केली.

१९५४ च्या निवडणुकीत पहिल्यांदा ते नगरसेवक झाले. १९६२ ला नगराध्यक्षपद त्यांनी भूषवले. या नंतर अनेक निवडणुकांमध्ये त्यांचा राजकीय आलेख चढता राहिला. १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा आमदार म्हणून ते निवडून आले. तर १९७८ ते ८७ दरम्यान ते कॅबिनेट मंत्री राहिले. तर २००२ मध्ये मालेगाव महापालिकेचे पहिले महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला.

एस.एम. जोशी यांचे मानसपुत्र म्हणून देखील ते साऱ्यांना परिचित होते. त्यांच्या निधनाने राजकारणातील गरिबांचा नेता हरवल्याची भावना सर्वत्र व्यक्त होते आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव बुलंद इकबाल निहाल अहमद हे त्यांचा राजकीय वारसा चालवीत आहेत. मालेगाव मनपा ते नगरसेवक आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा

$
0
0

टीम मटा

नाशिक जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी बेमोसमी पावसाबरोबरच गारपिटीने जोरदार तडाखा दिला. मालेगाव, मनमाड, नांदगाव, सिन्नर या तालुक्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस व गारपीट झाली. काढणीला आलेला कांदा व द्राक्ष पिकांना या आपत्तीने मोठा फटका बसला आहे. गहू तसेच आंब्यासाठीही हा पाऊस घातक ठरला आहे.

गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही बेमोसमी पाऊस व गारपीट होते की काय, या भीतीने द्राक्ष बागायतदारांच्या पोटात गोळा आला आहे. संपूर्ण जिल्ह्यात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी ऊन-सावलीचा दिवसभर खेळ सुरू होता. रविवारी जिल्ह्याच्या काही भागांत पाऊस झाला होता. पण गारपीट झाली नसल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला होता. मात्र, हा दिलासा औटघटकेचाच ठरला. सोमवारी पावसाबरोबरच गारपिटीनेही दणका दिल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नांदगाव तालुक्यात भालुर गावात जोरदार गारपीट झाली. त्यामुळे काढणीला आलेला कांदा व द्राक्षांचे नुकसान झाल्याचे समजते. एकवई व धनेर गावांच्या परिसरातही गारपीट झाल्याचे वृत्त आहे. मालेगाव तालुक्यात काही गावांमध्येही वादळी वा-यासह पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. वाऱ्यामुळे विजेचे खांब कोसळले, तर काही ठिकाणी वृक्षही कोलमडले. मालेगाव शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडी खुशी, थोडा गम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आयकरातील सूट आहे तशीच ठेवणे, बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना, वाहन क्षेत्राला करवाढीचा दणका आणि पायाभूत सोयी-सुविधांसाठी गुंतवणूक. एकंदरीतच थोडी खुशी, थोडा गम अशा प्रकारचा सूर विविध मान्यवरांनी व्यक्त केला. देशाच्या अर्थसंकल्पाचा अन्वयार्थ नाशिककरांना कळावा यादृष्टीने 'महाराष्ट्र टाइम्स'च्यावतीने विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. हॉटेल एसएसके सॉलिटेअर हे या चर्चासत्राचे व्हेन्यू पार्टनर होते.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यंदाचा अर्थसंकल्प कसा आहे आणि कुठल्या क्षेत्रावर त्याचा कसा परिणाम होणार आहे. यासाठीच विशेष चर्चासत्राचे आयोजन तिडके कॉलनीतील हॉटेल एसएसके सॉलिटेअरमध्ये करण्यात आले. त्यात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील, क्रेडाईचे माजी अध्यक्ष अनंत राजेगावकर, चार्टर्ड अकाउंटंट संजय बुरड, अर्थतज्ज्ञ सतीश श्रीवास्तव, कृषी अभ्यासक डॉ. गिरधर पाटील, ग्रामविकास अभ्यासक अश्विनी कुलकर्णी, वाहन उद्योजक ओम मोहरीर, हॉटेल व्यावसायिक अतुल चांडक, गुंतवणूक सल्लागार प्रमोद पुराणिक, व्यापारी संघटनेचे अनिल बुब, निमाचे माजी अध्यक्ष अभय कुलकर्णी, बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांनी सहभाग घेतला.

नोकरदारांना कररचनेत बदल अपेक्षित होता. पण, तो झाला नाही. करासाठी अडीच लाखाची मर्यादाच कायम ठेवण्यात आली आहे. पायाभूत सोयी-सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) आणि बांधकाम या उद्योगाला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात उपाययोजना करण्यात आली आहे. बांधकाम क्षेत्राला उद्योगाच्या दृष्टीने पाहून आणि सर्वसामान्यांना घरे उपलब्ध होण्यासाठीच विविध प्रकारच्या

तरतूदी करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने ५० लाखांपर्यंतचा फ्लॅट घेणाऱ्यांना गृहकर्ज व्याजात सूट, सर्व्हिस टॅक्सची सूट यांचा समावेश आहे. त्यामुळे येत्या २-३ वर्षातच मोदी सरकारच्या प्रयत्नांचे यशापयश दिसून येईल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. प्रास्ताविक आणि

सूत्रसंचालन 'मटा'चे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांनी केले. 'टाइम्स'च्या ब्रांच हेड मंजिरी शेख यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीला ‘सायकलिस्ट’

$
0
0

दुर्गम भागात अनेक विद्यार्थी वाहतुकीची साधने नसल्यामुळे कित्येक किलोमीटर पायपीट करीत शाळेत जातात. ऊन, पाऊस वारा याचा सामना करीत त्यांना शिक्षण घ्यावे लागते. या संकटांचा सामना करणे दररोज शक्य होत नसल्याने त्यांच्या शाळेमधील उपस्थितीवर देखील परिणाम होतो. त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहतात. नेमकीच हीच बाब लक्षात घेऊन 'नाशिक सायकलिस्ट'ने सायकल डोनेशन हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. घरात अडगळीत पडलेल्या सायकली नाशिक सायकलिस्टला द्या; त्या गरजू विद्यार्थ्यांना वापरासाठी उपलब्ध करून देऊ, असे या उपक्रमाचे स्वरुप आहे.

दरवर्षी होणार ऑडिट प्रथम या सायकली 'नाशिक सायकलिस्ट'कडे जमा केल्या जातील. त्यानंतर त्या वापरण्यायोग्य करून जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा यांना सोपविण्यात येतील. या सायकलींवर शाळांची जबाबदारी राहील. गरजेनुसार वर्षभरासाठी या सायकली विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील. शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर संबंधित विद्यार्थी ती सायकल आपल्या शाळेमध्ये पुन्हा जमा करतील. नाशिक सायकलिस्टतर्फे या वाटप केल्या जाणऱ्या सायकलींचे प्रतिवर्षी ऑडिट केले जाईल.

येथे साधा संपर्क सामजिक भान जपणारा आणि निरंतर सुरू राहणारा हा उपक्रम पहिल्यांदाच नाशिक सायकलिस्टतर्फे राबवण्यात येत आहे. या उपक्रमात नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. यासाठी शिवशक्ती सायकल्स, शिवशक्ती चौक, सिडको तसेच शिवशक्ती सायकल्स, जायंट- स्टारकेन शोरूम, शंकाराचार्य न्यास जवळ, जुना गंगापूर नाका, किशोर काळे (८९७५८३०७११), याशिवाय लुथरा एजन्सी, विहार मिसळसमोर, जुना गंगापुर नाका, गंगापूर रोड गौरव लुथरा (९०९६७८२४०१) या संकलन केंद्रावर सायकली जमा कराव्यात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निहाल अहमद यांचे निधन

$
0
0

निहाल अहमद यांचे निधन

--

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक/मालेगाव

--

ज्येष्ठ समाजवादी नेते साथी निहाल अहमद (वय ९०) यांचे वृद्धापकाळामुळे नाशकात सोमवारी सकाळी निधन झाले. समाजवादाचा अखेरचा चिरा पडला, अशी रास्त प्रतिक्रिया त्यांच्या निधनानंतर उमटली. जनता दल (सेक्युलर)चे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व माजी विरोधी पक्ष नेते राहिलेले निहाल अहमद (वय ९०) यांना रविवारी श्वसनाचा त्रास जाणवल्याने मालेगावहून नाशिक येथील वोक्हार्ट रुग्णालयात हलविण्यात आले होते. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना सकाळी दहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. निहाल अहमद यांच्या पश्चात दोन पत्नी, पाच मुले, चार मुली असा परिवार आहे. चिरंजीव बुलंद इकबाल हे त्यांचा राजकीय वारसा चालवत असून, ते मालेगाव महापालिकेत नगरसेवक आहेत.

समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेचा आवाज बुलंद करतानाच, अर्धशतकाहून अधिक काळ सर्वसामान्य

जनतेच्या मनावर निहालभाईंनी अधिराज्य केले. सोशालिस्ट पार्टी, प्रजा समाजवादी पक्ष, जनता पक्ष, जनता दल, जनता दल (सेक्युलर) असा राजकीय प्रवास करीत त्यांनी राजकारणात आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातला झंझावात काळाच्या पडद्याआड गेल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सोमवारी रात्री नऊला मालेगावच्या त्यांच्या हजारखोली येथील निवासस्थानातून अंत्ययात्रा काढण्यात आली. रात्री उशिरा बडा सोनापूर कब्रस्तानात त्यांचा दफनविधी झाला.

आमदार ते मालेगावचे प्रथम महापौर

२२ मे १९२६ रोजी जन्मलेल्या साथी निहाल अहमद यांना लहान वयातच समाजसेवेचे वेध लागले होते. अल्पवयातच त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. १९६७ ते १९७२ व १९७७ ते १९९९ या काळात त्यांनी मालेगावची आमदारकी भूषविली. १९७७ ते १९८० राज्याचे उच्च व तांत्रिक शिक्षण व रोजगार हमी योजना विभागाचे ते मंत्री होते. १९८६ ते १९८९ विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपदही त्यांनी भूषविले होते. १९६२ साली मालेगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी आरूढ होऊन शहराच्या विकासाचा पाया रचणारे निर्णय घेत, त्यांनी शहराचा विकास साधला. २००२ साली मालेगाव महानगरपालिकाचे प्रथम महापौर होण्याचा बहुमानही त्यांनी मिळविला होता. १९९० च्या सुमारास निहालभाईंमध्ये आमूलाग्र बदल घडत मुस्लिम नेत्याची त्यांची छबी निर्माण झाली. अयोध्येतील बाबरी मशिद विध्वंस प्रकरणी त्यांनी निषेध आंदोलने केली. बाबरी विध्वंसाविरोधात अखेरपर्यंत हातावर काळी पट्टी लावत ते वावरले.

चालती-फिरती सभा!

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचे नेतृत्व निहालभाईंनी केले होते. गोवा संयुक्त महाराष्ट्र मुक्ती लढाईचे ते जनक व स्वातंत्र्यसैनिकही होते. उर्दू साप्ताहिकच्या माध्यमातून लिखाण करून अनेक ज्वलंत समस्या त्यांनी उजागर करतानाच, सर्वसामान्य जनतेशी ते नाळ जुळवून होते. मालेगावमधील अनेक आंदोलने त्यांनी गाजविली. पोलिसांच्या जमावबंदी आदेशाला न जुमानता खांबावर चढत त्यांनी किदवाई रोडवर राजकीय सभा घेतली व सभेला आलेल्या लोकांना एकाच ठिकाणी उभे न राहता चालता-फिरता सभा ऐका, असे आवाहन करून सभा घेतली. या प्रकाराने पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करता आली नाही. निहाल अहमद यांनी जमावबंदी आदेशाविरूध्द लढविलेली शक्कल आजही मालेगावात चर्चिली जाते. ही सभा खूप गाजली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेमोसमीच्या हजेरी धास्तावला बळीराजा

$
0
0

टीम मटा नाशिक जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी बेमोसमी पावसाबरोबरच गारपिटीने जोरदार तडाखा दिला. कांद्रा, द्राक्ष, गहू, आंबा या पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ हवामान, हलका पाऊसगारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास यंदाही हिरावला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

मागील वर्षाप्रमाणेच बेमोसमी पाऊस व गारपीट होण्याची चिन्हे असल्याने शेतकरी चिंतेत आहे. गेल्या वर्षी सलग बाराही महिने पावसाने हजेरी लावली होती. कांदा व द्राक्षाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आतापर्यंत शेतक-यांना शासकीय मदतीचे धनादेश मिळत आहेत, तर अद्यापही अनेक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या वर्षी आलेल्या आपत्तीमुळे यंदाच्या वर्षात शेतकरी आत्महत्या वाढल्याचे दिसून आले आहे. त्यातच यंदा पाणीटंचाईही जाणवत असल्याने बळीराजावर दुहेरी संकट ओढावलेले आहे.

नांदगाव तालुक्यात भालुर गावात जोरदार गारपीट झाली. त्यामुळे काढणीला आलेला कांदा व द्राक्षांचे नुकसान झाल्याचे समजते. गहू व हरभरा पिकाचेही काही ठिकाणी नुकसान झाल्याचे वृत्त आहे. काही गावांमध्ये काढणीला आलेला गहू पाऊस व वा-यामुळे आडवा पडला आहे. तालुक्यात भाजीपाल्याचेही नुकसान झाल्याचे समजते. एकवई व धनेर गावांच्या परिसरातही गारपीट झाली. मात्र, तेथे जास्त नुकसान झालेले नाही. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पाऊस झाला. मालेगाव तालुक्यात काही गावांमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. वाऱ्यामुळे विजेचे खांब कोसळले, तर काही ठिकाणी वृक्षही कोलमडले. मालेगाव शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे मालेगावकरांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागला. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सुभद्राबाई उगले या वीज पडून जखमी झाल्या आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेचे ‘वाघ’ शिवसेनेत

$
0
0

म टा प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले महापौर अॅड. यतीन वाघ, स्थायी समिती माजी सभापती रमेश धोंगडे आणि सातपूर प्रभाग समितीचे माजी सभापती अरविंद शेळके यांनी सोमवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. वर्षभरावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीच्या तोंडावर मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यानिमित्ताने मनसेमधील संदोपसुंदी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

महापौरपदावरून पायउतार झाल्यानंतर अॅड. वाघ मनसेपासून दरावले होते. वसंत गिते यांच्या गोटातील असा शिक्का बसलेले वाघ यांच्यासह धोंगडे आणि शेळके सुरुवातीस भारतीय जनता पक्षात जाणार अशी चर्चा सुरू होती. मनसेतील अस्वस्थ पदाधिकारी कोणत्या पक्षात सहभागी होणार, याची चर्चा सुरू असताना सोमवारी सकाळी त्यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन शिवबंधन घातले. यानंतर, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शालिमार येथील शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, आमदार योगेश घोलप, सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे, सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड, शिवाजी सहाणे, सत्यभामा गाडेकर, विनायक पांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

इतर पक्षातील पदाधिकारी इच्छूक महापालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इतर पक्षातील अनेक नगरसेवक पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छूक आहे. शिवसैनिक म्हणून काम करण्यास तयार असलेल्या प्रत्येकास काम करण्याची संधी देण्यात येईल, असे सूचक वक्तव्य संपर्क प्रमुख अजय चौधरी यांनी केले. वाघ, शेळके आणि धोंगडे यांना कोणत्याही अटी शर्थीशिवाय प्रवेश देण्यात आला असून हेच धोरण आगामी काळात कायम राहणार असल्याचे चौधरी यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिवसेनेचे १९ मार्चला जनआंदोलन सरकार नाशिकवर सातत्याने अन्याय करीत आहे. हक्काचे पाणी पळवून नेण्यात आले. मात्र, जलसंपदा मंत्र्यानी हातावर हात ठेवले. शहरात गुन्हेगारांचे राज्य निर्माण झाले असून दिवसाढवळ्या खून घडत आहे. आम्ही सत्तेत असलो तरी सरकार जमा झालेलो नाही. सरकारचे काही निर्णय चुकत असतील त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे. याच भूमिकेतून येत्या १९ मार्चला आम्ही नाशिकसाठी जनआंदोलन उभे करणार असल्याचे शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी स्पष्ट केले. एकलहरे येथील प्रकल्प पळवणे, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन, गुन्हेगारी अशा मुद्यांवर विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जाणार आहे.

मनसे म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी माजी आमदार वसंत गिते यांच्या गटातील असल्याचा ठपका ठेवत पक्षाने आमची उपेक्षा केली. एका ठराविक कंपूने पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली असून त्यास वरिष्ठांनी खतपाणी दिल्याचा आरोप माजी महापौर अॅड. वाघ यांनी केला. मागील दीड वर्षात अनेकदा राज ठाकरे यांच्यापर्यंत आमचे म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक पदाधिकारी व संपर्कप्रमुखांनी तसे होऊच दिले नाही. स्वायत्त म्हणून तयार झालेल्या पक्षाचे निर्णय इतर पक्षातील पदाधिकारी कसे घेऊ शकतात, असा प्रश्न अॅड. वाघ यांनी उपस्थित करीत राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या युतीबाबत नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांना संधीच दिली जात नसल्याने आणि त्यातच सुरू असलेल्या गटबाजीला कंटाळून आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इतर पक्षातील अनेक असंतुष्ट पदाधिकारी व नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहे. आमच्यापर्यंत येणाऱ्या सर्वांना समावून घेण्यात येईल. अॅड. यतीन वाघ व इतरांना मनसेने खूप काही दिले. त्यांनी पक्षाशी प्रातरणा केल्याचा आरोप होतो. मात्र, मनसेने काय केले? स्वत:चे घर काचेचे असताना दुसऱ्यांच्या घरावर दगडफेक का करायची?

- अजय चौधरी, संपर्कप्रमुख, शिवसेना

पक्षातील गटबाजी आणि कामाची चुकीची पध्दत यामुळे आम्ही त्रासलो होतो. पक्षाध्यक्ष राज ठाकरेंकडे अनेकदा पोहचण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही पदाधिकाऱ्यांनी त्यास यश येऊ दिले नाही. पक्षाला आमची गरज राहिली नसल्याचे दिसत असल्याने पक्षामध्ये थांबून काही साध्य होणार नव्हते. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला.

- अॅड. यतीन वाघ, माजी महापौर

मनसेने ज्यांना भरभरून दिले तेच आता प्रतारणा करीत आहे. पक्ष कार्यकर्त्यांवर चालतो. पक्षाशी ताकद अशा पदाधिकाऱ्यांमुळे कमी होणार नाही. आगामी निवडणुकीत सर्व चित्र स्पष्ट होईल. पक्षप्रमुखांनी दगडाला शेंदूर फासला होता. तो आता निघाला. स्वार्थी व कृतघ्न चेहरे पक्षातून बाहेर पडल्याने खऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल.

- राहुल ढिकले, शहराध्यक्ष, मनसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लघु उद्योगांना ‘मुद्रा’चे बूस्ट

$
0
0

संतोष मंडलेचा

देश अन् राज्यांतर्गत चालणारे लघुउद्योग विकासपर्वातील महत्त्वाचे टप्पे आहे. देशाच्या एकूणच अर्थकारणामध्ये अलिकडच्या काळात वाढलेले लघु उद्योगांचे योगदान नजरेआड करून चालणार नाही. लघुउद्योगांची ही अफाट क्षमता लक्षात घेत पंतप्रधानांनी या उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी मुद्रा बँकेच्या माध्यमातून बूस्ट देऊ केले आहे. लघु व कुटीर उद्योगांच्या अर्थ सहाय्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा बँक योजना जाहीर करण्यात आली. छोटे व्यापारी, कुटीर उद्योग करणारे उद्योजक, यांना अर्थसहाय्य करण्यासाठी ही योजना आणली आहे. यामुळे छोट्या उद्योगांना सहजगत्या कर्ज पुरवठा होईल व उद्योगांच्या वाढीमुळे रोजगार निर्मिती होईल अशी संकल्पना यात मांडण्यात आली आहे.

नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणावर लघु उद्योग आहेत. मुद्रा बँकेच्या माध्यमातून सहाय्य घेत तरुणांनी नवे व्हीजन ठेवल्यास उद्योगाच्या नव्या संधी तरुणांना प्राप्त होतील. उद्योजक, व्यावसायिक यांनी बँकेतून कर्ज घ्यायचे म्हटल्यास अनेक प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. तारण व जामीन दिल्याशिवाय त्यांना बँका कर्ज देत नाहीत, यासाठी कुठल्याही प्रकारचे तारण अथवा जामीन दिल्याशिवाय होतकरू तरुणांना उद्योजकांना त्यांना लागणारे कर्ज मुद्रा बँक योजनेद्वारे उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना पंतप्रधानांनी अस्तित्वात आणली. यासाठी सुमारे हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या योजनेतून कर्ज उपलब्ध झाल्यामुळे सावकारांकडून कर्ज घेऊन होणाऱ्या व्याजखोरीतून उद्योजकांची सुटका व्हावी असा या मागचा उद्देश आहे. मोठे उद्योग हे सव्वाकोटी लोकांना रोजगार देतात. तर देशातील छोटे उद्योग हे १२ कोटी लोकांना रोजगार देत आहेत. छोट्या उद्योगांचा विकास होणे गरजेचे आहे. सहाजिकच त्यांना अत्यल्प दरात व सुलभतेने कर्ज पुरवठा व्हावा यासाठी हा प्रयत्न सरकारने केला आहे. या योजनेद्वारे तरुणांबरोबरच ज्या महिला घरगुती उद्योग करीत आहेत त्यांनाही सहजपणे कर्ज पुरवठा या योजनेंतर्गत होऊन त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील व आपला व्यवसाय, उद्योग वाढवू शकतील. या योजनेत प्रोत्साहन म्हणून सबसिडी देण्याचीही तरतूद आहे.

मुद्रा बँकेच्या माध्यमातून तीन योजना राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये शिशु ऋण योजना, किशोर ऋण योजना, तरूण ऋण योजना यासारख्या उपयुक्त योजनांचा समावेश आहे. शिशु ऋण योजनेंतर्गत ५० हजार रूपयांपर्यंत कर्ज पुरवठा केला जाईल. किशोर ऋण योजनांतर्गत ५० हजार ते ५ लाख रूपयांपर्यत कर्ज दिले जाईल. तर तरूण ऋण योजनेंतर्गत ५ ते १० लाख रूपयांपर्यंत कर्ज देण्याची योजना आहे.

अशा प्रकारच्या उद्योगांना प्रोत्साहन दिल्यामुळे उद्योगांची वाढ होईल. त्याचबरोबर देशातील पैसा हा देशातच राहील अशीही या मागची भूमिका आहे. छोट्या व्यावसायिक व उद्योजकांमध्ये आत्मविश्वास वाढून स्पर्धा निर्माण होण्यास मदत होईल. परिणामी त्यांच्या विकास त्यातून होईल. या योजनेद्वारे कर्ज घेण्यासाठी अत्यंत सुटसुटीत पद्धत अमलात आणली आहे. त्यानुसार बँकेने तयार केलेला सुटसुटीत अर्ज भरून द्यावा लागेल. त्याचबरोबर स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा, उद्योगाची नोंदणी केली असल्याचा दाखला, उद्योगाच्या योजनेचा तपशील, पुढील वर्षाचा संकल्पित ताळेबंद व छायाचित्राच्या प्रती सोबत द्याव्या लागतील. अर्जदाराने मात्र इतर कोणत्याही बँकेतून कर्ज घेतलेले नसावे अशी अट त्यामध्ये आहे.

सुरुवातीस काही मर्यादित क्षेत्रापर्यंत ही योजना लागू करण्यात आली असली तरी भविष्यात त्याचा विस्तार करण्यात येईल. या योजनेत मुद्रा कार्ड, पोर्ट फोलिओ अशा योजनांचाही समावेश करण्यात येईल. छोटे उद्योजक, सेवा देणारे उद्योग, कुटीर उद्योग यांना सुलभतेने कर्ज पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी अमलात आणलेली ही योजना अत्यंत दूरदर्शी आहे. ग्रामिण भागाला समोर ठेऊन ग्रामिण जनतेचे राहणीमान सुधारावे. त्यांनी व्यवसायाकडे वळावे, रोजगार निर्मिती करावी अशा चांगल्या उद्देशाने सुरू केलेली ही योजना अद्याप पाहिजे तेवढी लोकप्रिय झालेली नाही. त्याचा योग्य प्रचार व प्रसार झाल्यास ही योजना निश्चित रोजगार निर्मितीसाठी सहाय्यभूत ठरेल यात शंका नाही.

(लेखक महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चरचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी बचतीत महापालिका नापास

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, सिडको
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेतर्फे पाणीबचतीबद्दल प्रबोधन मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु जनजागृतीनंतरही शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय सुरू असून, या मोहिमेत महापालिका नापास झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेने याबाबत आता कडक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता नाशिक महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणीकपात सुरू केली आहे. तसेच रहिवाशांमध्ये पाण्याचा जपून वापर करण्याबाबत महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी प्रबोधन करीत आहेत. ज्या भागात पाणी बचतीचे आवाहन करण्यात आले होते, त्याच भागात पुन्हा पाण्याची नासाडी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी नगरसेवकांच्या संपर्क कार्यालयासमोरच पाण्याचा अपव्यय सुरू आहे.
या प्रकारामुळे सिडको, सातपूरच्या कामगार वस्तीत पिण्याच्या पाण्याचे महत्त्व अद्यापही रहिवाशांना समजलेले नसल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपासून महापालिकेच्या दोन पथकांद्वारे सिडको व सातपूरच्या रहिवाशी भागात पाणी बचतीचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला दोन दिवस उलटत नाहीत तोवर पाण्याची नासाडी सुरू झाली आहे. गाड्या धुणे, सडा टाकणे, फरशी धुणे यासारखे प्रकार या भागात सर्रास होताना दिसत आहेत. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर महापालिकेने दंडात्मक कारवाईसह नळ कनेक्शन बंद करावे, अशी मागणी नागरिक करीत आहे‌त.

नगरसेवकांचे दुर्लक्ष
एक दिवस पाणी वेळेवर आले नाही किंवा आलेच नाही तर रहिवाशांच्या तक्रारीवरुन नगरसेवक महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरतात. परंतु हेच नगरसेवक रहिवाशांना पाणी बचतीचे आवाहन का करीत नाहीत?, असा सवाल एका अधिकाऱ्याने 'मटा'शी बोलताना उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​महिला दिनानिमित्त स्पर्धांचे आयोजन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प
येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर महिला मंडळ व चॅलेंज क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थिनींच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन स्पर्धांना सुरुवात झाली. यावेळी चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्याता आल्या. शनिवार (५ मार्च) केशरचना स्पर्धा, ६ मार्चला पाककला स्पर्धा व निबंध स्पर्धा, खुल्या गटासाठी 'माय माझी सरस्वती', या विषयावर छायाचित्र स्पर्धा, 'आई सोबत माझा संवाद', या विषयावर लेखन स्पर्धा तर 'आई' याचा विषयावर काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक राजेंद्र श्रीवंत, किरण वावरे, प्रसाद वडगावकर यांनी दिली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा महिला दिनी म्हणजेच ८ मार्चला भगूर येथे होणार आहे. यावेळी चित्रकला व रांगोळी स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून विद्या बलकवडे, भारती साळवे, सुनिता गोळे, ज्योती कापसे, जितेंद्र भावसार, विक्रम कवटे, देविदास वाघ उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कुंडारीया यांनी केले तर आभार जयमाला पाटोळे यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहशत ‘डी गँग’ची!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड
जेलरोड परिसरात डासांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. डासांच्या झुंडी नागरिकांवर हल्ले करीत असल्याने इथले आरोग्य धोक्यात आले आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच ही डासांची समस्या उभी राहिली आहे.
या डासांच्या बेसुमार वाढीचे मुख्य कारण आहे ते दसकच्या गोदावरीतील पाणवेली आणि खालच्या बंधाऱ्यात साचलेले पाणी. यामुळे डासांच्या गँग वरच्या म्हणजेच जेलरोडच्या दिशेने हल्ले चढवत आहेत. विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे याबाबत बोलताना म्हणाले की, नदीतील पाणवेली काढून तिथे औषध फवारणीचे काम सुरू आहे.
जेलरोडच नव्हे तर नाशिकरोड भागात धुराळणीच बंद झाली असल्याची माहिती या भागातील रहिवाशी डॉ. शरद मोरे यांनी दिली. डासांच्या नायनाट करणाऱ्या रॅकेटचा खपही या भागात मोठ्या प्रमाणावर आहे. डासांमुळे मलेरिया, डेंग्यूंच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे डॉ. शरद मोरे यांनी सांगितले. या डासांचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी रहिवाशांमधून होत आहे. नदीखालील बंधारा लवकरच फोडण्यात येणार असल्याने आठवडाभरात डासांची संख्या कमी होईल, असा विश्वास जेलरोडचे नगरसेवक अशोक सातभाई यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजी चौकातील उद्यान अखेर स्वच्छ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, सिडको
संभाजी चौकातील पाटील प्रेस्टीज व पोकार रेसिडेन्सी परिसरात असलेल्या उद्यानाला अवकळा आल्याची बातमी 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रसिध्द करताच महापालिकेची यंत्रणा जागी झाली. नुकतीच महापालिकेतर्फे या उद्यानाची स्वच्छता करण्यात आली आहे. महापालिकेने आठवड्यातून किमान दोन वेळा स्वच्छता मोहिम राबविण्याची मागणी रहिवाशांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केली.
'संभाजी चौकातील उद्यानाला अवकळा', अशा आशयाची बातमी 'मटा'मध्ये प्रसिद्ध झाल्यावर महापालिकेला या दुरवस्थेची दखल घ्यावी लागली. यानंतर उद्यान व आरोग्य विभागाने तत्काळ रहिवाशांची भेट घेत स्वच्छता मोहिम राबविणार असल्याचे सांगितले. यानंतर बांधकाम, उद्यान व आरोग्य विभागाने संभाजी चौक उद्यानात स्वच्छता मोहीम राबवत उद्यान चकाचक केले आहे. याबाबत पाटील प्रेस्टीज व पोकार रेसिडेन्सी येथील रहिवाशांनी 'मटा'चे देखील आभार मानले. महापालिकेने आठवड्यातून किमान दोनवेळा उद्यानांची स्वच्छता करावी, या उद्यानांमधील मोडलेली खेळणी दुरुस्त करावीत अशी अपेक्षा रहिवाशांनी व्यक्त केली. पोलिसांनी देखील सुरक्षेसाठी सांयकाळी या भागात पेट्रोलिंग करावे, असे मत रहिवाशांनी व्यक्त केले. पोलिसांनी पेट्रोलिंग केल्यास उद्यानाची नासधुस होणार नाही व उद्यानही सुरक्षीत राहिल असे संभाजी चौकातील रहिवाशांचे म्हणणे आहे.
'मटा'मध्ये बातमी प्रसिध्द होताच महापालिका कर्मचाऱ्यांनी रहिवाशांची भेट घेतली. यानंतर दुसऱ्याच दिवशी महापालिकेचे कर्मचारी आपल्या टीमसह दाखल झाले व त्यांनी उद्यान चकाचक केले. या बातमीबद्दल आभार.
प्रशांत गिते, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राममंदिर परिसरात काँक्रिटीकरणाला सुरुवात

$
0
0


देवळाली कॅम्प : येथील वॉर्ड क्रं.२ मध्ये असणाऱ्या राममंदिर परिसरात काँक्रीटीकरण करण्यात येत असून या भागातील रहिवाशी सीमा बुटे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. विद्या विनय सोसायटीमधील नागरिकानी गेल्या कित्येक दिवसांपासून काँक्रिटीकरणाची मागणी केली होती. ही मागणी अखेर पूर्ण झाली आहे. यावेळी लीलाबाई पाटील, शेवंताबाई चव्हाण, मालती पाटील, सुरेश फल्ले, सुधाकर पाटील, सतीश ठाकरे यांच्यासह सोसायटीतील सभासद यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीईचे प्रवेश आजपासून आॅनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राईट टू एज्युकेशन (आरटीई) या नियमांतर्गत नर्सरी आणि पहिल्या इयत्तेसाठी बुधवारपासून (दि. २) ऑनलाइन प्रवेशांना सुरूवात होणार आहे. महापालिका हद्दीतील विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वंय अर्थसहाय्यता शाळांमध्ये या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. इच्छुकांनी http://rte25admission.maharashtra.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

स्वंय अर्थसहाय्यता गटामध्ये अल्पंसख्यांक निकषांतर्गत मान्यता असलेल्या शाळा वगळण्यात आल्या आहेत. या वर्गातील व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये आरटीईंतर्गत संबंधित शाळेच्या इयत्ता पहिलीच्या पटाच्या २५ टक्के जागांवर वंचित व दुर्बल घटकांसाठी यापूर्वीही ऑनलाइन पध्दतीने मोफत प्रवेश देण्यात आला आहे. २५ टक्के शाळा प्रवेश मिळविताना पालकांची गैरसोय टळावी व प्रवेश सुलभ पध्दतीने व्हावा, यासाठी विद्यार्थ्याना त्यांच्या घरापासून एक ते तीन किलोमीटरच्या परिघात प्रवेश मिळण्यासाठी यंदापासून ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात राज्यभरातच प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने घेण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश आहेत. त्यानुसार नाशिक महापालिकेच्या हद्दीत २५ टक्के प्रवेश पात्र शाळांच्या मुख्‍याध्यापकांनी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेसाठी सर्वशिक्षा अभियान, नागरीसाधन केंद्र क्रमांक २ जेतवननगर, जयभवानी रोड नाशिकरोड येथे उपस्थित रहावे, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. ऑनलाइन प्रवेश अर्जांसाठी १६ मार्चपर्यंत वेबसाईट खुली राहणार आहे. यानुसार पहिला ड्रॉ १८ मार्च ते २२ मार्च या कालावधीत काढण्यात येईल. आरटीईंतर्गत प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची ऑनलाइन नोंदणी अद्यावत केली आहे. शाळांनी त्यांच्या आवारात पालकांच्या सुविधेसाठी मदतकेंद्र सुरू करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे, राष्ट्रवादी सदस्यांचा राजीनामा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थायी समितीत प्रत्येक सदस्याला संधी मिळावी या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या सदस्यांचे राजीनामे घेतले असून नवीन सदस्यांची येत्या दोन दिवसात निवड केली जाणार आहे. पक्षांनी सदस्यांचे राजीनामे घेतले असले तरी अद्याप ते महापौरांकडे सुपूर्द करण्यात आले नाहीत. दरम्यान, स्थायी समितीत आता एकूण १५ नवीन सदस्य राहणार आहे. रिक्त जागांसाठी मनसेसह राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये चुरस आहे.

स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत संपल्यानंतर नुकतीच यातील सात सदस्यांची निवड करण्यात आली आहे. तर मनसेच्या एका रिक्त जागेवर मनसेने अद्याप उमेदवार दिलेला नाही. स्थायी समितीत मनसचे पाच, राष्ट्रवादी व शिवसेनेचे तीन, भाजप, काँग्रेसचे प्रत्येकी दोन तर अपक्षाचे एक संख्याबळ आहे. सद्यस्थितीत शिवसेना व भाजप व अपक्षांचा कोटा पूर्ण झाला आहे. राष्ट्रवादी व मनसेने प्रत्येकाला संधी मिळावी यासाठी स्थायीवर दोन ऐवजी एक वर्ष संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार स्थायी समितीवरील मनसेने यशवंत निकुळे, रत्नमाला राणे, मेघा साळवे, संगीता गायकवाड यांचे तर राष्ट्रवादीने शिवाजी चुंभळे, नीलिमा आमले, छाया ठाकरे यांचे राजीनामे घेतले आहेत. मनसेचे पाच, राष्ट्रवादीचे तीन आणि काँग्रेसच्या एक सदस्य अशा नऊ सदस्यांची निवड केली जाणार आहे.

मनसे करणार बंडखोरांवर कारवाई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देवून शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी महापौर अॅड. यतीन वाघ यांच्यासह अन्य दोघा नगरसेवकांवर कारवाईची तयारी पक्षाने सुरू केली आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती गटनेते अनिल मटाले यांनी दिली आहे. त्यामुळे या तिघांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. अॅड. वाघ यांच्यासह रमेश धोगडे, अरविंद शेळके या तिघांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. अॅड. वाघ यांनी अगोदरच पश्चिम विभाग प्रभाग समितीच्या बैठकीत पक्षाचा व्हीप झुगारला आहे. त्यामुळे पक्षाला त्यांच्यावर कारवाई करण्याची संधी आहे. तर पक्षविरोधी भूमिका घेणारे व पक्षाच्या विरोधात थेट माध्यमांसमोर विधाने केल्याने आता त्यांच्यावर कारवाई करण्याच्या विचारात पक्ष आहे. तिघांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देवून शिवसेनेत प्रवेश करायला हवा होता, अशी मनसेची भूमिका आहे. परंतु, या तिघांनी राजीनामे न दिल्याने आता त्यांच्या विरोधात पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तर अपात्रे संदर्भात कायदेशीर सल्ला घेवून रितसर तक्रार केली जाणार असल्याची माहिती मटाले यांनी दिली आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images