Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

खुटवडनगर भागातील कार्तिकेय नगरातील रहिवाशी महिन्याभरापासून पाणीटंचाईला तोंड देत आहेत. याकडे कुणी लक्ष देत नसल्याने महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाला जाग आणण्यासाठी महिलांना हंडा मोर्चा काढावा लागला. यावेळी महिलांचा रोष पाहून पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते.

सध्या शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. पाणीटंचाईची दाहकता वाढीस लागल्याने कपातीवर भर देण्यात आला आहे. मात्र, आता एकवेळही पुरेसे पाणी येत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. कार्तिकेय नगरातील नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे महिलांनी हंडा मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. पाण्याची समस्या लक्षात घेता पोलिसांनी मध्यस्थी करीत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना कार्तिकेय नगर येथे बोलावून निवेदन स्वीकारण्यास सांगितले. यावेळी महिलांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

एक वेळ का होईना परंतु, पुरेसा पाणीपुरवठा मिळत नसल्याचा आरोप महिलांनी केला. यावेळी पाणीपुरवठा अधिकारी बच्छाव व दादाजी आहेर यांनी धरणात पाणीसाठा कमी असल्याने पाणी कमी येत असल्याचे उत्तर दिले. यानंतर महिलांनी पुन्हा अधिकाऱ्यांना लक्ष करीत शहरात केवळ खुटवडनगर भागासाठी धरणात पाणीसाठा कमी झाला का असा प्रश्न उपस्थित केला. यामुळे अधिकारीही निरुत्तर झाले. यानंतर महिलांना शांत करीत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी निवेदन स्‍वीकारले. यावेळी मकरंद वाघ, संजय पटेल, अतुल झोपे यांनीही महिलांसमवेत मोर्चात सहभाग घेतला.

चार घरांना पाणीच नाही महिनाभरापासून पाण्याची समस्या भेडसावत असताना कार्तिकेय नगरातील चार घरांना तर पिण्याचे पाणीच मिळत नाही. शेजारून अथवा हातपंपावरून पाणी आणण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. याबाबत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना माहिती असून देखील पाणी समस्येकडे काणाडोळा करीत असल्याचा आरोप चारही रहिवाशांनी केला.

पाणीपुरवठा अधिकारी नावालाच! सिडकोतील पाणीपुरवठा अधिकारी केवळ नावालाच असल्याचे प्रभाग बैठकीत नगरसेवक नेहमीच आरोप करीत असतात. प्रभागाच्या बैठकीत देखील अधिकारी नेहमीच उपस्थित राहत नसल्याने त्यांची बदली करण्याची मागणी नगरसेवकांनी वेळोवेळी केली आहे. परंतु, महापालिका आयुक्त नगरसेवकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही नगरसेवक करतात. यात सिडकोच्या विस्तारलेल्या भागात सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग व नगरसेवक यांच्याकडे कार्तिकेय नगरातील पाण्याच्या समस्येबाबत वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. परंतु, याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. अखेर महापालिकेच्या सिडको विभागाच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढावा लागला. - मकरंद वाघ, रहिवाशी, कार्तिकेय नगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी मोजाड

0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी भाजपचे वार्ड क्रमांक सातचे नगरसेवक बाबुराव मोजाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सचिन ठाकरे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांच्याकडे उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली.

उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी कॅन्टोन्मेंटच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सीईओ पवार यांनी निवडीसंबंधी मार्गदर्शन केल्यानंतर कार्यवाही सुरू झाली. मावळते उपाध्यक्ष ठाकरे यांनी मोजाड यांचे नाव सुचविल्यानंतर दिनकर आढाव यांनी त्यास अनुमोदन दिले. दुसऱ्या कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे अध्यक्षांनी बाबुराव मोजाड यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे घोषित केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार, ब्रिगेडियर सुधीर सुंदुबरेकर, मेजर पीयूष जैन, नगरसेविका प्रभावती धिवरे, भगवान कटारिया, आशा गोडसे, बाबुराव मोजाड, कावेरी कासार, मीना करंजकर आदी उपस्थित होते. उपाध्यक्षपदी निवड जाहीर होताच समर्थकांनी फटक्यांची आतषबाजी व गुलाल उधळीत मोजाड यांची मिरवणूक काढली. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार वसंत गिते, कर्नल कक्कर, बळवंत गोडसे, दिनकर पाळदे, तानाजी करंजकर, रतन कासार, भाऊसाहेब धिवरे, चंद्रकांत गोडसे यांसह शिंगवे बहुला ग्रामस्थ व देवळालीकर उपस्थित होते. यावेळी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडीयर प्रदीप कौल यांच्या हस्ते मोजाड यांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलादिनानिमित्त ऑफर्सला बहर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागतिक महिला दिन जसजसा जवळ येऊ लागतो, तसतसे मोठमोठ्या दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड झळकू लागतात. महिलावर्गाला आपल्या दुकानांकडे खेचण्याची ही संधी विक्रेते सोडू इच्छित नाही. यंदाही मार्केटिंगची ही ट्रिक विक्रेत्यांनी आजमावली आहे.

महिला दिनाला खरेदीची जोड असेल तर त्यासारखा दुसरा आनंद नाही. हे लक्षात घेत दरवर्षी विविध ऑफर्स विक्रेत्यांकडून दिल्या जातात. यावेळीही या ऑफर्सला बहर आला आहे. यामध्ये प्रामुख्याने कपड्यांच्या दुकानांमध्ये ५० टक्क्यांपासून सुरुवात आहे. मोठ्या ब्रॅण्डेड दुकानांमध्ये जाण्यास अनेकदा मध्यमवर्गीय महिलांना पाय आखडते घ्यावे लागतात. त्याच महिलांची पावले आता ऑफर्समुळे या दुकानांकडे वळू लागली आहेत. कपडे, दागिने, घरगुती वस्तू अशा अनेक वस्तूंवर भरघोस ऑफर्स देण्यात आली आहे.

मुख्य दिवसांना विशेष सूट देऊन मार्केटिंगचे तंत्र विक्रेते साधत असल्याची चर्चाही यानिमित्ताने ऐकण्यास मिळत आहे. दुकानातील वैशिष्ट्येपूर्ण वस्तूंची ओळख करून दिली म्हणजे वर्षभर महिलावर्ग खरेदीसाठी आपल्या दुकानाला प्राधान्य देतील, असा दुकानदारांचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे.

पॅकेजच्या ऑफर्स महिलांचे आरोग्य नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. महिला आरोग्याची काळजी घेत नाही, आहार, व्यायाम याकडे दुर्लक्ष करतात. महिला दिनानिमित्त तरी त्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, या हेतूने शहरातील अनेक फिटनेस सेंटर्सनी विविध ऑफर्स देऊ केल्या आहेत.

टूर्सवरही ऑफ काही नामांकित ट्रॅव्हल एजन्सींकडून महिला दिनानिमित्त विशेष टूर्स प्लॅन करण्यात आल्या आहेत. एरवी फिरायला जायचे म्हणजे मोठी रक्कम भरणे आले. पण, या दिवसासाठी भरघोस सूट देण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही एजन्सीजनी तर मोफत टूर अशा जाहिराती केल्या आहेत. या कंपन्या खरेच अशी सूट देत आहेत की ग्राहकांना ऑफर्समार्फत हूल देत आहेत, पडताळणीतूनच कळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२ हजार शेतकरी बाधित

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यात सात हजार १७१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सुमारे १२ हजार शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला असून, कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. शनिवारी पावसाने उघडीप दिली असली तरी हवामान विभागाने येत्या दोन दिवसात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने २८ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत जिल्ह्यातील पिकांना अक्षरश: झोडपून काढले. गुरुवारी मध्यरात्री तर पावसाने नाशिक तालुक्यात कहरच केला. एकाच दिवसात जिल्ह्यात ११२ मि.मी. पावसाची नोंद झाली. या सहा दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने केवळ पिकांचेच नुकसान केले असे नाही, तर चार व्यक्तींसह अनेक जनावरेही मृत्युमुखी पडली. महसूल मंत्री आणि पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने पंचनाम्यांचे काम हाती घेतले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान कांदा पिकाचे झाले आहे. चार हजार ४२१ हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले असून, सर्वाधिक म्हणजेच तीन हजार ४३५ हेक्टर क्षेत्र एकट्या बागलाण तालुक्यात आहे. मालेगावात ४३० हेक्टर तर नांदगावात २९८ हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. सुमारे ११३० हेक्टरवरील गहू वादळी वाऱ्यासह आलेल्या या अवकाळी पावसामुळे झोपला आहे. त्यामध्ये सर्वाधिक ६३४ हेक्टरवरील गव्हाचे एकट्या निफाड तालुक्यामध्ये नुकसान झाले आहे. ५६४ हेक्टरवरील भाजीपाला आणि ४६९.७१ हेक्टरवरील द्राक्षबागांची हानी झाली आहे. निर्यातक्षम द्राक्षांचे मणी फुटल्याने शेतकऱ्यांना यंदा मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. ३५४ हेक्टरवरील हरभरा आणि १८२ हेक्टरवरील डाळिंबाचेही नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

बागलाणला सर्वाधिक फटका जिल्ह्यात एकूण सात हजार १७१ हेक्टरवरील ‌पिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. सर्वाधिक नुकसान बालगाण तालुक्यातील चार हजार ५०३ हेक्टरवरील पिकांचे झाले आहे. एकूण ११ हजार ७०९ शेतकऱ्यांपुढे या पावसामुळे आर्थिक संकट उभे राहिले असून, त्यामध्ये सात हजार २९६ शेतकरी एकट्या बागलाण तालुक्यातील आहेत. त्याखालोखाल निफाडमधील एक हजार ४२४ शेतकऱ्यांच्या ७३४ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. सर्वात कमी नुकसान येवला तालुक्यात झाले आहे. तेथे दोन हेक्टर क्षेत्रावरील डाळिंबाचे नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांची संख्याही केवळ दोन आहे. जिल्ह्यात एकूण १८६ गावे बाधित झाली असून, एकट्या निफाड तालुक्यातील ४४ गावांचा त्यामध्ये समावेश आहे. मालेगावातील २९, बागलाणमधील २५ आणि त्र्यंबकेश्वरील २३ गावे या अवकाळी पावसामुळे बाधित झाली आहेत.

३५ जनावरे मृत्युमुखी जिल्ह्यात ३५ जनावरांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. त्यामध्ये १३ बैल, ८ गायी, ८ म्हैस, ५ शेळ्या आणि एका वासराचा समावेश आहे. सर्वाधिक ९ जनावरे मालेगाव तालुक्यात मृत्युमुखी पडली आहेत. बागलाणमध्ये आठ तर कळवण, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यात प्रत्येकी तीन जनावरे मृत्युमुखी पडल्याची माहिती प्रशासनाने दिली.

नुकसानग्रस्त पीक एकूण बाधित क्षेत्र ७१७१
& पीक - हेक्टर कांदा ४४२१ गहू ११३० भाजीपाला ५६४ द्राक्षे ४६९ हरभरा ३५४ डाळिंब १८२ फळपिके ५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोतवाल, तलाठी, तहसीलदारवर गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत तलाठी, कोतवाल, तहसीलदार अशा शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांचीही नावे असल्याने खळबळ उडाली आहे.

फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे, कागदपत्रे बनावट असल्याचे ठाऊक असूनही खरे म्हणून दाखवणे, संगनमत करून फसवणूक करणे या कलमांखाली हा गुन्हा दाखल झाला आहे. अॅड. प्रकाश निवृत्त ताजनपुरे (वय ५८, सिन्नरफाटा) यांनी फिर्याद दिली आहे. देवळाली शिवारातील सर्वे क्रं. १९०/१ आणि १९० व/१ फ या जागेची खोटी कागदपत्रे तयार करून फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक करणाऱ्या संशयितांमध्ये देवराम लक्ष्मण अरिंगळे, संजय नेताजी अरिंगळे, रामदास राजू अरिंगळे, दिलीप संतू अरिंगळे (रा. अरिंगळे मळा, सिन्नरफाटा), राहुल रामचंद्र राठी (बिल्डर, राठी सदन), राहुल जोशी (देवळालीगाव), गणेश राठोड (तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधीकरण, तहसील कार्यालय, नाशिक), ए. एल. डावरे ( तेलाठी, देवळालीगाव), प्रवीण ज्ञानेश्वर गोंडाळे (मंडल अधिकारी, देवळालीगाव), गणेश इंगोले (कोतवाल, देवळालीगाव) यांचा समावेश आहे.

तलाठी कार्यालय आणि उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि वरील नमूद संशयितांनी संगनमत केले. त्यांनी वर नमूद केलेली मिळकत बिल्डरला विक्री करता यावी यासाठी बहिणीचे हक्कसोड पत्र घेतले. फिर्यादी प्रकाश ताजनपुरे यांची आजी सुंदराबाई लक्ष्मण अरिंगळे यांचे नाव कमी केले. सुंदराबाईच्या नावे ही जमीन ६० ते ६५ वर्षे होती. त्यांचे निधन झाले होते. मात्र, वरील मिळकतीची खोटी कागदपत्रे तसेच जाहिरात करून आणि जमीन पडिक असल्याचे दाखवून राठी बिल्डर्स यांना बेकायदेशीर विक्री करण्यात आली. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कागदपत्रे खोटी असल्याचे ठाऊक असूनही ती खरी असल्याचे भासवून रेकार्ड तयार केले असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक टी. एम. राठोड तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षकाराला भूलथापा देणे थांबवा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सर्वसामान्य नागरिक न्यायाच्या अपेक्षेने वकिलांकडे पोहचतो. आज ना उद्या आपल्याला न्याय मिळेल, अशी त्याची अपेक्षा असते. वकिली व्यावासाय पैसे कमवण्यासाठी नसतो. त्यामुळे पक्षकाराला भूलथापा देण्याचे काम कधीही करू नका. पक्षकाराचा विश्वास टिकवा. त्यातून न्याय व्यवस्थेवरील सर्वसामान्यांचा विश्वास आणखी दृढ होईल, असे जेष्ठ वकील आणि पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. जेष्ठ वकील अॅड. दौलतराव घुमरे यांच्या तीन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

बदलत्या काळात अनेक कायदे बदलण्याची गरज असल्याचे राष्ट्रपती वेळोवेळी सांगतात. या पार्श्वभूमीवर वकिलांनी सुध्दा अंतर्मुख होण्याची आवश्यकता असल्याचे निकम यांनी स्पष्ट केले. घुमरे यांनी अर्ली ज्युरी प्रड्युइन्स ऑफ क्रॉस एक्झामिनेशन, अॅप्रिसिएशन ऑफ इव्हिडन्स, अंडरकरंट इन मार्कसिझम या तीन पुस्तकांचे कौतुक केले. कालिदास कलामंदिर येथे संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झालेल्या कार्यक्रमास मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती साधना जाधव, अॅड. धैर्यशील पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दिल्लीत कोर्टाच्या आवारात झालेल्या कृत्याचे समर्थन कधीही होणार नाही, असे निकम यांनी म्हटले. न्यायमूर्ती साधना जाधव यांनी घुमरे यांच्या पुस्तकांचे कौतुक करीत वकिलाला पक्षकार व न्यायाधीश यांच्यातील दुवा होण्याचे कसब माहिती पाहिजे, असे नमूद केले. अॅड. पाटील यांनी मार्कसिझमचा विषय बारकाईने विषद केला.

पीडित तरुणीचा जबाब किती वेळा घ्यायचा? या कार्यक्रमादरम्यान अॅड. उज्ज्वल निकम यांनी शक्तिमील बलात्कार प्रकरणाचा उल्लेख केला. बलात्कार पीडित महिलेला सर्वप्रथम फिर्याद द्यावी लागते. नंतर प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांकडे पुन्हा त्याची नोंद होते. कोर्टातही सातत्याने चर्चा होते. तीन वेळेस पीडित महिलेची तक्रार का नोंदवली जाते, असा सवाल अॅड. निकम यांनी उपस्थित केला. न्यायमूर्ती साधना जाधव यांनी हा सामाजिक बदलांमधून उद्भवलेल्या परिस्थितीचा परिपाक असल्याचे म्हटले. महिलेच्या तक्रारीत दबावामुळे बदल होऊ नये, यादृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वाची असल्याचे जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागा एक अन् विद्यार्थी आठ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची आज जिल्हा प्रशासनाने परीक्षा घेतली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चढाओढ असल्याचे शनिवारी पहावयास मिळाले. सुमारे ८०९ विद्यार्थी या परीक्षेला बसले. त्यापैकी १०० विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या अभ्यासिकेत प्रवेश दिला जाणार आहे.

शांतताप्रिय वातावरणात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता यावा आणि प्रशासकीय सेवेतील मान्यवर अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभावे, यासाठी प्रशासनाने गोविंदनगर परिसरात पांडूरंग गायकवाड अभ्यासिका सुरू केली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे आतापर्यंत आयोजिलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेत प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असला तरी सर्वांनाच तेथे प्रवेश देणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांसाठी पूर्वपरीक्षा घेण्यात आली. सीबीएस येथील शासकीय कन्या शाळेत ही ४० गुणांची परीक्षा घेण्यात आली. सामान्य ज्ञानाबरोबरच, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्रवर आधारीत प्रश्न त्यामध्ये विचारण्यात आले. ८०९ विद्यार्थी या परीक्षेला सामोरे गेले. त्यापैकी १०० विद्यार्थ्यांना पुढील सहा महिन्यांसाठी या अभ्यासिकेत प्रवेश दिला जाणार आहे. तेथे पुस्तके, इंटरनेट सुविधेसह प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन लाभेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी भागात साकारणार मेडिकल कॉलेजेस

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये होमिओपॅथी मेडिकल कॉलेज साकारण्यासोबतच राज्याच्या आदिवासी भागांमध्ये मेडिकल कॉलेजची संख्या वाढविण्याचा मानस महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने नव्या बृहद आराखड्यात ठेवला आहे. सन २०१७ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीत लोकसंख्येच्या निकषांनुसार मेडिकल कॉलेजेसच्या संख्येचा समतोल राखण्यावर भर देण्यात येणार आहे.

राज्यात तळागाळापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, या दृष्टीने एकसमान दर्जेदार आरोग्य शिक्षण देण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट असल्याचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले.

विद्यापीठाचा सन २०१७-२२ या कालावधीसाठी सुधारीत बृहत आराखड्याच्या निर्मितीसाठी जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालक, विविध प्राधिकरणांचे सदस्य व संलग्नित कॉलेजेसचे अधिष्ठाता, प्राचार्य व शिक्षण तज्ज्ञ यांच्यासाठी विद्यापीठाच्या नाशिक मुख्यालयात बैठक पार पडली.

यावेळी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर म्हणाले, लोकसंख्येच्या निकषांवर राज्यात नवीन मेडिकल कॉलेजेस वाढविण्यात येतील. राज्याच्या सर्वच भागात रुग्णसेवा मिळण्यासाठी एकसमान दर्जेदार आरोग्य शिक्षण उपलब्ध झाले पाहिजे, हे विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे. यादृष्टीने पुढील टप्प्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर या शहरांमध्येही या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकींमधून आलेल्या सूचनांवर यात मंथन करण्यात आले.

व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. अरुण भस्मे म्हणाले की, विद्यापीठातर्फे राज्याच्या विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करून मागविण्यात आलेल्या सूचना ही स्वागतार्ह्य बाब आहे. विद्यापीठाकडून या आराखड्यात नाशिक येथे स्वतःचे होमिओपॅथी कॉलेज स्थापन करण्याबाबत सुचविण्यात आले.

विद्यापीठाच्या नियोजन विभागाचे प्रभारी संचालक महेंद्र कोठावदे यांनी दृकश्राव्य सादरीकरण करून विद्यापीठाच्या बृहत आराखड्यानुसार विद्याशाखा निहाय, जिल्हानिहाय सुरू करण्यात येणारे कॉलेज, पदवी आणि पदव्युत्तर कॉलेजेस सुरू करणे याबाबतच्या नियमांची माहिती दिली. या बैठकीचे प्रास्ताविक, स्वागत व सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.

या बैठकीसाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कळ, व्यवस्थापन परीषदेचे सदस्य डॉ. अरुण भस्मे, डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. यशवंत पाटील, नियोजन मंडळाचे प्रभारी संचालक महेंद्र कोठावदे व्यासपीठावर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिककर वेठीस

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मतांच्या लालसेपोटी नाशिकच्या हक्काचे पाणी भाजपने मराठवाड्याला पळविल्यानंतर पालिकेतील सत्ताधारी मनसेने उर्वरित पाण्याचे प्रभावीपणे नियोजन करून नाशिककरांना दिलासा देणे अपेक्षित होते. मात्र, दुर्दैवाने मनसेनेही भाजपच्या वाटेवर जात पाण्यावरुन राजकारण सुरू केले आहे. दोन्ही पक्षांच्या कुरघोडीत सामान्य नाशिककरांना वेठीस धरले जात आहे. महापालिकेमार्फत सगळ्यांना पाणी देण्याची जबाबदारी टाळून मनसेने शहरात मोफत पाणी टँकरसेवा सुरू केली आहे. दुसरीकडे ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहेत, ते प्रशासनही भाजपच्या तालावर नाचत असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याचा पुरता खेळखंडोबा झाला आहे.

गेल्या चार महिन्यांपासून नाशिकच्या विकासाचा प्रश्न मागे पडला आहे. महापालिका ते गल्ली असे सर्वत्र पाण्याचीच चर्चा झडत आहे. धरणे उशाशी असल्याने मुबलक पाणी वापरण्याची सवय असलेल्या नाशिककरांवर भाजपने मराठवाड्यांच्या मतांपायी हंडाभर पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ आणली आहे. गंगापूर धरणाचे पाणी जायकवाडीला गेल्यानंतर नाशिककरांना पाण्याची चणचण जाणवत असून, जसजसा उन्हाळा तीव्र होत आहे, तशी पाण्याची दाहकता वाढत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस तापत चालला आहे. शहराचा मुख्य भाग वगळता इतरत्र पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. अशा बिकट परिस्थितीत सत्ताधारी मनसेकडून नाशिककरांना पाणी नियोजनाच्या अपेक्षा होत्या. परंतु, शिल्लक पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याचे सोडून मनसेनेही भाजपच्या नादाला लागून पाण्याचे राजकारण सुरू केले आहे. त्यामुळे सत्ताधारी मनसे, भाजप आणि प्रशासनाच्या तिहेरी कात्रीत नाशिककर जनता भरडली जात आहे.

मनसेने शनिवारी मोफत पाणीसेवा सुरू केली. सात टँकरमार्फत मागेल त्याला पाणी देण्याची मोहीम सुरू करण्यात आली. परंतु, हीच तत्परता मनसेने प्रशासनामार्फत दाखवणे अपेक्षित असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. फसलेल्या प्रशासनाने पाण्याचे फेरनियोजन करण्यासाठी महापौरांचे उंबरठे झिजवण्याचे काम सुरू केले आहे. परंतु, त्यांच्या फेरनियोजनाला संमती दिली जात नसल्याचे चित्र आहे.

फेरनियोजनाची टोलवाटोलवी शनिवारी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम व महापौर अशोक मुर्तडक यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेवून विभागवार पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. यात बहुतेकांनी आठवड्यातून एक दिवस पाणीबंद ठेवण्यावर कल व्यक्त केला. परंतु, सत्ताधारी व प्रशासनाने इथेही निर्णय घेण्यासाठी एकमेकांकडे बोट दाखवले. या बैठकीत निर्णय घेऊन पुढील आठवड्यापासून त्याची अंमलबजावणी अपेक्षित होती. परंतु, निर्णय झालाच नाही. उलट आता तो गटनेत्यांच्या बैठकीत ठेवण्याचा निर्णय झाल्याचे महापौरांनी पत्रकारांना सांगितले.

सत्ताधाऱ्यांची हतबलता महापालिकेत सुरू असलेल्या पाण्याच्या खेळखंडोब्यावर विरोधकांनीही तीव्र टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक नसल्याचा आरोप शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. पाणी नियोजनासाठी ११ कोटी रुपयांचा विषय महासभेवर स्थगित असतांनाही, त्याच्या निविदा कशा निघाल्या असा सवाल केला आहे. सत्ताधाऱ्यांचे घेतलेले निर्णय प्रशासन राबवत नाही. त्यामुळे नाशिककरांची कोंडी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तांत्रिक अहवालावर निर्णय पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचे सांगत, आयुक्त डॉ. गेडाम यांनी पाणी फेरनियोजनाचा निर्णय हा तांत्रिक अहवालानंतर घेतला जाणार असल्याचे सांगितले आहे. बहुसंख्य नागरिक व नगरसेवकांचा कल हा आठवड्यातून एक दिवस सरसकट पाणीबंद ठेवण्याचा आहे. परंतु, प्रशासकीय अडचणी असल्याचे सांगून दोन दिवसात निर्णय घेवू, असे सांगून वेळ मारून नेली जात आहे. त्यामुळे विभागवार पाणीकपातीतून प्रशासनाकडून नाशिककरांना दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे.

फेरनियोजनाची टोलवाटोलवी

शनिवारी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम व महापौर अशोक मुर्तडक यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेवून विभागवार पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. यात बहुतेकांनी आठवड्यातून एक दिवस पाणीबंद ठेवण्यावर कल व्यक्त केला. परंतु, सत्ताधारी व प्रशासनाने इथेही निर्णय घेण्यासाठी एकमेकांकडे बोट दाखवले. या बैठकीत निर्णय घेऊन पुढील आठवड्यापासून त्याची अंमलबजावणी अपेक्षित होती. परंतु, निर्णय झालाच नाही. उलट आता तो गटनेत्यांच्या बैठकीत ठेवण्याचा निर्णय झाल्याचे महापौरांनी पत्रकारांना सांगितले.

सत्ताधाऱ्यांची हतबलता

महापालिकेत सुरू असलेल्या पाण्याच्या खेळखंडोब्यावर विरोधकांनीही तीव्र टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक नसल्याचा आरोप शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. पाणी नियोजनासाठी ११ कोटी रुपयांचा विषय महासभेवर स्थगित असतांनाही, त्याच्या निविदा कशा निघाल्या असा सवाल केला आहे. सत्ताधाऱ्यांचे घेतलेले निर्णय प्रशासन राबवत नाही. त्यामुळे नाशिककरांची कोंडी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तांत्रिक अहवालावर निर्णय

पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचे सांगत, आयुक्त डॉ. गेडाम यांनी पाणी फेरनियोजनाचा निर्णय हा तांत्रिक अहवालानंतर घेतला जाणार असल्याचे सांगितले आहे. बहुसंख्य नागरिक व नगरसेवकांचा कल हा आठवड्यातून एक दिवस सरसकट पाणीबंद ठेवण्याचा आहे. परंतु, प्रशासकीय अडचणी असल्याचे सांगून दोन दिवसात निर्णय घेवू, असे सांगून वेळ मारून नेली जात आहे. त्यामुळे विभागवार पाणीकपातीतून प्रशासनाकडून नाशिककरांना दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​फुले मार्केटचा होणार मॉल

0
0


म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक
जुन्या नाशकातील महात्मा ज्योतिबा फुले मार्केटचा पुनर्विकास करून त्या जागेवर आता बीओटी तत्वावर सुसज्ज वाहनतळासह चार मजली मॉल बांधण्याचा निर्णय महापालिकेतर्फे घेण्यात आला आहे. मॉलची इमारत हरित लवादाने सुचविलेल्या अटी शर्तींनुसार ग्रीन बिल्डिंग तंत्रज्ञानाचा वापर करत बनविण्यात येणार असून या परिसरातील बीफ, मटण मार्केट वडाळा गावात स्थलांतरीत करण्यात येणार आहे.
महात्मा फुले मार्केटचा पुनर्विकास करत या जागी सुसज्ज मॉल उभारण्याचा प्रस्ताव नगरसेवक सुफी जीन व समिना मेमन यांनी महापालिकेला सादर केला होता. हा प्रस्ताव मंजूर करत महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शहर अभियंता व अन्य अधिकाऱ्यांसमवेत या भागाची पाहणी केली. लवकरच या संदर्भातील डॉकेट सादर करुन महसभेची या प्रकल्पासाठी मंजुरी घेतली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या मॉलमध्ये एक लाख ७२ हजार स्क्वेअर फुटांचे बांधकाम होणार आहे. बेसमेंटमध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ तसेच ५५० स्टॉल्स असणार आहेत.
या मॉलच्या बांधकामासाठी फुले मार्केट परिसरातील बीफ, मटण कत्तलखाना वडाळा गावात हलविण्याचे ठरले आहे. याबरोबर बोकडांचा कत्तलखानाही हलविण्यात येणार आहे. मटण मार्केटमध्ये फक्त मटण विक्रीची मुभा असेल, असे आयुक्त गेडाम यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेला हा प्रकल्प पूर्णत्वास येणाच्या मार्ग सोपा झाला आहे.
याचसोबत सारडा सर्कल परिसरात स्कायवॉक उभारण्याबाबतही यावेळी माहिती देण्यात आली. नॅशनल उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हा स्कायवॉक बनविला जाणार आहे. यासाठी निधी देणार असल्याचे प्रभाग क्रमांक ३६ चे नगरसेवक सुफी जीन व नगरसेविका समिना मेमन यांनी या भेटीदरम्यान जाहीर केले.


या मिळणार सुविधा

१ सारडा सर्कलजवळ होणार स्कायवॉक
२ मॉलसंबंधिचे डॉकेट महासभे‌त होणार सादर
३ १ लाख ७२ हजार स्क्वेअर फुटांचे होणार बांधकाम
४ मॉलमध्ये होणार ५५० स्टॉल्स उपलब्ध
५ दुचाकी व चारचाकी धारकांसाठी स्वतंत्र वाहनतळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डासांंचे अड्डे उध्वस्त होणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड
नाशिकरोड व जेलरोड परिसरात डासांनी सध्या उच्छाद मांडला आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये नुकतीच याबाबत बातमी प्रसिद्ध झाली होती. तिची दखल घेऊन महापालिकेमार्फत नदीतील पाणवेली काढणार असल्याची माहिती नगरसेवक शैलेश ढगे यांनी दिली.
नासर्डी नदीपासून टाकळी गोदावरी संगमापर्यंत तसेच या संगमापासून दसकच्या संत जनार्दनस्वामी पुलापर्यंतच्या पाणवेली काढल्या जाणार आहेत. जेलरोड, टाकळी येथील नदीपात्रात पाणवेली प्रचंड वाढल्या आहेत. त्यात डासांची प्रचंड पैदास झाल्याची माहिती विभागीय स्वच्छता अधिकारी संजय दराडे यांनी दिली.
नगरसेवक शैलेश ढगे, राहुल दिवे, बांधकाम उपअभियंता निलेश साळी, शाखा अभियंता विशाल गरुड यांनी नुकतीच दसक, पंचक, नांदूर येथील गोदापात्राची पाहणी केली. नदीत पाणी सांडपाणी साचलेले असून पाणवेलीही फोफावल्याचे यावेळी लक्षात आले. या दोन्ही कारणांमुळे डासांची पैदास वाढली आहेत. त्यामुळे प्रत्येक कॉलनीत धुराळणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैलावाहिनी पुन्हा नादुरुस्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प
देवळाली कॅम्पवासीयांच्या आवश्यक सेवेसाठी असणारी व्हॅक्युम एम्प्टीयर व्हॅन (मैलावाहिनी) गेल्या महिन्याभरापासून पुन्हा नादुरुस्त झाली आहे. वर्षभरात ही व्हॅन अनेकदा खराब झाल्याने नागरिकांकडून नवीन व्हॅक्युम एम्प्टीयर व्हॅनची मागणी होत आहे.
देवळालीच्या कॅन्टॉन्मेन्ट प्रशासनाच्या वतीने देवळालीच्या विविध भागात निर्माण होणारा मैला वाहून नेण्यासाठी आवश्यक सेवा म्हणून व्हॅक्युम एम्प्टीयर व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यापासून ही व्हॅन नादुरुस्त असून नागरिक सातत्याने या वाहनाची मागणी करत आहेत. परंतु प्रशासन मात्र ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे.
नागरिकांच्या घराजवळ असलेल्या टाक्यांच्या आजूबाजूस मोठ्या प्रमाणात घाण पाण्याचे साम्राज्य पसरले आहे. काही दिवसांपूर्वी याबाबत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता नवीन असणारी व्हॅक्युम एम्प्टीयर व्हॅन खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. नवीन व्हॅन तर लांबच पण उपलब्ध असलेली व्हॅनही पुन्हा नादुरुस्त झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.गेल्या वर्षभरात अनेकदा ही असणारी व्हॅक्युम एम्प्टीयर व्हॅन बिघडली आहे. प्रशासनाने नको तिकडे होत असलेला खर्च कमी करीत नवीन व्हॅन
खरेदी करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘सातपूरचा श्वास मोकळा करा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर
महापालिकेने सातपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मंडईची उभारणी केली आहे. या मंडईच्या बाहेर व रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणांमुळे सातपूरचा श्वास कोंडला गेला आहे. या अतिक्रमणाची व्यवस्था लावत सातपूरचा श्वास मोकळा करा, अशी मागणी फेरीवाला झोनच्या बैठकीत ग्रामस्थांनी केली.
राष्ट्रीय फेरीवाल झोनची कठोर अंबलबजावणी करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यासाठी महापालिकेच्या सातपूरच्या विभागीय कार्यालयात फेरीवाला झोनबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भाजी विक्रेत्या महिलांनी आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला होता. सातपूरच्या प्रवेशापासून रस्ते अतिक्रणांनी वेढले आहेत, मंडई असताना रस्त्यांवर भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे, अशा अनेक समस्या यावेळी मांडण्यात आल्या.
महापालिकेचा लाखो रुपयांचा कर भरणाऱ्या मार्केटमधील व्यापाऱ्यांवर उपासमारीचे वेळ आल्याचे भाजी विक्रेते मोराडे यांनी सांगितले. मंडईच्या पार्किंगमध्येही अतिक्रमणे असल्याची माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शंकर पाटील यांनी दिली. या सर्वांची माहिती समजावून घेत ती आयुक्तांकडे सादर करणार असल्याचे उपायुक्त गोतीसे यांनी सांगितले. तसेच राष्ट्रीय फेरीवाला झोनमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन विभागीय अधिकारी केरुरे यांनी केली. बैठकीला फेरीवाला झोनचे पदाधिकारी, सातपूरचे ग्रामस्थ, रस्त्यावर बसणारे भाजी विक्रेत्यांचे प्रतिनिधी, सभापती उषा शेळके, नगरसेविका नंदिनी जाधव, उपायुक्त दत्तात्रय गोतीसे, विभागीय अधिकारी चेतना केरुरे उपस्थित होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याचा मालेगावात पाच तास थरार

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील भायगाव शिवारातील जाजुवाडी परिसरात रविवारी सकाळी बिबट्या आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली. या भागातील महादेव मंदिरासमोरील घराच्या जिन्याखाली हा बिबट्या लपून बसला होता. वनविभागाने तब्बल पाच तास शर्थीचे प्रयत्न करून बिबट्याला जेरबंद केले.
सकाळी ९ च्या सुमारास जाजुवाडी परिसरातील प्रा. मोरसकर यांना त्यांच्या बंगल्याच्या जिन्याखाली बिबट्या दिसला. त्यांनी लागलीच परिसरातील नागरिकांना याबाबत कळविले. ही बातमी शहरभर पसरल्याने बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. मात्र बराच वेळ हा बिबट्या त्याच जागी बसून होता. मालेगाव वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती कळव‌िण्यात आली. तत्पूर्वी मालेगावचे प्रांत अजय मोरे, तहसीलदार सुरेश कोळी तसेच वडनेर खाकुर्डी पोल‌िस स्थानकाचे निरीक्षक बोरसे आदींसह मोठा पोल‌िस बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला होता. बिबट्याकडून इजा होवू नये म्हणून या परिसरात कोणालाही येऊ दिले जात नव्हते. मोठा गोगाट असूनही बिबट्या जागीच पडून होता. बिबट्या पकडण्यासाठीची सामग्री आणि प्रशिक्षित अधिकारी कर्मचारी मालेगावी नसल्याने नाशिक येथील विशेष पथक बोलावण्यात आले. नाशिक येथील उपविभागीय वन अधिकारी वाडेकर आणि त्यांचे पिंजरा व बंदुकधारी पथक दुपारी एकच्या सुमारास येथे पोहचले. तोपर्यंत बिबट्या जिन्याच्या खालीच बसून असल्याने त्याला बेशुद्ध करण्यासाठी त्यावर शूट करण्यात अडचण निर्माण झाली. त्यामुळे बाजूच्या घरातून त्यावर शूट करण्यात आले. त्यानंतर अर्ध्यातासाने बिबट्याला बाहेर काढून पिंजराबंद करण्यात आले. नाशिक येथील पांडव लेणी नजीक असलेल्या उद्यानात या बिबट्याला नेल्यात आले आहे. मालेगाव हे भविष्यातील जिल्ह्याचे ठिकाण असून येथे वनविभागाचे उपविभागीय कार्यालय आहे. त्याअंतर्गत ५ राखीव वन क्षेत्र येतात. मात्र अस असूनही बिबट्या सारख्या हिंस्त्र प्राण्यांना पकडण्यासाठी येथील वनविभागाकडे प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी तसेच उपयोगी साहित्य नसल्याचे रविवारी उघड झाले. नाशिक येथून वेळीच बिबट्या पकडणारे पथक आल्याने पुढील अनर्थ टळला.

२१ वर्षांपूर्वी आला होता बिबट्या वन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार तालुक्यातील मोसम काटवन भागात जंगल असून पाण्याचा तुटवडा असल्याने हा बिबट्या शिकार व पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत शिरला असावा. मात्र या आधी सुमारे १९९४-९५ सालीही बिबट्या मालेगावी आढळून आला होता.



..तर काय झाले असते तब्बल पाच तसा बिबट्या एकाच जागी बसून असल्याने प्रशासनाला नाशिक हून पथक बोल‌ाविण्यास वेळ मिळाला. या वेळात जर बिबट्या बाहेर पडला असता किंवा त्याने आजूबाजूला असलेल्या जमावावर हल्ला केला असता, तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती, अशी चर्चा दिवसभर नागरिकांमध्ये सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ पंचनाम्यांमध्ये चालढकल नको’

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात सुरू असलेला बेमोसमी पाऊस व गारपीटीने शेतमालाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषी विभागाने दिरंगाई न करता युद्धपातळीवर सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी तसेच कृषीपंपांचे कनेक्शन तोडू नये, अशी मागणी कळवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. याबाबत कळवणचे तहसीलदार अनिल पुरे यांनस निवेदन दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिरे, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे, जिल्हा बँक संचालक धनंजय पवार, कळवण नगरपंचायत गटनेते कौतिक पगार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तहसीलदार अनिल पुरे यांना निवेदन दिले. महसूल व कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व सरसकट पंचनामे करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

पंचनामे करण्यात दिरंगाई होऊ नये व सरसकट सर्व नुकसानीचे पंचनामे करावेत, जणेकरून शेतकऱ्याला मदतीचा हात मिळेल. अन्यथा शेतकऱ्याचे भवितव्य अंधकारमय होईल असेही निवेदनात नमूद केले आहे.

शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची बिले न भरल्याने त्यांची जोडणी पुढ‌ील पीक येईपर्यंत वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तोडू नये असे आदेश सरकारने द्यावेत अशी मागणी ही यावेळी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी फक्त नुकसानीचे अहवाल मागविण्याचे आदेश देऊन भागणार नाही तर जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी तातडीने नुकसानीची प्रत्यक्ष पहाणी करून सरकारला वास्तववादी अहवाल द्यावा. तसेच नुकसान भरपाई मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी मागणीही केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिरे, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे, जिल्हा बँक संचालक धनंजय पवार, कळवण नगरपंचायत गटनेते कौतिक पगार, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र पवार, आदी उपस्थित होते.

सरकारी मदत द्या

कळवण तालुक्यातील मानूर येथे मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या शीतल अशोक हळदे हिच्या कुटूंबियांना शासनस्तरावरून आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने तहसीलदार अनिल पुरे यांच्याकडे केली. अर्जुनसागर प्रकल्पात मासे पकडत असताना वीज पडून जखमी झालेल्या गंगापूरच्या ३ युवकांनाही मदत मिळवून देण्याची विनंती केली आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२० दिवसात १०९ कोटी खर्चणार कसे?

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक वर्ष समारोपाकडे जात असूनही विविध विभागांकडून अद्याप तब्बल १०९ कोटींचा निधी खर्च होऊ शकलेला नाही. गेल्या अकरा महिन्यांत मंजूर निधीच्या ६५ टक्के निधी खर्च करणे प्रशासनाला शक्य झाले आहे. २० दिवसांत ३५ टक्के निधी प्रशासन कसा खर्च करणार, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

‍जिल्हा नियोजन व विकास विभागाने मंजूर केलेल्या परंतु अद्याप खर्च न होऊ शकलेल्या निधीबाबत जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी नुकताच आढावा घेतला. डीपीडीसीच्या सर्वसाधारण योजनेंतर्गत मंजूर ३३६ कोटींपैकी अवघा २२७ कोटींचा निधी खर्च होऊ शकला आहे. ३१ मार्चपर्यंत १०९ कोटींचा निधी खर्च करण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे. त्यातही चार रविवार, दुसरा व चौथा शनिवार या सुट्या असून महाशिवरात्री, होळी, गुडफ्रायडे, रंगपंचमी, धुलीवंदनासारख्या सणांचा हा काळ आहे. त्यामुळे हे काही दिवस काम होऊ शकले नाहीत. तर प्रशासनाच्या हातात केवळ २० दिवसांचा कालावधी उरणार आहे. त्यामध्ये हा ३५ टक्के निधी खर्च होऊ शकलेला नाही तर तो सरकारकडे परत जाण्याची नामुष्की ओढावू शकते. तसे झाल्यास पुढील आर्थिक वर्षात सरकारकडून जिल्ह्याला मिळणार असलेला निधीही कमी होणार असल्याने प्रशासनाची धांदल उडाली आहे.

सरकारी अधिकाऱ्यांची अकार्यक्षमता व उदासिनतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी ताशेरे ओढल्याने सद्यस्थितीत सर्वच विभागांकडून विविध योजना मार्गी लावण्यासाठी धावपळ सुरू आहे. अपेक्षित प्रमाणात निधी खर्च न झाल्याबद्दल कुशवाह यांनी बहुतांश विभागांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. हा निधी आता कसा खर्च करणार याबाबत विचारणा करण्यात आली.

६९ कोटी जलयुक्तसाठी सवर्साधारण योजनांसाठी ३३६ कोटींच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी ६९ कोटी जलयुक्त शिवार कामांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. ३३६ पैकी २४८ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून २२७ कोटींचा खर्च झाला आहे. अनुसूचित जाती उपयायोजनांमध्ये ८१ कोटींच्या आराखड्यापैकी ४९ कोटी (६० टक्के) निधी खर्च झाला आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२९ गावांसह १९ वाड्यांची तहान भागतेय टँकरवर

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

दुष्काळातील दाहकतेच्या मोठ्या झळा सोसतांना निर्माण झालेल्या भीषणटंचाईला सामोरे जातांना येवला तालुक्यातील गावोगावच्या जनतेचे हाल होत आहेत. मार्चच्या प्रारंभीच तालुक्यातील तब्बल २९ गावांसह १९ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असून इतर गावांमधूनही टँकरची मागणी होऊ लागली आहे.

यावर्षीच्या टंचाई परिस्थितीत येवला तालुक्यातील अनेक गावे व वाड्या वस्त्यांना पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे. विहिरींसारखे पाण्याचे नैसर्गिक स्रोत कधीच आटल्याने अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी मोठा आटापिटा करण्याची वेळ आलेली आहे. तालुक्यात यंदाच्या दुष्काळाच्या झळा इतक्या भयाण आहेत की मागील वर्षीच्या डिसेंबर पासूनच गावागावात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागले आहेत. गेल्या काही

महिन्यात तर दिवसागणिक अनेक गावांमधून टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. सध्याही येवला

तहसील व पंचायत समिती स्तरावर पाणी टँकर सुरू करा या मागणीचे प्रस्ताव धडकत असून यंदाची भिषण टंचाई बघता येत्या काळात त्यात दिवसेंदिवस वाढ होत जाण्याची दाट चिन्हे आहेत.

सध्या येवला तालुक्यातील २९ गावे व १९ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ५ सरकारी तर १० खासगी अशा १५ टँकरद्वारे दररोज एकूण ५४ फेऱ्या सध्या केल्या जात आहेत. अशातच तालुक्यातील अनकाई, गोरखनगर, वसंतनगर व चांदगाव या चार गावांचे प्रस्ताव नुकतेच प्रशासनाला प्राप्त झालेले असून या गावांची लवकरच तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडून संयुक्त पाहणी केली जाताना टँकर सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

टँकरद्वारे पाणीपुरवठा गावे : कुसमाडी,वाईबोथी,बाळापुर,पांजरवाडी,बोकटे,दुगलगांव,आहेरवाडी,लहीत,जायदरे,मुरमी,आडगांव रेपाळ,धामणगाव,खिर्डीसाठे,देवळाणे,खरवंडी,देवदरी,कोटमगाव खुर्द,तांदूळवाडी,खैरगव्हाण,महालगाव,हडपसावरगाव,चिचोंडी बुद्रुक,रायते,गुजरखेडे,बल्हेगांव,चिचोंडी खुर्द,कासारखेडे,गोपाळवाडी,कोटमगांव बुद्रुक.

वाड्या : महादेववाडी, चांदरजठार वस्ती, रानमळा कुळधरवस्ती, सायगाव फाटा (सर्व सायगांव), गोपाळवस्ती (खैरगव्हाण), हनुमान नगर (सोमठाण जोश), गोल्हेवाडीरोड वस्ती, योगेश्वरवाडी फुलेवाडी शंकरवाडी, सावतावाडी जयहिंदवाडी, दळेवस्ती रामवाडी बजरंगवाडी (सर्व अंदरसूल), घनामाळी मळा, वडाचा मळा पाटीलवस्ती, खोडके सानपवस्ती, माळवाडी फरताळवाडी, गाडेकर घाडगेवस्ती (सर्व नगरसूल), हनुमान नगर (खिर्डीसाठे), वाघ वस्ती, हवालदार वस्ती, भैरवनाथ वस्ती सानप महानुभाव वस्ती (राजापूर).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश पेठेतील कोंडी सुटणार!

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

शहरातील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध पर्याय सुचव‌िण्यात आले असून यामध्ये गणेश पेठेत सम-विषम तारखांचे पार्किंग आणि सकाळी ११ ते सायंकाळी ७ या काळात चारचाकी वाहनांना बंदी करण्याचा निर्णय, तसेच गणेशपेठ ते वावी वेस, व्यापारी बँक कॉर्नर ते नाशिक वेस या रस्त्यावर एकेरी वाहतूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील. वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सिन्नर वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस नगराध्यक्षा अश्विनी देशमुख, वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, निफाडचे पोलिस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे, तहसीलदार मनोजकुमार खैरनार, पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे, ताराचंद खिवंसरा, नगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुनील शिंदे आदी उपस्थित होते.

गणेश पेठेत सम-विषम तारखांचे पार्किंग आणि सकाळी ११ ते सायंकाळी ७ या काळात चारचाकी वाहनांना बंदी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

शहरातील गणेश पेठेत कोंडी होत असल्याने सरस्वती पूल ते शिवाजी चौक, वावी वेस हा शहरात येण्याचा मार्ग, तर व्यापारी बँक कॉर्नर ते नाशिक वेस हा मार्ग बाहेर पडण्यासाठी निश्चित करण्यात आला. पेठेत सम-विषम तारखांचे पार्किंग करण्याचा तसेच त्यासाठी दुकानदारांनी फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

चौकात गतिरोधक बसवावेत, महामार्गावरील दुभाजकांत पथदीप बसवावेत, आडवा फाटा, बसस्थानक, मारुती मंदिर येथे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी, अशा सूचना नागरिकांनी केल्या. निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी नगरपालिकेने अधिसूचना प्रसिद्ध करावी, अशी सूचना उपअधीक्षक दीपक गिऱ्हे यांनी केली. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ताराचंद खिंवसरा, सोनल लहामगे, दिवाकर पवार, मु. शं. गोळेसर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, शिवसेनेचे शहराध्यक्ष राहुल बलक, रत्नाकर पवार, संतोष खर्डे आदींनी सूचना मांडल्या.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेडसर महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

रस्त्याने जाणाऱ्या वेडसर महिलेला बळजबरीने रिक्षात बसवून बोकडदरे शिवारातील वनविभागाच्या जंगलात नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघा संशयितांपैकी दोघांना सरपंच व गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. यापैकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजता ही वेडसर महिला (वय ४२) बोकडदरे शिवारात एकटी चालली होती. बोकडदरे येथील हनुमंत फकीरा पिंपळे, मारुती भीमा बछाव, योगेश माळी, ज्ञानेश्वर अशोक पिंपळे यांनी तिला बळजबरीने रिक्षात बसवून बोकडदरे शिवारात नेत तिच्यावर सामुहिक अत्त्याचार करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बोकडदरेचे सरपंच भाऊसाहेब दराडे व गावकऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांना फोन केला. तसेच या चौघांना पकडण्याचा प्रयत्न केला. हनुमंत पिंपळे व

ज्ञानेश्वर पिंपळे यांना पकडण्यात यश आले असून बाकीचे दोन संशयित फरार आहेत. याबाबत निफाड पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पीडित महिला ही वेडसर असल्याने तिला या प्रकाराबाबत काही सांगता येत नाही. तिला नाशिक येथे नेण्यात आले असून मानसोपचार तज्ज्ञाकडून तपासणी करण्यात

येणार आहे. तसेच तिची वैद्यकीय तपासणीही करण्यात येणार

असल्याचे पोलिस निरीक्षक निघोट यांनी सांगितले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांच्या’ हालचालींवर तिसऱ्या डोळ्याची नजर

0
0

pravin.bidve@timesgroup.com

नाशिक : कारागृह अन सरकारी महिला वसतिगृहासारख्या कडेकोट सुरक्षा असणाऱ्या ठिकाणांहून निसटू पाहणाऱ्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर असणार आहे. सुरक्षा व्यवस्थेबाबतच्या प्रस्तावांना जिल्हाधिकारी प्रशासनाने मान्यता दिली असून त्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेमधून तब्बल २१ लाखांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.

राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये नाविन्यपूर्ण (इनोव्हेशन) योजनेचाही समावेश आहे. या योजनेंतर्गत राखीव असणारा साडे तीन टक्के निधी सरकारी कार्यालयांमधील ठोस कामांसाठी वापरता येतो. यंदा सुरक्षेच्या कारणास्तव हा निधी वित‌रीत करण्याला जिल्हा प्रशासनाकडून पसंती देण्यात आली. अशोकस्तंभ येथील वात्सल्य महिला वसतिगृहात पुनर्वसनासाठी ठेवण्यात आलेल्या नऊ बारबाला रखवालदाराच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून पळून गेल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी हा प्रकार घडला होता. त्यानंतरही असे प्रकार येथे सातत्याने घडले. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी या सरकारी वसतिगृहात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी पाच लाख ७७ हजार रुपये निधी जिल्हा प्रशासनाने मंजूर केला आहे.

नाशिकरोड कारागृहातून मंगलसिंह रोहिदास भोसले (३२) या कैद्याने १५ फुट उंच भिंत ओलांडून ६ एप्रिल २०१४ रोजी पलायन केले होते. कारागृहात मोबाइल, गांजा व तत्सम वस्तू बाळगल्या जात असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहेत. अशा गैरप्रकारांवर वॉच ठेवण्यासाठी कारागृह प्रशासनाने ६० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तेवढे पुरेसे नसल्याने कारागृह प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. नाविन्यपूर्ण योजनेतून कारागृहाला ९ लाख ५१ हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. भूमी अभिलेख कार्यालयातील गैरप्रकारांवरही सीसीटीव्हींचा वॉच असणार आहे. त्यासाठी त्यांना पाच लाख ४९ हजारांचा निधी देण्यात आला आहे. केवळ सीसीटीव्हींसाठी प्रशासनाने चालू वर्षी २० लाख ७७ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रदीप पोतदार यांनी दिली आहे.

याखेरीज महाराष्ट्र पोलिस अॅकॅडमीमध्ये याच योजनेंतर्गत नऊ लाख ८१ हजारांच्या निधीतून क्लॅम्बिंग व रॅप्लिंग वॉल उभारण्यात आली आहे.

धान्य गोदामांतील गैरप्रकार थांबणार

रेशन धान्य घोटाळ्यामुळे नाशिक जिल्हा राज्यभरात बदनाम झाला. नाशिकरोड येथील सरकारी गोदामात चोरीचे प्रकार घडले. धान्याची साठवणूक करणारी सरकारी आणि खासगी गोदामांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले. अशा गोदामांची सुरक्षा अधिक भक्कम व्हावी आणि गरीबांच्या धान्यावर कुणी डल्ला मारू नये यासाठी तेथेही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी तब्बल १५ लाख ५३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नावीन्यपूर्ण योजनेतून सीसीटीव्ही, रॅप्लिंग वॉलसाठी निधी दिला आहे. सीबीएस येथील किशोर सुधारालयातून काही मुले पळून गेल्यानंतर तेथेही सीसीटीव्हींची मागणी झाली. मात्र, हा प्रस्ताव विलंबाने प्राप्त झाल्यामूळे तो चालू वर्षी मंजूर होऊ शकलेला नाही.

- प्रदीप पोतदार, जिल्हा ‌नियोजन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images