Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

किशोर सुधारालयात आता ‘नो एन्ट्री’

0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

सीबीएसच्या शेजारी असलेल्या किशोर सुधारालयातून काही बाल गुन्हेगार पळून गेल्याने प्रशासनाने आता हा परिसर निषिद्ध क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. तसेच, इतरही अनेक उपाययोजना करून सुधारालयाला सुरक्षा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

कायदा व सुव्यस्था अबाधित राहावी यासाठी बालगुन्हेगारांस होणारे शासन (कैद) भोगण्यासाठी असणारे सुधारालय गृह नाशिकच्या मध्यवर्ती भागात आहे. सीबीएस जवळ असणाऱ्या या किशोर सुधारालयात अनेक बालगुन्हेगार आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी याच किशोर सुधारालयाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. काही आरोपी या सुधारालयाच्या भिंतीवरून उडी मारत पळून गेले होते. या घटनेनंतर प्रसार माध्यमे आणि इतर स्तरांवरून कारागृहाच्या व्यवस्थापन आणि सुरक्षेवर टीकेची झोड उठली होती. कारागृहाच्या आसपास पुरेशी सुरक्षा यापूर्वी नव्हती. मात्र, सध्या चित्र बदललं आहे. किशोर सुधारालय आसपासचा परिसर 'निषिध्द क्षेत्र' म्हणूज जाहीर करण्यात आला आहे. तसा फलकच व्यवस्थापनेने सुधारालयाच्या बाहेर लावला आहे. तेथे अनेक रिक्षा, टॅक्सी यांचा थांबा होता. सुधारालयाच्या कमानीतून अनेकदा विद्यार्थी आत जाऊन पाणी पितांना दिसायचे. तसेच कारागृहाला लागूनच असलेल्या रहिवाशी भागात जाण्यासाठी छोटी भिंत ओलांडून अनेक तरुण 'शॉर्ट कट' मारायचे.

वस्तुस्थिती

किशोर सुधारालयाच्या भिंती बऱ्याच अंशी लहान आहेत. कारागृह इमारतीच्या गच्चीपासून भिंतींची उंची फारच कमी आहे. कारागृहाच्या बाजूला आरोपींच्या कौशल्यासाठी शेती व्यवस्थापनेची जागा कित्येक वर्षांपासून पडून आहे. काही वर्षांपूर्वी एक-दोन पिकं घेतली जात होती. मात्र आता उत्पादन घेतले जात नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुरुपुष्यामृतमुळे सराफांना संजीवनी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने सराफ व सुवर्ण व्यावसायिकांवर लादलेल्या अबकारी कराच्या निषेधार्थ देशव्यापी बंद पुकारला होता. या काळात सोन्याचे कोणतेही व्यवहार झाले नाही. त्यानंतर प्रथमच गुरुपुष्यामृतचा मुहूर्त आल्याने सराफ बाजारात सोने खरेदीला गुरूवारी उधाण आले.

सुमारे दीड महिन्यानंतर सराफ बाजार व इतर ठिकाणच्या दुकांनांमध्ये ग्राहकांची गर्दी झाल्याने व्यावसायिकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले. मागणीच्या प्रमाणात पुरवठा देखील झाल्याने गुरुवारच्या पुष्य नक्षत्रावर कोट्यवधीची सोने, चांदीची खरेदी झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नाशिककर नागरिकांनी गुरुवारी मोठ्या प्रमाणात सोने खरेदीचा आनंद घेतला. यावेळी राशीच्या खड्यांनाही चांगली मागणी होती.

सोने-चांदी दराची माहिती नसल्याने गुरूवारच्या दिवशी अनेक ग्राहकांनी सराफ बाजारातील पेढ्यावर दर आणखी उतरणार का? याबाबत चौकशी केली. मात्र, गुरूवारी बाजार उघडल्यानंतर भाव २९ हजार १५० वर स्थिरावला. नाशिकमध्ये अनेकांनी लग्नसराईसाठी दागिन्यांची खरेदी केली तर अनेकांनी गुंतवणूक म्हणून खरेदी केली. खरेदी करत असतांना भाव खाली येणार का याची धाकधूक मनात कायम होती. गुरूपुष्यांमृतच्या मुहूर्तावर अनेकांनी कालावधीत सोन्याची बिस्किटे, वेढे, सोन्याच्या भरीव मूर्ती तसेच सोन्याची नाणी यांना चांगली मागणी होती. सोन्याची नाणी एक ग्रॅम पासून ते पन्नास ग्रॅमपर्यत उपलब्ध होती. तसेच चेन, अंगठी, हार, नेकलेस, पेण्डल, कुंदन सेट, पाटल्या, बांगड्या यांची खरेदी जोरात झाली.

चोख सोन्यापेक्षा दागिन्यांना मागणी

लग्नसराई असल्याने गुरूपुष्यामृतानिमित्त लोकांनी चोख सोन्याची खरेदी न करता दागिने खरेदीला पसंती दिली. अनेकांनी मंगळसूत्रे, नेकलेस, लक्ष्मीहार, पाटल्या, बांगड्या, सोन्याची वेढे, व सोन्याची बिस्कीटे घेणे पसंत केले. तर गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी चोख सोन्याला पसंती दिली. लग्न घरांमध्ये गुरूपुष्यांमृतचा मुहूर्त साधत खरेदी करण्यात आली. डॉ. आंबेडकर जयंतीची सार्वजनिक सुटी असल्याने सराफ बाजारामध्ये खरेदीदारांचीही गर्दी दिसून आली.

लग्नसराई आणि गुरूपुष्यांमृतचा मुहूर्त दोघांचा मेळ साधत लोकांनी सोन्याची खरेदी केली. सकळापासूनच लोकांनी गर्दी केली. ग्राहकांचा सोन्याचे दागिने खरेदीकडे जास्त कल आहे.

- गिरीष नवसे, सराफ व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकल गस्तीला बेपर्वाईचा गंज!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस आणि नागरिकांमध्ये सुसंवाद व्हावा, यासाठी सुरू करण्यात आलेली सायकल गस्त अल्पावधीतच इतिहासजमा झाली आहे. सुसंवादासाठी सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेचा पुरता बोजवारा उडाला असून, कामाच्या अतिरिक्त ताणामुळे या उपक्रमालाच गंज चढला आहे. त्यामुळे या उपक्रमांत सातत्य ठेवता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

नागरिकांची सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था यावर लक्ष केंद्रित करीत पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी सायकल गस्तीचा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमाचे नागरिकांनी संमिश्र स्वागत केले. सायकल गस्तीमुळे गुन्हेगारी कमी होईलच असे नाही. मात्र, नागरिक आणि पोलिस यांच्यातील संवाद वाढीस लागेल, अशी अपेक्षा त्या वेळी व्यक्त करण्यात आली. या उपक्रमासाठी पोलिसांनी थोड्याथोडक्या नव्हे, तर ५० नवीन सायकली खरेदी केल्या. पोलिसांनी प्रत्येक पोलिस स्टेशनच्या हद्दीत सायंकाळी सहा ते रात्री नऊ या कालावधीत 'सायकल पेट्रोलिंग' करणे अपेक्षित आहे. यासाठी पोलिस स्टेशनला प्रत्येकी चार ते सहा या प्रमाणात सायकली देण्यात आल्या. मात्र, हा उपक्रम सुरू झाल्यानंतर अवघ्या एखाददुसऱ्या आठवड्यानंतर सायकल गस्त मोहीम थंड बस्त्यात गुंडाळली गेली. आता या सायकली पोलिस स्टेशनच्या आवारात धूळ खात पडून आहेत. येणारा पावसाळा संपल्यानंतर या सायकली पुन्हा सुरू होण्याची शक्यता फारच कमी आहे. ५० सायकलींसाठी झालेला खर्च या निमित्ताने वाया जाऊ शकतो. दरम्यान, गुन्हेगारी वाढत असल्याची ओरड झाल्यानंतर पोलिसांकडून एखादी मोहीम सुरू करण्यात येते. मात्र, पोलिस सातत्याने एकच काम करू शकत नाही. बंदोबस्त आणि तपास यामुळे अशा उपक्रमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने स्पष्ट केले.



महिला गस्तही थंडावली

जागतिक महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी महिला पोलिस कर्मचाऱ्यांमार्फत गस्त घालण्याचे काम सुरू केले होते. यासाठी महिला कर्मचाऱ्यांना स्वतःच्या दुचाकींचा वापर करावा लागत होता. रोजच गस्तीचे काम करावे लागत होते. मात्र, दुचाकींसाठी पेट्रोलची कोणतीही तजवीज करण्यात आली नाही. परिणामी, महिला पोलिसांची गस्तदेखील लागलीच बंद झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचे बजेट रखडले

0
0

गेल्या आर्थिक वर्षाप्रमाणेच चालू वर्षीही पालिकेच्या बजेटचा गोगलगाईच्या गतीने प्रवास सुरू आहे. आयुक्त डॉ. गेडाम यांनी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे १३५८ कोटीचे बजेट २६ फेब्रुवारीला सादर केले. परंतु, तत्कालीन सभापती शिवाजी चुंबळे यांचा २९ फेब्रुवारीला कार्यकाल संपल्याने बजेट महासभेत सादर झाला नाही. मार्चमध्ये नव्या सभापती निवडीसाठी एक महिन्याचा कालावधी लोटला. त्यामुळे बजेट सादर करण्याची जबाबदारी नवीन सभापती सलिम शेख यांच्यावर आली आहे. त्यांना पदभार स्वीकारून आता तीन आठवडे उलटले आहेत. मात्र, अद्यापही बजेटला मुहूर्त लागत नसल्याने नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत. गेल्या वर्षी स्थायी समितीने तब्बल सहा महिन्यानंतर महासभेला बजेट सादर केले होते. तर महासभेने ते डिसेंबरमध्ये पारीत केले होते. त्यामुळे नगरसेवकांची कामे ही झालीच नाहीत. त्यामुळे दोन-दोन लाखांच्या कामांसाठी सुद्धा नगरसेवकांना आयुक्तांचे उंबरठे झिझवावे लागले होते.

एप्रिल अखेरपर्यंत महापालिकेचे बजेट प्रशासनाकडे सादर होणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप बजेटवर स्थायी समितीची बैठक सुद्धा झालेली नाही. त्यामुळे या महिना अखेरपर्यंत बजेट प्रशासनाला सादर होण्याची आता सुतराम शक्यता नाही. त्यामुळे एप्रिल महिनाही वाया जाणार असून मे मध्येच बजेटची वाट मोकळी होणार आहे. त्यामुळे चालू वर्षाचे तीन महिने प्रशासनाला आपल्याच बजेटवर कारभार चालवाला लागणार आहे. तोपर्यंत नगरसेवकांची विकासकामे सुद्धा रखडणार आहेत.

नगरसेवकांच्या पोटात आला गोळा बजेटमध्ये भांडवली खर्चासाठी ४९६ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे वर्षभरात या भांडवली खर्चातूनच विकासकामे करता येणार आहे. चालू बजेटमध्ये रस्त्यांसाठी १९१ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. दोन्ही निधी हा बजेटच्या मंजुरीचा मार्ग मोकळा झाल्यानंतरच खर्चास मिळणार आहे. परंतु, बजेटचाच मार्ग अद्यापही मोकळा होत नसल्याने नगरसेवकांच्या नजरा या बजेटकडे लागल्या आहेत. बजेटचा मार्ग मोकळा झाला नाही तर आपलेही निवडणुकीत बजेट होईल, अशी भीती नगरेसवकांना सतावत आहे.

माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्याशी बजेट संदर्भात चर्चा झाली. लवकरच बैठक घेवून आवश्यक त्या सूचना व दुरुस्त्या करून चालू महिन्यात महासभेला सादर केले जाईल. - सलिम शेख, सभापती, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात महिलांची पहिली राष्ट्रीयीकृत बँक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये राष्ट्रीयीकृत बँकेची पहिली महिला बँक लवकरच सुरू झाली आहे. इंदिरानगरमध्ये पंजाब नॅशनल बँकेने महिला बँकेचा शुभारंभ केला असून महिलांच्या सशक्तीकरणाच्या दृष्टीने ही बाब मोलाची ठरली आहे.

महाराष्ट्रात महिलांच्या मंदिर प्रवेशाचा वाद गाजत असतांना दुसरीकडे पंजाब नॅशनल या राष्ट्रीयीकृत बँकेने पहिल्या महिला शाखेचा शुभारंभ करत महिला सशक्तीकरणाचे पाऊल उचलले आहे. राष्ट्रीयीकृत बँकेची ही जिल्ह्यातील पहिली शाखा असून त्याचे महिलांनी स्वागत केले आहे. या अगोदरच जिल्ह्यातील पिंपळगाव बसंवत येथील मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत हा देशातील पहिला महिला टोलनाका आहे. तेथे टोल वसुली महिलांद्वारेच केली जात आहे. त्यानंतर आता महिला बँक सुरू होणे ही नाशिकसाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे.

महिलांचे व्यवस्थापन असलेल्या जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अनेक बँक व पतसंस्थांनी चमकदार कामगिरी केली आहे. त्यात जिल्हा सहकारी बँक, महिला विकास बँक यांचा समावेश आहे. या बँकेबरोबरच जिल्ह्यात महिलांच्या अनेक पतसंस्था आहेत. त्यांच्या कामाचेही कौतुक झाले आहे. यामध्ये आता पंजाब नॅशनल बँकेच्या महिला शाखेची भर पडली आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या महिला शाखेचे उदघाटन इंदिरा नगर येथे १०० फुटी रिंग रोड येथे बुधवारी झाले. या बँकेच्या व्यवस्थापिका म्हणून भारती राजे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. बँकेत पाच महिला कर्मचाऱ्यांचा स्टाफ असणार असून खातेदार सर्वांना होता येणार आहे. बँकेत महिलांसाठी विशेष योजना असणार असून त्यांना अधिकाधिक फायदा व्हावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. याप्रसंगी बँकेचे महाव्यवस्थापक एस. के. वाधवा, 'नासा'च्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी, अश्वमेध लेबॉरेटरीचे सीईओ डॉ. अपर्णा फरांदे, सर्जन डॉ. श्रीया कुलकर्णी, चंद्रप्रकाश अग्रवाल आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील महिलांसाठी सुरू झालेली ही पहिली राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा आहे. आम्ही महिलांसाठी विशेष योजना ठेवल्या असून महिलांनी लाभ घ्यावा. या बँकेच्या व्यवस्थापनाचा आनंद वेगळा आहे. बँकेने महिला सशक्तीकरणासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच आमच्यासाठी स्वागतार्ह आहे.

- भारती राजे, मॅनेजर, पंजाब नॅशनल बँक

नाशिकमध्ये महिलांच्या सहकार क्षेत्रात असलेल्या बँका चांगले काम करत आहे. त्यात पंजाब नॅशनल बँकची महिला शाखा स्थापन झाली ही स्वागतार्ह गोष्ट आहे. यामुळे महिला उद्योजक व छोट व्यवसाय करणाऱ्या महिलांना लाभ होऊ शकेल. महिलांचा कारभार पारदर्शी असतो, त्यामुळे निश्चित फायदा होईल.

- डॉ. शोभा बच्छाव, संचालक, नाशिक जिल्हा सहकारी बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समर्थ रामदासांचे वाल्मिकी रामायण गवसले!

0
0

Ramesh.padwal@timesgroup.com

'रामायण' या वैश्विक काव्याने मानवी मन व्यापलं आहे. नाशिक परिसर तर या काव्याचा अविभाज्य भाग असल्याने रामायणाबद्दल प्रत्येकाच्या मनात वेगळं स्थान आहे. ३९५ वर्षांपूर्वी या काव्याची भुरळ समर्थ रामदासांनाही न पडावी तर नवलचं! पण समर्थांच्या सिद्ध हस्ताक्षरातील 'वाल्मिकी रामायण' आता नेमके आहे कुठे? असा प्रश्न अनेकांना पडतो. रामदासांच्या रामायण या अजब साहित्य‌िक कलाकृतीचा चारशे वर्षांचा प्रवास उलगडला असून, धुळ्यातील श्री समर्थ वाग्देवता मंदिरात समर्थांच्या रामायणाच्या जतनाचे काम सुरू आहे. यातील बालकांड ग्रंथ रूपाने उपलब्ध करण्यात आले आहे.

महादेवाने पार्वतीला सांगितलेली श्री रामाची कथा ही `अध्यात्म रामायण' नावाने प्रख्यात आहे. मात्र यापूर्वीही हनुमानाने शिलेवर रामायण लिहिल्याची अख्यायिका प्रसिद्ध असून, त्यास 'हनुमन्नाटक' असे म्हटले जाते. त्यानंतर महर्षी वाल्म‌िकींनी `रामायण'ची संस्कृत महाकाव्य रचना केली. गोस्वामी तुलसीदासने रामकथेला `श्रीरामचरितमानस'च्या नावाने आकार दिला. अशा अनेक अख्यायिकांनी रामायणाचा प्रवास थक्क करतो. महर्षी वाल्म‌िकी लिखित रामायणाला मूळ रामायण मानण्यात आल्याचे दिसते. नाशिककरांच्या दृष्टीने समर्थ रामदासांच्या स्वहस्ताक्षरातील वाल्म‌िकी रामायण म्हणजे नाशिकची साहित्यनगरी म्हणून झालेल्या प्रवासाचा अनोखा पुरावाच आहे. मात्र रामदासांच्या रामायणाचा प्रवास आजही अनेकांना अज्ञात आहे.

समर्थ रामदास इ. स. १६२० ते १६३३ असे साधारण १२ वर्षे टाकळी गावात तपश्चर्या व कठोर साधनेसाठी राहिले. यादरम्यान, बाल रामदासांनी गोदाकाठच्या पंडितांकडे वाल्म‌िकी रामायणाचे अध्ययनही केले. १६२२ मध्ये १४ वर्षांच्या रामदासांनी वाल्म‌िकी रामायणातील बालकांड संस्कृतमध्ये लिहून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अयोध्या, अरण्य, किष्किंधा व सुंदर ही पाच कांडे नाशिकमध्ये १६२४ पर्यंत पूर्ण केली व युद्ध व उत्तरकांड त्यांनी साताऱ्यातील मसूरमध्ये पूर्ण केले. मात्र, रामदासांच्या हस्ताक्षरातील रामायण ३१४ वर्षे बीडच्या मठात अज्ञात अवस्थेत होते. याचा शोध १९३५ मध्ये 'विदर्भाचे टिळक' म्हणून ओळखले जाणारे शंकरराव ऊर्फ नानासाहेब देव यांनी लावला व समर्थांचे रामायण धुळ्यातील वाग्देवता मंदिरात दाखल झाले, अशी माहिती वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष शरद कुबेर यांनी दिली.

असा लागला 'रामायणा'चा शोध !
३१४ वर्षांनंतर म्हणजे १९३५ मध्ये समर्थांचे शिष्य गिरिधरस्वामी यांच्या बीड येथील मठात समर्थांची मूळ प्रत 'विदर्भाचे टिळक' म्हणून ओळखले जाणारे शंकरराव ऊर्फ नानासाहेब देव यांना सुस्थितीत मिळाली. मात्र हा प्रवासही थक्क करणारा होता.

रामदासांनी लिहिलेलं रामायण कोठे आहे हे कोणालाही माहीत नव्हतं. १९३३ मध्ये नानासाहेब देव यांना हैदराबाद येथील इंदूरबोधन मठात बीड मठासंदर्भातील काही कागदपत्रे मिळाली. यातील दोन कागदपत्रांनी रामदासांच्या रामायणाचे रहस्य उलगडण्यास मदत केली. यातील एक कागद १७३१ चा, तर दुसरा १७४४ चा होता. दोन्ही कागद रामदासांचे कार्य पुढे घेऊन जाणाऱ्या भीमाजी गोसावी व यसोबा गोसावी यांच्यातील संपत्तीच्या वाटणीचा होता. तर दुसरे पत्र काही सामायिक वस्तूंचे विभाजन बाकी असल्याने ते १७४४ मध्ये १३ वर्षांनी करण्यात आले होते. यातून रामदासांनी लिहिलेले रामायणाची उकल झाली.

रामायणाचीही झाली वाटणी

भीमाजी व यसोबा यांच्यातील सामायिक वाटणीत समर्थांनी लिहिलेले वाल्म‌िकी रामायण, अध्यात्म रामायणाचा समावेश होता. अध्यात्म रामायण (श्लोक संख्या ६ हजार) हा ग्रंथ यसोबाजवळ होता, तर वाल्म‌िकी रामायण (श्लोक संख्या २४ हजार) भीमाजी जवळ होता. दोन्ही मिळून ३० हजार श्लोक संख्या झाली. त्यानुसार प्रत्येकाच्या वाट्याला १५ हजार श्लोक येणार होते. ६ हजार श्लोकांचा अध्यात्म रामायण ग्रंथ यसोबाकडे होता. त्यामुळे त्यांना वाल्म‌िकी रामायणातील ९ हजार श्लोक देणे होते. यानुसार, बाळकांड/ आदिकांडातील २८५० श्लोक, आयोध्या कांडातील ३९६० श्लोक व सुंदर कांडातील २९२५ श्लोक असे एकूण ९७३५ श्लोक देण्यात आले व उरलेले समर्थांची रामायणाची कांड भीमाजीकडे राहिली. अशा प्रकारे दोन भावांमध्ये समर्थांच्या रामायणाची वाटणी करण्यात आली. पुढे परंपरेने श्रीराम बुवा यांच्या मठात यसोबांकडील ग्रंथ संपदा आली. ही ग्रंथ संपदा अर्धवट होती. यामुळे सुमारे दीडशे वर्षांनंतर मठातील मंडळींनी भीमाजीकडील ४ कांड लिहून घेत यसोबाकडील ग्रंथसंपदेला पूर्ण स्वरूप दिले. ती कांडे नानासाहेब देव यांनी यसोबांच्या मठातून मिळविली. तर इतर कांडे भीमाजी बाबांच्या परंपरेतील सीताराम बाबा यांच्या मठात असली पाहिजेत हे लक्षात आल्यानंतर तीही २१ मे १९३४ मध्ये त्यांच्या बीड मठातून ताब्यात घेतली. यामुळे समर्थांचे वाल्मिकी रामायण पूर्ण झाले.

२४ हजार श्लोक; १८२० पाने

रामदासांच्या बालकांड (श्लोक संख्या २८५०), अयोध्या (३९६०), अरण्य (४१७०), किष्किंधा (४१५०), सुंदर (२९२५), युद्ध (२०४५) आणि उत्तरकांड (४५००) या एकूण सात कांडांपैकी पहिले पाच कांड १६२४ पर्यंत टाकळीत पूर्ण केले होते. इतर दोन कांड १६४५ ते १६४९ मध्ये साताऱ्यातील मसूर येथे पूर्ण केले. या सात कांडांमध्ये २४,६०० संस्कृत श्लोक असून, ते १८२० पृष्ठांचे आहे.

ग्रंथ संपदेचे झाले जतन

वाग्देवता मंदिरात समर्थांच्या या सर्व ग्रंथ संपदेचे जतन (रिस्टोरेशन) करण्यात आले आहेत. त्याचे डिजिटलायझेशनही झाले असून, समर्थांचे वाल्म‌िकी रामायणाचे सातही कांड सर्वसामान्यांपर्यंत पोहचावेत यासाठी वाग्देवता मंदिरातर्फे प्रयत्न सुरू आहेत. यातील पहिले बालकांड प्रकाशित करण्यात आले असून, त्यात समर्थांया हस्ताक्षरातील मूळ संस्कृत बालकांडाचे मराठी व इंगज्री अनुवाद करण्यात आला आहे.

समर्थांच्या सातही कांड समाजासमोर यावीत यासाठी प्रयत्न सुरू असून, यातील पहिले बालकांड ग्रंथ रूपात आले आहे. येत्या वर्षात ३ व पुढील वर्षी ३ तीन कांड ग्रंथ रूपात घरोघरी पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. इतर कांड यावीत यासाठी समाजाकडून पाठबळाची गरज आहे.

शरद कुबेर, अध्यक्ष, वाग्देवता मंदिर, धुळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीटंचाईने घेतला महिलेचा बळी

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या त्र्यंबक तालुक्यात देवगाव भागातील लचकेवाडी येथे झऱ्यावर पिण्याचे पाणी घेण्यासाठी गेलेल्या वयोवृद्ध आदिवासी महिलेचा बुडून मृत्यू झाला. तालुक्यातील पाणीटंचाई गंभीर व‍ळणावर जाऊन पोचल्याची प्रचिती या घटनेच्या निमित्ताने आली आहे.

साळुबाई वारे (वय ६०) असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास ही महिला धरणावर पाणी घेण्यासाठी गेली होती. धरणाला लागूनच पाण्याचा झरा आहे. तेथे पाण्याचा हंडा भरीत असताना साळुबाई झऱ्यात पडली. त्यानंतर काही वेळातच तिचा मृत्यू झाला. सायंकाळी उशिराने घडला प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आला. धरणातील पाणी गढूळ असते. त्यामुळे नितळ पाणी भरण्यासाठी हा झरा खोदण्यात आला होता. महिलेच्या मृत्यूमुळे या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नळाला पाणी आलेच नाही!

देवगावच्या बोरीची वाडी आणि हुंब्याची मेट या दोन पाड्यांसाठी ४९ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होते. या योजनेवर पैसे खर्च होऊनही नळाचे पाणी लचके वस्तीला मिळू शकले नाही. योजनेत समावेश नसलेल्या हट्टी पाडा येथे पैसा खर्च करण्यात आला. पाणीपुरवठा योजनेसाठी खर्च होवूनही नळाचे पाणी मिळाले नाही म्हणून ग्रामस्थांनी झरा खोदलेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटींमध्ये गुरफटला गाभारा प्रवेश!

0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वराचा गाभारा महिलांसाठी अटीशर्तींवर गुरूवारी पहाटे खुला करण्याचा दिलेला शब्द विश्वस्तांनी अखेर फिरवला. अटीशर्तींच्या चर्चेत गुंतवून स्वराज्य संघटनेच्या महिलांना कात्रजचा घाट दाख‌विण्यात आला. परिणामी महिलांचा त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील बहुचर्चित प्रवेश निव्वळ फार्सच ठरला. न्यायालयाने दिलेला हक्क हिरावल्याची तसेच विश्वस्तांनीही मंदिराचे नियम पाळले नसल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्याचा इशारा स्वराज्य संघटनेच्या महिलांनी दिला आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या ‌विश्वस्तांनी बुधवारी `स्वराज्य`च्या महिलांसोबत झालेल्या वादानंतर सकाळी ६ ते ७ यावेळेत अटीशर्तींवर प्रवेश देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार सकाळी सहाच्या सुमारास महिला मंदिर आवारात दाखल झाल्या. पण त्या आधीच सोवळेधारी पुरोहित मंडळी भागाऱ्यात मंत्रघोष करीत दाखल झाली होती. स्वराज्य संघटनेच्या संस्थापक वनीता गुट्टे आणि सहकारी महिलांनी आम्हाला गाभाऱ्यात प्रवेश द्या, अशी मागणी केली. यावेळी विश्वस्तांनी प्रवेशासाठी रांगेत येण्याची सूचना केली. महिलांनी रांगेतून मंदिरात प्रवेश केला. मात्र, गाभारा आधीच पुरूष भाविकांनी भरलेला होता. त्यामुळे तेथे लगेच कोणाला प्रवेश दिला जाणार नाही, असे महिलांना सांगण्यात आले. महिलांनी गाभाऱ्याच्या समोरील अरूंद जागेत थांबू नये, असे देवस्थान प्रशासनाने बजावले. विश्वस्तांची खेळी लक्षात आल्याने महिला आंदोलकांनी तेथेच बैठक मारली. गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही, तोपर्यंत येथून हलणार नाही, अशी त्यांची भूमिका होती.

दोन महिलांनी प्रातिनिधीक स्वरूपात गाभाऱ्यात जावे, असे पोल‌िसांनी सुचविले. यावेळी गुट्टे आणि एक सहकारी महिला तयार झाल्या; मात्र त्यांच्या अंगावर ओले सुती वस्त्र असा देवस्थानने ठरविलेला ड्रेसकोड नसल्याने या नियमाचे पालन करावे, अशी मागणी उपस्थित ग्रामस्थ तसेच विश्वस्तांनी केली. मात्र, महिलांनी आम्ही आहे त्याच वस्रांसह प्रवेश करणार असा आग्रह धरला. त्यावर वस्रे ओली करून यावीत असे सूचविण्यात आले. त्याचबरोबर मंदिराच्या प्रांगणातील पाण्याच्या टाकीजव‍ळ महिलांना स्नान करण्यास मनाई करण्यात आली. यानंतर मात्र महिलांनी हेतूपूर्वक आम्हाला प्रवेश द‌िला जात नसल्याचा आरोप करीत विस्वस्तांशी वाद घालण्यास सुरूवात केली. यावेळी पोलिसांनी एका महिलेला तरी प्रवेश द्या, अशी विनंती विश्वस्तांकडे केली. त्यानंतर विश्वस्त असलेल्या लल‌िता शिंदे यांना गाभारा प्रवेशासाठी तयार करण्यात आले. त्यांना मंदिराच्या प्रांगणातच स्नान घालण्यात आले. मात्र, त्यांना गाभाऱ्यात जाऊ नये म्हणून पूजक तुंगार मंडळींनी तीव्र विरोध केला. या गोंधळात सात वाजल्याने आता कोणालाही गाभाऱ्यात प्रवेश मिळणार नाही, असे देवस्थानने जाहीर केल्याने या नाट्यावर तात्पुरता पडदा पडला.

पोलिसांत तक्रार करणार!

देवस्थानचे प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य यांनी महिलांनी मंदिरातून निघून जावे असे आवाहन केले. मात्र स्वराज्यच्या महिलांनी उत्तर दरवाजाच्या समोर ठाण मांडले. दिवसभर या महिला येथे बसून होत्या. पोलिसांनी व विश्वस्तांनी प्रवेश देण्याचा बनाव केल्याचा आरोप करतानाच या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे स्वराज्य संघटनेच्या संस्थापक वनीता गुट्टे यांनी सांगितले. विश्वस्तांनीही स्वराज्यच्या महिलांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले. मात्र, रात्री उशिरापर्यंत पोलिसांना कोणाचाही तक्रार अर्ज प्राप्त झाला नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गाळे भाडेवाढीबाबत आज निर्णय

0
0

महापालिकेच्या मालकीच्या सतराशे गाळ्यांची रेडीरेकनरनुसार भाडेवाढ करण्याबाबत किंवा त्यांचा फेरलिलाव बाबतचा धोरणात्मक प्रस्ताव शनिवारच्या (दि. १६) महासभेत चर्चेला येणार आहे. स्थायी समितीने रेडीरेकनरने भाडेवाढ फेटाळत पंधरा वर्षाच्या दीर्घमुदतीच्या भाडेकरारावर देण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे महापालिका गाळ्यांबाबत काय धोरणात्मक निर्णय घेते याकडे गाळेधारकांचे लक्ष लागून आहे.

महापालिकेच्या महासभेत विविध धोरणात्मक विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यात शहरातील महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या सतराशे गाळ्यांच्या भाडेवाढीसह साधुग्रामसह शहरातील अन्य मैदानांच्या जागांचे दर वाढविण्याचा विषय चर्चेला येणार आहे. स्थायी समितीने गाळ्यांचा फेरलिलाव फेटाळत रेड‌िरेकनेरने भाडेवाढ करण्यास विरोध केला होता. तसेच गाळ्यांची मुदतवाढ १५ वर्षांनी वाढव‌िली आहे. त्यामुळे महासभा आता गाळ्यांचे भाडे निश्चित करणार आहे. शहरातील बेरोजगारांना रोजगारासाठी हे गाळे दिले आहेत. रेडीरेकनरने आकारणी केल्यास भाडेवाढ शंभरच्या पटीने होत आहे. त्यामुळे या भाडेवाढीला गाळेधारकांचा विरोध आहे. तसेच साधुग्रामची जागा सभा, मेळावे, उत्सव व प्रदर्शनासाठी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सोबतच शहरातील प्रमुख मैदानांच्या दरातही वाढ केली जाणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

'निरी' अहवालावर चर्चा गोदावरीच्या निळ्या व लाल पूररेषेतील बांधकामाना परवानगी न देण्यासंदर्भातील अहवाल 'निरी'ने दिला आहे. त्यावर नेमण्यात आलेल्या समितीने गावठाणातील लाल पूररेषेतील बांधकामांना अटी शर्तीच्या अधीन राहून परवानगी देण्याचा अहवाल दिला आहे. त्या अहवालावरही महासभेत चर्चा केली जाणार आहे. तसेच सार्वनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची रक्कम वाढविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या मुद्याकडेही सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुकांचे लक्ष ग्रामपंचायतींकडे

0
0

जि. प. साठी मोर्चेबांधणी सुरू

म. टा. वृत्तसेवा, कळवण

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांचे लक्ष ग्रामपंचायत निवडणुकीकडे लागले आहे. कोणता गट-तट आघाडीवर आहे, कोण बाजी मारेल, कोणाला मदत करावी, असे आडाखे बांधले जाऊ लागले आहेत. यामुळे तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांना महत्त्व प्राप्त झाले आहे. येत्या १७ एप्रिल रोजी ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे.

देवळा तालुक्यातील तेरापैकी रामेश्वर, कापशी, सुभाषनगर, विजयनगर या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका व इतर सात गावांतील काही जागा बिनविरोध झाल्या असल्या, तरी इतर ठिकाणी मात्र त्या त्या गावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ऐन उन्हाळ्यात प्रचारयंत्रणा राबविण्याची वेळ आल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांची मोठी दमछाक होत आहे. या निवडणुकांमध्ये बहुतांश गावांमध्ये युवा वर्ग सक्रिय झाल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. पारावरच्या गप्पांवरही निवडणूक हाच विषय चर्चिला जात आहे. काही ठिकाणी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गावात वर्चस्व निर्माण करण्यासाठी दोन पाऊले मागे येण्याचा सोपस्कार राबविण्याचाही प्रकार घडला आहे. तालुक्यातील प्रतिष्ठेच्या अशा रामेश्वर, विजयनगर, सुभाषनगर व कापशी या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

बहुतांश गावात राखीव जागा बिनविरोध झाल्या असून, सर्वसाधारण जागांसाठी निवडणुका होत आहे. बहुतांश सर्वसाधारण गटातील लढती आमनेसामने स्वरूपाच्या आहेत. मतदारसंख्या मर्यादित असल्याने व एक-एक मत मोलाचे असल्याने काट्याच्या निवडणुका होत असल्याचे चित्र आहे. गावागावात गुप्त बैठका, भाऊबंदकीच्या बैठका, ओल्या-कोरड्या पार्ट्या यांनी जोर धरला आहे.

या जागांसाठी रस्सीखेच खुंटेवाडी व सावकी वगळता इतर गावातील काही जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे पिंपळगाव (१० जागा), खर्डे (७ जागा), खुंटेवाडी (९ जागा), वाखारी (६ जागा), शेरी(४ जागा), सावकी (११ जागा), खडकतळे (६ जागा), वार्शी (३ जागा), गुंजाळनगर (४ जागा) या गावातील ६० जागांसाठी जोरदार रस्सीखेच पहावयास मिळत आहे.

यांची प्रतिष्ठा पणाला तालुक्यातील राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या पंचायत समितीचे सभापती अशोक बोरसे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, माजी सभापती बापू देवरे, खुंटेवाडीचे युवा उद्योजक भाऊसाहेब पगार, बाजार समितीचे माजी संचालक नदीश थोरात, गुंजाळनगरचे माजी उपसरपंच सतीश गुंजाळ, वार्शीचे विद्यमान उपसरपंच भिला सोनवणे, खर्डेचे विद्यमान उपसरपंच भरत देवरे, वाखारीचे जेष्ठ नेते रतन शंकर पाटील, शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख नंदकुमार जाधव, सावकीचे विद्यमान उपसरपंच कारभारी पवार आदींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

डॉक्टरही रिंगणात देवळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी देवळा येथे वैद्यकीय व्यवसायात कार्यरत असलेले डॉ. संजय शिरसाठ (वाखारी), डॉ. राजेंद्र गुंजाळ, डॉ. संजय निकम यांच्या सुविद्य पत्नी डॉ. कविता निकम (गुंजाळनगर) आदींनी निवडणूक आखाड्यात उडी घेतल्याने निवडणुकीत रंग भरला आहे. देशपातळीवरील वैद्यकीय क्षेत्रातील अग्रेसर अशा सीसीआयएमचे पदाधिकारी तथा नाशिक येथील शताब्दी हॉस्पिटलचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर थोरात यांनी खुंटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीतून ऐनवेळेस माघार घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमप्रकरणातून तरुणाने रिक्षासह स्वतःलाही पेटविले

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

कऱ्हे येथील युवकाने प्रेमप्रकरणातील नैराश्यातून रॉकेल ओतून अ‍ॅपेरिक्षा जाळून खाक केली. तसेच, स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विंचूर शहादा प्रकाशा राज्य महामार्गावरील सटाणा बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली. सुदैवाने जागृक नागरिकांनी त्यास ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. हा तरूण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तालुक्यातील कऱ्हे येथील विनोद अहिरे (२१) या युवकाने शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सटाणा बसस्थानकाबाहेरील मुख्य चौकात प्रेमप्रकरणाच्या नैराश्येतून स्वतःची अ‍ॅपे रिक्षा भरदुपारी रस्त्यात उभे केली. त्यावर रॉकेल ओतून अ‍ॅपेवाहन पेटवून दिले. तर्र स्वतःवर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता प्रत्यक्षदर्शींनी धावून जात त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला. विनोदला तत्काळ सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अधिक उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस कमजोर; गुन्हेगार ‌शिरजोर!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या कृपाशीर्वादाने, पोलिस उपायुक्त एन. अंबिका यांच्या खंबीर पाठिंब्याने आणि सिनीअर पीआय प्रकाश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटीत नव्याने रावणराज अवतारू पाहत आहे. खंडणी, अपहरण किंवा खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या संशयितांची पोलिसच सरबराई करीत असून, गुन्हेगार आणि पोलिसांमधील मैत्रीचे नाते पाहून सर्वसामान्य मात्र अवाक झाली आहेत.

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) हा कलम सराईत गुन्हेगारांविरोधातच वापरला जातो. समाजाला ज्या टोळीचा त्रास आहे, त्यांना रोखणे अत्यावश्यक ठरत असल्यास मोक्का कायद्याचा वापर केला जातो. पंचवटी पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी मोक्कानुसार काही संशयितांना अटक केली होती. बराच काळ जेलमध्ये व्यथित केल्यानंतर संबंधितांना जामीन मिळाला. नुकतेच जेलमधून बाहेर पडलेल्या जया दिवे, कुंदन परदेशी आदींनी पुन्हा राडा घालण्यास सुरुवात केली आहे. गावटी कट्टे दाखवत त्यांनी काही दिवसांपूर्वी एका महिलेला मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. गुन्हेगार सुधारतात त्यांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे, असे मत पंचवटी पोलिसांनी व्यक्त केले.

हा दिवस उलटत नाही तोच संबंधित महिलेच्या बंद कार्यालयावर पुन्हा एकदा काही गुन्हेगारांनी राग काढला. तेथील फोटो असलेल्या बॅनरचे तुकडे करण्यात आले. पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हेगारांना जास्त त्रास नको म्हणून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. पोलिसांकडूनच रसद मिळत असल्याने भविष्यात या गुन्हेगारांनी खून केला तर काय, असा प्रश्न संबंधित पीडित महिला कविता पवार यांच्यासह सर्वसामान्यांना पडला आहे. पंचवटी पोलिसांनी मात्र संशयितांकडून हमीपत्र घेत त्यांच्यावर ​विश्वास दर्शवला.

सर्वसामान्यांचा जातोय बळी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये नुकतीच शांतता कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीस शेखर निकम उपस्थित होता. शेखर निकमने सध्या राजकारणाची वाट पकडली आहे. अपहरणाच्या एका गुन्ह्यात त्याची निर्दोष सुटका झाली आहे. मात्र, खंडणी किंवा तत्सम काही गुन्हे अजून कोर्टात प्रलंबित आहेत. त्याचा भाऊ किरण याच्यावर सुध्दा काही गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे या बैठकीत आमदार बाळासाहेब सानप यांच्या शेजारीच निकम बसलेला होता. पंचवटी पोलिसांच्या या भूमिकेला अनेक कांगोरे असून, त्यामुळे पंचवटीकर धास्तावले आहेत. वरील महिलेच्या हाणामारी प्रकरणात देखील निकमने सक्रिय सहभाग घेतला होता. निकमच्या पुढाकारामुळेच पंचवटी पोलिसांनी संशयितांविरोधात कलमांचा योग्य वापर केला नाही. तसे झाले असते तर कोर्टाने दिलेला जामीन सुध्दा रद्द झाला असता. असो, सध्या पोलिसांचे काम संशयित करीत असून, पोलिस मात्र गमजा मारत आहेत. पोलिस आणि गुन्हेगार हम साथ साथ है, असे वागत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लहवितमध्ये तणावपूर्ण वातावरण

0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गावात असलेल्या बीएसएनएल टॉवरवरील निळा झेंडा काढून टाकल्याने व गावाच्या चौकात लावलेल्या जयंती फलकावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले फलक फाडल्याने संशयित आकाश शिंदे यास पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे लहवितमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता.

लहवित येथे डॉ. आंबेडकर जयंतीसाठी मार्केट परिसरातील दुमजली इमारतीवर डॉ. बाबासाहेबांचे छायाचित्र असलेले बॅनर फाडल्याने व झेंडा काढून टाकल्याने भावना दुखावल्याची अविनाश गायकवाड यांनी फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आकाशसह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्पूर्वी सकाळी दलित समाजाने एकत्र येत गावातील ग्रामपंचायत कार्यालयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करीत मोर्चा काढला. गावात सकाळपासून तणावाचे वातावरण होते. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी तातडीने राज्य राखीव दल व दंगा निवारण पथक तैनात केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्यासह सहाय्यक पोलिस उपायुक्त रवींद्र वाडेकर यांनी गावातील दलित समाजाच्या नेत्यांशी चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन संपले

0
0

दुष्काळात ११५ दलघफू पाण्याची बचत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पिण्याच्या पाण्याची परिस्थिती सध्या अतिशय बिकट असताना प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या कसोशीच्या प्रयत्नांमुळे तब्बल ११५ दशलक्ष घनफूट पाण्याची बचत झाली आहे. पालखेड डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याची गळती, तसेच चोरी थांबविण्यात यश आल्यानेच पाण्याची बचत होऊ शकली आहे.

पालखेड डाव्या कालव्यातून तहानलेल्या मनमाड, येवला, मनमाड रेल्वेसह ३८ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी पालखेड डाव्या कालव्यातून सोडलेले आवर्तन गुरुवारी सायंकाळी बंद करण्यात आले. या आवर्तनातून तब्बल ११५ दशलक्ष घनफूट पाण्याची बचत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लाखभर वस्ती असलेल्या शहराला आठ महिने पुरेल इतके हे पाणी आहे.

तब्बल ८८ किलोमीटर लांबीच्या या कालव्यातून होणारी पाण्याची चोरी याचा अंदाज पकडून प्रशासनाने ७३० दशलक्ष पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात मात्र नियोजन केल्यामुळे ६१५ दशलक्ष घनफूटच पाणी लागले. पाणीचोरीमुळे दाब मिळत नाही. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी एकाच रोटेशनसाठी ८०० दशलक्ष घनफुटाहून अधिक पाणी लागले होते. पाण्याचा दाब मिळाला नाही तर त्यात वाढ करावी लागेल, असा अंदाज जलसंपदा विभागाने पकडला होता. त्यासाठी जलसंपदा विभागाने ३०० दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी लागेल, यासाठी आपली तयारीही केली होती.

पाच एप्रिल रोजी पालखेड डाव्या कालव्यात ७५० क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले. ७२ तासांनंतर हे पाणी मनमाड, येवला परिसरात पोहोचले. या पाण्याची चोरी कालव्यातून होऊ नये, म्हणून राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्यांचे १८० जवान तैनात करण्यात आले होते. त्याचप्रमाणे महसूल, पोलिस, महावितरण व जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून होते. या बंदोबस्तातही पाणी चोरण्याऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तीन वर्षांपूर्वी अशा टंचाईच्या काळात पाणी सोडल्यानंतर ते मनमाड, येवला येथे न पोहोचल्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. त्या वेळी अनेक गुन्हेही दाखल झाले; पण यानंतरही पाणी अतिरिक्त सोडावे लागले होते. यंदा मात्र नियोजित आवर्तनापेक्षा कमी आवर्तन सोडावे लागले आहे. यातून ११५ दलघफू पाण्याची बचत झाली आहे.

विशेष म्हणजे, मनमाडसारख्या दुष्काळाला तोंड देणाऱ्या शहराची ९ ते १० महिन्यांची तहान एवढ्या पाण्यावर भागू शकते. दरम्यान, पाण्याची ही बचत झाली असली तरी मनमाड, येवलासाठी दुसरे आर्वतन सोडता येईल इतके पाणी उपलब्ध नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

तब्बल दहा दिवस पालखेड डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. त्या वेळी पोलिस, महसूल, महावितरण या सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यामुळे पाण्याचा विसर्ग होण्यात अडचण झाली नाही. मोठ्या प्रमाणात पाणीचोरी रोखण्यात आम्हाला यश आले. ७३० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश होते; पण प्रत्यक्षात ६१५ दलघफू पाणी सोडले. - राजेंद्र शिंपी, इंजिनीअर, जलसंपदा विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूररोडला पुन्हा चेन स्नॅचिंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पतीसोबत वॉकिंगसाठी जात असलेल्या ५८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये ​किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवरील दोघा भामट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना गंगापूररोडवरील आनंदवली परिसरातील युनियन बँकेसमोर गुरुवारी संध्याकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास घडली.

या प्रकरणी आनंदमंगल अपार्टमेंट येथे राहणाऱ्या अलका दत्तात्रय मंडलिक यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. घटनेच्या दिवशी मंडलिक आपल्या पतीसोबत वॉकिंगला जात असताना चोरट्यांनी मंगळसूत्र तोडून पोबारा केला. गंगापूररोड तसेच महात्मानगर परिसरात वारंवार चेन स्नॅचिंगच्या घटना घडत असून, पोलिसांकडे या प्रकरणी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

१५ हजारांची चोरी सीबीएस सिग्नलजवळील हॉटेल सुरुची जवळ महिलेच्या पर्समधील १५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी हातोहात लांबवली. ही घटना गुरुवारी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास घडली. दिंडोरीरोडवरील तलाठी कॉलनी परिसरात राहणाऱ्या चंदा दिलीप पारखे (वय ४५) यांनी या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, पुढील तपास हवालदार सोनार करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस शिपाईपदासाठी आज लेखी परीक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिस दलातील ३१ रिक्त पदांसाठी आज, शनिवारी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. शारीरिक चाचणीनंतर लेखी​ परीक्षेसाठी ६४४ उमेदवार पात्र ठरले आहेत. ही परीक्षा मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पार पडेल.

राज्यभरात राबविण्यात आलेल्या पोलिस भरती प्रक्रियेत नाशिक शहर पोलिस दलातील रिक्त ३१ पोलिस शिपाईपदांचा विचार करण्यात आला. या रिक्त पदांसाठी तब्बल चार हजार ९१६ अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले होते. २९ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत सदर उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. गैरहजर उमेदवार वगळता कागदपत्रांची छाननी झालेल्या व शारीरिक चाचणी परीक्षांमध्ये सहभाग नोंदवलेल्या उमेदवारांची गुणांकन यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीनुसार लेखी परीक्षेसाठी ६४४ उमेदवार पात्र ठरले. संबंधित पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा शनिवारी पोलिस मुख्यालयातील कवायत मैदानावर पार पडणार आहे. दरम्यान, शहरात उन्हाचा पारा धोकादायक पध्दतीने चढत आहे. जिल्ह्यात तब्बल ४४ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली असून, यामुळे उमेदवारांच्या बुध्दिमत्तेसह त्यांच्या शारीरिक क्षमतेचीही पुन्हा एकदा चाचणी घेण्यात येणार आहे. यामुळे निवडीसाठी चांगलाच घाम गाळावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या मातीतला सुपुत्र जाणतो हत्तींची भाषा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

''हत्तींचे जग वेगळे असते. त्यांच्याशी बोलताना खूप सुक्ष्म व्हावे लागते. कारण हत्ती सात किलोमीटर परिघ क्षेत्रातील दुसऱ्या हत्तीशी बोलू शकतो. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर निसर्गाची अद््भुत किमया अनुभवता येते. एकदा त्याच्याशी मैत्री झाल्यावर तो कधीही तुम्हाला सोडून जात नाही. संकटात कधीही तुम्हाला एकटे टाकत नाही.'' हत्तींची भाषा जाणणारा नाशिकच्या मातीतला सुपुत्र आनंद शिंदे हत्तींची स्वभाववैशिष्ट्ये उलगडून सांगत होते...

'माझे मूळ गाव नाशिकजवळचे पिंपळगाव गरुडेश्वर. वळणावळणाने असणारी हिरवाई आणि डोंगरांच्या कुशीत वसलेले माझे गाव आजही माझ्यासाठी आकर्षणाचे केंद्र आहे. येथील वातावरणाची मला भुरळ पडते. वर्षभरातून अनेक वेळा मी गावी येतो. येथे माझ्या आजोबांच्या, काकांच्या व वडिलांच्या पाऊलखुणा आहेत. त्यांचा स्पर्श मी अनुभवतो.' आनंद शिंदे त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील त्यांच्या गावाविषय‌ीही भरभरून बोलत होते. त्यांचे आजोबा द. स. उर्फ अण्णासाहेब शिंदे हे नावाजलेले कीर्तनकार होते. त्यांच्या बोटाला धरून नाशिक फिरलेले आनंद शिंदे नाशिकविषयीच्या सर्व स्मृती जागवतात. पत्रकारितेच्या क्षेत्रात असताना केरळला झालेली बदली आणि तेथे संवाद साधण्यासाठी मल्याळम भाषेची असलेली उणीव यामुळे शिंदे यांचा मोर्चा निसर्गाकडे वळला. फोटोग्राफी त्यांच्या रक्तातच होती. वाइल्ड वर्ल्ड लाइफ फोटोग्राफी करताना केरळला १० तासांहून अधिक वेळ शूटिंग चालायचे. त्यात हत्तींशी जवळून संबंध आला. या मोकळ्या वेळात हत्तींचे चालणे, त्यांची संवाद साधण्याची पद्धत, त्यांचे प्रेम, त्यांचा राग, त्यांच्या विविध भावना शिंदे कॅच करू लागले. त्यातून त्यांना हत्तीचे वर्तन कळू लागले. हत्तींच्या कळपासोबत घालवलेला वेळ त्यांना निसर्गाच्या एका अनोख्या शक्तीचे वरदान देऊ पाहत होता. ती शक्ती होती हत्तींची भाषा समजण्याची.

हत्तींच्या आजारावर प्रबंध

आनंद शिंदे यांना हळूहळू हत्तींची भाषा कळू लागली. तो काळ हत्तींसाठी मोठा कठीण होता. त्या वेळी हत्तीचे पिल्लू सुरक्षित नव्हते. काही कारणाने हत्तींची पिले पटापट मरू लागली. त्याचे कारण आनंद शिंदे यांनी अभ्यासपूर्वक शोधून काढले आणि मुख्य वनाधिकाऱ्याला ते दाखवले. त्यांनी गांभीर्य ओळखून प्रेझेंटेशन बनवायला लावले व डॉक्टर्ससमोर ते सादर करण्याची सूचना केली. याच वेळी शिंदे यांचे आवडते हत्तीचे पिल्लूही या आजाराला बळी पडले आणि त्यांच्यासाठी सर्व जगच बदलले. त्यांनी प्रचंड अभ्यास केला व त्यामागची कारणे शोधली आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी डॉक्टर्स तत्पर झाले. पुढे शिंदे यांनी 'कम्युनिकेटिंग एलिफंट' हा विषय घेऊन आशियाई हत्ती परिषदेत सादर केला. त्यांची अभ्यासाची खोली पाहून अनेकांनी सकारात्मकपणे त्यांना दाद दिली. हत्ती विषयातील मास्टर्स असलेले डॉ. सुझान मिकोरा यांनी शिंदे यांना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे हत्तींची भाषा समजून घेण्याबद्दल कोणतीही शैक्षणिक पदवी घेतलेली नसताना अनुभवाला मान्यता दिली.

अशा या अवलियाशी आपण रविवारी, १७ एप्रिल रोजी टिळकपथावरील सावाना बिल्डिंगमागील मु. शं. औरंगाबादकर सभागृहात संवाद साधणार आहोत. सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. या वेळी प्रोजेक्टरवर काही हत्तींशी संवाद साधलेल्या व्हिडिओ क्लिपही दाखविण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळात ११५ दलघफू पाण्याची बचत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पिण्याच्या पाण्याची परिस्थिती सध्या अतिशय बिकट असताना प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या कसोशीच्या प्रयत्नांमुळे तब्बल ११५ दशलक्ष घनफूट पाण्याची बचत झाली आहे. पालखेड डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याची गळती, तसेच चोरी थांबविण्यात यश आल्यानेच पाण्याची बचत होऊ शकली आहे.

पालखेड डाव्या कालव्यातून तहानलेल्या मनमाड, येवला, मनमाड रेल्वेसह ३८ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी पालखेड डाव्या कालव्यातून सोडलेले आवर्तन गुरुवारी सायंकाळी बंद करण्यात आले. या आवर्तनातून तब्बल ११५ दशलक्ष घनफूट पाण्याची बचत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लाखभर वस्ती असलेल्या शहराला आठ महिने पुरेल इतके हे पाणी आहे.

तब्बल ८८ किलोमीटर लांबीच्या या कालव्यातून होणारी पाण्याची चोरी याचा अंदाज पकडून प्रशासनाने ७३० दशलक्ष पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात मात्र नियोजन केल्यामुळे ६१५ दशलक्ष घनफूटच पाणी लागले. पाणीचोरीमुळे दाब मिळत नाही. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी एकाच रोटेशनसाठी ८०० दशलक्ष घनफुटाहून अधिक पाणी लागले होते. पाण्याचा दाब मिळाला नाही तर त्यात वाढ करावी लागेल, असा अंदाज जलसंपदा विभागाने पकडला होता. त्यासाठी जलसंपदा विभागाने ३०० दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी लागेल, यासाठी आपली तयारीही केली होती.

पाच एप्रिल रोजी पालखेड डाव्या कालव्यात ७५० क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले. ७२ तासांनंतर हे पाणी मनमाड, येवला परिसरात पोहोचले. या पाण्याची चोरी कालव्यातून होऊ नये, म्हणून राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्यांचे १८० जवान तैनात करण्यात आले होते. त्याचप्रमाणे महसूल, पोलिस, महावितरण व जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून होते. या बंदोबस्तातही पाणी चोरण्याऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तीन वर्षांपूर्वी अशा टंचाईच्या काळात पाणी सोडल्यानंतर ते मनमाड, येवला येथे न पोहोचल्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. त्या वेळी अनेक गुन्हेही दाखल झाले; पण यानंतरही पाणी अतिरिक्त सोडावे लागले होते. यंदा मात्र नियोजित आवर्तनापेक्षा

कमी आवर्तन सोडावे लागले आहे. यातून ११५ दलघफू पाण्याची बचत झाली आहे.

विशेष म्हणजे, मनमाडसारख्या दुष्काळाला तोंड देणाऱ्या शहराची ९ ते १० महिन्यांची तहान एवढ्या पाण्यावर भागू शकते. दरम्यान, पाण्याची ही बचत झाली असली तरी मनमाड, येवलासाठी दुसरे आर्वतन सोडता येईल इतके पाणी उपलब्ध नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

तब्बल दहा दिवस पालखेड डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. त्या वेळी पोलिस, महसूल, महावितरण या सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यामुळे पाण्याचा विसर्ग होण्यात अडचण झाली नाही. मोठ्या प्रमाणात पाणीचोरी रोखण्यात आम्हाला यश आले. ७३० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश होते; पण प्रत्यक्षात ६१५ दलघफू पाणी सोडले. - राजेंद्र शिंपी, इंजिनीअर, जलसंपदा विभाग





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावचा पारा ४४ अंशांवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाच्या तप्त झळांनी नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यावासीयांना नको नको करून सोडले आहे. कधी नव्हे ते यंदा प्रथमच एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात मालेगावचा पारा ४४.२ अंशांवर पोहोचला आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान मालेगावमध्येच नोंदवले गेले आहे. नाशिकचा पाराही चाळिशीपर्यंत गेल्याने विदर्भ मराठवाड्याप्रमाणेच नाशिककरही उन्हात पोळून निघत आहेत. मालेगाव खालोखाल जळगावने ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे.

थंड हवेचे ठिकाण म्हणून नाशिक परिचित असले तरी येथे अवकाळी पावसापाठोपाठ आता उन्हाचा कहरही नाशिककरांना अनुभवयास मिळतो आहे. नाशिक आणि खान्देशच्या मध्यावर असलेल्या मालेगावात सूर्य कोपला असून, तापमानाचा पारा ४४.२ अंशांच्या वर गेला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांत नाशिकचेही नाव झळकू लागले होते. हिवाळ्यात नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. चार अंश सेल्सिअसपर्यंत हे तापमान खाली उतरले होते. हेच नाशिक आता 'हॉट' झाले असून, तापमानाने चाळिशी ओलांडली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा मालेगावात आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान नोंदविले गेले. एप्रिलच्या पंधरवड्यातच ४४.२ अंशांपर्यंत तापमान गेले आहे. नाशिक शहरातही शुक्रवारी ३९.९ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदविले गेले. किमान तापमान २० अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले. गत आठवड्यात ३८.२ अंशांपर्यंत तापमान पोहोचले होते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता काहीशी कमी होती. या आठवड्यात ढगाळ वातावरण गायब झाले असून, नागरिकांना तप्त झळांचा सामना करावा लागतो आहे. शहरात गेल्या तीन दिवसांपासून कमाल तापमानामध्ये वाढ होत आहे. सकाळी नऊपासूनच वातावरणात असह्य उकाडा जाणवू लागला आहे. अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत तर उन्हाचा तीव्र चटका जाणवत असल्याने लोक घराबाहेर पडणे टाळू लागले आहेत. त्यामुळे दुपारी बहुतांश रस्ते आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पहावयास मिळतो आहे. खान्देशातील जळगावमध्ये तापमानाने चाळीशी ओलांडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकच्या विश्वस्तांसह अडीचशे ग्रामस्थांवर गुन्हे

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिरात गाभारा प्रवेशासाठी आलेल्या स्वराज्य संघटनेच्या महिलांना अपमानास्पद वागणूक देऊन प्रवेश नाकारला म्हणून सामाजिक कार्यकर्त्या वनिता तानाजी गुट्टे यांनी त्र्यंबकेश्वरमधील दोनशे ते अडीचशे ग्रामस्थांविरोधात गुरुवारी रात्री पावणेअकराला फिर्याद दिली असून, त्यांच्याविरोधात त्र्यंबक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात त्र्यंबकेश्वर मंदिराचे ट्रस्टी, पुरोहित, पुजारी, नगरसेवकांसह महिला व पुरुष ग्रामस्थांचा समावेश आहे. या व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र सार्वजनिक प्रार्थनास्थळाच्या प्रवेश मान्यता अधिनियम १९५६ चे कलम ४ (अ) (१) (अ) ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात गाभारा प्रवेशासाठी बुधवारी, १३ एप्रिल रोजी दुपारी तीन ते रात्री नऊदरम्यान आणि गुरुवारी सकाळी सव्वासहा ते सायंकाळी पाचदरम्यान स्वराज्य संघटनेच्या महिला आल्या असता त्यांना मंदिराचे ट्रस्टी, पुरोहित, पुजारी, ग्रामस्थ महिला व पुरुष नगरसेवक आणि इतरांनी विरोध केला. शिवीगाळ, धक्काबुकी करून दमबाजी केली, असे गुट्टे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबतचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बेंडाळे यांच्याकडे देण्यात आला आहे. दरम्यान, मंदिर देवस्थान ट्रस्टनेही या महिलांबाबत पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असल्याचे समजते. मात्र, अधिक चौकशी केली असता ट्रस्ट प्रशासन अथवा पोलिस ठाण्याने माहिती दिली नाही.

सीसीटीव्हीवरून चौकशी सत्र?
त्र्यंबकेश्वरच्या ग्रामस्थांवर मोठ्या संख्येने गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या गुन्ह्यात समावेश असलेल्या कायद्याच्या कलमानुसार सहा महिने कारावासही होऊ शकतो. यात अज्ञात २०० ते २५० व्यक्तींचा समावेश असल्याने नेमके कोणाला चौकशीस सामोरे जावे लागेल या संदर्भात आडाखे बांधले जात आहेत. या प्रकरणी मंदिर प्रशासनाचे सीसीटीव्ही फूटेज तपासले जाण्याची शक्यता आहे. आंदोलनकर्त्या महिलांनी दिलेल्या अर्जात, आम्हाला शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी खाण्याचे जिन्नस दिले नाही, सार्वजनिक टॉयलेट व्यवस्थेचा वापर करू दिला नाही आदी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. मात्र, मंदिरालगतच्या एका हॉटेल व्यावसायिकाने, या महिलांनी आपल्याकडे नाश्ता केल्याचे सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images