Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

हमीभावासाठी कांदा उत्पादक रस्त्यावर

0
0

टीम मटा सरकारने तातडीने कांद्याला हमीभाव जाहीर करून दुष्काळात होरपळलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी कांदा उत्पादकांसह राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला. रणरणत्या उन्हात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

निर्यातमूल्य शून्य असतांना निर्यात धोरणांबाबत मोदी सरकारच्या धरसोड वृत्तीमुळेच भारतीय कांद्याला मागणी कमी झाली असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष अॅड. पगार यांनी केला. सरकारला कांदा खरेदीच करायचा होता, तर हमीभाव जाहीर केल्यानंतर खरेदी केला असता तरच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार होता. बाजार भावाप्रमाणे कांदा खरेदी करून सरकारला काय साध्य करायचे होते, असा प्रश्न पगार यांनी उपस्थित केला. 'अच्छे दिन' यावेत म्हणूनच बाजार भावानुसार कांदा खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची टीका जिल्हाध्यक्ष अॅड. पगार यांनी केली.

यावर्षी २०३ लाख मे. टन कांद्याचे उत्पादन झाले असून गतवर्षापेक्षा २५ लाख टन कांदा उत्पादन जास्त झाले आहे. असे असूनही केंद्र सरकार बाजार भावाप्रमाणे १५ हजार टन कांदा खरेदीची घोषणा शेतकऱ्यांची चेष्ठा करणारी आहे. या परिस्थितीत सरकारने कांद्याला हमी भाव जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली.

नाशिक तालुक्यातील नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील ओढा, इगतपुरी तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील बोरटेंभे चौफुली, त्र्यंबकेश्वर येथील जव्हार फाटा, पेठ येथे तहसीलदार कार्यालयासमोर, येवला येथे येवला चौफुली, कळवण येथे बस स्थानकासमोर, चांदवड येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड चौफुली, देवळा येथील पाचकंदील चौफुली, नांदगाव येथे विटी संकुल समोर, सटाणा येथे बस स्थानकासमोर, सिन्नर येथे बस स्थानकासमोर, सुरगाणा तालुक्यातील बोरगाव चौफुली, भगूर येथे रेल्वे स्टेशन जवळ तर नामपूर येथे बाजार समितीसमोर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला.

वणी येथे आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. पगार, आमदार नरहरी झिरवाळ, कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे सहभागी

झाले होते.

लाखलगाव

जिल्हा परिषद अध्यक्षा ना. विजयश्री चुंभळे, जिल्हा बँकेचे संचालक शिवाजी चुंभळे, विष्णुपंत म्हैसधुणे, तानाजी गायधनी, पंचायत समितीच्या सभापती मंदा निकम, जिल्हा परिषद सदस्या अलका साळुंके, सचिन पिंगळे, सोमनाथ खातळे, रामकृष्ण झाडे, यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले.

नांदगाव

कांद्याला हमीभाव मिळावा म्हणून नांदगाव येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे नांदगाव-मनमाड रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली होती. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, माजी नगराध्यक्ष बाळकाका कलंत्री, तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, शहराध्यक्ष अरुण पाटील, मनमाडचे शहराध्यक्ष राजेंद्र पगारे सहभागी झाले होते.

देवळा

जिल्हा परिषदेच्या सभापती उषाताई बच्छाव, सदस्या डॉ. भारती पवार, तालुकाध्यक्ष पंडित निकम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले.

सकाळी १० वाजता देवळा पाचकंदील येथे रास्ता-रोको आंदोलन छेडण्यात आले. सुमारे पाऊण तास चाललेल्या आंदोलनामुळे विंचूर-प्रकाशे राज्य मार्गावर दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

येवला

येवल्यात महामार्गावर ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मायावती पगारे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, शहराध्यक्ष दीपक लोणारी, कार्याध्यक्ष राजेंद्र पवार, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड, संजय बनकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले. याशिवाय चांदवड, बोरगाव (ता. सुरगाणा), पेठ, इगतपुरी, सिन्नर, नामपूर येथे आंदोलन करण्यात आले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कळवणमध्ये गारांसह तासभर संततधार

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण


कळवण शहर व परिसरात शुक्रवारी सायंकाळी गारांसह तासभर संततधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

कळवण शहरातील रस्त्यांवर गारांचा खच पडला होता. मेच्या पहिल्याच आठवड्यात शहर व परिसरात पावसाने वादळवाऱ्यासह हजेरी लावली. उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी कांदा, डाळिंब, तसेच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाशिक चौपाटी’ खाद्योत्सवात खवय्ये दंग

0
0

लोकप्रिय १५० पदार्थांचा एकाच ठिकाणी आस्वाद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चटकदार बटाटेवडा...तिख्खट खट्टी मिठी पाणीपुरी...आंबटगोड चवीचा दहिवडा...डोळ्यातून व नाकातून पाणी आणणारा मसाले वडा असे एक दोन नव्हे तर तब्बल १५० खाद्यप्रकार एकाच छताखाली आले आणि खवय्यांना 'हे ट्राय करू' की 'ते ट्राय करू' असे झाले. निमित्त होते नाशिक चौपाटी या अभिनव खाद्योत्सवाचे.

या खाद्यउत्सवात जागेवर गरमागरम पदार्थ तयार करून देत असल्याने खाण्यासाठी एकच गर्दी झाली होती. एरवी नाशिकभर फिरून प्रत्येक ठिकाणी गल्लीबोळात जात ज्या पदार्थांची चव चाखावी लागते ते पदार्थ हाकेच्या अंतरावर एकमेकांशेजारी असल्याने खवय्यांनी त्यावर चांगलाच ताव मारला. पहिल्याच दिवशी हजाराहून अधिक खवय्यांनी या स्टॉल्सला भेट दिली.

'विश्वास संकल्प आनंदाचा' या उपक्रमांतर्गत नाशिककर खवय्यांसाठी चटकदार चवदार पदार्थांची चंगळ असलेल्या 'नाशिक चौपाटी' हा अभिनव खाद्योत्सव सुरू झाला आहे. यात नाशिकच्या चवदार व लोकप्रिय १५० पदार्थ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. नाशिकची खाद्यपरंपरा ज्यांनी ५० वर्षाहून अधिक काळ जपली आहे, अशा पदार्थांचा एकाच ठिकाणी आस्वाद घेता येणार आहेत.

अतिथ्यचा टेस्टी दहिवडा, पालक चाट, बटाटेवडा, नंदन स्वीटसचे चटकदार चाट प्रकार, विजूची चवदार दाबेली-सॅण्डविच, कुलकर्णीजची चमचमीत पावभाजी, सराफ बाजारातील दराडे मामांचा मसाले वडा, गंगेवरील दरोडेंचे टिपिकल पॉट आईस्क्रिम, हेरंब फुड्सचे अफलातून खरवस, पीयूष केरी लिव्हजचा स्पेशल केशर तवा पुलाव, एस. आर. केटरर्सचा कोरिएन्डर चाट, फ्राईड आईस्क्रिम मसाला डोसा, ढोकळा चाट, मूंग भजी, चना चटपटा, मक्याचे कणीस, बुड्ढी के बाल, बर्फ गोळा, कोल्ड कॉफी, आइस टी, बन-मस्का, ज्यूस, सरबत, सोडा कालाखट्टा, मेक्सिकन सॅण्डविच, मिरची वडी, नागपुरी वडी, स्ट्रोबेरी कॉफी अशा चटकदार, बहारदार, चवदार पदार्थांचा या खाद्य उत्सवात समावेश आहे.

विश्वास लॉन्स, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकरनगर, गंगापूर रोड येथे रविवार ८ मे पर्यंत सायं ५ ते रात्री १० या वेळेत हा खाद्योत्सव सुरू आहे. 'नाशिक चौपाटी' उत्सवात जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक विश्वास ठाकूर, विनायक रानडे, विवेकराज ठाकूर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेंट लॉरेन्स’ला कोर्टाचा दणका

0
0

पालकांच्या मनाईचा अर्ज फेटाळला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात असंतोष व्यक्त करण्याचा व व्यवस्थापनाला प्रश्न विचारण्याचा पालकांना अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नाशिक कोर्टाने दिला आहे. पालकांनी शाळेभोवतालच्या दोन किलोमीटर परिसरात जमू नये, पत्रके वाटू नये, आंदोलन करू नये, असा अर्ज सिडकोतील सेंट लॉरेन्स शाळेने दाखल केला होता. तो कोर्टाने फेटाळून लावला. पालकांना आपल्या पाल्याच्या हितासाठी व व्यवस्थापनाला प्रश्न विचारण्यासाठी शाळेच्या परिसरात जमण्याचा मूलभूत हक्क आहे, असेही कोर्टाने नमूद केले.

सेंट लॉरेन्स शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी २७ फेब्रुवारी २०१६ ला मायको हॉल शेजारी बैठक घेऊन शाळेच्या विरोधात ठराव संमत केला होता. यामुळे शाळेने पालकांच्या एकत्र येण्यावर मनाई हुकूम मिळवण्यासाठी अर्ज केला होता. फी वाढीच्या विरोधात पालकांच्या एकत्र येण्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे, असे शाळेचे म्हणणे होते. मात्र, शाळेचा हा दावा कुठल्याही ठोस घटना वा पुरावा यांच्याअभावी कोर्टाने फेटाळला. आपल्याच पाल्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल, अशा प्रकारचे वर्तन पालक करतील ही शाळेने व्यक्त केलेली भीती आधारहीन आहे, हे नमूद करतानाच 'शिक्षण हा घटनेने दिलेला मूलभूत अधिकार असल्याने आपल्या पाल्यांच्या कल्याणाची काळजी घेण्याचा अधिकार पालकांना आहे व त्याचबरोबर शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात असंतोष असल्यास तो व्यक्त करण्याचा व व्यवस्थापनाला प्रश्न विचारण्याचही अधिकार त्यांना आहे, असे कोर्टाने स्पष्ट केले.

नाशिकच्या वरिष्ठ दिवाणी कोर्टात न्यायाधीश प्रशांत काळे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. पालकांच्या वतीने अॅड. अभिजीत आंदोरे यांनी बाजू मांडली. या आदेशाविरुद्ध अपील दाखल करेपर्यंत कोर्टाने पालकांच्या एकत्र जमण्यास तात्पुरता मनाई आदेश द्यावा, असा विनंती अर्ज शाळेने दुसऱ्याच दिवशी कोर्टास केला. मात्र, कोर्टाने शाळेचा तोही अर्ज फेटाळला.

कोर्टाच्या या निकालाचे शिक्षण बाजारीकरणविरोधी मंचाकडून आम्ही स्वागत करतो. अशा प्रकारे पालकांविरुद्ध अनेक खासगी शाळा कारवाई करू पाहतात. मात्र, या निकालातून त्या बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच, कोर्टाने आपल्या निकालात पालकांच्या मूलभूत अधिकारांना अधोरेखित केले आहे. शाळांच्या मनमानी, अन्याय्य वर्तनाविरुद्ध एकत्र येऊ पाहणाऱ्या पालकांना या निकालामुळे बळ मिळेल, अशी अपेक्षा आहे. - डॉ. मिलिंद वाघ, शिक्षण बाजारीकरणविरोधी मंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेततळ्यांच्या कामांना प्रारंभ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांना भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी पावसाळ्यापूर्वी शेततळ्यांची कामे पूर्ण करा, असे आदेश राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ८२७ शेततळ्यांच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली असून, ११४ शेततळ्यांची कामे तातडीने सुरू करा, असे आदेशही देण्यात आले आहेत. चार शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून, २४ कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने 'मागेल त्याला शेततळे' ही योजना आणली आहे. त्यानुसार जिल्ह्यात दोन हजार ५०४ शेततळी करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. सरकारच्या या योजनेला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. जिल्ह्यात शेततळ्यांसाठी १३ हजार ६१० अर्ज आले असून, त्यातून लाभार्थी निवडणे जिल्हा प्रशासनापुढे आव्हान ठरले आहे. आतापर्यंत एक हजार ८२७ अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ११४ शेत तळ्यांच्या कार्यारंभाचे आदेश देण्यात आले असून, २८ ठिकाणी प्रत्यक्षात शेततळी बनविण्याची कामे सुरू झाली आहेत. त्यापैकी चार ठिकाणी शेततळी तयार झाली आहेत. तर, २४ ठिकाणची कामे प्रगतीपथावर आहेत. शेततळ्याच्या आकारमानानुसार त्याला किमान २६ हजार २०६ रुपये, तर जास्तीत जास्त ५० हजार रुपये अनुदान देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय आणि दारिद्रय रेषखालील शेतकरी कुटुंबांना प्राधान्याने मागेल त्याला शेततळी योजनेचा लाभ द्या, असे आदेश यापूर्वीच राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

पावसाळ्यापूर्वी शेततळ्यांची कामे पूर्ण व्हावीत, असाच जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात २ हजार ५०४ शेततळी करण्यात येणार आहेत. चार शेततळी पूर्ण झाली असून एकाचवेळी अनेक ठिकाणी ही कामे केली जाणार असल्याने ती पूर्ण होतील, असा विश्वास आहे. - गोरक्षनाथ गाडीलकर, उपजिल्हाधिकारी रोहयो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चव्हाण परतला, पैशांचे काय?

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक वेगवेगळ्या प्रकारची ऑपरेशन्स व ​सिंगापूरमध्ये दोन वर्षांनंतर मुक्काम वाढण्याची धूसर झालेली शक्यता यामुळे चव्हाण दाम्पत्य आज, मुंबईत परतले. २०१४ मध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून सुरू झालेल्या पलायननाट्याचा पहिला अंक या दोघांच्या अटकेच्या रुपात संपुष्टात आला. अगदी घरदार, जमीन विकून पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांना यामुळे दिलासा मिळाला असून, पैसे परत मिळण्याची त्यांची अपेक्षा वाढीस लागली आहे. दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवणाऱ्या केबीसी कंपनीची सुरुवात २०११ मध्ये झाली. यानंतर कंपनीचा विस्तार फारच झपाट्याने झाला. मात्र, पहिल्या तीन वर्षांतच गुंतवणूकदारांना पैसे मिळणे बंद झाले. केबीसी विरोधात सर्वात पहिला गुन्हा मार्च २०१४ मध्ये दाखल झाला. त्यावेळी पोलिसांनी चव्हाणला अटक सुद्धा केली. मात्र, नंतर जामिनावर सुटलेला चव्हाण त्याच्या पत्नीसह १९ जून २०१४ रोजी परदेशात पळाला. यानतंर, जुलै २०१४ मध्ये आडगाव पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र ठेवीदार हितरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) भाऊसाहेब व आरती चव्हाणसह, बापुसाहेब छबू चव्हाण, पंकज राजाराम शिंदे, नितीन पोपटराव शिंदे, संजय वामनराव जगताप, नानासाहेब छबू चव्हाण, साधना बापू चव्हाण, भारती मंडलिक शिलेदार, कौशल्या संजय जगताप आदींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. केबीसीचा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण परेदशात गेल्याने गुंतवणूकदारांमध्ये संतापाचे वातावरण होते. पोलिसांच्या कार्यपध्दतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने केबीसीचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्याची मागणी जोर धरू लागली होती. १८ ठाण्यांमध्ये गुन्हे या प्रकरणी महाराष्ट्रासह झारखंड, तेलगंणा राज्यातील १८ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी सांगितले, की मागील आठवड्यात कोर्टाच्या आदेशाने हा गुन्हा तपासासाठी पुन्हा पोलिसांकडे वर्ग झाला. मात्र, चव्हाण दाम्पत्य परागंदा झाल्यापासून सीआयडी, पोलिस तसेच इतर तपास यंत्रणा त्यांच्या मागावर होत्या. त्यातूनच तो मुंबईला परतणार असल्याची माहिती समजली होती. आमचाही त्याच्याशी संपर्क होतच होता. चव्हाण सिंगापूरला गेल्यानंतर अवघ्या तीन महिन्यातच त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती. परदेशात त्यांना अटक होणे सर्वांनाच त्रासदायक ठरले असते, असे मत एस. जगन्नाथन यांनी व्यक्त केले. २१० कोटींची मालमत्ता भाऊसाहेब चव्हाणच्या मालकीची जवळपास ११५ कोटी रुपयांची मालमत्ता सील झाली असून, त्याच्याकडे तब्बल २१० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. भाऊसाहेब चव्हाण व त्याची पत्नी आताच परतले असून, लवकरच त्यांचे काही बँक लॉकर्स उघडण्या​ची कार्यवाही सुरू होईल. तसेच त्यांच्या इतर मालमत्तेचा शोध घेतला जाईल, असे जगन्नाथन यांनी स्पष्ट केले. आता, गुंतवणूकदारांना पैसे परत मिळवून देणे हे आमचे प्राथमिक ध्येय असून, त्यादृष्टीने काम सुरू करण्यात येईल, असा दावाही जगन्नाथन यांनी केला. दरम्यान, आम्ही त्याला ताब्यात घेतल्यापासून तो त्याच्या व त्याच्या पत्नीच्या ऑपरेशनबाबतच बोलत आहे. या घोटाळ्याची इतर माहिती काढण्यासाठी त्याच्याकडे चौकशी करण्यात येईल. हा गुन्हा आडगाव पोलिस स्टेशनशी संबंधित असला तरी त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. त्यामुळे त्याची कस्टडी आर्थिक गुन्हे शाखेकडेच राहील. उद्या, शनिवारी या दोघांना कोर्टात हजर करण्यात येईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यानांच्या देखभाल, दुरुस्तीला अखेर मुहूर्त

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील उद्यानांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी दत्तक देण्याची मागणी शिवसेनेने केल्यानंतर पालिकेतील सत्ताधारी जागे झाले असून, त्यांनी गार्डन्सच्या देखभाल दुरुस्तीच्या कंत्राटाला चालना दिली आहे. तब्बल आठ म‌हिन्यांनंतर उद्यान विभागातर्फे २८६ उद्यानांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे. दोन एकरवरील १६ उद्यानांसाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या असून, देखभाल दुरुस्तीसाठी ६० टक्के कामे ही महिला बचतगटांना देणे बंधनकारक केले आहे.

महापालिकेच्या मालकीची ४७७ उद्याने असून, त्यांची देखभाल व दुरुस्ती पालिकेमार्फतच केली जाते. परंतु, गेल्या आठ महिन्यांपासून काम ठेकेदाराला द्यायचे, की महिला बचतगटांना द्यायचे यावरून घोळ सुरू होता. महासभेत दोनदा ठराव करण्यात आले, तरीही उद्यानांच्या देखभालीला मुहूर्त सापडत नव्हता. त्यामुळे शहरातील निम्मे उद्याने ही भकास झाली. उद्यानांच्या देखभालीवरून मनसेची कोंडीही झाली. त्यामुळे देखभालीसाठी सुवर्णमध्य काढत कंत्राटदाराला काम देण्याचा निर्णय झाला. त्यात ६० टक्के कामे ही महिला बचतगटांना देण्याचा निर्णयही या ठरावात करण्यात आला आहे.

आज प्रसिध्दी होणार निविदा महापौरांचा ठराव प्रशासनाला प्राप्त झाला असून, निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शनिवारी २८६ उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांची निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यात दोन एकरपेक्षा मोठ्या असलेल्या १६ उद्यानांच्या निविदा या स्वतंत्र काढल्या जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोतनीस जामिनावर १३ ला सुनावणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारांना पैसे देण्यास असमर्थ ठरलेले गांवकरी प्रकाशनचे संचालक अरविंद पोतनीस व वंदन पोतीनस या दोघांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर १३ मे रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून याप्रकरणी शेकडो ठेवीदारांनी तक्रारी दिल्या असून, तक्रारदारांनी दिलेल्या अर्जानुसार फसवणुकीचा आकडा २० कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. मुदत ठेवींवर आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून मुदतीनंतरही गुंतवणूकदारांना मूळ रक्कम वा व्याज देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये अरविंद पोतनीस व वंदन पोतनीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दोघांनी मार्च महिन्यात अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टात सादर केला होता. त्यावर २३ मार्च रोजी दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला. यानंतर, कोर्टाने २ एप्रिलपर्यंत अटी व शर्तींवर तात्पुरता जामीन मंजूर केला होता. या जामिनाची मुदत संपल्यानंतर मुदवाढीसाठी न्यायाधीश सुचित्रा घोडके यांच्यासमोर युक्तिवाद झाला. दरम्यान, सदर प्रकरण मध्यस्थी केंद्राकडे पाठवण्याची विनंती पोतनीसांमार्फत कोर्टाकडे करण्यात आली होती. त्यावर सरकारी पक्षासह फिर्यादीच्या वकिलांमार्फत जोरदार आक्षेप नोंदवण्यात आला. कायद्यात अशी कोणतीही तरतूद नसल्याचा युक्तिवाद अॅड. राजेंद्र घुमरे तसेच फिर्यादीचे वकील अॅड. मंदार भोनेसे यांनी केला. शुक्रवारच्या सुनावणी दरम्यान सरकारवाडा पोलिसांच्या तपासअधिकाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले. तक्रारींचा ओघ असून तक्रारदारांच्या तक्रारीनुसार २० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पोतनीस पिता-पुत्रांना देणे असल्याचे म्हणणे मांडत पोलिसांनी त्यांच्या अटकपूर्व अंतरिम जामिन अर्जास विरोध दर्शवला. १३ मे रोजी या प्रकरणावर अंतिम सुनावणी करावी, असे आदेश ​जिल्हा व सत्र न्यायाधीश सु​चित्रा घोडके यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनास्थेसमोर कुस्ती स्टेडियम चीत

0
0

महापालिकेच्या दुर्लक्षामुळे देवळालीगावातील स्टेडियमवर समाजविघातक प्रवृत्तींचा ताबा
म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

शहरातील युवापिढीला कुस्तीचे धडे मिळण्याची सोय व्हावी म्हणून महापालिकेने तब्बल एक कोटी रुपये खर्च करून देवळालीगावात उभारलेले कुस्ती स्टेडियम महापालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभारापुढे चीत झाले आहे. या स्टेडियमचा संपूर्ण परिसर अस्वच्छतेमुळे गलिच्छ बनला असून, मद्यपींचा अड्डाच बनला आहे. देवळालीगावातील सोमवार पेठेत तत्कालीन महापौर विनायक पांडे यांच्या कालावधीत महापौर व स्थानिक नगरसेवक निधीतील तब्बल एक कोटी रुपयांचा निधी खर्च करून कुस्ती स्टेडियमची उभारणी करण्यात आली आहे. देवळालीगाव पंचकमिटीच्या मालकीच्या जागेवर उभारण्यात आलेल्या या स्टेडियमची मालकी अद्यापही महापालिकेकडेच आहे. परंतु, महापालिका प्रशासनाने या स्टेडियमच्या व्यवस्थेकडे पूर्णपणे डोळेझाक केल्याने या वास्तूवरच चीतपट होण्याची दुर्दैवी वेळ येऊन ठेपली आहे. आजमितीस या स्टेडियममधील दालनांचा वापर मद्यपीच जास्त करीत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मद्याच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून येतो. सर्व दालनांच्या खिडक्या गायब झालेल्या असून, काही ठिकाणी भिंतींना भगदाडही पाडण्यात आलेले आहे. मुख्य प्रवेशद्वारावरील शटर्सचे पत्रेदेखील गायब झालेले आहेत. या ठिकाणी कचरा, दगड, माती या वस्तूंचा खच पडलेला आहे. कचरा मोठ्याप्रमाणात साचलल्याने डुकरांचा मुक्त वावर वाढलेला आहे. काही दालनांचा तर चक्क स्वच्छतागृह म्हणूनदेखील वापर सुरू आहे. कुंपणाअभावी टवाळखोरांचा येथे सातत्याने वावर दिसतो. एका दालनात महापालिकेची अंगणवाडी चालविली जाते. शेजारीच सार्वजनिक हातपंप असल्याने तेथील वापराचे पाणी थेट या स्टेडियमच्या दालनापर्यंत वाहत येत असल्यानेही अस्वच्छता निर्माण झाली आहे. जुनी वाहने काही वर्षांपासून येथे धूळ खात पडून असल्याने या जागेला बकाल स्वरूप प्राप्त झालेले आहे. या स्टेडियमची कोनशिलाही गायब झालेली आहे. महापालिकेने हे स्टेडियम आपल्या ताब्यात ठेवले असले, तरी सध्या या स्टेडियमची व्यवस्था वाऱ्यावर सोडल्याने या स्टेडियमचा श्वास अस्वच्छतेमुळे कोंडला गेला आहे. शहरातील युवापिढीला कुस्तीचे धडे मिळणे तर दूरच, उलट या जागेचा वापर समाजविघातक प्रवृत्ती फोफावण्यासाठीच अधिक होत असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. देवळालीगाव पंच कमिटीच्या मालकीच्या जागेवर महापालिकेने एक कोटी रुपये खर्च करून या कुस्ती स्टेडियमची उभारणी केलेली आहे. मात्र, मागणी करूनही ही वास्तू महापालिकेने देवळालीगाव पंच कमिटीकडे हस्तांतरित केलेली नाही. महापालिका प्रशासन या वास्तूची व्यवस्था स्वतःही ठेवत नाही व आमच्याकडेही जबाबदारी देत नाही.परिणामी या कुस्ती स्टेडियमची वाताहत झाली आहे. -डॉ. शांतारामबापू कदम, अध्यक्ष, पंच कमिटी, देवळालीगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वालदेवीतील प्रदूषण हटणार कधी?

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा
गोदावरी नदीपात्रातील प्रदूषण निवारणासाठी उपाययोजना करणाऱ्या महापालिका प्रशासनाचे देवळाली परिसरातील वालदेवी नदीपात्रातील प्रदूषणाकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याने सध्या या नदीची अक्षरशः गटारगंगा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे वालदेवी प्रदूषणमुक्त होणार तरी कधी, असा सवाल परिसरातील त्रस्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वालदेवी नदीचा उगम हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजनेरी पर्वतात झालेला आहे. अंजनेरी ते वडनेरपर्यंत या नदीचे पात्र पूर्णतः प्रदूषणविरहित आहे. मात्र, महापालिका हद्दीत या नदीचा प्रवेश झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने या नदीचे पात्र प्रदूषित होण्यास प्रारंभ झाल्याचे दिसून येते. प्रशासकीय अनास्थेमुळे आजमितीस या नदीचे पात्र जणू गटारगंगाच झाले आहे. वडनेर, विहितगाव, देवळालीगाव, बागुलनगर, गुलाबवाडी झोपडपट्टी आदी शहरी व स्लम भागातून ही नदी जसजशी पुढे वाहत जाते, तसतशी अधिक प्रदूषित झालेली दिसून येत आहे. नाशिकरोड भागातील मोठी लोकसंख्या वालदेवी नदीच्या काठावर वसलेली आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने अद्यापही या नदीच्या प्रदूषणाच्या समस्येवर ठोस उपाययोजना आखून त्यांची अंमलबजावणी करण्याची इच्छाशक्ती दाखवलेली नाही. त्यामुळे या नदीचे पात्र आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक ठरू लागले आहे. या नदीच्या काठालगत कायम प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते. साचलेल्या अस्वच्छ पाण्याच्या डबक्यांमुळे या भागात डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. या नदीच्या काठावर धार्मिक विधीही मोठ्या प्रमाणात होत असतात. मात्र, अस्वच्छता व दुर्गंधीमुळे त्यावरही परिणाम झालेला आहे. दसक व तपोवनातील मलनिस्सारण केंद्रांमुळे गोदापात्रातील प्रदूषणाची समस्या दूर करताना महापालिका प्रशासनाच्या नाकीनऊ आले असल्याचे उदाहरण ताजे असतानाही महापालिका प्रशासनाने पिंपळगाव खांब येथे पुन्हा वालदेवी नदी काठावर नव्याने मलनिस्सारण केंद्र उभारण्याचा घाट घातला आहे. तसे झाले, तर वालदेवीच्या प्रदूषणात आणखी वाढ होणार आहे. या नदीच्या काठावर अनधिकृत झोपडपट्टीचीही झपाट्याने वाढ होत आहे. या झोपडपट्टीत ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळे वालदेवी नदीपात्राचे आरोग्य आणखीच बिघडत चालले आहे. या नदीवर रेल्वेचा पूलही आहे. या पुलाखाली पाणी अडविल्याने या पुलाच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झालेला आहे. या सर्व बाबींकडे महापालिका प्रशासनाने तत्काळ लक्ष देणे आवश्यक बनले आहे. वालदेवी नदी प्रदूषणाच्या प्रश्नाकडे महापालिका प्रशासन आजवर दुर्लक्ष करीत आलेले आहे. वालदेवी पात्राच्या स्वच्छतेला दुय्यम स्थान दिले जात असून, स्थानिक लोकप्रतिनिधींनाही या प्रश्नाचे गांभीर्य उमगलेले नाही. महापालिका प्रशासनाकडे हा प्रश्न सोडविण्यासाठीच्या इच्छाशक्तीचा अभाव असल्याचेच दिसून येत आहे. -उदय थोरात, पर्यावरणवादी कार्यकर्ते, देवळालीगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकलहरे प्रकल्प लागणार मार्गी!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या एकलहरे येथील औष्णिक विद्युत प्रकल्पाचे काम लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. विस्तारित ६६० मेगावॅट क्षमतेच्या वीज प्रकल्पाच्या प्रश्नाबाबत राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे येत्या ११ मे रोजी नाशिक दौऱ्यावर येणार असून, १० तास ते प्रकल्पाच्या ठिकाणी थांबणार आहेत. या भेटीत ते अधिकारी, लोकप्रतिनिधी, कामगार व प्रकल्पग्रस्तांशीही चर्चा करणार आहेत.

एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्पाचा विषय आमदार योगेश घोलप यांनी विधानसभेत महिनाभरापूर्वीच उपस्थित करून लक्ष वेधले होते. त्यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असून, लवकरच ते सुरू केले जाईल, असे आश्वासन दिले होते. तसेच सर्व विभागांची बैठक बोलावून हा प्रश्न निकाली काढू, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार ११ मे रोजी ते नाशिक येणार आहेत.

एकलहरे येथील ६६० मेगावॅट विद्युत निर्मिती प्रकल्पास मान्यता मिळाली, पण प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या पर्यावरण व वनविभाग तसेच, संरक्षण मंत्रालय आणि विमानतळ प्राधिकारणाची परवानगी मिळणे आवश्यक असल्यामुळे हा प्रकल्प रडखला होता. त्यासाठी केंद्रस्तरावर पाठपुरावा करू, असे बावनकुळे यांनी सांगितले होते.

असा असेल १० तासांचा दौरा सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत ते एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रकल्पाला भेट, दु. १२ ते २ मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते व कार्यकारी अभियंते यांच्याशी बैठक, दु. २ ते ३ आमदार-खासदारांशी चर्चा, दु. ३ ते ४ विविध स्थानिक कर्मचारी संघटना यांच्या समस्याबाबत चर्चा, दु. ४ ते ५ प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबाबत चर्चा, सायं‌काळी ६ ते ७ स्थानिक प्रश्नाबाबत चर्चा, ७ ते ८ पत्रकार परिषद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप नेत्यावर कारवाईची टांगती तलवार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनधिकृत बांधकाम करण्यासह विनापरवानगी बांधकासाठी पिण्याचे पाणी वापरल्याप्रकरणी महापालिकेने भाजपचे नेते सुनील बागूल यांना नोटीस देण्याची कारवाई सुरू केली आहे. स्थानिकांच्या तक्रारीनंतर शुक्रवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित जागेवर जाऊन पाहणी केली असून, तक्रारीत तथ्य असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शनिवारी नगररचना विभागातर्फे बागूल यांना नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रामवाडीतल्या सुनील बागुल यांच्या निवास्थानासमोरील रिकाम्या जागेवर दोन महिन्यापासून बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी महापालिकेचे पाणी वापरले जात असून, ते बेकायदेशीर आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या संदर्भात पालिकेकडे तक्रारी केल्या असून, या तक्रारींची पालिकेने गंभीर दखल घेतली आहे. पाणीपुरवठा व नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी शुक्रवारी संबंधित बांधकामावर जाऊन पाहणी केली. त्यात बागूल यांचे बांधकाम हे अनधिकृत असून, त्याची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. तसेच, पाणी वापरासंदर्भातील परवानगीही घेतलेली नाही. शहरात बांधकामासाठी पाणीवापर पालिकेने बंद केला असून, दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे. सध्या दुष्काळाची परिस्थिती असून, पाण्याचा वापरावर निर्बंध आला आहे. बांधकामासाठी केवळ बोअरवेल्सचे पाणी वापरले जात आहे. अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकाम व पाणीवापराबाबतचा अहवाल नगररचना विभागाला सादर केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज २५० पत्रं

0
0

gautam.sancheti @timesgroup.com

व्हॉटसअॅप, इ मेल आणि मेसेज या साऱ्यांची सध्या चलती असताना जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र अद्यापही पत्रांचाच पाऊस पडत असल्याचे दिसून येत आहे. दिवसाकाठी एक, दोन नव्हे तर सरासरी २५० पत्रे टपाल शाखेमध्ये येत आहेत. या साऱ्या शाखेचे कम्प्युटरायझेशन करण्यात आले असल्याने प्रत्येक टपालाची नोंद केली जाते आणि त्याचा पाठपुरावाही केला जातो आहे. एकेकाळी पोस्टाचे पत्रच हेच लेखी संवादाचे माध्यम होते. ही पत्र एकागावाहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी काही ठिकाणी पंधरा, तर काही ठिकाणी सरासरी ३ ते ८ दिवसांचा कालवधी लागत होता. त्यानंतर मात्र कुरियर सर्विसने पत्र पोहोचविण्याचे काम गतीशील केले.

तरीसुध्दा हे पत्र पोहचण्यासाठी एक दिवसाचा अवधी जात होता. या सर्व पत्रव्यवहाच्या पध्दतीवर मात करीत ई-मेल हा सर्वात जलद व तत्काळ सेवा देणारा प्रकार पुढील आला व शासकीय कार्यालयातही त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होवू लागला. आता तक्रार व निवेदन द्यायचे असेल तरी त्यासाठी ई- मेलचा वापर केला जातो. हे सर्व बदल झालेले असतांना आजही शासकीय कार्यालयात पोस्टाने येणाऱ्या पत्राची संख्या कमी झालेली नाही, तर निवेदन व तक्रारीचे पत्रही कार्यालयात किंवा पोस्टाने दिले जाते. जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या या पत्रांसाठी तळ मजल्यावर खास टपाल विभाग तयार केला असून, त्यात चार कर्मचारी काम करतात. तब्बल २८ विभागांची पत्रे येतात. आल्यानंतर त्यांची विभागनिहाय वर्गवारी करुन ते वेगवेगळ्या कपाटात ठेवले जातात. नंतर ही पत्रे संबंधित विभागात पोहचती केली जातात. महिन्याला सहाशेच्या आसपास पत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पाठवली जातात. जिल्हाधिकारी कार्यालात येणाऱ्या टपालात निवेदने व तक्रारींचाही भरणा असतो. या विभागातही पत्राची नोंद व इतर गोष्टींसाठी सॉफ्टवेअर केले असून, त्यात आवक नोंद केली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केमिकल टाकून तरुणीला जाळले

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरालगत असलेल्या बिलाडी रस्त्यानजीक शनिवारी, पहाटे एका तरुणीचा निर्घृणपणे खून करून तिच्या अंगावर केमिकल टाकून तिला जाळून टाकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मका फॅक्टरीच्या पुढे लहान पुलाजवळ अर्धवट जळालेला मृतदेह नागरिकांना आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पहाटेच्या वेळी घटनास्थळाजवळील रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना काही तरी जळत असल्याचा घाण वास आला. त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहिले असता, त्या ठिकाणी एका तरुणीचा मृतदेह अर्धवट जळून त्याचा कोळासा झाला होता. मृतदेहावर टाकलेले केमिकल जळत होते. मृतदेह जाळण्यासाठी चाऱ्याचा वापर करण्यात आला होता.

नागरिकांनी घटनेची माहिती तालुका पोलिसांना कळविली. अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, तालुका पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी हे श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर ही घटना मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांचे एक पथक या घटनेतील आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे महिला व तरुणींची निर्घृण हत्या करण्याचे प्रकार घडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसाठवण क्षमतेत ५९ लाख घनमीटरने वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वर्षानुवर्षे गाळ न काढल्याने राज्यासह जिल्ह्यातील जलाशयांची पाणीसाठवण क्षमता कमी झाली आहे. ही क्षमता वाढावी, यासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले असून, लोकसहभाग व जलयुक्त शिवार अभियानाद्वारे दुष्काळग्रस्त भागातील धरणे, तलाव, नदी, नाले, बंधाऱ्यांमधील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. नाशिक विभागात ९२४ जलाशयांमधील गाळ काढण्याचे काम पूर्णत्वास आले असून, आतापर्यंत सुमारे ६३ लाख १४ हजार ४८८ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे जलाशयांची पाणीसाठवण क्षमता ५९ लाख घनमीटरने वाढली आहे.

पाणीटंचाईची तीव्र जाणीव करून देणाऱ्या दुष्काळाने नागरिकांचे डोळे उघडले आहे. थेंबन् थेंब पाणी जपून वापरण्याची कसरत करावी लागत असल्याने नागरिकांना खऱ्या अर्थाने पाण्याचे महत्त्व कळू लागले आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने 'पाणी अडवा पाणी जिरवा'ची मोहीम व्यापक स्तरावर सुरू केली आहे. त्यासाठी लोकसहभागही घेतला जात असून, जलाशयांमधील गाळ काढण्याची मोहीम व्यापक स्तरावर राबविली जात आहे. नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यात ४४८ तलाव असून, त्यामधील गाळ काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कामी ६,१९७ शेतकऱ्यांनी योगदान दिले असून, २४ लाख ४३ हजार ९११ घनमीटर गाळ काढला आहे. त्यामुळे तलावांची जलसाठवण क्षमता २३ लाख ३८ हजार २१८ घनमीटरने वाढली आहे. हेच काम ठेकेदारामार्फत करण्यासाठी सरकारला १६ कोटी ७३ लाख ११ हजार रुपये खर्च आला असता. काढलेला गाळ ४,३७७ हेक्टर जमिनीवर टाकल्याने तेथील उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

धुळ्यात ११८ तलावांमधून १,७४५ शेतकऱ्यांच्या सहकार्याने २४ लाख ७७ हजार ७२९ घनमीटर गाळ काढण्यात आला. ६७६ हेक्टर शेतीमध्ये गाळ टाकण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात ७७ तलावांमधील गाळ काढण्यासाठी १२३ शेतकऱ्यांची मदत मिळाली. १ लाख ९८ हजार ९९२ घनमीटर गाळ काढण्यात आला. १७७ हेक्टर जमिनीवर हा गाळ टाकण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात ६४ तलावांमधील गाळ काढण्यासाठी ६,४७९ शेतकऱ्यांची मदत मिळाली. तेथे ४ लाख ७४ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. हा गाळ २,७४० हेक्टर जमिनीवर टाकण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात २७ तलावांमधील गाळ काढण्यासाठी २०९२ शेतकऱ्यांनी सहकार्य केले. ७ लाख १९ हजार ३३७ घनमीटर गाळ काढण्यात आला.

मोहिमेत सातत्याची गरज

गाळ काढण्याच्या मोहिमेस ग्रामीण भागात जोरदार प्रतिसाद मिळाला. शेतजमिनींमध्ये गाळ टाकल्यामुळे जमिनींची सुपीकता वाढण्यास मदत होणार आहे. शेती उत्पादनवाढीलाही त्यामुळे चालना मिळेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जलाशयांमधील पाणीसाठा वाढविण्यासही या मोहिमेमुळे मोठी मदत होणार आहे. म्हणूनच जलाशयांमधील गाळ काढण्याचे काम दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात प्रशासनाने हाती घ्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

वाचला कोट्यवधींचा खर्च

जलाशयांमधील गाळ शेतकऱ्यांना मोफत मिळाल्याने शेतकरी सुखावले आहेत, तर गाळ काढून तो वाहून नेण्यासाठी शेतकऱ्यांची मदत झाल्याने अशा कामांवर होणारा सरकारचा कोट्यवधींचा खर्च वाचला आहे. खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून हे काम केले गेले असते तर त्यासाठी सरकारला ३८ कोटी रुपये मोजावे लागले असते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

जिल्हानिहाय वाचलेला खर्च

नाशिक : १६ कोटी ७३ लाख ११ हजार रुपये धुळे : १७ कोटी ९४ लाख ९४ हजार रुपये नंदुरबार : ४२ लाख ७१ हजार रुपये जळगाव : ३ कोटी ४० लाख २२ हजार १८८ रुपये अहमदनगर : १९ लाख ११ हजार ६९२ रुपये एकूण : ३८ कोटी ७ लाख ९ हजार ८८० रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ढगाळ वातावरणामुळे जीव टांगणीला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यात रविवारी धुव्वाधार कोसळलेल्या पावसाने सोमवारी काहीशी विश्रांती घेतली. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला. मात्र, पाऊसच न आल्याने त्यांनी उरलीसुरली पिके वाचविण्यात हा वेळ खर्च केला. शहरात मात्र आजही नागरिकांना विजेच्या लपंडावाचा अनुभव आला.

जिल्ह्यात रविवारी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली. मान्सूनमध्ये पडावा तसा पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषत: शेतांमध्ये साठवून ठेवलेल्या कांदा पावसात भिजल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे. पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत सुरू राहिल्याने आणि वीजपुरवठाही खंडित असल्याने रविवारी रात्री अनेक शेतकरी शेतामध्ये पोहोचू शकले नाहीत. मात्र, सोमवारी सकाळीच त्यांनी शेतामध्ये धाव घेऊन पिकांची पाहणी केली. नुकसान झालेल्या पिकांची चिंता सोडून उरलीसुरली पिके वाचविण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला. पावसात फारसा न भिजलेला कांदा आणि अन्य भाजीपाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यास शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. हवामान विभागाने पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांनी पावसाची धास्ती घेतली आहे. म्हणूनच सबंध शेतकरी कुटुंबच उरलीसुरली पिके वाचविण्यासाठी शेतामध्ये उतरल्याचे चित्र जिल्ह्यात बहुतांश ‌ठिकाणी पाहावयास मिळाले. विजांच्या कडकडाटाची शक्यता गृहीत धरून जनावरांनाही सुरक्षित स्थळी ठेवण्यावर भर देण्यात आला.

फक्त ढगाळ वातावरण

शहरासह जिल्ह्यात सोमवारी ढगाळ वातावरण होते. पाऊस होईल अशी चिन्हे असली तरी सायंकाळपर्यंत कोठेही पाऊस झाला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सोमवारी ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमान, तर १९.५ सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. सकाळी वातावणातील आर्द्रता ७१.५ होती. ती सायंकाळी ४५ नोंदविण्यात आल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिक्रमण पाहताच संचारला उत्साह

0
0

म. टा. प्र‌तिनिधी, न‌ा‌शिक

शाळेला उन्हाळी सुट्या असल्यामुळे बच्चेकंपनीने बुध अधिक्रमण पाहण्यासाठी गर्दी केली होती. कुणी ग्रुपने, तर कुणी आपल्या पालकांसोबत अधिक्रमण पाहण्यासाठी आले होते. टेलिस्कोप म्हणजे काय?, बुध अधिक्रमण म्हणजे नेमके काय? या मुलांच्या प्रश्नांना खगोल मंडळाच्या स्वयंसेवकांनी सकारात्मक उत्तरे देत त्यांचे शंकासमाधान केले. अखेरच्या क्षणी का होईना अधिक्रमण पाहता आल्याने बच्चेकंपनीत उत्साह संचारला. अधिक्रमण पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. पहिल्यांदाच अधिक्रमण पहायला मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

स्टेलॅरियम ठरला उपाय बुध अधिक्रमणावेळी त्याचा वेग ५० किलोमीटर प्रति सेकंद इतका होता. पृथ्वीपासून बुध हा २२२ मिलीयन किलोमीटर लांब असून, ग्रहमालेतील तो सर्वात लहान ग्रह आहे. ढगाळ वातावरणामुळे बुध अधिक्रमण दिसत नसल्यामुळे खगोल मंडळातर्फे स्टेलॅरियम या सॉफ्टवेअरचा उपयोग करण्यात आला. स्टेलॅरियम म्हणजे 'रियल स्काय सिम्युलेशन'. या सॉफ्टवेअरमुळे आपल्याला ढगाळ वातावरणातही सूर्याची स्थिती लाइव बघता येते. अखेरच्या क्षणी दुर्बिणीतून प्रत्यक्ष अधिक्रमण दिसले तरीही स्टेलॅरियम प्रणाली सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान अधिक्रमण दिसले, पण त्यानंतर ढगाळ वातावरण असल्यामुळे उपाय म्हणून आम्ही स्टेलॅरियम प्रणालीची व्यवस्था केली होती. अखेरच्या क्षणी अधिक्रमण दिसल्याने आमचा उद्देश सफल झाला. नाशिककरांनी यावेळी गर्दी केली होती. खगोल मंडळ यापुढेही असे उपक्रम राबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. - सुजाता बाबर, खगोल मंडळ

उन्हाळी सुट्या असल्यामुळे मी माझ्या आई-वडिलांसोबत अधिक्रमण पाहण्यासाठी आलो होतो. लाईव स्ट्रीमिंगबरोबरच अखेरीस मी प्रत्यक्ष बुध अधिक्रमण बघितले. यातून मला खूप नव्या गोष्टी शिकता आल्या. - अथर्व अंतापूरकर, विद्यार्थी

पावसाच्या वातावरणामुळे निराशा झाली, पण शेवटी बुध अधिक्रमण दिसले. खगोल मंडळाने केलेली स्टेलॅरियम प्रणालीची व्यवस्थाही उत्तम होती. - प्रा. सुवर्णा कुलकर्णी, खगोलप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांनी बॅग चोरट्यास पकडले

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पैसे पडल्याचे सांगून कारचालकाचे लक्ष विचलीत केल्यानंतर बॅग चोरी करणाऱ्या संशयितास सरकारवाडा पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने सोमवारी दुपारच्या सुमारास अशोकस्तंभ परिसरात जेरबंद केले.

शाहजहॉन शहद हमीद (वय ५२) असे या संशयिताचे नाव असून ,तो तामिळनाडू राज्यातील दिंडीगल जिल्ह्यातील आतूर येथीर रहिवाशी आहे. दुपारी चार वाजेच्या सुमारास संशयित हमीदने कारचालकाचे लक्ष विचलित करून बॅग चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हमीदचा हा प्रयत्न कारचालकाच्या लक्षात आला. संबंधित कारचालकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने हमीदला पकडून चांगलाच चोप दिला. हा प्रकार गस्त घालणाऱ्या पोलिसांना समजला. त्यांनी लागलीच संशयित हमीदला ताब्यात घेतले. कारजवळ दहा, वीस वा शंभर रुपयांच्या नोटा टाकून कारचालकाचे लक्ष विचलीत करायचे आणि कारमधील बॅग लंपास करायची, अशी हमीदची मोडस ऑपरेंडी असून, हमीदच्या अटकेमुळे शहरातील विशेषतः सीबीएस परिसरात घडलेल्या बॅग लिफ्टिंगच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

विजेच्या धक्क्याने मृत्यू भुयारी विद्युत वाहिनीचा धक्का लागून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास पोलिस वसाहतीत घडली. दूरसंचार विभागाच्या वायरिंगचे काम सुरू असताना हा प्रकार घडला.

अन्सारी मेहमूद मुस्ताफा (वय ५४) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, ते पवननगर येथील भगतसिंग चौकातील रहिवाशी होते. सरकारवाडा पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी मान्सूनपूर्व पावसामुळे पोलिस मुख्यालय व परिसरातील दूरसंचार यंत्रणा कोलमडली होती. दुपारी दीड वाजेच्या सुमारास अन्सारी मेहमूद मुस्तफा हे कर्मचाऱ्यांसह सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या पाठिमागून गेलेल्या वायरिंगच्या दुरुस्तीचे काम करीत होते. यावेळी जवळून गेलेल्या विद्युत वाहिनीचा धक्का मुस्तफा यांना लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योम मालवली होती. याबाबत सरकारवाडा पोलिसांनी आकमास्त मृत्युची नोंद केली आहे.

खून प्रकरणी कोठडी बेळगाव ढगा येथील निर्जन परिसरात दाजीचाच खून केला म्हणून सातपूर पोलिसांनी अटक केलेल्या संशयित भावेश पवार यास कोर्टाने १२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पवारला कोर्टात हजर करण्यात आले होते. पूर्ववैमनस्यातून पवारने आपले चुलत दाजी असलेल्या नामदेव सोनवणे यांचा खून केला होता. खुनाची घटना १२ एप्रिल २०१६ रोजी उघडकीस आली होती.

भुरट्या चो-यांमध्ये वाढ पंचवटी परिसरात भुरट्या चो-यांमध्ये वाढ झाली आहे. रात्री पोलिस गस्त वाढविण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोरणांमुळे बारगळले ‘सुरक्षारक्षक’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एटीएम मशिन्स केंद्रावर सुरक्षा रक्षक तैनात नसणे, पोलिसांसह खातेदारांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यासाठी धोरणात्मक निर्णयाकडे बोट दाखवून स्थानिक अधिकारी नामानिराळे राहत असून, याचा फटका मात्र सामान्य खातेदारांना बसत आहे. असाच प्रकार नुकताच शहरात घडला असून, भामट्यांनी शहरातील सात जणांच्या खात्यातील सुमारे तीन लाख रुपयांना गंडा घातला. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी अद्यापपर्यंत या प्रकरणाचा कोणताही छडा लागलेला नाही.

रेडक्रॉस सिग्नलजवळील जगन्नाथ रेस्टॉरंटशेजारील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून पैसे काढलेल्या वेगवेगळ्या सात बँक ग्राहकांच्या खात्यातून तीन लाख एक हजार २०० रुपयांची रक्कम पनवेलच्या एटीएममधून परस्पर काढल्याची घटना नुकतीच घडली. चोरट्यांनी या एटीएम मशीनला स्कॅनिंग मॉर्फिन मशीन जोडून मशीनचा डाटा चोरी केला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. दरम्यान, अशाच प्रकारे आणखी काही बँक ग्राहकांची फसवणूक झाली असल्यास त्यांनी भद्रकाली अथवा सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्याचे आवाहन सहाय्यक पोलिस आयुक्त राजू भुजबळ यांनी केले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एक पथक पनवेल येथे पाठविण्यात आले. मात्र, हे पथक पोहोचेपर्यंत तेथील बँक बंद झाली होती. त्यातच रविवारची सुटी आल्याने अडचण झाल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. एटीएम केंद्रांवर सुरक्षारक्षक तैनात ठेवण्यासंबंधी बँक व्यवस्थापकांना वारंवार कळविण्यात आले आहे. मात्र, हा धोरणात्मक निर्णय असल्याचे सांगत स्थानिक अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. ग्राहकांना सेवा देण्यासाठी सुरू करण्यात येणारे एटीएम केंद्रच ग्राहकांना आर्थिक झळा देणार असतील तर ग्राहकांनी काय करावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी मदतीला मुकणार?

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे यापूर्वी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पुन्हा पंचनामे करू नयेत, असे आदेश सरकारने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जाणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त १,६३३ गावे आहेत. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सामना करीत आहेत. गेल्या वर्षी तर वर्षभर अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिवापाड जपलेली पिकेही डोळ्यादेखत आडवी झाली. लागवडीवर, तसेच खते आणि मशागतीवर केलला खर्च वाया गेल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला. नैराश्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाते. जिल्ह्यात सुमारे ३ लाख २१ हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने १८५ कोटी रुपयांची मदत वितरित केली आहे. या मदतीमुळे शेतकऱ्याला थोडा हातभार लागला. मात्र, गेल्या वर्षी मान्सूनमध्ये पुरेसा पाऊसच न झाल्याने पुन्हा शेतकऱ्यांवर अरिष्ट ओढवले. पाण्याअभावी पिके जगविणे मुश्कील होऊ लागले. येनकेनप्रकारे पिके जगविल्यानंतर आता पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना धक्का दिला आहे. रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

काय आहे नेमके धोरण?

यापूर्वी सरकारने ३ लाख २१ हजार शेतकऱ्यांना यापूर्वीच मदत देऊ केली आहे. त्यांच्या शेतांमध्ये पिके नसतील तर नुकसान होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामेच करू नये, असे धोरण सरकारने स्वीकारले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही मदत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावांमधील शेतकऱ्यांचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images