Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आयमा निवडणुकीची वाढणार चुरस

$
0
0

अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची (आयमा) निवडणुकीसाठी बुधवारी, तिसऱ्या दिवशी १८ अर्जांची विक्री झाल्याने आयमा निवडणुकीची चुरस वाढणार आहे. सत्ताधारी एकता पॅनलच्या वतीने अध्यक्षपदासाठी राजेंद्र आहिरे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. विरोधी गटातून तुषार चव्हाण यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्यामुळे आयमाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन प्रमुख औद्योगिक संघटना म्हणून 'निमा' आणि 'आयमा' या संघटनांची ओळख आहे. यात निमा व आयमाची अनेकदा झालेल्या निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आजी माजी पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात होते. यात बहुतांश वेळा 'आयमा'ची निवडणूक बिनविरोध झाली आहे. परंतु, सत्ताधारी गटाच्या विरोधत असलेल्या तुषार चव्हाण यांनी अध्यक्षपदाच्या जागेवर आपला हक्क दाखविल्याने 'आयमा' निवडणुकीची रंगत वाढणार आहे. त्यातच अर्ज विक्रीच्या तिसऱ्या दिवशीही १८ अर्जांची विक्री झाली. यामुळे ३० जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीसाठी एकूण ३० अर्जांची विक्री झाली आहे. दरम्यान सत्ताधारी गटांकडून माजी अध्यक्ष असलेले विजय तलवार, जे. एम. पवार, पी. के. शेट्टी, बी. पी. सोनार, धनजंय बेळे, एस. एस. आनंद, जे. आर. वाघ, एस. एस. बिर्दी, संदीप सोनार, ज्ञानेश्वर गोपाळे, सुरेश माळी व विवेक पाटील यांनी अध्यक्षपदावर विद्यमान सरचिटणीस राजेंद्र आहिरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. अर्ज विक्री व स्वीकृतीसाठी गुरुवारपर्यंत (दि. १९) मुदत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रीन जीमला उन्हाचा चटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

उपनगर परिसरात अनेक ठिकाणी ग्रीन जीम उभारण्यात आल्या आहेत. मात्र, येथे ग्रीन म्हणजे हिरवळ नावाला सुद्धा नाही. सकाळी आणि सायंकाळी कडक उन्हाळामुळे जीमचा वापर करता येत नाही. दुपारी लहान मुले कडक उन्हात या जीमचा खेळणी म्हणून उपयोग करीत आहेत. ओपन जीमजवळ वृक्षारोपणाची किंवा शेडची मागणी होत आहे.

उपनगर परिसरात पाच ते सहा ठिकाणी आमदार देवयानी फरांदे यांच्याहस्ते काही दिवसांपूर्वी ग्रीन जीमचे उदघाटन झाले. इच्छामणी गणेश मंदिराजवळ जॉगिंग ट्रॅक उभारण्यात आला आहे. ट्रॅक शेजारीच ग्रीन जीमचे साहित्य उभारण्यात आले आहेत. सायंकाळी ज्येष्ठ नागरिक त्याचा वापर करतात. मात्र, सायंकाळी उन्हाचा कडाका कायम असतो. त्यामुळे तापलेल्या व्यायाम साहित्याचा वापर करता येत नाही. सकाळीही तीच परिस्थिती असते. या जीम शेजारी दिवे बसवल्यास सायंकाळनंतर त्यांचा वापर करता येईल. मनपाने नागरिकांच्या मागण्यांची दखल घ्यावी, असा सूर उमटत आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत टँकरसाठी व्यावसायिक सरसावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

सध्या पाण्याचा प्रश्न खूपच गंभीर झाला आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागात पाण्याची समस्या भेडसावू लागली असून, पाऊस पडेपर्यंत नागरिकांना किमान पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने विल्होळी ग्रामपंचायत हद्दीतील काही व्यवसायिकांनी मोफत टँकर सुविधा सुरू केली आहे.

विल्होळी गावातील संघर्षनगर व बजरंगवाडीत पाण्याची टंचाई चांगलीच जाणवू लागली आहे. शेतीला तर सोडाच परंतु पिण्यासाठीसुद्धा नागरिकांना पाणी मिळत नसल्याने येथील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू असते. यावर उपाय म्हणून विल्होळीचे सरपंच बाजीराव गायकवाड, उपसरपंच ताराबाई वाघ, संजय गायकवाड यांनी परिसरातील काही व्यवसायिकांच्या मदतीने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अनिलकुमार कन्स्ट्रक्शनचे रवींद्र भालेराव व मनूशेठ गुलाटी यांनी पाऊस पडेपर्यंत दररोज पाच टँकर मोफत देण्याचा निर्णय घेतला. गावातील नागरिकांना पाणी मिळाले पाहिजे त्याचबरोबर त्यांना पाण्यासाठी वणवण होवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे भालेराव यांनी सांगितले. कालपासून हे टँकर उपलब्ध झाले आहेत. याप्रसंगी भालेराव, गुलाटी, संजय गायकवाड, संतोष आल्हाट, ग्रामविकास अधिकारी बी. एम. पगार, नवनाथ गाडेकर, सोमनाथ भावनाथ, संपत बोंबले, शरद पवार, अर्चना थोरात यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

कोण काय म्हणते

विल्होळी गावासह परिसरातील अनेक वस्त्यांवर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शेतीतील विहिरींनासुद्धा पाहिजे त्या प्रमाणात पाणी राहिलेले नाही. त्यामुळे पाऊस येईपर्यंत नागरिकांना किमान पिण्यासाठी पाणी देण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला. दानशूर व्यक्तींनी टँकर देण्याचे आवाहन केल्यावर अनिलकुमार कन्स्ट्रक्शनने ही जबाबदारी घेतल्याने आनंद झाला आहे. दररोज पाच टँकर येणार असल्याने नागरिकांना पाणी उपलब्ध होईल.

- बाजीराव गायकवाड, सरपंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्री श्री रविशंकर यांचा दारुबंदीस पाठिंबा

$
0
0

नाशिकमधून छत्रपती युवा व युवती सेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दारुबंदी आंदोलनाचा श्रीगणेशा करण्यात आलेला आहे. देशातील प्रगत व पुरोगामी विचारांचे राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखले जाते. मात्र, महाराष्ट्रातील व्यसनाधिनतेचे प्रमाण अन्य राज्यांपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रातील युवा पिढीला वाचविण्यासाठी महाराष्ट्र दारुबंदी आंदोलनाचे नेतृत्व करणारे गणेश कदम, मराठी अभिनेता चिन्मय उद्गीरकर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे महाराष्ट्र राज्य समन्वयक विजय हाके यांनी रविशंकर यांची बंगलोर येथे नुकतीच भेट घेतली. यावेळी त्यांनी जनआंदोलनाचे समर्थन केले. यावेळी तुषार भोसले, विक्रम कदम, विशाल झांजरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या वारसांना व्यापारी बॅँकेची मदत

$
0
0

नाशिक जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ८५ कुटुंबियांना नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेतर्फे २४ लाख ६९ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते जेलरोडच्या इंगळेनगर शाखेत शुक्रवारी (दि. २०) सकाळी नऊला मदतीचा धनादेश प्रदान केला जाणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड आणि उपाध्यक्ष सुधाकर जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, अशोक चोरडिया, मनोहर कोरडे, रामदास सदाफुले, श्रीराम गायकवाड आदी उपस्थित होते.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी आत्महत्या या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्णय बँकेच्या संचालक आणि सभासदांनी घेतला होता. सभासदांनी लाभांशाच्या दोन टक्के, संचालक मंडळाने वर्षभराचा सभा भत्ता आणि कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन देण्याचे ठरले होते. त्यानुसार २४ लाख ६९ हजाराचा निधी जमा झाला आहे. जिल्हाभरातील ८५ कुटंबीयांना प्रत्येकी सुमारे २० हजाराची मदत मिळणार आहे. रक्कम उरली तर मुख्यमंत्री निधीला दिली जाणार आहे. कार्यक्रमानंतर संजय गिते आत्महत्येवर समुपेदशन करतील. शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमाला खासदार संजय राऊत, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, जिल्ह्यातील खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत.

'रिपाइं'तर्फेही मदत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे दुष्काळग्रस्तांना सव्वा लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री निधीसाठी नुकतीच देण्यात आली. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील संपत कांबळे, उत्सव समितीचे अध्यक्ष देवीदास दिवेकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी अतुल भावसार, प्रेमनाथ पवार, शैलेश शिंगवेकर, दिनेश केदार, गोरख गांगुर्डे, वाहिद खान, सुनील बर्वे, आदी उपस्थित होते. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती असल्याच्या निमित्ताने सव्वा लाखाचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निफाड आणि चांदवड तालुक्यातील शेतकरी आत्महत्येचे लोन आता अन्य तालुक्यांमध्ये सरकू लागले आहे. चांदवड तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविल्याच्या घटना उघडकीस आली आहे. यामुळे वडनेर भैरव आणि हिरापूर या दोन गावांवर शोककळा पसरली आहे. गेल्या साडेचार महिन्यांत जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३४ झाली आहे.

चांदवड तालुक्यात कोंडाजी रामभाऊ वक्ते (वय ३६ रा. वडनेर भैरव, ता .चांदवड) व देवीदास भाऊसाहेब चव्हाण (वय ४२, रा.हिरापूर ता.चांदवड ) या शेतकऱ्यांनी विष प्रशान करून आत्महत्या केली. वक्ते हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. मंगळवारी (दि.१७) रात्री नऊच्या सुमारास कुटुंबीयांसह जेवण करून घरासमोर झोपण्यासाठी चालले होते. त्यावेळी त्यांनी औषधाची बाटली सोबत घेतली होती. खोलीतून मुलाने काय घेतले म्हणून त्यांची आई गीताबाई यांना संशय आला. त्यांनी घराबाहेर जाऊन पाहिले असता कोंडाजी हे औषध पिऊन उलट्या करीत होते. त्यांना तत्काळ पिंपळगाव बसवंत येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या वडिलांच्या नावे सोसायटीचे आठ लाख रुपये, तसेच गावातील वेगवेगळ्या तीन पतसंस्थांचे तीन लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती पुढे आली आहे. कोंडाजी यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी वृद्ध आई वडील भाऊ असा परिवार आहे.

दुसरी घटना हिरापूर येथे घडली. देवीदास भाऊसाहेब चव्हाण (वय ३८) यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हिरापूर येथे त्यांची शेती असून, शेतीवर त्यांनी कर्ज काढल्याची प्राथमिक माहिती आहे.

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे लोणे पसरू लागले आहे. निफाडमध्ये सर्वाधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. आता आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे. विशेष म्हणजे यामध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने ही चिंताजनक बाब आहे. गेल्या वर्षी ८५ शेतक-यांनी आत्महत्यांनी क‌ेली होती. यावर्षी चारच म‌हिन्यात हा आकडा ३४ वर पोहोचला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याअभावी अतिरिक्त भारनियमनाचा धोका

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

महाराष्ट्रात असलेल्या दुष्काळसदृष्य परिस्थितीची झळ राज्यातल्या वीज उत्पादनाला बसली असून, पाणी उपलब्ध होत नसल्याने राज्यातील १५ व‌ीजनिर्मिती प्रकल्प बंद झाले आहेत. परिणामी ग्राहकांची वीजेची मागणी आणि पुरवठा यात तब्बल हजार मेगावॅट वीजेची तफावत (तुटवडा) निर्माण झाली आहे. नॅशनल ग्रीडमधून वीज विकत घेऊन ही तफावत भरुन काढण्याचा अटोकाट प्रयत्न वीज कंपनी करत असली तरी कोणत्याही क्षणी राज्यात अतिरिक्त भारनियमन लागू होण्याची शक्यता आहे.

आदानी पॉवर कंपनीचा गोंदिया येथील तीन हजार मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा औष्णिक वीज प्रकल्प आहे. पाणीटंचाईमुळे या प्रकल्पातील २ हजार ४०० मेगावॅट वीज उत्पादन ठप्प झाले आहे. तर महाराष्ट्रात थर्मलचे ९ प्रकल्प व हायड्रोचे ६ प्रकल्प बंद आहेत. वीजनिर्मिती करणारे हे दोन प्रकल्पातून वीजनिर्मिती क्षमता मोठ्याप्रमाणात घटल्याने राज्यभर भारनियमन करण्याची नामुष्की महावितरणवर ओढवणार आहे.

महावितरणची सध्या १७ हजार ५०० मेगावॅटच्या घरात दैनंदिन वीजेची मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीबरोबरच खासगी वीज प्रकल्पांमधून वीज घेतली जाते. त्यानुसार सध्या तीन हजार मेगावॅट वीज आदानीकडून घेतली जात होती. पण आज अचानक जलसंपदा विभागाने आदानीच्या प्रकल्पाचा पाणीपुरवठा बंद केल्याने वीजनिर्मिती ठप्प झाली असून, त्याचा झटका महावितरणला बसला आहे. राज्याच्या अ आणि ब गटातील फिडर वगळता सी, डी, ई, एफ, जी-१, जी-२ या फिडरवर भारनियमन करण्यात येत आहे. इतर प्रकल्पांमधून अतिरिक्त वीज उपलब्ध होईपर्यंत आणखी काही दिवस हे भारनियमन सुरूच राहणार आहे. प्रसंगी अतिरिक्त भारनियमन लागू केले जाऊ शकते, अशी माह‌िती महावितरणच्या सूत्रांनी दिली.

राज्यात ७ थर्मल पॉवर स्टेशन्स आहेत, त्यातील नाशिकच्या ३ संचातून ४३७ मेगावॅट वीज तयार होते. कोराडीच्या ४ संचापैकी १ बंद असून, तीन संचाद्वारे ७१७ मेगावॅट, खापरखेडा ५ संचाद्वारे १०७६ मेगावॅट, पारसच्या २ संचाद्वारे ४४४ मेगावॅट, परळीचे पाचही संच बंद आहेत. चंद्रपूर येथे ७ संच असून, त्यातील ३ संच बंद आहेत, भुसावळच्या ४ संचामधून १०६० मेगावॅट वीजेचे उत्पादन होते. यातील सात थर्मलमध्ये ३० संचापैकी ९ संच बंद आहेत. कोयना हायड्रोच्या माध्यमातून तयार होणारे ६ संच बंद आहेत. त्यामुळे पाणी टंचाईमुळे आणखी १५ दिवस भारनियमन जास्त प्रमाणात होणार असल्याची चिन्हे आहेत. राज्याला अंदाजे १७ हजार ५०० मेगावॅट वीजेची गरज भसते, त्यातील ११ हजार ५०० मेगावॅट वीज जनरेशन आणि इतर माध्यमातून मिळवली जाते. येत्या काही दिवसात हे सर्व संच सुरु न झाल्यास आणखी भारन‌ियमन सोसावे लागण्याची शक्यता आहे.

वीजेची गरज १७, ५०० मेगावॅट

एकूण वीज निर्मिती ११,४९४ मेगावॅट

एकूण वीजेचा तुटवडा ६००६ मेगावॅट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्त-बिल्डरांमध्ये रंगले ‘सोशलवॉर’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कपाट प्रश्नावरून महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि शहरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये सोशल वॉर सुरू झाले आहे. कपाट प्रश्नावरून बिल्डरांना ठणकाविणाऱ्या आयुक्तांनी कपाटे तोडून दाखवावीच, अशी निनावी पोस्ट सोशल मीड‌ियावर बुधवारी फिरत होती. क्रेडाईच्याच माजी पदाधिकाऱ्याने ही पोस्ट शेअर केल्याने व त्यात थेट आयुक्तांना खरी खोटी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे कपाटाचा वाद अधिक पेटण्याची शक्यता असतांनाच, क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांनी आयुक्तांची भेट घेवून या पोस्टशी क्रेडाईचा संबध नसल्याचा दावा केला आहे. नागरिकांसाठी यातून योग्य मार्ग निघावा, अशी आमची इच्छा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

कपाट प्रश्नावर महापालिकेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करणाऱ्या बिल्डरांविरोधात आयुक्त डॉ. गेडाम यांनी सोशल मीड‌ियावर थेट उत्तरे दिलीत. तसेच कपाटे कशी अनधिकृत असून ती आपण पाडूही शकतो असा दम भरला होता. या पोस्टमध्ये क्रेडाईलाही फटकारले होते. त्यामुळे आयुक्तांच्या या पोस्टला काही बिल्डर्स व आर्किटेक्ट यांनी काऊंटर करत, आयुक्तांच्या विरोधातील एक पोस्ट व्हायरल केली.

क्रेडाईच्या माजी पदाधिकाऱ्यांनी निनावी पोस्ट शेअर केली असून, त्यात थेट आयुक्तांनाच आव्हान देण्यात आले आहे. कपाटे पाडून दाखवाच, असे आव्हान देण्यात आले आहे. आयुक्तांचे अभिनंदन करत, हा उहापोह आता कशासाठी असा सवाल उपस्थित केला आहे. जर तुम्ही भोळसट अन् अजाण अशा नाशिककरांना जागृत करण्यासाठी हा लेख लिहीला असेल तर, उल्लेखणीय आहे की, याही परिस्थित कपाटबंद इमारतीतील सदनिकांची विनादिक्कत खरेदी-विक्री सुरू आहे, अगदी बाकायदा रजिस्टर्ड. मागे आपण दिलेल्या आवाहनाला भोळसट अन् अजाण नाशिककरांनी मनपातून किती मंजूर नकाशांच्या प्रती नेऊन प्रतिसाद दिला हा देखील संशोधनाचा विषय आहे. भोळसट अन् अजाण नागरिकांनी सुजाण होऊन अशा बिल्डर्स व आर्किटेक्ट्स विरुद्ध खटलेच टाकावेत. (मनपा अधिकाऱ्यांचा यात काहीच दोष नाही, ते अतिशय प्रामाणिक असून कपाट वगैरे बंद होतात हे त्यांना माहितही नसावे, असेलच कुणी तर त्यांस माफीचा साक्षीदार करावे) आपले अधिकार फार मर्यादीत आहेत व आपण कपाट नियमित करू शकत नाही असे आपण म्हणतात. आपल्या अधिकारात केवळ कपाटं तोडण्याचा पर्याय आहे असाही उल्लेख आहे. तर मग आपला किरकोळ अधिकार वापरून ही कपाटे तोडा असे थेट आव्हान दिले आहे.

प्रिंट व सोशल मीड‌ियातील लेख, मनपाची वेळोवेळी निघणारी परिपत्रके व गोबेल्स पद्धतीने होणारी चर्चा यावरून भोळसट व अजाण नागरिकाने बांधकाम व्यावसायिकाला दोषी तर ठरवलेच आहे. परंतु, अधिक कालापव्यय झाल्यास त्यांच्या मुलांच्या हातावर 'मेरा बाप चोर है' लिहायलाही ही मंडळी कमी करणार नाहीत, असा टोला या पोस्टमध्ये लगावत पालिकेच्या अधिकाऱ्यांवरही तोंडसुख घेतले आहे.

क्रेडाईने झटकले हात

दरम्यान ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांच्यास काही सदस्यांनी सायंकाळी आयुक्त डॉ. गेडाम यांनी या संदर्भात भेट घेतली. तसेच या पोस्टशी क्रेडाईचा काहीच संबध नसल्याचा दावा केला आहे. ही पोस्ट शेअर करणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे. क्रेडाईनेच ही पोस्ट अनधिकृत असल्याचे सांगून पोस्ट शेअर करणाऱ्यांपासून अंतर राखले आहे. यावर तोडगा निघावा, अशी भूमिका असल्याचे त्यांनी सांग‌ितल्याने क्रेडाईतच दोन गट पडल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोग्याच्या ज्ञानघरी माकड आजारी!

$
0
0

satish.kale@timesgroup.com

नाशिक : 'त्याला' बोलता येत नाही, खाणाखुणाही करता येत नाहीत, परंतु त्याचा जीव आपल्यासारखाच वेदनांनी तुटतो, त्याच्या या वेदना कुणी जाणून घेणार का? आपल्या अंगणात एक मुका जीव वेदनेने तडफडताना दिसत असूनही त्याच्याकडे लक्ष न देता आपला व्यवहार सुरू ठेवणाऱ्या या दुनियेला काय म्हणावे?

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात गेल्या दोन दिवसांपासून वास्तव्य असलेल्या माकडाचे आरोग्य धोक्यात असल्याचे दिसून आले. एकीकडे आरोग्याच्या पदवीदानाचे काम सुरू असताना दुसरीकडे या माकडाने आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सभागृहाबाहेर मान टाकली होती. येथील सुरक्षासरक्षाला विचारपूस केली असता, त्याने या माकडाचे आरोग्य बिघडले असल्याचे सांगितले. त्यावेळी तत्काळ अॅनिमल वेलफेअर अॅण्‍ड अॅन्टी हॅरेशमेंट सोसायटी (आवास) संस्थेच्या कार्यकर्त्यांना पाचारण करण्यात आले. तेव्हा आवास संस्थेच्या गौरव क्षत्रीय यांनी या माकडाला उपचारासाठी तेथून हलवले. प्रथम त्याची वन विभागात नोंद केली. त्यानंतर त्याची डॉक्टरांकडून तपासणी केली असता या माकडाच्या दाताचे सूळे हे त्याच्या कातडीच्या बाहेर आल्याने त्याचे अन्न-पाणी ग्रहण करणे अवघड झाले आहे. त्यामुळे या माकडाला अशक्तपणा आला आहे. या माकडाचे वय साधारण चार ते पाच वर्षे आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. लवकरच त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे.

अन्नाच्या शोधासाठी सध्या नाशिक शहराच्या विविध भागात माकडं वावरतांना दिसत आहेत. त्यापैकी काही आवास सारख्या संस्था माणुसकी, प्राण्यांविषयी प्रेम जपत त्यांना अन्नपाणी देत त्यांचा सांभाळ करीत आहेत.

अशा प्रकारच्या घटना खूप कमी असतात. या माकडाला काही लोकांनी दगड मारल्याने शरीराला खूप वेदना झाल्या आहेत. त्यामुळे हे माकडाचे आरोग्य अधिक बिघडले आहे. परंतु, त्याच्या दातांवर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

- गौरव क्षत्रिय, आवास संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयमा’साठी ६० अर्ज दाखल

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, सातपूर अंबड इंडस्ट्रीज अँण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) च्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ६० अर्ज दाखल झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एम. जी. चंद्रशेखर यांनी सांगितले. परंतु निवडणूक अधिकारी सत्ताधाऱ्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप विरोधी गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार तुषार चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान दोन पँनल उभे राहत असल्याने पुढील काही दिवस उद्योजकांमधिल निवडणुकीची रंगत पाहायला मिळणार आहे. आयमाच्या दोन वर्ष कार्यकाळ असलेल्या निवडणूक येत्या २९ मे रोजी होत आहे. यामध्ये निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्नही झाले; परंतू त्याला यश येऊ शकले नाही. आता माघारीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ६० अर्ज दाखल झाले आहेत. यात सत्ताधारी व विरोधकांकडून अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीचा आखाडा उद्योग वर्गात पाहायला मिळणार आहे. सत्ताधारी गटाकडून राजेंद्र आहिरे यांचे नाव अध्यक्षपदासाठी जाहीर करण्यात आले. अर्जांची रक्कम रोख घेण्यात आली होती. परंतू प्रोसेसिंग फि नावाने घेण्यात आलेले तीन हजार रुपये चेकने निवडणूक अधिका-यांनी स्विकारलेच कसे असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. यात चेकने स्विकारलेली प्रोसेसिंगची रक्कम ज्या उमेदवारांची असेल ते अर्ज बाद करण्यात यावेत, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगशास्त्र’चा शंभर टक्के निकाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक मार्च-एप्रिल २०१६ या उन्हाळी सत्रात नागपूरच्या कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या योगशास्त्र अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत. या विद्यापीठाला संलग्न योगविद्या गुरुकुल संचालित योग महाविद्यालय, नाशिकच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्यापीठाची विद्यार्थिनी स्मिता डेंगळे ही बी. ए. योगशास्त्र या विषयात कालिदास विद्यापीठात दुसरी आली आहे. योग महाविद्यालयाने सलग चौथ्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. या संस्थेच्या वतीने योगशास्त्र या विषयात चालविण्यात येणाऱ्या पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी या विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. या विद्यार्थ्यांना योगाचार्य विश्वास मंडलिक, पौर्णिमा मंडलिक, प्राचार्या डॉ. आशालता वेरुळकर, संस्कृत आणि योग उपनिषिदे या विषयात प्रा. अतुल तरटे यांचे मार्गदर्शन लाभले. ..येथे साधावा संपर्क अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेसंदर्भात योग महाविद्यालयाशी (०२५३) २३१८०५० या क्रमांकावर किंवा प्रा. अतुल तरटे यांच्याशी ९८५००३७२६३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्या डॉ. आशा वेरुळकर यांनी केले आहे. योगशास्त्र पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीचा आहे. बी. ए. (योगशास्त्र) हा पदवी अभ्यासक्रम ६ सेमिस्टर म्हणजे तीन वर्षांचा, तर एम. ए. (योगशास्त्र) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम ४ सेमिस्टर म्हणजे दोन वर्षांचा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वळणदार अक्षरांच्या ‘स्ट्रोक्स’ने फुलली कॅलिग्राफी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक प्रत्येकात दडलेल्या सृजनशक्तीला आवाहन करीत सिद्ध हस्तांनी सादर केलेल्या वळणदार अक्षरांच्या स्ट्रोक्सनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. या सादरीकरणातून प्रेरणा घेत कॅलिग्राफीच्या कार्यशाळेत सहभागी इच्छुकांच्या बोटांनाही चालना मिळाली. निमित्त होते 'महाराष्ट्र टाइम्स' आणि श्री रचना महाविद्यालयातर्फे आयोजित 'शिका कॅलिग्राफी' कार्यशाळेचे. कॅलिग्राफी म्हणजे काय? या प्रश्नापासून तर या विषयाचा इतिहास आणि त्याची प्रात्यक्षिके करून घेण्यापर्यंत या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. राजू दाणी यांनी या वेळी कार्यशाळेत सहभागींशी संवाद साधला. कॅलिग्राफी ही कला केवळ चित्रकारांनाच जमू शकते , असा समज अनेकांमध्ये आहे. पण, कलेविषयी आस्था असल्यास व इच्छाशक्ती असल्यास आपणही वळणदार अक्षरवाटांचे सोबती होऊ शकतो, असा विश्वास या कार्यशाळेच्या माध्यमातून जागविण्यात आला. कॅलिग्राफसाठी लागणाऱ्या साहित्याच्या ओळखीपासून, तर प्रात्यक्षिकांपर्यंत प्रा. राजू दाणी यांनी या वेळी मार्गदर्शन केले. या कलेत प्रचलित असणाऱ्या विविध आकर्षक फॉण्ट्सचीही माहिती या वेळी देण्यात आली. याशिवाय स्वत:च्या सर्जनशीलतेच्या वापरातून नवनव्या फॉण्ट्सचा शोध कसा घ्यावा, याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले. इंग्रजी व मराठी या दोन्हीही भाषांमध्ये कॅलिग्राफी करण्यात येते. या दोन्ही भाषांमधील कॅलिग्राफीची माहिती या वेळी देण्यात आली. या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाला नोटबुक व कॅलिग्राफी सेट देण्यात आला. कॅलिग्राफीच्या कलाकुसरीमध्ये पेनाची नीब कशी पकडावी, अक्षरे गिरविताना काय काळजी घ्यावी, अक्षरामध्ये एकसारखेपणा कसा असावा आदी मुद्द्यांवर प्रा. दाणी यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी इच्छुकांचाही चांगला सहभाग मिळाला. वळणदार अक्षरासाठी महत्त्वाचे तंत्र व टिप्स या कार्यशाळेत मिळाल्या. या कलेसाठी सराव महत्त्वाचा असल्याचेही समजले. 'मटा'ने पुन्हा एकदा एक चांगला उपक्रम आम्हाला दिला. -आरती देशमुख धावपळीच्या युगात लोककला व त्यातून मिळणाऱ्या आनंदाला आपण विसरून गेलो आहोत. या कार्यशाळेतून तोच आनंद पुन्हा गवसला. अनमोल मार्गदर्शन मिळाले. -भूषण ओस्तवाल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालनाट्य शिबिराची आजपासून धमाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ व विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यदिग्दर्शक प्रशांत वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार (दि. २०) पासून 'बालनाट्य शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. मुला-मुलींच्या जडणघडणीत शिक्षणाला जसे महत्त्व आहे तसे आजच्या जगात सभाधीटपणा, संभाषणकला, निरीक्षण क्षमता, एकाग्रता, सुप्त गुणांचा विकास, स्वत:ला सादर कसे करावे, वैचारिक सकसता, सांघिकतेचे महत्त्व आदी विषयांचा समावेश असलेली शिबिरे गेली अनेक वर्षे समाजातील विविध स्तरांतील मुला-मुलींसाठी डॉ. प्रशांत वाघ राबवीत असतात. संबंधित शिबिर अभिनय व मनोरंजनात्मक खेळाच्या माध्यमातून घेतले जाते. नाट्यदिग्दर्शक प्रशांत वाघ यांनी हौशी व व्यावसायिक बालरंगभूमीवर अनेक बालनाट्ये दिग्दर्शित केली असून, त्यात दुर्गा झाली गौरी, वयम् मोठम् खोटम्, जंतर मंतर पोरं बिलंदर, शेपटीचा साप, परिकथेतील राजकुमार, चिमणा बांधतो बंगला, अंदिबानच्या बेटावर, श्यामची आई, बोक्या सातबंडे, जादूचा शंख, बजरबट्टू इत्यादी चाळीसहून अधिक बालनाट्यांचा समावेश आहे. शिबिर ९ ते १७ वयोगटाच्या मुला-मुलींसाठी असून, शुक्रवार (दि. २०) ते सोमवार (दि. ३०) या कालावधीत सकाळी १० ते ३ या वेळेत क्लब हाउस, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑपरेटिव्ह बँकेसमोर होणार आहे. शिबिराच्या संपर्कासाठी व अधिक माहितीसाठी राजू देसले- ७७२००५२५७२, सचिन हांडे- ७७२००५२५५९ यांच्याशी संपर्क साधावा. नोंदणी फॉर्म विश्वास बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहेत. बालनाट्य शिबिरास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विश्वास को-ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर, उपाध्यक्ष विलास हावरे, मानद कार्यकारी संचालक मंगेश पंचाक्षरी, जनसंपर्क संचालक घनःश्याम येवला, संचालिका वैशाली होळकर, संचालक डॉ. वासुदेव भेंडे, डॉ. सुभाष पवार, डॉ. चंद्रकांत संकलेचा, शशिकांत पारख, अजित मोडक, विक्रम उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरी विनायक कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सारिका देशपांडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅरम स्ट्राइकरच्या बोटांना लेखणीची धार

$
0
0


वेळ भर दुपारची असो वा मध्यरात्र उलटून गेल्यानंतरची.. पोलिसगाडीचा सायरन ऐकताच 'त्या' स्लममधील मुले कॅरमचा स्ट्राइकर जागीच टाकून सैरावेरा पळत सुटतात... तर काही चांगल्या जीवनाची स्वप्न पाहत कष्टाच्या कामाचा मार्गही स्वीकारतात.. पण मार्गदर्शनाअभावी भरकटणाऱ्या या वस्त्यांमधूनही प्रशासनातले उत्तम अधिकारी बाहेर पडावेत यासाठी आता नाशिक पोलिसांनी या मुलांना मदतीचा हात दिला आहे. खास स्लम भागातील होतकरू तरुणांसाठी पोलिसांच्या वतीने स्पर्धा परीक्षेचा पहिला मार्गदर्शन वर्ग वडाळ्यात गुरुवारपासून सुरू झाला.

शहरातील महामार्गालगतचे वडाळागाव, भारतनगर, राजीवनगर आणि भगतसिंग या स्लम भागांचा पोलिसांशी दररोज येणारा संबंध हा केवळ गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमुळेच. या स्लममधील काही तरुण नेहमीच कुठल्या ना कुठल्या वादात वा आरोपात सापडणारे तर काही तरुण कॅरमसारख्या खेळांच्या आहारी जाणारे. अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. मात्र, यंदाच्या यूपीएससी परीक्षेच्या ऐतिहासिक निकालाने मात्र यासारख्या पूर्वग्रहांना फाटा दिल्याची बाब पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या नजरेने टिपली. एका सामान्य रिक्षाचालकाचा मुलगा यूपीएससीद्वारे आयएएस होऊ शकतो तर याला स्लम भागातील मुलेही अपवाद का रहावीत, हा प्रश्न पोलिस अधिकारी धिवरे यांना यूपीएससीच्या निकालापासून सतावित होता. यावर प्रत्यक्ष कृतीद्वारे तोडगा काढण्यासाठी त्यांनी या भागातील युवकांसाठी सुचलेली विकासात्मक संकल्पना पोलिस खात्यासमोर मांडली अन् नाशिक परिमंडळ व वडाळा परिसरातील जेएमसीटी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने या युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्राचा अभिनव उपक्रम पुढे आला आहे.

कायद्याच्या धाकाऐवजी सामोपचार या उपक्रमास वडाळ्यातील जेएमसीटी कॉलेजमध्ये गुरूवारी सुरूवात झाली. वडाळा गावासह परिसरातील चार स्लममधून सुमारे दीडशेवर तरुण विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. या विद्यार्थ्यांसाठी युनिव्हर्सल फाऊंडेशन अकादमीच्या तज्ज्ञांद्वारे युवकांशी संवाद साधला जाणार आहे. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? या प्रश्नापासून तर अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करून चांगले अधिकारी कसे निर्माण होऊ शकतात, याची आदर्श उदाहरणेही युवकांसमोर मांडली जाणार आहेत. केवळ कायद्याचा धाक दाखवून कुप्रवृत्तींवर पकड मिळविण्यापेक्षा सोबतीला युवकांनी गुन्ह्याकडे वळूच नये, यासाठी स्वीकारलेला सामोपचाराचा पोलिसांचा प्रयत्न वाखाणला जातो आहे.

शहरात पेट्रोलिंग करताना कॅरमसारख्या गेम्समधून हाती असणारा वेळ वाया घालविणारी मुले किंवा केवळ रोजीरोटी सुटेल, अशी कष्टाची कामे स्वीकारणारी अल्पसंख्यांक समाजातील मुले कायम नजरेला पडतात. त्यांच्यातील अनेकांमध्ये टॅलेंट दडलेले असते. या टॅलेंटला साजेशी परिस्थिती मिळावी व त्यांच्यातून समाजाला चांगले अधिकारी मिळावेत, यासाठी हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा प्रयत्न करण्याची कल्पना सुचली. - श्रीकांत धिवरे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचा जमावावर लाठीमार

$
0
0

कपालेश्वर मंदिरातील विश्वस्त मंडळाच्या कार्यालयाची संतप्त भाविकांनी तोडफोड केल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत जमावावर नियंत्रण मिळविले. पोलिसांनी अॅड. देसाई यांना संरक्षण देत शहराबाहेर नेले. सुमारे अडीच तास सुरू असलेला हा दर्शनाचा 'अध्याय' संपुष्टात आला. मात्र, यामुळे परराज्यातून आलेल्या भाविकांची तारंबळ उडाली. मंदिर परिसरात सायंकाळी उशिरापर्यंत तणाव होता. दरम्यान, याप्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

अॅड. देसाई मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करणार असल्याची माहिती समजताच स्थानिक भक्त त्यास विरोध करण्यासाठी एकटवले. त्यात महिलांची संख्याही लक्षणीय होती. अॅड. देसाईंच्या दर्शनामुळे वाद होण्याची शक्यता गृहीत लक्षात घेत पोलिस सज्ज झाले. मात्र, तब्बल तीन तास वाटाघाटीतच गेले. अॅड. देसाई आपल्याकडील कोर्टाची ऑर्डर दाखवत दर्शनासाठी आग्रही बनल्या. तर, प्रदोष असल्याने अॅड. देसाईंनी भक्तांच्या रांगेत येऊन दर्शन घ्यावे, असा युक्तिवाद उपस्थित भक्तांनी केला. या दरम्यान पोलिस मध्यस्थाची भूमिका निभावत राहिले. अॅड. देसाई तीन तास मंदिराचे ट्रस्टी अॅड. भाऊसाहेब गंभीरे यांच्या कार्यालयात थांबल्या होत्या. यामुळे भाविकांमध्ये नाराजी होती. दरम्यान, अॅड. देसाईंना मंदिरात येण्यासाठी काही पत्रकार उद्युक्त करीत असल्याचा आरोप करीत भाविकांनी त्यांना थेट मारहाण केली. यामुळे एकच पळापळ सुरू झाली. काही भाविकांनी ट्रस्ट कार्यालयाची तोडफोड केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी बसवण्यात आलेला टीव्ही, कम्प्युटर तसेच कार्यालयातील काचा भाविकांनी फोडल्यात. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी अॅड. देसाईंना मंदिराबाहेर नेले.

भाविकांना फटका सध्या सुट्यांचा मौसम असून गुरूवार तसेच प्रदोष असल्याने पंचवटीतील भाविकांची संख्या अधिक होती. दुपारच्या सुमारास कपालेश्वर मंदिरात झालेल्या गोंधळाचा फटका परराज्यातून आलेल्या भाविकांना बसला. पोलिसांच्या लाठीमारानंतर तारंबळ उडालेल्या भाविकांनी साडेपाच वाजेनंतर पुन्हा दर्शनास सुरूवात केली.

पोलिसांकडे दोन तक्रारी कार्यालयाची झालेली तोडफोड आणि आपल्या जीवला धोका असल्याची तक्रार मंदिराचे विश्वस्त अॅड. भाऊसाहेब गंभीरे यांनी पोलिसांकडे दिली. तर, भाविकांनी मारहाण केल्याची दुसरी तक्रार कॅमेरामॅन उमेश अवणकर यांनी दिली.

जमाव झाला आक्रमक पोलिस वाहनाकडे जात असलेल्या अॅड. देसाई यांच्या दिशेकडे एका भाविकाने चप्पल भिरकावली. जमाव आक्रमक होत असल्याचे पाहत पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करीत गर्दीवर नियंत्रण मिळवले. एकीकडे अॅड. देसाईंना कडेकोड सुरक्षेत शहराबाहेर काढण्यात आले तर दुसरीकडे जमावही पांगवण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दर्शनाची ‘तृप्ती’ नाहीच!

$
0
0

कपालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा अॅड. तृप्ती देसाई यांनी आंदोलन केले. मात्र, भाविकांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे त्यांना मंदिरात प्रवेश मिळाला नाही. अखेर पोलिस संरक्षणात देसाई यांना माघारी फिरावे लागले तर यावेळी संतप्त भाविकांनी ट्रस्टच्या कार्यालयाची तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणासाठी पोलिसांना भाविकांवर सौम्य लाठीमार करावा लागला. याचवेळी पत्रकारांनाही धक्काबुक्की करण्यात आली.

गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अॅड. देसाई कपालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करणार असल्याचे कळताच दुपारी बारापासूनच मंदिरातील पुजारी प्रभाकर गाडे, अनिल भगवान, साहेबराव गाडे, पुप्पू गाडे, गुरव यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी मंदिराच्या दारात ठिय्या मांडला. मंदिराच्या बाहेर तसेच आतमध्ये पोलिसाचा चोख बंदोबस्त होता. कोणत्याही परिस्थितीत मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करू द्यायचा नाही, असा चंग मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी बांधला होता. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, हिंदू एकताचे रामसिंग बावरी, महंत सुधीर पुजारी, अनिल कोठुळे मंदिरात थांबून होते. दुपारी तीनच्या सुमारास मंदिराच्या आवारात अॅड. देसाई यांचे आगमन झाले. त्यांना थेट देवस्थानच्या कार्यालयात नेण्यात आले. तेथे तहसीलदार राजश्री अहिरराव, विश्वस्त भाऊसाहेब गंभीरे, प्रमोद देसाई, विजय दहींजे आदींच्या उपस्थितीत चर्चा केली. विश्वस्तांनी कोर्टाच्या आदेशानुसार मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करू शकता, असे विश्वस्तांनी सांगितले. मात्र, पुजाऱ्यांच्या प्रतिनिधींनी तीव्र विरोध दर्शविला. ट्रस्टने लेखी परवानगी द्यावी, काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी घ्यावी, अशा अटी अॅड. देसाईंकडून टाकण्यात आल्या. अॅड. देसाई यांनी मंदिरात प्रवेश करू नये म्हणून कधी उत्तरेचा तर कधी दक्षिणेचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्नही भाविकांनी केला. मंदिरात भाविकांनी घोषणाबाजी, घंटानाद, डमरूनाद सुरू केला. देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयाबाहेर भजनही सुरू केले. सुमारे दोन तास ट्रस्टच्या कार्यालयात बसून असलेल्या असलेल्या अॅड. देसाई यांना अखेर पोलिसांनी शिताफीने जमावापासून बाहेर काढले.

..आधी हाजी अलीत जा! मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात मजारपर्यंत न जाणाऱ्या अॅड. देसाई या कपालेश्वरच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी का आग्रह करीत आहेत? आधी त्यांनी हाजी अलीत जावे आणि त्यानंतर कपालेश्वरच्या दर्शनासाठी यावे, असे संतप्त भाविकांचे म्हणणे होते. यामुळे मंदिर परिसरातील वातावरणात तणाव निर्माण झाला.

काळाराम मंदिरात दर्शन सकाळी नऊला काळाराम मंदिर येथे अॅड. देसाई यांनी दर्शन घेतले. मंदिराचे पुजारी मंगेश पुजारी, सुनील पुजारी, शेखर पुजारी, मुकूंद पुजारी यांनी मंदिर आणि मूर्तींविषयी माहिती दिली. मंदिराच्या गाभाऱ्यातील जाळी अगोदर बंद करण्यात आली. तसेच या गाभाऱ्याच्या आत कुणी जात नाही असे त्यांना सांगण्यात आले. त्याचवेळी त्यांनी कपालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी मला अनेकांचे फोन आले. नंदी नसलेले महादेवाचे हे एकमेव मंदिर असल्याने त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महिला भाविकांच्या विनंतीनुसार कपालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यात येणार असल्याचे सांगितले.

भाविकांना दर्शनासाठी अडचणी मंदिर परिसराला आलेल्या पोलिस छावणीचे स्वरूप आणि मंदिरात पुजारी, गुरव आणि त्यांचे समर्थक यांच्यामुळे कपालेश्वर मंदिरात दर्शनास आलेल्या भाविकांना अडचणी येत होत्या. गोंधळ, घोषणाबाजी आणि घंटानादामुळे मंदिरात काय चालले हेच समजत नव्हते. कित्येक भाविक तर दुरूनच दर्शन घेऊन जात होते. काही भाविक तर मंदिराच्या मुख्य दरवाजा मागे लावण्यात आलेल्या आरशात कपालेश्वराचे दिसणाऱ्या प्रतिबिंबाचे दर्शन घेऊन परतत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांनी’ जपले रुग्णसेवेचे व्रत

$
0
0

डॉ. नूतन पहाडे यांची मधुमेह व क्षयरोगींसाठी धडपड

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

वयाच्या तेराव्या वर्षी मधुमेह झाल्यानंतर कोमात गेलेल्या परिस्थितीतून सहीसलामत परत आलेल्या आणि ५० वर्षे मधुमेहाशी झुंजणाऱ्या मनमाडच्या डॉ. नूतन पहाडे यांनी जिद्दीने मधुमेह व क्षयरोगांनी ग्रासलेल्या रुग्णांचा जीव वाचवण्याची धडपड सुरू ठेवली आहे. सोबतच वैद्यकीय क्षेत्रात व्यावसायिकता येण्याच्या काळात सोळा वर्षांआतील मुलांवर मोफत उपचार करत 'रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा' हे ब्रीद गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी जपले आहे.

मनमाड येथील डॉ. नूतन पहाडे याना वयाच्या तेराव्यावर्षी मधुमेह झाल्याचे समोर आले. ३६ तास कोमात असताना मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमधून ते सहीसलामत बाहेर पडले. मात्र जीवावरचे संकट जाताना आपण दुसऱ्यांचा जीव वाचवला पाहिजे. याचा ध्यास घेऊन त्यांनी मनमाड केंद्रात दहावीला पहिला क्रमांक मिळवण्यापासून ते एमबीबीएस होईपर्यंत त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.


सेवाभावी करुणा रुग्णालय आणि डायबेटिक सेंटर या माध्यमातून रुग्णसेवा करणाऱ्या या दीपस्तंभ डॉ. पहाडे यांचा मुंबईत डॉ. श्रीधर आजगावकर यांच्या हस्ते नुकताच गौरव करण्यात आला. आता मधुमेह झालेल्या बालकांना विशेष मार्गदर्शन केंद्र आणि त्यांच्यासाठी शिबिरे आयोजित करण्याचा संकल्प डॉ. नूतन पहाडे यांनी यावेळी सोडला आहे.


डॉ. नूतन पहाडे यांना वडील डॉक्टर आर. एल. पहाडे आणि डॉ. श्रीधर आजगावकर, डॉ. विजय आजगावकर यांचे ट्रीटमेंट आणि करिअरसाठी मार्गदर्शन त्यांना मिळाले. गेली अनेक वर्षे डॉ. नूतन पहाडे हे आपल्या क्लिनीकमध्ये सोळा वर्षांआतील मधुमेह आणि क्षयरोगाव्यतिरिक्त कोणत्याही रुग्णावर मोफत उपचार करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अग्निशमन विभागाचे अनिल महाजन गोत्यात?

$
0
0

vinod.patil@timesgroup.com

नाशिक ः अग्निशमन विभागात वादग्रस्त ठरलेले मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांच्या मनमानी कारभाराला आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी चाप लावला आहे. विनापरवानगी मुख्यालय सोडणे त्यांना आता महागात पडणार आहे. परदेश दौऱ्याच्या मंजुरीआधीच मुख्यालय सोडणे, वेळोवेळी विनापरवानगी गैरहजर राहिल्याप्रकरणी प्रशासन विभागाने त्यांची विभागीय चौकशी सुरू केली आहे. या चौकशीअंतर्गत महाजन यांना आरोपपत्रही बजावले असून, त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. या चौकशीत महाजन दोषी आढळल्यास, त्यांच्यावर थेट कारवाई होण्याची शक्यता असून, अग्निशमन दलाच्या राज्याच्या महासंचालक पदापासून त्यांना मुकावे लागणार आहे.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा कारभार नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. शहरातील बिल्डर, डॉक्टर व व्यावसायिकांची या विभागातून पिळवणूक होत असल्याचा आरोप केला जातो. या विभागाचे प्रमुख असलेल्या अनिल महाजन यांच्या अनेक तक्रारी असून, महासभा व स्थायी समितीवर ते नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. महाजन कोणालाही न जुमानता मनमानी कारभार करतात, असा आरोप केला जातो. मात्र आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्यांच्या मनमानी कारभाराला चाप लावला आहे. महाजन सध्या खासगी परदेश दौऱ्यावर असून, परदेश दौऱ्यासाठी त्यांनी आयुक्तांकडे परवानगी मागितली होती. मात्र, ही परवानगी मिळण्यापूर्वीच महाजन यांनी मुख्यालय सोडले. या संदर्भातील कोणतीही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली नाही. रजा मंजूर न होताच त्यांनी मुख्यालय सोडत परदेशवारी सुरू केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. वेळोवेळी विनापरवानगी गैरहजर राहत असल्याचेही आयुक्तांच्या निदर्शनास आले असून, त्यांनी महाजन यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रशासन उपायुक्तांनी त्यांची चौकशी सुरू केली असून, त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

संचालकपदावर पाणी?

अनिल महाजन सध्या बढतीच्या प्रतीक्षेत असून, राज्य अग्निशमन दलाच्या राज्य संचालकपदावर त्यांची बढती होऊ शकते. त्यासाठी ते पात्रही आहेत. मात्र, एखाद्या अधिकाऱ्याची विभागीय चौकशी सुरू असताना त्यांना बढती दिली जात नाही. त्यामुळे संचालकपदापासून महाजन यांना दूर राहावे लागू शकते. या प्रकरणात ते दोषी आढळल्यास त्यांच्या बढतीसोबत वेतनवाढही रोखली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरगाण्यात भीषण पाणीटंचाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, अमृतधाम

राज्यासह नाशिक जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. त्याचा परिणाम सुरगाणा तालुक्याच्या पश्चिम भागातील भेणशेत येथील आदिवासी बांधवांनाही जाणवत आहे. या बांधवांना पाण्यासाठी तब्बल तीन किलोमीटर अंतरावरून पायपीट करावी लागत आहे. याबाबत टँकरने पाणीपुरवठा करावा असे निवेदन मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच स्थानिकांनी संबंधितांना दिले होते. मात्र त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. उलट आता मे महिऩ्यात परिस्थिती आणखी गंभीर झाल्याने स्थानिकांची पाण्यासाठी वणवण होत आहे.

एकीकडे जलयुक्तच्या कामांचा चांगला परिणाम होत आहे. मात्र सुरगाणा तालुक्यातील भेणशेत भागात मात्र पाणीटंचाई तीव्र झाली असूनही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. याकडे तातडीने लक्ष देत पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा व्हावा, याची मागणीही स्थानिकांनी केली आहे.

सुरगाणा तालुक्यातील भेणशेत या गावाची लोकसंख्या साडेतीनशे असून, येथील आदिवासी बांधवांना दरवर्षीच मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवते. मागील वर्षी या गावाला सरकारतर्फे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र यावर्षी अद्याप काहीही हालचाल नसल्याने नागरिकांची होरपळ होत आहे.

अशीच पाणीटंचाई परिसरातील घाणीचा पाडा व खडकी या गावांनाही जाणवते. त्यामुळे लवकरात लवकर या भागात पाण्याचे टँकर पुरवावेत, अशी मागणी वसंत पवार, लक्ष्मण वड, रमेश वड, प्रभाकर भोंड, लक्ष्मण खुरकूटे, जयराम खुरकूटे, पंडित भोये यांनी सुरगाणा तहसीलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदन देऊनही दुर्लक्ष

भेणशेतवासीयांनी पाणीपुरवठ्यासाठी मार्च महिन्यात गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिले होते. त्यांची अद्यापही दखल घेतली नसल्याने ग्रामस्थ तीव्र पाणीटंचाईचा सामना करित आहेत. या भागात पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत असून पाणी लवकरात लवकर पुरवावे, अशी मागणी करूनही या मागणीला वाटाण्याच्या अक्षता दिल्या जात असल्याचेच चित्र दिसत आहे.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र सुरगााणा तालुक्यातील या आदिवासी भागात पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. आदिवासी बांधवांना पाण्यासाठी दाहीदिशा वणवण करावी लागत आहे. त्यामुळे सरकारने याकडे गंभीरतेने लक्ष देणे आवश्य‌क आहे, असा सूर उमटत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

यंदाच्या दुष्काळाचा मुकाबला करताना भीषण पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस सातत्याने जिल्ह्यातील नागरिकांना भेड़सावत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी शासकीय निधीतून अंदरसूल शिवारातील कोळगंगा नदीपात्रातील गाळ काढ़ण्याच्या मागणीसाठी माजी उपसरपंच बद्रीनाथ कोल्हे व रामनाथ घोड़के यांनी उपोषण सुरू केले होते. हे उपोषण ग्रामपंचायतच्या लेखी आश्वासनाने बुधवारी रात्री उशिरा मागे घेण्यात आले.

येवला तालुक्यातील अंदरसूल गावासोबत इतर पाच ते सहा गावांसाठी संजीवनी ठरणारी कोळगंगा नदीपात्रातील तसेच नदीवरील बंधाऱ्यातील गाळ जेसीबी मशीनद्वारे काढण्यात आल्यास पाणी साठ्यात वाढ होणार आहे. यामुळे अंदरसूल गावासोबत परिसराला पिण्याचे पाणी व सिंचनासाठी मदत होणार असल्याचे मत उपोषणकर्त्यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केले.


सायंकाळी उशिरा ग्रामसेवक सचिन पवार यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधत उपविभागीय कार्यालयाने या कामासाठी त्वरीत पन्नास हजार रुपयांचा निधी देणार असल्याचे सूचित केले. तसेच अतिरिक्त निधीसाठी ग्रामपंचायत प्रयत्न करणार असल्याचे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना दिल्यांनंतर हे उपोषण मागे घेण्यात आले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images