Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शेततळ्यांद्वारे पाणीटंचाईवर मात

$
0
0

निफाड तालुक्यात २८७ शेततळ्यांचे काम पूर्ण; २,१५३ अर्ज प्रतीक्षेत

म. टा. वृत्तसेवा, निफाड

बागायती शेतीसाठी प्रसिद्ध निफाड तालुक्यात गेल्या ५ वर्षांपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत आहे. त्यावर आता येथील शेतकऱ्यांनी शेततळे हा परिणामकारक पर्याय वापरत पाणीटंचाईवर मात केली आहे. तालुक्यात सद्यस्थितीत २८७ शेततळ्यांचे काम झालेले असून राज्य सरकारकडे एकूण २,१५३ शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज केले आहे. त्यामुळे शेततळ्यांना मिळणारा प्रतिसाद उल्लेखनीय असल्याने पाणीटंचाईवर याने एक चांगला उपाय समोर आला आहे.
या शेततळ्यांना सरकारी अनुदान असल्याने शेतकऱ्यांचा कल तिकडे वाढला आहे. निफाड तालुक्यात आतापर्यंत २८७ शेततळ्यांचे काम पूर्ण होऊन त्याचा लाभ शेतकरी घेत आहेत. दुसरीकडे गेल्या ४ वर्षांपासून सरकारने त्यासाठी असणारे अनुदान बंद केले होते. यावर काही शेतकऱ्यांनी वैयक्तिक खर्चाने शेततळे केले होते. मात्र या वर्षापासून राज्य सरकारने 'मागेल त्याला शेततळे' ही घोषणा केल्याने २,१५३ शेतकऱ्यांनी त्यासाठी अर्ज केले आहेत. त्यामध्ये १,५६८ अर्ज ऑनलाइन तर कृषि विभागाकडे सामूहिक शेततळे योजनेसाठी २८५ अर्ज प्राप्त झाले आहेत. फळबागांना जीवदान असणाऱ्या या शेततळ्यांचे प्रमाण तालुक्यात वाढले असून विशेष करुन तालुक्याच्या उत्तर पट्टयात जास्त शेततळी आहेत. त्या खालोखाल पश्चिम भागात आहे, मात्र गोदावरी नदी भागात एक किंवा दोन गावे सोडल्यास अद्याप शेततळे दिसत नाही.


शेततळे उपयुक्त पर्याय

निफाड तालुक्यातील खडक माळेगाव, उगाव, शिवडी, खेडे, वनसगाव आदि उत्तर भागातील गावांमधे याचा फायदा मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. त्यामुळे या भागातील द्राक्ष बागा जगल्या व त्यातून उत्पादनही मिळालेले आहे. सद्यस्थितीत पाण्याची जाणवणारी कमतरता आणि भविष्यातील संभाव्य टंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांनी शेततळे हा उपयुक्त पर्याय स्वीकारल्याचे निफाड तालुक्यात होत असलेल्या निर्मितीतून समोर येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वुमेन ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी पराभूत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेषा असोसिएट्सतर्फे स्वामीनारायण मंदिरात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत गुरुवारी पाचव्या फेरीत महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णीला आंतरराष्ट्रीय मास्टर श्रीनाथने पराभवाचा धक्का दिला, तर पवन दोडेजाने ग्रँडमास्टर शार्दूल गागरेला बरोबरीत रोखल्याने स्पर्धेची रंगत वाढली आहे. स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंनीही चमकदार कामगिरी केली असून, वेदान्त पिंपळखरे याने पुण्याचे पद्मनाभ मेनन याचा पराभव केला.

पाचव्या फेरीअखेर ग्रँडमास्टर गागरे, आंतरराष्ट्रीय मास्टर समीर कठमाळे, श्रीनाथ, पवन दोडेजा, फिडे मास्टर निलेश बेलूरकर, विनयकुमार, वेदान्त पिंपळखरे, दिलीप पागे चार गुणांसह संयुक्तरीत्या आघाडीवर आहेत.

अमरावातीच्या दोडेजाने ग्रँडमास्टर गागरेविरुद्ध पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना फ्रेंच डिफेन्सचा अवलंब केला. मात्र, प्रमुख मोहऱ्यांची अदलाबदल झाल्यानंतर मध्यस्थितीत दोघांनाही कुरघोडीची संधी मिळू शकली नाही. अखेरीस डाव बरोबरीत सुटला. महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी व आंतरराष्ट्रीय मास्टर श्रीनाथ यांच्यातील लढत चुरशीची झाली. मात्र, श्रीनाथसमोर तिचा निभाव लागला नाही.

चौथ्या फेरीच्या उद््घाटनासाठी मुंबई इंडियन्सचे फिजिओथेरपिस्ट डॉ. वैभव महाजन, खो-खो प्रशिक्षक उमेश आट‍वणे, विजय पाटील, यलो इंडियाचे निशिकांत गिते प्रमुख पाहुणे होते. या वेळी खो-खोचा खेळाडू स्वप्निल चिकणे, हेमलता गायकवाड, तलवारबाजीचा खेळाडू दिग्विजय सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. बुद्धिबळ प्रशिक्षक सुनील शर्मा, तारे यांनी स्पर्धेला भेट दिली. अर्चना कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचा गौरव केला. रसिका रत्नपारखी, अभिषेक देशपांडे, हेमंत चौरे, देवेंद्र लहाने, विजय चाकोते, सोहा व युगा कुलकर्णी सहकार्य करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावनांना मूर्त करण्याचे काम चित्र करते

$
0
0

शर्वरी लथ यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कलेला कुठल्याही वयाचे बंधन नसते. कला ही उपजत असते. तिचे शास्त्रशुध्द शिक्षण घेतलेच पाहिजे असेही नाही. मनात असलेल्या भावनांना मूर्त स्वरूप देण्याचे काम कला करीत असते. नाशिकमधील तीन अवलिया चित्रकारांनी जी चित्रं आणि काष्ठशिल्प सादर केली आहेत त्याला तोड नाही. त्यांच्या कलेतून मेहनत स्पष्ट होते. त्यांची कला भविष्यात जास्तीत जास्त बहरत जावो, असे प्रतिपादन फ्रावशी ग्रुप ऑफ स्कुल्सच्या उपाध्यक्षा शर्वरी लथ यांनी केले.

कुसुमाग्रज स्मारकातील छंदोमयी दालनात 'अभिनव चित्रकला, शिल्पकला' प्रदर्शनाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. नाशिकच्या तीन कलाकारांनी एकत्र येऊन या चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन २० ते २२ मे या कालावधीत कुसुमाग्रज स्मारकात सुरू असून, सकाळी ११ ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रेक्षकांसाठी खुले रहाणार आहे.

या प्रदर्शनात लमुवेल म्हस्के, सुरेश (रिचर्ड) सोनवणे आणि अरुण जाधव यांच्या चित्रांचा समावेश आहे. सुरेश सोनवणे यांनी अत्यंत अभिनव पध्दतीने चित्र रेखाटली आहेत. निर्सगातल्या अनेक गोष्टी त्यांनी मॉडर्न आणि पारंपरिक पध्दतीने साकारल्या आहेत. कागदावर पडलेल्या शाईच्या डागातून तयार होणाऱ्या कलाकृतींना त्यांनी वास्तव मूर्त स्वरूप देऊन त्या एनलार्ज केल्या आहेत. मोठ्या चित्रांबरोबरच त्यांनी पडलेला डागदेखील प्रेक्षकांना पाहण्यासाठी ठेवला आहे.

निसर्गचित्रणात त्यांनी केरळचा निसर्गरम्य परिसर आपल्या कुंचल्याद्वारे चित्रबध्द केला आहे. त्याच प्रमाणे तांडा, ताल व लय, विविध प्रकारचे पक्षी, सीडीचे रिफ्लेक्शन, हॉर्स युनिटी, मिरर इफेक्ट अशी अनेक चित्रे नाईफवर्क पेंटिंग, पोस्टर कलर, हार्डबोर्ड सनमायका, अॅक्रेलिक, वॉटर कलर या माध्यमातून साकारले आहेत. त्याचप्रमाणे आंब्याच्या कोयीपासून विविध मुखवटे तयार केले आहेत. दुसरे चित्रकार अरूण जाधव यांनी विविध प्रकारच्या जाळीच्या पानावर चित्रं रेखाटली आहे. यात अष्टविनायक, सरस्वती, साईबाबा, स्वामी समर्थ अशी अनेक देवदेवतांची चित्रे आहेत. त्याच प्रमाणे जंगलात फिरताना सापडलेले काष्ठ जमा करून त्यातील विविध आकार शोधून त्यांना मूर्त स्वरूप दिले आहे. यात तलावातील लाकूड, नारळापासून बनवलेला कमंडलू, डायनासोर, डान्सिंग बॉल इत्यादींचा समावेश आहे. तिसरे चित्रकार लुमवेल म्हस्के यांनी अत्यंत दुर्मिळ होत असलेला स्टीपलिंग आर्ट हा चित्रकलेतील प्रकार सादर केला आहे. या प्रकारात बिंदूच्या सहाय्याने चित्र काढली जातात. अत्यंत वेळ लागणार हा प्रकार असून गोदाघाट, मदर, गवाक्षातील ललना अशा अनेक चित्रांचा समावेश आहे. या प्रदर्शनात विविध शैलीतील चित्रांबरोबरच शिल्पांचा देखील समावेश आहे. जास्तीत जास्त नाशिककरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन तीनही चित्रकारांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांची’ही वाटचाल प्रगतीच्या दिशेने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षणाचा अभाव, पुरेशा संधींची कमतरता व योग्य मार्गदर्शन नसणे यामुळे आदिवासी, ग्रामीण भागातील अनेक मुले-मुली प्रगतीच्या दृष्टीने मागे पडत असल्याचे दिसून येते. या मुलामुलींनाही स्वतःचे जीवन समृद्ध करण्यासाठी योग्य मार्गदर्शन, दिशा मिळावी या उद्देशाने श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानच्यावतीने विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ स्किल मॅनेजमेंट हे मोफत ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे. विविध व्यावसायिक अभ्यासक्रम अशा मुलामुलींसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

आदिवासी भागांमध्ये रोजगाराचा प्रश्न बिकट असतो. काम करण्याची तयारी असली, तरी रोजगार मिळविण्यासाठी त्यांना सतत धडपड करावी लागते. या परिस्थितीवर मात करायची असेल तर काहीतरी वेगळ्या अभ्यासक्रमाचे ज्ञान जवळ असणे आवश्यक आहे. हे ज्ञान मिळवून त्यांना त्यांच्या जीवनाचा एक नवा पैलू उलगडता यावा, यासाठी संस्थानने विविध कोर्सेस सुरू केले आहेत. त्र्यंबकेश्वर येथील पेगलवाडीत एशिया फिच ग्रुपने, उद्योग जगतातील सामाजिक उत्तरदायित्त्व म्हणून संस्थानच्या सहकार्याने हे मॉडेल ट्रेनिंग स्कूल उभारले आहे.

जून महिन्यात प्रवेश

जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात या अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यातील काही अभ्यासक्रमांसाठी दहावी-बारावी उत्तीर्ण असण्याची मर्यादा आहे, तर काही अभ्यासक्रमांसाठी शिक्षणाची कोणतीही अट नाही. या मुला-मुलींना योग्यप्रकारे मार्गदर्शन करून ते स्वतःला सिद्ध करू शकतील, यासाठी या उपक्रमामार्फत प्रयत्न केला जाणार असल्याचे संस्थानच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे.

कोणते अभ्यासक्रम उपलब्ध

रोजगार वा व्यवसायासाठी आवश्यक असणारी तंत्रशिक्षणाची आवश्यकता लक्षात घेता या सेंटरमध्ये आदिवासी व ग्रामीण मुला-मुलींसाठी टर्नर, फिटर, वेल्डर, टू व्हिलर, फोर व्हिलर रिपेरिंग, एसी मॅकेनिक, इलेक्ट्रीक, सुतारकाम, टेलरिंग, सिक्युरिटी गार्ड, वायरमन, फॅशन डिझायनिंगस, शिलाई, इमिटेशन ज्वेलरी, कम्प्युटर प्रशिक्षण आदी कोर्सचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे. हे सर्व अभ्यासक्रम राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेमार्फत मंजूर करण्यात आले आहे.

आज शुभारंभ

या अभ्यासक्रमाचे शिक्षण विद्यार्थ्यांना घेता यावे, यासाठी पेगलवाडी येथे इमारत साकारण्यात आली आहे. आज (दि.२०) एशिया फिच ग्रुपचे सीएसआर हेड सतीश नायर यांची प्रमुख उपस्थिती यावेळी असणार आहे. विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ स्किल मॅनेजमेंट, त्र्यंबकेश्वर-घोटी मार्ग, पेगलवाडी, त्र्यंबकेश्वर येथे शुभारंभ सोहळा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विचारांची शक्ती संपते, तेथून जादू सुरू होते

$
0
0

जादूचे प्रयोग आजही सर्वांसाठी कुतूहलाचे ठरतात. अनेक रिअॅलिटी शो, व्हिडिओ गेमसारखी मनोरंजनाची साधने असतानाही जादू म्हटले की, त्या कडे सर्वजण वेगळ्याच दृष्टीने पाहतात. जादूचा प्रयोग कोठेही असला, तरी हाउसफुल्ल होतो. कारण, या कलेला मोठा लोकाश्रय मिळालेला आहे. जादुगार रघुवीर हे त्यातले प्रसिद्ध नाव. सध्या रघुवीर घराण्याचे तिसरे नायक जितेंद्र रघुवीर आपल्या आजोबांची खुर्ची सांभाळताहेत. आज, शनिवार (दि. २१) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात त्यांचा जादूचा प्रयोग होणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत... जादू या कलेविषयी काय वाटते? भारतात केवळ क्रिकेटला राजाश्रय आहे. अन्य खेळांसह कलांकडे साफ दुर्लक्ष झालेले आहे. जादू ही अभिजात कला असून, तिचे जतन होणे गरजेचे आहे. लोकाश्रय मात्र प्रचंड असल्याने कलेचा आजवर विकास झाला आहे. कला वाढविण्यासाठी आपण शिकवत असून, आजोबांच्या नावे पारितोषिके ठेवली आहेत. जादूकडे लोक कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात? जादूला प्रचंड लोकाश्रय मिळालेला आहे. दर वर्षी १७० ते २०० प्रयोग होतात. माझे परदेशांतही दौरे होतात. जादूवर आधारित चित्रपट चालले नाहीत. मात्र, जादूचे प्रयोग मात्र तुफान चालतात. जादू ही लोकांवर प्रभाव पाडणारी असते. तात्पुरते का होईना त्याचे गारुड लोकांवर होते. त्यामुळे त्याचा जनमानसावर अनुकूल परिणाम होतो. मनोरंजन हा जादूचा सर्वात मोठा गुण आहे. लहान बालकापासून तर वृद्धांपर्यंत सर्वांनाच जादू अचंबित करते. त्यामुळे लोकांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कुतूहलाचा आहे. रूमालातून कबूतर बाहेर येणे किंवा खिशातून रंगबेरंगी माळा बाहेर येणे हे लोकांना आवडते. त्यानुसार मी वर्क करतो आणि म्हणूनच माझे प्रयोग सक्सेस होतात. हातचलाखी की चमत्कार, याचा निवाडा कसा करता? जादू ही शंभर टक्के हातचलाखी आहे. परंतु, बऱ्याचदा तिला चमत्काराचे स्वरूप येते. असे का व्हावे? तर असंख्य लोकांवर चमत्काराचा प्रचंड पगडा आहे. त्यातून त्यांना सहजासहजी बाहेर काढणे अवघड असते. परंतु, आम्ही सांगतो की जादू म्हणजे १०० टक्के हातचलाखी. जादूसाठी शिक्षण घ्यावे लागते का? या कलेचा आमच्याकडे समृद्ध वारसा आहे. गेल्या ७५ वर्षांमध्ये २७ देशांमध्ये आमचे जादूचे प्रयोग झालेले आहेत. आजकाल टीव्हीचे वेड लागलेले असतानाही आमच्या शोला प्रचंड गर्दी असते. लोकांना हे शो भावतात, त्यामुळे ते हे शो स्वीकारतात. प्रयोगांना मिळणारा प्रतिसादही चांगला आहे. मी बी. ई. व मास्टर इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग या पदव्या घेतलेल्या आहेत. मात्र, जादूचे शिक्षण आजोबांकडूनच आले. टाटा ऑटोमोटिव्हमधील व्यवस्थापकाची नोकरी सोडून मी पिढीजात जादूच्या प्रयोगाकडे वळलोय. जादूच्या इतर अंगांविषयी काय सांगाल? प्रयोगांमध्ये ताजेपणा येण्यासाठी वेगवेगळे 'प्रयोग' करावे लागतात. तीन-चार मोठे आभास लहान-मोठ्या ट्रिक्स आलटून पालटून घेतल्या जातात. विचारांची शक्ती संपते तेथून जादू सुरू होते. त्यामुळे जुने प्रयोग नव्या पद्धतीने सुरू केले जातात. लोकांना नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न असतो. आभास, संगीत, प्रकाशयोजना यात नाविन्य आणून मनोरंजन केले जाते. त्यामुळे रसिकांना फ्रेश वाटते. कार्यक्रमामधील प्रयोगांविषयी काय सांगाल? लोकांना आकर्षित करण्यासाठी नवे प्रयोग आवश्यक असतात. फ्लाइंग बॉक्स, व्ही सेक्शन, आफ्रिकन वुडू, व्हर्टिकल कटिंग, ट्यूब झॅक यांसारखे नवे प्रयोग आणले आहेत. जादू प्रयोगातले तंत्र काही जण समोर आणताहेत त्याविषयी सांगा? याचा परिणाम उलटा झाला आहे. टीव्ही चॅनल्सवरील कार्यक्रम पाहून प्रयोगांना गर्दी वाढली आहे. जादूचे प्रयोग करताना कोणते तंत्रज्ञान वापरात येते हे पाहण्याची उत्सुकता ताणली जात आहे. यात्रा अथवा चॅरिटी शो उघड्यावर होतात, तेव्हा तंत्रज्ञानाचा वापर कसा करणार? त्यामुळे प्रयोगाला जास्त लोक येतात. (शब्दांकन : प्रशांत भरवीरकर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी आत्महत्येवर कर्जमाफी उपाय नव्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

शेतकरी आत्महत्येवर कर्जमाफी हा उपाय नाही. पाणी, वीज आणि शेतीमालाला हमीभाव दिल्यास शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही, असे प्रतिपादन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेतर्फे जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या ८८ शेतकऱ्यांच्या वारसांना २५ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश वाटपाचा कार्यक्रम बँकेच्या जेलरोड शाखेत झाला. त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते.

सहकार मंत्री पाटील म्हणाले, की नाशिकरोड बॅँकांसारख्या संस्था आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला पुढे येत आहेत. सरकारचेही प्रयत्न सुरू आहेत. मात्र, निधी उभारून किंवा कर्जमाफीने प्रश्न सुटणार नाहीत. शेतकऱ्याला कर्ज काढावे लागणार नाही यासाठी प्रयत्न हवेत. जलयुक्त शिवार, ठिबक सिंचन, सोलर पंप हे उपाय सरकार करत आहे. पाणी व वीज उपलब्ध करायला हवी, शेतीमालाला योग्य हमी भाव द्यायला हवा. मध्यस्थांचे उच्चाटन करायला हवे. त्याशिवाय, शेती फायद्यात येणार नाही. पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी जलसिंचन केले नाही म्हणूनच या आत्महत्या होत आहेत.

सहकार राज्दायमंत्री दादा भुसे म्हणाले, की शेतकरी आत्महत्या होऊ नये म्हणून सरकार अनेक उपाययोजना करीत आहेत. शेतकऱ्यांना पाणी दिले तर तो स्वावलंबी होईल. सहकारासारख्या पवित्र क्षेत्राला पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी अपवित्र केले आहे. ते स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. खासदार हेमंत गोडसे, लालचंद जैन यांनीही मनोगत व्यक्त केले. स्मिता दीक्षित यांनी सूत्रसंचलन केले. सुधाकर जाधव यांनी आभार मानले. दलालांना दूर करा! खासदार राऊत म्हणाले, की धान्याची कोठारी भरली असताना, धान्य निर्यात होत असताना शेतकरी आत्महत्या होत आहेत. आत्महत्या ही वेदना आहे. ज्यांनी ६५ वर्षे राज्य केले ते शेतकरी आत्महत्येला जास्त जबाबदार आहेत. भूक सैतानाला जन्म देते. दिल्लीत मोठ्या हॉटेलात कांदाभजी साडेचारशे रुपये प्लेट विकली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळत नाहीत. त्यामुळे मध्यस्थांना दूर करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. तरच शेतकऱ्यांना बरे दिवस येतील.

`त्याला` बाळाचीही आठवण झाली नाही

बागलाण तालुक्यातील कल्याणी शाम ठाकरे या शेतकरी विधवेच्या प्रतिक्रियेने उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले. त्या म्हणाल्या, की नऊ लाखाचे कर्ज आणि लहान बाळ मागे ठेऊन उच्चशिक्षित पतीने आत्महत्या केली. त्याला सप्तपदी आणि वचनांचीही आठवण झाली नाही. दुडू दुडू धावणाऱ्या बाळाचीही आठवण झाली नाही.

खासदार संजय राऊत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सहकार राज्य मंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सुधाकर जाधव, सुरेशबाबा पाटील,अजय ब्रम्हेचा, भास्कर कोठावदे, लालचंद जैन, त्र्यंबकराव गायकवाड व संचालक व्यासपीठावर होते. ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे व अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी प्रास्तविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढिम्म व्यवस्थेपर्यंत पोहोचला आवाज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक दैनंदिन आयुष्य जगत असताना अनेक समस्यांना समोरे जावे लागते. या समस्या मांडण्यासाठी संबंधित यंत्रणेशी थेट पत्रव्यवहार, तक्रारी करता येतीलच याची खात्री नसते. त्यातही या तक्रारींची दखल घेतली जाईलच असेही नाही. 'महाराष्ट्र टाइम्स'ने एका क्लिकवर समस्या मांडण्याची आणि ती संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचवण्याची सोय अॅपच्या माध्यमातून करून दिल्याने सामान्यांचा आवाज अधिक खणखणीतपणे यंत्रणेपर्यंत पोहोचत आहे. यातील काही तक्रारींची तडही लागली आहे. त्यामुळे या व्यासपीठाबद्दल सिटीझन रिपोर्टरनाही अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या माध्यमातून अधिकाधिक समस्या सुटाव्यात हा आशावादही त्यांनी मांडला. समाजातील विविध घटकांना आपले प्रश्न मांडण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे सुरू करण्यात आलेल्या 'मटा सिटीझन रिपोर्टर अॅप' उपक्रमात सहभागी होऊन समस्या मांडणाऱ्या तीन सिटीझन रिपोर्टरचा सन्मान करण्यात आला. त्यात योगेश सोनवणे, प्रफुल्ल देकाटे आणि मयूर विभांडिक यांचा समावेश आहे. देकाटे यांच्या अनुपस्थितीत त्यांचे मित्र रमेश मेखे यांनी प्रशस्तीपत्रक स्विकारले. शुक्रवारी 'मटा' कार्यालयात निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन या सिटीझन रिपोर्टरचा गौरव करण्यात आला. गोदावरी परिचय उद्यानातील समस्या मी या अॅपद्वारे पाठवली. तेथे झाडांना पेव्हर ब्लॉकचा विळखा पडला आहे. ही समस्या गंभीर आहे. त्याला वाचा फोडण्याची संधी मला मिळाली. - योगेश सोनवणे गोल्फ क्लब येथील ग्रीन जिमच्या साहित्याची दुरवस्था माझे मित्र देकाटे यांनी मांडली. ग्रीन जिम ही लोकांसाठीच आहे. पण, त्याची अशी दुरवस्था होणे अत्यंत वाईट आहे. 'मटा'ने हा उपक्रम सुरू करून सर्वसामान्यांना मोठी संधी दिली आहे. - रमेश मेखे निमाणी येथील बस स्टँडमध्ये निवारा शेड उभे केले आहे. पण ते शोभेसाठीच आहे. ऊन आणि पावसात प्रवाशांना उबे रहावे लागते. इतका मोठा खर्च केला तो कशासाठी? - मयूर विभांडिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नालेसफाईसाठी १५ दिवसांची मुदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक नाल्यांमधील सांडपाण्याचा तातडीने निचरा व्हावा तसेच ऐन पावसाळ्यात अस्वच्छता आणि रोगराई वाढू नये यासाठी नगरपालिका व महापालिका क्षेत्रामध्ये तातडीने नालेसफाईची कामे सुरू करा. १५ दिवसांत ही कामे पूर्ण करून त्याचा संयुक्त अहवाल मुख्य अधिकारी आणि कार्यकारी अभियंत्यांनी जुनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालयाची आपत्ती व्यवस्थापन शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मान्सून पूर्व तयारी २०१६ आढावा बैठक व एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या बैठकीत सरकारी यंत्रणेतील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी अपर ‌जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, नितीन मुंडावरे, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत मोहिते, एनडीएचे डेप्युटी कमांडंट आलोक कुमार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांसह विविध विभागांचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते. राधाकृष्णन म्हणाले, की 'पावसाळयात येऊ शकणाऱ्या आपत्तींचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे लागेल. पूरसदृश्य परिस्थितीमध्ये झाडे कोसळणे, वादळी वाऱ्यामुळे उदभवणाऱ्या कोणत्याही आपत्तीबाबत सर्वप्रथम वरिष्ठांना कळविणे अपेक्षित आहे. सुस्थितीत नसलेल्या पाझर तलावांची गावनिहाय यादी दोन दिवसांत तयार करा. आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करावी असे आदेश त्यांनी तहसिलदारांना दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापनासंबधी आराखडा अद्ययावत करताना त्यासाठीचे सूक्ष्म नियोजन करावे. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषिसहाय्यकांनी मुख्यालय सोडू नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. आलोककुमार यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि एनडीआरएफविषयी माहिती दिली. पूर्वतयारी, समाजाची आपत्तीशी लढण्याची क्षमता वाढविणे आणि आपत्तीच्यावेळी तात्काळ प्रतिसाद अशा तीन स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य करावे लागते, असे त्यांनी सांगितले. खेडकर यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेविषयी माहिती दिली. तालुकास्तरावर एक जूनपासून २४ तास सुरू असणारे नियंत्रण कक्ष स्थापित करावे, क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण तहसीलदार आणि गट विकास अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे घ्यावे, स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींशी आपत्ती व्यवस्थापनाबाबत चर्चा करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. तत्काळ प्रतिसाद, शून्य मनुष्यहानी! पुरसदृश्य परिस्थितीमूळे कोणतीही मोठी आपत्ती उदभवली तरीही त्यात कोणतीही जीवितहानी होणार नाही, याची काळजी प्रशासनाला घ्यावी लागेल. 'तत्काळ प्रतिसाद आणि शुन्य मनुष्यहानी हे आपले उद्दिष्टे असून, त्यासाठी प्रत्येकाने झोकून देऊन काम करायला हवे, असे आवाहन राधाकृष्णन यांनी केले. पावसाळ्यात मोबाईल नेटवर्कसारख्या संपर्क यंत्रणा कोलमडण्याची शक्यता असते. मात्र अशा तांत्रिक त्रुटींमूळे संवाद थांबायला नको याची पुरेपूर दक्षता घ्या. तालुक्यांमध्येही आपत्ती व्यवस्थापनासाठी टोल फ्री क्रमांक सुरू करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ग्रीन रिव्होलेशन’चा पुढाकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर निर्सगाला वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसत आहे. यात ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी ग्रीन रिव्होलेशन ग्रुपच्या वतीने पुढाकार घेऊन चुंचाळे शिवारातील डोंगरावर दहा हजार वृक्षांचे रोपण केले जाणार आहे. यासाठी शहरासह सातपूर भागातील सर्व क्षेत्रांतील डॉक्टरांचे सहकार्य लाभले आहे. महिन्याच्या दर शनिवारी व रविवारी डॉक्टर व त्यांचे कुटुंबीय चुंचाळेच्या डोंगरावर हातात टिकाव, फावडे घेत खड्डे खोदण्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून करीत आहेत. साडेतीन हजार खड्डे खोदले गेले असून, पावसाळ्याच्या आत पाच हजार खड्डे खोदण्याचे उद्दिष्ट असल्याचे डॉ. क्रांतीकुमार म्हसदे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. सामाजिक भावनेतून आपलाही पर्यावरणाचे जतन करण्यासाठी सहभाग असावा म्हणून डोंगरावर वनराई साकारण्याचे डॉक्टरांनी एकत्रित येऊन ठरविले असल्याचे डॉ. म्हसदे यांनी सांगितले. आपल्या रुग्णांना नेहमीच आरोग्य सांभाळण्यासाठी व्यायमाचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरांनीच ग्रीन रिव्होलेशन नावाने ग्रुप तयार करत वनराई उभारण्याचे काम हाती घेतले आहे. सातपूर भागातील सर्व डॉक्टरांनी एकत्रित येत ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी चुंचाळे शिवारातील डोंगरावर दहा हजार वृक्षांची लागवड करत वनराई साकारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. डॉक्टरांच्या कामाबाबत ज्यांना माहिती मिळाली तेदेखील या उपक्रमात सहभागी झाले आहेत. सुरुवातील पाच डॉक्टरांनी सुरू केलेल्या ग्रीन रिव्होलेशन ग्रुपची सदस्यसंख्या आता दोनशेच्या वर पोहोचली आहे. यामध्ये डॉक्टरांसह शिक्षक, सामाजिक संस्था व सर्वसामान्य नागरिकदेखील खड्डे खोदण्यासाठी सहभागी होत आहेत. केवळ सामाजिक भावनेतून चुंचाळे डोंगरावर वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. पावसाळ्याच्या अगोदर पाच हजार खड्डे खोदण्याचा संकल्प केला असून, साडेतीन हजार खड्डे खोदले गेल्याचे डॉ. म्हसदे यांनी सांगितले. वृक्षांची मदत काही सामाजिक संस्था, तसेच वन विभागदेखील करणार आहे. वड, लिंब, चिंच, पिंपळ व इतर वृक्षांची लागवड पहिल्या पावसानंतर करण्याचे ठरविले आहे. ज्यांना ग्रीन रिव्होलेशन ग्रुपमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी शनिवारी चुंचाळे शिवारातील महापालिकेच्या घरकुल योजनेच्या बाजूला असलेल्या डोंगरावर सकाळी सहा वाजता यावे, असे आवाहन डॉ. म्हसदे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सा‍ळवे, गायकवाड, घुगे भाजपमध्ये दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा नाशिकरोडमधील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही लोकप्रतिनिधी व काही शिवसैनिकांनी शुक्रवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. नाशिकरोड शहरातील प्रभाग क्रमांक ५७ चे काँग्रेसचे नगरसेवक कन्हैय्या साळवे, प्रभाग क्रमांक ५९ च्या मनसेच्या नगरसेविका संगीता गायकवाड यांचे पती व शिखर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व व्यापारी बँकेचे संचालक हेमंत गायकवाड, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थचे संचालक प्रकाश घुगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अतुल धनवटे आदींचा भाजपात प्रवेश केलेल्यांत समावेश आहे. त्यांच्यासोबत शंभरच्यावर शिवसैनिकांनीही भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या सर्वांचे स्वागत केले. यावेळी नाशिकचे आमदार व भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, नगरसेवक संभाजी मोरुस्कर, नाशिकरोड भाजपाध्यक्ष बाजीराव भागवत, सुनील आडके आदी पदाधिकारी उपस्थित होते. घोलपांवर शरसंधान आपण देवळालीचे माजी आमदार व माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या पाठिशी शेकडो कार्यकर्त्यांना घेवून उभे राहिलो. पण त्यांनी आमच्या कामाची कदर न करता कायमच प्रामाणिक शिवसैनिकांची उपेक्षा केली, असा आरोप व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे संचालक प्रकाश घुगे यांनी केला. दरम्यान, प्रकाश घुगे यांची नाशिक शहराच्या उपाध्यक्षपदी पुनर्वसन करण्यात आल्याची माहिती आमदार बाळासाहेब सानप यांनी दिली. साळवेंचे पक्षप्रवेशाचे वर्तुळ पूर्ण नगरसेवक कन्हैय्या साळवे यांनी शुक्रवारी भाजपात प्रवेश केल्याने त्यांचे पक्ष प्रवेशाचे वर्तुळ अखेरीस पूर्ण झाले. मूळचे भाजपच्या कोषात घडलेले साळवे यांनी काँग्रेस, शिवसेना पुन्हा काँग्रेस असा राजकीय प्रवास करून आता ते पुन्हा भाजपात परतले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदेशीर होर्डिंग्जकडे सोयीस्कर दुर्लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड नाशिकरोडचे बेकायदेशीर होर्डिंग्ज हटविण्याची इच्छाशक्ती महापालिकेकडे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बेकायदेशीर होर्डिंग्ज लावणाऱ्यांना त्यांनी एकप्रकारे प्रोत्साहनच दिले आहे. गुरुवारी असे होर्डिंग्ज तातडीने हटविण्यात येतील, असे स्पष्टीकरण देणाऱ्या विभागीय अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीही कारवाई न केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बेकायदेशीर होर्डिंग्जकडे सोयीस्कर दुर्लक्षाचा आरोप नागरिकांकडून होत असून, संबंधितांवर काय कारवाई होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. बेकायदेशीर होर्डिंग्ज लावणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आदेश महापालिका स्थायी समितीचे सभापती आणि मनसेचे नेते सलीम शेख यांनी दिले आहेत. विभागीय अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली नाही, तर त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. तथापि, नाशिकरोड येथे त्यांच्याच पक्षाच्या जिल्हा सरचिटणीसाने वाढदिवसानिमित्त जेलरोडपासून बिटको चौकापर्यंत होर्डिंग्ज लावले. ते दुसऱ्या दिवशीही कायम होते. त्यामुळे सभापतीच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याची आणि न्यायालयालाचा अवमान केल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. नियमांचे पालन करण्यात लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकारीच उदासीन असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. कारवाई होत नसल्यानेच नाशिकमध्ये न्यायालयाचा अवमान होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडमध्ये महिलेचा खून

$
0
0

सुनेच्या हातावरही चोरट्याकडून वार

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड येथील माधवनगर भागातील शिक्षक कॉलनी येथे बंगल्यात शिरून चोरट्याने नीलम जयस्वाल (वय ५८) या महिलेची हत्या करीत सुमारे ८० हजारांचे दागिनेही चोरून नेले. ही घटना शुक्रवारी सकाळी भरदिवसा घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच, नीलम जयस्वाल यांच्या सुनेच्या हातावर शस्त्राने वार करीत चोरट्याने तेथून पळ काढला. प्रतिकारामुळे पर्समधील ८० हजार रुपये वाचले असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी जखमी महिलेच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी खून व जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

येथील माधवनगर येथे शिक्षक कॉलनी येथे बंगल्यात धीरज जयस्वाल यांचे कुटुंबीय राहते. ते धुळे येथे नोकरीस असून, त्यांची आजारी आई व पत्नी आणि दोन मुले येथे राहतात. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घरात नीलम शामकुमार जयस्वाल एकट्या होत्या. त्यांची सून शीतल या बाजार करण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. दोन्ही नातू सुटीत बाहेरगावी असल्याने घरी त्या एकट्या होत्या. नीलम यांना पक्षाघात झाला असल्याने बाहेरून कुलूप लावून शीतल जयस्वाल बाहेर गेल्या होत्या. या वेळी चोरट्याने घरात घुसून नीलम जयस्वाल यांचा गळा दाबून त्यांना ठार मारले. कपाट चावीने उघडून कपाटातील चार तोळे सोन्याचे दागिने चोरले. शीतल जयस्वाल या बाहेरून घरी परत आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी सासूबाईंना आवाज दिला पण, प्रतिसाद मिळाला नाही. त्याचवेळी बाथरूममध्ये लपलेल्या चोरट्याने त्यांच्या हातावर शस्त्राने वार करून पर्स पळविण्याचा प्रयत्न केला. प्रतिकार करताच चोराने पलायन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

तपासासाठी पाच पथके वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिक गुन्हा अन्वेषणची टीम किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात दाखल झाली. यावेळी श्वान पथक आणण्यात आले मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. घटनास्थळी संशयास्पद काही सापडले नाही. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक पुंडलिक सपकाळे करीत आहेत. एकूण पाच पथके तयार करून पोलिस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दुष्काळी अधिवेशन घेण्याची गरज’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाण्याचा वापर कसा करावा, यावर कोणतेही निर्बंध नाहीत. महाराष्ट्रात तर विदारक चित्र आहे. त्यामुळे आता हिवाळी व पावसाळी अधिवेशासारखेच दुष्काळी अधिवेशन घेण्याची गरज असून, त्यात हक्कभंग नाही, वादावादी नाही तर फक्त शेती, दुष्काळ व पाणी हेच विषय असायला हवेत, असे मत हिरवेबाजाराचे प्रमुख मार्गदर्शक पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

मानव उत्थान संस्थेने प. सा. नाट्यगृहात आयोजित डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे २९ वे पुष्प पोपटराव पवार यांनी गुंफले. शेती व्यवसायातून समृध्द ग्रामजीवन या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर मानव उत्थान संस्थेचे जगबीर सिंग व शिक्षण बाजारीकर विरोधी मंचचे डॉ. मिलिंद वाघ उपस्थित होते. पवार पुढे म्हणाले, की मताच्या गणितांमुळे सर्व व्यवस्था बिघडली आहे. गावात झेंडे व पोस्टरने गाव विद्रुप झाले आहे. अशा स्थितीत गाव सुरक्षित केल्याशिवाय शहर सुरक्षित होणार नाही. गावाला सुरक्षित केल्यानंतर शहरातल्या झोपडपट्टीत कोण राहायला येणार. त्यामुळे गाव समृध्द होणे गरजेचे आहे. तरुणाईला विधायक मार्गाकडे वळवणेही गरजेचे आहे. प्रशासन व राजकारणातही चांगली माणसे आहेत, पण चांगल्या गोष्टीची चर्चा होत नाही.

प्रेरणास्‍त्रोतही कमी नाही, त्यामुळे नेमके काय घ्यायचे हे तरुणांनी ठरवायला हवे. पंचवीस वर्षांपूर्वी मागे गेलो, तर सर्व नद्या स्वच्छ वाहत होत्या. पण, आता त्या दू‌षित झाल्या आहेत. पूर्वी भूपृष्ठावरील पाण्यावर जगणारा आपला देश होता, आता भूगर्भातील पाण्यावर जगणारा देश झाला आहे. हजारो फूट पाण्यासाठी बोअरवेल खोदल्या जात आहे. त्यामुळे खरं तर कुंभ हा नदी स्वच्छ करण्याचा उत्सव आहे. पण, आता तो नदी घाण करण्याचा बनला आहे. आता नद्या गटारी झाल्या आहेत. निसर्गाचे शोषण करून विकास नको. पर्जन्याधारीत शेती करणे आवश्यक आहे, असेही पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नळांतून पाण्याएेवजी येतेय हवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

शहरात एकीकडे पाणी कपात सुरू असतानाच पिंपळगाव बहुला गावावर वेगळ्याच कारणाने पाणीटंचाईचे सावट गडद झाले आहे. जुन्या जलवाहिनीतून पिण्याच्या पाण्याऐवजी केवळ हवाच येत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे २५ वर्षांपूर्वीच्या जुन्या वाहिन्या बदलून नवीन वाहिन्या टाकण्याची मागणी केली जात आहे.

सातपूरच्या सभापती सविता काळे व नगरसेविका सुरेखा नागरे यांनी पिंपळगाव बहुला येथे भेट देत समस्या जाणून घेतली. या वेळी अनेक महिलांनी कमी दाबाने पाणी येत असल्याने पाणी कमी पडत असल्याचे सांगितले. यासाठी ट्रँकरने विकत पाणी घ्यावे लागत असल्याचेही महिलांनी सभापती काळे यांना सांगितले. अनेक ठिकाणी खड्डा करून पिण्याचे पाणी भरावे लागत असल्याचे पाहणीवेळी निदर्शनास आले. येथील जलवाहिनीवरील जोडण्या २५ वर्षांत दहा पटींनी वाढल्याने पाणी पुरत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. सभापती काळे यांनी पाणीपुरवठा विभागाला नवीन जलवाहिनी टाकण्याची सूचना केली आहे.

नळ आहेत, पण मीटर गायब

सभापती सविता काळे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसह पिंपळगाव बहुला येथे पाहणी दौरा केला. दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणी पाण्याचे नळ दिसले. परंतु, मीटर मात्र गायब होते. पाणी मीटरच गायब असल्याने महापालिकेचे कर्मचारी करतात तरी काय, असा सवाल या वेळी उपस्थित झाला. पाण्याचे मीटर नसल्याने त्यावर बोलण्याचे सर्वांनीच मात्र टाळले. मात्र, यामुळे महापालिकेचेच नुकसान होत असल्याचे सूज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे जुन्याच वाहिन्यांद्वारे येणारे पिण्याचे पाणी आता कमी पडू लागले आहे. त्यातच गेल्या महिन्यापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने प्रसंगी पाणी विकत

घेण्याची वेळ येत आहे. महापालिकेने नवीन वाहिनी टाकण्याची गरज आहे.

-अशोक गुंबाडे, रहिवासी, पिंपळगाव बहुला

विस्कळीत पुरवठ्याचा गंगापूररोडलाही फटका

विस्कळीत पुरवठ्याचा गंगापूररोडलाही फटका

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

शहरातील स्वतःची विशेष ओळख असणाऱ्या गंगापूररोड भागालाही पिण्याच्या पाण्याचा तुटवडा सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असून, गेल्या काही वर्षांत गंगापूररोडचा परिसर झपाट्याने वाढल्याने जुन्या जलवाहिन्यांवर अतिरिक्त भार येत असल्याने पुरेसे पाणी मिळत नसल्याचे नगरसेवक विलास शिंदे यांनी सांगितले. महापालिकेने परिसराचा सर्व्हे करून नवीन वाहिन्यांचे कामे मंजूर करावे, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.

गंगापूररोडचा सर्वात जुना भाग म्हणून नरसिंहनगर आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून पिण्याचे मुबलक पाणी या भागाला मिळत नसल्याने टँकरद्वारे पाणी घ्यावे लागत आहे. येथे नवीन जलवाहिनी व जलकुंभाची आवश्यकता आहे.

-बापू कोतवाल, स्थानिक रहिवासी

या भागाला पोहोचतेय झळ

नरसिंहनगर परिसर, महारुद्र अर्पाटमेंट, अथर्व कॉलनी, भोसला प्रवेशद्वारासमोरील भाग, शंकरनगर, गंगापूर पोलिस स्टेशनसमोरील आनंद विहार कॉलनी, आनंदवली कोळीवाडा, साईबाबा मंदिर, सागर पार्क यासह इतर भागातही विस्कळीत पाणीपुरवठ्याने रहिवासी हैराण झाले आहेत. गुरुवारी पाणीपुरवठा बंद असल्याने दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा अतिशय कमी दाबाने होत असल्याचा आरोपही रहिवाशांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चव्हाण दाम्पत्याचा ताबा नांदेड पोलिसांकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केबीसी मल्टिट्रेड अँड रिसोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या घोटाळेबाज कंपनीचा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब व त्याची पत्नी आरती चव्हाण यांना शुक्रवारी कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. या दोघाची सेंट्रल जेलमध्ये रवानगी होताच नांदेड पोलिस त्यांचा ताबा घेणार आहेत. चव्हाण दाम्पत्य शनिवारी सकाळी नांदेडला रवाना होणार आहे.

राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या केबीसी घोटाळ्याच्या सूत्रधारांना ६ मे रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. तेव्हापासून सलग १४ दिवस पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यांमधील १९ किलो सोने व २ किलो ३०० ग्रॅम चांदी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भाऊसाहेब व आरती चव्हाणच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्याने त्यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. कदम यांच्या कोर्टासमोर हजर करण्यात आले. कायद्याने १४ दिवसांपेक्षा अधिक पोलिस कोठडी देणे शक्य नसल्याने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश कदम यांनी दिले. दरम्यान, केबीसी घोटाळा उघडकीस आल्यानंतर नांदेड जिल्ह्यातसुद्धा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. नांदेड पोलिसांनाही या गुन्ह्याच्या तपासासाठी भाऊसाहेब व आरती चव्हाणकडे चौकशी करायची आहे. नाशिक पोलिसांनी चव्हाण दाम्पत्याला अटक केल्यानंतर नांदेड पोलिसांचे एक पथक शहरात दाखल झाले होते. त्यांनी १३ मे रोजी नाशिक कोर्टाकडे विनंती केली. मात्र, कोर्टाने चव्हाण दाम्पत्याच्या कोठडीत वाढ केल्याने हे पथक रिकाम्या हाताने परतले. नांदेड पोलिस दलाचे स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद दिघोळे शुक्रवारी कोर्टात हजर होते. त्यांनी केलेली विनंती कोर्टाने मंजूर केली. त्यानुसार शनिवारी सकाळी नांदेड पोलिसांचे पथक चव्हाण दाम्पत्यास घेऊन जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेततळ्यांच्या कामांना वेग

$
0
0

शेततळे योजनेद्वारे मालेगाव तालुक्यात ७३० अर्जनोंदणी

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव तालुक्यात यंदा भीषण दुष्काळ परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी अजूनही वणवण करावी लागते आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतीसाठीचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी 'मागेल त्याला शेततळे' योजना लाभदायक ठरली आहे. या योजनेअंतर्गत मालेगाव तालुक्यातील ७५० हून अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने यासाठी अर्ज दाखल केले आहेत. तर त्यापैकी शंभर कामे ही पूर्ण झालेली आहेत.

शेती उत्पादनात शाश्वतता आणण्यासाठी व दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त आहेत. त्यामुळे राज्यातील कोरडवाहू शेतीसाठी शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी या योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार मालेगाव तालुक्यातील एकूण ७३० शेतकऱ्यांनी या योजनेसाठी 'आपले सरकार' या वेबपोर्टलद्वारे ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी ६५० अर्ज कृषी कार्यालय मालेगाव यांच्याकडे प्राप्त झाले असून अर्ज छाननीनंतर एकूण ५४० अर्ज पात्र ठरलेत. यातील ३४१ अर्ज प्रांताधिकारी यांनी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामधील २०० शेततळ्यांची आखणी झाली असून कामे वेगाने सुरू आहेत. या महिन्याअखेर १०० शेततळी पूर्ण होतील, असा विश्वास कृषी अधिकारी गोकुळ आहिरे यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केला आहे.

किसान सभेद्वारे जनजागृती

'मागेल त्याला शेततळे' योजनेचा शेतकरी बांधवामध्ये जनजागृती व्हावी यासाठी किसान सभांचे आयोजन केले होते. येथील कृषी विभागाने एप्रिल महीन्यात तालुक्यातील ११७ ग्रामपंचातींच्या कार्यक्षेत्रात किसान सभा घेतल्या. त्यामध्ये योजनेची अर्ज कसा भरावा, त्याचे निकष काय याबाबतचे आवाहन करण्यात आले. तसेच निळगव्हाण येथे नुकतेच तालुकास्तरीय शेतकरी प्रशिक्षण घेऊन त्याठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांचे शंका निरसन करण्यात आले.

मालेगाव तालुक्यातील शेती सिंचनसाठी या योजनेचा निश्चित फायदा होणार आहे. पावसाळ्यात विहीर पुनर्भरण, पिकांना पानी देणे, पाणी साठवण क्षमता वाढवणे यासाठी शेततळे फायदेशीर ठरतील. तसेच शेती उत्पादनात वाढ होवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास या योजनेची मदत झाली आहे.

- गोकुळ आहिरे, तालुका कृषी अधिकारी, मालेगाव

या योजनेच्या माध्यमातून माझ्या शेतात शेततळे पूर्ण झाले आहे. यंदा जरी दुष्काळी परिस्थितीशी सामना करावा लागला असला तरी येत्या काळात शेततळ्यांच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार असल्याने ही समाधानकारक बाब आहे.

- बाळासाहेब मगर, शेतकरी, साकूर ता. मालेगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेठरोड भागात दुष्काळग्रस्तांचा डेरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, अमृतधाम उन्हाच्या तडाख्याने आणि पुरेसे पाणी मिळत नसल्याने जिल्हाभरातील रहिवासी त्रस्त झाले असून, जगण्यासाठी रोजगार, दोन वेळचे अन्न मिळवण्यासाठी अनेक जणांनी आपले गाव सोडून नाशिक गाठले आहे. नाशिकच्या पेठरोड परिसरात मिळेल त्या उघड्या जागेवर त्यांचा डेरा पडला असून, तेथे संसार थाटून त्यांचा दुष्काळाशी लढा सुरू आहे. सुरगाण व पेठ तालुक्यांतील विविध ठिकाणांहून हजारो नागरिक संपूर्ण कुटुंबासह नाशिकच्या पेठरोडवरील भक्तिधामसमोरील मोकळ्या जागेत राहण्यासाठी व मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करण्यासाठी आले आहेत. सकाळी लवकर उठावे, स्वयंपाक करावा, हातातच पोळी-भाकरी, चटणी-मिरची आणि कोरडी भाजी घ्यावी आणि पोटात ढकलावी व कोणी तरी आपणास नक्कीच कामासाठी बोलावेल या आशेने पेठरोडच्या कडेला थांबावे, असा त्यांचा दिनक्रम दिसून येत आहे. पावसानंतर परतणार... दुष्काळ काय असतो, त्याचा चटका कसा असतो, काय हाल होतात, जनावरे चारा व पाण्याविना कशी आपल्या डोळ्यांसमोर तडफडतात आणि आपला जीव कसा कासावीस होतो, अशा व्यथा मांडतानाच पाणी नाही, जनावरांना चार नाही त्यामुळे आम्ही नाशिकला आलो असून, पाऊस पडला की, आम्ही परत जाणार आहोत, असे त्यातील काही जणांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाशाबा कुस्तीत आयोजकांचा रडीचा डाव

$
0
0

महेश पठाडे, नाशिक

नाशिक येथील सातपूर क्लब हाऊसच्या मैदानावर मोठ्या थाटामाटात सुरू झालेल्या राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेला शनिवारी दुसऱ्या दिवशी आयोजक आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतील वादामुळे गालबोट लागले. बक्षिसाच्या मुद्द्यावरून कुस्तीच्या इतिहासात प्रथमच लढती थांबविण्यात आल्या आहेत. जागतिक कुस्ती संघटनेच्या नियमानुसार या स्पर्धेत आठवा वजनगट वाढविण्यात आला होता. या वाढीव आठव्या वजनगटातील बक्षिसे आयोजकांनी द्यायचे असतात. मात्र, आयोजकांनी ही बक्षिसे देण्यास नकार दिला. नंतर तातडीने झालेल्या बैठकीत बक्षिसे देण्यास मान्यता दिल्याने वादावर पडदा पडला. मात्र, यामुळे एक दिवसाचा खेळ वाया गेला, तर हजारो कुस्तीप्रेमींची निराशा झाली.

राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेला शुक्रवारपासून नाशिकमध्ये सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दोन गटांच्या स्पर्धा झाल्यानंतर उर्वरित गटाच्या स्पर्धा शनिवारी खेळविण्यात येणार होत्या, तर रविवारी क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते स्पर्धेचा समारोप होणार आहे. मात्र, शनिवारी बक्षिसाच्या मुद्द्यावरून आयोजक व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत वाद निर्माण झाला. आयोजकांनी आठव्या गटातील बक्षिसे देण्यास नकार दिला. मात्र, शनिवारी रात्री तातडीने झालेल्या बैठकीत वादावर तोडगा काढण्यात येऊन आयोजकांनी बक्षिसे देण्यास मान्यता दिली.

काय होता वाद?

यापूर्वीच्या खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा एकूण सात गटांत होत होत्या. मात्र, जागतिक कुस्ती संघटनेने एक गट वाढवल्याने खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेतही या गटाचा अंतर्भाव करण्यात आला. त्यामुळे फ्रीस्टाइल, ग्रीको रोमन व महिला गटात प्रत्येकी एक गट वाढविण्यात आला. या वाढीव गटाची साडेचार लाखांची बक्षिसे आतापर्यंत आयोजकांकडून दिली जात होती. नाशिकमध्येही आमदार हिरे यांनाच ही बक्षिसे द्यावी लागणार हे कुस्तीगीर परिषदेने गृहीत धरली होती. मात्र, ऐनवेळी आयोजकांनी ही बक्षिसे देण्यास नकार दिल्याने वाद निर्माण झाला.

आयोजकांची अडचण काय?

या स्पर्धेसाठी शासनातर्फे निधी दिला जातो. एकूण ५० लाखांच्या या स्पर्धेत ३५ लाख शासनातर्फे, तर उर्वरित १५ लाखांची रक्कम आयोजकांतर्फे उभी केली जाते. त्यापैकी केवळ १० लाख रुपयेच आयोजकांनी उभे केल्याचे समजते. उर्वरित पाच लाख रुपयांची तूट यामुळे निर्माण झाली. त्यात बक्षिसांची रक्कम वाढल्याने आयोजकांचे गणित कोलमडले. त्यामुळेच आयोजक ही रक्कम देण्यास नकार देत होते.

आज सकाळी सामने

खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेला प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, बक्षिसाच्या मुद्द्यावरून लढतीच रद्द करण्याचे जाहीर केल्याने प्रेक्षकांची घोर निराशा झाली. कुस्तीच्या लढती रद्द करण्याची राज्याच्या इतिहासातली ही पहिलीच घटना नाशिकमध्ये घडली आहे. अखेर आयोजकांनी स्पर्धेच्या सहा गटांतील लढती रविवारी सकाळ व सायंकाळच्या सत्रात घेण्याचे जाहीर केल्याने वादावर पडदा पडला.

बाळासाहेब लांडगे संतप्त

बक्षिसाच्या मुद्द्यावरून लढती थांबवाव्या लागल्याची माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांना फोनवरून देण्यात आल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला. ते तातडीने पुण्याहून नाशिककडे रवाना झाले.

कुस्तीगीर परिषद म्हणते...

खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेतील वाढीव वजनगटाची बक्षिसे आयोजकांनी द्यावीत, अशी शासननिर्णयातच तरतूद आहे. आयोजकांनी ही बक्षिसे देण्यास नकार देणे योग्य नाही. आता ही रक्कम देण्यास त्यांनी मान्यता दिल्याने प्रश्न सुटला आहे, अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्ष प्राधिकरणाचे अंदाजपत्रक नव्याने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक नाशिक महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीच्या अंदाजपत्रकातील दुरुस्तीबाबत शुक्रवारी महापालिकेत विशेष सभा बोलवण्यात आली होती. त्यात आयुक्तांनी हरकती घेतलेल्या त्रुटी दुरुस्त करून पुन्हा नव्याने अंदाजपत्रक सादर करण्याचा ठराव करण्यात आला. शहर जास्तीत जास्त झाडे लावावीत यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीतर्फे विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांसाठी जो निधी लागतो, त्याचे अंदाजपत्रक तयार करून आयुक्तांना सादर करणे अपेक्षित असते. यापूर्वी झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत १३ कोटी ७४ लाख रुपये कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येऊन आयुक्तांपुढे ठेवण्यात आले. आयुक्तांनी अंदाजपत्रकाचा अभ्यास करून त्यात १२ कोटी १० लाख रुपयांची कपात करून अवघ्या १ कोटी ६४ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली होती. त्यामुळे वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त करून शुक्रवारी पुन्हा बैठक बोलावली. या बैठकीत चर्चा होऊन आयुक्तांनी यापूर्वी मंजूर केलेल्या वृक्षगणनेच्या २ कोटी ३० लाखांच्या खर्चालादेखील कात्री लावली होती. ती चूक दुरुस्त करण्यात येऊन पुन्हा १० कोटी ५० लाख रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे. येणाऱ्या पावसाळ्यात वृक्षारोपणाचे काम होणे अपेक्षित आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. यातील बहुतांश कामांचे टेंडरदेखील निघालेले आहेत. आयुक्तांनी जर खर्चाला कात्री लावली, तर कामे कशी करायची, असा सवाल सदस्यांनी केला आहे. एकीकडे महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग काम करीत नाही, अशी ओरड केली जाते व दुसरीकडे निधीही दिला जात नाही. यामुळे झाडे लावायची कशी आणि त्यांची जोपासना करायची कशी, असा सवाल सदस्यांनी व्यक्त केला आहे. वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली या वेळी कुणाल वाघ, अनिल शेळकेंसह सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाले, गटारींच्या स्वच्छतेला सुरुवात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

पावसाळ्यापूर्वी मालेगाव शहरातील प्रमुख नाले तसेच मोसम नदी पात्रातील घाण, कचऱ्याची सफाई करण्याचे काम मनपाकडून शुक्रवारीपासून (दि. २० मे) सुरू करण्यात आले. मनपा आयुक्त रवींद्र जगताप यांनी नुकतीच शहरातील स्वच्छता कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती त्यावेळी आयुक्तातर्फे हे आदेश देण्यात आले होते.

शहराच्या मध्यातून जाणारे मोसम नदीचे पात्र तसेच सात प्रमुख नाले, गटारींची सफाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. काही नाले व गटारी तुंबल्याने पावसाळ्यातील पाणी शहरातील रस्ते व वस्त्यांवर येते. त्यामुळे नालासफाईचे काम तत्काळ हाती घेण्यात यावे, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

पोकलँड मशिनद्वारे सफाई

या आदेशानंतर शहरात प्रशासनाकडून गेल्या दोन दिवसात चार जेसीबी व एक पोकलँड मशिनद्वारे सफाई केली जात आहे. यात शहरातील मालेगाव हायस्कूल, पवारवाडी रोड, नवरंग कॉलनी या भागातील नाल्यांची सफाई काम सुरू करण्यात आले आहे. या वेळी आयुक्त जगताप व अधिकाऱ्यांनी शहरातील जमहूर नाल्याची पाहणी करत सफाईच्या कामास सुरुवात केली. तसेच बडा कबरस्थान येथे साजरा होणाऱ्या 'शब-ए-बारात' च्या पार्श्वभूमीवर पाहणी करण्यात आली.

शहरातील मोसम नदी पात्र असो किंवा गटारी, नाले याठिकाणी कमालीची अस्वच्छता पसरल्याने नालेसफाईचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाचे काम होत असून स्वतः आयुक्त रवींद्र जगताप, उपायुक्त कमरूद्दीन शेख, स्वच्छता निरीक्षक गोविंद परदेशी, प्रभाग अधिकारी या कामांवर लक्ष ठेवून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>