Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

चेकवर सह्या नसणे हाच कळीचा मुद्दा

$
0
0

महेश पठाडे, नाशिक

नाशिक येथे तिसऱ्या राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत सरकारने आर्थिक व्यवहारातून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला खड्यासारखे दूर ठेवल्यानेच वादाची ठिणगी पडली. स्पर्धेत बक्षिसांपासून पंच, प्रशिक्षकांच्या मानधनापर्यंतच्या सर्वच बाबतीत धनादेशावर सही करण्याचे अधिकार केवळ प्रभारी क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांनाच देण्यात आले होते. यापूर्वीच्या स्पर्धांत कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस व शासकीय अधिकाऱ्याच्या सहीशिवाय कोणतेही व्यवहार होत नव्हते. मात्र, या वेळी हे अधिकार केवळ सबनीस यांनाच असल्याने कुस्तीगीर परिषदेत अस्वस्थता होती. त्याला बक्षिसाच्या मुद्द्याने खतपाणी घातले आणि आयोजक- परिषदेतील वाद चिघळतच गेला. त्याची परिणती कुस्ती स्पर्धा स्थगित होण्यात झाली.

नाशिकमध्येच गेल्या वर्षी भाई नेरूरकर चषक खो-खो स्पर्धा क्रीडा उपसंचालक संजय सबनीस व आमदार सीमा हिरे यांच्या आयोजन व नियोजनाखालीच झाली होती. त्या वेळी क्रीडा उपसंचालकांबरोबरच महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या सरचिटणीसांचीही सही घेतली जात होती. यापूर्वीच्या खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेतही हाच पायंडा होता. यंदा मात्र हा पायंडा मोडला. कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे दिल्लीत असल्याने त्यांना स्पर्धेच्या दिवशी उपस्थित राहता येणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रभारी क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांच्याच सहीने धनादेश दिले जात होते. कुस्तीगीर परिषदेला ही बाब समजल्यानंतर प्रचंड संताप व्यक्त झाला. यामागचा सूत्रधार सबनीस हेच आहेत, अशी कुस्तीगीर परिषदेची धारणा झाली. मात्र, बाळासाहेब लांडगे नाशिकमध्ये एक दिवस उशिराने दाखल होणार असल्याने तोपर्यंत आर्थिक व्यवहार ठप्प होतील म्हणूनच हे अधिकार सबनीस यांनी स्वतःकडे घेतले. मात्र, ते शासनाच्या संमतीने घेतले किंवा नाहीत याची अद्याप उकल होऊ शकलेली नाही. मात्र, आठव्या वजनगटातील बक्षिसांच्या रकमेवरून या वादाला फोडणी मिळाली.

'अयोध्या'त रामायण!

स्पर्धेतील पंच, प्रशिक्षक व कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवास व भोजन व्यवस्था अयोध्या हॉटेलमध्ये होती. येथे बक्षिसाच्या मुद्द्यापेक्षाही परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांना धनादेशावर सहीचे अधिकार नसल्याची चर्चा अधिक चवीने रंगली. ही माहिती बाळासाहेबांच्या कानावर घातल्याने आयोजक व कुस्तीगीर परिषदेतील धुसफूस वाढली. बक्षिसाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर बाळासाहेब तातडीने नाशिकला रात्री अकराच्या सुमारास दाखल झाले. त्यांनी त्याच रात्री बैठक घेतली. एकूणच हे संपूर्ण प्रकरण सबनीस यांच्यावरच फोडले. हे संपूर्ण रामायण 'अयोध्या'वरच रंगले.

स्पर्धेवर प्रश्नचिन्ह

खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेला सुरुवातीपासून लागलेले ग्रहण पाहता याबाबत आयोजक व महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेत अनेकदा बैठकी झाल्या. आता स्पर्धा अनिश्चित काळापर्यंत स्थगित करण्यात आल्याने राज्य सरकारने यापुढे ही स्पर्धा घ्यायची किंवा नाही, यावर गंभीरपणे विचार सुरू केला आहे. याबाबत आमदार सीमा हिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की खेळाडूंच्याच फायद्यासाठी ही स्पर्धा घेतली होती. आता स्पर्धा स्थगित झाल्याने क्रीडामंत्री विनोद तावडे यांनीही या स्पर्धेबाबत गंभीरपणे विचार सुरू केला आहे.

लाखो रुपयांचा खर्च वाया

स्पर्धेवर आतापर्यंत १२ ते १४ लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यात आला होता. पहिल्या दिवसाच्या लढती झाल्यानंतर उर्वरित लढती स्थगित करण्यात आल्या. त्यामुळे स्पर्धेवरील खर्च वाया गेला आहे. हा खर्च कोणी द्यायचा असा प्रश्न आयोजकांसमोर आहे. याबाबत सरकारला संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यानंतरच काय तो निर्णय होईल, असे क्रीडा कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिओ ऑलिम्पिकला नरसिंगच जाणार!

$
0
0

mahesh.pathade@timesgroup.com

रिओ ऑलिम्पिकला नरसिंग यादवच जाणार असून, दिल्लीत कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याशी झालेल्या चर्चेत हा निर्णय झाल्याची माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी रविवारी 'मटा'शी बोलताना दिली. भारताला कोटा मिळवून देणारा नरसिंग यादव व ऑलिम्पिकवीर सुशील कुमार यांच्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर लांडगे यांनी प्रथमच कुस्तीगीर परिषदेची भूमिका मांडली.

यापूर्वी ज्या मल्लाने कोटा मिळवून दिला आहे त्यालाच ऑलिम्पिकला पाठविण्यात आले आहे. जर वाइल्ड कार्डवर भारताला प्रवेश मिळाला असता तर मल्लांमध्ये चाचणी घेणे योग्य असते. यापूर्वी वाइल्ड कार्डावर प्रवेश मिळाल्याने पप्पू यादव व महाराष्ट्राचा काका पवार यांच्यात लढत झाली होती. त्यात काका पवार पराभूत झाल्याची आठवणही लांडगे यांनी सांगितली.
ते म्हणाले, की जागतिक कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्याची नरसिंग यादवऐवजी सुशील कुमारला संधी होती. मात्र, खांदा दुखावल्याने तो जाऊ शकला नाही म्हणून नरसिंगला पाठविण्यात आले. आता नरसिंगने भारताचा ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केल्यानंतर सुशील कुमार खांद्याच्या दुखापतीतून कसा काय तंदुरुस्त झाला?
खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेबाबत ते म्हणाले, की ही स्पर्धा १२ वर्षे राष्ट्रीय स्पर्धा म्हणून खेळविली जात होती. मात्र, स्पर्धेची पारितोषिके उत्तरेतील मल्लांना जात असल्याने ही स्पर्धा राज्यस्तरीय करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून ही स्पर्धा राज्यस्तरीय झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या मल्लांचा फायदा झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावधान! आपण घेतोय रोज विषाचा प्याला

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

नाशिक ः गायी-म्हशींच्या दुधाचे प्रमाण वाढण्यासाठी देण्यात येणाऱ्या ऑक्सिटोसिन इंजेक्शनची शहरात मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असून, संपूर्ण नाशिक शहरातील गोठ्यांमध्ये याचे सर्रास वितरण होत आहे. गायी-म्हशी सातत्याने जास्त प्रमाणात दूध देऊ शकत नाहीत. त्यासाठी बाजारात ऑक्सिटोसिन इंजेक्शन उपलब्ध आहे. हे इंजेक्शन १ एमएल व २ एमएल या स्वरूपात मिळत असून, दिवसाला सरासरी दहा लिटर दूध देणाऱ्या गायी- म्हशी ऑक्सिटोसिनमुळे २० लिटरपर्यंत दूध देतात. मात्र, ऑक्सिटोसिनचे हे दूध मानवी शरीराला घातक असून, त्यामुळे पुरुषांमध्ये नंपुसकत्व येण्याची शक्यता असते.

अन्न आणि औषध प्रशासनाने या ऑक्सिटोसिनवर बंदी आणलेली आहे. मात्र, तरीही हे ऑक्सिटोसिनची विक्री सुरू असून, त्याची एक साखळीच तयार झाली आहे. शहरात प्रामुख्याने हे इंजेक्शन ट्रॅव्हलच्या बसमधून अथवा खासगी वाहनाने कानपूर, दिल्ली, इंदूरहून येते. वाहनातून उतरवल्यानंतर स्थानिक विक्रेता गोठे मालकांना तो आपल्या माणसांद्वारे थेट पोहोच करतो. १०० एमएलच्या बॉक्ससाठी अवघे तीस रुपये याची किंमत असते. पूर्वी हे इंजक्शन मेडिकलमध्ये उपलब्ध होत असे. मात्र, कारवाईमुळे त्याची विक्री बंद झाली आहे. मध्यंतरी अन्न व औषध प्रशासनाने अशा गोठे मालकांवर कारवाई केली. मात्र, त्यांनाही धमकावण्याचा प्रकार झाला होता. काही कालावधीनंतर पुन्हा हा धंदा जोमाने सुरू झाला आहे. हे इंजेक्शन दिल्यानंतर गायी-म्हशींमधील स्त्री हार्मोन्सची वाढ होऊन जनावरांना पान्हा फुटतो व ते जास्त प्रमाणात दूध देऊ लागतात. इंजेक्शनमुळे मिळणारे दूध मानवी शरीरास घातक असून, यामुळे स्त्रियांमधील हार्मोन्सचा समतोल बिघडून आजारात वाढ होते. पुरुषांच्या हार्मोन्समध्ये बदल होऊन नंपुसकत्व येण्याचा संभव असतो.

शहरात इंजेक्शन येते याबद्दल शंका नाही. मानवी शरीराला घातक असलेले इंजेक्शन आमचा कोणताही सभासद विकत नाही. आम्ही याबाबत विक्रेत्यांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने याचा शोध घ्यावा व कारवाई करावी, असे नाशिक जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गोरख चौधरी यांनी सांगितले.

इंजक्शन दिलेल्या गायी-म्हशींच्या दुधाने पुरुषांमधील स्त्री हार्मोन्सची वाढ होते. सुरुवातीला थायरॉइडसारखे आजार होतात. पुढे दीर्घकाळ परिणाम होऊन अनेक आजार होऊ शकतात, असे डॉ. राहुल सावंत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खते, बियाणे मोफत द्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

दुष्काळातून होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सरकारने मोफत बियाणे आणि खते त्वरित उपलब्ध करून द्यावीत, तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धुळ्यात शिवसेनेचा सोमवारी सकाळी अकरा वाजता संपर्कप्रमुख बबनराव थोरात आणि जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शेकडो शिवसैनिक आणि शेतकरी सहभागी झाले होते. या वेळी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

जिल्ह्यात काही वर्षे सोडली तर सतत दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. गेल्या दोन वर्षांपासून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. शासनाने या सर्व पार्श्वभूमीवर कृषी औद्योगिक महामंडळातर्फे कृषी विभागामार्फत धुळे जिल्ह्यात शेतकरी कोणते पीक किती प्रमाणात लागवड करतात याचे सर्वेक्षण करून कापूस, ज्वारी यांसारखे बियाणे आणि खते मोफत उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांचे पूर्वीचे कर्ज माफ करावे, त्यांना आता खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेसह सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्जाचे वितरण करावे, शेतक-यांच्या मालाल हमी भावासाठी तातडीने उपाययोजना करावी आदी मागण्या करण्यात आल्या.
काद्यांला दोन हजार रुपये हमीभाव मिळाला पाहिजे, सर्व शेतकऱ्यांची वीजबिले माफ झाली पाहिजेत, अशाही मागण्या करण्यात आल्या. मोर्चात संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, हेमंत साळुंखे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महिला संघटक कविता क्षीरसागर, वंदना पाटील, मनीषा जोशी, उपजिल्हाप्रमुख संजय गुजराथी, राजेंद्र पाटील, नितीन पाटील, भूपेंद्र लहामगे, सुनील बैसाणे, महेश मिस्तरी, रावसाहेब गिरासे, संदीप सूर्यवंशी, सुधीर जाधव, कैलास पाटील आदी सहभागी झाले होते.

भाजपवर टीका

भाजपचे एकनाथ खडसे व शहराचे आमदार अनिल गोटे यांच्यावर थोरात यांनी टीका केली. ते म्हणाले की, भाजपचे नेते भामटे आहेत. महसूलमंत्री खडसे धुळ्यातील तेलगी घोटाळ्यातील आरोपींबरोबर फिरतात. खडसे यांचा राजकीय दौरा नसतो. ते खासगी कामासाठीच धुळ्यात येतात. जनतेने भाजपच्या नेत्यांना निवडून देऊन मोठी चूक केली आहे. 'सबसे बडी भूल कमल का फूल' असा टोलाही हाणला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर प्रदेशातून पुरविले जाते ऑक्सिटोसिन

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

जनावरांनी जास्त दूध द्यावे यासाठी देण्यात येणारे इंजेक्शन थेट उत्तर प्रदेशातून मागविण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

महाराष्ट्रात ऑक्सिटोसीनच्या इंजेक्शनला बंदी आहे. तरीही, शहरात ते मुबलक प्रमाणात मिळत असून पूर्वी मेड‌िकलमध्ये मिळणारे इंजेक्शन आता थेट गोठ्यांपर्यंत पोहचत आहे. यासाठी उत्तर प्रदेशातील काही व्यापाऱ्यांनी समांतर यंत्रणा उभारली आहे. या व्यापाऱ्यांकडे नाशिकमधील गोठ्यांना रोज किती इंजेक्शन्स लागतात याची माहिती आहे. त्यानुसार गोठे मालकांना आठवड्यातून एकदा इंजेक्शनचा पुरवठा केला जातो. यातील काही माल हा मध्यप्रदेशातील इंदूरहूनही येत आहे. इंदूरमध्ये ऑक्सिटोसिनच्या व्यापारासाठी बाजारपेठ आहे. येथे या इंजेक्शनची खुलेआम विक्री होत असते. हा माल इंदूरमार्गे खासगी वाहनांतून थेट नाशिक शहरात दाखल होतो. प्रत्येक वेळी माल उतरविण्याचे ठिकाणी बदलले जात असमन स्थानिक पुरवठादार हा माल थेट गोठ्यांपर्यंत पोहचव‌ित आहेत. कुणाला शंका येऊ नये यासाठी सायकल अथवा छोट्या वाहनांचाही यासाठी वापर करण्यात येतो. बऱ्याचदा हा माल हायवेवरच उतरवून घेतला जातो. नाशिकमधील काही व्यापारी दिल्लीहूनही माल आणतात. हा माल ट्रान्स्पोर्टद्वारे थेट दुकानात पोहचव‌िला जातो. बिलावर ऑक्सिटोसीन असे न लिहीता दुसऱ्या औषधाचे नाव लिहीले जाते त्यामुळे कुणाचेही याकडे लक्ष जात नाही.

तपासणीसाठी यंत्रणा नाही

मध्यप्रदेशातून हा माल येत असताना तपासणीसाठी कुठल‌ीही यंत्रणा नाही. त्यामुळे हा माल राजरोसपणे शहरातील गोठ्यांपर्यंत पोहोचविला जात आहे. या प्रकाराबाबत पोलिसांना देखील माहीती नसल्याने तेदेखील बिनधास्त आहेत.

--

ऑक्सिटोसीनयुक्त दूध ओळखायचे कसे?

दुधात अनेक प्रकारे भेसळ केली जाते. प्रत्येकवेळी प्रयोगशाळेत जाऊन त्याची चाचणी करणे शक्य होत नाही. या करता बाजारात दूध भेसळ ओळखणारे यंत्र उपलब्ध आहे. याची किंमत १ हजार रुपयांपर्यंत आहे. यासोबत काही स्ट्रीपही मिळतात. त्याच्या वापराने दुधाचा अथवा स्ट्रीपचा रंग बदलल्यास दूध ऑक्सिटोसीन युक्त असे समजावे. त्याचप्रमाणे अन्न औषध प्रशासनाकडून देखील याची तपासणी केली जाते.

(क्रमशः)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जबाजारीपणातूनच आत्महत्या

$
0
0

जिल्ह्यात आतापर्यंत ३८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; २१ प्रकरणे मंजूर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला सरकारकडून मिळणारी एक लाखांची आर्थिक मदतही मोठी वाटत असली तरी अलीकडे झालेल्या अशा घटनांमध्ये जिल्ह्यातील तीन कुटंब मदतीला मुकले आहेत. जिल्हा प्रशासनाने शेतकरी आत्महत्येची १२ प्रकरणे मंजूर केली असून, या घटना कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र तीन प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत.

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. शेतकरी आत्महत्येची प्रत्येक घटना सरकारी निकषांमध्ये बसतेच असे नाही. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात या विषयावर बैठक बोलाविण्यात आली होती. एकूण १७ पैकी १२ प्रकरणे पात्र, तर तीन अपात्र ठरविण्यात आली. दोन प्रकरणांच्या फेरचौकशीचे आदेश संबंधित तहसीलदारांना देण्यात आले आहेत.

निफाड, सिन्नर, बागलाण, मालेगाव, नांदगाव, दिंडोरी, चांदवड या तालुक्यांमध्ये शेतकरी आत्महत्येच्या घटना सातत्याने घडत आहेत. चालू वर्षात ३८ शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे खचून जाऊन आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मात्र, त्यासाठी संबंधित शेतकरी कर्जबाजारी असावा, कर्जवसुलीसाठी त्याच्याकडे बँकांकडून तगादा सुरू असावा किंवा गेल्या काही वर्षांपासून त्याची जमीन नापीक असावी, अशा प्रकारचे निकष आहेत. अशा निकषांना पात्र ठरणाऱ्या प्रकरणांमध्येच संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मंजूर केली जाते. आत्महत्येच्या नेमक्या कारणांचा शोध घेऊन त्याचा अहवाल तहसीलदार आणि संबंधित पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांद्वारे जिल्हा प्रशासनाला सादर केला जातो.

आर्थिक अरिष्ट, निसर्गाचे दुष्टचक्र यांसारख्या संकटांना त्रासून शेतकऱ्याने आत्महत्या केली असेल, तर तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले जातो. १२ एप्रिल रोजी याबाबतची बैठक झाली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा याबाबतची बैठक बोलावण्यात आली. एप्रिलपूर्वीची प्रलंबित प्रकरणे तसेच नवीन १७ प्रकरणे मंजुरीसाठी प्रशासनासमोर ठेवण्यात आली होती.

सरकारी मदतीस पात्र ठरलेली शेतकरी कुटुंब नामदेव तुकाराम कांडेकर (पांगरी, ता. सिन्नर), संजय तानाजी सूर्यवंशी (खालप, ता. देवळा), आप्पा नानाजी गायकवाड (विंचूरे, ता. बागलाण), छबू रेवजी कोल्हे (विटावे, ता. चांदवड), हरिभाऊ भिमाजी नागरे (अस्तगाव, ता. नांदगाव), सागर पंढरीनाथ डोंगरे (गोळेगाव, ता. निफाड), कैलास संतू जाधव (सोनजांब, ता, दिंडोरी), आकाश राजेंद्र शिंदे (वनसगाव, ता. निफाड), अशोक लहानू शेळके (चास, ता. सिन्नर), देवीदास भाऊसाहेब चव्हाण (रा. हिरापूर, ता. चांदवड), कोंडाजी राजाभाऊ वक्ते (वडनेरभैरव, ता. चांदवड), नंदू मुकुंदा घोटेकर (चांदोरा, ता. चांदवड).

अपात्र प्रकरणे दिलीप रामनाथ खिंडे (रा. सोनगाव, ता. निफाड), महेंद्र पुंजा गाडे (रा., सोनगाव, ता. निफाड), विलास गोविंद चौधरी (रा.ओझर, ता. निफाड).

फेरचौकशीसाठी ठेवलेली प्रकरणे बापू रामभाऊ अहिरे (ब्राह्मणवाडे, ता. बागलाण), ‍रंगनाथ संतू शेळके (रा. नांदूर शिंगोटे, ता. सिन्नर)

जिल्ह्यात २१ प्रकरणे पात्र तर ११ अपात्र जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या ३७ घटना. त्यापैकी १८ प्रकरणे यापुर्वीच निकाली काढण्यात आली आहेत. त्यामध्ये नऊ प्रकरणे मंजूर, तर तेवढीच प्रकरणे नामंजूर करण्यात आली आहेत. १७ मार्च रोजी सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील नामदेव तुकाराम कांडेकर यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली होती. हे प्रकरण प्रलंबित ठेवण्यात आले होते. मात्र ते आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. आतापर्यंत ३७ पैकी ३४ प्रकरणे मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहेत. त्यापैकी २१ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. ११ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली असून, दोन प्रकरणांची फेरचौकशी केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसपाटील, कोतवाल भरतीप्रक्रिया नियमानुसार

$
0
0

उपविभागीय अधिकाऱ्यांचा दावा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निफाड उपविभागातील पोलिसपाटील व कोतवाल पदांच्या भरतीसाठी पारदर्शक पद्धतीने आणि नियमानुसार निवडप्रक्रिया राबविण्यात आली आहे. निवड प्रक्रियेत आर्थिक बाबी संदर्भातील सर्व तक्रारी निराधार व तथ्यहीन असून, केवळ गुणवत्तेच्या आधारावर निवड प्रक्रिया राबविल्याचा दावा उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी केला आहे.

निफाड उपविभागातील पोलिसपाटील व कोतवाल पदांच्या भरतीकरिता २४ एप्रिल रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. लेखी परीक्षेचा निकाल ५ मे रोजी जाहीर करून १० ते १३ मे या कालावधीत पाच सदस्यीय निवड समितीमार्फत मुलाखती घेण्यात आल्या. कोतवालपदाच्या १६ मे रोजी मुलाखती घेण्यात येऊन त्याच दिवशी दोन्ही पदांसाठीचे निकाल जाहीर करण्यात आले. मात्र या भरतीप्रक्रियेत घोळ झाल्याचे आरोप होऊ लागले आहेत.

गुणांकन पद्धतीबाबत सरकारच्या तसेच संबंधित अधिनियमामध्ये स्पष्ट तरतूद नाही. संबंधित समितीने सर्वंकष विचार करून सर्वात लायक उमेदवार निवडणे सरकारला अभिप्रेत आहे. गुणांकन पद्धतीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच उमेदवारांची पदासाठीची पात्रता तपासण्यासाठी निवड समितीने पोलिसपाटीलपदासाठी ११, तर कोतवाल पदासाठी १२ मुद्दे निश्चित केले होते.

गुणांकन पद्धतीमध्ये त्याच्या शैक्षणिक आर्हतेसोबतच पदासाठी आवश्यक सर्वंकष व्यक्तितीमत्व, व्यावहारिक कौशल्य, निर्णय क्षमता, समय सुचकता, परिस्थितीजन्य कौशल्य आदी सर्वंकष गुणांचा विचार करून निश्चित मुद्यांच्या आधारे गुणांकन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व दस्त सर्वांच्या अवलोकनार्थ उपलब्ध करून देण्यात आलेले असून, इच्छुक व्यक्ती संपूर्ण दस्तऐवज कार्यालयीन वेळेत येऊन अवलोकन करू शकतात, असे प्रशासनाने कळविले आहे. निवड प्रक्रियेसंदर्भात कोणास कोणतीही तक्रार किंवा अडचण असल्यास कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन मंगरूळे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागलाण, नांदगावमध्ये दोन शेतकरी आत्महत्या

$
0
0

बागलाण, नांदगावमध्ये दोन शेतकरी आत्महत्या

नाशिक : बळीराजाच्या आत्महत्येच्या हृदय ‌पिळवटून टाकणाऱ्या घटनांचे सत्र नाशिक जिल्ह्यात सुरूच आहे. सोमवारी बागलाण आणि नांदगावात दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. चालू वर्षात मृत्यूला कवटाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३८ झाली आहे. बागलाण तालुक्यातील जुनी शेंमळी येथील जिभाऊ गोटू बागूल (वय ६५) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. दुसरी घटना नांदगाव तालुक्यातील मनमाडजवळील माळेगाव कर्यात येथे घडली. देवीदास पुंडलिक फरताळे (वय ५१) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इगतपुरीत धक्काबुक्कीत तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इगतपुरी

पत्नीचा हात धरून मोटरसायकलवर का बसवले यावरून कुरापत काढून धक्काबुक्की करीत ढकलल्याने दगडाचा मार लागून युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते येथील दऱ्याची वाडी येथे घडली. पोलिस पथकाने अवघ्या आठ तासांतच संशयित आरोपीला जेरबंद करून न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

काळुस्ते जवळील दऱ्याची वाडी येथे २२ मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी एकनाथ पांडू गावंडा (वय २१) याने कृष्णा सोमा भले (वय २२, रा. निरपण) यास तू माझ्या पत्नीला फशाबाईचा हात धरून तुझ्या मोटरसायकलवर का बसवले या कारणाची कुरापत काढली. कृष्णा भले यास धक्काबुक्की व शिवीगाळ केली. तसेच कृष्णा भले यास ढकलल्याने जमिनीवर पडून दगडाचा मार डोक्याला लागून त्यात तो जागीच मृत झाला.

या घटनेची फिर्याद बाबू मनाजी भले यांनी इगतपुरी पोलिस ठाण्यात दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुभाष पाटील, पोलिस कर्मचारी विनोद गोसावी, गणेश वराडे, राहुल पगारे, दराडे, राठोड आदी पोलिस पथकांनी त्वरित आरोपीचा शोध घेण्यासाठी धाव घेतली. संशयित आरोपीने या घटनेनंतर घटनास्थळावरून पळ काढला होता. खबऱ्याच्या सांगण्यावरून काळुस्ते येथील जि. प. शाळेच्या मागे लपून बसलेल्या संशयित आरोपी एकनाथ गवांडा यास जेरबंद करण्यात अखेर पोलिसांना यश आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शन खाते उघडण्यास नकार

$
0
0

बँक ऑफ महाराष्ट्राची आडगाव शाखा अनेक दिवसापासून कोणार्क नगर परिसरात कार्यरत आहे. या परिसरात शेकडो निवृत्त पेन्शनधारकांचे वास्तव्य आहे. मात्र, त्यांचे खाते उघडण्यास बँक ऑफ महाराष्ट्राच्या आडगाव शाखेने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना बँकेच्या मुख्य आणि अन्य शाखांमध्ये जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

कोणार्कनगर परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांचे पेन्शन खाते बँकेच्या शहरातील मध्यवर्ती भागातील शाखांमध्ये आहे. आपल्या परिसरात बँक ऑफ महाराष्ट्रची आडगाव शाखा आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना आनंद झाला. त्यांनी बँकेच्या आडगाव शाखा व्यवस्थापकांची भेट घेऊन पेन्शन खाते उघडण्यासाठी विनंती केली. मात्र, लाल फितीमधील कारभारात फसलेल्या बँक कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता दिल्या. आम्हाला बँकेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून पेन्शनधारकांची खाती उघड्यासंदर्भात अद्याप परवानगी मिळालेली नाही. तसेच आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याचेही कारण बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पुढे केले. त्यामुळे पेन्शनधारकांचा हिरमोड झाला आहे. अन्य बँकेच्या कामांसाठी देखील कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळण्याऐवजी ज्येष्ठ नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याची ज्येष्ठ नागरिकांची तक्रार आहे. बँक आपल्या शाखेत स्वत:हून येणाऱ्या ग्राहकांना अशी बेजबाबदारपणाची वागणूक कशी काय देऊ शकते? यातून बँकेचा व्यवसाय वाढण्याऐवजी कमी होण्याची शक्यता अधिक असल्याचे मत आडगाववासीयांनी मांडले आहे.

प्रवास बनतोय जिकिरीचा वयाची ६५ वर्षे पार केलेल्या आणि शारीरिक क्षमता कमी झाल्यामुळे हतबल असलेल्या पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिकांना शहरातील बँकेत जाण्यासाठी सातत्याने वाहतुकीची वर्दळ सुरू असलेला महामार्ग ओलांडण्याचा धोका पत्करावा लागतो. जत्रा चौफुली ओलांडून बस किंवा रिक्षा पकडून प्रवास करणे त्यांना जिकिरीचे होते. आपल्या घराजवळच बँकेची शाखा उपलब्ध झाल्यास उतारवयात होणारी दगदग कमी होऊ शकेल, अशी मागणी त्यांनी मांडली आहे.

आमच्या शाखेत राज्य कर्मचाऱ्यांच्या पेन्शन खात्याच्या मायकर नंबरची समस्या आहे. आम्ही बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. याशिवाय शाखेत मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे आमचा नाईलाज आहे. - पी. एल. तायडे, शाखाधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र, आडगाव

जत्रा चौफुली दररोज अनेक छोटे मोठे अपघात होतात. त्यामुळे आम्हाला महामार्ग ओलांडून जाणे अवघड आहे. स्थानिक बँक शाखेत पेन्शन मिळाली तर आमच्यासाठी सोयिस्कर होऊ शकेल. - गोविंद वाडेकर, स्थानिक ज्येष्ठ नागरिक

आमच्या घराजवळ शाखा असून देखील आम्हाला कित्येक किलोमीटर पेन्शन घेण्यासाठी शहरातील मुख्य शाखेत जावे लागते. आम्हाला कोणार्कनगर शाखेमध्येच पेन्शन उपलब्ध झाली तर आमचा त्रास कमी होईल. - किशोर पेटकर, स्थानिक ज्येष्ठ नागरिक

आमच्या उतार वयाचा विचार करता बँक कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांची समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावा. तसे झाल्यास शहरातील मुख्य शाखेत जाण्यासाठी होणारी दगदग टळू शकेल. - पंढरीनाथ जगदाळे, स्थानिक ज्येष्ठ नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

$
0
0

फ्लॅट विक्री व्यवहारात भंडारा जिल्ह्यातील महिलेची २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रविवार पेठेतील डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात ४२० कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे.

नीलिमा कापसे (४१, पंचायत समितीमागे, सरदार सॉ मिलजवळ, भंडारा) यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. नारायण मुरलीधर येवलेकर (५४, रा. लोणार गल्ली, रविवार पेठ, नाशिक) आणि त्यांची पत्नी डॉ. रोहिणी यांचा जेलरोडवरील बिशप हाऊससमोर आनंद विजय संकुलमध्ये पाचव्या मजल्यावर ५८ क्रमांकाचा फ्लॅट आहे. त्याच्या विक्रीचा व्यवहार नीलिमा कापसे यांच्याशी झाला. या फ्लॅटवर कोणताही बोजा किंवा कर्ज नाही असे त्यांनी कापसे यांना सांगून २९ लाख रुपयांना विकला.

बोजाची २७ लाखांची रक्कम निकाली काढून देतो, असे आश्वासन २७ नोव्हेंबर २०१३ पासून आजपर्यंत देत राहिले. मात्र, बोजा कमी करून दिला नाही. त्यामुळे डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या आमिषाने फसवणूक

$
0
0

कोल्हापूरमधील शिक्षण संस्थेमध्ये ‌विविध पदांच्या भरतीसाठी थेट मुलाखतीला येण्याचे आवाहन करणारी जाहिरात प्रसिद्ध करून आलेल्या हजारो इच्छुक उमेदवारांकडून प्रत्येकी १०० ते २०० रुपये उकळण्याचा प्रकार सिडको परिसरात सोमवारी उघडकीस आला. काही जागरुक तरुणांनी या प्रकाराविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, फसवणूक झालेल्या तरुणांनी अंबड पोलिस स्टेशनबाहेर दुपारी उशिरापर्यंत गर्दी करीत संबंधितांवर कारवाईची मागणी केली.

दोन दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रात कोल्हापूर येथील महर्षी शाहू राजे शिक्षण संस्थेच्या नावाने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यात संस्थेला प्राथमिक उपशिक्षक, माध्यमिक उपशिक्षक, क्रीडा शिक्षक, चित्रकला उपशिक्षक, लिपिक, शिपाई यासारखे अनेक पदे भरावयाची असून थेट मुलाखतीला येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी सकाळी नाशिकबरोबरच धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर या जिल्ह्यातील हजारो इच्छूक उमेदवार महाराणा राणाप्रताप चौकातील या संस्थेच्या कार्यालयाजवळ हजर झाले. यावेळी सुरुवातीला संस्थेकडून प्रत्येकाकडून १०० रुपये घेवून त्यांना एका फॉर्मचे वाटप करण्यात आले. हा फॉर्म भरून दिल्यानंतर मुलाखत घेतल्याचे खोटे दर्शविण्यात आले. मात्र, हा सर्व प्रकार खोटा असल्याचा संशय काही जणांना आला. त्यांनी संस्थेची माहिती विचारण्यात सुरुवात केली. मात्र, संस्थेच्या उपस्थित कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे उपस्थितांचा संशय बळावला. अखेरीस यातील काही जणांनी थेट अंबड पोलिस ठाण्यात नोकरीच्या नावाने तरुणांची फसवणूक केली जात असल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संस्थेच्या तेजल गोसावी, तुषार गोसावी, हेमंत वेलीस यांच्यासह अन्य एका व्यक्तीला ताब्यात घेतले. यानंतर सर्व इच्छुक उमेदवारही अंबड पोलिस स्टेशनला जमा झाले.

यावेळी पोलिस स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला. संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्याची तसेच मुलाखतीच्या नावाखाली घेतलेले पैसे परत मिळावे, अशी मागणी तरुणांनी केली.

सुरुवातीला १०० रुपयांना देण्यात आलेले फॉर्म नंतर २०० रुपयांना विकण्यात आले. त्यामुळे ही निव्वळ फसवणूकच असल्याचे लक्षात येते. मुलाखतीला बोलावून त्यानंतर फॉर्म भरून घेण्याची कोणती पद्धत आहे? - अशोक पाडवी

वृत्तपत्रात आलेली जाहिरात वाचून नोकरीच्या आशेने आलो. परंतु, त्या ठिकाणी आमचे कागदपत्र घेऊन मुलाखत न घेता केवळ १०० रुपये घेऊन एक फॉर्म भरून घेतला. हा प्रकार फसवणुकीचा असून केवळ पैसे उकळले जात आहेत. पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करून आमचे पैसे व कागदपत्र परत मिळवून द्यावेत. - सोनिया देशमुख

शिक्षण संस्थेत नोकरी मिळेल या हेतूने आम्ही थेट मुलाखतीला आलो. पण या ठिकाणी आल्यावर फॉर्म फी मागण्यात आली. तसेच संस्थेविषयी माहिती विचारल्यावर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. पोलिसांनी या प्रकाराची सखोल चौकशी करावी व न्याय मिळवून द्यावा. - सुवर्णा राऊत

महर्षी राजे शाहू शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित मुलाखतीप्रसंगी पावती न देता १०० ते २०० रुपये घेण्यात आले. पावती व शाळेबद्दल विचारल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली. यावरून केवळ फसवणूक करणे हाच यांचा उद्देश असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणाची कायदेशीर चौकशी व्हावी. - योगेश गांगुर्डे, डीएड-बीएड बेरोजगार संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता विद्यार्थ्यांना गणवेश घरपोच

$
0
0

मोफत गणवेशासाठी पैसे स्वीकारताना आर्थिक परिस्थितीचा न्यूनगंड विद्यार्थ्यांच्या मनाला शिवू नये, यासाठी २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना घरपोच गणवेश देण्याच्या उपक्रम महापालिका शिक्षणसमितीमार्फत आखण्यात आला आहे. येत्या ६ जूनला प्राथमिक शाळा सुरू होणार असून पहिले आठ दिवस म्हणजे ६ ते १३ जूनपर्यंत हा उपक्रम राबविला जाणार आहे.

सर्व शिक्षा अभियानांतर्गत महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन गणवेशासाठी ४०० रुपये दिले जातात. सर्व मुली व अनुसूचित जमाती, द्रारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) मुले यांना या योजनेचा लाभ मिळतो. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना शाळेत असे पैसे घेताना आर्थिक परिस्थितीविषयी न्यूनगंड निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ६ ते १३ जून या कालावधीत प्रत्येक विद्यार्थ्याची गृहभेट घेऊन पालकांसमक्ष गणवेश सुपूर्द करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीमार्फत हा उपक्रम राबविला जाणार असल्याने कोणावरही या उपक्रमाचा जादा भार येणार नसल्याचे समितीमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांपर्यंत या उपक्रमाचे नियोजन करण्यासाठी पुढील आठवड्यात मुख्याध्यापकांची बैठकही होणार आहे. या अंतर्गत पहिली ते आठवीच्या २५ हजार विद्यार्थ्यांना घरपोच गणवेश मिळू शकणार आहे. तसेच शाळा प्रवेशोत्सवाच्या दिवशी म्हणजेच पहिल्याच दिवशी पुस्तके वाटण्यात येणार असून १३ जूनपर्यंत पटनोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे.

सात हजार विद्यार्थ्यांनाही लाभ सर्व शिक्षा अभियानांतर्गत मिळणाऱ्या मोफत गणवेश योजनेपासून जनरल, एनटी व ओबीसी संवर्गातील विद्यार्थीवर्ग वंचित होता. मात्र, या शैक्षणिक वर्षापासून या विद्यार्थ्यांनाही मोफत गणवेशाचा लाभ मिळावा, यासाठी महापा‌लिकेच्या २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. यानुसार या गटातील सात हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. मात्र, ही प्रक्रिया शिक्षणसमितीच्या अखत्यारित नसल्याने हे गणवेश वाटप कधीपर्यंत होतील, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

अंमलबजावणीमध्ये अडथळे घरपोच गणवेशाचा उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले असले तरी ही प्रक्रिया सत्यात उतरविण्यासाठी अनेक आव्हाने आहेत. शाळांकडे विद्यार्थ्यांचे रहिवासी पत्ते नसण्याची समस्या मोठी आहे. शिवाय, अनेक विद्यार्थ्यांचे पालक मजूर, बांधकाम कामगार असल्याने पालकांच्या रोजगारासाठी त्यांना स्थलांतर करावे लागते. अशा विद्यार्थ्यांपर्यंत गणवेश घरपोच इतक्या कमी कालावधीत मिळणार का? अशी शंका महापालिकेच्याच शिक्षकांकडून उपस्थित केली जात आहे.

राज्यात केवळ नाशिकमध्येच अशा स्वरुपाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळावेत व त्यांना कमीपणा वाटू नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. - उमेश डोंगरे, प्रशासनाधिकारी, महापालिका शिक्षण समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नीट’ला नो ऑप्शन!

$
0
0

'नीट'ची सक्ती टाळण्यासाठी पालक अन् विद्यार्थ्यांनी जिवाचे रान केले असले, तरीही मेडिकलला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी या परीक्षेला यंदाही अन्य पर्याय नसल्याचे चित्र स्पष्ट आहे. गर्व्हेन्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशाचे स्वप्न न बघता खासगी किंवा अभिमत कॉलेजमध्ये प्रवेशासाठी एका पायावर तयार असणाऱ्यांना 'नीट'च्या दिव्यातून यंदाच्याही वर्षी जावेच लागणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे १९ हजार विद्यार्थीही याच प्रक्रियेचा भाग बनणार आहेत.

मेडिकलला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांवरील 'नीट'ची टांगती तलवार टाळण्यासाठी अखेरीला केंद्र सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला असला तरीही अद्याप कायदेशीर खुलाशासाठी तो अध्यादेश राष्ट्रपतींच्या औपचा‌रिक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे अध्यादेश निघाला, असे स्पष्टही म्हणता येत नाही. त्यातही हा अध्यादेश हाती पडला तरीही केवळ गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजेसनाच राज्याची 'सीईटी' परीक्षा लागू असणार आहे. इतर खासगी मेडिकल कॉलेजेस किंवा डिम्ड युनिव्हर्सिटीसाठीचे प्रवेश केवळ 'नीट'द्वारेच होणार असल्याचेही संभाव्य अध्यादेश स्पष्ट सांगतो.

गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये वैद्यकीय व दंतवैद्यकीय प्रवेशांसाठी २८१० जागा आहेत. तर राज्यातील प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसकडे १७२० आणि डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये १६७५ याप्रमाणे खासगी ३३७५ जागा उपलब्ध आहेत. गव्हर्न्मेंट जागांवर 'सीईटी'ची मोहोर असेल तर खासगी जागांवर केवळ 'नीट'ची मोहोर असणार आहे. राज्यातील सुमारे २ लाख विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली आहे. यातून सरकारी २८१० जागा सोडल्यास उर्वरित साडेतीन हजार खासगी जागांसाठी या लाखो विद्यार्थ्यांना आता २४ जुलै रोजी होणारी 'नीट' सक्तीचीच राहणार आहे.

एकुलते एक गव्हर्न्मेंट कॉलेज नाशिकमधून यंदा १९ हजारावर विद्यार्थ्यांनी 'सीईटी' दिली. तर नाशिकसह नगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांसाठी धुळ्यामध्ये एकुलते एक मेडिकल कॉलेज आहे. या पाठोपाठ 'एमबीबीएस'साठी पाच आणि बीडीस (दंत वैद्यकीय) साठी सुमारे पाच खासगी कॉलेजेस उपलब्ध आहेत. इतर मेडिकल अभ्यासक्रमांसाठी सीईटीव्दारे प्रवेश होतील.

'नीट'च्या कसोटीवर परीक्षा उत्तर महाराष्ट्रात धुळ्यात दोन मेडिकल कॉलेजेस आहेत. पैकी भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज हे गव्हर्न्मेंटचे तर एसईपीएम हे मेडिकल कॉलेज खासगी आहे. अहमदनगरमध्ये विठ्ठलराव विखे फाऊंडेशनचे मेडिकल कॉलेज, जळगावमध्ये गोदावरी फाऊंडेशनचे मेडिकल कॉलेज व नाशिकमध्ये डॉ.वसंतराव पवार मेडिकल कॉलेज, घोटीमध्ये (इगतपुरी) एसएमबीटी असे पाच मेडिकल कॉलेजेस आहेत. शिवाय बीडीएससाठीही उत्तर महाराष्ट्रात पाच मेडिकल कॉलेजेस आहेत. येथील प्रवेशासाठी 'नीट'ची कसोटी असणार आहे. या खालोखाल आयुर्वेद व होमिओपॅथीचीही कॉलेजेस आहेत.

एसएमबीटीचे प्रवेश मान्यतेच्या फेऱ्यात? वैद्यकीय अभ्यासक्रम चालविणाऱ्या कॉलेजेसना विद्यापीठाच्या संलग्नते सोबतच मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचीही मान्यता हवी असते. दोन वर्षांपूर्वी घोटी (इगतपुरी) मधील एसएमबीटी कॉलेजच्या प्रवेशांना मान्यता दिली नव्हती. यामुळे तेव्हा ते कॉलेज चर्चेत आले होते. गतवर्षी या मान्यतेसह प्रवेश सुरळीत झाले होते. यंदा मात्र अद्यापही एमसीआयने प्रवेशांना परवानगी दिलेली नाही. त्यामुळे दोन वर्षांपूर्वीच्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, अशी धास्ती विद्यार्थी अन् पालकांच्याही मनात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोपाळहून टेकऑफ; नाशिकला गुडबाय!

$
0
0

उपलब्ध विमानाने भोपाळ-रायपूर-पुणे सेवा सुरू

Bhavesh.brahmankar @timesgroup.com

नाशिक : मुंबई-नाशिक-मुंबई विमानसेवेसाठी एअर इंडियाने उपलब्ध करून दिलेले ATR-72-600 हे विमान आता भोपाळ-रायपूर-पुणे या सेवेसाठी वापरण्यात आले आहे. मुंबई विमानतळावर वेळ मिळत नसल्याने (एअर स्लॉट) नाशिकची विमानसेवा सुरू होऊ शकली नाही. आता हेच विमान अन्य ठिकाणासाठी वापरले जाणार असल्याने नाशिक विमानसेवा अधांतरीच राहणार असल्याचे दिसून येत आहे.

असंख्य अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर नाशिकहून विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात एअर इंडियाने पुढाकार घेतला. एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एअर अलायन्सद्वारे मुंबई-नाशिक-मुंबई ही सेवा सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले. त्यासाठी ATR-72-600 हे विमानही उपलब्ध करण्यात आले. नाशिकसोबतच हुबळी, पुणे आणि मुंबई या शहरांसाठीच्याही सेवा सुरू करण्याचे एअर इंडियाने निश्चित केले. त्यानुसार नाशिकसेवेसाठी मुंबई विमानतळावर वेळेची मागणी केली. मात्र, मुंबई विमानतळ टर्मिनलचा सांभाळ करणाऱ्या जीव्हीके कंपनीने वेळ उपलब्ध होणार नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे नाशिक विमानसेवेचे टेक ऑफ होता होता लँडिग झाले. हवाई वेळच नसल्याने सेवा सुरू होण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली. यासंदर्भात संसदेमध्येही प्रश्न उपस्थित करण्यात आला. अखेर ही सेवा सुरू होण्याची कुठलीही चिन्हे नसल्याने एअर इंडियाने ATR-72-600 या विमानाची सेवा भोपाळ-रायपूर-पुणे या मार्गावर देण्याचे निश्चित केले आहे. म्हणूनच २३ मे पासून सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस या विमानाद्वारे सेवा सुरू झाली असून, त्याचे बुकिंगही सुरू आहे. त्यामुळे नाशिकसाठी राखीव विमानही आता अन्य मार्गासाठी गेल्याने नाशिकची विमानसेवा सुरू होण्याबाबत संदिग्धता आहे.

अडथळ्यांची शर्यत

टर्मिनलची सुविधा नाही टर्मिनलचे हस्तांतरण नाही विमान कंपन्यांचा प्रतिसाद नाही नाशिक विमानतळ हवाई नकाशावर नाही टर्मिनचा सांभाळ करणारे कुणी नाही लहान आसनी विमानांना प्रतिसाद नाही एअर इंडियाला विमान उपलब्ध नाही विमान उपलब्ध झाले पण पायलट नाही मुंबई विमानतळावर वेळेची अनुपलब्धता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवतारी पुरुषाने लुबाडले ४६ लाख

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

'मी अवतारी पुरुष असून, माझ्या मंदिरात खेटा मारल्यास तुझा उत्कर्ष होईल. तुझ्या जमिनीत देव असून, ते कोपलेले आहेत. तुला ती जमीन विकावी लागेल,' असे सांगून एका भोंदू बाबाने घोटी येथील युवकास ४६ लाखांचा गंडा घातला. याबाबत युवकाने पोलिसांत तक्रार केल्यानंतर भोंदूबाबासह पाच जणांविरुद्ध घोटी पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा विरोधी प्रतिबंधक कलमासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी तालुक्यातील धामणी येथील रहिवासी ज्ञानेश्वर बहिरू भोसले या युवकाने घोटी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. विल्होळी येथील भगतबाबा नवनाथ निंबा महाले (रा. वाढोली) यांचा वाढोली येथे मठ आहे. 'मी दत्ताचा अवतार आहे' असे सांगून मठात वेळोवेळी खेटा मारण्यास सांगितले. गेल्या आठ वर्षापासून बाबाने भगतगिरी करून अंगारे, धुपारे करीत ज्ञानेश्वरची २००८ पासून ४६ लाख रूपयांची आर्थिक पिळवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत ज्ञानेश्वर भोसले याने घोटी पोलीसात भगत बाबा नवनाथ (अण्णा) निंबा महाले (रा. विल्होळी), रामदास नथू धोंगडे, बबन बाबर, पोपट रामदास धोंगडे व अन्य एक अशा या पाच संशय‌िता विरोधात महाराष्ट्र जादूटोणाविरोधी प्रतिबंधक कायदातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोल‌िस निरीक्षक प्रभाकर पाटील करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळीत टाकल्याने मुस्लिम कुटुंबांची होरपळ

$
0
0

लखन सावंत, कॉलेज क्लब रिपोर्टर

राज्यातील भटक्या विमुक्त आणि आदिवासी समाजातील जातपंचायती 'जाच'पंचायती ठरू लागल्याने ही व्यवस्था मोडून काढण्यासाठी 'जातपंचायत विरोधी मूठमाती अभियान' राबविले गेले. यामुळे अनेक जातपंचायती बरखास्त झाल्या. मात्र मुस्लिम समाजातील जातपंचायतीही 'जाच'पंचायत ठरत असल्याचा प्रकार समोर आला आहे. बागलाण तालुक्यातील वाघळे गावात दोन मुस्लिम कुटुंबांना पिंजारी जातपंचायतीने तीन वर्षांपासून वाळीत टाकल्याने या कुटुंबाची होरपळ होत असून, सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही त्यांना सहभागी करून घेतले जात नसल्याची तक्रार या कुटुंबीयांनी सोमवारी पोलिसांत दाखल केली आहे.

बागलाण तालुक्यातील वाघळे गावात मेहबूब उस्मान पिंजारी व रुस्तम यासीन पिंजारी यांचे कुटुंब राहते. महेबूब पिंजारी हे या गावचे जावई आहेत. आजूबाजूच्या गावांत पिंजारी समाजाची मांसविक्रीची दुकाने व गादी भरण्याची दुकाने आहेत. २०१४ मध्ये गावातील मांसविक्री दुकानाचा ठेका मेहबूब पिंजारी यांनी घेतला होता. सदरील ठेका जातपंचायतीतील व्यक्तीला मिळावा या कारणावरून पिंजारी जातपंचायत व पीडित कुटुंब यांच्यात वाद निर्माण झाला. वाद मिटविण्यासाठी मेहबूब पिंजारी यांचे सासरे रुस्तम पिंजारी यांनी मध्यस्ती केली. परंतु, त्यांचे कोणत्याही प्रकारचे म्हणणे न ऐकता जातपंचायतीचे पंच नवाब पिंजारी, रहेमान पिंजारी, उस्मान पिंजारी, नीहाल पिंजारी, हारून पिंजारी, शिराज पिंजारी यांनी त्यांना वाळीत टाकले. त्यांना समाजातील विवाह, धार्मिक कार्यक्रम, सण-उत्सवापासून दूर ठेवले जाऊ लागले. याचदरम्यान पीडित कुटुंबाला जातपंचायतीतील काहींनी घरात घुसून मारहाण झाली होती. याबाबत पोलिसांत तक्रार गेेल्यानंतर मार्च महिन्यात गावातील तंटामुक्त समितीने हा वाद मिटविला. परंतु, काही दिवसांपूर्वी महेबूब पिंजारी यांना ग्रामपंचायतीने राहण्यासाठी दिलेली जागा जातपंचायतीची असल्याचे कारण देत ती जागा सोडण्याबाबत धमकविल्याने हे कुटुंब भेदरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

धुळे : तालुक्यातील आंबोडे येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

दरम्यान येथील अनिल सरग (वय ३५) या शेतकऱ्याने सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेला असता त्याठिकाणी विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार जवळच असलेल्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी उपचाराससाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केला असता मृत घोषीत केले. अनिल सरग यांच्या पश्चात पत्नी, तीन वर्षांची मुलगी असा परिवार आहे. सततच्या नापिकी आणि दुष्काळामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडू न शकल्याने आत्महत्या केली असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘…तर पालिकेचे मोठे नुकसान झाले असते’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

घरकुल योजनेचे काम थांबविले असते तर जळगाव नगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असते हे म्हणणे खरे आहे, अशी माहिती उलटतपासणीत तत्कालीन मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांनी दिली. मंगळवारी जळगाव घरकुल घोटाळ्याच्या उलटतपासणीत संशयीतांच्या वकीलांनी जावळीकर यांना चांगलेच गोंधळात आणले होते.

यात घरकुल योजनेप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपींनी जे कृत्य केले आहे. तेच कृत्य या गुन्ह्यामध्ये तुम्हीपण केले असल्याने तुम्हीदेखील गुन्हेगार आहेत, असे तुम्हाला वाटत नाही का? असा सवाल संशयीत वासुदेव सोनवणे, सुभद्राबाई नाईक, शिवचरण ढंढोरे व इतर संशयीतांचे वकील जितेंद्र निळे यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना या खटल्यातील साक्षीदार तत्कालीन जळगाव नगरपालिका मुख्याधिकारी धनंजय जावळीकर म्हणाले हे खरे नाही खोटे आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वेडिंग टाइम्स स्वयंवर’ रविवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक विवाहेच्छुक वधू-वरांना अपेक्षित जोडीदाराची निवड करता याव, या उद्देशाने 'टाइम्स ग्रुप'तर्फे रविवारी (दि. २९) मराठा समाजातील वधू-वरांसाठी 'वेडिंग टाइम्स स्वयंवर' या खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कॉर्पोरेट कल्चरच्या जमान्यात विवाह जमविण्याचे सोपस्कार विरळ होत आहेत. अलीकडे मॅट्रोमेनियल एजन्सीजतर्फे खास उपवर वधू-वरांची मने जुळविली जात आहेत. त्याच अनुषंगाने सावरकरनगर, गंगापूररोड येथील विश्वास लॉन्स येथे रविवारी दुपारी ४ वाजेपासून 'वेडिंग टाइम्स स्वयंवर' भरणार आहे. मागील वधू-वर मेळाव्याला उत्तम प्रतिसाद मिळून अनेक विवाह जमले आहेत. मेळाव्यानंतरसुद्धा लग्न जमविण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. या मेळाव्यात वधू-वरांची मोफत यादी दिली जाणार आहे. मेळाव्यात 'अनुपमशादीडॉटकॉम'च्या माध्यमातून नोंदणी झालेल्या सदस्यांना सहभागी होता येईल. तसेच, कार्यक्रमाच्या ठिकाणीदेखील सदस्यांना नोंदणी करून सहभागी होता येणार आहे. मेळाव्यात मुंबई, पुणे आणि नाशिकचे वधू-वर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये उपवर वधू-वरांना आपली ओळख सांगून जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा व्यक्त करता येणार आहेत. मराठा समाजाच्या उपवर वधू-वरांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जोडीदार निवडता येणार आहे. यात ग्रॅज्युएट, डॉक्टर, इंजिनीअर, डिप्लोमा, डिग्री, डॉक्टरेट, आयटी सेक्टर अशा विविध क्षेत्रांतील उच्चशिक्षित उमेदवार सहभागी होणार आहेत. या वधू-वर मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून, नोंदणीसाठी अनुपमशादीडॉटकॉम,‌ शीतल कॉम्प्लेक्स, अंजली प्लायवूडच्या मागे, द्वारका, नाशिक (मोबाइल- ८३७८९१०९९९ / ८२७५०१६५०१) येथे संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images