Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

राष्ट्रवादी, मनसेला शिवसेनेकडून खिंडार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपले धक्कातंत्र कायम ठेवले असून, शहराप्रमाणेच ग्रामीणमध्येही ताकद वाढविण्याचे काम सुरू केले आहे. शहरातील मनसे, राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांना गळाला लावल्यानंतर सिन्नरमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार पाडले आहे. सिन्नर नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक, सिन्नर पंचायत समितीतील राष्ट्रवादीचे गटनेते उदय सांगळेंसह आठ सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला असून, त्यात त्र्यंबकेश्वरमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम वाजायला लागताच शिवसेना आक्रमक झाली आहे. इतर पक्षांतून पदाधिकारी व उमेदवारांना आयात करण्याचा सिलसिला सुरू केला आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांनी मंगळवारी सिन्नरमध्ये राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला. सिन्नरमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक विजय जाधव, शैलेश नाईक, मनोज भागत, राजेंद्र घोरपडे, प्रमोद चोथवे, नगरसेविका वैजयंती बर्डे, शुभांगीताई झगडे, पुष्पलता लोणारे अशा आठ जणांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला, तर सिन्नरमधील राष्ट्रवादीचे बडे नेते व पंचायत समितीतील गटनेते उदय सांगळे यांच्यासह पंचायत समितीचे आठ सदस्य शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे सिन्नरमधील राष्ट्रवादी जवळपास नामशेष झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर व सिन्नर तालुक्यातील पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी शिवसेना भवनात शिवबंधव बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यात त्रंबकेश्वरचे मनसे तालुकाप्रमुख नामदेव चव्हाण, मनसे वाहतूक सेना तालुकाप्रमुख समाधान आहेर, संघटक पंडित चव्हाण यांचा समावेश आहे. सहकार राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते या वेळी उपस्थित होते.

आव्हाडांना अपशकुन

नाशिक राष्ट्रवादीच्या प्रभारीपदी आमदार जितेंद्र आव्हाड यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. आव्हाड यांचे होमटाऊन हे सिन्नर असून, त्यांच्या नियुक्तीने सिन्नरमध्ये राष्ट्रवादीचे बळ वाढणे अपेक्षित होते. मात्र, राष्ट्रवादीचे बळ वाढण्याऐवजी सिन्नरमध्ये राष्ट्रवादीच नामशेष झाली आहे. त्यामुळे हा आव्हाडांसाठी अपशकुन असल्याची चर्चा आहे. सिन्नरमध्ये आव्हाडांच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच, दुसरीकडे सांगळे यांनी पूर्ण राष्ट्रवादीच शिवसेनेत विलीन केल्याने आव्हाडांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेला शिंगेच नाहीत; ते नाठाळ बैल:भाजप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

शिवसेना पाण्यावरून राजकारण करीत आहे. राज्यात भाजपसोबत राहूनही जर विरोधच करायचा असेल तर सत्ता सोडा. शिवसेनेला गटबाजीने पोखरलेले आहे. शिंगावर घेण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनाला शिंगेच शिल्लक राहिले नाहीत, ते नाठाळ बैल आहेत, अशा प्रकारची टीका भाजपच्या मध्य पश्चिम मंडळाच्या विकास पर्व २०१६ च्या कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आल्या.

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या मेळाव्यास भाजप शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते, सुनील बागूल, प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे, सुरेश पाटील, माजी आमदार निशिगंधा मोगल, ताई कुलकर्णी आदी उपस्थित होते. सानप म्हणाले, महापालिकेत मनसेची सत्ता असताना खत प्रकल्प बंद पडला आहे. घंटागाड्या वेळेवर येत नाहीत. फाळके स्मारक, बौद्ध स्मारक दुर्लक्षित झाले आहेत. अशा परिस्थिती नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यासाठी शासनाने दोन वर्षांत राबविलेल्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्याचे काम करावे.

गीते यांनी शासनाने राबविलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करावे, असे सांगून शिवसेनेला शिंगेच राहिली नाहीत. ते नाठाळ बैल आहेत. अशी टिका केली. प्रा. फरांदे यांनी केंद्र शासनाने राबविलेल्या योजनांची माहिती दिली. साने यांनी भाजपला अनुकूल परिस्थिती असल्याचे सांगितले. शिंगावर घेणाऱ्यांकडे शिंगेच कुठे शिल्लक आहेत. नवनिर्माण करण्याचे सांगणाऱ्यांचे आव्हान संपुष्टात आले असल्याचे त्यांनी म्हंटले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ उपकेंद्रांची जागा ही धुळे महानगरपालिकेने मोफत देण्याचा ठराव करून शासनस्तरावर पाठविला होता, मात्र नुकताच हा ठराव निलंबित करून मनपा प्रशासन आणि राज्य सरकार हे विद्यार्थी विरोधी असल्याचे दाखवून देत आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनप्रसंगी प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफी मिळण्याची मागणी केली आहे. परंतु ही रक्कम काही विद्यार्थ्यांना परत मिळालेली नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तसेच मागावर्गीय विद्यार्थ्यांची गेल्या दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती थकीत असून, त्याअभावी विद्यार्थ्यांचे शोषण होत आहे. आंदोलनात संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष यशवर्धन कदमबांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सत्यजित सिसोदे, शहराध्यक्ष कांतीलाल दाळवाले, मयूर ठाकरे, सचिन आखाडे, कुणाल पवार, संदीप हजारे आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा लोणचे महागात पडणार!

$
0
0

अवकाळीच्या फटक्याने कैऱ्यांचे भाव वधारले

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

येथील आठवडा बाजारात लोणच्याच्या कैऱ्या विक्रीसाठी दाखल झाल्या असून महिलांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. पहिल्या पावसानंतर ग्रामीण भागात लोणचे भरण्यात येते. एकीकडे वरूणराजाने आपले आगमन दिवसेंदिवस लाबंविल्याने महिलांनी आता पहिल्या पावसाची वाट न पाहता लोणच्याच्या हंगामाला प्रारंभ केला आहे. त्यातच यंदा कैऱ्यांचे उत्पादन कमी प्रमाणात असल्याने कैऱ्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.

बागलाण तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्टा हा कैऱ्यांचे आगार समजले जाते. कोकणी भागातील आदिवासी भागातील कैरीला सटाणा शहरात मोठ्या प्रमाणात मागणी असते. ग्रामीण भागात व शेतकरी कुटुबांत आजही लोणच्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. घरात पंचपक्वानांचे स्वादिष्ट भोजन असले तरीही लोणच्याशिवाय या सुग्रास भोजनाला स्वाद येत नाही. यामुळे घरोघरी लोणचे घातले जाते. साल्हेर मुल्हेरच्या आदिवासी कोकणातील टोकापासून तर थेट डांगसौंदाणे भागापासून कळवण, अभोणा, कनाशी, दळवट भागातील गावठी व इतर लोणच्यासाठी असणारी कैरी विक्रीसाठी सटाण्यात दाखल होऊ लागली आहे. येथील बाजारपेठेतील बाजारात कैरीचे गाडे दाखल होत आहेत. कैरीचे आकारमान, गर तसेच चव यावर कैरीचे भाव ठरविले

जावू लागले आहेत.

या वर्षी भावात तेजीचे असुन किमान ४०० ते १००० हजार रुपये शेकडा या भावाने कैरी खरेदी होऊ लागली आहे. यामुळे जसा माल तसा भाव या गणितावर कैरीचे दर ठरत आहेत. कैरी विकत घेतांनाचे पद्धत ही शेकडा असली तरीही सहा कैऱ्यांचा एक फड ही पूर्वापार चालत आलेली ग्रामीण भागातील पद्धत आजही कायम आहे. प्रत्येक कुटुंबिय आपापल्या कुटुंबाच्या गरजेनुसार कैरी खरेदी करीत आहे. लोणचे बनविण्यासाठी आवश्यक लाल मिरची, मसाले यांचे देखील भाव कडाडले असुन दालचिनी, बडीशेप, लवंग, मिरी, वेलदोडा, राई, मोहरी, मीठ व शुद्ध शेंगदाणा तेल या साठीचे दर देखील वाढल्याने तोंडाला चव देणारे लोणचे यावेळी आबंट झाले आहे. लोणचे भरण्यासाठी राजस्थान येथून बनविलेले च‌िनीमातीची गोल बरणी देखील बाजारात व्रिकीसाठी दाखल झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीचोरी रोखण्यासाठी आता व्ह‌िजिलन्स स्कॉड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर तालुक्यासाठी सोडण्यात आलेले पाणी चेहेडी येथील बंधाऱ्यातून चोरीस जात असल्याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. पाणीचोरी रोखण्यासाठी व्हिज‌िलन्स स्कॉड नेमतानाच कृषी पंपांचा विद्युत पुरवठा दररोज २२ तास खंड‌ित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिन्नर तालुक्याला दुष्काळाची दाहकता अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे. वाड्या-वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला, तरी तालुकावासियांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. मान्सूनची चिन्हे नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुकावासियांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यातून सिन्नरसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु, वहनमार्गातील शेतकऱ्यांकडून अवैध उपसा होऊ लागला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत मोहिते यांच्यासह पाटबंधारे, महावितरण, कृषी यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. उपलब्ध पाणी जुलैअखेरपर्यंत पुरविणे आवश्यक असल्याने पाणी चोरी कदापि सहन केली जाणार नाही असा इशारा या बैठकीत देण्यात आला. पाण्याच्या वहनमार्गावर दहा किलोमीटर परिसरात व्हिजिलन्स स्कॉड नेमण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. प्रत्येकी दोन किलोमीटरवर या स्कॉडची एक बॅच बंदोबस्तावर असणार आहे. पुरेसा पाऊस पडेपर्यंत या स्कॉडला कार्यरत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याखेरीज कृषीपंपांद्वारे पाण्याचा उपसा होऊ नये यासाठी दररोज किमान २२ तास विद्युत पुरवठा खंड‌ित करा असे आदेश महावितरण कंपनीला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरीत दोन गटांत दंगल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इगतपुरी
लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरुन इगतपुरीतील खालची पेठ भागात दोन गटांत तुफान हाणामारी झाली. ही दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोल‌िसांनी प्रयत्न केला असता जमावाने पोल‌िसांवरही दगडफेक केली. यात पोलिसांच्या वाहनाची काच फुटली असून, तीन पोलिस जखमी झाले आहेत.
जमावात झालेल्या हाणामारीत तलवारी, लोखंडी रॉड, लाकडी दांड्यांचा सर्रास वापर करण्यात आला. यात चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्नालयात दाखल केले आहे. दोन्ही गटांनी परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हाही दोन्ही गटांविरुध्द दाखल करण्यात आला आहे. यात आतापर्यंत चारजणांना अटक केली आहे. त्यांना कोर्टात हजर केले असता सहा दिवसांची पोल‌िस कोठडी देण्यात आली. दंगलीमुळे शहरात एकच घबराट पसरली असून, घटनास्थळी नाशिक येथीत दंगल नियंत्रण पथक रवाना झाले होते. अधिक तपास पोल‌िस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोल‌िस उपनिरीक्षक सुभाष पाटील, अर्चना कटके यांच्यासह पो. कॉ. विनोद गोसावी, आदी तपास करीत आहेत. दोन पल्सर चोरीस शहरातून दोन महागड्या पल्सर मोटारसायकली चोरट्यांनी लांबविल्या. यामध्ये एका नव्या कोऱ्या पल्सरचा समावेश आहे. याप्रकरणी सरकारवाडा व अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीच्या अर्जांसाठी झुंबड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
दहावीच्या विद्यार्थ्यांना बुधवारी मार्कशीट्सच्या मूळ प्रती मिळाल्यानंतर अकरावीच्या प्रवेश अर्जांच्या खरेदीसाठी कॉलेज कॅम्पसमध्ये हजारो विद्यार्थ्यांची झुंबड उडाली. तीन दिवस या अर्जांचे वितरण झाल्यानंतर १८ जूनपर्यंत या अर्जांची स्वीकृती करण्यात येईल. तर, २२ जून रोजी अकरावी प्रवेशासाठी शहरातील सर्व कॉलेजेसची मेरीट लिस्ट जाहीर होणार आहे. बुधवारी ११ वीसाठी प्रवेश अर्जांचे वितरण सुरू झाले. अपेक्षित कॉलेजमध्ये प्र्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी दोन ते तीन कॉलेजेसचे प्रवेश अर्ज घेऊन पर्याय आजमावून पाहिले. ज्या कॉलेजेसचे प्रवेश ऑनलाइन आहेत, अशा काही कॉलेजेसने यंदा प्रॉस्पेक्टस विक्रीला फाटा देण्याचा चांगला प्रयोग केला आहे. तर, शहरातील बहुतांश कॉलेजेसकडून प्रॉस्पेक्टसच्या आडून नफेखोरी करण्याचा गोरखधंदा यंदाही सुरू राहणार आहे. या नफेखोरीविरोधात काही विद्यार्थी संघटनांनी एल्गार पुकारला असून याला आळा घालण्याची मागणी शिक्षण उपसंचालकांकडे करण्यात आली आहे. सर्वाधिक जागा असलेल्या पहिल्या पाच ते सहा कॉलेजेसकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे. याच प्राधान्यक्रमाने विद्यार्थी कॉलेजला पसंती देणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील आजारी उद्योगांचे सर्वेक्षण सुरू

$
0
0

नाशिक : शहरातील सातपूर व अंबड येथे बंद पडलेले उद्योगाचे भूखंड एमआयडीसी ताब्यात घेणार आहे. त्यासाठी या उद्योगाचा सर्व्हे सुरू असून तो पूर्ण झाल्यानंतर नियमाप्रमाणे ताब्यात घेण्याची कारवाई केली जाणार आहे. या दोन्ही एमआयडीसीमध्ये जागा शिल्लक नसली तरी अनेक बंद उद्योगांनी आपले भूखंड ताब्यात ठेवल्याच्या अनेक तक्रारी आल्यामुळे 'एमआयडीसी'ने हे पाऊल उचलले आहे.

सातपूर व अंबड 'एमआयडीसी'मध्ये भूखंड शिल्लक नसल्यामुळे नवीन उद्योगांनी जागेअभावी नाशिककडे पाठ फिरवली आहे. तर अनेक उद्योगांनी नव्याने विकसित होणाऱ्या दिंडोरी एमआयडीसीकडे मोर्चा वळवला आहे.

शहारात नवनवीन उद्योग यावे यासाठी सर्व पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू असतांना जागेचा प्रश्न मात्र कायम आहे. त्यामुळे एमआयडीसीने बंद पडलेले उद्योगाचे भूखंड ताब्यात घेण्यासाठी सर्व्हे सुरू केला आहे. एमआयडीसीत उद्योग बंद पडला तर तो भूखंड ताब्यात घेण्याची कारवाई सर्वत्र केली जाते. आता तशी कारवाई नाशिकमध्येही केली जाणार आहे. उद्योग बंद पडल्यानंतरही केवळ जागेच्या हव्यासापोटी भूखंड सोडण्यास उद्योजक तयार होत नाही. तर अनेकांनी केवळ गुंतवणूक म्हणून भूखंड ताब्यात घेतलेले आहेत. त्यामुळे एमआयडीसने ही मोहीम सुरू केली आहे. त्यातून किती भूखंड ताब्यात येतात व त्यांचे काय प्रश्न आहेत, हे सर्व्हे केल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

बंद उद्योगांची पाठवा माहिती सातपूर व अंबड एमआयडीसीमध्ये एकूण २,८३८ भूखंड आहेत. पण यातील अनेक उद्योग बंद पडल्यामुळे शहराच्या विकासाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. यात उद्योगांची वीज बिले तपासले जाणार आहेत. या तपासणीत उद्योग सुरु आहे की नाही हा प्राथमिक निष्कर्ष काढला जाणार आहे. वीज बिलांसारख्याच वेगवेगळ्या तपासण्या करून त्यातून माहिती संकलित केली जाणार आहे. बंद उद्योगाबाबत सामान्य नागरिकांनी माहिती पाठवण्याचे आवाहनही केले जात आहे.

सातपूर व अंबड येथे बंद उद्योगाचा सर्व्हे झाल्यानंतर एमआयडीसीकडून संबंधितांवर कारवाई केली जाईल. या सर्व्हेत तपासणी केली जाणार आहे. वीज बील हा त्यातील एक निकष असेल. - हेमांगी पाटील, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एटीएमद्वारे ५० हजारांना गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक एटीएम कार्डचा तपशील मिळवून चोरट्यांनी एसबीआयच्या दिंडोरीरोडवरील एटीएममधून परस्पर ५० हजार रूपये काढून घेतले. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. उत्तम प्रेमचंद चव्हाण (रा. ओमकारनगर, म्हसरूळ) यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि. १३) त्यांना ८८७७०१०६२१ या क्रमांकाच्या मोबाइलवरून फोन आला. मुंबई येथील एसबीआयच्या हेड ऑफिसमधून बोलत असल्याचे त्यांना संबंधिताने सांगितले. तुमच्या वडिलांचे एटीएम कार्ड बंद करण्यात आले असून, पुन्हा सुरू करावयाचे असल्यास कार्डवरील नंबर द्या असे सांगितले. त्यानुसार चव्हाण यांनी एटीएम कार्डवरील नंबर सांगितला. त्यानंतर काही वेळातच वडिलांच्या बँक खात्यावरील ४९ हजार ५०० रूपयांची रोकड काढण्यात आल्याचे समोर आले. ही रक्कम एसबीआयच्या दिंडोरी रोडवरील एटीएममधून काढण्यात आली होती. सराईत निसटला गुन्हेगारांच्या शोधासाठी सुरू असलेल्या कोम्ब‌िंग ऑपरेशन दरम्यान एक सराईत पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झाला. भारतनगर परिसरात हा प्रकार घडला. त्याच्या घरामध्ये धारदार हत्यारे मिळून आली. मुंबईनाका पोलिसांनी शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी रात्री भारतनगर परिसरात कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले. बल्ली नामक सराईतास पोलिसांची चाहूल लागताच तो पसार झाला. त्याच्या मरीयम निवासमध्ये छापा टाकला असता तेथे धारदार खंज‌ीर मिळून आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीचे भवितव्य आज ठरणार

$
0
0

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानातील दुसऱ्या टप्प्यातील समावेशासाठी २५ जून पूर्वी प्रस्ताव सादर करायचा आहे. त्यामुळे या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी गुरुवारी (दि. १६) महासभा होत आहे. त्यात स्मार्ट सिटीचे भवितव्य ठरणार आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत शहर बससेवा महापालिकेकडे घेण्यास महापौरांसह अन्य पक्षांनी विरोध केला आहे. तर, एसपीव्हीमधील काही मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना आक्षेप आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असतांना, शहर बससेवेचा पांढरा हत्ती पोसायचा कसा? असा सवाल लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला केला आहे. तर एसपीव्हीच्या अध्यक्षपदावर सचिव स्तरावरील अधिकारी नियुक्त करण्याचा बदल केला जाण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानातील पहिल्या टप्प्यात नाशिकचा समावेश थोडक्यात हुकला होता. त्यामुळे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी नव्याने प्रस्ताव तयार केला. तो २५ जूनपूर्वी केंद्र सरकारला सादर करायचा आहे. नवीन प्रस्तावाला महासभेची आवश्यकता आहे. पहिल्या प्रस्तावाप्रमाणेच हा प्रस्तावही वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी रामायणवर महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरूमीत बग्गा, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम व गटनेत्यांची बुधवारी बैठक झाली. त्यात शहर बससेवेवरून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये मतभेद झाले आहेत.

स्मार्ट सिटीच्या नव्या प्रस्तावात बीआरटीएस अंतर्गत शहर सार्वजनिक बससेवा महामंडळाऐवजी महापालिकेने चालवावी, असे प्रस्तावित करण्यात आले आहे. परंतु, या प्रस्तावाला महापौरांसह सर्वच लोकप्रतिनिधींचा विरोध आहे. महापालिकेने अगोदरच शहर बससेवा हस्तांतरित करण्याचा एसटी महामंडळाचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. शहर बससेवा ताब्यात घेतल्यानंतर नोकरभरती करावी लागणार आहे. तसेच बससेवा चालविण्याचा पूर्ण खर्च महापालिकेलाच करावा लागणार आहे. एकीकडे महापालिकेची आर्थिक अवस्था खराब असतांना हा पांढरा हत्ती पोसायचा कसा? असा सवाल लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला आहे. त्यामुळे शहरबससेवा वगळून प्रस्ताव मंजूर करू, अशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे या मुद्यावरून स्मार्ट सिटीचे घोडे अडकण्याची शक्यता आहे.

एसपीव्हीचे अध्यक्ष सचिव? स्मार्ट सिटीत सर्वाधिक वादग्रस्त ठरलेल्या एसपीव्हीतही महासभेला बदल अपेक्षित आहेत. सद्यस्थितीच्या प्रस्तावात आयुक्तांनाच अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव आहे. परंतु, अध्यक्षपद आयुक्तांऐवजी महापौरांना देण्याची मागणी आहे. परंतु, सरकारने यात आता मध्यममार्ग काढल्याने प्रधान सचिव दर्जाचा अधिकारी एसपीव्हीचा अध्यक्ष राहण्याची शक्यता आहे. पुणे आणि सोलापूर मध्ये सरकारने असाच प्रयोग राबविला असून त्याची पुनरावृत्ती नाशिकमध्येही होऊ शकते.



फेरीवाला, खासगी बिलाबाबत निर्णय महासभेत राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत महापालिकेने तयार केलेला आराखडा मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. त्यालाही या महासभेत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास फेरीवाल्यांचा प्रश्न निकाली निघणार आहे. सोबतच पाणीबिलांचा वाटप खासगी ठेकेदारामार्फत करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. तसेच खुल्या मैदानांसदर्भातील धोरणात्मक विषयालाही ग्रीन सिग्नल मिळणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वारबाबानगरात अघोषित शांतता

$
0
0

नगरसेवक प्रकाश लोंढे सरकारवाडा पोलिसांपुढे शरण जाताच त्याच्या प्रभाग, सातपूरमधील स्वारबाबा नगरामध्ये अघोषित शांतता पसरली. लोंढेंच्या अटकेमुळे सातपूर परिसरात ऐरवी सक्रिय असणारा पीएल ग्रुपमध्ये बुधवारी सामसूम दिसून आली. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दिवसभर पोलिसांनी दक्षता बाळगली होती.

पोलिसांना वेळोवेळी आव्हान देणाऱ्या प्रकाश लोंढेंना अटक झाल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांच्या मुसक्या आवळल्या जातील, असा विश्वास नागरिकांमध्ये बुधवारी निर्माण झाल्याचे दिसून आले. मात्र, दोन तरुणांच्या हत्येचा आरोप असलेल्या लोंढे यांचा पुत्र भूषण यास कधी अटक होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. भूषणचा शोध घेण्याचे पोलिसांपुढे आव्हान कायम आहे.

टवाळखोरांवर कारवाईची मागणी सातपूर भाग मागील काही वर्षांत झपाट्याने वाढला आहे. ठिकठिकाणी मोक्याच्या ठिकाणी व चौकांमध्ये उभ्या राहणाऱ्या टवाळखोरांचा सर्वसामान्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. शाळा भरतांना व सुटतांना टवाळखोरांकडून मुलींची छेड काढली जाते. खासगी क्लासेसच्या आवारात टोळक्यांकडून जोरात वाहने चालवित विद्यार्थ्यांना घाबरविले जाते. पोलिसांनी अशा टावाळखोरांवर आणि भरधाव वाहने चालविणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी सातपूरकरांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकाश लोंढे अखेर शरण

$
0
0



कोर्टाच्या आवारात संशयितांना मद्य पुरविण्याचा प्रयत्न करणारे तसेच याबाबत हटकले असता पोलिस कर्मचाऱ्याला अॅट्रॉस‌िटी दाखल करण्याची धमकी देणारे नगरसेवक प्रकाश लोंढे बुधवारी पोलिसांना शरण आले. सकाळी साडे दहाच्या सुमारास ते पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले. त्यांना कोर्टात गुरुवारी हजर करण्यात येणार असल्याची माहिती सरकारवाडा पोलिसांनी दिली आहे.

स्वारबाबानगर परिसरात नगरसेवक लोंढे यांच्या कार्यालयात जानेवारीत दुहेरी हत्याकांड झाले होते. या प्रकरणात अटकेत असलेल्या संशयितांना २४ मे रोजी कोर्टात आणण्यात आले होते. हे संशयित कोर्टाच्या आवारात थांबले असताना त्यांना मद्य आणि अन्य खाद्यपदार्थ पुरविण्याचा प्रयत्न लोंढे यांनी केला. त्यावर बंदोबस्तावरील एका पोलिस कर्मचाऱ्याने आक्षेप घेतला. त्यावेळी लोंढे यांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केली. तसेच अॅट्रॉस‌िटी दाखल करण्याची धमकी दिली. सरकारवाडा पोलिसांनी लोंढे यांच्यावर गुन्हा दाखल केला. अटक होण्याची शक्यता गृहीत धरून लोंढेंनी ३० मे रोजी जिल्हा कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. लोंढे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन कोर्टाने हा अर्ज फेटाळला. त्यामुळे त्यांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी धाव घेतली. मात्र, तो देखील फेटाळण्यात आला. त्यामुळे लोंढे यांना अटक करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला. पोलिसांची तीन ते चार पथके त्यांचा शोध घेत होती. कडेकोट पोलिस बंदोबस्तात मंगळवारी रात्री पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहाय्यक पोलिस आयुक्त अतुल झेंडे यांनी लोंढे यांच्या कार्यालयाची आणि घराची झडती घेतली. लोंढे यांना बुधवारी सकाळी सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले.



भूषण लोंढेबाबतही होणार चौकशी नववर्षाच्या सुरुवातीलाच स्वारबाबानगर परिसरातील नगरसेवक लोंढे यांच्या कार्यालयात दोन तरुणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांचा मृतदेह ग्रामीण पोलिसांना सापडल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. या प्रकरणात प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण याचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. हायकोर्टाकडून तात्पुरता जामीन मिळविणारा भूषण काही महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत आहे. पोलिस अजुनही त्याचा शोध घेत आहेत. भूषण नेमका कोठे आहे? याबाबतची चौकशी लोंढे यांच्याकडे केली जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२० टक्के अनुदानाचा लाभ १५०० शिक्षकांना

$
0
0

Jitendra.tarte @timesgroup.com

कायम विनाअनुदानीत म्हणून मान्यता मिळालेल्या, मात्र मूल्यमापनात पात्र ठरलेल्या शाळांना २० टक्के अनुदान देण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील सुमारे दीड हजारपेक्षा जास्त शिक्षकांना होणार आहे. यात जिल्ह्यात प्राथमिक विभागाच्या ६८ तर माध्यमिक विभागाच्या ७० अशा एकूण १४० शाळा व तुकड्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. कायम विनाअनुदानीत शाळांच्या अनुदानाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राज्य मंत्र‌िमंडळाच्या निर्णयानंतरही अद्याप या शाळांमधील शिक्षकांचे आंदोलन सुरुच आहे. अघोषित शाळांची यादी जाहीर करण्यात यावी, या मागणीसाठी हे आंदोलन लावून धरण्यात आले आहे. नव्या निर्णयानुसार आता चालू शैक्षणिक वर्षांपासून विनाअनुदानीत शाळांना २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. विनाअनुदानीत शाळांच्या अनुदानाच्या प्रश्नासाठी १ जूनपासून हे आंदोलन सर्वच ठिकाणी छेडण्यात आले होते.

शिक्षकांच्या कामाची 'तप'पूर्ती

विनाअनुदानीत शाळांमध्ये सुमारे बारा वर्षांपासून अधिक कालावधीपासून काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी नाही. यातील बहुसंख्य शिक्षक विनापगारी काम करत आहेत. इतक्या दीर्घ प्रतिक्षेनंतर २० टक्के अनुदानाचा लाभ पदरात पडला असला तरीही पूर्ण पगाराच्या टप्प्यासाठी भविष्याकडे डोळे लावून बसावे लागणार आहे. कुठल्याही तांत्रिक मुद्द्यांचे भेदाभेद न ठेवता सरकारने समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांचे पूर्ण पगार सुरू करावेत, अशीही अपेक्षा आंदोलनकर्त्या शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्याच दिवशी शाळेला लावले टाळे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील तरसाळी येथील प्राथमिक शिक्षक वाय. बी. मोरे यांची बदली करण्यात आल्याने ही बदली रद्द करून त्यांना तरसाळी येथेच कायम करण्यात यावे, या मागणीसाठी तरसाळी ग्रामस्थांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकून शाळा बंद ठेवली. दरम्यान, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बहिरम यांनी बदली प्रशासनाचा भाग असल्याचे नमूद केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पंचायत समिती आवारात विद्यार्थ्यांसह धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत तरसाळी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी बहिरम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तरसाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक मोरे यांनी अत्यंत गुणवत्तापुर्वक काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत चमकले आहे. तर आदिवासी विद्यार्थी जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. लोकसहभागातून मोरे यांनी शाळेत ई लर्निंग व डिज‌िटलायजेशन करून शाळा नावारूपास आणली आहे.

उत्कृष्ट व चांगले कार्य करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची बदली रद्द करण्यात यावी, यासाठी आंदोलकांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकून शाळेचे कामकाज बंद पाडले आहे. यावेळी गटविकास अधिकारी बहिरम यांनी बदली हा प्रशासनाचा भाग असल्याचे नमूद करून ही ग्रामस्थांनी शाळा बंदच ठेवली आहे. दरम्यान दिवसभरात बदली रद्द न झाल्यास शालेय विद्यार्थी पंचायत समिती आवारात धरणे आंदोलन छेडतील, असा इशाराही ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी आंदोलनात तरसाळी सरपंच दला पिपळसे, उपसरपंच लक्ष्मण पवार भिका पाटील, प्रभाकर पवार, गोपीनाथ पाटील, पुंडल‌िक रौंदळ, अरुण रौंदळ, सुरेश पवार, यांच्यासह विद्यार्थीदेखील सहभागी होते.

संपूर्ण तालुक्यात चर्चा

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची बदली रद्द करण्यासाठी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकण्याची बहुदा ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ असावी. सगळीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांची स्पर्धा सुरू झाली असतांना ग्रामीण भागात आजही जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व तितकेच असल्याचे या प्रसंगावरून स्पष्ट होत आहे. सगळीकडे शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत होत असताना तरसाळी येथे मात्र शाळेला कुलूप ठोकण्यात आल्याने संपूर्ण तालुक्यात याविषयाची चर्चा सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोथिंबीर @ १०० रुपये

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाईमुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अशा परिस्थितीतही धरणाकाठच्या गाळपेऱ्याच्या जमिनीत पालेभाज्यांचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ लागला आहे. पालेभाज्यांच्या हंगामाच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक ७० टक्क्यांनी घटली असल्याने पालेभाज्यांचे भाव कडाडले आहे. त्यात कोथिंबीर ५० ते ८० रुपये प्रति जुडी या दराने बाजार समितीतील लिलावात कोथिंबिरीची विक्री झाली. किरकोळ विक्रीत हा दर सुमारे १०० रुपये प्रति जुडीपर्यंत पोहोचला आहे.

जून महिन्याचा पंधरवाडा उलटून गेला तरी अजून पावसाची चिन्ह दिसत नसल्याने आणि तीव्र पाणीटंचाईने तोंडचे पाणी पळालेले असताना कळवण तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी कोथिंबिरीच्या लागवडीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. या भागातून येणारी कोथिंबीर,

मेथी, शेपू, कांदापात यांची आवक मर्यादित असल्याने त्यांना चांगला भाव मिळत आहे. कोथिंबिरीत नवीन विकसित करण्यात आलेले वाण तीव्र उन्हातही तग धरत आहेत. सध्या अशाच वाणांची आवक होत आहे. गावठी कोथिंबीर क्वचित नजरेस पडते. मात्र, अशा कोथिंबिरीला चढे दर मिळत आहेत. सध्या कोथिंबीर ५० ते ८०, मेथी ३० ते ४०, शेपू ३० ते ४०, कांदापात ४० ते ५५ रुपये प्रति जुडी या भावात विकले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चपलेतून कोर्टात आणला गांजा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोर्टात आणलेल्या कैद्याला नवी चप्पल देण्याच्या बहाण्याने गांजा पुरविला जात असल्याचा प्रकार कैदी पार्टी कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे बुधवारी उघडकीस आला. याप्रकरणी कैद्याच्या भावास सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे. नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी खुनातील संशयिताला पाण्याच्या बाटलीतून मद्य पुरविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार ताजा असतानाच अशी दुसरी घटना घडली आहे.

संतोष अरूण लोखंडे (वय ३१, रा. विजय चौक, कर्डक चाळ शेजारी फुलेनगर) असे संशयिताचे नाव आहे. पंचवटीतील लुटमारीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या परविन अरूण लोखंडे याला बुधवारी कोर्टात आणले होते. त्याला भेटण्यासाठी साडेबारा वाजेच्या सुमारास संतोष आला होता. पोलिस वाहनात बसलेल्या परविनसाठी तो पिशवीत नवी चप्पल घेऊन आला. मात्र या चपलेच्या सोलमधून त्याने गांजा पुरविण्याचा प्रयत्न केला. कैदी पार्टीमधील कर्मचारी संजय भरीतकर (नेमणूकः पोलिस मुख्यालय) यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी सरकारवाडा पोलिसांना याबाबत माहिती दिली. वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्यासह उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार, जमादार सुशिला करोडेवाल व संदीप सानप या कर्मचाऱ्यांनी संशयितास ताब्यात घेतले. जाड सोलची चप्पल कापली असता त्यामध्ये गांजाच्या पुड्या आढळून आल्या. सरकारवाडा पोलिसांनी गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा हायस्कूलच्या दहावीतील गुणवंतांचा सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक मविप्र समाज संस्थेच्या मराठा हायस्कूलमधील मार्च २०१६मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावीच्या परीक्षेस मराठा हायस्कूलमधून ७६० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ७५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विद्यालयाचा निकाल ९९.६० टक्के लागला आहे. यामध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १२८ आहे.

संस्थेचे शिक्षणाधिकारी प्रा. एस. के. शिंदे यांनी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करताना यात पालकांची भूमिका, प्रयत्न याबद्दल दाद दिली. विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात यशाचा आलेख असाच उंच ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करावेत, असे सांगितले. एसएससी बोर्डाचे सहाय्यक सचिव प्रकाश आंधळे या वेळी म्हणाले की, विद्यार्थी देशाचे भांडवल असून, देशाचे भावी आदर्श नागरिक आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी, समाजासाठी करावा. पालकांनी आपली महत्त्वाकांक्षा विद्यार्थ्यांवर लादू नये, तसेच एसएससी बोर्डातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्गीकरण स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर व्यायाम, छंद जोपासावा म्हणजे आपले आरोग्य आणि मन स्वच्छ, सुंदर राहील, असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा नीलिमा पवार म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी असेच यश संपादन करावे. त्यासाठी अभ्यासाबरोबर आपले आरोग्य व्यवस्थित राखण्यावर भर द्यावा. जग खूप सुंदर आहे, तेव्हा आपला वेळ मोबाइलमध्ये न घालवता विश्वाचा, निसर्गाचा आनंद घ्या. भविष्यातील शिक्षणाच्या विविध संधीसंबंधी माहिती देऊन त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक कहांडळ यांनी आभार मानले. या वेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक के. एस. गावले, अरुण पवार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीबीएसईच्या दहावीतील गुणवंतांचा सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सीएचएमई सोसायटी संचलित विद्याप्रबोधिनी प्रशालेच्या सीबीएसई विभागातील इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेत आयोजित छोटेखानी कार्यक्रमात गुणगौरव करण्यात आला. शाळेने सलग पाचव्या वर्षी शंभर टक्के यश मिळविल्याने संस्थेच्या या यशाचेही या वेळी कौतुक करण्यात आले.

गंधाली आफळे, सार्थक पाटील, हर्षद पेलमहाले, तनिषा उनियाल, फाल्गुनी भट या गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुहास जपे प्रमुख पाहुणे होते. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून निश्चित ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करावे, असा सल्ला जपे यांनी विद्यार्थ्यांना दिला. संस्थेचे कार्यवाहक दिलीप बेळगावकर यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद करतानाच विद्यार्थ्यांना करिअरसंबंधी मार्गदर्शन केले. संस्थेचे कोषाध्यक्ष हेमंत देशपांडे, शालेय समिती अध्यक्ष नितीन गर्गे आदी या वेळी उपस्थित होते. मुख्याध्यापिका लीना चक्रवर्ती यांनी संयोजन केले. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या यशातून इतर वर्गांतील विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्याध्यापिका चक्रवर्ती यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनस्थान सोहळा २१ जूनपासून

$
0
0

नाशिकच्या कलावंतांच्या जनस्थान या व्हॉटसअॅप ग्रुपचा दुसरा वर्धापन दिन २१ ते २३ जूनदरम्यान परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे साजरा होणार असून यावर्षी वर्धापन दिनानिमित्ताने तीन दिवसीय भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोहळ्याची सुरुवात २१ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता या होणार असून इंतियामातकत ट्रॅव्हल कंपनीचे ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर आणि अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी गुणाजी यांच्या हस्ते ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी, कैलास पाटील, कविवर्य किशोर पाठक यांना 'जनस्थान आयकॉन' पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाला महापौर अशोक मुर्तडक, अॅड. विलास लोणारी, 'सावाना'चे कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांच्यासह नाशिकमधील चित्रपट, साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

फिनलॅण्ड स्थित या टूर कंपनीतर्फे गुणाजी यांनी गेल्याच महिन्यात स्कॅन्डिनेव्हियन देशांची सहल केली. त्यावेळी त्यांनी टिपलेल्या अत्यंत अद्भूत, सर्वांग सुंदर, लोभस आणि निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या या प्रदेशाच्या छायाचित्रांचे प्रदर्शनासह चित्रकार राजेश सावंत, प्रफुल्ल सावंत, छायाचित्रकार प्रसाद पवार, मूर्तिकार श्रेयस गर्गे, यतिन पंडित, शाम लोंढे यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन परशुराम साईखेडकर नाट्यमंदिराच्या नवीन कलादालनात आयोजित केले आहे. प्रदर्शन २१ ते २३ जून सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

सई परांजपे लिखित आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या करंजीकर दिग्दर्शित 'माझा खेळ मांडू दे' या नाटकाचा प्रयोग २२ जून रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या नाटकात विद्या करंजीकर, लक्ष्मी पिंपळे ,पल्लवी पटवर्धन, प्रिया तुळजापूरकर, शाम लोंढे, धनजंय वाबळे, पंकज क्षेमकल्याणी हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत

'स्वर शेला पावसाचा' या कार्यक्रमाचे आयोजन २३ जून रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. यात जनस्थानचे कवी किशोर पाठक, प्रकाश होळकर, मिलिंद गांधी, सी. एल. कुलकर्णी, सदानंद जोशी यांच्या कविताना नाशिकच्याच पाच संगीतकरानी संगीतबद्ध केले आहे. यात संगीतकार धनंजय धूमाळ, संजय गिते, मकरंद हिंगणे, मोहन उपासनी, आनंद अत्रे यांचा समावेश आहे. कार्यक्रमात नृत्याची साथ कीर्ती भवाळकर, सुमुखी अथनी यांनी दिली असून कार्यक्रमात सादर होणारे नाट्यप्रवेशाचे दिग्दर्शन सचिन शिंदे, प्रशांत हिरे ही मंडळी करणार आहे.

गीत-संगिताची मेजवानी कार्यक्रमात पं. अविराज तायडे, पं मकरंद हिंगणे, रागिणी कामतीकर, गीता माळी, ज्ञानेश्वर कासार, आशिष रानडे हे गाणार आहे. फ्यूजनमध्ये जागतिक कीर्तीचे हार्मोनियम वादक पंडित सुभाष दसककर तसेच नितिन पवार, सुजीत काळे, प्रमोद भडकमकर, सतीश पेंडसे (तबला), आनंद अत्रे (सिंथेसिझर), प्रसाद रहाणे(सतार), अभिजीत शर्मा (अॅक्टोपॅड), दिगंबर सोनावणे (पखवाज), मोहन उपासनी (बासरी), अनिल दैठणकर (व्हायोलीन), नरेंद्र पुली (गिटार), संजय पुणतांबेकर (काँगो व जेंबे) अशी साथ संगत होणार आहे. स्वानंद बेदरकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भष्ट्राचारमुक्त प्रशासन देण्यावर भाजप ठाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भष्ट्रचारमुक्त प्रशासन देण्यासाठी भाजपचे सरकार कटिबद्ध असून, मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने पारदर्शी सरकार करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे संपूर्ण विश्वात भारताचे नाव अभिमानाने लोक घेत असल्याचे प्रतिपादन खासदार पी. मुरलीधर राव यांनी केले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राव व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर संस्थांच्या प्रतिनिधींसोबत सुसंवादाचा कार्यक्रम गुरुवारी लक्षिका मंगल कार्यालयात आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते.

मुरलीधर राव पुढे म्हणाले की विश्वात भारताची प्रतिमा स्कँडल्सचा देश अशी झाली होती. मोदी सरकारने ती खोडून काढली आहे. संपूर्ण विश्वात व्यापाराची घट होत असताना भारतातील स्थिती आशादायक आहे. मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर नैसर्गिक आपत्तीनेदेखील परीक्षा पाहिली. त्याला सरकारने समर्थपणे तोंड दिले आहे. भारताने ग्रोथ रेटच्या बाबतीत चीनला मागे टाकले असून, ७.६ टक्के दर वाढवला आहे. गरिबांसाठी विविध योजना अमलात आणल्या असून, प्रत्येक नागरिकाला स्वाभिमान मिळवून दिला आहे. भाजपच्या मंत्र्यांनी कुठल्या एका क्षेत्राचा विकास करण्यावर भर दिला नसून संपूर्ण राष्ट्राच्या उन्नतीकडे लक्ष दिले आहे. या वेळी लँड डेव्हलपर जितूभाई ठक्कर यांनी स्मार्ट सिटीप्रमाणेच स्कील सिटी तयार होण्याबाबत नाशिकला प्रमोट करण्याची मागणी केली, त्याचप्रमाणे एखादे काम होत नसेल तर ते का होत नाही, याचे मूल्यमापन करण्यावर भर द्यावा, असे सांगितले. टुरिझम कॅपिटल करण्यावर भर द्यावा, असे सांगितले. सहकारी बँकांबाबत केंद्र सरकारने थोडी नरमाईची भूमिका घ्यावी, अशी मागणी बँक असोसिएशनचे भास्करराव कोठावदे यांनी केली.

सरकार शिक्षणाबाबत रोज नवनवीन नियम राबविले आहे. एकाच प्रवेशाबाबत केंद्र सरकार वेगळी भूमिका घेत आहे. राज्य सरकारचे वेगळे धोरण आहे तर न्यायालय वेगळा निर्णय देते, याबाबत सरकारने योग्य अभ्यास करून अंमलबजावणी करावी. नाशिक शहरात गेल्या २५ वर्षांत एकही मोठा कारखाना आलेला नाही, त्याबाबत सरकारने योग्य पावले उचलावे अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांनी केली. औद्योगिक धोरणाबात सरकारने शिथिलता आणल्यास जास्त उद्योग वाढू शकतील, त्यावर सरकारने गांभीर्याने विचार करावा, असे उद्योजक राजेंद्र आहिरे यांनी सांगितले.

या वेळी संजीव नारंग म्हणाले, की जोपर्यंत नाशिकला एअर कनेक्टिव्हिटी होत नाही, तोपर्यंत येथे उद्योजक येणार नाही. त्यासाठी अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले. सराफांवर लादलेल्या अबकारी कराबाबत किशोर ओढेकर यांनी पुनर्विचार करावा, असे सांगितले. डॉ. मंजुषा दराडे म्हणाल्या, की सरकारने महिलांबाबत ठोस पावले उचलावीत असे सांगितले. या वेळी पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images