Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रेशनकार्डासाठी आदिवासी आक्रमक

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

तालुक्यातील ठाणापडा-हरसूल परिसतरातील आदिवासी ग्रामस्थांना दुय्यम रेशनकार्ड मिळविण्यासाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. गुरूवारी दुपारी किसान सभचे प्रदेश सदस्य इरफान शेख यांच्या नेतृत्त्वाखाली माजी सभापती रमेश बरफ, लक्ष्मण राऊत, हरिदास मौळे आदींसह सुमारे ३५० ग्रामस्थांनी तहसीलसमोर धरणे आंदोलन केले.

फेब्रुवारी २०१६ मध्ये सुमारे १७७४ रेशनकार्ड येथे दुय्यम प्रत मिळावी म्हणून जमा केले आहेत ते अद्याप मिळालेले नसल्याने गुरुवारी शेकडो आदिवासी ग्रामस्थांनी त्र्यंबक तहसीलसमोर ठाण मांडले आहे. जोपर्यंत आम्हाला रेशनकार्ड मिळत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही, असा पवित्रा या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांची भेट ग्रामस्थांनी घेतली व आपले गाऱ्हाणे मांडले. यादरम्यान, झालेल्या उलट तपासणीत अवघे ३०० रेशनकार्ड प्रक्रिया पूर्ण असल्याचे निदर्शनास आले. यामुळे रेशनकार्डाच्या मागणीसाठी आलेले ग्रामीण भागातील हे ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी येथून न हटण्याचा निर्धार व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुरगाणा नगराध्यक्षांविरोधात तक्रार

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सुरगाणा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष रंजना लहरे या कोणालाही विश्वासात न घेता काम करणे व त्यांच्या गटनेत्या जयश्री शेजोळे यांच्या संगनमताने आर्थिक गैरव्यवहार करत असल्याची लेखी तक्रार नगरपंचायतमधील नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सुरगाणा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रंजना लहरे यांनी कोणतेही मासिक सभा न घेता आदेशाचे उल्लंघन केले आहे. नगराध्यक्षा यांनी केलेली उपाययोजना आणि त्याबद्दलची कारणे स्थायी समितीस आणी नगरपंचायतीस अनुक्रमे त्यांच्या पुढील सभेत कळवणे बंधनकारक असताना आजपर्यंत कोणतीही मासिक सभा न घेता विकास कामाबाबत ठराव करून कोणतीही प्रशासकीय मंजुरी न घेता तसेच निविदा न काढता निविदा मंजूर केल्या आहेत. तसेच कोणतीही निविदा मंजुरीसाठी प्रसिद्धीसाठी दैनिकाला दिलेली नाही. ३५०० रुपयांच्या वर खरेदीसाठी निविदा काढणे बंधनकारक असतांना कर्मचारी वर्गावर दबाव टाकून पाणीपुरवठ्याच्या नावाने पाइपखरेदी, जलपरी खरेदी, पाइपलाइन खोदकाम यांची खोटी बीले तयार केली. यासाठी तब्बल दोन ते तीन लाखांची बिले नगरपंचायतीच्या खात्यावरून क्रांती जनरल स्टोअर्स या नावाने काढण्यात आले. क्रांती जनरल स्टोअर्सचे मालक मनोज शेजोळे हे असून त्यांच्या पत्नी नगरसेवीका आहेत. नगरसेविका जयश्री शेजोळे यांच्या पतीने नगरसेवक पदाचा गैरवापर करून आर्थिक लाभ घेतला आहे.जयश्री शेजोळे, नगराध्यक्षा रंजना सुरेश लहरे यांची चौकशी करून त्यांचे पद रिक्त करावे, अशी लेखी तक्रार शिवसेनेचे पाच, भाजपचे दोन, सिपीएमचा एक नगरसेवकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समित्यांनी पुकारला एल्गार

0
0

नियमनाविरोधात मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार



म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत
फळे, भाजीपाला व इतर शेतमालाला नियमनमुक्त करून शासन शेतकऱ्यांची फसवणुकीचे व त्यांच्या आर्थिक कोंडीचे मार्ग खुले करीत असून नाशिक जिल्ह्यातील बाजार समितींना ही नियमनमुक्ती मान्य नाही. त्यामुळे या प्रक्रियेला विरोध दर्शविण्यासाठी तसेच मुक्त धोरणामुळे शेतकऱ्यांच्यी होणारी फसवणूक शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय नाशिक जिल्हा बाजार समिती सहकारी संघाच्या बैठकीत घेण्यात आला.

बाजार समितीतील फळे, भाजीपाला व इतर शेतमालाला नियमनमुक्ती देण्याच्या प्रक्रियेला सरकारने गती दिल्यानंतर जिल्हा बाजार समिती सहकारी संघाचे अध्यक्ष व पिंपळगाव बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांच्या अध्यक्षतेखाली पिंपळगाव बाजार समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सचिव आणि प्रतिनिधी आदींची तातडीची बैठक झाली.

या बैठकीत सरकारच्या नियमनमुक्ती धोरणाला कडाडून विरोध करतानाच शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य आर्थिक नुकसान सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, दिंडोरीचे सभापती दत्तात्रय पाटील, देवळ्याचे सभापती केदा आहेर, चांदवडचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, कळवणचे सभापती धनंजय पवार, उमराण्याचे सभापती विलास देवरे, येवल्याच्या सभापती उषा शिंदे, सिन्नरचे सभापती अरुण वाघ, घोटीचे उपसभापती गोरख बोडके, पिंपळगाव समितीचे संचालक भास्कर बनकर, दीपक बोरस्ते, सोहनलाल भंडारी आदींसह जिल्ह्यातील बाजार समितीचे सचिव व प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेत सरकारच्या नियमनमुक्तीला विरोध दर्शवत या प‌्रक्रियेतून शेतमालाची शिवार खरेदी वाढणार असून शेतकऱ्यांच्या रक्कमेला कोणताही सुरक्षा राहणार नाही. तसेच शेतकऱ्यांच्या हितापेक्षा फसवणुकीचे मार्ग शेतमाल खरेदीदारांना मिळणार आहे. तसेच शेतमालाच्या मुक्त व्यवहारावर कुणाचेही नियंत्रण राहणार नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होणार असल्याने सरकारने तातडीने ही शेतमाल नियमन मुक्तीची प्रक्रिया थांबवावी, असा निष्कर्ष या बैठकीत काढण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावर ओतला कांदा...

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

मोठ्या कष्टानं पिकवलेल्या कांद्याला अनेक दिवसांपासून कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले असतानाच गुरुवारी या ढासळत्या बाजारभावाबद्दल शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत आणलेल्या पांढऱ्या कांद्याला गुरुवारी दुपारी अवघा २०० रुपये क्विंटल बाजारभाव पुकारला गेल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावरच कांदा ओतला.

जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी आपला कांदा ट्रॅक्टर येवला शहरातील विंचूर चौफुलीवरील राज्य महामार्गावरच ओतून दिला. या वेळी शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आदी पक्षांचे येवला तालुक्यातील नेतेमंडळी व कार्यकर्ते अचानक रस्त्यावर उतरले होते. कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, अशा जोरदार घोषणा देत या वेळी सर्वांनीच ढासळत्या बाजारभावाबद्दल चिंता व्यक्त करून निषेध व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी अन् पालकांची कसोटी

0
0

अॅडमिशनसाठी कागदपत्रांची जमवाजमव; कट ऑफची समीकरणे अन् जीवघेणे वेटिंग



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जूनच्या मध्यावर आता अकरावीपासून सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना सुरुवात झाली आहे. प्रवेशाची लगबग साधताना विद्यार्थी अन् पालकांची कसोटी बघितली जात आहे. विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व, रहिवासी प्रमाणपत्र यांसारख्या दाखल्यांची जमवाजमव करताना चांगलीच दमछाक होते आहे. शिवाय कागदपत्रांची फाइल तयार झाल्यानंतर मेरिट लिस्टमधील कट ऑफची धास्ती अन् अपेक्षित कॉलेजेससाठी परिणामी करावे लागणारे वेटिंग या परिस्थितीमुळे पालकांसाठी जून महिन्याचा मध्यांतर चांगलीच कसोटी बघणारा ठरणार आहे.

बुधवारपासून (दि. १५) शहरात अकरावीच्या प्रवेशाला सुरुवात झाली. अकरावीसाठी प्रवेश अर्ज वितरणास बुधवारपासून सुरुवात झाली. या प्रवेश अर्जांची स्वीकृती १८ जूनपर्यंत सुरू राहील. तर अर्जांची छाननी २२ जूनपर्यंत होईल. मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट २२ जून रोजी जाहीर होईल. पहिल्या मेरिट लिस्टनुसार २५ जूनपर्यंत, दुसऱ्या २८ जूनपर्यंत तर तिसऱ्या मेरिट लिस्टनुसार प्रवेश २९ जूनपर्यंत प्रवेश होतील. चौथी मेरिट लिस्ट २९ जून रोजी जाहीर होईल. चौथ्या मेरिट लिस्टनुसार प्रवेश ३० जूनपर्यंत होऊन १ जुलै रोजी शहरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल.

इंजिनीअरिंगची

लिस्ट १९ जूनला

इंजिनीअरिंगच्या विविध विद्याशाखांसाठी विद्यार्थ्यांना २ जूनपासून रजिस्ट्रेशनची सुविधा देण्यात आली होती. गुरुवारी (दि. १६) रोजी रजिस्ट्रेशनची मुदत संपली आहे. दरम्यानच्या कालावधीत जमा झालेल्या अर्जांची छाननी होऊन १९ जून रोजी इंजिनीअरिंगची पहिली मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे. यानंतर प्रवेशांसाठी केंद्रीय पद्धतीने चार कॅप राऊंड जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार पार पडतील. १४ ऑगस्टपर्यंत इंजिनीअरिंगचे प्रवेश पूर्ण होतील.

पॉलिटेक्निक प्रवेश शनिवारपासून

दहावीनंतर पॉलिटेक्निकला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेश अर्ज भरण्याची मुदत १८ ते २९ जून दरम्यान दिली आहे. यानंतर १८ ते ३० जून या कालावधीत कागदपत्रांची छाननी व स्वीकृती होईल. २ जुलै रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. ५ जुलै रोजी मुख्य गुणवत्ता यादी जाहीर होईल. ऑप्शन भरण्यासाठी ५ ते ८ जुलैपर्यंत मुदत आहे. प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पहिला कॅप राऊंड १० जुलै रोजी होईल. ११ ते १५ जुलै दरम्यान पहिल्या कॅप राऊंडचे प्रवेश होणार आहेत. दुसरा कॅप राऊंड १७ जुलै रोजी होईल. दुसऱ्या राऊंडचे प्रवेश १८ ते २१ जुलै दरम्यान होतील. तिसरा कॅप राऊंड २३ जुलै रोजी होईल. तिसऱ्या कॅप राऊंडचे प्रवेश २४ ते २७ जुलै होतील. चौथ्या कॅप राऊंडसाठी पर्याय सादर करण्याची मुदत ३० जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे. चौथ्या कॅप राऊंडमध्ये प्रवेश मिळालेल्यांची यादी ५ ऑगस्ट रोजी होईल. अंतिम राऊंडचे प्रवेश ६ ते १० जुलै दरम्यान होतील.

बी. फार्मसीच्या ९६० जागा

नव्या शैक्षणिक वर्षासाठी बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला गुरुवारपासून (दि. १६) प्रारंभ झाला. ही प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण संचलनालयाच्यावतीने राबविण्यात येणार आहे. शहर व जिल्ह्यातील १६ कॉलेजेस मिळून ९६० जागा उपलब्ध आहेत. तर विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातून ८ कॉलेजेसमध्ये सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पूर्वनोंदणी, कागदपत्र पडताळणी १६ ते २२ जून दरम्यान करण्यात येणार आहे. एमएचटी सीइटीच्या माध्यमातून हे प्रवेश होणार आहेत. या अभ्यासक्रमासाठी प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांनी २२ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचे आहे. विद्यार्थ्यांनी कागदपत्र पडताळणी, कन्फर्मेशनसाठी या कालावधीत फॅसिलीटेशन सेंटरसोबत संपर्क साधावा. २२ जूनपर्यंत रजिस्ट्रेशन झाल्यानंतर २३ जून रोजी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे. २४ व २५ रोजी आक्षेप नोंदविले जातील. तर फायनल मेरिट लिस्ट २८ जूनला जाहीर होईल.

अधिक माहितीसाठी

विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रीयेची अधिक माहिती www.dtemaharashtra.gov.in/ph2016 या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुविधा केंद्रांची यादीही या वेबसाइटवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना एमएच सीइटीचे मुळ ओळखपत्र एफसी केंद्रावर दाखविल्यानंतर विद्यार्थ्यांना माहितीपत्रक देण्यात येईल व नंतरच त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. अर्जाच्या पडताळणीसाठी विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रे सादर करायची आहेत. त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची तयारी ठेवण्यात यावी. स्कॅनिंगही करून ठेवावे. विद्यार्थ्याला ऑनलाइन अर्ज भरणे शक्य न झाल्यास त्या विद्यार्थ्याचा मेरिट लिस्टमध्ये व कॅप किंवा नॉन कॅपराऊंडमध्ये समावेश करण्यात येणार नाही. एफसी येथे विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचे विनामुल्य स्कॅनिंग करून देण्यात येईल सुटीच्या दिवशी व रविवारीही एफसी केंद्र सुरू राहणार आहे. काही अडचणी असल्यास विद्यार्थ्यांनी (०२२) ३०२३३४४६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीप्रश्नी २० जूनला तहसीलवर आंदोलन

0
0

कसमादे पाणी संघर्ष समितीची स्थापना

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

पाणीप्रश्नी सनदशीर पाठपुरावा करण्यासाठी तसेच मांजरपाडा-२ साठी निधी प्राप्त करून घेण्यासाठी कसमादे पाणी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. त्यात चारही तालुक्यांतील ज्येष्ठ आणि तरुणांना सामावून घेत हक्काचे पाणी मिळविण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार येत्या सोमवार, (दि. २० जून) रोजी तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. जनतेनेही यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील पाणी गुजरातकडे पळविले जात असल्याच्या धोरणाविरोधात आगामी रणनिती ठरविण्यासाठी सटाणा येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना माजी आमदार नितीन भोसले यांनी ही माहिती दिली. यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिकादेखील दाखल केली आहे. केंद्र सरकारकडून नदीजोड प्रकल्पाच्या नावाखाली उत्तर महाराष्ट्रातून १५७ टीएमसी पाणी गुजरातकडे वळविले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी,(दि. १४) शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात झालेल्या बैठक घेण्यात आलीयावेळी

शेतकरी संघटनेचे रामचंद्र पाटील, यशवंत अहिरे, प्रा. के. एन. अहिरे, आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात नदीजोड प्रकल्पाच्या नावाने या पाण्यावरील राज्याचा हक्कच हिरावून घेतला जात असल्याचा आरोपही भोसले यांनी केला. मुंबईला २० टीएमसी पाणी देऊन उर्वरित पाणी गुजरातला नेण्याचा डाव असून, प्रशासनही दबावाखाली असल्यामुळे याप्रश्नी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आला आहे, असा सूरही या बैठकीत उमटून याबाबत येत्या २० जूनला तहसीलवर मोर्चा नेला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीटंचाईत टँकरचा सावळा गोंधळ

0
0

त्र्यंबकला किसानसभेचा ठिय्या; यंत्रणा उदासीनच

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

'टँकर सुरू मात्र पाणीच नाही' अशी परिस्थिती त्र्यंबक तालुक्यातील दुर्गम भागातील ग्रामस्थांच्या नशिबी आली आहे. दुष्काळाने गांजले असताना सरकारी यंत्रणांच्या गाफील कारभाराने दुर्गम भागातील आदिवासींना पाणी पाणी म्हणण्याची वेळ आली आहे. टँकर मंजूर केले मात्र पाणी मिळत नाही म्हणून गुरूवारी (दि.१६) त्र्यंबक तालुक्यातील किसान सभेच्या सुमारे ३०० कार्यकर्त्यांनी तहसील धडक आंदोलन करत याबाबत जाब विचारला.

बळीराजाची चिंता पावसाच्या लांबणीमुळे वाढली आहे. त्यात पाणीटंचाईच्या गावांमध्ये टँकरबाबत सरकारची उदासीनता स्पष्टपणे दिसत आहे. याबाबत आरोपही होत आहेत. याबाबत गुरूवारी किसान सभेकडून आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यात ओझरखेडपैकी कोशीमपाडा येथे टँकर मंजूर केला होता. मात्र ५ मे २०१६ रोजी पाणी दिल्यानंतर पुन्हा टँकरच फिरकला नाही, अशी माहिती किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी दिली. त्याचप्रमाणे ठाणापाडा आणि हरसूल परिसरातील अनेक गाव वस्त्यांना टँकर फिरकत नाहीत. तसेच काही ठिकाणी आठ दिवसांतून एखाद्यावेळेस टँकर येत असतो, अशी माहितीही समोर आली आहे.

महिलांची पायपीट

त्र्यंबक तालुक्यात अवघे चारच टँकर राज्य सरकारकडून सुरू आहेत. या व्यतिरिक्त जैन सोशल ग्रुप या संस्थेचे टँकर असल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यांची निश्चित माहिती दिली जात नाही. तसेच काही सामाजिक संस्था, पुढारी टँकर देतात म्हणूनदेखील प्रस्ताव नाकारण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे एकुणच सरकारने यावेळेस 'धर्मावर सोमवार' करत सारे काही आलबेल असल्याचा देखावा करत असल्याचे चित्र आहे. परिसरात नागरिकांना दोन किलोमीटर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, तर दुसरीकडे आदिवासी भागात टँकर नाकारल्याने तेथील महिलांचीही पायपीट वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाजन जमीन मूळ मालकाला परत देणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तापी पूर्णा प्रकल्पाबाबत मानपूर येथील जमीन हडपल्याचे माझ्यावर जे आरोप केले जात आहेत, ते बिनबुडाचे आहेत. या जमिनीच्या सातबाऱ्यावर माझे नाव आहे हे मला माहीत नाही. ज्या कारणासाठी ही जमीन ताब्यात घेतली त्या कारणासाठी तिचा विनियोग होत नसेल तर ती मूळ मालकाला परत देण्यास मी तयार आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले, की सरकारने पेट्रोलऐवजी इथेनॉलच्या उत्पादनाला प्राधान्य दिले होते. यासाठी तापी पूर्णा प्रकल्पासाठी ८४ एकर जमीन घेण्यात आली. त्यातील २५ एकर जमीन संचालकांच्या नावे घेण्यात आली. प्रत्येक संचालकाच्या नावावर पाच एकर जमीन होती. मात्र, सरकारची भूमिका बदलल्याने हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. या जमिनीच्या सातबाऱ्यावर माझे नाव असल्याबाबत मी अनभिज्ञ होतो. निवडणुकीच्या वेळी प्रतिज्ञापत्र भरून देतानाही मी याचा कधी उल्लेख केला नाही. माझ्या कुठल्याही आयकर विवरणात याचा उल्लेख नाही. त्यामुळे मी भूखंड खाल्ला, असे म्हणणे उचित होणार नाही. मला या जमिनीबाबत आजही काही माहिती नाही. मी ती जमीन पाहिलेलीही नाही. या जागेचा वापर झाला नसल्याने ती जागा मी मूळ मालकाला परत देण्यास तयार आहे. इतर संचालक काय निर्णय घेणार आहेत याबाबत मी काही सांगू शकत नाही, असे ते म्हणाले. याबाबत माझ्याबाबत कुणी तरी बदनामी करत आहे, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोथी पारायणाचे मानधन दुष्काळग्रस्तांना

0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

कमाईतला काही वाटा समाजासाठी राखून ठेवावा, अशी आपल्या पूर्वजांची शिकवण आहे. नाशिकच्या ८१ वर्षीय सुमती बापट यांनीही पोथी पारायणातून मिळालेले संपूर्ण मानधन दुष्काळग्रस्तांना देत समाजासमोर आदर्श ठेवला आहे. गजानन महाराजांच्या पोथीचे मुखोद्गत पारायण करणाऱ्या बापट यांनी आतापर्यंत अनेकांचे संसार उभे केले आहेत, तर अनेकांना त्यांनी व्यवसायासाठी मदत केली आहे.

बापट यांना गजानन महाराजांची संपूर्ण पोथी मुखोद्गत आहे. त्यांनी १९६७ मध्ये शेजारच्यांकडून ही पोथी आणून वाचली. त्यानंतर ती विकत घेऊन अखंड पारायण करायला सुरुवात केली. १९७३ मध्ये ही पोथी मुखोद्गत झाल्यानंतर त्यांनी ती कधी हाती घेण्याची गरज पडली नाही. आतापर्यंत त्यांनी भारताच्या कानाकोपऱ्यात गजानन महाराजांच्या पोथीची पारायणे केली आहेत. अहमदबाद, दिल्ली, बडोदा आदी शहरांत महाराजांचे विचार पोहोचवण्यासाठी फिरल्या. हे करीत असताना यामधून मिळणारे मानधन त्यांनी स्वतःसाठी कधीही वापरले नाही. हे सर्व मानधन त्या समाजकार्यासाठी देत आहेत. मिळालेल्या मानधनातून अनेकांच्या मुलांचे शिक्षण केले. काहींचे व्यवसाय उभे करून दिले. अनेक गावांना पाण्याच्या टाक्या बांधून दिल्या. गरीब मुलींचे लग्न लावून दिले. अनेक ठिकाणी सत्कार होतात. लोक शाली, साड्या देतात. यातील एकही वस्तू त्या स्वतःसाठी कधीही वापरत नाहीत. ''देवाच्या कृपेने मला सगळे मिळाले आहे. महाराजांनी दिलेला पैसा हा माझा नसून समाजाचा आहे. त्यासाठीच तो वापरला पाहिजे,'' असे त्या म्हणतात.

येणारा पैसा माझा नाही. तो मी कशाला स्वतःसाठी खर्च करू. मला देवाने भरपूर दिले आहे; मदत करते. हा छोटासा प्रयत्न आहे. - सुमती बापट

पावती देणारा 'तो' आहे!

यंदा महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात दुष्काळाची झळ पोहोचली आहे. गावोगावी पाणीटंचाई आहे. यासाठी त्यांनी भक्त परिवाराच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये पाण्याच्या टाक्या पोहोचवल्या आहेत व येत्या काही दिवसांत आणखी देणार आहेत. दुष्काळाची झळ बसलेल्या विदर्भ, मराठवाड्यातही त्यांनी मदतकार्य सुरू ठेवले आहे. कुणाकडे हात पसरायचे नाही आणि मागायचेही नाही. पारायणाच्या माध्यमातून जे काही मिळेल ते पाण्यासाठी वापरायचे, असा त्यांनी निश्चय केला आहे. पुण्याजवळील खेड्यात एका व्यक्तीची मोठी शेती आहे. मात्र, पाणी नसल्याने तो त्यातून काहीही उत्पन्न मिळवू शकत नव्हता. जेव्हा बापट यांना या शेतकऱ्याची कैफियत समजली, तेव्हा त्यांनी तत्परतेने त्या व्यक्तीला विहीर तयार करून दिली. कोकणातील काही गावांमध्येही विहिरी बांधून दिल्या आहेत. कुणाला एखादी वस्तू दिल्यानंतर त्याची पावती त्या घेत नाहीत. 'पावती देणारा तो बसला आहे. कागद घेऊन त्याचे काय करू,' असे त्या म्हणतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्याजवळील भीषण अपघातात १७ प्रवासी ठार

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सुरत-नागपूर महामार्गावर शुक्रवारी, सायंकाळी एका मालवाहू कंटेनरचे टायर फुटून तो कालीपिलीवर जाऊन आदळला. या भीषण अपघातात कालीपिलीमधील १७ प्रवासी जागीच ठार झाले, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. धुळे तालुक्यातील भिरडाणे गावाजवळ ही घटना घडली. मृत प्रवाशांमध्ये नऊ महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे.

धुळ्याहून जळगावकडे जाणाऱ्या कंटेनरचे (एमएच १८ एए ०९७८) धुळे तालुक्यातील भिरडाणे गावाजवळ उजव्या बाजूचे पुढील टायर फुटले. त्यानंतर हा कंटेनर समोरून येत असलेल्या कालीपिलीवर (एमएच १८ ई ८४७१) जाऊन जोरात आदळला. या भीषण धडकेत प्रवासी वाहनाचा चक्काचूर होऊन १७ जण जागीच ठार झाले. मृत व्यक्तींमध्ये चेतन छोटू पवार, रेखा नरेंद्र पाटील, सुलोचना राजेंद्र पाटील, विजय गुलाबराव पाटील, संगीता प्रेमराज मैंद, वसंत पंढरीनाथ पाटील, योगिता भटू पाटील, रामलाल तुळशीराम तिवारी, रफीक शेख, अनुसयाबाई, सिता फुला अहिरे, भारती हिरालाल बागूल, हेमतला मनोहर चौधरी, मंगला भाऊसाहेब पाटील, सरिता विश्वनाथ पाटील व अन्य दोघांचा समावेश आहे. इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. या अपघातामधील मृत व्यक्ती धुळे तालुक्यातील फागणे, मुकटी, अजंग, मोहाडी येथील रहिवासी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालीपिलीत होते २४ प्रवासी?

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सुरत-नागपूर महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी एका मालवाहू कंटेनरचे टायर फुटून झालेल्या अपघातात कालीपिलीमधील १७ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. या कालीपिलीला नऊ प्रवाशांची आसन क्षमता मंजूर असताना, त्यात २४ प्रवासी कोंबण्यात आलेले होते, अशी माहिती आता सांगितली जात आहे. हा भीषण अपघात धुळे तालुक्यातील भिरडाणे गावाजवळ घडला होता. या घटनेमुळे अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

अपघातानंतर धुळे जिल्हा पोलिसांनी शनिवारच्या दिवशी पन्नासहून अधिक कालीपिली आणि खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. मात्र, पोलिसी कारवाईचे हे सत्र आणखी किती दिवस चालू राहील याबद्दल नागरिक साशंक आहेत. एरवी या गाड्यांमध्ये सर्रासपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले जातात. त्यांच्यावर आरटीओ, पोलिस प्रशासन वेळीच कारवाई का करत नाही? असा अर्थपूर्ण प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख सतीश महाले, प्रदीप पानपाटील, हेमंत साळूंखे, अतुल सोनवणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उर्दू शाळा आता ‘डिजिटल’

0
0

विद्यार्थ्यांना अभ्यासात होणार लाभ

Gopal.Paliwal@timesgroup.com

धुळे जिल्ह्यात डिजिटल शाळा अभियानात आता उर्दू शाळांनाही डिजिटल क्लासरूम सुरू झाले आहे. नुकतेच सोनगीरला मुलींची शाळा क्र. २, येथे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्याहस्ते डिजिटल क्लासरूमची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे आता जिल्ह्यातील उर्दू शाळांतील अभ्यासक्रम आता मुलांना डिजिटली अभ्यासता येणार आहे.

जिल्हाभरात गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम हे अभियान सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास २५० शाळा संगणकीय अभ्यासक्रमाचा लाभ घेत आहेत. यामध्ये उर्दू शाळांचे प्रमाण मात्र कमी होते. यामुळे या अभियानाअंतर्गत सोनगीर येथील जिल्हा परिषदेची मुलींची शाळा क्र. २ मध्ये खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते डिजिटल क्लासरूमची सुरुवात करण्यात आली. या डिजिटल प्रणालीमुळे उर्दू शाळेस अभ्यासक्रम पूर्णपणे संगणकीय आधाराने मिळणार आहे. त्यांना याचा लाभ १ ली ते ५ वी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देता येणार आहे.

यासाठी पुणे येथील कंपनीने हे सॉफ्टवेअर तयार केले असल्याचे अभियानाचे हर्षल विभांडिक यांनी माहिती देताना सांगितले. आम्ही 'प्रेरणा सभा'च्या जिल्ह्यातील जवळपास सर्वच शाळा येत्या जुलै महिन्यापर्यंत डिजिटल करू, असा विश्वासही विभांडिक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घरकुल’ राबविताना धोरणात्मक निर्णय

0
0

कनिष्ठ लेखापरीक्षक संजय कुटे यांची माहिती

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जळगाव नगरपालिकेने घरकुल योजना राबविताना कोणत्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेतला नव्हता. तसेच त्यासाठी अंदाजपत्रकाला जिल्हाधिकाऱ्यांची परवानी आणि योजनेला तांत्रिक मंजुरी घेण्यात आलेली नव्हती, अशी माहिती विशेष लेखापरीक्षण करणारे अहमदनगर येथील स्थानिक लेखा विभागाचे कनिष्ठ लेखापरीक्षक संजय रमन कुटे यांनी विशेष न्यायालयात सरतपासणीत दिली. मंगळवार, (दि. २८) रोजी धुळे जिल्हा व सत्र न्यायालयात जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी कामकाज झाले.

यात सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी, अॅड. प्रवीण चव्हाण यांच्याकडून याबाबत सरकारच्या आदेशानुसार ही सरतपासणी घेण्यात आली. कुटे यांनी सांगितले की, सरकारच्या आदेशानुसार जळगाव घरकुल योजनेचे विशेष लेखापरीक्षण करण्यासाठी नाशिकच्या स्थानिक लेखा विभागाचे डेप्युटी चीप ऑडीटर यांच्याकडून दोनजणांचे पथकाची नियुक्ती केली गेली. त्यात आपल्यासह गहिवड होते. तर प्रमुख सतिष कडकसे होते. मार्च ते जुलै २००७ या काळात हे विशेष ऑडीट करण्यात आले. त्यावर जळगावचे डेप्युटी ऑडीटर सोलंकी, धनगर, द्वारके यांच्याकडून देखरेख केलेल्या ऑडीटची तपासणी केली जात हाती.

लेखापरीक्षाबाबतचा अहवाल देत यामध्ये विविध प्रकारच्या मुद्द्यांना समाविष्ट करण्यात आले होते. प्रामुख्याने यात नगरपालिकेकडून घरकुल योजना राबविण्यासाठी कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यात आला नव्हता. तसेच त्याबाबतच्या अंदाजपत्रकाला जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेतली गेली नव्हती. ऑडीट करताना कॅशबुक, बिले, माजमाप पुस्तिका, नगरपालिका संचिका, टिपणी, अंदाजपत्रके, विविध प्रकारच्या याद्या आदींची तपासणी केली गेली. त्यानंतर संशयित आरोपींकडून उलटतपासणी घेण्यात आली. त्यात अॅड. प्रमोद पाटील, अॅड. एस. के. शिरोडे यांनी उलटतपासणी घेतली. कामकाजावेळी आरोपी सुरेश जैन, जगन्नाथ वाणी, पी. डी. काळे, राजा मयूर, प्रदीप रायसोनी, गुलाबराव देवकर आदींसह इतर संशयित आणि वकिलांची न्यायालयात उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदुरबार पं. स. वर काँग्रेसचा झेंडा

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार तालुका पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदासाठी मंगळवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात सर्वाधिक अकरा सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार हादरा देत काँग्रेसने झेंडा फडकविला आहे. यात काँग्रेसच्या रंजना नाईक सभापतीसाठी बहूमताने विजयी झाल्या. तर उपसभापतिपदी ज्योती पाटील यांचा विजय झाला आहे.

निवडणुकीत ऐनवेळेस राष्ट्रवादीचे चार सदस्य गैरहजर राहिल्याने अकरा सदस्य असूनही त्यांना हातची सत्ता गमावावी लागली आहे. मंगळवारी, (दि. २८) दुपारी काँग्रेसतर्फे रंजनाताई नाईक यांनी सभापती तर उपसभापती पदासाठी ज्योती पाटील यांनी अर्ज दाखल केले. तर राष्ट्रवादीच्यावतीने पुष्पांजली गावीत यांनी सभापती आणि तुषार धामणे यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केले होते. दरम्यान काँग्रेसचे सर्वच्या सर्व नऊ सदस्य उपस्थित राहिले आणि राष्ट्रवादीचे फक्त सात सदस्य हजर राहिल्याने राष्ट्रवादीच्या हातून सत्ता गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे तालुक्यातील पाच जणांना जन्मठेप

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे तालुक्यातील मुकटी गावात २९ जानेवारी २०१५ रोजी, रात्रीच्या सुमारास मागील भांडणाचा राग मनात ठेवून वचपा काढण्यासाठी आलेल्या सहा जणांपैकी पाच जणांना धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. प्रदीप काळे यांनी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील अजून एक आरोपी फरार असून, त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असल्याची माहिती सरकारी वकील शामकांत पाटील यांनी दिली.

मागील भांडणाचा राग मनात ठेवून सतीश उर्फ योगेश पाटील, सुनील पाटील, ईश्वर पाटील, चंदू पाटील, उमेश पाटील, योगेश पाटील यांनी मुकटी गावातील समाधान पाटील व दत्तात्रय पाटील या दोघा भावांवर गुप्ती आणि चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. समाधान पाटील हा जागीच मृत झाला, तर दत्तात्रयला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा व जिवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करून पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळ्यात समर्थकांचा जल्लोष

0
0

खासदार डॉ. सुभाष भामरेंना केंद्रात राज्यमंत्रीपद; क्लीन इमेजला संधी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांचा सोमवारी, (दि. ४) केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने जिल्हाभरात आनंदाला उधाण आले होते. शहरात भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांनी ठिकठिकाणी फटाके फोडत, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. तर मंगळवारी (दि. ५) सकाळी अकरा वाजता डॉ. भामरे यांचा शपथविधी दिल्ली येथे झाला. त्यावेळी खासदार डॉ. भामरे यांच्या कुटूंबातील सदस्य उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.

खासदार डॉ. सुभाष भामरे यांची मंत्रिपदाची बातमी धुळे जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरताच सोशल मीडियासह विविध माध्यमांवर खासदार भामरेंना शुभेच्छाचा वर्षाव सुरू झाला. शहरातील त्यांच्या घरीही कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी आपला आनंद डॉ. भामरे यांच्या कुटुंबासोबत साजरा केला. यावेळी डॉ. भामरे यांच्या निवासस्थानी त्यांचे वडील रामराव पाटील, पत्नी विणा भामरे, बंधू सुरेश पाटील यांच्या डोळ्यातून प्रथम अश्रूअनावर झाले अन् त्यानंतर पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. धुळे शहरासह डॉ. भामरे यांच्या मुळगावी साक्री तसेच तालुक्यातील मालपूर, शिंदखेडा, शिरपूर याठिकाणीही फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्याला डबल बोनस

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात धुळे जिल्ह्याला स्थान मिळणार अशी बातमी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. मात्र ही बातमी अखेर गुरुवारी (दि. ७) सांयकाळी निश्चित झाली.

जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका मतदारसंघातील भाजपचे आमदार जयकुमार रावल यांची राज्यमंत्री पदासाठी वर्णी लागल्याने धुळे शहरात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला. या वेळी ज्येष्ठ कार्यकर्ते विजय पाश्चापूरकर, हिरामण गवळी, विनोद मोराणकर, अमित खोपडे, यशवंत येवलेकर, नगरसेविका वैभवी दुसाने, प्रतिभा चौधरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडीने धुळ्याला भाजपकडून डबल बोनस मिळाल्याची चर्चा शहरात होत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसामुळं सुरत-भुसावळ रेल्वेमार्ग खचला!

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नंदुरबार, नाशिक

नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर आज सकाळपासून ओसरल्याचे चित्र आहे. मात्र, गेल्या २४ तासांत झालेल्या अतिवृष्टीने ४ जणांचे बळी घेतले आहेत, तर दोघे बेपत्ता आहेत. मुसळधार पावसामुळे तीन किमी लांबीचा सुरत-भुसावळ रेल्वेमार्ग खचला असून सुरत-नंदुरबार मेमू रेल्वेचे चार डबे घसरले आहेत. त्यामुळं वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.

मुसळधार पावसामुळे रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सुरत-भुसावळ मीटरगेज रेल्वे मार्गावरील ३ किमीपर्यंतचा मार्ग खचला. त्यामुळं सुरत-नंदुरबार मेमू रेल्वेचे ४ डबे घसरून अनेक प्रवासी अडकून पडले होते. पावसाची संततधार सुरू असल्याने मदतकार्यात अडचणी येत होत्या. अखेर सोमवारी पहाटे सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता असून रेल्वे प्रवाशांसाठी १५ बसेसची सोय करून देण्यात आली आहे.

पाचोराबारी येथे अतिवृष्टीमुळे सहा जण वाहून गेले. यापैकी चौघांचे मृतदेह हाती लागले असून अन्य दोन जण बेपत्ता असल्याचे जिल्हाधिकारी एम. एस. कलशेट्टी यांनी सांगितले. पावसामुळे सुमारे ८० घरांचे नुकसान झाले असून १०० जनावरे दगावल्याचेही सांगण्यात आले. नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, पावसाचा जोर ओसरल्यामुळं परिस्थिती बरीच नियंत्रणात असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

नाशिकमध्येही धो-धो

गेल्या २४ तासात नाशिक जिल्ह्यात धो-धो कोसळणाऱ्या पावसाने गंगापूर आणि दारणाच्या पाणी साठयात विक्रमी वाढ झाली आहे. जिल्ह्याचा धरणसाठा ९ टक्यावरून थेट २४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून नाशिककरांचा पाणीप्रश्न सुटेल, अशी आशा आहे.

गंगापूर धरणात ४८.३३%, दारणा धरणात ६६.१३%, तर कश्यपी धरणात १५.३८ % पाणीसाठा असल्याची नोंद करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून दाराणातून ९,१७५ क्युसेक्स, नांदूर मध्यमेश्वरमधून २३,३२६ क्युसेक्स, गोदावरी उजवा कालव्यातून २०० क्युसेक्स, गोदावरी डावा कालवा १०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

चोवीस तासातील पाऊस (११ जुलै)

> नाशिक १८४ मिमी > इगतपुरी २१५ मिमी > त्र्यंबक २०८ मिमी > दिंडोरी १३४ मिमी > पेठ १८७ मिमी > निफाड ७१ मिमी > सिन्नर ९१ मिमी




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिवृष्टीमुळे सुरत-भुसावळ रेल्वेमार्ग खचला

0
0

नवापूर तालुक्यातील घटना; १२ गाड्यांच्या मार्गात बदल तर तीन रद्द

टीम मटा, जळगाव/धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील पाचोराबारीजवळ झालेल्या अतिवृष्टीमुळे सुरत-भुसावळ रेल्वेमार्गाचा तीन किमीचा भाग हा १० ते १५ फूट खोल खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील १२ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यासह तीन गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत. भुसावळहून सुरतकडे जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या या नंदुरबारपर्यंत आणि सुरतकडून येणाऱ्या गाड्या सद्यस्थितीत नवापूरपर्यंत चालविल्या जात आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात रविवार व सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. आतापर्यंत नवापूर तालुक्यात २५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाचा मोठा फटका रेल्वेलादेखील बसला आहे. गुजरात व खान्देशला जोडणाऱ्या सुरत-भुसावळ रेल्वेमार्गाचा तीन किमीचा पट्टा रविवारी रात्री, पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेला. या भागात आता आधारासाठी खडी व स्लिपर नसल्याने रूळ अधांतरी आहेत. त्यावरून इंजिन जाणे शक्य नाही. हा मार्ग वाहून गेला त्यावेळी सुरतहून रात्री साडेनऊला निघालेल्या सुरत-नंदुरबार पॅसेंजरचे (५९०५१) इंजिनपासूनचे पहिले चार ते पाच डबे रूळावरून खाली उतरले. सुदैवाने या घटनेत जिवीतहानी झाली नाही. गाडीतील प्रवाशांची संख्या पावसामुळे कमी होती. या घटनेची माहिती मिळताच नंदुरबार रेल्वेस्थानकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्री घटनास्थळी धाव घेतली. पश्चिम रेल्वेचे ईआरएम व मुंबईचे डीआरएम दाखल झाले आहेत.

प्रेरणा एक्स्प्रेस ढेकवदपासून परत

या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल केले. सुरतहून रात्री प्रेरणा एक्स्प्रेस ढेकवदपर्यंतच येऊन परत गेली. नंदुरबार स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांना परत नवापूरला पाठविण्यात आले. या प्रवाशांना तिकिटाचे पूर्ण भाडे रेल्वेने परत केले आहे. सुरतहून जळगावकडे येणाऱ्या काही गाड्या या वसई, कल्याण, नाशिकमार्गे वळविण्यात आल्या आहेत. भुसावळ-सुरत पॅसेंजर(५९०७८), सुरत-भुसावळ पॅसेंजर (५९०७५) व भुसावळ-सुरत पॅसेंजर (५९०७६) या तीन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

गाड्यांच्या मार्गात बदल

हावडा-अहमदाबाद(१२८३४), चेन्नई-अहमदाबाद नवजीवन (१२६५६), हावडा-पोरबंदर (१२९०६), अहमदबाद-हावडा (१२८३३), राजकोट-रेवा (१२९३७) या गाड्या भोपाळ, रतलाम, गोध्रा, वडोदरा, अहमदाबादमार्गे वळविण्यात आल्या आहेत. अहमदाबाद-नागपूर प्रेरणा (११४५३), अहमदाबाद-पुरी (१२८४४), गांधीधाम-विशाखापट्टनम् (१८५०२), सुरत-छपरा ताप्तीगंगा(१९०४५), अहमदाबाद-चेन्नई नवजीवन (१२६५५), बिकानेर-सिकंदराबाद (१७०३८) व वाराणसी-उधना (१९०५८) या सुरत, वसई रोड, कल्याण, नाशिक, जळगावमार्गे वळविण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मदतकार्य युद्धपातळीवर

0
0

पाचोराबारीत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपये

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी परिसरात रविवारी, (दि. १०) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील नाल्याला आलेल्या पुरात चारजण वाहून मृत्यूमुखी पडले तर दोन जण बेपत्ता आहेत. घटनास्थळी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी, (दि. १२) भेट देऊन पाहणी केली असून राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत करण्यात आली. अभ्यास दौऱ्यासाठी गेलेल्या खासदार डॉ. हीना गावित यांनीदेखील तत्काळ मायदेशी परतत पाचोराबारीत पाहणी केली. केंद्राकडून अतिवृष्टीत मृत व जखमींच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या अतिवृष्टीत सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावरील रूळ खचल्याने रेल्वे प्रशासनाकडून सोमवारी पहाटेपासून रेल्वेमार्ग सुस्थितीत करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. तर बुधवारी दुपारनंतर हे काम सुरळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

रविवारी (दि. १०) झालेल्या अतिवृष्टीने पाचाेराबारी भागात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तसेच या पावसाने रेल्वेसेवाही ठप्प झाली असून ती सुरू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर पाचोराबारी गावाचे जनजीवन पुन्हा सुरळीत होण्याच्या मार्गावर असून गावातील लोकांना सर्व सुविधा जिल्हा प्रशासनाच्यावतीने पुरविण्यात येत आहेत. यासाठी शर्यतीचे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पाचोराबारीच्या नुकसानग्रस्त भागास पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र डहाळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जी. सी. मंगळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, प्रांताधिकारी सुनिल गाडे, तहसीलदार नितीन पाटील, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता वर्षा अहिरे, जिल्हा परिषदेचे बी. एन. पाटील, मध्यम प्रकल्पाचे गिरवीरसिंग सुखमणी आदींनी भेटी देत पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते राज्य सरकारकडून मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना तत्काळ चार लाख रुपये देण्यात आले. तसेच ज्यांची गुरे-ढोरे, जनावरे वाहून गेली त्यांना तीस हजारांची मदत देण्यात आली. या मदतीपासून एकही जण वंचित राहणार नाही याबाबत त्यांनी सूचना दिल्या. घटनेतील नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्यांना वेळेत मदत करण्याच्या सूचनाही पालकमंत्री महाजन यांनी दिल्या. पुरामुळे चार जणांचा मृत्यू तर दानजण बेपत्ता आहेत. तसेच एकूण १७३ छोटी व मोठी जनावरे मृत झाली असून त्यांच्या मृत शरीराची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्याचे काम करण्यात आले. या गावातील एकूण ३२ घराचे पुर्णत: व १३९ घराचे अंशत: नुकसान झाले आहे. रेल्वे रुळाखालील भराव वाहून गेल्यामुळे अंदाजे ३ किलोमिटर लांबीचा रेल्वेमार्ग बाधित झाला आहे. त्यांच्या दुरुस्तीबाबत रेल्वे विभागामार्फत युद्धपातळीवर काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. मलिनाथ कलशेट्टी यांनी दिली.

गाड्यांच्या मार्गात बदल

भुसावळ : नंदुरबार येथ झालेल्या अतिवृष्टीने मंगळवारी, (दि. १२ जुलै) रोजी ११ गाड्यांच्या मार्गात बदल झाला आहे. तर गाडी क्र. ५९०१४ सुरत-भुसावळ ही रेल्वे रद्द करण्यात आली आहे. या गाड्यांमध्ये चैन्नई-अहमदाबाद एक्स्प्रेस (गाडी क्र.१२६५६) ही गाडी मनमाड, कल्याण, भोईसरमार्गे वळविण्यात आली आहे. सुरत-भागलपूर (गाडी क्र.१९०४७) ही दीड तास उशिराने निघेल. तर उधना-धनपूर (गाडी क्र. १९०६३) ही गाडी १० तास ४५ मिनिटे उशिराने सुटेल. सुरत-पुरी एक्स्प्रेस (गाडी क्र.२२८२६) ही गाडी ३ तास ३५ मिनिटे उशिराने धावेल. जोधपूर-चैन्नई (गाडी क्र.१६१२६) ही भोईसर, कल्याणमार्गाने धावेल. तसेच भागलपूर-सुरत (गाडी क्र.१९०४८) ही गाडी भुसावळ, इगतपुरीमार्गे धावणार आहे. अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस

(गाडी क्र.१२८४४) ही गाडी कल्याणमार्गे धावेल. सुरत-पुरी

(गाडी क्र.२२८२८) ही गाडी १९ तास उशिराने सुटेल. अहमदाबाद-हावडा (गाडी क्र.१२८३३) ही गाडी दहातास उशिराने धावेल, तर अहमदाबाद-चैन्नई एक्स्प्रेस (गाडी क्र.१२६५५) ही गाडी १३ तास १५ मिनिटे उशिराने सुटेल. तसेच गाडी क्र.19263 पोरबंदर दिल्ली रोहिला (गाडी क्र.१९२६३) ही गाडी २० तास १० मिनिटे उशिराने धावणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images