Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पत्नीचा खून करून शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

तळेगाव दिंडोरी (ता. दिंडोरी) येथे घरगुती वादातून एका वृद्ध शेतकऱ्याने पत्नीला काठीने मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दिंडोरी पोलिसांनी पतीविरुद्ध पत्नीच्या खुनाचा, तसेच आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

तळेगाव दिंडोरी येथील तातीराम अर्जुन उगले (वय ८५) व गीताबाई तातीराम उगले (वय ७६) हे शेतकरी दाम्पत्य दोघेच वस्तीवर राहत होते. रविवारी रात्री त्यांच्यात वाद होऊन तातीराम यांनी पत्नीस त्यांच्याच आधाराच्या बांबूच्या काठीने डोक्यावर मारहाण केली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर तातीराम यांनीही स्वतः राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी त्यांचा मुलगा आला, तेव्हा दरवाजा बंद आढळला. नातेवाइकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या दाम्पत्याच्या मागे दोन मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दिंडोरी पोलिसांनी तातीराम उगले यांच्याविरुद्ध पत्नीच्या खुनाचा, तसेच आत्महत्येचा गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक मधुकर गावित करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हज यात्रेचे टेक ऑफ ओझरहून होणार!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ओझर येथून कार्गो सेवा कार्यान्वित झाल्यानंतर आता पुढील महिन्यातील हज यात्रेचे टेक ऑफ ओझरहून करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. यासंदर्भात संबंधित यंत्रणांची चाचपणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातून १५०० मुस्लिम बांधव हज यात्रेला यंदा जाणार आहेत. त्यांना या सेवेचा फायदा होऊ शकणार आहे. मक्का येथे होणाऱ्या हज यात्रेला जगभरातून भाविक हजेरी लावतात. आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करावी, अशी भावना मुस्लिम बांधवांमध्ये आहे. त्यामुळे दरवर्षी या यात्रेला जाणाऱ्या इ्च्छुकांची संख्या मोठी असते. नाशिक जिल्ह्यातून दरवर्षी किमान एक हजार भाविक हज यात्रेला जातात. यंदा महाराष्ट्रातून ५५ हजार मुस्लिम बांधवांनी हज यात्रेसाठी अर्ज केले होते. ग्रीन हाऊससाठी (फर्स्ट क्लास) २ लाख १९ हजार ९५० तर अमिमियासाठी (सेकंड क्लास) एक लाख ८६ हजार ५० रुपये भरण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यातून अर्ज केलेल्या १५०० जणांची सरकारने लॉटरी पद्धतीने निवड केली आहे. हे सर्वजण मुंबईहून विमानाद्वारे हज येथे जाणार आहेत. मात्र, गेल्या आठवड्यात ओझर येथील विमानतळावरुन शेळ्या-मेंढ्यांची शारजाह येथे निर्यात करण्यात आली आहे. तसेच, ओझर येथे अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनलही आहे. या बाबींचा विचार करता हजसाठी मुंबईऐवजी थेट ओझरहून विशेष विमान पाठविता येईल का, याचा गांभिर्याने विचार सुरु आहे. त्यादृष्टीने चाचपणीही केली जात असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. ऑगस्ट महिन्यात हज यात्रा सुरू होत असून, जवळपास वीस दिवस अवधी असल्याने तांत्रिक आणि इतर बाबी येत्या काळात जुळून येऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे ओझरहून थेट सेवा दिली गेल्यास नाशिक, मालेगाव आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मुस्लिम बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ट्रॅव्हल कंपन्याही इच्छुक

दरम्यान, ओझर येथून हजसाठीच्या विशेष सेवेबाबत खासगी ट्रॅव्हल कंपन्याही इच्छुक आहेत. या कंपन्यांनी हॅनहोव्हर येथील प्रशासनाशी संपर्क करुन विमानसेवा देण्याबाबत बोलणी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचारी-अधिकाऱ्यांना ओळखपत्र सक्तीचे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

बदली होऊनही मुख्यालयात फिरणाऱ्या महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांना चाप लावण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी आता सर्वांसाठी ओळखपत्र सक्तीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ओळखपत्र लावावे लागणार असून, नियुक्त जागेव्यत‌िरिक्त फिरतांना आढळल्यास थेट कारवाईचा सामना करावा लागणार आहे. आयुक्त अभिषेक कृष्णा यांनीही डॉ. प्रवीण गेडाम स्टाईल कर्मचाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी गनिमी काव्याचा वापर करण्याचा निर्णय घेत


पालिका मुख्यालयातून बदली होवूनही अनेक कर्मचारी व अधिकारी हे मुख्यालयातच बदलीपूर्व ठिकाणी काम करतात. शेखर कावळे हा नाशिकरोडला घरपट्टीत बदली झाला होता. तरीही त्याने बांधकाम विभागात येवून लाच स्वीकारली. त्यामुळे आयुक्त कृष्णा यांनी सर्व कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी तातडीने हजर होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच परिपत्रक काढून ओळखपत्र वापरणे सक्तीचे केले आहे. जो कर्मचारी ओळखपत्र वापरणार नाही त्यावर थेट कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.तसेच गैरहजर व अनुपस्थित राहणा-या कर्मचा-यांसाठी लवकरच गनीनी काव्याने कारवाई केली जाणार असल्याचे संकेत त्यानी दिले आहेत.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नराधमांना कठोर शिक्षा करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अत्याचार व हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला. या घटनेची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर महिनाभराच्या आत कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे करण्यात आली. कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणानंतर शहरात आंदोलनांचा भडका उडाला आहे. मंगळवारी सर्वपक्षीय नेत्यांनी काळ्या फिती लावून मूक मोर्चाद्वारे निषेध नोंदविला. बी. डी. भालेकर मैदानावरुन या मोर्चाला सुरुवात झाली. शाल‌िमार, रेड क्रॉस सिग्नल, मेहेर चौकमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. या मोर्चात शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, माकपच्या पदाधिकाऱ्यांसह अखिल भारतीय युवक मराठा महासंघ, अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. घोषणाबाजी न करता आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचले. तेथे सीबीएसच्या मुख्य रस्त्यावरच छोटेखानी सभा झाली. आरोपींना फाशीपेक्षाही कठोर शिक्षा लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मोर्चात डॉ. डी. एल. कराड, अजय बोरस्ते, अॅड. रवींद्र पगार, शरद आहेर, यतीन वाघ, करण गायकर, अॅड. राहुल ढिकले, डॉ. संदीप कोतवाल, विक्रम कदम, विलास शिंदे, अनिल मटाले, अर्जुन टिळे, विलास सातभाई, माधुरी भदाणे, हेमलता पाटील, काजल गुंजाळ, युवराज धात्रक, आकाश पगार, आदी सहभागी झाले होते. आरोपींना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी या सर्वांनीच केली. राजकीय पक्ष आणि संघटनांच्या भावना निश्चितपणे राज्य सरकारपर्यंत पोहोचवू अशी ग्वाही जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.

भाजपने राखले अंतर या महामोर्चामध्ये सर्व राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले असले, तरी भारतीय जनता पक्षाने मोर्चापासून अंतर राखल्याचे पहावयास मिळाले. संशयितांवर कठोर कारवाईसाठी भाजप टीकेचा धनी ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच घरफोड्या; लाखो रुपये लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील पंचवटी, अंबड, उपनगर, सातपूर आणि इंदिरानगर या पोलिस स्टेशन हद्दीत चोरट्यांनी घरफोड्या करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी संबंध‌ित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असून, चोरट्यांना शोधून काढण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. घरफोडीची पहिली घटना पंचवटीत झाली. सोमवारी भरदिवसा झालेल्या या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दोन लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. याप्रकरणी लोखंडे मळा परिसरातील स्वामिनीनगर येथे राहणाऱ्या पोमाराज पुखारमजी जाट यांनी तक्रार दिली आहे. सोमवारी सायंकाळी कामानिमित्त जाट कुटुंबीय घराबाहेर पडले होते. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बॅगेत ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने व पाच हजार रुपयांची रोकड असा सुमारे दोन लाख पाच हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास उपनिरीक्षक देवरे करीत आहेत. यानंतरची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरात घडली. पाटील नगर येथील गौरीनंदन रो-हाऊसमध्ये राहणारे प्रसाद महादेव अंबुसकर हे रविवारी सायंकाळी थोड्या वेळासाठी घराबाहेर पडले होते. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत संशयित आरोपी सुभाष बिरसिंग ब‌िस्ट व त्याचा एक साथीदार यांनी बंद घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून वरच्या मजल्यावरील बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने व दीड लाख रुपयांची रोकड असा सुमारे सहा लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत. घरफोडीची तिसरी घटना जेलरोड परिसरातील हुनमंतानगर येथे राहणाऱ्या चेतन रमेश मोरे यांच्या घरात घडली. चोरट्यांनी सुमारे साडे चार हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. यानंतरचा गुन्हा सातपूर औद्योग‌िक वसाहतीत घडला. श्रम‌िकनगर येथील विठ्ठल लहानू हिरगळ यांच्या कंपनीच्या भट्टीवरील छताचे पत्रे उचकटून चोरट्यांनी स्टोअरमधील पाच प्लॅस्टिक बॅकेटमध्ये ठेवलेले सुमारे ९० हजार रुपये किमतीचे कॉपर मूव्हींग कॉन्ट्रॅक व कॉपर रॉड चोरी केले. सातपूर पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत. घरफोडीचा पाचवा गुन्हा इंदिरानगर पोलिस स्टेशन हद्दीत घडला. पाथर्डी शिवारातील गौळाणे फार्म हाऊस परिसरात राहणारे आकाश माणिकराव राऊत यांचा बंगला फोडून चोरट्यांनी घरातील एलसीडी टीव्ही, होम थिएटर, घड्याळ व घरगुती सामान असा सुमारे १९ हजार ६५० रुपयांचा ऐवज चोरी केला. रविवारी रात्री घडलेल्या या गुन्ह्याची इंदिरानगर पोलिसांनी नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेफ विष्णू मनोहर शिकविणार ग्रेव्ही बनविण्याची कला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना‌शिक

विविध प्रकारच्या डिशेस तयार करण्याची कला अवगत करण्यासाठी दि. २२ जुलै रोजी 'टाइम्स ग्रुप'तर्फे 'द कुकरी शो'चे आयोजन करण्यात आले आहे. एकाच पध्दतीच्या भाज्या बनविल्यामुळे घरातील लहान मुलं नेहमी भाज्या खाण्यात कंटाळा करतात. त्यामुळे त्यांचं चांगले पोषण होत नाही. एकच भाजी विविध प्रकारामध्ये कशा बनवता येतील याचे मार्गदर्शनपर 'द कुकरी शो'चे आयोजन 'टाइम्स ग्रुप'तर्फे करण्यात आले आहे. हा कुकरी शो शरणपूर रोड येथील हॉटेल एमरल्ड पार्क येथे दि. २२ जुलै रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिध्द मास्टर शेफ विष्णू मनोहर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणार आहेत. हा कुकरी शो सर्वांसाठी खुला आहे. फक्त महिलाच नव्हे तर ज्यांना जेवण बनवून इतरांना खाऊ घालण्यात आनंद मिळतो अशा सर्वांसाठी आयोजित करण्यात आले आहे. 'टाइम्स ग्रुप'तर्फे आयोजित 'द कुकरी शो'चे टायटल स्पॉन्सर सनबर्ड किचन, असो. स्पॉन्सर कारडा कन्स्ट्रक्शन, को स्पॉन्सर सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर व्हेन्यू पार्टनर हॉटेल एमरल्ड पार्क आहे. जास्तीत जास्त नाशिककरांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अठरा कोटींत ‘दारू’चा रुपयाही नाही!

$
0
0

arvind.jadhav @timegroup.com नाशिक ः गत वर्षात प्रादेश‌िक परिवहन विभागाने (आरटीओ) नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून तब्बल १८ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. मात्र, आरटीओने 'ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह'ची एकही कारवाई केली नाही. अपुरे मनुष्यबळ आणि साधनांचा अभाव अशी कारणे आरटीओकडून पुढे केली जात असून, याचा परिणाम मात्र रस्त्यावरील अपघातांच्या संख्येवर होतो आहे. अपघातांच्या ९० टक्के घटना मानवी चुकांमुळे होत असतात. यात मद्य प्राशन करून वाहन हाकणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. मात्र, अशा मद्यपींवर वचक ठेवण्यासाठी यंत्रणाच काम करीत नसल्याने अनर्थ घडतात. गत वर्षात आरटीओने ओव्हरलोड, सामानाच्या वाहनात नागरिकांची वाहतूक करणे, लायसन्ससह इतर कागदपत्रे नसणे अशा विविध कारणांमुळे लाखो वाहनचालकांवर कारवाई करीत तब्बल १८ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. मात्र, यात एकाही मद्यपी वाहनचालकावर कारवाई झाली नाही. आरटीओच्या तीन फिरत्या पथकांमार्फत ही कारवाई केली जाते. याबाबत उपप्रादेश‌िक परिवहन अधिकारी भारत कळसकर यांनी सांगितले की, 'ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह'संदर्भात केसेस करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. आमच्याकडे साधनेच नसल्याने आणि पुरेसे मनुष्यबळ नसल्याने कारवाई होत नाही. आरटीओ विभागाच्या या धोरणांमुळे वाहनचालकांचे फावते. वास्तविक 'ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह'च्या केसेस करताना आरटीओ अधिकाऱ्यांचा खूप वेळ खर्ची पडतो. संबंध‌ित चालकाची मेड‌िकल करणे, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस स्टेशनला जाणे, केसचा फॉलोअप ठेवणे, अशी कामे आरटीओ अधिकाऱ्यांना करावी लागतात. हा वेळ वाचवण्यासाठी आरटीओ तळीरामांवर कारवाई करण्याचा विचारच करत नाही. दरम्यान, हेल्मेटसक्तीसाठी आरटीओ कार्यालयातील अधिकारी वाहतूक पोलिसांप्रमाणे कारवाई करतात. मग, मद्य पिऊन दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. मद्यपी वाहनचालकांचे परवाने रद्द झाल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हड्डी कारखाने उद‌्ध्वस्त करा

$
0
0

लोकायुक्तांचे आदेश; निखिल पवार यांनी दाखल केली होती याचिका

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहराच्या लगत असलेल्या अवैध हड्डी उकळविण्याचे कारखाने, साबण बनवण्याचे कारखाने, स्लॅटर हाऊस तत्काळ उद‌्ध्वस्त करावेत. तसेच हे कारखाने पुन्हा प्रस्थापित होऊ नये म्हणून दक्षता घ्यावी, असे आदेश मुंबई येथील लोकायुक्त मु. ल. टेहालनिया यांनी मालेगाव महानगर पालिका व पोल‌िस प्रशासनास दिले आहेत.

याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार यांनी दाखल केलेल्या तक्रारींवर मुंबईत टेहालनिया यांच्यासमोर सुनावणी झाली. हे कारखाने पुन्हा सुरू झाल्यास किंवा मनपा व पोल‌िस प्रशासनाने कारवाईत दिरंगाई केल्यास लोकायुक्तांना कळवावे, असे आदेश तक्रादार पवार यांना दिले आहेत.

मालेगाव शहराच्या मध्यातून जाणाऱ्या महामार्गालगत असलेल्या पवारवाडी, ओवाडीनाला व दरेगाव शिवारात मोठ्या प्रमाणात अवैधपणे जनावरांची हाडे उकळण्याचे, चरबीपासून साबण निर्मिती करण्याचे कारखाने, कत्तलखाने सुरू आहेत. याकडे पालिका व पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरत असलेल्या या अवैध हड्डी कारखाने व कत्तलखान्यांबाबत तक्रारदार पवार यांनी सातत्याने पालिका व पोलिस प्रशासन यांच्याकडे तक्रार केली. मात्र त्यांना कुठलीही दाद मिळाली नाही. अखेर त्यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. याबाबत मंगळवारी सुनावणी झाली. मालेगाव महापालिकेच्या वतीने नगररचनाकार शकील सय्यद, पवारवाडी पोल‌िस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड व तक्रारकर्ते निखिल पवार उपस्थित होते.

याआधी २९ मार्च रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी दिलेल्या आदेशानंतर २ एप्रिल रोजी मनपाकडून कारवाई करण्यात आली होती. पवारवाडी परिसरातील अवैध कत्तलखाने, हड्डी उकळवण्याचे, साबण कारखाने तोडण्याबाबत आदेश लोकायुक्तांनी दिले होते. त्या आदेशावर काय कारवाई केली गेली याची माहिती आज लोकायुक्तांनी घेतली.

शुक्रवारी सुनावणी

मनपातर्फे सय्यद यांनी सांगितले की, हड्डी कारखाने तोडली असून आजपावेतो ती पुन्हा स्थापित झाली नाहीत. तसेच साबण बनवण्याच्या कारखानदारांनी स्थानिक न्यायालयातून जो मनाईहुकूम मिळवला आहे. त्यावर मनपाने मनाईहूकूम उठवण्याची मागणी न्यायालयात केली असून त्यावर २२ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने मनाईहुकूम उठवताच साबण कारखाने पूर्णतः उद्धवस्त करणार आहोत.

कारखान्यांची बांधकामेदेखील अनधिकृत

तक्रारदार निखिल पवार यांनी, एकता ऍग्रो फ्रुड्स, अल फैज एंटप्राईजेस, अल रिहिम फोरेजन फ्रुड्स पाकिजा अग्रो फूड्स कत्तलखाना या स्लॅटर हाऊसवर कारवाई झाली नाही. दरेगाव ग्रामपंचायतीने दिलेली बांधकाम परवानगी २३ मे २०१६ च्या आदेशाने महाराष्ट्र शासनाने अनधिकृत ठरवली आहे. तरी या कत्तलखान्यांवर कारवाईचे आदेश द्यावेत, साबण कारखान्यांवर कारवाई व्हावी, हड्डी कारखाने पुन्हा स्थापित होऊ नयेत म्हणून उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत, अशी लेखी मागणी केली. मनपा तर्फे शकील सय्यद यांनी या दरेगाव ग्रामपंचायतीने कारखान्यांना दिलेली बांधकाम परवानगी शासनाने अनधिकृत ठरवली असून त्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात २४ टक्के पेरण्या पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यात पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावल्याने जून महिन्याच्या अखेरपर्यंत झालेल्या २२ टक्के पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाली असून सोमवार (दि.१८) पर्यंत विभागातील ५८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्याचा अपवाद वगळता उर्वरित जिल्ह्यांत जून महिन्यात पावसाने प्रतीक्षा करायला लावली होती. नाशिक जिल्ह्यात तर जून अखेरीस केवळ २ टक्के पेरण्या झाल्या होत्या. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. परंतु, जुलै महिन्याच्या सुरुवतीपासूनच कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने नाशिक विभागात खरीप हंगामातील पेरण्यांना गती मिळाली होती. नाशिक विभागातील काही तालुक्यांचा भाग वगळता सर्वदूर पाऊस झाला. त्यामुळे पेरणी क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली असून आता तब्बल ५८ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने दिली.

जुलै महिन्यात बाजरी, मका, सोयाबीन, तुर, मुग, कपाशी, भात, भुईमुग या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. असे असले तरी विभागातील नगर आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांतील काही तालुक्यांत अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने या जिल्ह्यातील पेरणीचे क्षेत्र कमीच आहे. विभागात नाशिक जिल्ह्यात सर्वांत कमी क्षेत्रावर पेरणी झाल्याने या जिल्ह्यातील शेतकरी अजूनही पुरेशा पावसाच्या प्रत‌ीक्षेत आहे.

नाशिक जिल्ह्यातील उत्तर पूर्व भागातील येवला, चांदवड, नांदगाव, देवळा, मालेगाव, कळवन व सटाणा या तालुक्यांत अद्यापही सरसरी पेरणी पावसाअभावी रखडली आहे. विभागातील जळगाव जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाल्याने या जिल्ह्याने पेरणीत आघाडी घेतली असून, या जिल्ह्यात तब्बल ८३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्याखालोखाल धुळे व नंदुरबार या जिल्ह्यात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. चालू आठवड्यात नाशिक व नगर या जिल्ह्यातील उर्वरित भागात पुरेसा पाऊस झाल्यास उर्वरित पेरण्यांना गती मिळणार आहे. मात्र पावसाने दडी मारल्यास किंवा लांबल्यास या दोन्ही जिल्ह्यांतील पेरणी क्षेत्रात मोठी घट येवून शेतकऱ्यांना खरीप हंगामाला मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवलेकरांचा पाणीप्रश्न मार्गी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

यंदाच्या उन्हाळ्यापाठोपाठ पावसाळ्याच्या प्रारंभी देखील पिण्याच्या पाण्यासाठी वणवण नशिबी आलेल्या येवलावासियांचा गंभीर पाणीप्रश्न पालखेडचे आवर्तन मिळाल्याने मार्गी लागला आहे. पालिकेचा शहरालगत असलेला टप्पा क्रमांक दोन योजनेचा साठवण तलाव आवर्तनातून प्राप्त झालेल्या ४५ दशलक्ष घनफूट पाण्याने तुडुंब भरला असून, पुढील चार महिन्यांसाठी तरी शहरवासीयांच्या पिण्याचा पाण्याची चिंता मिटली आहे.

उन्हाळ्यात टंचाई परिस्थितीचे चटके सोसतानाच सुरू झालेल्या पावसाळ्यातील गेल्या महिना दीड महिनाभरात जवळपास ६० हजारांच्या वर लोकसंख्या असलेल्या शहराला पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागली होती. पालिकेचा टप्पा क्रमांक दोन या योजनेचा ५० दशलक्ष घनफूट क्षमतेचा विस्तीर्ण साठवण तलाव कोरडाठाक पडल्याने शहरवासीयांची तहान कशी भागवावी या महाचिंतेत असलेल्या नगरपालिका प्रशासनाला २०-२५ दिवस मोठी तारेवरची कसरत करावी लागली होती. कधी साठवण तलावातील मृत पाणीसाठा तर कधी साठवण तलाव परिसरातील खासगी विहिरींमधील पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणून पुढे ते शहराला पुरवताना पालिकेची मोठी कसोटी पणाला लागली होती. शहरवासीयांची तहान भागविण्याची नितांत गरज लक्षात घेऊन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी पालखेडचे पिण्यासाठीचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिल्याने शहरवासीयांचा जीव भांड्यात पडला होता. सोडण्यात आलेल्या पालखेडच्या आवर्तनातील पाणी गेल्या आठवड्यातील मंगळवारी येवला पालिकेच्या शहरालगतच्या टप्पा क्रमांक दोन साठवण तलावात घेण्यास प्रारंभ झाला. आता हा तलाव पूर्णपणे भरला आहे.१६ वर्षांपूर्वी निर्मिती झालेल्या ५० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या साठवण तलावाची सध्याची पाणीसाठा क्षमता लक्षात घेऊन पाणी मिळाले असून, सोमवारी सकाळी हा साठवण तलाव ४५ दशलक्ष क्षमतेने भरला आहे.

साठवण तलाव भरला गेल्याने शहराचा पुढील चार महिन्यांसाठीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. पालखेडचे आवर्तन मिळाल्याने पालिका प्रशासनाने मध्यंतरी पाण्याअभावी विस्कळीत झालेला शहराचा पाणीपुरवठा सुरळीत केला आहे. उपलब्ध पाणी पुढील किमान चार महिने पुरविण्याची गरज लक्षात घेऊन पालिकने सध्या शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा बाजार समितीवर प्रशासक

$
0
0

मुख्य प्रशासकपदी रमेश देवरे

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

कृषी उत्पन्न बाजार समितीवरील सहाय्यक निबंधकांचा पदभार काढून सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागाने शासकीय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मुख्य प्रशासकपदी भाजपचे ज्येष्ठ नेते व सटाणा मर्चंट बँकेचे माजी चेअरमन रमेश संभाजी देवरे यांची तर उपमुख्य प्रशासकपदी सटाणा उत्तर सोसायटीचे सभापती विशाल प्रभाकर सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य सभापदीपदाचा कार्यभार रमेश देवरे यांच्याकडे मंगळवारी मुख्य प्रशासक व सहाय्यक निबंधक चंद्रकांत विघ्ने यांनी सुपूर्द केला.

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीवर मुख्य प्रशासक व प्रशासकीय मंडळावर भारतीय जनता पार्टीचे ९ व शिवसेनेचे ९ अशा १८ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक मंडळामध्ये मुख्य प्रशासक रमेश देवरे, उपमुख्य प्रशासक विशाल सोनवणे, प्रशासक यशवंत अहिरे, नगरसेवक साहेबराव सोनवणे, राजू जगताप, जिभाऊ मोरकर, राहुल सोनवणे, अतुल पवार, आर. पी. आयचे दिलीप सोनवणे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, शहरप्रमुख शरद शेवाळे, अ‍ॅड. वसंत सोनवणे, कारभारी पवार, प्रवीण भामरे, साधना गवळी, किरण अहिरे, राजेंद्र सोनवणे, बाळू बिरारी यांचा समावेश आहे. सटाणा कृषी बाजार समितीचे विभाजन होऊन सटाणा व नामपूर या दोन कृषी उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात आल्याने संचालक मंडळ बरखास्त करून एप्रिल २०१५ मध्ये शासकीय प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून अशासकीय प्रशासक मंडळात आपली वर्णी लागावी याकरिता अनेक मातब्बरांनी कंबर कसली होती. अखेरीस प्रशासकीय मंडळाची नियुक्ती झाल्याने चर्चेला पूर्ण विराम मिळाला.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी व व्यापारी यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार. कृउबाचे कामे करतांना सर्व घटकांना व प्रशासक मंडळाला विश्वासात घेऊन कामकाज करू.

- रमेश देवरे, मुख्य प्रशासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलींचा रोजच थरकाप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

येथील प्रभाग क्रमांक ५९ मधील बिटको कॉलेजमागील के. जे. मेहता हायस्कूलरोडवरून जाताना शाळा आणि कॉलेजच्या मुलींचा रोजच थरकाप होत आहे. त्यांना या भागात रोडरोमिओ, टवाळखोरांचा सामना करावा लागत असून, विशेष म्हणजे नगरसेविकेने स्वखर्चातून बसविलेल्या डझनभर सीसीटीव्हींची पोलिसांकडून पडताळणीच केली जात नसल्याने गुंडांना अभय मिळत आहे.

के. जे. मेहता हायस्कूल, हांडे मळा रोड आणि तरणतलाव रोड हे संवेदनशील रस्ते झाले आहेत. परिसरात उच्च आणि मध्यमवर्गीयांची दाट लोकवस्ती झाली आहे. येथे खासगी क्लासेस, बिटको कॉलेज, के. जे. मेहता, जेडीसी बिटको शाळा, जयरामभाई हायस्कूल आहे. त्यामुळे मुलींचा या तिन्ही मार्गांवर मोठा वावर असतो.

पोलिसांचे दुर्लक्ष

प्रभाग ५९ मध्ये शिखर प्रतिष्ठानच्या पदाधिकारी आणि नगरसेविका संगीता गायकवाड यांनी स्वखर्चाने २०१३ मध्ये सर्वेक्षण करून सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवले आहेत. त्यापैकी के. जे. मेहता रोड, तरणतलाव, मुक्तिधाम, गुलमोहर कॉलनी येथे प्रत्येकी एक, तर जगताप मळा आणि आनंदनगर चौकात प्रत्येकी चार सीसीटीव्ही आहेत. दुर्दैवाने पोलिसांनी सीसीटीव्हीचे फूटेज कधीच बघितले नाही. त्यामुळे गुंडगिरी वाढली आहे.

या वेळेत होते मोठ्या प्रमाणावर छेडछाड

प्रामुख्याने सकाळी ते सात ते आठ आणि सायंकाळी पाच ते आठ ही खासगी क्लासेस, शाळा आणि कॉलेजची वेळ असते. या वेळी रोडरोमिओ मुलींची वाट पाहत बसलेले दिसतात. मुलींना इम्प्रेस करण्यासाठी कॉलेजचे युवक सुसाट गाड्या चालवतात. रस्त्यावर गाड्या पार्क करून टवाळखोर मुलींची छेडछाड, अश्लील चाळे करतात. बहुतांश मुली चांगल्या घरातील असल्याने शक्यतो तक्रार करीत नाहीत. अनेक वर्षांपासून त्या हा जाच सहन करत असल्याने गुंडांचे डेअरिंग वाढले आहे. त्यामुळे मुलींचा येथून जाताना थरकाप होत आहे.

पोलिस खात्याला विनंती आहे, की त्यांनी आम्ही स्वखर्चाने बसविलेल्या सीसीटीव्हींच्या फूटेजची दर आठवड्याला पडताळणी करावी. ते पाहून टवाळखोर मुलांना समज द्यावी, त्यांच्यावर कारवाई करावी, तरच मुली व महिलांना सुरक्षित वाटेल.

- हेमंत गायकवाड, शिखर प्रतिष्ठान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच महिन्यात तब्बल २५२ तळीरामांना हिसका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत अवघ्या एका तळीरामावर कारवाई झाली होती. पोलिसांकडून मद्यपी वाहनचालकांच्या या 'लाडा'बाबत 'मटा'ने २३ एप्रिलच्या अंकात सविस्तर वृत्त दिले होते. यानंतर वाहतूक पोलिसांनी सहा ब्रेथ अॅनालाझयर उपलब्ध केले. मे महिन्यात १९, तर जून महिन्यात तब्बल २५२ तळीरामांवर कारवाई करीत पोलिसांनी नवा विक्रमच यानंतर प्रस्थाप‌ित केला आहे. शहरातील रस्त्यांवर मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांमुळे अनेक समस्या निर्माण होतात. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला शहर पोलिसांनी तळीरामांवर कारवाईच केली नाही. याबाबतचे वृत्त 'मटा'ने प्रसिध्द केले. या वृत्ताची दखल घेत वाहतूक शाखेचे तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त देवीदास पाटील यांनी कारवाई करण्यासाठी लागलीच साधने व मनुष्यबळ उपलब्ध केले. याबरोबर शहर पोलिसांनी वेळोवेळी कोम्बिंग, नाकाबंदी तसेच 'मिशन ऑल आऊट'सारख्या मोहिमेदरम्यान तळीरामांना लक्ष केले. आजमितीस शहर पोलिस आधुनिक ब्रेथ अॅनालायझरच्या माध्यमातून मद्यपी व्यक्तीची तपासणी करतात. या मशिनद्वारे वाहनचालकाच्या रक्तातील अल्कोहलचे प्रमाण लागलीच समोर येत असल्याने संबंधीत वाहनचालकास थेट कोर्टात सादर केले जाते. जून महिन्यात शहर पोलिसांनी तब्बल २५२ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

KBC : चव्हाण दाम्पत्य नाशिक सेंट्रल जेलमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुणे सीआयडीच्या परभणी पथकाने चौकशी पूर्ण केल्याने केबीसीचा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाण यांचा ताबा नाशिक पोलिसांना मिळाला आहे. सध्या या दोघांची रवानगी नाशिक सेंट्रल जेलमध्ये झाली असून, गुन्ह्यातील हार्ड डिस्क मिळाल्यानंतरच केबीसी घोटाळ्याच्या पुढील तपासास चालना मिळणार आहे. भाऊसाहेब व आरती चव्हाण दोघांनी नाशिकसह नांदेड व परभणीमधील गुंतवणूकदारांनाही चुना लावला आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर कोर्टाच्या आदेशाने त्यांना संबंध‌ित पोलिसांकडे सोपवण्यात आले होते. ६ मे रोजी नाशिक पोलिसांनी या दोघांना अटक केली होती. तर, २२ मे रोजी चौकशीसाठी नांदेड पोलिसांना त्यांचा ताबा देण्यात आला होता. परभणी येथेही चव्हाणविरोधात गुन्हे दाखल असल्याने आणि हा तपास गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) करीत असल्याने त्यांनीही चव्हाण दाम्पत्याकडे चौकशी केली. नाशिक पोलिसांच्या ताब्यात असताना पोलिसांनी त्यांच्या सात बँक लॉकरमधून ५ कोटी रुपये किमतीचे २१ किलो सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले होते. यात १८ किलो ९६५ ग्रॅम सोने व दोन किलो ३०० ग्रॅम चांदीच्या दागिन्यांचा समावेश होता. कल‌िना येथील फॉरेन्स‌िक लॅबमध्ये एक हार्डडिस्क असून ती पोलिसांच्या हातात मिळाल्यानंतरच या गुन्ह्याचा अधिक तपास करणे पोलिसांना शक्य होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ झाडांच्या हत्येची चौकशी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वृक्षतोडीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असल्याने झाडांची तोड करणे आता अवघड बनले आहे. परंतु तरीही काही नागरिक अशी अडचणीची झाडे पाडण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत असल्याचे समोर आले आहे. या झाडांच्या बुंध्याला थेट घातक रसायनांचे इंजेक्शन देवून झाडांची हत्या सुरू आहे. महापालिककडे अशी सुकलेली झाडे पाडण्यासाठी दहा अर्ज आले असून, वकीलवाडीचे झाडही केम‌िकलच्या इंजेक्शननेच पाडल्याचा संशय आहे. अशा प्रकारे झाडांची हत्या करण्याच्या प्रयत्नांची आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी गंभीर दखल घेतली असून, वकीलवाडीतल्या झाडासह शहरातील अन्य झाडांच्या वाळवीची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

वृक्षतोडीसंदर्भातील कडक नियमांमुळे शहरात सध्या रस्ते व रिकाम्या प्लॉटवरील झाड तोडणे अवघड झाले आहे. त्यात जागरूक पर्यावरण प्रेमीमुळे झांडाची तोड अशक्य झाली आहे. त्यामुळे या झाडांच्या हत्येची नवी शक्कल शोधून काढली आहे. अडचणीच्या ठरणाऱ्या झाडांना घातक रसायन मिश्र‌ित इंजेक्शन देवून त्यांना वाळवी लावली जात आहे. त्यामुळे कालातंराने झाड सुकून ते तोडण्यासाठी पालिककडे अर्ज केले जातात. वक‌ीलवाडीत पडलेल्या झाडाचीही हीच व्यथा सांग‌ितली जात आहे. वृक्षप्राध‌िकरणातही अशा झांडाना तोडण्यास परवानगी दिली जाते. परंतु आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी आता अशा प्रकारावर जरब बसवण्याचा निर्णय घेत वकीलवाडीतल्या झाडासह अन्य अर्ज आलेल्या १० झाडांच्या वाळवीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

घातक रासायनिक पदार्थ वापरून झाडांना वाळवी लावण्याचे प्रमाण वाढले आहे.झाड कोरडे झाल्यावर तक्रार अर्ज करून ते पाडले जातात.त्यामुळे अशा प्रकरणाची गंभीर दखल घेवून त्यांची चौकशी केली पाहिजे.

शेखर गायकवाड,पर्यावरणप्रेमी, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळ्यात एसटीची शहर सेवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहर आणि परिसरातील आठ गावांसाठी शहर बससेवेचे उद्घाटन जिल्हाधिकारी ए. बी. मिसाळ यांच्याहस्ते बुधवारी करण्यात आले. शहर बससेवेसाठी एका प्रवासाच्या टप्प्यासाठी सहा रुपये भाडे आकारणी करण्यात आली आहे.

या बससेवेच्या उद्घाटनाप्रसंगी मनपा आयुक्त संगीता धायगुडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय लांडे, शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी, भाजपाचे शहराध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी, आगार प्रमुख एस. बी. जगनोर आदी उपस्थित होते. नगांव, फागणे, वडजाई, लळींग, मोराणे, वलवाडी या ठिकाणांहून सकाळी सात ते सांयकाळी सात वाजेपर्यत प्रत्येकी चार मिनी बस सुरू करून दिवसभरात किमान सहा फेऱ्या होतील, अशी माहिती एसटीचे धुळे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुल योजनेसाठी होता गुप्त कट

$
0
0

तपास अधिकारी यांची साक्ष

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मुंबई महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींचा वापर करीत आरोपी सुरेश जैन, प्रदीप रायसोनी यांच्या सांगण्यावरून जळगाव नगरपालिकेतील नगरसेवक गुप्त कट करीत होते. हे तपासातून निष्पन्न झाल्याची माहिती तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक तथा घरकुल खटल्यातील तपासी अधिकारी ईशू सिंधू यांनी धुळे जिल्हा विशेष न्यायालयात सरतपासणीत दिली.

ईशू सिंधू यांनी सांगितले की, नगराध्यक्ष, उच्चाधिकारी समिती सभापती यांनी गुन्ह्याच्या प्रत्येक टप्प्यात गुप्त कट अंमलात आणला. तसेच विविध टप्प्यांवर उमेद मंजुरीच्या आदेशाचा, तरतुदीचा दुरुपयोग करण्यात आला होता. त्याबाबतचे कागदपत्र जप्त करण्यात आले आहेत. वास्तुविशारदाच्या नेमणुकीबाबत असलेल्या टिपणी व इतर ठराव हे बेकायदेशीरपणे करण्यात आल्याची बाब कागदपत्रावरून स्पष्ट झाल्याची माहितीही त्यांनी दिली. संशयित आरोपी सुरेश जैन, जगन्नाथ वाणी, प्रदीप रायसोनी, गुलाबराव देवकर, राजेंद्र मयूर आदींसह आरोपींचे वकील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींसाठी ‘तो’ बनला माहितीस्त्रोत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतीची माहिती देण्यासाठी कम्युनिटी सेंटरबरोबरच देशभर अत्याधुनिक प्रचार तंत्राचा वापर केला जातो. मात्र, बदलत्या युगातही आदिवासी गावातील गोटुराम दोंदे हे शेतकऱ्यांसाठी चालता बोलता कम्युनिटी रेडिओ बनले आहेत.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगावसारख्या छोट्याशा गावात गोटुराम हा माहिती केंद्र बनला आहे. विशेष म्हणजे स्वतः पहिले प्रयोग आपल्या शेतीत करतो त्यानंतर त्याची माहिती गावाला देतो. गोटुरामची १५ एकर शेती आहे. त्यात त्याने नागली, भात, वरई, खुरसणी, गहू, बाजरीसह कारले, टोमॅटो आदी भाजीपाला पिकवला आहे. मला राजकारणाशी काही घेणे-देणे नाही. लोकांची जमेल तशी सेवा करायची' अस सांगात हा शेतकरी गावकऱ्यांनादेखील खरिपानंतर स्वस्थ न बसता शेतात कष्ट करावे, असा आग्रह धरतो.

शेतकऱ्यांना स्वत:च्या पाइपलाइनमधून पाणी देऊन रब्बीचं पीक घेण्यासाठी प्रोत्साहित करायचे. वनीकरणात सहभाग, पेसांतर्गत गावात विकासाची कामे घ्यायची, बाजूच्या पाड्यावरची पाण्याची समस्या सोडवायची, अशी त्यांची विविध कामे आहेत. त्यांच्या प्रयत्नाने गाव तंटामुक्त झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावात दोन बचत गट सुरू करण्यासही त्यांनी प्रोत्साहन दिले. पोलिस मित्र म्हणून आपली भूमिका ते निष्ठेने पार पाडतात. गावासाठी लिफ्ट इरिगेशन व्हावे, यासाठीदेखील ते प्रयत्नशील असून गावाचा विकास हेच त्यांचे ध्येय आहे.

शासकीय योजनांचीही देतात माहिती

शेतीबरोबरच गोटुराम शासकीय योजनांची माहिती देतो. त्याने स्वतः शासकीय योजनेतून ठिबक सिंचन केले आहे. पाण्यासाठी ५० पाइप आणि इंजिन, अवजारे आणि पेरणी यंत्रदेखील त्यांनी अनुदानातून घेतले. हे सर्व घेण्यासाठी त्याला ७० ते ८० हजाराचे अनुदान मिळाले. आता ही माहितीही गोटुराम गावकऱ्यांना देतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमबीबीएस, बीडीएसची पहिली मेरिट लिस्ट जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मेडिकल विद्याशाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी एमबीबीएस अन् बीडीएस या अभ्यासक्रमांची पहिली मेरिट लिस्ट जाहीर होताच नि:श्वास टाकला. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने (डीएमईआर) गुरूवारी ही लिस्ट जाहीर केली. यामुळे आता पहिल्या लिस्टमध्ये समावेश असणाऱ्या विद्यार्थ्यांना २९ जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत. लिस्टमधील विद्यार्थ्यांच्या हाती प्रवेशासाठी आता अवघे आठ दिवस शिल्लक आहेत.

या प्रक्रियेत काही पालकांनी कोर्टाकडे धाव घेतल्यानंतर यादी प्रसिध्द होण्यास विलंब झाला होता. स्पोर्टस् किंवा स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य आदी निकषांखाली काही विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याच्या निर्णयाविरोधात पालकांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणीमुळे महिनाभरात तीनदा यादी जाहीर होण्याच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यामुळे मेडिकल शाखेत प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला होता. मुंबई हायकोर्टाच्या १९ जुलैच्या सुनावणीनंतर आता प्रसिध्द करण्यात आलेली यादी ही केवळ एमएचटी सीईटीच्या गुणांवर आधारीत आहे. त्यात कुठल्याही विद्यार्थ्यांना इतर निकषांखाली वाढीव गुण देण्यात आलेले नाहीत. मंगळवारी सुनावणीदरम्यान मुंबई हायकोर्टाने वैद्यकीय शिक्षण संचलनालय आणि एमएच सीईटीला सूचना दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इन्शुरन्स नसल्याने वैकुंठरथच झाले वैकुंठवासी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या लालफिती कारभाराचा फटका ज‌िवंत माणसांनाच बसतो, असे नाही. तर, माणूस मेल्यानंतर त्याच्या मोक्षप्राप्तीसाठी घेऊन जाणाऱ्या वैकुंठरथालाही बसतो. याचा प्रत्यय पालिकेतल्या वैकुंठरथांना आला आहे. महापालिकेच्या मालकीच्या चार वैकुंठरथांचा इन्शुरन्स आरटीओकडे भरलाच नसल्याने हे रथ चार महिन्यापासून वैकुठंवासाचा अनुभव घेत आहे. त्यामुळे संतप्त नगरसेवकांनी बुधवारी महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढत आमचे मानधन देतो, परंतु वैकुंठरथ रस्त्यावर आणा, असा टाहो फोडला. त्यानंतर महापौरांनी तातडीने इन्शुरन्स भरण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

महापालिकेच्या सर्वच वाहनांचा इन्शुरन्स प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे केला जातो. इन्शुरन्स केल्यानंतरच संबंधित वाहन हे रस्त्यावर येते. त्यात मृत व्यक्तींना वैकुंठाचा मार्ग दाखविणाऱ्या वैकुठंरथाचाही समावेश असतो. पलिकेकडे सध्या चार वैकुंठरथ असून, नागरिकांच्या मागणीनुसार त्यांना पाठविले जाते. परंतु सध्या हे चार वैकुंठ रथच वैकुंठवासी झाले असल्याचा आरोप नगरसेवक आर. डी. धोंगडे यांनी महासभेत केला. या वैकुंठरथाचा आरटीओकडे इन्सुरन्स केला नसल्याने चार महिन्यापासून हे वैकुंठरथ वापराविना पडून आहेत. वैकुंठरथासाठी नागरिक आम्हाला फोन करतात. परंतु त्यांना रथ बंद असल्याने मदत करता येत नाही. त्यामुळे काही तरी करा व ते चालू करा, अशी मागणी त्यांनी केली. सध्या खाजगी वैकुंठरथ असल्याने बंद वैकुंठरथांची बोंबाबोब होत नाही. त्यामुळे या सर्व प्रकारावर प्रशासकीय बेफिकीरी समोर आली आहे. त्यामुळे पालिकेतील शुक्राचार्य हे माणूस मेल्यानंतरही त्याला छळतात, अशी टीका सदस्यांकडून करण्यात येत आहे.

आमचे मानधन वापरा

महापालिकेत नागरिकांशी निगडीत कोणतेही काम करायचे असेल तर निधीचा प्रश्न येतो. त्याचाच फटका या वैकुंठरथाना बसला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या धोंगडे यांनी आम्ही आमचे मानधन देतो; परंतु तातडीने त्यांचा विमा काढा, असे आर्जव केले. त्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी साथ दिली. त्यामुळे महापौर अशोक मुर्तडक यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images