Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पोलिसांच्या कारवाईने भाजपत धुसफूस

0
0

जुना नव्या पदाधिकाऱ्यांचा वाद कारणीभूत; जुगार अड्ड्याचा वाद प्रदेशपातळीवर जाणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई नाक्यावरील भाजप पदाधिकाऱ्याच्या अड्ड्यावर टाकलेल्या धाडीने पोलिसांनी आपल्यावरील आरोपांचा कलंक धुतला असला, तरी या कारवाईने आता भाजपतच अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. भाजपमधल्या जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत गटबाजीने ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. महापालिका निवडणुकीतील वर्चस्ववादातून ही कारवाई झाल्याचे बोलले जात असून हा वाद थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात जाणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच भाजपमधील गटबाजी पुन्हा उफाळून आली असून पक्षात शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे.

महापालिका निवडणुका सात महिन्यांवर येऊन ठेपल्या असून त्या निमित्ताने राजकीय वर्चस्ववादाला सुरुवात झाली. निवडणुकीपूर्वीच शहरातील गुन्हेगारी वाढल्याचा संदर्भ घेत, पोलिसांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या अवैध धंद्याना टारगेट केले आहे. यातूनच गेल्या पंधरवड्यात शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी थेट कारवाई केली होती. यामुळे पोलिसांवर पक्षपातीपणा केल्याचा आरोपही झाला होता. शिवसेनेने थेट ही कारवाई भाजपच्या इशाऱ्याने केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईला संशयास्पद स्वरूप आले होते.

भाजप वगळता इतर पक्षीयांवरच पोलिस कारवाई करत असल्याचा संशय पुसून टाकण्याची संधी भाजपमधील गटबाजीने पोलिसांना मिळाली. मुंबई नाक्यावरील भाजपच्या बड्या पदाधिकाऱ्यांच्या सरंक्षणाखाली असलेल्या जुगार अड्ड्यावर थेट पोलिस आयुक्तांनीच छापा टाकण्याची हिम्मत दाखवली. संबधित जुगार अड्डा कोणाचा आहे, याची कल्पना पोलिसांनीही होती. या कारवाईत नुकतेच मनसेतून भाजपवासी झालेल्या काही पदाधिकाऱ्यांना तर थेट पकडण्यात आले. त्यामुळे एवढे दिवस कानाडोळा करणाऱ्या पोलिस आयुक्तांनी दाखवलेली हिम्मत ही कौतुकास्पद असली, तरी या कारवाईसाठी पोलिसांना भाजपमधूनच बळ पुरविले गेल्याची चर्चा आहे. महापालिका निवडणुकांची जबाबदारी भाजपने प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीतेंवर सोपवली असून त्यांनी निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे. विविध ठिकाणी मेळावे घेवून शक्तीप्रदर्शनही सुरू केले असतांनाच, त्यांना अडचणीत आणण्याचे काम स्वपक्षीयांनी सुरू केल्याची आता चर्चा आहे.

जुन्या नाशकात अभय

मुंबई नाक्याप्रमाणेच जुन्या नाशकातही एका बड्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून जुगार अड्डा चालविला जातो. काझीपुरा पोलिस चौकीच्या परिसरातच हा अड्डा असल्याची चर्चा आहे. परंतु या अड्ड्याकडे दुर्लक्ष केले जाते. माजी पोलिस आयुक्त सरंगल यांनी यापूर्वी दोनदा धाडी टाकल्या. परंतु नव्या कारवाईत मात्र जुन्या नाशिकमधील अवैध अड्ड्याकडे पोलिस का दुर्लक्ष करतात, असा सवाल करत आहे. सत्ताधारी पक्षाच्या बड्या पदाधिकाऱ्यांच्या अड्ड्यावर कारवाई होते. परंतु विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर वरदहस्त का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.



एका दगडात दोन पक्षी

महापालिका निवडणुकांची जबाबदारी ग‌ितेंवर आल्याने त्यांना विविधप्रकारे आडकाठी आणण्याचे कारस्थान त्यांच्या स्पर्धकाकडून रचले गेले. एखाद्या जुगार अड्ड्यावर पोलिस आयुक्तांनी धाड टाकण्याची ही पहिलीच घटना आहे. या अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी पोलिसांवर दबाव होता. परंतु मधल्या फळीतील अधिकाऱ्यांमध्ये ती हिम्मत नव्हती. त्यामुळे थेट वरिष्ठांकडूनच कारवाई व्हावी यासाठी थेट मंत्रालयातूनच दबाव येत होता. या कारवाईने भाजप पदाधिकाऱ्याचेही हात छाटायचे आणि मुंबई नाका पोलिस स्टेशनवर प्रभाव असलेल्या पोलिस अधिकाऱ्यालाही वेसन घालून एका दगडात दोन पक्षी मारले गेले आहेत. संबंध‌ित पीआय हा पालकमंत्र्यांच्या जवळचा असल्याचीही चर्चा आहे. तर पालकमंत्र्यांकडून ग‌ितेंनाही झुकते माप मिळत आहे. त्यामुळे या कारवाईने संबंधित पदाधिकाऱ्यांनी योग्य संदेश देऊन आपली 'मनसबदारी' कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक शहरासह जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये शनिवारी पाऊस परतला. इगतपूरी तालुक्यात मागील २४ तासात ४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात ८१.७ मिलीमीटर पाऊस पडला असून शहरात शनिवारी सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडेपाच दरम्यान ६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

गुरुवारी जिल्ह्यातील १० तालुक्यांमधून पाऊस गायब झाला होता. मात्र पावसाने पुनरागम केले असून शनिवारी सकाळी साडेआठपर्यंत २४ तासांत ८१.७ मिलीमीटर पाऊस पडला. इगतपुरीत (४२), पेठमध्ये (१४), सुरगाण्यात (६), त्र्यंबकेश्वरमध्ये (५), नाशिक तालुक्यात (२.३), सिन्नरमध्ये (२) तर चांदवडमध्ये १.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी पाच मिलीमीटर पाऊस पडला. देवळा, येवला, कळव या तालुक्यांमध्ये दांडी मारली. शनिवारी जिल्ह्यात कमाल तापमान २७.५ अंश सेल्सियस तर किमान तापमान २२.१ अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले. शनिवारी सकाळी साडे आठपर्यंत शहरात २.१ मिलीमीटर पाऊस पडला. त्यानंतर मात्र पावसाचा जोर वाढला.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता ग्राहक पंचायतही ऑनलाइन

0
0

'ग्राहक फ्रेंडली' कार्यपद्धतीवर राहणार भर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्राहक हा राजा आहे, ही बिरुदावली खरी मानत ग्राहकांच्या हक्कांची जनजागृती करणाऱ्या आणि ग्राहकांसाठी विविध लढा देणाऱ्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीनेही काळाची पावले ओळखत ऑनलाइन वाटचाल सुरू केली आहे. पुढील महिन्यात ग्राहक पंचायतीची अतिशय सुसज्ज अशी वेबसाइट सुरू होत असून याद्वारे ग्राहकांच्या विविध शंकांचे निरसन होतानाच त्यांना तक्रारीसाठीचे व्यासपीठही उपलब्ध होणार आहे.

विविध प्रकारच्या सेवा आणि उत्पादनांच्या मागणी तसेच पुरवठ्यात ग्राहक हा केंद्रबिंदू आहे. मात्र, ग्राहकाला फसविण्याचा गोरखधंदा अतिशय तेजीत आहे. खरे तर ग्राहक हाच राजा असल्याचे बोलले जाते. प्रत्यक्षात विविध पळवाटा आणि छुप्या पद्धतींद्वारे ग्राहकाची दिशाभूल करतानाच त्याचा मानसिक छळ आणि आर्थिक नुकसानही केले जाते. हीच बाब ओळखून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना पुण्यात १९७४ साली झाली. बिन्दूमाधव जोशी यांच्या पुढाकाराने पंचायतीच्या कामकाजाने हळूहळू देशव्यापी स्वरुप प्राप्त केले. याच ग्राहक जनजागृतीची दखल घेत ग्राहक धोरण आणि ग्राहक संरक्षण कायदाही लागू करण्यात आला आहे. 'ना नफा, ना तोटा' या तत्वावर ग्राहक पंचायतीचे काम सुरू असते. पंचायतीच्या त्या-त्या शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांद्वारे जनजागृती आणि तक्रारींचे निवारण केले जाते. या साऱ्या प्रक्रियेत अनेक मर्यादा येतात. काही शहरांमध्ये पंचायतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नसल्याने ग्राहकांच्या शंका निवारणासाठीची यंत्रणाच नाही. त्याशिवाय वेळ, ठिकाण आणि अन्य बाबींचीही अडचण येते. या साऱ्यावर उतारा म्हणून पंचायतीने आता ऑनलाइन कामकाजालाही प्राधान्य दिले आहे. पंचायतीची सुसज्ज वेबसाइट ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी सुरू होत आहे. सद्यस्थितीत ग्राहक पंचायत डॉट कॉम ही वेबसाइट उपलब्ध असली तरी त्यावर त्रोटक माहिती आहे. तसेच, हिंदी आणि इंग्रजी भाषेत त्यात अधिक मजकूर आहे. त्यामुळे नव्याने दोन स्वतंत्र वेबसाइट मराठीत सुरू करून पंचायतीच्या कामकाजाला बळकटी देण्याबरोबरच ग्राहकांवरील अन्याय दूर करण्याचेही उद्दीष्ट असल्याचे पंचायतीचे विजय सागर यांनी सांगितले.

ग्राहक फ्रेंडली कार्यपद्धतीवर या वेबसाइटची रचना करण्यात आली आहे. या वेबसाइटचा ग्राहकांना प्रचंड फायदा होईल, असा विश्वास आम्हाला आहे.

- दिलीप फडके,

अखिल भारतीय ग्राहक पंचायत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिवंत काडतुसांसह हत्यार जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक पिस्तूलची मॅग्झीन आणि दोन जीवंत काडतुसे, लोखंडी सुरा अशी हत्यारे विक्रीसाठी आणणाऱ्या दोघांना आडगाव पोलिसांनी गजाआड केले. या व्यतिरिक्त, लुटीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमधील सहा जणांना आडगाव पोलिसांनी पकडले. संभाजी कवळे आणि विक्की काळे यांचा लुटीच्या दोन गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आडगाव पोलिसांनी शुक्रवारी रात्री आडगाव नाका येथे नाकाबंदी लावली होती. त्यावेळी मखमलाबाद येथील विनोद उर्फ भुऱ्या समाधान कटारे आणि रामवाडीतील राजेश उर्फ राजा रवींद्र सूर्यवंशी दुचाकीवरून आले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन ज‌िवंत काडतुसे, लोखंडी सुरा आणि एक मॅग्झीन सापडली. ही हत्यारे त्यांनी विक्री साठी आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार, आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोर्टाने संशयितांना २६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी लुटीच्या दोन घटनांमधील प्रत्येकी तीन अश्या सहा जणांना जेरबंद केले. स्वामीसमर्थ नगर येथील रहिवासी डॉ. अभिजीत सुरशे हे गेल्या १६ मे रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून आले असता त्यांना लुटण्यात आले होते. बळीमंदिराजवळील पार्क साईड जवळ दुचाकीवर आलेल्या त‌िघांनी त्यांच्यावर चाकूने वार करून २ हजार रुपये व इतर कागदपत्रे हिसकावून घेतले होते. त्यानंतर याच एटीएम पाकिटावर प‌िनकोड लिह‌िलेला असल्यामुळे नंतरच्या काळात तीन विविध एटीएम मधून त्यांनी ३५ हजार रुपये काढले. हाती आलेल्या पैशांतून त्यांनी मध्यप्रदेश येथे जावून अवैधरित्या पिस्तूल विकत घेतले होते. याप्रकरणी म्हसरूळ परिसरातील एकतानगर येथील संभ्या उर्फ संभाजी विलास कवळे, रामवाडीतील वैभव उर्फ विकी दत्तात्रेय काळे, हनुमानवाडीतील बब्या उर्फ नितेश अजय सुरसुजे यांना अटक केली.

दुसऱ्या एका घटनेत आडगाव येथील अभिजीत श्रीकृष्ण जगताप हे १९ मे रोजी पहाटे दुचाकीवरून अमृतधाम जवळून जात असतांना दुचाकीवर आलेल्या तिघांनी जगताप यांच्या मोटारसायकलला लाथ मारून खाली पाडले आणि त्यांच्या कडून दोन मोबाईल घेवून पळून गेले. याप्रकरणी तपास करून आडगाव पोलिसांनी गणेशवाडी येथील अविनाश रावसाहेब वाणी,

एकतानगर येथील संभ्या उर्फ संभाजी विलास कवळे आणि वैभव उर्फ विक्की दत्तात्रेय काळे आदींना अटक करून त्यांच्या ताब्यातील मोबाईल हस्तगत केले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औद्योगिक धोरणावर उद्योजकांचा संताप

0
0

वीसवर्षात एकही मोठा औद्योगिक प्रकल्प नाही

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचे मार्ग बंद करण्याचा घाट घालण्याच्या उद्योगमंत्रालयाच्या धोरणाविरुध्द नाशिकच्या उद्योजकांनी आपला संताप व्यक्त करत सरकारच्या धोरणावर जोरदार हल्ला चढविला आहे. नाशिकच्या औद्योगिक विकासाचे मार्ग अगोदरच सरकारने बंद केले, आता हे नवीन धोरण म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नाशिकमध्ये गेल्या वीसवर्षांत एकही मोठा औद्योगिक प्रकल्प आला नाही. त्यामागे राजकीय दूरदृष्टी नसल्याचा नेता एकाही पक्षात नसल्याची खंतही या उद्योजकांनी व्यक्त केली. नाशिकच्या पाण्यावर औरंगाबाद येथे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा प्रकल्प चालणार आहे. पण नाशिक मुंबई-पुणे-नाशिक अशा गोल्डने ट्रँगलमध्ये अडकला आहे. मुंबई-पुणे येथील औद्योगिक विकासाची तुलना नाशिकबरोबर करून विकासाचे मार्ग रोखण्याचा हा प्रकार दूरगामी परिणाम करणारच असल्याचेही मत उद्योजकांनी व्यक्त केले.

उद्योग मंत्रालयाने नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राची तुलना प्रगत मुंबई-पुणे बरोबर केली व नवीन उद्योगांना विदर्भ व मराठवाड्यात नेण्यासाठी एक अभ्यास समिती गठित केली आहे. त्यात मुंबई, पुणे व नाशिक येथे औद्योगिकीकरणामुळे येणारा ताण व नागरिकरणामुळे झालेली वाढ लक्षात घेता ही समिती विदर्भ व मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात समतोल विकास साधण्यासाठी काम करणार असल्याचे म्हटल्यामुळे हा संताप उद्योजकांनी व्यक्त केला.

मुंबई-पुणे येथील औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात झाला त्या तुलनेत नाशिक खूपच मागे आहे. नाशिकला राजकीय दूरदृष्टी असणारे कोणत्याही पक्षात नेतृत्व नाही. त्यामुळे नाशिकवर पहिलेच खूप अन्याय झाला आहे.आता त्याचे दूरगामी परिणाम होणार आहे. सरकारशी भांडणारे औद्योगिक संघटनेलाही नेतृत्व मिळाले नाही. त्यामुळे सरकार असे अन्यायकारक निर्णय घेण्याचे धैर्य करते. सिन्नर-घोटी येथे येणारा दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा प्रकल्प हा औरंगाबादला पळविला गेला पण त्याचे गांभीर्य कोणालाही नाही. नाशिक हे मुंबई-पुणे येथील औद्योगिक विकासाच्या पंचवीस वर्षे मागे आहे. नाशिकमध्ये गेल्या २० वर्षात महिंद्राचा स्कॉर्पिओच्या प्रकल्पानंतर एकही मोठा प्रकल्प आला नाही. विमानतळ नसल्यामुळे कनेक्टिव्हिटी नाही ही गोष्टही विकासाला मारक ठरत आहे. यासर्व गोष्टी असल्या तरी मराठवाडा व विदर्भला ज्या सवलती देतात त्या नाशिकलाही मिळायला देण्यात याव्या असे मत नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्नेह’पूर्ण पदन्यासाने फिटले डोळ्यांचे पारणे

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बाहेर झालेलं पावसाळी वातावरण...झेंडूच्या फुलांचा मनमोहक सुगंध, फुलांच्या तोरणांना लागलेली किणकिणणारी छोटीशी पितळी घंटी, अत्तराचा घमघमणारा सुवास आणि अशा माहोलमध्ये प्रत्येक ठेक्यावर होणारा अनोखा पदन्यास असा मणिकांचन योग जुळून आला होता. भरतनाट्यम कलाकार आणि आणि साधक स्नेहा दातार यांच्या नृत्याच्या कार्यक्रमानिमित्ताने. गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने 'नृत्यशारदा' या संस्थेच्या पुढाकारातून हा कार्यक्रम झाला.

स्नेहा दातार यांनी अनोख्या पदन्यासाने प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणे फेडली. 'प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये' या गणपतीस्तोत्राने नृत्याची सुरुवात झाली. त्यानंतर स्नेहा यांनी गोस्वामी तुलसीदासांनी रचलेले मिश्र तालातील व यमन बागेश्री रागातील 'श्रीरामचंद्र कृपालु भजु मन हरण भवभय दारुणं। नवकंज लोचन कंजमुख कर कंज पद कंजारुणं॥' या गीतावर नृत्य सादर केले. या गीतात सीता स्वयंवर तसेच शूर्पणखा गर्वहरण अशा दोन कथा गुंफण्यात आल्या होत्या. त्या दोन्हीही कथा सादर करताना स्नेहा यांनी केलेला नृत्याभिनय वाखाणण्यसारखा होता.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संत एकनाथ रचित 'माझे माहेर पंढरी'या अभंगावर नृत्य सादर करण्यात आले. त्यानंतर नृत्यातील अमूर्त रचना म्हणून नावाजलेला प्रकार तिल्लाना स्नेहा यांनी सादर केला. स्नेहा दातार यांनी आपले भरत नाट्यमचे शिक्षण गुरू मीरा धानू यांच्याकडे घेतले असून गुरू कल्याण सुंदरम पिल्लई आणि गुरू दीपक मुझूमदार यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. ज्येष्ठ गुरू आणि कलाकार पंडित बिरजू महाराजजी यांच्या उपस्थितीत त्यांनी आपले अरंगेत्रम केल्यावर विविध ठिकाणी आपले नृत्य पेश केले आहे. त्यात काळाराम मंदिर येथील वासंतिक उत्सव तसेच शिर्डी येथील उत्सव यांचा समावेश आहे. भरतनाट्यम नृत्य परंपरेतील शास्त्र मांडणारे अल्लारीपू-तिल्लाना हे नृत्य प्रकार त्या सादर करतातच पण विविध भजनांमार्फत अभिनय दर्शन हे त्यांच्या नृत्याचे वैशिष्ट्य आहे. गुरूपौर्णिमेनिमित्त सादर झालेल्या या कार्यक्रमातही स्नेहा यांच्या नृत्याने रसिक मंत्रमुग्ध झाले.

यांची होती साथ

नृत्याची कोरिओग्राफी गुरू मीरा धानू यांची होती. नृत्याच्या संगीतासाठी गायन : श्रीकृष्णमूर्ती, मृदुंग : शंकर नारायणन, व्हायोलिन : मंगला वैद्यनाथन, तबला : अमोल पाळेकर तर नटवंगम वर गुरू मीरा धानू यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन अश्विनी घैसास यांनी केले. मान्यवर व कलाकारांचा सत्कार शोभना दातार यांनी केला. शंकराचार्य संकुलातील डॉ. कुर्तकोटी सभागृहात हा नृत्याचा कार्यक्रम झाला.



दक्षिण भारत व महाराष्ट्राचा अनोखा संगम

भरतनाट्यम ही अभिजात दक्षिण भारतीय नृत्यशैली असून या शैलीचा उगम दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये झाला. ही एकल नृत्यशैली असून भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित असल्याने तिला भरतनाट्यम् म्हटले गेले. आहे. भरतनाट्यमचे सादरीकरण कर्नाटकी संगीताच्या साथीने होते. अलरिपू, वर्णम, पदम, तिल्लाना ही भरतनाट्यमची विविध अंगे आहेत. स्नेहा यांनी नृत्यामध्ये ही सर्व अंगे साकार केली. परंतु विशेष म्हणजे भरतनाट्यम मध्ये 'माझे माहेर पंढरी'सारख्या अभंगावर नृत्य करून स्नेहा यांनी दक्षिण भारत आणि महाराष्ट्राची अनोखी सांगड घातली. नृत्य कार्यक्रमाच्या शेवटाकडे नेणारे हे अभंगनृत्य भावभक्तीचा सुरेख संगमच होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कवी विष्णू खरे यांचे काव्यवाचन

0
0

नाशिक : नाशिकच्या वाचनसंस्कृतीला नित्य नवी झळाळी देणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळा रविवारी (दि. २४ जुलै) रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त वाचनालयाच्या औरंगाबादकर सभागृह येथे सायंकाळी ६.१५ वाजता ख्यातनाम हिंदी कवी व समीक्षक विष्णू खरे यांचे काव्यवाचन आणि त्यांच्याशी संवाद असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

या कार्यक्रमात विष्णू खरे यांच्याशी संवाद साधण्यासाठी प्रसिद्ध मराठी कवी प्रफुल्ल शिलेदार यांची उपस्थिती राहणार आहे. हिंदी कवी व समीक्षक विष्णू खरे यांना आतापर्यंत साहित्य क्षेत्रातील विविध राष्ट्रीय सन्मानाने गौरविण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास नाशिककर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अघोषित उत्पन्न योजना’ सुवर्णसंधी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अघोषित उत्पन्न योजना ही करदात्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. नाशिकच्या उद्योजकांनी अघोषित संपत्ती जाहीर करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. ३० सप्टेंबर २०१६ ही शेवटची तारीख असल्याने करदात्यांनी या वेळेत आपले उत्पन्न घोषित करणे गरजेचे असल्याची माहिती आयकर आयुक्त ए. सी. शुक्ला यांनी दिली.

शनिवारी प्राप्तिकर विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या या योजनेची माहिती देण्यासाठी नाईसच्या सभागृहात उद्योजकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रिन्स‌िपल आयकर आयुक्त संजय पात्रा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दिग्जविजय कापडीया, निमाचे अध्यक्ष संजय नारंग, नाशिक इंडस्ट्रीज क्लस्टरचे नरेंद्र गोलीया, क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल, डॉ. अनिरुद्ध भांडारकर हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उद्योजकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहन केलेली चित्रफीतही दाखवण्यात आली.

यावेळी आयुक्त ए. सी. शुक्ला म्हणाले, योजनेचे विशिष्ट फायदे आहेत. ही योजना न वापरता कर भरावयाचे झाल्यास करदात्याला कमीत कमी १०० टक्के व जास्तीत जास्त ३० टक्के दंड भरावा लागू शकतो. या योजनेत जे करदाते आपले उत्पन्न घोषित करणार आहेत त्या करदात्याची माहिती ही कोणत्याही सरकारी कार्यालयाला दिली जाणार नाही. त्याचप्रमाणे या माहितीचा भविष्यात कोठेही आयकर वसूल करताना माहितीचा वापर केला जाणार नाही. या नंतर उपलब्ध असलेल्या पैसा हा करदाता कोणताही व्यवसाय वापरू शकतो असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एचआयव्हीबाधित नवदाम्पत्यांचा सत्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच एचआयव्हीबाधित नवदाम्पत्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला. पंचवटीतील पं. पलुस्कर सभागृहात हा कार्यक्रम झाला.

महिन्द्रा अँड महिन्द्रा लिमिटेड व यश फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठातील आरोग्य विज्ञान विभागाचे संचालक जयदीप निकम, महिन्द्रा अँड महिन्द्राचे मनोज निकम, यश फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. जवळपास तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, बॅग, डबा यांसारख्या शालेय उपयोगी भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी जगदीप निकम म्हणाले, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संघर्ष असतो. या मुलांच्या आयुष्यातील संघर्ष तर खूपच कठीण आहे. तरीही या मुलांनी त्यावर मात करून यश मिळविल्याबद्दल त्यांचे कौतुक करायला पाहिजे. यावेळी शिक्षणातील वेगवेगळ्या संधीविषयी मुलांना मार्गदर्शन करण्यात आले. एचआयव्हीबाधित नवविवाहित दाम्पत्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या दाम्पत्यांनी त्यांचे सकारात्मक अनुभव यावेळी कथन केले. त्यांच्यासाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि खेळांचे आयोजन करण्यात आले होते. एचआयव्ही सहजीवन जगणारे ४५० हून अधिकजण या कार्यक्रमात सहभागी झाले. मालेगाव येथेही अशाच प्रकारचा कार्यक्रम घेण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आडगावातील विहिरीत दोन मुलांचा करुण अंत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/आडगाव

शाळेतून घरी परतताना वाटेतील एका पडक्‍या विहिरीत शनिवारी दोन शाळकरी मुलांचा करुण अंत झाला. आडगाव शिवारातील समर्थनगरमधील ओमकार श्रीराम करंजकर (वय १३) व शुभम सोमनाथ शिंदे (वय १४) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. आसपासच्या नागरिकांनी बघ्याची भूमिका न घेता तत्काळ रुग्णालयात दाखल केले असते तर एकाचा जीव वाचू शकला असता, असे पोलिसांनी सांगितले.

ओमकार व शुभम हे दोघे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आठवी व दहावीच्या वर्गात शिकत होते. शनिवार असल्याने शाळा लवकर सुटली आणि दोघेही काही मित्रांसह घराकडे निघाले होते. सकाळपासून पाऊस सुरू असल्याने ठिकठिकाणी डबकी साचली होती. मदर तेरेसा आश्रमाच्या संरक्षक भिंतीच्या मागे शेतीच्या रस्त्याने ते येत होते. शेताच्या बांधावरील एक जुनी पडकी विहीर पाण्याने भरलेली होती. त्यामुळे दोघांना ती विहीर असावी, याचा अंदाज न आल्याने ओमकारने आधी पाण्यात उडी घेतली. पाठोपाठ शुभमनेही उडी घेतली आणि दोघेही गाळात रुतले. शुभमचा धाकटा भाऊही तेथे होता. तो तत्काळ घरी पळत गेला आणि घटनेची माहिती दिल्यानंतर नातलगांनी विहिरीकडे धाव घेतली. तोपर्यंत, नीलेश जाधव या युवकाने ओमकारला बाहेर काढले आणि तातडीने उपचारासाठी नेण्यास सांगत तो पुन्हा शुभमला शोधण्यासाठी विहिरीत उतरला. मात्र, शुभम गाळात फसल्याने त्याला वेळेत बाहेर काढू शकला नाही. या वेळी आडगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ओमकारला नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याचा अंत झाला होता. शुभमचा गाळातच मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकुंडाचे काँक्रिटीकरण गोत्यात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात उपाययोजना करण्यासंदर्भात हायकोर्टाने नियुक्त केलेल्या विभागीय आयुक्तांच्या समितीने आपला अहवाल हायकोर्टाला सादर केला आहे. त्यात गोदावरीसह तिच्या उपनद्यांमधील क्राँक्रिटीकरणाला विभागीय आयुक्तांच्या समितीनेही विरोध दर्शवला आहे, तसेच भुयारी गटार योजनेचा वापर पावसाळी पाण्यासाठीच व्हावा, अशी शिफारस समितीने केली आहे. विभागीय समितीच्या शिफारशींमुळे रामकुंडासह, गोदा पार्क व पंचवटी परिसरात नदीपात्रात केलेले काँक्रिटीकरण गोत्यात आले आहे. हायकोर्टात आता २८ जुलैला या संदर्भात सुनावणी होणार आहे.

सिंहस्थापूर्वी गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात पर्यावरणप्रेमींकडून हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्याची गंभीर दखल घेत, हायकोर्टाने निरीकडून अहवाल मागवत उपाययोजना सुचवण्याचे निर्देश दिले होते. निरीने या संदर्भात हायकोर्टात शिफारशी सादर केल्या होत्या; परंतु या शिफारशींवर महापालिकेने हरकती नोंदविल्या होत्या. त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशाने विभागीय आयुक्तांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यात निरीच्या उपाययोजनांवर या समितीने अहवाल सादर करावयाचा होता. ४६ पानांचा हा अहवाल हायकोर्टात सादर करण्यात आला असून, त्यात काही शिफारशींवर महापालिका व निरीचे एकमत झाले आहे. त्यात नदीपात्रात करण्यात आलेल्या क्राँक्रिटीकरणाला तीव्र विरोध करण्यात आला आहे. निळ्या पूररेषेतील गावठाणातील बांधकामांना काही अंशी संरक्षण देण्यात आले आहे. तसेच स्टॉर्म वॉटर पाइपलाइनमधून फक्त 'पावसाचेच पाणी' जायला पाहिजे. कुठलाही घनकचरा त्यात जाता कामा नये ही सूचनादेखील सर्वांनी मान्य केली. काँक्रिटीकरणाला विभागीय समितीनेच विरोध केल्याने आता पंचवटी, रामकुंड, गोदाघाटाच्या क्राँक्रिटीकरणाची कामे अडचणीत सापडली आहेत.

यावर एकमत नाही

- निळ्या पूररेषेत कोणत्याही पद्धतीचा 'भराव' नको - जॉगिंग ट्रॅक, शौचालय, गार्डनही नको - 'लाल पूररेषेत' मल-जल चेंबर्स नकोत - बोअरवेलसाठी जीएसडीएची मान्यता हवी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लासलगावला आजपासून डाळिंब लिलाव

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

लासलगाव व परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आज (२५ जुलै) पासून बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात डाळिंब लिलावास सुरुवात होणार आहे. ही माहिती लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी दिली.

लासलगावसह प‌‌रिसरातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव, सिन्नर, कोपरगाव, राहुरी, राहाता व नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर डाळिंब लागवड केली आहे. त्यांची मालविक्रीची सोय व्हावी म्हणून बाजार समितीतर्फे लासलगाव मुख्य बाजार आवारावर दोन वर्षांपूर्वी डाळिंब लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे चालू हंगामातील डाळिंब लिलाव सुरू करण्याबाबत नुकतीच व्यापारीवर्गाशी चर्चा करून आजपासून शासन अध्यादेशातील नवीन सुधारणांप्रमाणे सदरचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.परिसरातील शेतकरी बांधवांनी लासलगाव मुख्य बाजार आवारावर डाळिंब योग्य प्रतवारी करून २० किलोच्या क्रेटमध्ये विक्रीस आणल्यास सदर शेतीमालाची अनुज्ञप्तीधारक अडत्यामार्फत उघड लिलावाद्वारे विक्री करून वजनमापानंतर लगेच रोख पेमेंट देण्याची व्यवस्था बाजार समितीने केली आहे. डाळिंब खरेदीसाठी अनेक व्यापारी इच्छुक असल्याने शेतकऱ्यांना मदत होईल.

बाजार समितीच्या लासलगाव मुख्य बाजार आवारावर डाळिंब खरेदीस इच्छुक व्यापाऱ्यांनी लायसन्सबाबतच्या अटी पूर्ण केल्यास तत्काळ लायसन्स देऊन बाजार आवारावर पॅकिंग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

- बी. वाय. होळकर, सचिव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरच्या संख्येत घट

0
0

नाशिक विभागात नंदुरबार जिल्हा सर्वप्रथम टंचाईमुक्त

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

नाशिक विभागात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने हजेरी लावल्याने जून महिन्यात विभागातील ५४ तालुक्यांपैकी टँकरने पाणीपुरवठा सुरू असलेल्या तालुक्यांची संख्या आता ३९ वरून २० वर आली. त्यामुळे जूनच्या मध्यापर्यंत सुरू असलेल्या टँकर्सच्या संख्याही घटली असून ही संख्या आता १,१४३ वरून ४५५ वर येऊन पोहोचली आहे. विभागातील नंदुरबार जिल्ह्याने सर्वप्रथम पाणीटंचाई मुक्त होण्याचा मान पटकावला आहे. त्या पाठोपाठ धुळे व जळगाव हे दोन्ही जिल्हे टंचाईमुक्त होण्याच्या मार्गावर आहेत.

नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात यंदा कडक दुष्काळ पडला होता. त्यातच पावसाने ओढ दिल्याने पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्याही प्रचंड वाढली होती. ग्रामीण भागाबरोबरच मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनीही तळ गाठल्याने शहरांतील नागरिकांनाही पाणी कपातीचा सामना करण्याची वेळ आली होती.

संपूर्ण जून महिना कोरडाच गेल्याने जून महिन्याच्या मध्यावर नाशिक विभागातील टंचाईग्रस्त गावांची संख्या ८४४ वर पोहोचली होती. या गावांतील ३,४९४ वाड्या-वस्त्यांवर ७१ शासकिय व १,०७२ खासगी असे मिळून १,१४३ टँकर्स नागरिकांची तहान भागविण्यासाठी दिवसरात्र फिरत होते.

मात्र जुलैच्या प्रारंभीच विभागात पावसाचे आगमन झाल्याने टँकर्सची संख्या झपाट्याने घटली. ही संख्या आता ४५५ वर येऊन पोहोचली. तर टंचाईग्रस्त तालुक्यांची संख्याही ३९ वरुन २० वर झाली. धुळे आणि जळगाव या दोन जिल्ह्यांतील सर्वच तालुके जवळजवळ टंचाईच्या फेऱ्यातून मुक्त झालेत. मात्र नगर आणि नाशिक या जिल्ह्यांत अजुनही पावसाचे प्रमाण कमी असल्याने टंचाईग्रस्त तालुक्यांची संख्या जास्त आहे.

नगरमधील कर्जत व शेवगाव या दोन्ही नगरपालिका मात्र टंचाईमुक्त झाल्या आहेत. तर जामखेड व पारनेर या दोन्ही नगरपालिकांना अजूनही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नाशिक विभाग शंभर टक्के पाणी टंचाईमुक्त होण्यासाठी विभागातील ग्रामीण भागातील २० तालुक्यांत अजुनही जोरदार पावसाची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामपूर ‘कृउबा’वर प्रशासक मंडळ

0
0

लखन सावंत, कॉलेज क्लब रिपोर्टर

नामपूर : महाराष्ट्र कृषी व पणन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या आदेशान्वये विद्यमान शासकीय प्रशासक बदलून नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकोणावीस संचालकांच्या अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र कृषी व पणन यांच्या आदेशान्वये २०१५ रोजी सटाणा बाजार समितीचे विभाजन करून स्वतंत्र सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समित्या अस्तित्वात आल्या. यावर शासकीय प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त व्हावे, यासाठी भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आग्रही होते.

शासकीय प्रशासक एस. एस. गिते यांनी प्रशासकांच्या नावांची घोषणा केली. मुख्य प्रशासक भाऊसाहेब कापडणीस, उपमुख्य प्रशासक अविनाश सावंत तसेच सर्व प्रशासक मंडळाकडे पदभार सुपूर्द केला. प्रशासक मंडळाची घोषणा होताच सर्व कार्यकर्त्यांनी फटाके फोडत गुलालाची उधळण केली. यावेळी शासकीय प्रशासक एस. एस. गिते, पंचायत समिती सभापती जिजाबाई सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य पप्पू बच्छाव, मविप्र संचालक भरत कापडणीस सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युती सरकार हे धनदांडग्यांचे

0
0

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड. पगार यांचा टोला

म. टा. वृत्तसेवा, येवला

कामगार, सर्वसामान्य जनता अन् शेतकरी यांच्या विरोधातील धोरणे राबविणारे राज्यातील भाजप-शिवसेना युतीचे सरकार हे केवळ धनदांडग्यांचे सरकार आहे. या सरकारच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व विरोधी पक्षांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी केला.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवारपासून येवला तालुक्यात गटनिहाय बैठका सुरू झाल्या आहेत. त्यावेळी ते बोलत होते. अॅड. पगार म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांपासून ते स्थानिक गावपातळीच्या कार्यकर्त्यांपर्यंत दडपशाही करण्यात येत आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने आक्रमकपणे आंदोलने करीत राहील, असे अॅड. रवींद्र पगार यांनी सांगितले.

या दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुका नजरेसमोर ठेऊन रणशिंग फुंकले आहे. शनिवारी, (दि. १६) तालुक्यातील पाटोदा व मुखेड येथे आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना अॅड. रवींद्र पगार बोलत होते.

राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेल्या मांजरपाडा प्रकल्पासाठीच्या बोगद्याचे काम अंतिम टप्यात आले असून आता केवळ सुमारे ७०० मीटर इतकेच बोगद्याचे काम राहिले आहे. मात्र या उर्वरित ७०० मीटर बोगद्याच्या कामासाठी वारंवार पाठपुरावा करूनदेखील युती सरकार केवळ राजकीय हेतू ठेऊन या कामासाठी निधी देत नसल्याचा थेट आरोप देखील अॅड. पगार यांनी यावेळी केला. तालुक्यातील पाटोदा जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांचा मेळावा पाटोदा येथील श्री रामेश्वर मंदिराच्या सभागृहात तर मुखेड जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांचा मेळावा मुखेड येथील भवानी देवी मंदिराच्या सभागृहात घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यांमध्ये शेतकऱ्यांची तसेच कार्यकर्त्यांची मनोगते जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी जाणून घेतली. यावेळी पक्ष निरीक्षक नामदेव वाघचौरे, विजय पवार, माणिकराव शिंदे, राधाकिसन सोनवणे आदींची भाषणे झाली. यावेळी अशोक मेंघाने, साहेबराव आहेर, बाळासाहेब पिंपरकर, चंद्रकांत साबरे आदींसह स्थानिक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्ज माफ करा

दुष्काळ व सातत्याने येत असलेल्या संकटामुळे हतबल शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करावे, वीजबिले माफ करावीत. सर्व प्रकारच्या कर्ज व सरकारी वसुल्या त्वरित थांबवाव्यात. राज्य सरकारने स्वतःची रोजगार हमी योजना सुरू करून लोकांना रोजगार द्यावा. तसेच शेतकऱ्यांच्या शेतावरही रोजगार हमी योजना राबवून उत्पादक स्वरुपाची कामे हाती घ्यावीत अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पहिणे घाटाला जत्रेचे स्वरूप

0
0

निसर्ग पर्यटनाचा लुटला आनंद; पोलिसांची मद्यपींवर कारवाई

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

पावसाची विश्रांती आणि स्वच्छ सूर्यप्रकाश यामुळे त्र्यंबकेश्वरच्या पहिणे घाटात विकेंड साजरा करण्यासाठी नाशिक शहरवासीयांची झुंबड उडाली होती. त्यात पोलिसांनी मद्यप्रेमींना अटकाव केल्याने कौटुंबिक सहलींनी या परिसरास जत्रेचे स्वरूप आले होते.

जवळपास चार ते पाच किलोमीटरचा हा परिसर पावसाने बहरला असून, सूर्यदर्शनाने उजळून निघाला आहे. उंचावरून कोसळणारे धबधबे, मखमली हिरवळ असे पाचुचे रान यामध्ये हरवून जाण्यासाठी शहरवासीय अलिकडील काही वर्षांपासून येथे येत आहेत. याची भुरळ मद्यप्रेमींनादेखील पडली असून, माळरानावर अथवा खळाळत्या पाण्यात बसून एक प्याला और सही म्हणत धुंद होण्यासाठी तळीरामांची जत्रा भरते आहे. याची दखल घेत त्र्यंबक पोलिस ठाण्याचे मुकुंद देशमुख आणि वाडीवऱ्हेचे सुरेश मनोरे यांनी पेगलावडी फाटा आणि पहिण्याची त्रिफुली येथे तळीरामांच्या वाहनांची झडती घेऊन या प्रकारास प्रतिबंध घातला.

वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे, उपनिरीक्षक शीतलकुमार नाईक, आदी वीस पोलिसांचे पथक तसेच त्र्यंबकचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलिस उपनिरीक्षक कैलास आकुले, किरण मेहेर आदींच्या सुमारे चाळीस पोलिसांनी सतत दोन दिवस या भागात कारवाई करीत निसर्गप्रेमींना दिलासा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये ३१ जुलैला खुली बुद्धिबळ स्पर्धा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मॉर्फी बुद्धिबळ अॅकॅडमीतर्फे ३१ जुलै रोजी नाशिकमध्ये खुली बुद्धिबळ स्पर्धा होणार आहे. कामगारनगरमधील नाइस वजन काट्याजवळ, पाइप लाइन रोड येथील आनंद निकेतन शाळेत होणार आहे.

स्पर्धेत एकूण ४० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असून, प्रथम क्रमांकासाठी १५ हजार, द्वितीय १० हजार, तिसरे ५५००, चौथे ३०००, पाचवे २००० रुपये अशी एकूण १२ व्या क्रमांकापर्यंत पारितोषिके दिली जाणार आहेत. याशिवाय ७, ९, ११, १३ व १५ वर्षांखालील वयोगटांसाठी स्वतंत्र बक्षिसे आहेत. स्पर्धेत आठ वेळा भारताचे प्रतिनिधित्व करणारी ऋतुजा बक्षी, माजी राष्ट्रीय अ गट खेळाडू सोहन फडके, सुयोग वाघ, संकर्ष शेळके, अमरदीप बारटक्के आदी नामांकित खेळांडूनी सहभाग घेतला आहे.

स्पर्धा स्विस लीग पद्धतीने होणार आहे. अधिक माहितीसाठी माधव चव्हाण (९६८९५-८८७६५ / ९०११०-०१९७९) यांच्याशी संपर्क साधावा. प्रवेश नोंदविण्याची अंतिम मुदत ३१ जुलै रोजी सकाळी आठपर्यंत आहे. स्पर्धेत पहिल्या २०० खेळाडूंनाच प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवीण ठाकरे व मंगेश गंभिरे पंच असतील. तुषार गोसावी, आनंद यशवंते, अनिल राठी, संतोष कस्तुरे, गणेश थेटे आदी सहकार्य करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..अन्यथा आमची जागा परत द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील शिवनई शिवारातील जमीन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पससाठी देताना करण्यात आलेल्या ठरावातील मागण्यांची पूर्तता विद्यापीठाने काटेकोरपणे करावी, अन्यथा जमीन परत करावी अशी आक्रमक भूमिका शिवनईतील ग्रामस्थांनी घेतली आहे. यासंदर्भात विद्यापीठाने ग्रामस्थांना लेखी आश्वासन द्यावे अन्यथा येत्या स्वातंत्र्यदिनाच्या ग्रामसभेत कॅम्पससाठी दिलेली जमीन परत घेण्याचा ठराव मांडू, असा इशारा शिवनईच्या ग्रामस्थांनी दिला आहे. गेल्या पंधरवड्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने शिवनईतील नाशिक कॅम्पसच्या नियोजित जमिनीवर वॉल कम्पाऊंड बांधण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले. सरकारकडून कॅम्पसच्या अप्रूव्हलला होणारी दिरंगाई अन् काही ग्रामस्थांकडून या जागेवर होणारे अतिक्रमण या स्थितीला सामोरे जाताना विद्यापीठाने महत्प्रयासाने पदरात पडलेली जागा वाचविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. मात्र जागा ताब्यात घेताना झालेल्या ठरावानुसार विद्यापीठाने स्थानिक ग्रामस्थांना संभाव्य कॅम्पसमध्ये प्राधान्याने संधी द्याव्यात, या मागणीवर आता ग्रामस्थांचा जोर पडू लागला आहे. जागा ताब्यात घेण्यापासून तर वॉल कम्पाऊंडचे उद्घाटन करण्यापर्यंतच्या टप्प्यावर स्थानिकांना संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात विद्यापीठाने प्रत्यक्षात ग्रामस्थांना विश्वासात घेतले नसल्याचा त्यांचा आरोप आहे. यादृष्टीने विद्यापीठाने ग्रामस्थांना लेखी आश्वासन द्यावे, अशी त्यांनी अपेक्षा आहे. अशी पावले विद्यापीठाने न उचलल्यास यासाठी येत्या स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेवर गावाची जमीन गावास विद्यापीठाने परत करण्याचा ठराव मांडण्यात येणार असल्याची माहिती शिवनईचे माजी सरपंच कृष्णा गडकरी यांनी दिली आहे. गावाच्या या जमिनीवर एकेकाळी झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी वैयक्तिकरित्या कोर्टाकडे दाद मागून ते अतिक्रमण हुसकावून लावले होते, असेही गडकरी सांगतात. यानंतर विद्यापीठास जमिनीचा ताबा देताना झालेल्या ठरावानुसार त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून सकारात्मक चर्चा करणे अपेक्षित आहे, मात्र विद्यापीठास अद्याप ते ही न जमल्याची ग्रामस्थांची नाराजी आहे.

सरकारच्या विविध प्रकल्पांत जमिनींच्या रुपात शिवनई गावाचे योगदान आहे. परिणामी, स्थानिक शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत. सरकारच्या कुठल्याही प्रकल्पाला विरोध नाहीच; मात्र या प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या नव्या संधींमध्ये स्थानिकांचा प्राधान्याने विचार व्हावा, पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पसबाबत ग्रामस्थांची हिच भूमिका आहे, असे लेखी आश्वासन मिळावे. - कृष्णा गडकरी, माजी सरपंच, शिवनई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुवेतनिवासी डॉक्टरला बँकेच्या चुकीचा फटका

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बँकेत एनआरई खाते उघडूनही ते अॅक्टीव न झाल्यामुळे डॉक्टर दाम्पत्याला मानसिक त्रास सहन करावा लागला. बँकेत टाकलेले पैसे भारताच्या शाखेत का ट्रान्सफर होत नाहीत, याची विचारणा करण्यासाठी डॉ. संजीव पवार यांना कुवेतहून भारतात यावे लागले. त्यानंतर बँकेत खाते अॅक्ट‌ीव्ह झाले नसल्याचा प्रकार समोर आला. नाशिकच्या गोल्फ क्लब येथील बँक ऑफ इंडियाच्या चुकीमुळे हा प्रकार घडला. डॉक्टरांनी अखेर या बँकेचे चालू न झालेले खाते बंद केले. नाशिकच्या डॉ. अंजली पवार यांचे पती डॉ. संजीव हे डिसेंबर २०१५ पासून कुवेत येथे नोकरीसाठी गेले. त्यांनी कुवेतला जाण्याअगोदर बँक ऑफ बडोदाच्या गोल्फ क्लब शाखेत एनआरई खाते उघडले. त्यानंतर ते कुवेतला निघून गेले. एक महिन्यानंतर डॉ. संजीव यांनी कुवेतहून पैसै पाठवले तेव्हा ते पैसे भारतात जमा झाले नाहीत. याबाबत कुवेतला विचारणा केल्यानंतर तुमचे अकाउंट सस्पेंडेड असल्याचे बँकेतून सांगण्यात आले. त्यामुळे डॉक्टरांनी आपल्या पत्नीला फोन करुन नाशिकच्या बँकेतून माहिती घेण्यास सांगितले. तेव्हा बँकेने तुमचे अकाउंट अॅक्टिव्ह असल्याचे सांगत आयएफएससी कोड नीट टाकण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दिलेल्या कोडप्रमाणे पैसे टाकले. पण तोच मेसेज पुन्हा आला. सहा महिने बँकेने उडवाउडवीची उत्तरे दिली व प्रश्न सुटला नाही. अखेर डॉ. संजीव पवार यांनी नाशिक गाठले व त्यांनी बँकेत जाऊन त्याबाबत चौकशी केली. त्यावेळी बँकेत खाते अॅक्टीव्ह नसल्याची माहिती समोर आली. त्यासाठी डॉक्टर पवार यांना नाशिकच्या शाखेत कुवेती चलन असलेले दिनार जमा करावे लागले व त्यातून हा प्रकार उघड झाला. बँकेत हे दिनार जमा केल्यानंतर हे खाते चालू झालेच नसल्याचे बँकेला कळाले. त्यानंतर पुणे, मुंबई येथून फोन करुन चौकशी करण्यात आली. पण या सर्वांचा त्रास मात्र या डॉक्टर दाम्पत्यास सहन करावा लागला. त्यामुळे अखेर त्यांनी या बँकेचे खातेच बंद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मृत्यूच्या चिंतनातून तत्त्वज्ञानाचा प्रवास’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आई व भावंडांच्या मृत्यूमुळे लहान वयात मृत्यू जवळून समजला. त्याचे चिंतन सुरू असताना प्राध्यापकांना 'मृत्यू म्हणजे काय'विचारले, तर त्यांनी कठोपनिषद वाचावयास सांगितले आणि माझा तत्त्वज्ञानाचा प्रवास सुरू झाला, असे प्रतिपादन ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा यांनी केले. सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी नाशकात आलेल्या भैरप्पा यांनी रविवारी मु. शं. औरंगाबादकर सभागृहात निमंत्रितांशी मनमोकळा संवाद साधला. भैरप्पा पुढे म्हणाले की, वयाच्या अकराव्या वर्षी आई गेली. त्यानंतर बहीण व भाऊ एकाच दिवशी प्लेगने वारले. मी पंधरा वर्षांचा असताना त्यांचे मृतदेह स्वत:च्या खांद्यावर वाहिले. त्यानंतर मृत्यूविषयी चिंतन सुरू झाले. पुढे ते म्हणाले की, मृत्यू म्हणजे काय असा प्रश्न प्राध्यापकांना केला. त्यांनी कठोपनिषदातील नचिकेत व यमाची कथा सांगितली. पण मला ती कथा समजली नाही. मी पुन्हा त्या प्राध्यापकांकडे गेलो, तेव्हा त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याची सूचना केली. त्यांचे ऐकून मी बीए, एमए आणि पीएचडीदेखील तत्त्वज्ञानात केली. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातूनच लेखनाची पार्श्वभूमी तयार झाली. पुढे कादंबऱ्यांतूनही तत्त्वज्ञान डोकावत राहिले. 'धर्मश्री' ही पहिली कादंबरी धर्मांतराच्या प्रश्नामुळे आलेल्या अस्वस्थतेतून साकारली. तेव्हा माझे वय केवळ २५ वर्षे होते. सन १९६२ मध्ये पीएचडी करीत असतानाच 'वंश' या विषयाने अस्वस्थ केले व कादंबरी आकार घेऊ लागली. भारतातील वंश संकल्पनेचा सखोल अभ्यास करून 'वंशवृक्ष'ही कादंबरी लिहिली. या कादंबरीने आपल्याला कादंबरीकार म्हणून ओळख दिली; शिवाय आपल्यात बदलही घडवल्याचे डॉ. भैरप्पा म्हणाले. व्यासपीठावर ज्येष्ठ लेखक विरुपाक्ष कुलकर्णी, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नरेश महाजन यांची उपस्थिती होती. ज्येष्ठ लेखिका व अनुवादक उमा कुलकर्णी यांनी भैरप्पा यांच्याशी संवाद साधला. सावानाचे कार्यवाह मिल‌िंद जहागिरदार यांनी प्रास्ताविक केले. नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images