Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मनमाडकरांचा आरोग्यप्रश्न ऐरणीवर

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

शहर परिसरात सध्या पावसाचा फारसा पत्ता नसला तरी बदलते हवामान आणि अशुद्ध व गढूळ पाणी तसेच डासांचा प्रादुर्भाव यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरातील विविध दवाखान्यात ताप, थंडी व खोकल्यासह डेंग्यूच्या रुग्णातही वाढ झाल्याने नागरिकांत काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिन्याभरात शहरात १२ ते १५ डेंग्यूचे रुग्ण आढळल्याची माहिती डॉ. संदीप कुलकर्णी यांनी 'मटा'शी बोलताना दिली. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांत नाराजीचा सूर आहे.

मनमाड शहरातील हॉस्पिटल हे रुग्णांच्या गर्दीने फूल झाल्याचे चित्र असून पालिका प्रशासनाने सार्वजनिक स्वच्छता व आरोग्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे. मनमाडमध्ये पाऊस फारसा नसूनही बदलत्या वातावरणाचा फटका नागरिकांना बसला आहे. दरम्यान मलेरिया, टायफाइडची साथ पसरू नये, डासांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नागरिकांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासन आणि सेवाभावी संस्थांतर्फे करण्यात आले. महिनाभरातून एकदा पाणी पुरवठा होत असल्याने महिनाभर पाणी साठवून ठेवणे जिकिरीचे आहे. या साठवलेल्या पाण्यामुळेदेखील स्वच्छता आरोग्याचा प्रश्न उद्भवत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालय खासगी रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात ताप व पोटदुखीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता मनमाड शहर परिसरात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत पालिका प्रशासनाने केवळ सूचना देऊन चालणार नाही. त्यासाठी उपाययोजना आवश्यक असल्याची मागणी नागरिकांत होत आहे.

मनमाड शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यासाठी नागरिकांनी डासांपासून स्वतःचे रक्षण करणे गरजेचे आहे. शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या घटणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते आहे. यावर उपाय म्हणून नागरिकांनी स्वच्छता ठेवावी. पाणी उकळून तसेच गाळूून प्यावे.

डॉ. संदीप कुलकर्णी, हृदयरोग तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सायबर चोरांकडून १४ लाखांना गंडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

निवृत्त बँक व्यवस्थापक, त्यांची पत्नी, बहीण आणि मुलगा यांच्या बँक खात्यातून इंटरनेट बँकिंगद्वारे सायबर चोरांनी १४ लाख रुपये काढून घेतल्याची घटना घडली. उपनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. बँकेच्या व्यवस्थापकालाच गंडा घातला जात असले तर सामान्य व्यक्तीच्या बँकेतील पैशांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

व्ही. रामचंद्रन (६७, स्वामी समर्थ संकुल, गाडगेरनगर, नाशिकरोड) यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. रामचंद्रन तसेच त्यांची, बहीण, पत्नी व मुलाचे पंजाब नॅशनल बँकेच्या नाशिकरोडच्या दत्त मंदिर चौकातील शाखेत अकाऊंट आहे. २५ जुलै रोजी या चौघांच्या अकाऊंटमधून एकूण १४ लाख रुपये सायबर चोरांनी काढून घेतले गेले. रामचंद्रन हे २००१ मध्ये याच बँकेतून व्यवस्थापक म्हणून निवृत्त झाले. ते खात्यातील बॅलन्सची चौकशी करण्यासाठी बँकेत गेले असता १४ लाख रुपये दुसऱ्या खात्यात व त्या अकाऊंटमधून अन्य अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होत गेल्याचे स्पष्ट झाले. पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोबी-फ्लॉवर तेजीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जुलै महिन्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने भाजीपाल्याचे दर सवसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. पालेभाज्यांसह फळभाज्यांचेही दर गेल्या महिन्याच्या तुलनेत निम्म्यावर आले आहेत. दरम्यान, कोबी-फ्लॉवरचे दर मात्र टिकून आहेत. यामुळे गृहिणींनी सुटकेचा निःश्वास सोडला. यामुळे गृहबजेट सावरण्यास मदत झाली आहे.

गेल्या महिन्यात भाज्यांचे दर १०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले होते. पालेभाज्या तर सर्वसामान्यांसाठी दुर्मीळच झाल्या होत्या. त्यातच डाळींच्याही किंमती गगनाला भिडल्याने इकडे आड तिकडे विहीर अशी सर्वसाामन्यांची अवस्‍था झाली होती. मात्र, जुलै महिन्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने भाज्यांची आवकही वाढली आहे. यामुळे १०० रुपये जुडी मिळणारी कोथिंबीर २० ते ३० रुपये जुडीने मिळू लागली आहे. मेथी, शेपू, पालक, कांदापात यांचे दरही निम्म्याने कमी झाले आहेत.

कारले, गिलके, दोडके, वांगे, भेंडी, गवार यांचे दरही ६० रुपयांखाली आले आहेत. काकडी, टोमॅटो, भोपळ्याचे दरही कमी झाल्याने ग्राहकांना हायसे वाटत आहे. भाजीपाल्याचे बजेट प्रथमच कमी झाल्याने गृहिणींनी समाधान व्यक्त केले. मात्र मिरची अजूनही तिखटच आहे.

कोबी-फ्लॉवरला सुगीचे ‌दिवस

कधी कधी कवडीमोल भावाने विकल्या जाणाऱ्या कोबी-फ्लॉवरला सुगीचे दिवस आले आहेत. आवक मर्यादित होत असल्याने तसेच मागणीही चांगली असल्याने कोबी व फ्लॉवर ४० ते ५० रुपये किलोने विक्री होत आहे. नाशिकबाहेरही मुंबई व गुजरातमध्ये कोबी-फ्लॉवरची मागणी वाढली आहे.

भाजीपाल्याचे किलोचे दर

मिरची - ५०, कोबी - ४० ते ५०, फ्लॉवर - ४०, कारले - ४०, गिलके - ५०, दोडके - ४०, टोमॅटो - ४०, काकडी - ३०, शेवगा - ४०, वांगे - ३०, भेंडी - ३०, गवार - ४० ते ५०, कोथिंबीर - २० ते ४० जुडी, मेथी - ५ ते १५, शेपू - १० ते २०, पालक - ४ ते १२, भोपळा - १० रुपये नग.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशन व्यवस्‍था होणार ठप्प!

0
0

आजपासून रेशन दुकानदारांचा संप; गोरगरिबांचे हाल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेशन दुकानदारांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यास राज्य सरकारने नकार दिल्यामुळे आजपासून (१ ऑगस्ट) स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन विक्रेते संपावर जाणार आहेत. शहरासह जिल्ह्यातील सुमारे साडेसहा हजार परवानाधारक या संपात सहभागी होणार आहेत. ऐन सण उत्सवाच्या काळापूर्वीच पुकारलेल्या या संपामुळे रेशन व्यवस्था ठप्प होणार असून, गोरगरिबांचेच सर्वाधिक हाल होणार आहेत.

सरकारकडून मिळणाऱ्या अत्यल्प कमिशनवर व्यवसाय करणे रेशन दुकानदारांना परवडेनासे झाले आहे. त्यामुळे त्यांनी आता कमिशनऐवजी दरमहा ३५ हजार रुपये मानधन द्यावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे. मानधनाच्या रकमेबाबत रेशन दुकानदारांची तडजोडीची भूमिका असली तरी सरकार ही मागणी मान्य करण्यास तयार नाही. मालाची चढउतार करण्यासाठी होणारा हमालीचा खर्च दुकानारांच्या माथी मारू नये, अशीही एक मागणी करण्यात आली आहे. विविध योजनांची प्रलंबित देयके तातडीने अदा करावीत यांसह अनेक मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. सरकारने या मागण्या मान्य कराव्यात, यासाठी त्यांना ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वी ४ एप्रिल रोजीच संघटनेने ही मुदत दिली होती. मागण्या मान्य न झाल्यास १ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय रेशन दुकानदारांच्या विविध संघटनांनी घेतला आहे. या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बुधवारी २७ जुलै रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मंत्रालयात बोलाविण्यात आले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, सचिव महेश पाठक, उपसचिव सतीश सुपे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. मात्र त्यामध्ये संघटनेच्या मागण्या मान्य करणे तूर्तास शक्य नसल्याचे सांगण्यात आले. बापट यांनी संघटनेच्या मागण्यांवर उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे १ ऑगस्टपासून संपावर जाणार असल्याचे संघटनेने निश्चित केले आहे.

या आहेत प्रलंबित मागण्या

सरकारी गोडावूनमधून थेट दुकानापर्यंत माल पोहोच करावा, सरकारच्या जी. आर. प्रमाणे तूट टाकण्यास परवानगी द्यावी, कमिशनमध्ये वाढ करावी, तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रात अन्न-धान्य वितरण महामंडळ स्थापन करावे, बिहारप्रमाणे केरोसिनला प्रति लिटर एक रुपयेप्रमाणे कमिशन मिळावे, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सप्ताहात दुकानदारांना धान्य उपलब्ध करून द्यावे, शालेय पोषण आहाराची थकीत रक्कम मिळावी, बायोमेट्रिक योजनेकरिता फॉर्म भरून घेण्यासाठी दुकानदारांना सक्ती करू नये, किरकोळ व गंभीर चुकांबाबत दुकानदारांना मोका न लावता पूर्वीच्याच कायदेशीर तरतुदी लागू कराव्यात, दुकानदाराला किराणा व धान्य विक्रीची परवानगी मिळावी, गाळाभाडे, लाईटबील,स्टेशनरीच्या खर्चाची तरतूद करावी.

संपात प्रत्येक दुकानदाराने सहभागी व्हावे, यासाठी आम्ही प्रत्येक तालुका पिंजून काढत आहोत. सोमवारी (१ ऑगस्ट) निफाड, दिंडोरी, पेठ येथील तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन देणार आहोत. पुरवठा मंत्री आमच्या मागण्यांची दखल घेत नसल्याने आता मुख्यमंत्रीच लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यातील २ हजार ६०९ रेशन दुकानदार आणि ३ हजार ९०० केरोसिन विक्रते संपात सहभागी होणे अपेक्षित आहे.

- निवृत्ती कापसे, जिल्हाध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मदतकार्यात पोलिसांची मोलाची भूमिका

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात मंगळवारी पावसाने हाहाकार माजवला होता. यावेळी बचावकार्य करण्यात आपत्ती व्यवस्थापनाबरोबरच पोलिसांनीदेखील मोलाची भूमिका बजावल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत झाली.

सोमवारी रात्री पाऊस सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाने पोलिसांना अलर्ट केले. त्याचवेळी कामाचे नियोजन करुन पोलिसांनी पाणी येणार असल्याच्या ठिकाणी बंदोबस्तास सुरुवात केली. लोकांची गर्दी होणार, अशा ठिकाणीदेखील बंदोबस्त लावला होता. लोकांनी पाण्याकडे जाऊ नये, यासाठी गोदावरीला मिळणाऱ्या सर्व उपनद्यांवर बंदोबस्त तैनात केला होता. सकाळी गंगापूर धरण, सोमेश्वर धबधबा, आनंदवल्ली, आसारामबापू पूल, जुना गंगापूर नाका येथे गस्त घालण्यात येत होती. धरणाकडे येणाऱ्या पर्यटकांनी पाण्याजवळ जाऊ नये, अशा सूचना देण्यात येत होत्या. जे पूल पाण्याखाली गेले होते त्याच्या शंभर ते दोनशे मीटर अंतरावरूनच लोकांनी तेथे जाऊ नये, असे सांगण्यात येत होते. नेहमीप्रमाणे नाशिककरांनी पूर पाहण्यासाटी गर्दी केली होती. त्यासाठी रामवाडी पुलाच्या अलीकडे व रविवार कारंजडावर गर्दी होऊ नये, यासाठी अशोकस्तंभावरच वाहतूक थांबवण्यात आली होती. या ठिकाणी बॅरिकेडस् लावण्यात आले होते. रविवार कारंजाजवळ वाहनधारकांनी जाऊ नये, अशा सूचना करण्यात येत होत्या. त्याचप्रमाणे बोहरपट्टी, चांदवडकर गल्ली, गाडगे महाराज पूल, रामसेतू पूल, रामकुंड, नासर्डी नदी काठचा परिसर अशा अनेक ठिकाणावर बंदोबस्त लावण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत आपत्ती व्यवस्थापनाबरोबरच पोलिसांचेदेखील मदतकार्य सुरू होते. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी सर्व कार्यक्रम रद्द करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यास मदत केली. आपत्ती व्यवस्थापनाबरोबरच पोलिस नियंत्रण कक्षातील फोन सातत्याने वाजत होते. त्यामुळे परस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांची भूमिका मोलाची ठरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकसाठी केंद्राकडून उड्डाणपूल मंजूर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

पंचवटी परिसरातील के. के. वाघ ते जत्रा हॉटेल दरम्यान उड्डाण पुल उभारण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तत्वतः मान्यता दिल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

के. के वाघ ते जत्रा हॉटेलपर्यंत २.३ किलोमीटर उड्डाणपुलासाठी पुल उभारण्यासाठी सुमारे २१२ कोटी लागणार आहेत. सविस्तर अहवाल बनविण्यासाठी सल्लागारांची नेमणूक केली जाईल. उड्डाणपुलाचा सविस्तर अहवाल आल्यानंतर कामास मान्यता मिळेल. सुमारे आठ महिने काम सुरू करायला लागतील. यासाठी प्रशासकीय अधिकारी राजीवसिंह, खोडसकर, साळुंके, झोडगे यांचे सहकार्य लाभले.

नाशिक उड्डाणपूल तयार होऊनही द्वारका सर्कल, इंदिरानगर, लेखानगर, के. के. वाघ कॉलेज, अमृतधाम क्रॉसिंग, जत्रा हॉटेल क्रॉसिंग आदी मुख्य ठिकाणी रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. के. के. कॉलेजसमोर अनेक विद्यार्थी जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडतात. अमृतधाम क्रॉसिंगलाही नाशिक शहरातंर्गत ३० मीटर रिंगरोड क्रॉस होतो. जत्रा क्रॉसिंगला बाह्य मार्गावरील नाशिक शहराचा ६० मीटरचा रिंगरोड क्रॉस होतो. त्यामुळे अनेकदा अपघात होतात. या त्रुटी महामार्गाच्या आराखड्यात राहिल्याचे खासदार गोडसे यांनी विभागीय अभियंता राजीवसिंह, प्रकल्प अधिकारी खोडसकर आदींसोबत पाहणी करून निदर्शनास आणून दिले. अनेक क्रॉसिंगवर किती अपघात झाले व त्यामध्ये किती नागरिकांचे मृत्यू झाले हे आडगाव व पंचवटी पोलिसांच्या लेखी पुराव्यासह दाखविले. कार्यकारी समितीच्या नुकत्याच झालेल्या २८५ व्या बैठकीमध्ये ३१ कोटी ३५ लाख मंजूर झाले. एन्ट्री व ईस्ट रॅम्पसाठी काही ठिकाणी सबवे, हायमास्क या कामासाठी मान्यता देण्यात आली. पहिल्या टप्प्यातील कामे ऑक्टोबरनंतर सुरू होतील.

उड्डाणपुलाव्यतिरिक्त मंजूर अन्य कामे लेखानगर उड्डाणपुलाच्या प्रथम गाळ्यामध्ये यू-टर्न करणे इंदिरानगर बोगद्याच्या चारही दिशांना ठराविक अंतरापर्यंत सर्व्हिसरोड व मुख्य रस्त्यामध्ये विभाजक व रेलिंग काढणे गॅब्रिएल कंपनीजवळ धुळे वाहतुकीसाठी प्रवेश मार्गिका हॉटेल सेव्हन हेवन येथे मुंबई वाहतुकीसाठी प्रवेश मार्गिका धुळे-द्वारकाकडून येणाऱ्या आणि मुंबईला जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्प्लेन्डर हॉल येथे मार्गिका पुण्याहून येणाऱ्या व मुंबईला जाणाऱ्या वाहतुकीसाठी हुनमानमंदिर व पादचारी मार्गाचे निकास ठराविक अंतरावर स्थलांतरीत करणे धुळे-द्वारकासाठी जाणाऱ्या वाहतुकीसाठी प्रवेश मार्गिका स्टेट बँक आणि पंचवटी कॉलेज येथे पादचाऱ्यांसाठी भूयारी मार्ग मोहाडी फाटा येथे उड्डाणपूल करणे कोकणगाव फाटा व दहावा मैल येथे हायमास्ट लावणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाकाठी गाळाचे साम्राज्य

0
0



सातपूर : मुसळधार पावसाने नाशिकला धुवून काढल्यानंतर आता रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नदी लगतच्या भागात गाळ पसरला आहे. पाणी ओसरल्यानंतर प्रशासनाकडून दिवसभर गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले.

आनंदवल्लीत नवश्या गणपती मंदिराशेजारील रस्त्याला भगदाड पडले. मंदिर परिसरात पाणी साचले. रस्त्याला भगदाड पडल्याने वीज पोलांचेदेखील नुकसान झाले आहे. महापालिकेने गणपती मंदिराला संरक्षक भिंतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू जाधव यांनी केली आहे.

सिटी सेंटर मॉल बंद नंदिनी नदीला आलेल्या पुरामुळे सिटी सेंटर मॉलच्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. तसेच मॉलचा सिग्नल पाण्यामुळे बंद पडला. त्यामुळे बुधवारी सिटी सेंटर मॉल बंद ठेवण्यात आला. अनेक तरुण-तरुणी मालबाहेर येऊन थांबले होते. मात्र, मॉल बंद असल्याचे सांगत सुरक्षारक्षकांनी त्यांना माघारी पाठविले.

वन विभागाची नर्सरी गायब वन विभागाची नर्सरी गोदावरीच्या पुरामुळे गायब झाली. नर्सरीतील रोपे वाहून गेली. तसेच तेथे गाळाचे साम्राज्य पसरले. नर्सरीची अवस्था वाईट झाली असतांना वन विभागाचे एकही कर्मचारी रोपे उचलण्यासाठी किंवा स्वच्छतेसाठी आला नाही. दरम्यान, नंदिनी नदीकाठी असलेल्या अमरधामध्ये गाळ पसरला. महापालिकेच्या वतीने अमरधाममधून गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच नदीला आलेल्या पुरामुळे अमरधामला गाळाने वेढल्याचे जाणकारांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडचे माजी नगराध्यक्ष छाजेड यांची आत्महत्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून नांदगाव तालुक्यात प्रसिद्ध असलेले मनमाडचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ छाजेड (वय ५२) यांचा मृतदेह बुधवारी सकाळी श्रावस्तीनगर परिसरातील विहिरीत आढळून आला. राजाभाऊ छाजेड हे गेल्या काही महिन्यांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त होते. या आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

छाजेड यांच्या निधनाचे वृत्त शहर व परिसरात समजताच शिवसेनेसह सर्वपक्षीय नेत्यांनी छाजेड यांच्या निवासस्थानी धाव घेतली. काही कार्यकर्त्यांना अक्षरशः रडू कोसळले. ही वार्ता पसरताच मनमाडकरांनी छाजेड यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. छाजेड हे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जात. शिवसेना शहरप्रमुख, नगरसेवक, नगराध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली. शिवसेनेच्या सभेत त्यांच्या घणाघाती भाषणाची नेहमी उत्सुकता असे.

शव विच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी छाजेड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. नोव्हेंबरमध्ये होणारी थेट नगराध्यक्ष निवडणूक लढविण्याची त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी निकटवर्तीयांना बोलून दाखवले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तहसील कर्मचाऱ्याची कार्यालयात आत्महत्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

तहसीलदार कार्यालयातील शिपाई एकनाथ हिरकण गांगुर्डे (वय ५५) यांनी पहाटेच्या सुमारास तहसीलदार कार्यालयातच आत्महत्या केली. बुधवारी रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

गेल्या तीन महिन्यांपासून रजेवर असलेले एकनाथ गांगुर्डे (रा. रवळजी) हे २ ऑगस्ट रोजी तहसीलदार कार्यालयात रजेवर असतांनाही आले होते. प्रकृती अस्वस्थ असल्याने रजेवर असल्याने घरी जाऊन आराम करा, अशी सूचना कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गांगुर्डे यांना केली होती. शिवाय जवळचे नातेवाईक घरी घेऊन जाण्यासाठी तहसीलदार कार्यालयात आले होते. मात्र गांगुर्डे यांनी त्यांच्याबरोबर जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. पाऊस सुरू असल्याने त्यांनी घरी न जाता तहसील कार्यालयात नियंत्रण कक्षेत मुक्काम केला.

तालुक्यात सध्या आपत्कालीन परिस्थिती असल्याने आपत्ती नियंत्रण कक्षेत अन्य कर्मचारी समवेत गांगुर्डे मुक्कामी होते. बुधवारी पहाटे नियंत्रण कक्षातून चार ते पाच वाजेदरम्यान तहसीलदार यांच्या कक्षेत प्रवेश करून आतील दरवाजे बंद करून गांगुर्डे यांनी टेलिफोन वायरने खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. दीर्घ आजारामुळे नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओसरला पूर; जागल्या स्मृती

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

विक्रम तयार करावे लागेत नाहीत, ते काळाच्या ओघात होतच असतात. मोडले जातात, पुन्हा नवे विक्रम प्रस्थापित होतात. याची प्रचिती नाशिक परिसरातील नागरिकांना मंगळवारच्या महापुराने आली. नाशिकला गाडगे महाराज पूल प्रथमच पूर्ण बुडाला तसाच जेलरोडचा संत जनार्दन स्वामी पूलही पाण्याखाली गेल्याने नवा विक्रम नोंदला गेला. असा पूर आतापर्यंत कधी पाहिलाच नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठांनी व्यक्त केली.

नाशिकरोडच्या गोदावरी, वालदेवी, दारणा आणि नंदिनी या नद्यांनी प्रथमच धोक्याची पातळी ओलांडली. यापूर्वी २००८ मध्ये पूर आला होता तेव्हा जेलरोडच्या पुलाच्या खांबाला पाणी लागले होते. यंदा नवीन बांधलेला पूलही पाण्याखाली गेला. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी बॅरिकेड लावून पूल दोन्ही बाजूंनी बंद केला. त्यामुळे तीन महामार्गांची वाहतूक प्रथमच बंद झाली. बुधवारी सकाळी पुलावर आलेला कचरा महापालिकेने युद्धपातळीवर साफ केल्याने वाहतूक सुरू झाली.

लक्षवेधी मदतकार्य पुराची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन नाशिकरोडच्या १२ प्रभागात महापालिकेचे साडेतीनश कर्मचारी विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, विभागीय उपअभियंता मईद, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धपातळीवर २४ तास कार्यरत होते. आपत्ती व्यवस्तापन कक्ष सतर्क होता. अग्निशमन दलाने एस. टी. बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली एस. बी. निकम, एस. पी. मेधने, व्ही. बी. बागूल, संजय पगार, आर. बी. आहेर, एस. के. आडके, एस. के. साळवे आदींनी युद्धपातळीवर मदतकार्य केले. पोतदार हायस्कूलच्या मैदानात पाणी साचल्याने तेथील घरात अडकलेल्या कुटुंबाची सुटका अग्नीशमन दलाने केली. ब्रम्हगिरी सोसायटी, आरंभ कॉलेजजवळ पडलेली झाडे हटवली.

पाणीही विक्रमी नाशिकरोडला बिटको हॉस्पिटल व बुद्धविहारच्या तळघरात प्रथमच प्रचंड पाणी साचले. बिटको चौक, देवी चौक, शिवाजी पुतळा, आंबेडकर चौक, सुभाषरोडला रस्त्यावर प्रथमच पूरस्थिती होती. अनेक गाड्यांचे नुकसान झाले. नवले चाळ, गवळीवाड्यातील अनेक घरे पाण्यात बुडाली. देवळाली कब्रस्थानला पुराचा वेढा असल्याने अहिल्या माता पथवरील अनेक घरात प्रथमच पाणी घुसले. एकलहरा रोड ७० घरांमध्ये पाणी गेले. जयभवानीरोड परिसर जलमय झाला होता.

आरोग्य टीम सतर्क आरोग्य विभाग विभागीय निरीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले (दसक), राजू निरभवणे, प्रभाकर थोरात (देवळालीगाव), बबूल ढकोलिया (चेहेडी), विजय जाधव (विहीतगाव) आदींनी स्वच्छता मोहीम राबवली. उपनगरहून येणारे पाणी देवीचौकात साचल्याने आरोग्य विभागाने चेंबर उघडे करून दिले. प्लास्टिक अडकले होते ते काढले. सकाळी शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा भागातील एक टन कचरा या विभागाने उचलला. पाऊस व पूर ओसरल्यानंतर खरे आव्हान या विभागापुढे राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटीबसच्या १२६३ फेऱ्या रद्द

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अतिवृष्टीमुळे मंगळवारी शहरातील सिटी बससेवा कोलमडल्यामुळे एसटी महामंडळाला १२६३ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे एसटीचे ५ लाख ३७ हजार रुपयाचे उत्पन्न बुडाले. बुधवारी शहरातील सिटीबसची वहातूक सुरळीत झाली असली तरी शाळांना सुट्या असल्यामुळे अनेक बसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या. त्यामुळे एसटीला पावसाचा दुहेरी फटका बसला.

गेले तीन दिवस सुरू असलेल्या पावसानंतर मंगळवारी पावसाने जोर पकडल्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत सर्व पुलावरील वाहतूक बंद केली. त्यामुळे अनेक बस अर्ध्यावर खोळंबल्या. मंगळवारी मुसळधार पावसामुळे कामानिमित्त जाणाऱ्यांची गर्दी कमी असतांनाही बसची संख्या कमी झाल्यामुळे या बस फुल्ल होत्या. तर बुधवारी बसेसची संख्या जास्त असूनही शाळांना सुट्टी असल्यामुळे प्रवाशी कमी होते. त्यामुळे सिटी बसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या त्यात एसटी किती उत्पन्न बुडाले याचा आकडा अद्याप आला नाही. सायंकाळपर्यंत सर्व ठिकाणाहून याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू होते.

अतिवृष्टीमुळे शहरातील गोदाकाठबरोबरच इतर पुलांवरून वाहन पोलिस प्रशासनाने बंद केली. त्यानंतर एसटीची संपूर्ण वाहतूकच कोलमडली. ज्या बस रस्त्यावर धावत होत्या त्यांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागल्यामुळे एसटीचा प्रवास शहरातून तिप्पट वेळेचा झाला. पूर्व भागाकडून पश्चिम भागाकडे एसटी धावू शकल्या नाहीत. त्यामुळे जवळच्या डेपोतच त्या पार्क करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांची झाली दैना

0
0




म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुसळधार पावसाने शहरातील रस्त्यांची दैना उडवली आहे. रस्त्यांच्या दैनावस्थेचे चित्र पूर ओसरल्यानंतर समोर आले आहे. ठिकठिकाणी साचलेले पाणी व वाहून आलेला गाळ यामुळे रस्त्यांची अवस्था खराब झाली. शहरातील प्रमुख रस्त्यांची खड्ड्यामुळे चाळण झाली असून महापालिकेने खड्डे बुजण्यासह रस्ते मोकळे करण्यासाठी बुधवारी युद्धापातळीवर यंत्रणाला कामाला लावली. पुरामुळे रस्तेच नव्हे तर सोसायट्याही जलमय झाल्याने स्थिती पूर्ववत होण्यास दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे.

मंगळवारच्या पावसाने शहरातील रस्तेच नाल्यामंध्ये रुपांतरीत झाले. शहरातील संपूर्ण प्रमुख रस्ते व कॉलनी रस्त्यांवर दिवसभर पाणी साचल्याने सुमारे ५० टक्के रस्ते खराब झाले. विशेष म्हणजे यातून सिंहस्थात तयार केलेले नवे रस्तेही सुटू शकले नाहीत. अतिवृष्टीमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली. जागोजागी खड्डे पडल्याने नाशिककरांवर रस्ता शोधण्याची वेळ आली. कृषीनगर, महात्मानगर, कॉलेजरोड, सीबीएस, गंगापूररोड, द्वारका, नाशिकरोड, सिडको, सातपूर, पंचवटी या भागातील रस्ते पाण्यात गेल्याने त्यांची पूर्ण चाळण झाली. पूर ओसरल्यानंतर अनेक रस्त्यांवर पाण्यासोबत गाळ साचला. शहरातील प्रमुख रस्ते शेजारील सोसायट्यामंध्ये पाणी साचले. हेच पाणी नागरिकांनी रस्त्यावर टाकले.

बांधकाम विभागाचे शहरातील १६०१ किलोमीटरपैकी २५० किलोमीटरचे डांबरीकरण रस्ते लायबलिटीमध्ये आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरील खड्ड्यांची जबाबदारी संबंधित ठेकेदारांची आहे. तर सिंहस्थामध्ये शहरात १०७ किलोमीटरचे रस्ते झाले असून त्यांची लायबलिटीही ठेकेदारांची आहे. या रस्त्यांचे काम ठेकेदार करणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा भूमिका

0
0

महापुराच्या थैमानानंतर प्रशासनापुढे चिखल, गाळ व कचरा निर्मूलनाबरोबरच रोगराई नियंत्रणाचे आव्हान उभे ठाकले आहे. अद्यापही अनेक इमारतींची तळघरं, सखल भाग येथे पाणी तुंबलेले आहे. पाणी ओसरलेल्या भागात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दुर्गंधी, अस्वच्छता यामुळे रहिवासी भयभीत आहेत. डास, चिलटे यांचा उच्छाद सुरू झाला आहे. पुरात वाहून आलेला चिखल, पालापाचोळा, मृत प्राणी-पक्षी याची तातडीने विल्हेवाट लावली नाही तर ताप, डायरिया, मलेरिया, लेप्टोसारख्या साथीच्या आजारांची लागण होण्याची दाट शक्यता आहे. प्रशासन त्यांच्यापरीने कामाला लागले आहेच, पण आभाळातून पडणारा वरुणराजा अद्याप उसंत घेत नसल्याने नागरिकांनाही विनाविलंब या कामाला स्वतःहून जुंपून घ्यावे लागणार आहे. सोबतच विविध सामाजिक मंडळे, गणेश मंडळे यांनीही याकामी हातभार लावला तरच हा स्वच्छतेचा जगन्नाथाचा रथ ओढता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रजिस्ट्रेशन केलंत का?

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्रावण महिना सुरू झाला, की तरुणींमध्ये एक नवा विषय चर्चेला येतो तो म्हणजे 'मटा श्रावणक्वीन'. याची चाहूल लागताच श्रावणक्वीनच्या वेबसाइटवर मोठ्या संख्येने तरुणींनी आपले फोटो अपलोड करून रजिस्ट्रेशन केले आहे. मॉडेलिंग असो वा अभिनय या क्षेत्रांत नाशिकच्या तरुणींना या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले आहे.

'वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत' 'मटा श्रावणक्वीन'चा यंदाचा सिझन सुरू झाला असून, येत्या ११ ऑगस्ट रोजी एलिमिनेशन राऊंड होणार असून, सोमवारी (८ ऑगस्ट) नावनोंदणीची शेवटची तारीख आहे. त्यानंतर नाव नोंदवता येणार नाही. 'िऱ्हदम म्युझिक' या कार्यक्रमाचे म्युझिक पार्टनर आहेत.

माहितीसाठी येथे साधा संपर्क

फोन ः ०२५३-६६३७९८७
वेळ ः सकाळी ११ ते सायं. ५.

अशी आहे प्रक्रिया

ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी http://www.mtshravanqueen.com या वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. या वेबसाइटवर गेल्यानंतर 'Participate now' या पर्यायावर क्लिक केल्यावर रजिस्ट्रेशन फॉर्म भरता येणार आहे. या फॉर्ममध्ये तुमचे पूर्ण नाव, पत्ता, फोन नं., इ-मेल अॅड्रेस, तुमचे पॅशन काय?, उंची, वजन, हेअर कलर, आय कलर आदी तुमच्याविषयी माहिती नमूद करायची आहे. यामध्ये तुमचे पाच फोटोदेखील अपलोड करायचे आहेत.

व्होट फॉर हर

श्रावणक्वीनमध्ये यंदा वाचकांनाही सहभागी करून घेत येणार आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलेल्या तरुणींना वाचक व्होट करू शकता. यामध्ये ज्या तरुणींना सर्वाधिक व्होट मिळतील, त्यांची निवड एलिमिनेशन राऊंडसाठी होणार आहे.

नियम :

- रॅम्प वॉक केल्यानंतर स्पर्धकाला एका मिनिटात स्वतःची ओळख करून द्यावी लागेल.

- स्पर्धकाने स्वतःला येणाऱ्या कोणत्याही कलाकौशल्याचे सादरीकरण दोन मिनिटांत करावयाचे आहे. त्यानंतर परीक्षक स्पर्धकाला सामान्यज्ञानाशी संबंधित एखादा प्रश्न विचारतील.

- परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओझरहून तिसऱ्यांदा शेळ्यांची निर्यात

0
0

खराब हवामानाचा बसला फटका

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचा धुमाकूळ आणि ढगाळ हवामानाचा कार्गो विमानसेवेलाही फटका बसला. त्यामुळेच मंगळवारी (२ ऑगस्ट) शेळ्यांची निर्यात होऊ शकली नाही. अखेर बुधवारी दुपारी २ वाजता १४०९ शेळ्या-मेंढ्यांना घेऊन युक्रेनचे कार्गो विमान शारजाला रवाना झाले. आतापर्यंत जवळपास पाच हजार शेळ्या-मेंढ्यांची शारजाला रवानगी झाली आहे. येत्या सोमवारी (८ ऑगस्ट) पुन्हा निर्यात केली जाणार आहे.

हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) मालकीचे असलेल्या विमानतळावरून १५ जुलै रोजी कार्गो विमानाद्वारे प्रथमच शेळ्या-मेंढ्यांची निर्यात करण्यात आली. सुमारे १६४८ शेळ्या-मेंढ्या अवघ्या तीन तासात शारजा येथे पोहचविण्यात आल्या. त्यानंतर २६ जुलै रोजी १६७८ शेळ्यांची निर्यात करण्यात आली. तिसरी निर्यातही २९ जुलै रोजी करण्याचे निश्चित होते. मात्र, तांत्रिक अडचणी आल्याने ही निर्यात होऊ शकली नाही. हॅलकॉन या कार्गो सेवा कंपनीद्वारे आणि कार्गो सानप अॅग्रो अॅनिमल्स प्रायव्हेट लिमिटेड व अमिगो लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रयत्नातून ही निर्यात केली जात आहे. अखेर मंगळवारी (२ ऑगस्ट) दुपारी ही निर्यात करण्याचे नियोजन करण्यात आले. पण, शहर परिसरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे ओझर एचएएलच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल रुमने (एटीसी) कार्गो विमान उतरविण्यास परवानगी देण्यास नकार दिला. मात्र, युक्रेनचे कार्गो विमान शारजाहहून निघाले होते आणि ते कराचीपर्यंतही आले होते. त्यानंतर हे विमान तेथूनच पुन्हा शारजाला रवाना झाले. मात्र, ओझर कार्गो कॉम्प्लेक्सच्या ठिकाणी जवळपास दोन हजार शेळ्या गेल्या काही दिवसांपासून आणण्यात आल्या होत्या. सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने या शेळ्यांना मोठा फटका बसला. काही शेळ्या दगावल्या तर काहींना तातडीने मुंबई येथे विक्रीसाठी नेण्यात आले.

हवामान विभागाने ४८ तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्याने कार्गो सेवेबाबत अनिश्चिता होती. अखेर बुधवारी सकाळी एटीसीने परवानगी दिल्याने सकाळी आठच्या सुमारास कार्गो विमान ओझर विमानतळावर आले. दुपारी दोन वाजेच्या सुमारास विमानाने शारजाकडे उड्डाण केले. यावेळी १२४ मेंढ्या आणि १२८५ शेळ्या अशा एकूण १४०९ शेळ्या-मेंढ्यांचीच निर्यात होऊ शकली. दरम्यान, शारजा येथील कडक नियम आणि विशिष्ट पद्धतीच्या शेळ्यांचीच मागणी असल्याने गेल्या दोन वेळच्या निर्यातीच्या तुलनेत यंदा २०० शेळ्या कमी जाऊ शकल्या आहेत. बुधवारच्या या निर्यातीवेळी हॅलकॉनचे सीईओ सुधाकर सेन, सानप प्रा. लि.चे संचालक जयंत सानप, शिवाजी सानप, अमिगो लॉजिस्टिकचे एमडी साजिद खान, सोव्हिका लॉजिस्टिकचे असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट एन एस हंस आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकच्या सिव्हिलमध्ये गोंधळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

प्रसूतीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) दाखल करण्यात आलेल्या एका २२ वर्षीय महिलेचा प्रसूतीपूर्वीच मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाइकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत गोंधळ घातला. एकाने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील काचेच्या दरवाजा फोडला. यामुळे गोंधळात आणखी भर पडली.

जुन्या नाशिकच्या हेलबाऊडी मशिदीच्या मागील बाजूस राहणारी नगमा कादीर खान (वय २२) हिला प्रसूतीकळा येत असल्याने बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिवसभर कोणीही लक्ष दिले नाही. रात्री आठच्या सुमारास तिचा रक्तदाब वाढल्याने प्रकृती बिघडली. त्यामुळे अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. मात्र त्यानंतर तिचा मृत्यू झाला. यावरून नगमाच्या नातेवाइकांनी रुग्णालयावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत गोंधळ घातला. पायी रुग्णालयात आलेली नगमाचा अवघ्या काही तासांतच मृत्यू कसा होतो, असा प्रश्न उपस्थित करीत नातेवाइकांनी डॉक्टरविरुद्ध सरकारवाडा पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

रुग्णालयाच्या परिसरातील गोंधळ प्रकरणी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एसीपी, डीसीपीसह पीआय यांनी नातेवाइकांची समजूत काढत वातावरण शांत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरेंच्या नवनिर्माणावर फेरले पाणी

0
0

ठाकरेंकडून गोदावरी पुराची पाहणी; गोदापार्क पाहून उद्विग्न

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मंगळवारच्या महापुराने उद्‍ध्वस्त झालेल्या गोदाकाठ परिसराची मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी पाहणी केली. तसेच स्थलातंर केलेल्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. गोदाकाठसह मुंबई नाका परिसरात जाऊन पाणी साचलेल्या भागाचीही त्यांनी पाहणी केली. महापुरामुळे उद्‍ध्वस्त झालेल्या गोदापार्कला भेट देत आपल्या स्वप्नांचा झालेला चक्काचूर पाहून ठाकरे निराश झाले. नवनिर्माणची ही अवस्था बघून ते चांगलेच व्यथित झाले.

महापुरानंतर मंगळवारी राज ठाकरे यांनी दुपारी नाशिकला भेट दिली. विश्रामगृहावर आयुक्त अभिषेक कृष्णा, महापौर अशोक मुर्तडक, स्थायी समिती सभापती सलिम शेख यांच्याकडून त्यांनी शहराच्या स्थितीची माहिती जाणून घेतली. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अंभ्यकर उपस्थित होते. अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरेंनी व्हिक्टोरीया ब्रीज गाठला. या पुलावरून त्यांनी गोदेच्या पुराची पाहणी केली. त्यानंतर ठाकरेंनी रामकुंडावर जाऊन परिस्थिती पाहिली. त्यानंतर गाडगे महाराज पुलावर जाऊन तेथे पुरामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबीयांची ठाकरेंनी भेट घेतली. स्थलातंरीतांशी चर्चा करून त्यांना मदतीचे आश्वासन दिले. त्यानंतर ठाकरेंनी पंचवटीतल्या अमरधाम येथील पुलावर जाऊन परिस्थिती पाहिली. काझी गढीच्या कोसळलेल्या भागाची ठाकरेंनी दुरूनच पाहणी केली. त्यानंतर ठाकरेंनी मुंबई नाका परिसराची पाहणी केली. या भागात सोसायट्यामंध्ये घरांचे पाणी घुसले. काही बंगल्यामध्येच पाणी शिरले होते. त्यामुळे सकाळपासूनच या नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले होते. या ठिकाणी जाऊन ठाकरेंनी नागरिकांची भेट घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

नाशिकच्या नवनिर्माणची खून असलेल्या गोदापार्कची दैनावस्था झाली आहे. त्यामुळे ठाकरेंनी दौऱ्यात शेवटी गोदापार्ककडे धाव घेत पाहणी केली. पुरामुळे गोदापार्क पूर्ण उद्‍ध्वस्त झाला आहे. गोदापार्कची अवस्था बघून ठाकरेही अस्वस्थ झाले. त्यामुळे ठाकरे यांनी या ठिकाणी महापौर व आयुक्तांसोबत एकातांत चर्चा केली. पुरामुळे स्थलातंरीत झालेल्या कुटुंबीयांना योग्य ती मदत देण्यासह शहरातील सर्व रस्ते मोकळे करण्याचे आदेश ठाकरेंनी अधिकाऱ्यांना दिले.

अन् ठाकरे झाले निराश

गोदापार्क हे राज ठाकरेंचे स्वप्न होते. रिलायन्स फाउंडेशनच्या मदतीने साडेतीन किलोमीटरचा गोदापार्क तयार करण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात अर्धा किलोमीटर काम पूर्णत्वास आले असतानाच महापुराने संपूर्ण गोदापार्कचीच वाट लावली. पुरात लॉन्स, लाईट, स्टाईल्स सर्वच वाहून गेले. पावसाळ्यापूर्वी गोदावरीच्या सौंदर्यसृष्टीत भर घालणारे गोदापार्क मंगळवारच्या पुराने सौंदर्यहीन झाले होते. त्यामुळे ठाकरे गोदापार्कच्या झालेल्या हानीने चांगलेच उद्विग्न झाले. नाशिककरांना दाखवलेल्या स्वप्नावरच पाणी फिरल्याने ठाकरेंनी अपसेट होऊन विश्रामगृह गाठले. त्यानंतर पत्रकारांशीही संवाद टाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोडला नाही कणा!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीचा महापूर ओसरल्यानंतर गोदाकाठासह उपनगरांचा भाग अद्यापही पूर्वपदावर आलेला नाही. गोदाकाठावरील वस्त्यांमध्ये कचरा व घाणीच्या साम्राज्यामुळे बेघर असलेल्या नागरिकांना आता रोगराईचा सामना करावा लागत आहे. रस्ते अजूनही चिखलाने माखले असतांना महापालिकेची यंत्रणा मात्र ढिम्म आहे. गोदाकाठावर उत्पन्न झालेल्या स्थितीवर जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पंचनामा करण्यासाठी १० पथके तयार करण्यात आले असून शुक्रवारपासून (दि.५) पंचनामे सुरू होणार आहेत.

गोदावरीला आलेल्या महापुराने नदीकाठाचे मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठावरील अनेक भागांमध्ये घुसलेले पाणी ओसरले असून पुरामुळे स्थलातंरित झालेले नागरिक आपल्या निवासस्थानी परतत आहेत. परंतु, पुरामुळे झालेल्या विद्रुपीकरणामुळे त्यांना पुन्हा स्थलांतरीक कॅम्पमध्ये परतण्याची वेळ आली आहे. नदीकाठावर झालेले विद्रुपीकरण दुसऱ्या दिवसही कायम आहे. नदीकाठावरील सर्व रस्ते अजूनही चिखलाने माखले असल्याने गोदाकाठ पूर्वपदावर येण्यासाठी अजूनही चार ते पाच दिवस लागण्याची शक्यता आहे.

रामकुंड, काळाराम मंदिराचा परिसर अमरधाम, गाडगेमहाराज पूल, गणेशवाडी, सराफ बाजारात साचलेल्या पाणी आणि गाळामुळे आता या भागात रोगराईचे संकट उभे राहिले आहे. आरोग्य विभागाकडून मदतकार्य राबविले जात असले तरी यंत्रणा अपुरी पडत आहे. रस्त्यांच्या साफसफाईसाठी महापालिकेने जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर उतरवले आहे. परंतु, हानीच मोठी असल्याने काम संथगतीने सुरू आहे. दुसरीकडे नागरिकांच्या मदतीला नगरसेवक व सामाजिक संस्था धावून आल्या आहेत. विविध संस्थाकडून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कॅम्प लावून तपासणी केली जात आहे. तर आवश्यक ते औषधोपचारही केला जात आहेत. उपमहापौर गुरुमीत बग्गा, नगरसेविका विमल पाटील यांनी पंचवटीत आरोग्य शिबिर घेऊन नागरिकांना मदत केली. तर आरटीओ विभाग, मराठा कट्टा, बिल्डर्स असोसिएशन, बाप्पा सिताराम ग्रुप, नाशिकरोड गुरूद्वारा ग्रुप, लायन्स क्लब या संस्थानी गुरुवारी नागरिकांना मदतीचा हात दिला.

११४ ठिकाणचा गाळ उचलला महापालिका बांधकाम विभागाने दोन दिवसात शहरातील २६ जेसीबी, ३२ ट्रॅक्टर, तीन स्क्रॅपर, १२ डंपर जुंपत शहरातील रस्ते मोकळे करण्यासह माती उचलण्याची मोहीम उघडली. गाळ हटविण्यासह रस्ते मोकळे करण्यासाठी २६८ मजूर राबत आहेत. ११४ ठिकाणची माती उचलण्यासह हे रस्ते मोकळे करण्यात आल्याचा दावा बांधकाम विभागाने केला आहे. शहरातील ८५ ठिकाणी साचलेले होते. जेसीबीच्या सहाय्याने या ठिकाणच्या पाण्याला वाट करून देण्यात येत आहे.

४९४ मेट्रिक टन कचरा संकलन पुरामुळे गोदावरीच्या उपनद्यासंह शहरातील अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. हा कचरा उचलण्यासाठी आरोग्य विभागाने यंत्रण लावली असली तरी काम संथ गतीने सुरू आहे. गुरुवारी शहरातून केवळ ४९४ मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला. त्यात नदीकाठावर वाहून आलेल्या कचऱ्याचाही समावेश आहे. अतिरिक्त घंटागाडीच्या मदतीने कचरा उचलला जात असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

खासगी हॉस्पिटल्सचा पुढाकार शहरातील प्रति‌ष्ठित ११ मोठ्या हॉस्पिटल्सने महापालिकेला मदत देण्याची तयारी दाखवली आहे. या हॉस्पिटल्सची ११ पथके शुक्रवारपासून (दि. ५) नदीकाठावरील कॅम्पमध्ये जाऊन नागरिकांची फिरत्या दवाखान्यांच्या मदतीने आरोग्य तपासणी करणार आहेत. एमव्हीपी, सिक्स सिगमा, सार्थक, साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट, वोक्हार्ट, शताब्दी, लाईफ केअर, सुजाता बिर्ला, अपोलो, ऋषिकेश हॉस्पिटल आदींनी प्रत्येकी एक अॅम्ब्युल्नस, दोन डॉक्टर व औषधी देण्याची तयारी दर्शवली आहे.

गोदाकाठवर सर्वप्रथम नागरिकांना पूर्वपदावर आणण्यास प्राधान्य दिले जात आहे. महापालिका व विविध संस्थाच्या मदतीने नागरिकांसाठी मदतकार्य राबविले जात आहे. सामाजिक संस्थानी मदतीसाठी पुढे यावे. - गुरुमित बग्गा, उपमहापौर, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. गेडाम यांच्या विरोधात याचिका

0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जनरल मुखत्यारधारकास परस्पर टीडीआर न देण्याच्या तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या निर्णयाला माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी हायकोर्टात आव्हान दिले आहे. मुद्रांक शुल्काचाच टीडीआर हस्तांतराचा आदेश असतांनाही, डॉ. गेडाम यांनी परस्पर बंदी

लादल्याचा आरोप दातीर यांनी केला असून, हा आदेश बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे.

जमिनीची खरेदी करण्याऐवजी मुद्रांक अधिनियम कायद्याचे नियमानुसार मुंद्राक व शुल्क भरून तसेच जमीन मालकास योग्य तो मोबदला अदा करून तपशील दस्तावेजात दाखल करून रितसर होणाऱ्या जनरल मुखत्यारपत्र तयार केले जाते. परंतु, तत्कालीन आयुक्त डॉ. गेडाम यांनी नियमानुसार असणाऱ्या जनरल मुखत्यार पत्रालाच आव्हान देत, टीडीआर हस्तांतरणास विरोध केला होता. सर्व कार्यालयामध्ये जनरल मुखत्यारपत्र धारकाचे अधिकार कायम आहेत. त्यासंदर्भात नोंदणी महानिरीक्षकाचे पत्रही आहे. तरीही डॉ. गेडाम यांनी जनरल मुखत्यारधारकास परस्पर टीडीआर देण्याच्या कायदेशीर अधिकाराला परस्पर ब्रेक लावला. असे व्यवहार करण्यावर बंदी घातल्याने शेतकऱ्यांसह

बिल्डरांचे नुकसान झाले आहे. शासनाचा बंदी आदेश नसतांनाही, त्यांनी परस्पर तोंडी आदेश देवून व्यवहाराची कोंडी केली. विधी विभागही त्यांच्याच तालावर नाचत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंपिंग स्टेशन पाण्यात; पाणीपुरवठा ठप्प

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर शहर व तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी होऊनही भर पावसाळ्यात सिन्नरकरांना पाण्याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. सततच्या पावसामुळे दारणा नदीला आलेल्या पुरामुळे चेहडी येथील पंपिंग स्टेशन पाण्यात गेले. त्यामुळे पाणी उपसणे बंद झाल्याने सिन्नर शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.

सिन्नरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी रविवारी, (दि. ३१ जुलै) पुन्हा फुटल्याने पाणी उचलणे बंद झाले होते. त्यानंतर सोमवारी, (दि. १) पाऊस सुरु असल्याने जलवाहिनी रेपेरिंगचे काम थंडावले. त्यानंतर चेहडी येथील पंपिंग स्टेशनच पाण्याखाली गेले. या सर्व परिस्थितीत गेल्या पंधरा दिवसापासून सिन्नर शहरास भीषण कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

शहरास पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी स्वीकृत नगरसेवक हर्षद देशमुख, नगरसेवक बापी गोजरे, अभियंता सुनील पाटील यांचेसह नगरपालिका कर्मचारी प्रयत्न करीत असून लवकरच सिन्नरचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images