Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अनधिकृत बांधकामांमुळेच पूरस्थिती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीसह संपूर्ण राज्यातील पूरपरस्थितीला अनधिकृत बांधकामेच जबाबदार आहेत. तरीही राज्यसरकार अनधिकृत बांधकामांना अधिकृत करण्यासारखे मूर्खपणाचे निर्णय घेत असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. नाले बुजवले गेल्यानेच ही आपत्ती आल्याचे सांगून सर्वच शहरांची ती समस्या बनल्याचे ठाकरेंनी यावेळी सांग‌ितले. गोदावरीला आलेल्या पुरासंदर्भात प्रशासनाशी चर्चा केली असून, आवश्यक ती मदत करण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी यावेळी सांग‌ितले. तसेच महापुरानंतर महापालिका प्रशासनाचे काम उत्तम चालू असल्याचे प्रशस्तीपत्रकही त्यांनी दिले. घनकचरा व डेब्रसि शहरातून पूर्णपणे बाहेर काढण्याची सूचना प्रशासनाला दिल्याचे त्यांनी यावेळी सांग‌ितले. गोदावरीला आलेल्या महापुराच्या स्थितीची बुधवारी पाहणी केल्यानंतर राज ठाकरे यांनी गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधला. अनेक वर्षांनंतर अशी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे झालेले नुकसान पाहून वाईट वाटले. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवश्यक ती मदत दिली जात आहे. महापौर व आयुक्तांसोबतच महापुरासंदर्भात चर्चा केली असून, आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. शहरात अनधिकृत बांधकामांवर सर्वाधिक हातोडा मारला गेला. परंतु, तरीही नाल्यांवर बांधकाम झाले. नदीकाठावरही अतिक्रमण होऊन ही बांधकामे सरसकट अधिकृत केली जात आहेत. त्यामुळे अशा अनधिकृत बांधकामांमुळे आज पूरस्थिती ओढावली आहे. परंतु यातून सरकार काही शिकण्याऐवजी अशी बांधकामे सरसकट अधिकृत करून मूर्खपणाचे निर्णय घेत आहे. शहरातील नाले व नदीवरील अतिक्रम‌ित बांधकामांसह घनकचरा व बांधकामाचे डेब्र‌िसही पुराच्या घटनेला जबाबदार आहे. घनकचरा पूर्णपणे उचलण्यासह डेब्र‌िसचे स्वतंत्र टेंडर काढून काम देण्याच्या सूचना आपण केल्याचे ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. असे केले नाही तर अशीच परिस्थिती कायम राहील, असेही ते म्हणाले.
हा आनंदाचा विषय नाही गोदापार्कच्या दुरवस्थेवर माध्यमांनी टीका केल्याने ठाकरे चांगलेच संतापले होते. गोदापार्कची दुरवस्था होणे हा आनंदाचा विषय नाही, असे सांगून येथे माझी नव्हे, तर नाशिककरांची मुलेच खेळायला येणार होती, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली. महापुराने नुकसानच होते असे सांगून त्यांनी महापूर येणार म्हणून अजून किती वरती बांधकाम करायचे, असा उलट सवाल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मृतांचा आकडा दहावर

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मंगळवारच्या अतिवृष्टीमध्ये मृत पावलेल्यांची संख्या आता दहावर गेली आहे. तर, एकूण ७७ घरांचे नुकसान झाले आहे. पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात एकूण ९४० कुटुंबांमधील ३१६७ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आठ धरणांमधून अजूनही विसर्ग सुरुच असून नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात मंगळवारी झालेला मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेला पूर यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी दिवसभरात आठ जणांचा बळी गेला होता. तर, आणखी दोन जण बुधवारी मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे बळींचा आकडा दहावर गेला आहे. २ व्यक्ती जखमी असून एकूण २० जनावरे ठार झाली आहेत. एकूण २८०० कोंबड्या मृत पावल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ७७ घरांचे नुकसान झाले आहे. तर, पावसाच्या पुरामुळे एकूण ९४० कुटुंबे स्थलांतरीत करण्यात आली आहेत. त्यात ३१६७ व्यक्तींचा समावेश आहे.

जिल्ह्यातील विविध धरणांमधून गुरुवारीही पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गुरुवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास भोजापूर धरणातून ९९२, गंगापूरमधून ३०२४, कश्यपीमधून ४१८, आळंदीमधून १२६३, कडवामधून ३७४४, नांदूरमध्यमेश्वरमधून ६१८५७, चणकापूरमधून २१६, हरणबारीमधून २५८८, केळझरमधून ५९०, ठेंगोडा येथून ६९६८, पालखेडमधून ७५०८, करंजवणमधून ३५००, वाघाडमधून २८६५, पुणेगावमधून १२०७, दारणातून १५८३४, भावलीतून ४८१, वालदेवीतून १३०५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.

तातडीने पंचनामे करा

पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱयांनीही महसूल यंत्रणेला स्पष्ट निर्देश दिले असून,

शुक्रवार सकाळपासून पंचनामे करण्याचे काम सुरु होणार आहे. पंचनाम्यांचा एकत्रित अहवाल तयार करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी आरक्षणाला धक्का लावू नका

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जायकवाडीला पाणी सोडण्यासंदर्भात हायकोर्टाने दिलेल्या आदेशावर शिवसेनेने आक्षेप घेतला असून, महापालिकेने आपल्या पाणी आरक्षणाला धक्का लावू नये. यासाठी महापा‌लिकेने हायकोर्टात बाजू मांडावी, अशी मागणी महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केली आहे. महापालिकेने ९ ऑगस्टच्या हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी होवून आपला हक्क सांगावा, अशी मागणी त्यांनी महापौरांकडे केली आहे. दरम्यान, शहरात होणारी पाणीकपात थांबवून दोनवेळ पूर्णवेळ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जायकवाडीला पाणी सोडण्यासंदर्भात हायकोर्टाने आदेश दिला असून, पैठण जलायशयात येणारे पाणी अडवू नका, असे आदेश दिला आहे. तसेच पाणी सोडण्यांसदर्भातील माह‌िती ९ ऑगस्टला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मराठावाड्यानंतर आता नाशिकचेही लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत. शिवसेनेने या वादात उडी घेत, हायकोर्टात महापालिकेने पार्टी होवून आपली बाजू मांडावी, अशी मागणी केली आहे. महापालिकेच्या आरक्षणाला धक्का न लावता, हायकोर्टाने काय तो निर्णय घ्यावा. परंतु पालिकेचे आरक्षित पाणी त्यातून वगळावे, अशी मागणी महापालिकेने कोर्टात करावी अशी मागणी शिवसेनेचे अजय बोरस्ते यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा मराठवाडा विरुद्ध नाशिक असा संघर्ष सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२००८च्या ‌शिध्याचे पैसे अद्याप थकीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीसह अन्य नद्यांना पूर आल्यामुळे पूरग्रस्तांना शिधावाटपाची कोणतेही आदेश शासनाने न दिल्यामुळे पूरग्रस्तांसाठी सामाजिक संस्था धावून आल्या आहेत. दरम्यान २००८ साली झालेल्या पुरानंतर मोठ्या प्रमाणात शासनातर्फे शिधा वाटप करण्यात आला होता. पण त्याचे पैसेही रेशन दुकानदारांना शासनाने दिले नसल्याचेही समोर आले आहे. नाशिक जिल्हयात अतिवृष्टी झाल्यामुळे ७७ घरांचे नुकसान झाले आहे, तर ३१६७ जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त झालेल्यांना मदत अपेक्ष‌ित होती. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले, तरी स्थलांतरीत असलेल्या पूरग्रस्तांना मात्र कोणताही शिधा उपलब्ध करुन देण्यात आला नाही. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून जर शिधा दिला, तर रेशन दुकानदारांनी संपकाळातही शिधा वाटप करू असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सांगितले होते. पण शासनाचे कोणतेही आदेश नसल्यामुळे हा शिधा वाटप करण्यात आला नाही. पूरग्रस्तांना धान्य, साखरेसह इतर वस्तू गेल्या वेळी देण्यात आल्या होत्या. मात्र, यावेळी अशी तरतूद का करण्यात आली नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जावू लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदोरी, सायखेडा पूरग्रस्तांना मदत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड तालुक्यातील चांदोरी व सायखेडा या गावांना मंगळवारी, (दि. २) गोदावरीच्या पुराचा तडाखा बसल्यानंतर येथील पाणीपुरवठा करणे अवघड झाल्याने सरकारच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. तसेच येथील पू्रग्रस्तांना प्रशासनाकडून पाहणी करून योग्य ती मदतही करण्यात आली.

गोदावरीच्या पुरामुळे पाणीपुरवठा करणे अवघड झाल्याने सिन्नर येथून सायखेडा गावासाठी ४ पाण्याचे टँकर पाठवण्यात आले. निफाड तहसील प्रशासन व पंचायत समिती यांनी विविध सामाजिक संस्था, चांदोरी ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने चांदोरी येथील पूरग्रस्त भागातून विस्थापित आणि पुरामुळे गावात घरामध्ये अडकलेल्या सर्व नागरिकांना जेवण, पाण्याच्या बॉटल्स दिल्यात. दरम्यान विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे यांनी चांदोरी गावाला तर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी बुधवारी, (दि. ३) चांदोरी, सायखेडा गावाला भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

अखेर बाजार भरला

गेल्या तीन दिवसापासून गोदावरीला आलेल्या पुरामुळे सायखेडा येथील जनजीवन विस्कळीत झाले होते ते काल पूर्वपदावर आले. सायखेडा गावातील पेठेत असणारे पाणी ओसरल्याने व्यापाऱ्यांनी गुरूवारी, (दि. ४) आपली दुकाने उघडली होती. व्यावसायिकांचे अंदाजे दीड ते दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

निकृष्ट काम उघड

त्र्यंबकेश्वर : सततच्या पावसामुळे त्र्यंबकेश्वरला सिंहस्थादरम्यान रस्ते आणि गटारी यांचे झालेले नियोजन शुन्य काम उघडे पडले. यावरून सिंहस्थ ध्वजारोहण १४ जुलै २०१५ आणि त्यानंतर शाहीस्नानाच्या दरम्यान जर असा १०० मिमी पेक्षा अधिक पाऊस एका दिवसात झाला असता तर प्रशासनाने नेमके काय केले असते, असा प्रश्न येथील ग्रामस्थांनी विचारला. यासोबतच प्राचीन कुशावर्त तीर्थ ओव्हर फ्लो झाले आणि पुराणात येथे प्रकट होऊन पुन्हा गुप्त झालेली गोदावरी वाहती झाल्याची घटना मंगळवारी, (दि. २) पाहावयास मिळाली. या महिन्यातील पुढील आठवड्यात ध्वज अवतरणास मुख्यमंत्री महोदयांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तेव्हा पुन्हा कुशावर्तातून गंगा बाहेर पडली तर काय करणार. अशा परिस्थितीत प्रशासन कसे नियोजन करते हा खरा प्रश्न आहे.

हरसूल-वाघेरा घाट खुला

हरसूल-वाघेरा घाट ३० तासांच्या अथक प्रयत्नाने अखेर एकेरी वाहतुकीसठी खुला करण्यात आल्याने परिसातील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

संपर्क तुटला

कळवण : संततधार पावसामुळे सुरगाणा तालुक्यातील पश्चिमेला गुजरात सीमेवरील शेवटच्या टोकाला असलेले पिंपळसोंड, उंबरपाडा येथील अंबिका नदीची उपनदीवर या गावाजवळ पाइपच्या मोरीवरून पूराचे पाणी वाहत आहे. येथील शंकर चौधरी या युवकाने नागरिकांना मदतीला घेऊन रस्त्यावरील चिखल थोड्याफार प्रमाणात हटविला. सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेवरील देवलदरी ते चापापाडा या नदीवरील फरशी पूल पुरात वाहून गेल्यामुळे नागरिकांना नदीतून प्रवास करावा लागत आहे. या पाड्यावर तीनशे ते साडेतीनशे लोक वस्ती आहे.

दिंडोरीत नुकसान

दिंडोरी : तालुक्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने २२७७ हेक्टर शेतीसह २२८ घरांचे सुमारे साडेतीन कोटींचे नुकसानीचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. याबाबत तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांनी अहवालाची माहिती दिली आहे.


पूरपाण्याचा फायदा; शेतीचे नुकसान

सिन्नर : गेल्या दोन दिवसांच्या पावसाने येथील भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्याने कालव्याला पूरपाणी सोडावे अशी मागणी आमदार राजाभाऊ वाजे यांनी केली. पाटबंधारे विभागाने याची तातडीने दखल घेत पाणी सोडले असून १५० क्यूसेक क्षमतेने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे सिन्नर संगमनेर तालुक्यातील १३ गावांना पूरपाण्याचा फायदा होणार आहे. यामध्ये सिन्नर तालुक्यातील माळवाडी, दुशिंगपूर, खंबाळे, पांगरी, चास, भोकणी, सुरेगाव, मऱ्हळ, कणकोरी, मानोरी, नांदूरशिंगोटे, दोडी, दातली या गावांना फायदा होणार आहे. कडवा धरणापासून ५०० मीटर अंतरावर असलेला कालव्याचा उजव्या बाजूचा भराव पावसाच्या पाण्याने वाहून गेल्याने कालव्याचे पूरपाणी मंगळवारी संध्याकाळी बंद करण्यात आले. तर धारणगाव आणि कुंदेवाडी येथील पुलांच्या बाजूला असलेला भराव वाहून गेला. तहसीलदार मनोजकुमार खैरनार, नायब तहसीलदार प्रशांत पाटील यांनी नुकसानीची पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहणेरचा गिरणा नदीवरील पूल बंद

$
0
0

घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

महाड (जि. रायगड) येथील सावित्री नदीवरील ब्रिटिश काळातील नदीवरील पुलाच्या घटनेची गंभीर दखल घेत सटाणा सार्वजनिक बांधकाम विभागाने लोहणेर येथील गिरणानदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे.

विंचूर-शहादा-प्रकाशा राज्यमहामार्गावरील लोहणेर येथील गिरणानदीपात्रावर असलेला पूल हा ब्रिटिशकालीन आहे. ब्रिटिशांनी सन १९४४ मध्ये बांधकाम केलेला नऊ मीटरचे वीस गाळे असलेला पूल वाहतुकीसाठी बांधला होता. या पुलाला आजमितीस तब्बल ७२ वर्षांचा कालावधी उलटूनही पूल वाहतुकीसाठी सुरूच होता. या पुलाचे आयुष्यमान संपल्याने या पुलाला पर्यायी नवा पूल शेजारीच उभारण्यात आला असून या दोघा पुलांवरून राज्य महामार्गावरील अवजड वाहनांसह वाहतूक दररोज होत आहे.

जुन्या पुलाला थोड्याफार प्रमाणात डागडुजी करण्यात येऊन या पुलावरून सटाणा शहराकडे येणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. तर या पुलाला जोडून नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावरून नाशिककडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. एकेरी वाहतूक होत असली तरीही सदरचा राज्यमहामार्ग हा गुजरातला जोडणारा नजिकचा महामार्ग असल्याकारणाने मुंबई, पुणे, नगरसह कर्नाटककडे जाणारी गुजरात व आंध्रप्रदेशमधील वाहतूक या ठिकाणाहून होत असते. यामुळे मोठी अवजड वाहतूक या पुलावरून होत असते. या पुलाच्या खालून गिरणानदी वाहत असून पुलापासून नदीचे अंतर काही शेकडो फुटांचे आहे. नदीपात्र अत्यंत विशाल असून पावसाळ्यात नेहमीच या नदीला मोठ्या प्रमाणात पूर येत असतो.

नव्या पुलावरून दुहेरी वाहतूक

चणकापूर व पुनद धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग, पूरपाणी यामुळे मोठ्या प्रमाणात नदीला पाणी येत असते. अनेकवेळा लोहणेर गावापर्यंत पाणी गेल्याचे आख्यायिका आहेत. या अनुषंगाने महाड येथील घटनेनंतर प्रशासनाने खडबडून जागे होत. पुलावरील वाहतूक बंद केल्याने नव्या पुलावरून आता दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या पुलाचा वापर पुन्हा निश्चित केव्हा सुरू करण्यात येईल, याबाबत प्रशासनाने साशंकता व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. बिंदू महाराजांचा उपोषणाचा इशारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट माहितीच्या अधिकार कायद्याची पायमल्ली करत असल्याचा निषेध करण्यासाठी डॉ. बिंदू महाराज यांनी उपोषणाचा इशारा दिला.

ट्रस्टच्या मनमानी कारभाराला कंटाळून अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेचे प्रवक्ते व सल्लागार महंत डॉ. बिंदूजी महाराज यांनी माहिती अधिकारात अर्ज देऊन माहिती मागविली असता देवस्थान ट्रस्टने त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्यावर केलेल्या अपीलाची मात्रा निष्प्रभ ठरली आहे. त्यामुळे डॉ. बिंदूजी महाराज यांनी १५ ऑगस्टपासून मंदिरासमोरच उपोषणाचा इशारा दिला आहे.

ट्रस्टकडे माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती अर्ज देऊनही तसेच त्यावर रीतसर अपील अर्ज दाखल करूनही कारवाई होत नाही. याबाबत त्यांनी त्र्यंबक तहसीलदार, पोलिस निरीक्षक, मुख्याधिकारी यांना पत्र दिले आहे. त्र्यंबक देवस्थानला मिळत असलेले दान, देवस्थानकडून होणारा खर्च, देवस्थान वापरीत असलेली वाहने, त्या वाहनांना झालेले अपघात, वाहनांची दुरुस्ती आदी विषयांची माहिती डॉ. बिदूजी महाराज यांनी मागितली. तसेच देवस्थान ट्रस्टची इमारत, पुरातत्व विभागाचे नियम डावलून देवस्थान ट्रस्टच्या इमारतीत करण्यात आलेले फेरबदल आदी महत्त्वपूर्ण विषयांबाबतही डॉ. बिंदूजी महाराज यांनी माहिती मागितली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीच्या साडे अठरा लाखांवर ‘पाणी’

$
0
0

पावसामुळे २३९० फेऱ्या रद्द

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर व परिसरात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे एसटी महामंडळाने जिल्ह्यातील एकुण २३९० फेऱ्या रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. या बसफेऱ्या रद्द केल्यामुळे महामंडळाला १८ लाख ४५ हजार २८३ रुपयाच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. अतिवृष्टीमुळे जिवीतहानी व बसेसचे नुकसान झाले नसले तरी २२ हजार किलो मिटरवर एसटी मात्र धावू शकली नाही. बुधवारनंतर मात्र सर्व वाहतूक सुरळीत झाली. दुपारी दीडपर्यंत औरंगाबादकडे जाणारी वाहतूक ही निफाड व पिंपळगावमार्गे वळविण्यात आली. त्यानंतर सायखेडा मार्गेही वहातूक सुरळीत सुरू झाली.

अतिवृष्टीमुळे मोठा फटका नाशिक शहरातील डेपोला बसला. नाशिकहून बाहेरगावी जाणाऱ्या ३७८ फेऱ्या रद्द केल्यामुळे त्यातून ४ लाख १४ हजार ४२ रुपयाचा फटका बसला. त्याचप्रमाणे शहर वहातुकीच्या १ हजार २६३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामुळे ५ लाख ३७ हजार २९ रुपयाचे उत्पन्न बुडाले. नाशिक शहरातून औरंगाबादकडे जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या होत्या. तर ज्या ठिकाणी जोरदार पाऊस आहे तेथेही बस पोहोचल्या नाही. ट्रॅफिक जॅममुळे या बसेसला नुकसान झाले. प्रवाशांची संख्याही घटल्यामुळे काही बस रद्द करण्यात आल्या.

जिल्ह्यात एकुण एसटी महामंडळाचे १३ आगार असून त्यात नाशिकप्रमाणेच सिन्नर येथील १३१, पेठ येथील ११२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्याचप्रमाणे पिंपळगाव ९५, सटाणा ९२, इगतपुरी ८२, कळवण ७२ लासलगाव ५३, मालेगाव ३६, मनमाड ३०, नांदगाव १६, येवला ३० इतक्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमधील अतिरिक्त शिक्षकांचे होणार समायोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील शाळांची २०१५-१६ ची संचमान्यता करण्यात आली असून, या संचमान्यतेत जे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत, त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंबंधित परिपत्रक जारी करण्यात आले असून, याचा लाभ अनेक शिक्षकांना होणार आहे. नाशिकमध्ये रिक्त जागांच्या तुलनेत अतिरिक्त शिक्षकांचे प्रमाण कमी असल्याने शंभर टक्के म्हणजे सर्वच शिक्षकांचे समायोजन होणार असल्याने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. समायोजनाच्या शिक्षकांविषयी edustaff.maharashtra.gov.in या वेबसाइटवर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादी, त्यांची नावे व रिक्त पदांच्या माहितीसह जाहीर करण्यात आली आहे.

अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रवर्ग व अध्यापनाचा विषय याचा विचार करून त्याच प्रवर्गात व त्याच विषयांच्या रिक्त जागांवर समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात आली. या कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी प्रवर्गनिहाय जागा शिल्लक नसल्यास संबंधित शिक्षकाच्या अध्यापनाच्या विषयानुसार खुल्या प्रवर्गातील रिक्त जागांवर समायोजन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले, तसेच उपलब्ध असलेल्या रिक्त पदांवर समायोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्य शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात देण्यात आली आहे. समायोजनामुळे ज्या ठिकाणी शिक्षकांच्या रिक्त जागा असतील तेथे समायोजित शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी राज्यभर घेण्यात येत आहे. नाशिकमध्ये मात्र रिक्त जागांपेक्षा अतिरिक्त शिक्षकांची संख्या कमी असल्याने सर्वच शिक्षकांचे समायोजन होणार आहे. त्यामुळे नाशिक असा एकमेव जिल्हा ठरला आहे जिथे शंभर टक्के समायोजन पूर्णत्त्वास पोहोचले आहे, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले आहे.
संबंधित संस्थेत भविष्यात अन्य रिक्त होणाऱ्या पदामुळे बिंदुनामावलीनुसार तात्पुरते समायोजन केलेल्या शिक्षक कर्मचाऱ्याच्या समायोजनामुळे आरक्षणास बाधा येत नसल्यास समायोजन केलेल्या शिक्षकांना कायमस्वरूपी सामावून घेण्यात येणार असल्याची स्पष्ट करण्यात आले आहे. समायोजनाच्या शिक्षकांविषयी edustaff.maharashtra.gov.in या वेबसाइटवर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादी त्यांच्या नावे व रिक्त पदांच्या माहितीसह जाहीर करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांच्या एमईटीतून आंतरराष्ट्रीय कॉल्स

$
0
0

Gautam.sancheti@timesgroup.com

नाशिक: भुजबळ नॉलेज सिटीतील एमईटी महाविद्यालयातून आंतरराष्ट्रीय कॉल्स करण्यात आल्यामुळे संस्थेला तीन महिन्यांत १० लाख ३४ हजार ५७६ रुपयांचे बिल आले आहे. एक जुलै ते ३० सप्टेंबर २०१० या तीन महिन्यांच्या कालावधीत हे कॉल्स करण्यात आले. नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचमध्ये एमईटीने बीएसएनएलविरोधात दाखल केलेला दावा फेटाळल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

बीएसएनएलने पाठवलेल्या या बिलात एसटीडीबरोबरच आयएसडी कॉल्सचेही बिल आहे. हे बिल संस्थेने न भरल्यामुळे बीएसएनएलने ३ लाख ४१ हजार ४१० रुपये व्याजही लावल्यामुळे हे बिल १३ लाख ७५ हजार ९८६ रुपये झाले आहे. दरम्यान, दूरध्वनी केंद्रातील माहीतगार व्यक्तीने टेलिफोन कनेक्शनचा दुरुपयोग केल्याचा दावा एमईटीने केला. टेलिफोन एक्स्चेंज पूर्णपणे संगणकीकृत असल्याने एमईटी संस्थेव्यतिरिक्त टेलिफोनवरून कोणीही फोन करू शकत नसल्याचे बीएसएनएलने न्याय मंचात सांगितले आहे.

एमईटीने पीआरआय सर्व्हिसेस प्लॅनमधून प्रतिमहा १५ हजार रुपये भाडे असलेले दूरध्वनीचे कनेक्शन घेतले. त्यानंतर हा प्लॅन बदलून १७५० रुपयांचा प्लॅन मिळावा, यासाठी संस्थेने २५ जानेवारी २०१० रोजी विनंती केली. त्यानंतर मे महिन्याचे बिल ५० हजार २६९ आले. या बिलातून संस्थेला आंतराष्ट्रीय बिल झाल्याचे समजले. त्यानंतर संस्थेने बीएसएनएलला पुन्हा प्लॅन बदलण्याच्या पत्रावर कार्यवाही करण्यास सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून ५००० चा प्लॅन मिळावा, असे पत्र संस्थेने दिले. मात्र त्यानंतरही १० लाख ३४ हजार ५७६ रुपयांचे बिल आल्यामुळे संस्थेने ग्राहक न्यायमंचात १४ मार्च २०१४ रोजी तक्रार दाखल केली. त्यानंतर १६ महिन्यांनी ग्राहक मंचाने ही टेलिफोन लाइन संस्थेच्या अभ्यासक्रम चालवण्यासाठी व्यावसायिक कारणाने घेतली आहे. त्यामुळे संस्थेला ग्राहक म्हणता येत नाही, असे सांगत हा दावा फेटाळला. ग्राहक न्याय मंचात दावा दाखल केल्यामुळे आंतरराष्ट्रीय कॉल्सची बाब समोर आली असली तरी नेमके हे कॉल्स कोणी केले हा विषय आता चर्चेचा ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुल प्रकरण: वेळ वाया गेल्याने भरपाईचे आदेश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जळगाव नगरपालिकेतील घरकुल प्रकरणाचे काम धुळे येथील विशेष न्यायालयात चालू असून, गुरुवारी २५ संशयित आरोपींचे वकील कामकाजप्रसंगी हजर राहू न शकल्याने न्यायालयाचा वेळ वाया गेला म्हणून न्या. आर. आर. कदम यांनी आरोपींच्या वकिलांनी पाच हजार रुपये भरपाई न्यायालयाला द्यावी, असे आदेश दिले.

घरकुलच्या खटल्यातील ५३ आरोपींपैकी २५ आरोपींच्या वकिलांचे गुरुवारी, दुसऱ्या न्यायालयात कामकाज असल्याने ते उलटतपासणीसाठी धुळ्यातील विशेष न्यायालयात येऊ शकले नाहीत. त्यांनी तसा अर्ज न्यायालयास सादर केला होता, मात्र न्यायालयाचा वेळ वाया गेला म्हणून आरोपींच्या वकिलांनी एकत्रितपणे पाच हजार रुपये भरपाई न्यायालयाला द्यावी, असे आदेश खटल्याचे कामकाज पाहणारे विशेष न्यायाधीश आर. आर. कदम यांनी दिले. खटल्याचे पुढील कामकाज शुक्रवारपासून नियमित सुरू होईल, असे सांगण्यात आले.

'त्यांचे म्हणणे खोटे'

घरकुल प्रकरणाचे तत्कालीन तपास अधिकारी ईशू सिंधू यांची उलटतपासणी गुरुवारी आरोपीचे वकील जितेंद्र निळे घेतली. साक्ष देताना सिंधू म्हणाले की, 'मला बांधकामांबद्दल ज्ञान नाही, मी बांधकामतज्ज्ञ नाही हे खोटे आहे. माझा बांधकामांबाबत अभ्यास आहे. परंतु, त्या विषयी माझ्याकडे कोणतीही औपचारिक पदवी नाही. जळगावची घरकुल योजना ही शहराच्या मोठ्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची होती आणि कुठलीही नगरपालिका ही विकासासाठी ठराव मंजूर करीत असते हे म्हणणे खोटे आहे.'

'आरोपींचा दावा चुकीचा'

नगरपालिकेने नगरपालिका अॅक्टनुसार तरतुदींचे उल्लंघन केलेले नाही हे खरे नाही. तपासाधिकारी व त्यांचे अधिकारी यांनी घरकुल योजनेचा तपास हा एकतर्फी व बेकायदेशीररित्या केलेला आहे आणि या केसमध्ये आरोपींचे म्हणणे ऐकूण घेतले नाही. हे म्हणणे देखील खरे नसल्याचे सिंधू यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमिताभसोबतचा ‘तो’ फोटो आयोगासमोर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळ्यातील दंगलप्रकरणी नियुक्त चौकशी आयोगासमोर विविध गटांकडून सादर सीडीज् पाहण्याचा आदेश झाल्यानंतर या सीडींच्या सत्यतेवर विश्वास कसा ठेवावा, असा प्रश्न अॅड. शिशिर हिरे यांनी उपस्थित केला. अॅड. हिरे यांनी आपल्या म्हणण्याला पुरावा म्हणून सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार केलेला अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा पोलिस अधिकाऱ्यांचा फोटो आयोगासमोर सादर केला.

हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील कक्षात धुळे दंगलीच्या चौकशी आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश के. यू. चांदीवाल यांच्यापुढे कामकाज सुरू आहे. विविध गटांतर्फे अॅड. प्रकाश परांजपे, अॅड. जी. व्ही. गुजराथी, अॅड. अशपाक शेख, अॅड. समीर पंडित आदींचे युक्तिवाद झाले आहेत. पोलिस पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांचा युक्तिवाद काही दिवसांपासून सुरू आहे. त्यांनी विविध गटांतर्फे झालेले युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न गुरुवारी केला.

विविध गटांतर्फे दाखल झालेल्या दंगलीबाबतच्या सीडी ११ ऑगस्टला पाहण्याचा आदेश आयोगाने दिला आहे. त्यासंदर्भात अॅड. हिरे यांनी युक्तिवादात सांगितले की, या सीडींवर कसा विश्‍वास ठेवावा हा प्रश्‍न आहे. कारण, या सीडी केंद्रीय फोरॅन्सिक लॅबकडून प्रमाणित होऊन आलेल्या नाहीत. त्यात संगणकाच्या मदतीने काही बदल करता येऊ शकतात. त्याच्या पुराव्यादाखल अॅड. हिरे यांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या कक्षाबाहेर प्रसिद्ध चित्रपट अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत अॅड. हिरे, तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, तत्कालीन पोलिस निरीक्षक हेमंत पटील, अधिकारी विकास थोरात आदींसह कर्मचाऱ्यांचा फोटो काढून तो आयोगाला दाखवला. कम्प्युटरमधील सॉफ्टवेअरच्या मदतीने ही कमाल करता येऊ शकत असल्याचे त्यांनी आयोगाला सांगितले.

'अॅसिड हल्ल्याचा विचार करावाच लागेल'

अॅड. हिरे यांनी सांगितले की, दंगल नियंत्रणासाठी पोलिसांना कसरत करावी लागते. तराजू-काट्यासारखी एखादी बाजू कमी-अधिक होऊ शकते. स्थितीप्रमाणे पोलिसांना नियंत्रणासाठी प्रयत्न करावा लागतो. त्यांनी तो केला. ६ जानेवारी २०१३ ला धुळे शहरात मच्छीबाजार व परिसरात झालेल्या दंगळीच्या वेळी पोलिसांना गोळीबार करावा लागला. दंगलखोरांनी केलेल्या अॅसिड हल्ल्यात सुमारे ६० ते ७० पोलिस कर्मचारी जखमी झाले. या अॅसिड हल्ल्याचा विचार गांभीर्याने करावा लागेल, असेही अॅड. हिरे यांनी निक्षून सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस स्टेशनजवळील बँकेवर दरोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी धुळे शहरालगत असलेल्या नगावमध्ये धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेत (डीडीसी) अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून तिजोरीतून रक्कम लंपास केली होती. या घटनेनंतर आता शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे डीडीसी बँकेच्या शाखेत चोरी झाली असून, बँकेतील साडेतीन लाख रुपये लंपास झाले आहेत.

दरोड्याची घटना सकाळी बँकेच्या कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी बँकेचे व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी व संचालक, नरडाणा पोलिसांना माहिती कळविली. काही वेळातच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि नरडाणा पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथकाने चोरट्यांचा काही अंतरापर्यत माग काढला. अज्ञात चोरट्यांविरूद्ध बँकेचे व्यवस्थापक गजानन देवरे यांनी फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे.

गॅस कटरने कापले शटर; पोलिस अनभिज्ञ

अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने बँकेचे शटर तोडून आत प्रवेश केला आणि बँक व्यवस्थापकांच्या दालनात असलेल्या तिजोरीतून ३ लाख ६१ हजार ४०० रुपये चोरून नेले. ही बँक पोलिस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर आहे मात्र, या घटनेचा पोलिसांना कोणताही सुगावा लागला नाही.

आयसीआयसीआयचे फोडले एटीएम

चोरट्यांनी १५ दिवसांपूर्वी नगाव येथील डीडीसी बँक फोडली होती. त्यानंतर तेथून काही अंतरावरच असलेले आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडले. मात्र, चोरट्यांच्या हाती पैसे लागले नाहीत. त्यांनी एटीएमची मात्र, मोडतोड केली. या घटनेची माहिती पश्चिम पोलिस ठाण्यात देण्यात आली असून, अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक नसलयाने चोरट्यांनी संधीचा फायदा घेत चोरी करण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज पोलिसांचा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला पेपरमिल होण्याचे निश्चित!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

चलनी नोटांचा कागद कारखाना (पेपरमिल) नाशिकला होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री राम मेघवाल यांच्या एक ऑगस्टच्या पत्रानुसार रिझर्व्ह बँकेने याबाबतचा अहवाल तपासला आहे. अर्थमंत्रालयाचा नाशिकला पेपरमिल होण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून केला जाणार आहे. तो व्यवहार्य झाल्यास प्रकल्पाचा विचार होणार आहे.

खासदार हेमंत गोडसे, प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर गोडसे, सुनील आहिरे, संदीप बिश्वास, जॅक्सन आदींनी नुकतीच मेघवाल यांची याबाबत भेट घेतली. मेघवाल यांनी खासदार गोडसेंना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्रेस महामंडळ आणि रिझर्व्ह बँकेची बैठक अर्थमंत्रालयाने घेतली. सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करताना नाशिकला पेपरमिल उभारण्याची शक्यता पडताळून पाहण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला.

४८ लाख टन मागणी

पोसपोर्ट, चलन आणि अन्य उच्च सुरक्षा उत्पादनांसाठी सरकारला पेपरमिल सुरू करायची आहे. सध्या केंद्राची कागद निर्मिती क्षमता १७ लाख टन आहे. शासकीय कागदाची मागणी २०२४ पर्यंत ४८ लाख टन होणार असल्याने सरकार चार नवीन मशीन लाइन टाकणार आहे. प्रेस महामंडळ व रिझर्व बँक यांच्या भारतीय नोट पेपरमिल या संयुक्त कंपनीचा नाशिकला दोन मशिन लाइन सुरू करण्याचा विचार आहे. त्यासाठी डीपीआर केला जाणार आहे. चलनी नोटा आणि स्टॅम्प पेपरसाठी पेपरमिल उपयुक्त ठरेल. नाशिकरोड प्रेसमध्ये या गोष्टींचे उत्पादन होत आहेच.

सकारात्मक बाबी

खासदार गोडसे यांनी मंत्री मेघवाल यांना सांगितले की, नाशिकला करन्सी आणि आयएसपी प्रेसच्या साडेतीनशेपैकी दीडशे-दोनशे एकर जमीन विनावापराची आहे. ही जागा व एक हजार फ्लॅट्स रिक्त असून पेपरमिल आणि कामगारांसाठी देता येईल. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाचणार आहे.

पेपरमिल होण्यासाठी खासदार गोडसे यांच्या माध्यमातून आमचे जोरदार प्रयत्न सुरू होते. त्याला आता यश येत आहे.

- जगदीश गोडसे, सरचिटणीस, प्रेस मजदूर संघ

नाशिकला पेपरमिल झाल्यास प्रकल्पाची किंमत कमी होईल. हे केंद्रीय अर्थमंत्रालयाला पटवून दिले आहे. त्यामुळेच नाशिकलाच पेपर‌मिल होण्याची शक्यता बळावल्याचा आनंद आहे.

- हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलग नाट्यानुभव प्रथमच

$
0
0

१३ ला होणार वाडा चिरेबंदी आणि मग्न तळ्याकाठी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या रंगभूमीवर 'वाडा चिरेबंदी' आणि 'मग्न तळ्याकाठी' ही दोन नाटके सलग सादर करण्याचा प्रयोग होणार आहे. 'वीकेंड थिएटर' या संकल्पनेवर आधारित द्विनाट्यधारेचा नाशिक येथील हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे.

रंगभूमीला जिवंत, सांस्कृतिक, अभिरूची संपन्न प्रेक्षकांनी उचलून धरले असून, गेल्या २५-३० वर्षांत रंगभूमीने अनेक स्थित्यंतरे व नवे प्रयोग पाहिले आहेत. नाट्यक्षेत्राची अभिरूची जागवणारी प्रायोगिक नाटकांची चळवळच येथे उभी राहिली असल्याने द्विनाट्यधारेसारखे प्रयोग येथे करण्याचे धाडस आता दिग्दर्शक करू लागले आहेत. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी 'वाडा चिरेबंदी' हे नाटक रंगभूमीवर आणले असून, त्याचे यशस्वी प्रयोग ते पार पाडत आहेत. याच धर्तीवर 'वाडा चिरेबंदी', 'मग्न तळ्याकाठी' ही दोन नाटके सलग दाखवण्याचा प्रयोगह‌ी कुलकर्णी करणार आहेत.

कुलकर्णी यांनी वीस वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नाटककार महेश एलकुंचवार यांची 'वाडा चिरेबंदी', 'मग्न तळ्याकाठी' आणि 'युगांत' ही तीन नाटके त्रिनाट्यधारेच्या रुपात रंगभूमीवर आणत आगळावेगळा प्रयोग केला होता. शनिवार १३ ऑगस्ट रोजी कालिदास कलामंदिर येथे सायंकाळी ५.३० ते रात्री १२ या वेळेत ही दोन नाटके सादर होणार आहेत. या विशेष द्विनाट्यधारा प्रयोगाचे आयोजन फ्रेन्डस् सर्कलचे जयप्रकाश जातेगांवकर यांच्या सहकार्याने होत आहे.

दहा वर्षांनंतर कथानकातील पात्रातील बदल, नवीन पात्रांच्या प्रवेशबाबत नाट्यप्रेमींना उत्सुकता आहे. ही संधी सलग नाट्यानुभवाच्या स्वरूपात उपलब्ध करून देत आहे.

- चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक

पुण्या-मुंबईतील नाट्यानुभवाच्या यशानंतर इतर शहरांमध्येही हा प्रयोग राबवला जाणार आहे. दर महिन्याला एक प्रयोग करण्याचा संस्थेचा मानस आहे.

- श्रीपाद पद्माकर, निर्माता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एशियन इलेक्ट्रॉनिक्सची मशिनरी ‘पीएफ’कडून जप्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कामगारांचे भविष्य निर्वाह निधीचे एक कोटी ४१ लाख रुपये भरले नाही म्हणून पीएफ कार्यालयाने सातपूर येथील एशियन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची मशिनरी जप्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पीएफ कार्यालयाची जोरदार वसुली मोहीम सुरूच असून, या अगोदर दहा टॉपटेन थकबाकीदारांची यादी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशाव्दाराजवळ लावून त्यांच्यावर कारवाई केली होती.

कामगारांच्या भविष्य निधीचे ११० कोटी रुपये थकवल्यामुळे पीएफ कार्यालयाने आता विविध कंपन्याविरुध्द कारवाईचे हत्यार उपसले आहे. एशियन कंपनीवर कारवाईबरोबरच १२ कारखान्यांनाही जप्तीच्या नो‌टिसा बजावल्या आहेत. सुमारे २१ कंपन्यांची मालमत्ता जप्त केली आहे. आता या मालमत्तेचे मूल्यांकन करून लिलाव करण्यात येणार आहे. या कारवाईबरोबर राहुरी नगर परिषदेने ठेकदाराचे रेकॉर्ड न दिल्यामुळे त्यांचे सर्व बँक अकाऊंट सिल केले आहे. जुलैमध्ये पीएफ कार्यालयाने ४० लाखांची वसुली केली. ऑगस्टमध्ये आतापर्यंत ४४ लाखांची वसुली केली आहे.

एशियन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीतील जप्तीनंतर लिलावाची कारवाई केली जाणार आहे. थकबाकी वसूल करण्याची मोहीम सुरू आहे. त्यातून वसुलीत वाढ झालेली आहे.

- हेमंत राऊत, सहाय्यक आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूरच्या सातपट पाणी जायकवाडीला

$
0
0

आतापर्यंत ३८ हजारांहून अधिक दलघफू पाण्याचा विसर्ग

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण सातवेळा भरेल इतके पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडी धरणात शुक्रवारपर्यंत सोडण्यात आले आहे. गंगापूर धरणाची क्षमता ५६३० दशलक्ष घनफूट असून, जायकवाडीला आतापर्यंत ३८ हजारांहून अधिक दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले आहे.

पावासाळा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत हे पाणी सोडण्यात आले आहे. अजून काही दिवस हे पाणी सोडण्यात येणार असून, त्यामुळे जिल्ह्यातील एकूण धरणसाठ्यापेक्षाही जास्त पाणी हे जायकवाडीकडे वळवले जाणार आहे. गेल्या पाच महिन्यांपासून मृतसाठ्यात असलेल्या जायकवाडी धरणाने अखेर मंगळवारी रात्री उपयुक्त पातळी गाठली व त्यात नंतर वाढच होत गेली.

या आठवड्यात तर नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणात एक लाख ४५ हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे गुरुवारी जायकवाडी धरणाचा रात्रीपर्यंत उपयुक्त पाणीसाठा ४३३.८९५ दशलक्ष घनमीटरपर्यंत (२० टक्के) पोहोचला. त्यानंतर त्यात शुक्रवारपर्यंत सहा टक्के वाढ झाली. गेल्या वर्षी जायकवाडीमध्ये ऑगस्टमध्ये केवळ सहा टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. जायकवाडी येथे दारणा, गंगापूर, पालखेड, कडवा व इतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पाणी सोडूनही तक्रारींचा पाढा

नांदूरमध्यमेश्वरहून शुक्रवारी सकाळपर्यंत ३७ हजार ९३० दलघफू पाणी सोडण्यात आले. त्यात दारणा धरणातून १२ हजार ५७० दलघफू, कश्यपी धरणातून ९१.५३, कडवा धरणातून ३३५६.३५, आळंदी ९४३.३९, भावली ५६५.०८, गंगापूर ४२६९.३२, भोजापूर ७३३.४५, वालदेवीमधून ३५७.९१ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. नाशिकच्या धरणातून इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यानंतरही मराठवाड्यातील लोकांची तक्रार सुरूच आहे. त्यामुळे नाशिककरही संतापले आहेत. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सुध्दा मराठवाड्यातील नागरिकांच्या आरोपाचे खंडण करीत फटकारले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे पोलिस प्रशिक्षणाचे विकेंद्रीकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रात रेल्वे पोलिस फोर्सच्या (आरपीएफ) प्रशिक्षणाची दोन महत्त्वाची केंद्र असून, त्यातील मुख्य केंद्र हे सोलापूरला तर दुसरे केंद्र हे नाशिक जवळील सामनगाव येथे आहे. या दोन्ही केंद्रांच्या कामाचे वर्गिकरण करण्यात आले असून, नाशिकच्या केंद्रावर पोलिसांचे प्रशिक्षण तर सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडीजवळ असलेल्या चिनखील गावात कमांडो ट्रेनिंग देण्याचा निर्णय आरपीएफच्या मुख्यालयाने घेतला आहे.

नाशिक आणि सोलापूर या दोन्ही ठिकाणी रेल्वे पोलिसांचे नियमित प्रशिक्षण केंद्र आहे. या दोन्ही ठिकाणी कमांडो व इनडोअर ट्रेनिंग याचा समावेश आहे. मात्र यात विकेंद्रीकरण करण्यात येत असून, नाशिकच्या केंद्रावर परेड व इनडोअर प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे, तर चीनखील या ठिकाणी फायरिंग रेंज व कमांडो प्रशिक्षणासाठी जागा मोठ्या प्रमाणात असून, नाशिकचे कमांडो प्रशिक्षण सेंटर सोलापूरला हलविण्यात येणार आहे. सोलापूरचे निय‌मित प्रशिक्षण केंद्र नाशिकला हलविण्यात येणार आहे. सध्या असलेल्या प्रशिक्षणासाठी दोन्ही ठिकाणी इनडोअर व कमांडो प्रशिक्षणाचा कर्मचारी वर्ग कार्यरत होता. त्यांचेही आता विकेंद्रीकरण करण्यात येणार असल्याने नाशिक येथील कमांडो प्रशिक्षणाचा कर्मचारी वर्ग सोलापूरला, तर सोलापूरचा नियमित कर्मचारी वर्ग नाशिकला हलविण्यात येणार आहे. नाशिकमध्ये फायरिंगच्या प्रशिक्षणासाठी नेहमी अडचण येत असेल, तर सोलापूरच्या प्रशिक्षण केंद्रात मूलभूत सुविधांचा तुटवडा होता. सोलापूरला आरपीएफचे स्वतःचे फायरिंग रेंज आहे. नाशिकच्या प्रशिक्षण केंद्रात चांगल्या सुविधा आहेत. या विकेंद्रीकरणामुळे दोन्ही केंद्रांची अडचण दूर होणार असून, प्रशिक्षण घेणाऱ्यांना चांगले प्रशिक्षण मिळणार आहे.

नाशिकच्या प्रशिक्षण केंद्रात इन्फ्रास्ट्रक्चर चांगले आहे. तसेच सोलापूरच्या प्रशिक्षण केंद्रात फायरिंगच्या सुविधा चांगल्या आहेत. या दोन्हीचा समन्वय साधला जात असून, दोन्ही प्रशिक्षण केंद्राचे विकेंद्रीकरण करण्यात येत आहे. कोणतेही केंद्र कुठेही हल‌विण्यात येणार नाही. ज्या ठिकाणी जे केंद्र आहे ते त्याच ठिकाणी राहणार आहे.

- रामभाऊ पवार, प्राचार्य, आरपीएफ प्रशिक्षण केंद्र, सोलापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नमवार पुलाची दुर्दशा

$
0
0

अपूर्व हिरेंनी विधान परिषदेत वेधले लक्ष

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचा कन्नमवार पूल अवजड वाहनांसाठी धोक्याचा असल्याचे मान्य करणाऱ्या संबंधित विभागाने या पुलावर 'मोठ्या वाहनांना प्रवेश वर्जित' असा धोक्याचा फलक लावण्यापुरतेच कर्तव्य बजावले आहे. या पुलावरून मिनिटाला शेकडो अवजड वाहने जा-ये करीत आहेत. नाशिक येथे महाडसारख्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून शासनाने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी विधान परिषदेत केली.

अत्यंत कमकुवत व धोकादायक कन्नमवार पुलाच्या वापराचा गंभीर मुद्दा आमदार हिरे यांनी पॉईंट ऑफ इन्फर्मेशनद्वारे उपस्थित केला. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने गोदावरी नदीला महापूर आला. सन १९६९ नंतरचा हा सर्वात मोठा महापूर आहे. अतिवृष्टी कायम राहिली तर यापुढेही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होईल, असे प्रशासनाने जाहीर केले. महापुरात शहरातील अनेक पूल पाण्याखाली गेले. गोदावरी पात्रातील पाण्याचा वेगही प्रचंड होता. हा प्रवाह पंचवटी भागातील कन्नमवार पुलाच्या पायथ्याला भिडत असतो. मात्र, मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या व नाशिक शहराला जोडणाऱ्या या एकमेव पुलाची आजची अवस्था अत्यंत जीर्ण व धोकादायक आहे. पुलाच्या सुरक्षेचा कालावधी संपला असून, गोदावरीचा महापूर, पाण्याचा सततचा विसर्ग व गतिमान प्रवाह पाहता जीर्ण कन्नमवार पुलाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे, याकडे आमदार हिरे यांनी लक्ष वेधले.

महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित स्थानिक विभागाने कन्नमवार पुलालगत वाहनचालकांसाठी दोन सूचनाफलक लावले आहेत. त्याचा मजकूर सावधान - धोका-कमजोर पुलिया बडे वाहनों को प्रवेश वर्जित असा आहे. मात्र, अवजड वाहने सर्रास ये-जा करीत आहेत. शासनाने याप्रश्नी गांभीर्यपूर्वक लक्ष पुरवून आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी डॉ. हिरे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ हजार नुकसानग्रस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीला आलेल्या महापुरामूळे नाशिक शहरातील सुमारे आठ हजार नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात आजपासून प्रत्यक्ष पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. त्यासाठी १२ पथके नेमण्यात आली असून, जिल्ह्यातील तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसह महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही पंचनाम्यांसाठी मदत घेण्यात येत आहे. तीन दिवसांपूर्वी गोदेला आलेल्या महापुराने अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते केले. नदीकाठी राहणाऱ्या अनेक कुटुंबांचे संसार या पावसाने उघड्यावर आणले आहेत. जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्याने अनेक कुटुंबे हतबल झाली असून, सरकारकडून मिळणाऱ्या मदतीकडे डोळे लावून बसली आहेत. पंचनामे झाल्याशिवाय नुकसानीचा नेमका अंदाज येत नाही, तोपर्यंत सरकारकडे प्रस्ताव पाठविणेही प्रशासनाला शक्य होत नसल्याने नुकसानग्रस्तांना मदतही मिळत नाही. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने आता पावले उचलली आहेत. पावसाचा जोर कमी होताच पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी १२ पथके तयार करण्यात आली असून, त्यांना परिसरानुसार जबाबदाऱ्यांचे वाटप देखील करण्यात आल्याची माहिती तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी दिली. त्यासाठी मालेगाव, चांदवड, बागलाण, येवला, नांदगाव या तालुक्यांमधील महसूल खात्यातील तलाठी, मंडल अधिकाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे. महसूल विभाग आणि महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे संयुक्त पथक स्थापन करण्यात आले असून, त्यांनी पंचनाम्यांना सुरुवात केली आहे. या पथकांकडून देण्यात येणारा अहवाल हा वस्तुस्थितीदर्शक असावा, त्यावर बाधीत व्यक्तीची स्वाक्षरी असावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. स्थळ निरीक्षण करताना संबंध‌ित ठिकाणाचे फोटो, व्हीडीओ शूट‌िंग करणे आवश्यक असून, त्यासाठीचे साह‌ित्य आणि मनुष्यबळाचा खर्च महापालिकेने करावा, असेही सूचित करण्यात आले आहे. याबाबतच्या आदेशाची प्रत उपजिल्हाधिकारी उदय किसवे, प्रदीप भोये, दीपमाला चौरे, तहसीलदार गणेश राठोड यांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे. पंचनाम्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांचीही मदत घेण्यात येत आहे. पंचनामा होईल त्या प्रत्येक परिसरात सकाळी आठपासून दोन पोलिस कर्मचारी मदतीला असणार आहेत. विशेष म्हणजे तातडीने हे पंचनामे पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल ७ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे दोन दिवसांत पंचमाने पूर्ण करण्याचे आव्हान या पथकांपुढे आहे. पुरामुळे घरातील कपडे, भांडी यांचे नुकसान झाल्याचे गृहीत धरून अशा कुटुंबांना सरकारी निकषानुसार हजार ते दोन हजार रुपये एवढी मदत मिळण्याची शक्यता आहे. याखेरीज व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनांचा विमा काढून ठेवलेला असतो. पंचनाम्याशिवाय त्यांनाही संबंध‌ित विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळत नसल्याने त्यांचे पंचनामेदेखील प्राधान्याने करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी दिली आहे. त्यासाठी दोन स्वतंत्र पथके जिल्हा प्रशासनाने कामाला लावली आहेत.

येथे पंचनामे

वाघाडी नदी किनारा, वाल्मिकनगर, बुरूडवाडी, रामकुंड, गणेशवाडी, तपोवन रामटेकडी, बरूबाबानगर, गोविंदनगर झोपडपट्टी, पिंपळगाव बहुला, महादेववाडी, सातपूर, राजवाडा, कांबळेवाडी, मंगलवाडी, जोशीवाडा, मल्हारखान झोपडपट्टी, घारपूरे घाट, गंगापूर गाव, आनंदवली, काझीगढी, सराफबाजार, दहीपुल, शिवाजीवाडी, बजरंगवाडी, आंबेडकरवाडी, श्रमिकनगर परिसर नाशिकरोड, आय.टी.आय आदी भागात पंचनामे केले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images