Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

​ आता आस मदतीची

$
0
0

९० टक्के पंचनामे पूर्ण; मदतीचा प्रस्ताव सरकारला पाठविणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गत आठवड्यात गोदावरीला आलेल्या पुरामूळे नदीकाठचे रहिवासी आणि व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून, पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. शहरात तीन दिवसांत ३ हजार २६४ स्थळांसह ९० टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. उर्वरित पंचनामे लवकरच पूर्ण करून मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारकडून मदत कधी मिळते याकडे आता पूरग्रस्तांचे लक्ष लागले आहे.

ऑगस्टच्या पहिल्या सप्ताहात गोदावरीला महापूर आला. पावसाचा जोर आणि गंगापूर, दारणासह अन्य काही धरणांमधून सुरू असलेला पाण्याचा विसर्गामुळे पंचवटी परिसरासह नदीकाठची बाजारपेठ अक्षरशः पाण्याखाली गेली. नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे अतोनात नुकसान झाले. अनेकांचे संसार या पुरात वाहून गेले. अशी शेकडो कुटुंब पुरामुळे रस्त्यावर आली आहेत. विशेष म्हणजे सराफ बाजार, भांडी बाजार, दहीपूल, गोदाकाठ आणि पंचवटीच्या बऱ्याचशा परिसरात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे लवकरात लवकर पूर्ण व्हावेत यासाठी दहा पथके स्थापन करण्यात आली. प्रत्येक पथकात महसूलचे तीन, महापालिका आणि पोलिसांचे प्रत्येकी दोन कर्मचारी आहेत. त्यासाठी मालेगाव, चांदवड, बागलाण, येवला, नांदगाव या तालुक्यांमधील महसूल खात्यातील तलाठी, मंडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. पंचनाम्यांचे काम पूर्ण होत आल्याने नाशिक तालुक्याबाहेरील तलाठी रविवारी सायंकाळी त्यांच्या कार्यस्थळी रवाना झाले. पंचनामे करणाऱ्या पथकांकडून देण्यात येणारा अहवाल वस्तुस्थिती दर्शक असावा, त्यावर बाधित व्यक्तींची स्वाक्षरी असावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. संबंध‌ित ठिकाणचे फोटो, व्हीडीओ शुटिंग करणे सक्तीचे होते. याबाबतच्या आदेशाची प्रत उपजिल्हाधिकारी उदय किसवे, प्रदीप भोये, दिपमाला चौरे, तहसीलदार गणेश राठोड यांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पाठविल्या होत्या.

७ ऑगस्टपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पथकांना दिले होते. सोमवारपर्यंत ९० टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती नाशिक तहसील कार्यालयातून मिळाली. पंचनाम्याशिवाय त्यांनाही संबंधित विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळत नसल्याने त्यांचे पंचनामे प्राधान्याने करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिल्लीत महाराष्ट्राचे ‘वैभवदर्शन’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नवी दिल्लीतील कुतूब परिसरात शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय वस्तू संग्रहालय साकारले जात आहे. त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढलेले महाराष्ट्रातील गड-किल्ले व शिवकालीन वास्तुंचे फोटो असणार आहेत.

समितीचे सचिव व माजी केंद्रीयमंत्री विजय नवल-पाटील यांनी हे फोटो भेट दिल्याबद्दल ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी त्यांची मुंबईत मातोश्रीवर भेट घेतली. त्यांना शिवकालीन सुवर्णमुद्रा भेट दिली. समितीने प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्र अभियान सुरू केले आहे. त्यानिमित्त ठाकरे यांना कापडी पिशवी देण्यात आली. यावेळी मंत्री दादा भुसे, आमदार योगेश घोलप, विजय करंजकर, हर्षवर्धन बोऱ्हाडे आदी उपस्थित होते. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, बिहार, उत्तरांचल, दिल्ली आदी सात राज्यात या समितीचे ४० सदस्य कार्यरत आहेत. माजी मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा हे समितीचे अध्यक्ष आहेत.

नाशिककरांचा खारीचा वाटा

दिल्लीतील संग्रहालयात पुरातन नाणी, शस्त्रास्त्रे, शिवमुद्रा, तसेच शिवकालीन जहाज, घोडे आदी वस्तुंची प्रतिकृती तसेच उद्धव ठाकरेंनी काढलेल्या फोटोंचा समावेश असणार आहे. नाशिककरांचेही योगदान वस्तु संग्रहालयासाठी मिळत आहे. विजय नवल-पाटील हे नाशिकच्या शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांकडून वस्तू संग्रहालयासाठी काही वस्तू तयार करून घेत आहेत. नाशिकमधील २२ शिक्षक व त्यांचे विद्यार्थी हे काम करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात स्वच्छतेसाठी २४ तास पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश भागात पाणी साचले होते. हे पाणी ओसरताच बहुतांश भागात गाळ साचला आहे. हा गाळ काढण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून अशा भागांमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याची माह‌िती महापौर अशोक मुर्तडक यांनी दिली.

अनेक ठिकाणी गाळामुळे रस्त्याने चालणे अवघड झाले आहे. नदीकाठच्या घरांमध्ये गाळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा गाळ काढण्यासाठी पाण्याची आवश्यकता असल्याचे लक्षात घेऊन या परिसरामध्ये २४ तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. जोपर्यंत परिसर स्वच्छ होत नाही तेथील स्वच्छता निरीक्षक परिसर स्वच्छ झाल्याचा अहवाल वरिष्ठांना देत नाही तोपर्यंत २४ तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी जलदगतीने पालिकेच्या स्वच्छता मोह‌िमेत सहकार्य देऊन आपला परिसर गाळमुक्त करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओझरला लवकरच येणार इजिप्तची फळे

$
0
0

शुक्रवारी कार्गो विमानात होणार वाहतूक

bhavesh.brahmankar@timesgroup.com

नाशिक : ओझर येथून शेळ्या-मेंढ्यांची शारजा येथे कार्गो विमानाद्वारे थेट निर्यात सुरू झाल्यानंतर आता ओझर येथे इजिप्तच्या फळांची आयात होणार आहे. येत्या १२ ऑगस्टच्या शेळी निर्यातीसाठी शारजा येथून येणाऱ्या कार्गो विमानात ही फळे येण्याची दाट चिन्हे आहेत. आयात आणि निर्यात या दोन्हींमुळे ओझर येथील कार्गो सेवा आणखी गतिमान होणार आहे.

ओझर येथून गेल्या १५ जुलै रोजी शेळ्यांची शारजा येथे कार्गो विमानाद्वारे निर्यात सुरू झाली. आता या सेवेला अधिक बळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. युक्रेनच्या कार्गो विमानाद्वारे ओझर ते शारजा ही कार्गो वाहतूक होत आहे. सद्यस्थितीत ओझरला येणाऱ्या कार्गो विमानात कुठलीही मालवाहतूक होत नाही. त्यामुळे ओझरहून निर्यातीसाठीचा खर्चही वाढत आहे. शारजाहून ओझरला काही उत्पादनांची आयात झाली, तर हा वाहतूक खर्च कमी होणार आहे. आता त्यादृष्टीने सकारात्मक बाब समोर आली आहे. शारजा, दुबई आणि अन्य आखाती देशांमधून इजिप्तची विविध प्रकारची फळे जगाच्या बहुतांश भागात जातात. यातील काही फळे भारतातही येतात. मुंबई येथे कार्गो विमानाद्वारे ही फेळ सध्या येत आहेत. हीच फळे ओझर येथे कार्गो विमानाद्वारे आणण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळेच येत्या १२ ऑगस्ट रोजी शेळ्यांच्या निर्यातीसाठी येणाऱ्या कार्गो विमानात ही फळे येणार आहेत. त्यासाठीची चाचणी सध्या सुरू आहे. ही फळे आणण्यात किती खर्च येतो, यंत्रणांचे सहकार्य आणि अन्य बाबी कशा पद्धतीने पार पडतात यावर या फळांची आगामी आवक अवलंबून असणार आहे. मुंबईपेक्षा ओझर येथे नक्कीच कमी खर्चात ही फळे येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसे झाले तर येत्या काळात फळांची आयात ओझर येथे होऊ शकणार आहे. तसेच, मुंबई येथील जवाहरलाल नेहरू बंदराच्या ठिकाणाहून समुद्रमार्गे होणारी शेळ्या-मेंढ्यांची निर्यात ओझरहून कार्गो विमानाद्वारेच होऊ शकेल.

१५०० शेळ्या रवाना

सोमवारी (८ ऑगस्ट) ओझर येथून युक्रेनच्या कार्गो विमानात १५०० शेळ्या-मेंढ्यांची निर्यात झाली. १५६ मेंढ्या आणि १३४४ शेळ्या संध्याकाळच्या सुमारास शारजाला पोहचल्या आहेत. आता यापुढील निर्यात १२ ऑगस्ट रोजी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला भाविक कमी, अन् पोलिसच जास्त!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे भाविकांसह पर्यटक चांगलीच गर्दी करतात. मात्र आज, श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असतानाही भाविकांची अपेक्ष‌ित गर्दी नव्हती. राज्यातील पूरपरिस्थ‌ितीचा हा परिणाम असल्याचे भाविकांनी सांगितले. दरवर्षीप्रमाणे यंदाही गर्दी होणार असे वाटल्याने येथे मोठा पोलिस बंदोबस्त होता. मंदिर परिसरात भाविक कमी आणि पोलिसच जास्त असे चित्र दिसत होते.

त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे पुराच्या बातम्यांनी भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारच्या तुलनेत रविवारची गर्दी अधिक होती. पोल‌िस बंदोबस्त अधिक असल्याने भाविक कमी आणि पोल‌िस जादा असेच चित्र पाहावयास मिळाले होते. सोमवारी दुपारच्या पालखीनंतर आलेले भाविक परतण्यास सुरुवात झाली होती. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेस देखील विशेष गर्दी नव्हती.

आधीच गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाला तोंड देत असल्याने व्यापारी, व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते. मात्र पहिल्या सोमवारी गर्दी कमी असल्याने त्यांचाही चांगलाच हिरमोड झाला. आता येत्या सोमवारी तरी गर्दी वाढेल, अशी आशा त्यांना लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जबाब देण्यासाठी माझ्यावर दबाव

$
0
0

ईसीपी कंपनीचे गोवर्धनदास लालवाणी यांची साक्ष

म. टा. वृत्तसेवा, धुळे

घरकुल प्रकरणात जबाब देण्यासाठी माझ्यावर दबाव असल्याचे ईसीपी कंपनीचे कर्मचारी गोवर्धनदास लालवाणी यांनी मंगळवारी, धुळ्यातील विशेष न्यायालयात सांगितले. या कंपनीला घरकुले बांधण्याचा ठेका खान्देश बिल्डर्सकडून देण्यात आला होता.

जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळ प्रकरणी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी व अॅड. प्रवीण चव्हाण यांच्याकडून ईसीपी कंपनीचे कर्मचारी गोवर्धनदास नारायण लालवाणी यांना साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर करण्यात आले, मात्र लालवाणी यांनी न्यायालयात सांगितले की, जबाब देण्याबाबत माझ्यावर दबाब असल्याने वकील लावण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती जळगाव येथील अॅड. सुधीर कुळकर्णी यांच्यातर्फे अर्जाद्वारे विशेष न्या. आर आर कदम यांच्याकडे केली. त्यावर सरकार पक्षाची बाजू ऐकून घेत जिल्हा विशेष न्या. कदम यांनी साक्षी दरम्यान वकील घेण्याची मंजुरी लालवाणी यांना दिली. परंतु, वकील केवळ त्यांच्याबरोबर उपस्थित राहतील. ते कामकाजात हस्तक्षेप करू शकणार नाही, अशीही सूचना न्यायालयाकडून करण्यात आली. आजच्या कामकाजात मनपाचे तत्कालीन आयुक्त प्रकाश बोखड यांची सरतपासणी व उलटतपासणी झाली.

वकिलांमध्ये वाद

सरतपासणीच्या वेळी विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण हे मनपाचे तत्कालीन आयुक्त प्रकाश बोखड यांची साक्ष नोंदवत असताना त्यांच्या पाठीमागे आरोपीचे वकील जितेंद्र निळे उभे राहून कागदपत्र पाहत होते. त्यांना उद्देशून अॅड. चव्हाण यांनी हरकत घेतली. त्यावर अॅड. निळे यांनी मी कुठे उभे राहावे, हे सांगणारे तुम्ही कोण?, असा प्रश्न केल्याने दोघांमध्ये शाब्दीक चकमक उडाली.

न्यायालयाकडून कडक समज

सोमवारी सायंकाळी संशयित आरोपी सुरेश जैन यांची सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट घेतली होती. त्यासंदर्भात विविध वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्या सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयास दाखवून आरोपींचे हे कृत्य चुकीचे असल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने पोलिसांना विचारणा केली, मात्र दररोज बंदोबस्तावरील पोलिस बदलत असल्याने त्याबाबत आपल्याला काही माहिती नाही, असे न्यायालयातील उपस्थित पोलिसांनी सांगितले. संपूर्ण कामकाजाच्या वेळी आरोपी व पोलिसांनी न्यायालयात उपस्थित राहावे, अशी सूचना विशेष न्या. कदम यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शक्तिप्रदर्शन करीत २५ अर्ज दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जेलरोडला महापालिकेच्या दोन प्रभागात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण २५ अर्ज दाखल करण्यात आले. प्रभाग ३५ ब मधून १० तर प्रभाग ३६ ब मधून १५ उमेदवारांनी समर्थकांसह रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केले.

दोन्ही ठिकाणी बहुरंगी लढत होणार आहे. बुधवारी (दि. १०) छाननी होऊन अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रोहिदास बहिरम आणि सहाय्यक अधिकारी नितीन नेर यांनी दिली. या निवडणुकीसाठी सोमवारपर्यंत एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नव्हता. मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम मुदत होती. नाशिकरोड विभागीय कार्यालयात सकाळपासूनच अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. प्रभाग ३५ मधील शोभना शिंदे आणि ३६ मधील निलेश शेलार या नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात आल्याने ही पोटनिवडणुक होत आहे. शुक्रवार, १२ ऑगस्ट रोजी अर्ज माघारीसाठी मुदत असून शनिवारी, १३ ऑगस्ट रोजी निवडणूक चिन्ह वाटप करून अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. २८ रोजी मतदान आणि २९ रोजी मतमोजणी होणार आहे.

यांनी दाखल केले अर्ज
प्रभाग - ३५ ब : शांताबाई सिद्धार्थ शेजवळ (मनसे), वृषाली संजय नाठे (शिवसेना), मंदाबाई बबन ढिकले (भाजप), मंदा प्रकाश फड (अपक्ष/भाजप), चित्रा मुकुंद ढिकले (शिवसेना), वंदना विजय चाळीसगावकर (राष्ट्रवादी काँग्रेस).

प्रभाग - ३६ ब : प्रवीण मधुकर पवार (मनसे), पंकज सुनील गाडगीळ (शिवसेना), सुनंदा लक्ष्मण मोरे (भाजप), सुनील रामदास शेलार (शिवसेना), सुरेखा सतीश निकम (भाजप), मिलिंद पुंडलिक रसाळ (भाजप/अपक्ष), शशिकांत सुकदेव उन्हवणे (काँग्रेस), गणेश सुकदेव उन्हवणे (काँग्रेस), अमोल उमाकांत मोरे (जनसुराज्य जनशक्ती), मंगेश लक्ष्मण मोरे (भाजप).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वातंत्र्याचा आदर राखणे गरजेचे

$
0
0

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वातंत्र्यलढ्यात नाशिकचा मोठा वाटा आहे. नाशिकच्या स्वातंत्र्यसैनिकांनी पेटविलेल्या मशाली आजही संस्कार म्हणून आपल्यात भिणलेल्या आहेत. मात्र, मिळालेल्या स्वातंत्र्याचा आदर आपण राखतो आहोत का; याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. नियम पाळणे एवढे जरी आपण केले, तर देशाबद्दल खूप काही केले असे म्हणावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर यांनी केले.

नाशिक हेरिटेज क्लबतर्फे मंगळवारी (दि. ९) क्रांतीदिनानिमित्त सीबीएस येथील हुतात्मा स्मारकात स्वातंत्र्यसैनिकांबरोबर हेरिटेज टॉकचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंत बाबा हुदलीकर, दादूसा कलाल, मनोहर कुलकर्णी, पंडीत यलमामे, डॉ. स्नेहल सोनवणे उपस्थित होते.

या वेळी हुदलीकर म्हणाले की, स्वातंत्र्य सैनिकांची स्मारके असून अस्वस्थ आहेत. नाशिकची स्मारके प्रेरणास्थान आहेत अजूनही अनेकांचे आयुष्य घडविण्याचे काम नाशिकची स्मारके करत आहेत. यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे.

स्वातंत्र्यसैनिक कुलकर्णी, सांगळे, चित्रकार चुंबळे यांनी १९४२ व गोवा मुक्ती संग्रामातील आठवणी यावेळी जाग्या केल्या. यावेळी स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्नीही उपस्थित होत्या. भगूरच्या सत्यभामाबाई, सरस्वती मोरे यासह अनेक स्वातंत्र्यसैनिक यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. रामनाथ रावळ यांनी केले.

कार्यक्रमाच्या नियोजनात अतुल शिरसाट, महेश जगताप, रूद्र मजेटीया, हेमंत पाटील, सोमनाथ चौधरी, द्वीप आहेर, गायत्री आहेर, रेणूका जायभाये यांनी सहकार्य केले. या वेळी मविप्रचे संचालक सदस्य मुरलीधर पाटील, निखिल देशमुख, अंकिता पाटील, प्रशांत पाटील, उपस्थित होते. यावेळी नाशिकमधील स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केटीएचएम कॉलेजचे विद्यार्थी व नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘रेल रोको’साठी दीड तास वेटिंग!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने आदिवासी गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या नेतृत्वाखाली नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर मंगळवारी सकाळी रेल रोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मुंबई-भुसावळ पॅसेंजर पाऊण तास उशिरा आल्याने आंदोलकांना दीड तास रेल्वे स्टेशनवर गाडीची प्रतीक्षा करावी लागली. आंदोलनकर्त्यांनी गाडी अर्धा तास रोखून धरली.

धनगर समाजाला एससी व एसटी संवर्गातील आरक्षण देऊ नये, नऊ ऑगस्टला आदिवासी दिनी शासकीय सुटी जाहीर करावी, आदिवासी आश्रमशाळांतील रिक्त पदे त्वरित भरावीत, आश्रमशाळांमधील अनागोंदी थांबवावी या व इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले, हिरामण खोसकर, गोपाळ लहांगे, सोनाली पालवे, विकास परिषदेचे विभागीय अध्यक्ष लकीभाऊ सोनवणे, योगेश शेवरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले. आंदोलनाप्रसंगी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक नितीन पवार, रेल्वे सुरक्षाबलाचे पठाण व नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजय देशमुख या पोलिस अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. आंदोलनकर्त्यांच्या घोषणाबाजीने स्टेशन परिसर गजबजून गेला. स्टेशन प्रबंधक डी. के. जेजुरकर यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाचे ‘मातृत्व अॅप’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका हद्दीतील बाल व माता मृत्यू रोखण्यासाठी पालिकेने डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर व टीसीएसच्या मदतीने स्वतंत्र 'मातृत्व अॅप' तयार केले आहे. या अॅपच्या मदतीने शहरातील गरोदर मातांची नोंदणी केली जाणार असून, अतिजोखमीच्या जागी उपचारावर आता ऑनलाइन लक्ष ठेवले जाणार आहे. विशेष म्हणजे डॉक्टर व नर्सला अॅपकडूनच थेट संबंधित महिलेच्या उपचाराचे संदेश दिले जाणार असल्याने शहरातील बाल व माता मृत्यूचे प्रमाण शुन्यावर येईल, अशी माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली. आयुक्त कृष्णा यांच्या हस्ते मंगळवारी, (दि. ९) या अॅपचे लोकार्पण करण्यात आले.

महापालिका हद्दीत विशेषत: झोपडपट्टी व ग्रामीण भागात गरोदर महिला व बालमृत्यूचे प्रमाण आहे. सहा महिन्यानंतर हे अॅप विकसीत करण्यात यश आले असून मंगळवारी अॅपचे लॉचिंग करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिडको प्रभाग सभापती अश्विनी बोरस्ते, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. विजय डेकाटे, डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअरचे सर्व इनोवेटर्स तसेच वैद्यकिय विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अॅपव्दारे अतिजोखमीच्या गरोदर मातांना लवकर ओळखून त्यांचा योग्यप्रकारे तपासणी व उपचार करणे सोपे होणार आहे. यासाठी संबंधित नर्स व डॉक्टरलाच अॅपची जोडून थेट एसएमएसद्वारे माहिती दिली जाणार आहे. तसेच संबधित महिलेच्या उपचाराची थेट माहिती अॅपवर असणार आहे. सिडकोतील अंबड शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या अॅपची प्रथम चाचणी होणार असून, यानंतर हे अॅप संपूर्ण नाशिक शहरात पुढील महिन्यापर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रे व शहरी समन्वय आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत करण्यात येणार आहे.

या अॅपमुळे महिलांवर थेट लक्ष ठेवून त्यांना वेळेवर उपचार करता येणार आहे. तसेच वेळीच उपचार व्हावा यासाठी एसएमएस लिंकशी जोडून डॉक्टर व नर्सपर्यंत त्याची माहिती पोहचविली जाईल, त्यामुळे माता व बालमृत्यू थांबतील.

- अभिषेक कृष्णा, आयुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलेक्टरांवर निवेदनांचा पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आमदारांना देऊ केलेली पगारवाढ त्वरीत रद्द करावी, शिक्षणावरील खर्च सहा टक्के करावा, स्थगित शिष्यवृत्ती सुरू करावी यासह विविध मागण्यांसाठी छात्रभारती संघटनेने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. याखेरीज अन्य काही संघटनाही ‌विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्याने मंगळवारचा दिवस आंदोलनांचा ठरला. त्यामुळे सीबीएस परिसरात वाहतुकीची कोंडी झाली, तर जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या नागरिकांनाही गैरसायीचा सामना करावा लागला.

अनेक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत आंदोलने केली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. छात्रभारती संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले. राज्यात मुलींवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात कठोर कायद्याची गरज आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून सरकार आमदारांच्या पगारवाढीच्या मागे लागली आहे. आपल्याकडे शिक्षणावर खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत; मात्र, लोकसेवेचे ढोंग करणाऱ्या आमदारांच्या पगारासाठी मुबलक पैसे आहेत. हे नाकर्तेपणाचे लक्षण असल्याची टीकाही निवेदनात करण्यात आली आहे.

सरकारने पात्र विद्यार्थ्यांना इबीसी सवलत द्यावी, मुलींना बारावीपर्यंत मोफत शिक्षण द्यावे, केजी टू पीजी सक्तीचे व सकस शिक्षण द्यावे, शहरातील १६ कॉलेजांनी घेतलेल्या अतिरिक्त शुल्कासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलनात छात्रभारतीचे जिल्हाध्यक्ष सागर निकम, राकेश पवार, विशाल रनमाळे, संविधान गांगुर्डे, मंगेश साबळे, दीपक देवरे, मुन्ना पवार, वैभव गुंजाळ, निखिल गुंजाळ, रोशन वाघ आदींनी सहभाग घेतला.

'शेतकरीविरोधी कायदे रद्द करा'
शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी किसानपुत्रांनी एकत्रित येऊन सरकारच्या कृषीविरोधी धोरणांचा निषेध केला. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड या संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सततच्या नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यांना १०० टक्के कर्जमुक्ती द्यावी. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित व वेतन आयोगाच्या धर्तीवर हमीभाव द्यावा, गाव तेथे गोदाम निर्माण करावे, शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या खते,बियाणे कीटकनाशके उत्पादक कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात यावे, गोधन पाळण्यासाठी गोपालन भत्ता द्यावा, शेतकऱ्यांना शेती पुरक जोडधंदा करण्यासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज द्यावे, केंद्र व राज्य सरकारने कृषिसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प तयार करावा, राजीव गांधी आरोग्य सेवेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना द्यावा, पिक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना थेट देण्यात यावा, ग्रामस्तरावर शेती सुविधा केंद्र सुरू करावीत, अखंड वीजपुरवठा द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उपोषण करू, असा इशारा देण्यात आला आहे.

'विधवांची पेन्शन वाढवा'
आमदारांच्या वेतनात दुपटीने वाढ करण्याऐवजी सरकारने विना अनुदानित शाळेतील शिक्षक, विधवा, निराधार महिलांना दिली जाणारी पेन्शन, अपंग तसेच अंगणवाडी शिक्षिकांच्या वेतनात वाढ करावी, अशी मागणी भारतीय मानवाधिकार परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले. विना अनुदानित शाळेतील शिक्षकांना कायम करण्यासाठी पैसे नसल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. विधवा, निराधार, अपंग, अंगणवाडी सेविका यांना पेन्शन किंवा वेतन द्यायला पाच पाच महिने विलंब केला जातो. मात्र, आमदारांचे पगार दुपटीने वाढविण्यास पैसे कसे असतात असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. आंदालनात विरेंद्रसिंग टिळे, करणसिंग बावरी, अंकुश राऊत आदी सहभागी झाले.

शिक्षक-कामगार कृती समितीची निदर्शने
केंद्र व राज्य सरकारच्या कामगार धोरणांच्या निषेधार्थ केंद्र व राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक-कामगार कर्मचारी कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. वाढत्या महागाईला व बेकारीला आळा घाला, सर्व कामगारांना दरमहा १८ हजार रुपये वेतन द्या, कंत्राटी कामगारांना कायम कामगारांइतकाच पगार द्या, कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करा, सार्वजिनिक उद्योगांना संरक्षण द्या, १०० टक्के विदेशी भांडवलाला मज्जाव करा, सर्व कष्टकऱ्यांना पेन्शन द्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् किल्ल्यांशी झाली मैत्री!

$
0
0

दुर्ग संवर्धनतर्फे फ्रेंडशिप डे साजरा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील गडकोट आणि किल्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानतर्फे फ्रेंडशिप डे चे औचित्य साधून बागलाणमधील मांगीतुंगी पर्वतावर ३२ वी श्रमदान मोहीम राबविण्यात आली.

एकीकडे शहरात मोठ्या उत्साहात आऊटिंग करून हा दिवस साजरा होत असताना दुर्गसंवर्धनाने नाशिकचे किल्लेच आपले खरे मित्र आहेत आणि त्यांच्या संवर्धनासाठी, त्यांच्याशी घट्ट मैत्री करण्यासाठी हा पूर्ण दिवस मांगीतुंगी या पर्वतावर श्रमदान करून साजरा करण्यात आला. सेलबारी रांगेतील न्हावीगड व तांबोल्या गडाच्या रांगेत हा देव डोंगर आहे. समुद्रसपाटी पासून तब्बल ४,३६६ फूट उंच हा पर्वत असून या ठिकाणी खोदीव गुहा, पाण्याची टाकी आणि १०८ फुटी जगातील सर्वात मोठी ऋषभ भगवान यांची मूर्तीदेखील आहे.

हा पर्वत जैव विविधतेने नटलेला असून तेथे ९९ शिल्पेदेखील आहे. येथून तुंगी नदीचा उगमदेखील झालेला आहे. या पर्वतावर जाण्यासाठी ४,५०० हजार पायऱ्या असून पायथ्याजवळ असलेल्या भिलवाडा गावातील भिल्ल डोलीच्या सहाय्याने पर्यटकांना वर घेऊन जातात.

दुर्गसंवर्धन प्रतिष्ठानतर्फे याठिकाणी असलेली तीन तळी स्वच्छ केल्या. तसेच पर्वतावर वृक्षांचे रोपण करून त्याला फ्रेन्डशिप डे चे बँडदेखील बांधलेत. तसेच पाच हजार बियांचा टप्पादेखील या मोहिमेत पूर्ण करून आत्तापर्यंत तब्बल दहा हजार बिया विविध किल्ल्यावर टाकल्या आहेत. या मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, भीमराव राजोळे, आशिष बनकर, आकाश जाधव, सागर बनकर, गणेश जाधव, धनंजय बागड, रोशन पेलमहाले, दर्शन घुगे, सागर घोलप, अजित जगताप, संदीप थेटे आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूषण लोंढेला ठोकल्या बेड्या

$
0
0

दुहेरी हत्याकांड प्रकरणी सात महिन्यांनंतर लागला पोलिसांच्या हाती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातपूर येथील स्वारबाबानगर येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी सात महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणारा नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण यासह अन्य दोघांना ग्रामीण पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. सोमवारी पहाटे पुणे येथे ही कारवाई झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली.

सराईत गुन्हेगार अर्जुन महेश आव्हाड ऊर्फ वाट्या व निखिल विलास गवळे यांच्या खून प्रकरणात सहभाग असल्याचा पुरावा पोलिसांना मिळाल्यापासून भूषणसह संदीप रमेश गांगुर्डे (२५, रा. सातपूर) व आकाश दीपक मोहिते (२५, रा. त्रिमूर्ती चौक) हे फरार होते. संशयित पुण्यातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या मॉडर्न कॉलनीतील अमित अपार्टमेंट या इमारतीत फ्लॅट भाड्याने घेऊन राहत होते. याबाबतची पक्की खबर ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर नवले, उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र शिलावट यांनी पुण्याच्या फरासखाणा पोलिसांची मदत घेतली. जीममध्ये जाणाऱ्या संशय‌ितांवर दोन दिवस पाळत ठेवण्यात आली. सोमवारी रात्री पुणे पोलिसांच्या मदतीने सापळा रचत सदर फ्लॅटवर छापा मारण्यात आला. यावेळी लोंढे याने फ्लॅटच्या मागील दरवाजातून बाहेर पडत अपार्टमेंटच्या उंच भिंतीवरून उडी मारून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून जेरबंद केले. या पळापळी भूषणसह पुणे शहर पोलिसातील एक कर्मचारी जखमी झाला. उर्वरित दोघांना पळून जाण्याची संधीच पोलिसांनी दिली नाही.

दरम्यान, या तिघांना त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशन येथून न्यायालयात हजर करण्यात आले. बचाव व सरकारी पक्षाचा यु​क्तिवाद संपल्यानंतर न्यायाधीशांनी ​तिघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

असा होता गुन्हा

प्रिन्स सिंगच्या वाढदिवसानिमित्त ३१ डिसेंबर २०१५ ला वैतरणा धरणावरील हॉटेल पिकनिक पॉईंटवर पार्टी ठेवली होती. पार्टीत उद्भवलेल्या वादामुळे सराईत गुन्हेगार आव्हाड व गवळे या दोघांची सातपूरमधील पीएल ग्रुपच्या कार्यालयात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर या दोघांचे मृतदेह एन्डिव्हर फोर्ड कारमध्ये (एमएच १४, बीएफ १२१२) टाकून जव्हार रोडलगत तोरंगण घाटातील दरीत फेकून दिले होते. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी पीएल ग्रुपचे सदस्य प्रिन्स चित्रसेन सिंग, सनी ऊर्फ ललित अशोक विठ्ठलकर, निखिल मधुकर निकुंभ, वतन शिवाजी पवार व किशोर गायकवाड या पाच संशयितांना अटक केली. भूषण लोढेंचा २२ जानेवारीला विवाह असल्याने हायकोर्टाने त्यास तीन दिवसांचा जामीन मंजूर केला होता. मात्र, जामिनाची मुदत संपताच भूषण पुन्हा फरार झाला.

लपण्यासाठी केले नामांतर

पाठलाग करणाऱ्या पोलिसांना चकवण्यासाठी वरील तिन्ही संशयित गुजरात, राजस्थान यानंतर कोल्हापूर व शेवटी पुणे येथे पोहोचले. राजस्थान येथील कोटा येथील लॉजमध्ये त्यांनी आश्रय घेतला होता. मात्र, स्थानिक पोलिस सातत्याने तपासणी करीत असल्याने तेथून ते जयपूर येथील अचरोल येथे पोहचले. या ठिकाणी विद्यापीठ असून, विद्यार्थी असल्याचे भासवत त्यांनी काही काळ व्यथीत केला. गुजरातमधील बलसाड येथेही हे मुक्कामी होते. तेथून संशयित कोल्हापूरला पोहोचले. पहिलवान असल्याचे भासवून बिंदू चौकातील एका व्यायामशाळेजवळ त्यांनी घर भाड्याने घेतले. यानंतर, फेसबुकवरील मित्रांच्या सहकार्याने त्यांनी पुणे गाठले. आयटी कंपन्यात नोकरी शोधण्याचा बहाणा करीत संशयितांनी पुण्यात बस्तान मांडले. एक व्यक्ती भूषणच्या संपर्कात होती. त्यालाच पोलिसांनी टार्गेट करीत ​तिघांना अटक करून तपासाचा आणखी एक टप्पा पूर्ण केला.

दुहेरी हत्या प्रकरणी एप्रिलमध्ये जिल्हा कोर्टात सुमारे २५० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. लोंढे व त्याच्या मित्रांना अटक झाल्याने चौकशीअंती पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले जाईल.

- अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबड पोलिस ठाण्यात बिबट्याचे दर्शन

$
0
0

नागरिकांमध्ये भीती; बिबट्याचा थांगपत्ता लागेना

म. टा. प्रतिनिधी सिडको

सिडकोतील अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी मध्यरात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, दिवसभर वनविभागाने याचा तपास करण्याचाही प्रयत्न केला नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

सोमवारी मध्यरात्री पोलिस ठाण्यातील कर्मचारी राजेंद्र ढोले व दीपक वाणी हे परिसरात गस्त घालून काही कामानिमित्त पोलिस ठाण्यात आले असता त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. याबाबतची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनीही तातडीने सीसीटीव्ही फुटेज बघून खरोखरच बिबट्या आहे की नाही याची खात्री केली. रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास हा बिबट्या रस्त्याने जाताना दिसला, मात्र गाडीचा आवाज आल्यानंतर या बिबट्याने थेट पोलिस ठाण्याच्या आवारात धाव घेतली. पोलिस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या भंगार गाड्यांच्या दिशेने हा बिबट्या पळाल्याचे दिसून आले. मात्र त्यानंतर हा कुठे गेला याचा शोध लागला नाही. पोलिस ठाण्यापासून जवळच असलेल्या पेलीकन पार्कमध्ये हा बिबट्या गेला की सिडकोच्या नागरीवस्तीत कोठे जाऊन थांबला आहे याबाबत तर्कवितर्क काढले जात आहे. दोनच दिवसांपूर्वी पाथर्डी शिवारातील एका मळ्यातही बिबट्याचा वावर दिसल्याची चर्चा सुरू आहे. पाथर्डी येथे दिसलेला हा तो बिबट्या असावा का याबाबत शंकाकुंशका व्यक्‍त होत आहेत.

अंबड पोलिसांनी तातडीने याबाबतची माहिती वनविभागाला कळविली असली तरी वनविभगाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ पाहणी करून या ठिकाणाहून काढता पाय घेतल्याचे नागरिकांनी सांगितले.

रात्री जिल्हा रुग्णालयातील काम आटोपून आम्ही पोलिस ठाण्यात आलो. त्यावेळी गाडीच्या लाइटच्या प्रकाशात बिबट्या दिसून आला. त्यानंतर वरिष्ठांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून तातडीने हा बिबट्या असल्याची खात्री व्यक्त केली.

- राजेंद्र ढोले, पोलिस कर्मचारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

$
0
0

तीन तालुक्यांना सर्वाधिक फटका

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये सुमारे ११०० हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. हे नुकसान अधिक असू शकते, अशी शक्यताही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गत आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतपिकांचे नुकसान झाले आहे. गोदावरीसह अन्य नद्या, नाले, ओढ्यांना पूर आल्यामुळे शेतांमध्ये पाणी गेले. त्यामुळे अनेक ठिकाणी पिके वाहून गेली. शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज काढली असून, कर्जपुनर्गठणाची प्रक्रिया सुरू असतानाच चांगला पाऊस होईल या आशेने शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना सुरुवात केली होती. मात्र ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने शेतीक्षेत्राला मोठा फटका बसला आहे. पावसाचे पाणी शेतात साचल्याने पिके वाहून गेली आहेत. नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने सुरू केले असून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि सिन्नर या तीन तालुक्यांत ११६ गावे या पुरामुळे बाधित झाली आहेत.

या भागातील ११०५.७५ हेक्टर शेती क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने भात, नागली, वरई, सोयाबीन, ऊस, भाजीपाला या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. देवळा, येवला, नांदगाव, मालेगाव आणि पेठ तालुक्यात शेती पिकांचे नुकसान झाले नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

२९८ गावे बाधित; ११ मृतांच्या वारसांना मदत

अतिवृष्टीमुळे २९८ गावे बाधित झाली आहेत. दिंडोरीत सर्वाधिक १२८, निफाड ४४, नाशिक ३५, पेठ १५, सुरगाणा १४, बागलाण, कळवण आणि सिन्नरमधील प्रत्येकी ११, देवळा ९, चांदवड ६, त्र्यंबकेश्वर ५, येवला ४, इगतपुरी ३ आणि नांदगाव तालुक्यातील दोन गावांचा सामावेश आहे. पावसाने १३ जणांचा बळी घेतला असून, आतापर्यंत ११ जणांच्या वारसांना सरकारने मदत दिली आहे. पावसानेह २ हजार ९११ घरांचे अंशतः, तर ४०८ घरांचे पूर्णत: नुकसान केले आहे. निफाड तालुक्यात घरांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुलगुरू डॉ. साळुंखे पदभारातून ‘मुक्त’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'गांधीवध' अशा उल्लेखामुळे चर्चेत आलेले आणि १७ जणांना कायम करण्याच्या निर्णयाचे शेवटपर्यंत भिजत घोंगडे ठेवणारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे १४ वे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. १८ ऑगस्ट रोजी ते कुलगुरूपदी कायम राहणार आहेत. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याची कुलगुरू यांची प्रतिक्रिया असली तरी उलटसुलट विधानांना चांगलाच ऊत आला होता.

डॉ. साळुंखे यांची कारकीर्द धडाडीची राहिली असली तरी त्यामुळे ते अनेकदा वादातही सापडले. कुलगुरूंचा राजीनामा कुलपती तथा राज्याचे राज्यपाल सी विद्यासागर यांच्याकडे तो पाठविण्यात आला, राज्यपालांनी तो मंजूरही केला आहे. मुक्त विद्यापीठाचे १४ वे कुलगुरू म्हणून प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी १९ ऑगस्ट २०१४ रोजी पदभार स्वीकारला होता. गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात डॉ. साळुंखे यांनी विद्यापीठाच्या हिताचे निर्णय घेऊन प्रशासनात माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून बदल केले. परंतु त्यांची कारकीर्द काही वादग्रस्त निर्णयांमुळे चर्चेत राहिली. विद्यापीठातील १०३ जणांचा पेन्शनचा प्रश्न असो की सहायक पदावर काही काळ काम केलेल्या १७ जणांना कायम करून घेण्याचा प्रश्न कुलगुरू डॉ. साळुंखे यांनी कोणताही प्रश्न तडीस नेला नाही. अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या चतुर्थ श्रेणी (शिपाई) कर्मचाऱ्यांना सहायक म्हणून पदोन्नती मिळाली नसल्याचा निर्णय त्यानी पेंडिंग ठेवला होता. त्यावरून वाद मात्र अनेक झाले. १७ जणांना कायम करण्याच्या प्रश्नावरून तर नाशिकमधील राजकीय नेत्यांचाही हस्तक्षेप झाला होता. त्यावेळीही कुलगुरूंनी काहीही निर्णय दिला नाही. या प्रश्नी त्यांनी शिक्षणमंत्र्यांचाही आदेश धुडकावला. मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रे विद्याशाखा आयोजित 'यशवंतराव चव्हाण आणि आधुनिक महाराष्ट्र' या राष्ट्रीय चर्चासत्रात कुलगुरूंनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत गांधीहत्येचा उल्लेख गांधीवध असा केला होता. त्यावेळी स्वत: पवार यांनी 'त्या' शब्दाची दुरुस्ती केली होती. अशाप्रकारे त्यांची कारकीर्द काही अंशी वादग्रस्तच राहिली. डॉ. साळुंखे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदाचा अतिरिक्त कार्यभार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे सोपविला जाणार आहे.

मुक्त विद्यापीठ प्रभारींच्या भरोसे...!

मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राजीनामा दिल्याने या पदावर आता आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. गेल्याच महिन्यात कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांचाही कार्यकाल संपल्याने त्या पदावर शिलानाथ जाधव प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. ही दोन्हीही निर्णय घेणारी पदे आहेत व तीच प्रभारी झाल्याने मुक्त विद्यापीठ आता प्रभारींच्या भरोसे असल्याचेच चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुहेरी हत्याकांड प्रकरणी तपासाला गती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड येथील रोकडोबावाडीत रविवारी मध्यरात्री गुलाब शेख आणि अकबर शेख या युवकांचा खून झाला होता. त्यांचा मित्र संदीप जैन याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचे गूढ उकलण्यासाठी उपनगर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. त्यांनी तीन पथके नेमली असून, ती वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली आहेत. पोलिसांनी मंगळवारी परिसरातील सुमारे २५-३० जणांची चौकशी केली.

गुलाब व अकबर शेख या दोघांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. उपनगर पोलिस ठाण्यावर त्यांनी मोर्चाही काढला होता. रात्री उशिरा पोलिसांना शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर त्यांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. तपासाचे कोणतेही धागेदोरे नसल्यामुळे मुख्य साक्षीदार संदीप जैन हाच पोलिसांचा मुख्य आधार आहे. तथापि, त्याने अद्याप आवश्यक माहिती दिलेली नाही. त्यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. घटना किचकट असली तरी आव्हान स्वीकारले असून, गुन्हेगार लवकरच पकडले जातील, असा आशावाद पोलिस उपयुक्त श्रीकांत धिवरे यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल इन्शूरन्स कंपनीला ग्राहक मंचाचा दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चोरी गेलेल्या मोबाइलचा इन्शूरन्स देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंपनीस ग्राहक मंचाने दणका दिला. तक्रारदारास २३ हजार ५०० रुपये व त्यावर १० टक्के व्याज, तसेच मानसिक त्रासापोटी आठ हजार रुपये देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक मंचाने दिले आहेत.

मालेगाव स्टॅण्ड परिसरात राहणाऱ्या रूपचंद रामचंद सुराणा यांनी तक्रार दिली होती. सुराणा यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी ५ ऑक्टोबर २०१४ रोजी सॅमसंग कंपनीचा एन ७५०० हा मोबाइल नाशिकरोड येथील दुकानातून २३ हजार ५०० रुपयांना खरेदी केला होता. तसेच मोबाइल चोरीला जाणे किंवा इतर बाबींमुळे त्याचे नुकसान झाले, तर सुरक्षा म्हणून मुंबईतील कश्मिरारोडवरील दहिसर चेक नाका येथील पीक-मी सोल्युशन्स इं .प्रा.लि. या कंपनीकडून ७ ऑक्टोबर २०१४ पासून पुढे एका वर्षाचा विमा काढला. १४ जून २०१६ रोजी सुराणा रात्री १० वाजेच्या सुमारास पंचवटी येथे रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांपैकी एकाने त्यांचा मोबाइल खेचून धूम ठोकली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर, सुराणा यांनी संबंधित कंपनीकडे विम्याची रक्कम मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू केला. मात्र, कंपनीने अगदीच थंड प्रतिसाद दिला. यानंतर, एक दिवस कंपनीने ओळखपत्रात आणि क्लेम फॉर्मच्या स्वाक्षरीत बदल असल्याचे तोंडी कारण देत सुराणा यांचा क्लेम फेटाळला. दरम्यान, सुराणा यांनी कंपनीस नोटीस पाठवून विमाकृत मोबाइलच्या रकमेची मागणी केली. कंपनी दादच देत नसल्याने अॅड. रूबी सुराणा यांच्या मार्फत सुराणा यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडे दाद मागितली. न्यायमंचाने कंपनीस नोटीस पाठवून सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत. मात्र, कंपनीने या नोटीसीला उत्तर दिले नाही. यानंतर, एकतर्फी सुनावणी घेत मंचचे सदस्य कारभारी जाधव यांनी न्यायनिर्णय सुनावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल कॉलेजचे नाशिकला गिफ्ट?

$
0
0

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचे सकारात्मक संकेत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज सुरू व्हावे यासाठी सत्ताधारी भाजपने कंबर कसली आहे. एकट्या नाशिक शहरात सिव्हिल आणि संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये मिळून तब्बल साडेआठशे बेडची व्यवस्था असल्याने यापैकीच एका हॉस्पिटलला मेडिकल कॉलेजचा दर्जा मिळण्याची शक्यता बळावली आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनीही याबाबत सकारात्मकता दर्शवित या विभागाच्या सचिवांना याकामी लक्ष घालण्यास सांगितले आहे. त्यामुळे नाशिकला लवकरच मेडिकल कॉलेजचे गिफ्ट मिळण्याची चिन्हे आहेत.

वैद्यकीय क्षेत्राकडे वाढणारा नवीन पिढीचा ओढा पहाता अजूनही विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय कॉलेजांमध्ये प्रवेशापासून वंचित राहावे लागते. शहर आणि जिल्ह्यात सहा खासगी मेडिकल कॉलेजेस असून तेथे विविध वैद्यकशाखांचे शिक्षण घेता येते. मात्र तेथे मर्यादित असणाऱ्या जागा, न परवडणारे प्रवेश शुल्क यांमुळे इच्छा असूनही अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येत नाही. पुणे, मुंबईतही मर्यादित जागा असल्याने नाशिककरांची पीछेहाट होते.

उत्तर महाराष्ट्रात केवळ धुळे येथेच सरकारचे वैद्यकीय कॉलेज आहे. नाशिकमध्ये अशा प्रकारचे शासकीय महाविद्यालय सुरू झाल्यास येथील विद्यार्थी आणि पालकवर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नाशिकमध्येच राज्य सरकारने मेडिकल कॉलेज सुरू करावे, अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुनील आडके यांनी महाजन यांच्याकडे केली. नुकतेच त्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.

सिव्हिल हॉस्पिटल येथे अलिकडेच नवीन इमारत उभारण्यात आली असून लॅब, नर्सिंग कॉलेजदेखील आहे. सर्वसाधारण आजारांवर येथे उपचार होतात. तर संदर्भ सेवा हॉस्पिटलमध्ये हृदयरोग, किडनी आणि तत्सम गंभीर आजारांवर उपचार केले जातात. त्यासाठीची महागडी आणि अत्याधुनिक मशिनरीही उपलब्ध आहे. सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने येथे लवकरात लवकर मेडिकल कॉलेज सुरू करून विद्यार्थी आणि पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याबाबत महाजन यांनीही तेवढीच तत्परता दाखवित सचिवांना व्यवहार्यता तपासून कार्यवाही करण्याचे आदेशही दिलेत.

मेडिकल कॉलेजसाठी केवळ वर्गखोल्या, बेंचेस, प्रशिक्षित प्राध्यापक वर्गाची गरज आहे. या मेडिकल कॉलेजमध्ये मंजूर जागांपैकी किमान ३० टक्के जागा नाशिककरांच्या वाट्याला येतील. येथून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांना सरकारी हॉस्पिटल्समध्येच नोकरी मिळू शकेल. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

- सुनील आडके,

जिल्हा सरचिटणीस, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशनपुरवठा सुरळीत

$
0
0

दुकानदारांचा संप मागे; हमाली, वाहतूक खर्च सरकार देणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वस्त धान्य दुकानापर्यंत माल पोहोचविताना वाहतुकीवर आणि हमालीवर होणारा वाहतूक खर्च करण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवली आहे. याखेरीज दरमहा पगाराच्या मागणीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा करण्याची ग्वाही अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिल्याने स्वस्त धान्य दुकानदार संघटनांनी संप मागे घेतला आहे. उद्यापासून जिल्ह्यासह राज्यभरातील रेशन दुकानदार धान्य उचल करतील, अशी माहिती संघटनेने दिली.

सरकार दरबारी अनेक मागण्या प्रलंबित असल्याने रेशन दुकानदारांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले होते. १ ऑगस्टपासून सुरू झालेला हा संप तब्बल १० दिवस चालला. जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थिती आणि रेशन दुकानदारांच्या संपामुळे धान्य मिळत नसल्याने पूरग्रस्तांचे अतोनात हाल झाले. सरकार आणि स्वस्त धान्य दुकानदारांच्या या वादात सामान्य नागरिक भरडला जाऊ लागल्याने या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी पुरवठा विभागाने हालचाली गतिमान केल्या. मुंबईत अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावले होते. महाराष्ट्र फेअर प्राइज शॉपकीपर्स फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर, विजय गुप्ते, शहाजी लोखंडे, बाबुराव ममाडे, बाबुलाल शहा आदी पदाधिकाऱ्यांनी बापट यांच्यासमवेत चर्चा केली. स्वस्त धान्य वाहतुकीचा आणि हमालीचे पैसे रेशन दुकानदारांना द्यावे लागू नयेत, ही संघटनांची मागणी पुरवठामंत्र्यांनी मान्य केल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे यांनी दिली. दरमहा ३० ते ३५ हजार रुपये वेतन द्यावे, ही मागणी तूर्तास मान्य करणे शक्य नसले तरी अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यावर चर्चा करण्यात येईल, अशी ग्वाही देत बापट यांनी संघटनेला संप मागे घेण्याबाबत आव्हान केले. त्याला प्रतिसाद देत राज्यभरात संप मागे घेण्यात आल्याची माहिती कापसे यांनी दिली.

रेशन दुकानदारांना मदतनीस ठेवण्यास मान्यता, सरकारकडे थकीत असलेली रक्कम देण्याची ग्वाही या मागण्यांबाबतही सरकारने सकारात्मकता दर्शवली आहे. राज्यातील रेशन व केरोसीन परवानाधारकांना तामिळनाडू राज्याच्या धर्तिवर अन्न महामंडळ स्थापन करून सरकारी सेवेत सामावून घ्यावे, ही एकच मागणी तूर्तास अमान्य करण्यात आली आहे.

अल्प कमिशनवर व्यवसाय करणे रेशन दुकानदारांना परवडेनासे झाले आहे. त्यात हमाली आणि वाहतुकीवरील खर्चही दुकानदारांनाच करावा लागत असल्याने रेशन दुकानदारांची कुटुंबच रस्त्यावर येण्याची वेळ आली होती. सरकारने मान्य केलेल्या मागण्या हा संघटनेचा नव्हे, तर रेशन दुकानदारांचा विजय आहे. उर्वरित मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी पाठपुरावा सुरूच राहील.

- निवृत्ती कापसे, जिल्हाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images