Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पूर्ववैमनस्यातूनच दुहेरी हत्याकांड!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी सात संशयितांना अटक केली आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणातून हे दुहेरी हत्याकांड घडल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिश कैलास निकम, नितीन निवृत्ती बनकर (दोघे रा. रोकडोबावाडी), प्रशांत नाना जाधव (रा. जाधव मळा), आकाश नामदेव खताळे, अमोल अंबादास पठाडे, गोविंदा शंकर इंगोले (तिघे रा. विहितगाव) यांच्यासह एका अल्पवयीन संशयिताला अटक करण्यात आली आहे.

सोमवारी (८ ऑगस्ट) रात्री साडेअकराच्या सुमारास रोकडोबावाडीतील वालदेवी नदीकिनारी अकबर शेख याचा मृतदेह आढळून आला होता. गुलाम शेख याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर संदीप जैन गंभीर जखमी असून, त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मृतांच्या नातलगांनी हा खुनाचा प्रकार असल्याचा दावा केल्यानंतर उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मृतदेहांचे विच्छेदन करणाऱ्या अधिकाऱ्यांनीही खुनाचा संशय व्यक्त केला होता. या प्रकरणाचा तपास करीत असताना पोलिसांनी आतिश निकम याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून, तिघेजण पसार आहेत. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लायन्स क्लबकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने अनेकांची घरे वाहून गेली. चांदोरी, सायखेडा व नदी जवळच्या घरांना मोठे नुकसान सोसावे लागले. या निसर्गनिर्मित परिस्थीतिशी दोन हात करण्यासाठी लायन्स क्लबच्या शिकागो येथील मुख्या कार्यालयाने ५ हजार डॉलर्सची मदत केली आहे.

जाणीव लायन्स क्लब पंचवटीच्या अध्यक्षा वैद्य नीलिमा जाधव तसेच माजी प्रांतपाल वैद्य विक्रांत जाधव यांनी प्रांतपाल चंद्रहास शेट्टी यांना नाशिक येथील परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यांनीही तत्काळ पावले उचलून पूरग्रस्तांची परिस्थिती शिकागो येथील कार्यालयाला कळवली. या कार्यालयाने पूरग्रस्तांसाठी तातडीने पाच हजार डॉलर्सची मदत जाहीर केली आहे.

सरकारच्या मदतीने मदत साहित्य पूरग्रस्ताना दिले जाणार आहे. लायन्स नाशिकच्या सर्व क्लबला बरोबर घेऊन हे मदत कार्य केले जाणार आहे. तसेच मदतीचे वाटप जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे, असे वैद्य जाधव यांनी सांगितले. नाशिकसाठी आठ वर्षात आंतरराष्ट्रीय संघटनेकडून मदत येण्याची तिसरी वेळ आहे. २०१२ मध्ये कल्पतरू या डोळ्याच्या रुग्णालयाला १ कोटी ६० लाखांची मदत देण्यात आली होती. नाशिकच्या सर्व लायन सभासदांना लायन संघटनेचा अभिमान असून वेळेला धावणारी संघटना म्हणून नावलौकिक सिध्द केला आहे. या मदतकार्यास विनोद कोठावदे, उषा तिवारी, हेमंत वाझे, स्वप्नील कोठारी, लायन सोनावणे, अमित प्रभू, अजय अहुजा, जयंत येवला, राजेश कोठावदे, जे. पी. जाधव, वसंत घटे, हंसराज देशमुख, विनोद सोनजे, प्रकाश पाटील, निशा भरभात आदी प्रयत्नशील आहेत.

वस्तू-सेवा स्वरुपात मदत
पूरग्रस्ताना भांडी, कपडे, पाणी, औषधं, धान्य, खाद्य तसेच उबदार कपड्यांसाठी मदत मान्य करण्यात आली आहे. अभ्यासपूर्ण पद्धतीने योग्य व्यक्तींना मदत करण्याचे आदेश प्रांतपाल चंद्रहास शेट्टी यांना संघटनेने दिले आहेत. शहराला अशा प्रकारची मदत सन २००८ मध्ये वैद्य विक्रांत यांच्या पाठपुराव्याने मिळाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांना ऑनलाइन प्रशिक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यस्थळी अत्याधुनिक प्रशिक्षण मिळण्यास आता सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र पोलिस अॅकॅडमीमध्ये (एमपीए) त्यासाठी 'इ एमपीए स्टुडिओं विकसित करण्यात आला असून त्याचे उदघाटन बुधवारी प्रशिक्षण व खास पथकाचे अपर पोलिस महासंचालक डॉ. के. वेंकटेशम यांच्या हस्ते झाले.

गुन्हेगारीची मोडस बदलत असून जटील गुन्ह्यांचा तपास लावणे पोलिसांसाठी आव्हान ठरू लागले आहे. चोरट्यांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांनाही काळानुरूप आपल्या कार्यपध्दतीत बदल करणे अनिवार्य झाले आहे. प्रशिक्षण हाच त्यावर सर्वोत्तम उपाय असला तरी कायदा व सुव्यवस्था राखणारे पोलिस त्यापासून वंचित राहातात. दैनंदिन कामाचा ताण, बंदोबस्त, गुन्ह्यांची उकल करण्याचे आव्हान अन् तत्सम अनेक कारणांमुळे त्यांना इच्छा असूनही प्रशिक्षण घेता येत नाही. वेळेचा अभाव किंवा चालढलकपणामुळेही अधिकाऱ्यांना प्रशिक्षणापासून वंचित राहावे लागते. प्रशिक्षणाच्या सक्तीबाबत गृह विभाग आग्रही असून अधिकाऱ्यांना घरबसल्या प्रशिक्षण घेता येईल, अशी व्यवस्था 'एमपीए'च्या माध्यमातून निर्माण करण्यात आली आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशी ऑनलाइन प्रणाली 'एमपीए'मध्ये विकसित करण्यात आली असून प्रायोगिक स्तरावर प्रशिक्षणाचे वर्गही सुरू करण्यात आले आहेत. या प्रशिक्षणाचे रेकॉर्डिंग जेथे होईल त्या 'इ एमपीए स्टुडिओ'चे उदघाटन वेंकटेशम यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, नाशिक परिक्षेत्रच विशेष पोलिस महानिरीक्षक विनय चौबे, 'एमपीए'चे संचालक नवल बजाज आदी मान्यवर उपस्थित होते.

जर्मनीहून साधनसामुग्री
'एमपीए'मध्ये प्रशिक्षणार्थींसाठी अद्यावत फिटनेस सेंटर उभारण्यात आले असून व्यायामाची साधन सामग्री जर्मनीहून मागविण्यात आली आहे. ५० लाख रुपये खर्चून उभारलेल्या या फिटनेस सेंटरसह रॅपलिंग व क्लायबिंग वॉलची वेंकटेशम यांनी पाहणी केली.

मोबाइलद्वारेही प्रशिक्षण सुविधा
राज्यात अमरावती, कोकण, कोल्हापूर विभागासह १३ ठि‌काणी पूर्वीपासूनच पोलिस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध आहे. 'एमपीए'ने डिझाईन केलेले प्रशिक्षण तेथे दिले जाते. मात्र, अनेकदा अधिकाऱ्यांचा निरुत्साह किंवा कामाच्या व्यापामुळे अधिकाऱ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी जाता येत नाही. त्याचा परिणाम थेट त्यांची वेतनवाढ आणि पदोन्नतीवर होतो. मात्र, आता इ अॅकॅडमीमुळे अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातही प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत. विशिष्ठ सॉफ्टवेअरद्वारे लॅपटॉप, टॅब, किंवा अगदी मोबाइलवरही हे प्रशिक्षण घेता येते याचे प्रात्यक्षिक बुधवारी 'एमपीए'च्या स्टुडिओमध्ये दाखविण्यात आले. विशेष म्हणजे राज्यातील प्रत्येक विभागात ‌विशिष्ठ अधिकाऱ्यांनी इ 'एमपीए'मधील हे प्रात्यक्षिक लाईव्ह अनुभवले. पहिल्या टप्प्यात एकावेळी १०० अधिकारी प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत. यादीत नाव असलेल्या १०० अधिकाऱ्यांना विशिष्ट सॉफ्टवेअर डाऊनलोड करून मोबाइलवरही हे प्रशिक्षण घेणे शक्य होणार आहे.

पोलिस उपनिरीक्षकापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच आता प्रशिक्षण घेता येऊ शकेल. प्रशिक्षणाचा विषय आणि अधिकाऱ्याचे पद यांनुसार अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. किमान सहा तासांचे हे प्रशिक्षण असेल. टप्प्याटप्प्याने पोलिस कॉन्स्टेबललाही या प्रशिक्षणाच्या कक्षेत आणले जाईल. तणाव व्यवस्थापनासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन पोलिसांना त्यांच्या कार्यस्थळीच मिळू शकेल.
- डॉ. के. वेंकटेशम, अपर पोलिस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रह्मगिरी फेरीवेळी गैरप्रकार रोखा

$
0
0

जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणांना आदेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वरमध्ये श्रावणी सोमवारी किमान चार लाख भाविक ब्रह्मगिरी प्रदक्षिणा घालतील, असा अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तवला आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने नियोजन सुरू केले असून, ब्रह्मगिरी फेरीवेळी गैरप्रकार घडणार नाहीत याची काळजी घ्या, असे आदेश यंत्रणांना दिले आहेत.

जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी त्र्यंबकेवर येथे जाऊन तिसऱ्या सोमवारच्या तयारीचा आढावा घेतला. पावसामुळे अनेक भागात पाणी साचले असून, मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. त्यामुळे या भागात भाविक पाय घसरून पडण्याची शक्यता असून, फेरीमार्गावरील रस्ते पाण्याने स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रदक्षिणेनंतर त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे देवस्थान ट्रस्टने परिसरात चोख व्यवस्था करावी, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी पासेसची व्यवस्था करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. परिसरातील प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचाही त्यांनी आढावा घेतला. यंदा १३ ऑगस्टला दुसरा शनिवार, १४ ला रविवार आणि १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन अशा लागोपाठ सुट्ट्या असून, भाविकांचा ओघ राहणार आहे. फेरीमार्गावर अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी वीज व्यवस्था करावी, छेडछाडीचे प्रकार घडणार नाहीत याची पोलिसांनी काळजी घ्यावी, असे आदेश पोलिसांना दिले आहेत.

खासगी वाहनांना प्रवेश बंदी

तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत असल्याने खासगी वाहनांना त्र्यंबकेश्वरमध्ये बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिककडून येणारी वाहने खंबाळे येथे उभी करून भाविकांना एसटीने जावे लागणार आहे. जव्हारकडून येणारी वाहने आंबोली येथे थांबविण्यात येणार असून, तेथूनही बसेसची व्यवस्था असणार आहे. घोटीकडून येणारी वाहने पहिने येथे थांबविण्यात येणार आहेत. तळवाडे, सातपूर, नाशिकरोड, निमाणी, महामार्ग, सिडको, घोटी येथूनही जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ उमेदवारांचे अर्ज ठरले वैध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जेलरोडला महापालिकेच्या दोन प्रभागात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी छाननी झाली. त्यामध्ये १५ जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले. जनसुराज्य पक्षाच्या अमोल मोरे यांच्या उमेदवारी अर्जाबाबत गुरुवारी (दि. ११) सकाळी अकरा वाजता निर्णय होणार आहे.

अमोल मोरे यांच्या उमेदवारीला सूचक आणि अनुमोदक असलेल्यांनी महापालिकेची कराची थकबाकी भरली नसल्याचा लेखी आक्षेप काँग्रसेचे उमेदवार शशिकांत उन्हवणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी रोहिदास बहिरम यांच्याकडे नोंदवला. त्यामुळे अमोल मोरे यांचा अर्ज वैध की अवैध यावर गुरुवारी निर्णय घेतला जाणार असल्याचे बहिरम यांनी सांगितले.

उमेदवारी दाखल करण्याच्या मंगळवारी अखेरच्या दिवशी १६ उमेदवारांनी एकूण २५ अर्ज दाखल केले होते. प्रभाग ३५ ब मधून ६ तर प्रभाग ३६ ब मधून १० उमेदवारांनी नेते व समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी छाननीच्या वेळीही गर्दी झाली होती. शुक्रवारी (दि. १२) माघारी तसेच शनिवारी (दि. १३) निवडणूक चिन्ह वाटप झाल्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांसाठी ‘ट्रेझर हंट गो’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'पोकेमॉन गो' गेमने जगभरात धुमाकूळ घातला आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकस्थित 'झाबुझा लॅब्स' कंपनीने खास नाशिककरांसाठी 'ट्रेझर हंट गो' या गेमची निर्मिती केली आहे.

आजकालचे गेम्स लक्षात घेता सर्व गेम्स घरी बसून खेळता येतात. त्यामुळे फिजिकल एक्ससाईज, नवनविन ठिकाणी जाऊन भेट देणे, या गोष्टींमध्ये सर्वांचा कल हळूहळू कमी होत आहे. हीच बाब ओळखून झाबुझा लॅब्सने 'ट्रेझर हंट' सारख्या फिजिकल गेम्सना वाव मिळावा, यासाठी गेमची निर्मिती केली आहे. या गेममध्ये मॅप, ऑग्युमेण्ट रियालिटी या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. या गेममध्ये सुरवातीला एक ठिकाण दिलेले असते. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला नाशिकच्या ठिकाणांशी निगडीत एक कोडे विचारले जाईल आणि त्या कोड्याचे उत्तर म्हणजेच दुसऱ्या ठिकाणाचे नाव असेल. अशा प्रकारे एका नंतर एक सर्व कोड्यांचे उत्तर देऊन तुम्ही नाशिकच्या गुपित खजिन्यापर्यंत पोहचू शकतात.

प्रत्येक कोड्याचे बरोबर उत्तर दिल्यास तुम्हाला १० कॉइन्स मिळतात. या कॉइन्सचा वापर तुम्ही एखाद्या कोड्यात अडकल्यास उत्तर माहीत नसल्यास, हिंट्सच्या सहाय्याने उत्तर मिळवू शकता. या गेममधून नाशिककरांची नाशिक विषयीची व ठिकाणांची माहिती होण्यास मदत होईल.

'पोकेमॉन गो'पेक्षा वेगळा कसा?
नाशिककरांना रुची निर्माण होईल यासाठी नाशिकमधल्या नामांकित ठराविक ठिकाणांचा 'ट्रेझर हंट गो' गेममध्ये समावेश करण्यात आला आहे. हा गेम खेळताना तुम्हाला रस्त्यावर किंवा अडचणींच्या ठिकाणी जावे लागणार नाही, याची दक्षता या गेममध्ये घेतली आहे. या गेममध्ये ६० नामांकित ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.

४० लाख यूजर्स
गुगल मॅप आणि ऑग्युमेण्ट रियालिटी टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला हा भारतातला पहिलाच गेम असणार आहे.मानस गाजरे हे नाशिक स्थित 'झाबुझा लॅब्स' या कंपनीचे संचालक आहेत. त्यांच्या कंपनीने बनविलेल्या अनेक गेम्सपैकी तीन गेम्सची जागतिक गेम कॉम्पिटिशनमध्ये निवड झालेली होती. तसेच त्यांच्या 'बलून बो अॅण्ड अॅरो' या गेमने भारतात अँग्री बर्डसला मागे टाकून गुगलमध्ये स्टोअरवर अव्वल नंबर कमावला होता. या गेमचे आतापर्यंत ४० लाखांहून जास्त यूजर्स आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसुंधरा मित्र पुरस्कारांचे आज वितरण

$
0
0

संजय पाटील यांना वसुंधरा सन्मान पुरस्कार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवातील पुरस्कार वितरण आज (११ ऑगस्ट) संध्याकाळी पाच वाजता कुसुमाग्रज स्मारक येथे करण्यात येणार आहे. नाशिकचे प्रसिद्ध वास्तुविशारद संजय पाटील यांना वसुंधरा सन्मान हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 'नाशिक सायकलिस्ट', कुंभमेळ्यात पर्यावरणासंबंधी महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या डॉ. धनश्री हरदास आणि सॅमसोनाईट प्लान्‍टेशन ड्राइव्ह या उपक्रमाला 'वसुंधरा मित्र' पुरस्कार देण्यात येणार आहे.

जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून पदवी शिक्षण झालेले वास्तुविशारद संजय पाटील यांनी नेहमीच विजेची बचत करणाऱ्या इमारती बांधण्यास प्राधान्य दिले आहे. या आधीही त्यांना विविध संस्थांच्या पन्नासहून जास्त पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नाशिक सायकलिस्ट ही संस्‍था सायकल फेरी आयोजित करून लोकांमध्ये सायकल वापरण्यासंबंधी जनजागृती करण्याचे काम करीत आहे. डॉ. धनश्री हरदास यांनी नाशिकमध्ये पार पडलेल्या कुंभमेळ्यात 'कुंभमेळा २०१५ - केअर नाशिक ग्रीन कॉल' या उपक्रमाचे प्रतिनिधित्व केले आहे. या आगळ्या वेगळ्या उपक्रमात त्यांनी 'ग्रीन सोल्जर्स' नावाची फौज तयार करून कुंभमेळ्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. सॅमसोनाईटचे व्यवस्थापक डॉ. तैन्वाला, कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट वाय. एम. सिंग आणि इतर कर्मचाऱ्यांच्या प्रेरणेने सॅमसोनाईट प्लान्‍टेशन ड्राइव्ह या उपक्रमातून गोंदे दुमाला (इगतपुरी) येथे अडीच लाखाहून जास्त वृक्षांचे संवर्धन करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना हा 'वसुंधरा मित्र' हा पुरस्कार देण्यात येत आहे.

पांडवलेणी (त्रिरश्मी गुंफा) येथे 'फोटो वॉक' होणार आहे. प्रसाद पवार यांच्या कॅमेऱ्यातून घेतलेल्या छायाचित्रांमधून सफर बघण्याची संधी या निमित्ताने नागरिकांना मिळणार आहे. तसेच चांदशी येथील 'आयडिया कॉलेज ऑफ आर्किटेक्चर' मध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून 'सर्वांना परवडणारी घरे' या स्मार्ट सिटी उपक्रमातील महत्त्वाचे उद्दिष्ट असलेल्या विषयावर चर्चा करण्यात येईल.

पुरस्कार खालील प्रमाणे : वास्तुविशारद संजय पाटील : वसुंधरा सन्मान, नाशिक सायकलिस्ट : वसुंधरा मित्र, डॉ. धनश्री हरदास : वसुंधरा मित्र, सॅमसोनाईट प्लांटेशन ड्राइव्ह : वसुंधरा मित्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपट्टी बिल मिळाली तब्बल पाच वर्षांनंतर!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, सातपूर

महापालिकेकडून मुदतीत घरपट्टी व पाणीपट्टीची बिले मिळत नसल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. बिले उशिरा मिळाल्याने ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. पाण्याची बिले तर तब्बल पाच वर्षांहून अधिक दिवसांपासून ग्राहकांना मिळत नसल्याने एकाच वेळी हजारो रुपयांची बिले भरण्याची वेळ येते. याकडे महापालिकेने लक्ष घालावे, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

महापालिकेच्या चारही बाजूंनी रहिवाशी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. महापालिकेच्या सातपूर विभागात गंगापूररोड, ध्रुवनगर, शिवाजीनगर, श्रमिकनगर, अशोकनगर, विश्वासनगर, चुंचाळे शिवार, भोर टाऊनशिप येथील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर नागरीवस्ती वाढल्या आहेत. वाढत्या नागरी वस्तीला सुविधा पुरविण्यात महापालिका अपयशी ठरत असल्याचा आरोप नगरसेवकांसह रहिवाशांनी केला आहे. परंतु, यामध्ये सर्वाधिक अडचणींना रहिवाशांना सामोरे जावे लागते ते मुदतीत न मिळालेल्या पाणीपट्टी व घरपट्टीला. मुदतीत पाणीपट्टी व घरपट्टी न मिळाल्याने आर्थिक भूर्दंड देखील ग्राहकांना सहन करावा लागतो. त्यातच पाण्याची बिले अनियमित मिळत असल्याचा आरोप बैठकीत नगरसेवकांनीच केला आहे. नगरसेवक विक्रांत मते यांनी तर पाणी बिल जादा आल्यावर तडजोडीची भाषा महापालिका कर्मचारी ग्राहकांना करत असल्याचा आरोप केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिस्तीसाठी दंडुका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यास महिनाभराचा कालावधी दिल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी आता शिस्तीचा बडगा उगारला आहे. महापालिकेच्या विविध विभागांमध्ये बुधवारी सरप्राईज व्हिजिट देत त्यांनी कामकाजाची पाहणी केली. यावेळी अनेक आपत्तीजनक बाबी समोर आल्या.

कर्मचाऱ्यांच्या खुर्च्यांवर कर्मचाऱ्याऐवजी अनाहुत व्यक्ती आढळून आल्या. महापालिकेचे रेकार्डही अस्ताव्यस्त असल्याचे समोर आले आहे. कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सक्तीचे असतांनाही कर्मचारी आदेशाचे पालन करत नसल्याचे तर हालचाल रजिस्टर अद्ययावत नसल्याचे पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे आयुक्तांनी विभागप्रमुखांसह कर्मचाऱ्यांना तंबी दिली असून पुन्हा असा प्रकार आढळल्यास थेट कारवाईचाच इशारा दिला आहे.

महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी महापालिकेचा पदभार घेतल्यानंतर महिनाभर महापालिकेच्या एकूण कामकाजाची माहिती जाणून घेतली. अन्य अधिकाऱ्यांप्रमाणेच पहिल्या दिवसापासून अॅक्शनमध्ये न येताच सर्व स्थितीचा बारीक अभ्यास करत अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावून घेण्यासाठी वेळ दिला. परंतु, तरीही शिस्त दिसून येत नसल्याने आयुक्तांनी बुधवारी अचानक मुख्यालयातील विविध विभागांना भेटी दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, अनिल चव्हाण, उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांच्यासह प्रशासन अधिकारी उपस्थित होते. या पाहणीत अनेक कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र नसल्याचे आढळून आले. तर विभागामंध्ये महापालिकेचे रेकॉर्डच अस्ताव्यस्त असल्याचे त्यांना भेटीदरम्यान दिसून आले. तसेच डेड स्टॉक नष्ट केला नसून मध्यवर्ती रेकॉर्डरुमही व्यवस्थित नसल्याचे समोर आले.

नगरसेवकांच्या तक्रारीला पुष्टी
धक्कादायक बाब म्हणजे काही विभागामंध्ये कर्मचा-यांच्या खुर्च्यावर बाहेरील व्यक्तीच बसल्याचे आयुक्तांना आढळून आले आहेत. तर काही विभागांमध्ये अधिकारी व कर्मचारी बाहेर गेले असतांनाही हालचाल रजिस्टरच भरले नसल्याचे समोर आले. त्यामुळे आयुक्तांनी या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत, सर्व विभागप्रमुख व खातेप्रमुखांना तंबी दिली आहे. यापुढे असा प्रकार आढळल्यास थेट कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. अधिकारी व कर्मचारी जागेवर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी अनेक नगरसेवक करतात. त्याची पुष्टीच या भेटीने समोर आली असून सुधारणा करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे.

आयुक्तांचे आदेश
प्रत्येकाला ओळखपत्र सक्तीचे
मानधनावरील कर्मचाऱ्यांनाही तात्पुरते ओळखपत्र
रेकॉर्डचे वर्गीकरण करून त्याची विगतवारी निश्चित करणे
डेड स्टॉक दोन महिन्यात नष्ट करा
मध्यवर्ती रेकॉर्ड रुमचे संगणकीकरण होणार
अनाहूत व्यक्तींना प्रतिबंधाची जबाबदारी विभागप्रमुखांवर
हालचाल रजिस्टर अद्यायावत ठेवा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेला प्रतीक्षा ६७ कोटींची

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात केलेली काटकसर व बचत आता पालिकेच्या अंगलट आली आहे. सिंहस्थात पालिकेने वाचविलेले ६७ कोटी ४३ लाख रुपये शहरातील अन्य कामांसाठी पालिकेला देण्याबाबत शासन स्तरावर अद्यापही उदासीनता दिसून येत आहे. या बचतीतून घाट सुशोभिकरणासह, संरक्षक भिंत व गंगापूर एसटीपीचा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रस्तावाला अद्यापही हिरवा कंदील मिळालेला नाही. दरम्यान सिंहस्थ आराखड्यातील १११९ कोटींपैकी वर्षभरात पालिकेने आतापर्यंत ९८० कोटी खर्च केले असून अजूनही काही कामे प्रलंबित आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांच्या सोयी सुविधांसह विविध विकासकामांसाठी महापालिकेने स्वतंत्र आराखडा तयार केला होता. सुरुवातीला १०५१ कोटींचा हा आराखडा नंतर वाढून १११९ कोटी २९ लाखांपर्यत गेला होता.त्या त सर्वाधिक रक्कम ही रस्ते व रिंगरोडसाठी तब्बल ४६२ कोटी ठेवण्यात आली होती. १११९ कोटीच्या आराखड्यात तीन चर्तुथांश खर्च शासन उचलणार होते. तर भूसंपादनासाठी २०० कोटींचे कर्ज घेतले जाणार होते. शासन या आराखड्यात ६८९ कोटी ४७ लाख रुपये महापालिकेला देणार होते. त्यानुसार आतापर्यंत पालिकेला शासनाने ६२२ कोटी रुपये अदा केले आहेत. महापालिकेने सिंहस्थात अनेक कामे काटकसरीने केल्याने सिंहस्थ निधीत तब्बल ६७ कोटी ४३ लाखांची बचत झाली आहे.
बचत झालेला निधी घाट सुशोभिकरण, काझी गढीला संरक्षक भिंत, गंगापूर एसटीपी साठी मिळावा असे प्रस्ताव महापालिकेने दिले आहेत. परंतु, शासनाने या कामांना अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे ही कामे रखडली आहेत. महापालिकेने आतापर्यंत आपल्या वाट्यातील १८२ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यात ९५ कोटींचे कर्ज काढले आहे. तर भूसंपादनासाठी २३४ कोटी रुपये खर्च केले आहेत. अनेक कामे अजूनही प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे या कामांच्या पुर्ततेची प्रतीक्षा कायम आहे. विशेषतः झाडांमुळे गंगापूर व
दिंडोरी रस्त्यावरील रिंगरोडचे काम अपूर्ण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून खुल्या पद्धतीने कांदा खरेदी

$
0
0

व्यापाऱ्यांची अखेर नरमाईची भूमिका; कांदा उत्पादकांना दिलासा

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत महिन्यापासून बंद असलेला कांदा लिलाव अखेर गुरुवारपासून सुरू होणार आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे यांच्या पुढाकारातून प्रचलित (खुल्या)पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय सचांलक व व्यापारी यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश देवरे यांनी दिली.

गेल्या तीस दिवसांपासून सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद असल्याकारणाने तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सलग दोन दिवस आंदोलनाचे हत्यार उपसले होते. शेतकरी रस्त्यावर उतरल्याने व्यापारी व शासनाचे धाबे दणालले होते. या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश देवरे यांनी दुपारी बाजारसमिती सभागृहात संचालक मंडळाची बैठक घेऊन कांदा लिलावासंदर्भात चर्चा केली.

देवरे म्हणाले की, कांदा लिलाव होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला असून त्यांच्या चाळीतील कांदा सडतोय. आधीच दुष्काळाने होरवळलेला शेतकरी कसाबसा उभा राहतोय. त्यात कांदा मार्केट बंद असल्याने त्याची चोहीकडून कोंडी झाली आहे. व्यापारी आणि नियमांच्या कचाट्यात सापडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, असे सांगून त्यांनी व्यापाऱ्यांना भावनीक आवाहन केले.

चर्चेदरम्यान केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे यांनी व्यापाऱ्यांशी दूरध्वनीवर संभाषण केले. डॉ. सुभाष भामरे यांनी कांदा व्यापाऱ्यांना विश्वासात घेत शासन निश्चितच व्यापाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेणार आहे. तुमच्यावर कोणताही अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याची ग्वाही दिली. शेतकऱ्यांचा अंत न बघता आपण बाजार समितीचे व्यापार सुरू करावेत असे, आवाहनही त्यांनी केले.

या आवाहानास कांदा व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. यामुळे उद्या गुरुवारपासून पूर्वीप्रमाणे प्रचलित पद्धतीनुसार व्यापाऱ्यांकडून आडत घेवून बाजार समितीत कांदा लिलाव सुरू करण्यात येत असल्याची माहिती देवरे यांनी दिली.

उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या मालाची प्रतवारी करून कांदा विक्रीस आणावा, असे आवाहनही देवरे यांनी केले आहे. या बैठकीस व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक निकम, श्रीधर कोठावदे, वर्धमान लुंकड महेश देवरे, दीपक सोनवणे, जयप्रकाश सोनवणे, पप्पू सोनवणे आदी व्यापारींसह उपसभापती विशाल सोनवणे व संचालक मंडळ उपस्थित होते. बाजार समितीच्या या निर्णयाचे स्वागत शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्रबापू पाटील, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, बाळासाहेब सोनवणे, अरविंद सोनवणे, काका रौंदळ, जिभाऊ खंडू सोनवणे, संजय वाघ शिरसमणीकर, जनार्दन सोनवणे, राजेंद्र जगताप, भिका सोनवणे, तालुकाध्यक्ष सुभाष अहिरे आदींनी केले आहे.

उशिराचा निर्णय

गेल्या दोन वर्षांपासून नाशिक जिल्हा दुष्काळाला सामोरा जात आहे. त्यातच कसमादे पट्ट्यातील शेतकऱ्यांनी इतर पिकांचे पाणी तोडून कांदा जगविला. मात्र कांदा घरात नियमनाच्या मुद्द्यांवरून सगळे फिसकटले. मुसळधार पावसामुळे साठवणीतला कांदा अक्षरशः सडला. त्यामुळे खरेदी सुरू होणार असली तरी कांद्याची प्रत ढासळल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काय पडते, हे महत्त्वाचे आहे.


लासलगावमध्ये धूसफूस

निफाड : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खुल्या पद्धतीने कांदा विक्रीसाठी आणला होता. पण कालच्या तुलनेत अत्यंत कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडीत रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा धूसफूस पहायला मिळाली.

शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खुल्या पद्धतीने कांदा विक्रीसाठी आणला होता. तर काही शेतकऱ्यांनी गोणीत कांदा आणला. व्यापाऱ्यांनी गोणी लिलाव सुरू केले, पण आम्ही खुला कांदा आणला आहे. त्याचा लिलाव करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. व्यापाऱ्यांनी ते ऐकले नाही. फक्त गोणीतील कांद्याचा लिलाव सुरू केला. त्यावर शेतकऱ्यांनी गोणी लिलाव बंद पाडले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी खुला पद्धतीने कांद्याचे लिलाव सुरू केले. मात्र, आदल्या दिवशी आठशे रुपये क्विंटल असलेल्या या कांद्याला अवघा पाचशे रुपये क्विंटलचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडीत रास्तारोको आंदोलन केले. नंतर खुला कांदा आणलेल्या शेतकऱ्यांना बाजार समितीच्या संचालकांनी गोणी देऊन पुन्हा लिलाव सुरू केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभपर्वाची आज सांगता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशासह संपूर्ण जगाचे लक्ष वेधलेल्या सिंहस्थ कुंभपर्वाचा समारोप गुरुवारी (दि.११) होत आहे. त्र्यंबकेश्वर तसेच नाशिकमध्ये रात्री नऊ वाजून ३१ मिनिटांनी स्वतंत्रपणे ध्वजावतरण करण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह आखाडा परिषदेचे साधू, महंत उपस्थित राहणार आहेत. तर नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह वल्लभपीठाचे वल्लभाचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडणार आहे. देवी-देवतांची उत्तरपूजा झाल्यानंतर कुशावर्त व रामकुंडावर ध्वजावतरण होईल.

सिंहाचा गुरू राशीमध्ये प्रवेश होताच १४ जुलै २0१५ पासून सिंहस्थ कुंभमेळ्याला नाशिक-त्र्यंबकेश्‍वरमध्ये सुरुवात झाली होती. त्यानंतर वर्षभर कुंभमेळ्याचा सोहळा सुरू होता. बारा वर्षानंतर आलेल्या या पर्वणीने नाशिकला अनेक आठवणी दिल्या आहेत. स्मार्ट सिटीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी या कुंभमेळ्याने दिलेल्या काही ठेवी, नाशिकला उपयुक्त ठरणार आहेत. भारतभरातून पर्वणी साधण्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या साधूंच्या निमित्ताने अनोखी परंपरा आणि वैविध्यपूर्ण भारताचे दर्शन नाशिककरांना घडले. ११ ऑगस्टला ९ वाजून ३१ मिनिटांनी गुरू सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तेव्हाच कुंभपर्वाची सांगता होणार आहे. पशुवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्यासह अनेक मंत्री व साधू, मंहतही सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. नाशिकमध्ये सायकांळी ६ वाजता ध्वजावतरण सोहळ्याला सुरूवात होणार असल्याची माहिती सतीश शुक्ल यांनी दिली आहे. कपालेश्वर मंदिरासमोरील जागेत हा जाहीर सत्कार सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. रामकुंड परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरात वाहून गेलेल्या एसटीतील १७ प्रवाशांना वाचवले

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नंदुरबार

महाडमध्ये पुराच्या तडाख्याने पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन एसटी बस वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच आज पहाटे नंदुरबारमध्येही पुरात एसटी बस वाहून गेल्याची दुर्घटना घडली. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे या बसमधील चालक, वाहक व १७ प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.

गुजरातला लागून असलेल्या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात काल बुधवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नवापूरमधील रंगावली नदीला तर पूर आला असून याच पुरात एसटी बस वाहून गेली.



ही एसटी बस जालना येथून सूरतकडे जात होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास ही बस नवापूर शहरापासून जवळच असलेल्या रंगावली नदीपुलावरून जात असताना पुरात अडकली. पूल पूर्णपणे पाण्यात बुडाला होता मात्र चालकाला त्याचा अंदाज न आल्याने बस पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली.

दरम्यान, नदीशेजारीच वस्ती असल्याने या दुर्घटनेबाबत कळताच स्थानिकांनी धाव घेतली आणि महाडची पुनरावृत्ती टळली. बसमधील सर्व १७ प्रवासी तसेच वाहक आणि चालकाला जेसीबीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रेकर्ससाठी भटकंती कट्टा

$
0
0

महाराष्ट्रातील पहिली लायब्ररी

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

दत्तमंदिराशेजारी ट्रेकर्स व पर्यटकांसाठी महाराष्ट्रातील पहिली 'भटकंती कट्टा-नाशिक' ही लायब्ररी सुरू झाली आहे. यासाठी वर्षभराची नाममात्र फी भरून घरपोच पुस्तके मिळण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

परिसरातील अजित बर्जे, डॉ. हेमंत बोरसे, संजय अमृतकर, मनीषा बर्जे आदींनी या लायब्ररीची संकल्पना साकारली. ही लायब्ररी दत्त मंदिराशेजारील कार्वी रिसोर्स लायब्ररीतच 'भटकंती कट्टा लायब्ररी' नावाने सुरू आहे. लायब्ररीचे आतापर्यंत चारशे सभासद झाले आहेत. यामध्ये चार वर्षाचा बालवाचक ते ९५ वर्षांचे आजोबांचा समावेश आहे.

निसर्गाशी करा गट्टी

निसर्ग पर्यटन व ट्रेकिंगसाठी नाशिक हॉटस्पॉट झाले आहे. नाशिकच्या निसर्गरम्य परिसरात सुमारे पाच हजार निसर्गप्रेमी भटकत असतात. या चळवळीला बळ द्यावे, धकाधकीमुळे जगण्याचा गोडवा हरवलेल्यांना पुन्हा निसर्गाकडे न्यावे, पर्यटनस्थळ व ट्रेकिंगची शास्त्रशुद्ध माहिती मिळावी, संशोधन करून पर्यटनावर डॉक्यूमेंटेशनची सवय लागावी या उद्देशाने ही लायब्ररी सुरू केल्याची माहिती संजय अमृतकर आणि अजित बर्जे यांनी 'मटा'शी बोलताना दिली. या लायब्ररीद्वारे नाशिकमधील प्रत्येक घरात पर्यटन आणि ट्रेकिंगची पुस्तके पोहचविण्यात येणार आहे.

असा आहे कट्टा...

या कार्वी लायब्ररीत ट्रेकिंग व पर्यटनाशिवाय कथा, कादंबऱ्या, संदर्भ पुस्तके, बालसाहित्य, थोरांची चरित्रे, माहितीपुस्तके, नियतकालिके, दिवाळी अंक आहेत. भटकंती कट्ट्यावर किल्ले, शिवकालीन इतिहास, हिमालयातील भटकंती, फोटोग्राफी, वाइल्डलाइफ, नाशिक-दर्शन, डिस्कव्हरी ऑफ इंडिया आदी पुस्तके आहेत. इतिहासाच्या पाऊलखुणा, ऐतिहासिक नाणी, दुर्गदर्शन, महाराष्ट्रातील सरदार घराणी, शिवकालीन संदर्भ, भारतातली प्रसिद्ध वारसा स्थळे, मोडीलिपी आदी पुस्तके आहेत. कैलास कमोद, पांडूरंग पाटणकर या नाशिककरांची पुस्तकेही या लायब्ररीत उपलब्ध आहेत.

पर्यटकांनी निसर्गाच्या सहलीला जाताना सखोल ज्ञान व इतिहासाची माहिती घेतल्यास वेगळा व संपन्न दृष्टीकोन प्राप्त होतो. प्रगल्भता येऊन निसर्गाशी नाते जुळते. इतिहास व भूगोलाचे अवलोकन व्हावे, या उद्देशाने 'भटकंती कट्टा' सुरू केला.

- डॉ. हेमंत बोरसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणस्नेही स्मार्ट सिटी शक्य

$
0
0

वसुंधरा महोत्सवात 'ग्रीन आर्किटेक्चर'वर चर्चा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रीन आर्किटेक्चरवर आयडिया कॉलेजमध्ये झालेल्या चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी नवनवीन संकल्पना मांडत पर्यावरणस्नेही स्मार्ट सिटी निर्माण करणे अशक्य नाही, असे दाखवून दिले. यावेळी विद्यार्थ्यांकडून फूटपाथवर चालताना वीजनिर्मिती कशी होऊ शकते याचे पीपीटी सादरीकरण केले.

उतारावरील जमिनीवर खाचा करून पाणी कसे अडविता येऊ शकते तसेच पूर परिस्थितीतील व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियान पर्यावरण वाचविण्यात लोकांचा सहभाग या विषयांवर चर्चा झाली. कॉलेजच्या प्राचार्या अदिती कुलकर्णी तसेच सुयश पारीख, अनुष्का पारसिया, अनुजा गायकवाड, आरती पवार, विघ्नेश गोपीनाथ, अक्षय महाले, चैताली बेदमुथा, मनलीन कौर, याकीन किंगर, प्रिया व्यंकटरमण या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

फोटो वॉक

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान फोटो वॉकचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नाशिकचे प्रसिद्ध छायाचित्रकार प्रसाद पवार यांनी पांडवलेणीचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी लेण्यांचे छायाचित्रण करतानाचे बारकावे नवोदित छायाचित्रकारांना समजावून सांगितले. कार्यक्रमात पवार यांच्या अजिंठा लेणीचे फोटोबूक प्रकाशित झाले आहे. फोटो वॉकमध्ये वीसहून जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फरारी आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बुधवारी पसार झालेल्या आरोपीला गुरुवारी पुन्हा पकडण्यात यश आल्याने सायखेडा पोलिसांनी सुस्कारा सोडला.

याबाबत माहिती अशी, की सिन्नर येथील पोलिसांनी पकडलेला आरोपी आकाश जगताप (वय १९) याला मोटारसायकल चोरीच्या एका गुह्यात सायखेडा येथील पोलिसांनी ताब्यात घेतले. सिन्नरजवळील एका गावात भूक लागली म्हणून पोलिसांनी त्याला वडापाव खाण्यास दिला. त्यानंतर तहान लागली म्हणून पोलिस पाणी आणण्यासाठी गेले. ही संधी साधून आकाशने खिडकीला बेड्यांना झटका देत बेड्यांसह बुधवारी दुपारी चारच्या सुमारास पसार झाला. त्याचा शोध घेऊनही तो हाती न लागल्याने पोलिस हतबल झाले. अखेर रात्री नऊच्या दरम्यान पावसात ओलाचिंब झालेला मुलगा शिंगवे येथील मारुती मंदिरापाशी रहिवाशांना आढळला. तो नायगाव जाण्यासाठी रस्ता कोणता, असा प्रश्न विचारत होता. मात्र, त्याने बेडीचा हात मागे केल्याने कोणाच्या लक्षात आले नाही. मात्र, त्याची संशयास्पद हालचाल काही तरुणांच्या लक्षात आल्याने त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने शोधपथक शिंगवे, करंजगाव, भेंडाळी, सिन्नर आदी ठिकाणी पाठवले. रात्रभर शोधाशोध केल्यानंतर गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता सिन्नर येथे त्याच्या राहत्या घरी तो आढळून आला. तेथून त्याला ताब्यात घेऊन अखेर सायखेडा पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकारी, कर्मचारी गौरवाची पंरपरा कायम

$
0
0

विविध विभागांतील १९ जणांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या माजी आयुक्तांनी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कर्मचारी व अधिकारी पुरस्कार देण्याचा पायंडा आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी कायम ठेवला आहे. विविध १९ विभागांमध्ये १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांची महापालिकेच्या निवड समितीने निवड करत त्यांची नावे जाहीर केली आहेत. येत्या १५ ऑगस्टला या सर्वांचा सन्मान केला जाणार आहे.

महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कामाची स्पर्धा व्हावी यासाठी तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्याची प्रथा सुरू केली होती. दर तीन महिन्यात कर्मचाऱ्यांच्या कामांचे अवलोकन करून विभागनिहाय कर्मचारी व अधिकारी निवडून त्यांचा उत्कृष्ट कर्मचारी व अधिकारी म्हणून गौरव केला जात होता.

डॉ. गेडाम यांच्या बदलीनंतर सध्याच्या आयुक्तांनी ही प्रथा सुरू ठेवली असून अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण कायम ठेवले आहे.त्यानुसार गुरुवारी महापालिकेतील विविध १९ विभागातील उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यात येवून त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच प्रकरणी नायब तहसीलदारावर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागासाठी कार्यरत असलेल्या मालट्रकांना पुन्हा ठेका देण्यासाठी चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणारे नायब तहसीलदार सुधीर दामोदर सातपुते यांच्यावर अँटिकरप्शन विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. सापळ्यादरम्यान संबंधित अधिकाऱ्याने लाचेची रक्कम स्वीकारली नसली तरी लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करून एसीबीने सातपुतेंची चौकशी सुरू केली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, पुरवठा विभागासाठी कार्यरत असलेल्या चार ट्रकमालकांचा करार काही दिवसांपूर्वी संपुष्टात आला होता. हा करार पुन्हा करण्यासाठी चारही ट्रकमालक उत्सुक होते. मात्र, हा करार करायचा असेल तर प्रतिट्रक एक हजार रुपयांप्रमाणे चार हजार रुपये देण्याची मागणी सातपुते याने केली. चारपैकी एका ठेकेदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने पडताळणी करून गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात ट्रॅप लावला. या वेळी सातपुते यांनी पैसे मागितले; पण तक्रारदाराने गर्दीमध्ये दिले नाहीत व सापळा पथकाकडे परत आले. त्यानंतर तक्रारदार पुन्हा पैसे देण्यासाठी गेले; पण सातपुते यांनी ती स्वीकारली नाही. त्यामुळे पैसे मागणे हा गुन्हा असून, त्या दृष्टीने कारभार करणाऱ्या सातपुते यांच्यावर एसीबीने गुन्हा दाखल केला असल्याची माहिती एसीबीचे पोलिस अधीक्षक दौलत जाधव यांनी दिली आहे. या प्रकरणी एसीबीने सातपुते यांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, लाच घेणे किंवा मागणे याबाबत काही तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा नाशिक एसीबीच्या २५७५६२८ किंवा २५७८२३० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व्यक्तिमत्त्व शतपैलू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव उच्चारताच श्रोत्यांच्या मनात देशभक्तीचे स्फुरण चढते. जाज्वल्य देशभक्ती, उत्तुंग कवित्व आणि परखड हिंदुत्ववादी विचार यांचा संगम म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. पण सावरकर समजून घेताना त्यांना 'शतपैलू सावरकर' असेच संबोधावे लागेल, इतके ते विशाल व्यक्तिमत्त्व होते, असे मत सावरकर साहित्याचे नाशिक येथील अभ्यासक डॉ. गिरीश पिंपळे यांनी व्यक्त केले.

मालेगावच्या एस. एम. जोशी सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ते 'शतपैलू सावरकर' या विषयावर बोलत होते. हा कार्यक्रम सावरकर चरित्र आधुनिक तंत्राने कथन करण्याचा एक अतिशय आकर्षक आणि अभिनव असा प्रयोग होता. या कार्यक्रमात डॉ. पिंपळे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सुमारे १०० स्लाइड्स दाखविल्या आणि आपल्या ओघवत्या निवेदनशैलीतून सावरकरांचे अवघे जीवन श्रोत्यांपुढे उभे केले. या चित्रांमध्ये लंडनहून पाठविलेली पिस्तुले, अंदमानचा तुरुंग, तेथील बेड्या, फाशी घर, त्यांची कोठडी, मुंबईचे स्मारक, सावरकर सदन, त्यांच्या रोजच्या वापरातील वस्तू अशा अनेक ऐतिहासिक गोष्टींचा समावेश होता.

याशिवाय सावरकरांचे हस्ताक्षर, त्यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांची पत्नी आणि इतर नातेवाईक अशा अनेक बाबतीत पिंपळे यांनी सविस्तर माहिती दिली. सावरकरांच्या काही गीतांची झलक ऐकवून त्यांनी या कार्यक्रमात अधिक रंग भरले. या कार्यक्रमाचा शेवट करताना त्यांनी एका चित्रफितीत सावरकरांचे दर्शन घडविले आणि त्यांचा आवाजही ऐकविला.

वाचनालयाच्या अध्यक्षा डॉ. कल्पना करवा यांनी प्रास्ताविक केले. सचिव भास्कर तिवारी यांनी सूत्रसंचालन केले. संजय पाठक यांनी डॉ. पिंपळे यांचा परिचय करून दिला. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सूर्यवंशी या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकमध्येच थाटला संसार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

गेला आठवड्यात गोदाकाठच्या गावांना पुराने अक्षरशः वेढले होते. अनेक गावांमध्ये पाणी शिरले, घरांना पाणी लागले. अनेकांच्या संसाराची वाताहत झाली. सायखेडा येथील गंगानगर भागात राहणाऱ्या शंकर हांबरे यांचेही घर वाहून गेल्याने या कुटुंबावर आजपर्यंत एका मालट्रकमध्ये संसार थाटण्याची वेळ आली आहे.

शंकर हांबरे, त्यांची पत्नी मंगला, मुलगा, सून, दोन मुली, दोन नातू यांच्यासह सायखेड्याचा गंगानगर भागात राहतात. गेल्या सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीला पूर आला. पुरामुळे गंगानगर भागातील घरात पाणी शिरले. या भागातील घरामध्ये पाणी शिरल्याने सगळ्यांनी जीव मुठीत घेवून हाती जे लागेल ते घेवून आधार शोधला. पाण्याचा प्रवाह इतका होता की काही कळायच्या आत पुराच्या पाण्याने घरांमध्ये थैमान घातले. मंगलाबाईने हातात मावेल तेवढे सामान घेत जीव वाचवित मुलगा, सून, मुली, नातू यांना घराबाहेर काढले. पाण्याचा वेढा कसाबसा मागे रेटत ते बाहेर तर आले. पण घर-संसार पूर्ण पाण्यात बुडाला होता. त्यांचा मुलगा टिंगू ज्या मालट्रकवर ड्रायव्हर आहे. त्याने कुटुंबावर ओढवलेली परिस्थिती आपल्या ट्रकमालकाला सांगितली. मालक भाऊसाहेब हाडळे यांनीही त्याला ट्रक दिला. टिंगूने ट्रकमध्ये उरलासुरला सामान भरला. कुटुंबासह ट्रक सायखेडा कॉलेजजवळ सुरक्षित ठिकाणी आणून उभा केला. तेव्हापासून आठ जणांच्या या हांबरे कुटूंबाने चारचाकी घरात संसार थाटला आहे.

प्रशासनाने आम्हाला काहीही मदत केली नाही. काही माणसांनी आम्हाला खायला आणून दिले. आमचा किराणा, भांडी आणि घर सारंकाही वाहून गेले. सरकारने आम्हाला पुन्हा उभे राहण्यासाठी मदत करावी, अशी मागणी या कुटूंबाने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images