Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

२५ हजारांच्या दाव्यांचा खर्च देण्याचा आदेश

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट को-ऑप. बँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया यांच्याविरुद्ध बँकेचे माजी सरव्यवस्थापक मगनलाल बागमार यांनी नाशिक मर्चंट बँकेच्या लवाद प्राधिकरणाकडे केलेल्या दाव्यात लवादाने २५ हजार रुपये दाव्याचा खर्च देण्याचा आदेश दिला आहे. त्याचप्रमाणे बागमार यांना बँकेकडून अपेक्षित असलेल्या कागदपत्रांच्या प्रती दोन महिन्यांच्या आत प्रमाणित करून ती निःशुल्क देण्याचेही आदेश दिले आहेत. या निकालावर मात्र भोरिया यांनी लवादाची मुदत संपली असल्याचे सांगत लवादाच्या कक्षेत ही तक्रार येत नसल्याचे सांगितले.

या निकालावर बागमार यांनी मात्र प्रशासक भोरियांचा हा जावईशोध असल्याचे सांगत सहकार आयुक्तांनी ६ ऑक्टोबर २०१५ रोजी नाशिक मर्चंट बँकेचे लवाद प्राधिकरणावर अधिकारी म्हणून अमित चोरडिया यांची नियुक्ती केली असून, त्यांची मुदत आदेशानंतर एक वर्षाची आहे. त्यामुळे बँकेच्या प्रशासकांबाबत त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी हा निकाल दिला आहे. या निकालात लवाद अधिकाऱ्यांनी दावा बँकेच्या हिताचा असून, बँक प्रशासनाने दाव्यास केलेला विरोध अनाकलनीय आहे. बँक प्रशासन, कर्मचारी व बँकेचे वकील हे प्रशासकाच्या दबावाखाली काम करत असल्याचे निरीक्षणही नोंदवले.

बागमार यांनी, बँकेला प्रशासकांच्या बेकायदेशीर निर्णयामुळे कोट्यवधी रुपयाचा भुर्दंड बसल्याचे स्पष्ट करून, तो प्रशासकांकडून व्याजासह वसूल करावा, यासाठी लवादाकडे दावा दाखल केला होता. त्यावर लवादाने हा निर्णय दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ चिमुकल्यांसाठी सरसावताहेत हात

$
0
0

सायगाव येथील अनाथ बहिणींसाठी मदतीचा ओघ

म. टा. वृत्तसेवा, येवला

आईचं किडनीच्या विकाराने निधन होताना वडिलांनी अवघ्या दोनच महिन्यात हृदयविकाराच्या झटक्यामुळे जगाचा निरोप घेतला. नियतीने एकामागोमाग घाला घातल्यानं डोक्यावरच्या छायेचं अन् मायेचं मातृपितृछत्र गेल्यानं त्या चिमुकल्या अनाथ झाल्या... ; अशाच अनाथ मुलींच्या भवितव्याची काळजी लागल्याने माणुसकीच्या दातृत्वाचे हात पुढे सरसावत असल्याचं चित्र येवला तालुक्यातील सायगावी पुढे आलं आहे. आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या सायगाव येथील साक्षी अन् पूजा या दोघी चिमुकल्या बहिणींचे पोरकेपण दूर करण्यासाठी गावचे ग्रामस्थ पुढे सरसावले आहे.

येवला तालुक्यातील सायगाव येथील शेतमजूर बाबासाहेब सोपान लोहकरे (वय ३८) यांचे चार महिन्यांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या दोन महिने आधीच पत्नीचे किडनीच्या आजाराने निधन झाले.नियतीने घातलेल्या या घाल्याने त्यांच्या साक्षी (वय ८ ) आणि पुजा (वय १०) या दोन मुली माता-पिता विना अनाथ झाल्या आहेत. त्यांच्यासाठी सायगावमधील भागूनाथ उशीर, शिवाजी भालेराव, सुनील देशमुख, दिनेश खैनार आदी तरुणांनी काहीतरी करण्याचा निश्चय केला.

त्यांनी शहरातील व्यक्तींना आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत मातोश्री शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी कुणाल दराडे यांनी मदतीचा हात पुढे करत ११ हजाराची मदत दिली. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात सुपूर्द केली. कार्यक्रमात जमा झालेला हा पैसा मुलींच्या बँक खात्यात टाकला जाणार आहे. या मुलींना सर्वस्तरातून मदत जाहीर होत असून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारीही एका संस्थेने घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहरण झालेल्या विवाहितेची अखेर ‘घरवापसी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या दोन परप्रांतीयांनी अपहरण केलेल्या विवाहितेची सरकारवाडा पोलिसांनी सुटका केली. यासाठी शहर पोलिसांचे पथक थेट उत्तराखंड राज्यातील धारचूल या छोट्याशा गावापर्यंत पोहोचले होते. पोलिसांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ही विवाहिता घरी परतली असून, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत जाबजबाब नोंदवण्याचे काम सुरू होते.

माहितीच्या आदानप्रदानासाठी फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप या सोशल मीडियाचा वापर केला जातो. सरकारवाडा पोलिस स्टेशन हद्दीतील शरणपूर रोड भागात राहणारी महिलाही फेसबुकचा नित्यनेमाने वापर करत होती. मात्र, फेसबुकचा वापर महिलेला, तसेच तिच्या कुटुंबीयांना फारच त्रासदायक ठरला. या महिलेचा उत्तराखंड राज्यातील देव धोनी आणि नथू भंडारी या दोन व्यक्तींशी संपर्क आला. २०१४ मध्ये विवाह झालेल्या या तरुणीशी हे तरुण काही महिन्यांपासून सातत्याने संपर्क साधत होते. याच ओळखीचा फायदा घेत दोघांनी तिचे १२ जुलै २०१६ रोजी शहरातूनच अपहरण केले. सुरुवातीला या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दाखल झाली. विवाहिता बेपत्ता झाल्यापासून मुंबई व पुणे येथे ती राहत असल्याचे पुरावे समोर आले. नंतर मात्र ती उत्तराखंड राज्यातील नेपाळ देशाच्या सीमेनजीक असलेल्या धारचूल या गावात असल्याचे पोलिसांना समजले. दोन वर्षे सुखाने संसारात रमलेल्या पत्नीचे अपहरण झाल्याची तक्रार पतीने दिली. या घटनेतील गांभीर्य ओळखून पोलिसांनी हा गुन्हादेखील दाखल केला. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक सारिका आहिरराव यांच्यासह पोलिस कर्मचारी नाईक व वाघ धाराचूल येथे पोहोचले. तिथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने या महिलेची सुटका करण्यात आली. दुर्दैवाने संशयित दोन्ही तरुण पोलिसांना सापडले नाही. याबाबत आहिरराव यांनी सांगितले, की सदर महिलेसह इतरांचे जाबजबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. धारचूल हा उत्तराखंड राज्यातील अत्यंत दुर्गम भाग असून, ही महिला तिथे कशी पोहोचली हे तीच सांगू शकते. सध्या तपास सुरू असून, चौकशी पूर्ण झाल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल, असे आहिरराव यांनी सांगितले.

सततच्या पाठपुराव्यामुळे या महिलेला आम्ही परत आणू शकलो. बऱ्याचदा परराज्यात अशी कारवाई सफल होत नाही. सुदैवाने सरकारवाडा पोलिसांना यात यश मिळाले. सोशल मीडियाचा वापर कसा करावा, याचा प्रत्येकाने गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.

- राजू भुजबळ, सहाय्यक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमजी रोडवर महिलेची पर्स लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एमजी रोडवरील धुमाळ पाँइटवर खरेदीसाठी आलेल्या निफाडच्या रूपाली रवींद्र भोसले यांच्या पर्समधील रोकड आणि दागिने चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या पर्समध्ये एकूण २७ हजार रुपयांचा मुद्देमाल होता.

रूपाली भोसले बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास धुमाळ पाँइटवर खरेदीसाठी आल्या होत्या. त्यांच्या पर्समध्ये पाच हजार रुपये किमतीची तीन ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, १० हजार रुपये किमतीचे कानातील दागिने आणि ११,५०० रुपये रोख असा ऐवज होता. भोसले यांची खरेदी सुरू असताना चोरट्याने त्यांचे लक्ष विचलित करून पर्समधील किमती ऐवज आणि रोकड लंपास केली.

५० हजारांची चोरी

घरात झोपलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार करून पँटच्या खिशातील ५० हजार रुपये चोरट्याने लंपास केले. नवीन आडगाव नाका येथील बाप्पा सीताराम मार्ग परिसरात बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली.

नवीन आडगाव नाका येथील सिंघानिया बंगला येथे राहणारे नितीन खेमचंद सिंघानिया (वय ४६) बुधवारी रात्री घरात झोपलेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सिंघानिया यांच्या डोक्यात, पाठीवर, पायावर धारदार शस्त्राने वार करीत खुंटीला टांगलेल्या पँटच्या खिशातील ५० हजार रुपये लंपास केले. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पतीस मारहाण करून लूट

महिलेसह तिच्या नातलगांनी पतीस बेदम मारहाण करून सोन्याचे दागिने काढून घेतले, तसेच नणंद गर्भवती असतानाही जाणीवपूर्वक तिच्या पोटावर लाथ मारून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी कोर्टाच्या आदेशावरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हनुमानवाडी परिसरात ३ जुलै रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत तुषार दौंड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी प्रतीक्षा तुषार दौंड, बस्तीराम फकीर वाघ, संगीता बस्तीराम वाघ, प्रतीक बस्तीराम वाघ, अनिकेत पोपट वाघ (सर्व रा. हिरावाडी, पंचवटी), पोपट फकीर वाघ, गोकुळ पोपट वाघ (दोघे रा. अटकवडे, सिन्नर) आणि राजाराम नागरे (रा. निफाड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या संशयितांनी बळजबरी घरात प्रवेश करीत शिवीगाळ केली, तसेच गळ्यातील चेन आणि हातातील अंगठी काढून घेतली. दौंड यांची बहीण गर्भवती असतानाही संशयितांनी तिला बेदम मारहाण केल्याचे तुषार दौंड यांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी कोर्टाच्या आदेशान्वये आठही संशयितांविरोधात ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल दिला नाही म्हणून तोडफोड

मोबाइल दिला नाही, या क्षुल्लक कारणावरून चौघा संशयितांनी घरात घुसून तोडफोड करीत मारहाण केल्याचा प्रकार पंचवटीतील नवनाथनगर परिसरात घडला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथनगर परिसरातील सावरकर चौक येथील नीलेश दिलीप पवार बुधवारी दुपारी चारच्या सुमारास त्यांचे मामा विकास वाजे यांच्यासोबत घरासमोर उभे होते. तिथे आलेल्या सुनील नागू गायकवाड याने मोबाइल न दिल्याची कुरापत काढून वाद घालण्यास सुरुवात केली. अन्य तीन संशयितांसोबत पवार यांच्या घरात घुसून सामानाची तोडफोड केली, तसेच मारहाण केली.

तरुणाची आत्महत्या

सातपूर येथील शिवशक्ती चौकातील परमानंद पार्क परिसरात राहणाऱ्या तरुणाने बुधवारी राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. सुनील रमेश वाघ (वय ३३) असे या तरुणाचे नाव आहे. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा मार्केट खुलले

$
0
0

सटाणा, लासलगाव, पिंपळगाव बसवंत येथे लिलाव पूर्ववत सुरू

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

तब्बल ३२ दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात खुल्या ट्रॉलीवरील कांदा लिलावास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाल्यानंतर कांदा उत्पादकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. यावेळी कांदा उत्पादक शेतऱ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहत होता.

बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश देवरे यांनी बुधवारी कांदा लिलाव सुरू करण्याचा मार्ग सुकर झाल्याची घोषणा केल्यानंतर गुरुवारी सकाळी बाजार समिती आवारातील मैदान कांदा ट्रॅक्टरने फुलले होते.

बाजार समिती सभागृहात शेतकरी नेते रामचंद्र पाटील, पांडुरंग सोनवणे, मनोहर देवरे, अरविंद सोनवणे, संजय वाघ शिरसमणीकर, जनार्दन सोनवणे, सुभाष पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बाजार समितीमधील कांदा व्यापारी यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका व सरकारचे आभार व्यक्त करून संचालक मंडळाचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. सर्व शेतकरी प्रतिनिधी, संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत पहिल्या ट्रॉलीचा लिलाव करण्यात आला. त्याचा मान करंजाड येथील कांदा उत्पादक यादव गोपजी यांना मिळाला. ७०१ रुपये दराने त्यांचा कांद्याचा लिलाव करण्यात आला. बाजार समिती आवारात ३५० ट्रॉली ट्रॅक्टरसह १५० वाहनातून आठ हजार क्विंटल कांद्याची आवक होती. सर्वाधिक ७५५ रुपये प्रति क्विंटल इतका भाव सकाळच्या सत्रात मिळाला.

आश्वासन पूर्ण करावे

लिलाव शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे सुरू केले तर बाजार समिती संचालक मंडळ व्यापाऱ्यांना मार्केट फीमध्ये ५० टक्के सवलत देईल, हे आश्वासन सभापती रमेश देवरे यांनी पूर्ण करावे, अशी मागणी कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक निकम यांनी केली आहे.



पिंपळगावला १५ हजार क्विंटल आवक

पिंपळगाव बसवंत : सरकारने जाहीर केलेल्या नियमनमुक्ती विरोधात कांदा व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यामळे तब्बल एक महिन्यापासून बंद असलेले कांदा लिलाव पुन्हा सुरू झाले. गुरुवारी पिंपळगाव बसवंत बाजार आवारात शेतकऱ्यांना मोकळ्या पद्धतीने कांदा आणला होता. पहिल्याच दिवशी १५ हजार क्विंटल कांदा आवक झाली. तर बाजारभाव किमान ५०० रुपये, कमाल ८९० रुपये तर सरासरी ६८० रुपयांपर्यंत होते. आवक वाढल्यामुळे सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेले लिलाव सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होते. कांदा व्यापाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेत खुल्या पद्ध्तीने लिलाव सुरू केले. विशेष म्हणजे गुरुवारपासून शेतकऱ्यांकडून आडत कपात न करता खरेदीदारांकडून आडत कपात करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.


उमराणे-मुंगसेत आवक कमी

मालेगाव : तालुक्यातील उमराणे व मुंगसे बाजार समिती आवारात खुल्या पद्धतीने कांदा खरेदी सुरू झाली. कांदा लिलाव सुरू झाला असला तरी बहुतांशी शेतकऱ्यांना याची माहिती नसल्याने गुरुवारी दोन्ही बाजार समिती आवारात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मुंगसे आणि उमराणे बाजार समित्यांमध्ये खुल्या पद्धतीने सकाळपासून कांदा लिलावास सरुवात झाली. १०५ वाहनांमध्ये कांदा विक्रीला आला. मुंगसे येथे क्विंटलला ४०० ते ७०० तर, उमराणे येथे ६०० ते ८०० रुपये दर मिळाला. यामुळे अनेक शेतकरी नाराज झाले. कांदा खरेदी खुल्या पद्धतीने सुरू झाल्याबद्दल शेतकरी समाधान व्यक्त करीत असले तरी शासनाने हमी भाव द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांंनी केली आहे .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मैत्रेय’च्या ३४३ ठेवीदारांना ४३ लाखांचे वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीच्या ३४३ ठेवीदारांना गुरुवारी ४३ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत ६१९ गुंतवणूकदारांना ८१ लाख ५७ हजार रुपयांचे वाटप कमिटीमार्फत करण्यात आल्याचे सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी सांगितले.

मैत्रेय ठेवीदारांना इस्क्रो खात्यातून पैसे परत करण्यासाठी कोर्टाच्या आदेशाने एक कमिटी नियुक्त करण्यात आली आहे. या कमिटीमार्फतच गुंतवणूकदारांची यादी निश्चित करून पैसे परत करण्याची कार्यवाही होते आहे. ३४३ ठेकेदारांना गुरुवारी एकूण ४३ लाख २० हजार ६८० रुपये देण्यात आले. आतापर्यंत ६१९ ठेवीदारांना ८१ लाख ५७ लाख रुपयांचे वाटप झाले असून, ही प्रक्रिया निरंतर सुरूच राहील, असे पोलिस निरीक्षक कोल्हे यांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात कमिटीने कागदपत्रे सादर करण्यास सांगितलेल्या अनेक ठेवीदारांना पावसामुळे पोलिसांशी संपर्क करता आला नव्हता. या ठेवीदारांनासुद्धा चालू आठवड्यात पैसे परत करण्यात आल्याचे कोल्हे म्हणाले. ठेवीदारांशी संपर्क साधणे, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करणे, रकमेनुसार यादी तयार करणे यासाठी सात ते आठ अधिकारी कर्मचारी कार्यरत असून, सर्वांना पैसे मिळतील, यासाठी पोलिस प्रयत्नशील असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. इस्क्रो खात्यात जवळपास साडेसहा कोटी रुपये जमा असून, मैत्रेय संचालकांच्या परदेशातील मालमत्तांचा शोध घेतला जात आहे.

आठवड्याला पैसेवाटप

मैत्रेय ठेवीदारांचा आकडा मोठा असून, आठवड्यागणिक फार तर १५० ते २०० गुंतवणूकदारांना पैसे परत केले जाऊ शकतात. गुंतवणूकदारांशी संपर्क साधणे, त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे यासाठी पोलिस स्टेशनमध्ये रोज रात्री उशिरापर्यंत काम सुरू असते. पावसामुळे पोलिसांशी संपर्क साधू न शकलेल्या गुंतवणूकदारांना आजच्या आठवड्यात संधी देण्यात आली. त्यामुळे पैसे मिळालेल्या ठेवीदारांचा आकडा वाढला. मात्र, दर आठवड्याला हे शक्य होणार नाही, असे कोल्हे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तपासात ढवळाढवळ होण्याची शक्यता होती’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

घरकुल योजनेत दाखल गुन्ह्यात प्रमुख चार संशयितांच्या विरोधात पुरेसा पुरावा उपलब्ध असला, तरी इतर आरोपी हे कायदेशीर बाबींचा लाभ घेत तपासात ढवळाढवळ करण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले असल्याची साक्ष तत्कालीन तपास अधिकारी ईशू सिंधू यांनी गुरुवारी धुळ्यातील विशेष न्यायालयात दिली.

तपास अधिकारी सिंधू यांची उलटतपासणी घेण्याबाबत संशयित सुरेश जैन यांच्यातर्फे अॅड. राजा ठाकरे यांनी न्यायालयात अर्ज केला होता. प्रदीप रायसोनी यांच्यातर्फे अॅड. सुशील अत्रे यांनी उलटतपासणी घेतली.

ईशू सिंधू यांनी सांगितले की, दोषारोपपत्र दाखल करताना प्रमुख चार आरोपींबद्दल तपास पूर्ण झाला होता. प्रदीप रायसोनी यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल करताना, कायद्याचे कोणतेही उल्लंघन झालेले नाही. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तत्कालीन प्रशासक तथा सहकार खात्याचे सहनिबंधक (पुणे) यांची साक्षही न्यायालयात नोंदविण्यात आली.

जैन यांच्या जामीनावर आज सुनावणी

संशयित आरोपी माजी आमदार सुरेश जैन यांच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात आज, शुक्रवारी सुनावणी होणार आहे. यापूर्वी १४ जुलैला जैन यांच्या जामीनावर कामकाज झाले होते. त्यावेळी सरकार पक्षाकडून सांगण्यात आले होते की, या खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार तपासणे बाकी आहे. त्‍यामुळे जामीन अर्जावर कामकाजासाठी सर्वोच्च न्यायालयाने १२ ऑगस्ट ही तारीख दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैव-वैष्णवांच्या उपस्थितीत उतरली धर्मध्वजा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

येथे गुरुवारी रात्री ९ वाजून १६ मिनिटांनी ध्वजावतरण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बालविकासमंत्री पंकजा मुंडे आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अम‌ित शहा यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम नीलपर्वत जुना आखाडा येथे त्यांचे रात्री साडेआठ वाजता सर्व मान्यवरांचे आगमन झाले. अम‌ित शहा यांनी शैव व वैष्णव आखाड्यांचे साधू महंत एकत्र आल्याचे पाहून आनंद व्यक्त केला. त्यानंतर कुशावर्तावर ध्वजावतरणाचा पुजाविधी झाला. नगराध्यक्षा विजया लढ्ढा आणि उपनगराध्यक्ष संतोष कदम यांनी शहा यांचे स्वागत केले.

नीलकंठेश्वर महादेव मंदिरात शहा यांच्या हस्ते श्रीफळ वाहून कार्यक्रमांची सुरूवात करण्यात आली. त्र्यंबकेश्वर येथे प्रथमच सिहस्थ कुंभमेळा ध्वजावतरण कार्यक्रमात अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या प्रयत्नाने १३ आखाड्यांचे सर्व पदाधिकारी, साधू संत उपस्थित होते. त्यामुळे वर्षानुवर्षे चालत आलेला शैव-वैष्णव वाद संपुष्टात आल्याचे दिसून आले. यावेळी बिंदुजी महाराज, श्रीमहंत धनराजगिरीजी महाराज, श्रीमहंत गणेशानंद सरस्वती, शंकरानंद सरस्वती, जुना आखाडा महामंत्री, शांतिगिरीजी महाराज, भाजप शहराध्यक्ष श्याम गंगापुत्र, प्रांताधिकारी वाघचौरे, तहसीलदार नरेशकुमार बहीरम यांच्यासह त्र्यंबक शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिककर डॉक्टरची युरोपात सायकलस्वारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचे सायकलपटू अांतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने ठसा उमटवत आहेत. शहरातील कान नाक घसातज्ज्ञ डॉ. शिरीष घन यांनी अत्यंत खडतर अशी स्वित्झर्लंड ते फ्रान्स ही रॅली नुकतीच पूर्ण केली. या रॅलीत सहभागी होणारे ते एकमेव भारतीय ठरले आहेत. पाच दिवसांत त्यांनी तब्बल ६०० किलोमीटर अंतर कापले.

अमेरिकेतील स्मॉल स्टेप्स चॅरिटी या संस्थेतर्फे जिनेव्हा (स्वित्झर्लंड) ते नीस (फ्रान्स) ही ६०० किलोमीटरची रॅली ३१ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत झाली. शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी या संस्थेतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले. घटस्फोटीत दाम्पत्यांच्या मुलांची हेळसांड थांबावी यासाठी या रॅलीतून प्रबोधनही करण्यात आले. या मोहिमेतून जमा होणारा निधी भारतातील शाळांमधील लहान मुलांच्या शिक्षणासाठी वापरण्यात येणार आहे. विविध देशातील एकूण ३२ सायकलिस्ट रॅलीत सहभागी झाले. यात अमेरिका, इंग्लंड, डेन्मार्क व भारतीय सायकलिस्टचा समावेश होता. रॅलीची सुरुवात जिनिव्हा येथून होऊन नीस येथे समारोप झाला. ६०० किलोमीटरच्या रॅलीत सायकलिस्टला अनेक ठिकाणी चढ-उतार, खडतर रस्ते, डोंगर-दऱ्या, वाळवंट अशा परिस्थितीचा सामना करावा लागला. टूर द फ्रान्सचा १३ किलोमीटरचा काही भाग या राईडमध्ये येतो. 'अल्पस दे हज' हा १८१५ फुट उंचीवर चढण्याचे कसब यांना दाखवावे लागले.

सलग १५ तास प्रवास
रॅलीचा प्रवास बहुतांश प्रवास ग्रामीण भागातून असल्याने तेथील जीवनमान पहाण्याची देखील सायकलिस्टला संधी मिळाली. रोजचा अंदाजे १२० ते १५० किलोमीटर प्रवास सायकलिस्टला करावा लागत असे. साध्या रस्त्यावरून १५० किलोमिटर प्रवास करण्यास अंदाजे दोन ते तीन तास लागतात; मात्र हेच अंतर रॅलीत पूर्ण करतांना १५ तासापेक्षाही जास्त कालावधी लागत होता.

तीन महिन्यांचा कठोर सराव
रॅलीसाठी डॉ. घन यांनी तीन महिन्यांपासून सातत्याने सराव केला. यासाठी रोज ते कसारा ते नाशिक अशा दोन फेऱ्या पूर्ण करत होते. तसेच व्यावसायिक सायकलिस्टचे देखील त्यांनी मार्गदर्शन घेतले होते. मोहिमेच्या कालावधीत कोणता आहार घ्यावा, यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली. रॅलासाठी डॉ. घन यांनी जिनिव्हा येथील सायकल भाडेतत्वाने वापरली होती. डॉ. घन यांनी यापूर्वीही हिमालयातील अवघड सायकल मोहिमा पूर्ण केलेल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन हजार नकाशे ऑनलाइन उपलब्ध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील बांधकाम मंजूर झालेल्या इमारतींचे नकाशे ऑनलाइन करण्याच्या मोहिमेला वेग आला असून, नगररचना विभागाच्या वतीने आतापर्यंत दोन हजार इमारतींचे नकाशे ऑनलाइन करण्यात आले आहेत.
गेल्या तीन वर्षांत मंजुरी झालेल्या इमारतींचे पालिकेकडून मंजूर करण्यात आलेले नकाशे पालिकेच्या वेबसाइटवर टाकण्यात आले असून पालिकेच्या अॅपवरही ते उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरिकांना आपल्या इमारतीचा प्लॅन माहिती व्हावा, या उद्देशाने तत्कालीन आयुक्तांनी नकाशे ऑनलाइन टाकण्याचे आदेश दिले होते.
बिल्डरांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने नगररचना विभागाकडून इमारतीचे मंजूर केलेले प्लॅन टाकण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी घेतला होता. नागरिकांनी महापालिकेने मंजूर केलेल्या इमारतीचा नकाशा पाहूनच फ्लॅट घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यानुसार नगररचना विभाग व पालिकेच्या तांत्रिक विभागाच्या मदतीने दोन महिन्यांपासून नकाशांचे स्कॅनिंग करून ते वेबसाइटवर टाकण्यात येत आहेत. भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या इमारतींचे नकाशे टाकण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ उमेदवाराला अंधारात ठेवून माघार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जेलरोडला महापालिका पोटनिवडणुकीत शुक्रवारी राजकीय नाट्य घडले. सूचकानेच परस्पर माघारीचा अर्ज दिल्यामुळे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार अमोल उमाकांत मोरे निवडणूक रिंगणातून बाद झाले. त्यामुळे प्रभाग ३५ ब आणि ३६ ब मधून प्रत्येकी चार उमेदवार रिंगणार राहिले आहेत. दोन्ही प्रभागात बहुरंगी लढत होणार असून शिवसेना-भाजप आमने सामने आले आहेत.

उमेदवारीच्या अखेरच्या दिवशी दोन्ही प्रभाग मिळून १६ उमेदवारांचे अर्ज आले होते. प्रभाग ३६ ब मधील जनसुराज्य पक्षाचे अमोल मोरे यांच्या उमेदवारी अर्जाला शशिकांत उन्हवणे या काँग्रेसच्या उमेदवाराने तांत्रिक कारणास्तव आक्षेप घेतला होता. त्यामुळे निर्णय राखीव ठेवण्यात आला होता. त्यावर गुरुवारी सुनावणी होऊन अर्ज वैध ठरविण्यात आला. त्यामुळे दोन्ही प्रभागामधील मिळून सर्व १६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. दरम्यान, शनिवारी (दि. १३) निवडणूक चिन्हवाटप होणार आणि अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. २८ ऑगस्ट रोजी मतदान आणि २९ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.

... आणि खंजीर खुपसला
अर्ज माघारीसाठी शुक्रवार दुपारी तीनपर्यंत मुदत होती. अमोल मोरे यांना सुभाष निरभवणे सूचक तर रवींद्र जाधव अनमोदक आहेत. निरभवणे यांनी अमोल मोरे यांच्यावतीने उमेदवारी माघारीचा अर्ज दिला. अमोल मोरे हे पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलासराज गायकवाड यांच्यासह महापालिकेच्या नाशिकरोड कार्यालयात आले. विश्वासघात झाल्याचे लक्षात आल्यावर मोरे यांनी तातडीने हालचाल केली. निवडणूक निर्णय अधिकारी रोहिदास बहिरम यांना त्यांनी लेखी अर्ज दिला. त्यात म्हटले आहे, की सूचकाला दमदाटी करून आणि मला विश्वासात न घेता माझी उमेदवारी मागे घेण्यात आली आहे. तथापी, माझी उमेदवारी कायम आहे. त्यामुळे उमेदवारी ग्राह्य धरावी. मात्र, त्यांचा विनंती अर्ज माघारीच्या मुदतीनंतर आल्याचे सांगून बहिरम यांनी तो फेटाळला. त्यामुळे मोरे हे निवडणूक रिंगणातून बाहेर फेकले गेले.

रिंगणातील उमेदवार
प्रभाग ३५ ब : शांताबाई शेजवळ (मनसे), मंदा ढिकले (भाजप), वृषाली नाठे (शिवसेना) वंदना चाळीसगावकर (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग ३६ ब : प्रवीण पवार (मनसे), सुनंदा मोरे (भाजप), सुनील शेलार (शिवसेना), शशिकांत उन्हवणे (काँग्रेस)

शिवसेनेला पाठिंबा
विश्वासघाताने संतप्त झालेले विलासराज गायकवाड पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की अमोल मोरे यांच्या विजयाची धास्ती घेतल्यानेच विरोधकांनी सुरवातीपासून त्यांना टार्गेट केले होते. आता ते उमेदवार नसले तरी शिवसेनाला आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. त्यांचा उमेदवार विजयी करण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरोग्य विद्यापीठाने संशोधनावर भर द्यावा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने विविध विद्याशाखांतील संशोधनावर अधिक भर द्यावा. त्यासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र उभारावे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा विद्यापीठाचे प्र-कुलपती गिरीश महाजन यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दुसऱ्या अधिसभेत ते बोलत होते. महाजन पुढे म्हणाले की, संशोधकांचे नुकसान होऊ नये आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी पीएचडी अभ्यासक्रमाची प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करणे आवश्यक आहे. काळाची गरज लक्षात घेऊन विद्यापीठाने नवे अभ्यासक्रम सुरू करावेत. दरवर्षी दोन विद्यार्थी आणि प्राध्यापकांना उत्तम संशोधनासाठी सन्मानित करण्यात यावे. खासगी क्षेत्राच्या सहकार्याने संशोधन प्रकल्प राबवावेत. संशोधनाच्या माध्यमातून या क्षेत्रातील नवे प्रवाह विद्यार्थ्यांसमोर आल्यास त्याचा समाजालाही लाभ होईल, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाने जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळविण्यासाठी अधिकाधिक संशोधनास पेटंट मिळविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठाने अवयवदानाबाबत जागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कुलगुरू डॉ. म्हैसेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आमदार सतीश पाटील, जयप्रकाश मुंदडा, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसकर, कुलसचिव डॉ. के. टी. चव्हाण आदी उपस्थित होते.

रोजगारनिर्मितीवर भर
कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर विशेष भर दिला जात आहे. विद्यापीठानेदेखील वैद्यक क्षेत्रातील रोजगार निर्माण करण्यासाठी नवे अभ्यासक्रम सुरू करावेत, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणूक करणाऱ्या बिल्डरविरोधात गुन्हा

$
0
0

‌म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्राहकांनी विकत घेतलेल्या सदनिकांची खरेदी न देणाऱ्या तसेच इमारतीची परस्पर विक्री करू पाहणाऱ्या बिल्डरविरोधात शुक्रवारी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत केला जाणार आहे. महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅटस रेग्यूलेशन अॅण्ड प्रमोशन ऑफ कन्स्ट्रक्शन, सेल, मॅनेजमेंट अॅण्ड ट्रान्सफर अॅक्टनुसार पहिल्यांदाच अशी कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

साहेबराव गंगाधर कदम असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बिल्डरचे नाव आहे. स्ट्रफकॉन इंजिनीअर्स या कंपनीचे संचालक असलेल्या कदम यांनी गंगापूर पोलिस स्टेशन हद्दीतील योग विद्याधामसमोर सन्मित्र अपार्टमेंट या इमारतीचे काम पूर्ण केले. त्यानुसार फिर्यादी संजीव भाऊसाहेब बारवकर तसेच इतर सदस्यांनी १९९३ मध्ये अॅग्रिमेंट ऑफ सेल करून फ्लॅट विकत घेतले होते. यानंतर बारवकरसह इतर सदस्यांनी वेळोवेळी संशयित कदम यांच्याकडे फ्लॅट खरेदी करण्यासंदर्भात पाठपुरवा केला. मात्र, कदमने काहीतरी कारणे दाखवून हे काम पूर्ण केले नाही. इमारतीचे काम पूर्ण करणाऱ्या कदमने सहकारी सोसायटी स्थापन करून तिची नोंदणी करणे आवश्यक होते. मात्र, कदमने त्याकडेही दुर्लक्ष केले. त्यामुळे इमारतीची जागा व इमारत सोसायटीकडे म्हणजेच फ्लॅटमालकांकडे हस्तांतरित झालीच नाही.

गंगापूर पोलिसांनी संशयिताविरोधात कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे तसेच महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅटस रेग्यूलेशन अॅण्ड प्रमोशन ऑफ कन्स्ट्रक्शन, सेल, मॅनेजमेंट अॅण्ड ट्रान्सफर अॅक्टच्या कलम ४, ५, ७, १० व ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे.

... असे आहेत बिल्डरवर आरोप
साहेबराव कदम व त्यांची पत्नी कल्पना यांनी दरम्यानच्या काळात संगनमत करून सरकारी कागदपत्रांची फेरफार करून सदर इमारतीच्या जागेवर आयटी पार्क बांधण्यासाठी महापालिकेकडे फेरफार केलेली कागदपत्रे सादर केली. फिर्यादीच्या बिल्डींगचे मंजूर असलेल्या नकाशापेक्षा जास्त बांधकाम केले. अनधिकृतपणे जास्त मजले बांधणे, सदस्यांना खरेदी खत करून न देणे, सोसायटी नोंद न करणे अशा अनेक गुन्ह्यांबाबत फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आणखी शंभर कोटी द्या’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचे राज्य सरकारकडून ६७ कोटी रुपये येणे बाकी असतानाच, महापालिकेने सिंहस्थात पालिकेने खर्च केलेल्या निधीबदल्यात अतिरिक्त शंभर कोटींचा निधी राज्य सरकारकडून मागितला आहे. ध्वजावतरण सोहळ्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांकडे महापौर अशोक मुर्तडक यांनी आणखी शंभर कोटींच्या निधीची मागणी केली आहे.
सिंहस्थ ध्वजावतरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी रामकुंडावर कपालेश्वर मंदिरासमोरील पटांगणात झालेल्या समारंभात महापौर अशोक मुर्तडक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राज्य सरकारने सिंहस्थ खर्चासाठी पालिकेला आणखी शंभर कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी केली आहे. राज्य सरकारने दिलेल्या भक्कम पाठबळावरच सिहंस्थ कुंभमेळा यशस्वी झाला आहे. पालकमंत्र्यांसह आमदार, नगरसेवक, प्रशासनाने एकत्र‌ित प्रयत्न केल्याने कुंभमेळा यशस्वीपणे पार पडला आहे. नाशिककरांमुळेच कुंभमेळा यशस्वी झाल्याचे सांगत, महापौरांनी कुंभमेळ्यासाठी नाशिककरांच्या कराचा पैसा वापरण्यात आला असल्याचे सांगितले. महापालिकेने सिंहस्थासाठी अधिकची रक्कम वापरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुविधांवर त्याचा परिणाम झाला असल्याचेही ते म्हणाले.
जकात व एलबीटीमुळे पालिकेचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली नसतानाही पालिकेने नागरिकांचा पैसा सिंहस्थासाठी वापरला आहे. त्यामुळे राज्य सरकारने महापालिकेला अतिरिक्त शंभर कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. दुग्ध विकास मंत्री महादेव जानकरांसोबतच मुख्यमंत्र्यांना त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्य सरकारने यापूर्वीच ७५ टक्के वाटा दिला आहे. त्यात पुन्हा पालिकेने शंभर कोटींची मागणी केल्याने
आता सरकारसमोर धर्मसंकट उभे राहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारंपरिक वाद्यांनी वाढविली रंगत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संबळ, तारपा, पावरी, दिमडी, बुलबुल अशा एकापेक्षा एक वाद्यांच्या वादनाने नाशिकरांना तालावर डोलायला लावले. निमित्त होते 'जागर सूर तालांचा' या कार्यक्रमाचे. उत्तर महाराष्ट्रातील वाद्य संग‌‌ीतातील उदयोन्मुख कलावंतांसाठी (कै.) भगवान अंधृटकर वाद्य-संगीत कलावंत शोध अभियान शुक्रवारपासून (ता. १२) गंगापूर रोडवरील शंकराचार्य संकुलात सुरू झाले. शुक्रवारी सायंकाळी 'जागर सूर-तालाचा' ही दुर्मिळ वाद्यांची मैफल आयोजित करण्यात आली होती. त्यात नाशिककरांना पारंपरिक वाद्यांच्या संग‌ीताची मेजवानी मिळाली.
या कार्यक्रमात कालौघात विस्मृतीत जात असलेली वाद्ये ऐकायला मिळाली. यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वादक हजर होते. यात अस्सल मराठी मातीतील दिमडी, संबळ, तारपा, पावरी, ढोलकी, हलगी, टिंग्री, सुंद्री, सनई यांसारख्या लोकवाद्यांबरोबरच क्लॅरोनेट, ट्रंपेट, सुफराना, सॅक्सोफोन, मेंडोलीन आदी पाश्चात्य वाद्यही श्रोत्यांना ऐकायला मिळाली. आदिवासी, ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक कलावंतांनी यात आपली कला सादर केली.
कार्यक्रमाची सुरुवात मिलिंद व भालचंद्र अंधृटकर, त्यांच्या मातोश्री प्रमिला अंधृटकर व इतर मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे आयोजक वासुदेव दशपुत्रे, नवीन तांबट, शाम पाडेकर, श्रीकृष्ण चंद्रात्रे, मधुकर झेंडे यांच्या हस्ते नटराज पूजन, तर गांगोड बारी येथील ज्येष्ठ पावरीवादक वामन गवळी यांच्या हस्ते रंगमंच पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वासुदेव दशपुत्रे यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूम‌िका त्यांनी विषद केली. भालचंद्र अंधृटकर यांनी कार्यक्रम सादर करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर विविध पारंपरिक वाद्यप्रकार सादर करण्यात आले. शहनाई वादन, दिमडी जुगलबंदी, पावरी वादन, बेंजो वादन, संबळची जुगलबंदी यांनी उपस्थितांना ताल धरायला लावला. तीन दिवस चालणाऱ्या स्पर्धेचा कर्टन रेझर म्हणून हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्या वाद्यांची स्पर्धा कधी घेतली जात नाही, अशा वाद्यांची स्पर्धा आयोजित करून यातील चांगल्या कलावंतांना हुडकून काढणे व प्रोत्साहन देणे हा यामागचा हेतू होता. या स्पर्धेत विविध वाद्य वाजविणारे १२० स्पर्धक सहभागी झाले आहेत. परीक्षक म्हणून मुंबई येथील ज्येष्ठ शहनाई वादक शैलेश भागवत व पुणे येथील प्रसिद्ध बासरीवादक नीलेश देशपांडे काम पाहत आहेत. १३ व १४ ला मुख्य स्पर्धा आणि १५ ऑगस्टला अंतीम स्पर्धा व बक्षीस वितरण होणार आहे. त्यासाठी बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध सतारवादक पंडित नरेंद्र शर्मा उपस्थित राहणार आहेत. बक्षीस समारंभानंतर पंडित शर्मा यांचे सतारवादन होणार आहे. चारही दिवसांचे सर्व कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत. संगीतप्रेमींनी या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक आले आहेत. नाशिककरांना ही दुर्मिळ वाद्ये ऐकण्याची संधी मिळणार आहे. जास्तीत जास्त रसिकांनी याचा लाभ घ्यावा.
- वासुदेव दशपुत्रे, आयोजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छगन भुजबळ उच्च न्यायालयात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

सक्तवसुली संचालनालयाकडून (इडी) आपल्याविरुद्ध सुरू असलेली कारवाई बेकायदा आहे. कोणत्याही अधिकाराविना आपल्याला बेकायदा डांबण्यात आले असून आपल्याविरुद्ध ज्या पीएमएलए कायद्यातील तरतुदींखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, ते आपल्याला लागूच होत नाहीत, असा दावा करत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

सक्तवसुली संचालनालयाकडून (इडी) व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) आपल्याने आपल्याविरुद्ध नोंदवलेले गुन्हे चुकीचे व खोटे आहेत, असा दावा करत ते रद्द करण्याची आणि याचिकेवर निर्णय होईपर्यंत जामीन देण्याची विनंतीही भुजबळांनी याचिकेत केली आहे. ही याचिका शुक्रवारी न्या. व्ही. एम. कानडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणीस आली असता, 'आमच्यासमोर नको', असे खंडपीठाने स्पष्ट केले. त्यामुळे ही याचिका आता अन्य खंडपीठासमोर सुनावणीस येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वे-ब्रिज उरले दंडापुरतेच!

$
0
0

टोल नाक्यांवर अतिरिक्त माल काढण्याच्या कारवाईला टाळाटाळ

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक : टोल नाक्यांवरील वे-ब्रिज (वजन काटा)चा वापर फक्त दंड वसुलीसाठी होत असून, प्रत्यक्ष या ठिकाणी अतिरिक्त माल काढून घेण्याची कारवाईच होत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे टोल नाक्यांवरील कारभार पुन्हा चर्चेत आला आहे. तसेच, दंड भरून अवैध वाहतुकीलाही यातून चालना मिळत आहे.

पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांमुळे समस्त महाराष्ट्र हैराण आहे. मुंबई-आग्रा हा नॅशनल हायवेसुध्दा खड्ड्यांपासून मुक्त नाही. अवजड वाहनांमुळे रस्त्यांची चाळणी होते. मात्र, अवजड वाहनांना रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येत नाहीत. नॅशनल हायवे अॅथोरिटच्या नियमानुसार टोल नाक्यावरील वे-ब्रिजचा वापर दंडात्मक कारवाईपुरता मर्यादित न राहता अतिरिक्त माल काढून घेणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होत नाही. अवजड वाहनांना प्रतिबंद नसल्याचा फटका मात्र इतर वाहनचालकांना बसत आहे.

जुलै महिनाअखेरीस सुरू झालेल्या वरुणराजाने राज्यभर चांगली कृपा केली. मात्र रस्त्यांच्या वाईट परिस्थितीमुळे मनस्तापाला समोरे जावे लागले. नाशिक शहर, तसेच शहराला जोडणारे प्रमुख रस्तेही त्याला अपवाद नाहीत. अक्षरश‍ः शहरातील महत्त्वाचा उड्डाणपूलही खड्ड्यांच्या समस्यांनी त्रस्त आहे. रस्त्यावरील खड्ड्यांसाठी अवजड वाहने कारणीभूत ठरतात. मात्र, अशा वाहनांना रोखण्यासाठी यंत्रणा खूपच अपुरी असल्याचे सूत्रांनी सांगितले. नॅशनल हायवेवरील काही टोल नाक्यांवर वे-ब्रिजचा वापर करण्यात येतो. कोणतेही अवजड वाहन आल्यास त्याच्या वजनानुसारच त्याला पावती दिली जाते. वास्तविक अतिरिक्त भार वाहणाऱ्या वाहनांना टोल नाक्यावरच रोखून त्यातील अतिरिक्त माल दुसऱ्या वाहनामध्ये नेण्यासाठी वाहनचालकाला बाधित करता येऊ शकते. वे-ब्रिज असलेला एक टोल नाका पिंपळगाव येथे कार्यरत आहे. याबाबत बोलताना सूत्रांनी सांगितले की, सध्या आम्ही फक्त दंडात्मक कारवाईवर भर देतो. एप्रिल २०१५ मध्ये हे वे-ब्रिज बसविण्याबाबत आम्हाला सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, ते बंधनकारक नव्हते. त्यामुळे घोटी टोलनाक्याला वे-ब्रिज बसवलेलेच नाही. पिंपळगाव टोलनाक्याच्या दोन्ही बाजूस वे-ब्रिज आहे. दुसरे वाहन आणून अतिरिक्त माल त्यात भरणे हे फारच त्रासदायक काम असून, इथे (पिंपळगाव) हे शक्य नसल्याचे संबंधिताने स्पष्ट केले. महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्याच्या सीमाभागात अशा पध्दतीने काम चालते. रस्ता चांगला ठेवणे हे ठेकेदाराचे काम असले तरी त्याला त्यासाठी तितका पैसाही मिळणे आवश्यक असल्याचा दावा संबंधितांनी केला. दरम्यान, अवजड वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागामार्फत कारवाई केली जाते. एप्रिल ते जुलै या महिन्यात नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने ५३९ अवजड वाहनांवर कारवाई केली. यातून ६७ लाख ९५ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वास्तविक अतिरिक्त मालांची वाहतूक करणे हे ट्रान्सपोर्टर तसेच कंपन्यांसाठी फायद्याचे असते. त्यामुळे दंडाची रक्कम भरूनही अवजड वाहनांचे दळणवळण कमी होत नाही.

विभाग - तपासलेली वाहने - दोषी वाहने - निकाली - जप्त वाहने - माल जप्त - दंड

नाशिक - ११०० - ५३९ - ३२९ - १५८ - १५८ - ६७,९५,७५०

अहमदनगर - ४४७ - १५२ - १३१ - १५२ - १३१ - ९,६९,६६०

श्रीरामपूर - २१६ - १५७ - १३२ - १२ - १३२ - २०,८२,१५०

मालेगाव - ४४९ - ८१ - ५६ - ५६ - ५७ - १८,१३,४००

एकूण - २२१२ - ९२९ - ६४८ - ३७८ - ४७८ - १,१६,६०,९६०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवयव प्रत्यारोपणासाठी आता पोलिस व्हेरिफिकेशन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये अवयव प्रत्यारोपणासंदर्भात घडलेल्या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. दोषी डॉक्टरांना सोडणार नाही, असे सांगत वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आता प्रत्यारोपण करण्यापूर्वी अवयवदानाची पासपोर्टच्या धर्तीवर पोलिसांकडून व्हेरिफिकेशन करणार असल्याचे जाहीर केले आहे. अवयव प्रत्यारोपणापूर्वी अवयवदान प्रक्रियेची निवृत्त न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी झाल्यानंतरच अवयवदान करता येईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. तसेच अवयवदान कायद्याच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व सुसूत्रता यावी, यासाठी कायदा आणखी कडक करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये घडलेल्या प्रकारासंदर्भात नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी अवयवदानाचे राज्यासह देशात रॅकेट कार्यरत असल्याचे मान्य केले आहे. नातेवाइकांचे बोगस दाखले जोडून अवयवदान केले जाते. अवयवदानासंदर्भातील कायदा हा अत्यंत कडक आहे; परंतु या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व सुसूत्रता आणणे गरजेचे आहे. अवयवदानासंदर्भात आता हॉस्पिटल्सची समिती निर्णय घेत होती. मात्र, या प्रकाराने आता यात बदल करण्यात येणार आहे. पासपोर्ट देताना ज्याप्रमाणे पोलिस व्हेरिफिकेशन केले जाते, त्याच धर्तीवर अवयव प्रत्यारोपणापूर्वीच पोलिस व्हेरिफिकेशन करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांची समिती या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल व त्यानंतरच प्रत्यारोपणाला परवानगी मिळेल, अशी व्यवस्था निर्माण केली जाणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. अवयवदानाची प्रक्रिया अधिक कडक करणार असल्याचे त्यांनी सांगितले असून, 'हिरानंदानी'तल्या दोषी डॉक्टरांवरही कडक कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

मंदिरांची लवकरच बैठक

राज्यातील बड्या मंदिरांनी आपल्या उत्पन्नाचा ५० टक्के निधी आरोग्य विभागाला द्यावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनीही लक्ष घालत पुढील आठवड्यात शिर्डी संस्थान, पंढरपूर संस्थान, सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट आदी प्रमुख मंदिरांच्या ट्रस्टच्या अध्यक्षांची व सदस्यांची बैठक बोलविली असल्याचे महाजन यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर, काश्यपीवर आता पोल‌िस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर व काश्यपी धरणावर पोल‌िस संरक्षण उपलब्ध करून देण्याची महापौर अशोक मुर्तडक यांची मागणी जलसंपदा विभागाने मान्य केली आहे. जलसंपदा विभागाने नाशिक ग्रामीण पोल‌िस अधीक्षकांना पत्र लिहून गंगापूरसाठी चार, तर काश्यपीसाठी चार असे एकूण आठ पोल‌िस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या संदर्भातील पत्र नाशिक पाटबंधारे विभागाने पोल‌िसांना दिले आहे. त्यामुळे आता गंगापूर धरणाच्या सुरक्षेसाठी पोल‌िस तैनात केले जाणार आहेत.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाची सुरक्षा वेळोवेळी धोक्यात आली आहे. यापूर्वीच लष्करचा संशय‌ित अतिरेकी बिलाल शेखनेही धरणाची रेकी केली होती. तसेच धरणाच्या आजुबाजूला पर्यटन स्थळे असल्याने नागरिक थेट धरणाच्या गेटवर जातात. अलीकडे महापालिकेच्या वतीने जलपूजन करण्याच्या कार्यक्रमावेळी काही तरुण धरणावर दारू पिऊन पार्टी करत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे महापौरांनी पोल‌िस व पाटबंधारे विभागाला पत्र देऊन धरणाची सुरक्षा वाढविण्याची मागणी केली होती. धरणाचा माथा हा ३.८ किलोमीटर लांब आहे.

सध्या या ठिकाणी चार कर्मचारी उपलब्ध आहेत. पंरतु, नागरिक त्यांना जुमानत नाहीत. त्यामुळे संरक्षणासाठी पोल‌िस मिळावेत असे पत्र पाटबंधारे विभागाने नाशिक ग्रामीण पोल‌िस अधीक्षकांना दिले आहे. गंगापूर धरणावर दिवसपाळीत दोन, तर रात्रपाळीसाठी दोन असे चार पोल‌िस मिळावेत. तसेच काश्यपी धरणावर धरणग्रस्तांचे आंदोलन सुरू असते. काही दिवसांपूर्वीच धरणाचे गेट आदोलकांनी उघडले होते. त्यामुळे या ठिकाणीही चार पोल‌िस मिळावेत, अशी मागणी पाटबंधारेने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायतीत मिळणार रेल्वे तिकीट

$
0
0

'आपले सरकार केंद्र' उभारण्याचे आदेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात ग्रामपंचायतीसाठी विविध दाखल्यांसाठी ई-पंचायत अंतर्गत मिळणारी महाऑनलाइन सेवा आता आपले सरकार सेवा केंद्रात मिळणार आहे. या सेवेत आता रेल्वे तिकीट, बस आरक्षण, बँकिंग आदी सेवा गावातच मिळणार आहेत. यासाठी राज्य सरकारने नुकतेच ही सेवा देण्यासाठी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी विविध सूचना केल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यात १३७६ ग्रामपंचायत असून, त्यात १५ लाख उत्पन्न असणाऱ्या ग्रामपंचायतीत स्वतंत्र केंद्र असेल. त्यापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या ग्रामपंचायतही हे केंद्र उभारू शकेल, पण त्यांना आर्थिक जबाबदारी घ्यावी लागणार आहे. पण या ग्रामपंचायतीने स्वच्छेने निर्णय न घेतल्यास तेथे आजूबाजूच्या ग्रामपंचात मिळून क्लस्टर तयार करण्यात येणार आहे. सदर केंद्र उभारण्याचा प्रस्ताव ग्रामसभेत ठेवून त्यास मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर या केंद्राला लागणारा निधी जिल्हास्तरीय निधीत वर्ग करण्यास मंजुरी घ्यावी लागणार आहे. हे सर्व १ सप्टेंबरपर्यंत करावे लागणार असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या हाती आता अवघे १८ दिवस उरले आहेत.

या केंद्राचे संपूर्ण व्यवस्थापन सीएससी-एसपीव्ही कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात किंवा परिसरातील ग्रामोद्योजक आपले सरकार सेवा केंद्रचालक म्हणून काम करेल. या केंद्रास ग्रामपंचायतीची जागा, इलेक्ट्रीसिटी, इंटरनेट कनेक्टिव्हीटी सुविधा वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. या केंद्रामार्फत ग्रामपंचायतीव्दारे देण्यात येणारे दाखले महाऑनलाइन पध्दतीनेच दिले जाणार आहेत. राज्याने हे सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय अगोदरच घेतला होता, पण आता त्याची अंमलबजावणी सुरू केली असल्यामुळे ग्रामीण जनतेला त्याचा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे सर्व सेवा एकाच केंद्रात मिळणार असल्यामुळे त्याचाही फायदा होणार आहे.

या सुविधा गावातच मिळणार

या सेवेत आता रेल्वे तिकीट, बस आरक्षण, बँकिंग सेवा, पोस्ट सेवा, पासपोर्ट, डीटीएच रिचार्ज, आर्थिक समावेशन, ई-कॉमर्स, पॅनकार्ड, आधार नोंदणी, विमा हप्ते, इलेक्ट्रीसिटी बिल मिळणार आहे. यामुळे ग्रामपंचायतींना बळकटी मिळणार असून, ग्रामीण जनतेचे प्रश्न गावातच सुटू शकणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images