Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सव्वादोन कोटी दंड लोकअदालतीत वसूल

$
0
0

म .टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाद्वारे जिल्ह्यातील कोर्टांमध्ये आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत नुकसान भरपाई व दंडापोटी तब्बल दोन कोटी ३५ लाख रुपये वसूल करण्यात आले. त्यापैकी पावणेदोन कोटी रुपये दूरध्वनी सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना मिळाले आहेत.

शनिवारी जिल्ह्यातील कोर्टांमध्ये आयो‌जित लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांसह जिल्हा न्यायाधीश उर्मिला फलके जोशी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष नितीन ठाकरे, न्यायिक अधिकारी, वकील, पक्षकार व संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या लोकन्यायालयात जिल्ह्यातील न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणांपैकी दोन हजार ६८८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. याखेरीज सात हजार ८१० दावा पूर्व दाखल प्रकरणेही ठेवण्यात आली. अशा प्रलंबित प्रकरणांपैकी ३४९ प्रकरणे लोकन्यायालयात निकाली काढण्यात आली. दावा दाखलपूर्व २४१ प्रकरणांचाही निपटारा करण्यात आला. या लोकअदालतीमधून दूरध्वनी कंपन्यांना एक कोटी ७५ लाख ८९ हजार ५२ रुपये नुकसान भरपाई व दंडापोटी मिळाले. मोटार अपघात प्रकरणांमध्ये ५९ लाख १० हजार १८५ रुपये वसूल करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वि. र. अगरवाल यांनी जिल्ह्यातील सर्व न्या‌यिक अधिकारी, वकील, पक्षकार व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तब्बल ८४ ठिकाणी कोसळल्या दरडी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यात ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर तब्बल ८४ ठिकाणी दरड कोसळल्या घटना घडल्या. तर जिल्ह्यातील १३१ ठिकाणी रस्ते व पूल पाण्याखाली गेल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे दरड कोसळण्याच्या घटनेनंतर बांधकाम विभागाने तातडीने बंद पडलेला रस्ता सुरळीत करून वाहतूक सुरू केली. २ ते ८ ऑगस्ट या सात दिवसात या सर्व घटना घडल्या.

जिल्ह्यातील दरड कोसळण्याच्या सर्वाधिक ४१ घटना या त्र्यंबक तालुक्यात झाल्या असून नाशिक व निफाडमध्ये एकही घटना घडली नाही. मात्र अतिवृष्टीमुळे नाशिक तालुक्यात १९ ठिकाणी रस्ते व पूल पाण्याखाली गेले तर निफाडमध्ये हाच आकडा २५ वर होता. त्र्यंबक खालोखाल पाऊस झालेल्या इगतपुरी तालुक्यात मात्र ६ ठिकाणीच दरड कोसळली तर पाच ठिकाणी रस्ते व पूल पाण्याखाली गेले.

याबरोबरच कळवण ११, पेठ १०, सुरगाणा १०, सटाणा १, सिन्नर ४, दिंडोरी १ येथेही दरड कोसळल्या. त्याचप्रमाणे रस्ते व पूल पाण्याखाली वाहून गेल्याच्या घटना पेठ २४, सुरगाणा ११, दिंडोरी १२, त्र्यंबकेश्वर १०, सिन्नर ७, सटाणा १० झालेल्या आहे.

जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेतील परिसरातही या घटनाही घडल्या नसल्या तरी अतिवृष्टीमुळे मात्र मोठे नुकसान झालेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर पावसामुळे रस्ते व पूल पाण्याखाली गेले तर त्याची माहिती घेतली जाते. जास्त वेळ जर ते पाण्याखाली असले तर त्याची तातडीने दाखल घेऊन दक्षता घ्यावी लागते. त्यामुळे ही आकडेवारी तत्काळ गोळा केली जाते. त्याचप्रमाणे पावसामुळे किती खड्डे पडले याची माहिती आता गोळा केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डरला पत्नीसह अटक

$
0
0

बि‌ल्डिंग विक्रीप्रकरण; १५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्राहकांनी विकत घेतलेल्या सदनिकांची खरेदी न देणाऱ्या, तसेच या इमारतीची परस्पर विक्री करू पाहणाऱ्या बिल्डरला आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री अटक केली. या बिल्डरला मदत करणाऱ्या त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी सहआरोपी केले असून, या दोघांना शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांना १५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

साहेबराव गंगाधर कदम आणि कल्पना साहेबराव कदम असे या दाम्पत्याचे नाव आहे. या दोघांविरोधात शुक्रवारी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स रेग्युलेशन अॅण्ड प्रमोशन ऑफ कन्स्ट्रक्शन, सेल, मॅनेजमेंट अॅण्ड ट्रान्सफर (मोफा) या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी संजीव भाऊसाहेब बारवकर यांनी फिर्याद दिली. स्ट्रफकॉन इंजिनीअर्स या कंपनीचे संचालक असलेल्या कदम यांनी गंगापूर पोलिस स्टेशन हद्दीतील योग विद्याधामसमोर सन्मित्र अपार्टमेंट या इमारतीचे काम पूर्ण केले. मात्र, १९९३ मध्ये अॅग्रिमेंट ऑफ सेल करूनदेखील बारवकर यांच्यासह इतर सदस्यांना त्यांनी खरेदी दिली नाही. या दरम्यान साहेबराव कदम व त्यांची पत्नी कल्पना यांनी संगनमत करून सरकारी कागदपत्रांची फेरफार करून सदर इमारतीच्या जागेवर आयटी पार्क बांधण्यासाठी महापालिकेकडे फेरफार केलेली कागदपत्रे सादर केली. ही माहिती बारवकरांना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला असून, गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये संशयिताविरोधात कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे तसेच मोफाच्या कलम ४, ५, ७, १० व ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी लागलीच कदम दाम्पत्याला अटक केली असून, त्यांना शनिवारी कोर्टात हजर करण्यात आले.

आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता

या गुन्ह्यात कदमने कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. सरकारी कागदपत्रांमध्ये फेराफार करताना कदमला कोणी सहाय्य केले. हे काम कोणत्या ठिकाणी झाले याविषयी तपास करण्यात येईल. त्यात काही निष्पन्न झाले, तर निश्चितच आरोपींची संख्या वाढू शकते, असे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय पन्हाळे यांनी सांगितले.

बांधकाम क्षेत्रात खळबळ

मोफा तसेच एमआरटीपी अॅक्टमधील कलमाचा प्रभावी वापर व्हावा, याविषयी गृह विभागाने राज्यातील सर्वच पोलिस आयुक्त, तसेच पोलिस अधीक्षकांना सुचित केले आहे. राज्य सरकारच्या सूचनांनंतर पहिल्यांदाच नाशिक शहर पोलिसांनी असा गुन्हा दाखल केला असून, त्याचा तपास थेट आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेवर पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांचा थेट अंकुश असून, मोफानुसार झालेल्या पहिल्याच कारवाईनंतर शहरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. राज्यातील इतर व्यावसायिक या गुन्ह्यासंबंधी माहिती घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाच्या कामकाजास ‘किऑस’चा फायदा

$
0
0

जिल्हा कोर्ट परिसरात बसविल्या तीन मशिन्स

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

किऑस मशिनच्या आधारे पक्षकारांना त्यांच्या खटल्यासंबंधी हवी असलेली माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. यामुळे पक्षकाराचा वेळ अपव्यप टळणार असून, अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा कोर्टाच्या कामकाजास नि​श्चितच फायदा होईल, अशी माहिती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांनी दिली.

जिल्हा कोर्टाच्या परिसरात नव्यानेच बसविण्यात आलेल्या तीन किऑस मशीन, तसेच राष्ट्रीय लोकअदालतीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा कोर्ट व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने या मशीन बसविण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. जिल्हा कोर्टाचे वाढते कामकाज लक्षात घेता अशा २५ मशीन अगामी काळात बसविण्याचे आमचे नियोजन आहे. यासाठी आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाची मदत लागेल. न्याय व जिल्हाधिकारी कार्यालय हे एकमेकांच्या मर्यादेत काम करीत असतात. मात्र, दोघांना एकमेकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे न्यायाधीश ढवळे म्हणाले.

दरम्यान, आज सर्वांचा विश्वास लोकशाहीतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या न्यायव्यवस्थेवर आहे. परिणामी न्यायालय व्यवस्थेवर कामाचा ताणही वाढत चालला आहे. कामाचे ओझे कमी करण्यासाठी माहिती तंत्रज्ञाचा वापर हा आवश्यक बनला आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने न्यायालयीन प्रक्रिया गतिमान होण्यास मदत होणार आहे. किऑस मशिनच्या माध्यमातून पक्षकारांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. जिल्हा न्यायालयात सुरक्षेचा कारणास्तव अधिक सीसीटिव्ही बसविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निधी उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लोकअदालतीत महसुली दावे वाढविण्यावर आमचा भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी, न्यायाधीश ए. एच. काशिकर, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, जिल्हा सरकारी वकील राजेंद्र घुमरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव अग्रवाल यांनी प्रस्ताविक केले. न्या. उर्मिला फलके-जोशी यांनी किऑस मशिनचे कार्य विशद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होमगार्ड भरतीला ३०० जण मुकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, आडगाव

जिल्ह्यातील रिक्त जागांसाठी शनिवारी प्रशासनातर्फे राबविण्यात आलेल्या होमगार्डच्या भरती प्रक्रियेत केवळ काम करीत असलेल्या ठिकाणचे हमीपत्र नसल्याने सुमारे ३०० जण सहभागी होऊ शकले नाहीत. पोलिस प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता होमगार्ड भरतीसाठी काम करीत असलेल्या ठिकाणचे पत्र असणे बंधनकारक असते. त्यामुळे ज्यांच्याकडे असे हमीपत्र नव्हते त्यांच्यासाठी आम्ही पाच वाजेपर्यंत वेळ दिलेला होता. या वेळेत ज्यांनी हमीपत्र आणले त्यांना भरतीप्रक्रियेत सहभागी करून घेतले.

होमगार्ड भरती प्रक्रियेची सुरुवात सकाळी आठ वाजता झाली. भरतीसाठी जिल्हाभरातील १००० ते १२०० जण उपस्थित होते. आलेल्या सर्वांची प्रथम नोंदणी व कागदपत्र तपासणी करण्यात आली. सर्वप्रकारची कागदपत्रे असूनही केवळ काम करीत असलेल्या ठिकाणचे हमीपत्र नसल्याने सुमारे ३०० जणांना होमगार्ड भरतीप्रक्रियेपासून वंचित राहावे लागले. कळवण, मनमाड, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, येवला अशा सर्व तालुक्यांतून शेकडो जण या भरती प्रक्रियेत सहभागी झाले होते. पोलिस भरतीप्रमाणे सहभागी उमेदवारांची फिटनेस चाचणी घेण्यात आली. त्यानंतर ग्राउंड आणि इतर चाचण्या घेण्यात आल्या. सायंकाळी उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. ५४७ जागांसाठी भरती होणार असल्याचे पोलिस प्रशासने सांगितले.


आम्हाला हमीपत्र आणण्यासाठी १२ वाजेपर्यंतचा वेळ दिला होता. पण, गावावरून १२ वाजेपर्यंत हमीपत्र आणणे शक्य नसल्याने आम्ही या भरतीपासून वंचित राहिलो आहे.

- भास्कर कडनोर, सुरगाणा

---

पोलिस प्रशासनाला अनेक वेळा विनंती करूनदेखील करूनही हमीपत्र आणण्यासाठी १२ वाजेनंतर वेळ वाढवून दिला नाही. थोडा वेळ दिला असता, तर आम्हालाही या भरतीत सहभागी होता आले असते.

- दीपक कातकाडे, नांदगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हंगामी कर्मचाऱ्यांच्या माहितीचे संकलन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'एलआयसी'ने काढून टाकलेल्या हंगामी कर्मचाऱ्यांना पुन्हा कायमस्वरूपी नोकरीमध्ये सामावून घ्यावे, तसेच त्यांना मागील पगाराच्या थकबाकीपोटी ५० टक्के रक्कम द्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे देशभरातील तब्बल ५५०० कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. जिल्ह्यातील अशा कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असून, त्यांची माहिती जमा करण्याचे काम विमा कर्मचारी संघटनेने सुरू केले आहे.

या आदेशाची अंमलबजावणी एलआयसीने आठ आठवड्यांत करण्याचेही आदेश देण्यात आलेले अाहेत. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन अॅड. कांतिलाल तातेड व सरचिटणीस मोहन देशपांडे यांनी केले आहे. याअगोदरच सर्वोच्च न्यायालयाने १८ मार्च २०१५ रोजी कामावरून काढून टाकलेल्या हंगामी कर्मचाऱ्यांना पुन्हा कायमस्वरूपी नोकरीवर घेण्याचे आदेश दिले होते. पण, आयुर्विमा महामंडळाने पुन्हा पुनर्विचार याचिका दाखल केली होती, त्यानंतर हा निकाल आला आहे.

याबाबत अॅड. तातेड यांनी सांगितले, की पुनर्विचार याचिका अत्यंत अपवादात्मक प्रकरणांत दाखल करता येते. पुनर्विचार याचिका म्हणजे पूर्वी केलेल्या अपिलाचीच पुन्हा नव्याने सुनावणी नव्हे, असे स्पष्ट करून आयुर्विमा महामंडळाने सदरच्या याचिकेत कायद्याचा कोणताही नवीन मुद्दा उपस्थित केलेला नाही अथवा कोणताही नवीन पुरावा दिलेला नाही.

अखिल भारतीय विमा कर्मचारी महासंघाने गेल्या २५ वर्षांपासून केलेल्या संघर्षामुळे हे यश मिळाले आहे. १९८१ ते १९८५ च्यादरम्यान तात्पुरते काम केलेल्या या कर्मचाऱ्यांना हा फायदा होणार आहे. असे तात्पुरते काम केलेल्या कर्मचाऱ्यांनी मोहन देशपांडे (९८५०५०९९३५), के. के. जगताप (९९२२११४६८६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



निर्णयाचा फायदा अन् तोटाही

१९८१ ते १९८५ च्यादरम्यान तात्पुरते काम केलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घेतले, तरी त्यांचे आजचे वय हे ५० ते ६० दरम्यान असणार आहे. त्यामुळे यातील काहींना फारतर चार-पाच वर्षे नोकरी मिळेल. २००५ पासून पेन्शन बंद केल्यामुळे त्याचा फायदा होतो की नाही, हे महत्त्वाचे आहे. पण, या निर्णयामुळे मागील पगाराच्या थकबाकीची ५० टक्के रक्कम मिळणार असून, ती मात्र मोठी असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस पार्किंग पोलिसांच्या कोर्टात!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

मुक्तिधाम येथील बेकायदेशीर पार्किंग शुल्क वसुलीतून बोगस ठेकेदाराकडून पालिकेला वर्षभरात लाखो रुपयांचा चुना लावल्याच्या 'मटा'च्या वृत्ताची महापालिका प्रशासनाने अखेर दखल घेतली आहे. या प्रकरणी अज्ञात ठेकेदाराविरोधात पालिका प्रशासनाने आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक कर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मेहेरबानीतून सुरू असलेल्या या बोगस ठेकेदाराची कल्पना पालिका वर्तुळात सर्वांनाच असताना या प्रकरणाचा चेंडू पोलिसांच्या कोर्टात ढकलण्याची खेळी आता खेळण्यात आली आहे. त्यामुळे कुणाची म्हैस अन् कुणाला ऊठबैस असं म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.

संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेल्या मुक्तिधामला भेट देण्यास येणाऱ्या भाविकांकडून वाहन पार्किंगच्या नावाखाली गेल्या वर्षभरापासून बोगस ठेकेदाराकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळली जात असल्याची बाब `मटा`ने नुकतीच उघडकीस आणली होती. विशेष म्हणजे मुक्तिधाम येथे पे अॅण्ड पार्कचा ठेका कुणालाही दिलेला नसतांना पालिकेच्या नावाची ५० ते १५० रुपये वसुलीची पावती राजरोसपणे प्रतिवाहन प्रतितास या नियमाने भाविकांच्या माथी मारण्यात येत होती. वर्षभरापासून सुरू असलेल्या या पार्किंग घोटाळ्याची दखल `मटा`ने घेताच पालिकेच्या स्थानिक प्रशासनाची तारांबळ उडाली होती. या घोटाळ्याचे अधिकृत पुरावे प्राप्त झाल्याने पालिका उपायुक्त रोहिदास बहिरम यांनी तत्काळ अनधिकृतरित्या पार्किंग शुल्क वसुली करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे आदेश दिल्याने सुधाकर नुरजी वसावे रा. पेठरोड, नाशिक यांच्या तक्रारीवरुन उपनगर पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.


कर विभागाला क्लिन चिट?

मुक्तिधाम येथे भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगच्या कर वसुलीची जबाबदारी पालिकेच्या विविध कर विभागाकडे आहे. त्यासाठी दोन कर्मचाऱ्यांचीही नेमणूक केलेली होती. असे असतांनाही बेकायदेशीररित्या पार्किंग शुल्क वसुली करुन पालिकेची आर्थिक फसवणुक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे विविध कर विभागात कुठे तरी पाणी मुरत नाही ना, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असतांना या विभागाला क्लिन चिट देत थेट अज्ञात व्यक्तीविरोधातच पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.


मुक्तिधाम येथे बेकायदेशीररित्या पालिकेच्या नावाखाली भाविकांकडून वाहनांच्या पार्किंगपोटी आर्थिक वसुली सुरू असल्याची माहिती मिळताच पालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष चौकशी केली. परंतु, अशा प्रकारची वसुली करतांना कोणीही आढळून आले नाही. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पालिकेची आर्थिक फसवणुक झाल्याचे स्पष्ट झाल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात पालिकेची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिस तपासातून सत्य बाहेर येईल.

-रोहिदास बहिरम, उपायुक्त, मनपा, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणांची देखभाल आता पाणीपट्टीतून

$
0
0


vinod.patil@timesgroup.com

नाशिक : राज्यातील लहान-मोठ्या साडेतीन हजार धरणांसह कालव्यांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी अर्थसंकल्पात ७० कोटींचीच तोकडी तरतूद होत असल्याने या धरणांच्या क्षमतेसह सुरक्षिततेचाही प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे धरणे व कालव्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी अधिक निधी उपलब्ध व्हावा, यासाठी धरणांवर अवलंबून असलेल्या संस्थांच्या पाणीपट्टीतूनच धरणांची देखभाल व दुरूस्ती करण्यात येणार आहे. या प्रस्तावामुळे दरवर्षी धरणांसाठी तब्बल ७०० ते ७५० कोटींचा निधी मिळू शकेल.

टेमघर धरणातून होत असलेल्या पाणीगळतीमुळे राज्यातील अन्य धरणांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. राज्यात आजमितीस १०१ मोठी धरणे, २५८ मध्यम धरणे व जवळपास तीन हजार लघुप्रकल्प आहेत. यातील ७५ टक्के धरणे ही जुनी असून, त्यांची देखभाल व दुरूस्तीच होत नसल्याचे समोर आले आहे. जलसंपदा विभागाने राज्यातील १२३१ धरणांची तपासणी केली आहे. त्यापैकी १२१६ धरणांमध्ये गळती असल्याचे समोर आले आहे. या धरणांची दरवर्षी देखभाल व दुरूस्ती होणे आवश्यक आहे. परंतु, यासाठी जलसंपदा विभागाला दरवर्षी अर्थसंकल्पात केवळ ६० ते ७० कोटी रुपयेच मिळतात. एवढ्या अल्पशा निधीतून धरणांची डागडुजी करता येणे शक्य नाही. त्यामुळे धरणातून होणारी गळती थांबविता येत नाही. तशीच स्थिती कालव्यांचीही आहे.

याबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले, की 'जलसंपदा विभागाने धरणांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी नवीन धोरण तयार केले आहे. औद्योगिक संस्था, महापालिका, नगरपालिका, पाणीवाटप सोसायट्यांकडून येणारी पाणीपट्टी आता केवळ धरणांच्या देखभाल व दुरूस्तीवरच खर्च करण्यात येणार आहे. दरवर्षी या संस्थाकडून पाणीपट्टी पोटी जलसंपदाला ७०० ते ७५० कोटी रुपये मिळतात. हा निधी धरणांच्या बांधणीसाठी न वापरता केवळ धरणांचे ऑड‌िट करणे, त्यांची डागडुजी, नियमित देखभाल व दुरूस्तीसाठीच राखीव ठेवून तो वापरता येणार आहे. धरणांची नियमितपणे देखभाल व दुरूस्ती होत राहिल्यास त्यांचे आयुष्य वाढून त्यांची सुरक्षितताही होणार असल्याचा दावा महाजन यांनी केला आहे. प्रस्तावाचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या पंधरा दिवसात तो मुख्यमंत्र्याकडे सादर केला जाणार आहे.

(कोट फोटोसह)

धरणे व कालव्यांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी पाणीपट्टी वळविण्याचे नवीन धोरण तयार करण्यात येत आहे. त्यातून मोठा आर्थिक निधी उपलब्ध होणार असून, हा निधी धरणांवर खर्च झाल्यास धरणांना बळकटी मिळेल अन् धरणांचे आयुष्यही वाढेल.

गिरीष महाजन, जलसंपदा मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पैशांच्या परताव्यासाठी गुजराती एजंटचे अपहरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

गुजरातच्या विनटेक या कंपनीत गुंतवणूक केलेले पैसे परत मिळविण्यासाठी नाशिकच्या दोघांनी गुजरातमधील एका एजंटचे अपहरण झाल्याची घटना नाशिक येथे घडली. भद्रकाली पोलिसांनी गतीने चक्रे फिरवून संशयितांना ताब्यात घेऊन एजंटचीही सुखरूप सुटका केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

ललित भानुभाई पटेल व हितेश अमृतलाल पटेल यांनी गुतरातच्या विनटेक कंपनीत दीड कोटी रुपये एजंट दीपक मुकेश कुकडीया यांच्यामार्फत गंतवणूक केली होती. कंपनीच्या टर्नओव्हरच्या पाच टक्के कमिशन कंपनीकडून दिले जाण्याचा अॅग्रीमेंट (करार) झाला होता. कंपनी तीन महिन्यांपासून तोट्यात गेल्याने संशयित गुंतवणूकदारांना परतावा (रिर्टन) मिळत नसल्याने गुंतवणूक केलेले पैसे परत मिळविण्यासाठी ललित पटेल व हितेश पटेल यांनी एजंट दीपक कुकडीया यांना फोन करून धमकावणे सुरू केले. यावर तोडगा काढण्यासाठी विनटेक कंपनीचे मालक जिग्नेश पानसरीया व एजंट दीपक कुकडीया हे गुंतवणूकदारांना समजविण्यासाठी नाशिकला आले. कंपनीचे मालक जिग्नेश पानसरीया यांना भेटीदरम्यान संशयितांनी जोपर्यंत तुम्ही तीन कोटी रुपये आणून देत नाही, तोपर्यंत एजंट दीपक कुकडीया आमच्या ताब्यात राहिल. आम्ही त्याला घेऊन जात आहोत, असे सांगण्यात आले. जिग्नेश पनसारीयांनी घडलेला प्रकार एजंट दीपकचे वडील मुकेश गणेशभाई कुकडीया यांना कळविला. त्यांनी तातडीने गुजरातहून नाशिकला पोहचत भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे यांना दिपकचे अपहरण झाल्याची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळ नाशिकमधूनही बेघर?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह कुटुंबीयांची मालमत्ता जप्त करण्याचा सपाटा लावला आहे. दोन दिवसांपूर्वीच भुजबळांच्या २२ मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून, त्यात व्यावसायिक व निवासी मालमत्तांचाही समावेश आहे. मुंबईतल्या निवासी इमारतींपाठोपाठ आता नाशिकमधील त्यांची शान असलेला कोट्यवधी रुपये किमतीचा भुजबळ फार्म हाऊसचाही समावेश आहे. त्यामुळे भुजबळ आता मुंबईपाठोपाठ नाशिकमध्येही बेघर होण्याची वेळ आली आहे. भुजबळ फार्म येथील त्यांच्या मालकीचा नवा आलिशान फार्मही त्यांनी गमावल्याची चर्चा आहे.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सहा महिन्यांपासून ईडीच्या कोठडीत असलेल्या माजी मंत्री भुजबळ यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. पदावर असताना ठेकेदारांकडून जवळपास ७८० कोटींचा लाभ घेत, या पैशातून त्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप केला जात आहे. ईडी या पैशातून जमा केलेली बेहिशेबी संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वीच ईडीने २२ मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली आहे. त्यात नाशिकमधील पाच मालमत्तांचा समावेश आहे. त्यात जय इलेट्रॉनिक्स, शिलापूर येथील जमीन, एमईटीसमोरील जमीन, दिंडोरीतील शेतजमिनीसह भुजबळ फार्मचाही समावेश आहे.

भुजबळ फार्ममधील साडेतीन एकर जागा ही भुजबळांची वडिलोपार्जित आहे, तर उर्वरित जागा त्यांनी नव्याने विकत घेऊन त्यावर आलिशान महाल उभा केला आहे. हा महाल व त्यांच्या कार्यालयाची जागा जप्त केली असून, हे बेहिशेबी पैशांतून बांधल्याचा ईडीचा आरोप आहे. भुजबळ फार्म ही भुजबळांची नाशिकमधील ओळख असून, ही जागाच आता ईडीने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे भुजबळांचा नाशिकमधील एकमेव निवाराही जप्त झाल्याने भुजबळ नाशिकमधून बेघर झाले असल्याची माहिती भुजबळांच्याच निकटवर्तीयांनी दिली आहे. ईडीकडून लवकरच जप्तीची कारवाई पूर्ण केली जाण्याची शक्यता आहे.

जुन्या बंगल्याबाबत संभ्रम

भुजबळ फार्म येथील काही भाग हा भुजबळांना वडिलोपार्जित स्वरूपात मिळाला आहे. १९९५ पूर्वीच त्या ठिकाणी जुना बंगला बांधण्यात आला आहे. मात्र, या बंगल्याचे नव्याने नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे हा बंगलाही ईडीने रडारवर घेतला आहे. त्यामुळे या बंगल्याच्या जप्तीबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे भुजबळांची उर्वरित शेवटची जागाही जाणार असल्याने त्यांची अवस्था कोणी 'घर देता का घर' या 'नटसम्राट'मधील शोकांतिकेसारखी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला बालकल्याणच्या सदस्यपदासाठी चुरस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महिला व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांची मुदत १२ ऑगस्ट रोजीच संपल्याने आता नव्या सदस्यांच्या निवडीसाठी १६ ऑगस्ट रोजी महासभा होणार आहे. महासभेत पक्षीय बलानुसार नऊ सदस्यांची निवड केली जाणार असून, नव्या निवडीत सभापतिपदावर आता मनसेने दावा ठोकला आहे, तर राष्ट्रवादीनेही सभापतिपद मागितले आहे. दरम्यान, शेवटचे वर्ष असल्याने या समितीवर तरी संधी मिळावी, यासाठी महिला सदस्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

महिला बालकल्याण समितीच्या विद्यमान सभापती वत्सला खैरे, उपसभापती भामरे यांच्यासह नऊ सदस्यांची मुदत १२ ऑगस्ट रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे नवीन सदस्य निवडीचा प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी नगरसचिव विभागाने १६ ऑगस्ट रोजी महासभा बोलावली आहे. नवीन सदस्यांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी महापौरांकडे गटनेत्यांची बैठक झाली. बैठकीत राष्ट्रवादीने सभापतिपद मिळावे अशी मागणी केली. मात्र, महाआघाडीच्या जागावाटपानुसार आता सभापतिपदावर मनसेचा दावा आहे. त्यामुळे मनसेकडे हे पद असावे, अशी मनसेची इच्छा आहे. त्यामुळे सदस्यांची नावे अंतिम होऊ शकली नाहीत. दुसरीकडे विद्यमान सदस्यांनी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे सर्व पक्ष कोंडीत सापडले आहेत. पुढील वर्षी निवडणुका आहेत. त्यामुळे समितीला कामकाजासाठी सहा महिनेच मिळणार आहेत. तरीही या समितीवर जाण्यासाठी महिलांमध्ये रस्सीखेच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्वान निर्बीजीकरण ठेकाही वादात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घंटागाडी व पेस्ट कंट्रोलमुळे अगोदरच वादग्रस्त ठरलेल्या आरोग्य विभागाची कोटीच्या कोटी उड्डाणे कायम असून, आता श्वान निर्बीजीकरणाचा ठेकाही वादात सापडला आहे. आरोग्य विभागाने नवीन ठेका देण्याची तयारी सुरू केली असून, हा ठेका आता ७५ लाखांवरून थेट एक कोटी १४ लाखांवर नेण्यात आला आहे. विभागाने दहा टक्के वाढ पकडली असली तरी २५ ते ३० लाखांचा गोलमाल यात असल्याचा आरोप आता केला जात आहे.

महापालिकेने शहरातील श्वान निर्बीजीकरणाचा ठेका नव्याने देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी तब्बल एक कोटी १४ लाख रुपये अंदाजित रक्कम धरण्यात आली आहे. प्रतिश्वानापोटी महापालिका कंत्राटदाराला ७५० रुपये अदा करते. त्यामुळे आतापर्यंत दरवर्षी या ठेक्यावर साधारण ७० ते ७५ लाख रुपये खर्च होतात. मात्र, नव्या ठेक्याची रक्कम ही थेट एक कोटी १४ लाखांपर्यंत नेण्यात आली आहे. या विभागासाठी जवळपास दहा कर्मचारी काम करत असून, त्यांना किमान वेतन देण्यामुळे किंमत वाढल्याचा दावा विभागातर्फे केला जात आहे. किमान वेतन दिले तरी ठेक्याची किंमत ही ८५ ते ९० लाखांपर्यंत जाणे अपेक्षित आहे. मात्र, ती थेट ४० लाखांपर्यंत वाढविण्यात आली असून, ठेकेदाराला २५ ते ३० लाख रुपये अतिरिक्त रक्कम देण्याचा घाट असल्याचा आता आरोप केला जात आहे.

आरोग्य विभागाने घंटागाडी प्रकरणातही अशीच कोटीच्या कोटी उड्डाणे केली होती. त्यामुळे हा ठेकाच आता वादात सापडला असतानाच, पुन्हा नव्याने श्वान निर्बीजीकरण ठेक्याचा वाद निर्माण होणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची पुन्हा कोंडी होऊन प्रशासनावर त्याचे खापर फुटणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्ही. के. सिंह यांनी घेतले त्र्यंबकराजाचे दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी शुक्रवारी भगवान त्र्यंबकराजाचे सपत्निक दर्शन घेतले.

नगराध्यक्षा विजया लढ्ढा, नगरसेवक धनंजय तुंगार, योगेश तुंगार यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासमवेत दीपक लढ्ढा आणि आरोग्य सभापती यशवंत भोये आदी या वेळी उपस्थित होते. व्ही. के. सिंह यांनी मंदिराची माहिती घेतली. त्यांना ध्वजावतरण सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, ते येथे येऊ शकले नसल्याने शुक्रवारी त्यांनी त्र्यंबकेश्वराला भेट दिली. या वेळी त्यांनी लढ्ढा यांच्याकडून ध्वजावतरण आणि सिंहस्थपर्वाची माहिती घेतली. या वेळी सिंह यांचा देवस्थान ट्रस्ततर्फे सत्कार करण्यात आला. विश्वस्त कैलास घुले उपस्थित होते. घुले यांनी देवस्थान संस्थानला केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडून सहकार्य मिळावे आणि विकासकामांबाबत माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षांची पळवापळव!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून पाहिल्या जाणाऱ्या रविवार कारंजा परिसरातील रिक्षाचालकांच्या येत असलेल्या तक्रारीनुसार शहर वाहतूक पोलिसांनी दोन दिवसात १६१ रिक्षाचालकांवर कारवाई केली. यापैकी २३ रिक्षा जप्त करण्यात आल्या तर सात रिक्षाचालकांवर सरकारवाडा पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहे.

रविवार कारंजा परिसरात रिक्षाचालकांच्या मक्तेदारीमुळे वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजतात. रविवार कारंजा परिसरात अनधिकृतपणे थांबा करून उभ्या राहणाऱ्या रिक्षाचालकांमुळे वाहतुकीची समस्या उग्र रूप धारण करीत आहे. शहर बसेसला वळण घेण्याइतकीही जागा मिळत नसल्याने वाहतूक कोंडी होते. अशोकस्तंभाकडून रविवार कारंजाकडे येणाऱ्या वाहनधारकांना रविवार कारंजावरील वळणावर रिक्षाचालकांच्या बेशिस्तीला सामोरे जावे लागत आहे. बहुतांश रिक्षाचालक भररस्त्यातच रिक्षा उभ्या करून प्रवासी भरण्याच्या कामात व्यस्त होतात. बसचालकांना तुच्छतेची वागणूक देणाऱ्या रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे अनेकदा बसचालक व रिक्षा व्यावसायिकांमध्ये वादाचे प्रसंग उभे राहतात. थांबा नसतांनाही अनधिकृतपणे रिक्षा रस्त्यात थांबवून त्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवण्याचा सपाटा रविवार कारंजावर सुरू असतो. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी शनिवारपासून याठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत माहिती देताना वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गुरूनाथ नायडू यांनी सांगितले, की काही दिवसांपासून बेशिस्त रिक्षाचालकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे आम्ही खास मोहीम म्हणून ही कारवाई सुरू केली. शनिवारी काही तासातच पोलिसांनी ८० रिक्षाचालकांवर कारवाई केली. त्यापैकी संशयास्पद १७ रिक्षा जप्त करण्यात आल्या. त्यातील सात रिक्षाचालकांवर कलम २८३ चे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी सुटी असल्याने आरकेसह शहरात सर्वत्र गर्दी होते. त्यामुळे आम्ही सकाळपासूनच आरके परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई केल्याचे नायडू यांनी सांगितले. रविवारी देखील ८१ रिक्षावर कारवाई झाली. त्यापैकी ५ रिक्षा जप्त झाल्या असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी योग्य ते उपाय राबवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

१८ गुन्हे दाखल
रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून रहादारीस अडथळा आणल्याप्रकरणी शनिवारी दिवसभरात शहरातील पाच पोलिस स्टेशनमध्ये विविध वाहनचालकांविरोधात १८ गुन्हे दाखल करण्यात आले. यात, सरकारवाडा पोलिस स्टेशनमधील वरील सात गुन्ह्यांचा समावेश आहे. बेशिस्त वाहनचालकांविरोधात अंबड पोलिस स्टेशनमध्ये तीन, इंदिरानगरला दोन, सातपूरला पाच तर नाशिकरोडला एक गुन्हा दाखल झाला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई व्हावी, या हेतून गुन्हे दाखल होत असून यापुढे ही प्रक्रिया आणखी गतीमान केली​ जाईल, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सेल अन् वाहतुकीचा बोजवारा
१५ ऑगस्टनिमित्त देण्यात येणाऱ्या विविध वस्तुवरील सवलती आणि त्यातच लागून आलेला रविवार यामुळे दिवसभर शहरातील रस्ते वाहनांनी खचाखच भरले होते. विशेषतः मोठ्या मॉलबाहेरील चित्र फार वाईट होते. खरेदीसाठी मॉलकडे जाणाऱ्या ग्राहकांच्या अस्ताव्यस्त पार्क झालेल्या वाहनांमुळे याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्भावली. सायंकाळी कॉलेजरोड, उंटवाडी तसेच गंगापूररोड परिसरात गर्दी झालेली पाहण्यास मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर क्राईमवर वचक

$
0
0

सुसज्ज सायबर लॅबचे आज पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सायबर गुन्हेगारीवर वचक बसविण्याबरोबरच अशा गुन्ह्यांची तत्काळ उकल करून आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालये आणि पोलिस आयुक्तालयांच्या क्षेत्रात 'सायबर लॅब' सुरू करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. आज, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी, एकाच दिवशी राज्यातील ४४ ठिकाणी या सायबर लॅबचे उद्‌घाटन होत असून, नाशिक शहर पोलिसांनादेखील या निर्णयाचा फायदा होणार आहे.

माहिती तंत्रज्ञानामुळे सर्वत्र ई-बँकिंग, पेपरलेस कार्यालय, सोशल मीडिया आदींचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यातून आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे वापरून गुन्हे करण्याच्या विविध युक्त्या सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जातात. या गुन्ह्यांना आळा घालण्याबरोबरच हे गुन्हे करणाऱ्यांना वचक बसावा, यादृष्टीने गृह विभागाने महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालये आणि पोलिस आयुक्तालय क्षेत्रात 'सायबर लॅब' उभारण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. सर्व जिल्हे, पोलिस आयुक्तालयांसह मुंबई, पुणे आणि नागपूर रेल्वे कार्यक्षेत्रात ४४ विविध ठिकाणी 'सायबर लॅब'ची उभारणी करून गृह विभागाने या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. स्वातंत्र्यदिनी एकाच दिवशी या ४४ लॅबचे संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्री आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते उद्‌घाटन होत आहेत. नाशिक शहर पोलिसांसाठी सायबर लॅब सुसज्ज होणे जमेची बाजू आहे. यासाठी एक विशेष सर्व्हर, कम्प्युटर्स, तीन महत्त्वाचे सॉफ्टवेअर असे ३५ ते ४० लाख रुपयांचे साधने पुरविण्यात आले आहेत. या युनिटसाठी प्रशिक्षित दोन अधिकारी व सात कर्मचारी देण्यात आले असून, यामुळे सायबर क्राईम गुन्ह्यांचा तपास करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे सहज होणार असल्याचे सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले. पोलिस आयुक्तालयातील दुसऱ्या मजल्यावर हे युनिट कार्यरत राहणार असून, त्याचे उद्‌घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे.

कर्मचाऱ्यांचे हक्काचे गेस्ट हाऊस

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान तयार करण्यात आलेल्या बॅरेक्सचा योग्य वापर करीत शहर पोलिसांनी कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज गेस्ट हाऊस तयार केले आहे. सोळा रूम्सची क्षमता असलेल्या या गेस्ट हाऊसचे उद्‌घाटन स्वांतत्र्यदिनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. तपासासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या, तसेच मुख्यालयातच एकट्या राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अवघ्या ५० रूपयांत या ठिकाणी राहता येऊ शकते. हॉटेलप्रमाणे सर्व सुविधा कर्मचाऱ्यांना पुरवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक भार कमी होऊ शकेल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात चोख बंदोबस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच प्रमुख ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विविध ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी सुरू आहे.
सोमवारी सर्वत्र स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या आदेशान्वये आयुक्तालयातील १३ पोलिस स्टेशनच्या माध्यमातून चोख पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शहरातील सर्वच प्रमुख ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली असून, संशयास्पद वाहनचालकांची तपासणी केली जात आहे. याबरोबर, संवेदनशील भागात बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून सातत्याने तपासणी केली जात आहे. गर्दीच्या म्हणजे रेल्वेस्थानक, बसस्थानक, मंदिरे व मॉल सारख्या ठिकाणी विशेष काळजी घेतली जात असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. शहर पोलिसांकडून शनिवारपासूनच या बंदोबस्ताचे नियोजन सुरू आहे. पोलिस स्टेशन, क्राईम ब्रँचसह इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे काम केले जात आहे.

नागरिकांना एखाद्या संशयास्पद व्यक्तीबाबत, तसेच वस्तूबाबत माहिती द्यायची असल्यास त्यांनी तत्काळ नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये किंवा कंट्रोल रूमशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाकाबंदीदरम्यान पोलिसाला उडवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाकाबंदीदरम्यान पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनचालकाने पोलिसालाच उडवले. वाहन पळवून नेत असताना पोलिस कर्मचाऱ्यास फरफटत नेल्याने कर्मचाऱ्यास दुखापत झाली आहे. या प्रकरणी सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी येथील वाहनचालक विकास माणिक लोणारे याच्याविरोधात नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दसक पुलाजवळ शनिवारी नाकांबदीदरम्यान वाहनांची तपासणी सुरू होती. त्यावेळी एमएच १५ डीजे ५३२५ क्रमांकाच्या दुचाकीवरून लोणारे तेथे आला. उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी लोणारे याच्याकडे वाहनाच्या कागदपत्रांची मागणी केली. मात्र, कागदपत्रे दाखवण्याऐवजी लोणारे याने कर्मचाऱ्यांचे लक्ष नसल्याचे पाहून दुचाकी सुरू केली. संशयित आरोपी नाकाबंदी तोडून पळ काढण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिस शिपाई बर्वे यांनी त्यास रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयितांच्या दुचाकीने धडक देऊन त्यांना फरफटत नेले. त्यामुळे बर्वे यांना दुखापत झाली. या प्रकरणी पोलिस नाईक गोसावी यांनी लोणारे विरोधात नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

भाजलेल्या वृध्दाचा मृत्यू

शेकोटीचा शेक घेत असताना अंगावरील घोंगडीने अचानक पेट घेतल्याने गंभीररीत्या भाजलेल्या वृध्द व्यक्तीचा मृत्यू झाला. गोरक्ष नामदेव साबळे (वय ६२, रा. आदित्यनगर, जेलरोड) असे या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. साबळे हे घरी शेकोटीजवळ बसून शेकत होते. मात्र, त्यांच्या अंगावरील घोंगडीने पेट घेतल्याने त्यांचे हात पाय, चेहरा, मानेचा भाग जळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांनी फुलला प्रदक्षिणा मार्ग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शनिवार, रविवारसह स्वातंत्र्य दिनाच्या सुटीमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची संख्या वाढली आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवारमुळे दर्शन प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी फुलला आहे. पावसाने उघडीप दिल्याने निसर्ग चहुंगाने बहरला आहे. त्र्यंबकेश्वरची सहल येथील विलोभनीय निसर्ग पाहून अविस्मरणीय होणार यात शंकाच नाही.

भाविकांच्या दर्शनासाठी मंदिरात नियोजन झाले आहे. नेहमीप्रमाणे पूर्वदरवाजा दर्शनरांग सज्ज झाली आहे. तथापि, मंदिरातून बाहेर पडताना मात्र भाविकांना नाहक यातना होतील, असे नियोजन बदलण्याची गरज आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात पूर्वदरवाजाने प्रवेश केल्यानंतर नंदी मंदिरातून थेट सभामंडपात आणि तेथून दक्षिण दरवाजाने बाहेर असे होत असलेले नियोजन भाविकांची सत्वपरीक्षा पाहणारे आहे. मंदिरात दर्शनासाठी जातांना किमान दोन ते चार तास बंद मंडपात दर्शन बारीत प्रतीक्षा केल्यानंतर मंदिर प्रांगणात प्रवेश मिळतो. त्यानंतर तातडीने सभामंडपात व घाईगडबडीने दक्षिण दरवाजाकडे जावे लागते. येथे असलेल्या गायत्री मंदिराकडून बाहेर पडल्यानंतर पुन्हा पूर्व दरवाजाला चप्पल, मोबाइल, पिशव्या आदी साहित्य घेण्यासाठी संपूर्ण मंदिर परिसराला वळसा घालावा लागतो. लक्ष्मीनारायण चौकात वाहनांची गर्दी, रस्त्यावर ठाण मांडून बसलेले व्ययवसायिक यामधून चालता येणे मुश्किल होत आहे.

गरज मोबाइल, बॅग लॉकरची

त्र्यंबकेश्वर मंदिरात मोबाइल घेऊन जाण्यास मनाई आहे. यामुळे येथे मोबाइल सांभाळण्याचा व्यवसाय जोमात आला आहे. प्रत्येक मोबाइल मागे पाच ते दहा रुपये घेऊन, तसेच बॅग कॅमेरा आदी वस्तू सांभाळण्याचा लॉकर व्यवसाय येथे सुरू झाला आहे. भाविकांना मात्र भुर्दंड बसतो आहे. दिवसाला भाविकांच्या दानातून लाखो रुपये उत्पन्न मिळविणारे देवस्थान भाविकांसाठी मोफत लॉकर सुविधा निर्माण करीत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. असाच प्रकार चपलस्टँडबाबत धरसोड होत आहे. बॅग स्कॅनर आणले आहे. मात्र ते दर्शनबारीच्या शेवटच्या टोकाला आहे. एकूणच दर्शनाचे नियोजन असे दुर्लक्ष करणारे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचे संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना आणि नाशिक जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे सुरू असलेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या १७ आणि १९ वर्षांखालील संघांनी आपापल्या गटात विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

सांघिक प्रकारच्या १९ वर्षांखालील गटात नाशिकने सांगलीच्या संघाला ३-१ असे पराभूत केले. मुलांच्या एकेरीत झालेल्या पहिल्या सामन्यात सांगलीच्या निनाद अन्यपन्यावार याने नाशिकच्या हृषिकेश होले याचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या मॅरेथॉन लढतीत १४-२१, २१-१७, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला. हा सामना तब्बल ४३ मिनिटे रंगला. त्यानंतर मात्र नाशिकची राष्ट्रीय चम्पियन असलेली वैदेही चौधरी हिने दिया गडा हिचा २१-४, २१-६ असा केवळ १५ मिनिटांत पराभव करत नाशिकला बरोबरी साधून दिली. त्यानंतर झालेल्या पुरुष दुहेरी आणि महिला दुहेरी अशा दोन्ही सामन्यांत विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

१७ वर्षांखालील गटातही साताऱ्याविरुद्ध खेळताना नाशिकची सुरुवात पराभवानेच झाली. मात्र, नंतरचे तिन्ही सामने जिंकत संघाने विजय नोंदविला. पहिल्या सामन्यात नाशिकच्या अधीप गुप्ताचा साताऱ्याचा हर्षल जाधव याने २१-११, २१-१८ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. मात्र मुलींच्या एकेरीत नाशिकची उदयोन्मुख खेळाडू सई नांदूरकर हिने सिद्धी जाधव हिचा पराभव केला. विजयासाठी मात्र सईला चांगलेच झुंजावे लागले. पहिला सेट ११-२१ असा गमावल्यानंतर सईने सुधारणा करत दुसरा सेट जिंकला. ३५ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सईने २१-११, २१-१९, २१-१७ अशी बाजी मारली.

दरम्यान, १९ वर्षांखालील गटात ठाणे विरुद्ध चंद्रपूर सामन्यात ठाणे संघाने ३-० असा सहज विजय मिळवला. पहिला सामना ठाण्याचा प्रतीक रानडे विरुद्ध अंजेश कावळे (चंद्रपूर) यांच्यात रंगला. ४५ मिनिटे चाललेल्या या चुरशीच्या सामन्यात प्रतीकने २१-१२, १३-२१, २२-२० असा विजय मिळविला. टायब्रेकपर्यंत रंगलेल्या या सामन्यात विजय मिळवत संघातील मृण्मयी देशपांडे आणि सुकृत बापोरीकर यांनी तीच लय कायम ठेवली व संघाला पुढच्या फेरीत प्रवेश मिळवून दिला.

१७ वर्षांखालील गटात लातूर विरुद्ध कोल्हापूर या सामन्यात धक्कादायक निकालाची नोंद झाली. मुले-मुलींच्या एकेरीच्या सामन्यांत अनुक्रमे आदित्य माळी आणि गार्गी चिंचोलीकर यांनी लातूर संघाला विजय मिळवून दिला खरा, मात्र दुहेरीतील तिन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागल्यामुळे कोल्हापूरने ३-२ असा सामना जिंकला.

स्पर्धेत एकूण २५ जिल्हा संघांनी सहभाग घेतला असून, सांघिक सामने उद्यापर्यंत सुरू राहणार आहेत. त्यानंतर ६०० पेक्षा जास्त खेळाडूंचे वैयक्तिक सामने दिवस रंगणार आहे.


स्पर्धेतील पहिल्या सत्राचे निकाल

१७ वर्षांखालील गट

सांगली विजयी विरुद्ध धुळे (३-१)
रायगड वि. वि. परभणी (३-१)
औरंगाबाद वि. वि. रत्नागिरी (३-२)
सातारा वि. वि. वर्धा (३-०)
कोल्हापूर वि. वि. लातूर (३-२)
मुंबई उपनगर वि. वि. सोलापूर (३-०)
सांगली वि. वि. अहमदनगर (३-०)
नागपूर वि. वि. रायगड (३-१)
नाशिक वि. वि. सातारा (३-१)


१९ वर्षांखालील गट

सातारा वि. वि. यवतमाळ (३-०)
औरंगाबाद वि. वि. वर्धा (३-०)
सांगली वि. वि. अमरावती (३-०)
रायगड वि. वि. लातूर (३-१)
नाशिक वि. वि. सांगली (३-१)
धुळे पराभूत वि. पुणे (०-३)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांचा मोर्चा

$
0
0

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सुरगाणा वीज वितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियातर्फे धडक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामध्ये तालुक्यातील खासगी, अनुदानित माध्यमिक शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.

वीज वितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी अलंगुण येथून बारा ते पंधरा मैल पायपीट करून विद्यार्थ्यांनी कंपनीचे कार्यालय गाठत अधिकाऱ्यांसमोर समस्यांचा पाढा वाचला. तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू असून, दहा ते बारा दिवस वीज गायब असते. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे, वसतिगृहात रहाणे, अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, असे निवेदनात म्हटले आहे.

विद्यार्थ्यांच्या मागण्या

संपूर्ण तालुक्यात वीजपुरवठा सुरळीत करावा, सिंगल फेज योजना सुरू करावी, उंबरठाण येथील विद्युत उपकेंद्राचे काम त्वरित सुरू करून ते कार्यान्वित करावे, वीज वितरण कार्यालयातील रिक्त जागा भराव्यात, विजेचे जीर्ण खांब व वीजवाहक तारा बदलून नवीन टाकाव्यात आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे, वीज वितरण कंपनीचे अभियंता यांना देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images