Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट’वर गुन्हा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ठेवीदारांना जादा आर्थिक परतावा देण्याचे आश्वासन देऊनही परतावा मिळत नसल्याचा आणखी एक प्रकार पुढे आला आहे. केबीसी, मैत्रेयमधील गुंतवणूकदारांच्या फसवणुकीचे प्रकार ताजे असताना आणखी एक मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता असून, गंगापूर पोलिसांनी विद्याविकास सर्कल परिसरातील हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट कंपनीशी संबंधित १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

विनोद बाळू पाटील, महेश सुधाकर नेरकर, अनिल निवृत्ती कोठुळे, सतीश शेषराव कामे (चौघे रा. सिडको), सुशांत रमेश कोठुळे, भगवंत कोठुळे (दोघे रा. तपोवन), विजय लक्ष्मण खुनकर व सुरेखा भगवंत कोठुळे (दोघे रा. जेजुरकर मळा, तपोवन) रवींद्र पुंडलिक दळवी (रा. पंचवटी), दर्शन विजय शिरसाठ (रा. नाशिकरोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्यावर फसवणुकीसह एमआयडीसी कायदा ३,४ सिक्युरीटीज कॉन्ट्रॅक्टर कायदा कलम १९५६ चे कलम २३ व कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६७, ३७४, ७५/४४७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. विद्या विकास सर्कल परिसरात हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट कंपनीसमोर गणोर हाईट्समध्ये २०१२ पासून हा प्रकार सुरू होता. विनोद पाटील हा या फसवणूक प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गणेश गुरूनाथ देसाई (३२, रा. शंकरनगर, टाकळीरोड, द्वारका) यांनी या प्र्रकरणी फिर्याद दिली आहे. आपली पावणे चार लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. नाशिक तालुक्यातील अनेक शेतकरी तसेच चाकरमान्यांची अशाप्रकारे फसवणूक होत असल्याचे प्रकार आता पुढे येऊ लागले आहेत. हाऊस ऑफ इन्व्हस्टमेंट कंपनीत ११ लाख रुपये गुंतविले असता सांगितल्याप्रमाणे परतावा न देता आपली फसवणूक करण्यात आल्याची कैफियत गिरणारे येथील गणेश काटे या शेतकऱ्याने मे महिन्यातच पोलिसांकडे मांडली होती. कंपनीचे संचालक सर्व गुंतवणूकदारांना पैसे परत देण्याचे आश्वासन देत होते. पोलिसांनीही त्यासाठी संबंधितांना वेळ दिला होता. मात्र, पैसे देण्याऐवजी त्यांच्याकडून टाळाटाळच सुरू असल्याने अखेर पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट कंपनीशी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

आश्वासनांचे गाजर
साधारणतः पाच ते सहा महिन्यांपासून 'हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट'च्या व्यवहारात अनियमितता सुरू झाली. व्याज मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी मुद्दलाची रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. मागील महिन्यापर्यत सर्वांचे पैसे व परतावा करण्याचे आश्‍वासन दिले जात होते. पैसे मिळतील असा विश्वास असल्याने गुंतवणूकदार तक्रार दाखल करीत नव्हते. तसेच पोलिसांनीही अद्याप गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र, आता गुन्हा दाखल झाल्याने आणखी काही गुंतवणूकदार तक्रार देण्यासाठी पुढे येण्याची शक्यता आहे.

कंपनीकडून परदेशात गुंतवणूक
वार्षिक २४ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवित हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रा. लिमिटेड कंपनीशी संबधित असणाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप गुंतवणूकदारांकडून होतो आहे. कंपनीचे सुमारे ३० एजंट असून, त्यांच्यामार्फत ३ हजारांहून अधिक गुंतवणूकदारांकडून पैसे उकळण्यात आले आहेत. ही रक्कम विनोद पाटील याने पोर्टफोलिओ मॅनेजमेंट ऍण्ड सर्व्हिसेस, विनोद बुलियन्स दुबई, हाऊस ऑफ बुलियन्स, हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट, हाऊस ऑफ बिल्डकॉन, हाऊस ऑफ ऍग्रो कम्युनिटी या व अन्य काही कंपन्यांच्या माध्यमातून शेअर मार्केट तसेच बांधकाम व्यवसायात गुंतविल्याची माहिती पुढे आल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘बिटको’त जन्मले पाच किलोंचे बाळ

$
0
0



डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

पोटात तब्बल सव्वा पाच किलोंचे बाळ आणि दहा लिटर पाणी असलेली ती गरीब महिला देवळालीच्या कॅन्टोन्मेंटसह अनेक खासगी हॉस्पिटलमध्ये प्रसूती वेदना सहन करत चकरा मारत होती. मात्र, तिच्याकडे पाहून कोणीही डॉक्टर धोका पत्करत नव्हता. असहाय झालेल्या या मात‌ेने बिटको हॉस्पिटलचा मार्ग धरला. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुप्रिया संख्ये यांनी तिची परिस्थिती पाहिली अन् त्यांनी केलेल्या शस्त्रक्रियेत बाळ-बाळंतीण दोघांचाही जीव वाचला.

साधरणपणे जन्म झालेल्या बाळाचे वजन तीन किलोपेक्षा अधिक वजनाचे नसते. मात्र, देवळाली कॅम्पजवळील संसरी येथील अनिता अनिल ठाकूर (२७) यांना आधी चार अपत्ये झाली. त्यातील काही दगावली. आधीची बाळंतपण नॉर्मल झाली होती. आता पाचव्या वेळी त्यांना दाखल करण्यात आले तेव्हा परिस्थितीने धोक्याची पातळी ओलांडली होती.

यांचे लाभले सहकार्य
डॉ. संख्ये यांच्यासह डॉ. सुषमा पाटील, भूलतज्ज्ञ डॉ. मेलिटा इव्हेलिन, सिस्टर कल्पना चौहान, मीना काळे, नलिनी पगारे, संगीता रणदिवे, योगेश शिंदे, संजय अत्रे, रामनिवास वेद आदींच्या पथकाने गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सुरू केली. चार बाटल्या रक्त तयार ठेवण्यात आले. आई-वडिलांना मधुमेहाची शक्यता लक्षात घेऊन बाळाला 'सिव्हिल'मध्ये विशेष तपासणीसाठी पाठविण्यात आले. नंतर पुन्हा 'बिटको'मध्ये दाखल करण्यात आले. आठ दिवस काळजी घेतल्यानंतर बाळ आणि आईला 'बिटको'मधून निरोप देण्यात आला. त्यावेळी डॉक्टरांसह उपस्थित कर्मचारी भावून झाले होते.

डॉक्टर ठरले देवदूत
डॉ. संख्ये यांनी आतापर्यंत हजारो बाळंतपण शस्त्रक्रिया केल्या आहेत. अन्यत्र सीझरचा खर्च ४० हजार येतो. 'बिटको'त जननी सुरक्षा योजनेतंर्गत बाळंतपणापासून सर्व सुविधा मोफत आहेत. डॉ. संख्ये यांनी वंधत्व निवारण आणि दुर्बिणीव्दारे शस्त्रक्रिया करून अनेकांना मातृत्व दिले आहे. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्च करावे लागतात. याशिवाय त्या ‌हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या केवळ गरोदरच नव्हे तर सर्व वयोगटातील महिलांना आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करीत असतात. अनिता ठाकूर यांच्यासाठी डॉ. संख्ये देवदूतच ठरल्या आहेत.

डॉक्टांनी पेलले आव्हान
बाळंतपणापूर्वी अनिता ठाकूर विविध हॉस्पिटलमध्ये फिरत होत्या. त्यांचे नऊ महिने व १० दिवस झाले होते. त्यामुळे कॅन्टोमेंन्ट हॉस्पिटलने नकार दिला. बिटको हॉस्पिटलमध्ये त्यांना पाहिल्याबरोबर डॉ. संख्ये यांनी तातडीने तपासणी केली आणि त्यांना धक्काच बसला. गर्भ पिशवीत दहा लिटर पाणी होते. बाळही मोठे होते. नाळ बाळाच्या डोक्याजवळ आली होती. नाळ बाहेर आली असती तर बाळ दगावले असते. दोघांचे वजन जास्त असल्यामुळे गर्भ पिशवी फाटली असती. त्यामुळे डॉ. संख्ये यांनी तत्काळ सीझर करण्याचा निर्णय घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाकविरुध्द ‘पीच’ बदललाय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाकिस्तान काश्मीर प्रश्न घेऊन इतक्या दिवस भारतात खेळत होता. पण आता आम्ही पीच बदलला असून, आता भारत व पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमध्ये खेळेल. पाकविरुध्द केंद्र सरकारची भूमिका आता बदलली असून आता लाडीकपणा चालणार नाही अशा शब्दात गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी पाकला इशारा देत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली.
तिरंगा यात्रेनिमित्त ते नाशिकमध्ये आले होते. यावेळी भाजपा कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, १५ ऑगस्टच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विषय बदलून टाकल्यामुळे आता काश्मिरचा विषय चालणार नाही. आता विषय चालेल तो पाकव्याप्त काश्मिरचा. पाकला या अगोदरच तीन वेळा धूळ चारली आहे. तरीसुध्दा संबंध सुधारण्यासाठी भारताकडून प्रयत्न झाले. पण पाकिस्तान सुधारण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे आता केंद्र सरकारनेच आपली भूमिका बदलली आहे. काश्मिरचा विषय पाकिस्तानने सोडला नसला, तरी आता पीच मात्र बदललेला असेल, असेही अहिर म्हणाले.
इसिसवर लक्ष
इसिसच्या कारवाया बाबत बोलताना ते म्हणाले की, आम्ही त्याबाबत सतर्क आहोत. केरळमधून १८ कुटुंबांची आम्ही माहिती मागवली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून इसिसच्या जाळ्यात असलेल्या कुटुंबियांचा रिपोर्ट मागितला आहे. या कुटुंबांचा शोध लावून ते वठणीवर येईपर्यंत त्यांच्यावर सरकार काम करेल, असेही ते म्हणाले.
'तो' विषय स्थानिक
पवन पवाराचा विषय सर्वत्र सुरू असताना पत्रकारांनी गृहराज्यमंत्री अहिर यांना प्रश्न विचारल्यानंतर पहिले त्यांनी हा विषय माहित नाही, असे सांगितले. पत्रकारांनी माहिती देताच त्यांनी हा विषय स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आहे. त्यामुळे यावर भाष्य करणे योग्य नाही, असे स्पष्ट केले. तरीपण स्थानिक शाखा असा चुकीचा निर्णय घेणार नाही, असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नीतिवान समाजाची बांधणी करा

$
0
0

प्रकाश पाठक यांचे आवाहन; 'मटा हेल्पलाइन'च्या धनादेशांचे विद्यार्थ्यांना वाटप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आजचा समाज कालपेक्षा अनेक अर्थांनी समृध्द असला तरीही यात खऱ्या नीतिमत्ता असलेल्या माणसांची उणीव आहे. नीतिवान समाज ही उद्याची प्राधान्याची गरज असणार आहे. कर्तृत्वाची शिखरे गाठताना सामाजिक जबाबदारीचे भानही गांभीर्याने जपा आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नीतिवान समाजाची बांधणी करा, असे आवाहन सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन संस्थेचे कार्याध्यक्ष व प्रख्यात विचारवंत प्रकाश पाठक यांनी केले.

'महाराष्ट्र टाइम्स' च्या नाशिक आवृत्तीच्या 'मटा हेल्पलाइन' या उपक्रमांतर्गत आयोजित धनादेश वितरणाच्या कार्यक्रमात पाठक प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. भोंसला मिलिटरी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. नाशिककरांनी या कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिला. 'मटा हेल्पलाइन' उपक्रमांतर्गत दात्यांनी होतकरू विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या साडेअठरा लाख रुपयांच्या धनादेशांचे वितरण या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते दहा लाभार्थी विद्यार्थ्यांना करण्यात आले.

पाठक पुढे म्हणाले, की आजचा समाज नीतिवान माणसाच्या प्रतीक्षेसाठी आसुसला आहे. समाजाची ही अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी नव्या खांद्यांवर आहे. अनेकदा परिस्थितीतील प्रतिकूलता माणसाच्या मनात कणखर जिद्द अन् ध्यास उभारते. याउलट अनुकूल परिस्थिती हीच जिद्द सैरभैर करण्यासही कारणीभूत ठरते. यामुळे प्रतिकूल परिस्थितीबाबत वैषम्य न बाळगता त्याकडे सकारात्मक दृष्टीनेचं पाहिले पाहिजे. झगमगती दुनिया माणसाचा आदर्श ठरू शकत नाही. ज्या माणसांनी प्रतिकूलतेवर मात करीत जिद्दीच्या पायावर आयुष्य उभारले आणि सामाजिक जबाबदारीचे भान जपले, अशी माणसे आपण वाचायला अन् आत्मसात करायला शिकले पाहिजे. मन:स्थिती कणखर असेल तर कुठल्याही स्तरावरचा प्रवास खडतर नसतो. यामुळे स्वत:ला कमी लेखणे किंवा इतर जगाशी तुलना करून निराश होणे सोडून द्या, असा महत्त्वाचा सल्लाही पाठक यांनी उपस्थितांना दिला.

अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करून दहावीच्या वर्षात यशाचा उत्तुंग षटकार लगावणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर पाठक यांनी शाब्बासकीची थाप देतानाच मनमोकळा संवाद साधला. 'करिअर' या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, केवळ अधिकारपदाची खुर्ची मिळविणे म्हणजे ध्येयाची अखेर नाही. उलट ती खुर्ची प्राप्त करण्यात यश मिळाल्यानंतर मानवाचे नितीधैर्य शाबूत राहण्याचे आवाहन नियती उभी करते. तीच मानवी आयुष्यातील खरी कसोटी असते. तेव्हा उज्ज्वल करिअर नक्कीच साकार करा, पण त्यापेक्षाही महत्त्वाचे ध्येय म्हणजे जीवनात उत्तम माणूस व्हा.'

दातृत्ववान दात्यांचा शब्दालंकारांनी गौरव करताना अज्ञात शक्तीच्या कार्यशीलतेचे सूत्रही यावेळी पाठक यांनी मांडले. हे सूत्र मांडताना ते म्हणाले, 'होतकरू पंखामध्ये जेव्हा समाज बळ भरण्यासाठी पुढे सरसावतो, तेव्हा त्या समाजाला कुठलीतरी अज्ञात शक्ती तशी प्रेरणा देते. समाजाकडून ही मदत घेऊन उभे राहताना, आपल्याही आयुष्यात दातृत्वाच्या रूपाने या विधायक शक्तीचा ओघ पुन्हा समाजाकडे जाणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास जागविताना त्यांनी स्वामी विवेकानंद, दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम, विख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. जयंत नारळीकर आदी आदर्शांची प्रेरणादायी उदाहरणे यावेळी विद्यार्थ्यांसमोर मांडली. या सोहळ्यात व्यासपीठावर सीएचएमई सोसायटीच्या नाशिक शाखेचे कार्याध्यक्ष प्रकाश पाठक, संस्थेचे कार्यवाह डॉ. दिलीप बेलगांवकर, अपना बँकेच्या व्यवस्थापक संगीता रहाणे, भोसला मिलिटरी कॉलेजच्या प्राचार्या सुचेता कोचरगांवकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे, 'टाइम्स' च्या युनिट हेड मंजिरी शेख, 'महाराष्ट्र टाइम्स'च्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस 'मटा हेल्पलाइन' या उपक्रमामागील भूमिका निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे यांनी मांडली. ते म्हणाले, 'समाजातील होतकरू अन् ध्येयवादी विद्यार्थी हेरून त्यांच्या स्वप्नांना आर्थिक बळ देणाऱ्या या अनोख्या उपक्रमाचे हे सहावे वर्ष आहे. अल्पावधीत तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी नाशिकच्या दात्यांनी तब्बल अठरा लाखांची रेषा ओलांडत मदत निधी उपलब्ध करून दिला ही नाशिकच्या दात्यांच्या वृत्तीची श्रीमंती आहे.'

यावेळी प्राचार्या सुचेता कोचरगांवकर, राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक रवींद्र आवळे यांनीही मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसिका कुलकर्णी यांनी केले. 'मटा' चे प्रिन्सीपल करस्पाँडंट प्रशांत भरवीरकर यांनी आभार मानले.

दान योग्य हातांमध्ये
सीएचएमई सोसायटीचे कार्यवाह डॉ. दिलीप बेलगांवकर यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत आशावाद व्यक्त केला. 'पत्र नव्हे मित्र', हे ब्रीद 'महाराष्ट्र टाइम्स' ने जपत सत्पात्री दान योग्य हातांमध्ये दिलं आहे. हौशे-नवशे अन् गवशांच्या काळात खऱ्या हुन्नरी अन् गरजवंतांना 'मटा' ने समाजासमोर आणले आहे, असा गौरवोल्लेखही डॉ. बेलगांवकर यांनी यावेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे विकासासाठी २० हजार कोटी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक - पुणे रेल्वे मार्गाची निविदा सहा महिन्यांत काढण्यात येणार असून, हे काम लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. या मार्गासह राज्यात रेल्वे विकासाच्या ११ नवीन मार्गांची कामेही केली जाणार असून, त्यासाठी २० हजार कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. या कामात नाशिक -पुणे रेल्वेमार्ग, मनमाड-मालेगाव- इंदूर रेल्वेमार्ग, मनमाड - दौंड या रेल्वे मार्गांच्या दुपदरीकरणाचा समावेश असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी रविवारी भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह भाजपाचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सिन्हा म्हणाले की रेल्वे विकासाला प्राधान्य देताना सरकारच्यावतीने मोठी गुंतवणूक करण्यात येणर आहे. यंदाच्या वर्षात सव्वा लाख कोटी रुपये व येत्या चार वर्षांत साडेआठ कोटी रुपये रेल्वे विकासासाठी देण्यात येतील. रेल्वेची प्रवाशी संख्या व मालवाहतूकीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणत वाढ झाली आहे पण मागील काळात त्या तूलनेत रेल्वे मार्गांचा विकास होऊ शकला नाही.
यावेळी सिन्हा म्हणाले की, रेल्वे विकासाला प्राधान्य देताना सरकारच्या वतीने मोठी गुंतवणूक करण्यात येणर आहे. यंदाच्या वर्षात सव्वा लाख कोटी रुपये व येत्या चार वर्षांत साडेआठ कोटी रुपये रेल्वे विकासासाठी देण्यात येतील. रेल्वेची प्रवाशी संख्या व मालवाहतुकीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. पण मागील काळात त्या तुलनेत रेल्वे मार्गांचा विकास होऊ शकला नाही.
हम वापस आयेंगे
रेल्वेमंत्री येणार म्हणून चार नंबर प्लॅटफॉर्म सुरू झाला. रेल्वेचे तिकीट कार्यालय सुरू झाले. शौचालयावर मोफतचे फलक लावले. या प्रश्नावर सिन्हा यांनी ये तो अच्छी बात है, असे सांगितले.पण त्यानंतर पत्रकारांनी पण उद्या ते बंद होतील, असे सांगितल्यानंतर त्यांनी हम वापस आयेंगे, असे सांगून मूळ विषयाला बगल दिली. या पत्रकार परिषदेत खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, सुनील बागुल, लक्ष्मण सावजी, वसंत गीते, दादा जाधव, किशोर काळकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदारांच्या डुलक्या
जेवण करुन थेट पत्रकार परिषदेला दीड तास उश‌िरा आल्यानतंर मंत्री, आमदार व पदाधिकाऱ्यांना झोप आवरत नव्हती. अनेकांनी डुलक्या घेतच या पत्रकार परिषदेत आपली
हजेरी लावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्सुकता, दाटलेल्या भावना अन् आशादायक सायंकाळ

$
0
0

पालक अन् विद्यार्थ्यांच्या चेह-यावर समाधान

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

समाज मदत करतो म्हणजे किती भरभरून दान देतो याचे जिवंत उदाहरण 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन उपक्रमाच्या निमित्ताने नाशिककरांना रविवारी अनुभवण्यास मिळाले. हेल्पलाइनच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आशादायक सायंकाळी उत्सुकता, दाटलेल्या भावना होत्या. निमित्त होते 'मटा हेल्पलाइन' उपक्रमाच्या धनादेश प्रदान सोहळ्याचे.

कार्यक्रम सुरू झाला आणि प्रत्येकच विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान दिसत होते. 'मटा' या उपक्रमासाठी आपली निवड केली यातच सौख्य सामवल्याची ती भावना होती. आपल्याला पैसे किती मिळणार यापेक्षा आपल्यावर समाजाने इतका विश्वास टाकला आहे, ही या विद्यार्थ्यांची भावनाच मोठी होती. चेक प्रदान करण्याची वेळ येत गेली तसतशी ही कालवाकालव वाढत गेली आणि बोलण्याचा क्षण जवळ आला. गेल्या वर्षी ज्यांना हेल्पलाइनमध्ये सामावून घेतले होते तेदेखील कार्यक्रमाला हजर होते. त्यांना या विद्यार्थ्यांना बरेच काही सांगायचे होते. 'आमच्या पाठीवर शाबासकीचा हात पडलाच परंतु, समाजाने आमच्या पदरात भरभरून दान दिले. त्यामुळे आम्ही पुढे शिकू शकलो. आताही समाजाच्या देण्यावरच आम्ही तग धरून आहोत तुम्हाला ही मदत मिळालीय हे सत्पात्री दान आहे, त्याला तडा जाऊ देणार नाही' असे वचन द्या अशा आशयाचे छोटेखानी परंतु, हृदयस्पर्शी भाषण या गेल्यावेळच्या विद्यार्थ्यांनी केले. तसेच यंदाच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण व्यक्त केलेच परंतु, केवळ आभार न मानता त्यांनी एक विचार सर्वांना दिला. त्यांच्या विचारात आम्ही नवे काहीतरी करून दाखवू अशी आशा होती.

या विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे नातेवाईकही आलेले होते. त्यांना आपल्या पाल्याला शिकविण्याची आस होती परंतु, पैशांचे सोंग आणता येत नाही म्हणून त्रागा न करता त्यांनी मार्ग निवडला. 'मटा'ला साद घातली. 'मटा'नेही ओ देत त्यांच्या मनीची इच्छा जाणून या मुलांसाठी मदतीचे आवाहन केले आणि गेल्या पाच वर्षांप्रमाणेच यंदाच्या वर्षीही भरभरून रक्कम जमा झाली. ही रक्कम विद्यार्थ्यांना सुपूर्द करताना त्यांच्या चेहऱ्यावरील कुतूहलमिश्रित आश्चर्य अनेकांना भावले.

अबालवृध्दांची उपस्थिती

मटा हेल्पलाइनच्या या कार्यक्रमासाठी वय वर्षे ५ पासून ८५ पर्यंतचे खऱ्या अर्थाने अबालवृध्द आले. आपल्या ताई, दादाला चेक मिळणार म्हणजे नक्की काय होणार या उत्सुकतेपोटी आलेले किशोरवयीन आणि चालवत नसतानाही आपल्या नातवाचे होणारे कोडकौतुक पाहण्यासाठी वृध्द आलेले होते. असा हा माहोल जमून आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे राज्यमंत्र्यांकडे वेळ थोडा, अपेक्षा फार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकातील विकास कामांचे उद्घाटन केले. मात्र येवला, भगूरला जायची घाई असल्याने त्यांनी उद्घाटन उरकले. छापील भाषण वाचले आणि काढता पाय घेतला. नाशिककरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. देशात स्वच्छतेबाबत सहावा क्रमांक मिळवणाऱ्या या स्थानकाची त्यांनी पाहणीही केली नाही. त्यामुळे मनमाड, मुंबई, भुसावळ आदी ठिकाणाहून आलेल्या अधिकारी, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रात्रभर राबून केलेली रंगरगोटी, सुरक्षा आदी तयारी वाया गेली.
रेल्वे ट्रॅक्शन कारखाना विस्तारीकरण, नवीन हॉस्पिटल सुरू करणे, रेल्वे सुरक्षा दल केंद्रांचे आधुनिकीकरण, नाशिकरोडला टर्मिनसचा दर्जा, नाशिक-पुणे रेल्वे मार्ग, रेल्वे स्थानक सुरक्षा व पार्किंग, रेल्वेस्थानकात सरकते जिने व अपंगांसाठी लिफ्ट बसविणे, मालधक्क्यावर आरोग्य सुविधा आदी मागण्यांकडे लक्ष देण्यास मंत्र्यांना वेळ मिळाला नाही. पंचवटी व अन्य गाड्या वेळेत सोडणे, जादा डबे जोडणे, नाशिकमार्गे दिल्लीला जाणारी राजधानी एक्सप्रेस सुरू करणे आदी मागण्या खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण यांनी पोटतिडकीने मांडल्या. पण मंत्र्यांनी कान देऊन ऐकल्याच नाहीत.
कामगार सेनेचे निवेदन
रेल कामगार सेनेतर्फे रेल्वेमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पदाधिकारी अनिल आहेर, शेखर पवार, राकेश जोशी, पी. एम. जाधव, गणेश शिंदे, प्रमोद चव्हाण, ए. ए. शेरे, शंखर कुमावत, रमेश मोटे आदी उपस्थित होते. निवेदनातील प्रमख मागण्या अशा- भुसावळ रेल्वेस्टेशन बाहेर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा, पॉइंटमन व गेटमन यांचे कामाचे तास बारावरुन आठ तास करावेत, नाशिकरोड रेल्वे कारखान्याचा विस्तार करावा, येथे कच्चा माल नियमित पुरवावा, कामगारांना प्रोत्साहन भत्ता द्यावा, भुसावळ रेल्वे हॉस्पिटलमध्ये कायम डॉक्टरांची नियुक्ती करावी, अमरावती-पुणे व्हाया मनमाड गाडी सुरू करावी, रेल्वे अधिकाऱ्यांच्या बंगल्यांवर नियमबाह्य नेमलेल्या रेल्वे कामगारांना त्यांच्या कार्यक्षेत्रात रुजू करावे, ब्रिट‌िशकालीन पुलांची तपासणी करावी, पाण्याचा पुनर्वापर करावा, पाणीबचतीसाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रिक व्हॉल्व बसवावेत आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस उलटून दोन ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरालगत असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावर सोमवारी पहाटे नगावबारी परिसरात मुंबईहून इंदौरकडे जाणारी ट्रॅव्हल बस उलटली. या अपघातात दोन ठार, तर आठ जण जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात भरती केले.

मुंबईहून इंदौरकडे जाणारी ट्रॅव्हल बस पहाटेच्या वेळी नगावबारीजवळ उलटली. चालकाला वेगावर नियंत्रण न मिळविता आल्याने हा अपघात घडला असल्याचा अंदाज आहे. या अपघातात देवाशिष तेभा (वय ३५), विशाल अवखी (दोन्ही रा. इंदौर) हे बसखाली दाबले जाऊन जागीच मृत झाले. विकी वाघारी (वय ३०), राहूल वाघारी (वय २१), प्रमिला वाघारी (वय ५०) (तिघे रा. उज्जैन), मनोज वर्मा (वय २५ रा. इंदौर), ईश्वर जाधव (वय २५), मीरा जाधव (वय ४०, रा. सेंधवा) सुहास लक्ष्मण साहू (वय ४४ रा. मुंबई), लक्ष्मी साळुंखे (वय २७ रा. कळवा, ठाणे) हे प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघात घडताच मोठा आवाज झाला. तो ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. हा अपघात घडला त्यावेळी सर्व प्रवासी हे झोपेत होते. देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वैजापूरला पाणी सोडण्याचे संकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वैजापूर, गंगापूर तालुक्यांमधील रहिवाशांना एक्स्प्रेस कॅनलद्वारे पिण्यासाठी १५०० दलघनफूट पाणी सोडा, असे आदेश औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक पाटबंधारे विभागाला दिले आहेत. पिण्यासाठी पाण्याची मागणी होत असल्याने ते सोडावेच लागेल, असे संकेत दिले जाऊ लागले आहेत.

पावसाळ्यातच पाण्याची मागणी होऊ लागल्याने पुन्हा उन्हाळ्यातही पाणी सोडावे लागणार का, असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे. गेल्या वर्षी नाशिककर दुष्काळाची दाहकता अनुभवत असतानाही जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले. यंदा नाशिकसह राज्यातील अनेक भागांत चांगला पाऊस झाला. त्यामुळे जायकवाडीमधील पाणीसाठा ७५ टक्क्यांवर गेला आहे. अशा परिस्थितीत आता पावसाळ्यातच पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी वैजापुरमधील राजकीय पक्षांचे पदाधिकारी करू लागले आहेत. त्यासाठी त्यांनी तेथील जिल्हाधिकाऱ्यांना उपोषणाचा इशाराही दिला. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी तत्काळ पाणी सोडण्याबाबतचे पत्र नाशिक पाटबंधारे विभागाला पाठविले आहे. जायकवाडी ६५ टक्क्यांहून अधिक भरल्याने लाभक्षेत्राला पाणी देण्यात तांत्रिक अडचण नसल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याची मागणी असल्याने ती पूर्ण करावीच लागेल असे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या पुराचे (ओव्हरफ्लो) पाणी खालील भागास नदीमार्गे सुरु आहे. ते कालव्याला वळविता येईल. तर ओव्हरफ्लोचे पाणी बंद झाल्यानंतर औरंगाबाद, वैजापूर, गंगापूरसाठी असलेल्या आरक्षणातील मुकणे आणि भावली या धरणांमधून पाणी सोडले जाईल असे संकेतही देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिओतील हवामानामुळे अपयश

$
0
0

कविता राऊतने व्यक्त केली खंत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतासाठी पदक मिळवायचे ध्येय समोर ठेवूनच ऑलिम्पिक स्पर्धेत पूर्ण क्षमतेने उतरले होते. मात्र, ब्राझील येथील हवामानाचा वाईट परिणाम झाल्याने यशाला गवसणी घालता आली नाही, अशी खंत कविता राऊत हिने व्यक्त केली.

ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या कविता राऊत हिचे रविवारी रात्री नाशिकमध्ये आगमन झाले. यावेळी तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, की भारताच्या तुलनेत ब्राझील येथील हवामान दमट आहे. तेथील सागरी दमट वातावरणाचा परिणाम झाल्याने अपेक्षित कामगिरी करणे शक्य झाले नाही. मात्र, ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली याचा अभिमान आहे. ऑलिम्पिकहून परतलेल्या कविताचा नाशिक जिल्हा अॅथलिट असोसिएशन साई यांच्या वतीने डॉ. भीष्मराज बाम, डॉ. विजय घाडगे, डॉ. अनिल थत्ते, प्रशिक्षक विजयेंद्र सिंग, कविताचे पती महेश तुंगार यांच्या उपस्थितीत हॉटेल सिध्दार्थ येथे सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना कविता म्हणाली, की बंगळुरू आणि रिओ येथील वातावरण समान असल्याने आमचे प्रशिक्षण बंगळुरू येथे घेण्यात आले. रिओ येथे स्टेडियममजवळ समुद्र असल्याने वातावरण अधिक दमट होते. त्याचा शरीरावर परिणाम झाला. स्पर्धेच्या एक दिवसआधी ४० किलोमीटर धावण्याची चाचणी स्पर्धादेखील माझ्या अपयशाला कारणीभूत ठरली, असे तिने स्पष्ट केले.

कार्यक्रमास प्रख्यात क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भीष्मराज बाम, डॉ. विजय घाडगे, डॉ. अनिल थत्ते, राजाराम शिंदे, कविताचे पती महेश तुंगार, डॉ. मिलिंद पिंप्रिकर आदी उपस्थित होते. शेखर शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

आता लक्ष्य वर्ल्ड चॅम्पियनशीप

या अपयशाने खचून जाता ऑगस्ट २०१७ मध्ये लंडन येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये यशस्वी कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे, असेही तिने स्पष्ट केले. प्रशिक्षक विजयेंद्र सिंग यांनी पुढील काळात कविता यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचा कांदा रेल्वेने निघाला बिहारला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील कांद्याचे लिलाव बेभरवशाचे झाल्याने जिल्ह्यातील हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. परंतु, रेल्वेमार्फत कांद्याची परराज्यात निर्यात पुन्हा सुरू झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मध्य रेल्वेच्या खेरवाडी व मनमाड या रेल्वे स्थानकातून ४२ वॅगनमधून नुकताच १६८० टन कांदा बिहारमधील पाटणा येथे पाठविण्यात आला. यात खेरवाडी रेल्वे स्थानकातून बुधवारी २१ डब्यांतून कांदा बिहारला पाठविण्यात आला. याप्रसंगी स्टेशन अधीक्षक एस. व्ही. राठोड, मुख्य माल पर्यवेक्षक एन. के. गिते यांच्यासह इतर कर्मचारी, व्यापारी, शेतकरी उपस्थित होते. याशिवाय मनमाड रेल्वे स्थानकातूनही २१ डब्यांतून बिहारला कांदा पाठविण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेमार्फत परराज्यात कांदा निर्यात थांबलेली होती.

आडतीच्या प्रश्नावरून सरकार व व्यापाऱ्यांच्या वादात नाशिक जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या ठप्प होत्या. या पार्श्वभूमीवर पुन्हा जुन्या पद्धतीचे लिलाव पूर्ववत झाल्याने जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांत कांद्याची आवक प्रचंड वाढली होती. त्यामुळे कांदा निर्यात होणे आवश्यक होते. नेमक्या याच वेळेला रेल्वेनेही कांदा निर्यातीसाठी सोय उपलब्ध करून दिल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचा फायदा खेरवाडी, लासलगाव, मनमाड येथील रेल्वे मालधक्क्यावरील माथाडी कामगारांनाही रोजगाराच्या स्वरुपात नकळतपणे झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना पदाधिकाऱ्याकडून तलवार जप्त

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, सिडको

अंबड पोलिसांनी पवननगर भागातील शिवसेनेचा पदाधिकारी अभय पवार यास अटक करून त्याच्याकडून तलवार जप्त केली. पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी ही माहिती दिली. यामुळे दहशत पसरविणारे राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते पुन्हा पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

सध्या राजकीय पक्ष म्हणजे गुन्हेगारांचे हक्काचे घर झाले आहे. यामुळे सरार्सपणे गुन्हेगारांना राजकीय पक्षात प्रवेश दिला जात आहे. या पार्श्वभूमीवरही पोलिसांनी राजकारणाच्या जोरावर दहशत माजविण्याचा प्रयत्न करणा-यांच्या मुसक्या आवाळण्यास सुरुवात केली आहे.

पवननगर भागातील शिवसेनेचा पदाधिकारी अभय पवार या युवकाकडे तलवार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पवार याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्याकडून एक तलवार आढळून आली. दरम्यान पवार यास काही दिवसांपूर्वी अंगावर सोने घालून फिरणे व बॉडीगार्ड घेऊन फिरण्याच्या कारणावरून पोलिसांनी समजही दिली होती. त्यानंतर काही दिवसांत त्याने वाढदिवसासाठी तलवारीचा वापर केल्याचे फोटो सोशल मीडियावर फिरले होते. यामुळे अभय पवार याच्याकडे तलवार असल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे सोमवारी सकाळी पोलिसांनी त्याच्याकडून ही तलवार जप्त करीत त्यास अटकही केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. किरण यांच्या नृत्याभिनयाने रसिक मुग्ध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रामभक्त हनुमानाचे रूप मांडताना झालेला अप्रतिम अभिनय... शबरीची बोरे चाखून गोड तेवढी रामाला देणे, तिची रामाची वाट पाहणे हे प्रत्यक्ष अभिनयातून प्रकट करताना लीलया चेहरा बदलण्याची किमया... महादेवाची पूजा बांधणारे ब्रह्मा, विष्णू यांचा अभिनय अशा विविधतेने नटलेला डॉ. वसंत किरण यांचा नृत्याभिनय पाहण्याचे भाग्य नाशिककर रसिकांना लाभले. निमित्त होते कीर्ती कलामंदिरातर्फे दरवर्षी होणाऱ्या तीनदिवसीय पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवाचे. या महोत्सवाला सोमवारी सुरुवात झाली. या वर्षीचा महोत्सव 'नायक' या शीर्षकाने होत आहे.

महोत्सवाची सुरुवात झाली ती पारंपरिक कुचिपुडी नृत्याने. डॉ. किरण यांनी त्र्यंबकस्तुती सादर करीत श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी महादेवाला हे पुष्प अर्पण केले. त्यानंतर आदितालातील रागमालिका सादर करताना गदिमा यांची रचना असलेल्या 'एकच वर द्यावा, प्रभू मज एकच वर द्यावा' या गाण्यावर डॉ. किरण यांनी नृत्य सादर केले. या गाण्याची कोरिओग्राफी खुद्द त्यांचीच असल्याने अभिनयाने नटलेले हे नृत्य पाहणे म्हणजे नाशिककरांच्या दृष्टीने अविस्मरणीय अनुभवच ठरला. त्यानंतर त्यांनी शिवतरंग सादर केले. तिल्लाना या प्रकाराने त्यांच्या पुष्पाचा समारोप करण्यात आला. उत्तरार्धात गौरव-सौरव या जुळ्या भावंडांचे कथक नृत्य झाले.

गोपीकृष्ण जयंती महोत्सवात आज...!

गोपीकृष्ण जयंती महोत्सवात आज, २३ रोजी द्वितीय पुष्प शारवत जोशी गुंफणार आहेत. ते उत्तम ओडिसी नर्तक, कोरिओग्राफर आणि शिक्षक आहेत. गुरु शंतनू बेहरा आणि गुरू प्रशांत पटनाईक यांनी शारवतला घडवले. त्यांचे आजवर साऊथ कोरिया, चायना, जपान या देशात कार्यक्रम झाले आहेत आणि यू. के. फ्रान्स, बुडापेस्ट इथे त्याच्या 'ब्लू डान्स लाइट' या नृत्य संस्थेच्या शाखादेखील आहेत. महोत्सवाच्या द्वितीय पुष्पाच्या अखेरीस पुण्याचे परिमल फडके यांचे भरतनाट्यम् होणार आहे. गुरू रेया श्रीकांत, गुरू सुचेता चाफेकर आणि गुरू जयश्री राजगोपालन या दिग्गज गुरूकडे परिमलने भरतनाट्यमची तालीम घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांच्या महालात अनेक किमती वस्तू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या फार्म हाऊसवर एसीबीने तपासणी सुरू केली आहे. भुजबळांवर ईडीने कारवाईचा फास आवळल्यानंतर त्यांचे फार्महाऊसही सील करण्याबाबत चर्चा सुरू होती. एसीबीच्या कारवाईने या चर्चेला उधाण आले होते. एसीबीने केलेल्या तपासणीत भुजबळांच्या महालात अनेक किमती दुर्मिळ वस्तू आढळल्या आहेत. त्याच्या मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मफलर अन् बूटही मोजले

भुजबळ फार्म हाऊसमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या महालांमध्ये देश-विदेशातील अत्यंत दुर्मिळ अशा महागड्या वस्तू वापरण्यात आल्या आहेत. त्यांची प्रत्यक्ष दाखवलेली किंमत आणि बाजारभावातील किंमत यात मोठी तफावत असल्याने या महालांची इंचन् इंच मोजदाद केली जात आहे. लाकूड, शिल्प, विविध पेंटिंग, फर्निचर, शोभेच्या वस्तूंसह बांधकाम केलेल्या वस्तूंची मोजदाद सुरू आहे. विशेष म्हणजे या महालांमधील भुजबळ कुटुंबीयांकडून वापरण्यात येणारे कपडे, चादरी, गालिचे, भुजबळांचे मफलर, तसेच बुटांपासून सॉक्सपर्यंतची मोजदाद या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.

दगड, मातीसाठी विशेष तज्ज्ञ

नव्या पॅलेससाठी वापरलेले लाकूड, माती व दगडांचे मूल्य शोधण्यासाठी विशेष तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. या बंगल्यात वापरलेले लाकडू विदेशातील आहे, तर मातीही विशिष्ट रंगाची आहे. दगडही वेगवेगळ्या आकाराचे असल्याने हे सर्व परदेशातून आणल्याचा पथकाला संशय आहे. त्यामुळे लाकूड, माती व दगडांच्या तपासणीसाठी कृषी विभागाचे अधिकारी व तज्ज्ञांना सायंकाळी बंगल्यात बोलविण्यात आले. त्यांच्याकडून या चीज वस्तूंची किंमत काढली जात आहे.

तीन दिवस चालणार कारवाई

एसीबीच्या पथकाकडून रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. या फार्महाऊसमध्ये देशी व विदेशी वस्तूंची संख्या अधिक आहे, तसेच परिसरही बराच मोठा आहे. त्यामुळे एका दिवसात मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्यामुळे सोमवारी नव्या महालांची तपासणी रात्रीपर्यंत सुरू होती, तर ही कारवाई अजून दोन ते तीन दिवस चालणार आहे. भुजबळांच्या चंद्राई या बंगल्याचीही मोजणी केली जाणार आहे. त्यानंतर आर्मस्ट्राँग कंपनीच्या प्रकल्पांचीही मोजणी केली जाणार आहे.

जप्तीची अफवा

एसीबीच्या पथकांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे भुजबळांचे घर 'ईडी'ने जप्त केल्याची माहिती शहरात पसरली. गेली दहा वर्षे नाशिकमधील राजकीय घडामोंडीचे केंद्र असलेले भुजबळांचे घर जप्त होत असल्याची अफवा पसरताच ते पाहण्यासाठी नाशिककरांचीही मोठी गर्दी या परिसरात झाली होती. या परिसरात एसीबीच्या गाड्यांची संख्या व हालचाल बघून बघ्यांनी मात्र लांब राहणेच पसंत केले. भुजबळांच्या वकिलांनी मात्र ही जप्ती नव्हे, तर मालमत्तेचे मूल्यांकन केले जात असल्याचा दावा केला.

एसीबीने भुजबळ फार्महाऊसच्या मूल्यांकनाचा अर्ज राज्य सरकारकडे केला होता. त्याला सरकारने मंजुरी दिल्यानंतर बांधकाम विभागाच्या मदतीने येथील मालमत्तेचे मूल्यांकन केले जात आहे. जप्तीसंदर्भात कोणतीही नोटीस अथवा कागदपत्रे आम्हाला अद्याप मिळालेली नाहीत.

- अॅड. जालिंदर ताडगे, भुजबळांचे वकील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरी, नंदिनीची आता रात्री साफसफाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रदूषण थांबवण्यासाठी महापालिकेने गोदावरी व नंदिनी या दोन नद्यांची साफसफाई रात्रीपाळीतही करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच नदीच्या स्वच्छतेसाठी १७ स्वच्छता निरीक्षकांसह तेवढेच समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता गोदावरीसह नंदिनीच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित होणार असल्याने नद्यांचे प्रदूषण रोखले जाणार आहे.

गोदावरी व नंदिनीच्या स्वच्छतेची गंभीर दखल महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. नदी प्रदूषणाचा प्रश्न कायमच चर्चेत राहत असल्याने नदीकाठावरील स्वच्छतेची काळजी घेण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. या दोन्ही नद्यांच्या काठावर आता रात्रपाळीतही कर्मचाऱ्यांमार्फत साफसफाई मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने १७ स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती केली असून, ते महापालिकेच्या सहा विभागांची जबाबदारी घेणार आहेत, तसेच १७ समन्वय अधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विकासकामांचे बिघडले ‘बजेट’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महासभेने २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे बजेट मंजूर करून दीड महिना लोटला तरी महापौर कार्यालयाकडून प्रशासनाला बजेटचा ठरावच दिलेला नाही. त्यामुळे ५० लाखांच्या नगरसेवक निधीसह विकासकामांना ब्रेक लागला आहे. महापालिका निवडणुकांचा बिगूल वाजला तरी बजेटला मुहूर्त मिळत नसल्याने नगरसेवकांची विकासकामे मार्गी लागण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. बजेटचा ठराव महापौरांनी अडवून ठेवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे, तर दुसरीकडे जवळपास १५ ते २० नगरसेवकांनी विकासकामांची यादी प्रशासनाकडे सादर केल्याने प्रशासनही पेचात सापडले आहे.

महापालिकेतील सत्ताधारी मनसेने गेल्या वर्षीच्या बजेटचे 'बारा वाजवले' होते. एप्रिलपासून अंमलबजावणी करण्यात येत असलेले बजेट प्रत्यक्षात डिसेंबरमध्ये मंजूर झाले होते. त्यामुळे प्रशासनाच्या बजेटवरच काम करावे लागले होते. यापासून सत्ताधाऱ्यांनी कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. २०१६-१७ या वर्षाच्या बजेटचा मार्गही त्याच पद्धतीने सुरू आहे. स्थायी समितीने बजेट फेब्रुवारीत मंजूर केले असले तरी प्रत्यक्षात महासभेत ते जूनमध्ये आले होते. प्रशासनाच्या १३५८ कोटींच्या बजेटमध्ये स्थायी समितीने ३२० कोटींची वाढ सुचवून ती १७३७ कोटींपर्यंत नेली. यात नगरसेवकांना ५० लाखांचा निधी देण्याची तरतूद करण्यात आली होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात महासभेने या बजेटला मंजुरी दिली होती.

महापौर कार्यालयाकडून हा बजेटचा ठराव प्रशासनाला तातडीने मिळणे अपेक्षित होते; परंतु बजेट मंजूर होऊन दीड महिना झाला तरी महापौर कार्यालयाकडून बजेटचा ठरावच मिळालेला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या बजेटवरच महापालिकेचे कामकाज सुरू आहे. जोपर्यंत हा ठराव येत नाही तोपर्यंत नगरसेवक निधी मंजूर करणार नसल्याचा पवित्रा आयुक्तांनी घेतला होता. त्यानंतरही महापौरांनी ढिम्मपणाचीच भूमिका घेतली आहे.

आचारसंहितेचा फटका

महापालिका निवडणुकांचा आता बिगूल वाजला आहे. डिसेंबरमध्येच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौरांनी आता बजेट मंजूर केले तरी विकासकामे आचारसंहितेच्या कात्रीत सापडणार आहेत. बजेट मिळाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणासाठी दोन ते तीन महिने लागणार आहेत. निविदा काढल्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू होण्यास सहा महिने जातील. त्यामुळे या कामांचे श्रेय घेण्याचा नगरसेवकांचा अधिकार कमी होणार आहे. बजेट मंजूर केले तरी त्याचा सत्ताधाऱ्यांना फायदा मिळण्याची शक्यता कमीच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी मेडिकल प्रवेश उद्यापर्यंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खासगी मेडिकल कॉलेजांमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी हाती अखेरचे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. दोन दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षण संचालनालयांतर्गत (डीएमईआर) खासगी व विनाअनुदानित मेडिकल आणि डेंटल कॉलेजेसच्या प्रवेशांना सुरुवात झाली होती. या प्रवेशांसाठी २४ ऑगस्ट ही अखेरची मुदत आहे. 'नीट'च्या निकालानुसार हे प्रवेश देण्यात येणार आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आणि केंद्र सरकारच्या अध्यादेशानुसार खासगी मेडिकल कॉलेजेसमध्ये नॅशनल इलिजिबिलिटी कम एंन्टरन्स टेस्ट (नीट) २०१६ च्या मेरिटनुसार प्रवेश होतील, असे संदर्भ होते. यानंतर १६ ऑगस्ट रोजी नीट परीक्षेचा निकाल जाहीर होताच पुढील प्रक्रियेस सुरुवात झाली असल्याची माहिती मविप्र मेडिकल कॉलेजचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. एस. डी. गोसावी यांनी दिली.

अभिमत विद्यापीठ या प्रक्रियेबाहेर
ही प्रवेशप्रक्रिया मात्र अभिमत विद्यापीठांसाठी नाही. राज्यभरात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी १९२० जागा उपलब्ध आहेत, तर बीडीएस अभ्यासक्रमासाठी २३०० जागा उपलब्ध आहेत. या प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क समितीने निर्धारित केलेली फी भरावी लागणार आहे. ऑनलाइन अर्जासाठी प्रतिविद्यार्थी हजार रुपये, तर ६० रुपये बँक चार्ज यानुसार फी भरावी लागणार आहे. हजार रुपये ही प्रोसेस फी या वर्गात मोडते, तर प्रवेश फी यापेक्षा वेगळी म्हणजे शिक्षण शुल्क समितीने निर्धारित केलेली असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रवेशासाठी महत्त्वाच्या तारखा

- ऑनलाइन प्रवेश अर्जांसाठी अंतिम मुदत : २४ ऑगस्ट
- एसबीआय शाखेत फी पेमेंट भरण्याची मुदत : २५ ऑगस्ट
- प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट : २७ ऑगस्ट
- कागदपत्र पडताळणी आणि प्रेफरन्स अर्ज भरणे : ३० ऑगस्ट ते २ सप्टेंबर
- पहिली मेरिट लिस्ट प्रसिद्धी ('नीट'नुसार) : ३ सप्टेंबर

उत्तर महाराष्ट्रात १०७० जागा

उत्तर महाराष्ट्रात नाशिकसह धुळे, जळगाव आणि नगर जिल्ह्यात सुमारे १०७० जागा उपलब्ध आहेत. पैकी नाशिक जिल्ह्यात बीडीएस आणि एमबीबीएस या अभ्यासक्रमांसाठी सुमारे ३५० जागा खासगी विनाअनुदानित कॉलेजसाठी उपलब्ध आहेत. 'नीट'नुसार होणाऱ्या या प्रवेशांसाठी अवघ्या दोन दिवसांत म्हणजे २४ ऑगस्टपर्यंत यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

नाशिक विभागातील खासगी एमबीबीएस व बीडीएस कॉलेज

डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज, नाशिक..............१२० (एमबीबीएस)
एसीपीएम मेडिकल कॉलेज, साक्री, धुळे.................१०० (एमबीबीएस)
पद्मश्री व्ही. व्ही. पाटील मेडिकल कॉलेज, नगर.............१५० (एमबीबीएस)
डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जळगाव............. १५० (एमबीबीएस)
एसएमबीटी मेडिकल कॉलेज, घोटी (ता. इगतपुरी)..... १५० (एमबीबीएस)
केबीएच डेंटल कॉलेज, पंचवटी....................................१०० (डेंटल)
थोरात डेंटल कॉलेज, संगमनेर.....................................१०० (डेंटल)
जेएमएफ एसीपीएम डेंटल कॉलेज, धुळे......................... १०० (डेंटल)
वायसीएम डेंटल कॉलेज, नगर .......................................१०० (डेंटल)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जन्म-मृत्यूच्या ऑनलाइन नोंदीकडे पाठ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या जन्म व मृत्यू नोंदीच्या ऑनलाइन सेवेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने आता जिल्हा परिषदेची मदत घेण्याचा निर्णय घेतला असून, सोमवारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

महापालिकेने इतर सेवांप्रमाणेच जन्म व मृत्यूच्या नोंदणीसह दाखले देण्याची प्रक्रिया ऑनलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी पालिकेच्या वेबसाइटवर जाऊन त्यांची नोंदणी करण्याची सुविधा करण्यात आली आहे, तसेच दाखलाही ऑनलाइन घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, या ऑनलाइन सुविधेचा नागरिक वापर करत नसल्याचे चित्र आहे. ऑनलाइन सुविधेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने याची जनजागृती करण्यासह यासाठी जिल्हा परिषदेचे मार्गदर्शन घेण्याची तयारी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांना नऊ कोटींची मदत अपेक्षित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यात पाऊस आणि पुराने प्रचंड नुकसान केले आहे. मानव आणि जनावरांच्या जीवित हानीसह घरांची पडझड व तत्सम नुकसानाची भरपाई म्हणून सुमारे नऊ कोटींची मदत द्यावी लागणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली आहे.

जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाने थैमान घातले. गोदावरीसह तिच्या उपनद्या, तसेच अन्य नद्यांनाही पूर आला. नदीपात्रालगतची घरे, तसेच दुकानांमध्ये पाणी शिरल्याने रहिवासी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे जिल्ह्यात १३ जणांचा मृत्यू झाला असून, दीडशेहून अधिक जनावरे दगावली आहेत. पूर ओसरल्यानंतर प्रशासनाने पंचनाम्याचे काम हाती घेतले. त्यासाठी मोठी यंत्रणा कामाला लागली. निळी आणि लाल पूररेषा वगळता अन्य ठिकाणी करण्यात आलेल्या पंचनाम्यात पक्क्या, कच्च्या अशा ५,०५५ घरांचे नुकसान झाले असून, १३ गोठे जमीनदोस्त झाले आहेत. १४ झोपडीवजा घरांनाही या पावसाचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे पाच हजार ५५ घरांचे अंशत: तर एक हजार ६८२ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबतचा अहवाल विभागीय आयुक्त, तसेच राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. या सर्व ठिकाणचे पंचनामे पूर्ण झाले असून, प्रशासनाने सरकारकडे अहवालही सादर केला आहे. पूररेषेतील रहिवाशांना मदत देण्याबाबत सरकारने आदेश काढले तर त्यांनाही मदत दिली जाईल, असे खेडकर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश मंडळांच्या ‘नाल’वर पोलिसांची नजर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक गणेश मंडळांची रोषणाई, डीजे, देखावे यांचे अप्रूप सर्वांनाच असते. गणेशोत्सवातील दहा दिवसांत लाखो रुपयांचा खर्च करण्यासाठी मंडळे मागे-पुढे पाहत नाहीत. यंदा मात्र काही मंडळांच्या सदस्यांमध्ये गंभीर शांतता पसरल्याचे चित्र आहे. त्याचे कारण म्हणजे मंडळांच्या जुगार अड्ड्यांवर असलेली पोलिसांची करडी नजर. कारण वर्गणी तोकडी पडत असल्याने मंडळांना 'नाल'चाच काय तो आधार होता. मात्र, पोलिसांच्या आक्रमक पवित्र्यामुळे यंदा नाल (कमिशन) मिळेल की नाही, याची चिंता काही मंडळांना पडली आहे. सुदैवाने महापालिका निवडणूक तोंडावर असून, नगरसेवकपदासाठी इच्छुक उमेदवारच अशा मंडळांसाठी तारणहार ठरू शकणार आहेत. त्या दृष्टीने मंडळांचे पदाधिकारी कार्यरत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शहरात मोठ्या स्वरूपाची ३५०, तर मध्यम स्वरूपाची सुमारे ७५० मंडळे कार्यरत असून, यंदा या संख्येत काहीशी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षी शहर व परिसरात लहान-मोठ्या एक हजार गणेश मंडळांकडून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला होता. यंदा किमान १०० पेक्षा जास्त मंडळे सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय आहे 'नाल'?

गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता असते. हे पैसे एक तर वर्गणीच्या माध्यमातून जमा होतात किंवा जुगारातून मिळणाऱ्या पैशांवर! जुगार खेळणारे 'खेळिये' या दहा दिवसांत गणेश मंडळांना नाल (कमिशन) देतात. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच हे जुगार अड्डे सुरू होतात. त्यातून मिळणाऱ्या पैशांवरच मंडळाचा पुढील खर्च भागविला जातो.

पोलिस आक्रमक

यंदा, जुगार अड्ड्यांविरोधात शहर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच २१ जुलै रोजी शहर पोलिसांनी मुंबई नाका येथील सर्वांत मोठा जुगार अड्डा उद््ध्वस्त केला. पोलिसांनी ४१ जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ५ लाख ७१ हजार रुपयांची रोकड, मोबाइल, तसेच दुचाकी असा १० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. विशेष म्हणजे यात एका पोलिस कर्मचाऱ्याचाही समावेश होता. याचमुळे मुंबई नाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. पोलिसांच्या या आक्रमकतेची जाणीव जुगाऱ्यांना असून, सगळ्यांचे लक्ष आता नवीन पोलिस आयुक्तांकडे लागले आहे.

जुगार कशासाठी आणि कोणत्या कारणांमुळे होतो हे जाणून घेण्याचा प्रश्नच उद््भवत नाही. जुगार खेळणारे आणि खेळवणारे कायद्याचा भंग करतात, म्हणून त्यांच्यावर कारवाई होणारच. जुगार अड्डा सुरू राहणार नाही, याची दक्षता आम्ही घेऊ.

- सचिन गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त, क्राइम ब्रँच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images