Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शहरात हरतालिका उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखंड सौभाग्याचे वरदान मिळावे, यासाठी सुवासिनींनी मोठ्या उत्साहात हरतालिकेची पूजा केली. शहरातील सातपूर, नाशिकरोड भागातील महादेवाची मंदिरे रविवारी (दि. ४) सकाळपासून गजबजलेली दिसत होती. दिवसभर हरतालिकेचा उपवास करून मनोभावे हे व्रत पाळण्यात आले.

फुले, दुर्वा, विड्याची पाने, फळे, बेल, आघाडा, अत्तर असे विविध साहित्य घेण्यासाठी बाजार फुलला असल्याचे चित्र दिसून आले. रविवारी पहाटेही फुलबाजारात यासाठी अनेकींनी पूजेचे साहित्य खरेदी केले. त्यानंतर सर्व साहित्य, नैवेद्य घेऊन अनेकींनी महादेवांच्या मंदिरात पूजा केली. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हरतालिकेचे व्रत केले जाते. हे व्रत करून पार्वतीने महादेवाला प्राप्त करून घेतले होते.

त्यामुळे आपल्या पतीप्रती श्रद्धा राखत महिलावर्गाचा याकडे अधिक कल असतो. पतीला दीर्घायुष्य मिळावे, तसेच कौटुंबिक चिंता दूर व्हाव्यात, अशी प्रार्थना करत भक्तीभावाने हे व्रत पूर्ण करण्यात आले.रात्री उशिरा महादेवाच्या आरत्या, देवाचे गाणे गाऊन सुवासिनी हरतालिका साजरी केली. सुवासिनींबरोबरच कुमारिकाही हे व्रत मनासारखा जोडीदार मिळावा, यासाठी करतात. महादेवाच्या मंदिरात त्यांचीही लगबग दिसून आली. अनेकींनी हे व्रत पहिल्यांदाच केलेले असल्याने त्यांच्यामध्ये मोठी उत्सुकता दिसून आली. हरतालिकेच्या व्रतामागील संकल्पना समजावून घेत कहाणीचे श्रवणदेखील केले.


देशस्थ ऋग्वेदी संस्थेत पूजन

नाशिक : देशस्थ ऋग्वेदी संस्थेच्या दुर्गा मंगल कार्यालयात सालाबादाप्रमाणे यंदाही हरतालिका पूजन मोठ्या उत्साहात यथाशास्त्र करण्यात आले. या कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदमूर्ती पांडुरंगशास्त्री पैठणकर यांनी केले. सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत सर्व समाजातील सुमारे सहाशे सुवासिनींनी मोठ्या भक्तीभावाने हरतालिका पूजन केले. कार्यक्रमाचे आयोजन देशस्थ ऋग्वेदी संस्थेच्या महिला शाखेच्या कार्याध्यक्षा जयश्री पोळ यांनी केले. तसेच महिला शाखेच्या सदस्या संध्या कुलकर्णी, सविता तारे, अनिता जस्ते, वनिता जालियलकर यांच्यासह अनेक महिला सदस्या उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यवाह नरेंद्र कुलकर्णी, मकरंद सुखात्मे, बापू कुलकर्णी, अजय चौधरी, सचिन निरंतर, वसंत कुलकर्णी आदींसह सदस्यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अहिल्यादेवींच्या पुतळ्याला हवी छत्री

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील अहिल्यादेवी पुतळ्यावर छत्री बसवावी तसेच परिसराचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी एका शिष्टमंडळाने नुकतीच निवेदनाद्वारे केली. याबाबत महापौरांनी छत्री बसविण्याचे आणि अहिल्यादेवींचे स्टीलचे नाव पुतळ्याखाली लावण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

महापालिकेच्या नाशिकरोड कार्यालया शेजारी असलेल्या कोर्टासमोर पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा पुतळा आहे. प्रशासनाला या पुतळ्याची आठवण अहिल्यादेवींच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशीच येते. नेते व लोकप्रतिनिधीही पुष्पहार घालून निघून जातात. सर्वांनीच पुतळ्याकडे दुर्लक्ष केल्याची नागरिकांची तक्रार आहे. अहिल्यादेवी पुण्यतिथी कार्यक्रमासाठी महापौर अशोक मुर्तडक नुकतेच नाशिकरोड येथे आले असता या नागरिकांनी स्मारकाबाबत चर्चा केली. पुतळ्यावर छत्री उभारावी, पुतळ्यासमोरील गेट स्लाईडींगचे करावे अशी मागणी करण्यात आली. छत्री उभारल्यास पुतळ्याचे ऊन-पावसापासून संरक्षण होणार आहे. तसेच शोभाही वाढणार आहे. या शिष्टमंडळात नितीन धानापुणे, सागर दाणी, आप्पा माने, प्रकाश लांडे, मयूर भगत, किशोर वाघ, अविनाश वाघ आदींच्या समावेश आहे.

पुतळ्यापुढील ओटाही छोटा असल्याने पुतळ्याची पूजा करून हार घालण्यासाठी फारच थोडे लोक उभे राहू शकतात. कार्यकर्त्यांना बाहेर उभे रहावे लागते. पुतळ्याजवळ जाण्यासाठी रस्ताही अरुंद आहे. पार्किंगचा प्रश्नही गंभीर आहे. कार्यक्रमासाठी आलेल्यांना वाहने कोर्टाच्या आवारात किंवा रस्त्यावर उभी करावी लागतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस बंदोबस्त तैनात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या काही तासांत आगमन होणाऱ्या गणपतीबाप्पाच्या स्वागतासाठी अवघे शहर तयारीला लागले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांची लगबग सुरू असून, गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राहावी म्हणून पोलिसांनीही कंबर कसली आहे. स्थानिक पोलिसांसह अतिरिक्त २०० पोलिसांचा फौजफाटा शहरात तैनात करण्यात आला आहे.

सोमवारी सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाची धूम पुढील १० दिवस कायम राहणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांची मेजवाणी गणेशभक्तांना मिळणार आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. यंदाच्या निवडणुकीत खर्चाची तितकीशी चिंता कार्यकर्त्यांना नाही. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांच्या नवनवीन संकल्पना अगदी सुरुवातीपासूनच यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळेल. उत्सव काळात शहरातील शांतता अबाधित राहावी, अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनही सजग झाले आहे. पोलिस स्टेशननिहाय पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून, सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अतिरिक्त बंदोबस्तासाठी २०० पोलिस कर्मचारी, केंद्रीय राखीव पोलिस दलाची एक तुकडीही तैनात करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. खबरदारी म्हणून वर्दळीचे ठिकाण, शहरातील महत्त्वाची ठिकाणे, गर्दी होणाऱ्या गणेश मंडळांभोवती बॉम्बशोध पथक व बॉम्बनाशक पथकाच्या साह्याने तपासणी होणार आहे.

ध्वनिप्रदूषणाचा नियम पाळा

गणेशोत्सव काळात ९, ११, १४ आणि १५ सप्टेंबर या चार दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास पोलिस आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. मात्र, मिळालेल्या अतिरिक्त वेळेत, तसेच इतर काळातही मंडळांनी सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या ध्वनिप्रदूषण नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी केले आहे. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरास पूर्ण करण्यासाठी मंडळांची लगबग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशाची आरास पूर्ण करण्यासाठी शहरातील विविध मंडळांचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. पंचवटी, मेन रोड, भद्रकाली, जुने नाशिक, रविवारपेठ, अशोकस्तंभ आदी भागांतील मंडळांची कामे पूर्णत्वाकडे आहेत. उपनगरांमध्ये बहुतांश मंडळांची कामे संथ गतीने सुरू असल्याचे पाहायला मिळाले.

बी. डी. भालेकर मैदानाजवळील मंडळांनी आपली कामे पूर्ण केली आहेत. काही मंडळांचे देखावे रोषणाईचे, तर काही चलतचित्रांचे आहेत. त्यांनीही आपल्या कामाला सुरुवात केली आहे. शहरातील मंडळांची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर असली तरी उपनगरांमध्ये हा वेग कमी आहे. नाशिकरोड परिसरातील मंडळांनी कामाचा वेग वाढवला आहे. जेलरोड, शिवाजी रोड, सुभाष रोड, देवळाली गाव, अनुराधा थिएटरजवळील गणपती, जय भवानी रोड येथेही मंडप टाकून तयारी पूर्ण झाली आहे.

काही मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, काही मंडळाचे देखावे मोठे असल्याने उशिराने उघडण्यात येतील, असे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

वाहतुकीचा बोजवारा

शहरात ठिकठिकाणी खरेदीला वेग आला असून, बाजारपेठांत गर्दी वाढल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत असल्याची स्थिती आहे. रविवार कारंजा परिसरात वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार सातत्याने वाढले आहेत. महात्मा गांधी रोड ते नेहरू चौक हे अंतर कापण्यासाठी पादचाऱ्यांना किमान अर्धा ते पाऊण तास लागत आहे. हीच परिस्थिती मेनरोड परिसरात आहे. फुले, गणपतीला लागणारे पाट, पत्री खरेदीसाठी रविवार कारंजा, बोहरपट्टी, सराफ बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

पूजासाहित्यासाठी झुंबड

पूजासाहित्य खरेदी करण्यासाठी रविवार कारंजावरील सर्वच दुकानांमध्ये गर्दी झाली असून, नागरिकांना विक्रेत्याचे तोंडदेखील दिसत नसल्याची स्थिती आहे. ग्राहकांची संख्या जास्त असल्याने दुकानातील सेवक वर्गाची मात्र दमछाक होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धूलिकणांमुळे नागरिक त्रस्त

$
0
0

सोमेश्वर कॉलनीत समस्यांबाबत प्रशासनाची उदासीनता

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

औद्योगिक वसाहतीला अगदी लागून असलेल्या सोमेश्वर कॉलनीतील रहिवाशी कारखान्यांच्या बॉयलरमधून उडत येणाऱ्या धूलिकणांनी त्रस्त झाले आहेत. त्यातच गेल्या अनेक वर्षांपासून याभागात रस्तेच झाले नसल्याने नागरिकांना कच्च्या रस्त्यांवरील प्रवास अवघड झाला आहे. महापालिका व एमआयडीसीच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे लक्ष घालावे, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

सातपूर भागात कामगार वस्ती स्थापन होत असताना सोमेश्वर कॉलनीचादेखील त्यात समावेश झाला. एमआयडीसीला अगदी लागून व कामगारांना परवडतील अशा दरात घरकुले व फ्लॅट उपलब्ध झाल्याने अनेकांनी याठिकाणी राहणे पसंत केले. परंतू गेल्या काही वर्षांपासून सोमेश्वर कॉलनीच्या भागात कारखान्यांच्या बॉयलरमधून उडत येणाऱ्या धूलिकणांनी रहिवाशी त्रस्त झाले आहेत.

याबाबत महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळालादेखील रहिवाशांनी तक्रार केली. त्यात रस्त्यांची कामे अनेक वर्षांपासून झाली नसल्याने याकडे महापालिकेने लक्ष घालावे, अशी मागणी केली. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्षच केले. प्रभाग क्रमांक २२ मधील शेवटचे टोक सोमेश्वर कॉलनीचा परिसर आहे. यात महापालिका व स्थानिक नगरसेवकदेखील दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही रहिवाशांनी केला.

रायर्डसवर कारवाई करा

सोमेश्वर कॉलनी भागात असलेल्या कामगार वस्तीत परप्रांतीयांचीच संख्या अधिक आहे. यात झोपडपट्टी भागातील टवाळखोर शाळा भरताना व सुटल्यावर मुलींनाच रायडिंग करत त्रास देण्याचे प्रकार करतात. त्यांच्यावर कारवाईची मागणीही रहिवाशांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पासाठी मोदकांची व्हरायटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच देवाच्या पुढ्यात ठेवण्यात येणाऱ्या नैवेद्यासाठी मिठाईची दुकाने सजू लागली आहेत. वैविध्यपूर्ण आणि चविष्ट अशा मोदकांची भुरळ ग्राहकांना सहजच पडत असल्याने त्याची खरेदी-विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोदकाला चांगली मागणी आहे.

गणपतीचे सोमवारी घराघरांमध्ये आगमन होणार आहे. त्यासाठी विविध प्रकारची मिठाई प्रसादासाठी ठेवण्यात येते. गणपतीसाठी खव्याचे मोदक, उकडीचे मोदक, तळलेले गूळ, खोबऱ्याचे मोदक, साखरेचे मोदक, आंब्याचे मोदक, काजू मोदक, ओल्या खोबऱ्याचे मोदक यांना विशेष मागणी आहे. नाशिकच्या भगवंतराव मिठाई आणि महाराष्ट्र भांडार या दुकानांत मोदकाच्या खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे. सणाच्या कालावधीत घरोघरी पाहुण्यांची वर्दळ असते. रोजच्या प्रसादात वैविध्य हवे, यासाठी विविध प्रकारचे मोदक देण्यात येतात. त्याचप्रमाणे अनेक कंपन्यांमध्येही गणपतीची स्थापना केली जाते. तेथे प्रसादासाठी मोदकांचा प्रसाद दिला जातो. अशा वेळी घरगुती पद्धतीने तयार झालेल्या मोदकांना विशेष पसंती असते. बाजारपेठेत विविध प्रकारचे मोदक उपलब्ध असून, दोन दिवसांपासून तुफान खरेदी होत आहे.

मोदकांचे प्रकार

तळलेले मोदक ः २६० रुपये किलो
खव्याचे मोदक ः ३०० रुपये किलो
मलई मोदक ः ३०० रुपये किलो
उकडीचे मोदक ः १८ रुपये प्रतिनग
काजू मोदक ः ७०० रुपये किलो
आंब्याचे मोदक ः ७०० रुपये किलो
साखरेचे मोदक ः ३४० रुपये किलो
ओल्या खोबऱ्याचे मोदक ः ३५० रुपये किलो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळाचे प्रमाण ८ टक्क्यांपर्यंत

$
0
0

मेरीच्या सॅटेलाईट सर्व्हेक्षणातील धरणांची माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दर उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाली की धरणांतील गाळाचा विषय समोर येतो. त्यातून धरणाची क्षमता कशी कमी झाली हे सुध्दा सांगण्यात येते. काही ठिकाणी या गाळ काढण्याच्या मोहिमाही सुरू होतात. पण महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थे (मेरी) ने केलेल्या राज्यातील ९० धरणांच्या सॅटेलाईट सर्व्हेक्षणात सरासरी ५ ते ८ टक्के गाळ धरणात असल्याचे समोर आले आहे. हे सर्व्हेक्षण फक्त चल जलसाठ्यावर करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात खडक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते प्रमाण कमी असल्याचाही निष्कर्ष काढण्यात आला आहे. राज्यातील मोठे व मध्यम अशा धरणाचे हे सर्व्हेशन केल्यानंतर ही सरासरी आली पुढे आहे. गेली १५ वर्षे टप्‍प्याटप्‍प्याने सर्व्हेक्षण केल्यानंतर हे निष्कर्ष काढण्यात आले असले तरी इतर छोट्या धरणात मात्र गाळांचे प्रमाण यापेक्षा जास्त असल्याचेही सर्व्हेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मत आहे. हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार यासारख्या अनेक राज्यात धरणात गाळ मोठ्या प्रमाणात असतो. पण महाराष्ट्रात त्या तुलनेत तो खूप कमी आहे.

या अगोदर गाळ मोजण्याच्या पध्दतीत फारशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात नव्हता. त्यामुळे त्याचे निष्कर्षही अचूक येत नव्हते. पण सॅटेलाईट सर्व्हेक्षणाततून अचूक माहिती गोळा केली जाते. विशेष म्हणजे या सर्व्हेक्षणात काही धरणांची असलेली मूळ क्षमता काही प्रमाणात जास्त असल्याचेही आढळले आहे. पण त्याचे प्रमाण खूप कमी आहे.

धरणातील साठलेला गाळ हा शेती सुपीक करण्यासाठी खूपच उपयुक्त असतो. पण ते उचलण्याचे प्रमाण खूपच कमी असते. काही ठिकाणी गाळ काढण्याची मोहीम घेतली जाते. त्याला सरकारही पाठिंबा देते पण ती प्रक्रिया व्यापक स्वरुपात राबवणे गरजेचे आहे. छोट्या धरणात साठलेला गाळ काढल्यास त्याची क्षमता वाढवता येईल पण मोठ्या धरणात ही प्रक्रिया राबवणे अवघड असते, असेही मत या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जात आणि व्यक्तिस्वातंत्र्य हे आजचे द्वंद्व

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माणसे हिंसक वृत्तीने सत्ता प्रस्थापित करीत आहेत, ही गंभीर बाब आहे. जात आणि व्यक्तिस्वातंत्र्य हे आजचे द्वंद्व आहे. ज्याला व्यक्तिस्वातंत्र्य पाहिजे त्याला संविधानाने मार्ग दिलेला आहे. व्यक्तिस्वातंत्र्याला खासगीकरण, सरकारीकरण याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे प्रतिपादन संमेलनाचे अध्यक्ष, भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, प्रगतिशील लेखक संघ, आशीर्वाद फाऊंडेशन, केटीएचएम महाविद्यालयातर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनाचे अध्यक्ष म्हणून अॅड. आंबेडकर बोलत होते. गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात हे संमेलन झाले. चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते संमेलनाचे उद््घाटन करण्यात आले. मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार प्रमुख पाहुण्या होत्या.

अॅड. आंबेडकर म्हणाले, की लुटारू वृत्तीने जगायचे की सहजीवनाने जगायचे, याचा विचार ज्याला करता आला तो खरे आयुष्य जगला. नाही तर येरझऱ्याच झाल्या. डॉ. आंबेडकरांचे विचार जनमानसात पोहोचण्यासाठी त्यांची पुस्तके वाचली गेली पाहिजेत, असेही ते म्हणाले.

या वेळी श्रीपाद जोशी म्हणाले, की या विचार संमेलनाचे बीज गोविंद पानसरे यांच्या कृती कार्यक्रमातून आले आहे. पुरोगामी चळवळीचे केंद्रीकरण निर्माण करण्याचीच गरज निर्माण झाली आहे. मूळ प्रागतिक परंपरा ही सहिष्णू, धर्मनिरपेक्ष आहे, याची जाणीव सर्वांमध्ये पुन्हा निर्माण व्हावी म्हणून हा संमेलनाचा खटाटोप आहे, असेही ते म्हणाले.

या वेळी नीलिमा पवार म्हणाल्या, की बाबासाहेबांनी केवळ दलित स्त्रियांचे प्रश्न सोडवले नाहीत, तर समस्त स्त्री वर्गासाठी त्यांचा लढा होता. स्त्रियांचा राजकारणातील वाढत्या प्रभावामुळे नैतिकतेचा स्तर उंचावेल असे बाबासाहेबांना वाटत असे. समाजाचा विकास हा स्त्रियांच्या विकासाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पवार यांनी बाबासाहेबांच्या उपाध्यांची मोठी यादी सांगितल्याने प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.

उद््घाटन सत्रानंतर 'डॉ. बाबासाहेब यांचे परराष्ट्र धोरणविषयक विचार आणि सद्यःस्थिती' या विषयावर प्रा. डॉ. विजय खरे यांचे व्याख्यान झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असा समाज निर्माण झालाच नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. केवळ आरक्षण हा विचार पुढे न येता बौद्धिकांवर आधारित समाजाची निर्मिती व्हावी, असेही खरे यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत मनीषा जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. चित्रकार अशोक नागपुरे यांनी प्रकाश आंबेडकर, नागराज मंजुळे यांना पेन्सिलचित्र भेट दिले. मंजुळे यांनी भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचून उद््घाटन केले. या वेळी सर्व प्रेक्षकांनी उभे राहून मानवंदना दिली.

मंजुळेंची चौफेर फटकेबाजी

विचार संमेलनात भाषण करताना प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणाले, की विचार संमेलन या शब्दात नक्कीच आश्वासक काही तरी आहे. आंबेडकर समजून घ्यायला मलाही उशीर झाला. मला असे वाटत होते, की आंबेडकर माझे नाहीत; परंतु मला मागाहून ते उमगले. कोपर्डी व इतर घटनांविषयी बोलताना मंजुळे म्हणाले, की बलात्कार करणाऱ्याची जात पाहिली जाते. मात्र, त्यांची जात न पाहता त्यांना शिक्षा व्हावी. लोकांना सावित्रीबाई फुलेंपेक्षा आर्ची जास्त आवडते, याचे वाईट वाटते. असे होऊ नये. फुले, शाहू, आंबेडकर यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे. आंबेडकरांची मिरवणूक काढणे, डीजे लावणे बंद झाले पाहिजे. कारण त्यांनी दिलेला विचार महत्त्वाचा आहे. त्यांच्या पुतळ्यापेक्षा त्यांची पुस्तके अधिक महत्त्वाची आहेत, असेही मंजुळे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निम्मा उत्तर महाराष्ट्र ओलाचिंब

$
0
0

१०० टक्क्यांहून अधिक पाऊस

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तर महाराष्ट्रातील सुमारे निम्म्या तालुक्यांमध्ये यंदा १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. ५४ पैकी २४ तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली असून, सर्वाधिक ११ तालुके नगर जिल्ह्यातील आहेत. विशेष म्हणजे याच नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात अजूनही ४० टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

यंदा नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला. दुष्काळाने पोळून निघालेल्या महाराष्ट्रातील बहुतांश भागात यंदा १०० टक्क्यांहून अधिक पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. ही शक्यता काहीअंशी खरी ठरली. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार वगळता अन्य सर्वच जिल्ह्यांत १ जून ते ३ सप्टेंबर या कालावधीत समाधानकारक पाऊस झाला. अहमदनगर जिल्ह्यातील १४ पैकी ११ तालुक्यांमध्ये यंदा १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला. त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात १५ पैकी आठ तालुक्यांमध्ये पावसाने यंदा सरासरी ओलांडली. जळगाव जिल्ह्यात १५ पैकी तीन तालुक्यांत, तर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात प्रत्येकी एका तालुक्यात १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

उत्तर महाराष्ट्रात ५४ तालूके असून, त्यापैकी २४ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला. १७ तालुके असे आहेत, जेथे ७६ ते १०० टक्के एवढा पाऊस पडला. ५१ ते ७५ टक्के पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या ११ असून, धुळ्यातील शिंदखेडा आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात मात्र ५० टक्क्यांहूनही कमी पाऊस झाला आहे. ऐन पावसाळ्यातही पारनेरमध्ये ४०, नगर आणि शिंदखेडा तालुक्यांत प्रत्येकी तीन टँकर सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पा, तूच कर ‘एटीएम’चे रक्षण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडसह नाशिकमधील 'एटीएम'च्या सुरक्षेबाबत बहुतांश सरकारी, खासगी व सहकारी बँका बेफिकीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील २०० एटीएमपैकी वीस टक्केही 'एटीएम'साठी बँकांनी सिक्युरिटी गार्ड नेमलेले नसून, ८० टक्के एटीएम सुरक्षारक्षांविना आहेत. पोलिसांनी वेळोवेळी सूचना करून आणि बैठका घेऊनही बँका बेफिकीर आहेत. धक्कादायक म्हणजे अनेक बँकांचे सीसीटीव्ही कॅमेरे एक वर्षापासून बंद आहेत. त्यामुळे आता बाप्पा, तूच कर 'एटीएम'चे रक्षण, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

नाशिक-पुणे महामार्गावरील स्टेट बँकेचे एटीएम कटरच्या सहाय्याने फोडून चोरट्यांनी सुमारे आठ लाखांची रोकड लांबवली. चोरट्यांनी सीसीटीव्हीच्या वायर्स कापून ही चोरी केली. शेजारील दोन एटीएम फोडण्याचाही प्रयत्न केला. नाशिकरोडला दत्त मंदिर चौकाजवळील खासगी बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी अशीच मोठी चोरी केली होती.

'जनधना'बाबतची बेफिकिरी

'एटीएम'मध्ये रकमेचा भरणा करण्याचे काम बँकांनी खासगी एजन्सींना दिले आहे. स्टेट बँकेने हे काम ईपीएस या कंपनीला दिले आहे. ईपीएसने हे काम दुसऱ्या उपकंपनीला दिले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या दोन्ही कंपन्यात कॅश हॅन्डल करणारे फक्त दहावी पासही आहेत. बँकांचा याबाबतचा सर्व कारभार रामभरोसेच दिसत आहे. पोलिसांनी नाशिकरोडला 'एटीएम'चे सर्वेक्षण केले असता अनेक 'एटीएम'मध्ये सुरक्षारक्षकच नसल्याचे आढळले, तर काही 'एटीएम'मधील सीसीटीव्ही कॅमेरे एक वर्षापासून बंद असल्याचे आढळले. यावरून जनधनाबाबत बँका किती बेफिकीर आहेत, हे स्पष्ट होते.

'एटीएम'ची संख्या वाढली

नाशिकरोडला सर्व महत्त्वाच्या ठिकाणी एटीएम उघडण्यात आले आहेत. हॉटेल, पेट्रोलपंप, बाजारपेठा, रेल्वे स्टेशन, सिनेमागृहे, हाय वे अशा सर्वच ठिकाणी खासगी, सरकारी व सहकारी बँकांची सुमारे पन्नास तरी एटीएम आहेत. एकट्या जेलरोडला दोन डझन एटीएम आहेत. मात्र, सर्वांचा आढावा घेतला, तर जवळजवळ सर्वच ठिकाणी सुरक्षारक्षक नाहीत. याचाच अचूक फायदा चोरटे उचलतात. 'एटीएम'मध्ये पैसे भरण्याचे कंत्राट बँकांनी खासगी एजन्सीला दिले आहे. त्यामुळे 'एटीएम'मध्ये चोरी झाल्याचे लक्षात येण्यास बँकांना उशीर होतो.

सूचनांकडे दुर्लक्ष

पोलिस उपायुक्त श्रीकांत ढिवरे यांनी 'एटीएम'च्या सुरक्षेबाबत बँक अधिकाऱ्यांची बैठक उपनगर पोलिस ठाण्यात बोलावली होती. सुरक्षारक्षक तातडीने नेमण्याची सूचना करूनही त्याकडे बँकांनी काणाडोळा केला. सुरक्षारक्षक असते, तर बँकांना लाखोंचा फटका बसला नसता. चोरटे केवळ 'एटीएम'वरच डल्ला मारत नाहीत, तर ज्येष्ठ व अशिक्षित ग्राहकांनाही लुबाडतात. काही दिवसांपूर्वी नाशिकरोडला ज्येष्ठ नागरिकाला पैसे काढून देण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी लुटले. एटीएम परत करताना दुसरेच एटीएम दिले. नंतर मूळ 'एटीएम'च्या सहाय्याने त्यांचे पैसे काढून घेतले. काही चोर 'एटीएम'ला वेगळे मशिन लावून ग्राहकांचा पिन कॉपी करून त्यांच्या खात्यातून चोरी करतात.

चौकांमध्ये कॅमेऱ्यांची गरज

'एटीएम'मध्ये कॅमेरे असतात. मात्र, त्याला चकवा देऊन चोर डल्ला मारत आहेत. शहरातील महत्त्वाचे चौक आणि वर्दळीच्या मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास चोऱ्या, गुंडागर्दी अशा सर्वांनाच आळा घालणे शक्य होणार आहे. नाशिकरोडला काही नगरसेवकांनी स्वतःच्या पैशांनी असे कॅमेरे बसविले आहेत. प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलली, तर महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कार्यान्वित करणे शक्य होणार आहे.

'एटीएम'च्या सुरक्षेबाबत बँक प्रतिनिधींची बैठक घेऊन सूचना केल्या जात आहेत. त्यामध्ये एटीएम आणि ग्राहक सुरक्षेबाबत आवाहन केले जात आहे. मात्र, सूचनांचे पालन होताना दिसत नाही. अनेक 'एटीएम'बाहेर सुरक्षारक्षकच नाहीत. बँकांनी सुरक्षेच्या उपाययोजना त्वरित कराव्यात.

- श्रीकांत धिवरे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कत्तलीसाठी जाणाऱ्या दहा गायींची सुटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव नजीक रविवारी (दि. ४) पहाटे कत्तलीसाठी मालेगावच्या दिशेने येणाऱ्या गोवंशची सुटका करण्यात आली. येथील गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी मालेगाव पोलिसांच्या समवेत ही कारवाई केली.

चांदवडकडून मालेगावच्या दिशेने कत्तलीच्या उद्देशाने एका बोलेरो प‌िकअप (एमएच १७ टी ७९०५) मधून दहा गायी वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती गोरक्षा समितीचे सुभाष मालू, बजरंग दलाचे मच्छिंद्र शिर्के, अंबादास मांडवडे, हरिष ठाकूर यांना मिळाली होती. त्यानुसार महामार्गावर असलेल्या हॉटेल फाउंटनसमोर या बोलेरो पिकअप वाहनास थांबवले गेले. यावेळी वाहनचालक व त्याचा साथीदार वाहन सोडून फरार झाले. या वाहनात कोंबून, पाय बांधून जनावरे नेली जात असल्याचे दिसून आले. या प्रकरणी सुभाष मालू यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तालुका पोलिस स्टेशन येथे अज्ञात वाहनमालक, चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नक्षत्र’च्या संचालकास तीन वर्षांनंतर बेड्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर पोलिसांनी तब्बल तीन वर्षांनंतर फरार असलेल्या नक्षत्र ज्वेलर्सचा संचालक सचिन उदावंत याला बेड्या ठोकल्या आहेत. सातपूर कॉलनी भागातील असंख्य रहिवाशांना नक्षत्र ज्वेलर्सच्या संचालकाने लाखो रुपयांचा गंडा घालत पोबारा केला होता. त्यानंतर महिलांनी फसवणूक झाल्याच्या तक्रारी सातपूर पोलिस स्टेशनला दाखल केल्या होत्या. आता उदावंतकडे लाखो रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांना न्याय मिळणार का, असा सवाल सातपूर कॉलनीवासीयांनी उपस्थित केला आहे.

सातपूर कॉलनीत म्हाडाच्या वसाहतीत भाड्याच्या गाळ्यात नक्षत्र ज्वेलर्स या नावाने उदावंत याने दुकान थाटले होते. सन २०१३ मध्ये दिवाळीच्या सणात विविध प्रकारच्या गुंतवणुकीच्या स्किम उदावंत याने ग्राहकांना दिल्या होत्या. यामध्ये महिला ग्राहकांची संख्या सर्वाधिक होती. दिवाळी, दसरा या नावाने सुरू केलेल्या स्किममध्ये लाखो रुपयांच्या बक्षिसांचे आमिष उदावंतने दाखविल्याने महिलांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. काही महिलांनी आपल्या घरातील सोनेदेखील उदावंत याच्याकडे गहाण ठेवले होते. ग्राहकांची वाढलेली संख्या व दाखविण्यात आलेले आमिष याचा ताळमेळ बसत नसल्याचे उदावंत याच्या लक्षात आल्यावर त्याने दुकानालाल टाळा लावत पोबारा केला होता. दरम्यान, महिलांच्या तक्रारीवरून सातपूर पोलिस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी पहिल्या टप्प्यात तीन संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर पुन्हा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु, मुख्य संशयित सचिन उदावंत तीन वर्षांपासून फरार होता.

पोलिसांना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे उदावंत आला असल्याची खबर मिळाली. त्यावरून सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक के. व्ही. पाटील यांनी उदावंतला श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, मंगळवार (दि. ६)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहृत चिमुकली पुन्हा आईच्या कुशीत !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एक वर्षाच्या मुलाचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याने एका बापाने शनिवारी तेवढ्याच वयाच्या बालिकेचे अपहरण केले. दरम्यान, त्या आईने लेकीच्या विरहाने टाहो फोडला. घटनेचे गांभीर्य ओळखत मुंबई नाका पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे अवघ्या दोन तासांत विरहाने व्याकूळ झालेल्या आईच्या कुशीत तिची लेक आली. बालिकेचे अपहरण करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी भद्रकाली परिसरातून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन पाराजी गायकवाड, असे संशयित आरोपीचे नाव आहे. वडाळागाव परिसरातील सावित्रीबाई झोपडपट्टी भागात राहणाऱ्या गायकवाडने खोडेनगर परिसरातील गोल्डन स्टार्स बिल्ड‌िंगसमोर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून एक वर्षाच्या पायल पिंटू राऊतचे अपहरण केले होते. या बांधकाम साईटवर वॉचमॅन म्हणून राऊत कुटुंब वास्तव्यास आहे. शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पिंटू नशेत झोपलेला होता; तर पायलची आई वनिता ही कामात गुंतली होती. पायल इमारतीत खेळत असताना तिथे एक व्यक्ती आल्याचे वनिताला समजले. तोंडओळख असलेली ही व्यक्ती आली आणि गेली. मात्र, कामात व्यस्त असलेल्या वनिताला काय घडले हे समजले नाही. दरम्यान, याचा फायदा घेत संशयित गायकवाडने पायलला खांद्यावर टाकून पळ काढला.

काही वेळाने पायल दिसत नसल्याने वनिताने इकडे तिकडे शोधण्यास सुरूवात केली. मात्र, तिचा पत्ता नव्हता. जवळच राहणाऱ्या एका महिलेने पायलला एक व्यक्ती घेऊन गेल्याचे सांगताच वनिताच्या पायखालची जमीन सरकली. पोटचे लेकरू नजरेआड झाल्याने रडतच ती मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये पोहचली. घटनेचे गांभीर्य ओळखून कर्मचाऱ्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंद वाघ यांना कळवली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक घोडके, हवालदार सोनवणे, वाघ, डांगे शेख आदींनी चौकशी सुरू केली.

नितीन हा वनिताच्या भावाचा मित्र असल्याचे समजले. रात्रीच्या सुमारास तो भद्रकाली परिसरात पोलिसांच्या हाती लागला अन् चिमुकलीही सुरक्षित मिळाली. नितीन गायकवाड सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात चोरी आणि तत्सम गुन्हे दाखल आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर झळकला पार्किंग दरफलक

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

मुक्तिधाम येथे महापालिकेच्या नावाने पार्किंगचा बोगस ठेका चालविण्याचा प्रकार 'मटा'ने उघडकीस आणल्यानंतर महापालिका प्रशासनाने आता मुक्तिधाजवळ सोमाणी गार्डन येथे अधिकृत वाहनतळ दरपत्रकाचा फलक लावण्याची तसदी घेतली आहे. त्यामुळे यापुढे मुक्तिधाम येथे येणाऱ्या भाविकांची पार्किंगच्या नावाखाली होणारी लूट थांबणार असली, तरी गेल्या अनेक महिन्यांपासून महापालिकेच्या नावाने बेकायदेशीररीत्या अव्वाच्या सव्वा पार्किंग कर वसूल करून महापालिकेला लाखो रुपयांचे चंदन लावणारा बोगस ठेकेदार मात्र महापालिका प्रशासनाच्या हाती लागलेला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुक्तिधाम येथे महापालिकेचा अधिकृत पार्किंग कर वसुलीचा ठेका कुणालाही दिलेला नसताना येथे बोगस ठेका सुरू असल्याचा प्रकार 'मटा'ने उघडकीस आणला होता. या ठिकाणी वाहने पार्क करणाऱ्या वाहनचालकांकडून प्रतितासाचे १५० ते २०० रुपये वसूल केले जात होते. विशेष म्हणजे करवसुलीची महापालिकेच्या नावने वाहनचालकांना पावतीही दिली जात होती. वास्तविक पाहता महापालिकेच्या बाजार कर वसुली विभागाकडून येथे पार्क केलेल्या वाहनांसाठी केवळ १० ते १५ रुपये प्रतितास याप्रमाणे दर निश्चित केल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आली होती. असे असतानाही येथे पार्किंगसाठी बोगस ठेकेदाराकडून अव्वाच्या सव्वा पार्किंग कर विनापरवानगी वसूल केला जात होता. ही बाब उघड झाल्यावर महापालिका प्रशासनाने उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञात ठेकेदाराविरोधात गुन्हाही दाखल केला होता. त्यानंतर आता महापालिका प्रशासनाकडून या ठिकाणी वाहन प्रकारानुसार पार्किंगचा अधिकृत दरपत्रकाचा फलक लावण्यात आला आहे. परिणामी भाविकांची अव्वाच्या सव्वा पार्किंग कराच्या विळख्यातून सुटका होणार असली, तरी येथे बोगस पार्किंगचा ठेका चालविणाऱ्याचा शोध अजूनही न लागल्याने नागरिकांतून सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेला लाखो रुपयांचा चुना लावणारा बोगस ठेकेदार शोधण्यात राजकीय हस्तक्षेपाचा अडथळा आला असल्याचीही चर्चा महापालिका वर्तुळात रंगल्याने हा बोगस ठेकेदार अजूनही मोकाटच असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडळे हजार, परवानग्या अवघ्या ३४२

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक उत्सवांमध्ये नागरिकांना त्रास होऊ नये, तसेच रस्त्यावर अडथळा येऊ नये यासाठी हायकोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेने तयार केलेल्या नियमावलीचा धसका शहरातील गणेश मंडळांनी घेतला आहे. शहरात जवळपास एक हजाराच्या वर लहान-मोठी सार्वजनिक गणेश मंडळे असताना महापालिकेने आतापर्यंत केवळ ३४२ गणेश मंडळांनाच परवानगी दिली आहे. मंडप रस्त्यात उभारल्याप्रकरणी दोन मंडळांना नोटीसही बजावली आहे.

हायकोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेने यासंदर्भात महासभेत ठराव करीत रस्त्यावरील अडथळे आणि ध्वनिप्रदूषणासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार करीत कडक नियमावली तयार केली आहे. गणोशोत्सव, रमझान, बकरी ईद, नाताळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसह सर्वधर्मीय उत्सवांना ही नियमावली लागू करण्यात आली आहे. मंडप हा रस्त्याच्या एकूण रुंदीपेक्षा २५ टक्केच असला पाहिजे, अशी अट या नियमावलीत आहे. मंडप उभारण्यापूर्वी अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखलाही आवश्यक आहे. रस्त्यावर खोदकाम करण्यास सक्त मनाई असून, एक फूट खड्डा खोदल्यास त्यासाठी ५० हजार रुपये दंडाची तरतूद आहे. परंतु, या नियमाचीही पायमल्ली होऊन थेट रस्त्यावरच खड्डे खोदून मंडपाचे बांबू गाडण्यात आले आहेत. ध्वनिप्रदूषणासह ३६ जाचक अटी टाकण्यात आल्या आहेत.

महापालिकेने या अटींचे पालन करण्याचे निर्देश मंडळांना दिले आहेत. परंतु, मंडळांकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. परवानगीची कटकट ठेवण्याऐवजी अनेकांनी थेट परवानगी न घेताच मंडप उभारल्याचे चित्र आहे. शहरात जवळपास एक हजाराच्या वर लहान-माेठी मंडळे आहेत. परंतु, केवळ ३४२ मंडळांनीच मंडप उभारण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यात नाशिक पूर्व ४३, नाशिक पश्चिम ४७, सिडको ६०, पंचवटी ८०, सातपूर ८२ व नाशिकरोड येथे ३० मंडळांनी गणेश स्थापनेसाठी परवानगी घेतली आहे. परवानगीची संख्या एकदम रोडावली असून, मंडप धोरणाचा धसका घेतल्याचे चित्र आहे. सोबतच दोन मंडळांनी गणेश मंडप थेट रस्त्यातच टाकल्याने नाशिक पूर्व विभागाने नोटीस बजावली आहे. मंगळवारपासून ज्या गणेश मंडळांनी अटी व शर्तींचे पालन केले नसेल, त्यांच्यावर कारवाई सुरू केली जाणार आहे.

--

स्टॉलधारकांचा ठेंगा

महापालिकेच्या ईदगाह मैदानावर गणेश मूर्तींचे स्टॉल्स लावणाऱ्या स्टॉलधारकांनी महापालिकेला ठेंगा दाखवला आहे. स्टॉल्स उभारण्यासाठी महापालिकेकडे दररोज ५५० रुपये भरणे अपेक्षित होते. परंतु, स्टॉल्सची मुदत संपली, तरी या १६० स्टॉल्सधारकांनी अद्याप महापालिकेकडे छदामही जमा केलेला नाही. त्यामुळे महापालिकेने या १६० स्टॉल्सधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. विशेषतः बड्या राजकीय नेत्यांच्या नावावरच हे स्टॉल्स घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता महापालिकेच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दीडशे मंडळांनीच घेतले विजेचे अधिकृत कनेक्शन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सव काळात वीजचोरी होऊ नये म्हणून महावितरण कंपनीने घरगुती दरापेक्षा स्वस्त दरात वीजपुरवठा करण्याचे जाहीर केले. त्यानंतरही सर्वच गणेश मंडळांनी अधिकृत कनेक्शन घेतले नसल्याचे समोर आले आहे. सोमवारपर्यंत दोन्ही विभागांत १५०च्या अासपास कनेक्शन गणेश मंडळांनी घेतली असून, त्यात आणखी वाढ होणार आहे.

सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजचोरी करू नये यासाठी महावितरण कंपनीने नवीन शक्कल लढवत दर कमी केले. पण, त्यासाठी अर्ज करणे, डिपाॅझिट भरणे ही झंझट कोण करणार, असे सांगत अनेक मंडळांनी वीज कनेक्शन घेण्याचे टाळले आहे. महावितरणने ३.७१ रुपये प्रतियुनिट दर ठेवले असल्यामुळे प्रत्येक मंडळाला १० दिवसांचे १ ते ५ हजार रुपयांपर्यंतच बिल येणार आहे. त्यामुळे अधिकृत कनेक्शन घेण्यावर मोठ्या मंडळांनी मात्र भर दिला आहे. शहरात ७०० ते ८०० च्या दरम्यान सार्वजनिक गणेश मंडळे असून, त्यात निम्मी मंडळे तरी कनेक्शन घेतात का, हे पुढे स्पष्ट होईल.

महावितरण कंपनीचे नाशिक शहरात दोन विभाग आहेत. त्यात भाग नंबर एकमध्ये सोमवारपर्यंत ७१ कनेक्शन देण्यात आले. यात नाशिकरोड, देवळाली, भगूर, आडगाव, उपनगर, द्वारका, इंदिरानगर, राणेनगर, कामटवाडे या भागाचा समावेश आहे. भाग एकमध्ये शनिवारपर्यंत ५० कनेक्शन देण्यात आली. त्यानंतही कनेक्शन देणे सुरू होते. या विभागात नाशिक शहर, पंचवटी, सातपूर, अंबडसह मोठा भाग आहे. महावितरण कंपनीने दर कमी करूनही शंभर टक्के वीजचोरी रोखणे शक्य होईल का, असा प्रश्न मात्र कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये भव्य मोर्चाची तयारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

कोपर्डी येथील घटना, तसेच अट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराविरोधात मराठा समाज बांधवांकडून नाशिकला मराठाक्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्या तयारीसाठी सोमवारी नांदूर येथे बैठक झाली. या बैठकीत मोर्चाची रूपरेषा ठरविण्यात आली. अन्य जिल्ह्यांपेक्षा भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.

आमदार सीमा हिरे, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार जयंत जाधव, आमदार अपूर्व हिरे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, नगरसेवक उद्धव निमसे, जयंत दिंडे, दत्ता गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते. कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ राज्यात यापूर्वी औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, जळगाव आदी जिल्ह्यांत मोर्चे काढण्यात आले आहेत. या सर्व मोर्चांपेक्षा हा मोर्चा भव्य करण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आला. आरोपींना फाशीची झाली पाहिजे, मराठा आरक्षण लागू झाले पाहिजे, अटॉसिटी कायद्यातील जाचक तरतुदी शिथिल करण्यात याव्यात या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिओ सिमचा शहरात तुटवडा!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, आडगाव

रिलायन्सने सोमवारपासून खुल्या केलेल्या जिओ ४ जी सेवेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याने पहिल्याच दिवशी सिम कार्डचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र शहरात दिसून आले. रिलायन्सच्या जिओ ४ जी सेवेंतर्गत आउटगोइंग कॉल्स, इनकमिंग कॉल्स, एसएमएस, रोमिंग, ४ जी इंटरनेट या सेवा तीन महिन्यांसाठी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारी पहिल्या दिवशी दुपारपर्यंतच शहरातील आउटलेटमधील सिम संपल्याने ग्राहकांची अन्यत्र शोधमोहीम सुरू होती.

ग्राहकांनी सकाळपासूनच कार्ड विक्री सेंटरवर मोठी गर्दी केली होती. पण, दुपारपर्यंत सर्वच आउटलेटमधील सिम संपल्याने ग्राहकांना निराश होऊन परतावे लागले. काही व्यावसायिकांनी चक्क ब्लॅकने या कार्डची विक्री सुरू केल्याने मोफत मिळणाऱ्या या कार्डच्या बुकिंगसाठी ग्राहकांना पैसेही मोजावे लागल्याचे दिसून आले.

रिलायन्सतर्फे हे सिम कार्ड मोफत मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना फक्त कागदपत्रे जमा करायची आहेत. मात्र, पहिल्याच दिवशी तब्बल ६०० रुपयांना कार्डची विक्री सुरू असल्याचे दिसून आले. रविवार कारंजा भागात बऱ्याच ठिकाणी अशाप्रकारची विक्री सुरू असल्याचे आढळून आले. दरम्यान, एलवायएफ मोबाईलमध्ये जिओच्या सेवा तत्काळ सुरू होतात म्हणून अनेक ग्राहकांनी या कंपनीचे मोबाईल खरेदी केले. मात्र, या हॅण्डसेटमध्ये त्रुटी असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या.

----

शहरातील अनेक आउटलेटमध्ये दुपारीच कार्ड संपल्याने दोन-चार दिवसांत ती मिळतील, अशी प्रकारची माहिती दिली जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी ६०० रुपयांत कार्डची विक्री सुरू आहे. कंपनी मोफतच्या नावाखाली ग्राहकांची लूट तर करत नाही ना, अशी शंका यामुळे येत आहे.

-पंकज सोनार, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये १७ शिक्षकांना मनपाचे पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्राथमिक शाळेतील व खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच त्यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. शिक्षण समितीचे सभापती संजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या निवड समितीने १७ शिक्षकांची निवड केली आहे.

शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांची पडताळणी करून शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. शिक्षकांची शैक्षणिक सेवा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता व बुद्धिमत्ता विकासासाठी त्यांनी केलेले शैक्षणिक कार्य, सुलभ अध्ययनासाठी केलेले प्रयत्न, शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी केलेल्या कार्य आदी निकषांच्या आधारावर ही निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी शिक्षक पुरस्कारासाठी बजेटच मंजूर न केले गेल्याने पुरस्कारांचे वितरण झाले नव्हते. त्यामुळे यंदा गेल्या वर्षी निवड झालेले २५ शिक्षक व या वर्षीच्या १७ शिक्षकांना एकत्रित गौरविण्यात येणार आहे. आठवडाभरात या पुरस्कारांचे वितरण होईल.

पुरस्कारार्थी शिक्षक

मंगला शिंदे, बाळासाहेब कडलग, मंगला शेलार, चांगदेव सोमासे, पुंडलिक सोनवणे, गुलाम अन्सारी, मंगला मोरे, संगीता मदने, वैशाली लचके, सुशिला पवार, भारती नांदूरकर, संतोष गंगावणे, सचिन जोशी, बापूराव पवार, मीनाक्षी गायधनी, मोहन माळी, आशा क्षीरसागर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणातला बदलता ट्रेंड स्वीकारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'आजमितीला पारंपरिक शिक्षणात मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. यापुढील शिक्षणाची वाटचाल ही तंत्रज्ञानाधिष्ठित असणार आहे. हा बदल लक्षात घेऊन तो सकारात्मकपणे स्वीकारण्याची गरज आहे. स्पर्धेत टिकायचे असेल तर अधिकाधिक व्यासंगी बनण्याची आणि तंत्रज्ञानाशी मैत्री करण्याची गरज आहे', असे मत प्रोफेशनल टीचर्स अकादमीतर्फे झालेल्या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. कॉलेज रोडवरील थत्तेनगर परिसरातील गुरुकृपा क्लासेस हॉलमध्ये शिक्षकदिनाच्या निमित्ताने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रात पुणे येथील प्राध्यापक व शिक्षण विषयाचे अभ्यासक प्रा. चंद्रशेखर बेहरे यांच्यासमवेत नाशिकमधील प्रा. सुरेश साळुंके, प्रा. शिवाजीराव कांडेकर, प्रा. यशवंत बोरसे, प्रा. जगदीश बोरसे यांनी सहभाग घेतला.

'कोचिंग क्लासेसचे क्षेत्र : काल, आज आणि उद्या' असा विषय चर्चासत्रासाठी ठेवण्यात आला होता. या वेळी खासगी क्लासेसशी निगडित विविध मुद्द्यांचा ऊहापोह करण्यात आला. क्लासेससमोरील आव्हानेही या चर्चासत्रातून अधोरेखित करण्यात आली.

क्लासेस चालकांनी डिजिटल विश्वावर भर द्यायला हवा, अशी अपेक्षा प्रा. बेहरे यांनी व्यक्त केली. क्लासेसच्या क्षेत्रात वाढत जाणाऱ्या स्पर्धेला उत्कृष्ट दर्जाने उत्तर द्यावे, अशी अपेक्षा प्रा. कांडेकर यांनी व्यक्त केली. पारंपरिक शिक्षणाचा ट्रेंड आता पूर्णत: बदलला असून, काळानुरूप क्लासेस चालकांनी या पद्धतीत बदल करून घ्यायला हवेत, असाही सूर या चर्चासत्रातून उमटला.

क्लासेसनेही शाळा काढाव्यात

शिक्षण क्षेत्र आता खासगीकरणाकडे चालले आहे. याबद्दल भीती न बाळगता खासगीकरणाच्या स्पर्धेत खासगी क्लासेसनेही सहभागी व्हायला हवे. चार ते पाच मोठे क्लासेस एकत्र येऊन खासगी शाळाही उत्कृष्टपणे चालवू शकतात, अशी संकल्पनाही प्रा. बेहरे यांनी या वेळी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images