Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

परदेशी टोळीला न्यायालयीन कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटी परिसरातील परदेशी टोळीला आर्थिक मदत केल्याप्रकरणी मोक्काअन्वये अटकेत असलेल्या अजय बागूलसह चौघांना जिल्हा कोर्टार्न न्यायालयीन कोठडी सुनावली. पाच दिवसांच्या पोलिस कोठडीदरम्यान बागूल याने परदेशी टोळीला कशाप्रकारे आर्थिक मदत केली यासंदर्भातील जबाव नोंदविण्यात आले. फरार असताना कुंदन परदेशी ज्या ठिकाणी थांबला, कुंदन परदेशी व त्याचे साथीदार राहिले त्या ठिकाणांची शहानिशा करण्यात आली.

जून महिन्यात पंचवटीतील क्रांतिनगरमध्ये भेळविक्रेत्या सुनील वाघ यांचा परदेशी व त्याच्या साथीदारानी खून केला होता. त्यानंतर काही आठवड्यांतच एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरासमोर गोळीबार करून त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तेव्हापासून परदेशी व त्याचे साथीदार फरार होते. पोलिसांनी महिनाभरानंतर या टोळीला अटक केल्यानंतर पोलिस आयुक्तालयाने मोक्काअन्वये कारवाई केली.

याच दरम्यान भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल यांचा पुतण्या अजय बागूल यालाही परदेशी टोळीला आर्थिक मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. बागूलसह परदेशी, पवन कातकडे, रोहित उघडे यांची पोलिस कोठडी घेण्यात आली. बागूल याने खुनाच्या घटनेनंतर परदेशी टोळीला फरार होण्यासाठी वाहनांची व्यवस्था करून दिल्याचा, तसेच परगावी राहण्यासाठी आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फिर्यादीच निघाला चोर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

लामरोड येथील पारसी धर्माचे पवित्र अग्निमंदिर (अग्यारी) येथे नुकत्याच झालेल्या दानपेटीतील रकमेच्या चोरी प्रकरणी प्रथम फिर्याद देणारा खुद्द दस्तूरजी होमियार सिधवा (पुजारी) यानेच चोरी केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

देवळालीतील पारशी अग्यारी येथे २० ऑगस्ट रोजी पहाटे तीन ते चार वाजेदरम्यान दोन दानपेट्यातील पैशांची चोरी झाली होती. याबाबत प्रथम फिर्याद होमियार सिधवा यानेच देवळाली पोलिसांकडे नोंदवली होती. त्यावेळी पोलिसांना धर्माचा अडथळा निर्माण झाल्याने अग्यारीत प्रवेश नाकारला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी पारशी अग्यारी परिसराची पाहणी केली. त्यानुसार पुढील तपासाचे चक्रे कशी फिरवावी याबाबत मार्गदर्शन केले. सिधवा यास तपासादरम्यान देवळाली सोडून जाता येणार नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार दि. ६ रोजी सकाळच्या सुमारास मंदिराचा पुजारी होमियार सिधवा हा एक बॅग घेऊन बाहेर जात असल्याचे गस्तीवरील पोलिस उपनिरीक्षक विजय राठोड, हवालदार महेंद्र सांबरेकर, सुनील शेवाळे यांच्या नजरेस पडला. त्याची चौकशी केली असता बॅगेतून १ लाख ८२ हजार रुपये रोख रक्कम आढळून आली. मुद्देमालासह त्यास अटक करण्यात आली. मंदिरातील दानपेटीतील रक्कम आपणच चोरली असल्याचे कबुलीही त्याने पोलिसांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी गोळा करून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालकांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. फरार संचालकांचा, तसेच कंपनीच्या आर्थिक व्यवहारांचा तपासही पोलिसांकडून सुरू आहे.

हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट कंपनीशी संबंधित संचालकांनी गुंतवणूकदारांकडून ५० हजार ते एक कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवी गोळा केल्या. गुंतवणुकीवर वार्षिक २४ टक्के व्याजाचे आमिष दाखवित सुमारे ३०० कोटींपेक्षा अधिक रक्कम गोळा केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. गुंतवणूकदारांना पैसे देण्यास संचालकांकडून टाळाटाळ होऊ लागली. काही गुंतवणूकदारांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन २० ऑगस्ट रोजी कंपनीच्या संचालकांविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली. पोलिसांनी कंपनीचे भगवंत कोठुळे (रा.तपोवन), अनिल निवृत्ती कोठुळे (रा. नवीन नाशिक), महेश सुधाकर नेरकर (रा. नवीन नाशिक), रवींद्र पुंडलिक दळवी (रा. पंचवटी), दर्शन विजय शिरसाठ (रा. नाशिकरोड) या पाच संचालकांना अटक केलत्यांना मंगळवार (दि.१३) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाटकामुळे व्यक्तिमत्व खुलते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाटक ही सांघिक कला असून ती सर्वांच्या मदतीनेच आकाराला येते. नाटकात अभिनय केल्याने नाटक समृद्ध तर होतेच त्याच बरोबर त्यात काम करणाऱ्या नटाचे व्यक्तिमत्वदेखील खुलते, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्य कलावंत कमलताई अभ्यंकर यांनी केले. लोकहितवादी मंडळाच्या वतीने राज्य नाट्य स्पर्धेत सादर होणाऱ्या नाटकाच्या शुभारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या.

राका कॉलनी येथील लोकहितवादी मंडळाच्या ज्योतिकलश सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, मंडळाचे कार्यवाह मुकूंद कुलकर्णी, नवीन तांबट, निर्मल अष्टपुत्रे, सुभाष पाटील, लेखक भगवान हिरे, रेखा नाडगौडा यांच्यासह कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी राज्य नाट्य स्पर्धेत यंदाच्या महोत्सवात सादर करण्यात येणाऱ्या संस्कृत, हिंदी, मराठी नाटकांचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय निर्मल अष्टपुत्रे यांनी करून दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वालदेवीची स्वच्छता अखेर युद्धपातळीवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

दीड व दोन दिवसांच्या गणेशाचे विसर्जन झाले तरी देवळालीगावातीव वालदेवी नदीची स्वच्छता न केल्याबद्दल प्रभाग सभापती सूर्यकांत लवटे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर बुधवारी (दि. ७) वालदेवी स्वच्छतेची मोहिम तातडीने हाती घेण्यात आली.

गणेशोत्सव सुरू झाला असून दीड व दोन दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जनही वालदेवी नदीत झाले. मात्र, तेथे निर्माल्य व अऩ्य कचरा साचल्याने दुर्गंधी पसरली होती. याबाबत नागरिकांनी सभापती सूर्यकांत लवटे यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर त्यांनी पाहणी करत अधिकाऱ्यांना फोन केला. त्यांना तातडीने बोलावून नदीपात्र व घाटाची साफसफाई करायला लावली. यामध्ये विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, उपअभियंता गणेश मैंद यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. जेसीबी यंत्राने मोहिम दुपारपर्यंत सुरू होती. वालदेवी नदीत नागरिक कचरा टाकतात. यावेळी सुमारे एक टन कचरा व निर्माल्य घंटागाडीत घालून हटविण्यात आल्याची माहिती दराडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गतिरोधकाअभावी विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका

$
0
0

विद्यार्थ्यांचे आयुक्तांना निवेदनाद्वारे साकडे


रूचिका ढिकले, कॉलेज क्लब रिपोर्टर

गंगापूररोडवरील मविप्र संस्थेच्या विविध कॉलेजेस आहेत. यातील कृषी कॉलेजच्या ठिकाणी रस्त्यावर गतिरोधक नसल्याने विद्यार्थ्यांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे वारंवार लहान-मोठे अपघात नित्याचे झाले आहेत. म्हणूनच विद्यार्थ्यांनी याबाबत थेट महापालिका आयुक्तांना भेटून या समस्येचे निवेदन दिले होते. मात्र त्यावर अद्याप काहीही हालचाल करण्यात आलेली नाही.

मविप्र समाजाचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी कॉलेज, गंगापूर रोड या परिसरात गतिरोधक बसविण्याची मागणी होत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. मनपा आयुक्तांना समक्ष भेटून विद्यार्थ्यांनी विनंती अर्ज दिल्यानंतर लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. परंतु त्यानंतर या विनंती अर्जाला केराची टोपली दाखवली काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

या परिसरात तीन कॉलेज आहेत. त्यामुळे नेहमीच येथे विद्यार्थ्यांची वर्दळ असते. त्यातही आसारामबापू पुलावर जाण्याचा हा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे काही टवाळखोर मंडळी या रस्त्याने वेगाने गाड्या चालवतात. त्यामुळे छोटे-मोठे अपघात नेहमीच होतात. मागील काही महिन्यापूर्वी या रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग बसवण्यात आली. परंतु पहिल्याच पावसात त्याचा रंग गायब झाला आणि मनपाचा सोंगाड्या कारभार समोर आला. त्यामुळे याठिकाणी लवकर गतिरोधक बसावे, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौरपंपांचा १३० शेतकऱ्यांना मिळाला लाभ

$
0
0

दुर्गम भागातील शेतीला नवसंजीवनी

म. टा. खास प्रतिनिधी

महावितरण आणि महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या समन्वयाने सुरू करण्यात आलेल्या 'अटल सौर कृषिपंप योजने'अंतर्गत जिल्ह्यातील १३० शेतकऱ्यांना यावर्षी सौरपंप वितरीत करण्यात येणार आहेत. यातील नऊ पंप कार्यान्वित झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे.

राज्यातील अतिदुर्गम भागात शेती करीत असलेल्या शेतकऱ्यांना, तसेच राज्यातील विद्युतीकरण न झालेल्या गावात महावितरण आणि महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या समन्वयाने 'अटल सौर कृषिपंप योजना' सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना ३, ५ किंवा ७.६ अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषिपंप उपलब्ध करून देण्यात येत आहेत. लाभार्थी शेतकऱ्याचा वाटा ५ टक्के, तर उर्वरित खर्च केंद्र व राज्य शासनातर्फे अनुदान स्वरुपात देण्यात येत आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धडक सिंचन योजनेंतर्गत विहिरींचा लाभ घेण्यात आलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे.

लाभार्थी निवडण्यासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली

समिती नेमली आहे. महावितरणचे अधीक्षक अभियंता समितीचे सदस्य सचिव, तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणाचे वरिष्ठ वैज्ञानिक आणि महाऊर्जाचे अधिकारी या समितीचे सदस्य आहेत. नाशिक जिल्ह्यात यावर्षी १३०, जळगाव १७० आणि नंदुरबार जिल्ह्यात ६० शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्तावाची छाननी सुरू करण्यात आली आहे. योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये नाशिकमध्ये ९, जळगावमध्ये २२ आणि नंदुरबारमध्ये ७ सौरपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित पंप वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शाश्वत शेतीच्यादृष्टीने दुर्गम भागातील आणि वीजपुरवठा उपलब्ध नसलेल्या भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.

वीज नसल्याने सुरुवातीला शेतीला पाणी भरता येत नव्हते. वर्तमानपत्रातून सरकारी योजनेची माहिती मिळाली. शासनाच्या सौरकृषी योजनेचा लाभ घेऊन शेताला पाणी देणे शक्य झाले आहे. सरकारी योजनेचा खूप फायदा झाला. शासनाची ही योजना अत्यंत उपुयक्त आहे.

- चंद्रभागाबाई विठ्ठल कुऱ्हाडे, कुंदेवाडी मजरे, ता. सिन्नर

सौर पंप बसविण्यापूर्वी पुरेशा विजेअभावी शेतीला पाणी पोहचत नव्हते. सौर कृषिपंप लावल्यापासून शेताला मुबलक प्रमाणात पाणी मिळत आहे. भविष्यात द्राक्षबाग या सौरपंपाच्या मदतीने करणार आहे.

- शंकेश साहेबराव गाडे, सिन्नर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कष्ट करण्याची इच्छा असल्यास यश नक्की

$
0
0

महिला व्हॅनचालक मीनाक्षी शिंदेंची इच्छाशक्ती

दिलीप अहिरे, अमृतधाम

आपल्याजवळ जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची इच्छा असेल तर आपण आपल्या जीवनात नक्कीच यशस्वी होऊ शकतो. आपले ध्येय साध्य होतेच पण उत्तम जीवन जगण्याचा आपणास मार्ग मिळतो, अशी दुर्दम्य इच्छा महिला व्हॅनचालक मीनाक्षी शिंदे यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केली.

आपल्या घरची प्रतिकूल परिस्थिती, जीवघेणी स्पर्धा, महागडे शिक्षण, कुटुंबाच्या समस्या या सर्व सोडविण्यासाठी पती राजेंद्र यांची होणारी ससेहोलपट पाहून आपण व्हॅन चालविण्याचा निर्णय घेतला. आपल्या पतीला हातभार लावण्यासाठी, आर्थिक मदत करण्याकरिता आपण काहीतरी केले पाहिजे, असे मनात आले.

त्यामुळेच मी चारचाकी वाहन चालविण्याचा निर्धार केला.

माझे पती रिक्षातून शाळकरी मुला-मुलींना शाळेत सोडण्याचे आणि परत घरी आणण्याचे काम करीत असतात. त्याच कामाला मदत व्हावी, हातभार लागावा म्हणून गेली दोन वर्ष झाली मीदेखील व्हॅनमधून मुला-मुलींना ने-आण करण्याचे काम जिद्दीने करीत आहे.

यामुळे घरची प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करता आली आहे. मुलांच्या शिक्षणाला हातभार लागला, आर्थिक मदत झाली. अशा अनेक अडचणी सहज सुटत आहेत. यामुळे माझ्या कुटुंबाला माझा अभिमान वाटत आहे.

पालकांचाही विश्वास

पालक आधी माझ्या व्हॅनमधून मुले पाठविताना घाबरत होते. एक महिलाचालक काय काम करणार, वाहन नीट चालविणार काय याबद्दल साशंक होते. मी सर्वांना विश्वास दिला त्यानंतर आता माझा मुलगा-मुलगी आपल्याच व्हॅनमधून न्या, असा पालकच आग्रह धरतात. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला याचाच मला अभिमान आहे.

प्रतिकूल परिस्थितीचा विचार करत बसण्यापेक्षा आपण खांद्याला खांदा लावून काम करू शकतो. यामुळेच सर्व अडचणींवर मात करून अशा परिस्थितीत परिवारासह आपण उत्तम जीवन जगू शकतो हे मला शिकायला मिळाले. सर्व महिला भगिनींनीही आपले ध्येय निश्चित करावे.

-मीनाक्षी शिंदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकसाठी आजपासून लष्कर भरती प्रक्रिया

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळालीच्या ४ नं. नाका येथील सैन्यभरती मैदानावर दि. ६ ते २५ सप्टेंबर दरम्यान भरती प्रक्रिया राबविण्यात येत असलेल्या भरतीसाठी गुरुवारपासून तीन दिवस नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांसाठी तालुकानिहाय प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी ज्या युवकांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून अ‍ॅडमिट कार्ड मिळवलेल्या उमेदवारांना प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता येणार आहे.

याचबरोबर आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी व मुख्यालय पुणे येथून मंजूर बाह्य उमेदवारांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. बाहेरील जिल्ह्यातील उमेदवारांसाठी दि. १८ ते २५ दरम्यान वैद्यकीय परीक्षा व उर्वरित भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांसाठी

गुरुवार दि. ८ - नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, पेठ, सिन्नर व त्र्यंबकेश्वर

शुक्रवार दि. ९ - कळवण, देवळा, सुरगाणा, बागलाण, सटाणा, मालेगाव

शनिवार दि. १० - नांदगाव, निफाड, येवला

यानंतर रविवार (दि.११) पासून सर्व मेडिकल तपासण्या होतील.

बाहेरील जिल्ह्यांसाठी

सोमवार दि. १२ ठाणे, कल्याण, मुरबाड

मंगळवार दि. १३ भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ

बुधवार दि. १४ पालघर, वसई, डहाणू तलासरी

गुरुवार दि. १५ जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड

शुक्रवार दि. १६ अलिबाग, पेन, पनवेल, मुरबाड, उरण, कर्जत, खालापूर, माणगाव

शनिवार दि. १७ ताला, रोहा, सुधागड, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांचे आरोग्य रामभरोसे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात डेंग्यूचा प्रकोप अद्याप कायम आहे. ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबरमध्येही डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात शहरात तब्बल ८० डेंग्यू संशयित रुग्ण आढळले. यातील ३० रुग्णांचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून त्यापैकी २२ जणांना डेंग्यूची लागण असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात होत असलेल्या धूर फवारणीच्या कामांवरच आता शंका उपस्थित केली जात असून नाशिककरांचे आरोग्य रामभरोसे असल्याचे चित्र आहे.

आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या अनास्थेमुळे शहरातील डेंग्यूची तीव्रता कमी होत नसल्याचे चित्र आहे. जून व जुलैपेक्षा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ऑगस्टमध्ये झपाट्याने वाढली होती. आता सप्टेंबरमध्येही तोच कित्ता कायम आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहरात ८० डेंग्यू संशयित रुग्ण आढळून आले. त्यापैकी ३० जणांचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला असून त्यात २२ रुग्ण हे पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे शहरातील डेंग्यूचा डंख कायम असल्याचे चित्र आहे. ऑगस्टमध्ये आरोग्य विभागाकडे शहरात ४०४ डेंग्यू संशयित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी १८७ जणांना डेंग्यूची झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जुलैमध्ये शहरात सुमारे १४१ रुग्ण आढळून आले. तर चार महिन्यांत शहरात डेंग्यूच्या चार संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दुजोरा आरोग्य विभागाने दिला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात डेंग्यूचे संशयित १०९२ रुग्ण आढळून आले. त्यापैकी ४८४ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शहरातील डेंग्यूवर ताबा मिळविण्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाला अपयश आल्याचे चित्र आहे.

धूर फवारणी होते की नाही?
महापालिकेने शहरात धूरफवारणी व औषध फवारणीचे काम नव्या ठेकेदाराला आठ ऑगस्टपासून काम दिले आहे. आता धूर फवारणीला महिना पूर्ण झाला आहे. परंतु, धूर फवारणीचे प्रत्यक्ष परिणाम अद्यापही दिसत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ठेकेदाराकडून धूर फवारणी होती की नाही याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आरोग्य विभागाचा कारभारासोबतच आता नाशिककरांचे आरोग्य सुद्धा रामभरोसे झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मातेनेच फेकले चिमुकलीला विहिरीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

दोन अज्ञातांनी पाणी मागण्याच्या बहाण्याने आपल्या चिमुकलीला उचलून नेत विहिरीत फेकून हत्या केल्याचा बनाव रचणाऱ्या मातेला पोलिसांनी अटक केली आहे. काळजाला पीळ पाडणारी ही घटना दहेगाव येथे घडली. रागाच्या भरात आपल्या हातून हे कृत्य झाल्याची कबुली मातेने दिली आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

दोन दिवसांपूर्वी दहेगाव येथे भीक मागायला आलेल्या अज्ञात आरोपीने साडेपाच महिन्यांच्या स्वरा या चिमुरडीची विहिरीत फेकून हत्या करून पळ काढला अशा आशयाची फिर्याद वणी पोलिसांत मृत स्वराचे वडील ज्ञानेश्वर तुकाराम मेधने यांनी सोमवारी दिली होती. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

या घटनेसंदर्भात पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवीली असता सदर मुलीची हत्या तिची आई वंदना मेधने हिनेच केली असल्याचे निष्पन्न झाले. तिची दोन मुले घरकाम करीत असताना तिला त्रास द्यायचे यातून तिने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. सदर घटना घडण्याच्या दिवशी स्वरा रडायला लागल्याने त्रस्त झालेल्या वंदनाच्या रागाचा कडेलोट झाला आणि रागाच्या भरात तिने मुलीला विहिरीत फेकले, अशी कबुली वंदनाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रेनेजचे सांडपाणी गोदावरीत

$
0
0

सातपूर परिसरात दुर्गंधीने रहिवाशी हैराण; महापालिकेने लक्ष घालण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेने टाकलेल्या शिवाजीनगर भागातील मुख्य सांडपाण्याचे ड्रेनेज फुटल्याने सांडपाणी नैसर्गिक नाल्याद्वारे थेट गोदावरीत मिसळत आहे. गेल्या महिनाभरापासून ह‌िच परिस्थिती असून, दुर्गंधीयुक्त सांडपाण्याने रहिवाशी हैराण झाले आहेत. त्यातच नाल्याच्या समोरील बाजूस असलेल्या हॉटेल चालकांनादेखील दुर्गंधीयुक्त सांडपाण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेने फुटलेल्या मुख्य सांडपाण्याच्या ड्रेनेजची दुरूस्ती करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

चार महिन्यांपूर्वीच महापालिकेने शिवाजीनगरला लागून असलेल्या ध्रुवनगर भागातील कॅनॉलरो़डच्या बाजूला फुटलेल्या मुख्य सांडपाण्याच्या ड्रेनेजची दुरूस्ती केली होती. परंतु पुन्हा त्याचठिकाणी ड्रेनेजला मोठ्या प्रमाणावर गळती लागल्याने नैसर्गिक नाल्यातून सांडपाणी गोदावरी नदीत मिसळत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

यात पहाटे सहा वाजेपासून मोठ्या प्रमाणावर सांडपाणी नाल्यातून वाहत असल्याने दिवसभर दुर्गंधीचा त्रास परिसरातील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. एकीकडे गोदावरीत पावसाच्या पाण्याने सुखद धक्का दिला असताना आता दुर्गंधीच्या पाण्यामुळे नदीला दूषित होत असल्याने याकडे लक्ष कोण घालणार, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. त्यातच नाल्याच्या बाजूला असलेल्या बारदान फाटा रस्त्यावर हॉटेल चालकांनाही या सांडपाण्याच्या दु्र्गंधीला त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराबाबत महापालिकेने लक्ष घालून ड्रेनेजची दुरूस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

दूषित पाणी रस्त्यावर

सातपूर औद्योगिक वसाहतीत महिंद्रा हरियालीच्या समोर एका कारखान्याचे दूषित पाणी रस्त्यावरून गेल्या पंधरा दिवसांपासून वाहत आहे. या दुषित पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र याकडे सर्वांनीच काणाडोळा केला आहे. अनेक कर्मचारी या रस्त्यावरून जाताना त्यांना सांडपाणी दिसत नाही का, असा सवाल वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.

काही महिन्यापूर्वीच महापालिकेने ड्रेनेजची दुरूस्ती केली होती. मात्र त्याचठिकाणी ड्रेनेज पुन्हा फुटल्याने सांडपाणी नाल्याद्वारे नदीत जात आहे. यामुळे परिसरात राहणाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने याकडे लक्ष घालण्याची गरज आहे.

महेश शिंदे, स्थानिक रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांना नाशिकची ‘वतनदारी’

$
0
0

एक तपापासून महसूल अधिकाऱ्यांचे जिल्ह्यातच बस्तान

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : @bidvepravinMT

नाशिक : लोकशाहीत सरकारे बदलतात. आमदार, खासदारही बदलतात. राजकीय पक्षांमध्येही कधीतरी परिवर्तनाची लाट येतेच. परंतु नाशिक‌चा महसूल विभागातील 'विशिष्ट' अधिकारी मात्र वर्षानुवर्ष येथेच ठिय्या मांडून असल्याचे समोर आले आहे. यासाठी या बहाद्दरांनी सरकारी ‌नियमावलीही खुंटीला टांगत अपेक्षित नियुक्त्या पदरात पाडून घेतल्या आहेत. विशेष म्हणजे आघाडीचे सरकार बदलून युतीचे सरकार आले तरीही 'त्यांचा' नाशिक मुक्काम कायम आहे. महेश पाटील, सरिता नरके, रामदास खेडकर, रमेश मिसाळ, प्रज्ञा ‌मिसाळ अशी ही भली मोठी वतनदारांची नावे असून, तप उलटूनही अनेकांचा जिल्ह्यातच मुक्काम आहे. या अधिकाऱ्यांना नाशिकचा मोह सुटत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जिल्ह्यातील महसूल यंत्रणा राजकीय लोकप्रतिनिधींपेक्षा महसूल विभागातील अधिकारीच चालवितात की, काय अशी शंकेची पाल आता चूकचूकू लागली आहे. महसूल आयुक्तांपासून सचिव आणि मंत्र्यांपर्यंत सर्वांवरच गारूड घालणाऱ्या काही अधिकाऱ्यांची नाशिकमध्येच मक्तेदारी निर्माण झाली आहे. कामावर, कलेवर खुश होऊन बादशहाने राजदरबारातील एखाद्याला वतनदारी बहाल करावी, तसा नाशिक जिल्हा मोजक्या अधिकाऱ्यांना आंदण देण्यात आल्याची चर्चा महसूल वर्तुळात कायम रंगत आली आहे. लोहचुंबकासारखे वर्षानुवर्ष जिल्ह्यातील विविध खुर्च्यांनाच चिकटून बसणारे अधिकारी एका पदावरून दुसऱ्या पदावर नियुक्ती मिळवित सेवेचा कार्यकाळ पूर्ण करीत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. विशेष म्हणजे आघाडीचे सरकार जाऊन आता युतीचे सरकार सत्तेवर आले तरीही काही अधिकाऱ्यांचा महसूल विभागावरील वरचष्मा कायम राहीला आहे.

अनेकांना नाशिक बहाल!

निफाडचे प्रांताधिकारी म्हणून अल‌िकडेच रूजू झालेले महेश पाटील ३ डिसेबर २००० ते आजतागायत म्हणजे तब्बल १६ वर्ष नाशिक जिल्ह्यातच तळ ठोकून आहेत. केवळ मार्च २००९ ते ऑगस्ट २०११ असे अडीच वर्ष ते अहमदनगरमध्ये नियुक्तीवर होते. पुरवठा अधिकारी पदावरील सरिता नरके २००३ ते २०१६ अशा तपाहूनही अधिक काळ नाशिकमध्ये कार्यरत आहेत. जिल्ह्यात १३ मे २००३ रोजी त्यांनी देवळा तहसीलदार म्हणून कामकाजाला सुरूवात केली. तेव्हापासून आजतागायत त्यांना एकदाही जिल्ह्याबाहेर बदली झालेली नाही. रामदास खेडकर यांनीही उपजिल्हाधिकारी, निफाड प्रांताधिकारी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी पदासारखी मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. वर्षानुवर्ष नाशिक मुक्कामीच राहणाऱ्या अधिकाऱ्यांना टप्प्याटप्प्याने महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांचीच बक्षिस ‌मिळत आले आहे. त्यामुळे असे अधिकारी महसूल विभागात 'वजनदार' ठरू लागले आहेत. नाशिकबाहेर बदली झाली तरी काही काळ तेथे घालवून पुन्हा नाशिकमध्येच नियुक्ती मिळविण्याची कलाही अधिकाऱ्यांनी अवगत केली आहे. यात बाळासाहेब वाकचौरे, वासंती माळी, अजय मोरे, मधुमती सरदेसाई, रमेश मिसाळ, प्रज्ञा बढे-मिसाळ, विठ्ठल सोनवणे, उदय किसवे आदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

कुटुंबाचे स्थैर्य, पाल्यांचे शिक्षण, उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा आणि मुंबईशी कनेक्ट‌िव्हीटी यामुळे अधिकाऱ्यांना महसूल विभागीय कार्यालयाच्या ठिकाणीच बदली हवी असते. नाशिकमध्येच नाही तर पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कोकण (मुंबई) या सहा विभागांतही अशीच परिस्थिती आहे. नाशिक विभागात जसे धुळे, नंदुरबार सारख्या जिल्ह्यांत जाणे अधिकाऱ्यांना शिक्षा वाटते तशीच अन्य विभागांमधील परिस्थिती असल्याचे समोर येत आहे.(क्रमशः)

अधिकाऱ्याचे नाव नाशकातील सरासरी कार्यकाळ

सरिता नरके- १३ वर्षे ३ महिने, महेश पाटील- १३ वर्षे ४ महिने, रामदास खेडकर- किमान १० वर्षे, रमेश मिसाळ- किमान १० वर्षे, प्रज्ञा मिसाळ- किमान १० वर्षे, मधुमती सरदेसाई- ९ वर्षे ६ महिने, उदय किसवे- ९ वर्षे २ महिने, बाळासाहेब वाकचौरे- ६ वर्षे ७ महिने, विठ्ठल सोनवणे- ६ वर्षे ३ महिने, वासंती माळी- ४ वर्षे १० महिने, अजय मोरे- ४ वर्षे ७ महिने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे शहराला डेंगूचा विळखा

$
0
0

मनपाच्या स्थायी सभेत विविध विषयांवर चर्चा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील नागरिकांचे आरोग्य संकटात आले आहेत. डेंग्यूने थैमान घातल्याने आता त्यावर नियंत्रण मिळविण्याची गरज आहे, याबाबत गुरुवारी (दि. ८) झालेल्या स्थायी सभेत चर्चा करण्यात आली. यावेळी महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा व सफाई कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार न मिळणे, साफसफाई मनमानी पद्धतीने करणे यासह अनेक मुद्दे गाजले.

धुळे मनपात केवळ अंतर्गत कलहामुळे प्रशासनाने व संबंधित विभागांनी मनमानी कारभार चालविला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर मनपा सभागृहात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आरोग्यधिकारी अपर्णा पाटील यांचा निलंबनाचा प्रस्ताव स्थायी सदस्यांकडून सभापती सोनल शिंदे यांच्यासमोर ठेवला. यावेळी स्थायी समितीमधील सर्व सदस्य आणि मनपातील सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते.

शहरात आरोग्य विभागातील कर्मचारी हे साफसफाईचे काम नेमून दिल्याप्रमाणे करीत नाहीत. तर मनमानी पद्धतीने काम करतात. यामुळे शहरातील विविध भागांमध्ये घाणीचे सम्राज्य निर्माण होते, असे यावेही सदस्यांनी सांगितले.


७२ डेंग्यू संशयित रुग्ण

आतापर्यंत मनपा आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ७२ डेंग्यू संशयित रुग्ण आढळले असून सहा रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे वेळीच मनपाने डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळविले नाही तर शहरात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकरता येत नाही, असेही सभेत सांगण्यात आले.


मोबदला न घेता सेवा देणार

डेंग्यूने शहरभर कहर केल्यामुळे शहरातील मलेरिया व डेंग्यूची परिस्थिती पाहता दि.९ व १० सप्टेंबर रोजी कुठलाही मोबदला न घेता सेवा पुरविण्याचे आश्वासन मलेरिया कर्मचाऱ्यांनी दिले आहे. तर सफाई कर्मचाऱ्यांना ठेकेदार वेळेवर पगार देत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिले नाही तर कामबंद करणार असल्याचा, इशारा मनपा आयुक्तांना सफाई कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पदाधिकाऱ्यांनो जम‌िनीवर या’

$
0
0

म . टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीत जुने नवे असा वाद न करता, भाजपची सत्ता आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न करा. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने महापालिकेतही भाजपचीच सत्ता येईल अशा भ्रमात राहू नका, असा सज्जड इशारा देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना जमीनीवर येण्याचा सल्ला दिला आहे. जनतेच्या समस्या जाणून घ्या. पक्षात नव्याने येणाऱ्यांना समावून घ्या, विश्वासात घेऊन कामे करा, अशा कानपिचक्या मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिल्या. आगामी महापौर भाजपचाच राहील यासाठी प्रयत्न करा असे सांगत युतीचा निर्णय स्थानिक पातळीवरच घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला व्यस्त वेळ काढत महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. स्वामी नारायण मंदिर ट्रस्टच्या हॉलमध्ये झालेल्या शंभर निवडक पदाधिकाऱ्यांनाच हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला होता. त्यात पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी, सुनील बागूल वसंत गीते यांचा समावेश होता. महापालिका निवडणूक भाजप स्वतंत्रपणे लढणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी शहरातील सहा विभागांत सध्याची पक्षाची स्थिती, पक्षाचे सुरू असलेले कार्य, कोणत्या भागात कोणत्या गोष्टींची कमतरता भासते आहे, याचा आढावा घेऊन कोणत्या विभागात किती नगरसेवक निवडून येऊ शकतील, याचाही अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.

महापौर भाजपचाच होईल यासाठी प्रयत्न करा असा सल्ला देत, पूर्वीसारखी स्थिती राहिली नसल्याची जाणीवही त्यांनी करून दिली.जमीनीवर राहूनच निवडणूका जिंकाव्या लागतील असे सांगत, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व वसंत गीते यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या जातील असे त्यांनी स्पष्ट केले. जुने नवे असा वाद करू नका, मन मोठे करा, नवीन लोक पक्षात येतीलच असे सांगून निवडणुकीत विजय मिळवा असा आदेश त्यांनी दिला.


युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर

आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरील नेत्यांनीच घ्यावा असे मुख्यमंत्री म्हणाले. नाशिकमध्ये भाजपची स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू असली तरी, युती करायची असेल तर ते स्थानिक पातळीवरच ठरवा असे सांगून मुख्यमंत्र्यांनी युतीचे सर्व निर्णय स्थानिक पातळीवर सोपवले आहेत.

छावणीत बैठक

भाजप पक्षाचे ओळखपत्र असलेल्यांनाच प्रवेश दिला जात असल्याने बाकीच्यांना प्रवेशद्वारावरच अडविण्यात आले. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाही या बैठकीस परवानगी नाकारण्यात आली. विशेष म्हणजे आत कोणीच शिरू नये यासाठी बैठकीला छावणीचे स्वरुप देण्यात आले होते. भाजपचे निवडक पदाधिकारी वगळता कोणालाच प्रवेश नव्हता. त्यामुळे भाजपच्या काही कार्यकर्त्यांनीही नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी विविध संस्थांच्या आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. परंतु ती निवेदने पोलिसांनाच द्यावी लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिनकर आढाव यांचा भाजपमध्ये प्रवेश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेलरोड येथील माजी नगरसेवक, नाशिक साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिनकर आढाव तसेच अभिजित बगदे यांनी गुरुवारी नाशिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नाशिकरोडला भाजपची ताकद वाढणार असून पक्षीय समीकरणे बदलणार आहेत.

जेलरोडला राहणारे दिनकर आढाव हे प्रगतीशील शेतकरी आहेत. नाशिक साखर कारखान्याचे ते २००३पर्यंत अध्यक्ष होते. तसेच कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी पाच वर्ष काम पाहिले. नाशिक महापालिकेत ते अनेक वर्षे नगरसेवसक होते. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ वर्षे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. दसक ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्दीची सुरवात केली. दसक विविध कार्यकारी संस्थेत त्यांची ३० वर्षे सत्ता आहे. जेलरोडच्या नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत मंदा ढिकले, सुनंदा मोरे हे भाजपचे दोन नगरसेवक निवडून आले. संभाजी मोरुस्कर, सविता दलवानी हे देखील नगरसेवक आहेत. विद्यमान अपक्ष नगरसेवक पवन पवार, कन्हैया साळवे, संगीता गायकवाड, कोमल मेहरोलिया यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिकरोडला भाजपची ताकद वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियुक्तीबाबतच्या आदेशाला केराची टोपली?

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

नाशिकः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात घेण्याच्या नावाखाली महसूलमधील काही वरिष्ठांनी राज्य निवडणूक आयोगाच्या पत्राचा चुकीचा अर्थ काढला आहे. म्हणूनच होम डिस्ट्रिक्टबाहेरच नियुक्तीचे जुलमी धोरण आणले जात असल्याच्या निष्कर्षापर्यंत महसूलमधील अधिकारी पोहोचले आहेत. याच पत्राला राज्य सरकारच्या गृह, ग्राम विकास आणि नगर विकास विभागांनी केराची टोपली दाखविल्याचा धक्कादायक दावा होत असून विधी व न्याय विभागाकडे अभिप्रायासाठी गेलेल्या या धोरणाला हायकोर्टात आव्हान देण्याची तयारीही सुरू झाली आहे.

'महसूलवर वक्रदृष्टी'या वृत्त मालिकेद्वारे महाराष्ट्र टाइम्सने महसूल विभागातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आणला आहे. एकीकडे वर्षानुवर्ष अधिकाऱ्यांवर मेहेरबान राहणारे सरकार आता होम डिस्ट्र‌िक्टमधून अधिकाऱ्यांना कायमस्वरुपी हद्दपार करण्याच्या तयारीला लागले आहे. 'होम डिस्ट्रिक्टला अधिकारी होणार पारखे'या शीर्षकाखाली 'मटा'ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील अधिकारी खडबडून जागे झाले. व्हॉट्स अॅपसारख्या सोशल माध्यमातून सरकारच्या या येऊ घातलेल्या धोरणाचा निषेध सुरू झाला. मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांच्या अट्टाहासापायीच राज्य सरकार नायब तहसीलदार ते अपर जिल्हाधिकाऱ्यांना होम डिस्ट्र‌िक्टमधून हद्दपार करण्याच्या मागे लागल्याचा दावा महसूलमधील अधिकारी करू लागले आहेत. काही अधिकारी वरिष्ठांची दिशाभूल करुन राज्यभर चुकीच्या बदल्या करण्यास सरकारला भाग पाडत असल्याच्या पोस्ट सोशल मीड‌ियावर फिरू लागल्या आहेत.

२०१२ च्या निवडणुकांवेळी महसूल अधिकाऱ्यांना केवळ त्यांच्या तालुक्यात नियुक्ती देऊ नये, असे धोरण ठरविले होते. बदली करावी लागलीच तर निवडणूक काळापूरतीच करावी, असे या धोरणात स्पष्ट केले होते. होम डिस्ट्र‌िक्टमध्ये कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यामुळे निवडणूक प्रक्र‌ियेला बाधा पोहचल्याचा एकही प्रकार आतापर्यंत घडला नसल्याचा दावा महसूलमधील सूत्रांनी केला आहे. मात्र आता सरसकट सर्वच पदे निवडणुकीला बाधा पोहोचवित असल्याचा जावईशोध लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ज्यांना एका पदावर तीन वर्ष झाली अन जे होम डिस्ट्र‌िक्टमधील आहेत अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना त्यातही दुजाभाव झाला आहे. होम डिस्ट्र‌िक्टमधील अधिकाऱ्यांना जिल्ह्याबाहेर दूर, तर तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्यांना जिल्ह्यातच सोयीच्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. तीन वर्षांहून अधिक काळ एकाच जिल्ह्यात घालविणाऱ्या अधिकाऱ्यांचीही राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांशी जवळीक निर्माण होते. त्यांच्यामुळे निवडणुका बाधित होत नाहीत का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

होम डिस्ट्र‌िक्टमधून केवळ महसूलच्या अधिकाऱ्यांना हद्दपार करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये (मॅट) कित्येक अधिकाऱ्यांनी आव्हान दिले आहे. अशा बदल्यांना स्थगिती देण्याची नामुष्की सरकारवर ओढावली आहे. त्यावर उतारा म्हणून असे विचित्र धोरण आणण्याची तयारी सरकारने सुरू केली असली, तरी हे धोरण सरकारच्या अंगलट येईल असा दावा महसूल वर्तुळातील अधिकारी करीत आहेत. हे धोरण हायकोर्टात टिकणार नाही, असा विश्वासही व्यक्त होऊ लागला आहे.

तर प्रशासकीय गतिमानता निर्माण होईल

मंत्रालयामधील महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी चुकीची धोरणे आणण्यापेक्षा आपला बहुमूल्य वेळ अधिकाऱ्यांचे तसेच त्यांच्या वाहनांचे प्रश्न, सेवा ज्येष्ठता याद्या कायदेश‌िररित्या तयार करुन त्या अद्ययावत करण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा सोशल मीड‌ियावर संघटीत महसूल अधिकारी व्यक्त करीत आहेत. पदोन्नती, रिक्त पदे भरणे यांसह अन्य महत्त्वपूर्ण बाबींकडे लक्ष दिल्यास प्रशासकीय गतिमानता निर्माण होण्यास मदत होईल असा सल्ला देत या विषयात मुख्यमंत्री, महसूल मंत्री, प्रधान सचिवांनी लक्ष घालावे अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिसाद असेल तर विमानसेवा शक्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक शहरवासीयांकडून चांगल्या व्यावसायिक प्रतिसादाची हमी मिळाल्यास नाशिकमधून विमानसेवा शक्य असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी गुरुवारी सांगितले. नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (निमा) सभागृहात झालेल्या बैठकीत खासदार गोडसे बोलत होते.

या वेळी औद्योगिक विकास व विमानसेवा या विषयावर अनेकांनी आपले मतेही मांडली. 'निमा'चे अध्यक्ष हरिशंकर बँनर्जी यांनी विमानसेवेच्या महत्त्वावर सांगितले. विमानसेवेबाबत शासनदरबारी खोळंबलेल्या प्रक्रियेची माहिती खासदार गोडसे यांनी जाणून घेतली. यात मोठ्या उद्योगांतील कारखान्यात येणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींना रस्त्यानेच प्रवास करावा लागत असल्याने अनेकदा ते न येणेच पसंत करतात. यासाठी विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी मोठ्या उद्योगांतील प्रतिनिधींनी केली.

खासदार गोडसे यांनी मोठ्या उद्योगांची मागणी पाहता नक्कीच विमानसेवा सुरू करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मात्र, यासाठी चांगल्या व्यावसायिक प्रतिसादाची हमी निमा, आयमा या औद्योगिक संघटनांनी घेण्याची गरज असल्याचे खासदार गोडसे यांनी आवाहन केले. या वेळी 'निमा'चे मानद सरचिटणीस खरोटे, उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, तसेच टपारिया टूल्स, जीएसके फार्मा, किर्लोस्कर ऑइल, सीएट लि., थायसन ग्रुप, एबीबी इंडिया, लिग्रँड, महिंद्रा अँण्ड महिंद्रा, ग्लॅक्सो (जीएसके), सुदान आदी कंपन्यांतील प्रतिनिधी बैठकीत उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चिल्ड्रन ट्रॅफिक’ला मदतीची घोषणा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा सिडको

नाशिक शहरातील तिडके कॉलनी परिसरात उभारण्यात आलेल्या चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कला लॉर्डच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या वाहतूक व्यवस्थापनाच्या वाचनालयास आर्थिक मदत करण्याची घोषणा केली.

शहरातील मुलांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी, त्याचबरोबर वाहतुकीचे नियम कसे पाळावे, याची माहिती मिळण्यासाठी चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कची उभारणी करण्यात आलेली आहे.

शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत असते. आतापर्यंत सुमारे २६९ बॅचमधून सुमारे १२,१४८ विद्यार्थ्यांनी या पार्कचा आनंद लुटला आहे. या पार्कलगतच वाहतुकीचे व्यवस्थापन व नियमावलीबाबतचे वाचनालय उभारण्यात येत असून, त्याला आर्थिक मदत करण्याचा निर्णय गुरुवारी भेट दिलेल्या शिष्टमंडळाने केला. लॉर्ड इंडिया मुंबईचे रिजनल संचालक विलास ढवळे, लॉर्ड आशिया हाँगकाँगचे अध्यक्ष रेबेक्का विल्यम्स, लॉर्ड कॉर्पोरेशनचे यूएसएचे संचालक गेरी होफमॅन, फायनान्स मॅनेजर लिसा वट, फायनान्स संचालक ऑरोन व्हेस्ट्रिक यांनी या चिल्ड्रन पार्कला भेट दिली. अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी स्वागत केले. या वेळी विनिता धारकर, देवेंद्र बापट, मिलिंद जांबोटकर, प्रमोद लाड, जितेंद्र शिर्के, सुरेश पटेल, नरेंद्र साबू, मधुकर बापट, संजय देशमुख, सुनील कोतवाल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामान्यांना लुटणारे झारखंड, दिल्लीत!

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com
Tweet: @ArvindJadhavMT

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत सातत्याने सर्वसामान्यांची लूट करणारे आरोपी दिल्ली, तसेच झारखंडमध्ये दडले आहेत. या सायबर गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांची दोन पथके रवाना झाली असून, संशयितांना अटक झाल्यास किमान पाच ते सहा गुन्हे उघडकीस येऊ शकतात.

सायबर क्राइमची व्याप्ती हळूहळू वाढते आहे. यंदा शहरातील विविध पोलिस स्टेशनमध्ये १५ पेक्षा जास्त सायबर गुन्हे दाखल झाले असून, त्यातील सात ते आठ गुन्हे सप्टेंबरमधील आहेत. चालू महिन्यात विविध पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या घटना गेल्या दोन ते तीन महिन्यांत घडल्या आहेत. या घटनांचा बारकाईने तपास करीत सायबर सेलने राजधानी दिल्ली आणि झारखंडमध्ये राज्यातील दुर्गम भागात लपून सर्वसामान्यांना गंडा घालणाऱ्यांचा शोध लावला. अर्थात, हा शोध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून असून, प्रत्यक्ष आरोपींना अटक करण्यासाठी सायबर सेलची दोन पथके दिल्ली, तसेच झारखंड राज्याकडे रवाना झाली आहेत. याबाबत सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले, की सायबर गुन्ह्यांच्या मुळापर्यंत जाऊन तपास करण्याचे मोठे आव्हान असते. अनेकदा गुन्हेगार खोट्या कागदपत्रांच्या आधारे बँक खाते सुरू करतात. हे खाते मुंबईतील एखाद्या बँकेत सुरू केले असले तरी खात्यातील पैसे मात्र उत्तर भारतातील दुर्गम परिसरातील बँक शाखा किंवा एटीएममधून काढले जातात. सुदैवाने शहर पोलिसांची सायबर लॅब सक्षम झाली असून, सायबर क्षेत्रातील तज्ज्ञांना पोलिसांनी सायबर क्लबच्या माध्यमातून सोबत घेतले आहे. शहरातीलच हे खासगी काम करणारे तज्ज्ञ विविध गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना मदत करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून झारखंड आणि दिल्लीतील काही संशयितांचा माग काढण्यात यश मिळाले आहे. प्रत्यक्ष गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images