Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गणेशोत्सवामुळे फुलांचा बाजार तेजीत

$
0
0

पवन बोरस्ते, कॉलेज क्लब रिपोर्टर

नाशिक : गणेशोत्सवासाठी आवश्यक सगळ्याच साहित्याचे दर वाढले आहेत. सध्या मागणी वाढल्याने फुलांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. गणपतीला प्रिय असलेल्या जास्वंदीसाठी २५० ते ३०० रुपये मोजावे लागत आहेत.

लिली, मोगरा, गुलाब, शेवंती, ग्लॅडोज या फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मलेशियातून मुंबईत येणाऱ्या आर्किडलाही २० नगांमागे ३०० ते ४०० रुपये मोजावे लागत आहेत. दुर्वांनाही मागणी असून, जुडी आता दोन ते पाच रुपयांना मिळत आहे. झेंडूची जाळी ११० ते १६० रुपयांना मिळत आहे. दमदार पावसामुळे लागवड वाढल्याने झेंडूची आवक वाढली आहे. यामुळे झेंडूच्या दरात किरकोळ वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

हार व पुष्पगुच्छांना मागणी

गणराय व गौराईंना विविध प्रकारचे हार घातले जातात. जास्वंदीच्या कंठी माळेसाठी सध्या ८० ते १०० रुपये, तर सफारी हारसाठी ३०० ते ४०० रुपये मोजावे लागत आहेत. द‌हा रुपयांना मिळणारी झेंडूची साधी माळही २० रुपयांना मिळत आहे. त्याचबरोबर पुष्पगुच्छही सध्या तेजीत आहे. साधा पुष्पगुच्छ आता ७० ते ८०, तर मोठा पुष्पगुच्छ १२० ते १५० रुपयांना मिळत आहे.

गणेशोत्सवामुळे आम्हाला फुलांची खरेदी फार महागात पडते. मजुरीमुळे फुलांचे भाव आणखी वाढतात. सध्या जास्वंदी, झेंडू, दुर्वा, हार यांना मोठी मागणी आहे. गणेशोत्सवापर्यंत तरी फुलांचे दर चढेच राहतील.

- भूषण गायकवाड, फुलविक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालमत्तेचे ७१ टक्के गुन्हे अंधारात!

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com
Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : शहरात जानेवारी ते जुलैदरम्यान झालेल्या जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी, चोऱ्या तसेच दरोड्यासारख्या मालमत्तेशी संबंधित तब्बल ७१ टक्के गुन्ह्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. यातील केवळ २९ टक्के गुन्ह्यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे या सर्व गुन्ह्यांमध्ये घरफोड्यांचा शोध लावण्याचे प्रमाण केवळ २५ टक्के आहे.

शहरी भागात मालमत्तेशी संबंधित सर्वाधिक गुन्हे दाखल होतात. यात दरोडा, चेन स्नॅचिंग, घरफोडी, चोऱ्या, तसेच जबरी चोऱ्यांचा समावेश आहे. जानेवारी ते जुलैदरम्यान शहरात वरील प्रकारचे एकूण ५४७ गुन्हे झाले आहेत. यात दरोड्याचे नऊ, जबरी चोरीचे ४७, चेन स्नॅचिंगचे ६३, दिवसा घरफोडीचे २८, रात्री घरफोडीचे १३३ आणि इतर चोऱ्यांचे ३२१ अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. उपरोक्त कालावधीत पोलिसांनी तपास करीत १५८ गुन्ह्यांचा शोध लावला. गुन्ह्यांत सहभागी असलेल्या तब्बल ३२६ संशयित आरोपींना जेरबंद केले. मात्र, अद्याप ३८९ म्हणजे ७१ टक्के गुन्ह्यांचा तपास अधांतरी आहे. गुन्हा तपासाची टक्केवारी केवळ २९ टक्क्यांच्या आसपास आहे. चेन स्नॅचिंगचे प्रमाण गुन्ह्यांच्या तुलनेत कमी असले तरी एकूण ६३ गुन्ह्यांपैकी तब्बल ४७ गुन्ह्यांचा कोणाताही थांगपत्ता पोलिसांना लागलेला नाही. अन्य २६७ चोरीच्या घटनांपैकी ७७ गुन्ह्यांत चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे.

चेन स्नॅचर्स मोकाटच!

शहर पोलिसांनी जानेवारी ते जुलै २०१६ या कालावधीत तब्बल ३२६ संशयित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र, यात सर्वांत कमी चेन स्नॅचर्स आहेत. चोरीच्या गुन्ह्यांत १८२, घरफोडीच्या गुन्ह्यांत ५२, जबरी चोरीचे ३९, तर दरोडा व दरोड्याची तयारीत असलेल्या ३६ संशयितांना पकडण्यात आले. मात्र, चेन स्नॅचर्सच्या गुन्ह्यांत केवळ १८ जणांना पकडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशदर्शनात हरवले रस्ते!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील चौकाचौकांत नाशिककरांच्या गर्दीने रस्ते फुलले होते. विविध मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यात दंग झालेल्या नाशिककरांची पाऊलेही आज कमालीची संथ झाली होती. आकर्षक देखाव्यांकडे जाणारे बहुतांश रस्ते गर्दीत जणू हरवले होते! रविवारची सुटी आणि गणेशदर्शनाचा सातवा दिवस, यामुळे शहरासह जिल्हाभरातील नागरिकांनीही सहकुटुंब हजेरी लावली होती. सुटीचे औचित्य साधत रविवारी नाशिकनगरीत गर्दीने उच्चांक गाठला.

कुठे आरतीचे मंगलसूर, तर कुठे जल्लोषपूर्ण भक्तिगीते यामुळे वातावरणात चैतन्य संचारले असून, गणेशभक्तांच्या उत्साहाला भरते येऊ लागले आहे. नाशिककरांचा पाहुणचार घेण्यासाठी आलेल्या लाडक्या बाप्पाचा सात दिवसांचा मुक्काम पुर्ण झाला आहे. बाप्पाच्या लोभसवाण्या मूर्तींची प्रतिष्ठापना ठिकठिकाणी करण्यात आली आहे. अनेक मंडळांनी बाप्पाच्या स्वागताबरोबरच गणेशभक्तांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्यासाठी देखावे साकारले आहेत. या देखाव्यांचा आनंद लुटण्यासाठी अबावृद्धांची पाऊले सध्या नाशिक शहरातील नावाजलेल्या मंडळांकडे वळू लागली आहेत. कोठे नयनरम्य लायटिंग, कुठे भारतातील जाज्वल्य इतिहासाची प्रचीती देणारी आरास, तर कुठे भक्तिसंप्रदायाचे गोडवे गाणारे देखावे पाहून गणेशभक्तांच्या नेत्रांचे पारणे फेडले. उत्सव अवघा चार दिवस सुरू राहणार असल्याने देखावे पाहण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. केवळ शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील भाविकही देखावे पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. रविवारची सुटी जणू देखावे पाहण्यासाठीच राखीव ठेवल्याचे ही गर्दी सांगत होती. सीबीएस, शालिमार, अशोकस्तंभ, रविवार कांरजा, पंचवटीतील मुख्य रस्ते भाविकांच्या गर्दीने ओसंडले होते.

शहराच्या मुख्य भागात अशी परिस्थिती असताना सिडकोतील त्रिमूर्ती चौक, सावतानगर, रायगड चौक, पवननगर, उत्तमनगर, विजयनगर, राणाप्रताप चौक, शिवाजी चौक, गणेश चौक या परिसरातही यंदा मोठ्या प्रमाणावर देखावे साकारण्यात आले आहेत. ते पाहण्यासाठी सिडकोवासीयांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे सायंकाळी रस्ते गर्दीने फुलून जात आहेत.

रामवाडीजवळ भरली जत्रा

रामवाडी पुलाजवळ पाळणे, साहसी खेळ आणि अन्य स्टॉल्स लागल्याने या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रहाट पाळण्यांचा आनंद लुटण्यासाठी येथे अबालवृद्धांची गर्दी होते आहे. कालिदास कलामंदिरासमोरील रस्त्याला खाऊ गल्लीचे स्वरूप आले आहे. येथील स्टॉल्सवरील खाद्यपदार्थांवर ताव मारण्यासाठी नाशिककरांची गर्दी होते आहे. अशीच परिस्थिती नेहरू गार्डन, पंचवटी कारंजा परिसरातही पाहावयास मिळते आहे. खेळणी विक्रेत्यांची दुकानेही बच्चे मंडळींना खुणावत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडी दडपण्यासाठी वृध्दाचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरफोडी करीत असताना राखणदाराने पाहिले म्हणून त्याचा तिघांनी मिळून खून केल्याची घटना दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी येथे घडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी तपास करीत संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

सुदाम पांडुरंग स‌ितान (६५) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. शिवाजी बोडके यांच्या शेतात राखणदार म्हणून काम पाहणाऱ्या स‌ितान यांचा १५ ते १६ ऑगस्ट दरम्यान खून करून संशयितांनी मृतदेह शेतातीलच विह‌िरीत फेकून दिला होता. संशयित आरोपींनी स्टोअररूममधील पिस्टन पंप व हातपंप चोरी केले होते. याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्ह्याचे समांतर तपास करीत असताना पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत मोहिते व उपविभागीय पोलिस अधिकारी देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर नवले यांनी घटनास्थळ व मयत स‌ितान यांच्याबाबत सविस्तर माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी परिसरातील तुंगलदरा येथील सचिन राजाराम बगर, (२१), निलेश नवसू बगर, (२८) व उत्तम विश्वनाथ चोथे, (२९) यांना ताब्यात घेतले. खुनाच्या प्रकाराबाबत माहिती देताना संशयितांनी सांगितले की, मयत सुदाम पांडुरंग स‌ितान यांनी सदर आरोपींना शेतातील पिकावर फवारणी करावयाचे पंप चोरी करताना पाहिले होते. आज ना उद्या आपले बिंग फुटेल या भितीने त्यांनी स‌ितान यांना जीवे ठार मारून, मृतदेह विहिरीत फेकून दिला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सदर गुन्ह्यात कोणत्याही तांत्रिक पुराव्याची मदत न घेता गुन्हा उघडकीस आणल्याचे पीआय नवले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलाठी परीक्षेला ४३४१ अर्जदारांची पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील महसूल विभागातील उपविभागीय कार्यालयांमधील तलाठीपदाच्या ४१, तर वाहनचालक पदाच्या एका जागेसाठी रविवारी परीक्षा घेण्यात आली. सुमारे १९ हजार ८९२ परीक्षार्थी या परीक्षेला सामोरे गेले, तर ४ हजार ५६९ अर्जदारांनी परीक्षेला दांडी मारली.

जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्या आस्थापनेवरील तलाठीपदासाठी, तसेच वाहनचालक पदासाठी रविवारी ६१ केंद्रांवर ९८२ वर्गखोल्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली. तलाठीपदासाठी पेसा आणि पेसा क्षेत्राबाहेरील अशा वर्गवारीत अर्ज मागविण्यात आले होते. वाहनचालक पदासाठी सरळसेवा पध्दतीने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. ४१ पैकी ११ पदे ही पेसासाठी, तर ३० पदे पेसा क्षेत्राबाहेरील उमेदवारांकरिता आहेत. तलाठीपदासाठी पेसा क्षेत्राबाहेरील २० हजार ३०३ अर्ज, तर पेसा क्षेत्रातून ३ हजार २२१ अर्ज प्राप्त झाले होते. वाहनचालकाच्या एका जागेसाठी ९०८ अर्ज प्राप्त झाले होते. रविवारी शहरातील प्रमुख ६१ केंद्रांवर दोन टप्यात ही परीक्षा घेण्यात आली. सकाळी ११ ते १ या वेळेत तलाठीपदासाठी परीक्षा झाली. दोनशे गुणांसाठी बहुपर्यायी पध्दतीने ही परीक्षा घेण्यात आली. सुमारे २३ हजार ५५३ अर्जदारांपैकी १९ हजार २१२ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. तर चार हजार ३४१ अर्जदारांनी परीक्षेकडे पाठ फिरवली. म्हणजेच सुमारे ८२ टक्के परीक्षार्थींनी परीक्षा दिली.

पोलिसपाटील पदाची भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरल्यामुळे जिल्हा प्रशासनाने यंदा अधिक पारदर्शकपणे परीक्षा प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न केला. ९८० समवेक्षक, २७५ पर्यवेक्षक, १३० लिपिक, २५० शिपाई यांसह १९०० अधिकारी, कर्मचारी तसेच ७० वाहनांची परीक्षेसाठी मदत घेण्यात आली.

एका जागेसाठी ६८० उमेदवार

दुपारी तीन ते चार या वेळेत वाहनचालकाच्या एका पदासाठी परीक्षा घेण्यात आली. या जागेसाठी ९०८ अर्ज आले होते. त्यापैकी ६८० अर्जदार परीक्षेला सामोरे गेले. २२८ अर्जदार परीक्षेला गैरहजर होते. म्हणजेच वाहनचालक पदासाठीच्या परीक्षेला ७५ टक्के उमेदवारी लाभली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाकीचे जवान गोरडे श्रीनगरमध्ये शहीद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

भारतीय सैन्यात राष्ट्रीय रायफल युनिटमध्ये कार्यरत असणारे वाकी (ता. चांदवड) येथील जवान शहाजी गोरडे (वय ३४) कर्तव्य बजावत असताना श्रीनगरमध्ये शनिवारी रात्री शहीद झाले.

तब्बल दहा ते बारा हजार फूट उंचीवर संचारबंदी काळात सेवा करीत असताना शहाजी यांना वीरमरण आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या मागे आईवडील, पत्नी, मुलगी, मुलगा, चार बहिणी, दोन भाऊ असा परिवार आहे. शहाजी यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. शहाजी यांचे पार्थिव श्रीनगरहून विमानाने मुंबई व तेथून देवळाली कॅम्पमार्गे वाकी येथे सोमवारी आणण्यात येणार आहे. त्यांच्यावर सोमवारी दुपारी बारादरम्यान शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती वाकीचे सरपंच विक्रम जगताप व शहाजी यांचे स्नेही दीपक जाधव यांनी दिली. शहाजी यांचे वडील व भाऊ शेती करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ नकोशा असलेल्या चिमुरडीचा लागला लळा!

$
0
0

तपासाधिकारीला हवी तिची साथ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लहान मुलं ही देवाघरची फुलं, असे म्हणतात. नाती आणि जगण्यातील व्यवहारापासून अनभिज्ञ असलेल्या मुलांमधील निरागसपणा निगरगठ्ठ मनालाही सहज भावतो. त्यातून निर्माण होणारे प्रेम रक्ताच्या नात्यांपुढे कधी-कधी फिके वाटते. सध्या, अशीच काहीशी परिस्थिती 'त्या' चिमुरडीबाबत झाली आहे. मरणासाठी सोडून देणाऱ्या मुलीच्या माता-पित्यांचा शोध घेणाऱ्या महिला पोलिस उपनिरीक्षकांचे मन मुलींच्या आक्रोशाने द्रवले. आता, त्यांना तिची साथ हवी आहे. मुल दत्तक घेण्यातील कायद्याचा अडथळा दूर व्हावा, असे त्यांना मनापासून वाटते.

हातून झालेल्या चुका दडपण्यासाठी माता-पिता कधी कधी माणुसकीचाही गळा दाबतात. शुक्रवारी सकाळी अशीच घटना द्वारका-मुंबई नाका रोडवर घडली. रस्त्यावरील एका मोकळ्या जागेत झुडपात एक बाळ जीवाच्या आकांताने रडताना काही पादचाऱ्यांनी पाहिले. अवघ्या १२ ते १५ दिवसांच्या मुलीस सोडून निर्दयी माता-पिता फरार झाले होते. मुंबई नाका पोलिसांनी लागलीच गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. या गुन्ह्याचा तपास मुंबई नाका पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस उपनिरीक्षक प्रणिता पवार यांच्याकडे सोपविण्यात आला. सदर बाळाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यामुळे शुक्रवारपासून शनिवारपर्यंतचा बराच वेळ त्यांचा त्या मुलीसोबत गेला. दुसरीकडे तपासही सुरू होता. याबाबत बोलताना पवार यांनी सांगितले की, त्या निर्दयी आई-वडिलांना शोधण्याचे काम सुरू आहे. आज ना उद्या ते सापडतील. मात्र, या बाळाने काय चूक केली, असा प्रश्न सतावत आहे. त्याला आता महिला व बाल कल्याण मंडळाच्या 'वात्सल्य'मध्ये दाखल करण्यात आले आहे. अतिशय गोंडस बाळ आहे. त्याला दत्तक घेता यावे म्हणून प्रयत्न केले असल्याचे पवार यांनी सांगितले. मात्र, पीएसआय पवारांच्या या मागणीला कायद्याचा अडसर आहे. दत्तक घेणारे पालक मुल ठरवू शकत नाही. त्यांनी फक्त मागणी करावी लागते. त्यावर निर्णय महिला व बाल कल्याण विभाग यथावकाश घेईल. खाकी अंगावर आली की, त्या व्यक्तीतील माणुसकीची जागा कायदा घेतो, असे म्हणतात. मात्र, पीएसआय पवारांनी हा समज कालबाह्य ठरवला हे निश्चित!

या सगळ्यात तिचा दोष काहीच नाही. सुरुवातीला तिच्यासाठी काही कपडे व इतर वस्तू आणल्या. मात्र, नंतर तिचा लळाच लागला. कायद्यानुसार तिला दत्तक घेता येईल का?, असा प्रयत्न करते आहे. काळजी वाटते एवढेच!

- प्रणिता पवार, पोलिस उपनिरीक्षक, मुंबई नाका पोलिस स्टेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धानोऱ्यात जातीय सलोख्याचा आदर्श

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,धुळे

धानोरा गाव हे महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानात यशस्वी आहे. गावात सर्वांमध्ये एकी आहे आणि त्यामुळेच मुस्लिम समाजाच्या युवकाला गणेश मंडळाचा अध्यक्ष बनवले गेले आहे.

नंदुरबार तालुक्यातील धानोरा गावात जातीय सलोखा निर्माण व्हावा यासाठी हिंदू-मुस्लिम समाजबांधवांनी एकत्र येत इंद्रधनुष्य युवा फाऊंडेशनच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे. या मंडळाचा अध्यक्ष म्हणून आसिफ खाटीक याची निवड करण्यात आली आहे. कोणताही जातीभेद न ठेवता मोठ्या उत्साहात गणेत्सव साजरा केला जात असल्याचे खाटीक यांनी मटाशी बोलताना सांगितले.

इंद्रधनुष्य युवा फाउंडेशनच्यावतीने गावातील गणेश मंडळांचे पदाधिकारी व सदस्य यांचा सत्कार नुकताच करण्यात आला. देखाव्यांच्या माध्यमातून बेटी बचाव, बेटी पढाव, व्यसन मुक्ती, सामाजिक व धार्मिक सलोखा आदी विषयांवर जनजागृती करण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.


लोकसहभागातून कोणतेही कार्यक्रम असले, तर ते निश्चित यशस्वी होतात. मुस्लिम युवकाला गणेश मंडळाचा अध्यक्ष करणे हेच धानोरा गावातील महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानाचे यश आहे.

- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी, नंदुरबार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण पोहोचावे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

समाजातील मूल्ये, नीतिमत्ता, परंपरा टिकवून पुढे जाणे हे मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.

नागरिक शिक्षक गौरव समिती, नाशिक आयोजित शिक्षक गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. काकोडकर बोलत होते. पुरस्काराचे हे ४७ वे वर्ष होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला.

डॉ. काकोडकर पुढे म्हणाले की, समाजाची जडणघडण करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार होतो ही मोठी बाब आहे. ज्या संस्थात्मक प्रणालीत काम केले जाते तेथे हेरारकी सांभाळून नैपुण्याचा सत्कार केला जाणे म्हणजे कौतुक करणे होय. त्यामुळे शिक्षकांना प्रोत्साहन मिळणार आहे. कामात उत्कृष्टता साधायची असल्यास कौतूक करणे महत्त्वाचे असते असेही डॉ. काकोडकर म्हणाले. ते पुढे म्हणाले की, पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्यात दरी वाढत चालली आहे. ती लवकरच सांधली जाणे गरजेचे आहे.

यावेळी व्यासपीठावर सर्व पुरस्कारमूर्ती शिक्षक व प्राध्यापक, सावानाचे कार्यवाह मिलिंद जहागिरदार, उपाध्यक्ष नरेश महाजन, प्रा. विनया केळकर तसेच नागरिक शिक्षक गौरव समितीचे प्राचार्य रा. शां. गोऱ्हे यांची उपस्थिती होती.

प्रमुख पाहुणे डॉ. अनिल काकोडकर व सुयशा काकोडकर यांचा सन्मान नरेश महाजन व विनया केळकर यांनी केला. सूत्रसंचालन सुरेश गायधनी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय अॅड. अभय सदावर्ते यांनी करून दिला. पुरस्कारमूर्तींचा परिचय सुजाता नागपुरे यांनी करून दिला.

...या पुरस्कारमूर्तींचा होता समावेश

नमिता जानोरकर, संग‌िता गजभिये, शोभा गायकवाड, वर्षा मोराणे, अरूण महाजन, सुषमा कुलकर्णी, रामदास कुशारे, मंजुश्री खाडीलकर, कामिनी पवार, सुभाष दसककर, जाहीद शेख, डी.एफ. निकुंभ, संजय खैरनार, अनिता गोगटे, एकनाथ कुलकर्णी, नीला देशपांडे, हिरा मोरे, उषा कन्सारा, डॉ. तुकाराम दळवी, शोभा बिल्हाडे, व्ही.व्ही. सूर्यवंशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यावसायिक मालमत्ता महिनाभरात शोधणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शहरातील इमारतींची नोंदणी निवास क्षेत्रासाठी असताना त्याचा प्रत्यक्षात वापर मात्र व्यावसायिक कारणांसाठी होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा मालमत्ता महिनाभरात शोधून त्यांना व्यावसायिक पद्धतीने घरपट्टी आकारणी करण्याचे आदेश आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिले आहेत. तसेच महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास व अशा मालमत्तांचा गैरवापर आढळल्यास संबंधित विभागप्रमुखावर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
पालिकेच्या आर्थिक उत्पन्नवाढीसाठी आयुक्तांनी आता युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. महापालिकेने मालमत्ता शोध मोहिमेअंतर्गत राबविलेल्या सॅम्पल सर्वेक्षणात पाच टक्के मालमत्तांच्या वापरात बदल असल्याचे उघड झाले आहे. मालमत्तांची नोंदणी निवासीसाठी असताना, प्रत्यक्षात त्यांचा वापर व्यावसाय‌िक कारणांसाठी होत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे पालिकेने आता शहरातील सर्वच भागांतील इमारतींचे सर्वेक्षण करून वसूली करण्याची कारवाई सुरू केली आहे.
आयुक्त कृष्णा यांनी सोमवारी विविध कर संकलन विभागातील उपायुक्तांसह वसुली निरिक्षकांची बैठक घेतली. त्यात आयुक्तांनी महिनाभरात शहरातील सर्व मिळकतींचे सर्वेक्षण करून वापरात बदल असलेल्या मालमत्तांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. महिनाभरात या मालमत्ता शोधून त्यांना व्यावसायिक वापर असलेली घरपट्टी व पाणीपट्टीचे बिले देण्याचे आदेश दिले आहेत. सहा विभागांत तातडीने ही शोधमोह‌ीम राबविली जाणार असून, त्यातून किमान दहा टक्के नव्याने व्यावसायिक वापराच्या मालमत्ता सापडण्याची शक्यता आहे. उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यावेळी उपस्थित होते.

तर कारवाई करणार
या बैठकीत आयुक्तांनी उपायुक्तांसह निरीक्षकांची चांगलीच कानउघाडणी केली. वापरात बदल असलेल्या मालमत्ता महिनाभरात
शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. तसेच या आदेशाची अंमलबजावणी महिनाभरात झाली नाही, तर संबंधित खातेप्रमुख, निरिक्षक व विभागीय अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अवसान गळाले आहे. अगोदरच मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यातच आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजाणी करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गौराई’तून समाजप्रबोधन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येथील धडपड मंचच्या वतीने यंदाही या गौरीगणपतीच्या उत्सवानिमित्त शहरात गौरी सजावट स्पर्धा घेतली. स्पर्धेला घरोघरीच्या महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी 'गौराई माझी लाडाची लाडाची गं' असे म्हणत गणेशोत्सव काळात तीन दिवस माहेरवाशीण असलेल्या गौरींचे शहरातील असंख्य घराघरांत आगमन झाले होते. या स्पर्धेत विविध मनोहारी सजावटीचे दर्शन झाले.

शहरात गणरायाच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी घरोघरी वेगवेगळ्या गौरींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. उभ्या अन् बैठ्या स्वरूपातील गौराईची आकर्षक विविध रूपे यावेळी येवलेकरांची दाद मिळवून गेली. पितळी, तांबे, चांदी अन् पंचधातूचे पॉलिश केलेले गौरींचे आकर्षक मुखवटे यावेळी उजळून निघताना अधिकच खुलून दिसत होते. ठिकठिकाणच्या महिलांचा हळदी-कुंकवाचा समारंभदेखील अगदी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. गणेशोत्सवात विघ्नहर्त्या बाप्पा श्री गणरायासमोर सामाजिक प्रबोधन करणारे देखावे तसे लक्ष वेधून घेतात.

या स्पर्धेत एकूण ४५ महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचा बक्षिस समारंभ कार्यक्रम येथील बालाजी मंदिरात पार पडला. नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक व आभार प्रभाकर झळके यांनी मानले. यावेळी नगरसेविका पद्माताई शिंदे, नारायण शिंदे, प्रा. दत्तात्रय नागडेकर, प्रभाकर आहिरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरला ‘डीपी’ची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे जमीनधारकांचा 'डीपीने वाढविला बीपी' अशी अवस्था झाली आहे. शहराची हद्दवाढ झाली आणि आता नव्याने प्रारूप शहर विकास आराखड्याची प्रसिद्धी होणार आहे. याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी नगर परिषदेच्या गोपनीय विशेष सभेनंतर शहरात चर्चेचे पेव फुटले आहे. सन १९९३ मध्ये झालेल्या विकास आराखड्याने नेमके काय साध्य झाले ते तब्बल तेवीस वर्षांनंतरदेखील स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या आराखड्याने आता किमान त्र्यंबकच्या विकासाला हातभार लागावा, ही अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

या आराखड्यातील जवळपास ७० आरक्षणांपैकी अवघ्या दोन आरक्षणांची अंमलबाजवणी झाली आहे. तसेच यातील आरक्षित असलेल्या रस्त्यांवर अतिक्रमणे झाली. त्याबाबत नागरिक न्यायालयात गेले आणि तरीही त्यावर कार्यवाही झालेली नाही. विशेष म्हणजे याच दोन तपांच्या कालावधीत जमिनीला सोन्याचा भाव आला आणि खडी, बरद, दगड, डोंगर असलेल्या जमिनी सोन्याच्या खाणी ठरल्या. या आठवड्यात नव्याने प्रारूप आराखडा प्रसिद्ध होणार असल्याची चर्चा आहे. एकूणच त्र्यंबकनगरीच्या विकासाच्या आणि नागरिकांच्या भवितव्यावर दूरगामी परिणाम करणारा शहर विकास आराखडा प्रसिद्धीची प्रतीक्षा सर्वांनाच आहे.


आरक्षण टाकून विकास रखडला

त्र्यंबकेश्वर शहरात मंदिरापासून १०० ते ३०० मीटर अंतरावर पुरातत्त्व खात्याच्या नियमांमुळे विकासास वाव नाही. नदीकाठी १०० मीटर हरीतपट्टा आहे. त्यात पुन्हा निळी आणि लाल पूररेषा यांची भर पडली. डोंगराच्या बाजूस पश्चिम घाट संवर्धनाचे नियम आहेत, असे एक ना अनेक नियमांची नाकेबंदी झालेली असताना आरक्षणांचा फेरा पडल्यास करायचे काय, असा प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे. दुसरीकडे शहरात शासकीय भुखंड अतिक्रमणाने व्यापले आहेत आणि खासगी भूखंडांवर सार्वजनिक सुविधांचे आरक्षण होत असेल तर हा संबंधित जमीन मालकावर अन्यायच म्हणायला पाहिजे. याबाबत २५ वर्ष आरक्षण टाकून विकास रखडवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बालसाहित्य लिहिणे ही अवघड बाब’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

बालसाहित्य लिहिणे ही अवघड बाब असून, कवी जनार्दन देवरे यांच्या बालकविता या ग्रामीण व शहरी बालविश्वाला जोडणाऱ्या, तसेच लय व भावार्थ या अंगाने श्रेष्ठ असणाऱ्या आहेत, असे प्रतिपादन किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी मनमाड येथे केले.

कलाक्षर मंच आयोजित कवी जनार्दन देवरे यांच्या 'आनंदाने गाऊ या' या सिद्धी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या बालकविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. प्रा. भाऊसाहेब कुशारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अध्यक्ष प्रा. कुशारे, ज्येष्ठ कवी किशोर पाठक, कमलाकर देसले, चित्रकार विष्णू थोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रकाशक संदीप देशपांडे, अशोक परदेशी, डॉ. सी. एच. बागरेचा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. राजू लहीरे यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप गुजराथी यांनी परिचय करून दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३ वर्षीय बालिकेची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या तेरा वर्षीय शाळकरी मुलीने आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. मुलीच्या आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पायल गजानन गायकवाड (१३) असे मृत्यूमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. भोसला मिल‌िटरी गेट जवळील संत कबीरनगर येथे राहणाऱ्या पायलने दुपारी चार वाजेच्या सुमारास घरात कुणी नसताना अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. यावेळी घरात कोणी नव्हते. पायलची आई कामासाठी घराबाहेर पडली होती. आई कामावरून घरी परतल्यानंतर पायलच्या आत्महत्येची घटना उघडकीस आली. पायलच्या कुटुंबात आई, दोन बहिणी व एक भाऊ असे सदस्य असून, पायलने आत्महत्या का केली याचा शोध गंगापूर पोलिस घेत आहेत. रात्री उशिरापर्यंत तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमिपुत्राला अखेरचा सलाम

$
0
0

जवान गोरडे यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

म. टा. वृत्तसेवा, निफाड/मनमाड

जम्मू-काश्मीर येथील बांदिपुरात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना चांदवड तालुक्यातील वाकी खु. येथील जवान शहाजी गोपाळा गोरडे (वय ३४) यांना देशसेवा करीत असताना वीरमरण आले. त्यांच्यावर सोमवारी (दि. १२) सकाळी १० वाजता त्यांच्या मूळगावी वाकी खुर्द येथे शासकीय इतमामात हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लष्कराकडून बंदुकीच्या फैरी झाडून भारतीय सैन्यातील जवानांच्या पथकाने आपल्या सहकाऱ्याला मानवंदना दिली.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे, प्रांत भीमराज दराडे, तहसीलदार मंडलिक, सरपंच विक्रम जगताप, उपसरपंच चांगदेव देवढे, डॉ. आत्माराम कुंभार्डे, पोलिस निरीक्षक अनंत मोहिते अनिल काळे, वाकी बु.चे सरपंच दत्तू वाकचौरे, डॉ. दिनेश नाईक, मेजर जे. एस. बगाडे, विलास शेळके, रिओ ऑलिंपिकपटू दत्तू भोकनळ, जिल्हा सैनिक कार्यालयातील अप्पासाहेब कोडक आदींसह पंचक्रोशीतील असंख्य नागरिक उपस्थित होते. तसेच भारतीय सैन्यातील राष्ट्रीय रायफल युनिटसह कॅप्टन समीर चव्हाण, सुभेदार प्रदीपकुमार, आर. के. रॉय, अशोक नेरकर, सुनीलकुमार, योगेश शर्मा, पायलट आशिष कुमार अनिसबी, मुन्नाराम आदी अधिकारीवर्गाने आदरांजली वाहत कुटुंबीयांचे सांत्वन केले.

नोकरीचे आश्वासन

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंभळे यांनी शहाजी गोरडे यांच्या कुटुंबाला सरकारकडून आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले, तर त्यांच्या पत्नीला शासकीय नोकरीत स्थान मिळवून देण्याचे आश्वासन लष्करी अधिकाऱ्यांनी दिले.


ग्रामस्थांचे डोळे पाणावले

भूमिपुत्राला अखेरचा अलविदा करताना अवघ्या गावाचे डोळे पाणावल्याचे चित्र होते. शहाजीच्या पार्थिवावर सैन्यातील अधिकारीवर्गाने अशोक चक्र वाहिले. त्यावेळी शहाजींबद्दलचा अभिमान दाटून आला होता. त्यांचे पार्थिव सोमवारी सकाळी वाकी खुर्द येथे आणण्यात आले. तत्पूर्वी लासलगाव येथेही मिरवणूक काढून ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले. घराजवळ पार्थिव आणताच आई-वडील, पत्नी, मुले, मुली, भाऊ, बहिणी यांचा आक्रोश पाहून उपस्थित हेलावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वेगवेगळ्या घटनांत चौघांची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी चौघांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली असून, यात दोन महिलांचाही समावेश आहे. या प्रकरणी संबंधीत पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तीन युवक आहेत. यासंदर्भात पोलिस अधिक तपास करीत आहेत.
हिरवेनगर भागातील संग्राहीत सोसायटीत राहणाऱ्या शाह‌िस्था अभात अन्सारी (३२) या महिलेने रविवारी दुपारी आपल्या राहते घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात येताच कुटूंबियांनी त्यांना तातडीने सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दुसरी घटना पंचवटीतील अमृतधाम भागात घडली. येथील दत्तात्रय नगर परिसरातील रेणुका रेस‌िडेन्सी येथे राहणाऱ्या बाबू मोहम्मद शेख (५५) यांनी रविवारी सकाळी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. पंचवटीतील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबई नाका व पंचवटी पोलिसांत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या व्यतिरिक्त आणखी दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. पंचवटीतील महात्मा फुले नगर येथे राहणाऱ्या विश्वंभर रुकमांगद वाघ (२२) या तरुणाने रविवारी सकाळी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील सिल‌िंग फॅनला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तर, अंबड येथील दत्तनगर परिसरातील कारग‌िल चौकात राहणाऱ्या देवकी सोमनाथ गवारी (२३) या महिलेने शनिवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील लोखंडी पाइपास साडीने गळफास लावून घेतला होता. रविवारी सकाळी ही घटना समोर आली. याप्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगाऱ्यांकडून ३२ लाख वसूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मागील आठ महिन्यांत शहर पोलिसांनी तब्बल २३९ वेळा छापे मारीत जुगाऱ्यांकडील ३१ लाख ९० हजार ५१४ रुपये जप्त केले आहेत. मागील काही वर्षांतील ही उच्चांकी कामगिरी ठरली असली, तरी जुगार अड्ड्यांचे तसेच जुगारींचे पूर्णतः उच्चाटन झालेले दिसत नाही.
जुगारातून निर्माण होणाऱ्या पैशांमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती तर अड्ड्यांमुळे गुन्हेगार तयार होतात. अनेकदा तडिपार गुंड, समाजकंटकांना पोलिसांनी जुगार अड्ड्यातूनच जेरबंद केले आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत पोलिसांनी अवघ्या ७२ जुगार अड्ड्यांवर कारवाई केली होती. त्या तुलनेत यंदा जुगाऱ्यांविरोधात कारवाईला प्रचंड गती देण्यात आली आहे. अगदी रस्त्यांच्या कडेला डाव मांडणाऱ्यांपासून आलिशान फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवरही पोलिसांनी कारवाई केली. जुगार अड्ड्यांमुळेच एका पोलिसास निलंबीत व्हावे लागले, तर अन्य एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर बदलीच्या कारवाईची कुऱ्हाड कोसळली. याबाबत बोलताना सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले की, पोलिस सातत्याने कारवाई करीत आहेत. माहिती मिळाल्यानंतर लागलीच पोलिस घटनास्थळी जातात. दुर्दैवाने जुगार खेळणाऱ्याला लागलीच जामीन मिळतो. शिक्षाही कमी असल्याने जुगाराचे प्रमाण पूर्ण कमी झालेले नाही. जुगार खेळणाऱ्या व्यक्ती जुगाराच्या व्यसनी असतात. प्रसंगी घरातील वस्तू विकून ते जुगार अड्ड्यावर जातात. मागील आठ महिन्यांत पोलिसांनी २३९ वेळा जुगार अड्ड्यांवर कारवाई केली. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण फार मोठे आहे. जुगाऱ्यांकडून ३१ लाख ९० हजार ५१४ रूपये जप्त करण्यात आले असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले. जुगार अड्डा ज्या भागात आहे, त्या भागातील पोलिस स्टेशनचे बँकेत खाते असते. ते पैसे या खात्यात ठेवले जातात. सुनावणीनंतर कोर्टाच्या आदेशाने सदर पैसे सरकार दरबारी जमा होतात, असे गोरे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​जिंदालला हवी २०० एकर जागा

$
0
0

Gautam.sancheti@timesgroup.com

Tweet :@sanchetigMT

नाशिक : मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्र या दोन्ही महत्त्वाकांक्षी संकल्पनांना प्रतिसाद देत बहुराष्ट्रीय कंपनी जिंदाल पॉली फिल्मने नाशिक जिल्ह्यात २०० एकर जागेची मागणी केली आहे. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्याचा कंपनीचा मानस असून, याद्वारे नाशिक जिल्ह्यातील उद्योग जगतातील मरगळ झटकली जातानाच अन्य कंपन्याही नाशिककडे आकृष्ट होण्याची शक्यता उद्योग वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

जिंदाल पॉली फिल्म या बहुराष्ट्रीय कंपनीने नाशिक जिल्ह्यातील तळेगाव-अक्राळे व येवला येथे नव्या प्रकल्पासाठी जागेची पाहणी केली आहे. या नव्या प्रकल्पासाठी कंपनीला २०० एकर जागा हवी असून, ती औद्योगिक वसाहतीत मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. नाशिक शहरात जागा शिल्लक नसल्यामुळे नव्याने विकसित होणाऱ्या तळेगाव-अक्राळे व येवला येथील औद्योगिक वसाहतीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अधिकाऱ्यांनी कंपनीला जागा सूचविली आणि प्रत्यक्षात दाखविली आहे. जिंदाल कंपनीचे मुंबई-आग्रा हायवेवर मोठा प्रकल्प असून, त्याच्या विस्तारासाठी हा नवीन प्रकल्प उभारला जाणार आहे. जिंदाल पॉली फिल्मचे अमेरिका व युरोपमध्ये मोठे उद्योग आहेत. त्यामुळे या कंपनीने आपला विस्तार नाशिकमध्ये करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी जागेची पाहणी सुरु केली आहे. नाशिकच्या एमआयडीसी कार्यालयात जिंदालच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच भेट दिली. त्यांनी प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन केले त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना या जागा सुचवल्या आहेत. आता कंपनीचे अधिकारी हे मुंबई येथे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची भेट घेवून कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

जिंदाल कंपनीने १९९०च्या दशकात नाशिकमध्ये पॉली फिल्मचा उद्योग सुरु केला. त्यानंतर कंपनीचे बस्तान बसल्यानंतर आता त्याचा विस्तार केला जाणार आहे. जिल्ह्यात नाशिक, सिन्नर, दिंडोरी, मालेगाव, विंचुर, पेठ येथील जवळपास भूखंड वाटण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन विकस‌ित होणाऱ्या औद्योगिक वसाहतीत नवे प्रकल्प यावे, यासाठी एमआयडीसीचे प्रयत्न सुरु आहेत. यापूर्वी चीनचे शिष्टमंडळ व ब्रिटानीया कंपनीने अक्राळे -तळेगाव येथील जागेची पाहणी केली. त्यानंतर अनेक औषध कंपन्यांनी या जागेला पसंती देत उद्योग उभारण्याचे नियोजन करीत आहे, अशात जिंदालचा हा प्रकल्प आल्यास जिल्ह्याला त्याचा फायदा होईल.

जिंदाल पॉली फिल्मच्या अधिकाऱ्यांनी अक्राळे-तळेगाव व येवला येथील जागेची पाहणी केली. त्यांनी प्रेझेंटेशनसुध्दा दाखविले आहे. आता ते मुंबई येथे वरिष्ठांशी चर्चा करणार असून, जिल्ह्यात मोठे उद्योग यावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

- हेमांगी पाटील, प्रादेशिक व्यवस्थापक, एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभागांची मोडतोड, नगरसेवक धास्तावले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने तयार केलेल्या प्रभागरचनेवर विभागीय आयुक्तांच्या त्रिसदस्यीय समितीने शिक्कामोर्तब केले आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रभागरचनेत द्विसदस्यीय प्रभागांची मोठ्या प्रमाणावर मोडतोड झाली असून, मातब्बर नगरसेवकांना मोठा झटका बसणार असल्याचे समजते. प्रभागरचना तयार करताना नैसर्गिक व मानवनिर्मित सीमा कायम असल्या, तरी चार सदस्यीय प्रभाग करताना दोन प्रभागांच्या एकत्रीकरणात झालेली मोडतोड अनेक मातब्बरांच्या पतनास कारणीभूत ठरणार आहे, तसेच ती अनेकांच्या पथ्यावरही पडणार आहे. त्यामुळे प्रभागरचनेवर हरकतींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महापालिकने तयार केलेल्या ३१ प्रभागांची रचना सोमवारी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे. दोन सदस्यीय प्रभागरचना आता चार सदस्यीय झाली आहे. निवडणूक आयोगाच्या गाइडलाइनप्रमाणे प्रभागरचना तयार करण्यात आली असली, तरी एकत्रीकरणात मोठी मोडतोड झाली असल्याचे समजते. त्यात विद्यमान मातब्बर नगरसेवकांच्या प्रभागांचा समावेश असून, नव्याने जोडण्यात आलेल्या भागामुळे प्रभागाचे पूर्ण गणितच बदलणार आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या भागामुळे अनेकांवर उभे राहावे की नाही, याचा विचार करण्याची वेळ येणार असल्याचे समजते. विशेषतः शहरातील मध्य भागातील प्रभागांमधील बदल हे राजकीय पक्षांना झटका देणारे ठरणार आहेत.

विशेषतः झोपडपट्ट्यांचा समावेश करताना मोठा फेरबदल झाल्याची चर्चा आता नगरसेवकांमध्येच रंगू लागली आहे. त्याचा थेट फटका विद्यमान दिग्गज बाहुबलींना बसणार असल्याची चर्चा असून, त्यात विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या प्रभागांचाही समावेश आहे. त्यामुळे अनेक जण धास्तावले असून, कोणत्या पक्षात गेल्यास निवडणूक सोयीची होईल, याची चाचपणी करत आहेत. बदललेले प्रभाग हे लाट निर्माण करणारे असले तर भाजप- सेनेत प्रवेशकर्त्यांच्या रांगाच लागणार आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर दलबदलाचा आपटबार सुरू होणार असून, राजकीय फटाकेही फुटणार आहेत. या मोडतोडीवर आता थेट निवडणूक आयोगाकडे हरकतींसह तक्रारींचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाच्या घोषणेकडे नगरसेवकांसह पक्षांच्या नजरा लागून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयआरसीटीसी’ पुन्हा ऑफलाइन!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय रेल्वे कात टाकत असतानाच त्यांना अनेक तांत्रिक बाबींना तोंड द्यावे लागत आहे. प्रवाशांचा वेळ वाचावा यासाठी रेल्वेने 'इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन' (आयआरसीटीसी)च्या माध्यमातून रेल्वे बुकींग सुरू केले. मात्र, सोमवारी अचानक ही साइट पुन्हा बंद झाल्याने आरक्षण करणाऱ्या लाखो प्रवाशांचा खोळंबा झाला.

रेल्वे तिकीट बुकिंग खिडकीवरील ताण कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने या साइटच्या माध्यमातून ऑनलाइन बुकिंग सुरू केले. त्यामुळे खिडकीवरील ताण कमी होऊन प्रवाशांच्या वेळेची व पैशाची बचत झाली. अनेक प्रवाशांना मोबाइलवरून बुकिंग करणे देखील सोयीचे झाले. अनेक प्रवाशांना याची सवय जडल्याने या साइटचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला. रेल्वे तिकीट आरक्षणासाठी या वेबसाइटचा प्रामुख्याने वापर होतो. या वेबासाइटवर लाखोंचे व्यवहार होतात. या साइटवरून प्रवाशांना अनेक सुविधा मिळत असल्याने पॅकेज टूरचादेखील प्रवाशांनी लाभ घेतला. सोमवारी अचानक ही साइट बंद झाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. बुकिंग कुठे करावी, या विवंचनेत प्रवाशी होते. या आधीही ही साइट वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. 'आयआरसीटीसी'च्या वेबसाइटवरील ग्राहकांची माहिती चोरीला गेल्याचे वृत्त प्रसिध्द झाले होते. हॅकर्सने 'आयआरसीटीसी'ची वेबसाइट हॅक करून ग्राहकांची माहिती मिळवल्याची चर्चा होती. लोकप्रिय वेबसाइटबाबतीत हा प्रकार घडल्याने इंटरनेट सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, याबाबत असे काही झाले नसल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला होता. सोमवारी ही साइट बंद झाल्याने पुन्हा असाच प्रकार घडला की काय, अशी उलटसुलट चर्चा रंगली. साइट बंद झाल्याने लांब पल्ल्याची ति‌किटे काढण्यासाठी प्रवाशांना नाशिकरोड व तिबेटीयन मार्कट जवळील तिकिट बुकींग ऑफिसकडे धाव घ्यावी लागली. त्यामुळे या दोन्ही केंद्रांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तेथील गर्दी कमी करणे कर्मचाऱ्यांना कठीण झाले. दुपारी रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांना तिकिटासाठी सायंकाळी उशिरापर्यंत थांबावे लागले.

संपर्कदेखील ऑफलाइन

रेल्वे अधिकारी व 'आयआरसीटीसी'च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांचे नंबर नॉट रिचेबल होते. साइट कधी सुरू होणार याबाबत प्रवाशांना माहिती मिळत नसल्याने संभ्रमाचे वातावरण होते. कोणाची मदत घ्यावी, असा प्रश्न प्रवाशांपुढे निर्माण झाला. दरम्यान, याबाबत नाशिकरोड स्टेशनवरील रेल्वे अधिकाऱ्यासी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला काही माहिती नसल्याचे उत्तर दिले.

दिवाळीच्या कालावधीचे बुकिंग करायचे होते. मात्र, 'आयआरसीटीसी'ची साइट बंद असल्याने बुकिंग करता आले नाही. याबाबत नाशिकरेड रेल्वे स्टेशनवर संपर्क साधला असता आम्हाला याबाबत काही माहीत नसल्याचे सांगण्यात आले.

- भूषण कुलकर्णी, प्रवासी

अनेक दिवसांपासून 'आयआरसीटीसी'च्या साइटचा प्रॉब्लेम सुरू आहे. अनेकदा बुकिंग करताना ही साइट अचानक बंद होते. सोमवारी तर साईट अचानक बंद झाल्याने बुकिंग करताच आले नाही.

- राजू पारगावकर, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images