Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

ब्राह्मण युनिटीचा क्रांती मोर्चाला पाठिंबा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी व्हावी, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा या मागणीसाठी धुळे जिल्ह्यात २८ रोजी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला ब्राह्मण युनिटी या संघटनेने पाठिंबा दिला आहे.

अॅट्रॉसिटीचा सर्वत्र दुरुपयोग होत असून, गुन्हेगार त्याचा बचावासाठी उपयोग करू लागल्याचा आरोप करीत ब्राह्मण संघटनांनी मोर्चाला पाठिंबा दिला आहे. याबाबत धुळ्यात नुकतीच बैठक झाली. या बैठकीला ब्राह्मण समाजातील संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यज्ञोपवित बहुद्देशीय सामाजिक संस्था, अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघ, गोवर्धन ब्राह्मण महासंघ, परशुराम युवा मंच, ब्रह्मर्षी सेना, चित्पावन ब्राह्मण महासंघ या संघटनांनी मराठा क्रांती मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळ्यात परीट समाजबांधवांचा मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरातून मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात संत गाडगे महाराज यांची वेशभूषा केलेला समाजबांधव सहभागी झाला होता.

महाराष्ट्र राज्य परिट सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष विजय देसाई, अ. भा. धोबी महासंघाचे अध्यक्ष बालाजी शिंदे, युवा अध्यक्ष संजय वाल्हे, अनिल शिंदे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर जयश्री अहिरराव, कमलेश देवरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परीट समाजाला डॉ. भांडे समितीच्या शिफारशी लागू करून शासनाने न्याय द्यावा, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी लावावी आदी मागण्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुला विनियार्डसला तीन पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डेलवाईन एक्सलन्स अवॉर्डसतर्फे सुला विनियार्डसला प्रतिष्ठेचे तीन पुरस्कार मिळाले आहेत. नवी दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात सुलाचे सीईओ राजीव सामंत व उपाध्यक्षा (मार्केटिंग) सिसिलीया ओल्डन यांनी पुरस्कार स्वीकारले.

सुला विनियार्डसला 'इंडियन वाईन प्रोड्युसर ऑफ द इयर' तसेच 'वाईन टुरीझम वाईनरी ऑफ द इयर' हे पुरस्कार मिळाले असून उत्कृष्ट वाईन निर्मितीबद्दल सुलाचे चीफ वाईनमेकर अजॉय शॉ यांना 'इंडियन वाईनमेकर ऑफ द इयर' हा पुरस्कार मिळाला आहे.

इंडियन वाईन अकॅडमीचे अध्यक्ष सुभाष अरोरा व इंडियन रेस्टॉरंट स्पायचे फूड जर्नलिस्ट व ब्लॉगर सौरीश भट्टाचार्य यांनी डेलवाईन एक्सलन्स अवॉर्डस् या सोहळ्याचे आयोजन केले. वाईन उद्योगाला चालना देण्यासाठी, जागरूकता निर्माण करण्यासोबतच उत्पादनांचा दर्जा वाढावा असा हेतू पुरस्कार देण्यामागील होता. पहिल्याच आवृत्तीत सुलाचे तीन गटामध्ये नामांकन करण्यात आले आणि सुलाने पुरस्कारही पटकावला. वाईन उद्योगाला चालना देण्यासाठी कठोर परिश्रम घेत असलेल्या व्यक्ती, संस्थांचा सत्कार करून त्यांच्या मेहनतीबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण सुला टिमच्या परिश्रमांना हे तीन पुरस्कार समर्पित असल्याचे सामंत यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतरा शिक्षकांच्या सेवा वर्गवरून वादंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

खासगी व सरकारी शाळांमधील शिक्षकांची सेवा महापालिकेच्या शिक्षण समितीकडे वर्ग करण्यास महासभेचा विरोध असतानाही प्रशासन अधिकारी नितीन उपासनी यांनी १७ शिक्षकांची सेवा समितीकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव मांडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रिक्त पदांच्या नावाखाली या शिक्षकांचे समायोजन करण्याचे प्रयत्न केले जात असून, यात आर्थिक गैरव्यवहाराचाही आरोप केला जात आहे. त्यामुळे शिक्षण समितीचा कारभार पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.

सोमवारच्या महासभेत शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी नितीन उपासनी यांनी जिल्हा परिषद, खासगी शिक्षण संस्था, नगरपालिकेत कार्यरत असेलेल्या १७ शिक्षकांची सेवा महापालिकेडे वर्ग करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. महासभेने आधीच अशा सेवा वर्ग करण्यास विरोध केला असून, समितीनेच शिक्षकांची भरती करावी अशी मागणी केली आहे. यापू्र्वीही अशा समायोजनेवरून तत्कालीन प्रशासन अधिकारी कुंवर यांच्या विरोधात नगरसेवकांनी आवाज उठवत त्यांचा प्रस्ताव हाणून पाडला होता. तरीही नुकताच प्रशासन अधिकारी पदाचा पदभार घेतलेल्या उपासनी यांनी शिक्षकांचे कामकाज सुरळीत करण्याऐवजी व शाळांच्या दर्जा सुधारणेकडे लक्ष देण्याऐवजी शिक्षकांच्या सेवा वर्ग करण्याला प्राधान्य दिले आहे. तसा प्रस्तावच महासभेवर ठेवण्यात आला. परंतु या प्रस्तावावरून वाद होण्याची शक्यता गृहीत धरत, सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्तावच चर्चेला आणला नाही. त्यामुळे या प्रस्तावावरून सांशकता आहे. या सतरा शिक्षकांच्या सेवा वर्ग करण्यामागे आर्थिक कारणही दडल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता नगरसेवकांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

तिजोरीवर बोजा

महापालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. विकासकामांसाठीही पैसे मिळत नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत या शिक्षकांची सेवा वर्ग केल्यानंतर त्यांचा ५०टक्के पगार हा महापालिकेला द्यावा लागणार आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या पालिकेवर हा नवा आर्थिक बोजा पडणार आहे. पालिकेचे प्रशासन उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करत असताना समितीची ही उधळपट्टी कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सेवा वर्गऐवजी स्थानिक बेरोजगार तरुणांची नोकरभरती करा अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमा रुग्णालयाची क्षमता वाढवा

$
0
0

खासदार गोडसेंची केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे मागणी

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक कामगारांसाठी केंद्रीय कामगार मंत्रालयाने कामगार विमा रुग्णालयाची उभारणी केली आहे. असलेल्या कामगार रुग्णालयांमध्ये क्षमता वाढवा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच मेडिकल कॉलेजही सुरू करण्यात यावे, अशीही मागणी खासदार गोडसे यांनी केली.

नाशिक जिल्ह्यात असलेल्या १ कोटी २५ लाख कामगारांसाठी असलेल्या कामगार विमा रुग्णालयात आजही सुविधा मिळत नाहीत. असे असतांना दुसरीकडे खासदार गोडसे यांनी मात्र रुग्णालयात क्षमता वाढविण्याबाबत केंद्रीय कामगार मंत्री बंडारू यांच्याकडे मागणी केली आहे. सद्यस्थितीच अत्यंत दयनीय अवस्था कामगार विमा रुग्णालयाची आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्याचे सातत्याने कामगार समस्या मांडत असतात. परंतु याकडे कु्णीही लक्ष घालत नसल्याने खासगी रुग्णालयात अनेकांना उपचार घेण्याची वेळ येते.


वेळेवर उपचार मिळत नाही

रुग्णालयात सर्व सुविधा आहेत, परंतु त्या बंद अवस्थेतच पहायला मिळतात. काही वर्षांपासून खासगी रुग्णालयांशी कामगार विमा रुग्णालयाने टाइप केले आहेत. परंतु खासगी रुग्णालयात वेळेवर कामगारांच्या उपचारासाठी पाहिजे ती मदत कामगार रुग्णालयाकडून मिळत नसल्याचा आरोप नेहमीच कामगारांकडून होतो. यासाठी खासदार गोडसे यांनी कामगार रुग्णालयात अगोदर सुधारणा कराव्यात व त्यानंतर रुग्णालयाची क्षमता व मेडिकल कॉलेजची मागणी करावीे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाकरे संग्रहालयाचा मार्ग मोकळा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर पंपिंग स्टेशनजवळ महापालिकेच्या स्व. बाळासाहेब ठाकरे इतिहास संग्रहालयाचा मार्ग महासभेने मोकळा केला आहे. सोमवारी महासभेने जीव्हीके, मेलच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या इतिहास संग्रहालयाच्या विषयाला मंजुरी दिली. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची स्वप्नपूर्ती होण्याची शक्यता आहे. सध्याच्या संग्रहालयाच्या जागेची सुधारणा व सौंदर्यीकरण कंपनीच्या वतीने करण्यात येणार आहे. हा संपूर्ण परिसर विकसीत केला जाणार असून, त्यासाठी नाममात्र तिकीट ठेवण्यात येणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचे शस्त्र संग्रहालय करण्याची घोषणा केली होती. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे असलेली शस्त्रास्त्रे या संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. मे. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. व जीव्हीके यांच्या वतीने सयुंक्तपणे सीएसआर उपक्रमातून हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महासभेवर सौंदर्यीकरण व सुधारणेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे. जीव्हीके कंपनीकडून प्रवेशद्वाराचे सुशोभिकरण, मुख्य संग्रहालय इमारत सुधारणा, लॅण्डस्केप व विद्युतीकरण करणे, कलात्मक कामे, पेंटींग, अॅम्फी थिएटर, निरीक्षण गॅलरी, ऐतिहासिक भ‌िंत यांचा समावेश आहे. प्रस्तावामुळे आता राज ठाकरे यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

टीसीएससोबत करार

संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्राद्वारे सुरू करण्यात आलेल्या स्टार्ट अप योजनेंतर्गत सरकारी कार्यालयांनी समाजोपयोगी अॅप्ल‌िकेशन्सची निर्मिती करणे अपेक्षित आहे. टीसीएसच्या वतीने सामाजिक आव्हाने व शहरी भागातील समस्यांचा अभ्यास केला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या जागांचा वापर केला जाणार असून, टीसीएस व टाटा फाऊंडेशन, महापालिका एकत्र‌ित काम करणार असून, त्यासाठीचा त्रिपक्षीय कराराला महासभेने सोमवारी मान्यता दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर परिणाम भोगावे लागतील

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

काश्मीरमधील लष्करी तळावरील अतिरेकी हल्ला आणि मराठा समाजाच्या मोर्चांवरून राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे यांनी केंद्र व राज्य सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. यूपीए सरकारच्या काळात काश्मीरवरील हल्ल्यांबाबत 'ईंट का जबाब पत्थरसे' देण्याची भाषा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोंदी आता गप्प का, असा सवाल करत, हल्ले थांबत नसल्याची टीका केली. मराठा समाजाच्या वतीने निघणाऱ्या मूक मोर्चांची केंद्र व राज्य सरकारने वेळीच दखल घेतली नाही, तर दोन्ही सरकारांना वेगळे परिणाम भोगावे लागतील, अशा इशारा मुंडे यांनी दिला.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली. आमच्या सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले, पण भाजप सरकारने कोर्टात योग्य बाजू न मांडल्याने स्थगिती मिळाली. त्यामुळे मराठा समाजात असंतोष आहे. त्यात कोपर्डी प्रकरण योग्य पद्धतीने हाताळले गेले नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या असंतोषात भर पडली आहे. त्यामुळे मराठा समाजाकडून येणारी प्रतिक्रिया स्वाभाविक असून ती लोकशाही प्रतिक्रिया आहे. आपण आतापर्यंत असे विशाल व शांत मोर्चे पाहिले नाहीत, असे सांगत मराठा समाजाच्या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा; अन्यथा केंद्र व राज्याला त्याचे वेगळेच परिणाम भोगावे लागतील असा थेट इशाराच मुंडे यांनी दिला. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणासंदर्भात हायकोर्टात जाण्यास सांग‌ितले आहे. त्यामुळे आता सरकारने त्यात योग्य भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे. अॅट्रॉसिटीसंदर्भात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलेली भूमिका योग्य असल्याचे सांगून बलात्काऱ्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असा दावा त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या गावात एकाच दिवशी तीन हत्या होत असल्याने राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. राज्यातदेखील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, अस्थिरता निर्माण झाली आहे. यावर ठोस निर्णय होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तसेच राज्यात संवेदनशील विषय असंवेदनशीलरित्या हाताळले जात आहेत. जव्हार मोखाड्याच्या परिसरात कुपोषणामुळे ६०० बालकांचा मृत्यू झाला, ही चिंतेची बाब असून सरकारकडून दिलासा मिळाला नाही, तर त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असेही ते म्हणाले. देशातील व राज्यातील भाजप सरकारने जनतेला दाखविलेल्या विविध आश्वासनांबाबत दिलासा न दिल्याने सरकारने जनतेचा विश्वास पूर्णपणे गमावला असल्याची टीकाही त्यांनी केली.

आता मोदी गप्प का?
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करत, मुंडे यांनी या हल्ल्याबाबत थेट मोदी यांच्यावर टीका केली. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, त्यांनी यूपीए सरकारच्या पाकिस्तान धोरणावर टीका करत 'ईंट का जवाब पत्थरसे देना चाहिए' अशी टीका केली होती. मोदी आता गप्प का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी सरसावली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणूक पाच महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना राष्ट्रवादीने रंजन ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. या परिस्थितीत पक्षांतर्गत गट-तट व हेवेदावे बाजूला ठेऊन आगामी मनपा निवडणूक जिंकण्याचा निर्धार शहर राष्ट्रवादीच्या नूतन शहराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यात पदाधिकाऱ्यांनी केला. सर्व गटांना सोबत घेऊन ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याची ग्वाही यावेळी नूतन शहराध्यक्ष ठाकरे यांनी दिली.

राष्ट्रवादी भवन येथे शहर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे मावळते शहराध्यक्ष आमदार जयवंत जाधव यांच्याकडून रंजन ठाकरे यांनी स्वीकारली. यावेळी माजी खासदार देवीदास पिंगळे, प्रदेश सचिव नाना महाले, अर्जुन टिळे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, नगरसेवक विक्रांत मते, समाधान जाधव, संजय साबळे, प्रियंका बलकवडे, दीपक वाघ आदी उपस्थित होते. मनपा निवडणुकांच्या तोंडावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपविली असल्याने आता गट-तट बंद करा आणि पवार या एकाच गटात सर्वांनी काम करा असे आवाहन अर्जुन टिळे यांनी यावेळी केले. सर्वानुमते शहराध्यक्षांची निवड झाली असून, खुल्या दिलाने माजी शहराध्यक्ष ही संधी देत असल्याचे सांगत सर्वांना विश्वासात घेऊन पूर्णवेळ काम करावे लागेल, असे आमदार जाधव यांनी यावेळी सांगितले. माजी खासदार पिंगळे, अ‍ॅड. पगार व नाना महाले यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

ज्येष्ठांची कोअर कम‌िटी
आव्हान स्वीकारायची आपली तयारी असल्याचे सांगत, ठाकरे यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. शहरातील ज्येष्ठांची कोअर कमिटी करणार असून, त्यांच्या मार्गदर्शनानुसार काम करणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वणीसाठी २८० जादा गाड्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वणी येथील सप्तशृंगीदेवी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे २८० जादा बसेसचे नियोजन केले आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाभरातील १३ आगारातून १९५ बसेस थेट सप्तशृंगी गडावर जाणार आहेत. तर ८५ बसेस या नांदुरी फाटा ते सप्तशृंगी गड येथे जाणार आहे.

महामंडळाने नवरात्रोत्सव काळातील १ ते ११ ऑक्टोबरचे नियोजन केले असून त्यासाठी सर्व आगारांना नियोजनाचे पत्र पाठवले आहे. पहिले तीन दिवस कळवण आगारातून नांदुरी फाटा ते सप्तशृंगी गड अशी वाहतूक करणार आहे. त्यानंतर गर्दीनुसार सटाणा, मालेगाव व इतर आगारातून बस मागवण्याच्या सूचना केल्या आहे. या बसेसमध्ये मालेगाव, मनमाड, सटाणा, सिन्नर, नांदगाव, इगतपुरी, लासलगाव, पेठ, येवला, पिंपळगाव यांच्या प्रत्येकी पाच बसेस असणार आहेत. तर कळवण आगारातून ३५ बसेस असणार आहे. या सर्व बस ४ ते ११ ऑक्टोबरपर्यंत धावणार आहेत.

गडावर जाण्यासाठी नाशिक एकमधून ३० व नाशिक दोनमधून २५ बसेस जुने सीबीएस येथून धावणार आहेत. मालेगाव २०, मनमाड १५, सटाणा १५, सिन्नर १०, नांदगाव १०, इगतपुरी १०, लासलगाव १०, कळवण १५, पेठ १०, येवला १०, पिंपळगाव १५ अशा एकूण १९५ बसेस असतील.

महामंडळाने आगाराला दिले दिनविशेष
गर्दीचे नियोजनासाठी महामंडळाने आपल्या पत्रात दिनविशेषसुध्दा दिले आहे. यात १ ऑक्टोबरला घटस्थापना, २ ऑक्टोबरला गांधी जयंती, ३ ऑक्टोबरला मोहरम मासारंभ, ४ ऑक्टोबरला चौथी माळ, पाच ऑक्टोबरला विनायक चतुर्थी, सहा ऑक्टोबरला ललिता पंचमी, ७ ऑक्टोबरला सातवी माळ, ८ ऑक्टोबरला महालक्ष्मी पूजन, ९ ऑक्टोबरला दुर्गाष्टमी, महालक्ष्मी उपवास, आठवी माळ, १० ऑक्टोबरला महानवमी, नवरात्री स्थापना व उपवास पारणा, ११ ऑक्टोबरला विजयादशमी (दसरा) हे दिन असल्याचा तक्ता दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिमातेच्या निर्मितीसाठी लगबग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गणेशोत्सवानंतर आता शहरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या पितृपंधरवडा सुरू असून दुर्गा मातेची मूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकारांकडे लगबग सुरू आहे. सुमारे ८० टक्के मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शिवाय महाराष्ट्रात रुजलेल्या गरबा दांडियाची तयारीही जोमात सुरू आहे. यासाठी तरुणाई सज्ज झाली असून दांडिया शिकण्यासाठी शहरामध्ये प्रशिक्षण वर्ग सुरू झाले आहेत.

परंपरेनुसार गणेशोत्सव झाल्यानंतर पितृपंधरवड्यास सुरुवात होते. याच दिवसात नवरात्रोत्सवासाठी दुर्गा मातेची मूर्ती बनविण्यास सुरुवात केली जाते. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमधून देवीची स्थापना तसेच घरोघरी घटस्थापना केली जाते. अवघ्या काही दिवसांवर नवरात्रोत्सव आल्याने सार्वजनिक मंडळांकडून मंडप तयार करणे, रास दांडियाची तयारी करणे, विद्युत रोषणाई करण्याची तयारी जोरात सुरू आहे. शनिवार, दि. १ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होणार असल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवरात्रोत्सवातील महत्त्वाचा भाग मानल्या जाणाऱ्या दांडियाची पहिल्या दिवसापासून सुरुवात करण्यासाठी योग्य जागा, कार्यक्रमाची आखणी आणि डॉल्बी सिस्टीम या सर्व वस्तूंची जमवाजमव करण्यासाठी सार्वजनिक मंडळे दंग झाली आहे. देवीचा जागर करत तरुणाई दांडियाच्या तालावर नाचत असते. घटस्थापनेच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्यात व शहरात सर्वच देवींच्या मंदिरात पूजा, अर्चा आणि अखंड तेलवात असते. त्यामुळे भाविकांची या दिवसात गर्दी असते. आध्यात्मिक कार्यक्रम आणि धार्मिक उपक्रम याने हा काळ भारावलेला असतो.

विविध प्रकारातील गणेश मूर्ती दरवर्षी तयार कराव्या लागतात. मात्र, दुर्गा मातेची मूती एकच असल्याने बहुतांश सार्वजनिक मंडळानी फायबरच्या मूर्ती तयार केलेल्या आहे. त्यामुळे मूर्ती ज्या मंदिरात ठेवल्या जातात त्या मंदिराची स्वच्छता आणि रंगरगोटी करण्यात येत आहे. दांडियाचा विस्तार वेगाने ग्रामीण भागात झाल्यामुळे नवरात्रोत्सवाला विस्तारित स्वरूप प्राप्त झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलआयसी संरक्षणासाठी राबविणार व्यापक मोहीम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआसी) खासगीकरणाचे संकेत केंद्रातील भाजप सरकारने दिल्याने नाशिकच्या पश्चिम प्रदेश विमा कर्मचारी संघटनेच्या २१ व्या त्रैमासिक महाअधिवेशनात त्यावर चर्चा झाली. यात खासगीकरणासह विमा कंपनीच्या इतर विषयांवरही सर्वांनी मते मांडली. जानेवारी २०१७ मध्ये अखिल भारतीय अधिवेशन केरळ येथे कोचीमध्ये होणार आहे. त्यात एलआयसी व जीआयसीचे संरक्षण करण्यासाठी व्यापक मोहीम राबवून आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, असे 'एआयआयईए'चे राष्ट्रीय सरचिटणीस कॉ. व्ही. रमेश यांनी स्पष्ट केले.

ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉइज असोसिएशनच्या (एआयआयईए) चार दिवसीय अधिवेशनात विविध विषयांबाबत झालेल्या चर्चेची माहिती देण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी व्ही. रमेश म्हणाले, की मोबिलीटी व बदलीसंबधीचे कर्मचारी विरोधी धोरण, कर्मचाऱ्यांना पेन्शनचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, हंगामी कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घ्या, हंगामी कर्माचाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अमंलबजावणी करा, या विषयावर चर्चा झाली. अधिवेशनाचे उद्‍घाटन शनिवारी (दि. १७) झाले होते.

केवळ एलआसी कर्मचाऱ्यांचेच प्रश्न घेऊन चर्चा झाली नाही तर महागाई, बेरोजगारी, कामगार विषयी सरकाचे धोरण, निधर्मी सार्वभौमत्व प्रस्थापित करणे यावरही अधिवेशनात चर्चा झाली. एलआयसीने पंचवार्षिक योजना, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज या विकासकामासाठी लाखो कोटी गुंतविले. सरकार अशा महामंडळावर खासगीकरण करण्याचे प्रयत्न करत आहे. एलआयसीला नुकतीच ६० वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे डिसेंबर २०१६ मध्ये राष्ट्रीयस्तरावर देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रिक करून परिषद घेणार असून त्यात त्यांच्यासमोर हे प्रश्न मांडणार असल्याचे रमेश यांनी सांगितले.

'अच्छे दिन' असते तर अधिवेशनात पंतप्रधान मोदींचा फोटो लावला असता. एलआयसीचा हेतू जनतेचा पैसा जनतेकडे जावा असा आहे. देशाच्या विकासाला साथ देणाऱ्या अशा संस्थेला खासगीकरण करणे न पटण्यासारखे आहे. त्यामुळे संघर्ष करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील बालनाट्य चळवळ थंडावली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बालनाट्य चळवळीचा वारसा असलेल्या शहरातून बालनाट्य चळवळ थंडावल्याची चिन्हे आहेत. राज्य नाट्य स्पर्धांनंतर होणाऱ्या या बालनाट्यस्पर्धांसाठी अत्यंत मोजक्या एन्ट्रीज आल्याने अनुत्साहाचे वातावरण आहे.

राज्य नाट्य स्पर्धांनंतर मोठ्या गाजावाजात होणाऱ्या बालनाट्य स्पर्धांमध्ये यंदा धुगधुगी जाणवत आह. आश्चर्याची बाब म्हणजे केवळ १४ एन्ट्रीज आत्तापर्यंत आलेल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातल्या एन्ट्री असून मोठ्या मानल्या जाणाऱ्या शहरातून मात्र मोजक्याच जणांनी अर्ज भरले आहेत. गेल्या वर्षी बालनाट्यस्पर्धेला तब्बल ४५ एन्ट्रीज आल्या होत्या; मात्र यंदा कोठे माशी शिंकली हेच कळेनासे झाले आहे. यात विशेष म्हणजे ज्या मेट्रो सिटीजचा उल्लेख केवळ नाटकांसाठी केला जातो तेथूनच अत्यंत कमी एन्ट्री आल्याने शहरांमध्ये बालनाटकांची घेतल्या जाणाऱ्या शिबिरांमध्ये येतात; ती नंतर जातात कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बालनाट्य शिबिरांमध्ये तीन हजारापासून पाच हजारापर्यंत शुल्क घेतले जाते; मात्र मुलांमधील नैपुण्य आजमविण्याची वेळ आल्यानंतर त्यांना या स्पर्धांपासून पारखे ठेवले जाते. शिबिरांमधील हुशारी स्पर्धांमधून स्वत:ला सिध्द करत मांडली गेली पाहिजे; परंतु तसे होत नसल्याने मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याउलट ज्यांना स्वत:ला सिध्द करण्याची कोणतीही साधने उपलब्ध नाही, अशा ग्रामीण भागातून अधिकाधिक एन्ट्री आल्या आहेत, ही स्पर्धेच्या दृष्टीने एक चांगली बाब म्हणता येईल.

'राज्य नाट्य'साठीही यंदा कमी प्रतिसाद
राज्य नाट्य स्पर्धा म्हणजे तरुणाईसाठी उत्साहाचा खळाळता झरा. सिरियलमध्ये काम करण्यासाठी राज्य नाट्य स्पर्धा म्हणजे त्याची शिडी मानली जाते. अशावेळी या स्पर्धांमध्ये काम करण्याचा उत्साह काही निराळाच असतो; परंतु यंदा या स्पर्धांमध्ये कमी एन्ट्री आल्याने नाटकाकडे तरुणाईचा कल कमी झाला की काय अशी शंका येण्यास वाव आहे. मागील वर्षी राज्यनाट्यसाठी १८ एन्ट्री होत्या, यंदा मात्र पहिल्या छाननीमध्ये अत्यंत कमी अर्ज आले आहेत.

यंदाच्या वर्षी नाशिकच्या बाल नाटकांची संख्या वाढणार असे दिसते. त्यासाठी काही काळ जावा लागेल. आवाहन तर प्रत्येक शाळेला केले आहे. सहभाग कमी असला तरी आणखी काही दिवसात वाढेल असे वाटते.
- सुरेश गायधनी, ज्येष्ठ रंगकर्मी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आऊटसोर्सिंग फेटाळले

$
0
0



म.टा.खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत नोकरभरतीऐवजी आऊटसोर्सिंगने कामे करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सर्वपक्षीय नगरसेवकांनी सोमवारी हाणून पाडला. आऊटसोर्सिंगद्वारे महापालिकेची कामे करून घेणारे प्रस्ताव महासभेने फेटाळून लावले. नीलगिरी बाग येथील जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल दुरुस्ती ठेकेदारामार्फत करण्यास विरोध दर्शविला. ठेकेदारीऐवजी महापालिकेत भरती करा, अशी आग्रही मागणी करीत नोकरभरतीचा प्रशासनवर दबाव वाढविला. महापौर अशोक मुर्तडक यांनीही आक्रमक भूमिका घेत, ठेकेदारी पद्धतीने सध्या महापालिकेत कार्यरत कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली महासभा झाली. भाजप नगरसेविका ज्योती गांगुर्डे यांचे पती अर्जुन गांगुर्डे यांना श्रंद्धांजली वाहून महासभा अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आली. त्यानंतर झालेल्या सभेत आऊटसोर्सिंगचा विषय गाजला. प्रशासनाने नीलगिरी बाग येथील ५० दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्राची तीन वर्ष देखभाल दुरुस्तीसाठी दोन कोटी आठ लाख ५९ हजार रुपयाचा प्रस्ताव महासभेत प्रशासकीय मंजुरीसाठी सादर केला. सदर प्रस्तावास नगरसेवकांनी विरोध करत आऊटसोर्सिंगचे प्रस्ताव सादर करण्यास येू नये, असे सांगूनही प्रशासनाकडून प्रस्ताव सादर का करण्यात आला, असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला. 'वारंवार प्रस्ताव सादर करण्याचे कारण काय?' असा प्रश्न उपमहापौर गुरमीत बग्गा यांनी उपस्थित केला. प्रशासकीय खर्च जास्त असल्याचेचे कारण पुढे करत कायमस्वरुपी नोकरभरतीला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे किमान महापालिकेच्या माध्यमातून रोजंदारी आणि मानधनावर कर्मचाऱ्यांची भरती करावी, अशी मागणी नगरसेवकांनी यावेळी केली.

आऊटसोर्सिंगद्वारे प्रस्ताव सादर करणाऱ्या प्रशासनालाही घेरण्याचा प्रयत्न यावेळी नगरसेवकांनी केली. महापालिकेत सध्या किती रोजंदारी कर्मचारी आहेत, त्यावर किती खर्च होतो, असा जाब प्रशासनाला विचारला. परंतु, महासभेतही ही माहिती न दिल्याने प्रशासनाने मंजुरीसाठी सादर केलेले प्रस्ताव तहकूब करण्याची मागणी केली. प्रशासनाने नीलगिरी बाग येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कारण स्पष्ट केले. मात्र, आऊटसोर्सिंगलाच विरोध करत, महासभेने हा प्रस्ताव तहकूब केला. घंटागाडी महापालिकेनेच चालवावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

फाळके स्मारक येथील सुरक्षेच्या कामाचे ३२ लाख ४० हजार ७२० रुपयांचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. त्यावर नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी सदरचा प्रस्तावात कार्योत्तर मंजुरीसाठीचा विषय असून त्याबाबत प्रशासनाला जाब विचारला. महापालिका कचऱ्यांच्या वजनावर पैसे अदा करणार असल्याने घंटागाडी योजना मनपाचे चालवावी, अशी सूचना त्यांनी केली. तसेच जलशुद्धीकरण देखभाल व फाळके स्मारक हे दोन विषय तहकूब ठेवण्याची मागणी केली.

कर्मचाऱ्यांना गणवेश
महापालिकेतील कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी रोख रक्कम न देता, कापड खरेदी करून देण्याची सूचना दिनकर पाटील, प्रकाश लोंढे, तानाजी जायभावे, लक्ष्मण जायभावे, अशोक सातभाई, यशवंत निकुळे यानी मांडली. वेळ पडल्यास जादा पैसे द्या; पण कर्मचाऱ्यांना चांगले गणवेश द्या, अशी भावना नगरसेवकांनी मांडली. त्यावर महापौर मुर्तडक यांनी नामांकित कंपनीकडून कर्मचाऱ्यांना कापड खरेदी करण्याचे आदेश देत, त्यासाठी बजेटमध्ये वाढीव तरतूद करण्याच्याही सूचना यावेळी प्रशासनाला दिल्या.

गढूळ पाण्यावरून प्रश्नांची सरबत्ती
शहरात पुरवठा होत असलेल्या गढूळ पाणीपुरवठ्यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला. नगरसेवक अशोक सातभाई, राहुल दिवे, नीलिमा आमले यानी गांधीनगर भागातील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचा आरोप केला. तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार केली. सातपूर, पंचवटी, सिडको या विभागातील नगरसेवकांनी गढूळ पाण्याबाबत प्रश्नांची सरबत्ती केली. पाण्याचा दाब वाढण्याची मागणी केली. नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांना कामाबाबत आक्षेप घेतले. मात्र, जलकुंभ लवकर स्वच्छ करून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असा दावा त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद जवान संदीपला अखेरचा निरोप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात खडांगळी (ता. सिन्नर) येथील जवान संदीप सोमनाथ ठोक (वय २५) शहीद झाल्याने तालुक्यात शोककळा पसरली आहे. खडांगळी येथे सोमवारी रात्री उशिरा शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. संदीपमागे आईवडील, दोन विवाहित बहिणी, एक लहान भाऊ असा परिवार आहे.

दोन दिवसांपूर्वी गणेश विसर्जन करताना एका बुडणाऱ्या युवकाला वाचवताना मुसळगाव येथील जवान संदीप शिरसाठ याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी पहाटे उरी सेक्टरवर दहशतवाद्यांशी लढताना संदीप शहीद झाल्याचे वृत्त पसरताच हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेने दहशतवाद्यांविरोधात संताप व्यक्त होत असून, सकाळपासून निषेधाचे सूर उमटत आहेत. संदीपच्या वस्तीवर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली असून, घराघरांसमोर रांगोळ्या काढून 'संदीप ठोक अमर रहे' अशा ओळी लिहून त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
वडांगळी परिसरात दुपारपासूनच पोलिस, महसूल विभागाने बंदोबस्तात वाढ केली असून, शहीद संदीपच्या घरापर्यंतच्या खडबडीत रस्त्यावर तात्पुरता मुरूम टाकून मलमपट्टी करण्यात आली.

लष्कर छावणीतली दोन वर्षे

जुलै २०१४ मध्ये संदीप ठोक भारतीय सैन्यदलात भरती झाला होता. त्याचे शिक्षण दहावीपर्यंत वडांगळी येथील शाळेत झाले, तर सिन्नर महाविद्यालयात एमसीव्हीसी शाखेतून तो उत्तीर्ण झाला होता. भारतीय सैन्यदलात भरती झाल्यानंतर तो बंगालमध्ये रुजू झाला. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी त्याची बदली ६, बिहार रेजिमेंटमध्ये काश्मीरमधील उरी येथे झाली होती. पाच जुलै रोजी संदीप गावी येऊन गेला. संदीपच्या मागे आईवडील, दोन विवाहित बहिणी, एक लहान भाऊ असून, वडिलांची शेती आहे. टेलर म्हणून खडांगळी येथे ठोक ते परिचित आहेत. संदीप अविवाहित असून, दिवाळीत घरी आल्यानंतर विवाहाबाबत निर्णय घ्यावयाचा होता.

जवानांना मानवंदना

नाशिक : जम्मू- काश्मीरमधील उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील जवानांना सेनेतर्फे ओझर विमानतळ येथे मानवंदना देण्यात आली. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी वीर जवानांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. खडांगळी (ता. सिन्नर) येथील संदीप ठोक, जाशी (जि. सातारा) येथील लान्सनायक चंद्रकांत शंकर गलांडे, नांदगाव (जि. अमरावती) येथील शिपाई विकास उर्फ पंजाब जानराव उईके यांचे पार्थिव वायुसेनेच्या विशेष विमानाने सायंकाळी ओझर येथे आणण्यात आले. ब्रिगेडीअर एस. के. डे आणि स्टेशन कमांडर ग्रुप कॅप्टन पी. के. आनंद यांनी शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण केले. सेनेच्या वतीने शहिदांना मानवंदना देण्यात आली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीदेखील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन, आमदार जयंत जाधव, बाळासाहेब सानप, अनिल कदम, देवयानी फरांदे, सीमा हिरे आदींनीदेखील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मायेच्या वर्षावाने हरखली ‘माहेरवाशीण’!

$
0
0

vijay.mahale@timesgroup.com
Tweet : @vijaymahaleMT

नाशिक : सासुरवाशिणीसाठी मातृत्व हा सुखसोहळाच... प्रसूतीसाठी ती माहेरी येते तेव्हा काळजी घेणारी अन् जिवापाड जपणारी मायेची माणसं सोबतीला पाहून तिला हायसे वाटते... मरणयातना अन् पुनर्जन्म देणारी प्रसूतीची गुंतागुंत तिला सुलभ वाटून जाते... असे एखाद्या पक्षाच्या बाबतीत घडत असेल तर! आश्चर्य वाटतेय ना? पण हे खरे आहे.

तोरणानगरमधील एका कुटुंबात सलग सहाव्यांदा दुर्मिळ व्होला पक्षीण प्रसूतीसाठी आलीय. जणू हे कुटुंब तिचे माहेरच. मानवता अन् ममत्वाचे हे नाते कोणत्याही सीमेपलीकडचेच!

पक्षी कुणाच्या घराच्या गॅलरीत घरटे करतात. कुणाच्या अंगणात दाणे टिपण्यासाठी येतात, तर कुणाच्या ओसरीत स्वत:ची तहान भागवितात. पक्षी आणि माणूस यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते त्यामुळे अधिक वृद्धिंगत होत जाते. मात्र, पवननगरजवळील तोरणानगर परिसरात व्होला नावाची दुर्मिळ पक्षीण चक्क प्रसूतीसाठी मुक्कामी आलीय. तीही एकदा नव्हे, तर सहाव्यांदा. कबुतरासारख्या दिसणाऱ्या या पक्ष्याला अंडी घालण्यासाठी हेच घर अधिक सुरक्षित वाटते. पिलांच्या सुरक्षित भविष्यासाठी हा पक्षी वारंवार येथेच येतो. त्यामुळे तो या घरातील एक सदस्यच बनला आहे.

शहरातील सरस्वती हायस्कूलमधील बी. एस. पवार या शिक्षकाच्या घरात सध्या या व्होला पक्ष्याचा मुक्काम आहे. घराच्या गॅलरीत एका कोपऱ्यात त्याने मोजक्याच काड्यांच्या सहाय्याने छोटेसे घरटे बनविले आहे. यात 'व्होला' मादीने दोन अंडी घातली असून, त्यातून पिलेही बाहेर आली आहेत. अवघ्या आठ-दहा दिवसांत मोठी होणारी पिले आता आकाशात भरारी घेण्यासाठी सज्ज होणार आहेत. दरम्यान, व्होला पक्षी जोडीचे आगमन, मादीचे अंडी घालणे अन् पिलांचे संगोपन हा पवार कुटुंबासाठीच नव्हे, तर तोरणानगरवासीयांसाठी आनंदाचा सोहळा ठरतो आहे.

कसा आहे 'व्होला' पक्षी?

शेतकऱ्याचा मित्र मानल्या जाणाऱ्या 'व्होला' पक्षाचे वास्तव्य उजाड माळरानावर असते. अतिशय मोजक्या काड्या गोळा करीत 'व्होला' पक्ष्याची जोडी घरटे विणते. घरट्यातच विष्टा टाकून त्यापासून घरटे पक्के केले जाते. मादी एकावेळी दोन अंडी घालते. अंडी उबविण्याच्या काळात मादी कुठेही जात नाही. मानवी हस्तक्षेप किंवा सहवास या पक्ष्याला फारसा आवडत नाही. अंड्यांमधून पिले बाहेर आल्यावर आठ ‌दिवसांत ती भरारी घेण्यासाठी सज्ज होतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळ्यात पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । धुळे

राज्यात मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे शांततेने निघत असल्याने त्याचे सर्वत्रच कौतूक होत असताना धुळ्यात मात्र शेतकऱ्यांनी पाण्यासाठी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली.

हक्काचे पाणी मिळावे यासाठी धुळ्यात आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पाण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला तसेच जिल्हाधिकाऱ्याची गाडी अडवली. शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी शेतकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केला. पोलिसांच्या या लाठीहल्ल्यात काही महिला जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शेतकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याने तसेच महिला जखमी झाल्याने संतापलेल्या आंदोलक शेतकऱ्यांने जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली. जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंसक आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी १०० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले असून यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक

$
0
0

पाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक; शेतकऱ्यांवर लाठीमार

म. टा. वृत्तसेवा, धुळे

गेल्या काही महिन्यांपासून अक्कलपाडा धरणाअंतर्गत असलेल्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यासाठी वेळोवेळी शेतकऱ्यांनी आंदोलने, रास्ता रोको करून निवेदने देऊनही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे डाव्या कालव्यालगतच्या अकरा गावातील शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन तास आंदोलन केले. मात्र, त्याचीही दखल न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयावर दगडफेक ‌केली. यावेळी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. यामुळे काहीकाळ या परिसरात तणावाचे वातावरण होते. या लाठीमारात कार्यालयातील काही महिला कर्मचारीही जखमी झाल्या आहेत.

आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेण्याची मागणी केली होती मात्र, त्यांनी भेट घेण्यास नकार दिला. यावर प्रशासनाशी चर्चेसाठी जात असलेल्या आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला पोलिसांनी अटकाव केल्याने संप्तत जमावाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक सुरू झाली. यावेळी पोलिसांनी लाठीमार केल्याने परिसरात गोंधळ उडाला. पोलिसांनी शंभराहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले.

भीतीचे वातावरण; राजकीय हस्तक्षेप

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सुमारे अर्धा तास दगडफेक सुरू होती आणि पोलिसांची कुमक कमी असल्याने पोलिस मुख्यालयातून पोलिसांना पाचारण करून नियंत्रण मिळविणे शक्य झाले. तसेच ही दगडफेक शेतकऱ्यांनी केली नसून, एका राजकीय पक्षाच्या बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचा दावा आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांनी केला आहे.

प्रशासनाकडून खोटे आश्वासन

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्याचे काम पूर्ण करून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावे, ही मागणी नमूद करण्यात आली आहे. तसेच सिंचनविभाग व जिल्हा प्रशासनाला यापूर्वी गेल्यावर्षीही डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबत निवेदने देण्यात आली होती. त्यावेळी आश्वासन देण्यात आले होते की, जानेवारीमध्ये लेखी आश्वासन देऊन मार्चमध्ये डाव्या कालव्याचे काम पूर्ण होऊन शेतकऱ्यांना पाणी देण्यात येईल. पंरतु, बराच कालावधी उलटूनही कालव्यातून पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे गेल्या महिन्यातही रास्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांनी केले होते. याप्रसंगी २ सप्टेंबरला कालव्याचे काम पूर्ण करून पाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, प्रशासनाचे सर्व आश्वासने खोटे ठरल्याने डाव्या कालव्यालगत येणाऱ्या ११ गावातील शेतकऱ्यांनी मंगळवारी बेमुदत आंदोलनाचा पवित्रा घेतला.


आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करीत २ ऑक्टोबरला डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, आंदोलनाच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी येऊन आंदोलनकर्त्यांना सांगावे, असा जोर धरण्यात येत होता. मात्र, प्रोटोकॉलनुसार मागणी मान्य केल्यावरही अट्टहास धरला व आंदोलनाच्या ठिकाणी न गेल्याने शेतकरी संप्तत झालेत.

- दिलीप पाढंरपट्टे, जिल्हाधिकारी


शेतकऱ्यांनी पाण्यासाठी केलेल्या आंदोलनाविषयी विचारणा करण्यासाठी आले होते. मात्र, जिल्हा प्रशासन व सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी चिडले असावेत.

- कुणाल पाटील, आमदार धुळे ग्रामीण


शेतकरी शेतीसाठी पाण्याच्या मागणीसाठी आले होते. मात्र, प्रशासनाने त्यांची दखल न घेता त्यांच्यावर अन्याय केला. गेल्या महिनाभरात दोनवेळा अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यात आले. मात्र, त्याचा शेतीसाठी काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे हे पाणी शेतीला पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाने मार्ग काढला पाहिजे.

- बाळू सोनवणे, शेतकरी संघटना धुळे जिल्हा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ धुळे बसस्थानकात खड्डेच खड्डे

$
0
0

पावसामुळे आगाराची दयनीय अवस्था; प्रवाशांचे हाल

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरात गणपती विसर्जनाच्या दिवसापासून पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे बस स्थानक व आगारात पावसामुळे सुमारे ६० ते ७० छोटे-मोठे खड्डे झाले आहेत. यामुळे प्रवाशांसह बसचालकांना कसरतींना सामोरे जावून बसस्थानकात प्रवेश करावा लागत आहे. तर महामंडळाकडून सोमवारनंतर खड्डे बुजविण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती परिवहन विभागातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

गुरूवारपासून गणपतीबाप्पाला निरोप देताना पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर शहरातील जोरदार पावसामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे बसस्थानक व आगारात प्रवेशद्वारापासून ते आगारापर्यंत यासर्व प‌रिसरात मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. याकडे परिवहन विभागाने दुर्लक्ष करीत असल्याने बसचालकांसह प्रवाशांनाही चिखलातून मार्ग काढावा लागत आहे.

काम कधी होणार?

शहरातील बसस्थानकात दररोज विविध जिल्ह्यासह परराज्यातील एकूण ३,५०० बसेसच्या फेऱ्या होतात. हजारो प्रवाशी ये-जा करतात यामुळे सर्वांनाच या खड्ड्यांचा त्रास होतो. त्यासाठी महामंडळाने तत्काळ खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेवून प्रवाशी व बसचालकांचा होणारा संघर्ष दूर करावा, असे एका बस चालकाने 'मटा'शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहाद्यात शेतकऱ्यांचा मोर्चा

$
0
0

धुळे : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. यंदादेखील पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे खरीप हंगाम हातातून गेल्याने सरकारने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि. २०) मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे पाच हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

शहादा तालुक्यात अनियमित पावसामुळे खरीप हंगाम हातातून गेल्यावरही महसूल विभागाने तालुक्यातील गावाची नजर आणेवारी ५० पैशापेक्षा जास्त लावल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी शहादा प्रांत कार्यालयावर हा मोर्चा काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेच्या ‘त्या’ आंदोलनात कायकर्ते दोषी

$
0
0

पोलिसांना मारहाण केल्याने वर्षभराचा कारावास

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तर भारतीय रहिवाशांचा कार्यक्रम उधळून पोलिसांना मारहाण करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याला कोर्टाने दोषी ठरवत एका वर्षाच्या सश्रम कारावासाची, तसेच सहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपीने दंडाची रक्कम भरल्यास ती जखमी पोलिस कर्मचाऱ्याला, तसेच साक्षीदाराला देण्याचे आदेशही प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांनी दिले.

प्रदीप चंद्रकांत वझरे, असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यात बस्तान बांधत असताना पक्षाकडून परप्रांतीय नागरिकांना जोरदार विरोध झाला. नाशिक शहरातही मनसेतर्फे वेळोवेळी परप्रांतीय नागरिकांविरोधात आंदोलने झाली. तसेच हिंसक विरोधदेखील झाला. २६ जानेवारी २००९ रोजी सातपूर परिसरातील महाराष्ट्र हौसिंग कॉलनीतील महापालिकेच्या शाळा क्रमांक ९५ व ९६ मध्ये उत्तर भारतीय नागरिकांनी राष्ट्रीय एकात्मता अभियानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या ठिकाणी सातपूर पोलिस स्टेशनचे कर्मचारी किशार जयराम महाले कर्तव्यावर होते. यावेळी आरोपी प्रदीप वझरेसह १५ ते १६ कार्यकर्त्यांनी प्रवेश करून नागरिकांना मारहाण केली. साऊंड सिस्टिम, मंडप, खुर्च्या, गाद्या यांचेही नुकसान केले. परप्रांतीय नागरिकांचा बचाव करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर जमावाने हल्ला केला. यात, महाले व खटल्यातील साक्षीदार प्रसाद बैरागी जखमी झाले. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अॅड. सुधीर कोतवाल यांनी सरकारी पक्षातर्फे काम पाहिले. सरकारी पक्षातर्फे एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणीअंती कोर्टाने वझरेला दोषी ठरवत एक वर्ष सश्रम कारावास, तसेच सहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम भरल्यास त्यातील पाच हजार रुपये कॉन्स्टेबल महाले यांना तर पाचशे रुपये साक्षीदार प्रसाद बैरागी यांना देण्यात यावे, असे आदेश कोर्टाने दिले. आरोपीला कलम १४७, ३२३, ३५३, ४५२ आणि ४३५ नुसार शिक्षा झाली. या खटल्यात १५ ते १६ संशयित होते. मात्र, इतर संशयितांना पोलिस तसेच साक्षीदार कोर्टात ओळखू शकले नाही. त्यामुळे रमेश साळुंखे, गोकुळ पगारे, ऋषिकेश चौधरी आणि समाधान जाधव यांना संशयाचा फायदा मिळून सोडून देण्यात आले, तर उर्वरित संशयितांविरोधात कोणताही पुरावा नसल्याने त्यांची निर्दोष मुक्तता झाली.

राजकीय आंदोलकांना चपराक

शहरात राजकीय पक्षांची आंदोलने सातत्याने होतात. बंद, मागण्यांसाठी सर्वसामान्यांना वेठीस धरले जाते. राजकीय आंदोलनाआड मारहाण, तोडफोड, लूट असेही प्रकार सर्वसामान्यांनी अनुभवले आहेत. पोलिस गुन्हा दाखल करतात. मात्र, कार्यकर्त्यांना त्याचा फरक पडत नाही, असा सार्वत्रिक अनुभव या खटल्याने खोटा ठरवला. राजकीय पक्षांमार्फत केल्या जाणाऱ्या मुजोरीला खपवून घेतले जाणार नाही, असा थेट इशारा न्याय व्यवस्थेने दिला असून, राजकीय प्रलंबित खटल्यांना गती देण्याची मागणी या निमित्ताने केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images