Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शाळा-कॉलेजेसही बंद!

$
0
0

बहुतांश संस्थांकडून सुटी जाहीर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नगर जिल्ह्यातील कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (२४ सप्टेंबर) शहरात निघणाऱ्या मोर्चाचा परिणाम इतर क्षेत्रांप्रमाणे शाळा आणि कॉलेजेसवरही होणार आहे. मोर्चाच्या निमित्ताने शहरात दाखल होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता काही शैक्षणिक संस्थांनी शाळा व कॉलेजेसना सुटी जाहीर केली आहे. तर, काही शाळांकडून याबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. तरीही शनिवारी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर विशेष परिणाम जाणवणार आहे.

मोर्चामधील सहभागींची संभाव्य अफाट संख्या लक्षात घेता आयोजकांनीही शिस्तबध्दतेवर भर दिला आहे. ऐनवेळी शहरातील वाहतूक व्यवस्थेवर तणाव निर्माण होऊ नये, यासाठी शहराच्या चारही बाजूकडील मोकळ्या मैदानांवर बाहेरून येणाऱ्या वाहनांचे पार्किंग ठेवण्यात आले आहे. विविध विभागांमधून नाशिककडे येणाऱ्या वाहनांसाठी ठराविक विभागातच पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चातील सर्व सदस्य हे जनार्दन स्वामी मठ नजीक तपोवनाच्या परिसरात एकत्रित जमणार आहेत. ही संख्या सुमारे १५ ते २० लाखांच्या घरात असल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. परिणामी शहरातील वाहतुकीसह सर्व मार्गांचे नियोजनही अत्यंत काटेकोरपणे पोलिसांना करावे लागणार आहे. याचा मोठा परिणाम शहराच्या विविध भागातून होणाऱ्या विद्यार्थी वाहतुकीवर होण्याची शक्यता काही शाळांनी लक्षात घेऊन सुटी जाहीर केली आहे. तर, काही संस्थांनी अद्याप सुटीची घोषणा केलेली नाही. अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांना दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुटी असते. त्यानुसार या शाळाही मोठ्या संख्येने त्या दिवशी बंद असतील. सुटी जाहीर करण्यात आलेल्या संस्थांमध्ये मराठा विद्या प्रसारक समाज, महात्मा गांधी विद्यामंदिर, जी. डी. सावंत कॉलेज, सपकाळ नॉलेज हब, ग्रामोदय शिक्षण संस्था, ब्रह्मा व्हॅली, एनआयटी पॉलिटेक्निक, धन्वंतरी मेडिकल कॉलेज आदी संस्थांनी सुटी जाहीर केली आहे. इतर मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये यासंदर्भात विचारविनिमय सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कायदा सुव्यवस्था अबाधित राखू

$
0
0

मराठा क्रांती मूकमोर्चा समितीची प्रशासनाला ग्वाही

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातून शनिवारी (२४ सप्टेंबर) निघणाऱ्या मराठा क्रांती मूकमोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गोल्फ क्लब मैदानावर मोर्चेकऱ्यांसमोर यावे, असा आग्रह आयोजकांकडून धरण्यात आला आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास नकार दिल्याने आयोजकांनी त्यांच्याकडे उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर एक पाऊल मागे येत जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत विचार करू अशी भूमिका घेतल्याने निर्माण होऊ पाहणारा तणाव निवळला. कायदा सुव्यवस्था अबाधित राखू, अशी ग्वाही आयोजकांनी प्रशासनाला दिली.

सध्या मराठा क्रांती मूकमोर्चाची जिल्ह्यात जोरदार तयारी सुरू आहे. मोर्चाच्या पूर्वतयारीसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी बैठक बोलावली होती. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या बैठकीला खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, मराठा विद्या प्रसारकच्या सरचिटणीस नीलिमा पवार, आमदार अनिल कदम, माजी आमदार शिरीष कोतवाल, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, अव्दय हिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदी उपस्थित होते.

मराठा समाजाच्या वतीने सध्या राज्यभरात नियोजनबध्द मूकमोर्चे काढण्यात येत आहेत. नाशिकमध्ये येत्या शनिवारी (२४ सप्टेंबर) मोर्चा निघणार असून, त्यासाठीची जय्यत तयारी गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. या मोर्चामध्ये जिल्हाभरातून लाखो मराठा बांधव सहभागी होणार असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी केले.

मोर्चाला १५ ते २० लाख समाजबांधव येणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी गोल्फ क्लब मैदानावर यावे, असा आग्रह आयोजकांनी धरला. मात्र असे करणे प्रोटोकॉलला धरून नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गोल्फ क्लब येथे येण्यास नकार दर्शविला. मुख्यमंत्री विधानभवनाबाहेर येऊन निवेदन स्वीकारतात मग आपण मोर्चासमोर का येत नाही असा मुद्दा पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केल्याने शाब्दीक खडाजंगी झाली. गोल्फ क्लब येथे येण्याबाबत आपण विचार करू, असे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजकांना सांगितले. जिल्हाभरातून येणाऱ्या मराठा बांधवांच्या वाहनांसाठी सात ठिकाणी पार्किंगस्थळे निश्‍चित करण्यात आली आहेत. या ठिकाणी स्वयंसेवक नेमा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. पार्किंगच्या ठिकाणी चोऱ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहनांचे नुकसान होते. त्यामुळे दक्ष राहण्याचे निश्चित करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गांवरून हा मोर्चा जाणार असल्याने शहर वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले.

अवजड वाहतूक घोटीमार्गे वळविणार

द्वारका ते औरंगाबाद नाका, तसेच पुणे महामार्गावरही वाहनांची वर्दळ राहणार असल्याने अवजड वाहतूक घोटीमार्गे सिन्नरकडे वळविण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. २४ सप्टेंबरला शाळांना सुटी जाहीर करा, अशी मागणी करण्यात आली. मात्र हा निर्णय शैक्षणिक संस्थांनी घ्यावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. चौथा शनिवार असल्याने सरकारी कार्यालये तसेच औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांना सुटीच असल्याने वेगळी सुटी जाहीर करण्याची आवश्यकता नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

असे आहे नियोजन
मोर्चात २० लाख बांधव सहभागाचा अंदाज, वॉकी टॉकी, ड्रोन कॅमेऱ्याची परवानगी घेण्याच्या सूचना, दहा हजार स्वयंसेवक असणार कार्यरत]
६० ठिकाणी वैद्यकीय पथक; सात ठिकाणी पार्किंग, शहर वाहतूक मार्गांत बदल, जादा बसेसचेही नियोजन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक होणार स्मार्ट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नवी दिल्ली/नाशिक

शहरी भागातील सोयी-सुविधांना चालना देऊन तेथील रहिवाशांचे रोजचे जगणे सुकर करण्याची क्षमता राखणाऱ्या 'स्मार्ट सिटी' योजनेतील तिसऱ्या टप्प्यात २७ शहरांच्या यादीत केंद्राने नाशिकचा समावेश केला आहे. नाशिकच्या स्मार्ट सिटीवर आता केंद्रानेच शिक्कामोर्तब केले असून, नाशिकसोबतच ठाणे, नागपूर, औरंगाबाद आणि कल्याण-डोंबविलीचा समावेश आहे. नाशिकचा समावेश झाल्याने शहरात आता २,१९४ कोटींचा आराखडा पाच वर्षांत राबविला जाणार असून, त्यात महापालिकेचे २५ टक्के, राज्य २५ टक्के, तर केंद्राचा ५० टक्के वाटा राहणार आहे. त्यामुळे नाशिकच्या विकासाला चालना मिळणार आहे.

२१९४ कोटींचा आराखडा

नाशिककरांची स्मार्ट सिटीची प्रतीक्षा केंद्र सरकारने संपवली असून, नाशिकचा त्यात समावेश केला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २७ शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक अकरावा आहे. स्मार्ट सिटीच्या समावेशामुळे आता नाशिकचा चेहरामोहरा बदलणार असून, पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. महापालिकेने केद्र सरकारला तब्बल २,१९४ कोटींचा आराखडा सादर केला असून, त्याला आता मान्यता मिळाली आहे. या आराखड्यानुसार क्षेत्र विकासांतर्गत जुन्या नाशिकमध्ये पुनर्विकास प्रकल्प राबविला जाणार असून, त्यासाठी ३६० कोटींचा खर्च येणार आहे, तसेच ग्रीन फिल्डअंतर्गत हनुमानवाडीचा विकास होऊन त्यासाठी ८५६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पॅनसिटी प्रोजेक्टअंतर्गत तंत्रज्ञानाच्या आधारे पाणीपुरवठ्यासाठी स्मार्ट मीटर व स्काडा सिस्टीम आणि पार्किंग व वाहतूक व्यवस्थेसाठी ९८० कोटींचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे पार्किंग, वाहतूक व्यवस्था आणि पाणीपुरवठ्याच्या कटकटीतून नाशिककरांची मुक्तता होणार आहे.
यासोबतच स्मार्ट सिटी अंतर्गत पीपीपी तत्त्वावर काही महत्वपूर्ण प्रोजेक्टही राबविले जाणार असल्याने स्मार्ट सिटीतील पीपीपी प्रकल्पांतर्गत निमाणी, द्वारका, नाशिकरोड बस स्थानकात वाणिज्य व वाहनतळ व्यवस्था करणे, पिकअपशेड उभारणे, तर सीएसआरअंतर्गत ऐतिहासिक संग्रहालय ट्रॅफिक पार्क नेहरू बायो डायव्हर्सिटीसह सायकल ट्रॅक एनएच-३ फ्लायओव्हर खालील जागेमध्ये सुशोभीकरणाचा त्यात समावेश आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून ठप्प असलेल्या नाशिकच्या विकासालाही चालना मिळणार आहे.

नाशिकमध्ये आज पहिली बैठक

दरम्यान, नाशिकचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यानंतर राज्य सरकारने स्थापन केलेल्या एसपीव्हीची पहिलीच बैठक बुधवारी होत आहे. एसपीव्हीचे अध्यक्ष उच्च व तंत्र विभागाचे प्रधान सचिव डॉ. सीताराम कुंटे अध्यक्षस्थानी असतील. स्मार्ट सिटीची ही पहिलीच बैठक असून, त्यात स्मार्ट सिटीच्या आराखड्यावर चर्चा केली जाणार आहे, तसेच पुढील काळात प्राधान्यक्रमाने राबविण्यात येणारे प्रकल्प व निधीसंदर्भातील तरतुदींवर चर्चा केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हेगारीत अल्पवयीनांचा टक्का वधारला

$
0
0

यंदा विधी संघर्षित मुलांची संख्या वाढली

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, जाळपोळ किंवा मारहाण अशा गंभीर गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा टक्का यंदा वधारला आहे. सामाजिक दृष्टिकोनातून ही गंभीर बाब असून, पोलिसही कायद्यापुढे हतबल असल्याचे दिसते. यंदा ऑगस्ट महिन्यापर्यंतच १५८ मुले कायद्याच्या कचाट्यात सापडले असून, २०१४ आणि २०१५ च्या तुलनेत ही वाढ लक्षणीय ठरली आहे.

शहर परिसरात होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांत आठ ते नऊ नऊ टक्के वाटा अल्पवयीन मुलांचा आहे. विशेषतः चोरीच्या गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा सहभाग धक्कादायक पध्दतीने वाढल्याचे दिसते. यंदा अवघ्या आठ महिन्यांत ५० अल्पवयीन मुलांना चोरीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी पकडले. मोबाइल चोरी, सायकल चोरी, वाहनांच्या बॅटऱ्या, स्पेअर पार्ट काढून घेणे असे गुन्हे या मुलांच्या हातातून घडले आहेत. पंचवटी, अंबड आणि उपनगर पोलिस स्टेशन हद्दीत अशा मुलांची संख्या जास्त आहे. नुकतेच पंचवटी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सव्वादोन लाख रुपये किमतीचे मोबाइल हस्तगत केले होते. त्यापूर्वी तब्बल ४० सायकल चोरी करणारे अल्पवयीन मुले पोलिस रेकॉर्डवर आले. अंबड पोलिसांनीदेखील नववी आणि दहावीतील दोघा मुलांना पकडले. मौजमजेसाठी या मुलांनीदेखील लाखो रुपयांच्या महागड्या सायकली लंपास केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. जाळपोळीच्या गुन्ह्यात यंदा १० मुलांना कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागले. सन २०१५ मध्ये हे प्रमाण अवघे तीन होते, तर त्यापूर्वी अशा गुन्ह्यांत एकही मुलगा सापडला नव्हता.

याबाबत बोलताना क्राईम ब्रँचचे सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी हा सामाजिक प्रश्न सुध्दा आहे. बदलती लाईफस्टाईल, महागड्या गॅझेटचे आकर्षण, बाईकची हौस अशा अनेक कारणांमुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळतात. अल्पवयीन मुले लागलीच प्रभावीखाली येतात. त्यामुळे मोठ्याकडून मिळणाऱ्या चुकींच्या मार्गदर्शनामुळेही गुन्हेगारी वाढते. प्रत्येक मुलाची मानसिकता वेगळी असून, त्याचा सर्वांनी गंभीरपणे विचार करायला हवा.

उंटवाडीरोडवरील बालनिरीक्षण गृहाचे मानद सचिव चंदूलाल शहा यांनी टीव्हीवरील गुन्हेगारी मालिकांकडे अंगुलीनिर्देश केला. अवघ्या १० ते १२ वर्षांची मुले चोरी करताना सापडतात, हे फारच वाईट आहे. पालकांचा मुलांशी संवाद नसणे ही देखील समस्या असल्याचे शहा म्हणाले. यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन अशा मुलांना दत्तक घ्यायला हवे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सारे गाव गहिवरले!

$
0
0

संदीपच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सिन्नर तालुक्यातील खडांगळी येथील लष्करी जवान संदीप सोमनाथ ठोक (वय २५) शहीद झाला. या घटनेमुळे सिन्नर तालुक्यात शोक व्यक्त केला जात असून, सोमवारी रात्री उशिरा जन्मगावी शासकीय इतमामात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने सारा तालुका गहिवरला आहे.

वडांगळी पंचक्रोशीत भारत माता की जय, संदीप ठोक अमर राहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास संदीपचे पार्थिव त्याच्या गावी पोहोचले. घराघरासमोर रांगोळ्या काढून संदीप ठोक अमर राहे अशा रांगोळ्या काढून त्यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भारतीय जवानांच्या खांद्यावर त्याचे पार्थिव पाहताच कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांना शोक अनावर झाला. भारतीय जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडत त्यास अखेरची सलामी देत रात्री ११ वाजेच्या सुमारास अग्निसंस्कार केले.

तत्पूर्वी खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे यांनी ठोक वस्तीवर जाऊन त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. सहकार राज्यमंत्री दादा भुसे, लष्करी अधिकारी, जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस अधिकारी, माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.

सहाव्यावेळी झाला भरती

खडांगळी गावातील १० जवान सैन्यदलात आहेत. जुलै २०१४ मध्ये संदीप ठोक भारतीय सैन्य दलात भरती झाले. त्यांचे शिक्षण १० पर्यंत वडांगळी येथील शाळेत झाले, तर सिन्नर महाविद्यालयात किमान कौशल्य शाखेतून उत्तीर्ण झाले. सहाव्या वेळी लष्करात भरती होण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले. त्याने पश्चिम बंगाल, बिहार, उरी येथे सेवा बजावली. संदीपच्या पश्चात आई, वडील, दोन विवाहीत बहिणी, भाऊ असा परिवार आहे.

खडांगळीत कडकडीत बंद

संदीप यास वीरमरण आल्याचे वृत्त कळताच खडांगळी ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला होता. संदीपचे पार्थिव रात्री उशिरा आल्यानंतर वस्तीवर येणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येत होते. नातेवाईक व ग्रामस्थांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावे, अशी मागणी केली. येथील शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी त्याच्या आठवणींचे स्मरण करीत त्याच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी भगव्या, पांढऱ्या व हिरव्या टोप्या परिधान केलेल्या सुमारे तीनशे विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून विद्यालयाच्या प्रांगणामध्ये 'शहीद संदीप ठोक अमर रहे !' असे शब्दचित्र तयार केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दप्तर गहाळ, नागरिकांचे हाल!

$
0
0

वाडी बु. ची सन २०१० पूर्वीची कागदपत्रे मिळेनात

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण तालुक्यातील हिंगळवाडी ग्रुपग्रामपंचायतमधील जुने उतारे व नमुने गहाळ झाल्यामुळे नागरिकांना मोठी अडचणी निर्माण झाली आहे. तत्काळ या प्रकारची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कळवण तालुक्यातील वाडी बु. ग्रामपंचायत अंतर्गत असोली, एकलहरे गाव येत असून, जुने उतारे नोंदी नसल्याचे आढळून आले आहे. फक्त २०१० पासून कागदपत्रे असल्याची खातरजमा झाली आहे. पंरतु, त्यामागील कागदपत्रे नाही, असे संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. ही बाब गांभीर्याची बनली आहे. जुने कागदपत्र मिळत नसल्याने नागरिकांची कामे खोळंबली असून, याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्मण झाला आहे.

रामदास देवरे, असोली यांनी ग्रामपंचायतीकडे १९८१ चे उतारे मागितले. पंरतु, ग्रामसेवक यांनी आपल्याकडे मागील काहीच उतारे नसल्याचे सांगितले. मग मागील कागदपत्रे गेली कुठे हा संशोधनाचा विषय बनला आहे. मागील दप्तर गहाळ झाले, तर नवीन दप्तर का केले नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. दप्तर गाळ झाले तर त्याचा पंचनामा का करण्यात आला नाही असा सवाल उपस्थित झाला आहे. याबाबत गटविकास अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांची देखरेख करण्याचे काम ग्रामसेवकाचे असते. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम गटविकास अधिकाऱ्याचे असते. परंतु, येथे कोणाचे काही घेणे देणे नसल्याचे दिसून आले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामपंचायतीचे कागदपत्रे गहाळ किंवा नष्ट झाली आहेत, तर नवीन कागदपत्रे का केली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

कोट

वाडी बु. ग्रामपंचायतीच्या मागील दप्तरचा शोध घेऊन दप्तर मिळाले नाही तर, दप्तराबाबत चौकशी करून दोषींवर कडक करावी करण्यात येईल.

- तुकाराम सोनवणे, गटविकास अधिकारी

आक्टोबर २०१० पासून येथे हजर झालो त्या वेळी मला दप्तर व नमुने उपलब्ध झाले नसल्यामुळे याबाबत ग्रामपंचायतीत ठरावही करण्यात आला आहे.

- रवींद्र ठाकरे, ग्रामसेवक

दप्तर मिळत नसल्यामुळे शासनाच्या कामात नागरिकांना अडथळा निर्माण झाला आहे. दप्तर तत्काळ उपलब्ध करून द्यावे. मागील दप्तर आले नाहीतर ग्रामपंचायतीला टाळे लावले जाईल.

- रामदास देवरे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देहदानासाठी ७०० नागरिकांचा पुढाकार

$
0
0

येवल्यात महारक्तदान शिबिरात निश्चय

म. टा. वृत्तसेवा, येवला

महाराष्ट्र शासन आणि नरेंद्राचार्य महाराज सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येवल्यात आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी तब्बल ७०० नागरिकांनी मरणोत्तर देहदानाची तयारी दाखवत सहमतीपत्रक भरून‌ दिले.

जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या वयाच्या पन्नासाव्या वर्षपूर्तीनिमित्त श्रीसंप्रदायच्या वतीने सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. त्यानिमित्त राज्यभर ठिकठिकाणी 'महारक्तदान' शिबिरांचे आयोजन केले जात आहे. राज्यातील सर्व शिबिरातून एकूण एक लाख रक्तपिशव्या संकलित करण्याचा संकल्प श्रीसंप्रदायाच्या वतीने करण्यात आला आहे. संकलित झालेल्या या रक्तपिशव्यांपैकी ५० हजार रक्तपिशव्या सीमेवरील सैनिकांकरिता, तर ५० हजार रक्तपिशव्या या गरजूंसाठी राज्यातील शासकीय रक्तपेढ्यांना देण्यात येणार आहेत.

येवल्यातील रक्तदान शिबिरात ५४ रक्तदात्यांनी रक्त देऊन या उपक्रमात सहभाग नोंदवला. यावेळी नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, सुनील शिंदे, प्रभाकर झळके, सचिन शिंदे, प्रमोद सस्कर, प्रभाकर आहिरे आदींसह तालुका श्रीसंप्रदाय सदस्य उपस्थित होते. या शिबिराप्रसंगी येवला तालुक्यातील ७०० नागरिकांनी मरणोत्तर देहदानाचे पत्रक भरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिरुपती-नगरसूल’ रेल्वेगाडी पुन्हा रुळावर

$
0
0

प्रवाशांकडून निर्णयाचे स्वागत

म. टा. वृत्तसेवा, येवला

प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याच्या कारणास्तव गेल्या महिनाभरापासून बंद पडलेली 'नगरसूल-तिरुपती' ही साप्ताहिक प्रवाशी रेल्वेगाडी पुन्हा एकदा धावण्यास सुरुवात झाली आहे. महिनाभराच्या विश्रांतीनंतर आंध्रातील बालाजींचे तिरुपती अन् साईबाबांचे शिर्डी या दोन धार्मिकस्थळांना जोडणारी 'नगरसूल-तिरुपती' रेल्वे पुन्हा सेवेत दाखल होताना झाल्याने प्रवाशी वर्गाने आनंद व्यक्त केला आहे.

दक्षिण मध्य रेल्वेचे शेवटचे स्थानक असलेल्या येवला तालुक्यातील नगरसूल रेल्वेस्थानकापर्यंत अनेकदा नवीन रेल्वे सुरू होतात अन् प्रवाशांचा प्रतिसाद न मिळाल्याचे कारण देत बंद होतात. तशीच गत 'तिरुपती-नगरसूल' या प्रवाशी रेल्वेची झाली होती. गेल्या महिनाभरापासून बंद असलेली ही रेल्वे आता पुन्हा सुरू झाली आहे. साईबाबाची शिर्डी व बालाजीचे तिरुपती या दोन धार्मिकस्थळांना जोडणारी तिरुपती एक्स्प्रेस दाखल झाल्याने प्रवासी, भाविकांसह नगरसूल स्थानकावरून प्रवाशांना शिर्डीला नेणाऱ्या अनेक वाहनचालक, वाहनमालक तसेच ग्रामस्थांनी तिचे जल्लोषात स्वागत केले. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर ही रेल्वे पुन्हा सुरू होताना नगरसूल स्थानकावर आली.

असे असेल वेळापत्रक

आता रेल्वेच्या तिमाही वेळापत्रकानुसार सप्टेंबर, आक्टोबर, नोव्हेंबर या तीन महिन्यांतील दर शुक्रवारी 'तिरुपती-नगरसूल' ही प्रवाशी रेल्वेगाडी सकाळी साडेसात वाजता तिरुपती येथून निघेल व शनिवारी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी नगरसूल स्थानकात येईल. रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी पुन्हा तिरुपतीकडे निघताना तिरुपती येथे सोमवारी रात्री दोन वाजून तीस मिनिटांनी पोहचेल. तिचा मार्ग तिरुपती, रेणुगुंडा, नालगोडा, चेरापली, सिंकदराबाद, उदगीर, लातूर, औरंगाबाद, नगरसूल असा असेल. ही माहिती नगरसूल रेल्वे स्टेशन अधीक्षक हरिष महाले, सह स्टेशनमास्तर अनिल कुमार, बुकिंग क्लर्क मंडल कुमार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोर्चे महाराष्ट्राच्या विकासासाठी हानिकारक

$
0
0

भालचंद्र मुणगेकर यांचे प्रतिपादन; आरक्षणाचे समर्थन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रात सध्या मोर्चांचे पेव फुटले असून ते समाजस्वास्थासाठी अत्यंत हानिकारक आहे. काही दिवसांनी महाराष्ट्राची ओळख ही मोर्चांचे राज्य म्हणून होईल. राज्याची सामाजिक व अार्थिक परिस्थिती जपायची असल्यास अशा मोर्चांना आवर घालणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष व माजी राज्यसभा सद्स्य भालचंद्र मुणगेकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

शासकीय विश्रामगृहावर मंगळवारी (दि. २०) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात ज्या मुलीवर बलात्कार होतो त्या समाजातील व्यक्तीच मोर्चे काढतात. दुर्दैवाने इतर समाज पुढे येत नाही. त्याकरीता सर्व सामाजाने पुढे येऊन त्या घटनेचा निषेध करायला हवा. मोर्चे काढून काही साध्य होत नाही. या मोर्च्यांमुळे महाराष्ट्राला उदारमतवादी व पुरोगामी म्हणावे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. एक समाज काही कारणामुळे मोर्चा काढतो, त्यावर दुसरा समाज प्रतिमोर्चा काढतो. यातून सामाजिक समतोल बिघडते आहे असे मला वाटते. या बाबींची सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधी पक्षांनीही गांभीर्याने विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कोपर्डीत ज्या मुलीवर बलात्कार झाला त्या गावातील सर्व दलितांनी गुन्हागाराला फाशी व्हावी असे स्टॅम्प पेपरवर लिहून दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.

आरक्षणाला विरोध नाही

आरक्षणाच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, आमचा आरक्षणाला विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण आर्थिक निकषावर मिळावे ही आमची इच्छा आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्यास आरक्षणाच्या यादीत फक्त ब्राह्मण राहतात त्यांनादेखील आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे, असा आमचा आग्रह आहे. मोर्चांनी सरकारवर दबाव आणून परिस्थिती बदलणार नाही, असे त्यांनी सांगितले. अॅट्रॉसिटी कायद्याबाबत त्यांनी, हा कायदा रद्द करता येणार नसल्याचे मत व्यक्त केले. मात्र या कायद्याचा चुकीच्या पद्धतीने वापर होत असेल तर तो सामाजिक गुन्हा आहे, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसामुळे जनजीवन विस्कळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवसभर ढगाळ हवामान, पावसाची रिपरिप यांमुळे मंगळवारी शहरवासीयांचे जनजीवन विस्कळीत झाले. कधी संततधार, कधी भुरभुर, कधी उघडीप यांमुळे नागरिकांची दैना उडाली.

काही आठवड्यांपासून गायब झालेला पाऊस शुक्रवारपासून पुन्हा नाशिकमध्ये परतला आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंत १५८. ६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. एकट्या पेठ तालुक्यात ६९ मिलीमीटर पाऊस झाला. त्याखालोखाल दिंडोरीत ३५, इगतपुरीत २९, सुरगाण्यात १९ मिलीमीटर पाऊस झाला. त्र्यंबकेश्वर, नाशिक, निफाड आणि कळवण तालुक्यांमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. मालेगाव, नांदगाव, चांदवड, बागलाण, देवळा, सिन्नर आणि येवला तालुक्यात मात्र हा पाऊस झाला नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात १ जून ते २० सप्टेंबर २०१५ या कालावधीत ९,६७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. म्यंदा १४ हजार ८८७ मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरी ९९२.५ मिलीमीटर (९२.३७) टक्के पावसाची नोंद झाली आहे.

शहरात ९८४.२ मिमी पाऊस

शहरात १ जूनपासून आतापर्यंत ९८४.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी कमाल तापमान २५.८ अंश सेल्सियस तर किमान तापमान २१.८ अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले. सोमवारी सकाळी साडे आठ ते मंगळवारी सकाळी या २४ तासांत शहरात ७.३ मिमी पावसाची नोंद झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हक्कांबाबत जागरूक राहा

$
0
0

ग्राहक जनजागृती शि‌बिरातील तज्ज्ञांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बदलत्या जीवनशैलीमुळे खाद्यपदार्थांपासून दैनंदिन वापराच्या अनेक उत्पादनांसाठी आपण विक्रेत्यांवर अवलंबून असतो. त्यासाठी पैसे मोजतो. त्यामुळे ग्राहक म्हणून आपण आपल्या हक्कांविषयी जागरूक राहायलाच हवे, असे आवाहन मंगळवारी (दि. २०) ग्राहक जनजागृती शिबिरातील तज्ज्ञांनी केले.

राज्याचा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्थेने 'ग्राहक फसवणूक विरुद्ध जनजागृती' शिबिराचे आयोजन केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या शिबिराला मान्यवर म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके, जिल्हा धान्य वितरण अधिकारी सुभाष भाटे, संस्थेचे पदाधिकारी दिनेश भंडारे, स्टिव्हन फर्नांडिस, आनंदिता कोहूर आदी उपस्थित होते.

या वेळी भंडारे म्हणाले, भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्थेने ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी काम करताना मेडिएशन सेंटर सुरु केले आहे. न्यायालयीन प्रक्रियेतील वेळ वाचवितानाच येथे तक्रारदार व उत्पादक कंपन्यांमध्ये तडजोडीचा मार्ग वापरला जातो. ग्राहकांनी पॅकबंद खाद्यपदार्थ खरेदी करताना अॅगमार्क असलेले पदार्थ घेणे, इलेक्ट्रिकल साहित्यासाठी बीईई रेटींग पाहणे, आय.एस.आय. मार्कची उत्पादने खरेदी करणे गरजेचे असल्याचे सांगितले. ग्राहकांनी फसवणूक झाल्यास योग्य ठिकाणी दाद मागावी असे यावेळी आवर्जून सांगण्यात आले. आपल्या अडचणी आणि प्रश्नांबाबत माहितीसाठी संस्थेचा टोल फ्री क्रमांक १८००२२२२६२ या क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन करण्यात आले.

आर्थिक गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी याबाबत फर्नांडिस यांनी मार्गदर्शन केले. तसेच विमा, म्युच्युअल फंड आदी सुरक्षित गुंतवणूक पर्यायाबाबतही माहिती देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा मोर्चाला आध्यात्मिक संप्रदायाचे बळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्त्या करण्यात याव्यात आदी मागण्यांसाठी जिल्हाभरातील मराठा समाजबांधव रस्त्यावर उतरणार असून, त्यांना आता धार्मिक आणि आध्यात्मिक संस्थांचे पाठबळही मिळू लागले आहे.

मराठा समाजाकडून राज्यभरात मूक मोर्चांचे आयोजन केले जात आहे. सरकारचे मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरून विराट मोर्चात सहभागी होत आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली मोर्चाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव या मोर्चात सहभागी होणार असल्याने सिंहस्थापेक्षाही काटेकोर नियोजन करण्याकडे आयोजकांसह प्रशासनानेही भर दिला आहे. मोर्चाला कुठल्याही परिस्थितीत गालबोट लागू नये, शांततेतच मोर्चाचा समारोप व्हावा यासाठी सूक्ष्म नियोजन केले जाऊ लागले आहे. मोर्चेकऱ्यांकडून शांतता आणि संयमाचा परिचय दिला जात असल्याने विविध सामाजिक संघटनांचे त्याकडे लक्ष वेधले जाऊ लागले आहे. त्यामुळे या मोर्चाला विविध स्तरातून पाठिंबा लाभतो आहे. इतकेच नव्हे, तर अशा अनेक संघटनांनी मोर्चाच्या आयोजनातही सहकार्य देऊ केले आहे. एकीकडे वकील, इंजिनीअर्स, डॉक्टर्स असे सर्वच स्तरांतील घटक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. आता जिल्ह्यातील धार्मिक आणि आध्यात्मिक संघटनांनीही मराठा समाजाच्या मोर्चाला पाठबळ देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शांतिगिरी महाराज यांचा भक्तपरिवार, जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने या मूक मोर्चाला पाठिंबा दिला असून, ते शनिवारी या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. अध्यात्माच्या मार्गावर चालणारा मोठा भक्तपरिवार नाशिक जिल्ह्यात असून, तो सहभागी झाल्यास मोर्चाची ताकद वाढणार आहे.

अण्णासाहेब मोरे यांच्या गुरूमाऊली सेवेकरी संप्रदायाने या मोर्चाला अद्याप पाठिंबा जाहीर केला नसला तरी त्यांचा मोठा भक्तपरिवार मराठा समाजातील आहे. त्यामुळे ते या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.

जाट आरक्षण समितीचाही पाठिंबा

अखिल भारतीय जाट आरक्षण संघर्ष समितीने मराठा क्रांती मूक मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे. समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष यशपाल मलिक यांच्या अध्यक्षतेखाली शहरात नुकतीच बैठक घेण्यात आली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शांताराम लाठर यांच्यासह अनेक पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. मराठा समाज व जाट समाजाची आरक्षणाची स्थिती देशात एकसमानच असल्याने या मोर्चाला पाठिंबा देणे नैतिक कर्तव्य असल्याचे या समितीने म्हटले आहे.

पुण्यतिथीचा कार्यक्रम ढकलला पुढे

जोग महाराज भजनी मठाधिपती व वारकरी पंथाचे आधारस्तंभ माधव महाराज घुले यांच्या मातोश्रींची पुण्यतिथी शनिवारी २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेची होती. मात्र, मराठा क्रांती मोर्चामुळे या कार्यक्रमाची वेळ दुपारी चारची ठेवण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनंजय मुंडे करणार पाण्यासाठी उपोषण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतकऱ्यांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत पाणी सोडण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्याप्रमाणे पाणी न सोडल्यास शेतकरी हितासाठी आपण स्वतः उपोषणाला बसू, असे आश्वासन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिले. ते धुळ्यामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधत होते.

धनजंय मुंडे हे बुधवारी धुळ्यातील शासकीस विश्रामगृहात आले होते. त्यांनी शेतकऱ्यांकडून अक्कलपाडा प्रकरणी मंगळवारी घडलेल्या घटनेची माहिती घेऊन जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आंदोलन केले होते. त्यांचा आंदोलनाचा पवित्रा बरोबर होता. परंतु, काही जणांमुळे आंदोलनास गालबोट लागले आणि दगडफेक झाली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांची सुटका होण्यासाठी प्रशासनाने मदत करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी दिलीप पाढंरपट्टे यांनी आश्वासन दिले आहे की, येत्या ३० सप्टेंबरला डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येईल. त्यानुसार पाणी सोडले नाही, तर आपण स्वत: पाण्यासाठी उपोषण करू, असा इशारादेखील धनंजय मुंडे यांनी दिला.
याप्रसंगी उपस्थित असलेले शेतकरी व ग्रामस्थांनी पाण्यासंदर्भातील जोरदार मागणी केली. तसेच कालच्या आंदोलनप्रसंगी प्रशासनाने जी कठोर कारवाई केली त्याबाबत काहींनी नाराजी व्यक्त केली. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, म्हाडाचे माजी सभापती किरण शिंदे, जि. प. सभापती किरण पाटील, युवा नेते अनिकेत पाटील आदी उपस्थित होते.

जखमी आंदोलकांवर रुग्णालयात उपचार

अक्कलपाडा धरणाचा डावा कालवा सुरू करण्यासाठी मंगळवारी झालेल्या आंदोलन प्रकरणी पोलिसांनी ७६ आंदोलकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. यापैकी सहा ते सात आंदोलक जखमी असून, त्यांच्यावर शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार चालू आहेत.

शिवसेनेकडून घटनेचा निषेध

या घटनेच्या संदर्भात शिवसेनेने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अक्कलपाडा प्रकल्प आजही अपूर्ण स्थितीत आहे. शिवसेनेने वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे या प्रक्लपातील डाव्या कालव्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले. उर्वरित १० टक्के कामासाठी व सय्यदनगर येथील ३० ते ३५ घरांच्या पुनर्वसनाचा विषय तत्काळ मार्गी लावून अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरले जाऊ शकते. त्यानंतर डाव्या कालव्यातून शेतीला पाणी मिळू शकते मात्र, ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या दबावाला बळी पडणा-या प्रशासनाने आंदोलन करणा-या शेतक-यांवर लाठीचार्ज केला ही बाब निंदनीय असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कठीण, पण अशक्य नाही!

$
0
0

सीताराम कुंटेनी दिला विश्वास, करवाढीचे अधिकार महापालिकेलाच

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे मोठे आव्हान असले तरी, अशक्य नसल्याचा विश्वास एसपीव्हीचे अध्यक्ष व तंत्र व उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांनी व्यक्त केला. नवीन संकल्पना शहरी प्रशासनात आणण्यासाठी ही योजना असून, योजनेतील बारकावे तपासून त्यात आवश्यक बदल केला जाणार असल्याचा दावाही त्यांनी केला. एसपीव्ही कंपनीला करवाढीचे कोणतेही अधिकार राहणार नसून, केवळ केलेल्या कामांवर युजर्स चार्जेस लावण्याचा अधिकार राहणार असल्याचे सांगत, कंपनी प्रतिमहापालिका होणार नसल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला. स्मार्ट सिटीतल्या रेट्रोफिटिंग अंतर्गत असलेल्या जुन्या नाशिकचा मुंबईच्या धर्तीवर पुनर्विकास शक्य असल्याचा दावाही त्यांनी केला.

केंद्र सरकारकडून स्मार्ट सिटी योजनेत नाशिकचा समावेश झाल्यानंतर नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनची पहिली बैठक अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कुंटे यांनी नाशिककरांसमोर असलेल्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. स्मार्ट सिटी ही नवीन संकल्पना असून, शहरी प्रशासनात आणण्याची ही योजना आहे. नवीन संकल्पना, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन विचार व्यवस्थापनात रुजवले जाणार आहेत. स्मार्ट सिटी हे एक मोठे आव्हान असले तरी, ते आमच्यासाठी अवघड नाही. विद्यमान आराखड्यात काही बारकावे असले तरी त्यात काळानुरूप बदल केले जातील. पूर्ण आराखड्याची आहे तशी अंमलबजावणी होणार नाही. इतर शहरांचा अभ्यास करून तो पुढे नेला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रेट्रोफिटिंग अंतर्गत जुन्या नाशिकमध्ये राबविण्यात येणारा प्रकल्प अशक्य दिसत असला तरी, मुंबईच्या धर्तीवर या भागाचा पुनर्विकास शक्य आहे. पुनर्विकासाचे आव्हान मोठे दिसत असले तरी, यशस्वीपणे पेलून नेऊ. मुंबईत अनेक झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास झाला आहे. त्या धर्तीवर रेट्रोफिटिंगची योजना राबविली जावू शकते. यातून योग्य तो मार्ग काढला जाईल. पुनर्विकास मॉडेलचा वापर करून त्याचा विकास केला जाईल, असा दावा त्यांनी केला.

कंपनी प्रतिमहापालिका नाही

कुंटे यांनी महापालिकेची स्वायत्तता अबाधित राहिल, असा विश्वास नाशिककरांसह लोकप्रतिनिधींना दिला. कंपनीची नाळ ही महापालिकेशीच जोडलेली राहणार आहे. कर ठरविण्याचा अधिकार महापालिकेचा राहणार आहे. परंतु, करवाढीची सूचना फक्त कंपनी करू शकते. त्यामुळे कंपनीची वेगळी ओळख निर्माण होणार नसून, ती प्रतिमहापालिका होणार नाही, अशी काळजी घेण्यात आली आहे. या कंपनीमुळे नवीन चांगल्या गोष्टी येणार आहेत. खुल्यामनाने आपण त्याचे स्वागत केले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

आराखडा १२६३ कोटींचा

स्मार्ट सिटीचा आराखडा हा विविध योजनांच्या समावेशानंतर २१९४ कोटींचा दिसत असला तरी, मूळ आराखडा हा १२६३ कोटींचाच असल्याचा दावा कंपनीने केला आहे. अन्य प्रकल्प हे टीपी स्कीम, सीएसआर उपक्रम, पीपीपीतून पूर्ण केले जाणार असून, निधीचा प्रश्न उपस्थित राहणार नाही. यातील साडेसातशे कोटी केंद्र व राज्य सरकारकडून येणार असून, केवळ पाचशे कोटीच पालिकेला उभे करावे लागणार आहेत. त्यामुळे आर्थिक बोजा येणार नाही.

युजर्स चार्जेसचा अधिकार

कंपनीला शहरातील कर ठरविण्याचे अधिकार नसले तरी कंपनीने केलेल्या कामांच्या ठिकाणी युजर्स चार्जेस मात्र कंपनीला लावता येतील, पण त्यासाठी कंपनीकडून पालिकेलाच सूचना केली जाईल. विशिष्ट कामांसाठीच ते युजर्स चार्जेस राहतील. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर गदा येणार नाही. तसेच प्रकल्पांतर्गत येणारया कामांचे ई-टेंडरिंग मात्र कंपनीच करणार असल्याचे सांगत कंपनीकडून महापालिकेचीच यंत्रणा वापरली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मनसेची कामे स्मार्ट सिटीत

स्मार्ट सिटी आराखड्यात मनसेने शहरात सीएसआर उपक्रमांतर्गत सुरू केलेली कामेच घुसवली असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध उद्योजकांशी चर्चा करून सीएसआर उपक्रमांतर्गत कामे सुरू केली आहेत. त्यावर स्थायी समिती सभापती सलिम शेख व उपमहापौर गुरुमीत बग्गा यांनी आक्षेप घेतला. इतिहास संग्रहालय, फाउंटेन, बोटनिकल गार्डनसह अनेक प्रकल्प या स्मार्ट सिटीत घुसवली आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीत काय होणार असा सवाल पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. परंतु, हा आराखडा चांगला व्हावा यासाठी हे प्रकल्प आराखड्यात टाकल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​जव्हारमधील कुपोषित बालकाचा मृत्यू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिव्ह‌िल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या कुपोषित बालकाची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर बुधवारी संपली. जव्हार तालुक्यातील रुईधर येथील राहुल काशिराम वाडकर (वय २) या बालकाचा कुपोषणामुळे बुधवारी पहाटे मृत्यू झाला. महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा कुपोषणग्रस्त मोखाड्याचा दौरा सुरू असून, गेल्या आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे.

रुईधर बोपदरी येथील राहुल या कुपोषित बालकाला सोमवारी जव्हार तालुक्यातील पतंगशहा कुटीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. राहुलचे वजन अवघे पाच किलो असल्याने गेल्या महिनाभरापासून तो अतिगंभीर अवस्थेत होता. उपचारांची गरज असल्याने आशा कार्यकर्त्या संगीता किरकिरे यांनी या कुपोषित बाळाला हॉस्पिटलमध्ये दाखल करा, असे त्याच्या पालकांना सांगितले. मात्र हॉस्पिटलमध्ये मुक्काम करावा लागेल या चिंतेने त्याच्या कुटुंबीयांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. अखेर बाळाला मंगळवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास नाशिक येथील सिव्ह‌िल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सहायक जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. जी. एम. होले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्मार्ट सिटीचा श्रीगणेशा!

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारकडून स्मार्ट सिटी योजनेत नाशिकचा समावेश झाल्यानंतर नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनची पहिली बैठक अध्यक्ष सिताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पहिल्या बैठकीत कुंटे यांची अध्यक्ष म्हणून औपचारीक निवड करण्यात आली असून, नव्याने दोन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या बैठकीत कंपनीच्या कामाची रुपरेषा ठरविण्यात आली असून, स्मार्ट सिटी संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कंपनीच्या कारभारासाठी सल्लागार नियुक्त करण्यासह विविध कामांसाठी आयुक्त अभिषेक कृष्णा यांना विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सीटी अभियाना अतंर्गत नाशिक शहरासाठी विशेष उद्देश वाहन कंपनीच्या म्हणजे नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड संचालक मंडळाची बैठक बुधवारी झाली. तंत्र व उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव व कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटेसह या बैठकीला महापौर अशोक मुर्तडक, मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा, पोल‌िस आयुक्त रवींद्र सिंघल, उपमहापौर गुरमीत बग्गा, स्थायी समिती अध्यक्ष सलीम शेख, सभागृह नेत्या सुरेखा भोसले, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये कुंटे यांची कंपनीच्या अध्यक्षपदी औपचारीक निवड केली गेली. तर सभागृह नेत्या सुरेखा भोसले व विरोधीपक्षनेत्या कविता कर्डक यांची संचालक पदी निवड करण्यात आली.

बैठकीत कंपनी नोंदणी प्रमाणपत्राची, मेमोरेंन्डम व आर्टिकल्स याची नोंद घेण्यात आली. कंपनीच्या कामाची रुपरेषा या बैठकीत ठरविण्यात आली. आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्मार्ट सिटी प्रस्तावाची सविस्तर माहिती दिली. बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाची रचना, कर्मचारी उपलब्धता, बँक व्यवहार या सर्व विषयांवर साधक बाधक चर्चा झाली. तसेच शासकीय व बँक स्तरावर अधिकार प्रदान करणे विविध प्रकल्पांसाठी सल्लागार नेमणे, कर्मचारी नियुक्तीच्या पुढील कार्यवाहीसाठी अधिकार आयुक्त अभिषेक कृष्णा यांना देण्यात आले सर्व संचालकानी चर्चेत सहभाग नोंदविला व प्रस्तावासाठी सर्व बाबी तपशीलवार अभ्यास व पुर्नअवलोकन करणेस सहमती झाली. या बैठकीत स्मार्ट सिटीचा जागर नागरिकांमध्ये करण्याचाही निर्णय झाला आहे. त्यामुळे पहिल्या बैठकीनंतर आता स्मार्ट सिटीचा श्रीगणेशा झाला आहे.

'आव्हान अवघड नाही'

दरम्यान, बैठकीनंतर कुंटे यांनी पत्रकारांशी सवांद साधत स्मार्ट सिटीचे मोठे आव्हान असले तरी, ते अवघड नसल्याचा विश्वास व्यक्त केला. मुंबईच्या धर्तीवर नाशिकमध्येही पुर्नविकास प्रकल्प राबविणे शक्य असल्याचे सांगत, आराखड्यातील बारकावे तपासून त्यात नव्याने काही समाविष्ट केले जातील, असे त्यांनी सांगीतले. तसेच महापालिकेची स्वायत्तता अबाध‌ित राहणार असून, कर ठरवण्याचे अधिकार महापालिकेचे असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसपीव्ही ही प्रतिमहापालिका होणार नसल्याचा विश्वास देत कंपनीची नाळ मनपाशीच जोडलेली असेल, असा निर्वाळा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक पदवीधरसाठी काँग्रेसकडून डॉ. तांबे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे तांबे यांच्यासमोर आता भाजपचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांचे कडवे आव्हान असणार आहे.

काँग्रेसकडून बुधवारी पदवीधर उमेदवारांसाठी दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून, त्यात नाशिकच्या डॉ. तांबे यांचा समावेश आहे. भाजपच्या ताब्यातून तांबे यांनी हा मतदारसंघ ताब्यात घेतला होता. सन २००९ मध्ये प्रतापदादा सोनवणे लोकसभेत गेल्यानंतर नाशिकच्या रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत डॉ. तांबे यांनी विजयश्री संपादित केली होती. अवघ्या ११ महिन्यांच्या काळात त्यांनी केलेल्या कामांमुळे आणि मतदारांशी ठेवलेल्या थेट संपर्कामुळे त्यांना २०१० मध्ये ३४,३९० मतांच्या फरकाने विजय मिळाला होता. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे डॉ. तांबे मेव्हणे आहेत. शिक्षण, शेती, सहकार, सामाजिक आदी क्षेत्रातील विविध संस्थांवर ते मार्गदर्शक, विश्‍वस्त

म्हणून काम करतात. संगमनेर येथे २५ वर्षांपूर्वी त्यांनी संग्राम मुकबधिर व देवेंद्र ओहरा मतिमंद विद्यालयाची स्थापना करून आपल्या सामाजिक जीवनाला प्रारंभ केला. त्यांचा सामना आता भाजपचे डॉ. प्रशांत पाटील व अपक्ष सचिन चव्हाण यांच्याशी होणार असून, भाजपकडून त्यांना तगडे आव्हान मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयकर विभागाकडून गुंतवणूक सर्व्हेला गती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उत्पन्न घोषणा योजनेला लाभत असलेल्या अत्यल्प प्रतिसादामुळे आयकर विभागाने आता कारवाई करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. विविध सहकारी पतसंस्थांमध्ये सर्व्हे करून यात मोठी गुंतवणूक करणाऱ्यांचा माग आयकर विभागाकडून घेतला जात आहे. यात मोठे घबाड आयकर विभागाच्या हाती लागल्याचे वृत्त असून, त्यात मोठी गुप्तता बाळगली जात आहे.

देशभर कमी प्रतिसाद मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आता आयकर विभागाने उद्योजक व व्यावसायिकावर सर्व्हेला सुरुवात केली आहे. नाशिकमध्येही गेल्या तीन चार दिवसांत मोठ्या प्रमाणात ज्वेलर्स, उद्योजक, व्यापारी तसेच पतसंस्थामध्ये जाऊन विभागाने प्रत्यक्ष सर्व्हे करण्याचे काम सुरू केले आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच १२ हून अधिक पतसंस्थेमधील मोठ्या ठेवीदारांची तपासणी करण्यात आली असून, त्यात मोठे घबाड आयकर विभागाच्या गळाला लागले आहे. आयकर विभागाने या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे.

पतसंस्थेला केवायसी (नो युवक कस्टमर) वापरण्याची सक्ती आहे. पण बहुतांश पतसंस्था केवायसीचा वापर करीत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणता अघोषित रकमा या पतसंस्थेमध्ये असल्याचे आयकर विभागाला आढळून आले आहे. त्यात मोठे राजकारणी व विविध अधिकारी, उद्योजक व व्यापारी असल्याचे बोलले जात आहे.

आयकर विभागातर्फे हे छापे नसून, केवळ सर्व्हे असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यातून व्यापारी, उद्योजक व इतरांवर दबाव टाकून त्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. आयकर विभागाने केलेल्या सर्व्हेमध्ये कागदपत्रांची तपासणी करून व्यवहार तपासले जात आहेत.

नाशिक विभागाला १०० कोटींचे टार्गेट

देशभर आयकर विभागाने प्रत्येक विभागाला टार्गेट दिले असून, नाशिक विभागाला १०० कोटींचे टार्गेट दिले आहे. ज्यांनी यापूर्वीच्या वर्षात आपले उत्पन्न पूर्णपणे जाहीर केले नसेल, त्यांना या योजनेअंतर्गत अघोषित उत्पन्न जाहीर करता यावे, यासाठी ही योजना आहे. नाशिक आयकर विभागाने गेले चार महिने यासाठी विविध उद्योजक संस्था, सीए, व्यापारी यांची कार्यशाळा घेऊन माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतुकीसाठी काँक्रीट प्लॅन

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

ना‌शिक : वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी काँक्रीट प्लॅन आखण्यात आला आहे. शहरात वाढणारी अपघातांची संख्या, रॅश ड्रायव्हिंग, वाहतुकीचे नियम न पाळणे या पार्श्वभूमीवर हा आराखडा तयार केला आहे. नाशिक पोलिस आयुक्तालय आणि नाशिक फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्लॅन तयार करण्यात आला आहे.

बुधवारी (२१ सप्टेंबर) पोलिस आयुक्तालयातील बॅरेक १७ येथे हा आराखडा कॉलेजियन्सला सांगण्यात आला. शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी या प्लॅनची सर्वांना माहिती दिली. प्रत्येकाला स्वतःपासून वाहतुकीचे नियम पाळायला सुरुवात करायची आहे. या मोहिमेत आपण सर्वांना जोडून घेणार आहोत. यासाठी नाशिकच्या यूथचा सपोर्ट आम्हाला हवा आहे. यामध्ये मुखत्वे नियम मोडतो तो दादा नव्हे, तर नियम पाळतो तो दादा. मी नियम पाळले तुम्हीही पाळा, आपण सर्व एकत्रित ट्रॅफिकचे नियम पाळू, हे तीन तत्वे महत्वाची असणार आहेत. सोबतच काँक्रीट प्लॅनबाबत इतर माहितीही पाटील यांनी केली.

शहरातील सुमारे साठ कॉलेजेसचा यात सहभाग होता. प्रत्येक कॉलेजमधून चार निवडक विद्यार्थी व एक प्राध्यापकाची निवड यासाठी केली आहे. २८ जुलै रोजी सर्व प्राचार्य व शहर वाहतूक पोलिस विभाग यांची एकत्रित बैठक झाली. यात नाशिकच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी काँक्रीट प्लॅन येईल असे जाहीर केले गेले. यानंतर कॉलेजचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्राध्यापकांची बैठक पोलिसांनी ९ सप्टेंबर रोजी घेतली. यात काँक्रीट प्लॅनचा अहवाल प्राध्यापकांना सांगण्यात आला. बुधवारी (२१ सप्टेंबर) रोजी झालेल्या शिबिरात मात्र विद्यार्थ्यांना सर्व प्लॅन विषद करण्यात आला. आता हा प्लॅन फक्त यंगस्टर्सला सोबत घेऊनच पुढे नेण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक कॉलेजचे लीडर चॉईस केले आहेत. ते जाबाबदारी सांभाळतील. यावेळी शहर वाहतूक शाखेचे एसीपी जयंत बजबळे, पीआय शंकरराव काळे, नाशिक फर्स्टचे पदाधिकारी व कॉलेजियन्स उपस्थित होते.

काँक्रीट प्लॅनचे सरप्राईज

काँक्रीट प्लॅन टप्प्याटप्प्याने राबवला जाणार असून, यात अनेक सरप्राईज आहेत. पहिली फेज १ ऑक्टोबर रोजी सुरू होणार असून, त्यानंतर पुढील फेज राबविल्या जातील. या प्लॅनमध्ये अनेक सरप्राईज कॅम्पेन तसेच उपक्रम असणार असल्याचे उपायुक्तांनी सांगितले.

असे असेल पहिले कॅम्पेन

ऑक्टोबर रोजी कॉलेजमधून निवडलेल्या लिडरला पोलिस प्रशासनानाकडून दोन पोस्टर देण्यात येतील. हे पोस्टर दोन दिवस कॉलेजेसमध्ये लावण्यात येईल. यानंतर तिसऱ्या दिवशी दुसरे पोस्टर देण्यात येईल. असे आठ ते दहा दिवस पोस्टर सिरीज नाशिकमधील सर्व कॉलेजेस व महत्त्वाच्या ठिकाणी राबविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांची मोटर सायकल रॅली

$
0
0

महिलांची मोटर सायकल रॅली

नाशिकरोड ः नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (दि. २४) निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी नाशिकरोडला बुधवारी (दि. २२) मराठा महिला क्रांती मोर्चा ग्रुपने मोपेड रॅली काढली. ही रॅली नगरसेविका संगीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. या रॅलीत योगीता देवकर, कामिनी तनपुरे, रेखा पाटील, सुरेखा पेखळे, वैशाली अपसुंदे, आशा पावसे, आशा टर्ले, आशा गोडसेपाटील, सोनाली पाटील, क्रांती गायकवाड, लिलाताई गायकवाड, ज्योती उगले, कांचन चव्हाण, अॅड. वर्षा देशमुख, वृंदा देशमुख, अॅड. कविता पगार, आशा कदम, प्रगती मुठाळ आदी सहभागी झाले होते. देवळालीगावातील महात्मा गांधी पुतळ्यापासून रॅली सुरू झालेली रॅली आर्टिलरी सेंटररोड, जगताप मळा, दत्तमंदिर रोड, जेलरोडमार्गे नाशिक रोड येथे समारोप करण्यात आली.


चर्मकार महासंघाचाही पाठिंबा

नाशिकरोड : नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी नाशिकच्या तपोवनातून निघणाऱ्या मोर्चास राष्ट्रीय चर्मकार महासंघाने पाठिंबा घोषित केला आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजीमंत्री बबनराव घोलप यांनी बुधवारी (दि. २१) पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. बबनराव घोलप म्हणाले की, राज्यभरातून या बलात्काराच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून भव्य मोर्चे काढले जात आहेत. लाखोंच्या संख्येने समाजबांधव सहभागी होणार आहेत. शांततामय मार्गाने निघणाऱ्या या मूकमोर्चाचा आदर्श इतरांनी घेण्यासारखा आहे. अॅट्रॉसिटी कायद्यात अद्यापही काही त्रुटी असल्यास त्या दूर होऊन कायद्यात सुधारणा होण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुढाकार घेईल, अशी ग्वाही घोलप यांनी दिली.

कामटवाडे येथे नियोजन बैठक

सिडको : येथील कामटवाडे येथे मराठा क्रांती मूकमोर्चात कामटवाडे ग्रामस्थांना नियोजन बैठकीत जास्त संख्येत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी भाऊसाहेब मटाले, रवी पाटील, भिका मटाले यांचेसह मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला भाऊसाहेब मटाले व रवी मटाले यांनी मोर्चाचा उद्देश व तो यशस्वी करण्यामागील भूमिका पटवून दिली. त्याचबरोबर मोर्चाच्या नियोजन व अन्य सूचना केल्या. याप्रसंगी दिनकर मटाले, राजाराम मटाले, नारायण मटाले, दीपक मटाले, अनिल मटाले यांचेसह कामटवाडे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images