Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नदी पुनरुज्जीवनाने पाणीप्रश्न सुटणार!

$
0
0

बागलाणमधील नद्यांवर चौदा बंधारे बांधणार

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्याच्या पाणीप्रश्न सोडविण्यासाठी विविध सिंचन योजना हाती घेतल्या आहेत. पहिल्या टप्प्यात नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमांतर्गत आरम, हत्ती आणि कान्हेरी या तीनही नद्यांवर चौदा भूमिगत सिमेंट बंधारे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात आरम, हत्ती आणि कान्हेरी या नद्यांवर नदी पुनर्जीवन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत आरम नदीवरील मुंजवाड, मळगाव, खमताणे, हत्ती नदीवरील औंदाणे, मुंजवाड, वटार, चौंधाणे, वनोली, तरसाळी, विंचुरे, कंधाणे, जोरण व कान्हेरी नदीवरील वटार, वनोली येथील शिवारात चौदा भूमिगत सिमेंट बंधारे प्रस्तावित केले आहेत. ही कामे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, त्यासाठी बारा कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात मोसम, करंजाडी व दोध्याड या नद्यांवर नदी पुनर्जीवन कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले.

हरणटेकडी, साल्हेर व गणपती घाट या वळण योजना पूर्ण झाल्या असून, सुमारे ५३ दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले आहे. हे पाणी गुजरातकडे वाहून जात होते. वाघंबा (शेरमाळ) डोंगरावरील पाणीदेखील गुजरातकडे मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे. ते पाणी मोसम नदीत वळविण्यासाठी नव्याने वळण योजना तयार करण्यात येणार आहे. त्याचे लवकरच सर्व्हेक्षण करून अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना अधीक्षक अभियंत्यांना दिल्या असल्याचे डॉ. भामरे यांनी नमूद केले.

तळवाडे भामेर कालव्यासाठी निधी मंजूर

तळवाडे भामेर पोच कालव्याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी शासनाने सतरा कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर केला असल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले. या कामामुळे काटवनचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. तसेच हरणबारी डाव्या कालव्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. हे काम मार्गी लावण्यासाठी सुधारित जलनियोजनस मान्यता घेतली आहे. प्रलंबित कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव समितीपुढे सादर करण्यात आला असून, या कामासाठी ५९ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. हरणबारी उजव्या कालव्याच्या पुढील कामासाठी तत्कालीन सरकारने पाणी उपलब्ध नसल्याचे कारण दाखवत नकार दिला होता. हे काम मार्गी लावण्यासाठी जलसंपदामंत्र्यांनी हिरवा कंदील दिला असून, पारनेर ते सातमाणेपर्यंत कालव्याचे नव्याने सर्व्हेक्षण करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

मोसम, आरम नदीवर केटीवेअर

बागलाण तालुक्यातील नद्या बारमाही करण्यासाठीही आपला शासनस्तरावर प्रयत्न सुरू असून, त्यासाठी मोसम नदीवर पाच ठिकाणी व आरम नदीवर चार ठिकाणी केटीवेअर बंधारे मंजुरीसाठी सादर केले असल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले. त्याच्या सोमपूर, नामपूर, मोराणे येथे प्रत्येकी एक व अंबासन येथे दोन केटीवेअर बंधारे प्रस्तावित करण्यात आले आहेत. आरम नदीवरील चौंधाणे, कंधाणे, मुंजवाड, दहिंदुले येथे प्रत्येकी एक बंधारा घेण्यात येणार आहे. या सर्व बंधाऱ्यांची क्षमता पाच दशलक्ष घनफुटाच्या आत राहणार आहे. त्याच्यात नामपूर येथील ४.८७ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या बंधाऱ्याला तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले. हे साखळी पद्धतीचे बंधारे राहणार असल्यामुळे या नद्या बारमाही होऊन पाणीप्रश्न निकाली काढण्यास मदत होणार आहे.


जलयुक्त शिवारांतर्गत तेरा सिमेंट बंधारे

बागलाणमध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत यंदा तेरा गावांना सिमेंट काँक्रीट बंधारे मंजुरीसाठी सादर करण्यात आल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले. त्याच्यात सुराणे व देवळाणे येथे प्रत्येकी दोन, भाक्षी, दरेगाव, टेंभे खालचे, टेंभे वरचे, कांद्याचा मळा, जामोटी, अजमेर सौंदाणे, बिजोटे, पारनेर येथे प्रत्येकी एक सिमेंट काँक्रीट बंधारा बांधण्यात येणार आहे. त्यापैकी बिजोटे व पारनेर येथील बंधाऱ्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, निविदा स्तरावर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


न्या. साहेब तुम्हीसुध्दा...!

$
0
0

पोलिसांच्या कारवाईचे स्वागत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘हौसेला मोल नसते’ असे म्हणतात. त्यात ती हौस मद्याची असेल, तर विचारायलाच नको. मित्रांची अशी ‘ओली’ मैफल भल्याभल्यांना ‘मार्गी’ लावते. असाच काहीसा अनुभव एका न्यायाधीशांनी घेतला. न्यायाधीश महाशय ज्या हॉटेलमध्ये बसले त्याच ठिकाणी पोलिसांनी छापा मारला. न्याय निवाडा करणाऱ्या व्यक्तीवरच पोलिसांनी मुंबई पोलिस अॅक्टनुसार कारवाई करीत ‘समज’ दिली. सध्या, पोलिसांची ही कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे.

गुरुवारी रात्री पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उघड्यावर मद्यपान करणाऱ्या किंवा बेकायदा हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ओल्या पार्टींचा पोलिस शोध घेत होते. इंदिरानगर पोलिसांनी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास पाथर्डी फाटा येथील हॉटेल साई किरण येथे छापा मारला. हॉटेलमध्ये पाच पन्नास व्यक्ती मद्य रिझवत होत्या. मद्यपींवर मुंबई पोलिस अॅक्टमधील कलम ११०, ११७ आदी कलमानुसार कारवाई करून ताकीद देऊन सोडण्यात येते. मात्र, हॉटेल साई किरण हॉटेलमध्ये पोलिसांच्या हाती चक्क प्रथम न्यायदंडाधिकारी आणि सध्या सहायक धर्मादाय आयुक्त म्हणून कार्यरत असलेले मनोज वजिनाथ टोकले (वय ३८) हेच सापडले. अंबड कोर्टासाठी कार्यरत असलेले टोकले सध्या डेप्युटेशनवर सहायक धर्मादाय आयुक्त आहेत. पोलिसांच्या छाप्यानंतर टोकले यांनी पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांना आपली ओळख सांगितली. मात्र, उपायुक्त धिवरे यांनी कायदा कारवाईला समोरे जावेच लागेल, असे स्पष्ट केले. पोलिस उपायुक्तांचा आदेश होताच इंदिरानगर पोलिसांनी मुंबई पोलिस अॅक्टमधील तरतुदीनुसार कारवाई करीत ताकीद देऊन त्यांना सोडले. हॉटेलमालकावरदेखील कारवाई केली जात असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सदानंद इनामदार यांनी सांगितले.

कायदा सर्वसमानच

वरिष्ठ अधिकारी किंवा तत्सम व्यक्तींचे छोटे मोठे प्रकरण असेल, तर कायद्याला बगल दिली जाते, असा पोलिसांबाबत सर्वसामान्य व्यक्तींचा अनुभव आहे. पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे व त्यांच्या पथकाने मात्र थेट न्यायाधिशांवर कारवाई करीत हा समज खोडून काढला. सुशिक्षित आणि कायद्याची जाण असलेल्या व्यक्तींनी तरी कायद्याचे पालन करायलाच हवे, असे पोलिस उपायुक्त धिवरे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडासाठी २८० जादा बसेस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी , नाशिक

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगीदेवी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाने २८० जादा बसेसचे नियोजन केले आहे. यासाठी शुक्रवारी पुन्हा एकदा आढावा घेऊन तयारी पूर्ण करण्यात आली. या यात्रेसाठी तीन शिफ्टमध्ये पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांच्या ड्युटी लावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जुना सीबीएस, नांदुरी पायथा, वणी गडावरही अतिरिक्त कर्मचाऱ्यांची कूमक पाठविण्यात आली आहे. या यात्रेसाठी जिल्हाभरातील १३ आगारातून १९५ बसेस थेट सप्तशृंगी गडावर जाणार आहेत. तर ८५ बसेस या नांदुरी फाटा ते सप्तशृंगी गड येथे जाणार आहे.

शनिवारपासून यात्रा सुरू झाल्यानंतर भाविकांची गर्दी ही हळूहळू वाढते. त्यामुळे त्या पध्दतीने एसटीने नियोजन केले आहे. पहिले तीन दिवस कळवण आगारातून नांदुरी फाटा ते सप्तशृंगी गड असे वाहतुकीचे नियोजन आहे. त्याबाबत सूचनाही देण्यात आल्या असून त्यात गर्दीनुसार सटाणा, मालेगाव व इतर आगारातून बस मागविण्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर जादा बसेसमध्ये मालेगाव, मनमाड, सटाणा, सिन्नर, नांदगाव, इगतपुरी, लासलगाव, पेठ, येवला, पिंपळगाव यांच्या प्रत्येकी पाच बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. कळवण आगारातून ३५ बसेस या मार्गावर धावणार आहेत. हे सर्व नियोजन ४ ते ११ ऑक्टोबरपर्यंत करण्यात आले आहे.

असे आहे बसेसचे नियोजन

वणीच्या या यात्रेसाठी नाशिक एकमधून ३० व नाशिक दोनमधून २५ बसेस जुने सीबीएस येथून धावणार आहेत. मालेगाव २०, मनमाड १५, सटाणा १५, सिन्नर १०, नांदगाव १०, इगतपुरी १०, लासलगाव १०, कळवण १५, पेठ १०, येवला १०, पिंपळगाव १५ अशा एकूण १९५ बसेस यात्रेत धावणार आहेत. त्यामुळे एसटीला यातून चांगले उत्पन्न मिळणार आहे. वणी सोडल्यास नवरात्रोत्सवात इतर ठिकाणी जाण्यासाठी मात्र नियमित बस असणार आहेत.

अखंड ज्योतीने पेटणार शेकडो दिवे

कळवण : सप्तशृंगीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास (दि. १) आजपासून प्रारंभ होत आहे. उत्तर महाराष्ट्रात घराघरातील तसेच सार्वजनिक मंडळांच्या घटस्थापनेसाठी सप्तशृंगी गडावरील अखंड ज्योत मशालीद्वारे आपापल्या गावी भाविक अनवाणी, रात्रीचा दिवस करून घेऊन जात आहेत. सप्तशृंगीदेवीची यात्रा चैत्रोत्सव व नवरात्रोत्सवात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. नवरात्रोत्सवात प्रत्येक घरी घटस्थापना करून नऊ दिवस उपवास केले जातात. घटस्थापनेच्या अखंड दिव्यासाठी सप्तशृंगीदेवीच्या गडावरील ज्योतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी दोन दिवस अगोदरपासून भाविक गडावरील अखंड ज्योत मशालीच्या सहाय्याने आपल्या गावी घेऊन जातात. गावातील सर्व घरातील घट तसेच सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी सदरच्या ज्योतीद्वारे आपापल्या घरातील अथवा मंडळाचा दिवा पेटविला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीपेक्षा वृद्धसेवेतच शोधला जगण्याचा आनंद

$
0
0

ashwini.kawale@timesgroup.com

Tweet : ashwinikawaleMT

नाशिक : वृद्धत्त्व हे आयुष्यातील दुसरे बालपण असते, असे म्हटले जाते. या काळात वृद्ध व्यक्तींना समाजाच्या, कुटुंबाची मायेची सर्वाधिक गरज असते. मात्र, या वृद्धपणीच काहींना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतो. अशा वृद्धांची सेवा करण्याच्या उद्देशाने नाशिकमधील अमोल गायकवाड या तरुणाने वृद्धांची सेवा हेच धोरण अंगीकारले आहे. मागील तीन वर्षांपासून वृद्धांची सेवा करण्यातच त्यांनी आनंद शोधला असून, नोकरी करण्यापेक्षा हा आनंद मोठा असल्याची भावना व्यक्त केली आहे.

आजच्या काळात उच्चशिक्षण घेऊन, चांगली नोकरी करण्याकडे व आपले आयुष्य लवकरात लवकर स्थायिक करण्यासाठी प्रत्येकाचीच धावपळ सुरू आहे. या शर्यतीत आपल्याच अनेक व्यक्तींकडे दुर्लक्ष होत आहे, याची जाणीवही दूर राहिली आहे. मात्र, अमोल यांच्यासारख्या तरुणाने सामाजिक बांधिलकी दाखवून वृद्धसेवेतच आपला आनंद शोधला आहे. त्यांनी सुरू केलेल्या निसर्ग केअर सेंटरमध्ये वृद्धांना ते सांभाळत आहे. नाशिक जिल्ह्यासह मुंबई, इंदूर, मालेगाव येथील वृद्ध व्यक्तींचा आधार त्यांना लाभला आहे. यांना अंघोळ घालणे, स्वतःच्या हाताने खाऊ घालणे, आजारी असलेल्यांची देखरेख करणे अशी सेवा ते नित्याने करीत आहेत. अंथरुणाला खिळलेल्या व्यक्ती, पॅरालिसिस झालेल्या अशा अनेक आजारांनी ग्रासलेल्या व्यक्तींची दीर्घकालीन तसेच तात्पुरत्या स्वरुपातील व्यवस्था त्यांनी ना नफा ना तोटा तत्त्वावर उपलब्ध करून दिली आहे. केवळ दहावीचे शिक्षण पूर्ण केलेल्या अमोल यांची वृद्धांप्रती असलेली आत्मीयता पाहून डॉ. पराग देसले व डॉ. डी. व्ही. जोशी यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. हे दोन्ही डॉक्टर्सनी पूर्णतः मोफत सेवा या व्यक्तींसाठी उपलब्ध करून दिली आहे.

वृद्धसेवेतच माझा आनंद शोधला आहे. वृद्ध व्यक्तींची सेवा करणे, त्यांची काळजी घेणे माझ्यासाठी समाधानाचे असते. त्यांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याकडे माझा कल असतो. वृध्दांना या वयात मायेची गरज असते. त्यांचे मन सांभाळणे गरजेचे असते.

- अमोल गायकवाड.

या केंद्राच्या कामातील प्रामाणिकपणा पाहून वृद्धांची मोफत आरोग्य तपासणी करण्यास पुढाकार घेतला. यानिमित्ताने वृद्ध व्यक्तींची सेवा घडावी, हा प्रयत्न आहे. - डॉ. पराग देसले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचीही संघटना

$
0
0

कांदा प्रश्नावर राज्यभर संघटन करणार

म. टा. खास प्रतिनिधी ,नाशिक

द्राक्ष, केळी, डाळिंब या फळपिकांसाठी संघ असल्यामुळे त्या उत्पादकांच्या हिताचे रक्षण केले जाते. पण कांदा उत्पादकांचा संघच नाही. राज्यात सर्वाधिक कांदा नाशिकमध्ये होतो, त्यामुळे येथूनच कांदा उत्पादकांचा संघ असावा, यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची स्थापन करण्यात आली असल्याची माहिती सिन्नर तालुक्यातील जायगांव येथील भारत दिघोळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

कांदा उत्पादकांना हमीभाव मिळावा ही आमची मागणी असून, शेतकरी जगला तर देश जगला हे आमच्या संघटनेचे धोरण राहणार आहे. आतापर्यंत कांदा उत्पादकांचा एकही संघटना नव्हती. त्यामुळे ही संघटना स्थापन केली असून, त्यातून केंद्र व राज्य सरकारची नोडल संस्था म्हणून काम करण्याचा मनोदय यावेळी दिघोळे यांनी व्यक्त केला.

या संघटनेमार्फत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडणे, कांद्याबाबत चुकीची सरकारी धोरणे बदलण्यास भाग पाडणे, कांदा उत्पादक तंत्रज्ञान, काढणीपश्चात तंत्रज्ञान व विक्रीव्यवस्था याबाबत सर्व माहिती उपलब्ध करून देणे, वर्षातून एकदा परिषद घेणे, कृषी संशोधनातील तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे व दबाव गट तयार करण्याचा उद्देश असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभाव, हवामान या संदर्भात माहिती पुरवून त्यांच्यात जागृती निर्माण केली जाणार आहे. कांदा उत्पादक शेतकरी हा अल्पभूधारक व कोरडवाहू असल्याने त्यांचा शेतकऱ्यांच्या निर्णयावर परिणाम होत नाही. त्यासाठी संघटन असणे महत्त्वाचे आहे. या संघटनेच्या माध्यमातून नवीण तंत्रज्ञान, नवीन वाण, आंतरराष्ट्रीय मागणी, निर्यातीतील अडचणी, देशातंर्गत उत्पादन व मागणी या सर्व बाबींची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचेही दिघोळे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत प्रशांत नागरे, सोमनाथ घुगे, सचिन दिघोळे, उद्ध्दव लटपटे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

अॅपही निर्माण करणार

कांदा उत्पादकांना विविध गोष्टींची माहिती व्हावी, यासाठी अॅप सुरू करणार असून, पहिले नाशिक व नंतर राज्यात संघटना वाढवली जाणार आहे. नाशिक येथे या संघटनेचे कार्यालय सुरू करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेक इन नाशिक आता मुंबईत

$
0
0

नाशिकचे ब्रँडिंग करण्याचा ‘निमा’च्या बैठकीत एकमुखी निर्णय

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये औद्योगिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक व्हावी, यासाठी मुंबईमध्ये मेक इन नाशिकचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय निमा व लोकप्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करावे व स्वागताध्यक्षपद पालकमंत्र्यांनी सांभाळावे, अशा सूचनाही करण्यात आल्या. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात मोठ्या उद्योजकांना आमंत्रित करून त्यांच्यासमोर नाशिकमध्ये औद्योगिक क्षेत्रासाठी असलेले इन्फ्रॉस्ट्रक्चरसह येथील वैशिष्ट्ये मांडावी, असेही ठरविण्यात आले.

नाशिककडे मोठ्या उद्योजकांनी फिरवलेली पाठ, विदर्भ व मराठवाडा येथे उद्योगवाढीसाठी सरकारने घेतलेले सकारात्मक निर्णय व वाढलेला कल, विजेच्या दर सवलतीत झालेला अन्याय यांसह अनेक औद्योगिक प्रश्नांवर नाशिक इंडस्ट्रिज मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने शुक्रवारी निमा कार्यालयात लोकप्रतिनिधी व उद्योजकांची बैठक झाली. या बैठीकीत भाजपाच्या आमदार सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, अपूर्व हिरे, नरहरी झिरवाळ व सुधीर तांबे यांच्यासह निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, सेक्रेटरी नितीन वागस्कर, ज्ञानेश्वर गोपाले, हर्षद ब्राह्मणकर, संजीव नारंगसह मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते.

या बैठकीत औद्योगिक विषयावर पाठपुरावा करण्यासाठी व बंद उद्योगांची कारणे शोधण्यासाठी दोन कोअर कमिटी स्थापण्याचा निर्णयही घेण्यात आला. नाशिकमध्ये मोठे उद्योग यावे, या प्रश्नाबरोबरच उद्योग वाढीसाठी एअर कनेक्टिव्हीटी या विषयावरही चर्चा झाली. त्याचप्रमाणे विजेच्या दरात मराठवाडा व विदर्भाला दिलेली सवलत व नाशिकवर केलेल्या अन्यायाचा विषयही चर्चेला आला. यावेळी सर्वांनी सकारात्मक चर्चा केली. आमदार झिरवळ यांनी केमिकल अभ्यासक्रम सुरू करण्याचा विषय मांडला, तर डॉ. राहुल आहेर यांनी लोकप्रतिनिधी व उद्योजकांची मोट बांधून सातत्याने औद्योगिक विषयावर सरकारकडे पाठपुरवा करण्याचे सुचविले. आमदार अपूर्व हिरे यांनी आपल्याकडे उद्योग का येत नाही याची कारणे शोधणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले. आमदार सीमा हिरे यांनी बंद पडलेल्या उद्योगांचा मुद्दा उपस्थित केला.

इतर लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठ

पाच आमदार सोडल्यास खासदार व आमदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. नाशिकमध्ये उद्योग वाढावे यासाठी आयोजित या बैठकीत सर्वांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता असताना त्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोवर्धन जमीनप्रकरणी भुजबळांना दिलासा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या गोवर्धन शिवार येथे छगन भुजबळ यांच्या एमईटी शिक्षण संस्थेला देण्यात आलेली १० हेक्टर जमीन परत देण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवत राज्य सरकारची याचिका फेटाळली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने स्पेशल लिव्ह पिटीशन याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला.

नाशिकच्या गोवर्धन शिवार येथे छगन भुजबळ यांच्या एमईटी शिक्षण संस्थेला राज्य सरकारने १० हेक्टर जमीन दिली होती. त्यानंतर याविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर राज्य सरकारने ही जमीन परत घेतली होती. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात एमईटीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर महिनाभरापूर्वीच उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्णय चुकीचा ठरवत जमीन परत करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात राज्य सरकारने आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात स्पेश लिव्ह पिटीशन दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पंचवटी’ला उशीरच!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पंचवटी एक्सप्रेस १ ऑक्टोबरपासून मनमाडहून ८ मिनिटे अगोदर सुटणार आहे. त्यामुळे या गाडीला रोज होणारा विलंब टळणार आहे. तथापि, ती नाशिकरोडला नेहमीच्या वेळेतच येणार आहे. ती मनमाडहून लवकर निघूनही मुंबईला वेळेत पोहोचणार नाही. त्यामुळे नवे वेळापत्रकही दिशाभूल असल्याची प्रवाशांची प्रतिक्रिया आहे.

पंचवटीला रोज होणारा विलंबाचा मुद्दा ‘मटा’ने सातत्याने उचलून धरून प्रवाशांच्या संतापाला वाट करून दिली होती. प्रवाशांनी मटाच्या वृत्ताची कात्रणे रेल्वेमंत्रालयाला पाठवली होती. त्यानंतर हालचाल होऊन पंचवटी आठ मिनिटे लवकर सोडली जाणार आहे. इंटरसिटीचा दर्जा असलेल्या पंचवटीची घोर उपेक्षा होत आहे. नाशिककरांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या पंचवटीला एक वर्षापासून कायमच उशीर होत असल्याने प्रवाशी प्रचंड नाराज आहेत. पंचवटी वेळेत चालवा नाही तर बंद करा, अशा भावना त्यांनी ‘मटा’कडे व्यक्त केल्या होत्या. आता गाडी लवकर सुटणार आहे मात्र, ती निफाडपर्यंतच. दुरांतोसाठी ही अॅडजस्टमेन्ट आहे. नाशिकरोडला ती आठ मिनिटे लवकर पोहोचणार नाही. त्यामुळे मुंबईतही ती नेहमीप्रमाणे उशिरा पोहोचणार आहे.

अशी धावेल पंचवटी

पंचवटी मनमाडहून सकाळी ६.१० ऐवजी ६.०२ ला सुटेल. लासलगावला ती ६.३० एेवजी ६.२० ला, तर निफाडला ६.४० एेवजी ६.३० ला आणि नाशिकरोडला नेहमीप्रमाणे ७.०५ पोहोचेल, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. मनमाडहून रात्री पुण्याला जाणारी पॅसेंजर (५१४०२ अप) रात्री ९.५५ एवजी ९.१५ ला सुटेल. मनमाडहून सिंकदराबादला जाणारी अजंठा एक्स्प्रेस (१७०६३) रात्री ९ एेवजी ८.५० ला सुटेल.

या कारणांनी होतो उशीर

पंचवटी पुढील कारणांनी लेट होते. त्यावरही उपाय हवेत तरच ही गाडी वेळेत सोडल्याचा फायदा होईल. नाशिकरोड स्थानकात पंचवटीच्या बोगीत पाणी भरणे, घोटी-कल्याण दरम्यान अन्य गाड्यांचे इंजिन बंद पडणे किंवा घसरणे, इगतपुरी स्थानकात जनता व मंगला एक्स्प्रेससाठी पंचवटीला थांबवणे, दुरांतो अगोदर सोडणे, मुंबईतील सिग्नल व अन्य तांत्रिक दोषामुळे पंचवटीला विलंब होतो.

अन्य मागण्या

गुजरातहून मुंबईला जाणाऱ्या बलसाड आणि फ्लाईंग राणीला पासधारकांचे आठ डबे आहेत. पंचवटी, राज्यराणी, गोदावरी या नाशिककरांच्या गाडीमध्ये एकच असा डबा आहे. या गाड्यांमधून प्रत्येकी तीन हजार प्रवासी प्रवास करतात. पंचवटीच्या २१ बोग्यांपैकी एक एसी कोच आहे. त्यामध्ये गर्दीच नसते. रिझर्व्हेशनचे तीन व पासधारकांचा एकच कोच आहे. त्यामध्ये जागेवरून मारामाऱ्या होतात. त्यामुळे पासधारकांच्या कोचची संख्या वाढवावी.

पंचवटी एक्स्प्रेस आठ मिनिटे अगोदर सोडण्याचा निर्णय रास्त आहे. आता गाडी रोज वेळेतच सुटेल आणि मुंबईला साडेदहालाच पोहचेल, तसेच नाशिकला वेळेत पोहोचले हे पाहावे. तरच फेरनियोजनाला अर्थ आहे. अन्यथा पुन्हा आंदोलने करावी लागतील.

- राजेश फोकणे, नितीन चिडे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भुजबळ समर्थकांकडून मोर्चाची तयारी पूर्ण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ नाशिकला ३ ऑक्टोबर रोजी होत असलेल्या मूक मोर्चाची तयारी पूर्ण झाली असल्याचा दावा संयोजकांनी केला आहे.विविध समाजांसह भारिप बहुजन महासंघ व अहिर सुवर्णकार समाजानेही मोर्चाला पांठिबा दिल्याचा दावा संयोजकांनी केला असून शनिवारी शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

या मोर्चासाठी समर्थकांकडून भाजपचे नेते स्व.गोपीनाथ मुंडे याचे पोस्टर्स लावण्यात आल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मोर्चा कुठल्याही विशिष्ट जातीच्या व धर्माच्या लोकांचा नाही तर सर्वसमावेशक असा असून, जातीभेद विरहीत समर्थक या मूक मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चाला आतापर्यंत विविध समाजांनी पाठिंबा दिल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. जवळपास दहा लाख समर्थक सहभागी होणार असल्याचा दावाही केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसही पदवीधरच्या मैदानात

$
0
0

संग्राम कोते-पाटील लढवणार नाशिकमधून निवडणूक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीला विश्वासात न घेतल्याने राष्ट्रवादीने आता वेगळी चूल मांडण्याची तयारी सुरू केली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीने आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांना मैदानात उतरवायचे ठरवले आहे.

कोते पाटील हे अजित पवार यांचे विश्वासू असून त्यांच्या एंट्रीने काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांच्या अडचणी वाढणार आहेत. तसेच पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट येणार असून आता पाच उमेदवार रिंगणात राहण्याची शक्यता आहे. याद्यांच्या गोंधळामुळे पदवीधरच्या निवडणूक काहीकाळ लांबणीवर पडत असल्या तरी, या निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. सत्ताधारी भाजपने तर, नाशिकच्या निवडणुकीसाठी आपली सर्व ताकद एकवटत, भाजपचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांच्यामागे पक्ष उभा केला आहे. काँग्रेसनेही निवडणुकीसाठी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. माकपच्या वतीने राजू देसले तर संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे सचिन चव्हाण या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे चौरंगी लढत होईल असे चित्र आजपर्यंत होते.

डॉ. तांबेंच्या अडचणी वाढणार

काँग्रेसने पदवीधरसाठी राष्ट्रवादीला विश्वासात न घेतल्याने राष्ट्रवादीचे नेते नाराज झाले. त्यामुळे निवडणूक लढवण्याचा विचार राष्ट्रवादीने केला असून प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांना नाशिकमधून निवडणूक लढवण्याचे आदेश दिले. कोते-पाटील हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. राष्ट्रवादीच्या एंट्रीने आता डॉ. तांबेच्या अडचणी मात्र वाढणार आहेत. एकीकडे भाजपच्या डॉ. पाटील यांनी जोरदार तयारी केली असतांना, राष्ट्रवादीच्या एंट्रीने निवडणुकीत रंगत येणार आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मतदार यादी रद्द केल्यानंतर पक्षांनी पुन्हा जोमाने मतदार नोंदणी सुरू केली आहे. डॉ. प्रशांत पाटील यांनी भाजपची, तर काँग्रेसच्या डॉ. तांबे यांनी काँग्रेससह शैक्षणिक संस्थाची यंत्रणा कामाला लावली आहे. तर अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या सचिन चव्हाण यांनी रविवारी (दि. ०२) नाशिकरोड येथील कदम लॉन्स येथे समर्थकांचा मेळावा आयोजित केला असून तेथून मतदारनोंदणी मोहिमेला सुरुवात केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूर्योदयापूर्वी घेतले कळसूबाईचे दर्शन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

तालुक्यातील घोटी येथील कळसूबाई मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपली सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरा कायम राखली आहे. गेल्या वीस वर्षांपासून नवरात्रात दररोज कळसूबाईच्या शिखरावर जाउन दर्शन घेतात. ही आध्यात्मिक परंपरा यावेळीही कायम ठेऊन जवळपास पन्नास युवकांच्या चमुने शनिवारी (दि. ०१) पहिल्याच माळीला शिखरावर पहाटेच जाऊन सूर्योदयापूर्वी घटस्थापना करून दर्शन घेतले.

या उपक्रमात मित्र मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली पन्नास युवकांच्या चमुने शनिवारी पहाटे चार वाजता घोटीत गणेश मंदिरात आरती केली. यानंतर वाहनाने बारी गावापर्यंत जाऊन कळसूबाईचे शिखर तासाभरात सर करून परिसर स्वच्छ करत विधिवत पूजन करून घटस्थापना केली.

घोटीतील हे कार्यकर्ते अखंडितपणे नवरात्रात दररोज उपवास धरून आपला हा नित्यक्रम राबवत असतात. या मोहिमेत भगीरथ मराडे यांच्यासह, गणेश सूर्यवंशी, प्रशांत येवलेकर, नीलेश पवार, बाळू आरोटे, प्रवीण भटाटे, अशोक हेमके यांच्यासह आदींचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिशाहीन आम्ही, नाही सापडली वाट...!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सामाजिक, भावनिक, तसेच प्रेमाच्या कविता सादर करीत सावाना मेळाव्याच्या पहिल्या दिवशी कविसंमेलन चांगलेच रंगले. या वेळी जिल्हाभरातून आलेल्या कवींनी या कविसंमेलनात सहभाग घेतला.

सैराट चित्रपटामुळे सध्या समाजातील काही प्रवृत्ती सैराट झालेल्या असून, त्यांच्यावर भाष्य करताना प्रा. बाळासाहेब हिरे यांनी

‘दिशाहीन आम्ही,
नाही सापडली वाट...
सारेच आम्ही सैराट’

ही कविता सादर केली. या उत्स्फूर्त कवितेने प्रेक्षकांच्या टाळ्या घेतल्या. कवी प्रशांत केंदळे यांनी

‘लेक बापाला लाडाची,
लेक आईला गोडाची...
लेक जिवाचा जिव्हाळा,
लेक सावली वडाची’

या ‘लेक’ कवितेतून लेकीचे महत्त्व विशद केले. रामचंद्र निजामपूरकर यांनी
‘बाळाला भूक लागल्यावर
भरवते ती आई...
मखमली पेटीत जपून ठेवावे
दोन शब्द म्हणजे आई’

ही ‘आई’ या शीर्षकाची कविता सादर केली. सुमती पवार यांनी,
‘शब्द खडाष्टके होती...
शब्द वेदना बोलती,
आसू बनून नेत्रात,
शब्द असे पाझरती’ ही ‘शब्द’ कविता सादर केली.

नुमान महबूब शेख यांनी

‘झाली चूक माफ कर
सोडून मला जाऊ नको,
गेली जर खरे सांगतो
मागे वळून पाहू नको’

ही कविता सादर केली. संजय गुजराथी यांनी

‘अवचित आला वादळवारा...
घेऊनी सोबत या जलधारा’ ही कविता सादर केली.

डॉ. श्रीपाद जोशी, कार्यवाह मिलिंद जहागीरदार, नरेश महाजन, किशोर पाठक, जयप्रकाश जातेगावकर प्रमुख पाहुणे होते. कविसंमेलनाचे अध्यक्ष व सूत्रसंचालक यांचा परिचय जहागीरदार यांनी करून दिला. प्रारंभी उरी येथील शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली.

प्रा. संदीप जगताप यांनी कवितांमध्ये चारोळ्यांची खुमासदार पेरणी करीत कविसंमेलनाचे सूत्रसंचालन केले. डॉ. शंकर बोऱ्हाडे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी सुरुवातीला छोटेखानी भाषण करीत सर्व कवींना शुभेच्छा दिल्या. या वेळी कविता सादर करणाऱ्या कवींना नरेश महाजन व बोऱ्हाडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ भेट देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला ४० कोटींचा ‘प्रसाद’

$
0
0

देशातील आठ तीर्थ क्षेत्रांमध्ये त्र्यंबकेश्वर-अंजनेरी

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ने त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार आहे. यामध्ये भाविकांच्या सुविधांचे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत. यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी पाठपुरावा केला होता. विकासाचा हा प्रसाद अवघ्या दोन महिन्यात पदरी पडणार असे, येथे शनिवारी (दि. ०१) खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सांगण्यात आले.

या बैठकीस त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट आणि श्री संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर ट्रस्ट यांचे विश्वस्त उपस्थित होते. बैठकीनंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणीदेखील करण्यात आली.
‘प्रसाद’ योजनेअंतर्गत देशातील आठ तीर्थक्षेत्रांमध्ये महाराष्ट्रातून एकमेव त्र्यंबकेश्वर-अंजनेरी या तीर्थक्षेत्राचा समावेश झाला आहे.या योजनेद्वारे तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र विकास प्राधिकरणाची टीम पुढील आठ दिवसात ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर, निवृत्तीनाथ देवस्थान, अंजनेरी किल्ला या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. प्रसाद योजनेअंतर्गत एकूण ४० कोटी रुपयांपैकी पहिल्या टप्प्यात ८ कोटी रुपयांची विकासकामे होणार आहेत. तर जानेवारी २०१७ अखेरपर्यंत ही कामे सुरू होतील. हा विकास आराखडा तयार करून १५ ऑक्टोबरपर्यंत केंद्र सरकारला सादर करणार आहेत. पणजीचे आर्किटेक्ट डॉ. मिलिंद रमणी हे पुढील आठ दिवस त्र्यंबकला थांबून आराखडा तयार करणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले.

नगरपालिकेतर्फे उपनगराध्यक्ष संतोष कदम यांनी प्रसादच्या आराखड्यात आवश्यक पायाभूत सुविधांच्या मागणीचे पत्र दिले. यावेळी पर्यटन खात्याच्या अधिकारी प्रज्ञा बढे, तहसीलदार महेंद्र पवार, कार्यकारी अभियंता हेमंत जगताप, शेख, मुख्याधिकारी डॉ. चेतना केरुरे-मानुरे, नगराध्यक्ष विजया लढ्ढा, विश्वस्त जयंत शिखरे, ललिता शिंदे, सत्यप्रिय शुक्ल, त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलिक थेटे, अभियंता प्रशांत जुन्नरे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला सक्षमीकरण ही काळाची गरज

$
0
0

करंजगाव ग्रामसभेत रत्नाकर पगार यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, निफाड

महिलांच्या विकासासाठी सरकारच्या अनेक योजना असून, त्याबाबत ग्रामपातळीवर जनजागृती गरजेची आहे. महिला आता प्रत्येक क्षेत्रात प्रगतीकडे वाटचाल करत असून, महिला सक्षमीकरण ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन निफाडचे गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी केले. निफाड तालुक्यातील करंजगाव येथे महिला ग्रामसभेत ते बोलत होते. ही सभा ग्रामपालिका सदस्य मनीषा प्रवीण पाटील राजोळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सरपंच खंडू बोडके-पाटील, राजेंद्र राजोळे, वसंत जाधव, रावसाहेब पाटील राजोळे, ग्रामविकास अधिकारी प्रमोद खैरनार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी ‘बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ’, महिला बचतगट आढावा, स्वच्छ भारत अभियान, जननी सुरक्षा योजना, कुपोषण निर्मूलन, मुलामूलींचे जन्म नोंदी, प्राथमिक शाळा, महिला सक्षमीकरण, अंगणवाडी-आरोग्य उपकेंद्र, रोजगार हमी योजना, महिलांसाठीच्या विविध योजनांबाबत चर्चा करण्यात आली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी होण्याचा निर्धार यावेळी महिलांनी केला. वीजेसंदर्भात व गावअंतर्गत रस्त्यांबाबत महिलांनी यावेळी तक्रारी केल्या. सरपंच खंडू बोडके-पाटील यांनी महिलांच्या सर्व तक्रारी सोडविण्याचे आश्वासन दिले. ग्रामविकास अधिकारी प्रमोद खैरनार यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून विषयपत्रिकेचे वाचन केले.

यावेळी करंजगावकर महिलांच्या वतीने गटविकास अधिकारी रत्नाकर पगार व ग्रामविकास अधिकारी प्रमोद खैरनार यांचा उत्कृष्ट कामकाज व सहकार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. खंडू बोडके-पाटील व राजेंद्र राजोळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


अवैध दारू विक्री विरोधात आंदोलन

कमल सावळीराम पीठे यांनी करंजगावात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीची तक्रार केली. त्यावर महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त करत वारंवार तक्रार करूनही सायखेड़ा पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करत असल्याची तक्रार केली. पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई न केल्यास पोलिसांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा व सायखेड़ा पोलिस स्टेशनला टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्य परिषदेच्या सभेकडे सभासदांची पाठ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सभासदांनी पाठ फिरवल्यामुळे अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेची वार्षिक सभा गणपूर्तीअभावी तहकूब करण्याची नामुश्की पदाधिकाऱ्यांवर ओढवली. त्यानंतर अर्ध्या तासानंतर अवघ्या २० ते २५ सभासदांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. केवळ औपचारिकता म्हणून झालेल्या या सभेत अहवाल वाचनाशिवाय एकही जिवंत विषय नसल्यामुळे ही सभा कोणताही वादा वा चर्चेविना संपली.

तब्बल बाराशेहून अधिक संख्या असलेल्या नाट्य परिषदेच्या या सभेत सभासदांच्या उपस्थितीबद्दल फारशी चर्चा न करता मागील सभेचे इतिवृत्त वाचून संमत करण्यात आले. त्यानंतर शाखेच्या कार्याचा वार्षिक अहवाल समंत करणे, कार्यकारी मंडळाने मंजूर केलेले शाखेचे एक एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ चा वार्षिक हिशेब मंजूर करणे, एक एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ साठीचे अंदाजपत्रक मंजूर करणे, २०१६- १७ साठी अंतर्गत हिशेब तपासनिसांची नियुक्ती करणे अशा कार्यक्रमपत्रिकेच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. अध्यक्षाच्या परवानगीने येणाऱ्या विषयात कार्यकारिणी सदस्य अॅड. धर्मेंद्र चव्हाण यांनी सभासदांना एसएमएस पाठवण्याची सूचना केली. त्यानंतर इतर सभासदांनी कोणतेही विषय चर्चेत घेतले नाहीत. सभेत पाच नोव्हेंबरला होणाऱ्या रंगभूमी दिनानिमित्त नियोजित पुरस्काराबरोबर आता अतिरिक्त संगीत पुरस्कार, सांस्कृतिक पत्रकारिता पुरस्कार, बालनाट्य पुरस्कार, विशेष योगदान पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी दिलेल्या एक लाखाच्या देणगीबद्दल अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर फारशी चर्चा न होताच ही सभा संपली.

सभेत अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, उपाध्यक्ष शाहू खैरे, कार्यवाहक सुनील ढगे, खजिनदार रवींद्र ढवळे यांच्यासह दत्ता पाटील, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, अॅड. धर्मेंद्र चव्हाण, ईश्वर जगताप, चंद्रकांत घुगे, अदिती मोराणकर, विजय सिंगणे, मुकंद गायधनी उपस्थित होते.

वार्षिक अहवालवाचन

नाशिक शाखेने वर्षभरात केलेल्या कार्याचे वाचन करण्यात आले. यात नाट्यवाचन, नाट्य पुरस्कार, नियामक मंडळ सभा, कालिदासदिन सोहळा, नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांची शाखेस भेट, आचार्य अत्रे जयंती, बालनाट्य संमेलन, कस्टमर केअर सर्वोत्कृष्ट, मराठी रंगभूमीदिन, नाट्यजाण शिबिर, शिरवाडकर, कानेटकर, सावंत पुरस्काराची घोषणा, नाट्यसंमेलनात शाखेची एकांकिका, नलावडे यांची कार्यालयास सदिच्छा भेट यांसारख्या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड येथील कुलस्वामिनी रेणुका देवीच्या नवरात्रोत्सवास शनिवारी (दि.०१) मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात प्रारंभ झाला. नवरात्रात येणाऱ्या भक्तांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मंदिरात घटी बसणाऱ्या महिलांची वाढती संख्या लक्षात घेता स्वतंत्र हॉलची व्यवस्था आहे. सरकार तसेच पुरातत्त्व विभागाकडून रेणुका देवी परिसरात जुन्या स्मृतींना उजाळा देण्याचे सुरू असलेले काम यंदा वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.

नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी रेणुका देवी मंदिरात शनिवारी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, रिंकू कासलीवाल तसेच उपनगराध्यक्ष कविता उगले, संदीप उगले यांच्या हस्ते सपत्नीक घटस्थापना करण्यात आली. तसेच चांदवडचे न्यायाधीश के. जी. चौधरी, न्यायाधीश एस. एम. धपाटे यांच्या हस्ते सपत्नीक आरती करण्यात आली.

कोटमगावला आरती

येवला ः तालुक्यातील श्री क्षेत्र कोटमगाव येथील माता जगदंबेच्या मंदिरात परमपूज्य रमेशगिरिजी महाराज यांच्या हस्ते शनिवारी घटस्थापना करण्यात आली. यावेळी आरतीही करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंगीचरणी भाविक लीन

$
0
0

जिल्ह्यात नवरात्रोत्सवास प्रारंभ; ३५ ते ४० हजार भक्तांची उपस्थिती

म. टा. वृत्तसेवा, कळवण

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ असलेल्या कळवण तालुक्यातील सप्तशृंग गडावर शनिवारी (दि. ०१) नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांनी सपत्नीक व जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा न्यासाचे अध्यक्ष यू. एन. नंदेश्वर यांच्या हस्ते सप्तशृंगी देवीच्या आरतीने प्रारंभ करण्यात आला. तसेच देवीच्या अलंकारांच्या पूजा व घटस्थापना यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.

प्रारंभी देवीच्या अलंकारांची विधिवत पूजा गडावरील पुरोहितांच्या माध्यमातून करण्यात आली. शनिवारी (दि. ०१) सकाळी ७ वाजता वाजत गाजत अलंकारांची मिरवणूकही काढण्यात आली. पहिल्या माळेला ३५ ते ४० हजार भाविकांनी भगवती दर्शनाचा लाभ घेतला. भगवतीस पंचामृत महापूजा करून दुपारी १२ वाजता महानैवैद्य दाखवण्यात आला. देवस्थानचे विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे, डॉ. उषा शिंदे, राजेंद्र सूर्यवंशी, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, जनसंपर्क प्रमुख भिकन वाबळे, अलंकार व्यवस्थापन प्रमुख प्रकाश पगार आदींसह मान्यवर उपस्थित होते. दरवर्षाप्रमाणे मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले राहणार आहे. पावसाने हजेरी काही वेळ आपली हजेरी लावली मात्र त्याचा कुठलाही परिणाम यात्रोत्सवावर झाला नाही.

भाविकांना सुविधा

देवस्थानच्या वतीने सर्व भाविकांसाठी अल्पदरात निवास व्यवस्था व यात्रा दरम्यान दोनवेळेचे मोफत अन्नदान, महाप्रसाद सुविधा देण्यात आली आहे. एकूण ११ पाणपोई व २४ तास लॉकर, चप्पल स्टँडची व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरात न्यासाच्या पाच जनरेटरद्वारे अखंडित वीजपुरवठा ठेवण्याची व्यवस्था कार्यान्वित आहे. परिसर स्वच्छतेसाठी ८० कर्मचारी कार्यरत आहेत.


भाविकांसाठी विमाव्यवस्था

गडावर येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षा व जीविताच्या रक्षणाच्या दृष्टीने न्यासाने ६ कोटी (सर्व प्रकारची आपत्तीसह) रकमेचा जनसुरक्षा विमा यात्रा कालावधीसाठी उतरविला आहे. सदर जनसुरक्षा विमा सुविधा अंतर्गत सर्व प्रकारचे अपघात, नैसर्गिक आपत्ती, गर्दीतील चेंगराचेंगरी व दहशतवादी हल्ला, अपघात याप्रसंगी होणारा मृत्यू व जखमींच्या कौटुंबिक व जीवित सुरक्षिततेसाठी हा विमा उतरविण्यात आला आहे. आरोग्याच्या दृष्टीने १०८ ही अत्यावश्यक रुग्णवाहिका सेवाही उपलब्ध करण्यात आली असून वाहनांची पार्किंग नांदुरीलाच करण्यात आली आहे.

खासगी व लहान वाहनांना परवानगी नाही

यू-टर्नचे काम झालेले असल्याने दोन महिन्यांपासून ठप्प असलेली अवजड वाहनांची वाहतूक खुली झाली असली तरी एस. टी. बसेस वगळता सप्तशृंग गडावर नवरात्रोत्सव व कोजागिरी उत्सवापर्यंत खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या २८० बसेस गडावर भाविकांच्या वाहतुकीसाठी तत्पर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राखीव वेळेचा आरटीओला विसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयाच्या (आरटीओ) भोंगळ कारभाराचा फटका लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्या अनेक उमेदवारांना शनिवारी बसला. घटस्थापनेनिमित्त जाहीर करण्यात आलेल्या सुटीमुळे शनिवारी आरटीओ कार्यालय बंद होते. मात्र, लर्निंग लायसन्ससाठी शनिवारी वेळ राखीव देण्यात आला होता. त्यामुळे उमेदवार कार्यालयात हजर झाले. मात्र, कार्यालयाला टाळे पाहून आता पुन्हा केव्हा हजर व्हायचे, असा प्रश्न उपस्थित करीत ते आल्या पावली परतले.

नाशिक आरटीओ कार्यालयात रोज तीनशे ते साडेतीनशे लर्निंग, तसेच पक्क्या लायसन्सचे काम केले जाते. लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी उमेदवाराला एका परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते. या परीक्षेस बसण्यासाठी उमेदवाराला ऑनलाइन अर्ज करावा लागतो. असा अर्ज भरणाऱ्या उमेदवारास परीक्षेसाठी उपस्थित राहण्याबाबतची वेळ व दिनांक दिला जातो. दिलेल्या वेळेत उमेदवाराने हजेरी लावणे आवश्यक असते. एका बॅचमध्ये ४० उमेदवारांची परीक्षा घेतली जाते. दिवसभरात अशा चार ते पाच बॅच पार पडतात. याशिवाय पक्के लायसन्स घेणाऱ्या चालकांची संख्या मोठी असते. हे काम केंद्रीय पातळीवर चालते. त्यात स्थानिक आरटीओमार्फत हस्तक्षेप होत नाही. त्यामुळे शनिवारी जाहीर झालेल्या स्थानिक सुटीच्या दिवशीही लर्निंग लायसन्ससाठी अर्ज सादर करणाऱ्या व्यक्तींना परीक्षेसाठी पाचारण करण्यात आले. या व्यक्ती सकाळी आरटीओ कार्यालयात पोहोचल्या. मात्र, तेथे कुलूप होते. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी सांगितले, की स्थानिक पातळीवरील सुटीबाबत नोटीस बोर्डावर सूचना देण्यात आली आहे. परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना सुटी असल्याचे कळवण्याबाबत आपल्याकडे यापेक्षा वेगळी यंत्रणा नाही. याचा परिणाम म्हणून काही व्यक्ती शनिवारी कार्यालयापर्यंत पोहोचल्या असाव्यात. त्यांना सोमवारपासून वेगवेगळ्या बॅचमध्ये समाविष्ट करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजर व्हा, अन्यथा मालमत्ता जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी अशा गंभीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या आणि मोक्का कलमानुसार कारवाई झालेल्या सात संशयितांनी हजर व्हावे; अन्यथा त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत. याबाबतचा आदेश कोर्टाने दिला आहे.

पंचवटीतील सुनील वाघ हत्याकांडानंतर शहर पोलिसांनी हत्या, तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार पंचवटीतील अनेक सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली. या गुन्ह्यात पोलिसांनी काही जणांना अटक केली असून, सध्या ते सेंट्रल जेलमध्ये आहे. मात्र, रवींद्र दगडूसिंग परदेशी (हनुमानवाडी, पंचवटी), अर्जुन रवींद्र परदेशी (हनुमानवाडी, पंचवटी), गणेश भास्कर कालेकर (हनुमानवाडी, पंचवटी), जयेश हिरामण दिवे (एरंडवाडी, पेठ फाटा, पंचवटी), राकेश तुकाराम कोष्टी (विजयनगर, दत्त चौक, सिडको), व्यंकटेश नानासाहेब मोरे (फ्लॅट क्रमांक १३, प्रीती अपार्टमेंट, विठ्ठल रुक्मिणी कार्यालयाजवळ, मखमलाबाद रोड) आणि किरण दिनेश नागरे (प्लॉट क्रमांक ७८, पार्वती निवास, जाणता राजा कॉलनी, मखमलाबाद रोड) यांना विशेष मोक्का कोर्टाने फरार असल्याबाबत जाहीरनामा (उदघोषणा) काढला असून, कोर्टाने या संशयितांना १४ ऑक्टोबर २०१६ पर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या तारखेपर्यंत संशयित कोर्ट अथवा पोलिसांसमोर हजर झाले नाही, तर कोर्टाच्या आदेशाप्रमाणे संशयितांच्या स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेव्हा शिक्षकच बनतात विद्यार्थिनींचा आधार

$
0
0

ashwini.kawale@timesgroup.com
Tweet : ashwinikawaleMT

नाशिक : वय शाळेचे.. पण पोटासाठी बाहेर पडून काम करण्याला घरादारातही जास्त महत्त्व.. त्यामुळे सकाळी उठल्यापासून पहिले घरातील व त्यानंतर इतरांकडे धुण्याभांड्याची काम करायला जायचे.. रोजच्या या दिनक्रमात शाळा मागे पडत चाललेली.. परंतु खऱ्या अर्थाने गुरुतुल्य असलेल्या शिक्षकांमुळे शाळा व अभ्यास दोन्हीही चांगल्या गतीने सुरू आहे.. हे चित्र आहे रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयातील मुलींच्या दैनंदिन जीवनाचे.

शाळेतील बहुतांश मुलींची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असून, झोपडपट्ट्यांमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. आई-वडिलांची शिक्षणाशी कधीच गाठ न पडल्याने आपल्या मुलांच्या व त्यातही मुलीच्या शिक्षणाबद्दल त्यांची मोठीच अनास्था असते. ‘शाळेत जाण्यापेक्षा काम कर’, असे टोमणेही त्यातूनच ऐकावे लागतात. मात्र, काहीही करून या घटकापर्यंत शिक्षण पोहोचवायेच या अट्टहासाने रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयातील सर्व शिक्षक कार्य करीत आहेत. या मुलींच्या कुटुंबाप्रमाणे या पिढीच्या वाट्याला तरी असे जीवन येऊ नये, यासाठी शाळेत येण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा शाळेमार्फत पुरविल्या जातात. बहुतांश मुली राजीवनगर, शिवाजीवाडी, सहवासनगर, कालिकानगर, मिलिंदनगर, कामटवाडे येथील झोपडपट्ट्यांमधून येतात. ये-जा करण्यासाठी लागणारा खर्च परवडत नसल्याने त्यांना मोफत बस पास काढून दिले जातात. शाळेतील शिक्षक दर महिन्याला स्वतःच्याच पगारातून यासाठी वर्गणी काढतात. याशिवाय मोफत गणवेश, नववी- दहावीच्या मुलींना पाठ्यपुस्तकेही उपलब्ध करून दिली जातात. शिवाय त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठीही शाळेतील शिक्षकवृंद सातत्याने पुढे असल्याने हे शिक्षक सर्वार्थाने या मुलींसाठी गुरू ठरत आहेत.

असे चालते काम...

रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात २० शिक्षक व एक मुख्याध्यापक असे २१ जण कार्यरत आहेत. प्रत्येक शिक्षक दर महिन्याला एक ते दीड हजार रुपये या मुलींच्या बस पासेससाठी देतात. शाळेतील शिपाईही आपल्या मिळकतीनुसार या उपक्रमाला हातभार लावतात. दर महिन्याला १५ ते १६ हजार रुपये जमा केले जातात. यातून पाससाठी आवश्यक फॉर्म आणणे, ते भरणे इथपासून मुलींना त्यांच्या हातात पास देण्यापर्यंतचे सर्व काम शिक्षक करतात. मुलींनी केवळ शाळेत यावे व शिक्षण घ्यावे ही एकच आमची इच्छा असल्याचे शिक्षक सांगतात.

शाळेत सर्व गरजू विद्यार्थिनी आहेत. त्यांच्याकडून कोणतीही फी आकारली जात नाही. त्यांनी फक्त चांगले शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे, ही आमची इच्छा आहे.

- करुणासागर पगारे, विश्वस्त

या मुलींच्या घरातील पार्श्वभूमी ही शिक्षणासाठी पूरक नसल्याने आम्हाला सातत्याने प्रबोधनाचे काम सुरू ठेवावे लागते. काही विद्यार्थिनी पास मिळाल्यानंतर दोन-तीन दिवस येत नाहीत. अशांना त्यांच्या घरी जाऊन शाळेत येण्यासाठी प्रवृत्त करावे लागते. या मुलींना जास्तीत जास्त चांगले शिक्षण मिळावे, या हेतूने आम्ही कार्य करीत आहोत.

- सरिता जोशी, मुख्याध्यापिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images