Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मत्स्य व्यवसाय अडचणीत

0
0

निविदा प्रक्रिया राबविण्यास दिरंगाई

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक जिल्ह्यातील एकूण १३० तलावांपैकी चालूवर्षी एकाही तलावाचा मत्स्य व्यवसायासाठी ठेका देण्यासाठी निविदा कार्यक्रम अद्यापही राबविण्यात न आल्याने जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाची तडफड सुरू झाली आहे. विशेष म्हणजे सुमारे साडेआठ लाख रुपयांची गेल्या वर्षीचीच थकबाकी अद्यापही वसूल होणे बाकी आहे.

नाशिक जिल्ह्यात २०० हेक्टरवरील एकूण १६ तलाव, तर २०० हेक्टरखालील ११४ तलाव आहेत. त्यापैकी ६७ तलावांच्या मत्स्य व्यवसायाची जबाबदारी हे तलाव ज्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत आहेत त्या ग्रामपंचायतींवर पेसा कायद्यांतर्गत देण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी केवळ ११ तलावातील मत्स्य व्यवसायासाठी मत्स्य व्यवसाय विभागामार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. परंतु, ही प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर या तलावांनी तळ गाठला होता. त्यामुळे शासनाचा मोठा महसूल वाया गेला होता. त्यानंतर १ मे २०१६ रोजी राज्य शासनाने काढलेल्या आदेशामुळे चालू वर्षीही नाशिक जिल्ह्यातील तलावांची मत्स्य व्यवसायाची निविदाप्रक्रिया अडचणीत आल्याने चालू वर्षी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. परिणामी दोन वर्षांपूर्वी ज्या मत्स्य व्यवसाय करणाऱ्या सहकारी संस्थांना या तलावांचा ठेका देण्यात आला होता, त्याच सहकारी संस्थांना चालू वर्षासाठी ठेका कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलावर दुसऱ्यांदा पाणी फिरले आहे. नाशिक जिल्ह्यातील २०० हेक्टरवरील १६ तलावांपैकी सध्या सहकारी संस्थांना १३ व खासगी संस्थांना तीन तलाव मत्स्य व्यवसायासाठी ठेक्याने दिलेले आहेत. त्यांच्याकडे गेल्या वर्षाचीच अद्यापही ७, ६३, ९९१ रुपये इतकी थकबाकी आहे. तर २०० हेक्टरखालील तलावांपैकी पेसा कायद्यान्वये स्थानिक ग्रामपंचायतींना मत्स्य व्यवसायासाठी हस्तांतरीत ६७ तलाव वगळता ४७ तलावांचा ठेका दिलेल्या सहकारी व खासगी संस्थांकडे ७३,९२९ रुपये इतकी थकबाकी आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसायाची तडफड वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारवाईच्या धाकाने सतरा स्पा सेंटरना टाळे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूररोड, सरकारवाडा तसेच मुंबई नाका या परिमंडळ एक हद्दीतील २० पैकी १७ स्पाला पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने टाळे लागले आहे. पोलिसांनी कॉलेजरोडवर एन्जी या स्पावर केलेल्या कारवाईनंतर हा चमत्कार घडला. स्पाआडून अनैतिक व्यवसायाचा बाजार भरू पाहणाऱ्या समाजकंटकांना ब्रेक लागला असून, पोलिसांनी सातत्याने यासाठी प्रयत्नशील राहावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जाते आहे.

कॉलेजरोडवरील ठक्कर मॅजेस्टी इमारतीत सुरू असलेल्या एन्जी या स्पावर ४ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणी वेश्या व्यवसाय करणाऱ्या पाच मुलींची सुटका करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी हेमंत अशोक परिहार आणि त्याची साथीदार निलोफर तैय्यब शेख यांच्यासह जागामालक भालचंद्र राजाराम सावळे अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. सावळे यांनी गाळा भाड्याने दिल्यानंतर परिहार आणि शेखने तो गाळा हडप करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पण्ण झाले. सध्या परिहारसह शेख न्यायालयीन कोठडीत आहे; तर सावळे यांची जाम‌िनावर मुक्तता झाली आहे.

दरम्यान, गतवर्षी पोलिसांनी याच ठिकाणी छापा मारून स्पाआड सुरू असलेला वेश्या व्यवसायाचा अड्डा उध्दवस्त केला होता. त्यामुळे स्पाआड अनैतिक व्यवसायाचे रॅकेट चालवणाऱ्यांना पोलिसांनी रडारवर घेतल्याचे दिसून येत आहे. परिमंडळ एकमधील गंगापूर, सरकारवाडा आणि मुंबई नाका या पोलिस स्टेशन हद्दीत सर्वात जास्त स्पा कार्यरत आहेत. ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या कारवाईनंतर पोलिसांनी परिमंडळ एकमधील या तीन पोलिस स्टेशनसह भद्रकाली, आडगाव, पंचवटी व म्हसरूळ पोलिस स्टेशन हद्दीत स्पा सेंटर्सची ठिकाणे शोधून काढली. पोलिसांनी कारवाई केली त्यापूर्वी २० सेंटर्स सुरू होते. सध्या फक्त तीन सेंटर्स सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

सदर सेंटर्समध्ये सीसीटीव्ही कार्यरत असून, संशयास्पद हालचाली आढळून आल्या नाहीत. उर्वरीत सेंटर्स बंद असून, काहीतरी काळंबेरं असल्यानेच त्यांनी सेंटर्स बंद केले असावेत, अशी शंका उपायुक्त पाटील यांनी उपस्थित केली. सदर स्पा सेंटर्समध्ये पिंपळगाव, ओझर, निफाड या सधन भागातील तरुणांचा मोठ्या प्रमाणावर राबता होता, असे प्राथमिक चौकशीत समोर येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

इंटरनेटवर अशा प्रकारच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर दाखवल्या जातात. प्रत्यक्षात मात्र तरुणांची आर्थिक फसवणूक केली जाते. पैसे गेलेले तरुण पोलिसांकडे येत नाहीत. सध्या आम्ही अशा काही गुन्ह्यांचा तपास करीत असून, त्याचे सूत्रधार परराज्यातून आपले काम चालवतात असे दिसते. त्यामुळे नागरिकांनीदेखील सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

-लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात मद्यधुंद पित्याची मुख्याध्यापकाला मारहाण

0
0

म. टा. वृत्तसेवा,धुळे

चितळे माध्यमिक विद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी चौथीतील विद्यार्थिनीची छेड काढल्याचा आरोप करीत या मुलीच्या वडिलांनी मद्यधुंद अवस्थेत मुख्याध्यापकांना मारहाण केली. या प्रकरणी देवपूर पश्चिम ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवपुरातील रामचंद्र चितळे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनारसिंग दुर्गासिंग पावरा (वय ४९) यांनी देवपूर पोलिस ठाण्यात दिलेलया फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवार २१ रोजी सकाळी साडेअकरा वाजता ते शाळेत गेले असता, दुपारी दोन वाजेच्या सुमारास उदय शिरसाठ व त्यांच्यासह एक व्यक्ती कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत आले. इयत्ता चौथीतील त्यांच्या मुलीची काही विद्यार्थी छेड काढत असल्याचा आरोप करीत त्यांनी मुख्याध्यापक पावरा यांना शिवीगाळ व दमदाटी केली. चपलेने त्यांच्या डोक्यावर मारहाण केली. शिक्षकांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले. या घटनेची माहिती शाळेचे पर्यवेक्षक अमोद जोग यांनी देवपूर पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी उदय शिरसाठ याला अटक करून त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर संप्तत शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. डॉक्टरांप्रमाणे शिक्षकांनाही संरक्षण कायदा मंजूर करावा यासह इतर मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. शालेय पसिरात नेहमीच काही वाईट प्रवृत्तीच्या मुलांचा नेहमीच त्रास होतो. त्याबाबत पोलिस व प्रशासनाकडे पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष होत आहे. या प्रकरणी योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी करण्यातक आली आहे. शिक्षक परिषदेचे संजय पवार, एस. डी. मोरे, सी. आर. देसले, नितीन ठाकूर, किशोर पाटील व शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत हवे स्वतंत्र वाहनतळ

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली मध्ये येत्या आठवड्याभरात कपडे खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे शहरात वाहतुकीचा खोळंबा होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर लेव्हिट मार्केटच्या लगतच्या जागेची निवड करत त्या ठिकाणी प्रशासनाने मोफत वाहनतळाची व्यवस्था करून दिली. तरी कॅन्टोन्मेंट हायस्कूल समोरील मोकळ्या जागेतदेखील स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यासाठी जागा उपलब्ध असून, त्या ठिकाणी कायमस्वरूपी अधिकृत वाहनतळ असावा, अशी मागणी नगरसेवक भगवान कटारिया यांनी केली आहे.

दिवाळीनिमित्त खरेदीसाठी येणाऱ्या लोक सोबत वाहनेही घेऊन येणार असल्याने लेव्हीट मार्केट परिसराचा आवाका लक्षात घेता त्या ठिकाणी पार्किंग सुविधा मोजकीच आहे. त्यामुळे बोर्डाने शहरातील बोहरा मशिद

शेजारील जागा, हौसन रोडवरील शाळा, गुरुनानी कॉम्पलेक्समागील, देना बँकशेजारील व आठवडे बाजाराची जागा वाहनतळ म्हणून एक आठवड्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. तसेच बाहेरील गाड्यांची पार्किंग आढळून आल्यास प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनी अधिकृत सूचना पत्रात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिसेलची वाहने सुसाट

0
0

शहर परिसरात तब्बल १२५ वाहन बाजार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीत नव्या वस्तूंबरोबरच सेकंड हँड गाड्यांनाही मोठी मागणी असून, त्यांच्या विक्रीतही वाढ झाली आहे. शहरात १२५ हून अधिक वाहन बाजार असून, त्यांची उलाढाल कोट्यवधी रुपयात आहे. या वाहन बाजारात ३० हजारांपासून एक कोटी रुपयांपर्यंतच्या गाड्याही विक्रीला आहेत. त्यामुळे या गाड्या सध्या ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत. विविध मॉडेल व कंपन्यांच्या गाड्या या मार्केटमध्ये बघायला मिळत असल्यामुळे ग्राहकांचा ओढाही वाढला आहे.

बदललेले राहणीमाण, वाढलेले कुटुंब व चारचाकी गाड्यांची गरज आता प्रत्येकाला वाटू लागली आहे. त्यातच चारचाकी गाडी असणे हे प्रतिष्ठेचे असल्यामुळे अनेकांना वाहन खरेदीची इच्छा असते. पण नव्या गाड्यांच्या वाढलेल्या किमतीमुळे ते मध्यम कुटुंबीयांना शक्य नसते, त्यामुळे सेंकड हॅण्ड गाड्या हा सर्वांसाठी पर्याय आहे. विशेष म्हणजे सेंकण्ड हॅण्ड मार्केटनेही आपली विश्वासार्हता निर्माण केली असून, ऑल इंडिया कार असोसिएशन त्यासाठी स्थापन केली आहे. नाशिकमध्ये या असोसिएशनचे ५५ सदस्य असून, त्यांनी आपली सर्व माहिती वेबसाईटवर टाकली आहे. त्यामुळे वाहन खरेदी करताना या असोसिएशनच्या सदस्यांना त्याचा फायदा होऊ लागला आहे. वाहन खरेदी करताना आता सहज बँक कर्ज उपलब्ध करून देत असल्यामुळे कार घेणे आता सोपेही झाले आहे. ऑनलाइनवर विकल्या जाणाऱ्या कारमध्ये ग्राहक व विकणाऱ्यांची फारशी ओळख नसते. त्यामुळे बऱ्याच वेळा फसवणूक होते. पण वाहन बाजारात ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जाते. कमिशनवर बेसवर केला जाणारा हा व्यवसाय नाशिकमध्ये मोठया प्रमाणात वाढला आहे. ठिकठिकाणी दिसणारे हे सेंकण्ड कार विकणाऱ्यांचा वाहन बाजार चकचकीत गाड्यांनी सर्वांचे लक्षही वेधते. या वाहन बाजारात मारुती, महिन्द्रा, टाटा, ह्युंदाई, जनलर मोटर्स, होन्डा, फोर्ड, टोयोटा अशा सर्वच प्रमुख वाहन कंपन्यांनाचे सेकंड हॅण्‍ड वाहने उपलब्ध आहेत. सेकंड हॅण्‍ड गाड्यांची विक्री करताना वाहन तांत्रिकदृष्ट्या फिट करतानाच विकल्यानंतरही त्यांना मदत करीत असल्यामुळे या कार विक्रीला चांगले मार्केट निर्माण झाले आहे.

दिवाळीत सेकण्ड हॅण्ड कारला चांगली मागणी आहे. आम्ही कार विकताना सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ती ग्राहकांना विकतो. त्यासाठी विश्वासार्हता महत्त्वाची आहे. चोरीच्या कारबाबत आम्ही दक्षता पाळतो. ऑल इंडिया लेवलवर आमची संघटना असल्यामुळे माहिती देवाण-घेवाणसाठी फायदा होतो.

- महेश जोशी, वरिष्ठ उपाध्यक्ष, आल इंडिया कार असोसिएशन

वाहन बाजारात विविध प्रकारच्या गाड्या असल्यामुळे दिवाळीत आपल्या घरीही कार असावी, यासाठी गेल्या काही दिवसांत मार्केटमध्ये चैतन्य आहे. कार विक्री करताना मार्केटने विश्वासार्हता तयार केल्यामुळे आता ग्राहकांचा ओढाही वाढला आहे.

- अनिरुध्द सप्तश्री, कार विक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकलीवरील उपचारांसाठी जोपासली सामाजिकता...

0
0

कार्तिकेय नगरवासीयांचे रक्तदान शिबिर


म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शाळेत शिकणाऱ्या गायत्री राजेंद्र गरूड या मुलीला अचानक थॅलेसेमिया या आजाराने ग्रासले होते. संबंधित आजारामुळे तिच्या शरीरात नवीन रक्तच तयार होत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. याबाबत कामडवाडे शिवारातील कार्तिकेयनगर वासीयांना माहिती मिळाल्यावर त्यांनी गायत्रीसाठी पुढे येत रक्तदान शिबिराचे आयोजन केले. याद्वारे त्यांनी सामाजिकतेचे दर्शनच घडविले.

या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून ५० रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करण्यात आले. याप्रसंगी उद्योजक प्रदीप पेशकार यांनी कार्तिकेयनगर वासियांचे आभार मानत रक्ताला जात नसल्याचे दाखवून दिल्याचे सांगितले. शिबिरात परिसरातील महिलांसह रहिवाशांनी सहभाग नोंदविला. गायत्रीच्या शिक्षकांनीदेखील यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

पेठे हायस्कूल शाळेत शिकणाऱ्या गायत्री गरूड या सातवीच्या विद्यार्थिनीला अचानक थॅलेसेमिया आजार झाला. तिचे वडील रिक्षा चालवून घरातील कुटुंबाचे पालनपोषण करतात. मात्र आपल्या मुलीला थॅलेसेमिया आजाराने ग्रासल्याने गरूड कुटुंब चिंतेत होते. त्यातच महिन्यातून अनेकदा गायत्रीचे रक्त बदलावे लागत असल्याने येणारा खर्च राजेंद्र गरूड यांना परवडत नव्हता.

समाजाचे ऋण फेडले

आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने कार्तिकेय नगर रहिवाशांनी गायत्रीसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. त्यांनी यासाठी अर्पण रक्तपेढीला तब्बल ५० पिशव्यांचा साठा दिला आहे. येथील श्वास फाऊंडेशन व साईबाबा मित्रमंडळाच्या वतीने गायत्रीला लागणाऱ्या रक्त पुरवठ्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात श्वास फाऊंडेशनचे विजय पाळेकर व मकरंद वाघ तर साईबाबा मित्रमंडळाचे दत्तू वाळे यांनी पुढाकार घेतला. गेल्या वर्षीही गायत्रीसाठी ७० पिशव्यांचा रक्त पुरवठा संकलित करण्यात आला होता. शिबिरासाठी डॉ. तापडे यांचे सहकार्य लाभले. भविष्यातही गायत्रीसाठी सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येईल, असे श्वास फाऊंडेशन व साईबाबा मित्र मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समस्यांप्रश्नी अधिकाऱ्यांची सारवासारव

0
0

नाशिकरोड प्रभाग बैठकीत नगरसेवक आक्रमक

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

दिवाळी सण अगदी जवळ येऊन ठेपला असूनही शहरातील बहुतांश भागातील बंद पथदिप व शहराच्या विविध भागात निर्माण झालेले कचऱ्याचे साम्राज्य या विषयांवर शुक्रवारी नाशिकरोड प्रभाग समितीची सभा चांगलीच गाजली. या वेळी अधिकाऱ्यांनी सारवासारव करताच प्रभाग सभापती सूर्यकांत लवटे यांनी सभागृहात दैनिकांत आलेल्या समस्यांच्या बातम्याच दाखविल्याने अधिकाऱ्यांची गोची झाली.

नाशिकरोड प्रभाग समितीची सभा शुक्रवारी (दि. २१) दुपारी नाशिकरोड विभागीय कार्यालयात प्रभाग सभापती सुर्यकांत लवटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी नगरसेवक अशोक सातभाई, शोभा आवारे, कोमल मेहरोलिया, हरिष भडांगे, ललिता भालेराव यांनी शहरातील अस्वच्छता, बंद पथदिप, दूषित पाणी पुरवठा या विषयांवर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

शहरातील स्वच्छता नियमितपणे केली जात असल्याचा दावा स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांनी करताच स्वतः प्रभाग सभापतींनी कचऱ्याच्या समस्याच्या एका दैनिकात छापून आलेल्या बातम्याच सभागृहात दाखविल्याने अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली.

दिवाळी निमित्ताने नागरिक घरांची स्वच्छता करित असल्याने जास्त वेळ पाणीपुरवठा करावा, शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, झोपडपट्टी विभागात स्वच्छता मोहिम राबवावी, शहरातील बंद पथदिप तत्काळ सुरू करावेत, झाडांच्या वाढलेल्या फांद्या कमी कराव्यात, दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने त्यावर उपाययोजना करावी यासारख्या मागण्या नगरसेवकांनी सभागृहात मांडल्या. याप्रसंगी नगरसेविका मंगला आढाव, सुनिता कोठुळे, नयना घोलप, सुनंदा मोरे, मंदा ढिकले, सविता दलवाणी आदींसह विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

गार्डन्सची दुरवस्था

शहरातील गार्डनच्या देखभालीचा ठेका एका ठेकेदाराला दिला असला तरी त्याची वर्क ऑर्डर न झाल्याने संबधित ठेकेदाराने गार्डन्सच्या देखभालीचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. न झाल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असल्याच्या प्रश्नावर नगरसेविका शोभा आवारे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

महिलांचा मोर्चा

प्रभाग क्र.५७ मधील गायकवाड मळा, गोरेवाडी या भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने या भागातील सुमारे १५० ते २०० महिलांनी पालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. त्यांनी यावेळी निषेध व्यक्त करत सभापती सूर्यकांत लवटे यांना आपल्या समस्यांचे निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाले बुजविण्याची लागली स्पर्धा

0
0

सातपूर भागात खासगी विकसकांचे अतिक्रमण; मनपा यंत्रणा सुस्त

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहरातील अनेक भागात असलेले नैसर्गिक नाले बुजविण्याची स्पर्धा सातपूरला लागली की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशोकनगर रस्त्यावरील मौले हॉलशेजारील नैसर्गिक नाला बुजविल्याने पावसाचे पाणी साचून वाहनचालकांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. त्यातच समृद्धनगरला लागून असलेल्या नाल्यावर खासगी विकसकाने चक्क बांधकामच सुरू केले. असे असताना दुसरीकडे गणेशनगरमध्ये एमआयडीसीतून बाहेर पडणाऱ्या नाला बुजविण्याचा घाट बांधकाम व्यावसायिकाने घेतला आहे. या सर्व परिस्थितीकडे महापालिकेच्या यंत्रणेने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सातपूर भागात नंदिनी नदीच्या तीरावर अनधिकृत झोपड्यांचे अतिक्रमण असताना दुसरीकडे नैसर्गिक नाल्यांवरही खासगी विकसकांनी अतिक्रमण केले आहे. अशोकनगर रस्त्यावरील मौले हॉलजवळील नाला गेल्या काही वर्षापूर्वी बुजविण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात नेहमीच रस्त्यांवर पाणी साचत असते. तसेच अशोकनगर भागातील नालादेखील बुजविण्यात आल्याने रस्त्यांवरून वाहणाऱ्या पाण्याचा वाहनचालकांसह पादचाऱ्यांनादेखील नेहमीच त्रास सहन करावा लागतो.

गणेशनगरमध्ये एमआयडीसीतून बाहेर पडणारा नाला बुजविण्याचे काम बांधकाम व्यावसायिकांकडून केले जात आहे. हे सर्व प्रकार उघडपणे घडत असताना महापालिकेची यंत्रणा काय करते, असा सवाल सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे. तरी तातडीने या नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई करावी, अशी मागणी सातपूरकरांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


असमर्थ ‘पर्यटन’मुळे अधिकारी वाऱ्यावर!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकपदी उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या नियुक्तीचे आदेश महसूल विभागाकडून काढण्यात आले असले, तरी पर्यटन विभागाने तब्बल दोन आठवड्यांनी हा आदेश टोलवून लावला आहे. मूव्हमेंट ऑर्डरची प्रतीक्षा करणाऱ्या मुंडावरे यांना प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून रुजू करून घेण्यास पर्यटन विभागाने असमर्थता दर्शविली असून, दोन विभागांमधील असमन्वयाचा फटका अधिकाऱ्यांना बसत आहे.

उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून रूजू व्हावे, असे आदेश महसूल विभागाने ७ ऑक्टोबरला काढले होते. जळगावचे जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून काढण्यात आलेल्या आदेशाला मुंडावरे यांनी मॅटमध्ये आव्हान दिल्याने महसूल विभागाने ही प्रतिनियुक्ती दिली होती. दोन महिन्यांपासून प्रतिनियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंडावरेंना या निर्णयामुळे दिलासा मिळाला होता. मात्र आता पर्यटन विभागानेही त्यांना रूजू करून घेण्यास नकार दिल्याने एकाच सरकारमधील वेगवेगळ्या विभागांमधील असमन्वयाचा फटका त्यांना बसला आहे.

ऑक्टोबर २०१५ मध्ये मुंडावरे जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (प्रशासन) या पदावर रुजू झाले. एका वर्षाच्या आतच २० ऑगस्टला त्यांच्या बदलीचे आदेश निघाले. ते मुळचे नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची जळगाव येथे बदली करण्यात आली होती. मात्र या आदेशाला त्यांनी मॅटमध्ये आव्हान दिले. निवडणुकीशी संबंधित काम नसेल, अशा नाशिकमधील कोणत्याही पदावर नियुक्ती द्या, अशी विनंती त्यांनी प्राधिकरणाला केली होती. कोर्टाने जिल्हा प्रशासनाची कानउघडणी केल्यानंतर त्यांना प्रादेशिक व्यवस्थापक पर्यटन विकास महामंडळ नाशिक या पदावर महसूलने नियुक्ती दिली. मात्र या पदावर रूजू करून घेण्यास पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने असमर्थता दर्शवली आहे.

पर्यटन विभागाचे स्पष्टीकरण

मुंडावरे यांच्या नियुक्तीबाबत पर्यटन विभागाने महसूल विभागाकडे मागणी, तसेच शिफारस केलेली नाही. त्यामुळे त्यांना या पदावर रूजू करून घेता येणार नाही, असे पर्यटन विभागाचे अवर सचिव सं. मु. भांडारकर यांनी महसूल विभागाच्या प्रधान सचिवांना काढलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागतिक शांतता परिषद सोमवारी

0
0

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची उपस्थिती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहशतवादाचे आव्हाने जगातील प्रत्येक देशासमोर उभे ठाकले असताना शिक्षणाच्या माध्यमातून यावर उपाययोजना सांगू पाहणाऱ्या तीनदिवसीय जागतिक शांतता परिषदेस सोमवारपासून (दि. २४) येथे सुरुवात होणार आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एसएमआरके कॉलेज मैदानावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते सकाळी १० वाजता या परिषदेचे उद््घाटन होईल. जगभरातील दीडशे तज्ज्ञ या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.

संयुक्त राष्ट्रांद्वारे ही परिषद पुरस्कृत करण्यात आली आहे. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एज्युकेटर्स फॉर वर्ल्ड पीस व गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी आणि एसएमआरके कॉलेजतर्फे या १९ व्या जागतिक शांतता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सुशासन आणि अहिंसेसाठी शांतता शिक्षण’ या विषयावर देश-विदेशातील तज्ज्ञ यावेळी मांडणी करणार आहेत. संयुक्त राष्ट्रांचा वर्धापनदिन, नामदार गोपालकृष्ण गोखले यांची १५१ वी जयंती, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शतकमहोत्सवपूर्व २५ महिन्यांच्या कालखंडाचा शुभारंभ, संस्थेचे सचिव, शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य सर डॉ. मो. स. गोसावी यांचे सहस्त्र चंद्रदर्शन तसेच ‘सर डॉ. एम. एस. गोसावी एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान अशी विविध औचित्य साधत परिषद आयोजित करण्यात आली आहे. अणू आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांना पहिला डॉ. गोसावी पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर हे अध्यक्षस्थान भूषवतील. विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर विशेष अतिथी आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन आणि खासदार चिंतामण वनगा प्रमुख पाहुणे असतील. सहस्त्रचंद्रदर्शनानिमित्त डॉ. गोसावी यांचा राज्यपालांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात येईल.

नऊ तांत्रिक सत्रे

परिषदेत एकूण ९ तांत्रिक सत्रे व गटवार चर्चा होणार आहे. तैवानमधील चेन्गाची विद्यापीठाचे कुलगुरू डेव्हिड ब्लन्डेल, शांततावादी कार्यकर्ते हु जी वांग, अमेरिकेतील शांततावादी कार्यकर्ते डॉ. लज उतरेजा, मुलांसाठी काम करणाऱ्या डॉ. नीना मेयरहॉफ, हवाईतील शांततावादी लेखिका डेम मेबेल कात्झ असे अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ तसेच नागालँडमधील खुल्या जागतिक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रियरंजन त्रिवेदी, अणुशास्त्रज्ञ शंकरराव गोवारीकर, न्या. जयंतराव चित्रे, न्या. ए. एस. अग्वैर असे देशातील नामवंत सहभागी होत आहेत. कॉलेजच्या प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे, एचपीटी चे प्राचार्य व्ही. एम. सूर्यवंशी, निमंत्रक डॉ विवेक बोबडे, परिषद यशस्वीततेसाठी प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांनी अनुभवली नाटकाची मजा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी मराठी बाणा या कार्यक्रमाची मजा लुटली. पोलिस आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना भद्रकाली पोलिस स्टेशन येथे हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अधिकारी हजर झाले. मात्र, यानंतर सर्व फौजफाटा कालिदास कलामंदिर येथे पोहोचला. चार दिवसांपूर्वी अशाच पध्दतीने पोलिस कर्मचाऱ्यांना एमएस धोनी या पिक्चरसाठी धाडण्यात आले होते.

पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील वाढत्या ताणाबाबत सर्वच स्थरातून चिंता व्यक्त करण्यात येते. त्यामुळे कामाच्या रहाटगाड्यात पिचलेल्या पोलिसांचा ताण कमी व्हावा, या उद्देशाने हा प्रयोग राबवला जात आहे. शहर पोलिस दलातील २०० पोलिसांना आरोग्य तपासणीनंतर १८ ऑक्टोबर रोजीदेखील थेट मल्टीफ्लेक्समध्ये नेण्यात आले. यानंतर, पुन्हा अशी संधी मिळेल की नाही, या विचारात असताना शनिवारी सायंकाळी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी सर्व पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षकांना भद्रकाली पोलिस स्टेशन येथे जमा होण्यास सांगितले. बरहुकूम कार्यवाही झाली. यानंतर, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा सर्व फौजफाटा थेट कालिदास कलामंदिर येथे पोहोचला. तिथे साता समुद्रापार पोहोचलेला मराठी बाणा या कार्यक्रमाची सर्वांनी मजा लुटली. कर्मचाऱ्यांपाठोपाठ पोलिस अधिकाऱ्यांनाही सुखद धक्का मिळाला असून, अशा विरंगुळ्यामुळे पोलिसांच्या एकूण कार्यपध्दतीत सुधारणा होण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना आहे.

आज ‘एलएसओएम’

शहर पोलिसांनी आयोजित केलेल्या लास्ट संडे ऑफ मंथ (एलएसओएम) या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी (२३ ऑक्टोबर) सकाळी सहा वाजेपासून गंगापूररोडवरील आसारामबापू पुलाजवळील गोदापार्क येथे कार्यक्रमास सुरुवात होईल. सदर कार्यक्रम नागरिकांसाठी असून, विविध खेळ तसेच सांस्कृतीक कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी नोकरभरती रद्दचा ठराव

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास महामंडळातील नोकरभरती ही महामंडळाच्या संचालक मंडळाची मंजुरी न घेताच करण्यात आली आहे. त्यामुळे ही वादग्रस्त नोकरभरती रद्द करावी, असा ठराव महामंडळाच्या संचालक मंडळाने केला आहे. त्यामुळे ही नोकरभरती पुन्हा वादात सापडली असून, आतापर्यंत निवड झालेल्या उमेदवारांचेही भविष्य टांगणीला लागले आहे. या भरतीसाठी संचालक मंडळासह सरकारचीही परवानगी नसल्याचा दावा संचालकांनी केला असून, यामुळे आता तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक बाजीराव जाधवांसह बड्या अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

आदिवासी विकास महामंडळात ५८४ पदांसाठी झालेली नोकरभरती गेल्या वर्षभरापासून गाजत आहे. या नोकरभरतीची सध्या विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्यामार्फत चौकशी सुरू आहे. या भरतीत जवळपास तीनशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचेच खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यानीच ती चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आता या भरतीसंदर्भात महामंडळाच्याच संचालक मंडळाने मोठा खुलासा केला आहे. नागपूरमध्ये आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या उपस्थितीत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या नोकरभरतीला संचालक मंडळाची परवानगीच घेतली नसल्याचा आरोप संचालकांनी केला. सरकारचे व्यवस्थापन महामंडळ असून, त्याचा कार्यभार संचालक मंडळामार्फत चालविला जातो. त्यामुळे या भरतीला महामंडळाची परवानगी आवश्यक होती. त्यामुळे संचालकांनी संतप्त होऊन ही भरतीच रद्द करण्याचा ठराव मांडला. त्याला इतर संचालकांसह आदिवासी मंत्र्यांनीही संमती दिल्याचा दावा संचालकांनी केला आहे.

दोनशेवर उमेदवारांचे भविष्य अधांतरी

आदिवासी विभागाचे सचिव राजगोपाल देवरा यांनी संबंधित भरती रद्दचा ठराव करून तो विभागीय आयुक्तांकडे पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. भरती रद्द करण्याची शिफारस विभागीय आयुक्त करू शकतात. त्यांनी रद्दची शिफारस केल्यास शासन रद्द करण्याचा निर्णय घेईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आतापर्यंत निवड झालेल्या दोनशेवर उमेदवारांचेही भविष्य टांगणीला लागले आहे. या सर्व प्रकारामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे आता सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

भ्रष्टाचार होईल उघड

या भरतीत कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जात आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून दहा ते पंधरा लाख रुपये घेतल्याचा आरोप केला गेला. ही भरती रद्द झाल्यास पैसे देऊन भरती झालेले उमेदवार बाहेर येतील, तसेच त्यांनी कोणाला पैसे दिले, याचीही माहिती बाहेर येईल. त्यामुळे यातील भ्रष्टाचार थेट उघड होईल, असा दावा काही संचालकांकडून केला जात आहे. ही भरतीप्रक्रिया राबविणारे तत्कालीन एमडी बाजीराव जाधव, प्रशासन अधिकारी नरेंद्र मांदळे यांच्यासह अनेकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेंट्रल गोदावरीच्या अध्यक्षपदी वाघ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूरच्या सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडणुकीत खासदार देविदास पिंगळे गटाचे ज्ञानेश्वर वाघ यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यपदी अरुण पाटील यांची बहुमताने निवड झाली. या निवडणुकीत दिनकर पाटील गटाचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले.

दीड वर्षापूर्वीच या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक झाली होती. त्यानंतर पिंगळे गटाने वर्चस्व मिळवत आपल्या समर्थकांना निवडून आणले. या संस्थेचे नाशिक तालुक्यातील पश्चिम भागातील २७ गावांचे कार्यक्षेत्र असून, पाच हजार सभासद आहेत. विशेष म्हणजे या संस्थेची सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही अधिकोश बँक असून, या बँकेकडून संस्था कर्ज घेऊन ते सभासदांना वाटते. संस्थेने आतापर्यंत १३ कोटी रुपये अल्प व मध्यम मुदतीचे कर्ज सभासदांना वाटप केले आहे.

संस्थेच्या अध्यक्षपदी दिनकर पाटील होते. त्यांच्या कार्यकाळात मनमानी काम करण्यात आल्याचा आरोप नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्षांनी केला. त्यामुळे आम्ही सर्वांनी एकत्र येऊन देविदास पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत बहुमत प्राप्त केले. निवडणुकीत पाटील गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार मधुकर खांडबहाले व उपाध्यक्षपदाच्या उमेदवार शीलाताई पाटील यांचा पराभव केला. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांना संस्थेचे ज्येष्ठ संचालक तानाजी पिंगळे, पंडितराव पाटील, रामदास पिंगळे, पुंजाजी थेटे, अनिल काकड आदींनी सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांवर खर्चाचे बंधन

0
0

म. टा प्रतिनिधी, नाशिक

नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून, विजयाची माळ गळ्यात पडावी, यासाठी उमेदवारांनीही कंबर कसली आहे. निवडणुकांमध्ये वारेमाप उधळपट्टी होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा ठरवून दिली आहे. नगरपालिकेच्या दर्जानुसार नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंत, तर सदस्यपदासाठी लढणाऱ्या उमेदवारांना कमीत कमी दीड ते तीन लाख रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे.

निवडणूक आयोगाने अलीकडेच नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नाशिकमधील भगूर, सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड आणि सटाणा नगरपालिकांची निवडणूक २७ नोव्हेंबरला होणार आहे. या नगरपालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिताही लागू झाली आहे. उमेदवारांच्या खर्चमर्यादेवर राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव ध. मा. कानेड यांनी आदेश काढले आहेत. अ, ब आणि क वर्गाच्या नगरपालिकांनुसार खर्चमर्यादा ठरविण्यात आली आहे.

अशी आहे खर्चमर्यादा

अ वर्ग नगरपालिका

सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी तीन लाख रुपये, नगराध्यक्षपदासाठी दहा लाख रुपये खर्च करता येतील.

ब वर्ग नगरपालिका ः

सदस्यपदासाठी अडीच लाख,
नगराध्यक्षपदासाठी सात लाख.

क वर्ग नगरपालिका ः
सदस्यपदासाठी दीड लाख,
नगराध्यक्षपदासाठी पाच लाख रुपये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीचाच झेंडा फडकेल

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजप- शिवसेना युती सरकारने शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात केला असल्याने जनतेमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. विविध समाजांचे मोर्चे निघत असून, सर्वत्र असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असल्याने आगामी नगरपालिका, पदवीधर मतदारसंघ व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच झेंडा फडकेल, असा विश्वास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संग्राम कोते पाटील यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवनात झाली. त्या वेळी कोते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, आमदार दीपिका चव्हाण, आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंभळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती उषा बच्छाव, माजी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार संजय चव्हाण, प्रदेश पदाधिकारी डॉ. भारती पवार, मुक्तार शेख, राजेंद्र भोसले, शोभा मगर, सचिन पिंगळे, राजेंद्र जाधव, डॉ. योगेश गोसावी, प्रेरणा बलकवडे, दीपक वाघ, अकबर शहा, रामदास पाटील, शहाजी भोकनळ आदी उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्यातील पक्षाच्या ताकदीचा अंदाज घेण्यात आला. नगपालिका, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची स्थिती भक्कम आहे. त्यामुळे या स्थितीचा लाभ उचलून पक्षाची ताकद वाढवण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. अनेक पदाधिकाऱ्यांनी निवडणुका स्वबळावरच लढण्याचा सल्ला दिला. भाजप- शिवसेना युती सरकारने ‘अच्छे दिन’चे खोटे स्वप्न दाखवले, खोटी आश्वासने दिली. या भूलथापांना भुलल्यानेच सर्वसामान्य जनतेला आज बुरे दिन आले असल्याचा आरोप अॅड. पगार यांनी केला आहे. प्रमुख विरोधी पक्ष म्हणून सातत्याने विविध आंदोलने करीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे वाटचाल करीत असून, आगामी काळातील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, असा विश्वास कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.

गरज तिथेच आघाडी

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घट्ट पकड असल्याने सर्व नगरपालिकांच्या व जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सर्वशक्तीनिशी सज्ज झाला आहे. सर्वच्या सर्व नगरपालिकांवर, तसेच जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचीच एकहाती सत्ता येईल, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी केले आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर आवश्यकता वाटल्यास समविचारी पक्षांशी चर्चा करण्यात येईल, असेदेखील अॅड. पगार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुंड पवन पवारची भाजपमधून हकालपट्टी?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपत सुरू असलेल्या गुंडांच्या प्रवेशावरून अडचणीत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या गुंडांच्या प्रवेशाबाबत हात झटकले आहेत. नाशिकमधील अपक्ष नगरसेवक व गुंड पवन पवारच्या प्रवेशाबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. पवनवर गुन्हे असतील, तर त्याला पक्षातून काढून टाकू, असा सूरही आळवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणामुळे पालकमंत्री गिरीश महाजनांसह शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानपच आता तोंडघशी पडले आहेत. दरम्यान, तळेगाव प्रकरणानंतर उद््भवलेल्या स्थितीमुळे भाजपमधील एक गट पवनला पक्षापासून लांब ठेवण्यासाठी सक्रिय झाला आहे.

नगरसेवक पवन पवारच्या प्रवेशावरून भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. पवनच्या प्रवेशावरून टीकेचे धनी बनलेल्या पदाधिकाऱ्यांना आता याबाबत उत्तरे देणेही अवघड झाले आहे. त्यातच तळेगाव प्रकरणानंतर पवनसह त्याच्या साथीदारांनी केलेल्या प्रतापामुळे तर पक्षाचीच प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या प्रतापामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिमा डागळली आहे. शनिवारी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पवनबाबत हात झटकले आहेत. पवन पवारच्या प्रवेशाबाबत आपल्याला काहीच माहिती देण्यात आली नसल्याचे सांगत, त्याच्यावर गुन्हे असतील तर पक्षांतून काढून टाकू, असे स्पष्टीकरण दिले आहे. पवनच्या प्रवेशाबाबत खुद्द मुख्यमंत्रीच अनभिज्ञ राहिल्याबद्दल आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पालकमंत्री गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांच्या किचन कॅबिनेटचे सदस्य आहेत, तर आमदार बाळासाहेब सानप हे महाजन यांच्या अंत्यत विश्वासातील आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून या दोघांनीही मुख्यमंत्र्यांना याबाबत कल्पना दिली नसल्याचे आता उघड झाले आहे. पवनसह अन्य गुन्हेगारांबाबत मुख्यमंत्र्यांनाच प्रश्न विचारले जाऊ लागले आहे, तर महापालिका निवडणुकांमध्ये पवनबाबतच वारंवार प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे पवनला पक्षातून बाहेर काढा, असा एक गट पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे सक्रिय झाला आहे. पक्षाची प्रतिमा सुधरवायची असेल तर पवनच्या हकालपट्टीशिवाय दुसरा पर्याय स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे नाही. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांवर पवनवरील गुन्ह्यांचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाईचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

पवनवर खुनासह १५ गंभीर गुन्हे

पवन पवारवर शहरातील विविध पोलिस स्टेशनमध्ये ३०२ या खुनाच्या कलमासह तब्बल १५ गुन्हे दाखल आहेत. १९९९ मध्ये त्याच्यावर नाशिकरोड पोलिसांत ३०७ हा हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर दरवर्षी त्याच्यावरील गुन्ह्यात भरच पडली आहे. २००९ मध्ये कृष्णा बिडवे या बीट हवालदाराची हत्या केल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे. आर्म अॅक्टचे तब्बल चार गुन्हे दाखल आहेत. तसेच ठार मारणे, दरोड्याचा प्रयत्न, मारहाणीचेही गुन्हे दाखल आहेत. तळेगावच्या घटनेनंतर पोलिस उपायुक्तांवरच हल्ल्याचा पवनवर गुन्हा आहे, तर त्याच्या घरातून कट्टे व दगड जप्त करण्यात आले. त्यामुळे एवढे गुन्हे दाखल असलेल्या पवनला भाजपने संरक्षण दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात पांझराचे सुशोभीकरण, नवीन रस्ते

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

पांझरा नदीचे सुशोभीकरण व वाहतूक व्यवस्थेतवरील ताण कमी करणारा कुमारनगर पूल ते मुंबई-आग्रा महामार्गापर्यंत ड्रायव्हर्शन ब्रिजपर्यंतचा रस्ता हा एका वर्षात बांधून तयार होणार असल्याची माहिती आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील विकासकामांबाबत माहिती देताना आमदार अनिल गोटे म्हणाले की, रस्त्याच्या कामांसह अद्यावत चौपाटीसह फुटपाथ, जॉगिंग ट्रॅक, नाना-नाणी पार्क आणि विविध वस्तू विक्रीचे मार्केट बांधून पाच हजार बेरोजगारांना रोजगार मिळवून देणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री निधीतून ३० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. याशिवाय ६५ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाच्या भूमिपुजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार आहेत. पांझरा नदीच्या उत्तर व दक्षिण काठाच्या साक्री रोड जवळील कुमारनगर पुल ते मुंबई-आग्रा महामार्गावरील ड्रायव्हर्शन ब्रिजपर्यंत प्रत्येकी साडेपाच किलोमीटरचे दोन रस्ते एका वर्षात बांधून तयार होणार आहेत. नदीच्या दोन्ही बाजूचे पात्र मिळून अकराशे ते बाराशे एलईडी दिवे रस्त्याच्या बाजूला लावले जाणार आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला साडेचार हजार झाडे लावली जाणार आहेत. प्लास्टिकच्या पिशव्या, टायर हे डांबरमिश्रणात टाकूण मजबूत रस्ता तयार करण्यात येईल आणि तो २५ वर्षे चांगला राहील. शहरातील २२ रस्ते चौपाटीला मिळतील. त्यामुळे वाहतुकीचा ताण कमी होईल. हा संपूर्ण प्रकल्प ६५ कोटींचा असून, त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ३० रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दुसरा आर्थिक टप्पा मार्चनंतर येणार आहे. हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी महसूल राज्यमंत्री एकनाथ खडसे यांच्यामुळे मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार अनिल गोटे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या मुर्तुझाचे पदार्पणातच शतक

0
0

विजयानगर (विशाखापट्टणम)

रणजी पदार्पणाच्या सामन्यातच नाशिकच्या मुर्तुझा ट्रंकवाला याने शतक झळकावत सौराष्ट्र विरुध्दच्या सामन्यात महाराष्ट्र संघाचा पराभव टाळण्यात सिंहाचा वाटा उचलला. मात्र पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारणाऱ्या सौराष्ट्रने तीन गुणांची कमाई केली, तर महाराष्ट्राला अवघ्या एका गुणावर समाधान मानावे लागले.

सौराष्ट्रने पहिल्या डावात ८ बाद ६५७ धावांवर डाव घोषित केला. धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्रचा पहिला डाव १८२ धावांतच आटोपला. पहिल्या डावातही मुर्तुझाने सलामीला येत शानदार ६४ धावांची खेळी केली होती. मात्र महाराष्ट्राला तो फॉलोऑनपासून वाचवू शकला नव्हता. दुसऱ्या डावातही महाराष्ट्राची सुरुवात चांगली झाल्यानंतर मधल्या फळीने नांगी टाकली. मात्र मुर्तुझाने पहिल्या डावाप्रमाणेच चिकाटीने खेळ करीत एक बाजू लावून धरली. दुसऱ्या डावात त्याने २२७ चेंडूत २२ चौकारांच्या मदतीने शानदार ११७ धावांची खेळी केली.

नाशिकचा पहिलाच खेळाडू

पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावणार मुर्तुझा हा नाशिकचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. मुर्तुझाने यापूर्वी १६ व १९ वर्षांखालील महाराष्ट्राचे संघाचे नेतृत्व केले आहे. सौराष्ट्र विरुध्दच्या दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर तो ५८ धावांवर नाबाद होता. पदार्पणाच्या सामन्यात त्याला शतक झळकावण्याची संधी असल्याने नाशिककरांचे त्याच्या खेळीकडे लक्ष लागून होते. नाशिककरांच्या अपेक्षांवर तो खरा उतरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विल्होळी, सारूळच्या डोंगरांचे पालटणार रुपडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गौण खनिजांच्या वारेमाप उत्खननामुळे अनेक ठिकाणे अक्षरश: विद्रूप झाली असून, त्यामुळे त्या त्या परिसराच्या सौंदर्यालाही मोठ्या प्रमाणात बाधा पोहोचली आहे. अशा ठिकाणचे सौंदर्यीकरण करण्यासाठी केंद्र सरकार सरसावले असून, प्रत्येक जिल्ह्यात खनिज विकास प्रतिष्ठानची स्थापन करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत आता संबंधित परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असून, जिल्ह्यातील विल्होळी आणि सारूळमधील डोंगरांचे रूपडे पालटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

खडी क्रशिंगच्या नावाखाली सध्या अनेक ठिकाणी डोंगरांची सर्रास कत्तल सुरू आहे. नद्यांमधील वाळू, तसेच सुंदर पठारी प्रदेशातील माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजाचा अनियमित आणि अवैध उपसा सुरू आहे. गौण खनिज उत्खननामुळे बाधित होणाऱ्या क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्यक्ष बाधित क्षेत्र आणि अप्रत्यक्ष बाधित क्षेत्राचाही विकास करण्याचा सरकारचा मानस आहे. उत्खनन होत असलेल्या क्षेत्रात पिण्याच्या पाण्यापासून ते आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी आवश्यक सर्वच बाबींच्या निर्मितीस या योजनेत प्राधान्य देण्यात आले आहे. उत्खननामुळे परिसरातील जनतेच्या आरोग्यावर तसेच सामाजिक, आर्थिक परिस्थितीवर झालेले आघात, परिणामही तपासण्यात येणार असून त्यावरही उपाययोजना करण्याचे निश्चित झाले आहे. खाण बाधित क्षेत्रातील नागरीकांना शाश्वत उपजिविकेचे दिर्घकालीन साधन उपलब्ध करुन द्यावे, असे केंद्राचे स्पष्ट आदेश असून, ते प्रशासनाने या प्रतिष्ठानमार्फत अंमलात आणणे अपेक्षित आहे.

शिक्षण, आरोग्यसुविधा अपेक्षित

सरकारने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री खनिज कल्याण योजनेतील एकूण निधीच्या दोन तृतीयांश निधी प्रत्यक्ष बाधित क्षेत्रात तर उर्वरित एकतृतीयांश निधी अप्रत्यक्ष बाधित क्षेत्रात खर्च करावा असे सरकारचे आदेश आहेत. गौण खनिजातून मिळणाऱ्या महसुलातील काही भागही खर्च करावा लागणार आहे. परिसराचे सौंदर्यीकरण करतानाच बाधित भागात शुद्ध पाण्याचा पुरवठा, भूजलाची पातळी उंचावण्यासाठी व्यवस्था, पर्यावरण संवर्धन व प्रदूषण नियंत्रणाची व्यवस्था करणे, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करणे, शिक्षणासाठी शाळेची इमारत बांधणी, तेथे दर्जेदार शिक्षणासाठी मनुष्यबळ नेमण्यासह प्रयोगशाळा, स्वच्छतागृह, पिण्याचे शुद्ध पाणी यासह सर्वच बाबींची व्यवस्था करणे अपेक्षित आहे. बाधितांचे पुर्नवसन करण्याचेही आदेश सरकारने सरकारला दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावानात तडजोडीचे संकेत

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सावानातील वर्चस्वसंघर्ष ऐरणीवर आला असताना समाजातील काही प्रतिष्ठितांनी हस्तक्षेप करून मधला मार्ग काढण्यास सुरुवात केल्याने कालपर्यंत एक घाव दोन तुकडे करण्याची भाषा करणारे दोन्ही गट तब्बल पाच तासांहून अधिक वेळपर्यंत चर्चा करीत होते. यावरून हा संघर्ष थांबवून या दोन्ही गटांत तडजोड होईल, असे संकेत मिळत आहेत.

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षांनी कार्यकारी मंडळातील कार्यवाह, कार्याध्यक्षा आणि अर्थसचिव या तिघांवर कारवाई केल्याने शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांबाबत निर्णय घेण्यासाठी रविवारी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीत काही तोडगा न निघाल्याने सोमवारीही ही बैठक होणार आहे.

घटनेतील नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवत संस्थेचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होईल, असे कारण देत अध्यक्षांनी कार्यवाह, कार्याध्यक्षा व अर्थसचिवांना काम करण्यास मज्जाव केला. पुढील सूचना होईपर्यंत कामकाज थांबवून ठेवण्याचा निर्णयही घेतला. कार्यवाह जहागीरदार यांच्याकडून ३७ बाबींचा, कार्यध्यक्षा केळकर यांच्याकडून २६ बाबींचा तर अर्थसचिव बेदरकर यांच्याकडून १३ बाबींचा खुलासा अध्यक्षांनी मागितला आहे. त्यावर उत्तर देण्यासाठी ही बैठक बोलाविण्यात आली होती. मात्र, त्यात कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही.
विद्यमान कार्यकारी मंडळात दोन गट झाले असून, अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांचा व मिलिंद जहागीरदार यांचा दुसरा गट या बैठकीत कार्यरत होता. जहागीरदारांच्या बाजूने अण्णा बेळे, किशोर पाठक, चंद्रकांत संकलेचा यांनी बाजू मांडली, तर औरंगाबादकरांसाठी कर्नल देशपांडे, गिरीश नातू, देवदत्त जोशी, अभिजित बगदे, रमेश जुन्नरे यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images