Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

खर्च कमी अन् उत्पन्न जास्त

$
0
0

हार्वेस्टर मशिनद्वारे निफाड तालुक्यात प्रथमच ऊसतोडणी

म. टा. वृत्तसेवा, निफाड

पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी आधुनिक पद्धत वापरण्याचा प्रघात सुरू असून, हार्वेस्टर या यंत्राने ऊसतोडणी होत आहे. निफाड पंचायत समितीचे सभापती सुभाष कराड यांच्या जळगाव येथे असलेल्या उसाची तोडणी संगमनेर करखान्याच्या हार्वेस्टर मशिनने सुरू केली आहे. निफाड तालुक्यातील हा पहिलाच प्रयत्न आहे. यामुळे वेळ व पैशांची बचत होत असल्याने शेतकऱ्यांसाठी हार्वेस्टर फायदेशी ठरत आहे.

हार्वेस्टर मशिनने ऊस मुळापासून तोडला जातो. त्यामुळे एकरी उत्पादन वाढते. नुकसानही होत नाही. तोडलेला ऊस कमी वेळेत कारखान्याच्या काट्यावर पोहोचल्याने तो वाळत नाही. त्यामुळे वजन वाढते. ऊस थेट कारखान्याच्या गव्हाणीत पोहोचतो. या यंत्रामुळे ऊसतोडणी मजुरांच्या मागे धावण्याची गरज नाही. ऊसतोड कामगारांना तोडणीसाठी शेतकऱ्याला खूप आर्जव करावे लागतात. प्रसंगी पैसे खर्च होतात आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे जी ऊसतोडणी व्हायला एक महिना लागेल ती अवघी चार दिवसांत झाल्याने शेतकरी या कामातून मुक्त होईल. मात्र यामुळे हार्वेस्टर यंत्राचा वापर वाढला, तर ऊसतोड मजुरांच्या रोजगारावर मोठा परिणाम होऊ शकतो.

सुमारे २० एकर क्षेत्रातील ऊस तोडण्यासाठी महिना लागू शकतो. ऊसतोडणी सलग चालली नाही, तर एकरी सरासरी उत्पादनावर परिणाम होतो. हार्वेस्टर यंत्राने चार दिवसांत माझे क्षेत्र पूर्ण मोकळे होईल आणि उत्पन्न वाढेल. त्यामुळे मोठ्या क्षेत्रासाठी हार्वेस्टरने ऊसतोडणी फायद्याची आहे. निफाड तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

- सुभाष कराड, ऊस उत्पादक, निफाड

अशी करावी लागवड

ऊस उभ्या पध्दतीने लावलेला असावा. चार फुटाच्या सऱ्या असाव्यात. लागवड नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यानची अधिक उपयुक्त. पाचट खत म्हणून उपयोगी पडते. ऊस निघून गेल्यानंतर कुट्टीचा एकरी दोन हजार रुपये खर्च वाचतो.

अशी होत ऊसतोड

हार्वेस्टर यंत्र वेगाने उसाची तोडणी करते. उसाचे तुकडे तयार करून तोडणीवेळी यंत्रासोबत चालणाऱ्या ट्रॉलीत ते टाकले जाते. ट्रॉली भरल्यानंतर मालट्रकमध्ये उसाचे तोडलेले टिपरे ओतले जातात. हे सर्व काम आटोमॅटिक चालते. या कामासाठी फक्त चार ते पाच माणसांची गरज असते. यानंतर भरलेला ट्रक थेट कारखान्याच्या काट्यावर जातो. उसतोडीच्या प्रचलित पद्धतीपेक्षा ही हार्वेस्टर पद्धत कमी खर्च, वेळेची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुसुमाग्रज म्हणजे नाशिकचे बोधिवृक्ष

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भगवान बुद्धांना ज्या बोधिवृक्षाखाली सत्याचे ज्ञान झाले, त्याचा स्पर्श व्हावा म्हणून गेलो असता त्या अश्वत्थ वृक्षाची सळसळ ऐकून ही आपण पूर्वी कोठेतरी ऐकल्याचे स्मरले आणि लख्ख प्रकाश पडला, की ही सळसळ म्हणजेच कुसुमाग्रज. त्यांनी नाशिकला ज्ञानवंत बनवले, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांनी केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे मराठी रंगभूमी दिनानिमित्ताने शनिवारी पुरस्कार वितरण करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शहाणे यांची उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले, की तात्यासाहेबांचा पिंड विश्वात्मक होता. त्यांनी लोकहितवादी मंडळाची स्थापना केली. नाशिकचा भावनिक कायापालट केला. सांस्कृतिक, सामाजिक बदल घडण्यास ते कारण ठरले. तात्यासाहेबांची विश्वात्मकता पुढे सरकली. त्यांनी मराठी नाटकांना संजीवनी दिली. अनेक नाट्यरत्नांना त्यातून घडवले. प्रतिष्ठान सुरू केले, तात्यासाहेबांनी या नाशिकचा खऱ्या अर्थाने विकास केला, असेही शहाणे म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर उपमहापौर गुरुमित बग्गा, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, नगरसेवक गुलजार कोकणी यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते नाट्य परिषदेतर्फे पुरस्कार वितरण करण्यात आले.

स्व. दत्ता भट स्मृती पुरस्कार (अभिनय पुरुष)- नरेंद्र दाते, स्व. शांता जोग स्मृती पुरस्कार (अभिनय स्त्री)- मीनल सौदागर, स्व. प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार (दिग्दर्शन)- गिरीश सहदेव, स्व. बापूसाहेब काळसेकर स्मृती पुरस्कार (रंगभूषा)- माणिक कानडे, स्व. गिरिधर मोरे स्मृती पुरस्कार (प्रकाशयोजना)- रवींद्र रहाणे, स्व. कुमुदताई अभ्यंकर स्मृती पुरस्कार (संगीत)- कैलास पाटील, स्व. वा.श्री. पुरोहित स्मृती पुरस्कार (बाल रंगभूमी)- प्रबोधिनी विद्यामंदिर, स्व. जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार (सांस्कृतिक पत्रकारिता)- नरेश महाजन यांना प्रदान करण्यात आला, तर विशेष योगदान पुरस्कार पाडवा पहाट व ग्रंथयात्रा– शाहू खैरे, सांस्कृतिक क्षेत्र– जयप्रकाश जातेगावकर, सांस्कृतिक क्षेत्र– राजेंद्र जाधव आणि ग्रंथसेवेबद्दल विनायक रानडे यांना प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमात दिवंगत नाट्यकर्मींना श्रद्धांजली वाहण्यात आली, त्यांच्या नावाने दीप उजळविण्यात आला. तसेच, पुरस्कारमूर्तींच्या हस्ते दिवंगतांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला चारुदत्त दीक्षित संचालित बागेश्री वाद्यवृंदांच्या सहभागाने नांदी सादर करण्यात आली. गणेशस्तवन व नटराजवंदना कलानंद नृत्य संस्थेच्या वतीने सादर करण्यात आली. नृत्य संयोजन गुरू संजीवनी कुलकर्णी यांनी केले. क. का. वाघ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टसतर्फे थिएटरच्या कविता सादर करण्यात आल्या. कविता कुसुमाग्रज आणि सौमित्र यांच्या होत्या. राहुल गायकवाड, एकता आढाव यांनी कविता सादर केल्या. दिग्दर्शन विनोद राठोड, नेपथ्य अथर्व पाटील, प्रकाशयोजना रोहित चौधरी यांची होती. प्रास्ताविक सुनील ढगे यांनी केले. सूत्रसंचालन पल्लवी पटवर्धन यांनी केले. यावेळी नाट्य परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आभार चंद्रकांत घुगे यांनी मानले.

--

चेकअप कॅम्प

कलावंतांचे जीवन नेहमी अस्थिर असते. खाण्याची वेळ ठरलेली नसते. त्यामुळे अनेक व्याधींना त्यांना सामोरे जावे लागते. यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आजीव सभासदांसाठी हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चेकअप करण्यात आले. यावेळी १५० जणांनी त्याचा लाभ घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘से नो टू सेल्फी’ मोहीम जोरात

$
0
0

शिक्षकांकडून उपहासात्मक प्रतिक्रियांचा पाऊस

तुषार देसले, मालेगाव

शाळाबाह्य विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती टिकवून ठेवण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने एका शासन निर्णयाद्वारे जानेवारीपासून दर सोमवारी वर्गातील विद्यार्थ्यांच्या समवेत शिक्षकांनी सेल्फी काढण्याचा अजब फतबा गुरुवारी काढला. यावरून शिक्षणक्षेत्रासह सर्वच क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सोशल मीडियावर तर ‘से नो टू सेल्फी’ मोहीमदेखील उघडण्यात आली आहे. शिक्षकांना पाहूनच मुले आता ‘सेल्फी ले ले रे’ अशी चित्रपट गीतेदेखील वर्गात म्हणतील, अशा गमतीशीर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरू झाल्यापासून शालेय शिक्षण विभागाने दररोजच नवनवे शासन निर्णय जाहीर केले आहेत. त्यात आता सेल्फीचा प्रयोग करण्याच्या निर्णयाची भर पडली आहे. राज्यात एकीकडे तंत्रस्नेही शिक्षकांनी नवनवीन प्रयोगाद्वारे गुणवत्ता वाढीत महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी ‘सरल’ प्रणालीद्वारे सर्वच ऑनलाइन करण्याच्या नादात शिक्षण विभागाकडून अशैक्षणिक कामेदेखील वाढली आहेत. याबद्दल आधीच शिक्षकांमध्ये नाराजीची भावना आहे. आता जानेवारीपासून हा सेल्फी प्रयोग सुरू करण्याचा निर्णय झाल्याने सोशल मीडियावर मात्र याबाबत जोरदार विरोध होत आहे.

जिल्ह्यासह तालुक्यातील अनेक शिक्षकांचे व्हॉट्सअॅप ग्रुप असून, त्यावर या निर्णयाबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. हा निर्णय कसा अव्यवहार्य व हास्यास्पद आहे, यावर शिक्षकांनी आपापली मते मांडली आहेत. सेल्फी काढून त्याच्यातील प्रत्येक मुलाचा आधार सरल प्रणालीवर टाकायला ते सरल किमान सरळ तर चालायला हवे ना! अशी उपरोधिक टीका होत आहे. यात अनेकांनी अशा प्रयोगांनी मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष होईल या गंभीरबाबीकडे देखील लक्ष वेधले आहे. याची दखल शासनदरबारी घेतली जावी, अशी रास्त अपेक्षा सोशल मीडियावर शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.

सेल्फीवर कविता

सोशल मीडियावर या निर्णयानंतर अनेक विनोद, कविता व्हायरल झाल्या आहेत. यात ‘सरल सरल म्हणत वाकड्यात की हो शिरलयं, सेल्फी विथ गुरुजी, आमची शाळा सेल्फी शाळा, चल बेटा सेल्फी ले ले’ या आणि आशा अनेक उपहासात्मक कवितांचा पाऊस पडत आहे. यातून असे निर्णय किती हास्यापद आहेत, यावर मिश्किल भाष्य केले जात आहे.

सोशल मीडियावर पडसाद

हल्ली अनेक घटनांनंतर सोशल मीडियावर त्याचे जोरदार पडसाद उमटले आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या सेल्फीच्या निर्णयानंतर शिक्षकांनी आता व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटरवर थेट ‘से नो सेल्फी’ मोहीम उघडली आहे. यासाठी अनेकांनी आपल्या व्हॉट्सअॅपचे डिपी बदलले आहेत. अनेकांनी मी ठेवले नो सेल्फी स्टेटस आपण ठेवले का? असे मेसेज सेंड करून आवाहन केले आहे. सोबतच या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी http://vote.pollcode.com/553438692 या लिंकद्वारे वोटिंगदेखील घेण्यात येत असून यावर हो, नाही पर्यायत सर्वाधिक मते नाहीच्या बाजूने येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेहिशेबी रक्कम प्रकरणात बडे मासे?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बेहिशेबी रक्कम बाळगल्याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तिघांवर कारवाई झाली असली, तरी या प्रकरणात आणखी काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्तविली आहे. बाजार समिती प्रशासन आणि पदाधिकारी पैशांसाठी कर्मचाऱ्यांवर दडपशाहीचा अवलंब करीत असल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली असून, अन्य कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि तत्सम सहकारी संस्थांमध्येही असे प्रकार घडत असण्याची शक्यता बळावली आहे. अशा संस्थांमधील कर्मचाऱ्यांनीही तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

बेहिशेबी रक्कम बाळगल्याप्रकरणी नाशिक जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील स्टेनो विजय सीताराम निकम, लेखापाल अरविंद हुकूमचंद जैन आणि लिपिक दिगंबर हिरामण चिखले या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ ऑक्टोबरला अटक केली. त्यांच्याकडे तब्बल ५८ लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम आढळून आली होती. संशयित निकम हा माजी खासदार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देवीदास पिंगळे यांचा स्वीय सहायक असल्याने या प्रकरणाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान तीनही संशयितांची कसून चौकशी करण्यात आली असून, त्यामध्ये काही धक्कादायक माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागली आहे. कर्मचाऱ्यांना महागाईभत्ता किंवा तत्सम फरक मिळतो, तेव्हा त्यांच्याकडून कोरे धनादेश घेऊन ती रक्कम त्यांच्या खात्यातून काढून घेतली जात असल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. २०१४ मध्येदेखील असा प्रकार घडला असून, त्यामुळे कर्मचारी जेरीस आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली असली, तरी आणखी काही बडे मासे गळाला लागू शकतात, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला आहे. केवळ नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच नव्हे, तर जिल्ह्यातील अन्य बाजार समित्या, अन्य सहकारी संस्थांमध्येही असे प्रकार घडत असण्याची दाट शक्यता असून, कर्मचाऱ्यांनी तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


‘त्या’ तिघांना हजेरी सक्तीची

या प्रकरणात अटक केलेल्या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजेरी लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यांना आठवड्यातून दोन वेळा हजेरी लावणे बंधनकारक आहे. कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात येते. बेहिशेबी रक्कम बाळगताना तिघांना पकडण्यात आले असले, तरी याकामी त्यांना कोणाचे सहकार्य मिळते, कुणाच्या सांगण्यावरून आणि कुणासाठी कर्मचाऱ्यांचे धनादेश घेतले जातात, तसेच अशा रकमेचे पुढे काय होते, याबाबतची माहिती मिळविण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सध्या सुरू आहे. तपासात सहकार्य न केल्यास किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात हजेरी न लावल्यास संबंधितांचा जामीन रद्द व्हावा, यासाठी कार्यवाही करण्याची तयारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजचा दिवस ‘लेकीचा दिवस’!

$
0
0

विवाह पत्रिकेद्वारे ‘मुलगी वाचवा’चा संदेश

म. टा. वृत्तसेवा, येवला

स्त्रीभ्रूण हत्या अन् घटणारे मुलींचे प्रमाण पाहता वेगवेगळ्या माध्यमातून ‘लेक वाचवा’चा संदेश दिला जात आहे. येवल्यातील एका कुटुंबाने आपल्या मुलाच्या विवाह निमंत्रण पत्रिकेवर आपल्या घरी येणारी सून म्हणजे आमच्या घरी एक लेक जन्म घेत असल्याचे स्पष्ट करीत ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’चा समाजमनाला संदेश दिला आहे. निमंत्रण पत्रिकेच्या मुखपृष्ठावरच लहान बालिकेच्या लक्षवेधी छबीसह दिलेला ‘लेक वाचवूया, लेक शिकवूया’चा संदेश सर्वांनाच प्रभावित करीत आहे.

येवला तालुक्यातील धुळगांव येथील अन् सध्या येवला शहरातील पटेल कॉलनीतील रहिवाशी असलेले दिनकर गायकवाड हे जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त विभागीय अधिकारी. दिनकर गायकवाड यांचा मुलगा सुयोग हा येत्या १६ नोव्हेंबरला पंचकेश्वर (निफाड) येथील गणेश काशिनाथ ढोमसे यांची कन्या अश्विनी हिच्याशी विवाहबद्ध होत आहे. गायकवाड कुटुंबीयांनी छापलेली विवाह निमंत्रणाची पत्रिका जरा हटकेचं ठरली आहे.

समाजमनाला प्रभावित करणारा आशय

सस्नेह नमस्कार, आम्ही कृतकृत्य झालो आहोत. आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. आजचा दिवस ‘लेकीचा दिवस आहे’. आमच्या घरात चि. सौ. का. अश्विनीच्या रूपाने एक ‘लेक’ जन्म घेत आहे, अशी या विवाह निमंत्रण पत्रिकेची सुरुवात होताना गायकवाड कुटुंबीयांनी मुलीचं महत्त्व समाजमनाला पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आपलं कर्तव्य जपूया...लेक वाचवूया, लेक शिकवूया!, विवाह निमंत्रण पत्रिकेवरील हे सगळं काही मोलाचा संदेश सर्वांनाच भारावून टाकताना प्रभावित करून जातो.

आमच्या घरात येणारी आमची सून नव्हे, तर आमची एक लेकचं असणार आहे. समाजानेदेखील स्त्री जन्माचं खुल्या दिलानं स्वागत करताना तिचा सन्मान करावा. तिला आदराचं स्थान देताना शिकवावे. याच हेतूने विवाह निमंत्रण पत्रिकेद्वारे संदेश देण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे.

- दिनकर गायकवाड, येवला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हौशा-नवश्यांची निवडणूक जत्रा!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक महापालिकेची सहावी पंचवार्षिक निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या अगोदर आलेल्या दिवाळीत इच्छुकांनी आपापले कधी न दिसलेले चेहेरे प्रभागातील नागरिकांपर्यंत दिवाळी शुभेच्छांची भेटकार्डे, सोशल मीडिया आणि शुभेच्छांच्या होर्डिंग्जद्वारे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या शुभेच्छांमधून हौसे, नवसे आणि गवश्यांची जत्रा येत्या निवडणुकीत दिसणार हे स्पष्ट झाले आहे.

चार सदस्यीय प्रभाग रचनेत साधरणतः पन्नास हजार लोकवस्तीच्या भागात निवडणूक लढविण्यात कशी कसरत करावी लागणार आहे, याच्या कल्पनेनेच भल्यभल्यांना घाम फुटला आहे. २०१२ च्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांना प्रभावीपणे कामे करता आलेली नाहीत. महापालिकेच्या या पंचवार्षिकमध्ये विकासकामांना खीळ बसलेली असल्याने येत्या निवडणुकीला इच्छुकांमध्ये फारसा उत्साह नसणार, असे वाटत असताना प्रत्यक्षात चित्र वेगळेच दिसत आहे. दिवाळीच्या सणाचा इच्छुकांनी पुरेपूर वापर करीत आपले चेहेरे मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम भेटकार्डांसह सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. या भेटकार्डांवर प्रत्येकाने प्रभाग क्रमांक टाकून ते कोणत्या प्रभागातून निवडणूक लढविणार आहेत. हे स्पष्ट केलेले आहे.


हौस भागवायची म्हणून

जत्रेत जसे हौसे, नवसे व गवसे असतात, त्याचप्रमाणे या निवडणुकीतही त्यांची जत्रा भरणार असे दिसत आहे. काही जण केवळ हौस म्हणून या निवडणुकीकडे बघत आहेत. चार सदस्यांमध्ये आपण सहज तारले जाऊ, असे काहींना वाटत आहे. निवडणुकीचा अनुभव नसताना, प्रभागात कोणत्या प्रकारचे सामाजिक काम नसतानाही सहज म्हणून निवडणूक लढवायची, असा विचार करणाऱ्यांची संख्या कमी नाही.


बघू नशीब आजमावून!

नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणारे आतापासूनच देव-देवतांना साकडे घालू लागले आहेत. कुंडली घेऊन ज्योतिषांकडे चकरा मारणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. काही ठिकाणी, तर अशा तांत्रिक बाबांचे होर्डिंग्जही झळकू लागले आहेत. पॉवरफुल बाबांच्या शोधात अशी मंडळी आतापासूनच लागलेली आहे.

गवश्यांची प्रतीक्षा

निवडणुकीत उभे राहण्यासाठी प्रत्येकाचा काही ना काही डाव असतो. तसाच डाव इच्छुक मांडीत असतात. वास्तविक त्यांच्यात निवडणूक लढविण्याची क्षमता नसते, हे ते स्वतःही जाणून असतात. मात्र, तरीही लुडबूड करीत या ना त्या पक्षाकडून तिकीट मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे ते भासवितात. नाहीच जमले, तर अपक्ष फॉर्म भरण्याची तयारी करतात आणि माघारीसाठी कुणी आपल्याकडे येतंय का याची प्रतीक्षा करीत बसतात. अशा गवश्यांचीही संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.


सत्तेची लालला कायम

नाशिकचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्याने नगरसेवकांना फारसे महत्त्व राहणार नाही, असा निराशजनक सूर विद्यमान नगरसेवक काढीत आहेत. एका बाजूला असा सूर निघत असताना दुसऱ्या बाजूला अनेक जण प्रभागात निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. आपल्या पॅनलमध्ये सांभाव्य उमेदवारांची चाचपणीही करीत आहेत. यावरून त्यांची सत्तेची लालसा कमी झालेली दिसत नाही.


नव्या चेहेऱ्यांना वाढली संधी

पंचवटीतील २४ पैकी १२ जागा महिलांसाठी राखीव आहेत. विविध आरक्षणांमुळे विद्यमान नगरसेविकांची संधी हुकली असल्याने या निवडणुकीत अनेक नवीन महिलांना नगरसेविका होण्याची संधी आहे. मीना माळोदे, फुलावती बोडके, सिंधू खोडे, विमल पाटील, रुपाली गावंड, ज्योती गांगुर्डे आदींच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता असल्यामुळे नवोदितांची संधी वाढली आहे. दिवाळीत शुभेच्छा कार्ड आणि होर्डिंग्जवर असे काही चेहेरे झळकलेही आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक पावली, तिजोरी भरली!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला
घरपट्टी, पाणीपट्टी यासह इतर विविध करांचा शहरातील मिळकतधारकांकडून दरवर्षी होणारा भरणा म्हणजे नगरपालिकेसाठी उत्पन्नाचा एक मोठा स्रोत. मात्र, या करवसुली व्हावी पालिका प्रशासनाला दरवर्षीच नागरिकांची दारे ठोठावी लागतात. यंदा मात्र पालिकेची निवडणूक पालिकेला पावली आहे. कुठलेही कष्ट न घेता येवला नगरपालिकेच्या तिजोरीत अगदी सहज तब्बल ५६ लाखांची भर पडली आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या असंख्य मालमत्ताधारकांनी आपला करांचा भरणा केल्यामुळे ही वसुली झाली आहे.

येवला नगरपालिका निवडणुकीमुळे पालिकेच्या कर विभागात करांचा भरण्यासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी नागरिकांची गर्दी होती. निवडणुकीमुळे इच्छुकांनी स्वत:हून आपल्याकडील सर्वच करांचा भरणा केल्याने पालिकेच्या उत्पन्नात मोठी भर पडली आहे. येवला शहरात हजारो मिळकतधारक आहेत. यातील अनेक मिळकतधारकांनी घर बांधकाम, पाणीपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने वसुली थकीत पडली होती.

मात्र पालिकेची पंचवार्षिक निवडणूक येवला पालिकेच्या पथ्य्यावर पडली आहे. निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या वाढली असून, त्यातही विविध प्रभागांमधून मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पालिकेची निवडणूक लढवताना उमेदवार हा पालिकेचा थकबाकीदार नसावा अर्थातच त्याच्याकडे चालू आर्थिक वर्षासह मागील कुठलीही अन् पालिकेच्या कोणत्याही विभागाची करांची बाकी नसावी हा नियम आहे. उमेदवार थकबाकीदार असल्यास छाननीमध्ये त्याचा उमेदवारी अर्ज ‘अवैध’ ठरविला जातो. परिणामी इच्छुक उमेदवारांनी स्वत:सह सूचकांच्या करांचा भरणादेखील पालिकेत केल्याचे चित्र दिसले. विविध करांपोटीचा भरणा करून तसा थकबाकी नसल्याचा पालिकेचा दाखला घेण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदरच्या शेवटच्या तीनचार दिवशी इच्छुकांनी पालिकेत मोठी गर्दी केली. पालिका प्रशासनानेही कर भरून घेण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवल्याने चारच दिवसांत तब्बल ५० लाखांची तर निवडणूक काळात जवळपास ५६ लाखांची वसुली झाली असल्याचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निष्ठावंतांची नाराजी दूर केली जाईल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर
सिन्नर नगरपालि‌केच्या निवडणुकीत शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक शिवसेनेतच असून त्यांचा गैरसमज दूर करण्यात येईल. ते पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करतील, असे प्रतिपादन पक्षाचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी केले.

सिन्नर येथे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार वाजे, तालुकाप्रमुख दीपक खुळे, उदय सांगळे, विजय जाधव, रामनाथ धनगर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून पक्षाचे सदस्यही नसलेल्यांना उमेदवारी देण्यात आल्याच्या निषेधार्थ शहरप्रमुख राहुल बलक व युवा सेना तालुखप्रमुख सागर वारुंगसे यांच्यासह सोळा पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे करंजकर यांच्याकडे पाठवले होते. मुलाखतीला नसलेल्यांना तसेच जिल्हाप्रमुखांचे नावही माहीत नसलेल्या, पक्षाचे सदस्यही नसलेल्यांना उमेदवारी देण्यात आल्याच्या निषेधार्थ हे राजीनामे देण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर करंजकर यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेतील बंडखोरी थांबवण्यासाठी प्रयत्न केले. ते म्हणाले, पदाधिकारी हे जनतेचे सेवक असून, त्यांनी पक्षासाठी निवडणुका जिंकायच्या असतात. बलक व त्यांच्या सहकारींचा गैरसमज झाला असून, तो दूर करण्यात येणार आहे. ते पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करतील. पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेवूनच उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाकडे इच्छुकांची गर्दी झाल्यामुळे प्रत्येकाला उमेदवारी देता येणार नाही. मात्र विजयी होणाऱ्या उमेदवाराला तिकीट देण्यात आल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे पक्षातील काही कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पक्षातील अशा सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जाईल, असे सांगून करंजकर यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनमाड, नांदगावमध्ये माघारीकडे लक्ष

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड व नांदगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल केलेल्या उमदेवारांमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली आहे. काही उमेदवारांनी माघार घ्यावी व आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी कुठे मनधरणी, कुठे शब्द तर कुठे विविध युक्त्या प्रयुक्त्या यांचा बखुबीने वापर होत आहे.

मनमाड व नांदगाव पालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीची पिसे निघून दोन्ही पक्षांनी स्वतंत्र राग आळवला. अपक्षांची संख्या मोठी असल्याने प्रमुख उमेदवारांची घालमेल सुरू आहे. मनमाड मध्ये हीच अवस्था काँग्रेस आणि राष्ट्रवादीची देखील आहे. दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. काही अपक्ष उमेदवार तर पक्षाने तिकीट नाकारल्याने एकला चलो रे म्हणत आपली दावेदारी सिद्ध करण्यासाठी निवडणूक रिंगणात दाखल आहेत.

पक्षात नव्याने आलेल्यांना तिकिटे मिळाली पण पक्षाचे प्रामाणिक काम करूनही उपयोग झाला नाही, असा नाराजीचा सूर बहुतांश पक्षात दिसत आहे. शिवसेना-काँग्रेसमधील अपक्षांची संख्या लक्षवेधी आहे. राष्ट्रवादीही त्याला अपवाद नाही. मात्र आता अपक्षांना मनवण्याचे, त्यांना विविध मार्गाने थांबण्यास सांगण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरात सुविधांची वानवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक शहरात भाविक पर्यटकांना वाहनतळापासून ते सर्वच बाबतीत असुविधांना सामोरे जावे लागत आहे. अभ्यगतांच्या या गैरसोयीबाबत त्र्यंबक नगरपालिका उदस‌िन असल्याने जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी भाविक कर‌ित आहेत.

त्र्यंबक नगरपाल‌िकेस हमखास उत्पन्न देणारे साधन हे वाहनतळ असून, वर्षाकाठी ४० लाखांच्या दरम्यान उत्पन्न मिळते. दिवाळी नंतर खरा उत्पन्नाचा सिझन सुरू होत असतो. नाताळच्या सुट्यांदरम्यान वाहनतळावर वाहने उभी करण्यास जागा शिल्लक राहात नाही. सध्या दिवसाला हजार पाचशे वाहने येथे येत असतात. २० रुपयांपासून वाहनतळ फी वसूल होत असते. वाहनाच्या प्रकाराप्रमाणे ५० रुपये, १०० रुपये याप्रमाणे पैसे आकारले जातात. सहलींच्या कालावधीत दिवसाला कमीजास्त एक लाख रुपये उत्पन्न मिळत असते. अर्थात वर्षाकाठी ४० लाख रुपये उत्पन्न देणारे वाहनतळ फी हे एकमेकांवर भरवशाचे उत्पन्नाचे साधन राह‌िले आहे. नगरपाल‌िका नवीन बसस्थानकाच्या जवळ टोल नाका लावून तळ फी घेत असतांना प्रत्यक्षात वाहनतळावर मात्र अनागोंदी परिस्थिती अनुभवास येत आहे. येथे वाहनांच्या सुरक्षेसाठी गार्ड नेमण्याचे कित्येक वर्षात झालेले नाही. लक्षावधी रुपयांचे वाहन येथे निवासी आलेले भाविक त्र्यंबकराजाच्या भरवशावर सोडून जातात. वाहतळाच्या बाजूस बकाल वस्ती तयार होत आहे. ते दृश्य पाहून वाहनधारक मनोमनी हबकतो. सिंहस्थ नियोजनात तीन साडेतीन कोटी रुपये खर्च करून वाहनतळाची पुनर्बांधणी झाली. स्वच्छतागृह, स्नानगृहाची अत्यंत तुटपुंजी व्यवस्था आहे. त्यासाठी देखील पैसे आकारले जातात. वाहनतळावर कोणत्याही प्रकारचे मनुष्यबळ नगरपाल‌िका पुरवत नसल्याने येथे आलेले वाहनधारक परस्परांशी हुज्जत घालत वाहने लावतात. पिण्याच्या पाण्याची सुविधा म्हणून सिंहस्थ कालावधीत एका साधू आखाड्याला दिलेली पाण्याची टाकी येथे आहे. महाराष्ट्र जीवन प्राध‌िकारणाने उभारलेला हा जलकुंभ आहे. परिसरात झोपड्या बांधून राहणारे अंघोळी करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅफिकवर कॅमेऱ्यांचा वॉच

$
0
0

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिली माहिती; ट्रॅफिक नॉलेज हबचे उद्‍घाटन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ट्रॅफिकबाबत कायद्याचा सन्मान व अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे आता देशभर सर्व चौकाचौकात कॅमेरे लावण्यात येणार असून, त्यातून ट्रॅफिक नियम तोडणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

तिडके कॉलनी येथील चिल्ड्रन ट्रॅफिक एज्युकेशन पार्कमध्ये देशातील पहिल्या ट्रॅफिक नॉलेज हबच्या उद्‍घाटनाप्रसंगी गडकरी बोलत होते. देशातील नवीन वाहन कायद्यात बदल झाल्यानंतर देशात चार हजार वाहन प्रशिक्षणाचे इन्स्टिट्यूट उभारले जाणार आहे. नवीन लायसन्स घेण्याचे काम आता मानवविरहीत असणार असून, ते कॉम्प्युटरव्दारेच केले जाईल. त्याचप्रमाणे फिटनेस व पोलूशन सर्टिफिकेटही कॉम्प्युटरव्दारेच मिळेल. यावेळी त्यांनी या हबचे कौतुक करून यातून प्रशिक्षित वाहक तयार होतील. हा ट्रॅफिक पार्क खूप उपयोगी व चांगल्या कारणासाठी असल्याने त्यासाठी सरकारकडून मदतही करू, असे आश्वासन दिले.

देशात वर्षात पाच लाख अपघात होतात व त्यातून दीड लाख मृत्युमुखी पडतात. त्यामुळे त्यांना योग्य प्रशिक्षण दिले, तर ५० टक्के संख्या कमी करता येऊ शकते. रस्त्यांवरील अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होणे गरजेचे असून, त्यासाठी शासनाच्या प्रयत्नांमध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ते बांधणी अभियांत्रिकी तंत्रज्ञानात वेगाने सुधारणा करण्यात येत आहेत. आजही देशात २२ लाख प्रशिक्षित वाहनचालकांची कमी असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

नाशिक फर्स्टचे चेअरमन अभय कुलकर्णी यांनी हबबद्दल माहिती देताना नाशिकच्या विमानसेवा व औद्योगिक समस्यांचाही उल्लेख केला. देशातील ही पहिली संकल्पना असून, त्यासाठी नाशिक फर्स्टच्या अॅडव्हान्टेज नाशिक फाउंडेशनतर्फे प्रयत्न करण्यात असल्याची माहिती दिली. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, खासदार हरिश्चंद चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, भाजपचे नेते वसंत गिते व सुनील बागूल उपस्थित होते.

उद्‍घाटन सोहळा दोन तास जॅम

टॅफिक हबच्या उद्‍घाटनाची वेळ ११.३० होती पण केंद्रीय मंत्री गडकरी तब्बल दोन तास उशिरा आल्यामुळे संयोजकांसह अनेक जण ताटकळत बसले होते. टॅफिकजॅमच्या समस्यांतून मार्ग निघावा व सुरक्षित वाहतूक व्हावी, याचे धडे देणाऱ्या या हबचा उद्‍घाटन सोहळाच दोन तास मंत्र्यामुळे जॅम झाला.

गडकरींनी केली पार्कची पाहणी

उद्‍घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अगोदर नितीन गडकरी यांनी ट्रॅफिक पार्क, प्रशिक्षण सभागृह व लायब्ररीची पाहणी केली. यावेळी त्यांनी अद्ययावत असे नॉलेज हबबद्दल माहिती घेऊन त्यातील ट्रॅफिक मॅनेजमेंटचे शिक्षण पुस्तक, ऑडिओ, व्हिडीओ डीव्हीडी-सीडीच्या माध्यमातून कसे दिले जाणार याची विचारणा करून कौतूक केले.

भाषणातच सत्कार

कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे संयोजकांचे एक भाषण संपताच नितीन गडकरी हे भाषणासाठी डायसकडे गेले. त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. इतर पाहुण्यांचा सत्कार व भाषणेही त्यामुळे संयोजकांनी टाळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कपिला संगमावरील फेसाची ‘भुरळ’

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोदावरीच्या पात्रात सध्या फारच थोड्याफार प्रमाणात पाणी आहे. त्यातील बहुतांश भागातील पाणी शहरातील गटारींचे असल्याने ते खडकाळ भागात पडताच त्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात फेस तयार होतो. तपोवनातील कपिला-गोदावरी संगमावर असलेल्या खडकाळ भागात असे पाणी वेगाने पडत असल्याने या पाण्यावर फेस तयार होत आहे. येथे येणारे भाविक आणि पर्यटकांना या फेसाची भुरळ पडत आहे. मात्र, त्याच्याजवळ गेल्यानंतर प्रचंड दुर्गंधीने अनेकांना काढतापाय घ्यावा लागत आहे.

सध्या दिवाळीच्या सुटीचा मोसम असल्याने नाशिकला धार्मिक स्थळी दर्शनासाठी भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी होत आहे. शहरातील विविध स्थळांना भेट देताना तपोवनात हे पर्यटक हमखास जात असतात. या पर्यटकांना तपोवनातील कपिला-गोदावरी संगमावर गेल्यानंतर तेथील खडकाळ भागात नदीपात्रात वेगाने वाहणारे पाणी दिसते.

या ठिकाणी गोदावरी नदी पूर्वेकडून वाहत जात असताना एकदम दक्षिणेला वळसा घेते. याच ठिकाणी पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगाने वाहतो. या वेगाने वाहणाऱ्या प्रवाहाच्या ठिकाणी खडकाळ भाग पाण्याच्या प्रवाहाने खोलगट होत गेला आहे.

शहर परिसरातील वाहत जाणाऱ्या ड्रेनेजचे पाणी कन्नमावर पुलाच्या पुढच्या भागात गोदापात्रात मिसळले जाते. या पाण्यात साबण, डिटर्जंट आदी मिसळलेले असल्याने ते खडकांवर आपटताच त्याचा फेस तयार होतो. हा फेस पाण्यावर तरंगत त्याचा मोठा ढिगारा तयार होतो. आकाशात पांढरे ढग दिसावेत त्याप्रमाणे पाण्यावर हा फेस दिसू लागतो. वाऱ्याची झुळूक आल्यानंतर हा फेस हवेतही उडू लागतो. हे दृश्य येथे येणाऱ्यांना आकर्षित करीत असते. या फेसाजवळ जाऊन अनेक जणांना सेल्फी काढण्याचा मोह होतो. मात्र, जेव्हा हे पर्यटक, भाविक त्या फेसाच्या जवळ पाण्याच्या प्रवाहानजीक जातात, तेव्हा त्यांना त्या पाण्याची येणारी दुर्गंधी नकोशी होते. प्रचंड दुर्गंधीने डोके दुखायला लागते. त्यामुळे ते तेथून लगेच काढतापाय घेतात. पाण्याचा प्रवाह अशाच प्रकारे नांदूर घाट येथे वेगाने आपटतो. तेथेही अशाच प्रकारचा फेस तयार होतो. गोदावरी स्वच्छतेचा प्रयत्न सुरू असताना दिवसेंदिवस गोदावरी प्रदूषितच होत असल्याचे चित्र दिसत आहे.

---

तपोवनातील या पवित्र ठिकाणी आल्यानंतर दूरून हे दृश्य खूप चांगले वाटले म्हणूनच आम्ही सहकुटुंब येथे सेल्फी काढायला गेलो. मात्र, तेथील दुर्गंधीने आम्हाला लगेच काढतापाय घ्यावा लागला. नदीचे हे प्रदूषित पाणी बघून अत्यंत वाईट वाटले.

- हरिप्रसाद वर्मा, पर्यटक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पदवीधर’ची मते घटल्याने गणित बदलणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक पदवीधर मतदारसंघातून शनिवारी नव्याने नोंदणीची अंतिम मुदत संपल्यानंतर गेल्या निवडणुकीपेक्षा पाच जिल्ह्यात ३९ हजार ७८४ मतदार कमी झाले आहेत. त्यामुळे याचा फटका नेमका कोणत्या उमेदवाराला बसतो व कोणत्या जिल्ह्यात मतदारांची वाढ व घट झाली आहे यावर आता चर्चा, गणित व व्यूहरचना आखली जात आहे.
नवीन मतदारयादीच्या नावनोंदणीसाठी ५ नोव्हेंबर ही पदवीधर मतदार संघात मतदार नोंदणीची अंत‌िम तारीख होती. या मतदार संघात नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे व नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे कुठे घट व कुठे जास्त मतदार नोंदणी झाली याला विशेष महत्व आहे. नव्याने नोंदणी झाल्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातून ७८ हजार पाच अशी नोंदणी झाली आहे. ती गेल्या निवडणुकीपेक्षा १३ हजार ८५५ ने कमी आहे. तरीसुध्दा नाशिक जिल्हा पाचही जिल्ह्यांत अग्रेसर आहे. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यात गेल्या निवडणुकीपेक्षा १६ हजार ५८० मते कमी झाली आहेत. अगोदर या जिल्ह्यात ८९ हजार ५०० मतदारांची नोंद झाली होती. आता ती ७२ हजार ९२० झाली आहे. जळगाव जिल्ह्यातही गेल्या वेळेपेक्षा १२ हजार १९१ मतदारांची नोंदणी कमी झाली आहे. त्यात पूर्वी ४४ हजार ३४६ मतदार होते. आता हेच मतदान ३२ हजार १५५ आहे. धुळे येथे मात्र या त‌िन्ही जिल्ह्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली असली तरी ती वाढ अवघी सात आहे. पूर्वी २४ हजार ४६९ मतदार होते आता तेच २४ हजार ४७६ झाले आहे. नंदुरबारमध्येही धुळ्यासारखी स्थिती असली तरी येथील वाढ मात्र २ हजार ८३५ इतकी आहे. पूर्वी येथे १२ हजार २१२ मतदार होते. आता हाच आकडा १५ हजार ४७ इतका झाला आहे.
या निवडणुकीत काँग्रेसतर्फे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे पुन्हा उमेदवारी करणार आहेत. तर भाजपने डॉ. प्रशांत पाटील यांची उमेदवारी घोष‌ित केली आहे. राष्ट्रवादीनेही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते -पाटील यांची उमेदवारी घोष‌ित केली आहे. डाव्या आघाडीतर्फे राजू देसले रिंगणात असणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीकरांना डेंग्यूची धास्ती

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

थंडीची चाहूल लागली असतानाही परिसरातील डासांची संख्या काही घटलेली नाही. ऐन दिवाळीच्या काळात डेंग्यूचे रुग्णांची पंचवटी परिसरात वाढलेली संख्या बघून नागरिक धास्तावले आहेत. डासांचा बंदोबस्त करण्यासाठी ज्या प्रमाणात प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी व्हायला हवी त्या प्रमाणात फवारणी होत नाही. धुरळणीदेखील केली जात नाही. त्यामुळे थंडीतही डासांचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही.

शेतमळ्यांचा परिसर असलेल्या नांदूर नाका भागात एक लहान मुलगा आणि एक लहान मुलगी यांना डेंग्यूची लागण झाल्याचे कळल्याने येथील नागरिक धास्तवले आहेत. पाणी साचण्याचे प्रमाण या भागात नसताही डेंग्यूसारख्या डासांपासून होणारे आजार वाढल्याने नागरिक दक्ष राहू लागले आहेत. या परिसरात नर्सरींची संख्या वाढलेली आहे. नर्सरीत असलेल्या कुंड्यांमध्ये पाणी टाकले जाते. हे पाणी जास्त काळ कुंड्यांमध्ये साचून राहत असल्याने त्यात डासांच्या अळ्या वाढत असल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त केले आहे. नर्सरीवाल्याने याबाबत काळजी घेतल्यास डासांच्या प्रादुर्भाव टाळता येऊ शकेल.

गोदावरी नदीचे पाणी पाहते नसते, त्या वेळी हमखास डासांचा प्रादुर्भाव वाढतो, ही बाब लक्षात येऊनही या काळात डासांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाहिजे तशा उपाययोजना महापालिकेकडून केल्या जात नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात या भागातील नागरिकांना डासांच्या त्रास सहन करावा लागता होता. तीच स्थिती हिवाळ्यातही दिसू लागली आहे.

डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांच्या बाबतीत महापालिकेतर्फे चांगल्या प्रकारे प्रबोधन करण्यात येत आहे. मात्र, तरीही डासांचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळत नसल्याची स्थिती दिसून येत आहे. डासांचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी ज्या फवारण्या करायला हव्यात, त्या नियमित करण्यात येत नाहीत. ज्यांना या फवारणीचे काम दिलेले आहे, ते मनुष्यबळ कमी असल्याची कारणे सांगून फवारणी करण्याचे काम टाळत आहेत. दोन-अडीच महिन्यांनंतर फवारणीची कामे पंचवटीतील प्रभागांमध्ये होत असल्याचे नागरिक सांगतात.

...

ऐन दिवाळीत माझ्या मुलाला डेंग्यू झाल्याचे निदान झाले. त्यामुळे आम्ही फार धास्तावलो आहोत. घराच्या परिसरात कुठेही पाणी साचू देत नसतानाही डेंग्यूचे डास आले कोठून, हा प्रश्न आम्हाला पडला आहे. महापालिकेची धुरळणी आणि फवारणी आमच्या भागात होत नाही. तक्रार करूनही दखल घेतली जात नाही.

-शशिकांत निमसे, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाईस पाणीबाणीची प्रतीक्षा?

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अंबड व सातपूर ‘एमआयडीसी’त पाणीपुरवठा करणारी जुनी आणि वापरासाठी राखीव असलेली पाइपलाइन एका खासगी विकसकाने चक्क विनापरवानगी कापून टाकली आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत ‘एमआयडीसी’त पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता वाढूनदेखील संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई केली जात नसल्याने कारवाई करण्यासाठी पाणीबाणीची वाट पाहिली जात आहे का, असा सवाल उद्योजकांसह परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे. या प्रकरणी बेफिकिरीने वागणाऱ्या विकसकावर कडक कारवाई करण्याची, तसेच संबंधित पाइपलाइन पूर्ववत करण्याची कार्यवाही तातडीने करण्याची अपेक्षादेखील व्यक्त करण्यात आली आहे.

‘एमआयडीसी’ परिसरात झालेल्या या प्रकाराबाबतचे वृत्त ‘मटा’मध्ये प्रसिद्ध केल्यावर ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांनी संबंधित विकसकाला केवळ समन्स देण्याचेच सोपस्कार पार पाडले आहेत. मात्र, अशी वापरासाठी राखीव असलेली पाइपलाइन कापण्याचा प्रकार अर्थकारणातूनच झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत ‘एमआयडीसी’तील अधीक्षक अभियंता नितीन वानखेडे यांना विचारले असता चौकशीच सुरू असल्याचे उत्तर त्यांनी दिले. कार्यकारी अभियंता दुशांत उईके यांना विचारले असता माहिती घेण्याचेच काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यात मात्र कार्यरत असलेली पाइपलाइन तोडण्याचा घाट घालणाऱ्यांवर कारवाई करणार कोण, असा सवाल उद्योजकांकडून उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अंबड व सातपूरमधील कारखान्यांसाठी आनंदवली गावात गोदावरी नदीवर बंधारा टाकत पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली होती. गंगापूर धरणातून ‘एमआयडीसी’साठी पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्यावर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत होता. त्यासाठी ‘एमआयडीसी’ने कोट्यवधी रुपये खर्च करून गंगापूर धरणातूनच थेट पाइपलाइन कारखान्यांसाठी उभारली आहे. गंगापूर धरणावर कारखान्यांसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या पाइपलाइनला पर्याय म्हणून जुनी असलेली आनंदवली गावातील लाइनदेखील राखीव म्हणून कार्यरत ठेवण्यात आली होती. त्यासाठी आनंदवली गावातील ‘एमआयडीसी’च्या पंपिंग स्टेशनवर आजही कर्मचारी कार्यरत आहेत. विशेष म्हणजे संबंधित पाइपलाइन आजही कार्यरत असताना ती तोडण्याचा घाट कसा घातला गेला, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एेनवेळी गंगापूर धरणावर पाणीपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था असलेली पाइपलाइन तोडण्याचा घाट अर्थकारणातूनच घात गेला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याकडे ‘एमआयडीसी’च्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी लक्ष घालावे, अशी मागणी उद्योजकांकडून केली जात आहे.

विकसकाने भूखंड केला सपाट

कारखान्यांना पाणीपुरवठा करणारी जुनी पाइपलाइन ज्या ठिकाणी तोडण्याचा घाट खासगी विकसकाने घातला होता, त्या ठिकाणी भूखंड सपाट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याबाबत ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांना माहिती असूनदेखील संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. केवळ नव्याने रुजू झाले म्हणून अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकावी का, असा सवालदेखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक होणार उड्डाणपुलांचे शहर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धार्मिक स्थळांचे शहर म्हणून प्रसिध्द असलेले नाशिक आता उड्डाणपुलांचे शहर म्हणून प्रसिध्द होणार आहे. १७ लाख लोकसंख्येच्या या शहरात मुख्य शहरातून जाणारे १३ ते १४ किमी लांबीचे उड्डाणपूल आता दिसणार आहेत. आजही गोदावरीला पूर आल्यानंतर पुराची पातळी मोजण्यासाठी रामवाडी, अहिल्याबाई होळकर, गाडगे महाराज व रामसेतू पुलाच्या खाली किती पाणी आहे यावरुन मोजली जाते. त्यामुळे पुलाचे महत्व अगोदरही होतेच. आता त्यात अधिक भर पडणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी द्वारका ते नाशिकरोड या ५.९ किमी रस्त्यावर उड्डाणपुलाची घोषणा शनिवारी केल्यामुळे आता शहरातील मुख्य भागात उड्डाणपुलाची गर्दी दिसणार आहे. याअगोदर महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा आणि देशातील तिसऱ्या क्रमांकाचा ६.१० किमी लांबीचा उड्डाणपूल मुंबई - आग्रा रस्त्यावर बांधण्यात आला. त्याअगोदर नाशिकरोड येथे दत्तमंदिर ते सिन्नर फाटा येथे दीड किमी अंतराचा पूल युती काळात बांधण्यात आला. त्यामुळे हे उड्डाणपूल आता नाशिकचे वैशिष्ट्ये ठरणार आहेत.
नाशिकच्या पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेले हे उड्डाणपुलाने वाहतुकीची कोंडी थांबवण्याचे काम केले. पण त्यात काही त्रुटी असल्यामुळे त्याचेही काम आता होणार आहे. विशेष म्हणजे या पुलाच्या अंतरात आता के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेज ते आडगाव हा पूलसुध्दा होणार आहे. व्दारका ते नाशिकरोडदरम्यान होणारा उड्डाणपूल तर पुणे येथे जाणाऱ्या वाहतुकीसाठी उपयुक्त असा असणार आहे. याअगोदर नाशिकरोड ते नाशिक या रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यात हा पूल झाल्यास द्वारका व मुंबई किंवा धुळ्याकडून पुणे येथे जाण्यासाठी या उड्डाणपुलाचा उपयोग होणार आहे. सुवर्ण चौकोनाचा एक भाग असलेल्या नाशिकची वाटचाल महानगराच्या दिशेने होत असताना कुंभमेळ्यात सर्वाध‌िक रस्ते शहरात झाले. त्यामुळे शहर चकाचकही झाले. त्यात ही नवी भर पडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दान उपक्रमाचे कौतुक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोसावी बहुद्देशीय संस्थेतर्फे दिवाळीनिमित्त दान महोत्सव या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात दिवाळीपूर्वी महिनाभरात एक लाख वस्तू गोळा करून त्या गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

गोसावी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकसहभागातून जीवनावश्यक अशा एक लाख एक वस्तू जमा करण्याचा उपक्रम हाती घेतला. यात गृहोपयोगी वस्तू, संगणक, सायकल, शालेय साहित्य, विजेची उपकरणे अशा अनेक वस्तूंचा समावेश होता. पाथर्डी फाटा, पोलिस मुख्यालय व नाशिकरोड येथील पोलिस वसाहतींमध्ये दान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल, पोलिस उपायुक्त विजय पाटील, लक्ष्मीकांत पाटील यांनी कौतुक करून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढविले. या उपक्रमाची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुनीता गोसावी यांनी दिली. लोकसहभागातून जमा झालेले साहित्य हे समाजातील अतिदुर्बल घटक, आदिवासी वाड्यावस्तींवर वाटप करण्यात येणार आहे. तसेच लोकसहभागातून श्रमदान कार्यक्रम घेऊन गावाची स्वच्छता, शाळेचे क्रीडांगण स्वच्छ करणे, स्वच्छतागृह तयार करणे अशा श्रमदान करणाऱ्यास वाटप करण्यात येणार आहे.

या उपक्रमात संस्थेचे सचिव विनोद गोसावी, संस्थेचे संचालक प्रशांत अहेर, रेश्मा पाटील, प्रतिभा देशमुख, नागेश चव्हाण, गोकुळ पाटील, अक्षय विसपुते, तुषार धुमाळ, पूनम सोनवणे, मनीषा टिळे, ऋषिकेश पाटील, योगीता धुमाळ आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यासाठी जलसिंचनाची विशेष गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘जलसिंचनाचा आराखडा बनविताना किमान पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन हा मुख्य हेतू विचारात घ्यावा लागतो. राज्यात पावसाचे प्रमाण अनियमित आहे. यावर उपाययोजना शोधताना पुरेसे जलसिंचन हाच प्रभावी उपाय आहे. हे लक्षात घेऊन सरकार राज्यातील जलसिंचनाची गरज भागविण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे’, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले.

चांदवड येथे आयोजित मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या वार्षिक राष्ट्रीय अधिवेशनाचे उद््घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. तेथील आबड- लोढा- जैन कॉलेजमध्ये हे तीनदिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
महाजन पुढे म्हणाले, की समाजाचे पाण्याशी असणाऱ्या नात्यात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. हा बदल लक्षात घेऊन पाण्याच्या संदर्भातील व्यवहारांची नवी अन् हितकारक व्यवस्था उदयास आणण्याची आवश्यकता आहे.
स्वागताध्यक्ष बेबीलाल संचेती होते. सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. शिवाजीराव भोसले होते. खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहुल आहेर, नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, डॉ. आत्माराम कुंभार्डे प्रमुख पाहुणे होते. यानंतर कॉलेजच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने संपादित ‘अर्थनेमि’ या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. अर्थशास्त्र परिषदेचे स्थानिक कार्यवाह डॉ. सुरेश पाटील यांनी अधिवेशनाबाबतची भूमिका मांडली. प्राचार्य डॉ. जी. एच. जैन यांनी मनोगत व्यक्त केले.

‘दुष्काळासारखा महत्त्वाचा अन् जिव्हाळ्याचा प्रश्न या अधिवेशनाचा मुख्य विषय आहे. ही कृषी क्षेत्राच्या दृष्टीने आशावादी बाब आहे. या मंथनातून दुष्काळासारख्या समस्येवर काही दीर्घकालीन उपाययोजना हाती येतील’, असा आशावाद या वेळी खासदार चव्हाण यांनी व्यक्त केला.

अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानाहून या वेळी सातारा येथील छत्रपती कॉलेजचे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजीराव भोसले यांनी ‘महाराष्ट्रातील जलसिंचन : एक चिंतन’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी जलसिंचन या विषयाची पार्श्वभूमी, जलसिंचनाचा उद्देश, सिंचनाच्या पद्धती, महाराष्ट्राचे जलधोरण आदी विषयांवर निरीक्षण मांडले.

प्रा. डॉ. तुषार चांदवडकर यांनी सूत्रसंचालन केले. कांतिलाल बाफना यांनी आभार मानले. या वेळी व्यासपीठावर अजित सुराणा, महावीर पारख, अरविंद भन्साळी, दिनेश लोढा, सुमतीलाल सुराणा, राजकुमार बंब, प्राचार्य सी. डी. उपासनी, पी. पी. गाळणकर, प्रा. डॉ. चारुदत्त गोखले, डॉ. अविनाश निकम व डॉ. राजेंद्र भांडवलकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचाराचा सोहळा भाजपवरच बूमरँग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उड्डाणपुलासह विविध रस्ते विकासकामांचा प्रारंभ भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करून महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजवण्याचा शहर भाजपचा प्रयत्न खासदार गोडसे यांच्यामुळे फोल ठरला. श्रेयवादाचा मुद्दा उपस्थित करून भाजपने हे विकासकाम आपल्यामुळे झाले, असा दावा केल्यानंतर भाजपच्या गडकरी यांनी खासदार हेमंत गोडसे यांना झुकते माप दिल्यामुळे प्रचाराचा हा सोहळा भाजपवरच बूमरँग झाला. त्यामुळे भाजपच्या पदरी इतका मोठा सोहळा होऊनही निराशाच पडली आहे.

खासदार गोडसे यांनी द्वारका व नाशिकरोड येथील रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे घेण्याची मागणी केली. गोडसे यांची मागणी मान्य करण्याबरोबरच गडकरी यांनी उड्डाणपुलाची भेट देत गोडसेंनाही सुखद धक्का दिला. खरे तर या रस्त्यावर सर्व्हिस रोड व्हावे यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, ण त्यात उड्डाणपुलाचा विषय कोठून आला व त्याची घोषणा कशी झाली, हेही अनेकांना चक्रावून टाकणारे ठरले. महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजप आमनेसामने असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत श्रेय लाटण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून सुरू झाला आहे. नाशिक शहरात भाजपचे तीन आमदार आहेत, तर शिवसेनेचा खासदार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून एकमेकांचे श्रेय घेण्याचे काम याअगोदरही झाले आहेत. राज्य सरकारने मंजूर केलेले एसटी बस स्थानकाच्या विकासकामाचे श्रेय शिवसेनेने घेतले होते. त्यावेळेसही असाच वाद सुरू झाला. त्यानंतर केंद्र सरकारच्या कामावरून हा वाद सुरू झाला; पण या वादात गडकरींनी शिवसेनेला चाल देऊन भाजपच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे.

मंत्री गडकरी यांनी सकाळी झालेल्या कार्यक्रमात राज्य सरकारला चिमटे काढले व सायंकाळी स्थानिक नेत्यांनाही जोरदार धक्का दिला. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मोर्चेबांधणी करून पोटनिवडणुकीतही आपले दोन शिलेदार निवडून आणले. त्यामुळे भाजपचे बळ वाढले असतानाच शनिवारच्या सोहळ्यात स्वपक्षातील नेत्यांकडून धक्का बसला. पोटनिवडणुकीच्या यशामुळे भाजप जोरात, तर इतर पक्ष कोमात गेल्यासारखे चित्र होते. त्यामुळे भाजपने महापौरांसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली. त्यासाठी गडकरी यांचे स्वागताचे पोस्टर लावतानाही त्यात भाजपची वचनपूर्ती, उड्डाणपुलाची होतेय स्वप्नपूर्ती असा मजकूर टाकला. त्यात मतदारांना आमच्यामुळे हे काम झाल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न होता. मात्र, गडकरी यांनी बाजू उलटवली व त्यांचा दौरा शिवसेनेलाच फलदायी ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाटसरूला लुटणाऱ्यास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पादचाऱ्याला निर्जन स्थळी नेऊन, तसेच त्यास मारहाण करून पैसे आणि मोबाइल फोन हिसकावणाऱ्या संशयिताला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने शिताफीने अटक केली आहे. संशयितांकडून काही मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी घडलेल्या या घटनेचा पोलिसांनी एका दिवसातच छडा लावला आहे.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील चेतन गायकवाड नाशिकला नातेवाइकांकडे येत होते. द्वारका सर्कल समजून ते वाडिवऱ्हे फाट्यावर उतरले. तेथून गाडी मिळत नसल्याने ते चालू लागले. त्याच वेळी मागून एका मोटारसायकलवरून दोन जण आले. नाशिकला जायचे आहे का, अशी त्यांना विचारणा केली. गायकवाड यांना गाडीवर बसवून मोटारसायकल निर्जन स्थळी घेऊन गेले. त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील दोन मोबाइल फोन व रोकड असा सुमारे नऊ हजारांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हिसकावून घेतला. गायकवाड यांनी शनिवारी वाडिवऱ्हे पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन फिर्याद दिली.

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर नवले यांनी महामार्गावरील गुन्ह्याच्या पद्धतीवरून तपासाला सुरुवात केली. स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक उपनिरीक्षक गुरुळे, हवालदार शिवाजी जुंद्रे, बंडू ठाकरे, संदीप हांडगे यांनी वाडिवऱ्हे येथील भवानीनगर परिसरातून संशयित अशोक हरी झोले (रा. वाडिवऱ्हे, ता. इगतपुरी) याला ताब्यात घेतले. त्याने खंडू काशिनाथ पाटील, रतन कैलास शेजवळ (दोघे रा. वाडिवऱ्हे) यांची नावे सांगितली. पोलिसांनी दोन्ही संशयितांचा शोध सुरू केला. शेजवळ यास परिसरातील एका कंपनीतून ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, दोन मोबाइल असा एकूण १८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. आरोपींना वाडिवऱ्हे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images