Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सुरगाणा तालुक्यातील पूल बनला धोकादायक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सुरगाणा तालुक्यातील उंबरदे (प) येथील पूल धोकादायक बनला आहे. तालुक्याच्या गावाला जोडणारा नार नदीवरील हा पूल सुरगाणा तालुक्यातील सर्वात जुना पूल आहे. ही बाब बांधकाम विभागाच्या निदर्शनास आली असूनही या पुलाकडे विभागाचे अधिकारी दुर्लक्ष का करतात, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. तातडीने या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

उंबरदे व हातरूंडी दरम्यान असलेल्या या पुलाचे बांधकाम १९८० ते १९८५ दरम्यान झालेले आहे. पुलाचे बांधकाम दगडी असल्यामुळे सद्यस्थितीत जागोजागी दगड निघाले आहेत. बांधकामाचा भराव असलेली बाजूही पूर्णपणे निखळली आहे. तसेच पुलाचे वरचे संरक्षण कठडे मोठ्या प्रमाणात तुटले असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

दुरुस्तीला मुहूर्त केव्हा?

या पुलामुळे परिसरातील पळसन, आमदा, वागण, भवाडा, राक्षसभुवन, खडकी, पळशेत, मेरदाड, कोटबा, गहाले, वाघाडी, बोरपाडा, सुळे, अतिदुर्गम भागातील ही गावे संपर्क क्षेत्राच्या बाहेर जाऊ शकतात. तसेच या गावाचे दळणवळण ठप्प होऊ शकते. त्यामुळे आता या पुलाच्या दुरुस्तीला मुहूर्त लागणे महत्त्वाचे झाले आहे. अशा या महत्त्वाच्या समस्येकडे बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी का लक्ष देत नाही, असा प्रश्न आता ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येवल्यात सहस्त्रार्जुन महाराज पालखी

$
0
0

म.टा. वृत्तसेवा, येवला

सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाचे आद्यपुरुष श्री राजराजेश्वर सहस्त्रार्जुन महाराज जयंतीनिमित्त येवला शहरातून समाजाच्यावतीने भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. भगवे फेटेधारी महिला अन् टोपी परिधान केलेले पुरुष मंडळींमुळे ही मिरवणूक सर्वांचेच लक्ष वेधून गेली.

श्री बालेश्वरी मंदिरापासून या पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. बालेश्वरी मंदिर येथे महाआरतीने मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले. महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येऊन विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. श्री सहस्त्रार्जुन प्रतिष्ठानच्या वतीने सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या पालखी मिरवणुकीमध्ये समाजाचे अध्यक्ष गोविंदसा वाडेकर, उपाध्यक्ष रवींद्र चौधरी, संजय कुक्कर, सहस्त्रार्जुन प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन बाकळे, राजश्री पहिलवान, कांचन पहिलवान, विलास पवार, जयप्रकाश कोकणे, अविनाश सांबर, सागर खानपुरे, ललित भांडगे, वामन वाडेकर, प्रवीण पहिलवान, विनोद बाकळे, प्रवीण कुक्कर, श्रीकांत बाकळे, पंकज पहिलवान, संजय फुलपगार, संजय वडे, पांडुरंग भांडगे, दीपक वखारे, बाळासाहेब भांडगे, योगेश सांबर, धनंजय हंडी, शेखर खेरूड, राकेश पेटकर, अमोल चिनगी, प्रतुल खानापुरे, राहुल भांडगे, अनिल हबीब, राजेंद्र वडे आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीक्षित दाम्पत्याला 'लोकसेवक' पुरस्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

महाराष्ट्र गो-विज्ञान समितीतर्फे दिल्या जाणाऱ्या 'जमनाबेन लोकसेवक पुरस्कार'ची घोषणा करण्यात आली आहे. यंदा जिल्ह्यातील लोकसेवक दाम्पत्य मुकुंद व वासंती दीक्षित यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष मोहन सराफ यांनी दिली. दरवर्षी सर्वोदयी स्व. जमनाबेन मनसुख भाई कुटमुटीया यांचे नावाने हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे हे २३ वे वर्ष आहे.

'जमनाबेन लोकसेवक पुरस्कार' हा उत्तर महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठेचा पुरस्कार मनाला जातो. गेल्या २३ वर्षांत प्रथमच हा सन्मान जिल्ह्याला मिळाला आहे. पुरस्कार निवड समितीत पद्मविभुषण माजी न्यायमूर्ती धर्माधिकारी, सेवाग्राम आश्रमचे अध्यक्ष जयवंत मठकर, अखिल भारतीय नई तालीम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ यांचा समावेश होता. पुरस्कार विजेत्यांना सुप्रसिद्ध समाजसेवी डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. २१ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता हा सोहळा होईल. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे असेल.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव संजय जोशी, कोषाध्यक्ष जितेंद्र कुटमुटीया , विश्वस्त डॉ. यशवंत (बहार) देवरे, विश्वस्त हिरामण जाधव, अपश्चिम बरंठ, जयेष शेलार, नचिकेत कोळपकर यांनी केले आहे.

जीवन आदिवासींसाठी समर्पित

‘जमनाबेन लोकसेवक पुरस्कार’चे मानकरी असलेल्या दीक्षित दाम्पत्याने आपले आयुष्य आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी समर्पित केले. कविवर्य कुसुमाग्रजांच्या सल्ल्याने ते दिवंगत बाबा आमटेंकडे गेले. त्यांना हेमालकसाच्या युवक बिरादरी प्रकल्पात बाबा आमटे यांनी जबाबदारी सोपवली. येथे त्यांनी आपल्या आयुष्याची १८ वर्षे अत्यंत घनदाट जंगलात राहून तेथील आदिवासी बांधवांना आपलेसे केले. त्यानंतरची १० वर्षे मध्य प्रदेशात विविध क्षेत्रांत काम केले. सध्या ते त्र्यंबकेश्वरच्या पश्चिमेकडील आदिवासींमध्ये गेली १५ वर्षे काम करीत आहेत. त्यांच्या या समर्पित कार्याचा गौरव यानिमित्ताने होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप उमेदवाराची प्रभाग नऊमधून माघार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक नऊमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेवरील भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या भूषण भावसार यांनी बुधवारी आपला अर्ज मागे घेतला.

या प्रभागात शिवसेनेच्या वतीने सागर पांडुरंग लोणारी यांना उमेदवारी देण्यात आलेली असून, सेना-भाजप यांच्यात झालेल्या ‘युती’मध्ये ही जागा सेनेच्या वाट्याला गेली आहे. युतीत ठरल्यानुसार भूषण भावसार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. येवला नगरपालिका निवडणुकीत बुधवार अखेर नगराध्यक्षपदासाठीच्या रिंगणातून दोन, तर नगरसेवकपदासाठीच्या पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. अद्याप नगराध्यक्षपदासाठी १०, तर नगरसेवकपदासाठी विविध प्रभागांतील एकूण १३२ उमेदवारांचे अर्ज शिल्लक आहेत. उमेदवारी अर्ज माघारीसाठी आता गुरुवार व शुक्रवार, असे शेवटचे दोनच दिवस शिल्लक आहेत. अध्यक्षपदाच्या शर्यतीसह विविध प्रभागातून कुणाकुणाची माघार होते अन् कोण कोण निवडणुकीला सामोरा जातो याकडे येवला शहरवासियांचे लक्ष लागले आहे. माघारीच्या अंतिम मुदतीनंतरच नगराध्यक्षपदाच्या महत्त्वपूर्ण मुकाबल्यासह कुठल्या प्रभागात कुणाकुणात कसा सामना रंगतो याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोठ्या नोटांनी काढला पोलिसांचा ‘दम’!

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक - चलनातील एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्याचा थेट परिणाम शहर वाहतूक पोलिसांच्या कारवाईवर झाला आहे. कारवाई व दंड वसुलीत घट झाली असून, नवीन नोटा चलनात येईपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. बंद झालेल्या नोटा स्वीकारायच्या नाहीत, अशा सूचनाच असल्याने वाहतूक पोलिस नियम मोडणाऱ्यांकडून शक्य तितके पैसे काढून पावती फाडण्यास प्राधन्य देत आहेत.

शहर वाहतूक शाखेतर्फे दररोज भरभक्कम दंड वसूल केला जातो. वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांची संख्या कमी नाही. यामुळे वाहतूक विभाग डिसेंबर अखेरीस दोन ते सव्वा दोन कोटी रुपयांचा दंड वसूल करण्याची शक्यता आहे. मागील वर्षापर्यंत एकूण दंड वसुलीचा आकडा फारतर एक-दीड कोटी रुपयांपर्यंत स्थिरावत होता. आजमितीस वाहतूक विभागामार्फत दिवसभरात सरासरी ४० ते ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला जातो. मात्र मागील आठ दिवसांचा विचार करता यात मोठी तफावत झालेली दिसून आली. विशेषतः सरकारने एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद ठरवल्यानंतर वाहतूक पोलिसांसमोर दंड वसुलीचा यक्षप्रश्न निर्माण झाला. ८ नोव्हेंबर रोजी रात्री सदर नोटा बाद झाल्या. दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबर रोजी दंडात्मक कारवाई करण्यासाठी रस्त्यावर आलेल्या पोलिसांना सुट्या पैशांची वानवा जाणवू लागली. बाद झालेल्या नोटा स्वीकारायच्या नाहीत, असे स्पष्ट आदेश होते. त्यामुळे, नियम मोडणारे आणि वाहतूक पोलिस यांच्यातच वाद सुरू झाले. दंड घ्यायचा असेल तर घ्या, अशी भूमिकाच नियम मोडणारे घेऊ लागले. यामुळे वाहतूक पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली. टोईंग करून आणलेली वाहने सोडवतानादेखील असाच गोंधळ उडाला. काही ठिकाणी वाहतूक पोलिस आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये झालेल्या वादानंतर अधिकाऱ्यांना मध्यस्थी करावी लागली.


एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर आम्ही शंभर रुपयांच्या किंवा नवीन नोटा स्वीकारण्यास प्राधान्य दिले आहे. वाहतूक नियम पाळणे ही वाहनचालकाची जबाबदारी आहे. नियम मोडून पुन्हा पोलिसांशी वाद घातला तर कारवाई करण्यात येईल. नियमाचे पालन केले तर दंडात्मक कारवाईचा प्रश्नच येणार नाही.

जयंत बजबळे, सहायक पोलिस आयुक्त



मागील आठ दिवसातील दंड वसुली

२ नोव्हेंबर-३२ हजार ४००

३ नोव्हेंबर-४८ हजार २००

४ नोव्हेंबर-४४ हजार ६००

५ नोव्हेंबर-३१ हजार २००

६ नोव्हेंबर-४४ हजार ४००

७ नोव्हेंबर-४६ हजार २००

८ नोव्हेंबर-३४ हजार

९ नोव्हेंबर-२६ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमी अभिलेखमधील तीन लाचखोरांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जमिनीची मोजणी केल्यानंतर त्याचा नकाशा देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सिन्नर भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकासह दोघांना अॅण्टी करप्शन ब्युरोने (एसीबी) जेरबंद केले. यामुळे सिन्नर तालुक्यात खळबळ उडाली असून, एक हजार आणि पाचशे रुपयांच्या बंद नोटाही लाचखोर अधिकारी स्वीकारत असल्याने सर्वत्र टिकेची झोड उठत आहे.
पांडुरंग नरहरी सानप (उपअधीक्षक), सुरेश चंद्रकिशोर रगडे (शिरस्तेदार) आणि भगीरथ जीभाऊ चव्हाण (लिप‌िक) असे एसीबीने अटक केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सिन्नर शिवारातील गट क्रमांक ७३५ (९९०) या दोन हेक्टर ६३ आर क्षेत्रात तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांच्या नावे १ हेक्टर ९३ आर शेती आहे. सदर क्षेत्राची तक्रारदार यांना विक्री करायची असल्याने त्यांनी सिन्नर तालुका भूमी अभिलेख कार्यालयात फी भरून जम‌िनीची मोजणी करून घेतली. मोजणी केल्याप्रमाणे सदर क्षेत्राचा नकाशा घेण्यासाठी तक्रारदाराने वरील तिघा संशयितांची गाठ घेतली. मात्र, सर्व रितसर असताना वरील संशयित आरोपींनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपये लाचेची रक्कम मागितली. तडजोडीअंती १२ हजार रुपये लाच घेण्यास संशयित आरोपी तयार झाले. तक्रारदाराला लाचेची रक्कम द्यायची नसल्याने त्यांनी एसीबी कार्यालयात संपर्क साधला. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर गुरुवारी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास एसीबीच्या अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराने दिलेली १२ हजारांची रक्कम शिरस्तेदार सुरेश रगडे याने स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रगडेसह उर्वरीत दोघांना अटक केली. यामुळे सिन्नर तालुक्यात खळबळ उडाली असून, चलनातून बंद झालेल्या नोटा स्वीकारणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याची मागणी केली जात आहे. लाचखोरीच्या तक्रारींसाठी क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या नोटांवर शर्विलकांची नजर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद होताच त्या बदलून घेण्यासाठी सर्वसामान्यांची राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. पुढील ५० दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार असून, दररोज गर्दीचे चित्र निर्माण होऊ शकते. या दरम्यान बॅग लिफ्टींग करणारे चोरटे सक्रिय होण्याची शक्यता असून, मोठी रोकड जवळ बाळगणाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.
शहरातील विविध बँकांमध्ये दररोज कोट्यवधी रुपयांचे व्यवहार पार पडतात. गर्दीचा फायदा घेत चोरटे नवनवीन शक्कल लढवत बँकेत आलेल्या ग्राहकांना फसवतात. आता तर चोरट्यांसाठी ही पर्वणी ठरू शकते. त्यामुळे मोठी रक्कम घेऊन बँकांकडे जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या परीने सावधानता बाळगावी. विशेषतः नोटा बदलण्यासाठी बँकेत जाताना रक्कम जास्त असल्यास भक्कम बॅगेत पैसे व्यवस्थित ठेवावेत. घरून पैसे घेऊन निघाल्यानंतर सरळ बँकेत जावे, अधे-मधे थांबू नये. आपल्यासोबत मदतीसाठी कोणाला तरी घ्यावे. पैशाची बॅग डिक्कीत सुरक्षित ठेवल्याची खात्री करावी. बँकेत कोणी नोटा मोजून देण्याची तयारी दर्शवली किंवा कारण नसताना संभाषण सुरू केले, तर सावध रहावे. नोटा मोजण्याच्या किंवा बदलून देण्याच्या बहाण्याने हे लोक आपली फसवणूक करू शकतात. ज्येष्ठ नागरिक, महिला व अपंगांनी आपल्या मदतीसाठी कोणालातरी सोबत ठेवावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातही धावाधाव

$
0
0

टीम मटा

पाचशे व एक हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर गुरुवारी (दि. १०) जिल्ह्यात नागरिकांनी बँकेत नोटा जमा करण्यासाठी गर्दी केली होती. त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात येत होते. तर काही ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांना शंका सोडविताना नाकीनऊ आले होते. मालेगाव, मनमाड, नांदगाव, चांदवड, कळवण, सटाणा, निफाड, घोटी, सिन्नर तालुक्यात सर्वच बँक शाखांना नागरिकांची झुंबड उडाली होती. मालेगावात आठवडे बाजारात सर्व व्यवहार ठप्प झालेले दिसून आले.


नोटांवरून चर्चा

निफाड : ‘आमच्या गृहमंत्र्यांनी ५००, १०००च्या नोटा काढल्या बाहेर’ अशा चर्चा आणि एक ना अनेक किस्से ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसात ऐकायला मिळाले. यापैकी काहींना यापूर्वी आपण बायकोकडे पैसे मागितले तर मिळत नव्हते. आणि आता नोटा बंद करताच घरातूनच हजारच्या नोटा असल्याची माहिती कळाल्याने कुतूहल मिश्रित हास्य अनेकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले. घरातील पत्नी, आई, आजी अशा घरगाडा हाकणाऱ्या महिलांकडे नोटा आता सुटे करून आणायची जबाबदारी पुरुषांवर आली आहे.


सोशल मीडियात प्रतिबिंब

चलनातील पाचशे आणि १ हजार रुपयांच्या नोटा रद्दबातल ठरविण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर करताच सोशल मीडियावर त्याचे प्रतिबिंब उमटू लागले.व्हॉटस अॅपवर तर या बातमीसह त्याचे विडंबन करण्याच्या संदेशाचा पाऊसच पडला. यातून नगरपालिका निवडणूकदेखील सुटली नाही. निवडणुकीवर या निर्णयाचा मोठा परिणाम होईल, असे संदेश जोरदारपणे फिरत होते. ‘घरच्या नोटा काढाव्या तर बँक मधे बसणार नाही अन् निवडणुकांत वाटायच्या होत्या तर लोक घेणार नाही..एक वैतागलेला नेता’, ‘चीटिंग है..काला धन बाहर से लाने का कहा था...ये अंदर का निकाल रहे है!’असे अनेक मेसेज येणे सुरू झाले होते.

सटाण्यात नागरिक त्रस्त

सटाणा : या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. तरीही या अनपेक्षित प्रकारामुळे गुरूवारी, सटाण्यात सर्व बँकाना ग्राहकांच्या गर्दीने जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. ५०० व१००० रूपंयाच्या नोटा मध्यरात्रीपासून बाद ठरविल्याने शहरातील दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. व्यावसायिकदेखील चलनात या नोटा स्विकारण्यास नकार देत होते. पेट्रोलपंपावर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी शहरातील सर्वच इंधनपंपावर प्रचंड गर्दी उसळली.

नोटा जमा करण्यासाठी ग्राहकांच्या उड्या

निफाड : काल बँकेचे व्यवहार सुरु झाल्या झाल्या बँकेत ग्राहकांनी अक्षरशः उड्या मारल्या. निफाड येथील स्टेट बँक, देना बँक, महाराष्ट्र बँक, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक हैद्राबाद आदी राष्ट्रीय बँकांमध्ये तसेच निफाड अर्बन बँक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक या बँकांमध्ये सकाळी १० वाजेपासूनच ग्राहकांनी गर्दी केली होती. काहींनी लहान मुले, घरातील ज्येष्ठ नागरिकांनाही पैसे बदलून घेण्यासाठी बँकेत रांगेत उभे केले होते.

बाजारात व्यवहार ठप्प

मालेगाव : शहर व तालुक्यात बुधवारी पेट्रोलपंपावर नोटा खपवण्यासाठी दिसणारी लोकांची गर्दी गुरूवारी (दि. १०) मात्र बँकांमध्ये पाहायला मिळाली. शहरातील स्टेट बँकच्या मुख्य शाखेसह सर्वच बँकामध्ये सकाळपासूनच लोकांनी रांगा लावल्याचे चित्र दिसत होते. बाजार समितीत ग्रामीण भागातून शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनादेखील चेकद्वारे पेमेंट करण्यात आले. तसेच सोमवारपर्यंत व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

बँकांचा ग्राहकांना दिलासा

येवला : नोटा बदलण्यासाठी शहरातील नागरिकांना गुरुवारी राष्ट्रीयकृत बँकांच्या सहकार्याच्या भूमिकेमुळे मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र दिसलं. गुरुवारचा दिवस शहर व तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी, भरणा करण्यासाठी शाखांबाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगाच रांगा लागल्या होत्या. दोन हजाराची नवी नोटदेखील नागरिकांच्या हातात पडली. ही नवी नोट हाती घेऊन पडणारा प्रत्येकजण नवी नोट बारकाईने न्याहळताना दिसत होता.


घोटीत बँकांचे नियोजन विस्कळीत

घोटी : नोटा बदलाच्या निर्णयाचा परिणाम घोटीतही जाणवला. २५ किलोमीटरवरून येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांचे यामुहे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यांना यासाठी तासंतास बँकेत नंबर लावल्यामुळे घरी जाण्यासाठी गाडीची अडचण निर्माण झाली. सरकारकडून चार हजार रुपये बदली देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे, घोटी येथील बँका दोन हजार रुपये देऊन नागरिकांची बोळवण करत होते. तसेच खात्यावर एक हजार, पाचशे रुपये खात्यावर भरणा करताना कोणत्याही फॉर्मची किंवा ओळखपत्राची गरज नसल्याच्या सूचना असतानादेखील बँकेकडून आधारकार्डची सक्ती केली जात होती. त्यामुळे नागरिक बँकांच्या अटीशर्तीला वैतागले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नांदूरमध्यमेश्वर पाणवठ्यावर पक्षीप्रेमींची गर्दी

$
0
0

२५ हजार पाहुण्यांचे आगमन

म. टा. वृत्तसेवा, निफाड

महाराष्ट्राचे भरतपूर असे वर्णन पक्षीमित्र सलीम अली यांनी केले त्या नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या पाणवठ्यावर देश विदेशातील २५ हजार पाहुण्यांचे आगमन झाले आहे. ही मांदियाळी डोळ्यात साठवण्यासाठी पक्षीप्रेमीचें पावले या धरण परिसरात असणाऱ्या पक्षीनिरीक्षण ठिकाणाकडे वळू लागली आहेत.

नाशिक जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्वर धरणाचे यावेळेचे वैशिष्ट्य असे ‘ओसप्रे’ हा अमेरिकेतून येणारा शिकारी पक्षी या हंगामात लवकर दाखल झाला आहे. पक्षी निरीक्षणासाठी नाशिक, सिन्नर, निफाड आदी ठिकाणांवरून पक्षी निरीक्षक, हौशी नागरिक, लहान मुले आदी हा निसर्गाचा अनमोल खजिना पाहण्यासाठी सहकुटुंब मित्रपरिवारासह धरण परिसरात दाखल होत आहेत. अभयारण्यात तिबेट, रशिया, सैबेरिया, दक्षिण आफ्रिका, इराण, अमेरिका अशा देशांसह हिमालय पर्वत आणि भारताच्या विविध भागातून नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत पक्षी राहतात. परिसरातील जैवविविधता, खाद्य यामुळे वर्षानुवर्षे हे स्थलांतरित पक्षी आपला अधिवास ठेवतात.

पर्यटकांसाठी सुविधा

पक्षी अभयरण्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी वनविभागाने चांगले प्रयत्न केल्याचे सध्याच्या चित्रावरून दिसत आहे. पक्षी पाहण्यासाठी निफाड तालुक्यात ३ ठिकाणे आहेत. त्यापैकी चापडगाव येथे सहा टॉवर, पक्ष्यांना विश्रांतीसाठी झाडांच्या फांद्यांच्या आकाराचे चार ते पाच ठिकाणी जेटी उभारल्या आहेत. पर्यटकांना राहण्यासाठी टेंट, विश्रांतीसाठी ३ इको हर्ट, पक्षी निरीक्षण गॅलरी आणि खास ४ पॅगोडा बनविले आहेत. वनविभागाने आकर्षक प्रवेशकमानी, स्थळदर्शक बोर्ड, पक्ष्याचे फोटो, नावे व माहिती मनोऱ्यापर्यंत जाण्यासाठी पायी वाटा व सायकल ट्रॅकही तयार आहेत. सर्व पक्ष्यांची, परिसराची माहिती देण्यासाठी ५ गाइडही उपलब्ध आहेत. या सुविधा असल्याने पर्यटक अभयारण्याकडे वळू लागली आहेत.

या पक्ष्यांचे आगमन

ओसप्रे,स्पॉटेडईगल, मार्शहॅरिअर, कॉमन केसट्रल, पेरिग्रीन फाल्कन, काईट हे शिकारी पक्षी नांदूरमध्यमेश्वरला आलेले आहेत.तर पेंटेड स्टार्क, ओपन बिल, स्टार्क व्हाईट, नेक स्टार्क, स्पूनबिल, कॉमन क्रेन, व्हाईट आयबीज, ब्लॅक आयबीज, ग्लॉरी आयबीज, रुडी शेडलक, कोमडक गार्गणी, युरेशियन विजन, शॉवलर, कॉमन टिलू, स्पॉट बिलडक, गल, रिव्हर टर्न, सेंड पायलर, युरेशियन करलीव, चम्मच हे भारतीय अधिवास असणारे पक्षीही आलेले आहेत. तसेच हिमालयाच्या पर्वत रांगा आणि इतर भागातून जकाना, पर्पल मुरहेन, कॉमन कूट, पर्पल हेरॉन, ग्रे हेरॉन, फ्लॉवर, सँडर्लिंग, किंगफिशर हे पक्षी आणि स्थानिक कारमोंट, लेसर व्हिसलिंग डक, डव्ह,पीजन, लॉन्स टेल, श्राईक, ग्रे श्राईक,लार्क, कॅटल, ड्रॅगो, सॉलोज हे पक्षीही दाखल झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवलेकरांचे लक्ष माघारीकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

कुरघोडीच्या राजकारणाची खासियत असलेल्या येवला शहरात यावेळच्या नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या दृष्टीने गेले पंधरा दिवस वातावरण चांगलेच तापले आहे. आता सर्वांचंच लक्ष लागलंय ते उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवसाकडे. नगराध्यक्षपदाच्या महत्त्वपूर्ण लढतीसाठी कोण-कोण रिंगणात राहणार अन् कुठल्या प्रभागातून कुणाची माघार होणार याकडे येवलेकरांचे लक्ष लागले आहे.

शहकाटशह अन् कुरघोडीच्या राजकारणात माहीर असलेल्या येवला शहरातील राजकारणाचा घोडा आता उमेदवारी अर्ज माघारीच्या निर्णायक वळणावर नेमका कसा ‘टर्न’ घेतो याची शहरवासीयांना मोठी उत्कंठा लागली आहे. अंतर्गत राजकारणाने जवळपास सगळीचं गणिते यावेळच्या पालिका निवडणुकीत एकदमच विस्कळीत झाले आहेत. त्यामुळेच यावेळची येथील पालिकेची निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

‘दोघांची’च माघार

अंतिम दिवस असताना गुरुवारच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात उमेदवारी अर्ज माघारी होतील असे वाटत होते. मात्र प्रभाग क्रमांक-८ मधील अनुसूचित स्त्री राखीव जागेवरील रुपाबाई जावळे व प्रभाग क्रमांक-६ मधील सर्वसाधारण जागेवरील शेख मुश्ताक रियाज या दोघांनीच माघार घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगूर नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत शुक्रवारी (दि.११) रोजी माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
पालिकेच्या इतिहासात प्रथमच शिवसेना, राष्ट्रवादी-काँग्रेस व भाजपा हे आपल्या राष्ट्रीय निवडणूक चिन्हांवर निवडणुकीला सामोरे जात आहे. यामध्ये शिवसेना सर्व १८ जागांवर लढत असून भाजप व काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला वेगवेगळ्या दोन प्रभागात उमेदवार नाही. नगराध्यक्ष पदासाठी असलेल्या निवडणुकीत तिरंगी लढत स्पष्ट असून शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अनिता करंजकर व आघाडीच्या प्रेरणा बलकवडे यांनी घरोघरी जात मतदारांच्या भेटी घेत आहेत. भाजपच्या उमेदवार शोभा भागवत यांनीदेखील भेट देत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकांकडून अडवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी व आपल्याकडील रक्कम डिपॉझिट करण्यासाठी सर्वांनीच बँकांमध्ये धाव घेतली आहे. यामुळे झालेल्या अलोट गर्दीला वैतागत काही खासगी राष्ट्रीयकृत बँकांनी आमच्या बँकेत खाते असेल तरच थांबा, असा पवित्रा घेतला. त्यामुळे गोंधळलेले नागरिक वैतागल्याचे चित्र गुरुवारी बँकांमध्ये पहायला मिळाले.

पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्याचा निर्णयामुळे अनेकांमध्ये गोंधळ उडाला आहे. या नोटा कशापद्धतीने बदलून घ्याव्यात, आपल्याकडील किती रक्कम डिपॉझिट करता येणार आहे असे अनेक प्रश्न त्यांना सतावत आहे. या चिंतेपोटी आपल्याकडील रक्कम लवकरात लवकर बँकेत जमा करून नवीन नोटा बँकांमधून घ्याव्यात, यासाठी अनेकांची घाई चालली आहे. त्यामुळे बँका उघडण्यापूर्वीच बँकांपुढे रांगा लागत असल्याचे चित्र सध्या गुरुवारी सकाळपासून सर्वत्र दिसून आले. ३० डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असतानाही पहिल्याच दिवशी उसळलेल्या गर्दीमुळे बँक कर्मचाऱ्यांचीही पंचाईत झाली. त्यामुळे वैतागलेल्या खासगी बँक कर्मचाऱ्यांनी आमच्या बँकेत तुमचे खाते असेल तरच नोटा बदलून घेण्यासाठी थांबा, असा हुकूमच सोडला. ग्राहकांची याने पंचाईत झाली. अनेकांचे वादही झाले. या गोंधळात पैशाची खरी निकड असलेल्या काही व्यक्ती मात्र नाहक भरडल्या गेल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीपी, डीसी रुलसंदर्भात तक्रार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचा नवीन विकास आराखडा व डीसी रुलसंदर्भात विधानपरिषदेत दिलेल्या आश्वासनाची मुख्यमंत्र्यांनी पूर्ती केली नसल्याने आमदार जयंत जाधव यांनी याबाबत विधानपरिषद सभापतींकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरमध्ये इगतपुरी-नाशिक व सिन्नरचा समावेश करावा, अशी मागणीही त्यांनी सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे केली आहे.

राज्य सरकारने नाशिकचा नवीन विकास आराखडा व डीसी रुल जाहिर करण्यासंदर्भातील आश्वासन नगरविकास राज्यमंत्र्यानी विधानपरिषदेत लक्षवेधीवर दिले होते. ५ एप्रिल रोजी दिलेल्या आश्वासनात एक महिन्याच्या आत हा आराखडा जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला सहा महिने उलटले तरी पूर्तता केली नाही. त्यामुळे आमदार जाधव यांनी विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे विकास आराखडा व डीसी रुलसंदर्भात तक्रार दाखल केली आहे. सभागृहाला दिलेले आश्वासन न पाळल्याने हा हक्कभंग व अवमान असून, विषयांकीत प्रकरणात कारवाई करावी अशी मागणी त्यांनी सभापतींकडे केली. तसेच मुबंई-दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरमध्ये इगतपुरी-नाशिक व सिन्नरचा समावेश करावा, अशी मागणीही केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लव-कुश, मुक्ताईच्या कथेत रंगला नाट्यमहोत्सव

$
0
0

बालनाट्य महोत्सवाचा आज समारोप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘श्री दामोदर प्रॉडक्शन व श्री नाट्य चंद्रशाला बाल रंगभूमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बालनाट्य महोत्सवाचा तिसरा दिवस गुरुवारी पार पडला. ‘लव-कुश’, ‘ज्ञानेश्वराची मुक्ताई’ ही दोन नाटकं यावेळी सादर करण्यात आली. कालिदास कलामंदिरात या चार दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, आज (दि. ११) नाट्यमहोत्सवाचा समारोप होणार आहे.

रामायण व महाभारताच्या कथा सर्वांनाच आवडतात. रामायणातील लवकुश हा भाग ‘लव-कुश’ या हिंदी दीर्घांकात या वेळी सादर करण्यात आला. रामाचा व सीतेचा जीवनप्रवास, त्यांना घडलेला वनवास, लव-कुशचा जन्म तसेच या दोघांनी अश्वमेध यज्ञाचा घोडा अडवल्यानंतर झालेले युद्ध, यानंतर रामसीतेची भेट, सीता धरणीमातेच्या पोटात जाणे व लव-कुश रामाबरोबर अयोध्येला परतण्याचे प्रसंग या नाटकात मांडण्यात आले. ओम पवार व नीतिश फुलंब्रीकर यांनी लव व कुश यांच्या भूमिका नाटकात बजावल्या. तर यश शर्मा, यश हिरे, मैथिली वाघ, आदित्य वराडे, वेदांत खैरनार, वृषिता घरटे, अमिषा डावरे, मोहक शहा, वेदांत विसपुते, अनुराग पाटील यांच्याही वेगवेगळ्या भूमिका या नाटकात होत्या.

‘ज्ञानेश्वरांची पुण्याई’ हे दुसरे नाटक या वेळी सादर करण्यात आले. मुक्ताईचे जीवनकार्य किती महान होते या नाटकातून मांडण्यात आले. मुक्ता वयाने लहान पण आई-वडिलांनी देहत्याग केल्यानंतर ती या भावंडांची आई झाली. समाजावर रागावलेल्या ज्ञानेश्वरांची तिने समजूत काढली. चांगदेवांनाही तिने आपल्या ज्ञानाने लज्जित केले. तिच्या ज्ञानाने प्रभावित होऊन चांगदेवांनीही तिला आपले गुरू मानले. या नाटकात ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले, आपल्या पाठीवर अग्नी प्रज्वलित केला, भिंत चालवली हे प्रसंग अत्यंत सुरेख नाटकात मांडण्यात आले. तसेच चांगदेवांची भेट, ज्ञानेश्वरांच्या समाधीचा प्रसंग, मुक्ताईचा अखेरचा प्रवास आदी प्रसंगांनी प्रेक्षकही भारावले.

मुक्ताईच्या महान कार्याने ती केवळ तिच्या भावंडांचीच नाही, तर सर्वांची मुक्ताई झाली, असा संदेशही यावेळी देण्यात आला. सई भालेराव, यश हिरे, सारंग कुमठेकर, मोहक शहा, अनुराग पाटील, यश शर्मा, सोहन जोशी यांच्या भूमिका या नाटकात होत्या. दोन्ही नाटकांचे लेखन व दिग्दर्शन डॉ. प्रशांत वाघ यांनी, सूत्रधार कुमुद कोठारकर तर निखिल नरोडे व सुयोग देशपांडे यांनी नेपथ्य व प्रकाशयोजना सांभाळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम परवानगी धोरणात बदल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगीबाबत अवलंबली जाणार जुनी पद्धत आता एक डिसेंबरपासून बंद होणार आहे. राज्यातील अन्य महापालिकांप्रमाणेच नाशिकमध्येही आता बांधकाम परवानगी देण्याची पद्धत अवलंबली जाणार आहे.

बांधकाम परवानगी संदर्भात आता ऑफीस कॉपी (ओसी) नव्हे तर फर्स्ट कॉपी (एफसी) अंतिम मानली जाणार आहे. तसेच नगररचना विभागात बांधकाम परवानग्यांबाबत आर्किटेक्टकडून होणारा हस्तक्षेप व हितसंबध एक डिसेंबरपासून थांबणार असून थेट अर्जदाराशीच नगररचना विभाग कागदोपत्री संपर्क करणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली आहे.बांधकाम परवानगीचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर नगररचना विभागाकडून ऑफीस कॉपी अर्जदारास दिली जाते. या कॉपीच्या आधारावर व्यावसायिक बांधकामाला सुरुवात करतो. त्यामुळे टीडीआरसारखे घोळ तयार होतात. तसेच ही पद्धतच पूर्णत: चुकीची असल्यानेच आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी पद्धत बदलवण्याचा निर्णय घेतला आहे. नगररचना विभागात बांधकाम परवानगीसदर्भात ऑफीस कॉपी जमा केल्यानंतर त्याच्यातील अटीशर्तींची पूर्तता अर्जदाराला करावी लागणार आहे. त्यानंतरच फर्स्ट कॉपी दिली जाईल.

हस्तक्षेप टळणार

बांधकाम परवानग्यांबाबतच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता आता आर्किटेक्टमार्फत केली जात होती. आर्किटेक्ट व नगररचना विभागातील अधिकाऱ्यांची या निमित्ताने चांगलीच गट्टी जमली होती. त्यामुळे केवळ ओसीवरच परवानगींंचे काम सुरू होते. परंतु आता कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी थेट मूळ अर्जदाराशीच कागदोपत्री व्यवहार करणार असल्याने नगररचना विभागात आर्किटेक्ट यांचा होणारा हस्तक्षेप व लागेबांधे टळणार आहे.

२५० प्रकरणे अडचणीत

राज्य सरकारने २८ जानेवारी २०१६ ला नवे टीडीआर धोरण आणले. परंतु यापूर्वी दाखल प्रकरणे मात्र नियमांच्या कचाट्यात सापडली होती. महापालिकेत अशी अडीचशे प्रकरणे टीडीआरमुळे मंजूरीसाठी अडकली आहेत. यासाठी सरकारकडून टीडीआर धोरणापूर्वी संबंधित अर्जदाराकडे नोंदणीकृत टीडीआर असेल तर त्याला परवानगी द्यावी, अशी सूचना करण्यात आली. परंतु नगररचनाकडे दाखल असलेल्या अडीचशे अर्जदारांकडे मात्र नोंदणीकृत टीडीआर नसल्याने आयुक्तांनी ही प्रकरणे पुन्हा राज्य सरकारकडे मार्गदर्शनासाठी पाठवली आहे. त्यामुळे ही प्रकरणे अडचणीत सापडली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपसमोर सेनेचे आव्हान

$
0
0

सिन्नरला काँग्रेस, राष्ट्रवादी व माकप यांची युती; मनसेही डोकेदुखी

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर नगर पालिकेच्या निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास एक दिवस बाकी असताना ही निवडणूक बहुरंगी होत आहे. भाजप, शिवसेना समोरासमोर ठाकले असून त्यांच्यासमोर काँग्रेस, राष्ट्रवादी व माकप यांची युती, तर मनसेनेे काहीठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. काही ठिकाणी अपक्ष उमेदवार असल्याने या निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.

सध्या नगरपालिकेत माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची सत्ता असून ती राखण्यासाठी त्यांची व्यूहरचना सुरू केली आहे. त्यांच्यासमोर शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी आव्हान उभे केले आहे. जिल्ह्यात सर्वात जुनी असलेल्या व शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या या निवडणुकीत सत्ता कोण स्थापन करतो याकडे सिन्नरकरांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असल्याने या पदासाठी उमेदवार शोधण्याचे मोठे काम सर्वच पक्षांना करावे लागले. भाजपतर्फे कोकाटे यांचे विश्वासू सहकारी माजी नगरसेवक अशोक मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेतर्फे उच्चशिक्षित चेहरा किरण डगळे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस आघाडीतर्फे विद्यमान नगरसेविका लता हिले यांना उमेदवारी दिली. मनसेतर्फे राजेंद्र बोरसे या नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली. तर अपक्ष म्हणून वसंतबाबा नाईक यांनी उमेदवारी केली आहे.

सटाण्यात प्रचारास प्रारंभ

सटाणा : नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारीचा आज अखेरचा दिवस आहे. आज दुपारी ३ वाजेनंतर उमेदवारीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान विविध पक्षांकडून प्रचार सुरू झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुशाल भरा पाचशे, हजाराच्या नोटा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने हजार व पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्या असल्या तरी घरपट्टी व पाणीपट्टीसह विविध करांचा भरणा करण्यासाठी या नोटा चलनात आणण्याची शेवटची संधी उपलब्ध झाली आहे. राज्य सरकारच्या आदेशानंतर महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टीसाठी जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून, शुक्रवारी (ता.११) रात्री बारा वाजेपर्यंत या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. यासाठी महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी कॅश काऊंटर वाढविले आहेत.

पाचशे व हजाराच्या नोटांसंदर्भात स्पष्ट निर्देश नसल्याने महापालिकेने पाणीपट्टी, घरपट्टी व इतर मालमत्ता करांचा या नोटांद्वारेचा भरणा बंद केला होता. केवळ ऑनलाइन तसेच शंभरच्या नोटांचाच भरणा असल्यास वसुली केली जात होती. परंतु, राज्य सरकारने गुरूवारी घरपट्टी, पाणीपट्टी व वीज देयकासाठी पाचशे व हजारच्या नोटा स्वीकारण्याचे स्पष्ट आदेश दिले. त्यानंतर नाशिक महापालिकेने तातडीने दुपारनंतर या नोटा स्वीकारण्याची तयारी दर्शवत, नागरिकांना आवाहन केले. शुक्रवारी रात्री बारावाजेपर्यंत घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली स्वीकारली जाणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी सात वाजेपासून घरपट्टी व पाणीपट्टीचा करभरणा स्वीकारला जाणार आहे. मार्च २०१७ पर्यंतचा भरणा नागरिक पाचशे व हजाराच्या नोटाद्वारे करू शकणार आहेत. नागरिकांसाठी अतिरिक्त कॅश काऊंटर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आज महापालिकेवर लक्ष्मीची बरसात होण्याची शक्यता आहे.

थकबाकीही भरता येणार

महापालिकेने नोव्हेंबर महिन्यापर्यंत डिमांड केलेली रक्कम मालमत्ताधारकांना भरता येणार आहे. वादग्रस्त मालमत्तांचाही कर विनाअट भरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. चालू आर्थिक वर्षापर्यंतचा एकत्रित करभरणा नागरिकांना करता येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. परंतु, दोन आदेशांची स्पष्टता न झाल्याने पालिकेचेही नुकसान झाले आहे.

तणावातही बँका खुश!

पाचशे व हजाराच्या नोटा रद्द केल्याने काळा पैसा बाळगणाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसला असला तरी थकीत कर्ज असलेल्या बँकांना फायदा होतो आहे. वसुलीसाठी वारंवार मागणी करूनही पैसे न भरणाऱ्या कर्जदारांनी गुरुवारी बँकेत स्वतःहून कर्ज भरून आपले कर्ज कमी केल्याने बँकेची चांगलीच वसुली झाली आहे. नोटा डिपाझिट करतांना येणाऱ्याअडचणीपेक्षा बहुतांश कर्जदारांनी बँकेतील थकीत रक्कम भरणे पसंत केल्याने कामाच्या तणावाखाली असणाऱ्या बँकांनाही सुखद धक्का बसला. या वसुलीसाठी काही बँकांनी थकबाकीरादारांना स्वतःहून फोन केले, तर काहींनी न सांगताच पैसे भरले. राष्ट्रीयकृत बँक, खासगी बँकांबरोबरच सहकारी बँका व पतसंस्थांनाही याचा मोठा फायदा झाला. काहींनी पूर्ण रक्कम भरली, तर काहींनी आपली थकबाकी कमी केली. नेमकी किती कर्जवसुली झाली याचा आकडा गुरुवारी पुढे आला नसला तरी ५० दिवसांत ही मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू ठेवून कर्जाची रक्कम वसूल करण्याची योजना बँकेने आखली आहे. नोटा बदलून देणे व डिपॉझिट करण्याचा ताण जरी बँकेवर असला तरी वसुलीसाठी स्पेशल कर्मचाऱ्यांची टीम तयार करून या संधीचा फायदा घेण्याचा बँकेने निर्णय घेतला आहे. त्यामुळे एनपीअेत आलेल्या बँकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. पतसंस्थांवर इतर बँकांसारखा ताण नाही. त्यामुळे त्यांनी सुध्दा ही संधी कॅश करण्यासाठी विशेष मोहीम आखली आहे.


ज्येष्ठ नागरिकांची परवड

बँकांमध्ये पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांच्या नोटा परत‌ करण्यासाठी नागरिकांनी बँकांमध्ये गर्दी केली. त्यामध्ये महिला, तरुणांप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात होती. बँकेबाहेर शंभर मीटरपर्यंत रांगा गेल्या. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक होते. एरवी वयाचा विचार करता ज्येष्ठांना स्वतंत्र खिडकी किंवा सुविधा उपलब्ध करून दिली जाते. मात्र, बँकांकडून गुरुवारी अशी कोणतीही काळजी घेण्यात आली नाही. काही राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कूपन दिले जाते. मात्र, गुरुवारी बँक ग्राहकांनी गर्दी केल्याने ज्येष्ठांच्या असुविधांकडे कुणीही लक्ष दिले नाही. तासनतास रांगेत उभे रहावे लागल्याने ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड चिडचिड झाली. काही जणांना रांगे उभे राहणे शक्य नसल्याने त्यांनी जागीच बैठक मारली. ज्येष्ठांची परवड होणार नाही, अशी मागणी या निमित्ताने अन्य बँक ग्राहकांनीही केली आहे.

अन् मिळाली दोन हजाराची नोट

पाचशे व हजाराच्या नोटा रद्द झाल्यामुळे अनेकांना मनस्ताप व त्रास झाला असला तरी काहींनी नोटा बदलून त्याचा आनंदही साजरा केला.नाशिकमध्ये त्र्यंबकरोडच्या अॅक्सिस बँकेच्या शाखेत ईश्वर निकम यांनी नोटाच्या बंडलमधील पहिल्या दोन नोटा मिळाल्यामुळे त्यांनी हा आनंद सर्वांसोबत शेअर केला. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्याभोवती माध्यमापासून पोलिसांनीही गराडा टाकला होता. गुरूवारी (दि. १०) सकाळी ९ वाजता बँकेचे कामकाज सुरू झाले व अवघ्या अर्धा तासात त्यांना ५०० रुपयाच्या आठ नोटांच्या बदल्यात दोन हजाराच्या दोन नोटा त्यांना मिळाल्या. या नव्या नोटावर क्रमांक ६ ए एच ७७२००१ व ७७२००२ असा होता. बंडलमधल्या या पहिल्या नोटा असल्यामुळे त्यांनी हे पैसे खर्च न करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण या ऐतिहासिक क्षण मी आयुष्यभर जपून ठेवेल, असेही त्यांनी सांगून आनंद शेअर केला. या वेळी अनेक पोलिसांनी नोटांबरोबर फोटो काढला तर काहींनी निकम यांचा फोटाे नोटांसह काढला. या नोटा बघण्याची उत्सुकता अनेकांना असल्यामुळे कुतूहलही समोर आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारी बँकांना पैसे मिळण्याची आस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
कोणत्याही सहकारी बँकेस राष्ट्रीयीकृत बँकांच्या करन्सी चेस्टमधून रोख रक्कम उपलब्ध करून न दिल्याने संतापलेल्या सहकारी बँकांच्या पदाधिकाऱ्यांना दिलासा देत शुक्रवारी सर्व बँकांना पैसे देण्याचे निर्देश लीड बँकेने दिले.
गुरुवारी सामान्य ग्राहकांसारखेच १० हजार रुपये बँकांनी काढावे असे राष्ट्रीयीकृत बँकांनी सांगितल्यानंतर नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनने पुणे येथील सहकार आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी निवेदन देऊन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर लीड बँकेचे व्यवस्थापक अशोक चव्हाण व इतर बँकांच्या अधिकाऱ्यांनी सहकारी बँकांना पैसे देण्याचे निर्देश दिलेत.
नाशिक जिल्ह्यात ४४ सहकारी बँका असून, त्यात नाशिक जिल्हा मर्चंट बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तीनशेहून अधिक शाखांचा समावेश आहे. इतर बँकांच्याही शंभरहून अधिक शाखा आहेत. त्यामुळे या बँकांनी शुक्रवारपासून ग्राहकांना पैसे उपलब्ध करून दिले नाही, तर प्रत्येक शाखेमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरी सहकारी बँकांना आवश्यक ती रक्कम तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यामुळे या तक्रारीची दखल घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सर्व बँका व सहकारी बँकांच्या पदाधिकाऱ्यांचे प्रश्न समजून घेत त्यात मार्ग काढण्याचे सांगितल्यानंतर बँकांनी वरिष्ठांशी चर्चा करुन पैसे देण्याचे मान्य केले. यावेळी भास्करराव कोठावदे, माधवराव पाटील, विश्वास ठाकूर, दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, डॉ. शशीताई अहिरे, शरद कोशिरे, अशोक झंवर, अशोक व्यवहारे, अशोक चोरड‌िया आदी उपस्थित होते.

पतसंस्थांनाही पैसे द्या!

जिल्ह्यातील सहकारी बँकांना पैसे दिल्यानंतर पतसंस्था असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष भास्करराव कोठावदे यांनी पतसंस्थांना आठवड्यातून पाच लाख रुपये द्यावे अशी मागणी जिल्हा निबंधक व सहकार आयुक्तांकडे केली. जिल्ह्यात ७००हून अधिक पतसंस्था असून, त्यात ग्राहकांच्या मोठ्या प्रमाणात अल्पबचत व ठेवी आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा मिळावा यासाठी आम्ही पाठपुरावा करणार असल्याचेही कोठावदे यांनी सांगितले. जिल्हा सहकारी बँक असोसिएशन व पतसंस्था फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अशी दोन्ही पदे कोठावदे यांच्याकडे आहेत. त्यांची एक मागणी मान्य झाली असून, दुसऱ्या मागणीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटा नकाराने घसरला एलआयसीचा भरणा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सर्वच सरकारी कार्यालयांना पाचशे व हजाराच्या नोटा घेण्याची परवानगी दिली असली, तरी इन्शुरन्स कंपनीला ती न दिल्यामुळे या कंपनीचा रोख भरणा ७० टक्के घसरला. जिल्ह्यात सर्वाधीक ग्राहक हे लाईफ इन्शुरन्स कंपनीचे असून या कंपनीत दररोज ३५ लाखाचा भरणा होतो. तर विभागात तो एक कोटी ६० लाख रुपये होतो. त्यामुळे यात मोठी घट झाली.
नाशिक विभागात नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे या रोखीचा फटका सर्वच ठिकाणी बसला. चेकने भरणा सुरू होता पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. इन्शुरन्स कंपनीचे हप्ते भरा, असे एजंटचे फोन येणाऱ्या ग्राहकांनाही या नोटा रद्द झाल्याचा थोडासा दिलासा मिळाला. नाशिकमध्ये या एलआयसीच्या पाच शाखा आहेत, तर मालेगाव, पिंपळगाव बसवंत व मनमाड येथे तीन शाखा आहेत. त्यामुळे या शाखांतही कॅशचा भरणा कमी झाला. पाचशे व हजारांच्या नोटा भरण्याला परवानगी दिली असती तर अनेकांनी नवीन पॉल‌िसी काढत त्यात पैसे भरले असते. त्यामुळेच सरकारने असा निर्णय घेतला असावा असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या भरण्यामध्ये झालेली ही घट मात्र पुढे भरुन निघणार आहे. केवळ या काळात ती कमी झाली असली तरी पैसे उपलब्ध झाल्यानंतर ग्राहक ती भरणारच आहेत. केवळ या निर्णयामुळे दोन दिवस कॅशचा व्यवहार ठप्प झाला तरीसुध्दा ३० टक्के कॅश जमा झाली आहे.
जनरल इन्शुरन्स सुरळीत
जनरल इन्शुरन्समध्ये बहुतांश भरणा हा चेकने असल्यामुळे त्यांना या निर्णयाचा फारसा फरक पडला नाही. वाहन, मालमत्ता व इतर गोष्टींसाठी ग्राहाकंकडून मोठ्या प्रमाणात जनरल इन्शुरन्स
केला जातो. त्यामुळे हे पैसै चेकनेच भरले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता तुलसीविवाहही होणार साधेपणाने!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी तुलसी विवाहाच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्याची योजना आखली होती. परंतु, केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे इच्छुकांच्या प्रयत्नांवर काही प्रमाणात विरजन पडले आहे. हाती पैसा असूनही तो खर्च करता येणे शक्य नसल्याने तुलसी विवाहांमधील रंगत यावर्षी गायब होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विद्यमान नगरसेवकांकडून साध्या पद्धतीने विवाह सोहळे आयोजित करण्यावर भर दिला आहे.
महापालिका निवडणुका फेब्रुवारीत होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून तुलसी विवाहांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले होते. तुलसी विवाहाच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करून मतदारांना आकर्षित करण्याचे नियोजन अनेक इच्छुकांनी केले होते. त्यासाठी लकी ड्रॉ, कीर्तनांसह विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यासाठी मोठा खर्च करण्याची तयारी करत, नोटांची जमवाजमव इच्छुकांनी केली होती. परंतु आता पाचशे व हजारच्या नोटा चलनातून बाद झाल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या या कार्यक्रमांवर विरजन पडले आहे. हाती पाचशे व हजारांच्या नोटा असूनही त्या खर्च करता येणे अवघड आहे. तर बँकेतून नोटा बदलून मिळण्यावर मर्यादा आल्या असल्याने खर्चाची पंचाईत झाली आहे. त्यामुळे या विवाहांवरच आता मर्यादा आल्या असून, साधेपणाने ते साजरे केले जाण्याची शक्यता आहे. प्रभागांत मोठ्या प्रमाणावर तुलसी विवाह आयोजित करून मतदारांचे लक्ष वेधून घेण्याच्या इच्छुकांच्या प्रयत्नांवर या निर्णयाने काहीअंशी पाणी फेरले आहे. दुसरीकडे नगरसेवकांनी मात्र साध्या पद्धतीने विवाह सोहळे आयोजित करण्यावर भर दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>