Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पालिकेला दोन दिवसांत बारा कोटींची लॉटरी

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हजार-पाचशेच्या नोटा चलनातून बाद झाल्या असल्या, तरी कर भरण्यासाठी या जुन्या नोटांचा पर्याय राज्य सरकारने उपलब्ध करून दिल्याचा नागरिकांनी चांगलाच लाभ घेतला आहे. घरपट्टी व पाणीपट्टीसह विविध करांपोटी दोन दिवसांत पालिकेच्या तिजोरीत तब्बल बारा कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. शुक्रवारी नऊ कोटी ५० लाख, तर शनिवारी दीड कोटीची रक्कम पालिकेच्या तिजोरीत पडल्याने पालिका दोन दिवसांत मालामाल झाली आहे. कर भरण्यासाठी राज्य सरकारने मुदतवाढ केली असली, तरी शनिवारी वसुलीला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र होते.

महापालिकेने विविध करांचा भरणा पाचशे व हजारांच्या नोटांद्वारे स्वीकारण्याचे जाहीर केल्यानंतर शुक्रवारी व शनिवारी महापालिकेवर हजार व पाचशेच्या नोटांचा अक्षरशः पाऊस पडला. शुक्रवारी एका दिवसात पालिकेच्या तिजोरीत घरपट्टी व पाणीपट्टीपोटी नऊ कोटी ५० लाख रुपये जमा झाले आहेत. सरकारने कर भरण्यासाठी जुन्या नोटांची मुदत आणखी तीन दिवस वाढवल्याने महापालिकेने शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस कर स्वीकारण्याची व्यवस्था केली. परंतु, शनिवारी मात्र या वसुलीला थंड प्रतिसाद मिळाला. शुक्रवारच्या मानाने शनिवारी मात्र नागरिकांनी कर भरण्यासाठी गर्दी केली असली, तरी करदात्यांची संख्या रोडावली होती. रविवार व सोमवार असे दोन दिवस त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

शनिवारी दिवसभरात घरपट्टीतून पालिकेला एक कोटी चार लाख रुपये मिळाले, तर पाणीपट्टीतून ३२ लाख रुपये मिळाले आहेत. एमटीएस विभागाला दिवसभरात १९ लाख रुपये मिळाले. पहिल्या दिवशी महापालिकेला ६५ लाख, दुसऱ्या दिवशी साडेनऊ कोटी, तर तिसऱ्या दिवशी दीड कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे अडीच दिवसांत महापालिकेची तब्बल बारा कोटींची कमाई झाली आहे. रविवार व सोमवार असे दोन दिवस अजून वसुली सुरू ठेवण्यात आली असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मंगळवारपासून जप्तीची कारवाई

घरपट्टी व पाणीपट्टीसह विविध करांपोटी दोन दिवसांत पालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडल्याने महापालिका मालामाल झाली आहे. कर भरण्यासाठी राज्य सरकारने मुदतवाढ दिल्याने दोन दिवसांत अाणखी मोठ्या प्रमाणात करभरणा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर येत्या मंगळवार (दि. १५)पासून महापालिकेच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी थकविणाऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. घरपट्टी थकविणाऱ्यांवर मालमत्ता जप्तीची, तर पाणीपट्टी थकविणाऱ्यांवर पाण्याचे कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.


विभागनिहाय स्थिती अशी

विभाग घरपट्टी (रुपये) पाणीपट्टी (रुपये)

सातपूर ७ लाख ६४ हजार ३ लाख ६० हजार

नाशिक पश्चिम १६ लाख ८६ हजार ३ लाख ४३ हजार

नाशिक पूर्व २० लाख १९ हजार ३ लाख ३६ हजार

पंचवटी २२ लाख ६ हजार ७ लाख ४३ हजार

नवीन नाशिक १७ लाख ४१ हजार ९ लाख ८ हजार

नाशिकरोड १७ लाख ३६ हजार ४ लाख ३६ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रचाराच्या रणधुमाळीस प्रारंभ

$
0
0

मनमाडमध्ये भाजप, तर सटाण्यात राष्ट्रवादीची प्रचार रॅली

टीम मटा

जिल्ह्यातील सहा नगरपालिकांसाठी निवडणूक चिन्हांचे वाटप झाले असून, प्रचाराला सुरुवातही झाली आहे. मनमाडमध्ये भाजपने, तर सटाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचार रॅली काढून मतदारांना आपल्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. सिन्नर, येवला, नांदगाव व भगूरमध्येही उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली आहे.

नगरपालिकांच्या पंचवार्षिक निवडणुकीत मनमाड शहरात भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कुसूम अरविंद दराडे यांच्यासह प्रभागातील उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री निलमणी गणेश मंदिरात खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमास माजी आमदार संजय पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, ज्येष्ठ नेते उमाकांत राय, माजी उपनगराध्यक्ष नारायण फुलवाणी, कांतीलाल लुणावत, निळकंठ त्रिभूवन, जिल्हा संघटन सरचिटणीस बापूसाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पवार, जिल्हा चिटणीस नारायण पवार, मनमाड शहर भाजप अध्यक्ष जय फुलवाणी, माजी नगरसेवक सचिन दराडे आदी उपस्थित होते. यानंतर मुख्य रस्त्यावरून रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा फुले, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, क्रांतिवीर वसंतराव नाईक, अण्णाभाऊ साठे आदी मान्यवरांच्या पुतळ्यास खासदारांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. प्रचार रॅलीनंतर प्रभाग सहा व दहामधील उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

माजी आमदार संजय पवार यांनीदेखील भाजप जनतेचा विश्वास नक्की मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. भाजपने थेट नगराध्यक्षासह जनतेची सेवा करणारे स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार दिले आहेत. त्यामुळे भाजप जनतेने दाखविलेल्या विश्वासात खरा उतरेल, असा विश्‍वास जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुट्यांच्या अभावामुळे नागरिक हतबल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सकाळपासूनच बँकांसमोर लागलेल्या रांगा, तासन् तास उभे राहून थकलेले चेहरे, नोटा बदलून घेण्याची, पैसे डिपॉझिट करण्याची घाई अन् नवीन नोटा हातात मिळाल्याचा आनंद, असे चित्र सध्या सर्वत्रच दिसून येत आहे. चलनातील नवीन प्रकारच्या नोटा मिळाल्याने अनेकांच्या आनंदाला पारावार न उरल्याचे चित्रही यानिमित्ताने दिसून आले. परंतु, व्यवहारासाठी सुट्या पैशांचाच अभाव असल्याने या आनंदावर पाणी पडले असून, अनेक जण हतबल झाले आहेत.

काळा पैसा बाहेर काढण्याच्या उद्देशाने पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या असून, दैनंदिन व्यवहारावर त्याचा मोठा प्रमाणात झाला आहे. काही दिवसांपूर्वी या नोटेला असणारे महत्त्व नोटा चलनातून रद्द केल्याच्या निर्णयाने क्षणात घसरले. नोटांचे मूल्य जरी तेच असले तरी व्यवहारासाठी या नोटा पूर्णतः नाकारल्या जात असल्याच्या सत्याला आता सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अगदी किरकोळ वस्तू खरेदी करण्यासाठी अनेकांचे हात बांधले गेले आहेत.

अनेकांनी तत्परता दाखवत बँक उघडण्यापूर्वी रांगा लावून नवीन नोटा मिळवल्या. परंतु, बाजारात या नोटा स्वीकारून त्या बदल्यात देण्यासाठी सुटे पैसेच नसल्याने ग्राहक व विक्रेते दोघांमध्ये प्रचंड हतबलता निर्माण झाली आहे. पाचशे किंवा दोन हजार रुपयांच्या नोटेपेक्षा दहा, वीस, पन्नास, शंभर रुपयांच्या नोटाच त्यामुळे मोलाच्या ठरत असून, या नोटांचे मूल्यच सध्या वाढले आहे.

पैशांचा अभाव असला, तरी जीवनावश्यक गरजा भागविणे प्रत्येकासाठीच आवश्यक असते. घरातील कर्त्या व्यक्तीपुढे या गरजा भागविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. किराणा, दूध, औषधे यांचे बिल भरण्यासाठी आवश्यक पैसे नसल्याने उधारीतील व्यवहार वाढत आहेत. आवश्यक वस्तू घेऊन जा, पैसे नंतर द्या, अशी भूमिका परिचयातील दुकानदारांनी घेतली असल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु, अशा उधारीतील व्यवहार यातून वाढतो आहे.

---

देशाच्या व प्रामाणिक देशवासीयांच्या चांगल्या भविष्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. या परिस्थितीत संयम बाळगून काम करणे आवश्यक आहे. सरकारने पुरेसा वेळ आपल्याला दिला आहे, त्यामुळे घाई न करता, घाबरून न जाता या परिस्थितीला सामोरे जावे. हा निर्णय घेणे काळाची गरज असल्याने त्याला सहकार्य करणे गरजेचे आहे.

-डॉ. जयंत ढाके, मानसोपचारतज्ज्ञ

--

नोटांमध्ये बदल हा चांगलाच निर्णय आहे. या निर्णयाला पाठिंबा देत सहकार्य करणे आवश्यक आहे. पूर्वसूचना नसल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला आहे. जी समस्या सध्या जाणवते आहे ती तात्पुरती आहे. हा निर्णय चांगल्या परिणामांसाठीच असल्याने प्रत्येकानी मानसिकदृष्ट्या तयार राहून या परिस्थितीला समोर जावे.

-अपूर्वा जाखडी, स्पेस एज्युकेटर

--

या परिस्थितीला प्रत्येक नागरिकाने शांततेने सामोरे जाण्याची गरज आहे. आज जरी या निर्णयाची समस्या जाणवत असली, तरी यातून उज्जवल भविष्य उजाडणार आहे. लवकरच ही परिस्थिती सुधारेल. राजकीय नेत्यांनी या परिस्थितीत तारतम्य बाळगावे. हा विषय राजकारणात ओढून नागरिकांची दिशाभूल करू नये.

-दिलीप फडके, ग्राहक संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांसाठी झाली पक्षांची दमछाक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने आता खऱ्या अर्थाने रंगतदार सामना शहरवासीयांना बघावयास मिळणार आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी सामना होत असून, प्रभागातील २१ जागांसाठी सुमारे ९२ उमेदवार रिंगणात आहेत. शहरातील सर्वच प्रभागात उमेदवार देत असताना राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षांची दमछाक झाली. भाजप वगळता कुठल्याच पक्षाला सर्व प्रभागात उमेदवार देता आले नाहीत.

सटाणा नगरपरिषदेच्या यंदाच्या या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदामुळे नगरसेवकांचे मूल्य कमी झाल्याचा परिणाम की पालिका राजकारणात आपले काम नाही या भावनेतून अनेक सामाजिक व राजकीय पटलांवर कामे करित असलेल्या धुरिणांनी लांब राहाणे पसंत केल्याने सर्वच पक्षांवर उमेदवार शोधण्याची वेळ येऊन ठेपली होती. थेट नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी सामना होत असून, काँग्रेसने तब्बल महिनाभर अगोदरच अ‍ॅड. विजय पंडितराव पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे. राष्ट्रवादीने विद्ममान गटनेते बाळासाहेब रौंदळ, भाजपने राष्ट्रवादीतून दाखल झालेले माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांना, तर शिवसेनेने युतीचा काडीमोड घेत ऐनवेळी अरविंद सोनवणे यांना रिंगणात उतरविले आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुनील मोरे यांनी सटाणा शहर विकास आघाडी निर्मिती केल्याने पंचरंगी सामना या ठिकाणी रंगणार आहे.

थेट नगराध्यक्षपदासाठी एकूण नऊ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले असताना पाच उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजपचे डॉ. विलास बच्छाव, रमेश देवरे यांनी माघार घेतली, तर राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे यांनादेखील माघार घ्यावी लागली. विद्यमान पाच नगरसेवक या निवडणूक रिंगणात असून, यात राष्ट्रवादीकडून विद्यमान नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण, सुशीला रौंदळ, सुमनबाई सोनवणे, भारत काटके, भाजपकडून गटनेते साहेबराव सोनवणे यांचा समावेश आहे. तर आठ माजी नगरसेवक पुन्हा रिंगणात उतरले असून, यात कांतीलाल चव्हाण, किशोर कदम, दत्तू सोनवणे, रामदास सोनवणे, पांडुरंग सोनवणे, अनिल सोनवणे, कुसुम सोनवणे, विश्वास जोशी यांचा समावेश आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीवरही नामुष्की

शहरातील दहा प्रभागांतील २१ उमेदवार देत असताना भाजप वगळता सर्वच पक्षांना मोठ्या प्रमाणात उमेदवारांची शोधमोहीम राबवावी लागली. काँग्रेसला दहा प्रभागांतून २१ उमेदवार देत असताना अवघे १२ उमेदवार उभे करण्यात यश आले आहे. यामुळे त्यांनादेखील बहुतांश प्रभागात उमेदवार मिळाले नाहीत. राष्ट्रवादीलादेखील २१ पैकी १९ उमेदवार अधिकृत देताना प्रभाग सातमध्ये दोघाही उमेदवारांना पुरस्कृत करावे लागण्याची नामुष्की ओढावली आहे.

शिवसेनेचे ११ उमेदवार रिंगणात
भाजप शिवसेना युतीचा काडीमोड झाल्याने शिवसेनेलादेखील ऐनवेळीस सर्वच जागांवर उमेदवार देताना शोधाशोध करावी लागली. यामुळे शिवसेनेने २१ पैकी अवघे ११ उमेदवार रिंगणात उतरविले असून, एका उमेदवाराला पुरस्कृत करण्यात आले आहे. मात्र भाजपने सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

शहर विकास आघाडीही अपयशी

सटाणा शहर विकास आघाडीचा मोठा गाजावाजा केला जात असताना आघाडीचे निमंत्रक सुनील मोरे यांनादेखील सर्वच प्रभागात उमेदवार देण्यास अपयश आले. शहर विकास आघाडीने सात प्रभागातून १४ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मतदार राष्ट्रवादीच्याच पाठीशी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा नगरपालिकेच्या माध्यमातून सटाणा शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. तब्बल दहा वर्षे पालिकेत स्वच्छ व पारदर्शी कारभार केल्यामुळे सटाणा शहरवासीय सलग तिसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती सत्ता सोपवतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी व्यक्त केला.

सटाणा नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचाराचा नारळ येथील देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिरात वाढविण्यात आला. त्या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पगार बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार दीपिका चव्हाण होत्या. अ‍ॅड. पगार पुढे म्हणाले की, सटाणा शहरातील रस्ते, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा अत्यंत सुयोग्य पद्धतीने पालिका प्रशासनाने सोडविल्या आहेत. हे सर्वसामान्य जनतेला जाणीव आहे. यामुळे काका रौंदळ यांच्यासह सर्व उमेदवारांना शहरवासीय विजयी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार दीपिका चव्हाण यांनी सटाणा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करीत गत दोन वर्षांच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपये विकास निधी पालिका प्रशासनाला मिळवून देत विकासकामांना चालना दिल्याचे सांगितले.

याप्रसंगी माजी आमदार संजय चव्हाण, नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाळासाहेब रौंदळ, तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, शेतकरी नेते जिभाऊ सोनवणे यांची भाषणे झाली. डॉ. व्ही. के. येवलकर, पईम शेख, जनार्दन सोनवणे, मोहन सोनवणे, शैलेश सूर्यवंशी, सुलोचना चव्हाण, शिवाजी रौंदळ आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी संपूर्ण शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचार रॅली काढण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडमध्ये सेनेचा स्वबळाचा नारा

$
0
0

निफाड तालुुका सेनेच्या बैठकीतील सूर

म. टा. वृत्तसेवा, निफाड

भाजप हा धोकेबाज पक्ष असून, आपली ताकद दाखवून देण्याची आता संधी आली आहे. ग्रामीण भागातील जनताही शिवसेनेला मतदान करण्याची वाट पाहत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भाजपशी युती करू नये, असा सूर निफाड येथे आयोजित शिवसेनेच्या बैठकीत दिसून आला. विशेष म्हणजे संपर्कप्रमुख सुहास सावंत यांनीही राज्यात काहीही होवो, आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कार्यकर्त्यांच्या भावना कळवून नाशिक जिल्ह्यात स्वबळावर लढण्यासाठी आग्रह धरणार असल्याचे सांगितले.

आमदार अनिल कदम यांनी निफाड तालुक्यात होत असलेल्या विकासकामांचे भूमिपूजन आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निफाड तालुका शिवसेनेची तातडीची बैठक मार्केट कमिटी सभागृहात आयोजित केली होती. त्याप्रसंगी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख सुहास सामंत, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, तालुकाप्रमुख उत्तम गडाख आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात काँग्रेसचे भास्कर बनकर, शेतकरी नेते राजेंद्र डोखळे, बाळासाहेब क्षीरसागर, संदीप टर्ले यांची उपस्थिती चर्चेचा विषय होती.

गेल्या निवडणुकीत सर्वात जास्त सेनेच्या जागा पाच जागा निफाड तालुक्यात निवडून आल्या. पंचायत समितीची सत्ता थोड्या फरकाने गमवावी लागली. त्याची सल अजून असून, या निवडणुकीत पंचायत समितीवर भगवा फडकवण्यासाठी आतापासून तयारी करायची आहे. येत्या काळात होणाऱ्या विविध विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी गटनिहाय मेळावे होणार आहेत. या मेळाव्यात सविस्तर चर्चा होतील, असे आमदार अनिल कदम यांनी सांगितले. संपर्कप्रमुख सुहास सावंत यांनी, तिकीट देताना पक्षनिष्ठा हा निकष राहणार असून, निवडून येण्याची क्षमताही पाहिली जाणार असल्याचे सांगत पक्षात प्रवेश करणाऱ्यांचाही तिकिटासाठी विचार होईल, असे सूतोवाच केले.

मित्रासाठी आलो!

या मेळाव्यात काही कार्यकर्त्यांनी मनोगतातून तिकीट देताना पक्षनिष्ठा आणि काम याचा विचार व्हावा, असे सांगितले. यावेळी राजेंद्र डोखळे व भास्कर बनकर यांनी शिवसेनेच्या तिकिटासाठी आम्ही या व्यासपीठावर आलो नाही, असे स्पष्ट करीत गेल्या दोन निवडणुकांत आम्ही पक्ष बाजूला ठेऊन केवळ मित्र म्हणून आमदार अनिल कदम यांच्यासाठी काम केल्याची कबुली दिली. आमच्या या त्यागाचीही कार्यकर्त्यांनी दखल घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आधार’ने पेटविल्या ‘त्यांच्या’ चुली...

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

केंद्र सरकारने पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर एकीकडे जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची बँकांत गर्दीत होत आहे. दुसरीकडे मात्र काही काळाबाजारींनी झोपडपट्ट्यांतील आधारकार्ड असलेल्या महिला व युवकांना बँकांतून नोटा बदलून आणून देण्याच्या बदल्यात हजारी शंभर ते दोनशे रुपये देण्याचे अामिष दाखवत काही प्रमाणात आपला ब्लॅक मनी सुलभरीत्या बँकेतून बदलून घेतल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला. या प्रकारामुळे केवळ आधारकार्ड असल्यामुळे हातावर पोट असलेल्या अनेकांच्या चुली पेटल्याचे दिसून आले.

चलनातून बाद झालेल्या पाचशे व हजार रुपयांचा नोटा घेत काही काळाबाजारींनी झोपडपट्ट्यांत जाऊन नोटा बँकांतून नोटा बदलून आणून देण्याच्या बदल्यात हजारी शंभर ते दोनशेची रुपयांची ऑफर देत काळ्याचे पांढरे करवून घेतले. केवळ आधारकार्ड व पॅन कार्ड बघून येथे जुन्या नोटा सुलभतेने बदलून दिल्या जात होत्या त्या स्टेट बँक, पोस्ट ऑफीस आदी ठिकाणी अशा काळाबाजारींनी झोपडट्ट्यांतील गोरगरीब महिला-युवकांना नेऊन बदलून आणलेल्या नवीन नोटांच्या बदल्यात त्यांना हजारी शंभर ते दोनशे रुपये दिल्याचे आढळून आले.

नोटा बदलामुळे दोन दिवसांपासून रोजगार बुडून चुलीदेखील पेटल्या नाहीत, अशा काही गरीब महिला व युवक काळाबाजारींच्या अामिषाला बळी पडल्याचे दिसून आले. बेरोजगार युवक आधारकार्डचा वापर जुन्या नोटा बदलून आणून देण्यासाठी तयार झाल्याचे एका युवकाने सांगितले. टॅक्स फ्री असलेली दोन लाखांची रक्कम बँक खात्यात जमा करून हा काळा पैसा व्हाइट करून देण्याचीही ऑफर मिळत आहे, तर बँक खात्यात अथवा बिगर खात्यात आधारकार्डच्या मदतीने नोटा बदलून घेण्याच्या प्रकारांना सुरुवात झाल्याची चर्चा उघडपणे रंगत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

 कामगारवर्ग हवालदिल

$
0
0

टीम मटा, जळगाव/धुळे

पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यानंतरदेखील कामगारांना देण्यात येणारे वेतन हे पाचशे आणि हजारच्या नोटांमध्येच मिळत असल्याने या मिळालेल्या नोटा बदलून घेण्यासाठी कामगारवर्गाची फिराफिर सुरू आहे. चलन बाद करण्याच्या निर्णयानंतर रविवारी, चौथ्या दिवशीदेखील बँकांबाहेर जुने चलन बँकेत भरण्यासाठी आणि चलन बदलून घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत होत्या.

मंगळवारी पाचशे आणि हजाराच्या नोटा बाद केल्यानंतर काळ्या पैशाविरोधात केलेली कृती म्हणून या सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले गेले असले, तरी त्याचे चटके बसायला सुरुवात झालेली आहे. चौथ्या दिवशी राष्ट्रीयीकृत बँकांबाहेर मोठ्या प्रमाणावर खात्यात जुने चलन भरण्यासाठी आणि चलन बदलण्यासाठी रांगा लागलेल्या दिसत होत्या. पीपल्स बँक आणि जळगाव जनता सहकारी बँकेत शंभराच्या नोटा संपल्याने केवळ पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा स्विकारल्या जात होत्या. मोठ्या प्रमाणावर शंभराच्या नोटांना असलेली मागणी आणि अपुरा पुरवठा यामुळे आलेल्या ग्राहकांची मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे सांगितले. एकाच वेळी दहा हजारांपर्यंत रकमा काढता येणार असल्याचे सांगितले गेले असले, तरी अनेक ठिकाणी दोन हजार व एक हजार रुपयेच दिले गेले, अशी तक्रार ऐकायला मिळाली.

भाकरीचे पीठ आणावे लागले उधार

सुभाष पाटील या समतानगरात राहणाऱ्या गवंडीकाम कामगाराने शनिवारी आपल्याला कामाचे पैसे पाचशेच्या नोटांमध्ये मिळाले असून, या नोटा बदलून घेण्यासाठी रांगेत उभा आहे. पण बँकेत शंभराच्या नोटा नसल्याने पैसे मिळालेले नाहीत. आता घरात धान्य कसे भरू म्हणून सवाल केला. पितांबर कारभारी या तांबापुरात राहणाऱ्या कामगाराने आपल्याला शनिवारी कामाचे १५०० रुपये पाचशेच्या नोटात मिळाले असून, या नोटा बदलून शंभराच्या घेण्यासाठी रांगेत उभा असल्याचे सांगितले. पैसे मिळाल्यानंतर उधार घेतलेल्या किराणामालाचे पैसे आता द्यायचे आहे. त्यामुळे रोजगार बुडवून रांगेत उभा असल्याचे सांगितले. लता पांडे या महिलेने आपण एमआयडीसीत एका कारखान्यात कामाला असून, शनिवारी आपल्याला पाच हजार रुपये पगार पाचशेच्या नोटेत मिळाला. या नोटा चालत नसल्याने बदलण्यासाठी रांगेत उभी आहे. काल भाकरीसाठी पीठ उसने आणले. आता पैसे मिळाले की, धान्य आणायचे असल्याचे या महिलेने सांगितले. बहुसंख्य कामगारांनी हातात पैसे नसून ते मिळावे म्हणून रांगेत उभे असल्याचे स्पष्ट केले. रांगेत तासन् तास उभे राहावे लागत असल्याने काहींनी रस्त्यातच कंटाळून बसकण मारली.

कामगारांचा भरणा अधिक

रविवारी बँकेबाहेरील रांगेत कामगारवर्गाचा मोठ्या प्रमाणावर भरणा होता. शनिवारी कामगारवर्गाला आठवड्याचे पेमेंट, काहींना महिन्याचा पगार मिळाला होता. पाचशेच्या नोटा व्यवहारातून बाद केल्या गेल्या असल्या, तरी या कामगारांना पाचशे व हजारच्या नोटा मिळाल्या. या माध्यमातून काळा पैसा बाहेर पडला. हाती आलेल्या पाचशेच्या नोटा बदलून घेण्यासाठी हे कामगार रांगेत उभे होते.

दोन हजाराचे काय करू?

काही बँकांनी केवळ दोन हजार रुपये नागरिकांना बदली चलनात दिले. या नोटादेखील नवीन होत्या. सामान्य नागरिक एकाच ठिकाणी हे दोन हजार रुपये खर्च करू शकत नसल्याने आणि त्याचे सुटे मिळत नसल्याने वैतागलेला दिसत होता. ही नोट बँकेच्या बाहेर आणल्यावर मला या नोटेचे सुटे मिळणार नाही. मी आता याचे काय करू, असा संतप्त सवाल अनेकांनी केला.

शेतकरीवर्गाला चेकपेमेंट

खान्देश जीनप्रेस कारखानदारसंघाची शनिवारी रात्री सभा होऊन त्यात शेतकरीवर्गाला त्यांच्या कापसाचा पैसा चेकच्या माध्यमातून परत करण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला. रोख रक्कम हातात नसल्याने हा निर्णय झाल्याची माहिती कारखानदार संघाचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी मटाशी बोलताना दिली.

प्रश्नांची मालिका संपेना

आदिवासी बहूल असलेल्या नंदुरबार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बँकांसमोर नागरिकांची प्रचंड रांग लागली होती. मजुरांना त्यांची मजुरी हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात मिळत असल्याने या नोटा बदलून घेण्यासाठी त्यांनी गर्दी केल्याचे दिसून आले. रांगेत उभे राहण्यासाठी मात्र, शेतीची कामे सोडावी लागत आहेत. अनेकांचा रोजगारही यामुळे बुडाला. त्यामुळे अनेकांना उद्या आपल्या घरात चूल कशी पेटेल? असा प्रश्न सतावत होता.

शंभराच्या नोटांची प्रतीक्षा

स्टेट बँकेने शंभराच्या नोटांची मागणी रिझर्व्ह बँकेकडे तीन दिवसांपूर्वीच केलेली असली, तरी अद्याप या नोटा आलेल्या नाहीत. दोन ते तीन दिवसांत या नोटा येण्याची शक्यता असली, तरी नक्क्की कधी येणार ते सांगता येणार नसल्याचे स्टेट बँकेकडून सांगण्यात आले. रविवारीदेखील स्टेट बँक, एचडीएफसी, सेंट्रल बँक, देना बँक, बँक ऑफ इंडियाच्या बाहेर नागरिकांची प्रचंड रांग लागलेली होती. सर्व बँकांमध्ये जादा काउंटर नागरिकांच्या सोयीसाठी सुरू होते. शहरात पाचशेच्या बोगस नोटा मिळाल्याने बँकामध्ये मशिनद्वारे नोटा तपासल्या जात होत्या. जळगाव महापालिकेच्या वसुलीत तब्ब्ल ४३ नोटा या बोगस आढळल्या आहेत.

पेट्रोलसाठी नाहीत रांगा

पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्याच्या निर्णयानंतर पुढील दोन दिवस पेट्रोल पंपांवर वाहनांची मोठी गर्दी होत होती. बहुतेक वाहनचालक हे पाचशे व हजारच्याच नोटा देत होते. परंतु, आता ही गर्दी दिसेनासी झाली आहे. त्यामुळे पेट्रोल पंपचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सोमवारबाबत संभ्रम कायम

शनिवार व रविवार बँकांची असलेली सुटी नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून रद्द करून बँका सुरू ठेवण्यात आलेल्या असल्या, तरी आज (दि.१४) सोमवारी बँका बंद राहणार असल्याने नागरिकांचे हाल होणार आहे. नोटा बदलून मिळण्यासाठी मंगळवारपर्यंत वाट पहावी लागणार आहे. नागरिकांच्या हातात चलन नसल्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून आता मोठ्या किराणा दुकानात, मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी येत असलेल्या ग्राहकांची संख्या निम्म्याहून कमी झालेली होती. जे काही येत होते ते डेबिट कार्डचा वापर करताना दिसत होते. पूर्वी फारसा डेबिट कार्डचा वापर होत नव्हता. ग्राहक रोखीने खरेदी करणे पसंत करत. मात्र, आता डेबिट कार्डचा वापर होऊ लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आर्थिक गुन्हे शाखेकडे ‘घरकुल’चा तपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

दोंडाईचा येथील घरकुलांमध्ये अपहार व गैरव्यवहार झाल्याप्रकरणी दि. ११ नोव्हेंबरला दोंडाईचा पोलिसांत माजीमंत्री डॉ. हेमंत देशमुखांसह तत्कालीन तीन नगराध्यक्ष आणि तीन मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आनंद निकम यांच्याकडे देण्यात आला असून, तक्रारदार कृष्णा नगराळे यांनी घरकुलांशी संबंधित सर्व कागदपत्रे पोलिसांनी तातडीने जप्त करून ताब्यात घ्यावीत, अशा आशयाचे पत्र दोंडाईचा पोलिसांना दिले आहे.

तक्रारदार नगराळे यांनी पत्रात म्हटले आहे की, घरकुल घोटाळ्यातील आरोपी हे कागदपत्र गहाळ करून ती जाळून टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे घरकुल प्रकरणातील प्रोसिडींग बुक, बँक खात्यातील घरकुलांसंबंधी कागदपत्रे व महत्त्वाचे मूळ दस्तावेज त्वरित जप्त करण्यात यावे. या प्रकरणी काँग्रेसचे माजीमंत्री डॉ. हेमंत देशमुख, काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. रवींद्र देशमुख, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, गुलाबसिंग सोनवणे यांच्यासह तत्कालीन मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, अमोल बागूल, राहुल वाघ यांच्याविरोधात नगराळे यांनी तक्रार केली आहे. संशयितांनी संगनमताने अपहार, गैरव्यवहार केला, शासनाच्या धोरणाच्या विरूद्ध जाऊन योजना राबविली, निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले, रेल्वेच्या हद्दीत तसेच अमरावती नदीच्या पूनर्वसन क्षेत्रात योजना राबविली, असे आरोप तक्रारीत केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझ्याविरूद्ध डाव आखला; नरसिंग यादव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

रिओ ऑलिम्पिकवेळी माझ्यावर उत्तेजक द्रव्य सेवनाचा गंभीर आरोप झाला. माझ्याविरोधात कोणी तरी आखलेला हा डाव होता, माझ्याशी झालेला हा धोका होता. मी ऑलिम्पिकमध्ये खेळलो असतो, तर देशाला नक्कीच पदक मिळवून दिले असते, असे प्रतिपादन पहिलवान नरसिंग यादव यांनी धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत केले. ते नमो नमो कुस्ती स्पर्धेनिमित्त आले होते.

नरसिंग यादव म्हणाला की, माझ्यावर उत्तेजक द्रव्य सेवनाचे आरोप झाल्यानंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यांना वस्तुस्थिती सांगितली. तसेच माझ्यावर झालेले आरोप मी लागलीच फेटाळ‍ूनदेखील लावले आहेत. सध्या या प्रकरणी सीबीआयमार्फत चौकशी करण्यात येत आहे. प्रशिक्षणादरम्यान देण्यात आलेल्या भोजनात उत्तेजक द्रव्यांचा वापर करण्यात आला असावा, असा संशय नरसिंग यादव यांनी बोलताना व्यक्त केला. कुस्ती क्षेत्रात राज्यातील ग्रामीण भागात एकापेक्षा एक सरस कुस्तीगीर नावारूपाला येत असल्याचा उल्लेख करून नरसिंग यादव म्हणाला की, धुळे हे कुस्तीप्रेमींचे शहर आहे. मीदेखील धुळ्यात अनेक कुस्ती स्पर्धा जिंकल्या आहेत. शहरात कुस्ती स्पर्धा नेहमीच होत राहिल्या, तर अनेक कुस्तीगीर तयार होऊन धुळे शहराचे नाव देशभरात पोहोचल्याशिवाय राहणार नाहीत. मात्र, त्यासाठी कुस्तीची नवनवीन प्रशिक्षण केंद्रे सुरू झाली पाहिजेत, अशी अपेक्षा यादव यांनी व्यक्त केली.
पत्रकार परिषदेला भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी, विजय पाश्चापूरकर, कुस्तीगीर संजय गिरी, गजेंद्र अंपळकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा पाणीप्रश्नाचेच गाजर!

$
0
0

बहुतांश उमेदवारांच्या जाहीरनाम्यात पाणीप्रश्न अग्रभागी

संदीप देशपांडे, मनमाड

पाणीप्रश्न हा आजवर मनमाडमधील कोणत्याही निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा ठरत आला आहे. मनमाड शहरात नळाला सातत्याने १२ ते १५ दिवसांआड पाणी येते. यंदा पाऊस पडल्याने थोडीफार अपवादात्मक स्थिती आहे. मात्र रोज पाणीपुरवठा ही दुरापास्तच गोष्ट आहे. म्हणूनच पाण्यासाठी आसुसलेल्या मनमाडकरांना पुन्हा पाणीप्रश्न सोडविण्याचे गाजर दाखवून मतदानासाठी आवाहन केले जाणार हे उघड आहे. बहुतांश उमेदवारांच्या जाहीरनाम्यात पाणीप्रश्न हाच मुद्दा अग्रभागी असणार आहे.

मनमाड पालिकेच्या १५ प्रभागातील ३१ नगरसेवकपदांसाठी येत्या २७ नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. नगरसेवकपदासाठी तब्बल १६२ उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली असून, थेट नगराध्यक्षपदाचे आठ उमेदवार गृहीत धरले, तर तब्बल ९५ महिला आणि ७५ पुरूष निवडणूक लढवत आहेत. वर्षानुवर्षे प्रत्येक निवडणुकीत पाण्यासाठी मतदान करणारे सोशिक मनमाडकर पुन्हा नव्याने त्याच आश्वासनांच्या पाठी जाणार व सरेल अंधार, येईल प्रकाश अशी खूणगाठ बांधत आपला लोकशाही हक्क बजावणार असेच चित्र आहे.

सर्व पक्षांची मांदियाळी

१५ प्रभागांच्या ३१ नगरसेवकपदांसाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षात कमालीची चुरस आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडीची बिघाडी झाली आणि सेना-भाजप युतीचीही घडी विस्कटली. त्यामुळे सर्वच पक्ष स्वतंत्ररित्या लढत असल्याने सद्यस्थितीत तरी निवडणूक अंदाज वर्तवणे अवघड झाले आहे. भाजप-सेनेचा वेगळा घरोबा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची फारकत यामुळे मनमाडची निवडणूक उत्कंठा वाढविणारी ठरणार आहे. त्यातच पालिका निवडणुकीत अपक्षांची वाढती संख्या ही सर्व प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. अनेक प्रभागात कुठे ५, कुठे ७, तर कुठे तब्बल १० उमेदवार उभे असल्याने राजकीय समीकरणेदेखील बदलली आहेत.

शिवसेनेपुढे बंडखोरांचे आव्हान

शिवसेनेने यंदा पक्षात बाहेरून आलेल्या मंडळींवर जास्त विश्वास ठेवल्याचे तिकीट वाटपावरून दिसते. त्यामुळे काही निष्ठावंतांनी नाराजीचा सूर आवळला. बंडखोरी थोपविण्याचे प्रयत्न सेना पदाधिकाऱ्यांकडून झाले मात्र त्याला पूर्णतः यश आले असे म्हणता येणार नाही. निवडून येण्याची क्षमता हा मुद्दा केंद्रीभूत ठेवून उमेदवारी दिली गेली असे सेनेचे नेते सांगत आहेत, तर निष्ठावंतांना डावलल्याची चर्चा काही ठिकाणी कानी पडत आहे. अशा स्थितीत शिवसेनेचे उमेदवार या निवडणुकीत कसा जनाधार मिळवतात, जनतेला आपल्याकडे कसे आकर्षित करतात हे पाहणे औत्सुक्याचा विषय आहे.

काँग्रेसमध्येही नाराजांचा गट

काँग्रेसमध्येही सर्वच आलबेल आहे, असे म्हणता येणार नाही. नाराजांचा गट इतर पक्षांप्रमाणे इथेही दिसतो. राष्ट्रवादीत असणारी व यापूर्वी विविध पदे भोगणारी मंडळी या निवडणुकीत शिवसेना-भाजप काँग्रेसमध्ये डेरेदाखल आहे. भाजपने थेटसाठी आपल्या पक्षात प्रवेश घेतलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन दराडे यांच्या आई कुसुम दराडे यांना तिकीट दिले आहे. पालिका निवडणुकीत प्रथमच भाजपने जास्तीत जास्त उमेदवार उभे करून लढतीत रंग भरले आहेत.

कम्युनिस्ट, मनसे दिसेना!

कम्युनिस्ट पक्ष, मनसे निवडणुकीत दिसत नाही. मात्र शिवसेनेशी संधान साधत शिवशक्ती भीमशक्तीचा नारा देत रिपाइंने आपले उमेदवार उभे करीत शक्ती पणाला लावली आहे. बहुजन समाज पक्षाचे उमेदवारही उमेदवारांच्या भाऊगर्दीत आपले अस्तित्व दाखविण्याच्या तयारीत आहेत. मनमाडमध्ये दाखल झालेल्या एमआयएमच्या एकमेव उमेदवार निवडणूक लढवित आहेत. मनमाड बचाव कृती समिती, स्वारीपदेखील रिंगणात आहे. अपक्षांची तर बहुतांश प्रभागात रेलचेल आहे. या पार्श्वभूमीवर मनमाड पालिकेची नगरसेवकपदाची निवडणूक रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. कोणाची उमेदवारी कोणाला तारणार? आणि कोणाची उमेदवारी कोणाला मारक ठरणार या गणितावरच सर्व निकाल व भल्याभल्यांचे भवितव्य ठरणार आहे. अपक्षांची वाढती संख्या हीच बहुतांश ठिकाणी निर्णायक ठरेल, असा अंदाज आहे. काही ठिकाणी एकास एक लढती, काही ठिकाणी तिरंगी व चौरंगी, तर बहुतांश ठिकाणी षटरंगी, अष्टरंगी लढती होणार आहेत.

समर्थक झाले विरोधक

मिले सूर मेरा तुम्हारा म्हणत मनमाड पालिकेत गेल्या पंचवार्षिकमध्ये एकत्र नांदणारे आणि पालिकेत विरोधी पक्षच न ठेवणारे विविध राजकीय पक्षांचे कालपर्यंत तुझ्या गळा माझ्या गळा म्हणणारे नगरसेवक आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. सध्यातरी उमेदवार सतराशे साठ आणि अंदाजाची लागणार वाट अशीच परिस्थिती आहे. अपक्ष उमेदवारांची वाढती संख्या, महिला उमेदवारांचे अधिक प्रमाण या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील, असे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटीचा वैतागवार!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचशे व हजाराच्या नोटा रद्द झाल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून बँकांसमोर रांगा हटता हटत नव्हत्या. मात्र, गर्दी कमी होण्याच्या अपेक्षेने बँकांकडे न फिरकणाऱ्या अनेक ग्राहकांनी रविवारच्या सुटीचे औचित्य साधून रांगेत हजेरी लावली. मात्र, त्यांनाही कॅश शॉर्टेजचा फटका बसल्याने मनःस्ताप सहन करावा लागला. एटीएमसमोरही लांबलचक रीघ लागल्याने एकूणच सुटीचा वार वैतागवार ठरला. एकाच दिवसात बँकेत एक हजारहून अधिक डिपॉझिट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, तर बँकेतून नवीन चलनाद्वारे सुमारे २५ कोटींची कॅश एक्स्जेंच, एटीएम व डिपॉझिटमधून पैसे काढण्यात आल्याचे बोलले जात आहे.

नोटा रद्द झाल्यानंतर बँकेत तीन दिवस सतत गर्दी होती. त्यात रविवारी आणखी भर पडली. शनिवारी शासकीय व औैद्योगिक सुटी असल्यामुळेही प्रचंड गर्दी होती, तर रविवारी त्यात आणखी वाढ झाली. विशेष म्हणजे किरकोळ वाद वगळता मोठ्या प्रमाणात गर्दी होऊनही सर्वत्र शांततेत पैसे काढले जात होते.

६० टक्के एटीएम सुरू

दोन दिवसांनंतर ६० टक्के एटीएम सुरू झाल्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. गेले दोन दिवस स्टेट बँकेचे एटीएम सुरू होते. त्यातही या बँकेच्या जेथे शाखा आहेत, तेथेच ते सुरू होते. मात्र, रविवारी बहुतांश बँकांनी एटीएम सुरू केल्यामुळे रविवारची बँकेसमोरची गर्दी काही प्रमाणात कमी झाली. या सर्व एटीएममधून १०० रुपयांच्याच नोटा मिळत होत्या. त्यामुळे ग्राहकांना त्यातून दिलासाच मिळाला.

कॅश शॉर्टेज

एकीकडे मोठ्या प्रमाणात गर्दी असताना दुसरीकडे बँकेत कॅश शॉर्टेज झाल्यामुळे बँकांना ग्राहकांच्या संतापाला सामोरे जावे लागले. पाचशे व हजाराच्या नोटा रद्द झाल्याच्या चौथ्या दिवशी ही गर्दी दुपटीने वाढली. सोमवारी बँका बंद असल्यामुळे त्यात आणखी वाढ झाली. काही बँकांत गर्दीमुळे कॅश संपली, तर काही बँकांत सकाळपासून कॅशच आली नसल्याचे चित्र होते. गेले तीन दिवस कोणत्याही बँकेत कॅश एक्स्जेंचसाठी जाता येत होते. मात्र, काही जण त्याचा गैरवापर करत असल्यामुळे अनेक बँकांनी फक्त खातेदारांनाच बँकेत प्रवेश दिला. मात्र, वादावादी झाली तर इतरांनाही सोडण्यात येत होते. कोणाची तक्रार होणार नाही, ही काळजी त्यामागे होती. अनेक बँकांनी केवळ रविवारी पाचशे व हजारच्या नोटा डिपॉझिट करण्यासाठी सुरूच ठेवल्या. कॅश शॉर्टेज असले तरी ते त्याबाबत फारसे बोलत नव्हते. बँकेची पत जाऊ नये म्हणून काहींनी दुपारी ४ ते ६ या काळात पैसे एक्सचेंज करून मिळतील, असे सांगितले. सावानासमोर असलेल्या बँक ऑफ बडोदातही हाच फंडा वापरण्यात आला.

बँकेसमोर मंडप

रांगेत उभे असलेल्या ग्राहकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सातपूर येथील स्टेट बँकेच्या शाखेत बँकेसमोरच मंडप टाकण्यात आला होता. त्यामुळे ग्राहकांना उन्हाचा त्रास कमी झाला.असाच प्रकार जिल्ह्यात अनेक बँकांनी केला तर काही ठिकाणी पाणी व चहाची व्यवस्थाही करण्यात आली. रविवारची सुटी असल्यामुळे प्रचंड गर्दी होईल, म्हणून अनेकांना बँकेसमोर पहाटेपासूनच रांगा लावल्या. मात्र, बँक शॉर्टेजचा रांगेत उभ्या राहणाऱ्यांना फटका बसला. एटीएमवर पैसे असल्याचे समजल्यानंतर गर्दी वाढली होती.

पेट्रोल भरा पाचशे, हजारचेच!

नाशिक ः मंगळवारी रात्री पाचशे व हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाला आणि लोकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली. शहरातील सगळ्याच पेट्रोलपंपांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली. पेट्रोल भरण्यासाठी रांगाच रांगा लागल्या. मात्र, पेट्रोलपंपचालकांनी सध्या नवा फंडा वापरायला सुरुवात केली आहे. पेट्रोल भरायचे असेल तर पाचशे रुपयांचेच भरा, नाही तर भरूच नका असा पवित्रा पेट्रोलपंपचालकांनी घेतला असून, यात सामान्य नागरिक भरडले जात आहेत. पाचशे आणि हजारच्या नोटा रुग्णालय, पेट्रोलपंप यांसारख्या ठिकाणी वापरण्यास १४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देऊनही पेट्रोलपंपावर पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारण्यास साफ नकार दिला जात आहे. पेट्रोल घ्यायचे तर पाचशेचेच घ्या; अन्यथा घेऊ नका, अशा पेट्रोलपंपचालकांच्या पवित्र्यामुळे सामान्य नागरिक वेठीस धरले जात असून, मजूर, कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मनपाला मिळाले १२ कोटी

महापालिका व इतर सरकारी खात्यांनी ५०० आणि हजारच्या नोटा स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने या संधीचा फायदा घेत अनेक कर थकबाकीदारांनी घरपट्टी, पाणीपट्टी व विविध करांच्या रूपाने थकलेले १२ कोटी रुपये महापालिकेत जमा केले आहे. नोटांच्या बंदीचा फायदा महापालिकेला झाल्याने यंदा महापालिकेला चांगले उत्पन्न मिळेल असे जाणकारांचा अंदाज आहे. विविध स्वरूपाचे कर भरण्यासाठी महापालिकेच्या सहाही विभागांत नागरिकांनी गर्दी केली आहे. रविवारच्या १ कोटी ३७ लाख २५ हजार रुपयांची भर पडली असून, आतापर्यंत १२ कोटी ४३ लाख ७२ हजार वसुली झाली आहे. महापालिकेची करवसुली रविवारी रात्री १२ पर्यत सुरू राहणार आहे.

पोस्टाकडून १.३० कोटी एक्स्चेंज

चलनातील पाचशे व दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा घेण्यासाठी रविवारी शहरातील विविध पोस्ट ऑफिसेसमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. पोस्ट ऑफिसच्या मुख्य कार्यालयात (जीपीओ) सकाळी १० ते १ या अवघ्या तीन तासांच्या कालावधीत ४० लाख रुपयांचे वाटप करण्यात आले, तर विविध भागांमधील ३२ शाखांमध्ये ९१ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. असे एकूण दिवसभरात तब्बल १ कोटी ३० लाख रुपयांचे वाटप पोस्टाकडून रविवारी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीडशे अपक्ष निवडणूक रिंगणात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना‌शिक़38 ना‌शिक़38 ​

निवडणुका म्हटल्यावर उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराजांचा गट हमखास तयार होता. यातूनच बंडखोरी जन्म घेते. यामुळे जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासह व नगरसेवकपदासाठी सुमारे १५० अपक्ष निवडणूक रिंगणात नजीब आजमावत आहेत. यामुळे राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.

नगरपालिका निवडणुकीत यंदा सर्वाधिक अपक्षांची संख्या मनमाडमध्ये आहे. या ठिकाणी सर्वाधिक ५८ अपक्ष नशीब आजमावत आहेत. त्याखालोखाल येवला (४६), नांदगाव (१२), सटाणा (१०), सिन्नर (९) व भगूर (४) या नगरपालिकांचा क्रमांक लागतो. नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी सुमारे १३९ अपक्ष उमेदवार ‌निवडणूक रिंगणात आहेत. यामुळे निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे.

भाजप-सेना युती व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी बहुतांश ठिकाणी होऊ न शकल्याने अपक्षांची संख्या घटली आहे. यामुळे सर्वच पक्ष आमनेसामने ठाकले आहेत. पक्षाने उमेदवारी न दिल्याने तसेच बाहेर आलेल्याला उमेदवारी बहाल केल्याने काही निष्ठावंतांनी बंडखोरी करीत आपल्याच पक्षापुढे आव्हान उभे केले आहे. काही प्रभागांमध्ये उमेदवार न मिळाल्याने राष्ट्रीय पक्षांनी अपक्षांना पुरस्कृत केले आहे. सटाण्यात तर भाजप वगळता एकाही पक्षाला पूर्ण क्षमतेने उमेदवार देता आलेले नाहीत. यामुळे अपक्ष उमेदवार निर्णायक ठरू शकतात.

अपक्षांमुळे पक्षीय उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. तसेच छोट्या-मोठ्या पक्षांनीही स्वतंत्र उमेदवार देत आव्हान निर्माण केले आहे. काही ठिकाणी शहर विकास आघाडी स्थापन करून अपक्षांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात अपक्ष भाव खाऊ लागले आहेत. काही उमेदवारांनी अपक्षांना आपल्याकडे वळविण्याचाही प्रयत्न सुरू केला आहे. हे अपक्ष कोणासाठी डोकेदुखी ठरतील, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

नगरसेवकपदाचे अपक्ष उमेदवार

मनमाड ५८, येवला ४६, नांदगाव १२, सटाणा १०, सिन्नर ९, भगूर ४

नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार

येवला २, मनमाड १, सिन्नर १, नांदगाव १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान करा अन् पाच टक्के सूट मिळवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड शहरात मतदानाची टक्केदारी वाढावी आणि आपल्या हॉटेलकडे निवडणूक काळात लोकांनी आत्कृष्ट व्हावे, यासाठी मनमाडच्या एका हॉटेलवाल्या निवडणूकप्रेमींनी एक फंडा शोधला आहे. निवडणूक मतदान करा, मतदान केल्याची शाईची निशाणी आम्हाला हॉटेलमध्ये येऊन दाखवा आणि आमच्याकडे जेवण करा, होणाऱ्या बिलावर पाच टक्के डिस्काउंट अशी ही लज्जतदार ऑफर आहे. आता जास्तीत जास्त मतदान करून मतदारांनी या ऑफरचा लाभ घ्यावा अशी जाहिरात मनमाडमध्ये होत आहे. देशप्रेम व्हाया आपला व्यवसाय असा हा फंडा मनमाडमध्ये निवडणुकीत प्रथमच वापरला गेला.

पक्ष बदलीवरून पिकला हशा

मनमाड व नांदगावमध्ये आता निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्याचप्रमाणे उमेदवारांची फिरकी घेणे व चर्चेतून एकमेकांना चिमटे काढणे हे सुद्धा सुरू आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात डेरेदाखल झालेल्या एका उमेदवाराला त्याच्या एका मित्राने अरे बाबा निवडणूक होईपर्यंत तरी तू आता नव्या पक्षात राहशील ना!, की आज रात्री इकडच्या पक्षात आणि उद्या पुन्हा स्वगृही तर नाही ना जाणार? असे विचारले तेव्हा मिश्किल असलेला तो उमेदवार तत्परतेने म्हणाला बघू आजचा दिवस पण आता स्वगृही नाही जाणार पण तिसरा एखादा पक्ष नक्की शोधेल वेळ आल्यावर... आणि मग मित्रमंडळीत एकच हशा पिकला.

निशाणीची गंमत

अपक्ष उमेदवारांपैकी काहींना कोणती निशाणी घ्यावी याचा फार घोर लागला होता म्हणे. अपक्षांसाठी कपबशी, सिलिंडरपासून टीव्ही आणि सायकलपर्यंत निशाण्या उपलब्ध होत्या. त्याचा एक मित्र म्हणाला अरे पतंग घे ना निशाणी. त्यावर पटकन त्या उमेदवाराच्या ओठांवर शब्द आले, नको रे भाऊ पतंगीला लई मांजा लागेल आणि मांजा लावूनही पतंग कटली तर? मग काय त्याची त्यालाच निवडून यायची खात्री नाही म्हटल्यावर मित्रांनी काढता पाय घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासासाठी काँग्रेसला साथ द्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

लोकनेते व माजी नगराध्यक्ष स्वर्गीय पंडितराव धर्माजी पाटील यांच्या आदर्श कार्यकाळाची चुणूक शहरवासीयांनी बघितली आहे. त्यांच्या कार्याची जाणीव ठेवूनच काँग्रेसने अ‍ॅड. विजय पंडितराव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे सटाणावासीयांनी विकासासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी केले.

सटाणा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार अ‍ॅड. विजय पाटील यांच्यासह प्रभागातील नगरसेवकांच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ शहराचे ग्रामदैवत श्री यशवंतराव महाराज यांना नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी संपूर्ण शहरातील प्रभागातून मान्यवरांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीची सांगता एका छोटेखानी सभेत करण्यात आली. या प्रसंगी राजाराम पानगव्हाणे म्हणाले, की सटाणा नगरपालिकेच्या कार्यकाळाचे सिंहावलोकन केल्यास माजी नगराध्यक्ष पंडितराव पाटील यांच्या कार्यकाळातील ठोस कामे आजही आहेत. ठेंगोडा नदीतून पाणीपुरवठा योजना, जिजामाता उद्यान, शहरातील भव्य दिव्य अमरधाम ही त्यांच्या कामाची पावती आहे. मात्र त्यांच्या कालखंडानंतर शहरात कोणताही विकास झाला नाही. यामुळे अ‍ॅड. विजय पाटील हे त्यांचा वारसा सुरू ठेवतील, असा आशावाद पानगव्हाणे यांनी व्यक्त केला. तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया यांनी भाजप शासन हे गरीब व शेतकऱ्यांचे नसून, व्यापारी धार्जिणे आहे, असा आरोप केला.

याप्रसंगी पक्षनिरीक्षक डी. जी. पाटील, जि. प. सदस्य यशवंत पाटील, अनिल पाटील, मविप्र संचालक डॉ. तुषार शेवाळे, नारायण खैरनार, सुरेखा खैरनार, पंडित अंबर, संतोष सूर्यवंशी, आण्णा सोनवणे यांची भाषणे झाली. यावेळी नगरसेवकपदाचे उमेदवार शंतनु सोनवणे, किशोर कदम, रोहिणी सोनवणे, रामदास सोनवणे, राहुल पाटील, प्रिती सोनवणे, हेमंत सोनवणे, दिनकर सोनवणे, भिका सोनवणे, दौलत देवरे, रवींद्र पवार, अभिनाना सोनवणे, उत्तरा सोनवणे आदी उपस्थित होते.

पाणीप्रश्न सोडविण्यावर जोर

थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार अ‍ॅड. विजय पाटील यांनीही सटाणा शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यास आपण निश्चित न्याय देऊ, दलित मुस्लिम वस्त्यांची दुर्देशा अत्यंत दयनीय असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या अनेकविध योजना आपण या शहरात विकासासाठी राबवू, असा आशावाद व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पहिल्याच टप्प्यात आरोप-प्रत्यारोप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणूक प्रचाराला प्रारंभ झाला असून, शिवसेना व भाजपच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या प्रचार कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले. प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या असून, पहिल्याच टप्प्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

सिन्नर नगरपरिषदेत माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची सत्ता असून, त्यांनी प्रचाराच्या पहिल्याच दिवशी महत्त्वाच्या लढती असलेल्या प्रभागातील प्रचार कार्यालयांचे उद्घाटन केले. यामध्ये प्रभाग एकमधील माजी नगराध्यक्ष व नगरसेवक विठ्ठल उगले व संगीता बुटे यांच्या कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच प्रभाग दोनमधील उमेदवार संतोष शिंदे व शीतल कानडी, प्रभाग पाचचे उमेदवार संजय चोथवे व निर्मला कमानकर यांच्या कार्यालयांची उद्घाटने केली.

शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांनीही प्रचाराला प्रत्युत्तर देत कार्यालयांची उद्घाटने केली. यामध्ये प्रभाग एकमधील बाळासाहेब उगले, नलिनी गाडे, प्रभाग दोनमधील उमेदवार नामकर्ण आवारे व सारिका कराळे, प्रभाग तीनचे उमेदवार प्रतिभा नरोटे व श्रीकांत जाधव यांच्या कार्यालयांची उद्घाटने केली.पाणीप्रश्नावर भर

माजी आमदार माणिकराव कोकाटे व आमदार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या निवडणुकीत शहराचा पाण्याचा प्रश्न कळीचा मुद्दा झाला असून, कडवा धरणाच्या २४ तास पाणीपुरवठ्याच्या योजनेचे रखडलेले काम यावर दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. योजना अपूर्ण असल्याने त्यावर शिवसेनेकडून कडवी प्रतिक्रिया दिली जात आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेही तयारीत

काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, तसेच अपक्ष उमेदवारांच्या कार्यालयांची उद्घाटने प्रतीक्षेत असून, त्यांच्याही कार्यालयांची उद्घाटने होऊन खऱ्या अर्थाने बहुरंगी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग १२ मध्ये १७ उमेदवार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

पालिकेच्या प्रभाग १२ मधील दोन्ही जागांवर मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात आहेत. या प्रभागातील सर्वसाधारण महिला राखीव जागेवर आठ, तर अनुसूचित जाती राखीव जागेवर सर्वाधिक नऊ उमेदवार नशीब आजमावत आहेत. यामुळे या प्रभागात चुरस वाढली आहे.

येवला नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार, तर १२ प्रभागातील २४ नगरसेवकपदासाठी १०३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग तीनमधील महिला राखीव जागेवर सना गाझी व तहसीन ए. रज्जाक, तर प्रभाग चारमधील महिला राखीव जागेवर नसीमाबानो अन्सारी व साबिया मोमीन यांच्यात ‘दुरंगी’ मुकाबला रंगणार आहे. हे दोन्ही प्रभाग मुस्लिमबहुल मतदारसंख्या असलेले प्रभाग आहेत.

एजाज शेख दुहेरी रिंगणात

काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्षपदाच्या लढतीत रिंगणात उतरलेले शेख एजाज शेख रियाज हे प्रभाग तीनमधील नगरसेवकपदाच्या सर्वसाधारण जागेवरदेखील याच पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, उमेदवारांना शनिवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले. निवडणूक लढविणाऱ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांना यावेळी त्यांच्या पक्षाची अधिकृत निशाणी, तर अपक्ष उमेदवारांपैकी काहींना नारळ, कपाट, करवत, गॅस सिलिंडर, छताचा पंखा, दूरदर्शन संच, काहींना मेनबत्ती, रोलर, कॅमेरा, शिट्टी, विजेचा खांब, कंदील अशा निशाण्या मिळाल्या आहेत.

येवला नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी सहा उमेदवार, तर नगरसेवकपदासाठीच्या १२ प्रभागातील २४ जागांसाठी एकूण १०३ उमेदवार नशीब अजमावत आहेत. उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्याची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी स्वाती थविल, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नरेश बहिरम व पालिका मुख्याधिकारी यांच्या समक्ष पार पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार लिटर रॉकेल पुरणार कसे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दरमहा केवळ चार लिटर रॉकेल मिळत असून, त्याद्वारे महिनाभर चूल कशी पेटवावी अशी चिंता सामान्यांना सतावते आहे.
सरकारकडून मिळणारे रॉकेल हिवाळ्यात अत्यल्प ठरत असून, लोकांना चूल पेटविण्यासाठी डिझेल तसेच लाकडासारख्या इंधनाची मदत घ्यावी लागत आहे. अशा इंधनाचा खर्चही सामान्यांना डोईजड ठरत असून, दरमहा प्रतिमाणशी चार लिटर रॉकेल मिळावे, अशी मागणी होऊ लागली आहे.
सरकार अन्न व पुरवठा विभागाच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालील लोकांना अल्प दरात केरोसिनचा पुरवठा करते. पुर्वी दारीद्रय रेषेखालील लाभार्थींना प्रतिमाणसी तीन लिटर रॉकेल वितरीत केले जात होते. मात्र, एलपीजी गॅस सिलेंडर वापराबाबत आग्रही असणाऱ्या सरकारने केरोसिन वितरणाचे प्रमाण कमी केले. कालांतराने अशा लाभार्थी कुटुंबाला दरमहा १० लिटर रॉकेल दिले जाऊ लागले. आता तर प्रत्येक कुटुंबाला दरमहा अवघे चार लिटर रॉकेल वितरीत होत असून, चूल पेटविण्यासाठी महिनाभर हे रॉकल पुरविणे लाभार्थींसाठी दिव्य ठरते आहे.
एका कुटुंबात वृध्द आई-वडील, मुलगा, त्याची पत्नी आणि त्यांची दोन अपत्ये असे किमान सहा जण असतात. दररोजचा दोन्ही वेळचा स्वयंपाक, पाणी गरम करणे व तत्सम जीवनावश्यक कामांसाठीही हे रॉकेल पुरत नाही. प्रतिव्यक्ती एक लिटर एवढेदेखील रॉकेल मिळत नाही. त्यामुळे अशा कुटुंबांना इंधनासाठी धावाधाव करावी लागते. कधी डिझेलद्वारे तर कधी लाकडांद्वारे चूल पेटविण्याची वेळ अशा कुटुंबांवर आली आहे. हा खर्चही या कुटुंबांना परवडत नाही. छोट्या-मोठ्या रोजगावर उदरनिर्वाह चालविणाऱ्या कुटुंबांना गॅस सिलेंडर घेणेही परवडत नसल्याने दरमहा अधिक रॉकेल द्यावे अशी मागणी लाभार्थींकडून होऊ लागली आहे.
परवानाधारकांना बुरे दिन
अन्न व पुरवठा विभागाकडून केरोसिन परवानाधारकांना विक्रीसाठी रॉकेल वितरीत केले जाते. परवानाधारक हे रॉकेल लाभार्थी कुटुंबांना वितरीत करतात. त्यासाठी त्यांना मिळणारे कमिशनही अत्यल्प आहे. केरोसिन लाभार्थींची संख्या कमी झाल्याने परवानाधारकांना सरकारकडून दरमहा मिळणारा रॉकेलचा कोटाही कमी करण्यात आला आहे. परिणामी काही परवानाधारकांना दरमहा फारतर १०० ते २०० लिटर रॉकल विक्रीसाठी मिळते. त्यामुळे केरोसिन परवानाधारकांना ‘बुरे दिन’चा अनुभव घ्यावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करांचे पैसे भरा, अन्यथा कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरातील अनेक मोठ्या धेंडांनी महापालिकेचा कर भरला नसल्याने अशा करचुकवेगिरी करणाऱ्यांविरुध्द प्रशासनाने कडक पावले उचलली असून, १५ नोव्हेंबरपर्यंत थकबाकी न भरल्यास जप्तीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
महापालिकेच्या सहाही विभागात अनेक मिळकतधारकांची विविध करांच्या रुपाने थकबाकी आहे. वेळोवेळी सूचना देऊनही अनेकांनी ही रक्कम भरलेली नाही. नुकत्याच पाचशे आण‌ि हजारच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतरही महापालिकेने जुन्या नोटा भरण्याची करदात्यांना परवानगी दिली होती. ही संधी साधून अनेक करदात्यांनी मोठ्या प्रमाणात कर भरणा केला आहे. यात वाढ व्हावी यासाठी दोन दिवसांपासून महापालिकेने विशेष मोहीम उघडली असून, रात्री १२ वाजेपर्यंत कर भरण्याची सवलत दिली आहे. जे थकबाकी वेळेच्या मुदतीत कर भरणार नाहीत अशा करदात्यांना जप्तीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. मालमत्ता कर थकबाकीदारांची जप्ती मोहीम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच पाणीपट्टी, थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्याची कारवाईदेखील १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. १४ नोव्हेंबरपर्यंत थकबाकीचा भरणा करून कटू कारवाई टाळावी असे सर्व करदात्यांना महापालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे. मनपाची सर्व भरणा केंद्रे आज (१४) सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुट्या पैशांअभावी फळभाज्या मातीमोल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद ठरविण्यात आल्यानंतर सुट्या पैशांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत होणारे रोखीचे फळभाज्यांचे व्यवहार या अडचणीमुळे ठप्प झालेले आहेत. हे व्यवहार आता मंगळवारपासून (दि. १५) सुरू होण्याची शक्यता आहे. पालेभाज्यांचे लिलाव नियमित सुरू आहेत. या लिलावानंतर पाचशे, हजार रुपयांच्या नोटा शेतकरी स्वीकारत आहेत.
नोटा बंदच्या निर्णयानंतरही बाजार समितीतील व्यवहार सुरू होते. टोमॅटो, डाळिंब, कांदा, बटाटा, मिरची, वालपापडी, गाजर आदींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत आहेत. त्यांनाही सुट्या पैशांच्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. शेतकरी आणि अडतदार हे सामंजस्याने त्यावर उपाय शोधत आहेत.
फळभाज्यांचे लिलाव बंद असल्याने त्यांच्या किरकोळ विक्रीवर भर वाढला आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणाऱ्या फळभाज्या उत्पादकांना याचा मोठा फटका बसला आहे. त्याचप्रमाणे बाजार समितीतील रोजच्या उलाढालही कमी झाली आहे.
दुपारच्या लिलावात कोबी, फ्लॉवर, काकडी, वांगी, कारले आदी फळभाज्यांचे लिलाव होत असतात. त्यास वेलवर्गीय फळभाज्यांचे प्रमाण जास्त आहे. ऐन बहरात आलेल्या या हंगामात या पीक उत्पादकांना फटका बसला आहे. या अगोदर नियमनमुक्तीमुळे व्यापाऱ्यांना पुकारलेल्या संपाच्या काळात शेतकऱ्यांना असाच फटका बसला होता. बाजार सुरळीत होत असल्याचे दिसताच काही ना काही अडथळे येऊन शेतकऱ्यांचेच नुकसान होत असल्याचे भावना शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.
रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडणार
सुटे पैसे नसल्यामुळे गव्हाचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे रब्बी हंगामाच्या बियाणे खरेदी लांबल्याने काही दिवसांसाठी या हंगामाच्या पेरण्या लांबवणीवर पडणार असल्याचे चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>