Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कठीण समय येता, कन्याच कामास येते

$
0
0


डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

लोक कितीही प्रगत झाले, विज्ञानयुगाच्या गप्पा मारत असले आणि कितीही उच्च शिक्षण घेतले, तरी अटीतटीची वेळ येताच समाजाच्या रुढी-परंपरांपुढे मान तुकवावीच लागतेच. तथापि, नाशिकरोड येथील देशमुख समाजातील पुरोगामी विचारांच्या महिलेने कालबाह्य रीतीरिवाज बाजूला ठेवून आईवर अंत्यसंस्कार करण्याचे धारिष्ट्य दाखवले, तसेच दशक्रिया आणि अन्य विधीही स्वतःच करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या नवीन प्रथेचे स्वागत होत आहे.

नयना अविनाश देशमुख ही ती पुरोगामी महिला आहे. त्या नाशिकरोडला राहतात. त्यांच्या मातोश्री शशिकाला भास्करराव पवार (वय ७३) यांचे नुकतेच निधन झाले. शशिकला यांचे परधाडी (ता. नांदगाव) येथे अनेक वर्षांपासून वास्तव्य होते. त्या परधाडीत पोस्टमास्तरही होत्या. त्यांचे पती भास्करराव हे तेथे १५ वर्षे सरपंच होते. त्यांना एक मुलगा आणि नयना देशमुख व ललिता काळे या विवाहित कन्या आहेत.

सुशिक्षित कुटुंब

नयना यांचे पती अविनाश हे महापालिकेत नगरसचिव होते. या दाम्पत्यास तीनही मुलीच आहेत. हे कुटुंब सुशिक्षित आणि प्रगत विचारांचे आहे. नयना यांच्या मावस सासऱ्यांचे निधन झाल्यावर त्यांच्यावर कविता देशमुख या त्यांच्या मुलीने अंत्यसंस्कार केले होते. ते उदाहरण नयना यांनी आपल्यासमोर ठेवले.


धाडसी निर्णय

शशिकला आजारी असल्याने परधाडीहून नाशिकरोडला नयना यांच्याकडे राहण्यासाठी आल्या. चार महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचे निधन झाले, तेव्हा परगावी असलेला मुलगा आला पण, थोड्या वेळाने निघून गेला. अंत्यसंस्कार कोणी करायचे ही गहन समस्या उभी ठाकली. कारण, देशमुख समाजातील महिलांनी स्मशानभूमीत जाण्याची आणि अंत्यसंस्कार करण्याची प्रथाच नाही. मात्र, नयना यांनी प्रिय आईसाठी कालबाह्य रुढी बाजूला ठेवल्या. आईवर अंत्यसंस्कार केले. आता दशक्रिया व अन्य विधीही त्याच करणार आहेत. त्यासाठी त्या गुरुंजीकडे गेल्यावर तेही गोंधळात पडले. मात्र, त्यांनी ज्येष्ठ गुरुजींचा सल्ला घेऊन मार्गदर्शन केले. नंतर नयना यांचे कौतुकही केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकचे ‘डॉन’ फरार...

$
0
0


सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

‘डॉन को पकडना मुश्किल ही नहीं नामुनकीन हैं’, ‘डॉन इन नाशिक’ अशी पोस्टर्स शहरात लावून ‘डॉन’ शहरात येणार असल्याचा प्रचंड गवगवा करण्यात आला होता. ‘डॉन’ कोण असणार, याचाही बराच सस्पेन्स शहरात वाढविण्यात आला होता. त्यानंतर ‘डॉन’ म्हणजे ‘दोस्त ऑफ नाशिक’ असून, शहरातील ट्रॅफिक सुधारणेसाठी हे ‘डॉन’ कार्यरत राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सध्या हे ‘डॉन’ गायब असल्याने त्यासंबंधीची सुरुवातीची चमकोगिरी आणि सध्याच्या हाराकिरीची चर्चा सध्या नाशिककरांमध्ये रंगत आहे.

नाशिक फर्स्ट व पोलिस आयुक्तालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम नाशिककरांसाठी तयार करण्यात आला आहे. मात्र, ज्या पद्धतीने ‘डॉन’ची कन्सेप्ट नाशिककरांसमोर आणण्यात आली, त्या पद्धतीने ती वास्तवात वापरली जात नसल्याचे नाशिककर सांगत आहेत. सध्या अनेक ठिकाणी वाहतुकीचे गैरप्रकार वाढत असून, ट्रॅफिकच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. असे असतानाही शहरातील ‘डॉन’ पुढाकार घेत नसून, कुठे फरार आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.

जून २०१६ पासून कॉलेजेसचे प्राचार्य, निवडक प्राध्यापक व कॉलेजियन्स यांच्या समवेत अनेक मीटिंग्ज घेत ‘डॉन’ ही संकल्पना वेगवेगळ्या पद्धतीने नाशिककरांना सांगण्यात आली होती. त्यानंतर काही पोस्टर शहरात लावून ‘डॉन इन नाशिक’चा गवगवाही करण्यात आला. गेल्याच महिन्यात पोलिस आयुक्त डॉ. रवीद्र सिंघल, ट्रॅफिकचे डीसीपी विजय पाटील, नाशिक फर्स्टचे अभय कुलकर्णी यांनी ‘डॉन’ नेमके कोण असणार आहेत, त्यांचे काम काय, याबाबत माहिती व उपक्रम सर्वांसमोर आणला होता.

ट्रॅफिक व्यवस्थेला शिस्त लागावी यासाठी मोठ्या प्रमाणावर ‘डॉन’चा सस्पेन्स तयार करून नाशिककरांची उत्सुकता वाढवली गेली होती. मात्र, घोषित केलेले ‘डॉन’, तसेच इतर ‘डॉन’ही शहरात कुठेच दिसत नसल्याने नाशिककरांचा सस्पेन्स कमी झाला आहे. ‘डॉन’ नाशिकमध्ये आहे का?, नाशिककरांना प्रोत्साहित करणारे ‘डॉन’ दिसणार तरी कधी, असे सवाल नाशिककर करत आहेत.

शहरातील अनेक भागात होणारी रॅश ड्रायव्हिंग, हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे, ट्रिपल सीट, विनापरवाना व विनाकागदपत्रांची वाहने चालवणे हे प्रकार शहरात वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीतही ‘डॉन’ फरार झाल्याचे जाणवत आहे. ‘डॉन’ ही परिस्थिती सुधारण्यासाठी नेमका पुढाकार घेणार तरी कधी, की डॉन कायमचे फरार झालेत, असा प्रश्न नाशिककर व यूथ विचारत आहेत.


अशी आहे कन्सेप्ट...

शहरातील प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर अशा सुमारे चोवीस व्यक्तींना ‘डॉन’ म्हणून यावेळी घोषित केले गेले. त्यानंतर या ‘डॉन्स’ना, तसेच निवडक कॉलेजियन्स प्रतिनिधी व प्राध्यापकांना ‘मैं हूँ डॉन’ असे स्टिकर्स बाइक्स व वाहनांना लावण्यासाठी दिले होते. हे स्टिकर्स लावल्यावर त्यांनी स्वतः वाहतुकीचे सर्व नियम पाळून इतरांनाही वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी प्रोत्साहित करायचे, अशी ही संकल्पना होती. मात्र, अजूनही शहरातील मुख्य ‘डॉन’मधील काही जणांच्या वाहनांना हे स्टिकर नसल्याचे नाशिककर सांगतात. कॉलेजियन्स प्रतिनिधींना विचारले असता, स्टिकर लावण्यास अजून सांगितले नाही. कॉलेजमध्ये काही सेमिनार घेऊन मग स्टिकर लावायचे आहे, असे सांगितले. अद्याप असा कार्यक्रम कॉलेजमध्ये झाले नाहीत. त्यामुळे याबाबतचा इंटरेस्ट यूथमधून आता कमी होत आहे, अशी प्रतिक्रिया यूथ देत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्चर क्लब सदस्य व्हा अन् फ्री पासेस मिळवा!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे नेहमीच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अशाच कार्यक्रमांची मेजवानी कल्चर क्लबला दोन वर्षे पूर्ण होत असल्याने ‘मटा’ यंदाही घेऊन येत आहे. याची सुरुवात राजस्थानी नृत्याच्या डान्स शोद्वारे सदस्यांना घेता येणार आहे. गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी (दि. २७) सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार असून, कल्चर क्लब सदस्यांना याचे मोफत पास देण्यात येणार आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबअंतर्गत अनेक कार्यक्रम घेण्यात आले. विविध सेमिनार, वर्कशॉप, स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रम आदींचा यामध्ये समावेश होता. या वर्षीही अशाच स्वरूपाचे अनेक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. कल्चर क्लब कार्ड रिन्युअल केलेल्या व जे नव्याने सदस्य होऊ इच्छित आहेत, अशा सर्वांना या कार्यक्रमाचे पास फ्रीमध्ये मिळू शकणार आहेत.

नाशिक जिल्हा अग्रवाल महिला मंडळाच्या वतीने बारादिवसीय राजस्थानी नृत्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. घुमर, गोरबंद, बोजूबंद, कलबेलिया, डांगलिला, खंजिरी, भवाई, आगचारी, फुलचारी, हंसमारी, हरियो रुमाल, ढोलकढी असे राजस्थानी नृत्यातील प्रसिद्ध नृत्यप्रकार या शिबिरात उदयपूर येथील प्रचलित कोरिओग्राफर गुरुमा शंकुतला यांनी शिकवले आहेत. आता या ग्रॅण्ड शोमध्ये या सर्व प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. आजच कल्चर क्लबचे सदस्य व्हा किंवा कार्ड रिन्यू करा आणि या कार्यक्रमांचे सुमारे तीनशे रुपयांचे पास मोफत मिळवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेट टूगेदरची लुटा मजा

कल्चर क्लब सदस्य असणाऱ्यांना २९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या गेट टूगेदरमध्येही मोफत प्रवेश मिळू शकणार आहे. तिडके कॉलनीतील ऋग्वेद मंगल कार्यालयात दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होईल. कल्चर क्लबचे सदस्य होण्यासाठी २९९ रुपयांचा चेक महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भरून कल्चर क्लबची मेंबरशिप मिळविता येणार आहे.



कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub

टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub

टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गिरीश मुदलीयारसह १५ जणांविरुद्ध गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शिखरेवाडीतील बालाजी मंदिराचे अतिक्रमण काढण्यास गेलेल्या महापालिकेच्या पथकाला शिव‌िगाळ करुन धमकी दिल्याप्रकरणी, तसेच सोशल मीड‌ियाद्वारे बदनामीकारक मजकूर व्हायरल केल्याप्रकरणी मंदिराचा विश्वस्त गिरीश मुदलीयार तसेच पंधरा कार्यकर्त्यांविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका उपायुक्त रोहिदास बहिरम यांनी याबाबत तक्रार दिली होती.
तक्रारीचा आशय असा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने बालाजी मंदिर नुकतेच जमीनदोस्त करण्यात आले. बहिरम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. मोहिमेसाठी महापालिकेचे पथक गेले असता गिरीश मुदलीयार, विशाल कुलथे, सुनील उपाध्ये, राजेश मुदलीयार, हेमंत जयस्वाल, महेंद्र आहिरे, महेंद्र बोराडे, दीपक बोडके, सागर चव्हाण, अविनाश चव्हाण, सुखदेव लोंढे, श्रीकांत शाहीर, महेश कुलकर्णी, प्रवीण गोऱ्हाणी, परेश पटेल आदींनी जमाव जमवला. महापालिका अधिकारी व कर्मचारी यांना शिव‌िगाळ करुन धमकी दिली. शासकीय कामकाजात अडथळा आणला. नंदन भास्कर, मयूर दिवे व आकाश कदम यांनी फेसबुक, व्हॉटस अॅपद्वारे महापालिकेविषयी बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. उमेश मराठेला कारागृहात हलविले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा गर्भपात केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ. उमेश मराठेला गुरुवारी जिल्हा रुग्णालयातून नाशिकरोड कारागृहात हलविण्यात आले.
नगरसेवकपुत्र अजिंक्य शिवाजी चुंभळे याने विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने केल्यानंतर पोलिसांनी चुंभळेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या तरुणीचा डॉ. उमेश मराठेने गर्भपात केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मराठे याला कोर्टाने बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, कोठडीत नेत असतानाच प्रकृती बिघडल्याचे कारण दिल्याने मराठेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज प्रकृती सुधारताच त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
खुनाचा तपास संथ
शहरातील महत्वाच्या असलेल्या गंगापूररोडच्या जेहान सर्कलला लागून असलेल्या सिटी बँकेसमोर सुधा दिनकर दफ्तरी या वयोवृद्ध महिलेचा खून झाला होता. यानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या तपासणीवरून गंगापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हाही दाखल केला होता. परंतु तपासाची गती संथ का आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी याकडे लक्ष घालावे, अशी अपेक्षा गंगापूररोडवासियांनी केली आहे.
जेलमध्ये कैद्याचे निधन
नाशिकरोड कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या नागपूर येथील कैद्याचे गुरुवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. नाशिकरोड पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १९८१च्या एपीडीए कायद्याखाली नागपूर येथील अतुल प्रकाश थूल हा नाशिकरोड कारागृहात होता. त्याला गुरुवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्याच्यावर कारागृहात उपचार केले. मात्र, त्याचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर पोलिसांनी आणले स्वाइप मशीन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटांपासून सुटका आणि दोन हजारांच्या नव्या नोटेमुळे होणारी सुट्यांची कटकट या त्रासाला कंटाळून आता वाहतूक पोलिसांनी थेट स्वाइप मशीनच आणले आहे. त्यामुळे वाहनचालकाच्या बँक खात्यातून रक्कम थेट पोलिसांच्या खात्यावर वळती होत आहे. यातून दंडाची रक्कम कमी करण्याची वाहनचालकांची विनंतीही हद्दपार झाली आहे.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर नाशिक शहर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. विविध चौक आणि मुख्य रस्त्यांवर उभे राहणारे वाहतूक पोलिस मोटार वाहन कायद्याच्या उल्लंघनाबाबत वाहनधारकांना दंड करतात. मात्र, केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयाची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय दोन आठवड्यांपूर्वी घेतला. त्यामुळे १०० च्या नोटांचा मोठा तुटवडा चलनात आहे, तर सरकारने २००० रुपयांची नवी नोट चलनात आणली आहे. मात्र, वाहनधारकास दंड आकारल्यास संबंधितांकडून २००० रुपयांची नोट वाहतूक पोलिसांना देऊ केली जात होती. सुट्या पैशांअभावी संबंधित वाहनचालकास सोडून द्यावे लागत होते, तर अनेक वाहनधारक ५०० आणि १००० रुपयाची नोट वाहतूक पोलिसांकडे सोपवत होते. यामुळे वाहनधारक आणि पोलिस यांच्यात वादविवादही होत होते. परिणामी, वाहतूक पोलिसांचा महसूल लक्षणीयरीया घटला आहे. ऑक्टोबर महिन्यात वाहतूक पोलिसांनी १६ हजार १८० वाहनधारकांवर कारवाई केली. म्हणजेच, दिवसाला सरासरी ५२१ वाहनधारकांवर कारवाई केली. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयानंतर वाहतूक पोलिसांनी गेल्या १२ ते १३ दिवसांत सरासरी अवघ्या २५० ते ३०० वाहनधारकांवर कारवाई केली आहे. या साऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता थेट स्वाइप मशीनच आणले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मदतीने १२ स्वाइप मशीन पोलिसांना उपलब्ध झाले आहेत. यासंबंधीचे एक प्रशिक्षणही शहर वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहे.

असे चालते कामकाज

वाहतूक पोलिसांच्या मोबाइलमध्ये Ezetab नावाचे मोबाइल अॅप डाऊनलोड करण्यात आले आहे. ब्लू टूथद्वारे स्वाइप मशीन कनेक्ट होते. वाहनधारकाला दंड करण्यावेळी त्याच्याकडील क्रेडिट कार्ड किंवा एटीएम कार्ड मशीनमध्ये स्वाइप केले जाते. तत्काळ कार्डधारकाला मेसेज येतो, की त्याचा बँक खात्यातून किती पैसे कट झाले आहेत. त्याच वेळी मोटार वाहन कायद्याच्या कुठल्या नियमांतर्गत दंड आकारण्यात आला, त्याचे चलन वाहतूक पोलिस वाहनधारकाला देतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदीचा ग्रंथयात्रेला फटका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराचे सांस्कृतिक संचित जपायचे असेल तर ग्रंथविक्रीला वाव दिला पाहिजे. शहरात बाहेरून ग्रंथ विक्रीसाठी येतील अशी व्यवस्था करून नाशिककर, तसेच पंचक्रोशीतील रसिक ग्रंथ विकत घेण्यासाठी उद्युक्त होतील, असा कार्यक्रम आखला पाहिजे, याच उदात्त हेतूने नोव्हेंबर महिन्यात आयोजित ग्रंथयात्रा नोटाबंदीच्या आदेशाच्या वादळात उधळून गेली आहे.

सांस्कृतिक संचितापेक्षा लोक सध्या पोटापाण्याला प्राधान्य देत असल्याचा परिपाकच यानिमित्ताने सामोर आला आहे. ही ग्रंथयात्रा प्रकाशक व साहित्यिकांच्या सहभागाअभावी स्थगित करण्यात आली आहे.

नाशिक महापालिकेतर्फे २ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत ग्रंथयात्रा आयोजित करण्यात आली होती. या ग्रंथयात्रेचे उद््घाटन सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रस्तावित होते, तर समारोपाला ज्येष्ठ साहित्यिक गणेश देवी यांची उपस्थिती लाभणार होती. या उपक्रमासाठी महापालिकेतर्फे ३५ लाखांची तरतूदही करण्यात आली होती. ठक्कर डोम येथे भव्य स्वरूपात होणाऱ्या या ग्रंथयात्रेत २०० स्टॉल्स उभारण्यात आले होते. मात्र, मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या आदेशामुळे केवळ २४ स्टॉल्सचे बुकिंग झाल्याने व प्रकाशक व साहित्यिकांनी या ग्रंथयात्रेस येण्यास नकार दिल्याने ही ग्रंथयात्रा स्थगित करण्यात आली.

वाचाल तर वाचाल, असे सांगणारे ग्रंथ हे माणसाला सुजाण बनवतात. माणूस सुजाण बनला तर तो विकासाचा विचार करू शकतो आणि माणसाचा विकास म्हणजे शहराचा विकास अशी ही शृंखला असल्याने केंद्रभागी असलेल्या ग्रंथांची भव्य यात्राच नाशिकमध्ये भरविण्याचा महापालिकेचा मानस होता. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका या यात्रेला बसला असून, सांस्कृतिक संचित ही नंतरची गरज असून, आता लोकांचे प्राधान्यक्रम बदलले आहे. बँका व एटीएमसमोर उभे राहून पैसा काढण्याला आणि गरजेच्याच ठिकाणी खर्च करण्याला लोक प्राधान्य देत असल्याने ही यात्रा स्थगित झाली आहे.

औरंगाबादचा अनुभव वाईट

औरंगाबाद येथे नुकतीच ग्रंथयात्रा आयोजित करण्यात आली होती. मात्र, नोटाबंदीच्या आदेशामुळे तेथे प्रतिस्टॉल ३ ते ४ हजार रुपये इतकाच प्रतिसाद मिळाल्याने संपूर्ण ग्रंथयात्रेचा फियास्को झाला. स्टॉलला भाडे सहा हजार व उत्पन्न ४ हजार मिळणार असेल तर प्रकाशक स्टॉल लावतील कशाला? नाशिकला हेच झाले असून, स्टॉलचे ६ हजार भाडेही निघते की नाही अशी परिस्थिती वाटल्याने प्रकाशकांनी येथे येण्यास नकार दिला व ग्रंथयात्रा होऊ शकली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघर्ष मोर्चासाठी मोटारसायकल रॅली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

अॅट्रॉसिटी कायदा संरक्षण समितीच्यावतीने आज शनिवारी (दि. २६) रोजी शहरात अॅट्रॉसिटी संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय सहभागी होणार आहे. त्यासाठी मोर्चाची संपूर्ण तयारी झाली असून सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात येणार आहे.

या मोर्चासाठी गेल्या तीन महिन्यांपासून नियोजन व तयारीचे काम सुरू होते. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी, शहरातील विविध भागातून मोटारसायकल रॅली काढून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यामुळे समाजबांधवामध्ये मोठा उत्साह संचारला असून तर मोर्चामध्ये कोणताही अनूचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्यात येत आहे. तर मोर्चा शांततेच्या मार्गाने पार पाडावा, असे आवाहनही संघर्ष मोर्चा समितीतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहा पालिकांसाठी उद्या मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील सहा नगरपालिकांसाठी रविवारी मतदान होणार असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. नगरसेवकपदाच्या १७८ जागांसाठी ५६५ उमेदवार रिंगणात असून २६४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. एकूण एक लाख ९३ हजार ९७१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून जिल्ह्यातील २८ मतदान संवेदनशील केंद्रांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. जिल्ह्यात तब्बल अडीच हजार पोलिस बंदोबस्तावर असणार आहेत.

जिल्ह्यातील मनमाड, येवला, नांदगाव, सटाणा, सिन्नर आणि भगूर या सहा नगरपालिकांमध्ये निवडणुक प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. २६४ मतदान केंद्रांवर ३४३ कंट्रोल, तर ६९३ बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे. सहाही नगरपालिकांमध्ये दोन हजार १६२ इतके टपाली मतदान असून, त्यासाठी दोन हजार ७९० टपाली मतपत्रिका छापण्यात आल्या आहेत.

येथे होणार मतमोजणी

२८ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने मतमोजणी केंद्रेही अंतिम केली आहेत. भगूरची मतमोजणी माऊली समाजमंदिर हॉल, विहितगाव, नाशिकरोड येथे होईल. मनमाडची मोजणी कै. वर्धमान बरडिया सार्वजनिक वाचनालयात होईल. नांदगावची मतमोजणी शासकीय इमारत हॉल, नवीन तहसील कार्यालयात होईल. सिन्नरला जीएमडी कॉलेज, सटाण्यातील नवीन प्रशासकीय इमारत आणि येवल्यात नगर परिषद कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे.

उमेदवारांनाही समज

येवला (१४ उमेदवार), मनमाड(८), नांदगाव(४), आणि सटाणा(७) येथील काही उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमिचे आहेत. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी अशा ३२ उमेदवारांवर प्रतिबंधात्म कारवाई केली आहे.

२८ केंद्र संवेदनशील

जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग यांच्यात झालेल्या बैठकांमध्ये आतापर्यंत सहापैकी चार नगरपालिकांमध्ये २८ मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. यात भगूर २, सिन्नर १२, सटाण्यात ५, येवला ९ केंद्रांचा समावेश आहे. मनमाड, नांदगावात संवेदनशील केंद्र नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ शेड्सवरील कारवाई अटळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्यामागील संकटाची मालिका कमी होत नसल्याचे चित्र आहे. विस्तारित बाजार समितीच्या शेडवरील अतिक्रमणासंदर्भात बाजार समितीने दाखल केलेल्या अर्जावरील स्थगिती न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे समिती जिल्हा न्यायालयात जाऊन पुन्हा स्थगिती मिळवण्याची शक्यता असल्याने नगररचना विभागाने जिल्हा न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे पुन्हा स्थगिती मिळण्याची शक्यता कमीच असल्याने या शेडवर हातोडा पडण्याची दाट शक्यता आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरदचंद्र पवार या विस्तारीत समितीत व्यापाऱ्यांसाठी समितीने पालिकेची परवानगी न घेताच शेड उभारले आहे. यासाठी नगररचना विभागाची परवानगी आवश्यक होती. परंतु ती घेतली नसल्याने पालिकेने हे अतिक्रमण काढण्यासंदर्भातील नोटीस बजावली होती. बाजार समितीने या नोट‌िसीविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानेही त्याला एकतर्फी स्थगिती दिली होती. त्यामुळे पालिकेने त्याच न्यायालयात धाव घेत, स्थगिती उठवण्याची मागणी केली होती. पालिकेची मागणी न्यायालयाने मान्य करत, कारवाईवरील स्थगिती आता उठवली आहे. तसेच समितीवरील न्यायालयात जाण्यासाठी पाच दिवसांची मुदत दिली आहे.


पालिकेकडून आधीच दक्षता

समिती या स्थगिती उठवण्याच्या निर्णयाविरोधात जिल्हा न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगररचना विभागाने आधीच दक्षता घेत, जिल्हा न्यायालयात या विरोधात कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे पालिकेची बाजू ऐकल्याशिवाय स्थगिती मिळण्याची शक्यता कमीच आहे. न्यायालयाने स्थगितीचा अर्ज फेटाळल्यास या शेड्सवर तत्काळ बुलडोझर चालविले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील २० उमेदवार कोट्यधीश

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सहा नगरपलिकेच्या निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांपैकी २० उमेदवाराचे नाव कोट्यधीशांच्या यादीत झळकले आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर १०० करोडपतींची नावे देण्यात आली असून, त्यात ही नावे आहेत. मनमाड, येवला, नांदगाव, भगूर, सिन्नर व सटाणा येथे निवडणुका आहेत. यात मनमाड, येवला, भगूर व सटाणाच्या उमेदवारांची नावे आहेत.

मनमाड नगरपालिका

पदमावती धात्रक - १७ कोटी

गणेश धात्रक - ५ कोटी

कुसुम दराडे - ३ कोटी

सविता गिडगे - ३ कोटी

विजय सगळे - ३ कोटी

सचिन दराडे - ३ कोटी

भगूर नगरपालिका

मोहन करंजकर - १५ कोटी

अनिता करंजकर - ११ कोटी

विजय करंजकर -११ कोटी

मनीषा कस्तुरे - ६ कोटी

भाऊसाहेब गायकवाड - ५ कोटी

दीपक बलकवडे -३ कोटी

येवला नगरपालिका

प्रणिताराजे शिंदे -२० कोटी

संकेत शिंदे - ५ कोटी

चंदा दुगड - ४ कोटी

उषाताई शिंदे - ४ कोटी

प्रवीण बनकर -३ कोटी

संदेश पाटील - ३ कोटी

सटाणा नगरपालिका

विजय पाटील - ७ कोटी

साहेबराव सोनवणे - ३ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसपीव्ही’चे कामकाज प्रभारी सीईओंकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीच्या घोषणेनंतर आता स्थापन झालेल्या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही)च्या कामकाजाला गती मिळाली आहे. एसपीव्हीची पहिली बैठक अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्यानंतर आता दुसऱ्या बैठकीची तयारी सुरू आहे. परंतु शासनाने अद्यापही एसपीव्हीच्या सीईओपदी कोणत्याही सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे आयुक्तांनी सीईओपदाचा तात्पुरता पदभार हा प्रशासन उपायुक्त विजय पगार यांच्याकडे सोपविला आहे. त्यामुळे आता स्मार्ट सिटीच्या नियोजनाला चालना मिळण्याची शक्यता आहे.

स्मार्ट सिटीच्या घोषणे अगोदरच नाशिकमध्ये एसपीव्हीची स्थापना झाली होती. त्यापाठोपाठ नाशिकचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये झाला होता. स्मार्ट सिटीमध्ये सर्व विकासकामांची अंमलबजावणी ही एसपीव्हीच्या मार्फत केली जाणार आहे. त्यामुळे घोषणेनंतर अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात पहिली बैठक झाली होती. त्यांनी एसपीव्हीच्या प्रशासकीय कामकाजाचे सर्व अधिकार आयुक्तांना देत, एसपीव्ही स्थापनेची कारवाई पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. एसपीव्हीचे कार्यालय हे महापालिकेतच असले तरी, एसपीव्हीचा कारभार पाहणारे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची अद्याप नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे एसपीव्हीच्या कामकाजाला गती आलेली नाही.

एसपीव्हीच्या कामकाजाला गती देण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच आपल्या अधिकारात एसपीव्हीच्या प्रभारी सीईओपदी प्रशासन उपायुक्त विजय पगार यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता एसपीव्हीच्या कामकाजाला सुरूवात होणार असून, दुसऱ्या बैठकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. एसपीव्हीच्या सीईओकडूनच इतर कार्यालयीन कामकाजाच्या नियुक्त्या केल्या जातात. त्यामुळे रखडलेल्या नियुक्त्या मार्गी लागणार आहे.

जानेवारीपासून कामकाज

जानेवारीपासून या स्मार्ट सिटीच्या कामकाजाला प्रत्यक्षात अंमलबजावणीला सुरूवात होण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटीतल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी एसपीव्हीचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू होणे अपेक्ष‌ित आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये एसपीव्हीची आणखीन एक बैठक होऊन नियोजनाचा आराखडा तयार केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यभर ‘फुलटाइम’ गुंडागर्दी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

भाजपचे मुख्यमंत्री सांगतात, मी ओव्हरटाइम मुख्यमंत्री आहे. मात्र त्यांच्या राज्यात गुंड मात्र फुलटाइम आहेत, असा जोरदार चिमटा काढत राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येवल्यात थेट हल्ला चढविला. गुंडांना बरोबर घेऊन राज्य करणाऱ्या या शासनाला आता त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहनही विखे पाटील यांनी केले.

येवला नगरपालिका निवडणुकीचा अंतिम टप्प्यांत प्रचार आता शिगेला पोहचला आहे. येवल्यात जाहीर प्रचारासाठी राज्यातील विविध पक्षांच्या नेतेमंडळींची हेल‌िकॉप्टर घिरट्या घालू लागली आहेत.

येथील निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या काँग्रेसच्या नगराध्यक्ष अन् नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राधाकृष्ण विखे पाटील यांची जाहीर सभा झाली. शहरातील केशवराव पटेल मार्केटसमोर झालेल्या या प्रचारसभेत विखे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडतानाच शिवसेनेला चिमटे घेतले. या देशात विकास फक्त रामदेव बाबाचा झाला, बाकी शेतकरी, कष्टकरी यांचे वाटोळे या सरकारने केले. अचानक नोटाबंदी करून सामान्य जनतेचे हाल केले. लोकांना कामधंदे सोडून बँकेच्या समोर रांगेत उभे केले. भाजपचा एकही आमदार रांगेत दिसला नाही, असा टोला विखेंनी लगावला. केवळ घोषणाबाजी करणारे अन् प्रत्येक घोषणेचे मार्केटिंग करणारे हे सरकार आहे. सर्वत्र गुंड पोसण्याचे काम हे सरकार करीत आहे. यांच्या राज्यात दाभोलकर, पानसरेंचे हत्यारे खुलेआम फिरत आहेत. पोल‌िस अधिकारी आत्महत्या करीत आहेत. सामाजिक व कायदा सुव्यवस्थेची या सरकारने वाट लावली आहे. जातीय दंगे भडकवले जात आहेत, असा आरोपही विखे यांनी केला. राज्य प्रगतीकडे नव्हे तर अधोगतीकडे सरकार घेऊन जात आहे. गुन्हेगारी, बलात्कार वाढले आहेत. सर्व गुंडांना प्रवेश दिले जात आहेत.

एकिकडे आदिवासी, अल्पसंख्यांकांच्या योजनेत मोठी कपात आणि दुसरीकडे उद्योगपतींना कर्ज माफ केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही विखे यांनी दिला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाने, येवला शहराध्यक्ष राजेश भंडारी, तालुकाध्यक्ष अरुण आहेर, नगराध्यक्षपदाचे उमेदवार एजाज शेख यांची भाषणे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दावा नाकारणाऱ्या कंपनीला दणका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाहन विकत घेतल्यानंतर आरटीओ कार्यालयात रीतसर नाव लागले असताना केवळ पॉलिसी ट्रान्सफर झाली नाही म्हणून विमा दावा नाकारणाऱ्या इन्शुरन्स कंपनीला ग्राहक न्यायमंचाने दणका दिला आहे.

अर्जदारास नुकसान भरपाईचे २ लाख ३७ हजार ९४६ रुपये देण्याचे आदेशही मंचाने दिले आहेत. त्याचप्रमाणे सेवा देण्यास कमतरता केल्याचे कारण सांगत त्रासापोटी ५ हजार व अर्जाचा खर्च ३ हजार असा आठ हजारांचा दंड ठोठावला. वाहन विकत घेतल्यानंतर त्याची रीतसर कागदपत्रांची नोंद करण्यात आली व त्याच रात्री वाहनाचा अपघात झालेल्या या प्रकरणात न्यायमंचाने हा निकाल दिला आहे.

नाशिकरोड येथील नंदू सखाराम लवटे यांनी याबाबत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, विलास मारुती सांगळे यांच्याकडून मी टोयोटा कार विकत घेतली. त्यानंतर सदर वाहनाचे आरटीओ कार्यालयात नाव ट्रान्सफर करण्यात आले. त्याचदिवशी रात्री १० च्या सुमारास सदर वाहनास नाशिकरोड येथे अपघात झाला. त्या वाहनाचे २ लाख ३७ हजार ९४६ रुपये नुकसान झाले. सदर खर्च मिळावा म्हणून मी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, अहमदनगर येथे दावा दाखल केला. मात्र, त्यांनी भरपाई दिली नाही. त्यानंतर मूळ मालक विलास सांगळे यांनी दावा दाखल केला, तोही फेटाळण्यात आला. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली. या तक्रारीवर इन्शुरन्स कंपनीने प्रथम तर न्यायमंचाच्या अधिकारात हा दावा येत नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर तक्रारदाराने वाहन विकत घेतल्यानंतर विमा पॉलिसी आपल्या नावावर ट्रान्सफर करून घेतलेली नाही. तक्रादारांचा इन्शुरेबल इंटरेस्ट नसल्यामुळे वाहनाच्या नुकसानीची भरपाई देण्याची त्यांची कोणतीही जबाबदारी नाही. त्यामुळे तक्रारदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा, असे सांगितले. या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमंचाने वाहनाचा अपघात न्यायमंचाच्या कार्यक्षेत्रात झाल्यामुळे ही केस चालवण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मोटार टेरिफ जीआर क्र. १७ नुसार वाहन ट्रान्सफर झाल्याच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या आत विमा पॉलिसी आपल्या नावे करण्यासाठी विमा कंपनीकडे अर्ज केला पाहिजे.

पण या केसमध्ये आरटीओकडे नाव ट्रान्सफर झाल्यानंतर त्याच दिवशी अपघात झाला आहे. त्यामुळे तक्रारदाराचा इन्शुरेबल इंटरेस्ट नव्हता, या विमा कंपनीच्या म्हणण्यात आम्हाला तथ्य वाटत नाही. या केसमध्ये इन्शुरन्स कंपनीने अटीशर्तीही दाखल केलेल्या नाहीत. त्यामुळे इन्शुरन्स कंपनीने सेवा देण्यास कमतरता केलेली आहे. त्यामुळे त्यांनी नुकसान भरपाई व दंडाची रक्कम द्यावी, असे सुनावले. हा निकाल न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी, कारभारी जाधव यांनी दिला आहे. तक्रारदाराकडून अॅड. डी. बी. डावकर यांनी युक्त‌िवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात विकासाचा नुसताच ठणठणाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गेल्या दहा-अकरा वर्षांत येवल्यात एका ठराविक पक्षाची सत्ता आणि अनेक वर्ष मंत्रीपद लाभूनही शहरात विकासाचा ठणठणाट आहे. आता केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने विकासाची संधी तुमच्यापुढे चालून आली आहे. सत्ता द्या, शहराचा दोन वर्षात कायापालट करून दाखवतो, असे भारीभक्कम आश्वासन राज्याचे जलसंपदामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी येवलेकरांना दिले.

पालिका निवडणुकीतील भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बंडू क्षीरसागर व प्रभागातील भाजपा-शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पालकमंत्री गिरीश महाजन यांची शहरातील पहाड गल्लीत सभा झाली. या सभेत महाजन यांनी येवला पालिकेत गेल्या दहा वर्षांपासून अधिक काळ सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

केंद्रातील मोदी सरकारने दोन वर्षांत जनतेच्या हितासाठी १०० योजना सुरू केल्या. भारताचा आवाज जगात पोहचला आहे. एका ठराविक पक्षाची सत्ता आणि अनेक वर्ष मंत्रीपद लाभूनही येवला शहरात विकासाचा ठणठणाट आहे. आता केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असून, विकासाची संधी तुमच्या पुढे चालून आली आहे. अनेक वर्ष सत्ता आणि पालकमंत्रीपदी असतानाही जिल्ह्यात पायाभूत सुविधादेखील मिळालेल्या नाही. मनमाडला २५ दिवसांनी पाणी मिळते, हा विकास आहे का? असा सवाल करून स्मार्ट सिटी ही मोदींची संकल्पना येथे राबवून शहराचा चेहरा-मोहरा बदलवण्यासाठी तुम्ही जे-जे मागाल ते-ते दिले जाईल. दिल्लीत सत्ता आहे, आता गल्लीतही सत्ता द्या, असे महाजन म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगाव मनपा कोट्यधीश!

$
0
0

नोटाबंदी निर्णयानंतर ७ कोटींहून अधिक कर जमा

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

पाचशे आणि हजाराच्या नोटा बाद करण्याच्या निर्णयानंतर मनपाचे थकित कर भरण्यासाठी या हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार दि. ९ नोव्हेंबरपासून या नोटांद्वारे नागरिकांकडून रक्कम स्वीकारण्यास सुरुवात झाली. नोटाबंदीच्या निर्णयाने महसूल विभागाचे करवसुलीचे काम सुलभ झाल्याने एरवी खडखडाट असलेल्या मनपाच्या तिजोरीत यामुळे मोठी रक्कम जमा झाली आहे. गेल्या १५ दिवसांत येथील महापालिकेच्या तिजोरीत ७ कोटी ७२ लाख इतका कर वसूल झाला आहे, अशी माहिती सहाय्यक कर आयुक्त इकलाख शेख यांनी दिली.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर शहरातील नागरिकांनी जुन्या पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा बदलून घेण्यासाठी दोन आठवड्यापासून विविध बँक आणि पोस्टाबाहेर रांगा लावल्या होत्या. मात्र या नोटा व्यवहारातून रद्द करण्यात आल्याने त्या कोणीही स्वीकारत नसल्याने अनेकांची चिंता वाढली होती. राज्यसरकारने मात्र या नोटांद्वारे मनपाचे थकित कर भरण्यासाठी सूट दिल्याने अनेकांनी बँक किंवा पोस्टात जाण्यापेक्षा कर भरणे पसंत केले.

याबाबत मनपा आयुक्त रवींद्र जगताप, कर उपायुक्त इकलाख शेख तसेच महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यासाठी नागरिकांना कर भरण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी प्रत्येक प्रभाग कार्यालय व मनपा कार्यालयात व्यवस्था करण्यात आली होती. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महापालिकेकडून दरवर्षी राबविल्या जाणाऱ्या वसूली मोहिमेत करांच्या पोटी एकूण ४० ते ५० टक्के वसूली होत असते. या आर्थिक वर्षात चालू तसेच थकित अशी एकूण ५१ कोटी वसूली होणे अपेक्षित आहे. यात आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू झाल्यापासून आतापर्यंत १२ कोटी १३ लाख २६ हजार रुपयांची वसूली झाली आहे. मात्र यातील लक्षणीय बाब म्हणजे ७ कोटी ७२ लाख ७२ हजार ५६९ रुपयांची करवसुली ही नोटाबंदी निर्णयानंतर झाली आहे. सर्वाधिक करभरणा प्रभाग क्रमांक एकमध्ये ३,२३,७७,४६२ रुपये इतका कर नागरिकांनी हजार आणि पाचशेच्या नोटांद्वारे भरला आहे. यामुळे यंदा वसुलीचा आकडा ७० टक्क्यांपर्यंत पोहचू शकतो, असा अंदाज महसूल अधिकारी व्यक्त करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उतारे, ऑनलाइन दुरुस्तीला अग्रक्रम

$
0
0

मागण्या मान्यतेनंतर तलाठी कार्यालये गजबजली

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तलाठी संघटनेच्या काही मागण्या मान्य केल्यामुळे नाशिकमधील तलाठ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या दहा दिवसांपासून सामूहिक रजेवर गेलेले तलाठी, तलाठी संवर्गातील मंडळ अधिकारी तसेच अव्वल कारकून कामावर रूजू झाले असून, तलाठी कार्यालये आता गर्दीने गजबजून गेली आहेत. शुक्रवारी (दि. २५) शेतकऱ्यांना उतारे देण्यास प्राधान्य देण्यात आले.

प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १६ नोव्हेंबरपासून तलाठी सामुदायिक रजेवर गेले होते. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून तलाठी कार्यालयाशी संबंधित सर्व कामकाज ठप्प झाले होते. वारंवार निदर्शने करूनही सरकार दखल घेत नसल्याने तलाठी संघटनांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला होता. महसूल गोळा करण्यापासून उतारे वाटपापर्यंतची सर्वच कामे रखडल्याने नागरिकांचे विशेषत: शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होऊ लागले. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी मुंबईत तलाठी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या सजांच्या पुनर्रचनेबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेण्याचे तसेच संगणकीय कामकाज करताना येणारे तांत्रिक दोष दूर करून प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र सर्व्हर देण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. तलाठ्यांना संगणक, लॅपटॉप, प्रिंटर्सबाबत येणाऱ्या अडचणी जानेवारी अखेरपर्यंत सोडविण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. ऑनलाइन कामकाजात येणाऱ्या अडचणींबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी महिन्यातून एकदा तलाठ्यांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, असे आदेशही महसूल मंत्र्यांनी दिले. आंदोलन करणाऱ्या तलाठ्यांवर कारवाई केली जाणार नाही तसेच त्यांच्या रजा धरण्यात याव्यात, ही मागणीही मान्य करण्यात आली आहे. महसूल मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे संप मागे घेण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नीळकंठ उगले यांनी दिली.

सायंकाळी उशिरापर्यंत महसूल मंत्र्यांशी मागण्यांबाबत चर्चा सुरू होती. त्यांनी आमच्या मागण्या मान्यतेबाबत सकारात्मकता दर्शविली. त्यामुळे जिल्ह्यात आजपासून ५६३ कामावर रूजू झाले. याखेरीज तलाठी संवर्गातील मंडळ अधिकारी आणि अव्वल कारकून असे २०० जण देखील कामावर रूजू झाले आहेत.

- नीळकंठ उगले,

जिल्हाध्यक्ष, नाशिक जिल्हा तलाठी संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचरंगी लढतीत कोण मारणार बाजी?

$
0
0

कैलास येवला, सटाणा

सटाणा नगरपालिका थेट नगराध्यक्षपदासाठी अत्यंत काट्याची लढत होत असून, कोण बाजी मारणार हे सांगणे कठीण झाले आहे. साम, दाम, दंड, भेद या रणनीतीचा वारेमाप वापर या दोन दिवसात होणार असल्याने विजयाचा पुष्पहार कुणाच्या गळ्यात पडतो व थेट नगराध्यक्ष निवडणुकीच्या धक्कादायक निकालाची परंपरा कायम राहणार का, याबाबत आता उत्कंठा वाढली आहे.

थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक ही सटाणा शहराला नव्याने नाही. या पूर्वीही शहरवासियांनी सन १९७६ व २००१ मध्ये अशा निवडणुकीचा थरार अनुभवला आहे. १९७६ मध्ये लोकनेते पंड‌ितराव धर्माजी पाटील व २००१ मध्ये अर्जुनराव अहिरे यांनी विजय संपादन केला आहे. त्यामुळे यदांची थेट नगराध्यक्षपदाची निवडणूकदेखील ऐतिहासिक व धक्कादायक निकाल देणारी ठरल्यास वावगे ठरणार नाही.

अर्ज माघारी नंतर १२ नोव्हेंबरपासून थेट नगराध्यक्षपदाचे चित्र स्पष्ट झाल्यांनतर तब्बल पंधरा दिवस प्रचाराला संधी मिळालेल्या उमेदवारांनी घराघरात जाऊन थेट संपर्क साधला. यंदाच्या निवडणुकीत सटाण्यात हायटेक प्रचाराने रंग भरल्याने कधी नव्हे तो इतक्या मोठ्या प्रमाणात ‘आर्थिक’ चुराडा या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत झाल्याने काही करोडोंची उलाढाल शहरात या निमित्ताने झाली आहे.

काँग्रेसचे अ‍ॅड. विजय पाटील व शहर विकास आघाडीचे सुनील मोरे हे दोघेही नगराध्यपदासाठी नवीन आहेत. तर भाजपचे बाळासाहेब सोनवणे यांनी तब्बल तीन वेळा नगराध्यक्षपद भूषविले आहे. तसेच राष्ट्रवादीचे बाळासाहेब रौंदळ, शिवसेनेचे अरविंद सोनवणे यांनी थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवारीचा अनुभव घेतला आहे. यामुळे पाचही उमेदवारांना ही निवडणूक नवी नसली तरी मोठ्या हिमतीने ते रिंगणात उतरले आहेत.

राष्ट्रीय पक्षाच्या तिघाही प्रदेशाध्यक्षांनी या निवडणुकीच्या निमित्ताने सटाण्यातील प्रचार सभांना हजेरी लावली. तर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांनी सभा घेत चुरस निर्माण केली आहे. शिवसेनेकडून स्टार प्रचारक कुणीही या ठिकाणी आले नाहीत. ‘शविआ’चे सर्वेसर्वा सुनील मोरे यांनी डिजिटल सभा घेवून आपल्या अस्त्विाची चुणूक दाखवून दिली.

भाजपने केंद्र व राज्यात आपली सत्ता असल्याने कोणत्याही परिस्थितीत यंदा पालिकेत परिवर्तन घडवून पालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे. तर राष्ट्रवादीने सलग दोन निवडणुकीत मिळविलेल्या एकहाती विजयाची आता हॅट्रीक करण्यासाठी चंग बांधला आहे. यासाठी विद्यमान आमदार दीपीका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण यांनी मोठे परिश्रम घेतले आहे. आमदार चव्हाण यांचे सासू-सासरे प्रभागात उमेदवार असल्याने त्यांनादेखील या रिंगणात उतरावे लागले आहे. काँग्रेसने शहरात पहिल्यांदाच आपल्या अस्तित्त्वाची जाणीव करून देत अन्य पक्षीय उमेदवारांना दमछाक करण्यास भाग पाडले आहे. लोकनेत दलितमित्र पंड‌ितराव पाटील यांच्या माध्यमातून शहरात मोठी आघाडी घेतली आहे. शिवसेनेचे शिलेदार अरविंद सोनवणे यांनी एक हाती किल्ला लढविला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे या ठिकाणी तळ ठोकून आहेत. अरविंद सोनवणे यांच्या सौभाग्यवतीदेखील प्रभागात रिंगणात असल्याने त्यांना तिकडे लक्ष द्यावे लागत आहे.

शहरात मराठा समाजाची मते मोठ्या प्रमाणात असून, समाजाची चारही उमेदवार रिंगणात आहेत. तर उर्वरित बाराबलुतेदारांची संख्या त्या बरोबरीची असल्याचे जाणकार सांगतात. त्यात शहर विकास आघाडीचे सुनील मोरे हे एकमेव उमेदवार माळी समाजाचे आहे. मत विभागणीच्या पाठबळावर विजयश्री खेचण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. तर ‘एक मराठा लाख मराठा’ हे कार्ड कोणता रंग दाखविणार यावरच खऱ्या अर्थाने निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. तसेच पंचरंगी असलेला सामना अखेरच्या टप्प्यात चौरंगीवरून तिरंगी झाल्यास नवल वाटायला नको.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरमध्ये रात्र वैऱ्याची

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर नगरपालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसह अपक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यांत झालेल्या सभामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झाडल्या. नंतर मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर देण्यात आला. एक, एका मतदाराला पुन्हा पुन्हा भेटून निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचवला आहे.

भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपली शक्ती पणाला लावली असून, नगरपालिकेवर पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी आखलेले डावपेच परतवून लावण्यासाठी शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांनीही आपली ताकद पणाला लावली आहे. पालिकेत बोकाळलेला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी परिवर्तन करण्याचे आवाहन केले आहे. कोकाटे यांनी मुख्यमंत्र्याची सभा घेवून प्रचारात आघाडी घेतली असताना वाजे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकास राज्य मंत्री दादा भुसे, आमदार अनिल कदम यांच्या सभा घेवून निवडणुकीत मोठी रंगत आणली. त्याचप्रमाणे काँग्रेस आघाडीने आमदार जितेंद्र आव्हाड यांची सभा घेऊन सिन्नरचा विकास काँग्रेसच्या काळात झाल्याचा प्रचारातील मुद्दा घेत मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. मनसेचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राजेंद्र बोरसे व इतर उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेऊन आम्हीही रिंगणात असल्याचे स्पष्ट केले. सिन्नरच्या राजकारणात सभेत पोलखोल करण्याऱ्यांमध्ये प्रसिद्ध असलेले वयोवृद्ध नेते अॅड. झुंजार आव्हाड यांनी नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार वसंत बाबा नाईक यांच्या प्रचारार्थ सभा घेवून सर्वच नेत्याच्या चांगलीच खिल्लह उडवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग रचना अखेर जैसे थे

$
0
0

३० हरकती फेटाळल्या; केवळ तीन दुरुस्त्या

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या ३२ पैकी ३० हरकती राज्य निवडणूक आयोगाने फेटाळल्या आहेत. केवळ प्रभाग क्रमांक २० व २७ संदर्भातील हरकतींमुळे त्यात तांत्रिक बदल करण्यात आले असून, मुद्रणातील काही दोष दूर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

प्रभाग रचनेतील सीमारेषा, लोकसंख्या, आरक्षणांसदर्भातील सर्व हरकती फेटाळल्याने महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध केल्यानंतर ती राजपत्रासह महापालिकेच्या वेबसाईट प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांवर पाणी फेरले गेले आहे.

महापालिकेच्या प्रभाग रचनेवर एकूण ३२ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी दीपक कपूर यांची नियुक्ती केली होती. सर्वाधिक तक्रारी या प्रभागांच्या तोडफोडी, लोकसंख्येच्या होत्या. त्यामध्ये शिवसेनेचे माजी सभागृहनेते भगवान भोगे यांनी संपूर्ण प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला होता.

कपूर यांनी हरकतींवर सुनावणी घेत अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. राज्य निवडणूक आयोगाने कपूर यांच्या अहवालानंतर शुक्रवारी अंतिम प्रभारचना प्रसिद्ध केले असून, ३२ पैकी ३० हरकती फेटाळल्या. प्रभाग क्रमांक २० मध्ये नितीन चिडे यांनी घेतलेल्या हरकतीची दखल घेत, प्रभागाचे विस्तृत वर्णन देण्याच्या सूचना कपूर यांनी केल्या. प्रभाग २७ मध्ये बदल करण्यात आला.

कोर्टात जाण्याचा पर्याय

भगवान भोगे यांनी पूर्ण प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला होता. आता त्यांच्यासह सर्वांच्याच हरकती फेटाळण्यात आल्याने त्यांच्याकडे कोर्टात जाण्याचा शेवटचा मार्ग शिल्लक आहे. त्यामुळे भोगेंसह अन्य हरकतदार काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.

भाजपला दिलासा

महापालिकेची प्रभागरचना भाजपच्या प्रभावाखाली तयार केल्याचा आरोप शिवसेनेसह अन्य पक्षांनी केला होता. भोगे यांनी तर निवडणूक आयोगाकडे थेट तक्रार दाखल करीत, काही अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली होती. आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार वसंत गिते यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर हस्तक्षेप केल्याचा आरोप केला होता. परंतु, राज्य निवडणूक आयोगाने या सर्व हरकती फेटाळून लावल्याने भाजपसह पदाधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images