Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पतंजली फूड पार्क विंचूरला?

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विंचूर वाइन पार्कमध्ये विकसित करण्यात आलेल्या भूखंडावर पतंजलीचा संभाव्य फूड पार्क येण्याची दाट शक्यता आहे. सद्यःस्थितीत वाइन पार्कमध्ये तुरळक प्रमाणात वायनरी कार्यरत आहेत, तर उर्वरित विकसित भूखंड पडून आहेत. या जागेवर कृषी प्रक्रिया उद्योगाला यापूर्वीच मान्यता देण्यात आल्याने पतंजलीचा प्रकल्प तेथे होण्याची चिन्हे आहेत.

रामदेवबाबा यांच्या पतंजली उद्योगसमूहाचा फूड पार्क नाशिकला होणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. या पार्कसाठी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पाठपुरावा केला होता. आता हा पार्क होणार असल्याच्या शक्यतेने नाशिकच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतींत सध्या भूखंड शिल्लक नाहीत. दिंडोरी येथे सध्या भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी तेथील भूखंड विकसित करण्याचे काम सुरू आहे. मात्र, औरंगाबाद हायवेवरील विंचूर वाइन पार्कमध्ये सध्या विकसित भूखंड आहेत. केवळ तुरळक वायनरी तेथे कार्यरत आहेत. याच ठिकाणी तिसऱ्या फेजमधील ५० हेक्टर (१२५ एकर) जागा औद्योगिक विकास महामंडळाने संपादित केली आहे. या जागेवर पायाभूत सोयी-सुविधा विकसित होऊ शकतात, तर याचलगत तब्बल १०० हेक्टर जागा संपादित होऊ शकते. वाइन उद्योग बहरत नसल्याने तेथील जागेवर कृषी प्रक्रिया उद्योग यावा यासाठी यापूर्वी प्रयत्न करण्यात आले. त्यास मान्यताही देण्यात आली. त्यानुसार पतंजलीचा पार्क विंचूर येथे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विंचूर वाइन पार्कमधील तिसऱ्या फेजमधील ५० हेक्टर जागा सध्या पडिक आहे. ही जागा संपादित असून, त्यावर सोयी-सुविधा उपलब्ध होऊ शकतात. तेथे कृषी प्रक्रिया उद्योगाला यापूर्वीच हिरवा कंदील देण्यात आलेला आहे.

- जगदीश होळकर, वाइन उद्योजक

पतंजलीच्या पार्कसाठी अद्याप जमिनीची मागणी करण्यात आलेली नाही. येवला, दिंडोरी आणि विंचूर येथे जागा उपलब्ध आहेत. प्रस्ताव आला, तर तातडीने कार्यवाही करण्यात येईल.

- हेमांगी भामरे-पाटील, प्रादेशिक व्यवस्थापक, एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता उरले आठ दिवस!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
पाचशे व हजाराच्या नोटा रद्द केल्यानंतर त्या बँकेत भरण्यासाठी देण्यात आलेली ५० दिवसांची मुदत ३० डिसेंबर रोजी संपणार असून, आता अवघे आठ दिवस बाकी आहेत. त्यानंतरही देशभराबरोबर जिल्ह्यातील सर्व व्यवहार पूर्ववत होतील, असे कोणतेही चित्र नाही. नोटाबंदीनंतर बँकांचे व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले असून, कॅश शॉर्टेजचा प्रश्न सर्वांसमोर आजही कायम आहे. त्यामुळे पुढील काही महिने तरी व्यवहार सुरळीत होण्यासाठी वाट बघावी लागणार आहे. एकीकडे कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन दिले जात असले, तरी दुसरीकडे त्यासाठी असणारी व्यवस्था पूर्णपणे तोकडी असून, त्यामुळे ही घोषणाही प्रत्यक्षात कूचकामी असल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात खासगी व राष्ट्र‌ियीकृत बँकांच्या ५२५ शाखा असून, ९०३ एटीएम आहेत. यातील स्टेट बँक सोडल्यास सर्वच बँकांत आजही कॅशचा प्रश्न कायम आहे. त्यात स्टेट बँकेलाही रिझर्व्ह बँकेने नवीन चलन गेल्या चार दिवसांपासून न दिल्यामुळे आठ दिवसांत ते न मिळाल्यास या बँकेतही कॅश शॉर्टेजचा प्रश्न निर्माण होणार आहे. पाचशे व हजारांच्या नोटा ३० डिसेंबरनंतर बाद झाल्यानंतर नव्या नोटा बाजारात येणार असल्या, तरी त्यात दोन हजाराच्या नोटा जास्त असल्यामुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्था कधी सुरळीत होईल, याची सर्वांना प्रतीक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्युनिअर इंजिनीअरला लाच घेताना पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कालव्यातून घेतल्या जाणाऱ्या पाण्याबाबत पोलिस केस न करण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच मागून पैसे स्वीकारणाऱ्या पालखेड पाटबंधारे उपविभागातील ज्युनिअर इंजिनीअर राजू पुना रामोळे याला अँटिकरप्शन ब्यूरोने पकडले.

एसीबीकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराची लोणवाडी शिवारात वडिलोपार्जित शेती असून, शेतीजवळून पालखेड डावा कालवा गेलेला आहे. इतर शेतकऱ्यांप्रमाणे तक्रारदाराने पाइप टाकून कालव्यातील पाणी वापरले. १४ डिसेंबर रोजी राजू रामोळे यांनी या ठिकाणी येऊन तक्रारदारास बोलावून घेतले. अनधिकृतपणे कालव्यातून पाणी घेतल्यामुळे तुमच्यावर पोलिस केस करावी लागेल, असे रामोळेने सांगितले. केस करायची नसल्यास नऊ हजार रुपये देण्याची मागणी केली. तडजोडीअंती रामोळेने पाच हजार रुपये घेण्यास तयारी दर्शवली. त्यानुसार तक्रारदाराने दोन हजार रुपये दिले. मात्र, यानंतर रामोळे सातत्याने फोन करून उर्वरित पैशांची मागणी करू लागला. त्यामुळे तक्रारदाराने एसीबीशी संपर्क साधला. एसीबीने गुरुवारी दावचवाडी येथे सापळा रचला. लाच स्वीकारताना एसीबीने रामोळेला जेरबंद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फाळकेंचा ऐतिहासिक ठेवा जपा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे नाशिकला लाभलेले वरदान असून, त्यांच्यामुळेच नाशिकचे नाव संपूर्ण चित्रपटसृष्टीत अभिमानाने घेतले जात आहे. त्यांचा जीवनप्रवास हा अभ्यासण्यासारखा अाहे. त्यांच्यातील चित्रपट निर्मितीची ओढ वाखाणण्यासारखी आहे. दुर्दैवाने फाळकेंच्या वस्तूंची जपणूक केली जात नाही ही खंत आहे. हा ऐतिहासिक ठेवा आपण जपायला हवा, असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक,चित्रपट निर्माते आणि राष्ट्रीय पुरस्कार तसेच फिल्मफेअर पुरस्कार विजेते कमल स्वरूप यांनी व्यक्त केले. ते अंकुर फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

अभिव्यक्ती मीड‌िया फॉर डेव्हलपमेंट आणि मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या ‘अंकुर फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. रावसाहेब थोरात सभागृहात कमल स्वरूप यांच्या हस्ते फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन झाले. अगदी जुन्या काळातील चलचित्रफीत फिल्म बॉक्स अर्थात फिल्म बायोस्कोप उघडून फिल्म फेस्ट‌िव्हलचे उद्धाटन करण्यात आले. यातून ‘देखो, सोचो और बनाओ’ असा संदेश देण्यात आला. यावेळी अभिव्यक्तीचे बोर्ड मेंबर अनुराग केंगे आणि भिला ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते.

एफटीआय येथे शिक्षण घेत असताना संशोधन विषयाअंतर्गत चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर कमल स्वरूप यांनी चित्रपट बनविण्याचे ठरविले होते. याची सुरुवात अर्थात नाशिक येथून झाली. मात्र ज्या मातीत फाळके जन्मले तेथे त्यांच्याविषयी फार तोकडी माहिती मिळाली. रे. टिळक यांचे नातू देवदत्त टिळक यांनी त्यांची खूप माहिती दिली. फाळके यांचा वाडा आता राहिला नसल्याची खंत कमल स्वरूप यांनी यावेळी व्यक्त केली. कमल स्वरूप यांनी ‘फाळके फॅक्टरी’ वेब साइटची निर्मिती आणि दादासाहेब फाळके यांच्या जीवनकार्यावर तयार केलेल्या ‘ट्रेसिंग फाळके’ या डॉक्युमेंटरीविषयी महिती दिली. ‘ट्रेसिंग फाळके’ हा फाळके आणि आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास सांगणार लघुपट आहे. हा संशोधन म्हणून तयार केला. मात्र, हे काम पाहून फिल्म डिव्हिजनने हा इतिहास जपून ठेवण्याचे ठरव‌िले आणि याचा एक शोधपर लघुपट तयार करायला सांगितला. तो आम्ही तयार केला, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये दीड कोटीच्या बनावट नोटा जप्त

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

नाशिकमध्ये बनावट नोटांची छपाई करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. गुरूवारी रात्री केलेल्या या कारवाईत नाशिक पोलिसांनी ११ जणांना जेरबंद केले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक अध्यक्षाचाही समावेश असून या आरोपींकडून पोलिसांनी दीड कोटीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

बनावट नोटा छापण्यात येत असल्याची आणि नोटा बदलून देण्याच्या नावाखाली लोकांची लूट करण्यात येत असल्याची खबर पोलिसांना गुरूवारी रात्री मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ सदर ठिकाणी छापा मारत ११ जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये राष्ट्रवादीचा युवक अध्यक्ष छबू नागरे आणि रामराव पाटील यांचा समावेश आहे. पोलिसांनी या धाडीत नोटा छापण्याची मशीन आणि दोन गाड्या जप्त केल्या आहेत. या आरोपींकडून दीड कोटीच्या बनावट नोटा आणि १ लाख ८० हजार रूपयांची रोकड जप्त केली असून त्यात दोन हजाराच्या नव्या नोटांचाही समावेश आहे. या बनावट नोटा कोण छापत होते? कधी पासून छापण्यात येत होत्या? त्यामागे आणखी कुणाचा हात आहे का? याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक फिल्म्सने गाजवला पहिला दिवस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट आणि मराठा विद्याप्रसारक समाज, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंकुर फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिला दिवस सामाजिक आशयाच्या फिल्म्सने गाजवला. बालविवाह, बलात्काराचे सावट, लोकशिक्षण, प्रबोधन, तसेच आरोग्य जागृती असे विषय या फिल्म्समधून साकारण्यात आले. हा फेस्टिव्हल २५ डिसेंबरपर्यंत रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूररोड येथे होणार आहे. फेस्टिव्हलचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.

सकाळच्या सत्रात शाहिरी ही फिल्म झाली. तीन तासांची ही फिल्म वेगवेगळ्या शाहिरांवर साकारण्यात आली. दिग्दर्शन अशित साबळे यांचे होते. शाहिरीचे खरे स्वरूपच या फिल्ममधून दिसले. त्यानंतर चकवा ही फिल्म झाली. २७ मिनिटांची ही फिल्म सामाजिक आशयावर बेतलेली होती. दुपारच्या सत्राची सुरुवात सावट या फिल्मने झाली. दिग्दर्शन स्वप्नील राजशेखर यांनी केले होते. ‘सावट’ ही बालविवाह प्रथेशी निगडित फिल्म होती. दारूडा बाप आणि त्यांच्या ओझ्याखाली गुदमरलेली मुलगी यांच्यातील संबंधावर ही फिल्म भाष्य करते. मुलगी शाळेत गेलेली असते, परंतु बापाला मात्र वेगळीच चिंता सतावत असते. आपल्या मुलीला कुणी पळवून तर नेले नसेल ना, या सावटाखाली तो सतत वावरत असतो. त्यामुळे ती जेव्हा परत येते तेव्हा तो तिचे लग्न लावण्याचा विचार करतो. त्याच्या सावटामुळे बालविवाहाला पुष्टी मिळते, असा या फिल्मचा विषय होता.

त्यानंतर ‘बलुतं’ ही फिल्म दाखवण्यात आली. ‘बलुतं’ या फिल्ममध्ये नायिकेच्या पतीचे निधन होते. त्यानंतर चार पोरींचा सांभाळ करण्यासाठी ती केस कापण्याचे काम करते. गावचा पाटीलही तिला या प्रयत्नात मदत करतो. तो स्वत: तिच्याकडून केस कापून घेतो व इतरांनाही तसे करण्यास सांगतो. त्यातून तिला रोजीरोटी मिळते. शांताबाई यादव या महिलेच्या जीवनावर बेतलेली ही कथा होती. पहाटेची रात्र या फिल्ममध्ये दरोडेखोरांशी स्त्री कसा सामना करते हे दाखविण्यात आले आहे. तिन्ही दरोडेखोरांना आपल्या चिमुरड्यासाठी यमसदनी धाडते अशा आशयाची ही फिल्म होती.

यंदा फेस्टिवलमध्ये ८५ फिल्म दाखविल्या जाणार आहेत. या फिल्म्स मध्य प्रदेश, गोवा, गुजरातसह नाशिक, कोल्हापूर, मुंबई, सांगली, रायगड, उस्मानाबाद, जळगाव, पुणे, बुलडाणा या ठिकाणाहून आल्या आहेत. फेस्टिवलमध्ये दोन सत्रांत दोन वेगवेगळ्या विषयांवर मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. पहिली कार्यशाळा अनिल झनकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. लघु चित्रपट बनवण्याच्या पद्धती या विषयावर त्यांनी टिप्स दिल्या.

आजच्या फिल्म्स

अंकुर फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘आज’, ‘एक नयी सोच : स्वच्छता’, ‘पुस्तक’, ‘कैफियत’, ‘चांगदेव’, ‘अप्रुटेड’, ‘वारसा’, ‘हम चित्र बनाते है’, ‘जिव्हाळा’, ‘ऑफबिट’, ‘माझी आई पास झाली’, ‘वॉटर इज इनव्हॅल्युएबल’, ‘चाइल्ड मॅरेज’, ‘आम्ही भारताचे नागरिक’, ‘ये जो देस है मेरा’, ‘बस स्टॉप’, ‘डब्लूटीबीएलबी’ या फिल्म्स होणार आहेत.

कार्यशाळा : पटकथा लेखन विषयावर कार्यशाळा : मीताली जोशी, वेळ : दुपारी २ ते ४ या वेळेत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजाराला दणका, धर्मस्थळांना दिलासा

$
0
0

बाजाराला दणका, धर्मस्थळांना दिलासा

अंबड लिंकरोडवरील अनधिकृत भंगार बाजारावरील कारवाई रोखण्यासंदर्भात स्क्रॅप असोसिएशनने हायकोर्टात दाखल केलेली याचिका शुक्रवारी फेटाळण्यात आल्याने भंगार बाजारवर हातोडा पडणार हे आता निश्चित झाले आहे. दुसरीकडे शिवसेनेतर्फे शहरातील २३ धार्मिक स्थळांबाबत दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने दिलासा दिला असून, या धार्मिक स्थळांवरील कारवाईला ११ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे शहरात २८ धार्मिक स्थळांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. स्थळांच्या जागेवरील मालकी हक्क महापालिकेने सिद्ध करावेत, अशा सूचनाही हायकोर्टाने महापालिकेला केल्या आहेत.

---

बाजारावर हातोडा निश्चित

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक

शहरातील गुन्हेगारांचा अड्डा असलेल्या अंबड लिंकरोडवरील अनधिकृत भंगार बाजारावर हातोडा पाडण्याची तयारी सुरू असतानाच स्क्रॅप असोसिएशनने पुन्हा हायकोर्टात धाव घेतली. परंतु, हायकोर्टाने शुक्रवारी असोसिएशनची स्थगिती देण्याची मागणी फेटाळून लावली आहे. हायकोर्टाने यावेळी या व्यावसायिकांना फटकारले आहे. त्यामुळे येत्या २ जानेवारी रोजी भंगार बाजारवर हातोडा पडणार हे आता निश्चित झाले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या वतीने भंगार बाजारवर तत्काळ कारवाई करावी, यासाठी शनिवारी पोलिस आयुक्तांची भेट घेतली जाणार आहे.

शिवसेनेचे माजी सभागृह नेते दिलीप दातीर यांनी अनधिकृत भंगार बाजाराविरोधात सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिला. सुप्रीम कोर्टाने संबंधित भंगार बाजारधारकांना स्थलांतर करण्यासाठी चार महिन्यांची मुदत दिली होती. हायकोर्टानेही बाजार हटवण्याची मुदत देऊन दीड वर्ष लोटले, तरीही बाजाराचे अद्याप स्थलांतर झालेले नाही. त्यामुळे महापालिकेने आता या बाजारवर कारवाईची तयारी केली आहे. महापालिकेने गुरुवारी या ५२७ भंगार बाजार व्यावसायिकांना जाहीर नोटीस बजावली असून, २ जानेवारीला या बाजारावर बुलडोझर चालवण्याचा मुहूर्त निश्चित केला आहे.

महापालिकेने कारवाई सुरू केली असतानाच नाशिक स्क्रॅप असोसिएशनच्या वतीने गुरुवारी हायकोर्टात न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या पीठासमोर याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यावेळी महापालिकेच्या वतीने भंगार बाजार व्यावसायिकांना आतापर्यंत दिलेल्या सवलतींचा चिठ्ठाच सादर केला गेला.

---


शिवसेनेची पोलिसांकडे धाव

दरम्यान, हायकोर्टानेही असोसिएशनची याचिका फेटाळली असल्याने हा बाजार त्वरित हटविण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेना आज, शनिवारी (दि. २४) पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांची भेट घेणार असल्याची माहिती शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली. महापालिका हा भंगार बाजार हटविण्यासाठी सकारात्मक आहे. परंतु, पोलिस संरक्षणाशिवाय महापालिकेला ही कारवाई करता येणार नाही. त्यामुळे पोलिसांनी या कारवाईसाठी तत्काळ संरक्षण पुरवावे, अशी मागणी सेनेच्या वतीने पोलिस आयुक्तांना केली जाणार आहे. कोणाचाही दबाव येण्यापूर्वी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


---

धर्मस्थळांवरील कारवाईस ‘ब्रेक’

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक

अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत शिवसेनेला पुन्हा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या वतीने शहरातील २३ धार्मिक स्थळांबाबत दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने दिलासा दिला असून, या धार्मिक स्थळांवरील कारवाईला ११ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. या धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांना ११ जानेवारीपर्यंत स्वतंत्र याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच या धार्मिक स्थळांच्या जागेवरील मालकी हक्क महापालिकेने सिद्ध करावेत, अशा सूचनाही हायकोर्टाने पालिकेला केल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या प्रयत्नामुळे शहरात २८ धार्मिक स्थळांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

महापालिकेने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांसंदर्भात सुरू केलेल्या कारवाईविरोधात शिवसेनेच्या दिलीप दातीर व भागवत आरोटे यांच्यासह चार जणांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पालिकेने पहिल्या टप्प्यात ८४ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली असून, दुसऱ्या टप्प्यात ५७ धार्मिक स्थळांना नोटिसा दिल्या आहेत. ३० डिसेंबरपूर्वी त्यांच्यावर कारवाई करायची आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने दातीर यांनी हायकोर्टात आव्हान दिले होते. त्यावेळी न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या पीठासमोर सुनावणी हायकोर्टाने या धार्मिक स्थळांवरील कारवाईला १६ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली होती. त्यानंतर शिवसेनेने पुन्हा शहरातील धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांना आव्हान करत कागदपत्रे आणून देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिवसेनेकडे २३ धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांनी धाव घेतली होती.

शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते व माजी सभागृह नेते दिलीप दातीर यांनी या २३ धार्मिक स्थळांसदर्भात शुक्रवारी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने ही याचिका दाखल करून त्यांच्यावरील कारवाईला ११ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती नरेश पाटील व एम. एस. कर्णिक यांच्या पीठाने ११ जानेवारीपर्यंत स्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश देत महापालिकेला या धार्मिक स्थळांच्या मालकी हक्काचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या धार्मिक स्थळांनी स्वतंत्रपणे ११ जानेवारीपर्यंत याचिका दाखल कराव्यात, अशा सूचना हायकोर्टाने केल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत २८ धार्मिक स्थळांवरील कारवाई तात्पुरता टळली असून, त्यांना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती बोरस्ते यांनी दिली.

---

भाजपची भूमिका दुटप्पी

शिवसेनेच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजय बोरस्ते यांनी यावेळी अनधिकृत धार्मिक स्थळांसंदर्भात भाजपने घेतलेल्या भूमिकेवर तीव्र टीका केली. भाजप हिंदुत्वाचे फक्त राजकारण करतो, प्रत्यक्ष या धार्मिक स्थळांसंदर्भात मात्र दुटप्पी भूमिका घेत आहे. या धार्मिक स्थळांबाबत भाजपच्या एकही आमदाराने विधानसभेत तोंड उघडले नाही. त्यामुळे भाजपचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका बोरस्ते यांनी केला. एकीकडे मंदिर वहीं बनाएंगे अशी घोषणा द्यायची अन् दुसरीकडे त्यांच्यावर संकट आल्यावर पळ काढायचे भाजपचे धोरण असल्याची टीका बोरस्ते यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट नोटांचा गोरखधंदा

$
0
0

नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या छबू नागरेसह ११ जण जेरबंद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एक कोटी ३५ लाख रुपयांच्या पाचशे व एक हजार रुपये मूल्याच्या बनावट नोटा छापून त्या वितरीत करण्याच्या तयारीत असलेल्या ११ जणांना शहर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री जेरबंद केले. यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी शहराध्यक्ष छबू नागरे, ठेकेदार रामराव पाटील-चौधरी व सिन्नर बाजार समितीचे माजी सभापती रमेश पांगारकर यांचा समावेश आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली असून, कोर्टाने संशयितांना २९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक वेगवेगळे मार्ग शोधून त्यानुसार ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गुरुवारी दिवसभरात शहरात मोठ्या रकमेची अनधिकृत उलाढाल होणार असल्याची टीप इन्कम टॅक्स विभागाने पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांना दिली होती. त्यानुसार, सिंगल यांनी आडगावसह काही पोलिस स्टेशनचे पथक तयार केले. गुरुवारी पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या पथकाने मुंबई-आग्रा हायवेवरील हॉटेल जत्रासमोर संशयास्पद वाहने पकडली. या वाहनांच्या तपासणीत चलनातून बाद ठरवलेल्या एक हजार व ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा खजिनाच सापडला. पोलिसांनी तब्बल एक कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. याशिवाय एक लाख ८० हजार

रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या मात्र खऱ्या नोटा सापडल्या. पोलिसांनी या सर्वांविरोधात बनावट नोटा छापणे व त्यांचे वितरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

यांना झाली अटक

छबू दगडू नागरे (वय ४२, प्लॉट क्र. १८, माहेरघर मंगल कार्यालया शेजारी, खुटवडनगर, नाशिक), रामराव तुकाराम पाटील (वय ५५, शांताई बंगला, महात्मानगर, हॉटेल रिव्होरासमोर), रमेश गणपत पांगारकर (वय ६३, पांगरी, सिन्नर), संतोष भिवा गायकवाड (वय ४३, दिंडोरीरोड, नारायणी, प्लॉट क्रमांक सात, बाढणे कॉलनी, नाशिक), संदीप संपतराव सस्ते (वय ४५, पुणे), ईश्वर मोहनभाई परमार (वय ५०, मुंबई), राकेश सरोज कारखुर (वय २९, ठाणे वेस्ट), नीलेश सतीश लायसे (वय २७, मुंबई), गौतम चंद्रकांत जाधव (वय २८, नवी मुंबई), प्रभाकर केवल घरटे (वय ४४, फ्लॅट क्रमांक ९, बालाजी पार्क, सावरकरनगर, गंगापूररोड), प्रवीण संजयराव मांढरे (वय ३१, बिल्डिंग क्रमांक १५, ए विंग, रूम क्रमांक ६०४, संघर्ष को. ऑप. सोसा. संघर्षनगर, चांदीवली, अंधेरी वेस्ट)

या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू असून, सर्व संशयित एकत्रित कसे आले, या घटनेत आणखी कोणाचा समावेश आहे काय याचा तपास केला जात आहे. पुरावे संकलीत करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

- डॉ. रवींद्र सिंघल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादीचे आता बुरे दिन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसमागील शुक्लकाष्ट संपत नसल्याचे चित्र असून, पक्षाचा एकेक पदाधिकारी जेलची हवा खात असल्याने आता पक्षासमोरच अडचणी उभ्या राहिल्या आहेत. आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या जेलवाऱ्यांमुळे पक्षाची मोठी बदनामी होत असल्याने पक्षाला बुरे दिन आल्याची चर्चा आहे. माजी मंत्री छगन भुजबळ मनी लाँडरिंग, तर माजी खासदार देविदास पिंगळे ५७ लाखांच्या बेकायदा रक्कम हडपल्याप्रकरणी कोठडीत आहेत. पाठोपाठ आता माजी पदाधिकारी असलेला व भुजबळ समर्थक छबू नागरेलाच बनावट नोटांप्रकरणी जेरबंद करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीवर मोठे संकट ओढवले असून, ऐन निवडणुकांच्या तोंडावर होणारी बदनामी पक्षाला घातक ठरणारी आहे.

लोकसभेपाठोपाठ विधानसभेत राष्ट्रवादीचे जिल्ह्यात मोठे पानिपत झाले आहे. त्यानंतर माजी खासदार समीर भुजबळ, माजी मंत्री छगन भुजबळ सध्या बेहिशेबी मालमत्ता व मनी लाँडरिंग प्रकरणात जेलची हवा खात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी पीछेहाट झाली आहे. त्याचा फटका पक्षाला नगरपालिका निवडणुकीत बसला असून, पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. भुजबळ आत गेल्याने पक्ष संकटात असतानाच माजी मंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले माजी खासदार देविदास पिंगळे यांना दोन दिवसांपूर्वीच कर्मचाऱ्यांची ५७ लाखांची रक्कम हडपण्याच्या तयारीत असतानाच अटक करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा झटका बसला आहे. दोन माजी खासदार व एक मंत्री सध्या जेलमध्ये असल्याने पक्षाची बदनामीही झाली असून, नुकसानही झाले आहे.

तीन मोठे नेते जेलमध्ये असतानाच पक्षाचा माजी युवक अध्यक्ष व शहर कार्याध्यक्ष असलेला भुजबळ समर्थक छबू नागरे याला गुरुवारी दीड कोटीच्या बनावट नोटाप्रकरणात अटक करण्यात आली आहे. अगोदरच भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राष्ट्रवादीची पुरती बदनामी झाली असताना नागरेच्या पराक्रमाने राष्ट्रवादीवर तोंड लपवण्याची वेळ आली आहे. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे होणारे नुकसान पक्षाला न सोसवणारे आहे. एकीकडे निवडणुकांची तयारी सुरू असतानाच पदाधिकाऱ्यांच्या जेलवारीने पक्षाला बुरे दिन सुरू झाले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे काय होणार, अशी चर्चा आहे.

छबू नागरेची हकालपट्टी

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने छबू नागरे हा पदाधिकारी नसून, पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे. त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा पक्षाचे नाशिकचे प्रभारी व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. नागरे बनावट नोटा प्रकरणात अडकल्याने पक्षाचीच बदनामी झाली आहे. त्यामुळे पक्षाने नागरेपासून अंतर राखत तो मोठा पदाधिकारी नसून, केवळ कार्यकर्ता होता. त्यामुळे पक्षाशी त्याचा संबंध नसून, त्याने केलेले कृत्य गैरच आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्याची पक्षातून हकालपट्टी केली असल्याची घोषणा आव्हाड यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शौर्य’तर्फे आजपासून ‘मित्सुरा’ आर्ट फेस्ट

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शौर्य सामाजिक संस्थेतर्फे आज, शनिवार (दि. २४)पासून आर्ट फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टसाठी महाराष्ट्र टाइम्स मीडिया पार्टनर आहे. ‘मित्सुरा’ या शीर्षकाने दि. २४ व २५ डिसेंबर रोजी हा फेस्ट होणार आहे. दुपारी १२ वाजता पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्या हस्ते फेस्टचे उद्घाटन होणार आहे, तर दि. २५ रोजी मास्टर शेफ ४ ची फायनालिस्ट मीनू धाम नाशिककरांचे आकर्षण ठरणार आहे.

गायनापासून तर शिल्पकलेपर्यंत सर्वच कलागुणांचा समावेश असणारा हा आर्ट फेस्ट नाशिककरांसाठी मेजवानीच ठरणार आहे. गोदापार्क, आसारामबापू ब्रीजजवळ, गंगापूररोड येथे सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत हा फेस्ट होणार आहे. चित्रकला, अक्षरलेखन, हस्तकला यांच्या कार्यशाळा, तसेच गायन, वादन, शास्त्रीय संगीत, नाटक अशा सर्वच कलांचा या फेस्टमध्ये समावेश राहणार आहे. प्रेक्षकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे अशीदेखील आयोजकांची इच्छा असून, त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल यात असणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्पॉट ड्रॉइंग स्पर्धा यात होणार असून, ४ हजार हून अधिक विद्यार्थी त्यात सहभागी होणार आहेत.

दि. २४ व २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत हा फेस्ट होणार आहे. यात २४ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ लगेचच त्याच ठिकाणी होईल. सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत डेमोस्ट्रेशन्स, विविध खेळ, प्रदर्शन, कविता, तसेच नृत्य, नाटक, सेल्फी तसेच शिल्पकला यांचे प्रदर्शन होणार आहे. सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत रॉक बॅण्ड परफॉर्मन्स, शास्त्रीय संगीत, नृत्य गायन व नाटक होणार आहे.

दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत २.५ किलोमीटरची सिटी रन होणार आहे. त्यानंतर गेम्स, झुम्बा व योगा होईल. सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत डेमोस्ट्रेशन्स, विविध खेळ, प्रदर्शन, कविता, तसेच नृत्य, नाटक, सेल्फी तसेच शिल्पकला यांचे प्रदर्शन होणार आहे. सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत रॉक बॅण्ड परफॉर्मन्स, फॅशन शो, ढोल परफार्मन्स, शास्त्रीय संगीत, नृत्य, गायन, नाटक होणार आहे.


प्रेक्षकांसाठीही स्पर्धा...

प्रेक्षकांसाठीदेखील विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, यात लहानपणचे खेळ खेळण्याची संधी देण्यात येणार आहे. या फेस्टमध्ये कला व फूडसाठी विविध ५० स्टॉल्स मांडण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी श्रेयांश सराफ- ९७६२८२८७०८ व पवित्र कारवा- ८२३७६५२४४४ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन तुरुंग अधिकारी निलंबित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षाव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्यानंतर राज्याच्या कारागृह विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक व कारागृह व सुधारसेवा (पुणे-१) महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शुक्रवारी या कारागृहातील श्रेणी एकच्या तब्बल तीन तुरुंगाधिकाऱ्यांना निलं‌बित केले. मात्र कशामुळे निलंबन केले याचे कारण देण्यात आलेले नाही.

निलंबित करण्यात आलेल्या तुरुंगाधिकाऱ्यांत पी. जी. मानकर, एस. एस. कुंवर व सध्या औरंगाबाद कारागृहात प्रतिनियुक्तीवर असलेले कैलास भवर या तिघांचा समावेश आहे. या तिन्ही तुरुंगाधिकाऱ्यांना निलंबित केल्याचे आदेश नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला शुक्रवारी प्राप्त झाले.

आणखी ९ मोबाइल आढळले

कारागृहात गुरुवारी रात्री आणखी ९ मोबाइल आढळून आल्याची तक्रार तुरुंगाधिकारी संतोष कोकणे यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिली. त्यामुळे आता केवळ डिसेंबर महिन्यात नाशिकरोड कारागृहात आढळून आलेल्या मोबाइलची संख्या २५ वर जाऊन पोहोचली आहे. विशेष म्हणजे या सर्व मोबाइलपैकी केवळ सोमवारी एका कैद्याकडे आढळून आलेल्या मोबाइलमध्ये सीमकार्ड आढळून आले. दरम्यान आणखी १२ कैद्यांना इतरत्र हलविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेरा हजार कुटुंबे झाली धूरमुक्त!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गरिबांना चुलीपासून दूर करण्यासाठी, तसेच पर्यावरण संवर्धनासाठी एलपीजीचा वापर करण्यावर सरकार भर देत आहे. गरिबांना एलपीजी कनेक्शन घेणे शक्य व्हावे यासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत नि:शुल्क एलपीजी कनेक्शन देण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात ७१ हजार ३७३ अर्जदारांपैकी १२ हजार ८५० गरजू कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

गेल्या काही वर्षांत घरोघरी एलपीजीचा वापर वाढला असला, तरी जिल्ह्यातील हजारो कुटुंबांचे अन्न अजूनही चुलींवरच शिजते. मात्र, आता अशा गरीब आणि गरजूंची चिंता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) धर्मेंद्र प्रधान यांच्या पुढाकाराने या योजनेचा लाभ देण्याबाबत धडक मोहीमच हाती घेण्यात आली आहे. योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यात ७१ हजार ३७३ अर्ज दाखल झाले आहेत. परंतु, त्यापैकी १२ हजार ८५० कुटुंबांनाच आतापर्यंत लाभ देण्यात आला आहे. प्रदूषण कमी करणे, महिलांचे आरोग्य अधिक सुरक्षित करणे हा योजनेमागील महत्त्वाचा हेतू आहे. राज्यात जवळपास १४ लाख कुटुंबांनी या योजनेसाठी अर्ज केला असून, पुण्यात सर्वाधिक ७८ हजार ७५७ अर्ज दाखल झाले आहेत. लातूर जिल्ह्यातील कुटुंबांना सर्वाधिक कुटंबांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

जिल्हा लाभार्थी

लातूर २९,४४३

औरंगाबाद २७,१०७

सांगली १७,७८७

अहमदनगर १७,७६५

धुळे १७,६३२

पुणे १७,४६६

सोलापूर १३,९७९

नाशिक १२,८५०

नागपूर १२,२१८

नांदेड ११,७८०

एकूण ४ लाख १५ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंगळेंच्या आणखी एका फार्महाऊसची झडती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री येथील आणखी एक फार्म हाऊस अॅण्टी करप्शन ब्युरोने शोधून काढले असून, तेथे झडती सुरू करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या एका बँक लॉकरमधील नऊ लाख रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने एसीबीने हस्तगत केले आहे.

पिंगळेंना अटक केल्यानंतर एसीबीने त्यांच्या शहरातील एक घरासह फार्महाऊसची झडती घेतली. दरम्यान, त्र्यंबकेश्वर अगदी जवळ असलेल्या पिंप्री गावात पिंगळे यांचे आणखी एक फार्म हाऊस असल्याची माहिती एसीबीला मिळाली असून, तेथे झडती प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. एसीबीचे एक पथक तेथे काम करीत असल्याचे संबंध‌ित अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवस्मारकाच्या कार्यात नाशिकचे मावळे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यावरून श्रेयवाद पेटलेला असताना दुसरीकडे या स्मारकाच्या कामात प्रत्यक्ष सहभाग असलेले नाशिकच्या तीन अधिकाऱ्यांचे नाव समोर आले आहे. या कामात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असला तरी प्रसिद्धीपासून ते कोसो दूर आहेत. या प्रकल्पाला चालना देण्यापासून आराखडा तयार करण्यापर्यंत त्यांचा सहभाग असल्यामुळे नाशिककरांनाही त्याचे कौतुक आहे. छत्रपतींचा सळसळता जाज्वल्य इतिहास सांगणाऱ्या या स्मारकाला नाशिककरांचा असा हातभार लागणे हेसुद्धा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.

या स्मारकाचे भूमिपूजन शनिवारी पंतप्रधानाच्या हस्ते होणार असून, हा ऐतिहासिक क्षण हे अधिकारीसुद्धा अनुभवणार आहेत. कित्येक वर्षांपासून या स्मारकाच्या आराखड्याचे काम सुरू होते. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पाटील, उपअभियंता श्याम मिसाळ यांचा मोठा वाटा आहे, त्याचप्रमाणे नाशिकचे असलेले विक्रीकर आयुक्त अविनाश भामरे यांचेही या कामात मार्गदर्शन मिळाले आहे. त्यामुळे या स्मारकात नाशिकचे हे त्रिकुट आपली वेगळी छाप पाडून गेले असले तरी ते सर्वांना अनभिज्ञ होते; पण या सोहळ्यानिमित्त ही नावे पुढे आली आहेत.

या स्मारकासाठी राजेंद्र पाटील सहा महिन्यांपासून काम करीत आहेत, तर श्याम मिसाळ दोन वर्षांपासून मुंबईतच आहेत. या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाला चालना देणे, प्रकल्प व्यवस्थापन सांभाळणे, प्रकल्पाची संकल्पना अंतिम करणे, आराखडा तयार करणे व निविदा काढण्याच्या टप्प्यापर्यंत कामे केली आहेत. नोकरीनिमित्त विविध भागांत अधिकारी जात असतात; पण या अधिकाऱ्यांना छत्रपतींच्या ऐतिहासिक स्मारकाच्या कामात आपला सहभाग नोंदवता आला ही गोष्ट त्यांना अभिमानास्पद व स्फूरण देणारी ठरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला धावपटूला अखेर मिळाला न्याय!

$
0
0

सोशल नेटवर्किंग फोरमच्या प्रयत्नांना मिळाले यश


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सोशल नेटवर्किंग फोरमचे जाळे महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात पसरले आहे. त्यामुळे दोन राज्यातील लोकांनी एकत्र येत एका विचाराने एका महिला धावपटूला न्याय मिळेपर्यंत सहारा देऊन तिच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटवला. आता या महिलेला तेथील शासनाने कोच म्हणून पर्मनन्ट नोकरी दिली आहे. सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून त्या महिला धावपटूला न्याय तर मिळालाच परंतु, सन्मानदेखील प्राप्त झाला आहे.

शांती सुंदरराजन या महिला धावपटूला तमिळनाडू शासनाने अलीकडेच कोच म्हणून पर्मनन्‍ट नोकरी दिली. सोशल नेटवर्किंग फोरम ही महाराष्ट्रातील सोशल मीडियावरील तरुणांनी स्थापन केलेली सामाजिक संस्था आहे. तमिळनाडूतील फोरमचे सदस्य राम तुरे यांनी तेथील शांती सुंदरराजन या आंतरराष्ट्रीय धावपटूवर झालेल्या अन्यायाविषयी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांना कळवले होते. हार्मोनन्स इम्बॅलन्सचे कारण देऊन शांती स्त्री नाही, असे जाहीर करून तिचे कॉमनवेल्थ मेडल तर परत घेण्यात आलेच पण तिला क्रीडा खात्याने सापत्न वागणूक दिली. या अन्यायाविरुद्ध शांतीला न्याय मिळवून देण्यासाठी गोपी शंकर हे सामाजिक कार्यकर्ते प्रयत्नशील होते.

चार गोल्ड, सहा सिल्व्हर, एक कांस्यपदक हे आंतरराष्ट्रीय आणि पन्नास राष्ट्रीय मेडल्स मिळवलेल्या एका महिला धावपटूवर अक्षरशः मजुरी करण्याची वेळ आली. आर्थक मदतीनंतर फोरमच्या वतीने जुलै २०१५ पासून पंतप्रधान आणि क्रीडा मंत्रालयाशी सातत्याने संपर्क साधण्यात आला. या प्रयत्नांना यश मिळून अलीकडेच तामिळनाडू शासनाने शांतीला कायमस्वरूपी कोचची नोकरी दिली. तिचे मेडल्स मात्र मिळालेले नाहीत.

महाराष्ट्रीयन बंधूंची कमाल

या सर्व लढाईत शांतीच्या उमेदीची अनेक वर्षे बरबाद झाली. या भगिनीला न्याय मिळवून देण्यात महाराष्ट्रातील बंधूंनी खारीचा वाटा उचलावा यापेक्षा राष्ट्रीय एकात्मतेचे दुसरे उदाहरण काय असेल? यामुळे सोशल फोरमचे महाराष्ट्रातील सदस्य, तमिळनाडूतील सदस्य, राम तुरे, गोपी शंकर या सर्वांच्या कामाचे स्वागत होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माजी सभापती, शहराध्यक्ष, ठेकेदार आणि बरेच काही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बनावट नोटा छापून त्याद्वारे आपले उखळ पांढरे करून घेण्याचा गोरखधंदा पोलिस आणि इन्कम टॅक्स विभागाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. या गुन्ह्यात सिन्नर कृषी उत्त्पन्न बाजार समितीचा माजी सभापती रमेश पांगारकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी शहराध्यक्ष छबू नागरे आणि ठेकेदार म्हणून प्रदीर्घ चर्चेत असलेला रामराव पाटील यांचा समावेश सर्वांना धक्कादायक तितकाच संतापजनक ठरला आहे.

रामराव पाटलांवर यापूर्वी बरेच गुन्हे दाखल असून, शहरातील घंटागाडी योजनेचा बोजवारा उडवून देण्यात या महाशयाचा मोठा वाटा ठरला होता. अनेक बालंट अंगावर आल्याने पाटलांनी नाशिक सोडून पनवेलकडे आपला मोर्चा वळवला. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचे कधी काळी निकटवर्तीय असलेले आणि सिन्नर बाजार समितीचे माजी सभापती रमेश पांगारकर त्यांच्या सोबतीला आल्याने पनवेल, शहापूर परिसरात या दोघांनी जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला. दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहराध्यक्षाची भूमिका पार पाडल्यानंतर निवांत असलेल्या छबू नागरेला बनावट नोटांप्रकरणी अटक व्हावी, यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शोकांतिका काय असू शकते? माजी सभापती व माजी शहराध्यक्ष राजकीय दृष्टिकोनातून सध्या बाजूला पडलेले होते. व्यावसायिक कामानिमित्त मुंबईवाऱ्या करणाऱ्या या तिघांचा मुंबईतील संशयित आरोपीशी संबंध आला. नोव्हेंबरमध्ये झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून पुढे आलेल्या बनावट नोटांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आणि हे कारस्थान रचले गेले.

प्रकरणाचे मूळ दुबईत?

राजकीय पक्षाआड घेतलेला सामाजिक कार्याचा बुरखा या निमित्ताने उघड झाला असून, बनावट नोटांचे पाळेमुळे शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या बनावट नोटांच्या प्रकरणाचे मूळ दुबईत दडले असल्याचे बोलले जाते आहे. काही दिवसांपासून संशयित आरोपींनी अनेकदा दुबईवाऱ्या केल्या असून, त्यांचे पासपोर्ट तपासण्याची मागणी पोलिसांना केली जात आहे. बनावट नोटा छापून वितरित करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास किमान १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. नाशिकमध्ये प्रथमच असा प्रकार घडला असून, यामुळे सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त केला जातो आहे.

विजय पांगारकर वेगळे

काही दिवसांपूर्वी शहर पोलिस आणि इन्कम टॅक्स विभागाने संयुक्त कारवाई करीत छावा संघटनेचे पदाधिकारी विजय पांगारकर यांच्यासह महंत सुधीरदास पुजारी आणि नितीन लुंकड या व्यापाऱ्यास ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे सापडलेल्या नवीन चलनी नोटांचे विवरण देण्याचे आदेश इन्कम टॅक्स विभागाने दिले होते. विजय पांगारकर आणि शहर पोलिसांनी अटक केलेला रमेश पांगारकर हे एकाच गावातील असून, या योगायोगातील तथ्य पोलिस पडताळून पाहणार काय, याची उत्सुकता सर्वांना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी कार्यालयांचे होणार फायर ऑडिट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच शॉर्ट सर्किटची घटना घडल्याने सतर्क झालेल्या जिल्हा प्रशासनाने सर्व सरकारी कार्यालयांना फायर ऑडिट करून घेण्याचे आदेश काढले आहेत. इतकेच नव्हे, तर आगीसारखी दुर्घटना घडलीच तर जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आगप्रतिबंधक उपकरणे हाताळण्याचे प्रशिक्षणही सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या दालनात बुधवारी दुपारी अचानक धूर निघू लागल्याने कर्मचाऱ्यांसह उपस्थित यंत्रणेची धांदल उडाली होती. आगीसारखी घटना नियंत्रणात आणणारे फायर एक्स्टिंग्युशरसारखे मशीन उपलब्ध असूनही ते कसे चालवावे, याचे शास्त्रशुद्ध ज्ञानच यंत्रणेला नसल्याचे या घटनेमुळे उघडकीस आले. जिल्ह्यात कुठेही आपत्ती उद््भवली की तत्काळ मदत मिळेल या विश्वासाने संकटग्रस्त नागरिक जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधतात. मात्र, हीच आपत्ती या विभागाचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ओढवली, तेव्हा प्रशासकीय यंत्रणेची उडालेली धांदल महसूल यंत्रणेच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. आपत्ती व्यवस्थापनाच्या सज्जतेचा बुरखाही फाडला गेला. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बुधवारी निघालेला धूर हा ट्यूबचा इलेक्ट्र‌िक चोक पंक्चर झाल्यामुळे निघाला, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्र‌िक विभागाने केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. पाच वर्षे जुना झालेला हा चोक बदलण्यात आल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

या घटनेची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयांनी त्यांच्या इमारतींचे फायर ऑडिट करवून घ्यावे, असे आदेश जिल्हा प्रशासनाने काढल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी गुरुवारी दिली. या आदेशाचे पत्र तयार केले असून, ते सर्व सरकारी कार्यालयांना पाठविणार असल्याची माहिती खेडकर यांनी दिली. सरकारी कार्यालयांमध्ये आगप्रतिबंधक उपाययोजना करा, त्या पूर्वीपासूनच असतील तर त्या सुस्थितीत आहेत की नाही, याची तपासणी करून घ्या, सरकारी कार्यालयांमधील वायरिंग जुने झाले असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे वायरिंगची दुरुस्तीदेखील करून घ्या, असे या आदेशात म्हटले आहे. सर्व कार्यालयांना फायर ऑडिट सक्तीचे असून २०१२ चा तसा कायदाच आहे. मंत्रालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर फायर ऑडिटबाबत सरकारी कार्यालयांकडून सतर्कता दाखविली जाते. सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फायर एक्स्टिंग्युशरसारखी आगविरोधी साधने चालविता यायला हवीत. हे मशीन कुणाला चालविता येत नसेल तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रशिक्षण देईल, अशी ग्वाही प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट नोटांमागचा सूत्रधार कोण?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बनावट नोटा छापून त्या वितरित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी शहराध्यक्ष छबू नागरे, तसेच महापालिकेचा ठेकेदार व राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित रामराव पाटील-चौधरी आणि सिन्नर बाजार समितीचा माजी सभापती रमेश पांगारकर या तिघांचा समावेश असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे चलनातून बाद ठरवलेल्या हजार व पाचशेच्या नोटांची छपाई करण्यात आली असून, संशयित हे काम बऱ्याच दिवसांपासून करीत असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, यामागचा सूत्रधार कोण, नोटांची छपाई कुठे होत होती, याचा पोलिस शोध घेत आहेत.

याबाबत माहिती देताना शहर पोलिसांनी मोठी सावधानता बाळगली आहे. हे प्रकरण बरेच मोठे असून, या गुन्ह्यात संशयितांची संख्या वाढणार असल्याची शक्यता पोलिसांना आहे. बनावट नोटांचे कारस्थान उघड करण्यासाठी पोलिसांनी हाताची घडी आणि तोंडावर बोट, अशी भूमिका स्वीकारली आहे. लवकरच आणखी मोठा धमाका होण्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून व्यक्त होत आहे.

संशयित आरोपींकडून हजार व पाचशेच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. शहर, तसेच जिल्ह्यातील ही सर्वांत मोठी कारवाई असून, संशयित आरोपींनी बनावट नोटा देऊन बऱ्याच जणांना गंडा घातल्याचा अंदाज व्यक्त होतो आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक नवनवीन क्लृप्त्या काढून काळा पैसा चलनात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. कमिशन देऊन जुन्या नोटा बदलणे हा ट्रेंड सर्वत्र दिसून येतो. नाशिकमध्ये यापूर्वीच चार एजंटांना अटक करीत पोलिसांनी ३० लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. यात दोन हजार रुपये दराच्या नोटांचा समावेश होता. आडगाव पोलिसांनी अटक केलेल्या ११ संशयितांकडे मात्र हजार आणि पाचशे रुपये दराच्या जवळपास एक कोटी ३५ लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा आढळून आल्या. कमिशन घेऊन जुन्या नोटा बदलून देणाऱ्या जिल्ह्यातील एजंटांना रात्रीच्या अंधारात बनावट नोटा द्यायच्या आणि त्यांच्याकडून दोन हजार रुपये दराच्या नव्या नोटा घ्यायचा, असा डाव संशयितांनी आखला होता. परगावाहून आलेल्या किती एजंटांना या प्रकारे गंडा घालण्यात आला, याचा तपास पोलिस करीत आहेत. बनावट नोटांचा सुळसुळाट वाढल्यानंतर इन्कम टॅक्स विभाग मात्र सतर्क झाला. त्यांना बनावट नोटांचा स्रोत समजल्यानंतर प्राप्तिकर विभागाच्या पुणे येथील युनिट एकने ही माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार संशयितांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

नोटांची हुबेहूब नक्कल!

शहर पोलिसांनी जप्त केलेल्या हजार आणि पाचशेच्या बनावट नोटा अगदी खऱ्या वाटाव्यात अशा आहेत. यातील बहुतांश नोटांचे सीरिअल क्रमांक एकच असून, नोटांची सफाईदार पद्धतीने छपाई करण्यात आली आहे. घाईत असताना किंवा अंधारात या नोटा खऱ्या की खोट्या हे समजणार नाही. याचाच फायदा घेत संशयित बनावट नोटा खपवत होते. या नोटा कुठे आणि कशा छापल्या, यामागील मुख्य सूत्रधार कोण? पुणे आणि मुंबईच्या संशयितांचे नाशिक कनेक्शन काय, असे अनेक प्रश्न या निमित्ताने पुढे आले असून, त्याचा तपास सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

मीठ पिशव्यांखाली दडवल्या नोटा

मध्यरात्रीच्या सुमारास आडगाव परिसरातील जत्रा हॉटेल चौफुलीनजीक पोलिसांनी एमएच १५/सीएम ७००२, एमएच ०४/ईएफ ९७०१ आणि एमएच १५/एफएच २१११ या तीन संशयास्पद कारचालकांना अडवले. पोलिसांनी या वाहनांची झडती घेतली असता त्यात मिठाच्या पिशव्यांची पॅकिंग असलेले बॉक्स आढळून आले. मात्र, पोलिसांची माहिती पक्की असल्याने त्यांनी मिठाचे बॉक्स उघडून पाहिले असता खाली बनावट नोटा आढळल्या. पोलिसांनी या तिन्ही कार जप्त केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीमवाडीतील झोपड्यांना शॉर्टसर्किटमुळे आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

जुने नाशिक येथील गंजमाळ परिसरसातील भीमवाडीतील घरकुलांचे लाभार्थ्यांसाठी तात्पुरते बांधण्यात आलेल्या शेडला शनिवारी सायंकाळी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीत पाच ते सात शेड जळून खाक झाले. अग्निशामक दलाने वेळीच घटनास्थळी पोहचत आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळले.

गंजमाळ बस स्थानक जवळील शेडमधून धुरांचे लोळ निघताना दीपक डोके यांनी पाहिले. त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला आगीची माहिती दिली. येथील रहिवाशांसाठी महापालिकाकडून घरकुल योजनेतून घरकूल बांधण्याचे काम गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. घरकुलांचे काम रखडल्याने भीमवाडीतील या लाभर्थ्यांना तात्पुरते शेड बांधून देण्यात आले आहे. या शेडच्या भोवती विद्युतपुरवठा करणाऱ्या तारा लोंबकळत आहेत. एकाच मीटरवर अनेक शेडमध्ये वीजपुरवठा सुरू आहे. कोणतेही विद्युत सुरक्षितेचे साधनेदेखील या ठिकाणी नाहीत. आग लागल्यामुळे लोकांची एकच गोंधळ केला. भद्रकाली पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अडथळे दूर केले. मुख्यालयातील दोन बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाच्या जवानाना यश आले. दरम्यान, गंजमाळ झोपडपट्टीला लागुनच असलेल्या नागरी वस्तीतील गॅस सिल‌िंडरचे गोडाऊन आहे. तर भीमवाडीत झोपडपट्टी परिसरात गॅस पुरवठा करणाऱ्या वाहने येथे उभ्या असतात. काही महिन्यांपूर्वी गोडाऊन जवळच भंगार दुकानाला भीषण आग लागली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंजाबचा संत्रा ठरतोय ‘भारी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शहराच्या कोणत्याही रस्त्याच्या कडेला नारंगी रंगाच्या संत्र्यांचे ढिग प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत. या रसरशीत संत्र्यांच्या खरेदीसाठी वाहने थांबवून ग्राहक संत्र्यांच्या दराची चौकशी करतात. नागूपरच्या संत्र्याबरोबरच पंजाबची संत्री बाजारात उपलब्ध झाल्याने दोन्ही संत्र्यांमध्ये जणू स्पर्धा लागली आहे. आकर्षित आणि गुळगुळीत असलेल्या पंजाबच्या संत्र्यांना ग्राहक पसंती देत असल्यामुळे पंजाबचा संत्री नागपूरच्या सत्रीपेक्षा भारी ठरत आहे.

नागपूर आणि पंजाबची संत्रीचा रंग सारखा असला तरी आकारात पंजाबाचा संत्री चांगली दिसत असल्यामुळे ग्राहक विक्रेत्यांकडे तिाची मागणी जास्त करीत आहेत. दोन्ही संत्र्यांच्या चवीत फारसा फरक नसतानाही केवळ नागपूरच्या संत्र्याची साल ही ओबडधोबड दिसते म्हणून ग्राहक पंजाबच्या गुळगुळीत सालीच्या संत्र्यांकडे आकर्षित होत आहेत. दोन्ही संत्र्यांचा दर सारखा असला तरी नागपूरच्या संत्र्यांपेक्षा पंजाबच्या संत्रीला मागणी जास्त आहे.

संत्री आणि द्राक्ष एकाच हंगामात बाजारात आल्यास द्राक्षाचे दर घसरण्याचे अनुभव द्राक्ष बागाईतदारांना येत असतात. यंदा संत्रा लवकर बाजारात आलेला आहे. त्याची विक्री फळांच्या बाजाराबरोबरच महामार्ग आणि इतरही रस्त्यांवर होऊ लागली आहे. संत्रांचा मोसम जानेवारीपर्यंत संपल्यास फेब्रुवारीपासून द्राक्षाला चांगले भाव मिळण्याची शक्यता द्राक्षबागाईतदार व्यक्त करीत आहेत.

नागपूर आणि पंजाब या दोन ठिकाणाहून नाशिकला संत्री विक्रीस येत आहे. बाजार समितीच्या आवारात विक्रीस आलेल्या या संत्र्यांची खरेदी करून त्यांची जागा मिळेल आणि ग्राहकांच्या नजरेस सहज दिसू शकेल, अशा ठिकाणी विक्री करण्यात येत आहे. ३० ते ४० रुपये प्रती किलो असा भाव मिळत आहे.

सरजीत वर्मा, संत्री विक्रेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images