Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आराध्य दैवताच्या यात्रेने सटाण्यात आनंदोत्सव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहराचे आराध्यदैवत श्री संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या १२९व्या पुण्यतिथी उत्सवाला शनिवारी सुरुवात झाली. शनिवारी पहाटेच्या गुलाबी थंडीत मंत्रघोष, जयजयकार व अत्यंत धार्मिक व मंगलमय वातावरणात सोहळ्याला सुरुवात झाली. देवमामलेदार यशवंतराव महाराज मंद‌िराचे परिसर व मंदिराची सजावट करण्यात आली असून, तब्बल १५ दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शनिवारी पहाटे चारच्या सुमारास बागलाणचे तहसीलदार आबासाहेब तांबे व नायब तहसिलदार पल्लवी तांबे, नगराध्यक्ष सुनील मोरे व योगिता मोरे, देवस्थान अध्यक्ष भालचंद्र बागड व अरूणा बागड, देवस्थानचे उपाध्यक्ष दादाजी सोनवणे व सिंधूबाई सोनवणे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. महापुजानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.

मंदिरात महिला व पुरुष भाविकांना दर्शनासाठी वेगवेगळी बॅरेकेटस् लावण्यात आली आहे. दिवसभर तालुक्यासह जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यात शनिवारी शहराचा स्थानिक आठवडे बाजार असल्याने भाविकांची गर्दी केली होती. संपूर्ण मंदिर परिसर पहाटे सडा, रांगोळी, आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. त्यातच आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला होता. पहाटेपासून मंदिराचे विश्वस्त दादाजी सोनवणे, धर्मा सोनवणे, गंगाधर येवला, सुनील मोरे, विजय पाटील, रमेश देवरे, कौत‌िक सोनवणे, राजेंद्र भांगडीया, रमेश सोनवणे, बाबुराव सोनवणे, हेमंत सोनवणे उपस्थित होते. पोलिस उपविभागीय अधिकारी अशोक नखाते, पोलिस निरीक्षक बशीर शेख यांनी देखील पहाटेपासूनच मंदिर व परिसरात चोख बंदोबस्त ठेवला. गांधी चौकातील देवमामलेदार यशवंतराव महाराज मित्र मंडळाच्या वतीने महापुजेनंतर दिवसभर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना साबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले. खामखेडा येथील अखिल विश्व वारकरी परिषदेच्या व ग्रामस्थांच्या दिंडी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर देवस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले. देवस्थानच्यावतीने अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान यात्रोत्सव येथील आरम नदी पात्रावर दुकाने सजली आहेत. सायंकाळी शहरातून थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उपाध्यक्ष, स्वीकृत निवडीकडे लक्ष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गेल्या महिन्याच्या अखेरिस पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सत्तापटलावरील समोर आलेल्या निकालातील पक्षीय संख्याबळाच्या राजकारणात आता उपाध्यक्ष निवड अन् स्वीकृत सदस्य नियुक्तीचा खेळ रंगणार आहे. ‘युती’द्वारे भाजपने नगराध्यक्षपदावर बाजी मारली असली तरी नगरसेवकपदाच्या लढाईत तब्बल दहा जागा पटकावत राष्ट्रवादीची झालेली सरशी, त्याखालोखाल शिवसेना, अपक्ष यांनी समसमान जिंकलेल्या प्रत्येकी पाच जागा तर भाजपच्या पारड्यात पडलेल्या चार जागा लक्षात घेता उपाध्यक्ष निवडीबरोबरच स्वीकृत सदस्यांच्या डावपेचात नक्की कुणाची सरशी असणार? याबाबत आडाखे बांधले जात आहेत.

पालिकेतील पूर्वीच्या बॉडीचा कार्यकाळ संपल्यावर येत्या दोनचार दिवसात नवनिर्वाचित सदस्यांसह सत्तापटलावरील कारभाराचा श्रीगणेशा होणार आहे. बरोबरच थेट जनतेतून नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान होत असलेले भाजपेचे बंडू क्षीरसागर यांचीही ‘इनिंग’ सुरू होणार आहे.

पालिका उपाध्यक्षपदाची निवड आणि पक्षीय तौलिक संख्याबलाबलानुसार स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्या विशेष सर्वसाधारण सभेत होणार असल्याने ही सभा नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर नेमकी केव्हा बोलावतात याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. याशिवाय उपाध्यक्षपदासह स्वीकृत सदस्यांच्या जागांवर नेमकी कुणाकुणाची वर्णी लागते? याबाबत येवलेकरांना कमालीची उत्सुकता लागली आहे.

राष्ट्रवादीकडे तब्बल दहा जागा, ‘युती’चा घटक असलेल्या शिवसेनेकडे त्यापाठोपाठ पाच, अपक्ष पाच आणि भाजपकडे चार जागा आहेत. नगराध्यक्षांचीदेखील नगरसेवक म्हणून गणती करण्याचा राज्य शासनाचा नवा निर्णय बघता भाजपचे संख्याबळही पाचवर पोहचत आहे. एक नगराध्यक्ष प्लस २४ नगरसेवक हे पालिकेच्या सभागृहातील समिकरण लक्षात घेतले तर एकूण २५ संख्याबळात उपाध्यक्ष करण्यासाठी किमान तेराचा जादुई आकडा गाठावा लागणार आहे. त्यामुळेच उपाध्यक्षपदाची निवडणूक एका अर्थाने लक्षवेधी ठरणार आहे.

राष्ट्रवादीकडे असणारे दहाचे बळ लक्षात घेता त्यांना उपाध्यक्षपदी आपला उमेदवार बसविण्यासाठी पाच अपक्षांमधील किमान तीन नगरसेवकांना गळाला लावावे लागणार आहे. पालिका निवडणुकीत एकहाती किल्ला लढवणारे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते माणिकराव शिंदे नेमकी काय रणनीती आखतात अन् मोक्याच्या क्षणी नेमके कसे पत्ते फेकतात यावरही बरचशे गणित अवलंबून असणार आहे. सध्या तरी माणिकभाऊंची भूमिका ‘वेट अंड वाच’ची असल्याने सर्व काही गुलदस्त्यात दिसत आहे. भाजपचा नगराध्यक्ष असल्याने ‘युती’त ठरल्याप्रमाणे शिवसेना उपाध्यक्षपदासाठी आग्रही असणार आहे. सेना व भाजपचे एकत्रित दहाचे संख्याबळ असल्याने त्यांनाही उपाध्यक्षपदाच्या लढाईत अपक्षांकडे मोठ्या अपेक्षेने पहावे लागणार आहे. पाच अपक्षांमधील एखादा देखील उपाध्यक्षपदावर डोळा ठेवुन असल्यास नवल वाटायला नको. सभागृहाची पायरी चढता चढता राजकीय गणित बदलल्याचा येवला पालिकेचा आजवरचा इतिहास पाहता उपाध्यक्षपदाच्या यावेळच्या निवडीचे गणित देखील ऐनवेळच्या राजकीय घडामोडींवर अचानक ‘यु टर्न’ घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक निकालानंतर शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्यासह शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, युवा नेते संभाजी पवार, तालुकाप्रमुख झुंजार देशमुख आदींच्या अपक्षांशी बैठका झाल्या आहेत. या बैठकीत संख्याबळ जुळवण्याबाबत चर्चादेखील झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच पुढे नेमकं काय घडतं याबद्दल उत्सुकता असणार आहे. अपक्ष नेमके कुणाच्या पंक्तीत जावून बसतात यावरच पुढचं सगळं वजाबाकीचं गणित अवलंबुन असणार आहे. शिवसेनेकडून उपाध्यक्षपदासाठी काही नावे चर्चेत असली तरी, सेनेत पक्ष पदाधिकाऱ्यांच्या शब्द हा मोलाचा ठरत असतो ही बाब लक्षात घेता उपाध्यक्षपदाचा उमेदवार ठरवताना पक्ष पदाधिकाऱ्यांचा निर्णय देखील अंतिम ठरणार आहे.

तर स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्यात पेच?

येवला पालिकेतील एकूण २४ नगरसेवकांचे संख्याबळ लक्षात घेतले तर सदस्य संख्येच्या १० टक्के नियमानुसार येवला पालिकेत दोन स्वीकृत सदस्य नामनिर्देशित होतात. मात्र शासनाच्या नव्या निर्णयानुसार नगराध्यक्ष देखील सभागृहातील सदस्य म्हणून ग्राह्य धरले जाणार असल्यामुळे एकूण सदस्यसंख्या २५ होते. त्यामुळे पालिकेत यावेळेस तीन स्वीकृत सदस्य नामनिर्देशित केले जाणार असल्याची चर्चा आहे. पक्षीय तौलिक संख्याबळ बघता राष्ट्रवादीचा एक स्वीकृत सदस्य हमखास होणार आहे. सेनेच्या पाच सदस्यांची संख्या सेनेला एक स्वीकृत सदस्य देवू शकते. भाजपाकडेही नगराध्यक्ष धरला तर पाच संख्याबळ होते. तर पाच अपक्षांनी आपल्या स्वतंत्र गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी केल्यास त्यांचे तौलिक संख्याबळ देखील पाच असणार आहे. अशा वेळी सेना, भाजप व अपक्ष यांचे स्वतंत्र तीन गट तयार होताना स्वीकृत सदस्य निवडीच्या उर्वरित दोन जागांसाठी पेच निर्माण होणार आहे. तिघांमधून चिठ्ठीद्वारे सोडत काढली जावून दोन नावांवर शिक्कामोर्तब करण्याची वेळ येईल अशी देखील चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओझरला प्रथमच वायफाय सेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निफाड तालुक्यातील प्रथमच वाय फाय फ्री सेवा असा नवा नावलौकिक ओझर शहराला प्राप्त झाला आहे. विश्वसत्य ज्ञान संकुलाजवळ काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या हस्ते या सेवेचा प्रारंभ करण्यात आला.

आहेर म्हणाले, की या मोफत वायफाय सेवेचा फायदा येथील व्यापारी वर्ग, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था व विशेषतः विद्यार्थी वर्ग व तरुणांना अधिक होणार आहे. या सेवेचा सर्वांनी विधायक कार्यासाठी व सकारात्मक हेतूने उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमाची संकल्पना येथील आरडी फाऊंडेशन व ओझरचे माजी सरपंच व ओमको बँक संचालक राजेंद्र शिंदे यांची आहे. ओमको बँकेचे चेअरमन वसंत गवळी, पिंपळगाव बाजार समिती संचालक सुरेश खोडे, नंदू कदम, ओझर नागरी चेअरमन दिनकर चौरे आदी प्रमुख पाहुणे होते. महेश गाडगे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र शिंदे यांनी आभार मानले. आर. डी. फौंडेशनचे आशुतोष कदम, प्रतीक शिंदे, अक्षय शिंदे, अजिंक्य पगार, किशोर रास्कर आदींनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरेच्या सोसायटीत अडकले नागरिकांचे पैसे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी छबू नागरे याला बनावट नोटांच्या प्रकरणात पकडल्यानंतर खुटवडनगर परिसरात या विषयावरून चर्चा रंगली आहे. नागरे याच्या पतसंस्था व फ्लॅटच्या परिसरातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून, त्याच्या घराची झडती होणार असल्याचे वृत्त परिसरात पसरले होते. त्यांच्या सोसायटीत अनेक व्यावसायिकांनी पैसे टाकले होते, ते आता परत कसे मिळतील याची चिंता नागरिकांना आहे.

नागरे याचे खुटवडनगर येथे निवासस्थान असून, ॲक्‍सेस मायक्रो फायनान्स मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी लि. नावाची पतपेढी आहे. या पतपेढीच्या माध्यमातून परिसरातील लहान-मोठ्या व्यवसायिकांकडून रोजच्या पावत्या फाडल्या जात होत्या व या व्यावसायिकांना कर्जसुद्धा देण्यात येत असल्याचे समजते. हा प्रकार घडल्यानंतर या बँकेत पैसे टाकलेल्या व्यावसायिकांना आता हे पैसे कसे मिळतील, याबाबतचा प्रश्न उपस्थित राहिला असल्याची चर्चा सुरू होती. याच परिसरात औदुंबर सोसायटीतील तळमजल्यावरील नागरे याच्या फ्लॅटमध्ये ऑसम ब्यूटी पार्लरचा व्यवसाय सुरू होता व त्या ठिकाणीच हे नोटांचे काम सुरू असल्याचा पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी रात्री उशिरा या ठिकाणाहून बरेच साहित्य व काही मशिनरीसुद्धा जप्त केल्याचे परिसरातील नागरिकांकडून समजते. या ब्यूटीपार्लरमध्ये येणाऱ्या महिलांची संख्याही खूप होती. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून महिलांचे येणे-जाणे कमी झाले असल्याचेही परिसरातील नागरिकांनी सांगितले. दुपारी नागरे यांच्या घराची झडती घेणार असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. त्यामुळे या परिसरात माध्यम प्रतिनिधींचीसुद्धा गर्दी झाली होती. नागरेने या परिसरात निवडणूकसुद्धा लढविली होती. विविध राजकीय कार्यक्रमांत त्याचा कायमच सहभाग असल्याने नागरे याने केलेल्या या प्रकाराबद्दल परिसरातील नागरिकांनी आश्चर्य व्यक्‍त केले आहे. महापालिकेत मनसेची सत्ता असल्याने मागील महापौरांच्या कार्यकाळात युवक काँग्रेसच्या वतीने समस्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चाचे संपूर्ण नियोजन नागरेने केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंगळेंची ‘ती’ तिजोरी विल्होळीला सापडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या घरातून नोव्हेंबर महिन्यात काढण्यात आलेल्या एका तिजोरीचा शोध एसीबीच्या पथकाने लावला आहे. विल्होळी येथील हरीश ट्रान्स्पोर्ट या दुकानातून ही तिजोरी जप्त करण्यात आली आहे. तूर्तास चाव्या नसल्याने ही तिजोरी उघडण्यात आलेली नसल्याचे अँटी करप्शन ब्यूरोचे (एसीबी) अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत देशपांडे यांनी सांगितले.

नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यावर दबाव टाकून परस्पर हात मारण्याचा उद्योग केल्याप्रकरणी पिंगळेंना एसीबीने अटक केली आहे. २५ डिसेंबरपर्यंत एसीबीच्या कोठडीत असलेल्या पिंगळे यांनी नोव्हेंबर महिन्यात गंगापूर येथील घरातून एक तिजोरी काढून परस्पर तिची विल्हेवाट लावली होती. विशेष म्हणजे एसीबीने २५ ऑक्टोबर रोजीच कर्मचाऱ्यांचे ५७ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक केली होती. त्यानंतर काही दिवसांतच ही तिजोरी पिंगळेंच्या घरातून बाहेर पडल्याने विविध चर्चांना ऊत आला होता. याबाबतची कुणकुण एसीबीला लागल्याने अधिकारी तिजोरीचा शोध घेण्यात गुंतले होते. चौकशीदरम्यान ही तिजोरी विल्होळी येथील हरीश ट्रान्स्पोर्ट या दुकानात असल्याची माहिती एसीबीला मिळाली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने या ठिकणी जाऊन ती तिजोरी जप्त केली. याबाबत बोलताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी सांगितले, की या तिजोरीच्या चाव्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे तिजोरी उघडण्यात आलेली नाही. तिजोरी उघडल्यानंतर त्यात काय आहे, याचा खुलासा होणार आहे. दरम्यान, ही तिजोरी वापरण्यास योग्य नसल्याने तिचा वापर झालेला नाही. घरात अडचण होत होती म्हणून ती परत करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण पिंगळेंनी या प्रकरणी दिले असल्याची माहिती समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री येथील पिंगळे यांच्या फार्म हाऊसची झडती पूर्ण झाली असून, त्यात फारसे काही हाती लागले नसल्याचे देशपांडे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामरक्षणासाठी बोलठाणमध्ये वाघोबाची पूजा

$
0
0

संदीप देशपांडे, मनमाड

देशभरात सर्वत्र देवादिकांची मंदिरे आहेत. मनमाडमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर आहे. अन्यत्र चित्रपट अभिनेत्यांचे, खेळाडूंचे मेणाचे पुतळे असल्याचेही ऐकिवात आहे. मात्र, नांदगाव तालुक्यात बोलठाण येथे चक्क वाघोबाचे मंदिर आहे. हा वाघोबा साऱ्या गावाचे रक्षण करतो, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.

त्यामुळे चोर, दरोडेखोर व हिंस्त्र प्राण्यांपासून बोलठाण गाव सुरक्षित आहे, असे वर्षानुवर्षे मानले जात आहे. सुमारे दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वी बोलठाण गावातील एका त्यागी धाडसी संतपुरुषाच्या कार्याची चित्तरकथा सांगणारे हे प्रतीकात्मक वाघोबा मंदिर पंचक्रोशीत आस्थेचा व उत्सुकतेचा विषय बनले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की घाटमाथ्यावरील गाव म्हणून ओळख असणाऱ्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे ग्रामस्थांनी चक्क वाघोबाचे मंदिर उभारले आहे. भक्तिभावाने होणारी वाघाची पूजा दत्त पौर्णिमेला त्याची निघणारी वैशिष्ट्यपूर्ण मिरवणूक व त्या निमित्त भरणाऱ्या जत्रेत या वाघोबाच्या सुरस कथांबरोबरच जिलेबी आणि भज्यांची चाखली जाणारी लज्जत इथल्या ग्रामजीवनाचा अविभाज्य घटक बनल्या आहेत. आता गावात वाघोबाचे मंदिर ही गोष्ट अचंबित करून टाकणारी वाटेल.

वाघोबाचे मंदिर का, असा प्रश्नही पडेल; पण या वाघोबाच्या मंदिरामागे वेगवेगळ्या सुरस दंतकथा, आख्यायिकादेखील सांगितल्या जातात. बोलठाण परिसरात डोंगरांची संख्या खूप. त्यात घाटमाथ्यावरचे गाव म्हणून दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वी हा भाग निर्जन... अशा वेळी या गावात एक गृहस्थ राहत. त्यागी ब्रह्मचारी असणारी ही व्यक्ती मोठी धाडसी. कधी अंगावर वाघाचे पट्टे लावून, बहुरूपी बनून चोर, दरोडेखोर, हिंस्त्र श्वापदे यांना ते घाबरवून सोडत व त्यामुळे गावाचे रक्षण होत, अशी आख्यायिका सांगितली जाते. गावाच्या भल्यासाठी वाघोबाचे रूप धारण करणारा आणि हा माणुसकीचा आविष्कार असणारा गावाच्या दृष्टीने महात्मा ठरलेला हा संतपुरुष मरण पावल्यानंतर त्याच्या स्मृती जपण्यासाठी प्रतीकात्मक रूपात वाघोबाचे मंदिर उभे करून वाघाप्रती आदर जपला जात असल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्रातील हे दुर्मिळ वाघोबा मंदिर असल्याचा आणि वाघोबा गाव रक्षणासाठी सज्ज असल्याने गावावर कोणतेच संकट येत नाही, असा समज आढळून येतो. दत्त पौर्णिमेला दत्त मिरवणुकीसह वाघोबाची संयुक्त मिरवणूक निघते. वाघोबाची पितळी मूर्ती रथातून गावभर मिरवली जाते. गावात जत्रा भरते हे खास वैशिष्ट्य मानले जाते. वर्षभर लोक वाघोबाच्या दर्शनाला येतात, असे लोक सांगतात. दत्त मंदिर ट्रस्टबरोबरच वाघोबा देवस्थान ट्रस्टदेखील बोलठाणमध्ये पाहायला मिळते. हिंदू देवस्थान ट्रस्टद्वारे कारभार पाहिला जातो. रामचंद्र पाटील त्याचे अध्यक्ष आहेत, तर बिपीन कायस्थ दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. देवादिकांच्या मंदिराप्रमाणे वाघोबा मंदिरावर लोकांची श्रद्धा आहे. लोक भक्तिभावाने पूजा करतात, असे ग्रामस्थ सांगतात. वाघोबाप्रती आदर व्यक्त करणारे बोलठाण गाव आणि गावासाठी जणू सुरक्षा, निर्भयता आणि धाडस घेऊन येणारे वाघोबा मंदिर आगळेवेगळे व लक्षवेधी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटबंदी राजकीय फायद्यासाठीच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दहशतवाद, भ्रष्टाचार, काळा पैसा रोखण्यासाठी घेतलेला नोटबंदी निर्णयाचा उद्देश सफल झालेला नाही. केवळ उत्तर प्रदेश व पंजाबच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राजकीय फायद्यासाठीच नोटबंदीचा निर्णय घेतल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. या निवडणुकांसाठी रोकड हाताळता यावी म्हणूनच दोन हजाराची नोट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणली असून, ही नोट चलनातून तत्काळ बाद करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मोदींनी भाजप नेत्यांना पूर्वकल्पना देऊन निर्णय घेतला असून, यात मोठा आर्थिक घोटाळ्याचा वास येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिवस्मारकाचे काम दोन वर्षे रखडले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या चव्हाण यांनी काँग्रेस कार्यालयात पत्रकारांशी वार्तालाप करताना, नोटबंदी व शिवस्मारक भूमिपूजनावरून टीकास्र सोडले. नव्याने आलेल्या दोन हजाराच्या नोटछपाईसाठी तब्बल २० हजार कोटींचा खर्च लागला असून, यातील १५ हजार कोटी परकीय चलन लागले आहे. यासाठी वापरलेले साहित्य परदेशी कंपन्यांचे असून, याचे एजंट कोण आहेत, याचा तपास होणे आवश्यक आहे. प्लास्टिकच्या नोटांचा अट्टहास हादेखील एका एजंटसाठी केला जात असल्याने यात मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा वास येत असल्याचा आरोप त्यांनी केला. हजार व पाचशेच्या नोटबंदीतून एक टक्कादेखील हेतू साध्य झालेला नाही. त्यामुळे हा निर्णय फसला असून, याचा फटका सामान्यांना बसत आहे. हा निर्णय फसत आल्याचे लक्षात आल्यावर कॅशलेस व्यवहाराचा फंडा उभा केला आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा काढायचा होता या उद्दिष्टाने हजार व पाचशेची नोट बंद करत दोन हजाराची नोट काढली. ही नोट आल्यावर भ्रष्टाचार होणार नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आगामी उत्तर प्रदेश व पंचाबच्या निवडणुकांमध्ये दोन हजाराची नोट हाताळता यावी, यासाठी ही नोट आणल्याचा आरोपही त्यांनी केला.

शिवस्मारकाचे काम रखडवले

शिवस्मारकाच्या सर्व परवानग्या मिळाल्यानंतरही केवळ मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय लाभ व्हावा, या हेतूने भाजपने शिवस्मारकाचे भूमिपूजन तब्बल पावणेदोन वर्षे रखडवले, असा आरोपही त्यांनी या वेळी केला. १९ फेब्रुवारी २०१५ मध्येच हा कार्यक्रम होणार होता. मात्र, निवडणुकीत राजकीय भांडवल करण्यासाठी हा सोहळा लांबवण्यात आला. नागपूर व पुणे मेट्रो एकाच वेळी मंजूर असताना केवळ पुण्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुणे मेट्रोचे उदघाटन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. लोकांची सहनशक्ती किती पाहणार, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला आहे.

आरबीआय माहिती देणार नाही

चव्हाण यांनी यावेळी आरबीआयवरही टीका केली. आरबीआयची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. काळा पैसा आणि संध्या बँकामध्ये जमा होणाऱ्या पैशांबाबत आरबीआयने अधिकृत माहिती दिली पाहिजे. मात्र, ही संस्था दबावात असल्याने माहिती देणार नाही. नोटबंदीनंतर एक रुपयाचेदेखील निश्चलीकरण झालेले नाही. काळ्या पैशांच्या स्रोताला हात लावण्याऐवजी सर्वसामान्यांचा पैसाच लुटला गेला असल्याचा आरोप केला.

ही तर दडपशाही

नोटबंदीविरोधात पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी मुंबईत अटक करण्यात आलेल्या काँग्रेसचे मुंबई शहराध्यक्ष संजय निरुपम यांच्या अटकेचाही चव्हाण यांनी निषेध केला आहे. पंतप्रधानांसमोर आंदोलन करू नये, असा काही कायदा आहे का, असा सवाल करत ही दडपशाही सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नोटबंदीचा निर्णय फसल्यामुळे सरकार आता विरोधकांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हा तर ‘व्हाइट कॉलर ड्रॉप’!

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com
Tweet : @ArvindJadhav

एखादा ग्रॅम खरे सोने देऊन आमच्याकडे किमान किलो सोने असल्याचे सांगत ते स्वस्तात देण्याचे आमिष दिले जाते. यानंतर पैसे घेऊन येणाऱ्या व्यापारी किंवा त्या व्यक्तीला सोन्याऐवजी मिळतो फक्त मार! पैसेही हिसकावले जातात. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव व राहता तालुक्यात हा प्रकार सर्रास चालतो. याला सराईतांच्या भाषेत ‘डराप’ अर्थात ‘ड्रॉप’ म्हणतात. शहर पोलिसांनी उघडकीस आणलले बनावट नोटांचे प्रकरण काहीसे याच मार्गाने जाणारे असून, त्यास आता ‘व्हाइट कॉलर ड्रॉप’ असे नामाभिधान पडले आहे.

स्वस्तात सोने किंवा जमीन देऊन फसवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांची मोडस ऑपरेंडीही सोपी असते. चोरी किंवा घरफोडीतील गुन्ह्यातील एखादे ग्रॅम सोने ते जवळ बाळगतात. यानंतर मध्यस्थीच्या माध्यमातून ते ग्राहकाच्या शोधात असतात. एकदा ग्राहक गळाला लागला, की ते ग्रॅमभर सोने ग्राहकाला दिले जाते. ग्राहक सोन्याची पारख करून घेतो. अर्थात, सोने शुद्धच असते. यानंतर फसवणूक करणारे किलोभर सोने असून, स्वस्तात देतो असे सांगत ग्राहकाला आमिष दाखवतात. ३० ते ४० लाख रुपये किमतीचे सोने अगदी १५ लाखांना मिळणार या खुशीत ग्राहक पैसे देण्यास तयार होतो. मात्र, चोरीचे एवढे मोठे सोने घेण्यासाठी ग्राहकाला दुसऱ्या, तसेच निर्जन ठिकाणी बोलवले जाते. पैसे घेऊन तिथे पोहोचणाऱ्यावर पाच ते सहा जण एकच हल्ला करून पैशांची बॅग घेऊन पोबारा करतात. दुसऱ्या गावात निर्जन ठिकाणी ग्राहकाच्या मदतीला कोणी येत नाही. पोलिसांकडे जावे तर अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार, या भीतीने ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ असा प्रकार घडतो. शिर्डी रोडवरील जमीन स्वस्तात देण्याचा बहाणा करून मुंबईतील अनेकांना अशा प्रकारे गंडा घालण्यात आला आहे. सराईत गुन्हेगार या प्रकाराला ‘डराप’ असे म्हणतात.

शहर पोलिसांनी उघडकीस आणलेले बनावट नोटांचे प्रकरण याच मार्गाने जाणार असल्याचे पोलिस सांगतात. व्हाइट कॉलर ड्रॉपचा हा प्रकार असल्याची शंका पोलिसांना आहे. कमिशन देऊन जुन्या नोटा बदलून देण्यासाठी आलेल्या एजंटकडून नवीन चलनी नोटा घ्यायच्या आणि पोलिस केसमध्ये गुंतवण्याची धमकी देऊन त्यांना चूप करायचे, असा हा सगळा खेळ असल्याचे सांगितले जाते. कमिशन एजंट गैरमार्गाने नोटा बदलून देत असल्याने या प्रकरणावर अद्याप पडदा पडलेला आहे. शहर पोलिस सध्या अशा पुराव्याच्या शोधात असून, लवकरच त्यात यश मिळेल, अशी अपेक्षा पोलिसांकडून व्यक्त होते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बनावट नोटांचा सूत्रधार छबू नागरेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बनावट नोटा छापण्याच्या उद्योगाचा खरा सूत्रधार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी पदाधिकारी छबू नागरे हाच असल्याचा निष्कर्ष पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनंतर काढण्यात येतो आहे. बनावट नोटांच्या निर्मितीचे केंद्र खुटवडनगर येथेच असून, पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत. या गुन्ह्यात संशयित आरोपींची संख्या वाढू शकते, असा दावा पोलिस सूत्रांकडून केला जातो आहे.

एक कोटी ३५ लाख रुपयांच्या पाचशे व हजाराच्या बनावट नोटा छापून त्या वितरित करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ११ जणांना शहर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री जेरबंद केले. यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी शहराध्यक्ष छबू दगडू नागरे, ठेकेदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी संबंधित रामराव पाटील- चौधरी, तसेच सिन्नर बाजार समितीचा माजी सभापती रमेश पांगारकर यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त शहरातील आणखी दोन, तर परजिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे. शहरासह जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट नोटांचा साठा जप्त करण्यात आला असून, त्यात राजकीय पक्षाशी निगडित पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने संताप व्यक्त होतो आहे. याबाबत बोलताना सूत्रांनी सांगितले, की बनावट नोटा छापण्याच्या उद्योगाचा मुख्य सूत्रधार नागरे हाच असल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून येते. खुटवडनगर येथील एका फ्लॅटमध्ये नोटा बनवण्याचे काम नागरे करीत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या संदर्भात काही महत्त्वाचे पुरावे जप्त केले असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, या बनावट नोटांचे वितरण करण्यात रामराव पाटीलसह रमेश पांगारकर यांचा महत्त्वाचा सहभाग होता. बनावट नोटांचे वितरण करून त्याद्वारे मिळणारे कमिशन हे तिघे वाटून घेत होते. या गुन्ह्यात पोलिसांनी मुंबई येथील सहा आणि पुणे येथील एकास अटक केली आहे. मात्र, अद्याप त्यांची या गुन्ह्यात नक्की काय भूमिका आहे हे पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही. या गुन्ह्याची व्याप्ती वाढत जाणार असून, प्रत्येकाची बारकाईने चौकशी सुरू असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

नागरेचा पाय खोलात

राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या छबू नागरेच्या खुटवडनगर येथील फ्लॅटमध्येच ऑसम ब्यूटीपार्लर सुरू करण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात या ब्यूटीपार्लरमध्ये गर्दी होत होती. मात्र, काही महिन्यांपासून येथील वर्दळ कमी झाली होती. याच फ्लॅटवजा ब्यूटीपार्लरमध्ये बनावट नोटा छापण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. शुक्रवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास पोलिसांनी येथील काही वस्तू जप्त केल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नागरेने अॅक्सेस मायक्रो फायनान्स ही मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीदेखील सुरू केली आहे. छोटे कर्ज देणे, दररोज पैशांचे कलेक्शन करणे आदी कामे या सोसायटीमार्फत केली जातात. बनावट नोटांचे काही धागेदोरे या फायनान्स कंपनीपर्यंत पोहोचतात काय, याचाही तपास पोलिस करीत आहेत.

डॉ. घरटेच्या घरी हाऊस सर्च

या गुन्ह्यात पोलिसांनी प्रभाकर केवल घरटे (४४, फ्लॅट क्रमांक ९, बालाजी पार्क, सावरकरनगर, गंगापूर रोड) या बीएचएमएस डॉक्टरलादेखील अटक केली आहे. आडगाव पोलिसांच्या पथकाने शनिवारी सायंकाळच्या सुमारास डॉ. घरटेच्या घरी पोहोचून हाऊस सर्च घेतला. इतर संशयितांच्या घरीदेखील याच पद्धतीने तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

छपाई आताच की पूर्वीपासून?

बनावट नोटा छापण्याचा उद्योग छबू नागरे केव्हापासून करतो आहे, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. नोटाबंदीच्या निर्णयानंतर नागरे व त्याच्या सहकाऱ्यांनी हा उद्योग केला की पूर्वीपासूनच तो या व्यवसायात आहे, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मी राष्ट्रवादीचा विरोधक नाही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादीचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रथमच राष्ट्रवादीसंदर्भात नरमाईची भूमिका घेतली आहे. आपली राष्ट्रवादीविरोधक अशी प्रतिमा तयार करण्यात आली असली तरी मी राष्ट्रवादीचा विरोधक नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. आपण राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल बोलणार नसल्याचे सांगत, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यास त्यांनी प्रथमच अनुकूलता दर्शवली आहे. चव्हाण यांनी प्रथमच राष्ट्रवादीसंदर्भात सूर जुळवण्याचे प्रयत्न केल्याने काँग्रेसमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रथमच राष्ट्रवादीसंदर्भात नरमाईचे धोरण स्वीकारले. राष्ट्रवादीसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करणार का, असे विचारल्यावर जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्यास काहीच हरकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांनी निवडणुकांमध्ये आघाडी करायची की नाही या संदर्भात निर्णय घ्यावा, असे आपले मत असून, प्रदेश काँग्रेसचीही तीच भूमिका आहे. आतापर्यंत आपण राष्ट्रवादीचे विरोधक आहोत, अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे; परंतु मी राष्ट्रवादीचा विरोधक नाही असे स्पष्टीकरण त्यांनी या वेळी दिले. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल बोलण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे चव्हाण राष्ट्रवादीशी सूत जुळवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. दरम्यान, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीच्या राजकारणावरही भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहलींसाठी रंगीत एसटी

$
0
0

Gautam.Sancheti@timesgroup.com

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नव-नवीन संकल्पना आणत बसेस सुरू केल्या आहेत. त्याला प्रतिसाद मिळत असताना आता लग्न समारंभ व शालेय सहलींसाठी खास बसेस सुरू होणार आहेत. या बसेसच्या रंगरंगोटी व सजावटीचे काम सध्या एसटीच्या विविध वर्कशॉपमध्ये सुरू असून, लवकरच या बसेस रस्त्यावर धावणार आहेत. या बसेसवर एसटीचे पारंपरिक रंगांऐवजी लग्नसोहळ्याशी संबंध‌ति चित्रे व शाळेच्या मुलांसाठी असलेल्या बसवर विविध कार्टून्स असणार आहेत.

एसटीने या अगोदर शिवनेरी, स्लिपर कोचसह विविध बसेस आणल्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता या बसेसच्या माध्यमातून शालेय सहल व लग्न सोहळ्याचे प्रवाशी आकर्षित केले जाणार आहेत. गेल्या काही वर्षांत खासगी बसेसमुळे एसटीकडे लग्नसोहळ्यासाठी लागणाऱ्या बसची मागणी घटली तर सहलीसाठी लक्झरी बसेसचा वापर केला जाऊ लागला. एसटीचे मोठ्या उत्पन्नाचे हे स्त्रोत कमी झाले. त्यामुळे ही कल्पना पुढे आली. या नव्या बसेसमध्ये अंतर्गत सजावटही केली जात असून, त्यामुळे या बसेसमध्ये लग्नसोहळ्याचा फिल यावा असा उद्देश समोर ठेवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदापात्रातील पाणवेलींकडे दुर्लक्ष

$
0
0

तपोवन परिसरात दुर्गंधीचा त्रास

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शहरातील गटारांचे पाणी थेट नदीपात्रात सोडण्यात येत असल्यामुळे पाणवेली वाढतात. हे माहिती असूनही सर्रासपणे नदीपात्रात गटारांचे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे कन्नमवार पूल ते लक्ष्मीनारायण पुलापर्यंतच्या गोदापात्रातील स्थिर पाण्यात पाणवेली वाढायला लागल्या आहेत. या पाणवेलींच्या वाढीची सुरुवात असल्याने गोदापात्रावर हिरवा थर जमा झाला आहे. महापालिका प्रशासनाने आताच या पाणवेलींचा थर काढल्यास कमी खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकेल, मात्र त्या दृष्टीने महापालिकेच्या काही हालचाली दिसत नाहीत.

नदीपात्रात टाळकुटेश्वर पुलाजवळून तसेच वाघाडीच्या नाल्यातील पाणी थेट गोदापात्रात मिसळले जाते. या गटारीच्या पाण्यात नायट्रोजनचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते पाणवेलीच्या वाढीस पोषक वातावरण निर्मिती करण्याचे काम करते. हे पाणी कन्नमवार पूल ते लक्ष्मी नारायण पूल या भागात स्थिर असल्याने तेथे पाणवेली वाढीस चांगला वाव मिळतो. सध्या येथील पात्रावर हिरवा थर जमा होऊ लागला आहे. या अवस्थेत पाणवेली काढणे सोपे असून त्यासाठी खर्चही कमी लागू शकतो. पाणवेलींची वाढ जास्त झाल्यावर त्या काढणे कठीण होते. हे लक्षात येऊनही महापालिका प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे.

गोदापात्रात गटारींचे पाणी सोडू नये यासाठी पंचवटी प्रभाग समितीच्या मासिक सभेत नगरेसवक अधिकाऱ्यांना सांगतात. तरीही गटारीचे पाणी नदीत सोडले जात आहे. निसर्गप्रेमींनी याबाबत आवाज उठवूनही हे प्रकार थांबलेले नाहीत. तपोवनाच्या परिसरात या दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास येथे येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना सहन करण्याची वेळ येते. याकडेही दुर्लक्ष महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

नदीच्या पात्रात गटारीचे पाणी सोडणे चुकीचे आहे. या पाण्यामुळेच पाणवेलींची वाढ होत असते. पाणवेलीचा थर काही एकाएकी जमा होत नाही. पाण्यावर हिरवा थर दिसताच तो मनपाने काढल्यास ही समस्या सुटू शकेल.

निशिकांत पगारे, निसर्गप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भंगार बाजारात ‘धावपळ’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

न्यायालयाने अनधिकृत भंगार बाजार हटविण्याबाबत महापालिकेने कळविल्यानंतर भंगार विक्रेत्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. यात अनधिकृत भंगार बाजारात स्वतःला नेते म्हणवून घेणारे बहुतांशजण गायब झाले आहेत. तर सर्वच राजकीय पक्षांनी भंगार विक्रेत्यांकडून चांगलीच माया जमवली होती. त्यांनी मात्र सद्यस्थितीत भंगार बाजाराकडे कानाडोळा करणेच पसंत केले आहे. महापालिकेने भंगार बाजार हटविण्याबाबत ठिकठिकाणी जाहीर नोटीस लाऊनदेखील काही भंगार विक्रेते जणू काहीच होणार नाही, अशा रुबाबात सर्रासपणे व्यवसाय करताना दिसत आहेत.

अनधिकृत भंगार बाजार हटविण्याबाबत अनेकदा पक्षांसह शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी तीव्र लढा उभारला होता. यामध्ये पक्षांनी जरी माघार घेतली होती, परंतु, माजी नगरसेवक दातीर अनधिकृत भंगार बाजार हटविण्यासाठी न्यायालयीन लढा लढतच राहिले होते. बाजार हटविण्याबाबत महापालिकेने अंबड-लिंकरोडवर ठिकठिकाणी जाहीर इशारा दिल्याच्या नोटीस फलकाद्वारे प्रसिद्ध केल्या आहेत. यामुळे भंगार विक्रेत्यांनी आता काय करावे, यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे. आता न्यायालयानेच अनधिकृत भंगार बाजार हटविण्याबाबत आदेश केले आहेत. दुसरीकडे अनेक पक्षांना भंगार बाजार हटवू नये यासाठी आर्थिक गंगाजळीही पुरविण्यात आली होती. तर काही भंगार विक्रेते मात्र जणू काहीच होणार नाही, अशाच रुबाबात आहेत. आता महापालिकेने पुढील वर्षी भंगार बाजाराचा हटविण्याचा विडा घेतल्याने अनेकांनी मात्र त्याची धास्ती घेतली आहे.

पूर्णत्वाचा दाखला नाही

भंगार बाजाराची जागा घरकुलांसाठी होती. परंतु, अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या बाजारात भंगार विक्रेत्यांचीच दुकाने अधिक आहेत. यात अनेकांनी राहण्यासाठी बांधकामाची परवानगी महापालिकेकडे मागितली होती. ती मनपाने दिली, मात्र बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला नसल्याने रहिवाशीदेखील आता धास्तावले आहेत.

आर्थिक गंगाजळीने वाढला भंगार बाजार

सातपूर व अंबडला औद्योगिक वसाहतीची स्थापना झाल्यावर सातपूरला नंदिनी नदीच्या किनारी महापालिकेच्याच जागेवर भंगाराची दुकाने थाटली होती. यानंतर अंबड व सातपूर भागात कारखान्यांचे मोठे जाळे पसरल्याने अनधिकृत भंगार बाजाराची व्याप्ती वाढतच गेली. विशेष म्हणजे, दर पाच वर्षांनी महापालिकेच्या सत्तेत येणाऱ्यांना भंगार बाजारातून आर्थिक गंगाजळी मिळत असल्याने अनधिकृत भंगार बाजार हटविण्यात महापालिका अयशस्वी ठरली होती. आता लवकरच महापालिकेकडून या बाजारावर हातोडा पडणार हे निश्चित.

नगरसेवकांचीही दुकाने

या भंगार बाजारात अनेक आजी-माजी नगरसेवकांची भंगाराची दुकाने आहेत. यात सर्वच नगरसेवकांनी भंगाराची दुकाने भाड्याने दिली असल्याने त्यांचीदेखील बोलती बंद झाली आहे. राणेनगर येथील एका माजी नगरसेवकाने तर चक्क आरक्षण असलेली जागा विकत घेत लाईनीत गाळे उभारून भाड्याने दिले आहेत. यामुळे पैसै कमविण्यासाठी नगरसेवक वाट्टेल तो मार्ग निवडत असल्याचे समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहकदिनी कॅशलेस व्यवहाराचे धडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

तहसील कार्यालयात रविवारी (दि. २५) ग्राहक दिन कॅशलेस व्यवहार मार्गदर्शनाने साजरा करण्यात आला. त्र्यंबकेश्वर ग्राहक पंचायत आणि तहसील कार्यालय यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकारी सीमा पहाडीया यांच्या कॅशलेस व्यवहार करण्याची गरज तसेच नेट बँ‌किंग करताना घेण्याची दक्षता याबाबत मार्गदर्शन केले. या वेळी तहसीलदार महेंद्र पवार, ग्राहक पंचायत जिल्हा सदस्य अमर सोनवणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. ‘मटा’ ने प्रसिद्ध केलेले बंद एटीएम वृताचेही पडसाद या कार्यक्रमात उमटले. याबाबत दखल घेऊन तहसीलदार महेंद्र पवार यांनी सूचना दिल्या. तहसीलदार महेंद्र पवार यांनी सरकारच्या सेवा आता ऑनलाइन होत असल्याचे सांगत यामध्ये १५ जानेवारीनंतर यामध्ये परिवर्तन होणार आहे, असे सांगितले. डॉ. दिलीप जोशी यांनी ग्राहक चळवळीबाबत मार्गदर्शन केले.

तक्रारींचा पाढा

या कार्यक्रमात सुनीता भुतडा यांनी त्र्यंबक शहरात आधार कार्ड नोंदणीसाठी शंभर रुपये घेत असल्याची तक्रार केली. अशाप्रकारे आधार कार्डासाठी पैसे देण्याची गरज नाही, असे तहसीलदारांनी सांगितले. तसे फलक शहरात लावणार असल्याचेही ते म्हणाले. विजय पुराणिक यांनी ग्रामस्थांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यात यावी, याबद्दल मत व्यक्त केले. नायब तहसीलदार मोहन कनोजे यांनी दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी होणाऱ्या लोकशाही दिनी नागरिकांनी तक्रारी कराव्यात, असे आवाहन केले. प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र पेंडोळे यांनी एसटी बस सेवा तसेच बस स्थानकांची परिस्थिती सुधारण्यात यावी, अशी मागणी केली.


मालेगावला ग्राहक दिन

मालेगाव : राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन तहसील कार्यालय येथे तहसीलदार डॉ. सुरेश कोळी यांच्या अध्यक्षतेखाली शहर ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष हरिश मारू यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. याप्रसंगी नायब तहसीलदार व्ही. डी. पाटील, तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, एस. टी. महामंडळाचे बच्छाव, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अमर शेवाळे, ग्राहक पंचायतीचे सदस्य, नागरिक उपस्थित होते. यावेळी ग्राहकांनी ग्राहक संरक्षण कायद्याचा उपयोग करून जागृत राहून खरेदी करत रितसर बील घ्यावेत, असे आवाहन मारू यांनी केले. शासकीय सेवा घेण्यामध्ये काही अडचण येत असल्यास, ग्राहक सेवांमध्ये त्रुटी असतील तर लोकशाही दिनी तक्रार दाखल करू शकतात, असे आवाहन यावेळी उपस्थितांना करण्यात आले.

निफाड तहसीलला कार्यक्रम

निफाड : येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. २५) तहसील कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी निवासी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. वसंत दंडवते यांनी प्रस्तावना केली. याप्रसंगी किरण जोशी यांनी ग्राहकांचे हक्क समजावले. प्रकाश महाले यांनी आभार व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारताची तिन्ही दले आतून पोखरलेली!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

२००३ नंतर केंद्र सरकारकडून नौसेना, वायुसेना आणि भूदलाला कोणताही सपोर्ट केला नसल्याने ही तिन्ही दले आतून पोखरली गेली आहेत. युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास मोठा बाका प्रसंग भारतावर येण्याची शक्यता असल्याचे प्रतिपादन संरक्षण व सामाजिक विषयातील तज्ज्ञ, ज्येष्ठ पत्रकार नितीन गोखले यांनी केले.

प्रमिलाबाई मिरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही रामकृष्ण मिरजकर व प्रमिलाबाई मिरजकर स्मृती समारोहानिमित्त दोन दिवसीय कार्यक्रम झाले. या वेळी ‘भारतीय संरक्षणसिद्धता : माध्यमांचा कलकलाट व वास्तव’ या विषयावर गोखले यांचे व्याख्यान झाले.

गोखले म्हणाले, की आयसिस, अल् कायदा यांसारखे धोके भारताला आहेच, मात्र अंतर्गत धोक्यांचाही विचार करण्याची गरज आहे. त्यात नक्षलवाद मोठ्या स्वरूपात फोफावतो आहे. त्याचा विचार सरकार कधी करणार आहे, असा सवालही गोखले यांनी केला. सैनिकाला सीमेवरची सिद्धता असणे हा मुद्दा आहेच, परंतु त्यांना शस्त्रसाठा, बुलेटप्रूफ जॅकेट या गोष्टी दिल्या जाताहेत का हे बघणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. आर्थिक स्थैर्य, सामाजिक विषयात शांतता, यातही समतोल साधण्याची गरज आहे, असे गोखले म्हणाले. डॉ. शिरीष सुळे, वेदशास्त्रसंपन्न यशवंत पैठणे, प्रा. संजय मिरजकर, अॅड. विलास लोणारी या वेळी उपस्थित होते. आपापल्या व्यवसायात वैशिष्ट्यपूर्ण प्रदीर्घ कामगिरी केलेल्या या महनीय व्यक्तींचा सत्कार गोखले यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात मुख्यत्वे सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून नि:स्पृह, प्रदीर्घ सेवा करणारे नाशिक येथील ज्येष्ठ मानसरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष सुळे, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. विलास लोणारी, वेदशास्त्रसंपन्न यशवंत पैठणे या त्रयींचा नाशिककरांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी तिघांनीही आपापल्या काळातल्या आठवणी जागवल्या. साहू अतुलकुमार आणि स्वराली शिंगणे या विद्यार्थ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. प्रा. संजय मिरजकर यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्या इंटरनॅशनलमध्ये नाताळाची धूम

$
0
0

ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, स्नो मेन वेधले लक्ष

म. टा. वृत्तसेवा, येवला

शहरातील विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये शनिवारी (दि. २४) साजरा झालेला नाताळ सण सर्वांचेच लक्ष वेधून गेला. यात ‘सांताक्लॉज’ची वेशभूषा साकारलेले शाळेच्या मोठ्या वर्गातील काही मुले, इतर शाळकरी छोट्या चिमुकल्यांनी परिधान केलेल्या ख्रिसमस कॅप अन् ख्रिसमसच्या अनेक गीतांच्या चालीवर ‘सांताक्लॉज’सह सर्वांनीच धरलेला नृत्याचा फेर याने स्कूलचा हा नाताळ सण उपस्थितांना चांगलाच भावून गेला.

विद्यार्थ्यांमध्ये सण-उत्सवांची गोडी वाढावी, त्यांना त्याचं महत्त्व कळावं हे या उत्सवामागचं कारण होते. यावर्षीही या शाळेतील विद्यार्थ्यांनी नाताळ सणाची अतिशय उत्साहात तयारी केली. ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, स्नो मेन हे सर्व काही विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केले. सांताक्लॉजने मुलांना वेगवेगळ्या प्रकारची खेळणी व चॉकलेट इत्यादीचे वाटप केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश पटेल, प्राचार्या शुभांगी शिंदे व सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

अजिंठा शाळेत धमाल

मालेगाव : शहरातील अजिंठा मंडळ प्राथमिक विद्यालयात रविवारी (दि. २५) ख्रिसमस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी ख्रिसमस ट्री तयार केला होता. तसेच काही विद्यार्थ्यांनी सांताक्लॉजची वेषभूषा करून सर्व विद्यार्थ्यांना खेळणी व चॉकलेट वाटप केले. या वेळी विद्यार्थ्यांसमोर ख्रिसमसचे महत्त्व राकेश अहिरे व जयवंत खैरनार यांनी विषद केले. विद्यार्थ्यांनीदेखील आपल्या लाडक्या सांताक्लॉजसोबत गायन, नृत्य करीत

धमाल केली. याप्रसंगी मुख्याध्यापक दीपक अहिरे, नीलेश लिंगायत यांनी विद्यार्थ्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्यात. मनीषा अहिरे, शीतल श्रीखंडे, शारदा बैरागी आदींसह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवोदितांनी जागतिक व्यासपीठावर लेखन करावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लेखकांनी प्रत्येक स्पर्धेत सहभागी व्हायलाच हवे, त्याशिवाय त्याला आपण कोठे आहोत हे कळणार नाही. नाशिकचे साहित्य क्षेत्र नावाजलेले आहे. प्रस्थापित व नवोदित लेखकांनी जागतिक व्यासपीठावर लेखन करावे, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी केले.

महाराष्ट्र टाइम्स व साहित्यप्रसार केंद्र प्रतिष्ठानतर्फे ‘मी लेखक’ या स्पर्धेची कार्यशाळा ख्यातनाम लेखिका माधुरी माटे व अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाली. संदीप कुलकर्णी यांनी लेखकांना लिखाणाबद्दलच्या काही टिप्स दिल्या. रेषा मल्टिअॅक्टिव्हिटी सेंटर येथे ही कार्यशाळा झाली. यावेळी ५५ हून अधिक लेखक उपस्थित होते.

साहित्यप्रसार केंद्र प्रतिष्ठानचे विश्वस्त मिलिंद कुलकर्णी यांनी कथेविषयी मार्गदर्शन केले. लेखकांनी पुढील कथा लिहावी व जागतिक व्यासपीठात आपला सहभाग नोंदवावा, असेही कुलकर्णी म्हणाले. भविष्यकाळात आणखी कथा लिहून नाशिकचे नाव जागतिक व्यासपीठावर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात बालदिनानिमित्त लहान मुलांच्या कथा व कविता स्पर्धेचे पारितोषिक वितरण माधुरी माटे व संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वर पर्यटकांनी गजबजले

$
0
0

नोटाबंदीने ओसरलेला गर्दीचा फिव्हर पुन्हा वाढला

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

वर्षअखेर आणि नाताळाच्या सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वर गजबजले असून नोटाबंदीनंतर ओसरलेला गर्दीचा फिव्हर आता काहीसा चढायला लागला आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत अद्याप गर्दी कमीच आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात पूर्व बाजूस दर्शन रांगा लागल्या आहेत. रविवारी, तळपत्या उन्हात भाविक हैराण झालेले दिसून आले.

देवस्थान ट्रस्टने येथे कापडी पेंडॉल उभारला मात्र तो अत्यंत तुटपुंजा असल्याने बहुतांश भाविक उन्हातच उभे होते. देणगी दर्शन उत्तर दरवाज्याने सुरू होते. यामुळे रांगेतील भाविकांना अधिक वेळ उन्हात थांबावे लागल्याने याबाबत संताप व्यक्त होत होता. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही तसेच स्वच्छतागृहाच्या दुर्गंधीने भाविक त्रस्त होत आहेत.

त्र्यंबकेश्वराचे दर्शन भाविकांना भुर्दंड देणारे ठरते आहे. त्यात नगरपालिका वाहनांना टोल आकारत आहे. तसेच मोबाइल, बॅग्स ठेवण्यासाठीही आकारणी केली जात आहे. त्यामुळे खासगी वाहनाने आलेले भाविक ५० रुपये पावती देऊन शहरात प्रवेश करतात. त्यानंतर मोबाइल व बॅग लॉकरमध्ये ठेवण्यासाठी १० ते २० रुपये मोजावे लागतात.

मंदिरात जातांना श्रद्धेपोटी भाविक प्रसाद, फुले, नारळ घेतात. रांगेत उभे राहिल्यानंतर किमान २ तास उभे राहावे लागल्याने अनेक अनेक अडचणी निर्माण होतात. मंदिरातून बाहेर पडताना दक्षिण दरवाजाने बाहेर आल्यानंतर आपल्या वस्तूंसाठी जास्त अंतर जावे लागते. तसेच त्याठिकाणी जाण्याचा रस्ता दाखवेल असा साधा फलकही येथे लावण्यात आलेला नाही, त्याने पर्यटकांची तारांबळ उडते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंधाऱ्यांसाठी साडेतीन कोटी मंजूर

$
0
0

गलाठी व दोध्याड नदींवर होणार सिमेंट काँक्रिट बंधारे; राज्यमंत्री दादा भुसेंची माहिती

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील नदी पुनर्जीवन योजनेंतर्गत गलाठी व दोध्याड नदींवर बंधारे बांधण्यासाठी ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली. या निधीमुळे परिसरातील शेतातील सिंचनाचा, पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत नदी, ओढा, नाला पुनर्जीवन करण्यास त्या गावातील रहिवांशांनी केलेल्या योगदानास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारमार्फत निधीची तरतूद केली जाते. या अंतर्गत तालुक्यातील गलाठी व दोध्याड नदींच्या पुनर्जीवनासाठी या नदींवर सिमेंट नाला बांधण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. यामध्ये गलाठी नदीवरील बंधाऱ्यांसाठी २ कोटी १२ लाख रुपये तर दोध्याड नदीवरील आणि जळगाव (पिंपळगाव) यांसाठी रु.१ कोटी ४८ लाख् रुपयाच्या निधीस मान्यता मिळाली आहे.

या निधीमुळे परिसरातील शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. परिसरात सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पाण्याची पातळीतही वाढ होणार आहे. त्यामुळे काही अंशी पिण्याच्या पाण्यासोबत सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे, असेदेखील राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. या अगोदरदेखील तालुक्यातील परसूल, कान्होळी, बोरी व सुकी या नदींच्या पुनर्जीवनासाठी १४ कोटी रुपये मंजूर केले असून, सदर बंधाऱ्यांची कामे सुरू आहेत.

१००० लाभार्थ्यांचे लाभ मंजूर

महाराजस्व अभियान, सप्टेंबर २०१६ अंतर्गत समाधान योजना तालुक्यात राबविण्यात आली. यात ३ हजार लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात आला होता. यानंतर योजना समितीची बैठक नुकतीच पार पडली. त्या बैठकीत इंदिरागांधी योजना-१३०, श्रावणबाळ योजना-५९०, संजय गांधी योजना-२८० असे एकूण सुमारे १००० लाभार्थ्यांचे लाभ मंजूर करण्यात आले. याप्रसंगी प्रमोद पाटील, तहसीलदार डॉ. सुरेश कोळी, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‌कैद्याकडून मारहाण

$
0
0

ना‌शिकरोड कारागृहातील प्रकार

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात झडतीदरम्यान मोबाइल आढळून आलेल्या मोक्का कायद्याखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने हल्ला करून एका तुरुंगाधिकाऱ्याला जखमी केले. संबंधित कैद्याने तुरुंगातून बाहेर गेल्यावर एकेकाला बघून घेण्याची धमकीही दिल्याने तुरुंग प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.

तुरुंगाधिकारी संतोष खरतोडे व नरेंद्रकुमार आहिरे हे दोघे अधिकारी खोली क्रमांक ७२ जवळून जात असताना या खोलीतील जन्मठेपेचा कैदी वेन्सील रॉय मिरिंडा उर्फ मॉण्टी हा काही संशयास्पद हालचाली करीत असताना आढळून आला. त्याने दोघांना पाहताच सॅमसंग कंपनीचा मोबाइल फोडून शौचाच्या भांड्यात टाकला. या दोघा अधिकाऱ्यांनी मॉण्टीला प्रदीपकुमार बाबर या तुरुंगाधिकाऱ्यांसमोर हजर केले. बाबर यांनी या कैद्याला वरिष्ठ तुरुंगाधिकारी फड यांच्यासमोर हजर करून त्याच्याकडे आढळून आलेल्या मोबाइल फोनबाबत चौकशी सुरू केली. त्याने त्यांच्यावरच हल्ला केला. या हल्ल्यात बाबर यांच्या हनुवटी व हाताच्या बोटाला दुखापत झाली.

पुन्हा मोबाइल आढळले

तुरुंगाधिकारी संतोष खरतोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंडळ क्रमांक ८, यार्ड क्र.१ मधील खोली क्रमांक ७६ मधील कैदी संजय रणधीर पवार याच्याकडेही खाचेत दडवलेला सॅमसंग कंपनीचा मोबाइल व त्यात रिलायन्स कंपनीचे सिमकार्ड आढळून आले. मोबाइलची संख्या ३२ वर पोहोचली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images