Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सावित्रीच्या लेकींसाठी जागर

$
0
0

घरोघरी जाऊन मुलींच्या नावाच्या लावल्या पाट्या

म. टा. वृत्तसेवा, येवला

भारतीय स्त्री शिक्षणाच्या आद्यप्रवर्तक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मंगळवारी (दि. ३) ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. यावेळी तालुक्यातील चिचोंडी बुद्रूक येथील प्राथमिक शाळेच्या गुरुजींनी राबविलेला अनोखा उपक्रम कौतुकास्पद ठरला. या प्राथमिक शिक्षकांनी गावातील सावित्रीच्या लेकींचा अनोख्या पद्धतीने जागर करताना गावात घरोघरी जाऊन त्या घरातील मुलीच्या नावाची पाटी घरावर लावली.

सावित्रीबाई फुले जयंती येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रूक गावात उत्साहात अन् आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर पायमोडे तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच संगीता पवार, सदस्या सविता

धिवर, पुष्पा गुंजाळ, मुख्याध्यापिका रजनी पाटील होत्या. याप्रसंगी स्त्रीभ्रूण हत्या, स्त्रियांवर होणारे अत्याचार, मुला व मुलींमध्ये केला जाणारा भेद, हुंडाबळी हे समाजातील चर्चेतील चित्र मन अगदी सुन्न करणारे आहे. सध्याला सरकार स्त्रियांसाठी विविध योजना राबवून त्यांना संरक्षण देताना प्रत्येक ठिकाणी मुलींच्या पाठीशी उभे आहे. मात्र खऱ्या अर्थाने स्त्रीला मान-सन्मानाने पुढे नेण्यासाठी आज नितांत गरज आहे, असा सूर यावेळी उमटला.

शाळेतील मुलींच्या नावाच्या पाट्या त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाला लावून जयंती साजरी करण्यात आली. या आगळ्या वेगळ्या उपक्रमात पुढील दिवसात गावातील सर्व वयोगटातील व शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींच्या घरावर त्यांच्या नावाची पाटी लावण्यात येणार आहे.

शिक्षकांनी सामाजिक जाणिवेतून हा संदेश मुलींच्या नावाची पाटी दरवाजाला लावून समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य कौतुकास्पद आहे.

- राजुबाई गाडे, सरपंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहतूक कोंडीवर मार्गबदलाचा पर्याय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतूक कोंडी व अपघाताच्या घटना टाळण्यासाठी शहर पोलिसांनी सीबीएस, मेहेर सिग्नल तसेच मायको सर्कल येथील वाहतुकीमध्ये काही बदल केले आहेत. वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलिसांनी याठिकाणी नो एंट्री तसेच वन-वेचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे.

सीबीएसपासून कान्हेरेवाडीत जाणाऱ्या, गोळे कॉलनीतून मेहेर सिग्नलकडे येणाऱ्या तसेच मायको सर्कलपासून होलाराम कॉलनीकडे येणाऱ्या रस्त्यांबाबत हे नियम असून, गुरुवारपासून सदर नियमांची अंमलबजावणी होत आहे. रस्ते वापराबाबत होणाऱ्या बदलांबाबत शहर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हरकती व सूचना मागवल्या होत्या. मुदतीत आलेल्या थोड्याफार हरकती निकाली काढत वाहतूक पोलिसांनी आपला प्रस्ताव कायम केला. या तिन्ही रस्त्यांचा वापर करण्यासाठी वाहनचालक धोकादायक पध्दतीने रस्ता पार करतात. त्यातून स्वतःसह दुसऱ्याचाही जीव धोक्यात येतो. तसेच वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होते. या पार्श्वभूमीवर सदर बदल लागू करण्यात आले असून, वाहनचालकांनी त्याची दखल घ्यावी, असे आवाहन सहायक पोलिस आयुक्त जयंत बजबळे यांनी केले आहे.

असे आहेत बदल

सीबीएसकडून कान्हेरवाडीमार्गे काल‌िदास कलामंदिराकडे जाणारी वाहतूक एकेरी असणार आहे. कालिदास कलामंदिराकडून कान्हेरेवाडीमार्गे सीबीएसकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असून, संबंध‌ित वाहनचालकांनी शालिमार मार्गे किंवा किटकॅट कॉर्नर येथून त्र्यंबक सिग्नल येथून सीबीएसकडे यावे.


शरणपूर पोलिस चौकी सिग्नलकडून मायको सर्कलकडे जाणाऱ्या वाहनचालकांना होलाराम कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याने वाहने नेता येतील.

जलतरण, चांडकसर्कल, उंटवाडीरोडकडून मायको सर्कलवर येणाऱ्या वाहनांना रस्ता क्रॉस करून सरळ होलाराम कॉलनी रोडकडे जाता येणार नाही. अशा वाहनांना प्रवेश बंद आहे. या वाहनांना शरणपूर पोलिस चौकी सिग्नलवरून वळूनच यावे लागेल.

मेहेर हॉटेललगतच्या मार्गावरील एलआयसी ऑफ‌िस, पोस्ट ऑफ‌िसकडून मेहेर सिग्नलकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आले आहेत.

मेहेर सिग्नल बाजूकडून बिझनेस बँकेजवळून गोळे कॉलनीत जाणाऱ्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी एकेरी मार्ग करण्यात आला आहे. गोळे कॉलनीतून या मार्गाने बाहेर पडणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

गोळे कॉलनी बाजूकडून बिझनेस बँकेजवळून मेहेरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी गद्रे मंगल कार्यालयाकडून अथवा पिपल्स बँकसमोरील बँकेसमोरील मार्गाचा वापर करून गंगापूररोड जाणाऱ्या रस्त्यांचा वापर करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीत आता ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम’!

$
0
0


fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet @FanindraMT

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने खासगी बसेसच्या तुलनेत आपणही मागे नाही हे दाखवून देण्यासाठी राज्यातील सर्व बसेसला ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम’ बसवण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानकातून निघालेली बस कोणत्या वेळी कुठे आहे, याची माहिती सेंट्रल कंट्रोल रुमला समजण्यास मदत होणार आहे. कालांतराने प्रवाशांच्या नातेवाईकांनादेखील संगणकामार्फत पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अपघात रोखण्यासाठी व बसेसची स्थिती जाणून घेण्यासाठी राज्यातील सर्व बसेसला ‘व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम’ बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सिस्ट‌ीम टप्प्याने बसवली जाणार असून पहिल्यांदा शिवनेरी, हिरकणी त्यानंतर साधी बस अशा क्रमाने लावण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील काम सुरू करण्यात आले असून, सहा महिन्यांत राज्यातील सर्व बसेसची माह‌िती संगणकावर जाणून घेणे शक्य होणार आहे. अनेकदा एखादी बस एका स्थानकावरुन सुटल्यानंतर त‌िची स्थिती समजत नाही. मात्र आता ती जाणून घेणे या माध्यमातून शक्य होणार आहे. नाशिक पुणे हे अंतर पाच तासांत कापणे आवश्यक आहे. मात्र सिझनच्या काळात या मार्गावर वाहतूक जास्त असल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास सात तासांचा अवधी लागतो. अशा वेळी एका मार्गावरुन सुटलेली बस कोणत्या ठिकाणी आहे, याचा शोध लागत नाही. त्यामुळे ठराविक अंतर कापण्यास अवधी का लागला, याचा शोधही या सिस्टीमद्वारे घेणे सोपे जाणार आहे.

चालकांच्या मनमानीला चाप

बसेस कोणत्या मार्गावर, कुठे थांबवायच्या याची जागा महामंडळाने निश्चित केली आहे. परंतु बसचालक मनात येईल त्या ठिकाणी व त्यांना हव्या तितक्या वेळ वाहने थांबवत असतात. त्यावर कुणाचे नियंत्रण नसते. हे नियंत्रण या सिस्टीमद्वारे करता येणार आहे. एखाद्या ढाब्यावर बस जास्त वेळ का थांबली, याचा जाब चालकाला विचारता येणार आहे. तसेच एखाद्या बसचा अपघात झाल्यास त्या बसची स्थिती जाणून घेणे शक्य होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता सरकारी वाइन फेस्टिव्हल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशाची वाइन कॅपिटल असलेल्या नाशिकमध्ये वाइन पर्यटनाला चालना देऊन राज्याच्या पर्यटन विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारच वाइन फेस्टिव्हल भरविण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी चाचपणी केली असून, त्याची घोषणा शुक्रवारच्या नाशिक दौऱ्यात ते करण्याची शक्यता आहे.

कृषीपासून ते पर्यटनापर्यंत विविध प्रकारच्या क्षमता असलेला वाइन उद्योग बहरण्यासाठी आता पर्यटन विभागच सक्रीय होण्याची चिन्हे आहेत. नाशिकमध्ये होणारा ‘सुला फेस्ट’ हा आता देशातील महत्त्वाच्या पर्यटन महोत्सवांपैकी एक झाला आहे. केवळ एका वायनरीला एवढे यश मिळते, तर वाइन कॅपिटलमध्ये असलेल्या तब्बल ३५ ते ४० वायनरींच्या माध्यमातून सरकारच्यावतीने वाइन फेस्टिव्हल आयोजित केल्यास त्याचा मोठा फायदा राज्याला होऊ शकतो, याची चाचपणी करण्यात आली आहे. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी त्यासंदर्भात विविध तज्ज्ञांशी चर्चाही केली आहे. विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले, नाशिकमधील वायनरींचे संचालक, वाइन उद्योगाशी संबंधित व्यक्ती, पर्यटन क्षेत्रातील जाणकार यांच्याशी त्यांनी याबाबत सल्लामसलत केली आहे. गेल्या काही वर्षांपासून ऑल इंडिया वाइन प्रोड्युसर्स असोसिएशन, इंडियन ग्रेप प्रोसेसिंग बोर्ड आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या वतीने नाशिकमध्ये वाइन फेस्टिव्हल आयोजित केला जात होता. गेल्या वर्षी त्यात खंड पडला. पण, आता हाच फेस्टिव्हल राज्याच्या पर्यटन विभागाकडून आयोजित करण्याचा विचार पर्यटनमंत्र्यांकडून केला जात आहे. या फेस्टिव्हलचे देशभर ब्रँडिंग करुन पर्यटकांना आकर्षित केले तर नाशिकसह शिर्डी, त्र्यंबकेश्वर, मुंबई या परिसरात पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.

वाइनविषयी सगळेकाही

वाइन कशी तयार होते, ग्रेप क्रशिंग म्हणजे काय, वाइन टेस्टिंग अशा विविध बाबींचा समावेश या फेस्टिव्हलमध्ये राहणार आहे. विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, जेवणाचे विविध प्रकार, पर्यटकांसाठी निवासी व्यवस्था याचेही आयोजन केले जाणार आहे. भव्य स्वरुपात ‍वाइन फेस्टिव्हल आयोजित केल्याने वाइन उद्योग आणि वाइन पर्यटनासह राज्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


वाइन पर्यटनाला चालना देण्याबाबत पर्यटनमंत्री आग्रही आहेत. त्यानुसार त्यांनी आमच्यासह विविध जाणकारांशी चर्चा केली आहे. वाइन पर्यटनाला चालना देण्यासाठी ते उपयुक्त निर्णय ते घेतील, असा आम्हाला विश्वास आहे.

- दत्ता भालेराव, अध्यक्ष, तान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यावर फेकला अधिकाऱ्याने बूट!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नोटाबंदी निर्णयाला पन्नास दिवस उलटूनदेखील तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. उलट आता त्यांना बँक कर्मचाऱ्यांच्या उद्दामपणाचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील दहीदी येथील सोपान वाघ हे करंजगव्हाण येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत कांदा विक्रीचे पैसे काढण्यासाठी गेले असता बँकेचे रोखपाल अभिजीत बोरसे यांनी बूट मारुन फेकत त्यांना धक्काबुक्की केली.

याबाबत शेतकरी वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन घडलेला प्रकार सांगितला. ते दोन डिसेंबरला सकाळी अकरापासून रांगेत उभे होते. पत्नी आजारी असल्याने उपचार व औषधासाठी त्यांना पैशांची नितांत गरज होती. बँकेत पती आणि पत्नी असे त्यांचे संयुक्त खाते आहे. ते ११ ते २ पर्यंत रांगेत उभे होते. त्यांनतर संबंधित अधिकारी जेवणाला गेला. परत आल्यानंतर रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांना पैसे संपले आहेत, असे सांगितले. तेव्हा वाघ यांच्याजवळील स्लीपवर १२ क्रमांकाचा शिक्का मारून उद्या या असे सांगण्यात आले. वाघ पुन्हा दुसरऱ्या दिवशी बँकेत गेले असता पैसे मिळणार नाहीत, पत्नीला घेवून यावे असे सांगितले. यावर वाघ यांनी रोखपाल बोरसे यांना ‘आपण दोन दिवसापूर्वीच हे का नाही सांगितले’, अशी विचारणा केली असता त्यांनी थेट बूट मारून फेकला व धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली, असा आरोप वाघ यांनी केला आहे.

दरम्यान हा सर्व प्रकार बँकेच्या सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाला असून, यावेळी ३० ते ४० ग्राहक उपस्थित होते. हक्काचे पैसे घेण्यासाठी देखील इतका अपमान होत असल्याने क्षणभर आत्महत्येचा देखील विचार मनात आला होता. मात्र वडनेर खाकुर्डी पोल‌िस ठाण्यात आपण याबाबत तक्रार केली असून, संबंधित रोखापालास निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली अन्यथा आत्महत्या करू असा देखील इशारा त्यांनी यावेळी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन महिने उलटूनही मोबदला नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
नोटाबंदी निर्णयानंतर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या शेतमालाची रक्कम गेल्या दोन महिन्यांपासून अदा करण्यात न आल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी याबाबत गुरुवारी येथील बाजार समिती कार्यालयात सचिव अशोक देसले यांची भेट घेऊन याबाबत विचारणा केली. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले होते.

केंद्र शासनाच्या नोटाबंदी निर्णयानंतर येथील बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या शेतमालाची रक्कम मिळण्यास अडचणी निर्माण होत असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सदर विक्री केलेल्या शेतमालाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चेकद्वारे वर्ग करण्यात येत होती. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या विक्री केलेल्या शेतमालाची रक्कम अद्याप ही खात्यात वर्ग न झाल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली असून, या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या सचिवांना याबाबत जाब विचारीत धारेवर धरले.

येथील बाजार समितीकडून तालुक्यातील सवंदगाव, मालनगाव, सातमाने, निबायाती, रोंझाने, वळवाडे आदी गावातील दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यात विक्री केलेल्या शेतमालाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांनी ज्या व्यापाऱ्यांना माल विक्री केला त्यांनी रक्कम अदा केल्याच्या पेड पावत्यादेखील शेतकऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे पेड पावती मिळवून रक्कम हातात न मिळाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप होत आहे. जिल्ह्यातील अन्य बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या शेतमालाची रक्कम त्यांना तत्काळ मिळत असून, मालेगाव बाजार समितीतच अशी अडचण का? असा देखील प्रश्न यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी विचारला.

.... तो भावूक झाला
रक्कम थकीत असलेल्या शेतकरी बांधावांपैकी वळवाडे येथील रमेश दिंगबर सोनवणे यांचे वडील तीन दिवसापूर्वीच वारले. हे दुःख मागे टाकून रमेश बाजार समिती आवारात रक्कम मिळावी यासाठी चकरा मारत आहेत. वडील देखील ही रक्कम मिळावी यासाठी येवून गेले. त्यांचा मृत्यूनंतरही रक्कम मिळत नसल्याचे सांगताना ते भावूक झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रांताधिकारी वासंती माळींसह २३ जणांवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवीन अविभाज्य शर्तीच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीची परवानगी देण्याचा अधिकार नसताना तहसीलदारांनी परवानगी देत सरकारची तब्बल पावणेचार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी येवल्याच्या प्रांत वासंती माळी, नांदगावचे तत्कालीन तहसीलदार सुदाम महाजन यांच्यासह २३ जणांवर नांदगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अँटी करप्शन ब्यूरोने (एसीबी) या प्रकरणी तक्रार दिला असून, यामुळे महसूल विभागासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

एसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत भामरे यांनी नांदगाव पोलिस स्टेशनला या प्रकरणी फिर्याद दिली असून, त्यांच्या तक्रारीनुसार, २०१५ मध्ये तत्कालीन तहसीलदार सुदाम महाजन यांनी अधिकार नसताना जवळपास ३०० एकरच्या आसपास नवीन अविभाज्य शर्तीच्या जमीन खरेदी-विक्रीस परवानगी दिली. यामुळे सरकारचा ५० टक्के महसूल बुडाला. सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी येथील जयराम दळवी यांच्या तक्रार अर्जाचा आधार घेत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, पोलिस निरीक्षक हेमंत भामरे, हवालदार संजय पगारे, पोलिस शिपाई अमोल निकुंभ यांनी पावणेचार कोटी रुपयांच्या फसवणुकीचा तपास केला.

यांच्याविरुद्ध गुन्हा

या बेकायदा कामात तहसीलदार महाजन यांच्यासह येवल्याच्या प्रांत वासंती माळी, प्रभारी तहसीलदार प्रणीती दंडिले, दुय्यम निबंधक डी. डी. पंडित, मंडल अधिकारी अशोक शिलावट, एस. के. आहेर, अव्वल कारकून डी. ए. कस्तुरे (जमाबंदी), तलाठी व्ही. पी. सोनवणे, व्ही. बी. बोडके, जयेश मलदुडे, व्ही. पी. गायकवाड यांच्यासह अॅड. शिवाजी सानप, अॅड. प्रशांत सानप (कासारी), नाशिक येथील जयंतीभाई पटेल, भावीन पटेल, मणिबेन पटेल, प्रवीणभाई पटेल, अर्जुन माकानी, शिवलाल माकानी, रंजन माकानी, विनोद माकानी, भारती शहा, पोपट पटेल यांनी वाटा उचलला. या सर्वांविरोधात चौकशीदरम्यान पुरावे समोर आल्याने एसीबीने नांदगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली.

२०१५ मध्ये उघडकीस आले प्रकरण

नवीन अविभाज्य शर्तीच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीची परवानगी देण्याचा अधिकार नसताना महाजन यांनी जवळपास ३०० एकरपेक्षा जास्त जमिनीबाबत परवानगी दिली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जुलै २०१५ मध्ये महाजन यांना सरकारने निलंबित केले. तत्पूर्वी त्यांची सुरगाणा येथे बदली करण्यात आली होती. या कामात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असून, प्रांताधिकारी माळी यांच्यासह सर्वांनी मिळून हे काम केल्याचे एसीबीच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.

प्रातांधिकाऱ्यांची यापूर्वीही चौकशी

या प्रकरणात महत्वपूर्ण ठरलेल्या वासंती माळी यांची कारर्कीद वादग्रस्त ठरली आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये त्यांच्या नावे २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या एकाला येवल्यातून एसीबीने अटक केले होते. वाळूच्या ट्रकसाठी प्रांताधिकारी माळी यांना २० हजार रुपये देण्याची मागणी या संशयिताने केली होती. या प्रकरणी माळींची चौकशीदेखील एसीबीने केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा वर्षांनी मिळाला मदतीचा धनादेश

$
0
0

तुषार देसले, मालेगाव

‘सरकारी काम अन सहा महिने थांब’ असे नेहमीच म्हटले जाते. प्रशासकीय दफ्तर दिरंगाईचा अनुभव सामान्यांना नेहमीच येत असतो. मात्र अपघातात मृत झालेल्या मुलाच्या पालकांना तब्बल सहा वर्षांनंतर मदतीचा धनादेश मिळाला. याप्रकरणातून शासकीय व प्रशासकीय यंत्रणेची असंवेदनशीलताच समोर आली आहे. तालुक्यातील जळगाव (नि) येथील गो. य. पाटील कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा मनमाड मालेगाव रस्त्यावर अपघात झाला होता.

ऑगस्ट २००३ मध्ये इयत्ता १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना शासनाकडून मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आली होती. दरम्यान पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वाहनाला १४ सप्टेंबर २०११ रोजी अपघात झाला होता. यात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता तर ४३ विद्यार्थी जखमी झाले होते. यांनतर मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना या योजनेतून मदत मिळावी यासाठी संस्थेचे अध्यक्ष कै. रोडू आण्णा पाटील, माजी प्राचार्य आर. एम. नरोटे, प्राध्यापक अमोल अहिरे, लेखनिक निबाजी शिंदे, प्राचार्य आर. आर. बागुल यांनी शासन दरबारी यासाठी पाठपुरावा केला. या घटनेनंतर भुजबळ फाऊंडेशनच्या वतीने आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना तातडीने ५० हजार रुपये व जखमी विद्यार्थ्यांना १५ हजार रुपये रोखीने मदत देण्यात आली होती. यासह मनमाड कृबा समितीने देखील मदत देवू केली होती. मात्र शासनाकडून सानुग्रह अनुदानाचा धनादेश मिळण्यासाठी संबंधित पालकांना तब्बल सहा वर्षाचा प्रदीर्घ वाट पहावी लागली. लालफितीच्या कारभाराचा फटका पालकांना सहन करावा लागला. विद्यालयातील एका कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समिती सभापती भरत पवार, डी. एस. गायकवाड यांच्या हस्ते हे धनादेश पालकांना देण्यात आले. पोटच्या मुलांचे अपघातात निधन झाले. तब्बल सहा वर्षांनी हातात पडल्यामुळे पालकांसह विद्यालयातील शिक्षकांच्या मनी त्या अपघाताच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विकास आराखडा पुन्हा लटकला?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन वर्षांपासून नाशिककरांना प्रतीक्षा लागून असलेला नवीन शहर विकास आराखडा अजून तीन महिने लटकणार असून, तो निवडणुकीनंतरच जाहीर होण्याची शक्यता आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने आता आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे या आचारसंहितेच्या काळात हा विकास आराखडा जाहीर होणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विकास आराखड्याची अधिसूचना अद्याप निघाली नसल्याने, तो जाहीर झाल्यास आचारसंहितेचा भंग होणार आहे. त्यामुळे विकास आराखड्याबाबत नाशिककरांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे.

शहर विकास आराखडा व विकास नियंत्रण नियमावली ही दोन दिवसांत प्रसिद्ध होणार असल्याची माह‌िती सूत्रांनी दिली आहे. आराखड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केल्याची माहितीही देण्यात आली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यात पुणे आणि नाशिकचा विकास आराखडा जाहीर केला होता. मात्र, बुधवारी पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता नाशिकमध्ये लागू झाली. यापूर्वीच आराखड्याची अधिसूचना जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, अधिसूचना जाहीर होण्यापूर्वीच आचारसंहिता लागू झाल्याने आता हा आराखडा जाहीर होण्याची शक्यता नसल्याची चर्चा आहे. हा आराखडा आता महापालिका निवडणुका संपल्यानंतरच मार्चमध्ये जाहीर होणार असून, तोपर्यंत विकासकांसह नाशिककरांना या आराखड्याची वाट पाहावी लागणार आहे.

डीपीत गोलमाल

दरम्यान, हा विकास आराखडा मुद्दाम लटकवला गेल्याची चर्चा विकासकांमध्ये आहे. नव्या विकास आराखड्यात मोठ्या प्रमाणावर आरक्षणांमध्ये फेरबदल झाले आहेत. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता होती. तो जाहीर झाल्यास भाजपवर तो बूमरँग झाला असता. त्यामुळे तो निवडणुकीनंतरच जाहीर करण्याचा दबावही मुख्यमंत्र्यांवर होता. वर्षभरापासून मुख्यमंत्र्याकडे प्रलंबित होता. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर तो जाहीर करूनही तो प्रसिद्ध न झाल्याने आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनता बदला घेईल!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

काळा पैसा बाहेर काढला जाईल या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीमुळे शेती व्यवसाय, शेतकरी आणि अर्थव्यवस्था उद््ध्वस्त झाली आहे. कॅशलेस व्यवहार आपल्या देशात अजून शक्य नाही. लोक शांतपणे सहन करतात आणि वेळ आली, की ते त्याचा बदला घेतात, असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला.

जनता वेळेवर बदला घेईल!

पवारांचे मोदी सरकारवर टीकास्र

म. टा. वृत्तसेवा, निफाड
काळा पैसा बाहेर काढला जाईल या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीमुळे शेती व्यवसाय, शेतकरी आणि अर्थव्यवस्था उद््ध्वस्त झाली आहे. कॅशलेस व्यवहार आपल्या देशात अजून शक्य नाही. लोक शांतपणे सहन करतात आणि वेळ आली, की ते त्याचा बदला घेतात, असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला.

किमान तीन वर्षे अर्थव्यवस्था सुरळीत होणार नाही. अशा परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन कोणतीही जात, धर्म न पाहता फक्त शेतकरी हीच जात आणि काळ्या आईशी इमान राखतो तो आपला भाऊबंद समजून आपली सामुदायिक शक्ती दाखवण्यासाठी एक व्हा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले.

पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथे बाजार समितीच्या आवारात गुरुवारी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, नाशिक जिल्हा प्रभारी आमदार जितेंद्र आव्हाड, विनायकदादा पाटील आदी उपस्थित होते.
शरद पवार यांनी खुमासदार शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटबंदीचा समाचार घेतला. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेती अर्थकारण कसे उद््ध्वस्त झाले आहे हे त्यांनी अनेक उदाहरणे आणि स्वानुभवातून पटवून दिले. नोटबंदीने काळा पैसा बाहेर येईल आणि महागाई कमी होईल अशा अनेक अपेक्षा शेतकऱ्यांच्या होत्या. प्रत्यक्षात दोन हजार रुपयांसाठी सर्वसामान्य जनतेला आठ तास रांगेत उभे राहायची वेळ आल्याने जनता आक्रोश करीत आहे. लार्सन टुब्रो कंपनीने ३१ हजार, तर व्हिडिओकॉन कंपनीने २२०० कामगार कमी केले. उद्योगधंदे बंद पडले आहेत. शेतीमालाला भाव नाही. कामगार उपाशी मरत आहेत. हे सगळे नोटबंदीचे परिणाम आहेत. आपला पैसा आपल्याला खर्च करता येत नाही हे सर्वसामान्यांचे दुःख आहे. टाटा, अंबानी, अदानी यांसारख्या धनाढ्य लोकांना त्याचा कोणताही फरक पडला नाही ही वस्तुस्थिती आहे.

कांदा, टोमॅटोला भाव नाही. माझ्या स्वतःच्या शेतातील दोन एकर वांगी मातीमोल भावाने विकल्याने ते नांगरण्याची वेळ माझ्यावर आली. तेव्हा तुमचे काय, असा प्रश्नही पवार यांनी केला. कॅशलेस व्यवहार करा असे सरकार म्हणते. ते आपल्या देशात अजून शक्य नाही. अमेरिका, इंग्लंडसारख्या देशात ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोक कॅशचे व्यवहार करतात. सहकार क्षेत्रही या सरकारने उद््ध्वस्त करायचे ठरवल्याचा आरोप पवार यांनी केला. देशाची बिघडलेली आर्थिक घडी अजून तीन वर्षे बसू शकत नसल्याचे मत अनुभवी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केल्याचा संदर्भही पवार यांनी या वेळी दिला.

देशात इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणल्यानंतर पुढच्या निवडणुकीत त्यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांना लोकांनी पराभूत केले होते. लोक शांतपणे सहन करतात आणि वेळ आली, की ते त्याचा बदला घेतात, असा सूचक इशारा त्यांनी या वेळी मोदी सरकारला दिला.

निफाड कारखान्याबाबत बोलताना ते म्हणाले, की उसाचे क्षेत्र कमी झाल्याचे चित्र या भागात आहे. ऊस वाढणार असेल तर केंद्र आणि राज्य सरकार ‘निसाका’ला कर्जसवलत देऊन कारखाना सुरू होण्यासाठी आपण मदत करू, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, कारखान्याच्या बाबतीत अण्णा हजारे यांनी आपल्यावर गंभीर आरोप केला असून, त्यांच्या विरोधात आपण खटला दाखल करणार असल्याचेही पवार म्हणाले.

यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही नोटबंदीचा निर्णय, त्यामुळे झालेली परिस्थिती यावरून मोदी सरकारवर पवार यांनी टीकास्र सोडले. आगामी काळात याचा शेतकरी बदला घेतील, असे सांगितले. विनायकदादा पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनीही मनोगत व्यक्त केले. मेळाव्याचे संयोजक पिंपळगाव बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी प्रास्ताविक केले आणि निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, ‘नाफेड’चे माजी उपाध्यक्ष चांगदेव होळकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंबळे, आमदार नरहरी झिरवाळ, दीपिका चव्हाण, जयंत जाधव, पंकज भुजबळ, हेमंत टकले, माजी आमदार उत्तम भालेराव, अमृता पवार, सचिन पिंगळे, भारती पवार, माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, तानाजी बनकर, नाना महाले, शेतकरी संघटनेचे रामचंद्र पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विदेशी कंपनीकडून नोटाछपाई वादात

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

केंद्र सरकारने काळ्या यादीत टाकलेल्या ब्रिटनच्या डे-ला-रू कंपनीला औरंगाबाद येथे भारतीय आणि परदेशी नोटा छापण्यासाठी दहा एकर जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, खासदार हेमंत गोडसे आणि नाशिकरोड प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी ही कंपनी काळ्या यादीत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची दिल्लीत भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणल्याची माहिती गोडसे यांनी ‘मटा’ला दिली. त्यामुळे औरंगबादेतील नोटाछपाई वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

नोटा छपाईच्या क्षेत्रात डे-ला-रू ही नावाजलेली आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. तथापि, काही गंभीर आरोप झाल्यानंतर २०११ साली केंद्रीय गृहमंत्रालयाने कंपनीला काळ्या यादीत टाकल्याचे जगदीश गोडसे यांनी सांगितले. भारतात चलन छपाईसाठी प्रथमच विदेशी कंपनीला परवानगी देण्यात आली आहे. ही कंपनी भारताला नोटा उत्पादनासाठी जो कागद पुरवित होती तोच ती पाकिस्तानलाही पुरवत होती, असे उघड झाले होते. एवढेच नव्हे, तर भारताला तीनशे कोटींचा सदोष नोट कागद कंपनीने पुरविल्याचे सिक्युरिटी प्रिंटिंग अॅण्ड मिंटिंग कॉर्पोरेशन आफ इंडियाने (एसपीएमसीआयएल) केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले होते, असे सूत्रांनी सांगितले.


करार सहा महिन्यांपूर्वीचा

सहा महिन्यांपूर्वी डे-ला-रू कंपनी आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात औरंगाबाद येथे प्रकल्प सुरू करण्याचा करार झाल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. या करारानुसार सुमारे सातशे कोटींच्या या प्रकल्पासाठी कंपनीला औरंगाबाद येथे ‘एमआयडीसी’ने दहा एकरचा भूखंड दिला आहे. ही कंपनी काळ्या यादीत असतानाही तिला परवानगी मिळाल्याचे खासदार गोडसे यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निदर्शनास आणले. डे-ला-रू कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मोदी सरकार आल्यापासून जेटली यांना भेटण्याचा अनेकदा अयशस्वी प्रयत्न केला. जेटली यांनीच ही माहिती खासदार गोडसे यांना दिली. यानंतरही केंद्रीय गृहमंत्र्यांनी करार रद्द करण्यासाठी हस्तक्षेप केलेला नाही. डे-ला-रू कंपनीने महाराष्ट्र सरकारला सांगितले आहे, की कंपनी ९० टक्के परकीय चलन आणि १० टक्के भारतीय चलन उत्पादित करणार आहे.

डे-ला-रू कंपनीला परवानगी देण्यास आमचा तीव्र विरोध आहे. जुनी मशिनरी असतानाही नोटबंदी काळात नाशिकरोड प्रेसने नोट छपाईचा इतिहास रचला आहे. कंपनीवर खर्च करण्यापेक्षा हाच खर्च नाशिकरोड प्रेसच्या आधुनिकीकरणावर केला, तर आम्ही सरकारला सध्यापेक्षाही दुप्पट उत्पादन देऊ.

- जगदीश गोडसे, सरचिटणीस, प्रेस मजदूर संघ

०००

नाशिकमध्ये नोट पेपर मिलचा दावा प्रबळ

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील प्रेस कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी नाशिक दौऱ्यात दिल्याने नाशिकला नोटांचा कागद कारखाना मिळण्याचा दावा प्रबळ झाला आहे.

मंत्री मेघवाल यांनी नाशिकरोड प्रेसची नुकतीच पाहणी केली. नंतर प्रेस नेत्यांच्या बैठकीत त्यांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी केंद्रात वकिली करण्याचे आश्वासन दिले. बैठकीला संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, राजेश टाकेकर, संदीप बिश्वास, माधवराव लहांगे, सुनील आहिरे, डा. चंद्रकांत हिंगमिरे आदी उपस्थित होते.

पेपर मिलमुळे फायदा

नोटा छापण्यासाठी केंद्र सरकारला देशात कागद कारखाना (नोट पेपर मिल) सुरू करायचा आहे. त्यासाठी पन्नास एकर जागा हवी आहे. नाशिक प्रेसकडे ३०० एकर जागा उपलब्ध आहे, तसेच कामगारांसाठी नेहरूनगरमध्ये वसाहत तयार आहे. उत्पादित कागद नाशिकरोड प्रेसच घेणार आहे. त्यामुळे वाहतूक खर्च शून्य राहील. कागदासाठी लागणारा कापूस जळगावमधून मिळणार आहे. हा माल नाशिकरोडला रेल्वेने येणार आहे. वालदेवी, गोदावरी नद्या जवळच असल्याने पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. त्यामुळे पेपर मिल नाशिकला होणे सरकारच्या फायद्याचे असल्याचे खासदार हेमंत गोडसे आणि मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी मंत्री मेघवाल यांना पटवून दिले. मेघवाल यांनी जागेची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

मशिनरींना मंजुरी
करन्सी प्रेसमध्ये इंटेग्लो मशिनच्या आधुनिकीकरणाची, तसेच नवीन दोन मशिन्स मंजूर आहेत, त्या देण्याची मागणी मंत्री मेघवाल यांनी मान्य केली आहे.


रिझर्व्ह बँकेसंदर्भात आक्षेप

रिझर्व्ह बँक देशातील बँका आणि चलनावर नियंत्रण ठेवणारी (मॉनिटरींग) यंत्रणा आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला स्वतःचा नोट प्रेस सुरू करता येत नाही, असा आक्षेप कामगार नेत्यांनी मंत्री मेघवाल यांच्याकडे नोंदवला आहे. नाशिकरोड प्रेसला देशात तयार झालेल्या नोट पेपरचा आणि देशी शाईचा वापर करावा लागतो. त्यांचा दर्जा अपेक्षित नसल्यामुळे उत्पादन आणि वेगावर परिणाम होतो. रिझर्व्ह बॅँकेच्या प्रेसला परदेशातून शाई आणि पेपर आयातीची परवानगी आहे. हा भेदभावही मंत्र्यांच्या नजरेस आणून देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिरांची सुरक्षा रामभरोसे

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड, उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंदिरांना चोरट्यांनी लक्ष्य केल्यामुळे नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी चोरट्यांची तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

देवळालीगावाचे श्री म्हसोबा महाराज हे ग्रामदैवत आहे. येथे मोठी यात्री भरते. या मंदिरात दि. ४ जानेवारी रोजी चोरांनी दरवाजाचे कुलूप तोडून रोकड लांबवली. या मंदिरासमोरच एेतिहासिक दुर्गादेवी मंदिर आहे, तेथेही महिनाभरापूर्वी अशीच चोरी झाली होती. या दोन्ही मंदिरांपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देवळालीगावातील पारावरील गणेश मंदिरात एक वर्षापूर्वी चोरी झाली होती. त्यावेळी चांदीचा मुकुट आणि रोकड चोरांनी लांबवली होती. देवळालीगावतील शनी मंदिर व साईबाबा मंदिरातही चोरीची घटना घडली होती. एकाच परिसरातील पाच मंदिरांत चोऱ्या होऊनही पोलिसांची गस्त वाढलेली नाही. तीन वर्षांपूर्वी जेलरोडच्या सायखेडारोडवरील दुर्गा मंदिरातील छताची कौले काढून चोरट्यांनी हात साफ केला होता. या घटनेच्या वर्षभर अगोदर मंदिराच्या आवारातील कालभैरव मंदिराची विटंबना करण्यात आली होती. दसक येथील शनी मंदिरातही काही महिन्यांपूर्वी चोरी झाली होती.

--

सीसीटीव्हींचा अभाव

नाशिकरोड परिसरातील प्रमुख चौकांमध्ये, तसेच महत्त्वाच्या मंदिरांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मागणी प्रलंबित आहे. बिटको, देवळालीगाव, उपनगर चौक, दत्त मंदिर चौक, जेलरोडचे शिवाजीनगर चौक, सैलानीबाबा चौकात सीसीटीव्हींची गरज आहे. ते लावल्यास चोऱ्यांना आळा बसू शकेल. सीसीटीव्ही नसल्यामुळे चोरट्यांची हिंमत वाढली आहे.

--

आदर्श उदाहरणे

नगरसेविका संगीता गायकवाड यांनी स्वखर्चाने काही चौकांमध्ये सीसीटीव्ही बसविले आहेत. जेलरोडला नगरसेवक अशोक सातभाई यांनीही असाच उपक्रम राबवला आहे. काही नागरिकांनी आपल्या घरांवर सीसीटीव्ही बसवले आहेत. श्री अण्णानवग्रह गणपती, उपनगरचे इच्छामणी, मुक्तिधाम आदी महत्त्वाच्या मंदिरांमध्ये ट्रस्टने सीसीटीव्ही बसवले आहेत. अशा उपक्रमांमुळे चोऱ्यांवर नियंत्रण आले आहे.

--

बहुतांश पथदीप बंदच

देवळालीगावातील बहुतांश पथदीप बंदच आहे. चोरी झाली त्या म्हसोबा मंदिरासमोरील पथदीपही अनेक दिवसांपासून बंद आहेत. बंद पथदीपांचा प्रश्न प्रभाग सभेत नगरसेवकांनी गाजवला होता, तरीही पथदीप सुरू झालेले नाहीत. देवळालीगावातील पोलिस चौकी कायम बंदच असते. अशीच परिस्थिती जेलरोडच्या दोन चौक्यांचीही आहे. पोलिस चौकी सुरू करावी, रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

--

मंदिरांच्या संख्येत वाढ

नाशिकरोड आणि उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंदिरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पोलिसांवरही मर्यादा आल्या आहेत. महापालिकेने अनधिकृत धर्मस्थळे हटविली असली, तरी अनेक छोट्या-मोठ्या सोसायट्या आणि खासगी जागांत मंदिरे आहेत. अनेक मंदिरांना लोखंडी ग्रीलचे दरवाजे, तसेच सुरक्षा यंत्रणाही नाही. त्याचा गैरफायदा चोरटे घेतात. सध्या थंडीमुळे लवकर सामसूम होत असल्याने भुरटे चोर सक्रिय झाले आहेत.

--

नाशिकरोड, जेलरोड परिसरातील मंदिरे चोरांपासून सुरक्षित नाहीत, हे वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे सिद्ध झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, मंदिर व्यवस्थापनांनीही काळजी घ्यावी, तसेच नागरिकांनी सजग राहावे, तरच चोऱ्यांना आळा बसेल.

-बापूसाहेब बोराडे

---


वायफाय, सीसीटीव्हींचे आज लोकार्पण

नाशिकरोड ः जेलरोड येथील प्रभाग क्रमांक १८ मधील महत्त्वाच्या व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी वायफाय सुविधा आणि सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. त्याचा प्रारंभ आज, शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी सहा वाजता जेलरोडच्या राजराजेश्वरी चौकात होणार आहे. भाजपचे विशाल संगमनेरे, सचिन हांडगे यांनी ही माहिती दिली. पालकमंत्री गिरीश महाजन आणि आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते उद्घाटन होईल. बाजीराव भागवत, सुनील आडेके, प्रा. शरद मोरे, अंबादास पगारे, जयंत नारद, सुभाष घिया, शांताराम घंटे, नीलेश सानप, राजेश आढाव, ज्ञानेश्वर आढाव, विजू लोखंडे आदींची प्रमुख उपस्थिती राहील. वायफाय सुविधेमुळे नागरिकांना लाभ मिळणार असून, सीसीटीव्हींमुळे मंदिरांना सुरक्षाकवच लाभणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यशासाठी उद्यमशीलतेला द्यावी नावीन्याची जोड

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

आपला देश व्हर्च्युल जगाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे केवळ ज्ञानाच्या जोरावर यशस्वी होणे अवघड आहे. तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता आपल्या उच्च ध्येयाच्या दिशेने जाण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून कठोर मेहनत करण्याची तयारी हवी. उद्यमशीलतेला नावीन्याची जोड देत शहराकडून खेड्याकडे गेल्यास नक्की यशस्वी व्हाल, असा मंत्र ब्ल्यू डार्ट एक्स्प्रेस लिमिटेड या कंपनीचे चेअरमन तुषार जानी यांनी येथील उद्योग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींना दिला.

शिखर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व व्यापारी बँकेचे संचालक हेमंत गायकवाड व नगरसेविका संगीता गायकवाड यांच्या वतीने नाशिक-पुणे महामार्गावरील दुर्गा इंटरनॅशनल हॉटेल येथे मी उद्योजक होणारच या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी तुषार जानी बोलत होते. याप्रसंगी त्यांनी भावी काळात तंत्रज्ञान व नवविचारांचे महत्त्व पटवून देत उद्योग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कराव्या लागलेल्या संघर्षाची माहिती दिली.

यावेळी अडचणींवर जिद्दीने मात करून मेहनत व सचोटीने आपल्या उद्योग-व्यवसायात यशस्वी झालेल्या भगरासिंग परदेशी, मनोज गायकवाड, अनंत ठाकरे, रवीचंद हांडोरे आदी व्यावसायिकांचा पहिला शिखर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. नगरसेवक संभाजी मोरुस्कर, प्रकाश घुगे, बाजीराव भागवत, डॉ. सीमा ताजणे आदी उपस्थित होते. नेहा खरे यांनी सूत्रसंचालन केले.

--


अपयश पचवणे शिका

यावेळी महाबळेश्वर येथील उद्योगपती सनरायझर्स कँडल्स कंपनीचे चेअरमन भावेश भाटिया यांनीही आपल्या संघर्षाची माहिती दिली. उद्योग सुरू करताना आलेल्या अडचणींवर त्यांनी जिद्दीने केलेली मात ऐकून उपस्थित सर्वच काही काळ स्तंभित झाले. दृष्टिहीन असूनही स्वतःची कंपनी सुरू करून तब्बल २३०० दृष्टिबाधितांना रोजगार उपलब्ध करून भाटियांच्या जिद्दीला उपस्थितांनी उभे राहून सलाम केला. सध्याच्या पिढीला अपयश पचवविणे अवघड झालेले असल्याने त्यांच्यात लवकर निराशा येत आहे. यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनतीला पर्याय नसून अपयश पचवायला शिका, असा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारभाव वधारल्याने आवारात मावेना कांदा!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात लाल कांद्याचा बाजारभाव काहीसा वधारल्याने येवला कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा घेऊन येणाऱ्या विविध वाहनांनी चांगलीच गजबजून गेली. उत्पादक शेतकरी गेल्या तीनचार दिवसांत लाल कांदा घेऊन मोठ्या संख्येने बाजार समितीची वाट धरू लागल्याने बाजार समितीचे आवार हाउसफुल्लं होताना दिसत आहे. शुक्रवारच्या लिलावाच्या दृष्टीने गुरुवारी (दि. ५) दुपारनंतरच शेकडोच्या संख्येने ट्रॅक्टर्स बाजार समितीत दाखल झाल्याने बाजार समितीच्या आवारात मोठी ‘ट्रॅक्टरकोंडी’ निर्माण झाल्याचे चित्र येवल्यात दिसले.

‘लाल’ कांदा बाजारभावाचा आलेख पूर्वीच्या तुलनेत गेल्या दोन तीन दिवसात काही अंशी वर सरकल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढू लागले आहे. कांदा लिलावासाठी येणाऱ्या ट्रॅक्टरसह पिकअप, रिक्षा यांचीही संख्या वाढत असल्याने येवला कृषी उत्पन्न बाजार समिती अक्षरशः गजबजून गेली आहे. गेल्या दोन दिवसात तर ही कांदा आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने येथील बाजार समिती आवारात ‘ट्रॅक्टरकोंडी’ निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. मनमाड राज्य मार्गालगत असलेल्या येवला मुख्य बाजार आवारात उद्या, शुक्रवारच्या लिलावाच्या दृष्टीने गुरुवारीच ट्रॅक्टर दाखल झाल्याने सायंकाळी बाजार समितीचे आवार अगदी ‘हाऊसफुल्ल’ झाले होते. आवारात ट्रॅक्टर लावण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून राज्य महामार्गावर दुतर्फा ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिमाणी या राज्य मार्गावरून धावणाऱ्या इतर वाहनांना देखील नाईलाजास्तव ‘ब्रेक’ लावण्याची वेळ या वाहनचालकांवर आली होती. त्यातून मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे चित्र होते. कांदा घेवून दाखल होणारे असंख्य ट्रॅक्टर तर शेतकरी राज्य मार्गाच्या साईडला लावताना दिसत होते.

साडेसातशे ट्रॅक्टर दाखल
येवला समितीच्या मुख्य बाजार आवारात गुरुवारी सकाळी जवळपास २६३ ट्रॅक्टर तर पाचशेच्या वर पिकअप रिक्षांमधील कांद्याचा लिलाव झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारने नुकसानभरपाई द्यावी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. ६) धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. केंद्र व राज्यात काँग्रेस पक्ष मजबूत विरोधी पक्ष आहे. लोकहिताच्या विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्यासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच अग्रेसर राहतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक, कामगार यासह सामान्यांना मोठा त्रास होत आहे. यासाठी काँग्रेस कमिटीच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन काँग्रेस निरीक्षक अॅड. ललिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाले. या वेळी माजीमंत्री हेमंत देशमुख, रोहिदास पाटील, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करणकाळ, आमदार कुणाल पाटील, आमदार काशिराम पावरा, आमदार डी. एस. अहिरे, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाला आपल्या विविध मागण्यांचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले.

अल्पसंख्याक सेलचे आज आंदोलन

गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यात झालेल्या विविध कार्यक्रमांना अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डावलण्यात येत आहे. तसेच वेळोवेळी अपमानास्पद वागणूक देण्यात येते. अशी खंत अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यामुळे जिल्हा काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले असून सेलचे आज (दि. ७) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनाची माहिती माजी महापौर ईस्माइल पठाण, साबीर शेख यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात लाचखोरीत ‘महसूल’च अव्वल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अँटी करप्शन ब्युरोने (एसीबी) २०१६ या वर्षात तब्बल १५३ सापळे रचले. सर्वाधीक कारवाई महसूल विभागातील कर्मचाऱ्यांवर झाली असून, त्यापाठोपाठ पोलिसांचा क्रमांक लागला आहे.

नांदगाव येथील जमीन व्यवहार प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी सदर गुन्ह्याची तिव्रता बाजूला सारीत आंदोलनाचे शस्त्र बाहेर काढण्याच्या तयारीत आहे. वास्तव‌िक लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये सर्वाधीक महसूल विभागाचे कर्मचारी सापडल्याचे एसीबीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

१२ महिन्यांच्या कालावधीत १५३ लाचखोरांना एसीबीने जेरबंद केले. जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांसह ४२ जणांचा यात सामावेश आहे. दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झालेल्या प्रांतअधिकारी वासंती माळींसह, प्रभारी तहसीलदार व इतर २१ जणांचा सामावेश आहे. त्यापूर्वी नाशिक बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांना बाजार समितीच्या कामगारांची ५८ लाखांच्या रोकडचा अपहार केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पिंगळेच्या अटकेनंतर सर्वांचे लक्ष एसीबीकडे लागले आहे. यामध्ये वर्ग एकच्या ११ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. वर्ग दोनचे १६ तर वर्ग तीन मधील १३५ कर्मचाऱ्यांचा सामावेश आहे. महसूल विभाग लाचखोरीत आघाडीवर असून, या विभागाचे २९ अधिकारी, कर्मचारी २०१६ मध्ये पकडण्यात आले. नेहमीप्रमाणे पोलिस दल दुसऱ्या क्रमांकावर आहे.

पोलिस दलातील २८ अधिकारी व कर्मचारी पकडण्यात आले आहे. नाशिक विभागातील १५३ सापळ्यांमध्ये १९३ लाचखोरांना जेरबंद करण्यात आले आहे.

१६ जणांना शिक्षा

लाचखोरांविरूद्ध कोर्टात दाखल झालेल्या दोषारोप पत्रांनुसार वर्षभरात ६९ निकाल सुनावण्यात आले. यातील तब्बल ५३ जणांना कोर्टाने निर्दोष सोडले तर अवघ्या १६ जणांना शिक्षा ठोठवण्यात आल्या. २०१५ मध्ये एसीबीने १९५ सापळे लावले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय होर्डिंग्जची साफसफाई

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या आदर्श आचारसंहितेचे पालन महापालिकेने सुरू केले असून, शुक्रवारी शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स व झेंडे जप्त केले आहेत. शुक्रवारी अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरात कारवाई करीत राजकीय पक्षांचे ७८ होर्डिंग्ज, १७७ बॅनर्स व २९९ झेंडे जप्त करण्याची कारवाई केली. त्यामुळे आचारसंहितेमुळे का होईना शहरात अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर्सची साफसफाई मोहीम सुरू झाली आहे. शनिवारीही ही कारवाई सुरूच राहणार आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे बुधवारपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेने राजकीय पक्षांकडून शहरात लावण्यात आलेले होर्डिंग्ज, बॅनर्स व झेंडे काढण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी महापालिकेने सातपूर, नाशिकरोड, पंचवटी, नाशिक पश्चिम, पूर्व व सिडको अशा सहा विभागांत ही कारवाई केली. त्यात विविध राजकीय पक्षांचे शेकडो होर्डिंग्ज, बॅनर्स व झेंडे जप्त करण्याची कारवाई केली. सर्वाधिक बॅनर्स व झेंडे हे नाशिक पश्चिम व नाशिकरोड या दोन विभागांत सापडले आहेत. शनिवारीही ही कारवाई सुरूच राहणार आहे. आचारसंहितेच्या निमित्ताने का होईना शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, झेंडे काढण्यात येत असल्याने शहराचे विद्रुपीकरण थांबणार आहे. दरम्यान, आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजाणीसाठी राजकीय पदाधिकाऱ्यांची वाहनेही जमा करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना भरला दम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याच्या वनवविभागात चाललेल्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करतानाच कामात कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याचा सज्जड दम वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनाधिकाऱ्यांना दिला. राज्यभरातील वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या दोनदिवसीय कार्यशाळेला वनमंत्र्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी प्रारंभ झाला. सकाळी ११ पासून कार्यशाळेत दाखल झालेले वनमंत्री रात्री उशीरापर्यंत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत होते.

वनवृत्त, वन्यजीव, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ अशा विविध सरकारी विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दोन दिवसीय कार्यशाळा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात होत आहे. या कार्यशाळेला वनमंत्र्यांनी उपस्थिती दर्शवित राज्यभरातील कामकाजाचा आढावा घेतला. मानव, वन्यजीव संघर्ष, वनविभागाकडून चालणारे कामकाज, वृक्षलागवड, रोपांची निर्मिती, विविध विकास कामे, वन पर्यटन अशा विविध प्रकारच्या कामनकाजाची सद्यस्थिती मंत्र्यांनी घेतली. राज्याच्या विविध विभागांच्या कामावर मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. खासकरुन अभयारण्यांच्या क्षेत्रातील वाढते अतिक्रमण, वाढता मानवी हस्तक्षेप यावरुन वनमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. अनेक अधिकाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुनवित कामकाजात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे, सकाळी ११ वाजता कार्यशाळेला दाखल झालेले वनमंत्री रात्री ९ वाजेपर्यंत आढावा घेत होते.

‘हॅलो फॉरेस्ट’ यशस्वी करा
वनविभागाने नुकतीच सुरू केलेली हॅलो फॉरेस्ट या हेल्पलाइनचा अधिकाधिक प्रचार करा, प्रत्येक तक्रारीची शहानिशा करा, संबंधितांवर तातडीने कारवाई करा, असे निर्देश त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नॅब संस्था करीत असलेले कार्य गौरवास्पद’

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातपूर

‘नॅब’ने अंध विद्यार्थ्यांसाठी केलेले अनमोल कार्य गौरवास्पद असल्याचे असल्याचे प्रतिपादन गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव सर डॉ. एम. एस. गोसावी यांनी केले. नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड (नॅब) युनिट महाराष्ट्र नाशिकतर्फे आदर्श शिक्षक, प्राध्यापक, संस्था व गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

सातपूर एमआयडीसीतील नाइस संकुलच्या सभागृहात झालेल्या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रांतील गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यभरातून आलेले अंध विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे, नॅबचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, महासचिव गोपी मयूर, पुरस्कार समितीचे अध्यक्ष मुक्तेश्वर मनशेट्टीवार यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. आरोग्य विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. चव्हाण यांनीदेखील गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत सांगितले. पुरस्कार समितीचे अध्यक्ष मुनशेट्टीवार यांनी नॅबच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. पसायदानाने पुरस्कार सोहळ्याची सांगता करण्यात आली.

--

...यांचा झाला गौरव

आदर्श प्राध्यापक पुरस्कार केंद्रीय विद्यालय मुदखेड जिल्हा नांदेड येथील बाळासाहेब लोंढे यांना प्रदान करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्काराने चंद्रकांत भोसले (अंध शिक्षक) कोरेगाव पार्क पुणे अंधशाळा, दत्तात्रय तांबे (डोळस शिक्षक) राजीव गांधी मेमोरियल स्कूल सोलापूर, सुरेखा रसाळ (अंध शिक्षिका) कमला मेहता दादर अंधशाळा मुंबई, नरेंद्र ताकसांडे (अंध शिक्षिका) ब्लाइंड बॉइज इन्स्टिट्यूट नागपूर यांना गौरविण्यात आले. आदर्श संस्था पुरस्कार नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड जिल्हा शाखा सांगली व लायन्स नॅब आय केअर सेंटर, मिरज संचलित कै. सुशीलाबाई दानचंद घोडावत निवासी अंधशाळा मिरज यांना देण्यात आला. विशेष सेवा पुरस्कार विनोदिनी सीतारामन, मुंबई (निवृत्त शिक्षिका निर्मला काॅन्व्हेंट स्कूल, नाशिक) यांना देण्यात आला. विद्यापीठ स्तरावर सात गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. उच्च माध्यमिक स्तरावर १४ विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गुणवंत विद्यार्थी माध्यमिक स्तरावर ७ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकराकडून सहा लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ट्रॅक्टर खरेदीच्या नावाखाली नोकरासह त्याच्या नातेवाइकाने एजन्सीधारकास तब्बल सहा लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश शिंदे व गणेश गायकर (रा. नांदगाव, ता. इगतपुरी) अशी संशयितांची नावे आहेत. रोनक प्रदीप मेहरा (रा. द्वारका) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. फिर्यादी मेहरा यांचा ट्रॅक्टर विक्रीचा व्यवसाय आहे. मेहरा यांच्याकडे संशयित शिंदे कामाला आहे.

शिंदे व गायकर या दोघा नातलगांनी संगनमत करून मेहरा यांच्याकडून काही रक्कम अदा करीत ८ ऑक्टोबर रोजी एजन्सीमधून ५ लाख ९५ हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर खरेदी केला होता. उर्वरित रक्कम बँक कर्ज काढून देण्याचे ठरलेले असताना संशयितांनी अद्याप रक्कम अदा केली नाही. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करुनही पैसे मिळत नसल्याने अखेर पोलिसांकडे धाव घेतली.

दुकानातून पुतळा चोरी

फर्निचर दुकानाचा दरवाजा तोडून चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीचा शोभेचा पुतळा चोरून नेला. ही घटना मायको सर्कल भागात घडली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादासाहेब पाटील (रा. पवननगर) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पाटील यांच्या शोरूममधून बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी पुतळा चोरून नेला.

ट्रकसह दुचाकीची चोरी

शहर परिसरातून एका मालट्रकसह दुचाकी चोरीला गेल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. मालट्रक चोरी प्रकरणी अंबड लिंक रोड भागात राहणाऱ्या राहुल शंकर सानप यांनी तक्रार दिली आहे. सानप यांच्या मालकीचा मालट्रक (एमएच २० बीटी ०३४०) १६ डिसेंबर रोजी सिडकोतील गौरीशंकर मंगल कार्यालयासमोर पार्क करण्यात आला होता. मात्र, चोरट्यांनी संधी साधत मालट्रक पळवून नेला.

वाहनचोरीची आणखी एक घटना कालिदास कला मंदिर परिसरात घडली. या ठिकाणी सिडकोतील विजय शरद पाटील यांनी पार्क केलेली दुचाकी (एमएच १५ सीएच ७८३२) चोरट्यांनी हातोहात लंपास केली.

गृहकर्जाच्या नावाखाली फसवणूक

गृहकर्ज मंजुरीच्या नावाखाली एकाने परप्रांतीयास दीड लाखास गंडा घातला. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानदेव रावसाहेबन पगार (रा. सर्वेश्वर अपार्टमेंट. खुटवडनगर) असे संशयिताचे नाव आहे. सातपूर औद्योगीक वसाहतीतील खांदवेनगर भागात राहणाऱ्या विरेंद्रकुमार सुरज यादव यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. स्वतःचे घर घेण्यासाठी यादव २०१५ मध्ये खटपट करीत होते.

त्यावेळी त्यांच्या संपर्कात आलेल्या संशयिताने गृहकर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच याच्या मोबदल्यात यादव यांच्याकडून ८० हजार रुपये आणि कागदपत्र घेतले. दरम्यानच्या काळात त्याने मैत्री वाढवत पुन्हा ८० हजार रूपये हातऊसनवार घेतले. त्यानंतर मात्र गृहकर्ज मंजुरी बरोबरच हातउसनवार घेतलेली रक्कम देण्यास संशयिताने टाळाटाळ केली. याबाबत जाब विचारला असता संशयिताने कर्ज प्रकरणासाठी घेतलेले धनादेशचा वापर करून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. यामुळे हादरलेल्या यादव यांनी सातपूर पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images