Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मार्केट फुलले; चेहरे उतरले

$
0
0

म.टा. वृत्तसेवा, येवला

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा घेऊन आलेल्या तब्बल तेराशेच्या आसपास ट्रॅक्टर्सने अक्षरशः फुलले असले तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा चेहरा काही खुलला नाही. कांद्याची प्रचंड आवक झाल्याचा परिणाम झाल्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत येथे लाल कांदा पुन्हा घसरला. खाली येणाऱ्या कांदा बाजारभावाने पूर्वीपेक्षा सोमवारी प्रतिक्विंटल जवळपास ७५ रुपयांनी ‘झटका’ दिल्याने शेतकऱ्यांचे चेहरे काळवंडले.

आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सोमवारी बाजार समितीच्या शहरातील मुख्य बाजार आवारात कांदा घेवून येणारे ट्रॅक्टर्स नजरेत भरत होते. मंगळवारी (दि.१०) आठवडे बाजारामुळे मार्केट बंद राहणार होते. त्यामुळे सोमवारच्या लिलावासाठी येवल्यात कांदा ट्रॅक्टर्सची महागर्दी झाली होती. परिणामी बाजार समितीकडे जाणाऱ्या मनमाड-नगर राज्य महामार्गावर दुतर्फा लांबच लांब ट्रॅक्टर्सच्या रांगा लागल्या होत्या.

सोमवारी येवल्यात तब्बल तेराशेच्या आसपास ट्रॅक्टर्समधून लाल कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला होता. त्यातील एकूण ९०० ट्रॅक्टर्समधील कांद्याचे लिलाव दिवसभरात पार पडले. उर्वरित चारशे ट्रॅक्टर्समधील लिलाव मंगळवारच्या सुटीनंतर बुधवारी (दि. ११) मार्केट उघडल्यावरच होणार आहेत.

आजही गर्दी होणार
मकरसंक्रांती निमित्त येणाऱ्या सुट्ट्यांमुळे येवला बाजार समिती बंद राहणार आहे. त्यामुळे बुधवारी येवला बाजार समितीत लिलावासाठी येणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र कांद्याचे दर कमी होत असल्याने शेतकरी नाराज आहेत.


क्विंटलमागे ७५ रुपयांची घसरण

येवला बाजार समितीत सोमवारी पूर्वीच्या तुलनेत ‘लाल’ कांदा बाजारभावात प्रतिक्विंटल जवळपास ७५ रुपयांनी घसरण झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरची हिवाळ्यातील ‘लाली’ क्षणार्धात गुल झाली. सोमवारी लाल कांद्याला प्रतिक्विंटल किमान ३०० ते कमाल ६५१ (सरासरी ५८०) असा बाजारभाव मिळाला. गेल्या आठवड्यातील शुक्रवारी हाच बाजारभाव किमान ३०० ते कमाल ७२५ (सरासरी ६५०) असा होता. कांदा बाजारभावाचा आलेख वर सरकण्याऐवजी खाली येऊ लागल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली भरल्याचे चित्र दिसू लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भावी डॉक्टरांनाच विषबाधा

$
0
0

जवाहर मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरालगत असलेल्या जवाहर मेडिकल फाउंडेशनमधील विद्यार्थ्यांना कॉलेजमधील मेसमध्ये सोमवारी (दि. ९) रात्री देण्यात आलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याची बाब समोर आली आहे. यात सुमारे ९० विद्यार्थ्यांना मंगळवारी पहाटेपासून कॉलेजच्या जवाहर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर नऊ जणांना अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

हा सर्व प्रकार मेडिकल कॉलेज प्रशासनाने दडवून ठेवला होता. मात्र याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करून घटनेची माहिती जाणून घेतली. त्यावेळेस धक्काबुक्की करून घडलेला प्रकार किरकोळ आहे. याची कोणीही दखल घेऊ नये, असे उत्तर देण्यात आले आहे.

जवाहर मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस व नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्यांसाठी वसतिगृहाची सोय आहे. त्याचबरोबर जेवणासाठी मेसची व्यवस्था करण्यात आली आहे. याचठिकाणी सोमवारी, रात्री आठ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे विद्यार्थी मेसमध्ये जेवणासाठी आलेत. त्यावेळी जेवणामध्ये वरण-भात, पोळी व बटाट्याची भाजी हे पदार्थ विद्यार्थ्यांनी खाल्ले. त्यानंतर मंगळवारी (दि. १०) मध्यरात्री ९० विद्यार्थ्यांच्या पोटात दुखण्यासह उलट्या, जुलाब होऊ लागले. एकापाठोपाठ एक विद्यार्थी उपचारासाठी मेडिकल कॉलेजच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेत. तर काहींना अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या जवळपास १० विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व प्रकाराबाबत अभाविपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जाब विचारला. त्यांना कॉलेज प्रशासनाकडून या प्रकारात कोणीही हस्तक्षेप करू नये, असे सांगण्यात आले. तसेच त्यांना धक्काबुक्की करून प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील यांच्याशी चर्चा करताना काही कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले. यामुळे या घटनेत शेकडो विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पोलिसात नोंद नाही

मेडिकल कॉलेजच्या ९० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली, या प्रकाराची तालुका पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नसल्याचे पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोरे यांनी सांगितले. याप्रकरणाची पोलिसात तात्काळ खबर देणे गरजेचे होते. मात्र कॉलेज प्रशासनाने घटनेनंतर बऱ्याच कालावधीनंतर फोन करून फक्त माहिती देत परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले, असे पोलिस अधिकारी मोरे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

चौकशी करण्यात यावी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली. कॉलेजकडून हा सर्व प्रकार दाबण्यात आला आहे. याची सखोल चौकशी व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आपण मागणी करणार असून मेसमधील सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करावी व प्रकार नेमका कशामुळे झाला. याचा शोध घेण्यात यावा, अशी मागणीही अभाविपचे शहराध्यक्ष नितीन ठाकूर व कार्यकर्त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्याच्या आयुक्तांना ज‌िवे मारण्याची धमकी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिकेच्या आयुक्त संगीत धायगुडे यांना अतिक्रमण निर्मूलन मोहीम थांबविण्यासाठी जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकी प्रकरणामुळे शहरात पुन्हा खळबळ माजली आहे.

याप्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. १०) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या शेजारीच असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्राचे अतिक्रमण पालिकेकडून काढण्यात येत आहे. हे अतिक्रमण काढण्याआधी पर्यायी जागा देण्याची मागणी केली जात आहे. मात्र आयुक्त धायगुडे यांनी हे केंद्र अतिक्रमण असल्याने पर्यायी जागा देण्यास प्रतिकूलता दर्शवल्याने त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

शहरातील एम. जी. धिवरे हे काही कार्यकर्त्यांसह आयुक्त संगीता धायगुडे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. निवेदन दिल्यानंतर धिवरे यांनी अतिक्रमण काढणाऱ्यांना मारून टाकण्याची धमकी दिली. पालिकेचे बांधकाम अभियंता अभियंता कैलास शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसात एम. जी. धिवरे यांच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळ्यातील स्थानिक राजकारणाचा आणखी एक अधिकारी बळी ठरणार, असे चित्र निर्माण झाले आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांची कारवाईची मागणी

धमकी प्रकरणाचा निषेध करीत मनपा कर्मचारी समन्वय समितीसह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महापालिकेपासून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यत पायी मोर्चा काढला. महिला आयुक्तांना धमकाविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी आणि कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे, अशी मागणी यावेळी निवदनाद्वारे करण्यात आली. या वेळी कर्मचारी समन्वय समितीने सकाळी कामकाज बंद ठेऊन मोर्चा काढला. या मोर्चाला महापौर कल्पना महाले आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी पाठिंबा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजपथावर यंदा लोकमान्य टिळक!

$
0
0

fanindra.mandlik
@timesgroup.com
Tweet : @FanindraMT
‘स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारीत असलेला चित्ररथ यंदा २६ जानेवारीच्या राजपथावर होणाऱ्या परेडमध्ये सहभागी होणार आहे.
लोकमान्य टिळकांनी जी स्वराज्याची घोषणा केली, त‌िचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. मागील वर्षी २०१६ मधील २६ जानेवारीला रोटेशन पद्धतीमुळे राज्याचा चित्ररथ सहभागी झाला नव्हता. त्यामुळे येत्या जानेवारीमध्ये लोकमान्यांच्या सिंहर्जनेवर आधारीत चित्ररथ साकारला जाणार आहे. महाराष्ट्रातून जे चित्ररथ दिल्ली येथे जातात, त्यात महाराष्ट्राच्या संस्कृत‌िक परंपरेचे दर्शन मुख्यतः घडविण्यात येत असते. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या चित्ररथाने ‘पंढरपूरची वारी’ ही परंपरा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्याला उत्कृष्ट चित्ररथाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते. कोकणात आंब्याचे पीक मोठ्या प्रमाणात येते. या व्यवसायावर वर आधारित असलेला चित्ररथ साकारण्यात आला होता. याअगोदर कोळी, गोंधळी, दशावतार अशा विविध परंपरांनी समाविष्ट असलेले चित्ररथ साकरण्यात आले होते. हे चित्ररथ सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने साकारले जात असून नामवंत नेपथ्यकार त्याची रचना करत आहेत. या चित्ररथांवर महाराष्ट्राच्या लोक संस्कृतीचे दर्शन घडविणारा सास्कृत‌िक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार चित्ररथावर सादरीकरण करण्यात येणारा कार्यक्रम हा ६५ सेकंदांचा असणार आहे. काही क्षणांच्या विश्रांतीनंतर पुनश्चः सादरीकरण करायचे असते. हे सादरीकरण तीन किलोमिटर अंतरासाठी दोन तासांच्या कालावधीसाठी असते. या चित्ररथामध्ये टिळकांचे बालपण दाखवण्यात येणार असून, पुण्यातील अँग्‍लो-व्हर्नाक्युलर शाळेतील काही प्रसंग दाखवण्यात येणार आहे. १८७२मध्ये टिळक मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासूनच टिळक अत्यंत कृश होते. त्यांच्या पत्नी तापीबाईपण त्यांच्यापेक्षा दणकट होत्या. त्यांनी एक वर्ष आपले लक्ष पूर्णपणे शारीरिक सामर्थ्य संपादन करण्यावर केंद्रित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेव्हन सिस्टर्स’साठी स्वतंत्र रेल्वे?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

राज्याचे कृषी, फलोत्पादन आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत आज (दि. १२) गुरुवारी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत नाशिकरोड येथील ‘मित्रा’ संस्थेच्या सभागृहात रेल्वेचे अधिकारी व कॉकर अधिकारी यांची रेल्वेने पूर्वोत्तर राज्यांना शेतमाल पाठविण्यासाठी रेल्वे वॅगन प्रकल्प राबविण्याबाबत चर्चा होणार आहे. या चर्चेतून ठोस व सकारात्मक निर्णय झाला तर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील शेतमाल बंगालसह पूर्वेकडील ‘सेव्हन सिस्टर्स’ राज्यांतील बाजारपेठांत पाठविण्यासाठीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
आज गुरुवारी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत नाशिकच्या प्रशासकीय दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री शेतमाल प्रक्रिया उद्योग केंद्रालाही भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी ते नाशिकरोड येथील ‘मित्रा’ संस्थेत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पिकणारा शेतमाल थेट पूर्वोत्तर राज्यांत पाठविण्यासाठी स्वतंत्र रेल्वे वॅगनची सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यास नाशिक विभागातील शेतकऱ्यांना पूर्वोत्तर राज्यांतील बाजारपेठ खुली होणार आहे.
शेतकऱ्यांना होणार फायदा
नाशिक जिल्ह्यात कांदा, द्राक्षे व डाळींब तर जळगाव, धुळे या जिल्ह्यांत केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. या शेतमालाला देशाच्या पूर्व भागातील बंगाल या राज्यासह ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्वोत्तर राज्यांतही मोठी मागणी असते. याशिवाय शेजारील बांग्लादेशातही कांदा पिकास मोठी मागणी असते. दरवर्षी रेल्वेद्वारे या शेतमालाची बंगाल, बिहार, आसाम या राज्यांत रस्ता व रेल्वेद्वारे वाहतूक होते. परंतु या शेतमालासह इतर भाजीपाला वर्गीय शेतमालाच्या थेट वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे वॅगनची सुविधा अद्याप नाशिकहून उपलब्ध नसल्याने या शेतमालाच्या वाहतुकीवर मर्यादा येत असतात. त्याचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून थेट वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे वॅगनची सुविधा मिळण्याची मागणी येथील शेतकरी वर्गाकडून गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. ही मागणी आज पुर्ण होण्याची शक्यता आहे. नाशिकरोड, खेरवाडी, लासलगाव, मनमाड, नांदगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ या रेल्वे स्थानकांतून ही सुविधा मिळण्याची आवश्यकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनचोरीची भरपाई नगरपालिकेकडून

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
ग्राहक न्यायमंचात ग्राहकांनी तक्रार केल्यास त्यांना भरपाई मिळते. पण एका केसमध्ये चक्क इन्शुरन्स कंपनीनेच तक्रार केल्यानंतर कंपनीच्या बाजूने निकाल दिला आहे. या निकालात न्यायमंचने त्र्यंबक नगर परिषदेला दोषी ठरवत त्यांना गाडीच्या नुकसान भरपाईचे ३ लाख २० हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. पार्किंगची पावती फाडूनही विमा कंपनीच्या गाडीचा सांभाळ न करणाऱ्या त्र्यंबकेश्वर नगरपालिकेला हा भुर्दंड बसला आहे. त्याचप्रमाणे दहा हजार रुपये अर्जाचा खर्च देण्याचेही सांगितले आहे.
नाशिक येथील रामवाडी येथे राहणाऱ्या मंगल अनिल नाईक यांचे चारचाकी वाहन आहे. हे वाहन घेऊन त्यांचे पती हे त्र्यंबकेश्वर येथे दर्शनाला गेले. तेथे त्यांनी हे वाहन त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या पार्किंगमध्ये लावले व रितसर पावती घेतली. पण दर्शन घेतल्यानंतर ते वाहन चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली व नंतर श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम केला. कंपनीने नाईक यांच्याकडून इंडेम्निटी कम डिक्लेरेशन लिहून घेऊन त्यांना नुकसान भरपाईपोटी तीन लाख २० हजार रुपये अदा केले. त्यानंतर इन्शुरन्स कंपनीने जिल्हा ग्राहक न्यायमंचात धाव घेत त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या चुकीमुळे आम्हाला नुकसान भरपाई देणे भाग पडल्याची तक्रार केली. पालिकेने सेवेत कमतरता केल्यामुळे हा प्रकार घडल्याचेही सांगितले.
या तक्रारीनंतर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने तक्रारदार हे ग्राहक नाहीत, असा पवित्रा घेऊन आधी नोटीस देण्याचाही युक्त‌िवाद केला. त्याचप्रमाणे विमा कंपनीची तक्रार खर्चासह फेटाळावी असे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांचे दाखले दिले. पण ग्राहक मंचाने निकाल देताना त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने सेवा देण्यास कुचराई केल्याचा ठपका ठेवत निर्णय दिला. हा निकाल ग्राहक न्यायमंचचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे -कुलकर्णी, कारभारी जाधव यांनी दिला. विमा कंपनीकडून अॅड. एस. जी. अष्टपुत्रे यांनी युक्त‌िवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेट नाही, मग लिहा निबंध!

$
0
0

पोलिसांची गांधीगिरी, दंडाऐवजी ११०० जणांना निबंध लिहिण्याची ‘शिक्षा’

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पोलिसगिरीमध्ये कल्पकता वापरल्यास त्याचा थेट सर्वसामान्यांवर आयुष्यभराचा परिणाम होतो व केलेली कारवाईसुध्दा धडा देऊन जाते. असाच काहीसा प्रकार बुधवारी नाशिकमध्ये घडला. तब्बल ११०० जणांनी हेल्मेट न वापरल्यामुळे पोलिसांनी थेट त्यांना हेल्मेट वापरण्याचे फायदे या विषयावरच निबंध लिहायला लावला. मुंबई नाका येथे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत अवघ्या १२ जणांनी पाचशेचा दंड भरत सुटका करून घेतली, तर निबंध लिहिणाऱ्या १९४ बाईकस्वारांनी नवीन हेल्मेट खरेदी केले.

सध्या रस्ता सुरक्षा सप्ताह राबविला जात आहे. या अंतर्गतच भूयारीमार्गाचा वापर करण्यासाठी पादचाऱ्यांना गुलाबपुष्प दिल्यानंतर पोलिसांनी आता हेल्मेट न वापरणाऱ्यांसाठी गांधीगिरी केली. हेल्मेट कारवाईत अनेक जण दंड भरण्यास विविध कारणे दाखवत आपली सुटका करून घेतात. पण या मोहिमेची परिणामतः साधत नव्हती. त्यामुळे मुंबई नाका येथील पोलिस निरीक्षक काळे व वाघ यांनी अनोखी शक्कल लढवत हेल्मेट न वापरणाऱ्यांना निबंध लिहिण्यास भाग पाडले. त्यामुळे पोलिस स्थानकात शाळा भरल्याचाही अनुभव अनेकांना आला. विशेष म्हणजे सर्व बिनाहेल्मेटवाले या परीक्षेमुळे सुरुवाताली चांगले वैतागले. पोलिसांच्या या मोहिमेची सर्वत्र चर्चाही रंगली. मुंबई नाका पोलिसांच्या या नव्या व कल्पक उपक्रमाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले. ज्या विषयाची चूक केली त्यावरच आपण निबंध लिहिणे ही गोष्ट खरं तर खूपच अवघड. मात्र ११ विनाहेल्मेट फिरणाऱ्या या विद्यार्थ्यांनी हा निबंध लिहिला व आयुष्यभराचा धडाही घेतला.

कारवाईत पोलिस, डॉक्टर, वकील

पोलिसांच्या निबंध लिहिण्याच्या या कारवाईत सात पोलिस, डॉक्टर, वकील, इंजिनीअरसुध्दा होते. त्यामुळे एकमेकांना मुद्दे विचारत काहींनी निबंध लिहिले. काहींनी येथेही कॉपी केली. पण सर्वांनी या कारवाईचे समर्थनच केले.

हेल्मेट न वापरणाऱ्यांवर दंडात्कमक कारवाई सुरूच आहे. पण मुंबई नाका येथे झालेली कारवाई वेगळी होती. हेल्मेट न वापरणाऱ्यांना हेल्मेटचे फायदे या विषयावर निबंध लिहून घेत जनजागृती केली. त्यामुळे त्यांना त्याचे महत्त्व कळाले व त्यांनी या उपक्रमाचे कौतुकही केले.

- जयंत बजबळे, एसीपी, वाहतूक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक @ ५.८

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून, नाशिककर चांगलेच गारठले आहेत. मंगळवारी किमान तपमान ६.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्यानंतर बुधवारी त्यात आणखी घट होत ५.८ अंश सेल्सिअसवर पारा स्थिरावला. राज्यातील सर्वात नीचांकी तपमानाची नोंद बुधवारी झाली. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत स्थिर असलेले तपमान अचानक घसरल्याने वाढलेल्या थंडीमुळे हुडहुडी भरली आहे.

यंदा थंडीचे प्रमाण जास्त असणार, अशी चर्चा ऐकूनच वातावरणातील बदलांमुळे सर्वसामान्यांमध्ये रंगली होती. परंतु, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तपमान ९ अंश सेल्सिअसच्या आसपासच स्थिरावत असल्याने नाशिकमध्येही निर्धास्तीचे वातावरण होते. ९ जानेवारीपर्यंत अशीच स्थिती शहरात होती. मात्र, दोनच दिवसात म्हणजे ११ जानेवारीला, बुधवारी घसरलेला पारा थेट ५.८ अंश सेल्सिअरवर स्थिरावले. नाशिकमध्ये सर्वात नीचांकी तपमानाची नोंद झाली असून, त्यानंतर अहमदनगर ७.१, औरंगाबाद ७.६, पुणे ७.७, जळगाव ८.० याप्रमाणे नोंद झालेली आहे. यामुळे चांगलीच हुडहुडी भरली आहे. आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्याही वाढत्या थंडीमुळे बळावत असून ताप, सर्दी, खोकला, घसादुखीमुळेही अनेकजण हैराण झाले आहेत.

पेटल्या शेकोट्या

थंडी, हवेतील गारवा सहन करणेही अवघड झाल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या असल्याचे दिसून येत आहे. गोदाकाठापासून ते रस्त्यांच्या कडेकडेला शेकोट्या पेटवून उब मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोकदैवत आणि लोककलेचा जागर

$
0
0

तुषार देसले, मालेगाव

लोकदैवत खंडोबाचे मूळस्थान जेजुरी असले तरी बाणाई आणि खंडेराय यांच्या प्रेम आणि भक्तीभावाने पावन झालेल्या मालेगावनजीकच्या चंदनपुरीचे महत्त्वदेखील तितकेच आहे. गुरुवारपासून येथे यात्रोत्सव सुरू होत आहे.

मराठी लोकधर्मात आणि लोकजीवनात खंडोबा अर्थात जय मल्हार या लोकदेवतेला आगळेवेगळे स्थान आहे. मल्हारी महात्म्याच्या आधारे खंडोबाची उपासना महाराष्ट्रात बाराव्या शतकापासून केली जात आहे. भगवान शिवाच्या उपासनेतून अनेक पंथ उदयास आलेले आपण पाहतो. या पंथांच्या किंवा संप्रदायाच्या अखंड परंपरेतून आध्यात्मिक जीवनाचा आणि उच्च सांस्कृतिक जीवनाचा चालत आलेला वारसा आजही कायम आहे. परंतु, क्षेत्रपाल म्हणून लोकसंस्कृतीशी एकरूप झालेले खंडोबा, ज्योतिबा, जैतोबा यासारखे अवतारही लोकांचे श्रद्धास्थान राहिले आहेत. सत्वशील ऋषिमुनींना आणि ज्ञानसाधना करणाऱ्या ब्रह्मवृंदांना पीडा देऊन त्रस्त करणाऱ्या मणी आणि मल्ल या दोन दैत्यबंधूंच्या वधासाठी शिवाने जो अवतार घेतला तोच मल्हारी मार्तंड म्हणजे खंडोबाराय होय. खंडोबाराय हे महाराष्ट्रजनांचे, असंख्य मराठी कुटुंबांचे कुलदैवत आहे. खंडोबा हा महाराष्ट्र इतकाच कर्नाटकातही लोकप्रिय आहे, म्हणून या दैवताची महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन्ही प्रांत मिळून अकरा पवित्र स्थाने मानली जातात. त्यात जेजुरी, पालीपाठोपाठ चंदनपुरी हे पवित्र स्थान आहे.

चंदनपुरीचे माहात्म्य

पेशवेकाळात मल्हारराव होळकरांना चांदवडची जहागिरी मिळाली होती. मल्हाररावांच्या स्नुषा अहिल्यादेवी होळकर कमालीच्या भाविक होत्या. त्या लोकमातेने प्रथम खंडेराव महाराजांचे मंदिर बांधण्याचे पुण्यकर्म केले. आज चंदनपुरीला खंडेराव महाराजांचे जे मंदिर आहे ती अहिल्यादेवींचीच देणगी आहे. येथील खंडोबाचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मंदिराला डाव्या हाताने वळसा घालून पुढील महाद्वाराचे प्रवेश करता येतो. मंदिराला चोहोबाजूंनी दगडी तट असून, मंदिराच्या डाव्या बाजूला शंकराची पिंड आणि समोरच्या बाजूस नदी आहे. देवालायचा गाभारा फारच लहान आहे. गाभाऱ्याला लागून असलेला मंडप त्यापेक्षा बराच मोठा आहे. गाभारा व सभामंडप असे संपूर्ण मंदिर भक्कम दगडी बांधकाम आहे. गाभाऱ्यात गेल्यावर त्यात खंडोबा, म्हाळसाई आणि बाणाई यांच्या संगमरवरी दगडाच्या उभ्या मूर्ती आहेत. मध्यभागी खंडोबा, तर उजवीकडे म्हाळसाई आणि डाव्या बाजूस बाणाईची मूर्ती आहे. खंडोबाच्या उजव्या हातात खडग आहे. पायात जोडे घातले असून, डोक्याला अंगचाच मुकुट आहे. बाणाई आणि म्हाळसाई यांच्या मूर्तीत सर्वच दृष्टीने साम्य आहे. दोघांचे उजवे हात अभय दाखवित असून, डाव्या हातात कमलपुष्प आहे. खंडोबा हे दैवत लोकसंस्कृतीचे प्रतीक आहे. खंडोबा आणि बाणाईची प्रेमकथा आणि त्यामागील भक्तीभाव हा श्रद्धेचा विषय आहे. तसेच लोककथा आणि गीतांच्या माध्यमातून ते घराघरात पोहोचले आहेत. खंडोबा यांची पहिली पत्नी म्हणजे म्हाळसा. समुद्रमंथन झाल्यावर विष्णूने ज्या मोहिनीचे रूप धारण करून दैत्यांना मोहविले तेच रूप म्हणजे म्हाळसा होय. म्हाळसा आणि बाणाई लोकजीवनात एकमेकींच्या सवत मानल्या जात असल्या तरी अलौकिक अर्थाने म्हळसा ही बुध्दिची देवता, तर बाणाई ही श्रद्धेची देवता आहे. खंडेराय हे शिवतत्व आहेत. महाराष्ट्रातील पाली येथे खंडेराव आणि म्हाळसा यांच्या प्रीतीची परिणती त्यांच्या विवाहात झाली म्हणून पालीस प्रेमपूर म्हटले गेले, तर चंदनपुरी येथे खंडेराय आणि बाणाई यांच्या प्रीतीला त्यागवृतीने झिजणाऱ्या चंदनाचा सुंगंध प्राप्त झाला म्हणून की काय त्या स्थानाला चंदनपुरी हे नाम प्राप्त झाले असावे. खंडेराय महाराज व बाणाईच्या प्रीतीच्या आठवणींना उजळा देण्यासाठी शेकडो वर्षांपासून चंदनपुरी येथे यात्रोत्सव साजरा होत आहे. प्रत्यक्ष खंडेरावांचे अस्तित्व आपल्या गावात आहे, त्याचा गावकऱ्यांना सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्राचे लोकदैवत असलेले खंडेराय टीव्ही मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत. मात्र यामुळे जेजुरीइतकेच स्थान माहात्म्य असलेले चंदनपुरी नावारुपाला येत आहे. त्यामुळे येथे भेट देणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय वाढत आहे. पौष पौर्णिमा ते पौष आमवस्या असे पंधरा दिवस चालणारा हा यात्रोत्सव म्हणजे लोकदैवत आणि लोककलेचा जागरच म्हणावा लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्ष उत्पादक धास्तावले

$
0
0

निफाड तालुक्यात घसरता पारा

म. टा. वृत्तसेवा, निफाड

जम्मू-काश्मीरमध्ये पडत असलेल्या बर्फामुळे तापमान उणे झाल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात घट झाली आहे. या हंगामातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची सर्वात कमी नोंद झाली आहे. याचा फटका द्राक्षबागांना बसू शकतो, असा जाणकारांचा अंदाज आहे.

या हंगामात दुसऱ्यांदा ५ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, द्राक्षाचा हंगाम तोंडावर असल्याने दिवसागणिक कोसळत चाललेल्या तापमानाने व वाढत्या गारव्यामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. कडाक्याच्या थंडीने तालुका गारठल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून तसेच चहा घेऊन नागरिकांनी ऊब मिळविण्याचा प्रयत्न केला. वाढत्या थंडीमुळे गहू ,हरभरा, कांदा ,लसूण ,ज्वारी पिकांना फायदेशीर ठरत असेल मात्र थंडी अशी टिकून राहिली द्राक्षबागावर भुरी, डाऊनी या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. याशिवाय पक्व होत असलेल्या बागांचे मणी तडकण्याचेही प्रमाण वाढण्याची स्थिती निर्माण झाल्याने द्राक्ष उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ते’ दोन पोलिस कर्मचारी सापडेना!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक


सोनारास १४० ग्रॅम सोन्याचा गंडा घालणाऱ्या दोघा पोलिस कर्मचाऱ्यांचा १५ दिवसानंतरही कोणताही सुगावा लागलेला नाही. दोघा कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले असून, सायबर सेलमध्ये केलेल्या कामाच्या ज्ञानाचा फायदा घेत ते स्वतःचे अस्तित्व लपवण्यात यशस्वी होत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

प्रदीप ठाकरे व सागर निकुंभ अशी या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या दोघांनी अन्य चौघांच्या मदतीने संगमनेर येथील नायकवाडा पुरा येथे राहणाऱ्या रियाजउद्दीन मो. नुरउद्दीन दिन या बंगाली सराफी कारागिरास लुटले होते. सोन्याला शहरात जास्त भाव मिळत असल्याने हा कारागीर २० तोळे विक्री करण्यासाठी शहरात आला होता. सोन्याचा व्यवहार १ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पंचवटीतील गणेशवाडी येथील आयुर्वेद‌िक कॉलेज व दवाखान्यासमोर पार पडला. मात्र, सैफउद्दीन उर्फ राजू नजरूल इस्लाम, वडाळागावातील हसननवाज चिकनवाला, शिवदास सातपुते, आशिष निकुंभ (गणेशवाडी) यांनी सायबर सेलमध्ये कार्यरत असलेल्या प्रदीप ठाकरे व सागर निकुंभ यांनी संगनमत करून रियाजउद्दीन दिन यास फसवण्याचा कट आखला.


खोटे सोने विकतो, पावत्या दाखव, तुझ्यावर कारवाई करतो अशी दमबाजी करीत वरील संशयित आरोपींनी दिनकडील २० तोळ्यांपैकी १४ तोळे सोने काढून घेतले. उर्वरीत सहा तोळे घेऊन जा, अशी दमबाजी करीत संशयितांनी पोबारा केला होता. मात्र, बहिणीच्या लग्नासाठी पैशांची आवश्यकता असल्याने दिन यांनी सरळ पोलिस गाठले.


यानंतर, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाची सूत्रे फिरवून चौघांना अटक केली.दोघे पोलिस सायबर सेलमध्ये कार्यरत होते. गुन्हेगारांचा माग काढण्याचे महत्त्वाचे काम त्यांच्याकडे होते. त्याचाच फायदा त्यांना मिळत असून, लवकरच त्यांना जेरबंद क रण्यात येईल.-सचिन गोरे ,सहायक पोलिस आयुक्त.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होळकरांचा आज सेनाप्रवेश

$
0
0

राज्यमंत्री दादा भुसेंची उपस्थिती; निफाडला पक्षांतराचे वारे

म. टा. वृत्तसेवा, निफाड

जिल्हा परिषदांच्या निवडणुकींचा बिगूल वाजला असून निफाड तालुक्यात पक्षांतर सुरूच आहे. नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. तर आज (दि. १२) नानासाहेब पाटील यांचे पारंपरिक विरोधक जयदत्त होळकर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करीत आहेत.

निफाड तालुक्यात शिवसेना आणि भाजपमध्ये इतर पक्षातील नाराजांची तसेच दिग्गजांची इनकमिंग सुरूच आहे. यामध्ये प्रामुख्याने पिंपळगावचे काँग्रेस नेते भास्करराव बनकर आणि बाजार समिती संचालक बाळासाहेब क्षीरसागर यांनी आपल्या समर्थकांसह नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. तर मंगळवारी, झालेल्या नाशिक येथील भाजपच्या मेळाव्यात संचालक नानासाहेब पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

तर दुसरीकडे नानासाहेब पाटील यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी लासलगाव बाजार समितीचे सभापती आणि राष्ट्रवादीचे जयदत्त होळकर यांचा लांबलेला शिवसेना प्रवेश आज (दि. १२) रोजी निफाड येथे राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपास्थितीत प्रवेश करत आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या कल्पना सूर्यवंशी आणि निफाड पंचायत समितीचे काँग्रेसचे उपसभापती राहुल बनकर हेही प्रवेश करणार आहेत.

चार महिन्यांपूर्वी झालेल्या लासलगाव बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप नेते सुरेश पाटील, नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांचे पॅनल आणि आमदार अनिल कदम यांच्या पॅनलमध्ये लढत झाली होती. त्यात आमदार अनिल कदम यांच्या पॅनलने सत्ता काबीज केली होती. याच परिसरातील जयदत्त होळकर आणि नानासाहेब पाटील हे जिल्हा परिषदेचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यामुळे नागरिकांचे लक्ष या नेत्यांच्या निर्णयाकडे लागले होते. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठेची लढत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. आता या पक्षांतराने निफाडला पक्षांतराचे वारे सुरू झाल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय पक्षांचा हुप्पा हुय्या!

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजताच राजकीय पक्ष लगेच कामाला लागले असून, भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेसह छोट्या पक्षांनी निवडणुका जिंकण्याची रणन‌तिी आखण्यास सुरूवात केली आहे. आचारसंहितेची घोषणा होताच सर्व पक्षांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना उमेदवार निश्चितीची वाट न पाहता प्रचाराच्या कामाला लागण्याचे सर्वच शहराध्यक्षांनी फर्मान काढले आहेत. महापालिका व जिल्हा परिषदेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकावा यासाठी पक्ष जोमाने कामाला लागले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी राज्यातील १० महापालिका व २६ जिल्हा परिषदांची एकत्र‌ति निवडणुकीची घोषणा केली आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक महापालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी मतदान २१ फेब्रुवारी या एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसह प्रशासकीय यंत्रणेला निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. निवडणूक आचारसंहिता बुधवारी लागणार असल्याची

कल्पना सर्वच राजकीय पक्षांना होती. त्यामुळे सकाळपासून पक्षाच्या कार्यालयांमध्ये खलबते शिजण्यास सुरूवात झाली होती. दुपारी चार वाजता आचारसंहिता लागू होताच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सक्रिय झाले आहेत.

शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यासोबत गुप्तगू केले. भाजपसह शिवसेनेच्या कार्यालयांमध्ये आचारसंहिता लागू होताच पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. निवडणूक सेल स्थापन होऊन प्रचाराच्या नियोजनाची तयारी सुरू झाली आहे. मतदानासाठी केवळ ३५ दिवस शिल्लक असल्याने मोर्चेबांधणीला सुरूवात करत, उर्वरीत दिवसांच्या प्रचाराचे नियोजन राजकीय पक्षांकडून सुरू झाले आहेत. त्यात उमेदवार कोण असेल याचा विचार न करता, प्रत्येक प्रभाग व गटात पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी कामाला लागा, असे संदेश कार्यालयातून देण्यात आले आहेत. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते हे बुधवारपासूनच कामाला लागल्याचे पहायला मिळत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसची भिस्त बड्या नेत्यांवर

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधून सुरू असलेल्या आऊटगोईंगने चिंतीत झालेल्या काँग्रेसने आता सक्षम उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. सक्षम पर्याय उभा करण्यासाठी पक्षातीलच बड्या नेत्यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शैलेश कुटे यांनी महापालिका निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली असून, माजी शहराध्यक्षांना आता निवडणूक मैदानात उतरवले जाणार आहे. यामुळे प्रभाग क्रमांक १२ मध्ये लढत रंगतदार होणार असून, आघाडी झाल्यास काँग्रेससमोर धर्मसंकट उभे राहणार आहे.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यामुळे सध्या काँग्रेसमधूनही आऊटगोईंग सुरू आहे. गेल्या वेळेस काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र‌ति निवडणुका लढल्या होत्या. परंतु यावेळेस आघाडीवरून दोन्ही पक्षात बिघाडी असून, अद्याप आघाडीचे चित्र स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसकडे उमेदवार नसतानाही स्वबळाचा नारा दिला जात आहे. त्यामुळे आता काँग्रेसने आपल्या निष्ठांवत व जुन्या वरिष्ठ मंडळीनाच मैदाना उतरवण्यासाठी आग्रही आहेत. त्याचा शुभारंभ काँग्रेसची ताकद असलेल्या प्रभाग क्रमांक १२ मधून केला आहे. या ठिकाणी आता काँग्रेसने माजी शहराध्यक्ष शैलेश कुटे यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. कुटे यांच्या सोबतच या प्रभागातून पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, काँग्रेसचे जेष्ठ नेते उत्तमराव कांबळे याचे चिंरजीव समीर काबंळे आणि वर्षा तेजाळे यांना काँग्रेस निवडणूक रिंगणात उतरवणार आहेत. त्यामुळे आघाडी झाल्यास राष्ट्रवादी व काँग्रेससमोर पेच उभा राहणार असून, कोणाला उमेदवारी द्यायची यावरून दोन्ही पक्षांमध्ये वादावादी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐतिहासिक पक्षांतराची लागणार कसोटी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, ​नाशिक
नाशिक महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आता राजकीय पक्षांना जेमतेम महिना-सव्वा महिना मिळणार आहे. उमेदवारांची निवड आणि इतर प्रक्रियाही लवकरच सुरू होईल. इच्छुकांनी नव्या वर्षाच्या प्रारंभापासूनच जोरदार तयारी चालवली होती. काहींनी सरत्या वर्षात आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत नवा घरोबा केला. नाशिकमध्ये `न भूतोभविष्यती`अशा पद्धतीने ४४ नगरसेवकांनी पक्षांतर करून इतिहास घडविला आहे. राजकीय पक्षांनीही या मंडळींना फार आढेवेढेघेता पावन करून घेतले. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील पक्षांच्या सद्यस्थितीचा घेतलेला कानोसा...


मनेसेची अस्तित्वाची लढाई

महाराष्ट्रातील पहिलीवहिली सत्ता म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिकमधील सत्तेचे कोण अप्रूप राज्यभर पाच वर्षांपूर्वी होते. मधल्या काळात गोदावरीतून बरेच पाणी वाहून गेले अन् आज हाच पक्ष अस्तित्वाची लढाई लढत आहे. एखाद्या पक्षाच्या काटकोनातील प्रगतीचा अन् तेवढ्याच वेगवान घसरणीचा आलेख म्हणून नाशिकची मनसेची कारकीर्द ही राजकीय इतिहासात ठळक नोंद राहील. तब्बल ४० नगरसेवक निवडून देत नाशिककरांनी राज ठाकरेंवर कमालीचा विश्वास टाकला

होता. मला सत्ता द्या, मी नाशिकचा कायापालट करून दाखिवतो, असा शब्द देणाऱ्या राज ठाकरेंनी नंतर नाशिकला टपली मारली अन् अंतर्गत सुंदोपसुंदी आज पक्षाच्याच जीवावर उठली. प्रथम महापौर, आमदार व विविध लाभाची पदे भूषविणारे आजघडीला किमान २७ नगरसेवक पक्षातून बाहेर पडले आहे. या निवडणुकीत पक्षाला सर्वत्र उमेदवार भेटले तरी खुप झाले. अखेरच्या सत्रात राज ठाकरेंनी नाशिकसाठी केलेल्या कामांचा डंका पिटला खरा; पण तोपर्यंत खुप उशीर झाला होता. आता पक्षाला दोन अंकी मजल मारता आली तरी त्यांनी मोठे यश मिळविले असे होईल.


शत प्रतिशतच्या पवित्र्यात भाजप

सध्या सर्वाधिक चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे पाहिले जात आहे. नाशिकमध्ये तीन आमदार निवडून आल्यापासूनच पक्षाचे हौसले बुलंद झाले होते. त्यानंतर पक्षाने आपले दार सताड उघडे केले अन् येईल त्याला प्रवेश देण्याचा सपाटा लावल्याने जेथे कधीही कमळ फुलणे शक्य नाही असे वाटत होते तेथे पक्ष पोहोचला आहे व रुजलाही आहे. शिवसेना हाच आपला मुख्य विरोधक राहणार हे हेरून भाजपाने गुंड व गुन्हेगारांनाही पायघड्या घातल्याने टीका झाली खरी पण आता शिवसेनेशी मसल पॉवरच्याबाबतीतही कमी नाही हा आत्मविश्वास त्यांना आला. त्याचमुळे शिवसेनेची लचकेतोड करण्यापर्यंत भाजपची हिंमत गेली आहे. मध्यंतरी शिवसेनेने भाजपला लक्ष्य करीत सर्व विरोधी पक्षांची मोट बांधून वातावरण निर्मिती केली तेव्हा पक्ष अडचणीत आला होता. पण आता पालकमंत्री गिरीश महाजन यांनी `जो तो वांछिल तो तो लाहो` या वचनाधारे काम करण्यास सुरुवात केल्याने पक्षाला सुगीचे दिवस येत चालले आहेत. शतप्रतिशत भाजपचा नारा कधीकाळी भाजपने नाशिकच्याच अधिवेशनात दिला होता, त्या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे. अर्थात इतर पक्षातील आयारामांना मिळणारी संधी ही निष्ठावंतांना बोचत असून, या असंतोषाचा फटका किती बसतो यावर भाजपचे भगवा फडकाविण्याचे स्वप्न साकार होणार की नाही ते दिसेल.



उर्वरित महाराष्ट्रातील शिवसेनेचा सत्तामार्ग प्रशस्त करणाऱ्या नाशिकमध्ये गेल्याखेपेस धाकली पाती मनसेने चमत्कार घडवित हा मार्ग अडविला तेव्हापासूनच शिवसेना ही जखम अंगावर वागवित वाटचाल करीत होती. नंतर सातत्याने पक्षाला मोठ्या प्रमाणात पिछेहाटीस सामोरे जावे लागले. मनसेच्या यशाची जागा नंतर भाजपने घेतली, त्यामुळे शिवसेना गडबडली. पक्ष सैरभैर झाला. आता महापालिकेत मनसेची घसरण होत असतांना पुन्हा एकदा ती पोकळी भरून काढण्यासाठी शिवसेना सज्ज होत आहे. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. मनसेतील सर्वाधिक नगरसेवक शिवसेनेत आले असून, काही प्रमाणात राष्ट्रवादी व काँग्रेसचीही मंडळी शिवसेनेला प्राधान्य देत असल्याने हॉट फेव्हरीट म्हणून शिवसेना समजली जात आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या बुलंद महत्वाकांक्षांना धक्के देण्यास सुरुवात केल्याने शिवसेनेची वाट बिकट होत चालली आहे. काही महिन्यांपूर्वीचे अनुकूल वातावरण धूसर होत आहे.

छोट्या पक्षांचा मर्यादित प्रभाव

आरपीआय, माकपा, बसपा, सपा, एमआयएम व काही स्थानिक आघाड्या या निवडणुकीत नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार असल्या तरी त्यांचा प्रभाव अगदीच मर्यादित राहील. आरपीआय यावेळेस भाजपचा मित्रपक्ष राहणार असल्याने त्यांना त्याच कितपत फायदा होतो ते पहावयाचे. गेल्याखेपेस आरपीआय शिवसेनेच्या चिन्हावर लढले होते, तरी त्यांच्या तीन जागा आल्या होत्या. यंदा भाजपच्या जोडीने त्यात थोडी भर पडू शकेल. राज्यात इतरत्र शिरकाव करू पाहणाऱ्या एमआयएमला गेल्या खेपेसही नाशिककरांनी उभे केले नव्हते. यंदा राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पडत्या काळात एमआयएमला संधी मिळू शकते. बसपाला गेल्यावेळेसच राष्ट्रवादीने गिळंकृत केले होते. नंतर पक्षाची अवस्था आणखी बिकट झाली यंदा काही उमेदवार उभे करण्यापलीकडे फार काही हाती लागणार नाही असे दिसते. माकपाने गेल्यावेळी तीन जागा मिळवून जोरदार पुनरागमन केले खरे पण नंतर त्यांच्या दोघांनी चक्क लाल बावटा टाकून देत भगवा खांद्यावर घेतला होता. यावेळेस त्यांना हे संख्याबळ टिकविण्यासाठी फारच कष्ट प़डतील असे दिसते.

काँग्रेस अजूनही गळाठलेलीच!

भरवशाच्या म्हशीला टोणगा या म्हणीचा प्रत्यय गेल्या खेपेसच राष्ट्रवादीच्या बाबतीत आला होता. भुजबळांच्या सुवर्णमयी काळातही पक्ष २२ जागांपुढे सरकला नव्हता. पुढे तर पक्षाची पार वाताहात झाली. भुजबळांच्या अडचणीपाठोपाठ पक्षही विस्कळीत झाला. शहरात तशी पक्षाची फारश ताकद कधी नव्हतीच; पण तरीही भुजबळांनी पक्षात चांगलीच हवा भरली होती. काही दिवसांनी ही हवा निघून गेली अन् नंतर तर पक्ष चक्क निर्नायकी झाला. मनसेप्रमाणेच राष्ट्रवादीच्याही अनेक नगरसेवकांनी इतर पक्षांचा आसरा घेतल्याने नव्या दमाचे उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. पक्षातील अनेक नेत्यांच्या घोटाळ्याच्या व अटकेच्या बातम्यांनी बदनामीही खुप झाल्याने पूर्णत: आत्मविश्वास गमावल्याच्या स्थितीत राष्ट्रवादी कितपत तग धरील हा मोठाच प्रश्न आहे.

एकेकाळी शहरावर कमालीचा प्रभाव असलेल्या काँग्रेसला गेल्या काही वर्षात लागलेली उतरती कळा थांबायला काही तयार नाही. दिल्ली ते गल्ली होत असलेल्या पिछेहाटीचा मार्ग प्रशस्त करणारीच स्थिती पक्षाची नाशकात आहे. नगरसेवकांनी संधीसाधूपणा चालविला असला तरी पक्षसंघटनाच इतकी विसविशीत झाली आहे की कोणी थांबायलाही तयार नाही. अशी दारुण स्थिती असतांनाही पक्षात शहराध्यक्ष विरुध्द निष्ठावंत असा वाद रंगतो आहे, यावरून पक्ष अजूनही सुधारण्यास तयार नाही हेच सिध्द होते. अनेक ठिकाणी पक्षाला उमेदवार मिळण्याची मारामार होणार असतांना पक्षांतर्गत संघर्ष होणार असेल तर काय भवितव्य असणार हे उघडच आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपकडून पैसे लुटा; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘नोटबंदीनंतर केवळ भाजपकडे पैसा असून, महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवारांकडून पैसे लुटा,’ असे खळबळजनक आवाहन भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. भाजप शिवसेनेला संपव‌ण्यिाचे काम करत असून, शिवसेना भाजपची युती होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे मिम‌ीक्री आर्टिस्ट असल्याची खिल्लीही त्यांनी उडवली आहे.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना आंबेडकर यांनी शिवसेना भाजपवर जोरदार ट‌‌ीका केली आहे. नोटबंदीनंतर केवळ भाजपकडेच पैसे असल्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आरोपाला आंबेडकर यांनी दुजोरा दिला असून, भाजपकडून या निवडणुकीत मोठया प्रमाणावर पैशांचा वापर केला जाणार आहे. परंतु मतदारांनी भाजपकडून हा पैसा लुटून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. महापालिका व जिल्हा परिषदेसाठी शिवसेना व भाजपमध्ये युतीच्या चर्चा सुरू आहेत. परंतु भाजपला सेनेला संपवायचे असल्याने ही युती होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भारीप बहुजन महासंघ काही

ठिकाणी पूर्णपणे पॅनल उभे करणार असून, पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढवली जाणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्ययन केंद्राचे अतिक्रमण काढले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील महानगरपालिका शेजारी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्राचे अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून वाद सुरू होता. अखेर अध्ययन केंद्राचे अतिक्रमण गुरुवारी (दि. १२) सकाळपासून काढण्यास सुरुवात करून त्याठिकाणी सायंकाळपर्यंत रस्ता तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली.

अध्ययन केंद्र महापालिकेने जमीनदोस्त केल्यानंतर आता पुढे शहरातील भगवा चौकातील शिवसेना कार्यालयावर जेसीबी चालविला जाणार आहे. येत्या दोन दिवसांत स्वत:हून शिवसेना कार्यालयाचे अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा मनपा हे कार्यालय जमीनदोस्त करेल, अशी सूचना मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख नंदलाल बैसाणे यांनी दिली. या वेळी शिवसेनेचे संजय गुजराथी आणि इतर पदाधिकारी कार्यालयात होते.

शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम आमदार अनिल गोटे यांच्या रडारवर असून त्यांनी शहरात विविध ठिकाणचे १९ अतिक्रमणे काढण्याबाबतची तक्रार महापालिकेला दिली आहे. देवपुरातील वीर सावरकर पुतळ्यासमोरील नदीकाठी असलेले तत्त्वज्ञान केंद्राचे अतिक्रमण त्यांनी स्वत:हूनच काढून घेतले होते. या अध्ययन केंद्राचे प्रमुख एम. जी. धिवरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी पर्यायी जागेची मागणी करत विरोध दर्शविला होता. त्यामुळे तणाव निर्माण झाल्याने मोहीम तात्पुरती थांबविण्यात आली होती. मंगळवारी, याविषयावरून एम. जी. धिवरे व पदा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदू चव्हाण यांची लवकरच मुक्तता

$
0
0

पाकचे आश्वासन; संरक्षण राज्यमंत्र्यांची ग्वाही

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

भारत-पाकिस्तान यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा अनवधानाने ओलांडल्यामुळे पाकिस्तानी लष्कराच्या तावडीत सापडलेले धुळ्याचे २२ वर्षांचे जवान चंदू चव्हाण यांची लवकरच सुटका होणार आहे, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी गुरुवारी मुंबईत दिली. पाकच्या लष्करी कारवायाविषयक महासंचालकांनीच (डीजीएमओ) हे आश्वासन दिले असून, पाककडून प्रथमच ठोसपणे सूतोवाच झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

धुळ्याच्या बोरविहीर गावचे चंदू चव्हाण चार वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले. ‘३७, राष्ट्रीय रायफल्स’मध्ये असलेले चंदू चव्हाण ३० सप्टेंबर रोजी सीमेवर गस्त घालताना पाक सैनिकांच्या तावडीत सापडले. तेव्हापासून त्यांचे कुटुंबीय हवालदील आहेत. मात्र, चंदू चव्हाण यांच्या जीविताला धोका नसल्याचे पाकने आश्वस्त केल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले.

डीजीएमओ स्तरावर आतापर्यंत पाकशी १५ ते २०वेळा चर्चा झाली. परंतु, दोनच दिवसांपूर्वी झालेल्या चर्चेत पाकने चव्हाण यांच्याविषयी ठोस आश्वासन दिले आहे. ‘भारतीय जवानाची चौकशी संपली असून, आम्ही त्याला लवकरच सोडू’, अशी ग्वाही पाक अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे भामरे यांनी सांगितले.

दरम्यान, सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने निकृष्ट जेवणाबद्दल केलेल्या तक्रारीसारखी कोणतीही तक्रार आपल्याकडे लष्कर, हवाई दल किंवा नौदलाकडून आलेली नाही. सीमा सुरक्षा दलाच्या तक्रारीविषयीही गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चौकशी केली आहे व त्यानुसार उत्तर दिले आहे, असे भामरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐतिहासिक बुद्धविहारास बारा वर्षांनी चालना

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झालेल्या येथील बुद्धविहाराचे एक तपापासून रखडलेले काम अखेर मार्गी लागले आहे. राज्याच्या सामाजिक व विशेष सहाय्य्य विभागाने ६७ लाखांचा निधी त्यासाठी मंजूर केल्याने खऱ्या अर्थाने येथील या रखडलेल्या कामाला गती मिळणार आहे.

देवळालीतील बाजार भागात असलेल्या बुद्धविहाराचे नूतनीकरणाचे काम सुरू होते. मात्र, अपुऱ्या निधीअभावी ते रखडले होते. शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मान्यवर व्यक्तींचे स्मारक बांधणे, तसेच सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या स्थळांचा विकास करणे यासाठी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देवळालीचे संजय आणि शैलेश भालेराव या बंधूंना समजताच त्यांनी देवळालीतील बुद्धविहाराच्या रखडलेल्या कामासाठी पुढाकार घेत या योजनेंतर्गत कागदपत्रांची पूर्तता करीत शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाने निर्णय क्रमांक २०१६ प. क्र. ६२५ - बांधकाम मंत्रालय दि. १० जानेवारी २०१७ अन्वये बुद्धविहार व प्रशिक्षण केंद्र यासाठी ६७ लाख २० हजार ६९० रुपयांना मंजुरी दिल्याने आता या बुद्धविहाराच्या कामाला गती मिळणार आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, समाजकल्याण विभागातील सर्व अधिकारी, खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार वसंत गिते, रिपाइंचे विश्वनाथ काळे यांच्यासह आर्किटेक्ट दीपक मगर व सार्वजनिक बांधकाम खाते व आंबेडकर अनुयायांचे याकामी सहकार्य लाभले.

डॉ. आंबेडकरांचा पदस्पर्श

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे १९३५ च्या दरम्यान सध्याचे बार्न्स स्कूल व तत्कालीन ब्रिटिश सरकारचे न्यायालय येथे न्यायालयीन कामकाजाकरिता येत असत. त्यावेळी येथील आंबेडकरी अनुयायांना मार्गदर्शन करीत असताना या बुद्धविहारास बाबासाहेबांचा पदस्पर्श झाला. त्यावेळी दादासाहेब गायकवाड, शांताबाई दाणी, यशवंतराव चव्हाण व इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते. अशा या ऐतिहासिक बुद्धविहाराचे ज्ञानमंदिरात रूपांतर करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेने पाच बैल ठार

$
0
0

मालेगाव : मालेगाव-नांदगाव मार्गावर जातपाडे गावाजवळ रामवाडी शिवारात बुधवारी रात्री मालट्रक व ऊसतोडणी कामगारांच्या बैलगाडी यांचा अपघात झाला. यात पाच बैल जागीच ठार झाले तर बैलगाडीवरील १० मजूर जखमी झाले.
रात्री अकराच्या सुमारास मालेगावकडून नांदगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा ट्रकने (एम. एच. ४१ जी. ६१४८) रस्त्याच्या कडेला निमगावच्या दिशेने जात असलेल्या ७ बैलगाड्यांना जोरदार धडक दिली. यात बैलगाड्याला जुंपलेले ५ बैल जागीच ठार झाले तर १० उसतोड मजूर जखमी झाले. यानंतर परिसरातील नागरिकांनी धावपळ करीत जखमींना उपचारासाठी येथील स्थानिक रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, गुरुवारी सकाळी संतप्त ऊसतोडणी मजुरांचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी रस्ता रोको केल्याने काही काळ वाहतूक खोळंबली. अपर पोलिस अधीक्षक राकेश ओला व पोलिस प्रशासनाने ऊसतोडणी मजुरांची समजूत काढल्यावर वाहतूक सुरळीत झाली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images