Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आघाडीसाठी सूर जुळेना!

$
0
0

बैठक निष्फळ; अशोक चव्हाणांच्या कोर्टात चेंडू

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेना-भाजपच्या फारकतनंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीतही आघाडीसाठी सूर जुळत नसल्याचे चित्र आहे. रविवारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आघाडीसंदर्भातील बैठक निष्फळ ठरली. तीन प्रभागांवरून आघाडीचे घोडे अडले आहे. यामुळे राष्ट्रवादीचे प्रभारी आमदार जितेंद्र आव्हाड आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात आज (दि.३०) होणाऱ्या बैठकीत अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे.

शिवसेना व भाजपचा सामना करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र यावे, अशी कार्यकर्त्यांची भावना असतांनाही दोघांमध्ये अजूनही जागावाटपाच्या फॉर्म्युलावर एकमत होत नाही. जागावाटपाचे सूत्र ठरविण्यासाठी रविवारी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, शहराध्यक्ष शरद आहेर आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार जयंत जाधव, नाना महाले यांच्यात बैठक झाली. परंतु, या बैठकीत ४, १२, १६ या तीन प्रभागांवरून एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे बैठक निष्फळ ठरली. अखेरीस अंतिम निर्णयाचा चेंडू मुंबईकडे टोलवण्यात आला आहे. या तीन जागांसंदर्भात राधाकृष्ण विखे पाटील हे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहेत. त अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे.

भाजपची आज यादी?

भाजप व शिवसेनेने उमेदवार याद्या जवळपास अंतिम केल्या आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन हे सोमवारी भाजपच्या यादीवर अंतिम हात फिरवणार असून, सोमवारी उशिरापर्यंत यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहेत. शिवसेनेनेची उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच यादी जाहीर केली जाईल. दोन्ही पक्षांतील बंडखोरांना काँग्रेस व राष्ट्रवादीकडून चाचपडले जाणार असल्याने आघाडीची यादी शेवटच्या दिवशी जाहीर होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ठाकरेंसाठी ‘टाटा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर सुरू झालेल्या वनौषधी उद्यानाला सोमवारी प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा भेट देणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देण्यात आली. या वेळी पक्षप्रमुख राज ठाकरे हजर राहणार असून, पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादीही जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून साकारण्यात आलेल्या काही प्रोजेक्टपैकी एक असलेल्या वनौषधी उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यास मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकरांनी हजेरी लावली होती. या वेळी अमिताभ बच्चन, तसेच रतन टाटा येणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, टाटा ट्रस्टच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीतून वनौषधी उद्यानाला आर्थिक मदत करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक संदेश देणारा ‘कथा अरण्याची’ हा साऊंड आणि लाइट शो सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर टाटा यांनी उद्यानाला भेट द्यावी, यासाठी राज ठाकरे आग्रही होते. ठाकरेंच्या विनंतीला टाटा यांनी मान दिला असून, ते सोमवारी सकाळी उद्यानाला भेट देणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले. ठाकरे रविवारी रात्री शहरात दाखल झाले आहेत.

पहिली यादीही जाहीर होण्याची शक्यता

मनसेच्या जवळपास पावणेपाचशे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आला. या मुलाखतींचा सार काढत त्याचा अहवाल संपर्कनेते अविनाश अभ्यंकर यांनी राज ठाकरे यांना सादर केला. ३० किंवा ३१ जानेवारी रोजी पक्षाची पहिली यादी जाहीर होऊ शकते. रतन टाटा यांच्या भेटीच्या निमित्ताने शहरात दाखल होणारे ठाकरे कोणाची नावे जाहीर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियावरील ‘राजकारण’ थंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित करण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे अतिउत्साही उमेदवारांनी प्रचारसुद्धा सुरू केला आहे. उत्साह अद्याप शिगेला पोहोचला नसला तरी निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण गरम होण्यास सुरुवात झाली आहे. यात सोशल मीडिया मात्र थंड पडलेला दिसतो. पोलिस आपल्या पातळीवर सोशल मीडियावरील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या दंगलीत तेल ओतण्याचे काम सोशल मीडियाने केले होते. यामुळे शहरातील वायलेस इंटरनेट सेवा तब्बल चार ते पाच दिवस बंद ठेवण्यात आली होती. राज्यात पहिल्यांदाच असा प्रयोग झाला. यानंतर शहर, तसेच ग्रामीण पोलिस दलाने अफवा किंवा दोन समाजांत तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीने पसरवण्यात आलेल्या माहितीचे संकलन केले. त्यानुसार शहर, तसेच ग्रामीण हद्दीत प्रत्येक सात ते आठ व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनवर गुन्हे दाखल झाले. याशिवाय काही फेसबुक युजरदेखील कायद्याच्या कचाट्यात सापडले. या घटनेने सोशल मीडियाचा अंदाधुंद वापर करणाऱ्यांना चांगला धडा मिळाला. सध्या शहरात महापालिका, तर ग्रामीण भागात जिल्हा परिषद निवडणुकीचा फिव्हर पाहण्यास मिळतो आहे. मात्र, यात सोशल मीडिया अलिप्त असल्याचे दिसते. याबाबत बोलताना क्राइम ब्रँचचे सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले, की व्हॉट्सअॅप किंवा इतर सोशल मीडियाचा वापर प्रत्येकाने जबाबदारीने केला पाहिजे. आपल्याकडून इतरांची बदनामी होणार नाही, अफवा पसरणार नाही याची दक्षता घेतली गेली नाही तर पोलिस कारवाई करतील. यासाठी सायबर सेलला सूचना करण्यात आल्या असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सर्वसामान्य नागरिक या प्रक्रियेपासून जाणीवपूर्वक दूर राहत असल्याचे सांगितले जात आहे. युतीबाबत मुंबईत दीर्घकाळ झालेला वाद, काँग्रेस- राष्ट्रवादीची सद्यःस्थिती, तसेच नोटाबंदीसारख्या बाबींचा हा परिणाम असल्याचे राजकीय विश्लेषकांनी सांगितले. सध्या तरी राजकीय कार्यकर्त्यांपुरतेच वातावरण गरम असून, त्यात सर्वसामान्य मतदार इतक्या लवकर सहभागी होणार नसल्याचे दिसून येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केनियाचा इसाक केम्बोई अव्वल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व नाशिक रनर्सतर्फे वणी येथील गडावर रविवारी झालेल्या सप्तशृंगी मॅरेथॉन स्पर्धेत खुल्या गटात केनियाच्या इसाक केम्बोईने, तर मुलींमध्ये मंजू सोहनीने विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत अर्जेंटिनाचीही लीना मारियेला ही महिला खेळाडूही सहभागी झाली होती. तिने स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असून, ही स्पर्धा पुढेही सुरूच राहणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

ही स्पर्धा ३, १० आणि २१ किलोमीटर अशा तीन गटांमध्ये झाली. देशातील ग्रामीण भागात अनेक प्रतिभावान खेळाडू असून, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही मॅरेथॉन स्पर्धा सप्तशृंगी गडावर घेण्यात आली. विजेत्या खेळाडूंना रोख रकमेसह श्री सप्तशृंगीदेवीची प्रतिमा भेट देण्यात आली. जिल्हा प्रधान न्यायाधीश ए. एम. ढवळे, न्यायाधीश एस. पी. पैठणकर, अॅड. नितीन ठाकरे, सप्तशृंगीदेवी ट्रस्टचे राजेंद्र सूर्यवंशी, जयंत जायभावे, तहसीलदार कैलास चावडे उपस्थित होते. नारायण वाघ, डॉ. प्रशांत देवरे, महेंद्र छोरिया, श्रीपाद दाबक, सुयोग शहा, अतुल संगमनेरकर, सुजित नायर यांनी सहकार्य केले. स्पर्धेत डॉ. राजेंद्र नेहेते, डॉ. वैभव पाटील, डॉ. नितीन वाघचौरे यांचे वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले होते.

स्पर्धेचा निकाल

१० किलोमीटर ः

मुले ः प्रथम- धर्मेंदर, द्वितीय- नितीन गावित, तृतीय- सोनू सोनवणे. मुली ः प्रथम- पूनम सोनवणे, द्वितीय- सायली मेंगे, तृतीय- वर्षा चौधरी.

२१ किलोमीटर

पुरुष ः प्रथम- इसाक केम्बोई, केनिया, द्वितीय- हिरामण थविल. मुली ः प्रथम- मंजू सोहनी, द्वितीय- लीना मारियेला, अर्जेंटिना.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवार कुटुंब एकसंधच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

पवार कुटुंबात कुठलेही मतभेद नसून, आम्ही एकसंध आहोत व कळवण तालुक्याच्या विकासासाठी आम्ही सर्व तत्पर असल्याची ग्वाही रविवारी पवार कुटुंबीयांनी मेळाव्याद्वारे दिली.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली कळवण येथील श्रीसाई लॉन्सवर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद मेळावा झाला. त्यावेळी पवार कुटुंबीयांनी मत व्यक्त केले. मेळाव्यात पवार कुटुंबातील सर्व सदस्य एकाच वेळी व्यासपीठावर उपस्थित असल्याने ते काय संवाद साधतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. आम्ही तालुक्याच्या विकासासाठी एकसंध असल्याची ग्वाही त्यांनी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

ज्येष्ठ विधिज्ञ शशिकांत पवार, जिल्हा परिषदेचे गटनेते रवींद्र देवरे, जिल्हा बँकेचे संचालक धनंजय पवार, नगरपंचायतीचे गटनेते कौतिक पगार, ज्येष्ठ नेते नारायण हिरे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, प्रवीण पवार, उपसभापती संजय पवार, पांडुरंग पाटील, पोपटराव वाघ, अशोक पवार, जितेंद्र पवार, योगेश पगार, शरद गुंजाळ आदी प्रमुख पाहुणे होते.

गेल्या चार दशकांपासून माजी मंत्री ए. टी. पवार यांनी कळवण तालुक्याचे विधानसभेत प्रतिनिधित्व करून आपले संपूर्ण आयुष्य तालुक्याच्या विकासासाठी खर्च केले. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, वीज व सिंचन या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करून तालुका सुजलाम् सुफलाम् केला. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून तालुक्याचा विकास खुंटला असून, विकासकामे ठप्प झाली आहेत. खासदार, आमदाराला तालुक्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. भाजप सरकारने जनतेचा आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून, नोटबंदीमुळे जनता त्रस्त झाल्याची टीका करतानाच पवार कुटुंबात मतभेद नसल्याचेही जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. नोटबंदीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तालुक्यातील जनता आता पश्चात्ताप करीत आहे. आमच्या कुटुंबात कुठलाही वाद व भांडण नसून, भांडण करणे आमच्या कुटुंबाला माहीत नाही. तालुक्याच्या विकासासाठी पवार कुटुंबामागे उभे राहण्याचे आवाहन डॉ. पवार यांनी केले.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत पवार, गटनेते रवींद्र देवरे, नारायण हिरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी मनोगत व्यक्त करून ए. टी. पवार यांनी केलेला विकास जनतेला ज्ञात असून, त्यांच्या विकासकार्याचा या वेळी गौरव केला. दोन वर्षांपासून विकास खुंटला असून, विकासासाठी तालुक्यातील जनता पवार कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभी असून, पवार कुटुंब एकसंध असताना कुणीही या कुटुंबाबाबत अपप्रचार करू नये, असे आवाहनही या वेळी केले.

जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन पवार यांनी सांगितले, की तालुक्यात ए. टी. पवारांनी आपल्या कारकिर्दीत मंजूर केलेली कामे तालुक्यात सध्या सुरू असून, नवीन कामे करण्यात आमदार व खासदारांना अपयश आले आहे. सुरगाणा तालुक्यातील जनतेचा विकास ज्या खासदार व आमदाराला करता आला नाही ते काय कळवण तालुक्याचा विकास करतील, असा सवालही त्यांनी केला. तालुक्यातील जनता भरकटत चालली असून, अपप्रचाराला बळी पडल्याने विधानसभेत पक्षाला पराभव पत्करावा लागला. मधुकर भदाणे, कडू पाटील, मावंजी पाटील, रामा पाटील, केदा बहिरम, हरिभाऊ वाघ, अशोक पाटील, रामचंद्र गायकवाड, ज्ञानदेव पवार, देवेंद्र गायकवाड, शांताराम जाधव, विलास रौंदळ, प्रवीण रौंदळ, भिवा बागूल, उमेश वाघ, दीपक वाघ, आशुतोष आहेर, सनी बोरसे, मनोज पवार, विष्णू बोरसे, अशोक पाटील, रामदास देवरे, नरेंद्र वाघ, नितीन पवार, सुनील देवरे, सुनील जाधव, रमेश पवार, यशवंत पवार, श्याम भोये, लक्ष्मण पवार आदी उपस्थित होते. विलास रौंदळ यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र पवार यांनी आभार मानले.

पवार कुटुंबीयाबद्दल विरोधकांचा अपप्रचार

तालुक्यातील पाणीप्रश्न महत्त्वाचा असून पाण्याचे आरक्षण, आवर्तन यासाठी तालुक्यातील जनतेला एकत्र यावे लागणार आहे. आमच्या कुटुंबात कलह असल्याचा विरोधक अपप्रचार करीत आहे. आम्ही सर्व एक आहोत आणि तुमच्यासमोर आहोत. केवळ तालुक्यातील जनतेच्या हिताची जोपासना करण्याची शिकवण आम्हाला ए. टी. पवारांनी दिली आहे. त्या हिताची जोपासना करण्याचे आमचे कर्तव्य असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पवार कुटुंब व राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन नितीन पवार यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ?

$
0
0

संजय लोणारी, येवला

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १ फेब्रुवारीपासुन सुरुवात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील राजकारणाचे रंगढंग आता समोर येऊ लागले आहेत. उमेदवारीच्या घोडेमैदानात आशाआकांक्षेचे धुमारे फुटलेल्या इच्छुकांचे घोडे चांगल्याच टापा टाकत ताल धरू लागले असून, पक्षांच्या नेतेमंडळींच्या पावलांकडे इच्छुकांसह सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत तालुक्यातील वाहत्या प्रवाहाचा एकंदरीत अंदाज घेत गट व गणांमधील बहुसंख्य इच्छुकांचा ओढा शिवसेनेच्या रिंगणाकडे वाढत चालल्याने इच्छुकांच्या या भाऊगर्दीत शिवसेनेच्या जिल्हा नेत्यांची कसोटी लागणार आहे.

जिल्हा परिषदेसह पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने येवला तालुक्यातील पाच गट व दहा गणांतील राजकीय वातावरण गेल्या महिनाभरात ढवळून निघतानाच आता उमेदवारी वाटपाच्या महत्त्वपूर्ण पर्वात तर अनेक गट व गणांतील राजकारणाने कूस बदलण्यास सुरुवात केली आहे. त्यातही मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामासाठी भाजपशी काडीमोड घेत शिवसेनेने राज्यभर ‘एकला चलो रे’चा नारा दिल्याचे परिणाम येवला तालुक्यातील राजकारणातही दिसू लागले आहेत. तालुक्यात प्रबळतेच्या दृष्टीने सर्वांत पुढे असणाऱ्या शिवसेनेने अगोदरच येथे जोरदार तयारी सुरू केली होती. शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यातच येवल्यातील गट व गणांच्या लढाईत प्रामुख्याने मुकाबला होईल असे आतापर्यंतचे चित्र दिसत असतानाच मुंबईत शिवसेनेने दिलेल्या नाऱ्याचे पडसाद आता येवल्यातही उमटू लागले आहेत. भाजपदेखील शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी पुढे सरसावली असून शतप्रतिशत भाजपचा नारा देत माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी झालेला भाजपचा मेळावा त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल. भाजपचा शुक्रवारचा मेळावा होतो न होतो, तोच शिवसेनेनेदेखील शनिवारी येवल्यात मोठा मेळावा घेत एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केले. भाजपच्या मेळाव्यात नेते अन् पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील ‘झेडपी’च्या पाच जागांसह पंचायत समितीच्या दहाही जागांवर उमेदवार देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळेच भाजप कुठल्या गट व गणातून नेमके कुणाला निवडणूक रिंगणात उतरवणार याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. तालुक्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांकडे सध्या इच्छुकांची मोठी गर्दी दिसत आहे. त्या मानाने भाजपसह काँग्रेसकडयाबाबतीत म्हणावे तसे चित्र दिसत नाही. त्यामुळेच शिवसेना व राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळणाऱ्यांवर भाजपसह काँग्रेसचे लक्ष गेल्यास नवल वाटायला नको. कुठल्या गट व गणात असे नेमके कोणकोणते मासे भाजपच्या गळाला लागतात, याचे उत्तर मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडल्यावरच समोर येणार आहे.

येवला तालुक्यातील अनेक गट व गणांतील इच्छुकांच्या भाऊगर्दीवर नजर टाकली तर शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीकडेही गर्दी दिसत आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तालुक्यातील पाच गटांपैकी तब्बल चार गट, तर पंचायत समितीच्या दहापैकी आठ गण काबीज करणाऱ्या राष्ट्रवादीकडे गेल्यावेळच्या तुलनेने यंदा गर्दी ओसरली असली, तरी पाटोदा, अंदरसूल यांसारख्या जिल्हा परिषद गटांसह पंचायत समितीच्या काही गणांमध्ये पक्षातील आहे त्यांच्यातच उमेदवारीवरून कलगीतुरा रंगला आहे. त्यामुळेच या तिकिटाच्या साठमारीत कुणाला ‘हाय’ करायचं अन् कुणाला ‘नाय’, हे अवघड बनलेलं गणित सोडवताना राष्ट्रवादीच्या जिल्हा नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. विशेषतः पाटोदा गटातील संजय बनकर, बाळासाहेब पिंपरकर, ज्ञानेश्वर शेवाळे आदी १२ इच्छुकांसह अंदरसूल गणातील शाहुराजे शिंदे, मकरंद सोनवणे, महेंद्र काले आदी इच्छुकांमधील उमेदवारीचा तिढा राष्ट्रवादी नेमका कसा सोडवते, यावरही तालुक्यातील निवडणुकीचे गणित अवलंबून असणार आहे हे नक्की.

शिवसेनेपुढे तर उमेदवारीवरून मोठा पेच आहे. राजापूर गटातून जिल्हा बँकेचे चेअरमन नरेंद्र दराडे यांनी शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ आपल्याच हाती हे गृहीत धरून गटात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. या गटातील राजापूर व सायगाव या दोन्ही गणांत आपल्या जोडीला दमदार उमेदवार असावेत या दृष्टीने दराडेंनी बाजार समितीचे माजी सभापती राहिलेले राष्ट्रवादीचे देविदास निकम यांना शिवसेनेत प्रवेश देऊन पावन करून घेतले आहे. निकम यांच्या पत्नीला अनुसूचित जाती स्त्री राखीव जागेवर शिवसेनेची उमेदवारी मिळवून देण्याचा दराडे यांचा मनसुबा आहे. मात्र, निकम गणाबाहेरचे असल्याने त्यांच्या शिवसेना प्रवेशानंतर गणात स्थानिक उमेदवार द्यावा ही मागणी बळावू लागली आहे. माजी आमदार मारोतराव पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पंचायत समितीच्या सावरगाव गणातही उमेदवारी देताना पक्षश्रेष्ठींची कसोटी लागणार आहे. या गणातील गेल्या पोटनिवडणुकीवेळी पुढच्या आश्वासनावर थांबलेले ज्येष्ठ नेते साकरचंद साळवे यांचे पुत्र कांतिलाल आपल्या सौभाग्यवती आशा यांच्यासाठी आधीच शिवसेनेकडून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असताना दराडे समर्थक सुधीर जाधव यांनी आपल्या पत्नी शोभा यांच्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर अचानक शिवसेनेत उडी घेतली आहे. ओबीसी स्त्री राखीव असलेल्या सावरगाव गणात साळवे कि जाधव, हा गुंता शिवसेना कशी सोडवते हे बघणे औत्सुक्याचे असेल. गट व गणातील इच्छुकांच्या शनिवारी मुलाखती घेतल्या. शिवसेनेकडे ऐन निवडणुकीच्या तोंडावर लागलेली इच्छुकांची रीघ बघता जिल्हानेत्यांसह पक्षश्रेष्ठी कुठल्या गट आणि गणात नेमक्या कुणापुढे उमेदवारीच्या पायघड्या अंथरतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'राज'कल्पनेतून साकारलेल्या गार्डनला टाटांची दाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीने आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या बॉटनीकल गार्डनची उद्योगपती रतन टाटा यांनी आज सकाळी पाहणी केली. गार्डन फारच सुंदर झाल्याचे सांगत टाटांनी राजकीय वक्तव्य करण्याचे मात्र टाळले. स्थानिक निवडणुकांबाबत आपल्याला काहीच माहित नसल्याचे स्पष्ट करीत पुढील कार्यक्रमासाठी टाटा निघून गेले.

महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर सुरू झालेल्या वनौषधी उद्यानाला सोमवारी रतन टाटा यांनी भेट दिली. यावेळी राज ठाकरे यांच्यासह मनसेचे सर्व पदाधिकारी हजर होते. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास टाटा तसेच ठाकरे यांचे आगमन झाले. टाटा ट्रस्टच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीतून तसेच ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे गार्डन विकसीत करण्यात आले आहे. मिळालेल्या निधीचा विनियोग कसा आणि किती झाला, हे राज ठाकरे यांनी रतन टाटा यांना दाखवून दिले. या बाबतची सविस्तर माहिती घेतल्यानंतर रतन टाटा यांनी थेट परतीचा मार्ग पकडला. यावेळी पत्रकारांनी त्यांना गार्डनबाबत छेडले असता त्यांनी, "आय एम इम्प्रेस" असे उत्तर दिले. गार्डनचे काम चांगले असल्याची पावती देणाऱ्या टाटांनी राजकीय भाष्य करण्यास मात्र नकार दिला. एवढेच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट करीत टाटांनी थेट उद्योजक रतन लथ यांच्या घराचा रस्ता पकडला. यावेळी टाटा ट्रस्टचे अधिकारी, मनसेचे पदाधिकारी तसेच उद्योजक हजर होते.

बॉटनीकल गार्डन ठरतोय चर्चेचा मुद्दा

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेसाठी बॉटनीकल गार्डन चर्चेचा मुद्दा ठरतो आहे. गार्डनच्या उद्घाटनासाठी मराठी सिने सृष्टीतील अनेक कलाकरांनी हजेरी लावली होती. आता याच गार्डनच्या पाहणीसाठी व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढीत रतन टाटा हजर झाले. अवघ्या दीड ते दोन तासात रतन टाटा शहरातून माघारी फिरले. दरम्यान, बॉटनीकल गार्डनचा मुद्दा सतत चर्चेत ठेवण्यात मनसैनिक अद्याप यशस्वी ठरली आहे. मात्र, बॉटनीकल गार्डन मनसेला ताकद देणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हास्तरीय समित्यांचे भिजत घोंगडे

$
0
0

धुळे जिल्हा योजनांच्या लाभांपासून वंचित


म. टा. वृत्तसेवा, धुळे

सरकारच्या विविध उपक्रमांची आणि योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळावा. प्रशासकीय यंत्रणेवर लोकप्रतिनिधींचा वचक राहून भ्रष्टाचार विरहीत कारभार होऊन सरकारी यंत्रणेच्या कारभार व त्रुटींवर अंकुश राहावा, या उद्देशाने पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर विविध समित्या गठीत करण्यात येतात. मात्र सध्या युतीत बेबनाव असल्यामुळे पालकमंत्र्यांच्या समितीने विविध समिती सदस्यांची होणारी निवडीचे घोंगडे भिजत आहे.

परिणामी, बहुतांश समित्यांचे पुनर्गठणाशिवाय प्रशासकीय स्तरावर कामकाज पार पडत आहे. तर काही समित्यांची नियुक्ती नसल्यामुळे कामकाज रखडले आहे. याचे गांभीर्य धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे व जिल्हा प्रशासनालादेखील नाही. परंतु, यामुळे अनेक योजनांच्या लाभापासून सर्वसामान्यांना वंचित राहावे लागत आहे. या समित्यांमध्ये निवड करावयाच्या अशासकीय सदस्यांमध्ये भाजप व शिवसेनेचे किती सदस्य घ्यावे यावरून तोडगा निघत नाही. त्यामुळे दोन वर्षांत या समित्याच नियुक्त करण्यात आलेल्या नाहीत. या समित्या विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी योग्य व्हावी, महिला बालके, गरोदर माता, अल्पसंख्याक घटक, आदिवासी, मागासवर्गीय घटकांना न्याय मिळावा, भ्रष्टाचार, अनागोंदी कारभारांना पायबंद घालण्यात यावा या उद्देशाने पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असतात. मात्र जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेले दादा भुसे यांनी अद्यापही समित्यांच्या अशासकीय सदस्यांच्या निवडीकडे दुर्लक्ष केले आहे. अधिकाऱ्यांकडून नियुक्तीसाठी पाठपुरावाच होत नाही. यामुळे अच्छे दिनचे स्वप्न भंगल्याचा प्रत्यय जिल्ह्याला येत आहे.

‘आरटीई’ अडचणीत

जिल्हा शिक्षण सल्लागार समितीच्या अशासकीय सदस्य निवडीसाठी मागील पंधरा वर्षांपासून मुहूर्तच सापडत नाही. विद्यमान पालकमंत्र्यांकडून मोठ्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. बालकांच्या शिक्षणाच्या हक्कावर गदा येत असून आरटीईची यशस्वी अंमलबजावणीस अडचणी येत आहेत.

मोजक्याच समित्यांचे कामकाज

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या बोटावर मोजण्या एवढ्याच समित्यांच्या नियमीत बैठका झालेल्या आहेत. या समित्यांचे योग्य नियोजन केले जाते. बैठकाही मागे पुढे होत असल्या तरी त्या घेतल्या जातात. जिल्हा नियोजन समितीच्या बैठक व्यतिरिक्त इतर बैठकांना पालकमंत्री क्वचितच दिसतात. उर्वरित बैठकांना सचिव म्हणून खाते प्रमुखांनाच घ्यावा लागतात.

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समित्या गठीत नसल्यामुळे कामकाजावर परिणाम झालेला नाही. मात्र, इतर विभागांच्या समिती निवडीच्या बाबतीत पाठपुरावा सुरू आहे. लवकरच त्या समित्या गठीत करण्यात येतील.

तुकाराम हुलवळे, निवासी उपजिल्हाधिकारी, धुळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंचवटीतून एकमेव अर्ज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी पत्र भरण्यासाठी चार दिवस बाकी असतांना पंचवटी विभागात आतापर्यंत अवघ्या दोन जणांनी अर्ज दाखल केले. शिवसेनेतर्फे मधुरा सुनील गांगुर्डे यांनी प्रभाग क्रमांक दोनमधील अनुसूचित जमातीसाठी महिला राखीव असलेल्या अ प्रवर्गातून सोमवारी अर्ज भरला. पण अर्जासोबत शिवसेनेचा एबी फॉर्म नव्हता. शनिवारी याच प्रभागातून क प्रवर्गातून मनसेतर्फे अनंता सूर्यवंशी यांनी फॉर्म भरला होता. त्यामुळे या प्रभागात तूर्त दोन उमेदवार झाले आहेत.

एकाच वेळी होणार गर्दी

एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने अर्ज दाखल करण्यासाठी आठ दिवसांचा अवधी दिला. त्यात रविवारी सुध्दा फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. पण, तरीही उमेदवारांकडून विलंब केला जात आहे. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसात धावपळ करीत गर्दीमध्ये उमेदवार अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

चार दिवस ट्रेनिंग
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोणी येत नसल्यामुळे हाती असलेल्या वेळेचा सदुपयोग करीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यावर भर दिला आहे. निवडणुकीच्या कामात कोणतीही चुक राहू नये, अर्ज लवकर ऑनलाइन सादर व्हावा, यासाठी कर्मचाऱ्यांना टिप्स दिल्या जात आहेत.

अधिकाऱ्यांना पडला प्रश्न
चार दिवसात केवळ दोनच उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे ऑनलाइन अर्ज भरतांना नेमकी काय अडचण आहे, असा प्रश्न आता अधिकारीच चौकशीसाठी येणाऱ्या उमेदवारांना विचारू लागले आहेत. पण कागदपत्राची अपूर्तता असे ढोबळ उत्तर सर्व जण देत आहेत. प्रत्यक्षात प्रमुख पाच पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर होत नाही तोपर्यंत उमेदवार फॉर्म भरणार नसल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गृहिणी, तरी करोडपती!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपचे संजय चव्हाण यांच्या पत्नी आशा चव्हाण यांनी प्रभाग ७ मधील सर्वसाधारण गटातून सोमवारी उमेदवारी अर्ज सादर केला. त्या भाजपच्या तिकिटासाठी इच्छूक आहेत. दहावी शिक्षण झालेल्या आशा यांची कौटुंबिक संपत्ती मात्र १ कोटी २६ लाख ८२ हजार ३२ एवढी आहे. पश्चिम प्रभागात केवळ चव्हाण यांचा एकमेव अर्ज सोमवारपर्यंत दाखल झाला आहे.

गंगापूररोडवर प्रसाद मंगल कार्यालय, गोळे कॉलनी, अशोकस्तंभालगतचा घारपुरे घाट, कॉलेजरोड-डिसुझा कॉलनी, पाटील लेन, पंडित कॉलनी असा पसरलेला हा प्रभाग उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय वस्तीचा अधिक आहे. मात्र, मल्हारखाण झोपडपट्टीही याच प्रभागात येते. प्रभागातील एकूण लोकसंख्या ४४ हजार ३८२ एवढी आहे. यात अनुसूचित जाती २८११ तर जमाती २४६९ लोकसंख्येचा समावेश आहे. प्रभागात एकूण ३६ हजार १५३ मतदार आहेत. प्रभागातील दोन जागा सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहेत. तर एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि एक जागा सर्वसाधारणसाठी आहे. या प्रभागात भाजपच्या वतीने आशा संजय चव्हाण या सर्वसाधारण गटातून इच्छूक आहेत. चव्हाण यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, दहावी शिक्षण झालेल्या आशा चव्हाण या गृहिणी आहेत. त्यांची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्यांच्याकडे रोख तीस हजार रुपये, बँकेत ६ हजार ७९० रुपयांच्या ठेवी, कंपन्यांमधील कर्जरोखे २ हजार १०१ रुपये, पोस्ट व ‘एलआयसी’तील गुंतवणूक ४२ हजार ९०० एवढी आहे. त्यांच्या नावे एकही वाहन नाही. १६ लाख ८० हजार रुपये किंमतीचे सोने मात्र त्यांच्याकडे आहे. आशा यांच्या नावे एकूण १७ लाख ६१ हजार ७९१ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांची पती संजय यांच्याकडे रोख २५ हजार, बँकेत ८३ हजार ७८०, कंपन्यांमधील कर्जरोखे २७ हजार १२६, पोस्ट व ‘एलआयसी’मधील गुंतवणूक १ लाख ८५ हजार ८३५ आहेत. संजय यांच्या नावे एकही वाहन नाही. त्यांच्या नावे ८ लाख ८१ हजार ७४१ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

कर्जाचा भार शून्य
आशा यांच्या नावे नाशकात ६० लाख रुपये किंमतीचे १७२८ चौरसफुटाचे घर आहे. त्यांचे पती संजय यांच्या नावे घर नसले तरी इगतपुरी तालुक्यातील भरवीर बुद्रुक आणि विल्होळी येथे एकूण ३ शेत जमिनी आहेत. त्यांचे एकत्रित मूल्य ४० लाख ३१ हजार ५०० रुपये एवढे आहे. चव्हाण दाम्पत्याच्या नावे कुठलेही कर्ज नाही. चव्हाण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ४ लाख ४० हजार रुपये एवढे आहे.

योगेश हिरे गॅसवरच
भाजपच्या आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश हिरे हे प्रभाग ७ मधून भाजपच्या वतीने इच्छूक आहेत. भाजपची यादी विविध कारणांमुळे जाहीर होण्याचे लांबत आहे. हिरे यांचेही तिकीट नक्की नसल्याचे दिसून येत आहे.

प्रभाग सातमधून एकूण ८ जणांनी उमेदवारीसाठी ऑनलाइन माहिती भरली आहे. त्यात कुंदनकुमार दुसाने, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, अल्का जांभेकर, आशा चव्हाण, मयूर पवार, आनंद ढोली, सागर पगार, ज्ञानेश्वर भोसले यांचा समावेश आहे.

प्रभाग १२ मध्ये १२ उमेदवारांनी त्यांची ऑनलाइन माहिती भरली आहे. त्यात शारदा निकाळे, प्रसाद बागुल, अमर काठे, काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील, प्रमोद कर्डिले, विशाल कमोद, सदानंद जाधव, देविदास सराटे, किशन आडवानी, कुणाल भोसले यांचा समावेश आहे.

प्रभाग १३ मध्ये १२ उमेदवारांनी त्यांची माहिती ऑनलाइन भरली आहे. त्यात सुनंदा बर्वे, सचिन भोसले, मृणालराजे घोडके, नगरसेवक विनायक खैरे यांची कन्या एकता खैरे, आनंद डागा, उन्नती आहेर, प्रकाश कनोजे, दीपक डोके, अजिंक्य खैरे, रोहन बागुल, सुमंत परांजपे, सागर सोनवणे यांचा समावेश आहे.

प्रभाग १४ मध्ये एकूण १९ उमेदवारांनी त्यांची माहिती ऑनलाइन भरली आहे. अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये नेहा चव्हाण, मोईनुद्दीन शेख, फरीद पठाण, इस्माईल शेख, मुधसार सय्यद, अस्लम खान, राणी जगताप, करणसिंग पवार, विद्या चव्हाण, मकसूद खान, संदीप कमोद, दिनेश मोटकरी, नासिर शेख, रामसिंग बावरी, गणेश जाधव, अंकुश राऊत, गोविंद बिरुटे यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्येकडून पित्याचा अंतिम प्रवास सुकर...

$
0
0


रामनाथ माळोदे, पंचवटी

ज्या समाजात महिलांना अंत्यसंस्कारासाठी अमरधाममध्ये जाण्यास मनाई केली जाते, अशा सिंधी समाजातील एक कन्येने आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार केले. नाशिकमध्ये सिंधी समाजाच्या मुलीने अशा प्रकारे पित्याच्या अंत्यसंस्कारात अग्निडाग देण्याचा प्रकार प्रथमच घडला आहे. आपल्या पित्याचे मरणोत्तर नेत्रदान करून समाजापुढे अवयवदान करण्याची प्रेरणाही या तरुणीने निर्माण केली. तिच्या या निर्णयाचे समाजाकडून कौतुक होत आहे.

पंचवटीतील पाथरवट लेन येथील राधेश्याम निवास येथील शिरीष मन्शानी (वय ६६) हे इंदिरानगर येथे एका बांधकामाच्या कामकाजाचे सुपरव्हिजन करीत असताना पाय घसरून ते पडले. त्यांच्या खुब्याला मार लागला, त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या घटनेतून सावरत असतानाच त्यांना दि. २२ जानेवारी रोजी हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मूलबाळ नसल्यामुळे त्यांनी राखी या चुलतभावाच्या मुलीला तिच्या जन्मावेळीच दत्तक घेतले होते. तेव्हापासून राखी त्यांच्याकडे लहानाची मोठी झाली. बालपणापासून राखीला त्यांनी पोटच्या मुलाप्रमाणेच वागणूक दिली. राखीनेही माता-पित्यांच्या सेवेत कुठलीच कमतरता भासणार नाही, याची काळजी घेतली. बांधकाम व्यवसायानिमित्त ते १५ वर्षे बीड येथे राहिले होते. राखी मात्र नाशिकलाच शिक्षण घेत होती. कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून राखीने वाणिज्य शाखेची पदवी मिळविली. कॅनडा कॉर्नर येथे कॉम्प्युटरचे होलसेलचे दुकान असलेल्या नीरज नागदेव यांच्याशी तिचा विवाह झाला. विवाहाच्या अगोदर ती क्लासेस चालवित होती.

सिंधी समाजातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर हिंदू धर्माप्रमाणे त्यांचेही अंत्यसंस्कार अग्निडाग देऊन करण्यात येतात. अंत्यसंस्कारांच्या दुसऱ्या दिवशी अस्थिविसर्जन केले जाते. दहाव्या आणि अकराव्या दिवशी रामकुंडावर पिंडदान करण्यात येते. बाराव्या आणि तेराव्या दिवशी घरी मोठा विधी केला जातो. सिंधी समाजाच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला महिलांना जाता येत

नाही, ही परंपरा आहे. त्यामुळे शिरीष मन्शानी यांचे अंत्यसंस्कार कुणाच्या हातून करायचे, हा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी गंगापूररोड येथील डॉ. महेश मन्शानी यांनी राखीने आपल्या पित्यासाठी आतापर्यंत सर्वकाही केले, मग अंत्यसंस्कार तिच्या हातून केले तर काय हरकत आहे, असा मुद्दा मांडला. अंत्यसंस्कारांचा विधी करणारे सुरज महाराज यांनीही काही हरकत नसल्याचे सांगितले. मात्र, हे मत समाजातील इतर लोक मान्य करतील की नाही, याबाबत शंका होती. विशेषतः (कै.) शिरीष यांचे मोठे बंधू श्रीहरी आणि भजनलाल, तसेच राखीचे सासरे, दीर आणि पती यांना हे मान्य होणार नाही, असेच वाटत होते. मात्र, त्यांनीही मनाचा मोठेपणा दाखवित होकार दिला आणि राखीच्या हाताने अमरधाममध्ये अग्निडाग देण्यात आला.


जपली सामाजिक बांधिलकी

आपल्या पित्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी धीरोदात्त राखीने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून आपल्या पित्याचे नेत्रदान करण्याची परवानगीदेखील दिली. दुःखातही तिने दाखविलेल्या या समाजभानामुळे सिंधी समाजातील अनेकांना प्रेरणा मिळाली असल्याचे मत समाजबांधव व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूर विभागाचे अखेर उघडले खाते

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी एका उमेदवाराने अर्ज सादर करून सातपूर विभागाचे खाते उघडले आहे.
गंगापूर गावातील अरुण पाटील यांनी प्रभाग क्रमांक ८ मधून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी भालचंद्र बेहरे यांच्याकडे सादर केला. अधिकृत पक्षांच्या इच्छुकांना मात्र चौथ्या दिवशीही उमेदवारीची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसून आले. भाजप व शिवसेनेत सर्वाधिक इच्छुक उमेदवार असल्याने राष्ट्रवादी व काँग्रेसलादेखील बंडखोरांची प्रतीक्षा लागून असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आघाडीनेही उमेदवार जाहीर केलेले नाहीत. दुसरीकडे बसप, माकप, भारिप या पक्षांतील उमेदवारदेखील चार जणांचे प्रबळ पॅनल कसे तयार होईल ,यासाठी प्रयत्नशील आहेत. दिवसभरात प्रभाग ९ मधून जनाबाई ईघे व प्रभाग ११ मधून विलास गुंजाळ यांनी आपली अनामत रक्कम भरली. परंतु, पक्षाची उमेदवारी जाहीर झाली नसल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केलेला नाही.

मनसेच्या ‘टाळी’ची चर्चा
दरम्यान, मनसेने शिवसेनेला टाळी देण्याचे ठरविले असल्याची चर्चा दिवसभर रंगली होती. परंतु, शिवसेनेत सातपूर विभागात इच्छुकांची मोठी संख्या असल्याने मनसेच्या टाळीला शिवसेना साथ देईल का, यावरही इच्छुकांची चांगलीच चर्चा रंगलेली दिसून आली. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या सातपूर विभागात भाजपने मोठी ताकद उभी केल्याने सर्वच प्रभागांतील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात उमेदवारी अर्ज दाखल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांचा थंड प्रतिसाद कायम आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी सोमवारी केवळ चार अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे एकूण अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या आता सात झाली आहे.

राजकीय पक्षांकडून अजूनही उमेदवारी याद्या घोषित केल्या जात नसल्याने शहरातील सर्व दहा निवडणूक कार्यालयांमध्ये शांतता आहे. असे असले तरी ऑनलाइन अर्ज भरण्याकडे इच्छुकांचा कल अधिक आहे. आतापर्यंत जवळपास ३५५ जणांनी ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरले आहेत.

महापालिका निवडणुकांसाठी नामांकन भरण्यासाठी शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. तीन फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल केले जाणार आहेत. शुक्रवारी पहिल्या दिवशी एकमेव अर्ज दाखल झाला होता. मात्र, हा अर्जही डमी होता. शनिवारी दोन अर्ज दाखल झाले. तर रविवारचा दिवस निरंक गेला. सोमवारी केवळ चार अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग क्रमांक १४ मध्ये राणी मिलिंद जगताप, प्रभाग क्रमांक १९ मध्ये नंदरकुमार रामदास आहेर, प्रभाग क्रमांक २६ मध्ये निर्मला भास्कर पवार, प्रभाग क्रमांक २७ मध्ये किरण हरी डवले यांनी अर्ज दाखल केले. राजकीय पक्षांकडून उमेदवारांची अद्याप घोषणा झालेली नाही. त्यामुळे दहा निवडणूक कार्यालयांमध्ये अजूनही शुकशुकाट दिसून येत आहे. तर ऑनलाइन अर्ज भरणाऱ्यांची संख्या ही ३५५ वर पोहचली आहे. त्यामध्ये अनेक विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवकांचा समावेश आहे.

सिडकोत दोन अर्ज दाखल
सिडको : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी सोमवारी सिडको विभागातून केवळ दोनच अर्ज दाखल झाले आहेत. अद्याप एकाही राजकीय पक्षाच्या इच्छुकांनी अर्ज दाखल केलेला नाही. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच अर्ज दाखल करण्याचे संबंधितांचे म्हणणे असले, तरी उमेदवारी अर्जांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी इच्छुकांचे समर्थक धावपळ करीत असल्याचे दिसत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे काम शुक्रवार (दि. २७)पासून सुरू झालेले आहे. सिडकोतील सहा प्रभागांतून २४ नगरसेवक निवडून येणार आहेत. परिसरात इच्छुकांची संख्या जास्त असली, तरी अद्याप प्रभाग २६ ब मधून निर्मला भास्कर पवार यांनी नाशिक महानगर युवा आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला असून, दुसरा अर्ज प्रभाग २७ अ मधून किरण हरी ढवळे यांनी दाखल केला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. कोणत्याही राजकीय पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर केली नसल्याने उमेदवारी अर्ज दाखल होत नसल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये आज चक्काजाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात मंगळवारी सकाळी मराठा मोर्चातर्फे निदर्शने, विविध मागण्यांसाठी रिक्षा संघटना, मालवाहतूकदार संघटनेतर्फे चक्का जाम आंदोलन होणार असल्याने जनजीवन विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत. संभाव्य नुकसान ओळखून एसटी महामंडळाने सुरक्षेच्या कारणास्तव शहर बससेवा मंगळवारी दुपारपर्यंत बंद ठेवल्या आहेत. रिक्षा व बस बंद राहणार असल्याने विद्यार्थी, चाकरमान्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाने दरवाढ केल्याच्या निषेधार्थ विविध रिक्षा संघटना, तसेच मालवाहतूकदार संघटनांतर्फे मंगळवारी सकाळी ११ वाजता द्वारका येथे चक्का जाम आंदोलन छेडण्यात येणार आहे. दुसरीकडे मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आडगाव आणि सिन्नर फाटा येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. एकाच वेळी तीन ठिकाणी रास्ता रोको होणार असल्याने नाशिककरांसह परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल.

पोलिस महासंचालकांकडून सूचना

पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी सोमवारी राज्यातील पोलिस आयुक्त, तसेच पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्तांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. चक्का जाम आंदोलन, तसेच निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेत समाजकंटकांवर कारवाई करण्याचे आदेश माथूर यांनी दिले आहेत.

शहर बस दुपारपर्यंत बंद

श्रमिक संघटनेच्या झेंड्याखाली सगळ्याच प्रमुख वाहतूकदार संघटनांनी आंदोलन पुकारल्याने सकाळपासून रिक्षा वाहतूक ठप्प होणार आहे. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी एसटी महामंडळाने शहर बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी दोन वाजेनंतरची परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे महामंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या बंदचा फटका शाळा, कॉलेजांतील विद्यार्थ्यांना बसेल.

शाळा, कॉलेज बंद?

एसटी बसेस, तसेच रिक्षा व्यावसायिक दुपारपर्यंत रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाही. त्यामुळे शाळा व कॉलेजांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावण्याची चिन्हे असून, पालकांनाच याबाबत सजग राहून निर्णय घ्यावा लागणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शाळांना सुटी जाहीर करण्यात आली असली तरी नाशिकमध्ये याबाबतचा निर्णय संध्याकाळी उशिरापर्यंत झालेला नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची आज ७० जणांची यादी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी ,नाशिक

दहा प्रभागात घोडे अडल्यामुळे भाजपची सोमवारी जाहीर होणारी यादी आता मंगळवारी जाहीर केली जाणार आहे. या यादीत जवळपास ७० नावे जाहीर केली जाणार आहेत. या निवडणुकीत भाजपने यादी आधी प्रसिद्ध करुन विरोधकांना जोरदार धक्का देण्याचे नियोजन केले होते. पण इच्छुकांच्या वाढलेल्या संख्येमुळे भाजपकडे पेच निर्माण झाला. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी सर्व सुत्रे आपल्या हाती घेवून सर्वांची चर्चा करून ही यादी मंगळवारी जाहीर करणार असल्याचे सांगितले.

पहिल्या यादीतील नावे फायनल करण्यासाठी त्र्यंबक नाक्याजवळ एका नेत्याच्या बंगल्यावर बैठक झाली. त्यात पालकमंत्री गिरीष महाजन, भाजप संघटनमंत्री किशोर काळकर, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, अपूर्व हिरे, लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, वसंत गीते, डॉ. प्रशांत पाटील, प्रकाश लोंढे आदी उपस्थित होते. या सर्वांशी चर्चा करून ही यादी अंतीम करण्याचा निर्णय झाला त्यानंतर रात्री उशीरापर्यंत चर्चा सुरू होती. ३१ प्रभागापैकी १० प्रभागात उमेदवारी बाबत एकमत न झाल्यामुळे या यादीचे घोडे अडले होते. भाजपाने सर्वात अगोदर आघाडी घेत मुलाखती घेतल्या. १२२ जागांसाठी ६८४ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. आता भाजपाला यातून उमेदवार निवडणे अवघड झाले असले तरी त्यांनी पहिले ७० उमेदवार निश्चित केले आहे. जवळपास २१ प्रभागात उमेदवार निश्चित झाले असून, उर्वरित दहा प्रभागाचा तिढा सोडवणे अवघड झाले आहे.

निवडून येणे हेच सूत्र

निवडून येणे हेच सूत्र धरत या बैठकीत चर्चा सुरू झाल्यामुळे अनेक दिग्गजांचे समर्थकांचे नाव गळाल्यामुळे त्यांची अडचण झाली आहे. एकाच प्रभागात तीन ते चार समर्थक असतांना दुसऱ्याला उमेदवारी निश्चित झाल्यामुळे काही नेत्यांना ते जिव्हारी लागले असले तरी त्यांनी मात्र मौन बाळगले आहे.

पहिली यादी जवळपास निश्चित झाली असून त्यात ७० नावे घोष‌ित केली जाणार आहे. उर्वरीत यादी टप्याटप्याने प्रसिद्ध केली जाईल. एकमताने सर्व नावे निश्चित केली जात आहेत.

-किशोर काळकर, संघटनमंत्री भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पदवीधर’चा प्रचार अंतिम टप्प्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता अंतिम टप्प्यांत येऊन पोहोचली आहे. मतदानासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना प्रमुख लढत असलेल्या काँग्रेस अन् भाजपच्या उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यांत येऊन पोहोचला आहे. डाव्या आघाडीच्या उमेदवारानेही प्रचारासाठी जोर लावला आहे.

अंतिम टप्प्यांत वैयक्तिक गाठीभेठींसह विविध संघटना आणि सामाजिक मंडळांसोबत एकत्रित बैठका, चौक सभा आणि संपर्क साधनांचा पूर्णत: वापर वाढला आहे. शुक्रवारी होणाऱ्या या निवडणुकीसाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातून सुमारे अडीच लाख उमेदवार मतदान करणार आहेत.

तांबे यांचा झंझावाती प्रचार

काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी सोमवारी नाशिकमध्ये झंझावाती प्रचार दौरा केला. मतदारांच्या दहाहून अधिक कॉर्नर बैठकांना संबोधीत करतांनाच माहेश्वरी आणि जैन समाजाने डॉ. तांबे यांच्या समर्थनार्थ आयोजित मेळाव्यांनाही त्यांनी हजेरी लावली. याशिवाय वैयक्तीक भेटी घेत डॉ. तांबे यांनी सहकार्याचे आवाहन केले. नाशिकरोड येथे चार, पंचवटीत दोन, गंगापूर रोडला एक आणि सातपूर भागात तीन अशा दहा कॉर्नर बैठका घेतल्या. विश्वकर्मा मंदिर ट्रस्टच्या, गणेश एकता कला क्रीडा संस्था, पीएमए फ्रेंडशिप कप या क्रिकेट स्पर्धा येथे भेट देत नाशिकमधील प्रचाराचा दुसरा टप्पा त्यांनी पूर्ण केला. डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रचारासाठी नगर शहर व जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटना प्रचारात सक्रीय झाल्या आहेत. ‘होम टू होम’प्रचारासह नाशिकमधील सरकारी कार्यालयांमध्ये दुर्गा तांबे व कार्यकर्त्यांनी भेट देऊन प्रचारावर भर दिला. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज्युनियर कॉलेज शिंदे पळसे, वैभव ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था, भोसला मिलिट्री स्कूल, डॉन बॉस्को स्कूल कॉलेज रोड, प्रबोधिनी विद्यामंदिर, रचना विद्यालय शरणपूर रोड, एस. टी. फ्रान्सिस स्कूल तिडके कॉलनी, नांदूर मधमेश्वर जलसंपदा विभाग, वनरक्षक कार्यालय, रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय गडकरी चौक, जिल्हा उद्योग केंद्र, शासकिय तंत्रनिकेतन, व्यवसाय प्रशिक्षण कार्यालय, सहकारी दुय्यम निबंधक कार्यलय, राज्य माहिती आयोग, उपविभागीय कृषी कार्यलय आदी ठिकाणी भेटी दिल्या.

डॉ. पाटील यांच्या प्रचारालाही वेग

पदवीधर मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांच्या प्रचारासाठीही कार्यकर्त्यांनी दिवस रात्र एक केला आहे. शहर आणि जिल्हाभरातील विविध शासकीय, खासगी संस्थांसह वैयक्तिक गाठीभेटींवरही भर दिला आहे. शहरी आणि ग्रामीण अशा दोन रचनांमध्ये प्रचारयंत्रणा उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यात कार्यरत आहे. सोमवारी डॉ. पाटील यांनी संस्थात्मक आणि वैयक्तिक भेटींवर भर देत दुसऱ्या टप्प्यातील प्रचार पूर्ण केला.

याशिवाय सोमवारी भिंगार मंडल नगरमध्ये कार्यकर्त्यांनी संपर्क अभियान राबविले. यावेळेस उपस्थित भाजप मंडल अध्यक्ष महेश नामदे, सुनील लालबोंद्रे, आरपीआयचे युवा अध्यक्ष अमित काले, नगरसेवक प्रकाश फुलारी, नगरसेवक रवींद्र लालबोंद्रे, महेंद्र जाधव, युवामोर्चा अध्यक्ष मयूर जोशी यात सहभाग घेतला. भिंगार शहर मधील पदवीधर मतदारांच्या गाठीभेटी घेऊन डॉ. प्रशांत पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी भिंगार भाजपा मंडल अध्यक्ष महेश नामदे, सरचिटणीस नीलेश साठे, आदी उपस्थित होते.

देसले यांच्या गाठीभेटी

डाव्या आघाडीचे उमेदवार राजू देसले यांनीही प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रत्यक्षात गाठीभेठींवर भर दिला आहे. पदवीधरच्या बालेकिल्ल्यांसाठी काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार दावा सांगत असले तरीही डाव्या आघाडीच्या उमेदवारास पडणारी मतेही निर्णायक ठरणार आहेत. तर, सरकारच्या विविध धोरणांवर टिका करत कष्टकरी आणि बहुजन वर्गाचा उमेदवार म्हणून रिंगणात असल्याची भूमिका देसले यांनी सोमवारच्या प्रचारादरम्यान मांडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक पतसंस्थेवर गुरूसेवा पॅनलची सत्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था (लि. नाशिक)च्या व्यवस्थापक समितीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत गुरूसेवा पॅनलने संपूर्ण सतरा जागा जिंकून त्यांनी हा विजय मिळवला. पौर्णिमा बस स्टॉपजवळील समर्थ मंगल कार्यालयात सोमवारी मतमोजणी पार पडली.

संस्थेच्या व्यवस्थापक समितीसाठी रविवारी पंचवार्षिक निवडणूक पार पडली. सन २०१७ ते २०२१ या कालावधीसाठी जिल्ह्यातील बारा मतदान केंद्रांवर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. संस्थेच्या १९६९ सभासदांपैकी १६७३ सभासदांनी म्हणजेच ८४ टक्के सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. गुरुसेवा पॅनल व शिक्षक क्रांती पॅनलमध्ये ही लढत रंगली. या निवडणुकीत सुभाष अहिरे, प्रकाश सोनवणे, अर्जुन तटकारे, केदू देशमाने, हेमंत पवार, धनंजय आहेर, संजय साळुंके, वामन खैरनार, अर्जुन भोये, राजाराम खैरनार, नंदू आव्हाड, प्रतिभा अहिरे, शोभा कापडणीस, संजय भोर, प्रदिप खैरनार, संजय दराडे, मनोहर वाघेरे हे उमेदवार निवडणुकीत बिनविरोध निवडून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंधन गळतीप्रकरणी शेतकऱ्यावर गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

सिन्नर तालुक्यातील आगासखिंड येथे शुक्रवारी (दि.२७) रोजी सपाटीकरण सुरू असतांना रॉक ब्रेकरचा नांगर जमिनीत अडकल्याने डिझेल वाहिनी फुटली होती. यामुळे सुमारे १.२६ कोटी रुपयाचे डिझेल वाया गेले आहे. याबाबत सिन्नर पोल‌िस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, या ठिकाणी जमिनीतून सुमारे ३० हजार लिटर डिझेल पुन्हा जमा करण्यात यश आले असून, जेसीबीच्या सहाय्याने ५ चौरस फूट खड्डे घेण्यात आले होते. त्यानंतर जमिनीतून वर येणारे डिझेल व्हॅक्यूम यंत्राच्या सहाय्याने काढण्याचे काम गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. या प्रकरणी भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशनचे उपप्रबंधक मनीष बळवंत यांनी सिन्नर पोल‌िस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन जमीनमालक उमेश मोजाड व डोझर मशीनचालक श्रीराम राऊत (जांभूरटोल, जि. गोंद‌िया) यांच्या विरोधात पेट्रोलिअम अ‍ॅण्ड म‌िनरल पाइप अ‍ॅक्वीसेशन ऑफ अ‍ॅक्ट २०११ नुसार कलम १५ (२) अन्वये व कलम २८५, २७८, ३३६, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. नि. दत्तात्रय कोकरे करीत आहे. हे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती बीपीसीएलचे देखभाल विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक स्वप्निल वराडकर यांनी दिली आहे. दरम्यान, काम पूर्ण झाल्यास पाइपमधून इंधनाचा प्रवाह तपासल्यानंतर नियमित इंधन वहन करणे शक्य होणार आहे.

माती परीक्षण होणार

ज्या शेतकऱ्याच्या जमिनीचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून माती परीक्षण करून देण्यात येईल. तसेच जमीन शेतीसाठी पुन्हा कशी उपयुक्त करता येईल का? याचेही परीक्षण केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यमुना सफेद’मुळे वाढणार उत्पादन क्षमता

$
0
0

सुनील कुमावत, निफाड

औषधी गुणधर्म असलेल्या लसणाचे भरगोस उत्पादन घेता येईल असे नवीन वाण एनएचआरडीएफ (राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि विकास प्रतिष्ठान)ने विकसित केल्याची माहिती डॉ. आर. पी. सिंग यांनी दिली. चितेगाव फाटा येथील या संस्थेने लसणाचे यमुना सफेद ९ (जी ३८६) या नवीन वाणाची निर्मिती केली आहे. सन २०१५-१६ मध्ये भारतात २.८१ लाख हेक्टर जमिनीवर १६.१७ लाख मेट्रिक टन लसणाचे उत्पादन घेतले गेले.


अशी करा लागवड

पेरणी करतांना दोन रांगांमध्ये १० ते १५ से. मी. आणि त्यातील कळ्यांमध्ये ७.५ ते १० से. मी. अंतर ठेवावे. सद्यस्थितीत लसूण शेती करताना कमी पाण्यात सिंचन पद्धतीचा उपयोग लाभदायक ठरत आहे. ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीचा उपयोग उपयुक्त आहे. या पद्धतीने लसणाचे पीक घेतल्यामुळे ४० टक्के पाण्याची बचत होऊ शकते. लसणाची पाने पिवळे पडल्यावर आणि वाळायला लागल्यावर लसूण परिपक्व झाला असे समजावे. त्याच्या काढणीनंतर ५ ते ७ दिवस त्याला सावलीत सुकवावे. त्यानंतर वाळलेल्या पानांसह त्याला हवेशीर ठिकाणी वर बांधावे.

असे आहे यमुना सफेद

n लसणाचा व्यास ४.५ पासून ५.५० से.मी.

n पाकळ्यांचा व्यास १.२५-१.५० सेमी

n वजन २ ते ३ ग्रॅम

n विलेय (टीएसएस) ४१ ते ४२ टक्के

n शुष्क पदार्थ ४२ ते ४३ टक्के

n प्रति हेक्टर १८० ते २२५ क्विंटल उत्पादन

n निर्यातीच्या दृष्टीने उत्कृष्ठ वाण

n १५० ते १६० दिवसात पीक तयार

n स्टेम फिलिअम, झुलसा आणि थ्रिप्स रोगांचा परिणाम होत नाही


अधिक उत्पादन आणि निर्यातक्षम असलेले यमुना सफेद ९ (जी३८६) हे लसणाचे नवीन वाण (बी) चितेगाव, सिन्नर, इंदूर (मध्य प्रदेश), कर्नाल (हरियाणा)या ठिकाणी सप्टेंबर महिन्याच्याच्या दरम्यान राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि प्रतिष्ठानच्या सेंटरमध्ये मिळेल.
- डॉ आर. पी. सिंग, संचालक, एनएचआरडीएफ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युनिसेफ फेस्ट‌िव्हलमध्ये नाशिकचे यश

$
0
0

एचपीटी कॉलेजला दोन पारितोषिके

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एचपीटी आर्ट्स आणि आरवायके सायन्स कॉलेज संचलित ना. गोपालकृष्ण गोखले स्कूल ऑफ मास कम्युनिकेशन अॅण्ड जर्नालिझम विभागाने मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय शॉर्ट फिल्म फेस्टीव्हलमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

युनिसेफ इंडिया आणि वुमन्स फिचर सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेत राज्यातील २० कॉलेजेसने सहभाग घेतला होता. अवघ्या तीन मिनिटांमध्ये अतिशय बोलक्या दृश्यांच्या माध्यमातून मनाला भिडणारे लघुपट यावेळी विभागाकडून सादर करण्यात आले.

दरवर्षी राज्यातील वृत्तपत्र विद्या विभाग चालविणाऱ्या कॉलेजेससाठी युनिसेफ इंडिया आणि वुमन्स फिचर सर्व्हिसेस यांच्याकडून महिला आणि लहान मुले यांच्याशी संबंधित विविध विषयांवर शॉर्ट फिल्मस फेस्ट‌िव्हलचे आयोजन करण्यात येते. यंदा या स्पर्धेत एचपीटी कॉलेजकडून ५ लघुपट पाठविण्यात आले होते. यात ‘गोईंग बॅक होम’या लघुपटाला साडे सात हजार रुपयांचे दुसरे तर स्क्रॅच या लघुपटला पाच हजार रुपयांचे तिसरे पारितोषिक मिळाले आहे. स्पर्धेसाठी अशोक राणे (चित्रपट समीक्षक), उर्वी जुवेकर (लेखक आणि दिग्दर्शक) आणि गणेश पंडीत (चित्रपट लेखक) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयाने दोन पारितोषिके पटकावल्यानंतर परिक्षकांनी शाब्बासकी दिली. लघुपट बनविण्यासाठी प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी आणि विभागप्रमुख डॉ. वृंदा भार्गवे, रमेश शेजवळ, मेघा वैद्य यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तर वैदही, प्रशांत, सपना,यश, प्राची, मयूर, रोहित आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

स्क्रॅच

कॉर्पोरेट क्षेत्रात महिलांचे शोषण केले जाते. यातून स्व:ताचे संरक्षण करणारी स्त्री याचे केवळ १ मिनिटांचे चित्रण स्क्रॅच लघुपटात असून प्रेक्षकांना अचंबित करते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images