Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

..आता उरले अवघे आठ तास!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या रणसंग्रामासाठी अर्ज भरण्यास अखेरचे दोन दिवस उमेदवारांच्या हाती उरलेले असताना अद्याप अवघे शंभरच अर्ज दाखल झाल्याची माहिती आहे. अर्ज भरण्याच्या उद्याच्या (३ फेब्रुवारी) अखेरच्या दिवसापर्यंत अधिकृत अर्ज दाखल करण्यास उमेदवारांच्या हाती अवघे आठ तास शिल्लक आहेत. या कालावधीत उर्वरीत काही शे उमेदवारांचे अर्ज दाखल होणार असल्याने प्रशासनाची तर कसोटी लागणार आहेच, शिवाय सर्व कागदपत्रांसह उमेदवारांपुढेही निर्दोष अर्ज सादर करणे आव्हान ठरले आहे.

नाशिक महापालिकेसाठी निवडणूक अर्ज भरण्यास २७ जानेवारीपासून सुरुवात झाली होती. या मुदतीपासून ऑनलाइन अर्जांचा मारा असला, तरीही प्रत्यक्षात अधिकृतपणे सुरुवातीचे पाच दिवस अपवादानेच अर्ज दाखल झाले. गणेश जयंतीचा मुहूर्त साधत ३१ जानेवारीला २७ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने ही संख्या ३० वर पोहचली होती. बुधवारी आणखी ७० अर्जांची भर यात पडल्याने आता महापालिकेसाठी एकूण १०० अर्ज दाखल झाले आहेत. शहरात एकूण १२२ जागांसाठी ही रणधुमाळी रंगणार आहे. यात अर्ज दाखल करण्यास उद्याची अंतिम मुदत आहे. हे अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी ३ असे अवघे चारच तास उमेदवारांच्या हाती असतात. दोन दिवस मिळून केवळ ८ तासांचा कालावधी उमेदवारांना मिळणार आहे. यामुळे या दोन दिवसांमध्ये इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी झुंबड उडणार आहे.

महापालिकेच्या मैदानात १२२ जागांसाठी प्रमुख चार पक्षांकडून उभे राहणारे उमेदवार गृहीत धरल्यास किमान साडेचारशे अधिकृत उमेदवार, उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करणारे, याशिवाय लहान पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष असे उर्वरित शेकडो इच्छुकांची अर्ज भरण्यासाठी या दोनच दिवसांत गर्दी होणार आहे.


यंत्रणेची होणार धावपळ

महापालिकेची ही निवडणूक प्रत्येक इच्छुक उमेदवारासाठी प्रतिष्ठेची असल्याने यात बहुतांश उमेदवारांकडून सर्वस्व पणाला लावले जात आहे. यात काहींची राजकीय कारकीर्द नव्याने सुरू होणार आहे, तर काही प्रस्थापितांपुढे आपले वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान आहे. यामुळे अतिशय सूक्ष्म गोष्टींचाही विचार उमेदवारांकडून केला जात असल्याचे चित्र आहे. याचाच परिणाम म्हणून अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी अमावास्या असल्याने अर्ज दाखल करण्यास उमेदवार धजावले नव्हते. गणेश जयंतीच्या दिवशी मात्र अवघ्या चार तासांत २७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. आता उर्वरित अर्ज भरण्याच्या दोन दिवसांमध्ये राजकीय डावपेच किंवा दबावतंत्र म्हणून अखेरपर्यंत रोखून ठेवलेले अर्ज दाखल होणार आहेत. उर्वरित शेकडो जणांचे अर्ज या कालावधीत दाखल होणार असल्याने यंत्रणेचा चांगलाच कस लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टवाळखोर विद्यार्थ्यांचे समुपदेशन करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कवायतीचा तास सुरू असताना नववीतील दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद होऊन थेट खून होण्यापर्यंतचा धक्कादायक प्रकार मंगळवारी ओझर टाऊनशिपमधील एचएएल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडला. शाळेतील शिक्षकांचे दुर्लक्षच याप्रकरणी भोवले असल्याची तक्रार यावेळी पालकांनी केली. तर विद्यार्थ्यांची तपासणी करुन शस्त्र बाळगणाऱ्या व मारामारीसारखे प्रकार करणाऱ्या टवाळखोर विद्यार्थ्यांची लिस्ट बनवा व त्यांचे समुपदेशन करा, असे आदेश शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी यावेळी शाळेला दिले.

शाळेत घडलेल्या या प्रकाराची चौकशी करण्यासाठी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांनी शाळेत भेट दिली. शाळा प्रशासनाची कसून चौकशी त्यांनी यादरम्यान केली. शाळेत राबविले जाणारे उपक्रम, शाळेची गुणवत्ता आदी विषयांबाबत माहिती घेण्यात आली असून लवकरच शाळेचे इन्स्पेक्शन केले जाणार आहे. यावेळी उपस्थित पालकांनी शाळेला कोणत्याही प्रकारची शिस्त नसल्याची ओरड केल्याने वातावरण गंभीर झाले होते. विद्यार्थी शाळेत शस्त्र घेऊन फिरतात, याकडे लक्ष देणे शाळा प्रशासनाची जबाबदारी नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


अचानक तपासणी करा!

विद्यार्थी शाळेत येताना सोबत काय काय आणतात, यावर लक्ष देण्यासाठी अचानक तपासणी करण्यावर भर द्या, असे आदेश शिक्षण उपसंचालक जाधव यांनी या शाळेला दिले आहेत. यापूर्वीही शाळेतील विद्यार्थ्यांकडून तब्बल ५० लोखंडी कडे जप्त करण्यात आले होते. असे असतानाही अशा विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष का केले गेले, असा जाबही यावेळी विचारण्यात आला. तसेच शाळांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्यातील इंग्रजी व मराठी शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात येणार असून त्यांना आवश्यक सूचना दिल्या जाणार आहेत.



मुख्याध्यापक, शाळा प्रशासन, शिक्षक यांनी शाळांमधील टवाळखोर विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशा विद्यार्थ्यांची लिस्ट बनवून त्यावर ताबडतोब उपाययोजना करणे आवश्यक आहे. या शाळेची चौकशी करण्यासाठी लवकरच आम्ही इन्स्पेक्शन करणार आहोत.

- रामचंद्र जाधव, शिक्षण उपसंचालक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप सत्तेचा दुरुपयोग करतंय

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निवडणूक ही लोकशाही पध्दतीने झाली पाहिजे. पण भाजपाने अडीच वर्षांत सत्तेचा दुरुपयोग केला असून, निवडणुकीतही त्याचा वापर केला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.

नाशिक महानगर पालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी भवन येथे पत्रकारांशी संवाद साधतांना अनेक गोष्टीवर मनमोकळेपणाने आपले मत मांडले. ते म्हणाले, मुख्यमंत्री मोक्का, खंडणी व विविध गुन्हे असलेल्यांचे स्वागत वर्षा बंगल्यावर करतात. कायद्याचा वापर चुकीच्या पध्दतीने अडकवण्यासाठी केला जातो आहे. केवळ विरोधी पक्षांसाठीच हे हत्यार वापरले जात नाही, तर स्वपक्षाच्या नेत्यांसाठी हाच वापर केला जात आहे. हेच हत्यार वापरुन खडसेंना हटवण्यात आले. आता मुख्यमंत्र्यांना मोकळे रान आहे. या सर्व प्रकारामुळेच त्यांचा मित्रपक्ष मुख्यमंत्र्यांना गुंडांचे मुख्यमंत्री म्हणतो. हे मी नाही बोलत, असा चिमटा काढत अजित पवार यांनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली.

यावेळी पवार म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री अजूनही विरोधी पक्षासारखेच बोलतात. त्याचे हातवारे व त्यांची बोलण्याची पध्दत यामुळे संताप होतो. त्यांनी शांतपणे बोलावे. महाराष्ट्राने अनेक सत्ताधारी व विरोधी पक्षांचा संघर्ष बघितला आहे. पण त्याला संयमानेच उत्तर दिले गेले आहे. हे सरकार आरोप - प्रत्यारोप करुन मूळ प्रश्नाकडून समाजाचे लक्ष दुसरीकडे नेत आहे. आता तर एकत्रपणे सरकारमध्ये काम करणारे शिवसेना - भाजप टीकेसाठी महाभारतातील पात्रांचा वापर करतात. कोणी कौरव म्हणतात, कोणी पांडव तर काही ठिकाणी आम्ही युतीत २५ वर्ष सडलो, असे सांगितले जाते. एकमेकांची औकात काढली जाते. राज्याच्या जनतेला हे शब्द रुचत नाहीत. राज्याकडे बघण्याचा इतर राज्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. आमचे विरोधी पक्षाबरोबर मतभेद असतील, पण आम्ही त्यांचे दुश्मन नाही.


भूमिपूजन करणारे सरकार

निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून भूमिपूजन केले जाते. कोणत्याही परवानग्या नसताना केवळ निवडणुका आल्या की भूमिपूजन भाजप सरकार करते. त्यामुळे या सरकारवर जनतेचा विश्वास राह‌िला नाही. डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. पण काम सुरू केले नाही. शिवस्मारकाचे भूमिपूजन केले. पण एनओसी बाकी आहे. मेट्रोचाही प्रश्न असाच आहे, असे सांगत त्यांनी केवळ भूमिपूजन करणारे हे सरकार आहे अशी टीका केली.

विकासदर घटला

नोटांबदीनंतर विकासदर दोन टक्क्यांनी घसरला आहे. राज्यात शहरी व ग्रामीण भागात त्याचा परिणाम झाला आहे. खरेदी व्यवहार बंद झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर त्याचा भार पडणार आहे. त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. केंद्र सरकारने तर रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवरही घाला घातला आहे.

पोस्टर वादाला विराम

भुजबळांचे आम्ही समर्थक असलो तरी लोक वेगळा विचार करतात असे सांगत भुजबळांचे फोटो पोस्टरवरुन काढण्याचे समर्थन करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी फोटो वादाला पूर्ण विराम दिला. माझी व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची चौकशी सुरू असल्याचेही सांगत त्यांनी या विषयावर पांघरुन घातले. नाशिक जिल्ह्यात कोणाचे नेतृत्व, असा प्रश्न नेहमी कळीचा मुद्दा बनत आला आहे. त्यामुळे पवार यांनी आता नाशिकसह इतर ठिकाणीसुध्दा राष्ट्रवादीने सामुहिक जबाबादारी व नेतृत्व स्वीकारले असल्याचे सांगितले. नाशिक जिल्ह्यात श्रीराम शेटे व त्यांच्या समितीतर्फे कामे केली जातील, असे सांगत त्यांनी हा विषयही संपवला.


एक कोटीने मुलगी परत येईल का?

पुणे येथील इन्फोसिसमधील महिला कर्मचाऱ्याच्या खुनाच्या प्रकरणावरही पवार यांनी जोरदार टीका केली. या कंपनीने एक कोटी मदत देण्याची तयारी दाखवली आहे. पण त्याने मुलगी परत येईल का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. हे प्रकरण सरकारचे अपयश आहे. राज्यात सरकारचा नियोजनशून्य कारभार सुरू आहे. त्यामुळे पोलिसांवर वचक राहीलेला नाही, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉट सर्किटने चार घरांना आग

0
0

रमजान बाबा नगरमधील दीडशे कुटुंब उघड्यावर

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील नटराज टॉकीज परिसरातील रमजान बाबा नगरमध्ये बुधवारी (दि. १) पहाटे चार घरांना शॉट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत अकरा घरे जळाली असून त्यातील रहिवाशांच्या लग्नासाठी जमा केलेल्या तीन लाखांच्या नोटा जळून खाक झाल्या आहेत.

या भीषण आगीत एकूण दीडशे ते दोनशे जणांचे कुटूंब उघड्यावर आले आहे. घरातील साहित्यासह संसारोपयोगी वस्तूदेखील जळाल्या आहेत. दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमन बंब उशिराने घटनास्थळी दाखल झाल्याने नागरिक संतप्त झाले होते. ही आग विद्युत कंपनीच्या हलगर्जीपणामुळे लागली असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. घटनेत जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.रमजान बाबा नगरात पहाटेच्या सुमारास घरातून धूर निघत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यावेळी तात्काळ नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीने चार घरांना वेढले. याबाबत अग्निशमन विभागाला माहिती दिली मात्र बंब वेळेत न पोहचल्याने लाखोंचे साहित्य जळून खाक झाले होते.

तीन लाखांच्या नोटा खाक

या आगीत लग्नासाठी जमा केलेल्या अडीच लाखांच्या रोकडसह एकूण तीन लाखांच्या नोटा जळून खाक झाल्या. महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे केले असून ते सरकारकडे पाठविण्यात येणार आहेत. बेघर अकरा कुटुंबियांनी तात्पुरता मोकळ्या जागेवरच राहण्याची व्यवस्था केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवीधरसाठी आज मतदान

0
0

पदवीधरसाठी आज मतदान

जळगाव, धुळे, नंदुरबारला निवडणूक यंत्रणा सज्ज

टीम मटा

विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज (दि. ३) मतदान होणार आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या शाळांवर ३३ मतदान केंद्र आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांनी सतर्क राहत निवडणूक प्रक्रिया योग्य रितीने पार पाडावी, असे आवाहन नाशिक विभागीय महसूल आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ डवले यांनी केले आहे.

आयुक्त डवले जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील हेल्पलाइन केंद्रास भेट दिली. त्यानंतर मतदान साहित्य पाहणी करून शहरातील मतदान केंद्रांची पाहणी केली. या वेळी जिल्हाधिकारी दिलीप पाढंरपट्टे, निवासी जिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी जे. आर. वळवी, अप्पर तहसीलदार ज्योती देवरे, तहसीलदार अमोल मोरे आदी उपस्थित होते. महसूल आयुक्त डवले यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारीसाठी आढावा घेत जिल्ह्यातील एकूण मतदार, मतदान केंद्रांवरील सुविधांची माहिती घेतली.

जिल्ह्यात प्रत्येक मतदान केंद्रावर पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात मतदान अधिकारी, शिपाई, सुक्ष्मनिरीक्षक, पोलिस कर्मचारी असे एकूण १६५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच जिल्हा पोलिस दलाकडून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त प्रत्येक मतदान केंद्रावर तैनात करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी जे. आर. वळवी यांनी दिली आहे.

००

पॉईंटर

धुळे जिल्ह्यातील मतदान केंद्र : ३३

एकूण मतदार : २५,४००

एकूण उमेदवार : १७

एकूण मतदार : २,५६,४७२

अधिकारी व कर्मचारी : १६५

००

मतदार ओळखपत्र आवश्यक

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान आज (दि. ३) सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत होणार आहे. यासाठी मतदारांनी मतदानाच्या वेळीस निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये ज्या मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसेल त्यांनी ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, छायाचित्र असलेले पदवी किंवा पदवीका प्रमाणपत्र, केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम किंवा उद्योगसंस्थेने दिलेले ओळखपत्र, बँक किंवा पोस्टाचे पासबुक यासारख्या पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा सोबत असणे आवश्यक आहे. ओळखीचा पुरावा असल्याशिवाय मतदान करता येणार नाही. मतदारांनी याची नोंद घ्यावी, असे निवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विकास मंत्र्यांना जाब विचारा

0
0

आमदार निर्मला गावित यांचे मतदारांना आवाहन

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

नोटबंदी हा काँग्रेसचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठरणार असे हरसूल भागात झालेल्या मेळाव्यात दिसून आले. ग्रामीण भागात नोटबंदीने घटलेला रोजगार आणि शेतकरी शेतमजूर याची चर्चा अधिक होत आहे. त्याचसोबत आदिवासींच्या कल्याणासाठी असलेल्या योजना बंद करण्यात येत आहेत, याचा जाब आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना विचारा, असे आवाहन आमदार निर्मला गावित यांनी हरसूल शिंदपाडा येथील मेळाव्यात केले.

केंद्रात व राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर सरकारने केलेल्या नोटबंदीमुळे आपलेच पैसे आपल्याला मिळत नसल्याची स्थिती सध्या सर्वत्र निर्माण झाली आहे. भाजपचे त्र्यंबकेश्वर तालुक्यात कुठल्याही प्रकारचे विकासकामे नसताना काही लोक निवडणुकीपुरते कामाला लागले आहेत.

त्र्यंबक, पेठ, सुरगाणा हे तालुके अजुनही मागासलेले आहेत. येथे पायाभात सुविधांची वाणवा आहे. आदिवासी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे या परिसरात निधी येतो आणि या भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावते. आता तुमच्याकडे आदिवासी विकासमंत्री सावरा येतील. त्यांना आद‌िवासींच्या योजना बंद का केल्या तसेच गडदवणे, बोरीपाडा बंधाऱ्यासाठी पैसे का देत नाहीत? याबाबत विचारा असे गावित यांनी आवाहन केले. काँग्रेसच्या विजय-संकल्प मेळाव्यात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी हजेरी लावली.

या मेळाव्याप्रसंगी ठाणापाडा गटाचे उमेदवार हर्षल गावित, ठाणापाडा गणाचे उमेदवार ललिता माडी, मुलवड गणाचे उमेदवार पुंडलिक गीते यांच्यासह सभापती मंगळू निंबारे, माजी सभापती सुनंदा भोये, सुमन खरपडे, सुमन टोपले, हर्षल गावित, देविदास जाधव, रमेश भोये, पुंडलिक कनोजे, अर्जुन मौळे, भाऊराज राथड आदींसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

हर्षलसाठी भा‌वनिक साद

ठाणापडा गटात आमदारपुत्र हर्षल गावित रणांगणात उतरले आहेत. याबाबत कार्यकर्त्यांनीही उमेदवारी जनतेच्या मागणीवरून असल्याचे सांग‌ितले. त्यामुळे आमदार निर्मला गावित यांनीदेखील हर्षलला पदरात घेऊन विजयी करावे, अशी भावनिक साद मेळाव्यात घातली आहे.

पक्षप्रवेश सुरू

मेळाव्यात माकप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे याबरोबरच इतरही पक्षातील शंभरावर कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसची ताकद ठाणापाडा गटात वाढली आहे. तर सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना एकत्र येऊन सरकारच्या विरोधात निवडणूक लढवून काँग्रेस पक्षाला निवडणूक जिंकायची आहे, असे तालुकाध्यक्ष संपत सकाळे यांनी सांगितले. यावेळी तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-पुणे रेल्वे मार्ग अधांतरीच

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पहिल्यांदाच सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पामुळे नाशिककरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सुटणार की नाही हे समजू शकलेले नाही. नाशिक-पुणे रेल्वे मार्ग होणार की नाही, अशी विचारणा नाशिककरांनी केली आहे. अनेक वर्षांपासून नाशिक-पुणे रेल्वेमार्ग पोतडीतच राहिल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

कृषी, पर्यटनासाठी विशेष गाड्या सोडणे, रेल्वेसुरक्षेसाठी एक लाख कोटीची तरतूद करणे, ऑनलाईन तिकिटावरील सेवाकर रद्द करणे, २०१९ पर्यंत सर्व कोचमध्ये बायोटॉयलेट, सौर ऊर्जेवर रेल्वेस्टेशनवर चालवणे आदी घोषणा नाशिककरांसाठी महत्त्वाच्या आहेत.

रेल्वेच्या ९२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच मुख्य अर्थसंकल्पासोबत रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेचे दहा हजार कोटी वाचल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासाठी काय मिळाले, याचा तपशील उपलब्ध न झाल्यामुळे नागरिक संभ्रमातच राहिले.

कृषी, पर्यटनाला फायदा

नाशिक द्राक्ष, डाळींब, कांदा व अन्य पिकांची देशाची राजधानी आहे. येथून भाजीपाला गुलाब व अन्य फुलेही निर्यात होतात. अशा कृषी उत्पादनासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचे जाहीर केल्याने नाशिकच्या कृषी क्षेत्राला फायदा होणार आहे. पर्यटन आणि तीर्थस्थळांसाठीही नाशिक प्रसिध्द आहे. देश-विदेशातून भाविक व पर्यटक येथे मोठ्या संख्येने येत असतात. त्यांच्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचे यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर झाले आहे.

सुरक्षा व्यवस्था वाढवा

रेल्वे सुरक्षेसाठी यंदाच्या अंदाजपत्रकात तब्बल एक लाख कोटींची तरतूद केलेली आहे. नाशिकरोडला कुंभमेळ्यात शंभरावर सीसीटीव्ही कंत्राटी पध्दतीने बसविण्यात आले. ते नंतर काढून घेण्यात आले. सीसीटीव्ही कॅमऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी आहे. मुख्य प्रवेशद्वारावरच मेटल डिटेक्टर आहेत. अन्य प्रवेशद्वार सताड उघडे असतात. तेथेही मेटल डिटेक्टर आणि स्कॅनिंग मशिन बसविणे, फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा भिंत उभारणे आवश्यक आहे. ही कामे अर्थसंकल्पातून मर्गी लागावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

रेल्वेचे इ-तिकीट काढतांना सेवाकर लागणार नसल्याने प्रवाशांना फायदा होणार आहे. तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने २०१९ पर्यंत सर्व गाड्यांमध्ये बायो टॉयलेट लावले जाणार असल्याने याचेही स्वागत आहे. सर्व घोषणा प्रत्यक्षात उतराव्यात. हीच अपेक्षा!

- राजेश फोकणे, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती

पूर्वी ज्या राज्याचे रेल्वेमंत्री असायचे त्याच राज्याकडे रेल्वेचा जास्त निधी जायचा. आता रेल्वे आणि केंद्रीय अर्थसंकल्प संयुक्तरित्या सादर झाल्यामुळे कोणत्याही राज्याशी भेदभाव होणार नाही. आवश्यकता आहे त्या ठिकाणी निधी मिळेल.

- बिपीन गांधी, अध्यक्ष, रेल परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कपाट, टीडीआर कोंडी फुटणार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कपाट प्रश्न व नव्या टीडीआर धोरणामुळे नाशिकच्या विकासाची झालेली कोंडी आता फुटण्याची शक्यता आहे. महापालिका हद्द‌ींमध्ये मोफत एफएसआयचे उल्लंघन होऊन अनधिकृत ठरणाऱ्या बांधकामांना नियमित करण्यासंदर्भातील अभिप्राय महापालिकेने शासनाला सादर केला आहे. त्यामध्ये अतिरिक्त बांधकामांवर प्रीमियम आकारून बांधकामे नियमित करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांवर एफएसआयचे उल्लंघन झालेल्या ठिकाणी टीडीआर लोड करण्याची परवानगी देण्याची शिफारस करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामांसदर्भातील या शिफारशी शासनाने मान्य केल्यास गेल्या दीड वर्षापासून कपाटांच्या प्रश्‍नांवरून निर्माण झालेला तांत्रिक वाद निकाली निघण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने पिंपरी चिंचवड पालिकेच्या धर्तीवर राज्यातील महापालिका हद्दीतील अनाधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यातील सर्वच महापालिकांमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भात राज्यसरकारने महापालिकांकडून अभिप्राय मागविला आहे. त्यानुसार महापालिकेने तज्ज्ञांच्या मदतीने शासनाला अनधिकृत बांधकामांसदर्भात काही पर्याय सुचविले आहेत. राज्य सरकारने महापालिकेच्या पर्यायांचा विचार केल्यास कपाटांच्या प्रश्‍नांवरून निर्माण झालेला तांत्रिक वाद मिटणार आहे. नव्या शिफारशींमध्ये साडेसात, नऊ मीटर रस्त्यावरील बांधकामांनी एफएसआयचे उल्लंघन केले असल्यास त्यावर टीडीआर लोड करून ती नियम‌ित करावी आणि ३० टक्के एफएसआय उल्लंघनाबाबत स्पष्टता करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे यातून शहराच्या बांधकाम व्यवसायाची झालेली बरीचशी कोंडी फुटणार आहे.

शहरात बांधकामातील कपाटांवरून वाद निर्माण झाला आहे. मोफत एफएसआयचा वापर चटईक्षेत्र वाढविण्यासाठी झाल्याचा दावा पालिकेच्या नगररचना विभागाने केला होता. त्यामुळे अशी बांधकामे अनधिकृत ठरविण्यात आली होती. गेल्या तीन वर्षांपासून हा वाद रखडला आहे. त्यामुळे बांधकाम परवानगीसाठी प्रकरणे दाखल होणे बंद झाले होते. सहा हजारांहून अधिक अशी प्रकरणे परवानगीअभावी प्रलंबित आहेत. शहर विकास आराखड्यातून प्रश्‍न मार्गी लागेल अशी अपेक्षा होती. परंतु, विकास नियंत्रण नियमावली जाहीर न झाल्याने तिढा कायम आहे. नियंत्रण नियमावलीतूनही प्रश्‍न सुटणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे बांधकामे अधिकृत करण्याच्या योजनेत पालिकेच्या शिफारशी मान्य केल्यास बांधकामातील कपाटांचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे.


महापालिकेच्या शिफारसी

- अनधिकृत बांधकामे अधिकृत करताना मोफत एफएसआयमध्ये तीस टक्‍क्‍यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. परंतु, सदरची सूट एकूण बांधकामावर आहे की अतिरिक्त वाढीव बांधकामावर आहे याबाबत सरकारने स्पष्ट करावे.

-३१ डिसेंबरनंतर ज्या बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्रे दिली आहेत, त्या बांधकामांचा समावेश बांधकामे नियम‌ित करण्याच्या योजनेत करू नये.

- नऊ मीटर रुंदीच्या खालील रस्त्यांवर एफएसआयचे उल्लंघन झाले असल्यास व त्यावर टीडीआर लोड केला असल्यास अशा बांधकामांनाही योजना लागू करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गर्दीने अडतेय ऑनलाइनचे घोडे!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इतके दिवस सुरळीत चालणाऱ्या ऑनलाइन प्रणालीने आता वाढत्या मागणीमुळे मान टाकण्यास सुरुवात केली आहे. वेबसाइट हँग होणे, पेज रिफ्रेश होणे किंवा डाटा सेव्ह न होणे असे प्रकार वाढले आहेत. उमेदवारी अर्जातील माहिती किचकट असून, गोंधळात यात काही चुका झाल्यास थेट उमेदवारी अर्जावरच संक्रात येण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज ऑनलाइन पध्दतीने भरण्याची सुविधा सुरू केली. महापालिका निवडणुकीसाठी याच पहिल्यांदाच वापर होतो आहे. मात्र, अतिरिक्त ताण पडल्याने ऑनलाइन सुविधेचा फज्जा उडण्यास सुरुवात झाली आहे. आगामी दोन दिवस ही यंत्रणा कोलमडून पडणार नाही, याची दक्षता प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. याबाबत बोलताना काही इच्छुक उमेदवारांनी सांगितले, की वेबसाइट हँग होणे ही महत्त्वाची समस्या समोर येत आहे. अनेकदा अर्ज भरण्याचे काम सुरू असताना अचानक पेज रिफ्रेश होते. उमेदवार थेट साइनआऊट होऊन होम पेजवर येतो. किमान तीन ते चार तास माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू असताना असे प्रकार घडल्यास मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार इच्छुकांकडून केली जाते आहे. दरम्यान, काही तांत्रिक मुद्देही अर्ज भरताना समोर येत आहेत. समजा इच्छुक उमेदवाराने काही वर्षांपूर्वी एखादे घर खरेदी केलेले असेल, तर ते खरेदीची तारीख अर्जात नमूद करावी लागते. ती तारीख बिनचूक हवी अन्यथा भविष्यात याचा मोठा फटका इच्छुक उमेदवारास बसू शकतो. दुसरीकडे शौचालयाच्या येथे काढण्यात येणारा सेल्फी फोटो हादेखील चेष्टेचा विषय ठरतो आहे.

तांत्रिक मुद्द्यांचे अडथळे

दरम्यान, एका उमेदवाराने याच वर्षीसाठी पहिल्यांदा इन्कम टॅक्स रिर्टन्स भरले. मात्र, अर्ज भरताना त्यात पाच वर्षांसाठी पर्याय देण्यात आलेले आहेत. यात, रिक्त जागा सोडल्यास अर्ज पुढे भरताच येत नाही. तर शून्य भरल्यास तो इनव्हॅलिड दाखवला जातो. हा मुद्दा फारच किचकट असून, यात सुधारणा होणार काय, असा प्रश्न इच्छुकांकडून उपस्थित होतो आहे. सध्या वेबसाइट यूजर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दोन दिवसांत त्यात आणखी भर पडेल. एकाच वेळी अनेक यूजर्स वापर करतील त्यावेळी काही समस्या उद्भवतील, अशी माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेला दीड कोटीचा दणका

0
0

Gautam.Sancheti@timesgroup.com

निफाड तालुक्यातील काकासाहेबनगर (रानवड) येथील नाशिक जिल्हा बँकेच्या शाखेतील १७ महिन्यांपूर्वी लॉकर्स फोडून झालेल्या चोरीत लॉकर्सधारकांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक मंचाने दिले आहेत. या चोरीनंतर बँकेने जबाबदारी झटकली होती. त्यामुळे २९ लॉकर्सधारकांनी ग्राहक न्यायमंचात धाव घेतली. त्यानंतर न्यायमंचाने हा ऐतिहासिक निर्णय देत तब्बल २९ ग्राहकांचे ६ किलो ६६७ ग्रॅम सोन्याचे चोरी झालेल्या दिवसाच्या बाजारभावाप्रमाणे मूल्य देण्याचे आदेश दिले आहेत. याची अंदाज‌ित किंमत १ कोटी ६४ लाख ८२० रुपये आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक ग्राहकाला मानसिक त्रासापोटी २५ हजार व अर्ज खर्चापोटी १० हजार रुपये असा एकूण १० लाख १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

रानवड येथे २४ ऑगस्ट २०१५ रोजी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत बँकेच्या पाठीमागची खिडकी तोडून दरोडेखोर आत शिरले. गॅस कटरच्या साह्याने त्यांनी स्ट्राँगरूमचा दरवाजा कापून या रूममधील लॉकर गॅस कटरच्या साह्याने कापले व त्यातील ऐवज लंपास केला. हा प्रकार लक्षात येताच व्यवस्थापकांनी तातडीने पिंपळगाव पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानंतर आतापर्यंत या चोरीचा तपास लागलेला नाही. त्यामुळे लॉकर्सधारकांनी बँकेत नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली. पण बँकेने तीन महिन्यांनंतर लॉकर्समध्ये किती किंमतीच्या वस्तू ठेलेल्या आहेत, याबाबत बँक अनभिज्ञ असल्यामुळे ही जबाबदारी बँकेवर येऊ शकत नाही. पोलिस तपासातून मुद्देमाल प्राप्त होताच तूर्त कळविण्यात येईल असे कळवले. त्यानंतर या चोरीतील २९ लॉकर्सधारकांनी ग्राहक न्यायमंचात १ एप्रिल २०१६ रोजी तक्रार दाखल केली व त्यानंतर हा निर्णय देण्यात आला.

उगाव येथील शेतकरी गणपत गंगाधर पानगव्हाणे यांच्यासह २८ जणांनी ग्राहक न्ययामंचात स्वतंत्र तक्रार केली. पानगव्हाणे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, सेफ डिपॉझीट व्हॉल्टबाबत बँकेने केलेला करारनामा अहेतूक असून, त्यात चोरी, आग व इतर कारणांसाठी नुकसानीची कोणतीही जबाबदारी वा त्याचा उल्लेख केला नसल्याने तो त्रुटीयुक्त आहे. त्याचप्रमाणे बँकेच्या शाखेत सुरक्षा रक्षक अथवा सुरक्षा गजराची सुविधा पुरविण्यात आलेली नव्हती. सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले नव्हते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात शाखा असल्यामुळे येथे विजेची शाश्वती नसूनही जनरेटरची अथवा बॅटरी बॅकअपची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. सर्व सुरक्षा देणे बंधनकारक असताना ते करण्यात कुचराई केलेली आहे. या तक्रारीवर बँकेने आपली बाजू मांडली. मात्र, न्यायमंचाने आपला निर्णय देताना नुकसान भरपाई देण्यास ग्राहक पात्र असल्याचे सांगत त्यांच्याकडून इंडेम्निटी बॉण्ड करुन घेण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय ग्राहक न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे -कुलकर्णी व कारभारी जाधव यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला उमेदवारांची उडतेय तारांबळ

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक महानगर पालिकेच्या निवडणूकीत प्रथमच चार उमेदवारांचा एक प्रभाग करण्यात आला असून यापैकी दोन जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. कोणत्याही राजकीय पक्षांकडे महिलांची संख्या एवढी नसल्याने अनेक पुरुष पदाधिकाऱ्यांच्या घरातील महिलांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र या महिलांची उमेदवारी अर्ज भरण्यापासूनच होणारी तारांबळ एक चर्चेचा विषय ठरली आहे. सिडको भागात कार्यरत असलेल्या विविध राजकीय पक्षांकडून महिलांना उमेदवारी देण्यासाठी महिलांची संख्या कमी दिसून येत आहे. त्यातच अनेक पुरुष इच्छुक असल्याने पुरुष गटात नाही तर महिला गटातून घरातील महिलेला उमेदवारी मिळण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. यासाठी महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचबरोबर मागील एक महिन्यांपासून प्रभागात या महिला फिरून मतांचा जोगवा मागताना दिसत आहेत. त्यातच आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांचीच गरज असल्याने या महिला विभागीय कार्यालयात येतांना दिसत आहेत. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करतांना होणारी धावपळ पाहता या महिलांची चांगलीच तारांबळ होत आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या या खटाटोपापेक्षा उमेदवारी न मिळाली तर बरे होईल, असेही हावभाव काही महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करमणूक कर नाही, तर निवडणूक नाही!

0
0

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhav

नाशिक: कोणत्याही स्वरूपाची थकबाकी असलेल्या उमेदवारास सार्वजनिक निवडणूक प्रक्रियेत भाग घेता येत नाही. तसा कायदाच असून, याचा आधार घेत करमणूक कर थकवणाऱ्या १२ जणांच्या नावांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिका प्रशासनाला दिली आहे. यापैकी इच्छुक उमेदवारांना ना हरकत दाखला देऊ नये, अशी विनंती करण्यात आली आहे.

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक २१ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. यासाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाश‌िंग बांधून तयार आहेत. महापालिका निवडणुकीवेळी आपल्या नावे थकबाकी राहणार नाही, याची दक्षता उमेदवारांकडून घेतली जाते. बऱ्याचदा महापालिकेशी संबंध‌ित थकबाकीचा विचार यात केला जातो. मात्र, या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाने महसूल विभागाकडे थकबाकी असलेल्या थकबाकीदारांच्या नावांची यादीच महापालिकेला सादर केली आहे. केबल ऑपरेटर, सभागृह किंवा मनोरंजनाची इतर सुविधा संबंध‌ितांकडून पुरवली जाते. मात्र, त्यापोटी करमणूक कर भरला जात नाही. थकबाकीदारांचा आणि थकबाकीचा आकडा मोठा असून, त्यापैकी कोणी इच्छुक उमेदवार ना हरकत दाखला घेण्यासाठी आला तर तो त्यास देऊ नये, असे महसूल विभागाने महापालिकेला कळवले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रानुसार, अनिल (छोटू) गांगुर्डे, नैना नीलेश सहाणे, नीलेश सहाणे, फम‌िदा जब‌िर खान, अनंत औटे, मुकुंद भास्कर बागूल, राम दशरथ खांदवे, ज्ञानेश्वर रामनाथ नागरे, सुनीता सुभाष घुबाडे, बजरंग नामदेव शिंदे, शश‌िकांत हरिभाऊ जाधव, शिवाजी देशमुख आणि सुनील आबा जाधव अशी थकबाकीदारांची नावे आहेत.

दाखल्यांसाठी २३०४ अर्ज

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रानुसार यापैकी उमेदवारी अर्ज सादर करणाऱ्यांना ‘ना हरकत दाखला’ दिला जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. बुधवारपर्यंत दोन हजार ३०४ जणांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ना हरकत दाखल्यासाठी अर्ज सादर केले. त्यापैकी दोन हजार २३७ दाखले तयार असून, जवळपास एक हजार ९०० दाखले वितरीत करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये उमेदवारीचा तिढा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची घटिका येऊन ठेपली असतानाही शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांसाठी उमेदवारांची निवड ही अग्निपरिक्षा ठरली आहे. उमेदवारीसाठी लॉबिंग, दबाव, शक्तिप्रदर्शन, इशारे आदींमुळे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मनसे वगळता अन्य पक्षांकडून यादी जाहीर होऊ शकली नाही. भाजप व शिवसेना या दोन पक्षांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वाधिक चुरस असून, बंडखोरांचीही मोठी भीती या दोन्ही पक्षांना आहे. त्यामुळे उमेदवार निवडीवरून रात्री उशिरापर्यंत युती आणि आघाडीमध्ये खल सुरू होता. बंडखोरीच्या भीतीने भाजपने तर थेट एबी फॉर्म उमेदवारांच्या हातात टेकवण्याचा निर्णय घेतला आहे, तर सेनेनेही शुक्रवारचाच दिवस निवडला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून कमीत कमी बंडखोरी होईल, याची दक्षता संगनमताने घेण्यात आल्याची चर्चा आहे.

मनसेने मात्र पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली असून, उर्वरित यादी शुक्रवारी जाहीर होणार आहे. पहिल्या यादीत महापौर अशोक मुर्तडक यांचा पत्ता मात्र कापण्यात आला आहे. दुसरीकडे शक्तिहीन झालेल्या काँग्रेस- राष्ट्रवादीचा घोळ अजून सुटला नसून निवडक प्रभागांमध्ये अजूनही तिढा आहे. त्यामुळे उमेदवार यादी तर दूरच, अजून आघाडीचीही घोषणा झाली नसल्याने इच्छुक सैरभैर झाले आहेत. त्यामुळे शुक्रवारचा दिवस निर्णायक ठरणार असून, बंडखोरी टाळण्याचे सर्वांत मोठे आव्हान शिवसेना, भाजपसमोर राहणार आहे.

मनसेच्या यादीत महापौरांचे नाव नाही!

महापालिका निवडणुकांसाठी उमेदवार निवड ही इतर पक्षांसाठी डोकेदुखी ठरली असतानाच मनसेने सर्वप्रथम ५४ उमेदवारांची यादी जाहीर करून धक्का दिला आहे. मनसेतर्फे गुरुवारी पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, त्यात विद्यमान आठ नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्थायी समितीचे सभापती सलीम शेख यांच्यासह सुरेखा भोसले, अनिल मटाले यांचा समावेश आहे. बंडखोरांची वाट न पाहता मनसेने यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे. असे असले तरी पहिल्या यादीत महापौर अशोक मुर्तडक व शहराध्यक्ष अॅड. राहुल ढिकले यांचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या दोघांच्या नावाचा समावेश नसल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेनेत इनकमिंग; बंडाळीचा धोका

सर्वाधिक इनकमिंग झालेल्या शिवसेनेसाठी उमेदवारांची निवड ही अग्निपरिक्षा ठरली असून, गुरुवारीही पक्षाची अंतिम यादी जाहीर होऊ शकली नाही. त्यामुळे भाजपप्रमाणेच शिवसेनेलाही बंडाळीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे आयारामांमुळे पक्षाची डोकेदुखी वाढली असताना शेवटच्या क्षणापर्यंत पक्षात इनकमिंग सुरू होते. अपक्ष नगरसेवक संजय चव्हाण यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. चव्हाण यांच्या प्रवेशावरून तीन दिवसांपूर्वीच राडा झाला होता. मात्र, देवानंद बिरारींची दिलजमाई करण्यात पक्षाला यश आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात बंडाळी रोखण्यात यश आले असले तरी यादी जाहीर झाल्यानंतरचा बंडोबांचा उद्रेक पक्षासाठी डोकेदुखी ठरणार आहे. दरम्यान, शिवसेनेच्या मुखपत्रातून शुक्रवारी उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.

भाजपमध्ये राडेबाजी सुरू

महापालिकेत स्वबळावर सत्ता मिळवण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या भाजपला निवडणुकीपूर्वीच निष्ठावंतांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. बंडखोरी टाळण्यासाठी व निष्ठावंतांची नाराजी ओढवू नये म्हणून भाजपने यादी जाहीर न करता थेट उमेदवारांना एबी फॉर्म देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुरुवारीच भाजपमध्ये उद्रेक पाहायला मिळाला. काही निष्ठावंतांनी पालकमंत्र्यांना घेराव घालत उमेदवारीसाठी आग्रह धरला. निष्ठावंतांनीच भाजपच्या उमेदवारांना पाडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे उमेदवारांची निवड भाजपपुढचे सर्वांत मोठे आव्हान असून, निष्ठावंतांचा रोष कायम राहिला तर सत्तेचे स्वप्न निवडणुकीपूर्वीच भंगण्याची शक्यता आहे. रात्री उशिरापर्यंत यादी अंतिम करण्याचे काम सुरू होते. काही निवडकांना एबी फॉर्मचे वाटपही सुरू करण्यात आले आहे.

आघाडीचा घोळ संपेना

शिवसेना, भाजपचा घोळ संपला नसताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचा तिढाही कायम आहे. जागावाटपाचे अंतिम सूत्रही निश्चित झाले नसल्याने आघाडीचे इच्छुक सैरभैर झाले आहेत. काही प्रभागांमध्ये उमेदवारही नसताना दोन्ही पक्षांनी निवडक जागांवर एकत्रित दावा ठोकल्याने शेवटपर्यंत आघाडीचा घोळ संपत नसल्याचे चित्र आहे. काही इच्छुकांनी काँग्रेस कार्यालयात जाऊन एबी फॉर्मची मागणीही केली. मात्र, पक्षाकडून अजून यादी अंतिम झाली नसल्याने त्यांना माघारी परतावे लागले, तर राष्ट्रवादीतही तिढा कायम होता. राष्ट्रवादीने प्रभाग १२ मधील एका जागेवर दावा केला, तर काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनीही दावा केल्याने आघाडीचा तिढा कायम आहे. आघाडीकडूनही शुक्रवारीच थेट उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीस हजार फुलांची नाशिककरांना पर्वणी

0
0


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नासर्डी पुलाजवळील नाशिक्लबमध्ये विविधरंगी फुलांच्या प्रदर्शनाला शुक्रवार (दि. ३)पासून उत्साहात प्रारंभ झाला. प्रदर्शनाचे आवार विविध रंग व सुवासाच्या वीस हजार फुलांनी फुलले असून, देशातील विविध राज्यांतून बीज आणून नाशिकमध्येच ही सुंदर फुलझाडे फुलविण्यात आली आहेत. ५ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांसाठी हे प्रदर्शन खुले राहील.

प्रदर्शनाच्या प्रारंभावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, आमदार राहुल आहेर, संयोजक रामेश्वर सारडा, ‘देशदूत’चे संचालक विक्रम सारडा, जनक सारडा, विजय शिंदे, संतोष शितोळे, हिमानी जेठवा, प्रिया जेठवा, दीपक सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रदर्शनाच्या प्रारंभावेळी इव्हेंट मॅनेजर संदेश सारंग यांनी स्वागत केले. दीपक सोनार यांनी प्रास्ताविक केले.

प्रदर्शनात गुलाबाचे १४० प्रकार आहेत. कॅलेड्युला, तोरेनिया, बालसम, साल्विया, इंपेशन्स, असिलम, लिलियम, ट्युलिप, ग्लॅडियस, बेगोनिया, आफ्रिकन रोज, जिरेनिय, सफेद झेंडू, पिवळा झेंडू, ब्राझिलियन बटरफ्लाय, प्रिन्स फूल, ओरनामेंटल केल अशा देशीविदेशी फुलांचा आनंद लुटायला मिळणार आहे. ५५ पेक्षा अधिक सिझनल जातींबरोबरच वर्षभर फुलणारी फुलझाडेही आहेत. प्रदर्शनादरम्यान फुलांच्या विविध स्पर्धा नाशिककरांसाठी होणार आहेत. गुलाब व बोन्साय, ताज्या फुलांच्या पाकळ्यांची रांगोळी, पॉटेड रोझ प्लँट्स, मिनिएचर गार्डन अशा विविध प्रकारांत ही स्पर्धा होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप नेत्यांकडून घोडेबाजार?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीत बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्याऐवजी थेट एबी फॉर्म देणे भाजपच्या चागंलेच अंगलट आले आहे. मनसे आणि शिवसेनेतून ऐनवेळी पक्षात आलेल्यांना पायघड्या घातल्याने भाजपला निष्ठावंतांच्या रोषाचा सामना करावा लागला असून, पक्षात मोठ्या प्रमाणावर बंडाळी उफाळून आली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह सानप यांना पक्ष कार्यालयात घेराव घालण्यात आला.

निष्ठावंतांमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सानप यांना कार्यालय सोडण्याची वेळ आली. दरम्यान, भाजपने २५ ते ३० लाख रुपये घेऊन उमेदवारी विकल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला असून, उमेदवार पाडण्याचा इशारा दिला आहे. तसेच यावेळी काही इच्छुकांनी अश्लिल भाषेत शिव‌ीगाळही केली. त्यामुळे भाजप कार्यालयाला पोलिस संरक्षण पुरवावे लागले.

राज्यातील सत्ताधारी पक्ष असल्याने भाजपकडे सर्वाधिक इच्छुकांचा ओढा होता. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांनी थेट मुख्यमंत्र्याकडून लॉबिंग केले होते. त्यामुळे भाजपमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वाधिक मारामारी होती. भाजपने सातशे इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या. परंतु, बंडाळी होण्याची शक्यता असल्याने अखेरीस उमेदवारी यादी जाहीर करण्याऐवजी थेट एबी फॉर्मच देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय भाजपच्या चांगलाच अंगलट आला. पालकमंत्री महाजन व सानप यांच्यावर उमेदवारीसाठी पैसे घेतल्याचे आरोप करण्यात आले. सकाळी ११ वाजता कोणाला उमेदवारी मिळणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. त्यामुळे उमेदवारी डावलण्यात आलेल्या इच्छुकांनी भाजप कार्यालय गाठले. भाजपकडून प्रभाग क्र. ३१ मधून इच्छुक असलेल्या शांता देवचंद दोंदे, प्रभाग क्र. १६ मधील रवींद्र भालेराव यांच्या मातोश्री सुश‌िला भालेराव, बापू लोंखडे, मनीषा भालेराव यांनी पक्ष कार्यालय गाठले. यावेळी सानप यांनीही कार्यालयात प्रवेश केला. त्यामुळे या इच्छुकांनी त्यांना गराडा घालत जाब विचारला. आम्हाला उमेदवारी का दिली नाही, असा सवाल करण्यास सुरुवात केली.

सानप यांना शांताबाई दोंदे, सुश‌िला भालेराव यांनी आक्रमक भाषेत सुनावत घेराव घातला. पक्षाच्या पडत्या काळात आम्ही काम केले. परंतु, ऐनवेळी तुम्ही दुसऱ्यालाच उमेदवारी का दिली, असा सवाल करत आम्ही पक्षाचा उमेदवार पाडू, असा सरळ इशाराच दिला. तसेच पैसे घेऊन तिकीटवाटप केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पक्ष कार्यालयात मोठा गोंधळ होण्यास सुरुवात झाल्याने सानप यांनी कार्यालयातून काढता पाय घेतला. सानप गाडीत बसल्यानंतरही इच्छुकांची आरोपबाजी सुरूच राह‌िली. त्यामुळे भाजप कार्यालयात तणावाची स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनाच संरक्षणासाठी उभे रहावे लागले.

आत्मदहन करेल किंवा भोसकेन

भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांनी पक्षाला गंभीर स्वरुपाचे इशारे दिले. शांता दोंदे यांनी तर पैसे घेवून उमेदवारी वाटप केल्याचा आरोप करत उमेदवारी मिळाली नाही तर आत्मदहन करेल असा इशारा दिला. तसेच एकएकाला भोसकण्याची धमकीही त्यांनी यावेळी दिली. प्रभाग क्र. ३१ मधून त्यांच्या पतींना उमेदवारी हवी होती. परंतु, ती न मिळाल्याने त्यांचा जीभेवरील तोल सुटला. भाजपच्या नेत्यांनी एक कोटीपर्यंत पैसे घेतल्याचा आरोप केला. त्यांची ही दमबाजी चर्चेचा विषय बनली होती.

..अन् कोसळले रडू!

उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांना भाजप कार्यालय ते महाजन यांचे निवासस्थान अशी तारेवरची कसरत करावी लागत होती. प्रभाग क्र.२९ मध्ये भाजपकडून डॉ. सोनल मंडलेचा यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. परंतु, ऐनवेळी त्यांच्या प्रभागात संगीता बरके यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे डॉ. सोनल मंडलेचा व्यथ‌ित झाल्या. त्यांनी महाजन यांचे निवासस्थान गाठून आपली कैफियत मांडली. परंतु, त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना महाजन यांच्या निवासस्थानाबाहेरच रडू कोसळले. त्यामुळे त्यांचे समर्थक चिडले. त्यांनीही शिव्यांची लाखोली वाह‌िली.


भाजपच्या नेत्यांनी पैसे घेऊन उमेदवारी दिली आहे. ऐनवेळी पक्षात आलेल्यांना उमेदवारी देऊन निष्ठावंतांवर अन्याय केला आहे. मला उमेदवारी मिळाली नाही तर आत्मदहन करेन किंवा एकेकाला आता भोसकेन.

शांता दोंदे, इच्छुक



पक्षात नव्याने आलेल्यांना तत्काळ उमेदवाऱ्या दिल्या आहेत. परंतु, पक्षासाठी योगदान असलेल्यांना नाकारले आहे. त्यामुळे तिकीटवाटपात मोठा घोडेबाजार झाला आहे. आम्ही पक्षीय पातळीवर याची तक्रार करणार आहोत.

-सुश‌िला भालेराव, इच्छुक


भाजपने घोडेबाजार करून उमेदवारी दिली आहे. आम्ही पक्षाचे निष्ठावंत असून अनेक वर्षांपासून काम करत आहोत. गरीबांना उमेदवारी टाळली. निष्ठावंतांना डावलणे भाजपला महागात पडणार असून, पक्षाच्या उमेदवारांना आम्ही मतदान करणार नाही.

- बापू लोखंडे, इच्छुक


पक्षासाठी ज्यांनी काम केले त्यांना उमेदवारी नाही. सर्व्हेक्षण करून तरी उमेदवारी दिली पाह‌िजे. रात्री अडीच वाजेपर्यंत माझी उमेदवारी फिक्स होती. परंतु, ऐनवेळी बाहेरच्या उमेदवारांना तिकीट दिले गेले.

-डॉ. सोनल मंडलेचा, इच्छुक


चार महिन्यांपासून काम करत आहोत. हा पैशांचा घोळ आहे. २५ ते ३० रुपये लाख घेऊन तिकीटवाटप केले आहे. चांगले उमेदवार यांना नको आहेत. मोदींनी यांना हेच सांग‌ितले का? आमचा राजकारणावरचा विश्वास उडाला आहे. राजकारणासारखे दुसरे गलिच्छ काम कोणतेच नाही.

-भगवान मराठे, इच्छुक उमेदवार समर्थक


उमेदवारी देताना निवडून येणे हा निकष लावण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळाली नाही ते असे आरोप करणारच आहेत. उमेदवारी देतानाचा निर्णय संगनमताने घेतला आहे.

-आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेस कार्यालयाला टाळे

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर विकास आघाडीच्या माध्यमातून गेले सहा महिने प्रचार करणाऱ्या उमेदवारांना ऐनवेळी पुरस्कृत करून निष्ठावंतांना डावलल्याचा प्रकार काँग्रेस पक्षातही घडला आहे. शहराध्यक्ष शरद आहेर यांनी इतरांकडून पैसे घेऊन निष्ठावंतांशी गद्दारी केल्याचा आरोप करीत प्रभाग क्रमांक पाचमधील संतप्त कार्यकर्त्यांनी एम. जी.रोडवरील काँग्रेस कार्यालयाला टाळे ठोकले. शहराध्यक्ष हटावच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

अन्य पक्षांप्रमाणेच काँग्रेस पक्षातही तिकीटवाटपावरून नाट्य घडले. निवडणुकीपूर्वीच अर्जुन गांगुर्डे, उद्धव निमसे यांसारख्या पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला. मात्र, अनेक निष्ठावान कार्यकर्ते अजूनही काँग्रेससाठी झटत आहेत. शिवसेना आणि भाजपपेक्षा काँग्रेसमध्ये चुरस कमी असली, तरी तेथेही तिकीटवाटपावरून गोंधळ सुरू असल्याचे चित्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पाहावयास मिळाले. प्रभाग क्रमाकं पाचमध्ये पक्षाचे पदाधिकारी पांडुरंग बोडके यांच्या पत्नी शोभा उमेदवारीच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. बोडके कुटुंबीयांतील एकास उमेदवारी दिली जाणार असून, पक्षचिन्हासह अर्ज भरा, असे शहराध्यक्षांनी आम्हाला सांगितले. मात्र, ऐनवेळी विमल पाटील यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आल्याचे समजताच बोडके कुटुंबीय आणि कार्यकर्ते संतप्त झाले. जाब विचारण्यासाठी त्यांनी काँग्रेसच्या शहर कार्यालयात धाव घेतली. मात्र, शहराध्यक्षांसह तिकीटवाटपात महत्त्वाची भूमिका बजावणारे पदाधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी काँग्रेस कार्यालयाला टाळे ठोकले.

‘तुम्ही अर्ज भरा, त्यावर चिन्ह टाका, सकाळी तुम्हाला एबी फॉर्म दिला जाईल,’ असे सांगण्यात आल्याचा दावा बोडके कुटुंबीयांनी केला आहे. पक्षाचे कार्यालय असताना लक्झरियस हॉटेलमध्ये तिकिटे निश्चित करण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. पक्षात एजंटगिरी सुरू असून, धनशक्तीपुढे जनशक्तीला नमविले जात असल्याबाबत निषेध नोंदविण्यात आला. पैसे घेऊन उमेदवारी देणाऱ्या शहराध्यक्षांचा धिक्कार असो, निष्ठावंतांवर अन्याय करून पळणाऱ्यांचा धिक्कार असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

---

शहराध्यक्ष शरद आहेर यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी पैसे घेऊन तिकिटे वाटल्याचा आमचा स्पष्ट आरोप आहे. आम्हाला आश्वासनांवर झुलवत ठेवून पक्षाने ऐनवेळी आमच्याशी दगाबाजी केली आहे. गतवेळी पक्ष उमेदवाराच्या विरोधात काम करणाऱ्यांवर पक्षाने अधिक विश्वास दाखविला हे दुर्दैव आहे.

-जगदीश बोडके

---

बोडके यांनी केलेले आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत. प्रभाग पाचमध्ये काँग्रेसला एकच जागा मिळाली असून, तीन जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आल्या आहेत. त्यांनी तेथे काही उमेदवारांना पुरस्कृत केले आहे. काँग्रेसने विमल पाटील यांना उमेदवारी दिली आहे. बोडके यांनी गैरसमजातून आरोप केले असून, पैसे घेण्याचा प्रश्नच उदभवत नाही.

-शरद आहेर, शहराध्यक्ष, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेत गुद्दागुद्दी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माजी महापौर विनायक पांडे यांचे पुत्र ऋतुराज पांडे आणि भावजयी कल्पना पांडे यांना उमेदवारी नाकारल्याच्या कारणावरुन शुक्रवारी शिवसेनेत राडा झाला. याच प्रकरणातून महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना बेदम मारहाणही झाली. तसेच २५ लाख रुपये घेऊन उमेदवारी दिल्याचा गंभीर आरोप पांडे यांनी केला आहे. मात्र, हे आरोप बोरस्ते यांनी फेटाळून लावले आहेत.

महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेतील बंडाळी उफाळून आली. माजी महापौर विनायक पांडे आणि महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्यात बाचाबाची आणि त्यानंतर हाणामारीही झाली. तिडके कॉलनीतील हॉटेल एसएसके सॉलिटेअरमध्ये हा प्रकार घडला. पांडे यांचे पुत्र ऋतुराज पांडे यांना प्रभाग १३मधून तर त्यांच्या भावजयी तथा विद्यमान नगरसेवक कल्पना पांडे यांना प्रभाग २४मधून उमेदवारी नाकारण्यात आल्याची बाब पांडे यांच्या निदर्शनास आली. हीच बाब लक्षात घेऊन पांडे हे त्यांच्या समर्थकांसह हॉटेल एसएसके सॉलिटेअर येथे आले. त्याठिकाणी बोरस्ते यांच्यासह जिल्हाप्रमुख विजय करंजकर व अन्य शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी पांडे यांनी बोरस्ते यांना उमेदवारी नाकारण्याबाबतचे कारण विचारले. याचवेळी पांडे आणि बोरस्ते यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि त्याचे पर्यवसान थेट हाणामारीत झाले. बोरस्ते यांचे कपडेही या झटापटीत फाटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच, बोरस्ते यांच्या चेहऱ्यावर मोठे व्रण निर्माण झाल्याचेही दिसून आले. या साऱ्या प्रकारानंतर पांडे हे हॉटेलमधून बाहेर पडले. त्याचवेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला. शिवसेनेमध्ये चुकीचा पायंडा पडत असून निष्ठावंतांना उमेदवारी नाकारली जात असल्याचा आरोप पांडे यांनी यावेळी केला.


पोलिसांकडून धरपकड

शिवसेनेच्या दोन गटात वाद तसेच हाणामारी होत असल्याची बाब पोलिसांना कळताच मोठा पोलिस बंदोबस्त हॉटेलच्या बाहेर तैनात झाला. यावेळी पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड केली. आठ जणांना ताब्यात घेऊन त्यांनी पोलिस व्हॅनमध्ये बंदिस्त केले. याप्रसंगी पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, एसीपी राजू भुजबळ यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून अनुचित प्रकार घडू दिला नाही.


बोरस्तेंचा तातडीने खुलासा

बाचाबाची आणि मारहाणीचा प्रकार घडल्यानंतर बोरस्ते यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन झाल्या प्रकाराचा खुलासा केला. आमच्यात केवळ बाचाबाची झाल्याचे त्यांनी कबूल केले. तसेच शिवसेना पक्षप्रमुखांसमक्ष चुंभळे कुटुंबियांचा प्रवेश झाल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. खासदार, आमदार, संपर्क प्रमुख आणि पक्षाच्या पॅनलने उमेदवारी निश्चित केली असून, पैसे घेतल्याचा आरोपही सपशेल खोटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पांडे यांच्या पक्षनिष्ठेविषयी मी अधिक न बोललेले बरे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. याप्रसंगी नगरसेवक विनायक खैरे हे यावेळी उपस्थित होते.


शिवसेनेमध्ये शिस्त अधिक महत्त्वाची आहे. एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींना तिकीट देऊन सामान्य कार्यकर्त्यांना कसे डावलता येईल? पांडे यांनी केलेले आरोप निराधार आहेत. पुत्रप्रेमापोटी त्यांनी विविध आरोप केले असले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही.

- अजय बोरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना


गेल्या ३८ वर्षांपासून मी शिवसेनेत आहे. तरीही माझ्या मुलाला उमेदवारी नाकारण्यात आली. चुंभळे कुटुंबियांकडून २५ लाख रुपये घेऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्यात आली आहे. अजय बोरस्ते आणि विजय करंजकर यांच्या कारभारामुळे शिवसेनेला मोठा फटका बसत आहे.

- विनायक पांडे, माजी महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुमखुमी!

0
0

खुमखुमी!

कुठल्याच बाबतीत मागं नसल्याचं नाशिकनं पुन्हा एकदा दाखवून दिलं होतं... ऐतिहासिक आणि धार्मिकतेबरोबरच राजकीय हाणामाऱ्यांचं शहर हे नवं बिरुद चिकटलं होतं... शहराच्या नसानसांत पॉलिटिक्स भिनलं असल्याचं सिद्ध झालं होतं... तिकिटासाठी प्रत्येक जण वाट्टेल त्या थराला गेला होता... शिव्यांची लाखोली, राडेबाजी, धक्काबुक्की, रेटारेटी, आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक असं सारं एकाच वेळी दिसून आलं होतं...

प्रत्येकालाच खुमखुमी असल्याचं दिसून आलं होतं... कार्यकर्त्यांना पुढं करून पेटवलं जात होतं... कुणाला स्वतःसाठी, कुणाला पत्नीसाठी, मुलासाठी, तर अजून कुणासाठी काहीतरी हवंच होतं... मला नाहीतर त्यालापण नाही, त्याला दिलं तर मलाही हवंच, या न्यायानं कुठं कुणाचं डोकं फुटलं होतं, तर कुणाचा डोळा... कुठं एबी फॉर्म पळवला गेला, तर कुठे तो फाडून टाकण्यात आला... सत्तेच्या हव्यासापोटी कपड्यांबरोबरच माणुसकीही टराटरा फाडून टाकण्यात आली होती...

तत्त्व, निष्ठा, विचार एका मिनिटांत बदले होते... अखेरच्या काही मिनिटांत इकडचा माणूस तिकडे झाला होता... एक झेंडा पायदळी तुडवत दुसरा खांद्यावर घेण्यात आला होता... संक्रांतीला पंतगोत्सवात दिसणार नाही अशी काटाकाटी शहरानं एका दिवसात अनुभवली होती... अर्थात, इथं नायलॉनचा मांजा नसला तरी खोलवर घाव अनेकांना काही तासांत मिळाले होते… किंवा त्यांनी ते इतरांना दिले होते... ज्यांना घाव मिळाले नाहीत, त्यांना ते कधी आणि कसे द्यायचे याची पक्की शिकवणही मिळाली होती... पुढच्या वेळची पायाभरणी इथंच तर झाली होती...

संक्रांतीला महिना उलटल्यानंतरही अनेकांवर खरीखुरी संक्रात आली होती... तिकिटं फायनल झाल्यानं आता इथून पुढं इलेक्शनचा रंगमंच आणखी पुढं सरकणार होता... या नाट्याचा पहिला प्रयोग शुक्रवारी खऱ्या अर्थानं शहरवासीयांनी पाहिला होता... सच्चा कलाकार या राजकीय रंगमचावरून केव्हाच हद्दपार केला गेला होता... आणखी २० दिवसांत बरेच प्रयोग बघायला मिळणार होते...

-संपत थेटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड प्रभागात उमेदवारांची दमछाक

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक मनपाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नाशिकरोड प्रभागातून एकूण ३१८ उमेदवारांनी ५०३ उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना-भाजपसह इतर पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची एबीफॉर्ममुळे दमछाक झाली.

नाशिकरोड प्रभागातील एकूण सहा प्रभागांतील २३ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयात इच्छुकांनी कार्यकर्त्यांसह गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज सादर करणाऱ्यांमध्ये नवख्यांची मोठी संख्या आहे. प्रभाग २१ डमधून शेख गुलाम गौस बाबुलाल यांच्या उमेदवारीच्या रुपाने एमआयएम या पक्षानेही प्रथमच नाशिकरोड प्रभागात एंट्री केली.

शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना एबी फॉर्मची मोठी प्रतीक्षा करावी लागली. उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत दुपारी ३ वाजेपर्यंतच होती. परंतु, प्रभाग २० अ मधून अनिल बहोत (काँग्रेस), संजय अढांगळे (राष्ट्रवादी) व प्रभाग २२ अ मधून गुंफाबाई भदरंगे (आरपीआय) या तीन उमेदवारांना आपले एबी फॉर्म मुदतीत सादर करता आले नाही. त्यांचे अर्ज स्वीकारले गेले असले तरी त्यांच्यावर मुदतीनंतर आलेले अर्ज असा शेरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मारला असल्याने या उमेदवारांना अपक्ष उमेदवारी करावी लागणार आहे. परिणामी या प्रभागांतून संबंधित पक्षांचे पॅनलही कोलमडले आहे. पूर्वाश्रमीचे मनसेचे नगरसेवक अशोक सातभाई व राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अॅड. सुनील बोराडे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेची उमेदवारी दाखल केली. परंतु, या दोघाही उमेदवारांनी पक्षाचा एबी फॉर्म सादर केल्याने या दोघांपैकी कुणाची उमेद्वारी अधिकृत समजायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचा प्रस्थापितांना ‘दे धक्का’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सैराट उमेदवारी वाटप केल्याने त्याचा फटका अनेक प्रस्थापितांना बसला आहे. भाजपने विद्यमान दोन नगरसेवकांसह दोन आयात नगरसेवकांना उमेदवारी नाकारली आहे. भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार, कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गोपाळ पाटील, तसेच आमदार सीमा हिरे यांची कन्या रश्मी हिरे यांच्या उमेदवारीचा पत्ता कट केला आहे. विद्यमान नगरसेविका सविता दलवाणी यांनाही उमेदवारी नाकारली आहे.

पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख असलेल्या भाजपने उमेदवारी देताना मोठ्या प्रमाणात निष्ठावंतांना डावलले. अनेक प्रस्थापितांनाही दणका देत घरचा रस्ता दाखवला. भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांची उमेदवारी कापण्यात आली आहे. कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गोपाळ पाटील यांचाही पत्ता कट केला, तर विद्यमान नगरसेवक सविता दलवाणी, परशुराम वाघेरे यांना तिकीट नाकारले. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या नगरसेविका लता दिनकर पाटील व मनसेतून आलेल्या सुनीता मोटकरी यांनाही तिकीट नाकारले आहे. तसेच आमदार सीमा हिरे यांच्या कन्या रश्मी हिरे यांचाही पत्ता कापून कात्रजचा घाट दाखवला आहे.

गिते, सानप, हिरेंची चलती

भाजपच्या यादीत माजी आमदार वसंत गिते, बाळासाहेब सानप, अपूर्व हिरे या तिघांच्या समर्थकांनाच उमेदवारी वाटपात झुकते माप देण्यात आले आहे. त्यामुळे गिते, सानप हिरे या तिकडीची भाजपाच चलती असल्याचा संदेश गेला आहे. सिडको व सातपूरमध्ये अपूर्व हिरेंच्या समर्थकांना अधिक तिकिटे देण्यात आली आहेत. मध्य नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे यांना डावलून थेट वसंत गितेंचा शब्द अंतिम मानण्यात आला आहे. गिते समर्थकांना तर नाशिकरोड, सिडको, मध्य नाशिकमध्ये उमेदवारी देण्यात आली आहे. सानप यांनाही झुकते माप दिले आहे.

भाजपकडून चार गुंड पावन

भाजपने एकीकडे निष्ठावंतांना डावलले असताना दोन गुन्हेगारांना थेट, तर दोघांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देऊन त्यांना पावन केले आहे. प्रभाग 28 मधून याग्निक शिंदे, प्रभाग ४ मधून हेमंत शेट्टी यांना, तर रम्मी राजपूत यांची बहीण सीमा राजपूत यांना उमेदवारी दिली आहे. तसेच पप्पू (धनंजय) माने यांच्या पत्नी प्रियंका माने यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपनेही गुन्हेगारांना आपले केल्याने इतरांपेक्षा वेगळे असल्याची भाजपची ओळख आता पुसली गेली आहे.

संघटनमंत्र्यांनी आमदाराला कोंडले!

भाजपकडून प्रभाग १४ मधून अलका मंडलिक यांना उमेदवारी हवी होती. पंरतु, त्यांच्याऐवजी हिना इनामदार यांना उमेदवारी देण्यात आल्याने त्यांनी थेट भाजपच्या कार्यालयात गोंधळ घातला. एबीफॉर्म वाटप खोलीत प्रवेश करीत संघटनमंत्री काळकर यांनाच जाब विचारला. त्यांनी जवळपास तारभर गोंधळ घातल्याने काळकर संतापले. त्यामुळे त्यांनी मंडलिक यांना आवर घालण्याची गळ आमदार देवयानी फरांदे यांना घातली. मंडलिक या आमदार फरांदे यांचेही ऐकत नसल्याने काळकर अधिक संतप्त झाले. त्यांनी मंडलिक यांना बाहेर काढत शेजारच्या रुममध्ये कोंडले. सोबतच आमदार फरांदे यांना शांत करण्याचे आदेश देत त्यांनाही या रुममध्ये कोंडून ठेवले. तरीही मंडलिक कोणाचेच ऐकत नसल्याने सर्वांनीच हात टेकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images