Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

येवल्यात वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

राज्य महामार्गावर दररोजच दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब लागणाऱ्या रांगा, क्षणोक्षणी खोळंबणारी वाहतूक अन् या सर्व मोठ्या वाहतूक कोंडीतून सर्वांनाच मार्ग काढताना करावी लागणारी तारेवरची कसरत हे येवल्यातील चित्र कधी बदलणार, असा सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

येवला शहरातून जाणारा मनमाड-नगर राज्य महामार्ग अन् त्यावर दिवसातील बऱ्याचदा होणारी वाहतूक कोंडी आता डोकेदुखीचा विषय बनला आहे. त्यातही नगर-मनमाड आणि नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गांचा शहरातील विंचूर चौफुलीजवळ असलेला संगम लक्षात घेता या महामार्गावरून धावणारी शेकडो वाहने, त्यातून होणारा वाहतुकीचा मोठा खोळंबा चिंतेचा विषय बनला आहे.

पोलिस यंत्रणेने गांभीर्याने लक्ष द्यावे

नगर-मनमाड राज्य महामार्गावरील येवल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोजच कांदा, मका लिलावासाठी येणारे हजारो ट्रॅक्टर्स रस्त्यावर आडवेतिडवे आवागमन करताना महामार्गावरील अवजड वाहनांसह मार्गक्रमण करणाऱ्या अनेक वाहनांना बसणारा ‘ब्रेक’ यातून निर्माण होणारी वाहतुकीची कोंडी मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा निर्माण करतात. दररोजच समोर येणाऱ्या या वाहतुकीच्या महाकोंडीवर मार्ग काढून कोंडी दूर करण्यासाठी येवला शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने प्रभावी प्रयत्न होताना दिसत नाहीत.

शहर पोलिसांचा येवल्यातील विंचूर चौफुलीवर वाहतूक नियंत्रण कक्ष असून त्यात चार वाहतूक पोलिस तैनात केलेले आहेत. मात्र, त्यातील किती पोलिस सातत्याने निर्माण होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुढे सरसावतात? हा मोठा विषय आहे. आता पोलिस यंत्रणेने या वाहतूक कोंडीकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे. येवला शहरात भेडसावणारा हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी वाहतूक पोलिसांसह संबंधित यंत्रणांनी तात्काळ पावले उचलण्याची नितांत गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षण परिवर्तन घडवणारी शिदोरी

$
0
0

पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शिक्षण ही आयुष्यात परिवर्तन घडवणारी शिदोरी आहे. दहावी बारावीचे वर्ष हे आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष असते. याच वयात काही करून दाखवण्याची जिद्द मनाशी बाळगा. विद्यालयातून निरोप नव्हे तर जिद्दीचे रोपटे घेवून जा आणि भविष्यात यशस्वी होवून त्याचा वटवृक्ष करा, असे प्रतिपादन येथील पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी केले.

येथील वर्धमान शिक्षण संस्थेच्या श्री र. वी. शाह विद्यालयात इयत्ता १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शरद पटनी हे होते. प्रताप शाह, गौतम रमेश शाह, गौतम शाह, प्राचार्य संजय बेलन, मुख्याध्यापक नितीन ठाकरे, पर्यवेक्षक के. पी. मुसळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते .

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत विद्यालयातील शिक्षकांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. संगीत शिक्षक मंदार जोशी व विद्यर्थिनी स्वागतगीत सादर केले तर वैदेही दायमा व वैष्णवी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व्ही. एन. कासार यांनी करून दिला तर आर. एल. फडके यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात प्रतिष्ठेची चौरंगी लढत

$
0
0

संदीप देशपांडे, मनमाड

नांदगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यातील साकोरा गट व गटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा गट सर्वसाधारण राखीव असल्याने चुरस वाढली आहे. तर साकोरा गण इतर मागासवर्गीय महिला राखीव असल्याने या गणात ही अटीतटीची लढत अपेक्षित आहे.

साकोरा जिल्हा परिषद गट हा राष्ट्रवादी काँग्रेस चा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या निवडणुकीत माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या तालुक्यातील वर्चस्वामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आपला वरचष्मा तालुक्यात सिद्ध केला होता. या गटात गेल्या निवडणुकीत आमदार पंकज भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक महेंद्र बोरसे यांच्या पत्नी माधुरी बोरसे यांनी विजयश्री मिळवली होती. मात्र यंदा साकोरा गटात राष्ट्रवादीने तरुण अभियंता अमित पाटील या नव्या चेहऱ्यावर विश्वास टाकला आहे. नाराज महेंद्र बोरसे यांनी स्वतः या गटातून अपक्ष उमेदवारी जाहीर करून बंडाचे संकेत दिले आहेत. नांदगाव तालुक्यात या गटातील राष्ट्रवादीची सत्ता उलथून टाकण्यासाठी शिवसेनेने फिल्डिंग लावली असून माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने साकोरा गटात दिलीप पगार यांना तिकीट दिले आहे. भाजपच्या एन्ट्रीने साकोरा गटात आता चौरंगी लढत अटळ मानली जात आहे.

खरे चित्र माघारीनंतर स्पष्ट होणार आहे. परिवर्तन हाच अजेंडा घेऊन भाजप व सेना राष्ट्रवादी विरोधात उभे ठाकले आहेत. तीस हजार बावीस मतदार असलेला हा गट प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाला विजयी करतो याचा अंदाज वर्तवणे अशक्य आहे.


गणातही चुरस

साकोरा गणात प्रमुख राजकीय पक्षांसह राष्ट्रवादीने तिकीट कापलेल्या माधुरी बोरसे या अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या सुंदराबाई खैरनार तर शिवसेनेच्या सुमन निकम व भाजपच्या ज्योती म्हस्के निवडणूक लढवत आहेत. गटाबरोबरच गणाची निवडणूकही चौरंगी व चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. पक्ष परिवर्तनाचा मुद्दा विकास कामे व नाते संबंध या गोष्टी या गटात प्रामुख्याने कळीचा मुद्दा ठरतील असे दिसते. वेहेळगाव गणात सेनेचे सुभाष कुटे भाजपच्या विजया भाबड व राष्ट्रवादीच्या नम्रता पगार यांच्यात तिरंगी सामना रंगणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निवडून येण्याची क्षमता’ हाच निकष

$
0
0

शैक्षणिक पात्रता व वय दुय्यम; केवळ १० पदव्युत्तर

तुषार देसले, मालेगाव

राजकारणात वय, शिक्षण यापेक्षाही पक्षांकडून निवडून येण्याची क्षमता हाच उमेदवारी देण्याचा ‘अर्थ’पूर्ण निकष झाला आहे. असे असले तरी मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि वय काय, असा प्रश्न या सुशिक्षित व तरुण मतदारांच्या मनात येत आहे. उमेदवारी देताना ज्येष्ठांना पहिली पसंती सर्वच पक्षांनी दिली आहे.

तालुक्यातून गट आणि गणासाठी एकूण १६० उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यातील केवळ १० उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तर १६ उमेदवार हे पदवीधर आहेत. बाकी सर्वच उमेदवार जेमतेम १० वी १२ वी उत्तीर्ण झालेलेच आहेत. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जासोबत शैक्षणिक पात्रता नमूद केलेली असते त्यावरून ही माहितीसमोर आली आहे. जिल्हा व तालुक्याचा कारभार पाहण्यासाठी ‘आम्हालाच निवडून द्या’ म्हणून मतदारांना गळ घालणाऱ्या उमेदवारांना तरुण मतदारांनी तुमची इयत्ता कोणती? असा प्रश्न केल्यास नवल वाटायला नको.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची धामधूम तालुक्यात सुरू आहे. इच्छुकांची संख्या वाढल्याने एका गट गणातून ९ ते १० उमेदवार रिंगणात आहेत. मात्र त्यांची शैक्षणिक पात्रता पाहता तालुक्यातील सुशिक्षित तरुण मतदारांना यांना कसे निवडणूक द्यायचे, असा प्रश्न पडला आहे.

गटासाठी उमेदवारी करीत असलेल्यांमध्ये केवळ ३ उमेदवार पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. यात कळवाडी गटातील सेनेच्या अंजली कांदे, अपक्ष उमेदवार ज्योती देसले तर रावळगाव गटातील रिपाईचे प्रशांत गरुड यांचा समावेश आहे. पदवीधारक उमेदवार ५ असून यात भाजप, सेनेचे एक-एक तर ३ अपक्ष उमेदवार आहेत. गणातदेखील अशीच परिस्थिती आहे, पदव्युत्तर शिक्षण घेतले एकूण ७ उमेदवार असून यात भाजप राष्ट्रवादीचे २-२, तर सेना काँग्रेस अपक्षांचा एक-एक उमेदवार आहेत. पदवीधारक असलेले एकूण ११ उमेदवार असून यात सर्वाधिक ६ अपक्ष, भाजप ३, सेना २ असे आहेत. गट गणातून जेमतेम दहावी बारावी झालेल्या उमेदवारांची संख्या ५१ इतकी आहे. विशेष म्हणजे शाळेची वाटच न धरलेलेदेखील १२ उमेदवार रिंगणात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूनबाईच खऱ्या वारसदार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

तालुक्यात राजकरणांच्या पिढीत सूनबाईच खऱ्या वारसदार ठरल्या आहेत, असे चित्र सध्या दिसून येत आहे. त्र्यंबक तालुक्यात अंजनेरी गट व गण आणि देवगाव गण या तिन्ही जागा महिला आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला होता मात्र आपण नाही तर आपली सूनबाई हा मार्ग राजकारण्यांनी निवडला आहे.

राजकारण्यांनी आपल्यानंतर थेट तिसऱ्या पिढीला राजकारणात आणताना सूनबाईंना उमेदवारी देऊन एक पाऊल पुढे टाकले आहे. एका अर्थाने आरक्षणातून महिला सबलीकरणाचा प्रयोग यशस्वी होत आहे, असे म्हणावे लागेल. माजी जिल्हा परिषद सदस्य कमळू कडाळी यांच्या सूनबाई सविता कडाळी शिवसेनेच्या तिकिटावर तर ज्येष्ठ नेते पांडुरंग झोले यांच्या सूनबाई अलका झोले भाजपच्या चिन्हावर लढत देत आहेत. माजी सभापती देवराम भस्मा यांच्या सूनबाई मनाबाई भस्मा अंजनेरी गणात शिवसेनेची उमेदवारी करत आहेत. दिवंगत आमदार भाऊ सकु वाघ यांच्या सूनबाई हिराबाई शंकर वाघ या देवगाव गणात राष्ट्रवादीची उमेदवारी करत आहेत.

यापूर्वी २००७ च्या निवडणुकीत त्यांनी माजी आमदार दिवंगत शंकरराव झोले यांच्या सूनबाई माजी सभापती शोभा झोले यांच्याविरोधात लढत दिली होती. शोभा झोले यांनी यावेळेसदेखील अंजनेरी गटासाठी उमेदवारी अर्ज दिला आहे. तथापि, त्यांच्या सूनबाई अलका भाजपच्या अधिकृत उमेदवार असल्याने येथे सासूबाईंची माघार होणार आहे. अंजनेरी गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार छाया बदादे पेगलावाडीचे राजकारणात सक्रिय असलेले बाळू बदादे यांच्या सूनबाई आहेत. तर काँग्रेसच्या उमेदवार शकुंतला डगळे सरपंच डगळेबाबांच्या सूनबाई आहेत.

राजकारण्यांच्या या हुशारीच्या खेळीने त्यांची तिसरी पिढी आता सक्रिय झाल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. त्यातही महिला आरक्षणाने सूनबाईंना प्राधान्य मिळते आहे. एकुणच ‘शाब्बास… सूनबाई’ म्हणत यापुढे राजकीय वारसा जोपासला जाणार आहे.

हरसूल गटातही सूनबाईच

हरसूल पेठ भागात पूर्वापार राजकीय दबदबा असलेल्या दिवंगत काळुपाटील माळेकर यांच्या सूनबाई रूपांजली माळेकर यांना राष्ट्रवादीने हरसूल गटात पुरस्कृत केले आहे. राष्ट्रवादीचे विनायक माळेकर यांचा अर्ज ठेकेदारीच्या मुद्द्यांवर काँग्रेसचे उमेदवार देविदास जाधव यांनी हरकत घेतल्याने बाद ठरला व महिला आरक्षण नसतानाही आणखी एक सूनबाई पुढे सरसावल्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या या पुरस्कृत उमेदवारासाठी काही उमेदवारांनी एक पाऊल मागे सरकण्याची शक्यता असल्याची चर्चा असून अपक्षाची ही लढत राष्ट्रवादी प्रतिष्ठा पणाला लाऊन लढणार असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लॅटमध्ये दारूचा साठा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खास निवडणुकीसाठी अवैध पद्धतीने मद्य तयार करून मोठा स्टॉक करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला शहर पोलिसांनी जेरबंद केले. मद्य व एक चारचाकी वाहन असा तब्बल १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे वाघाडी परिसरात गावठी दारू तयार करणारी ही टोळी या वेळी एका फ्लॅटमध्ये उद्योग करताना सापडली.

मोसीन माजीद खान पठाण (वय ३०), संजय बळी उर्फ कांबळे, बाळू पाटील, तेजस गायकवाड, माधव शेळके, शाहरूख सईद पठाण, सईद दाउद पठाण अशी संशयितांची नावे आहेत. यापैकी मोसीन पठाण, शाहरूख पठाण, सईद पठाण या तिघांना ताब्यात घेतले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका ठिकाणी अवैध मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, तसेच मुंबई नाका पोलिसांच्या पथकाने शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास तिडके कॉलनीतील सिबल फर्निचरजवळील सुयश अपार्टमेंटमधील फ्लॅटवर छापा टाकला. येथे दिव- दमण येथून आणलेला तब्बल अडीच ते तीन लाख रुपये किमतीचा मद्यसाठा आढळून आला. कर चुकवून आणलेल्या मद्याच्या बाटल्या फोडून मद्य बादलीसारख्या भांड्यात टाकायचे. त्यानंतर काही रसायन मिक्स करून पुन्हा नव्याने दुसऱ्या बाटल्यांमध्ये भरायचे, असा उद्योग येथे सुरू असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी सर्व मद्यसाठा, तसेच एक चारचाकी वाहन जप्त केले आहे.

याबाबत पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले, की हा उद्योग केव्हापासून सुरू आहे हे आता सांगता येणार नाही. मात्र, संशयित हा सर्व खटाटोप निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून करीत असल्याचे समोर आले आहे. निवडणुकीदरम्यान ड्राय डेच्या दिवशी किंवा इतर वेळी कार्यकर्त्यांना स्वस्तात मद्य पुरवता यावे, या दृष्टीने मोठा स्टॉक केला जात होता. मात्र, याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी कारवाई केली.

बाळू पाटीलचा सहभाग

पंचवटीतील वाघाडी परिसरात अवैध धंद्यांचे साम्राज्य निर्माण करणारा संशयित आरोपी बाळू पाटीलच्या एका अड्ड्यावर काही दिवसांपूर्वी पोलिसांनी छापा टाकला होता. तेथे मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले. मात्र, बाळू पाटील तेव्हा फरार झाला होता. या गुन्ह्यातदेखील बाळू पाटीलचे नाव पुढे आले असून, हा मद्यसाठा काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी तयार करण्यात येत होता का, याचा तपास पोलिसांनी करण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय भत्त्यावरून काम बंद आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिका कर्मचाऱ्यांना बाराशे रुपये वैद्यकीय भत्ता देण्याचे धुळ्याच्या आयुक्तांनी मान्य केले होते. मात्र आता एक हजार रुपये देण्यात येणार आहेत. प्रशासनाने आश्वासन काय दिले होते व प्रत्यक्षात मात्र काय देत आहे, यावरून संतप्त मनपा कर्मचारी संघटनेने सोमवारी (दि. १३) पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या काम बंद आंदोलनामुळे सोमवारी, दिवसभर मनपातील सर्व कामकाज ठप्प झाले होते.

मनपा कर्मचारी संघटनेने शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन महापालिकेला कराच्या माध्यमातून पंधरा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे सांगितले. त्यातून मनपा कर्मचाऱ्यांना पाचवा, सहावा वेतन आयोग, वैद्यकीय भत्ता आणि फरकाची रक्कम देण्यासाठी साडेचार कोटी रुपये देणार असल्याचे आयुक्तांनी मान्य केले होते. त्याप्रमाणे फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना मिळणेही सुरू झाले आहे. मात्र, वैद्यकीय भत्ता बाराशे रुपयांऐवजी एक हजार रुपये देऊन दोनशे रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्याला कर्मचारी संघटनेने विरोध केला काम बंद आंदोलनाचा इशाराला दिला.

या आंदोलनावर मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी कर्मचारी समन्वय समितीला पत्र देऊन कर्मचाऱ्यांना वेतन फरकातील तीस हजार रुपये देण्याचे आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांना दरवाढ लागू करण्याबाबत कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले होते. कर्मचाऱ्यांनी सोमवारी, काम बंद आंदोलन करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असे पत्रही देण्यात आले होते. तरीदेखील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेऊन मनपाचे कामकाज ठप्प केले. सोमवारी, सायंकाळी उशिरापर्यंत कामकाज ठप्प होते. अखेर याबाबत मनपाचा काय निर्णय होतो याकडे कर्मचारी संघटनेचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळाडूंसाठी सरकारचे धोरण योग्य नाही

$
0
0

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांची खंत

म. टा. वृत्तसेवा, धुळे

खेळाडू आणि खेळ या विषयीचे राज्य सरकारचे धोरण योग्य नसून त्याचा फटका मलासुद्धा बसला आहे. तसेच मी गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय आश्रमशाळेत क्रीडा शिक्षकांची नेमणूक करावी, या मागणीसाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहे. मात्र, त्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची प्रतिक्रिया धावपटू कविता राऊत यांनी दिली. नंदुरबार येथे आयोजित क्रीडा प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी ही खंत व्यक्त केली.

राज्य सरकारचे खेळाडू विषयीचे धोरण हे बोटचेपीचे आहे. त्याचा अनुभव मला स्वतःला आला आहे. सरकारने नोकरी देताना मला तिसऱ्या वर्गात नोकरी दिली आहे. ही गोष्ट कोणत्याही खेळाडूसाठी योग्य नाही. सरकारचे खेळाडूच्या संदर्भातील धोरण उदासीन असल्याचेही राऊत यांनी सांगितले. आदिवासी भागातील डोंगरदऱ्यात अनेक चांगले खेळाडू आहेत.

सरकारच्या दुर्लक्षानेच आदिवासी विद्यार्थी मागे

आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या अनेक शासकीय आश्रमशाळांमध्ये क्रीडा शिक्षक नाही. त्यामुळे त्यांना योग्य प्रशिक्षण मिळत नाही, क्रीडा प्रकारातही ते पुढे येत नाहीत. विविध खेळांच्या प्रशिक्षणापासून वंचित राहिल्याने अखेर जेमतेम दहावी, बारावीपर्यंत शिक्षण घेऊन कुठलाही कामधंदा या भागातील तरूण सुरू करतात. मात्र, जर आदिवासी विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर त्याला क्रीडा शिक्षकांकडून विविध खेळांचे प्रशिक्षण मिळाले. तर विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होऊन राज्याचा नावलैकिक होऊ शकतो. मात्र, शासनाने अद्याप याकडे लक्ष केंद्रित केले नसल्यानेच आदिवासी विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात पुढे येऊ शकत नसल्याचेही धावपटू राऊत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फीवर!

$
0
0


सकाळी दहा वाजेपर्यंत लोळत पडण्याचा बाज्याचा प्लॅन फिस्कटला होता... सकाळी-सकाळी चित्रपटांच्या चालीवर सुरू झालेल्या प्रचारगीतांनी त्याच्या झोपेचा पचका झाला... कानांवर उशी दाबूनही काही फरक पडत नव्हता... गृहमंत्री गावी केल्यानं दिवस आरामात घालविण्याच्या विचाराला सुरूंग लागला गेला... बाज्यानं अखेर अंग मोडत अंथरूण सोडलं... त्यानं घराचं दार उघडलं तशी कडीला अडकवलेली चार-सहा पत्रकं धपकन खाली पडली होती... त्यांच्यावरचे रंग पाहून बाज्याचं डोकंच गरगरायला लागलं...

सोफ्यावर पडून पत्रकं न्याहाळत असतानाच दारावर थाप पडली... चड्डी-बनियनवर असलेला बाज्यानं पटकन टॉवेल गुंडाळत दाराकडं धाव घेतली... ``भाऊ लक्ष असू द्या``, असं म्हणत एक उमेदवार थेट घरात शिरला होता... पाठोपाठ काही वर्कर दारापर्यंत आले होते... मागे दोन महिला उमेदवार पाहून बाज्याला अवघडल्यासारखं झालं... पुढच्यांना बसा म्हणत तो आत पळाला आणि कपडे घालूनच बाहेर आला... सर्व नातीगोती, मुद्दे, व्होटबँक यावर चर्चा झाली... निशाणी लक्षात राहील याचं पक्कं आश्वासन घेतल्यानंतरच मंडळींनी खुर्च्या सोडल्या... बाज्याला रात्रीच्या रंगीतसंगीत पार्टीचंही निमंत्रण मिळालं होतं... उमेदवारांची बोळवण करण्यासाठी दारावर जातो कुठे, तोच याड लागलंय, याड चागलंय या गाण्याच्या चालीवरील प्रचाररथ येऊन ठेपला होता... शांताबाईचं नव्या स्वरूपातलं गाणं बाज्यानं कालच ऐकलं होतं... आता वेळ सैराटची होती... दिवसभरात कानांना आणखी काय काय सोसावं लागेल या विचारनं बाज्याच्या अंगावर काटा आला होता... कानाचा पडदा फाटतो की काय, असंही त्याला वाटून गेलं होतं...

बाज्याचं घर चौकातच असल्यानं पुढच्या बाजूनंही दोन रथ येऊन ठेपले होते... कुणाचंच धड काही ऐकू येत नव्हतं... गल्लीतली लहान पोरं मात्र ठुमके लावत होती... रथांमागं पळत होती... दारात पत्रकांचा खच, रस्तोरस्ती वाजणारे भोंगे, चित्रपटांच्या चालीवरची प्रचारगीते, उमेदवार

-वर्कर मंडळींचा आरडाओरडा यामुळे नुसताच कलकलाट झाला होता... यंदा इलेक्शनमध्ये रंगत दिसत नाही, असं गेल्याच आठवड्यात कुणी तरी बोलल्याचं बाज्याला आठवलं होतं... कदाचित या गजबजाटालाच त्याला रंगत म्हणायचं असेल असं बाज्याला मनोमन वाटलं होतं... शहराला इलेक्शन फिवर पुरता चढला होता... आता हा गजबजाट कधी एकदाचा थांबतो आणि त्यामुळं खराखुरा फिव्हर चढू नये ऐवढीच प्रार्थना बाज्यासह सारेच करीत होते...

- संपत थेटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅरिकेडिंगने रोखला रस्ता!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शहरातील बिटको चौकातील नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोरील उड्डाणपुलाखालील वळणरस्ता गेल्या काही महिन्यांपासून बॅरिकेडिंग लावून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा फेरा मारून या परिसरातून ये-जा करावी लागत असल्याने गैरसोय होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

नाशिकरोड रेल्वे स्टेशन, सिन्नर फाटा या बाजूकडून नाशिकरोड पोलिस ठाण्याकडे जाण्यासाठी पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोरच उड्डाणपुलाखाली वळणरस्ता आहे. हा रस्ता गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षेच्या कारणाखाली पोलिसांचे बॅरिकेडिंग लावून विनाकारण बंद करण्यात आला आहे. परिणामी बिटको चौक, जेलरोडकडून राजेंद्र कॉलनीकडे व शिवाजी पुतळा चौकाकडून नाशिकरोड पोलिस ठाण्याकडे येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. सिन्नर फाटा व रेल्वे स्टेशनकडून नाशिकरोड पोलिस ठाण्याकडे येणाऱ्या नागरिकांना थेट बिटको चौकातून माघारी यावे लागत आहे. जेलरोड व बिटको चौकाकडून राजेंद्र कॉलनीकडे येणाऱ्या नागरिकांना शिवाजी पुतळा अथवा विभागीय महसूल आयुक्तालयाकडे जाणाऱ्या रस्त्याने वळसा घालून यावे लागत आहे. या फेऱ्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.

वाहतूक पोलिस अनभिज्ञ

नाशिकरोड पोलिस ठाण्यासमोरील उड्डाणपुलाखालील रस्ता बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आल्याबाबत वाहतूक पोलिस मात्र अनभिज्ञच आहेत. हा रस्ता बंद करण्याचे कारण वाहतूक पोलिसांना माहिती नसल्याचे स्थानिक वाहतूक पोलिसांनी सांगितले.

अनधिकृत पार्किंगवर मेहेरबानी का?

उड्डाणपुलाखालील दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर दररोज शेकडो वाहने अनधिकृतरीत्या पार्क केलेली असतात. या मार्गाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह सर्वच पोलिस कर्मचारी ये-जा करतात. मात्र, असे असूनही या अनधिकृत पार्क केलेल्या वाहनांकडे पोलिस डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे या ठिकाणी दररोज सकाळी व सायंकाळी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

पोलिसांना आयती ‘शिकार’

पोलिस ठाण्यासमोरील रस्ता बॅरिकेडिंग लावून बंद करण्यात आलेला असल्याने पोलिस ठाणे व आशानगरच्या दिशेने येणारे काही वाहनचालक विभागीय आयुक्तालयाकडे जाणाऱ्या रस्त्यानेच वळण घेऊन उलट बाजूने येतात. अशा वाहनचालकांना पोलिस ठाण्याच्या जवळपास उभे असलेले वाहतूक पोलिस पकडतात व राँग साइडने आल्याबद्दल दंडात्मक कारवाई करतात. या प्रकारामुळे वाहनचालक वैतागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आय लव्ह नाशिक’ची साद

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

व्हॅलेंटाइन डेनिमित्त मंगळवारी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर राबविण्यात येणाऱ्या आय लव्ह नाशिक या उपक्रमात नाशिकचे अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. रेल्वे स्टेशनवर अनेक ग्राफिटी रंगविण्यात येत असून, नाशिकरोडहून शहरात येणाऱ्या प्रवाशांसाठी हा नयनरम्य नजारा असणार आहे.

व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर प्रेमाचा केवळ प्रियकर-प्रेयसी इतकाच मर्यादित अर्थ न राहता आपण आपल्या शहरावर तितकेच दाट प्रेम करू शकतो, हा संदेश देण्यासाठी हॅण्ड फाउंडेशनतर्फे आय लव्ह नाशिक या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

समर्पक विषयांची निवड

रेल्वे स्टेशनवरच्या भिंती विविध ग्राफिटींनी रंगविण्यात येणार असून, त्यासाठी मोठ्या भिंतींची निवड करण्यात आली आहे. ग्राफिटीचे विषयही निवडण्यात आले आहेत. स्वच्छ भारत, स्वच्छ स्टेशन, नॅचरल हेरिटेज ऑफ नाशिक, नाशिकचे खरे हीरो, बालकामगारांबाबतची जागरूकता, सांस्कृतिक नाशिक, जवानांना अभिवादन, नाशिकची शक्तिस्थळे, स्त्रियांची सुरक्षितता, मुलगी वाचवा अशा विविध विषयांची निवड करण्यात आली असून, नाशिकच्या कलाकारांनी रेल्वे स्टेशनवर येऊन ग्राफिटी रंगवायची आहे.

नाशिकची स्ट्रेन्थ केंद्रस्थानी

व्हॅलेंटाइन्सच्या नावाने युवापिढी आपली भारतीय संस्कृतीला विसरून पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब करताना दिसते. या पार्श्वभूमीवर या दिवशी हॅण्ड (हेल्प, आर्ट, नॉलेज, ड्रीम) फाउंडेशनच्या वतीने नाशिकरोड रेल्वे स्टेशनला अधिक स्वच्छ करण्यासाठी आणि प्रवाशांना चित्रांद्वारे नाशिकचे महत्त्व समजावे, सामाजिक समस्यांबाबत प्रबोधन व्हावे, तसेच नागरिकांच्या कर्तव्याची माहिती होण्यासाठी स्थानकातील प्लॅटफॉर्म, भिंती आणि मोकळ्या जागांवर चित्रे काढण्यात येणार आहेत. रेल्वे स्टेशनवरून पर्यटक नाशिकमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे येथूनच त्यांना नाशिकची स्ट्रेन्थ समजली पाहिजे, असा या उपक्रमाचा हेतू आहे.

यांचा राहणार सहभाग

या उपक्रमात नाशिक शहरातील इंटेरिअर डिझायनर्सने यासाठी पुढाकार घेतला असून, त्याबाबत रेल्वे प्रशासनाची खास मान्यतादेखील घेतली आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकात कलाकुसर करण्यासाठी चित्रकला महाविद्यालय, के. के. वाघ ललित कला महाविद्यालय, केटीएचएम कॉलेज, मविप्र आर्किटेक्चर कॉलेजसह कैलास परदेशी, योगेश वालाडे हे चित्रकार सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीने सोडला अभोणा गट

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कळवण

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अभोणा गटात होणाऱ्या लक्षवेधी लढतीची हवा निघून गेली आहे. जिल्हा परिषद माजी अध्यक्षा जयश्री पवार यांच्यासह अभोणा गट व अभोणा, नरुळ गणातून राष्ट्रवादीच्या उमेदवारांनीच माघार घेतल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीत व्यक्तीकेंद्रीत आघाडी झाल्याचे समजते.

अभोणा गटात यशवंत गवळींमुळे पवार परिवाराने समोरासमोर लढा देण्याचा प्रयत्न सफशेल फोल ठरला. गवळी व पवार यांच्यात आगामी विधानसभेची अविरोधी ‘कमिटमेंट’ झाल्याचे एकीकडे बोलले जात आहे. यानिमित्ताने गवळी पुन्हा काँग्रेसकडून आपल्या हक्काच्या अभोणा गटात निवडून येण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर कनाशी गटातून माजी आमदार व मंत्री पुत्र नितीन पवार, विद्यमान खासदारपुत्र समीर चव्हाण, प. स. चे माजी सभापती काशिनाथ गायकवाड यांच्यात तिरंगी होणारी लढत होणार आहे. खर्डेदिगर गटात जयश्री पवार व मानूर गटात डॉ. भारती पवार उभ्या आहेत.

खर्डेदिगर गट

जयश्री पवार (राष्ट्रवादी), झेलुबाई ठाकरे (भाजप), जयमाला खांडवी (अपक्ष ), लता बर्डे (माकप), मीराबाई पवार (शिवसेना), वंदना बहिरम (काँग्रेस) यांच्यात लढत आहे. या गटातून कोणीही माघार घेतली नाही.

मानूर गट

डॉ. भारती पवार (राष्ट्रवादी), हेमलता पवार (माकप) यांच्यात समोरासमोर लढत होईल. अपक्ष बेबीबाई सोनवणे यांनी माघार घेतली.

कनाशी गट

जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार(राष्ट्रवादी), समीर चव्हाण (भाजप), काशिनाथ गायकवाड (काँग्रेस), हिराजी चौधरी (माकप) यांच्यात लक्षवेधी लढत होईल. शिवसेनेकडून बाबुराव हिराजी कोल्हे यांची उमेदवारी छाननीत बाद ठरली होती.

अभोणा गट

जयश्री पवार किंवा सुभाष राऊत यांच्यापैकी एक उमेदवारी करणार होते. मात्र दोघांनी या गटातून माघार घेतल्याने होणाऱ्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. भावी राजकारणाची खेळी खेळण्यात नितीन पवार व यशवंत गवळी यांना यश लाभल्याचे चर्चा होत आहे. यशवंत गवळी (काँग्रेस), जितेंद्र ठाकरे (भाजप), विश्वनाथ थैल (माकप)यांच्यात तिरंगी लढत होईल. या गटातून इंदुबाई गवळी यांनी माघार घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये ३६ उमेदवार रिंगणात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

तालुक्यात माघारी नंतर तीन गटांसाठी १४, पंचायत समीती सहा गणांसाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत. जवळपास सर्वत्र चौरंगी लढत होणार आहे. सोमवारी एकूण १५ उमेदवारांनी माघार घेतली.

अंजनेरी गटात भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश गंगापुत्र यांची भूमिका प्रभावी ठरली. हरसूल गटात ठेकेदार विनायक माळेकर (राष्ट्रवादी) यांचा अर्ज बाद झाल्याने त्यांच्या पत्नी रुपांजली माळेकरां (अपक्ष) यांच्यासाठी इतर अपक्षांची माघार महत्त्वपूर्ण ठरली.

हरसूल गटातील विनायक माळेकर यांचा अर्ज अवैध झाल्याने यांच्या पत्नी रुपांजली अपक्ष उमेदवारी करीत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी गटातील अपक्ष उमेदवार रवींद्र हिलीम आणि इतर या अपक्षांनी माळेकर यांना पाठ‌िंबा दर्शवत माघार घेतली. या अपक्ष उमेदवारांच्या पाठिंबाने गटात अपक्ष उमेदवार माळेकर यांची ताकद वाढली आहे.

भाजपला बंडखोरीची लागण

भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत झुलवत ठेऊन उमेदवारी दिली नाही. त्यामुळे काहींनी थेट अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. यामध्ये वाघेरा गणातील मोतीराम दिवे आणि ठाणापडा गणातील ब्राह्मणे नीलम प्रल्हाद यांच्या उमेदवारीची प्रमुख चर्चा होती. चिन्ह वाटपात अपक्षांनी प्रामुख्याने नारळ व कप-बशीला पसंती दिली आहे.

अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करताना मुलवड गणातील भिवा महाले व लक्ष्मण लासू या दोघांनी कपबशी चिन्ह मागितल्याने चिठ्ठी काढून लक्ष्मण लासू यांना कपबशी हे चिन्ह देण्यात आले.
माघारीनंतर तालुक्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या प्रमुख पक्षांत सर्वच गटात चौरंगी लढती तसेच हरसूल व ठाणापाडा गणात व ठाणापडा गटात माकपचे अव्हान आहे. मनसेचे केवळ एकमेव उमेदवार मूळवड गणात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वस्तात बससेवा देऊ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेच्या १३५ शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम, विद्यार्थ्यांना टॅब आणि विद्यार्थिनींसाठी नॅपकिन मशिन्स सुरू करण्याबरोबरच मुंबईप्रमाणेच नाशकात स्वस्त दरात शहर बससेवा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिले. सिडकोतील पवननगर येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली.

मुंबई महापालिकेतील ४८० शाळांमध्ये शिवसेनेने व्हर्च्युअल क्लासरूम सुरू केले आहेत. त्याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. त्याच धर्तीवर नाशिकमध्ये शिवसेनेला एकहाती सत्ता द्या. त्यानंतर महापालिकेच्या १३५ शाळांमध्ये अशाच प्रकारे क्लासरूम उपलब्ध करुन देऊ. विद्यार्थ्यांना एज्युकेशन टॅब, विद्यार्थिनींसाठी नॅपकिन मशिन्स, विद्यार्थ्यांची वार्षिक आरोग्य तपासणी यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावर सेनेच्या २४ उमेदवारांसह खासदार हेमंत गोडसे, अभिनेते तसेच पक्षाचे सचिव आदेश बांदेकर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते आदी उपस्थित होते. शिवसेनेचे कामकाज पारदर्शी असून, आम्ही थापा मारून विकास करीत नाहीत. वचनपूर्ती करणारी शिवसेना आहे. नाशकात बससेवा सुरू करून प्रदूषण रोखले जाईल, असे त्यांनी सांगितले.

पेलिकन पार्कचा विकास

सिडकोतील १७ एकर जागेवरील पेलिकन पार्क समस्याग्रस्त झाले आहे. सेनेची सत्ता आल्यानंतर तेथे अत्याधुनिक क्रीडांगण, बगिचे आणि पार्क साकारण्यात येईल. याचे काम अवघ्या सहा महिन्यात सुरू केले जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले.


भाजप गाजर दाखविणारा पक्ष

भाजप हा केवळ गाजर दाखविणारा पक्ष आहे. आजवर त्यांनी तेच केले. कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी हजारो कोटी रुपये जाहीर केले, अद्याप एक रुपयाही दिलेला नाही. त्यामुळे आम्ही माहितीच्या अधिकारात अर्ज टाकला आहे. भाजप हा भारतीय जुमला पक्ष आहे, अशी टीका त्यांनी केली. नोटाबंदीने १३ लाख रोजगार गेले आहेत. त्र्यंबकच्या पुरोहितांवर धाडी टाकण्यात आल्या. आता भाजपला राग दाखविण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.

मनसेचा उल्लेखही नाही

आदित्य यांनी भाजपवर कडाडून टिका केली असली तरी नाशिकमध्ये गेल्या पाच वर्षांपासून सत्ता असलेल्या मनसेचा साधा उल्लेखही केला नाही. त्यामुळे शिवसेनेचा प्रमुख शत्रू हा भाजपच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एबी फॉर्मची क्लीन चीट?

एबी फॉर्मच्या प्रकरणात सेनेला तब्बल ११ ठिकाणी पुरस्कृत उमेदवार द्यावे लागले आहेत. नाशिकमध्ये एबी फॉर्मचा गोंधळ झाला. हवा जिकडे वाहते तिकडेच सगळ्यांचा रोख असतो. मात्र, झाला प्रकार जाऊ द्या आता सत्ता आलीच पाहिजे, असे आदित्य यांनी सांगितले. त्यामुळे आदित्य यांनी या प्रकरणी जबाबदार असणाऱ्यांना क्लीन चीट दिली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा उत्पादक रस्त्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावर रविवारी सकाळपासून लिलाव बंद असल्याने व दुपारी लिलाव सुरू झाल्यावर शंभर रुपये प्रतिक्विंटल अत्यल्प भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाल्याने तणावाचे वातावरण होते.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंगसे व झोडगे कांदा खरेदी-विक्री केंद्रावरील व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कांदा बाजारपेठेत पाठवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून बोगी उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. त्यामुळे व्यापाऱ्यांकडील हजारो टन कांदा तेथेच पडून राहिल्याने व्यापारी संघटनेतर्फे रविवारी सकाळपासूनच लिलाव बंद करण्यात आले होते. राज्यमंत्री दादा भुसे यांना व्यापारी संघटनेने निवेदन देऊन रेल्वेची बोगी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, मुंगसे बाजाराच्या आवारात सकाळपासून शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणल्याने कांद्याची मोठी आवक झाली. दुपारपर्यंत लिलाव सुरू न झाल्याने शेतकरी संतप्त झाले. दुपारी तीननंतर लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले. मात्र, कांद्याला प्रतिक्विंटल १०० ते १५० रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या संतापात आणखी भर पडली. या वेळी सुमारे पाचशे शेतकऱ्यांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिस प्रशासनासह नायब तहसीलदार गिरीश वाखारे, बाजार समितीचे सभापती प्रसाद हिरे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे लेखी तक्रार द्यावी. त्यानुसार कारवाई करण्याचे आश्वासन हिरे यांनी यावेळी दिले. व्यापारी प्रतिनिधींनी आजपासून लिलाव सुरळीत सुरू राहणार असल्याचे सांगितले.

नांदगावात शेकडो टन कांदा पडून

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मोठ्या प्रमाणावर उत्पादित झालेला कांदा महाराष्ट्राबाहेर पाठवण्यासाठी रेल्वे प्रशासन पुरेसे रेल्वे रॅक उपलब्ध करून देत नसल्याने नांदगाव तालुक्यात कांदा व्यापाऱ्यांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. रेल्वे रॅकच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने सोमवारी कांद्याचे लिलाव झाले नाहीत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून, खळ्यात पडून असलेल्या कांद्याचे करायचे काय, असा प्रश्न पडला आहे.

यंदा नांदगाव तालुक्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. नांदगाव बाजार समितीमध्ये रोज २० ते २५ हजार क्विंटल कांद्याची आवक आहे. मात्र, रेल्वे रॅक उपलब्ध नसल्याने खरेदी केलेला कांदा साठवायचा कुठे असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे सोमवारपासून लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. हा कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा दिल्याने खळ्यात पडून असलेल्या कांदा पिकाचे करायचे तरी काय, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निवडणुकीत विरघळला व्हॅलेंटाइन विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक
पाश्चात्त्य संस्कृतीचे प्रतिनिध‌ित्व करणारा ‘व्हॅलेंटाइन डे’ सारखा इव्हेंट साजरा करावा की नाही, याबद्दल राजकीय पक्ष प्रेरीत विद्यार्थी संघटनांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्या तरीही या सर्व संघटनांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विषयाबाबत तलवार म्यानच केल्याचे चित्र आहे.
गेल्या काही वर्षांपासून ‘व्हॅलेंटाइन’ चर्चेत रहायचा तो या इव्हेंटला देण्यात येणाऱ्या राजकीय रंगांमुळे. संस्कृतीरक्षणाचा अजेंडा मिरविणारे पक्ष अन् संघटना याच्या विरोधात होते, तर मुक्त विचारांचा वारसा सांगणाऱ्या पक्ष संघटनांनी या इव्हेंटचा पुरस्कार केला होता. या दिवशी जागोजागी दिसणाऱ्या कपल्सवर दहशत गाजविल्याच्या घटनाही यामागे घडल्या होत्या. पण यंदा बदललेल्या राजकीय समीकरणांचा प्रभाव या इव्हेंटच्याही सेलिब्रेशनवर दिसून येतो आहे.
शहरात उत्तर महाराष्ट्रातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. इंजीनिअरिंगसह फार्मसी, मॅनेजमेंट, कौशल्यपूर्ण शिक्षण आणि पारंपरिक अभ्यासक्रमांमध्ये दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांचा भरणा नाशिकमध्ये आहे. विविध कॉलेजेसमध्ये ज्या उत्साहाने इतर डेजचे सेलिब्रेशन होते, त्याच उत्साहाने व्हॅलेंटाइनचेही सेलिब्रेशन शहरात होते. यापूर्वी काही राजकीय संघटनांनी या सेलिब्रेशनला विरोध केल्याची पार्श्वभूमी व एकूणच तरुणाईच्या उत्साहाला येणारे उधाण यामुळे या दिवशी शहरात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे. या इव्हेंटला विरोध करणाऱ्या संघटनांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणालाही न दुखावण्याची खबरदारी घेतल्याने या कार्यकर्त्यांचाही अडसर कपल्सला यंदा राहणार नाही. व्हॅलेंटाईन डेमुळे तरुणांचे गट एकत्रित येतात. यातच आता निवडणुकीचा माहोल आहे. अशावेळी कुठलेही निमित्त होऊन कायदा आणि सुव्यवस्थेस धक्का पोहचू नये, यासाठी पोलिसांनी शहरातील मुख्य ठिकाणी चेक नाके ठेवले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महा-टेक’ची सांगता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री महावीर पॉलिटेक्निकमध्ये ‘महा-टेक २०१७’ ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातून या स्पर्धेस चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेची सांगता नुकतीच करण्यात आली. या स्पर्धेमध्ये विज्ञान शाखेसह मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागाच्या वतीने स्पर्धेत क्वीझ, पेपर प्रेझेंटेशन आदी उपक्रम आयोजित करण्यात आले होते.

स्पर्धेच्या उद््घाटनाप्रसंगी राष्ट्रीय निर्मल ग्राम पुरस्कार, आदर्श सामाजिक एकता (गाव) प्राप्त अवनखेड दिंडोरीचे सरपंच नरेंद्र जाधव यांनी दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन केले. यावेळी व्यासपीठावर संघवी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे प्राचार्य जयंत पट्टीवार, श्री महावीर पॉलिटेक्निकचे गुणवत्ता अधीक्षक योगेश बागुल, प्रियांका झवर, रघुनाथ गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

लेखांचे सादरीकरण

इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभाग, सायन्स विभागाकडून टेक्निकल क्वीझ स्पर्धा घेण्यात आली. ऑटोमोबाईल आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील अद्ययावत संशोधने आणि ट्रेंड्स, नॅनो टेक्नोलॉजी, अल्टरनेटिव्ह एनर्जी सिस्टिम, रोबोटिक्स, मेकेट्रोनिक्स या विषयावरील लेखांचे सादरीकरण केले गेले. तर सोलर इन्व्हर्टर, वायरलेस कम्युनिकेशन या विषयांवरील लेखांचेही सादरीकरण करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. प्रमोद कांकरिया यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी प्रा. रामेश्वर लढ्ढा, प्रा. संभाजी सगरे, प्रा. संजय भामरे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारांच्या फोनने उमेदवारांना धडकी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘आमच्या प्रभागामध्ये असलेल्या मंदिराला सभागृहाची फार गरज आहे तेवढे बांधून द्या’, ‘भाऊ खूप दिवसांपासून सांगायचे होते पण आता संधी मिळाली, आम्हाला नाना नानी पार्क बांधून पाहिजे’, ‘अण्णा काहीही करा पण मंडळाला मोठी साऊंड सिस्टम घेऊन द्या’ अशा एक ना अनेक मागण्या मतदार करीत आहेत. त्यांच्या या मागण्यांना वैतागून उमेदवार मोबाइल उचलण्यासही कचरत असून ‘कहीं ये वो तो नहीं’ चा फिल येत असल्याने त्यांचा बेस्ट पंटरच फोन हॅण्डल करताना दिसत आहे.

महापालिकेत उभा राहिलेला उमेदवार श्रीमंत असेल तर या मागण्यांचा विचारदेखील होत आहे. परंतु, अपक्ष उमेदवार मात्र असे फोन घेण्यास कचरत असून या मतदारांना काय उत्तर द्यावे, हेच त्यांना सुचत नाही.


मागण्या पूर्ण करणे सुरू

मतदार म्हणेल तसे वागण्याची उमेदवारांना सवय पडल्याने आता काही चाणाक्षांनी मतदारांच्या खांद्यावरून बंदूक चालविणे सुरू केले आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रत्येक मागणी पूर्ण करणे जड जात आहे. डोईजड मागणी करणाऱ्या मंडळाची वीस-पंचवीस मते आहे म्हटल्यावर त्यांचा म्होरक्या म्हणेल तसे वागणे उमेदवाराला भाग पडते. या संधीचा फायदा घेत काहीजण मोठ्या मागण्या करून मिळेल ते पदरात पाडून घेत आहे. मंदिराचे बांधकाम, घराच्या फरशा बदलून घेणे, अपार्टमेंटला रंग देऊन घेणे, बोअरवेलची सोय, पार्किंगच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करून घेणे, यासारख्या मागण्याही मतदार करीत असल्याने बव्हंशी कामे उमेदवाराला करावी लागत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंगळेंच्या वाढल्या अडचण्‍ाी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक बाजार समितीचे सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावला. दोन महिन्यांपासून या अर्जावर हायकोर्टात सुनावणी सुरू होती.

बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याची रक्कम कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून परस्पर काढून घेतल्याच्या आरोपामुळे पिंगळेंवर अँटिकरप्शन ब्यूरोने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. कर्मचाऱ्यांची तब्बल ५७ लाख रुपयांची रोकड पिंगळेंकडे घेऊन जाणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिनाअखेरीस एसीबीने जेरबंद केले होते. या प्रकरणात पिंगळेंचा सहभाग आढळून आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

याच गुन्ह्यात एसीबीने तब्बल चार ते पाच दिवस पिंगळेंकडे चौकशी केली. पोलिस कोठडीची मुदत २५ डिसेंबर रोजी संपल्याने पिंगळेंना कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. पिंगळेंची लागलीच नाशिक सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली. यानंतर पिंगळेंनी जिल्हा कोर्टात जामिनासाठी अर्ज सादर केला. मात्र, साक्षीदारांवर दबाव टाकण्यात येऊ शकतो हा सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानत कोर्टाने पिंगळेंचा अर्ज फेटाळला. त्यानंतर पिंगळेंनी हायकोर्टात धाव घेतली. पिंगळेंच्या जामिनावर १० जानेवारी रोजी सुनावणी झाली होती. त्यात एसीबीने जबाब नोंदवणे अथवा इतर तपासाच्या दृष्टीने आवश्यक कामे पूर्ण करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निहाल अहमद यांच्या पुत्राविरोधात गुन्हा

$
0
0

फसवणूक प्रकरण; सात जणांविरोधात तक्रार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मालेगावचे माजी मंत्री आणि जनता दलाचे दिवंगत आमदार निहाल अहमद यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून त्याद्वारे शैक्षणिक संस्थेवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या मुलासह सात जणांविरोधात मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही फिर्याद अहमद यांच्या एका मुलानेच केली आहे.

मालेगावच्या अंजुमन तालिम-ए- जमहुर या शैक्षणिक संस्थेवर वर्चस्व मिळवण्यासाठी निहाल अहमद यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांच्या आधारे प्रतिज्ञापत्र तयार करून त्याआधारे धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्यात आल्याचे हे प्रकरण आहे. याबाबत बुलंद इकबाल निहाल अहमद यांनी फिर्याद दिली आहे. यावर पोलिसांनी निहाल अहमद अब्दुल खालिक (रा. चुन्नाभट्टी) मुख्तार अहमद मोहम्मद युसूफ (रा. खुशामद पुरा) इफ्तेखार अहेमद मोहम्मद हुसेन (रा. बेलबाग), इस्तियाक अहमद निहाल अहमद (रा.नवापुरा), अबुलैस सिराज अहमद (रा. बेलबाग), अॅड. अब्दूल रहेमान निहाल अहमद अन्सारी (रा. चुनाभट्टी) आणि अॅड. भाऊसाहेब गंभीरे (रा. व्दारका, नाशिक) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नाशिकमध्ये झालेली असल्याने त्यांना मुंबई नाका पोलिसांकडे पाठवण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images