Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

हजाराची चौरंगी लढत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, या दोन्ही निवडणुकांसाठी तब्बल १,०२७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी ३५२, तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ६७५ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. या दोन्ही निवडणुकांसाठी एकूण ६९० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक २१ फेब्रुवारी रोजी होत आहे. जिल्हा परिषदेसाठी ८२५, तर पंचायत समितीसाठी १,४४० अर्ज दाखल झाले होते. अर्ज छाननीअंती जिल्हा परिषदेसाठी ६०४, तर पंचायत समितीसाठी १,१२२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. अर्ज माघारीची प्रक्रिया सोमवारी (१३ फेब्रुवारी) सर्वच तहसील कार्यालयांमध्ये राबविण्यात आली. माघारीसाठी अवघ्या चारच तासांची मुदत असल्याने तहसील कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. दुपारी तीनपर्यंत अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू होती. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी २५१ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता ७३ जागांसाठी ३५२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १४६ गणांसाठी ४३९ उमेदवारांनी माघार घेतली असून, ६७५ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

निफाडमध्ये १५१ उमेदवार मैदानात

निफाड तालुक्यात १० गट आणि २० गण अशा एकूण ३० जागांसाठी तब्बल १५१ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पंचायत समितीसाठी ९२, तर जिल्हा परिषदेसाठी ५९ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. दिंडोरीत पंचायत समितीसाठी ६४, तर जिल्हा परिषदेच्या गटांसाठी ३३ अशा एकूण ९७ उमेदवारांनी दंड थोपटले आहेत. त्याखालोखाल मालेगावात अनुक्रमे ६३ आणि ३१ असे ९४ उमेदवार राजकीय भवितव्य आजमावत आहेत.

जनमत चाचणीस बंदी

मुंबई ः मुंबई, पुण्यासह १० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होणार असल्यामुळे १४ फेब्रुवारीपासून जनमत चाचणीचा कौल अथवा मतदानोत्तर चाचणीचे निकष जाहीर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. तसेच, जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर राजकीय पक्ष व उमेदवारांना मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांत प्रचारविषयक जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाहीत. मतदारांवर प्रभाव पडू नये यासाठ‌ी संबं‌‌‌धित कायद्यातील तरतुदीनुसार हा निर्णय घेतल्याचे सोमवारी राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी स्पष्ट केले.

कपबशी फोडणार सेनेला घाम

जिल्ह्यात शिवसेनेच्या विरोधात बंडखोरीचे निशाण फडकावणाऱ्या बहुतांश उमेदवारांना कपबशी हे चिन्ह मिळाले आहे. नाशिक तालुक्यात पळसे आणि एकलहरे गटात काही इच्छुकांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारले आहे. पळसे नागरिक विकास आघाडी आणि राजाभाऊ गोडसे विकास आघाडीच्या माध्यमातून अनुक्रमे संजय तुंगार आणि शंकर धनवटे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांविरोधात दंड थोपटले आहेत. या दोन्ही गटांत शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांना कपबशी हे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे धनुष्यबाणाला कपबशीने आव्हान उभे केल्याचे चित्र आहे. निफाड तालुक्यातील चांदोरी गटातही शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्या उत्तम गडाख यांच्या पत्नी लीलाबाई गडाख यांना कपबशी हेच चिन्ह मिळाले आहे. आम्ही कपबशी चिन्हाची मागणी केली होती. अन्य कुणी या चिन्हाची मागणी न केल्याने आम्हाला हे चिन्ह मिळाल्याची माहिती संजय तुंगार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘बुराई नदी बारमाहीसाठी कालबद्ध आराखडा करा’

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातून वाहणारी बुराई नदी बारमाही करण्यासाठी २०.६१ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे नदी बारमाही होण्यासाठी कालबद्ध आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी माहिती राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मंत्री रावल यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विकास कामांबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

या वेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश सांगळे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, जिल्हा नियोजन अधिकारी एम. आर. वाडेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, तहसीलदार गायत्री सैंदाणे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी मंत्री रावल म्हणाले, बुराई नदी बारमाही वाहण्यासाठी ५३ बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवून नदी बारमाही होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने नियोजन होणे आवश्यक असून प्रशासकीय बाबींची तात्काळ पूर्तता झाली पाहिजे. या पार्श्वभूमीवर कालबद्ध कार्यक्रम तयार करावा. आमदार निधी खर्चाबाबतचा अहवाल सादर करावा. तसेच निधी वेळेत खर्च कसा होईल याचेही नियोजन करावे, अशा सूचना मंत्री रावल यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊसतोड कामगारांची कर्नाटकहून सुटका

0
0

संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरेंचा पुढाकार

म. टा. वृत्तसेवा, धुळे

ऊसतोड कामगार म्हणून कर्नाटक राज्यात नेलेल्या सत्तर आदिवासींची केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांच्या प्रयत्नाने सुटका झाली आहे. जिल्ह्यातील साक्री, आमोदे, दुसाणे व धुळे तालुक्यातील अंचाळे, बागलाण तालुक्यातील मुलेर येथील आदिवासींना ऊसतोड कामासाठी कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील आडण तालुक्यातील बाईसह साखर कारखाना येथे नेण्यात आले होते.

या कामगारांनी त्याठिकाणी चार महिने काम केले. त्यानंतर ऊसतोडणीचे काम बंद झाल्याने आदिवासी मजूर आपल्या मायदेशी परत येण्यासाठी ठेकेदाराकडे गेल्या काही दिवसांपासून तगादा लावत होते. मात्र, संबंधित ठेकेदार दिलीप भिमा जाधव (रा. आडण, जिल्हा गुलबर्गा, कर्नाटक) यांनी आदिवासी कामगारांना सांगितले की, तुमचा ग्रुपचा ठेकेदार हा उसनवार पैसे घेऊन गेला आहे. ज्यावेळी मला माझे पैसे तुमच्या ठेकेदाराकडून मिळतील तेव्हाच तुम्ही सर्व कामगारांना मायदेशी तुमच्या राज्यात पाठविण्यात येईल. मजूर घरी येण्यासाठी निघाले असता संबंधित ठेकेदाराने त्यांन नजरकैद करून ठेवले होते. त्यामुळे या मजुरांना पळून जाण्यासाठी जिकरीचे ठरत होते. तर सर्व मजूर हे गेल्या वीस दिवसांपासून एकच वेळ जेवण करून दिवस काढत होते.या मुजरांना दररोज मारहाण करण्यात येत असल्याची माहिती तालुक्यातील गोरख भुरा मालचे यांना मिळाली. त्यांचे कुटूंबदेखील त्याचठिकाणी ऊसतोड कामासाठी गेले होते. त्यामुळे मालचे यांनी कर्नाटकमधील आडण गावाशी संपर्क करून माहिती घेतली. यावरून गोरख मालचे यांनी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेतली. डॉ. भामरेंनी तात्काळ गुलबर्गा येथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी फोनवरून संभाषण केले. यावरून आदिवासी नेते अशोक धुलकर दि. ७ फेब्रुवारी रोजी आडण गावात पोहोचले. त्यांनी पोलिसांच्या मदतीने धुळे जिल्ह्यातील ७० आदिवासींची सुटका झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नातेवाईकाने बहिष्कृत केल्याने आत्महत्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील नरडाणा येथे एकाच कुटुंबातील ४ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याप्रकरणी धक्कादायक प्रकार रविवारी (दि. १२) समोर आला होता. आत्महत्या केलेल्या कुटुंबाला अमळनेर तालुक्यातील ब्राम्हणे गावातून त्यांच्याच नातेवाईकाने बहिष्कृत केल्याने या कुटुंबाने सामूहिक आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचा गुन्हा नरडाणा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

नरडाणा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर रेल्वे रुळावर आसाराम भिल आणि त्यांच्या दोघे मुलांनी आत्महत्या केली होती. हे दृश्य पाहून आसाराम यांची पत्नी विठाबाई भिल आणि मुलगी वैशाली यांनी रेल्वे रुळालगत असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यात विठाबाईचा मृत्यू झाला तर वैशाली वाचली होती. पोलिसांनी वैशालीच्या जबाब नोंदवला असून त्यात तिने आपल्या काकाने कुटुंबाला गावाबाहेर काढले होते. म्हणून वडील गेल्या काही दिवसांपासून मानसिक त्रासले होते. आसाराम यांचा भाऊ अण्णा भील यांच्या त्रासामुळे वडीलांसह संपूर्ण कुटुंब आत्महत्येला प्रवृत्त झाले, अशी तक्रार वैशालीने दिली आहे. मात्र गावाबाहेर काढल्यानंतर तब्बल दीड महिन्यानंतरच या कुटुंबाने सामूहिक आत्महत्येचा मार्ग का पत्करला असावा, हा मात्र संशोधनाचा विषय ठरला आहे. याबाबत कारण स्पष्ट होत नसल्याने याविषयी तपास पोलिस यंत्रणेकडून केल्याचे सुत्रांकडून समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरी तालुक्यात काँटेकी टक्कर

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या इगतपुरी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत रणधुमाळी आता चांगलीच रंगू लागली आहे. माघारीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता निवडणुकीच्या आरपारच्या लढाईला खऱ्या अर्थाने रंगत वाढली आहे. आजी माजी आमदारांच्या प्रतिष्ठा, आजी-माजी सभापतीचे अस्तित्व पणाला लागले आहे. काही गटामध्ये चौरंगी तर काही गटांमध्ये तिरंगी लढती होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

इगतपुरी तालुका तसा राजकीयदृष्ट्या संवेदनशील व जागरूक तालुका असल्याने, राजकारणही त्याच तोलामोलाचे चालते. ‘हम किसीसे कम नही’ हे दाखवण्याचा प्रयत्न सर्वच पक्ष व उमेदवारांकडून केला जातो. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच राज्य सरकारमधील मंत्री, भाजपच्या उमेदवारासाठी मंत्री जयकुमार रावल यांनी नांदगाव सदो, घोटी, खेड, टाकेद व शिरसाठे येथे प्रचाराच्या शुभारंभासाठी येवून रणधुमाळीला सुरुवात केली. तर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी

शिवसेनेच्या उमेदवारांसाठी घोटी येथे प्रचार सभा घेवून वातावरण निर्मितीत भर घातली. इगतपुरी तालुक्यात पाच गटासाठी २९ उमेदवार तर १० गणासाठी ५९ असे ८८ उमेदवार रिगणात आहेत. त्यात काँग्रेस, शिवसेना, भाजप यांनी सर्वच जागावर उमेदवार उभे केले आहेत. तर राष्ट्रवादी, मनसे, शेकाप, माकप यांनी निवडक जागावर उमेदवार दिले आहेत. यात आमदार कन्या, माजी आमदारांच्या पत्नी, माजी ज‌ि. प. सदस्य, पंचायत समितीचे आजी माजी सभापती, नातलग आदींचा भरणा आहे. त्यामुळे प्रत्येक गटात निवडणूक ही उत्साहपूर्ण होईल अशी शक्यता आहे. शिरसाठे गटात पंचरंगी लढत होत आहेत. या गटात अपक्ष कोणीही नाही. शिवसेनेकडून माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या पत्नी सुशीला मेंगाळ, काँग्रेसचे ज्ञानेश्वर झेंडे यांच्या पत्नी तान्हुबाई झेंडे, भाजपच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संदीप बोंबले यांच्या पत्नी कल्पना बोंबले, राष्ट्रवादीकडून बेबीताई भस्मे व मनसेकडून राजूबाई हिरामण कवटे यांच्यात रंगतदार लढत होणार आहे. तर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या वाडीवऱ्हे गटात काँग्रेसकडून विद्यमान आमदार निर्मला गावित यांच्या कन्या कुमारी नयना गावित व पंचायत समितीचे सभापती गोपाळ लहांगे यांच्या पत्नी अनिता लहांगे या शिवसेनेकडून निवडणूक लढवीत आहे. या दोन उमेदवारांमध्ये लढत होत असली तरी त्यासाठी आमदार गावित व सभापती लहांगे यांची प्रतिष्ठा

पणाला लागली आहे. भाजपकडून गीता लहांगे, माकपकडून कुसुम बेंडकुळे व अपक्ष म्हणून रंजना बेंडकोळी यांच्यात चुरसपूर्ण लढत होणार आहे.

घोटीत चौरंगी लढत

संपूर्ण तालुक्याचे लक्ष घोटीकडे लागले असून या गटात चौरंगी सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उदय जाधव, शिवसेनेकडून निवृत्ती जाधव, मनसेकडून संदीप किर्वे, भाजपकडून संदीप शहाणे, यांच्यसह काँग्रेसचे भास्कर गुंजाळ, अपक्ष नालबंद जावेद सैय्यद व आदिनाथ सोमवंशी असे उमेदवार आहेत. नांदगाव सदो गटात चौरंगी लढत होत आहे. शिवसेनेकडून कावजी ठाकरे, भाजपकडून राजू गांगड, राष्ट्रवादीकडून नरेश घारे व काँग्रेसकडून मनोहर घोडे यांच्यात लढत होत आहे.

खेड गटात उमेदवारांची गर्दी

सर्वाधिक उमेदवार व सर्वच राजकीय पक्षांना हक्काची जागा वाटणाऱ्या खेड गटात यावेळी अतीतटीची लढत आहे. या गटात शिवसेनेकडून हरिदास लोहकरे, भाजपकडून वसंत डामसे, राष्ट्रवादीकडून डॉ. जयंत कोरडे, शेकापकडून सोमनाथ ठोकळ (तात्या) तर काँग्रेसकडून बाळासाहेब घोरपडे यांच्यासह अपक्ष केरुदादा खतेले, मनसेचे कोंडाजी तातळे व आशाबाई गवारी स्पर्धेत आहेत. केरुदादा खतेले यांच्या उमेदवारीने अनेक स्पर्धाकांचे धाबे दणाणले आहे. सर्वच उमेदवार आता पायाला भिंगरी, डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर घेवून फिरत आहेत. मात्र उमेद्वारानाच्या मोठ्या यादीमुळे मतदारही आता धर्मसंकटात पडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीतील १५ संचालकांना झेडपीचे वेध

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील १० पैकी ८ जिल्हा परिषद गट सर्वसाधारण व ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने निफाड तालुक्यातील राजकीय महत्वाकांक्षा पुढे आली आहे. त्यामुळे आधीच विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या राजकीय प्रतिनिधींना आता मिनी मंत्रालयाचे वेध लागले आहेत. तालुक्यात शेतकऱ्यांच्या जिवाभावाच्या असणाऱ्या लासलगाव आणि पिंपळगाव अशा दोन्ही बाजार समितीतील विद्यमान सभापती, उपसभापती व संचालक हे स्वतः आणि काही ठिकाणी कुटुंबातील सदस्यांना मिनी मंत्रालयात पाठवण्यासाठी प्रयत्नात आहेत.

तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत लासलगाव बाजार समितीचे ११ संचालक तर पिंपळगाव बाजार समितीचे ४ संचालक आपले नशीब आजमावत आहेत. लासलगाव गटा ते‌थील बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, संचालक नानासाहेब पाटील यांच्या लढत रंगणार आहे. उगाव गटातून संचालक बाळासाहेब क्षीरसागर, भास्करराव पानगव्हाणे व राजेंद्र डोखळे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. विंचूर गटातून पंढरीनाथ थोरेंच्या पत्नी विद्यमान जिल्हा परिषद सदस्या किरण थोरे विंचुर गटातून, कोठुरे गणातून उपसभापती सुभाष कराड यांच्या पत्नी मीनाक्षी कराड, विंचुर गणातून लासलगाव बाजार समिती संचालक संदीप दरेकर, खेडले झुंगे गणातून पिंपळगाव बाजार समितीचे संचालक गुरुदेव कांदे, देवगाव गटातून लासलगाव बाजार समिती संचालक शिवनाथ जाधव हे शेतकरी संघटनेकडून उमेदवारी करीत आहेत. पिंपळगाव बाजार समितीचे संचालक आणि नुकतेच काँग्रेसचा हात सोडून सेनेत डेरेदाखल झालेले भास्कर बनकर, सभापती दिलीप बनकर यांच्या पत्नी मंदाकिनी बनकर व बाजार समिती संचालक लक्ष्मण निकम पालखेड जिल्हा परिषद गटात निवडणूक लढवत आहे. शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या बाजार समितींचा कारभार व त्यामुळे शेतकरी वर्गाशी येणारा संपर्क या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत फलद्रूप होण्यासाठी बाजार समित्यांचे संचालक प्रयत्नात आहेत.

बाजार समिती संचालकांच्या या जिल्हा परिषद निवडणुकीत उगाव, पालखेड आणि लासलगाव या गटांमध्ये प्रतिष्ठेच्या लढती होतील. उगाव गटात काँग्रेसचे भास्कर पानगव्हाणे, शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर व शेतकरी विकास आघाडीचे राजेंद्र डोखळे तर लासलगाव गटात शिवसेनेचे जयदत्त होळकर, भाजपचे नानासाहेब पाटील किंवा त्यांचा उमेदवार यांच्यात लढत होईल. ते १५ तारखेनंतर समजणार आहे. पिंपळगाव बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांच्या पत्नी मंदाकिनी बनकर, शिवसेनेचे भास्करराव बनकर, भाजपचे लक्ष्मण निकम यांच्या पालखेड गटातील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांगांच्या रॅलीतून जागला स्नेहभाव

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
समाजामध्ये दिव्यांग व्यक्तींप्रती सामान्य नागरिकांमध्ये स्नेहभाव निर्माण व्हावा, जागृती व्हावी त्यांच्या समस्या जाणून घेता याव्यात, या उद्देशाने नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड महाराष्ट्र, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी ‘डिव्हाइन सायक्लोथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीतून ‌दिव्यांगांनी विविध संदेश देत नाशिककरांची मने जिंकून घेतली.
पोल‌िस आयुक्त रवींद्रसिंग सिंघल आणि क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत सायक्लोथॉनची सुरुवात करण्यात आली. यावेळी सामान्य नागरिकांना दुचाकी वापरताना हेल्मेट वापरा, रस्ता सुरक्षिततेसाठी नियम​ पाळण्याचे आवाहन करण्यात आले. सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या सायक्लोथॉनमध्ये शंभराहून अधिक अंध मुले-मुली, अस्थिव्यंग, मत‌िमंद, सेलेब्रल पाल्सी, बहुविकलांग, डिफ-ब्लाइंड असे दिव्यांग स्त्री पुरुष सहभागी झाले.
महात्मानगर क्रिकेट ग्राउंड ते भोसला मिलिटरी स्कूल गेट, कॉलेज रोड अशा मार्गावर झालेल्या या डिव्हाइन सायक्लोथॉनमध्ये दोन चाकी सायकल्स, टँडम सायकल्स, लहान मुलांसाठी तीन चाकी सायकल्स, व्हीलचेअर वापरण्यात आल्या. नाशिक सायकल‌िस्टच्या सदस्यांनी स्वतःच्या सायकल्स यावेळी उपलब्ध करून दिल्या.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुणे भीष्मराज बाम म्हणाले की, या पद्धतीच्या सायक्लोथॉन देशभर राबविण्यासाठी प्रयत्न करतानाच या दिव्यांग व्यक्तींची जागतिक पातळीवर ओळख निर्माण करण्याइतकी शक्तीला अशा सायक्लोथॉनमधून बळ दिले जात आहे. तसेच नॅब महाराष्ट्रचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी पुढच्या वर्षी किमान १० दिव्यांगांना स्वतंत्रपणे सायकल चालविण्याइतपत प्रशिक्षण आणि सराव घेण्यात येईल अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर ताबडतोब भीष्मराज बाम यांच्याकडून नॅब संस्थेला सायकल्स खरेदी करण्यासाठी ५ हजार, आणि किरण सोनार यांच्याकडून तीन हजार रुपयांची देणगी देण्यात आली.
पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल, उपायुक्त विजय पाटील, अंध उद्योजक भावेश भाट‌िया, अंध बँक अधिकारी वैभव पुराणिक, ज्ञानगंगा चॅरिटेबल ट्रस्टचे राजेश शुक्ल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवेदनशील केंद्रांवर प्रशासनाची नजर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरातील तब्बल ४४२ मतदान केंद्रांना प्रशासनाने रडारवर घेतले आहे. यात २७९ संवेदनशील, ८६ अतिसंवेदनशील व ७७ क्रिट‌िकल केंद्रांचा समावेश आहे. एकूण केंद्रांच्या तब्बल ३१ टक्के केंद्रांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी पोलिस बंदोबस्ताचे नियोजन सुरू आहे. परिसरातील कार्यकर्त्यांना ‘समज’ देखील देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रशासनासह राजकीय कार्यकर्त्यांकडून महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. गेल्या काही वर्षांतील निवडणुकांदरम्यान झालेल्या हाणामाऱ्या, दंगली, उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, राजकीय वैर लक्षात घेता महापालिका निवडणूक विभागाने संवेदनशील, अतिसंवेदनशील तसेच क्रिट‌िकल अशा पध्दतीने मतदान केंद्रांची वर्गवारी केली आहे. शहरात एकूण एक हजार ४३३ मतदान केंद्र असून, त्यापैकी सुमारे ३१ टक्के म्हणजे ४२२ मतदान केंद्रांना या वर्गवारीत घेण्यात आले आहे. शहरातील सर्वच प्रभागांमध्ये कमी अधिक फरकाने संवेदनशील केंद्रांची निवड करण्यात आली आहे. तर अतिसंवेदनशील केंद्राबाबत हाणामारी, दंगल, उमेदवारांची दहशत या बाबत विचार करण्यात आला आहे. या तीन वर्गवारींचा विचार करता पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

नवीन नाशिक क्रिट‌िकल
नवीन नाशिक परिसराची भौगोलिक रचना व मतदान केंद्रांची परिस्थिती लक्षात घेता येथे ‘क्रिट‌िकल’ या वर्गातील तब्बल ७७ मतदान केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. एखाद्या इमारतीत सहापेक्षा जास्त मतदान बूथ असतील, त्या ठिकाणांना क्रिट‌िकल वर्गवारीत टाकण्यात आले आहे. एकाच ठिकाणी जास्त बूथ असल्याने एकाच वेळी मोठ्या स्वरुपात गर्दी होण्याची शक्यता अधिक आहे. या गर्दीतून गोंधळ होणार नाही याची दक्षता प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. त्याचमुळे या नवीन वर्गवारीची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सिडको परिसरातील घनदाट लोकसंख्या व मतदान केंद्राची स्थिती लक्षात घेता नियोजन केले असून, त्यादृष्टीने पोलिस बंदोबस्त पुरवण्यात येणार आहे.

दसकमध्ये सर्वाधिक

प्रभाग क्रमांक १७मधील दसक गावात सर्वाधिक ९ अतिसंवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश असून त्याखालोखाल जुने नाशिक, सातपूर आणि पंचवटीत अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची संख्या जास्त आहे. मतदानाच्या दिवशी बाहुबली उमेदवारांकडून मतदारांवर दबाव येणार नाही, याची काळजी प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बडदास्त!

0
0


बडदास्त!

पार्टीवाल्यांनी चुकीची तिकीट वाटल्यानं यंदाच्या इलेक्शनमध्ये फारसे लक्ष न घालण्याचा फैसला बाज्यानं केला होता... पार्टीवाल्यांनी आपल्या कॅन्डिडेटवर अन् त्यातून आपल्यावरही मोठा अन्याय केल्याची त्याची भावना होती... पण, हा कॅन्डिडेट पार्टीशिवाय मैदानात उतरल्यानं नंतर बाज्याला निर्णय बदलावा लागला... बाज्या अखेर प्रचारमैदानात उतरला होता...

दारासमोरच्या उमेदवारासाठी तो दिवसभर फिरत होता... नाशकात काहीही झालं तरी चालंल, पण आपलं अपक्ष सीट निवडून यायलाच हवं, असं त्याला मनोमन वाटत होतं... पार्टीनं दोस्ताला नाकारलेलं तिकीट बाज्यानं मनाला लावून घेतलं होतं... महिनाभरापासून त्यानं कामधंदा सोडला होता... सकाळची थंडी, दुपारची उन्हं अन् पुन्हा सायंकाळचा गारठा असं विचित्र वातावरण अंगावर झेलत दोस्तामागं चालत होता... प्रचार रथात बसून अधून-मधून तो माइकवरही बोलत होता... ताई, माई, अक्का, शेगडीवर मारा शिक्का असं राहून राहून ओरडत होता... ठेकेदार असलेल्या दोस्तानंही खिसा सैल सोडल्यानं जेवणाचा अन् कशाचाच वांधा नव्हता... सकाळचा नाश्ता, दुपारची न्याहारी अन् रात्रीची पार्टीही दोस्ताकडंच रंगत होती... रोजच बाहेरचं खाणं आणि बाहेर जाणं यामुळं बाज्या घरी थांबतच नव्हता... त्यामुळं गृहमंत्र्यांशी खटकेही उडत होते... त्याचं हे वागणं घरच्यांना पटत नव्हतं... प्रचाराला जावा, पण रात्री लवकर घरी यावा, असं व्रतवैकल्य करणाऱ्या गृहमंत्र्यांचं म्हणणं होतं... पण, काही दिवसांपर्यंत शाकाहार जपणाऱ्या बाज्यानं सगळ्याच गोष्टी धाब्यावर बसवल्या होत्या... गळ्यातली माळ केव्हाच खुंटीवर गेली होती... वर्कर मंडळी अन् काही खास मंडळींची बडदास्त ठेवताना त्यांच्यासोबत उठावं-बसावं लागतं असं त्याचं म्हणणं होतं... त्यातूनच मग रात्रभर पार्ट्या रंगू लागल्या होत्या... दारूच्या वासाने नाक मुरडणारा बाज्या काहीच दिवसांत सराईत झाला होता... भजन म्हणणारा हा गडी रात्री गाणे म्हणत अन् डोलतच घरी परतत होता... मध्यमवर्गीय बाज्याला सगळं काही कळत होतं, पण वळत मात्र नव्हतं... अजून थोडे दिवस म्हणून तो स्वतःची समजूत काढत होता... पण नंतर तो हे सारं करणारच नाही याचा आता काही भरवसा राहिला नव्हता... रायबा-सायबासारखे काही वर्कर वेळीच सावरले होते... पण बाज्यासारख्यांचा पुरता बाजा वाजला होता...

- संपत थेटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवसांत आठ जणांना श्वानदंश

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
येथील जयभवानीरोड परिसरातील जाचक मळ्यात गेल्या दोन दिवसांत तीन बालकांसह आठ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने दहशतीचे वातावरण आहे. महापालिकेला कळवूनही कारवाई न झाल्याने अखेर नागरिकांनीच या कुत्र्याला यमसदनी धाडले.
जयभवानीरोड येथे गेल्या एक वर्षांपासून भटक्या कुत्र्यांचा जाच होत आहे. सोमवारी रात्री सव्वानऊला प्रकाश रहाणे यांचा पावणेतीन वर्षांचा चिमुकला सिद्धार्थ शेजाऱ्यांबरोबर फिरायला निघाला असता कुत्र्याने सिद्धार्थला कानाच्या मागे व दंडावर खोलवर चावा घेतला. त्याच्या काही मिन‌िटे अगोदर याच कुत्र्याने निवृत्त प्रेस कामगाराच्या हाताच्या कोपराचा आणि नंतर साडेनऊच्या सुमारास पाच वर्षांच्या मुलाच्या दंडाचा चावा घेतला. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी दुपारी तीनपर्यंत त्याच कुत्र्याचा धुमाकूळ सुरू होता. या कुत्र्याने जयभवानी मंदिर परिसरातील पाच जणांना चावा घेतला. पाटील कॉम्प्लेक्स, जीवनछाया रो हाऊसजवळ हे कुत्रे प्रथम दीर भावजयीला चावले. नंतर एका लहान मुलीला चावा घेतला. कुत्र्याने आपला मोर्चा ‘वास्तूपार्क’ जवळ हातगाडे घेऊन आलेल्या दोन गरीब भाजी विक्रेत्यांकडे वळवला. त्यांच्या पायाला चावा घेऊन जखमी केले.
जेलरोडलाही कुत्र्यांची दहशत
जेलरोडचे रहिवाशी किशोर सोनवणे म्हणाले की, गेल्या आठवड्यात ययातीनगरमध्ये चार वर्षांच्या मुलीला तसेच एका व्यक्तीला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने ते जखमी झाले. त्यांना महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. नारायणबापू चौकातील पेपर विक्रेते गणेश कुलथे यांनी सांगितले की, जेलरोडच्या वर्दळीच्या भीमनगर, ब्रह्मगिरी सोसायटी येथील नागरिकांना तसेच दुचाकी चालकांना भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो. पहाटे क्लासला जाणारे विद्यार्थी, दूधविक्रेते व प्रेस कामगारांना या कुत्र्यांचा विशेष त्रास होतो. पहाटे घरोघरी पेपर पोहचविणाऱ्या विक्रेत्यांनाही जाच सहन करावा लागत आहे. सायंकाळी नागरिकांना घरी परतणे मुश्क‌िल झाले आहे. जेलरोडच्या मॉडेल कॉलनीत नागरिकांनी ठेवलेल्या कचरा पेटीतही रात्री कुत्री घुसतात. शिळेपाके अन्न तसेच मांसाचे तुकडे खाल्ल्यानंतर कचरा विस्कटून टाकतात.

नागरिकांचा संताप

कुत्र्याचा हैदोस सुरूच असल्याने नागरिकांनी तेथेच राहणाऱ्या महापालिका निवृत्त अधिकाऱ्याची मदत घेऊन महापालिकेचे अधिकारी सोनवणे यांना फोन केला. मात्र, मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशीही कुत्र्याने पाच जणांना चावा घेतल्याने नागरिकांनी पुन्हा अधिकाऱ्यांना फोन केले. तथाप‌ि, कुत्रे पकडण्यासाठी गाडी नसल्याचे सांगितल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. त्यांनी दुपारी साडेतीनपर्यंत वाट पाहून अखेर कुत्र्याला मारुन दूरवर नेऊन टाकले. ते उचलण्यासाठीही गाडी आली नाही.

माझ्या मुलाच्या उपचारासाठी सहा हजारांची दोन इंजेक्शने नाशिकहून मागवली. दोन दिवसांत पंधरा हजारांचा खर्च झाला. महापालिकेचे अधिकारी सोनवणे यांना फोन करुनही कुत्रे पकडण्यासाठी अखेरपर्यंत गाडी आली नाही याचे वाईट वाटते.
-प्रकाश रहाणे

जय भवानीरोड, आर्टिलरीरोड परिसरातील मळ्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्यामुळे ज्येष्ठ नागरीक, लहान मुले व महिलांना बाहेर पडणे अवघड झाले आहे. महापालिकेने दुर्घटनेची वाट न पाहता कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.
-आशा हसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रभाग १३ ब’वर नजरा!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनसेचे पहिले महापौर अशी ओळख असलेले, पण सध्या शिवसेनेकडून उमेदवारी करणारे महाराज अर्थात, अॅड. यतीन वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष गजानन शेलार यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना होत आहे. या दोघांबरोबरच प्रभागात अन्य ४ उमेदवार असल्याने येथील निवडणूक रंगतदार ठरणार आहे.

मध्य नाशिकचा एक भाग असलेला प्रभाग १३ हा सध्या शहरात लक्षवेधी ठरला आहे. प्रभाग १३ मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग या गटात एकूण ६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात भाजपच्या वतीने मृणालराजे घोडके, शिवसेनेच्या वतीने माजी महापौर अॅड. यतीन वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी शहराध्यक्ष गजानन शेलार, बहुजन विकास आघाडीच्या वतीने ईश्वर कदम, अपक्ष उमेदवार धनश्री वाघ आणि धर्मराज्य पक्षाच्या वतीने चंद्रकांत रणदिवे हे नशीब आजमावत आहेत. या सर्व उमेदवारांमध्ये मुख्य लढत आहे ती यतीन वाघ विरुद्ध गजानन शेलार यांच्यामध्ये. दोघांचाही जनसंपर्क दांडगा आहे. दोघेही सधन कुटुंबातील आहेत, तसेच दोघांचाही प्रभागात दबदबा आहे, असे म्हटले तर वावगे ठरत नाही.

तब्बल ४५ हजार मतदार

या प्रभागाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शहरातील सर्वाधिक म्हणजे ४५ हजार ३८१ मतदार या प्रभागात आहेत. तेली गल्ली, नेहरू गार्डन, पंचशीलनगर, बुधवार पेठ, बडी दर्गा, कुंभारवाडा, काझी गढी, पठाणपुरा असा असलेल्या या प्रभागाची एकूण लोकसंख्या ५२ हजार ५६५ एवढी आहे. त्यात अनुसूचित जातीच्या ३,८३४, तर अनुसूचित जमातीच्या २,२१३ लोकसंख्येचा समावेश आहे. या ठिकाणी जातीचा फॅक्टरही महत्त्वाचा ठरणार आहे. वाघ आणि शेलार हे दोन्ही तेली समाजाचे आहेत आणि याच समाजातील मतदारांची संख्या येथे मोठी आहे. वाघ आणि शेलार यांचे एकमेकांशी नातेसंबंधही आहेत.

दोघांचीही दीर्घ परंपरा

शेलार हे तीनदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांचा प्रभागातील अनेक संस्था-संघटनांशी निकटचा संबंध राहिला आहे. भुजबळविरोधी गटातील नेते अशीही त्यांची ओळख आहे. भुजबळांशी त्यांचे असलेले मतभेद बहुचर्चित आहेत. विशेष म्हणजे शेलार यांनी त्यांच्या व्यक्तिगत संबंधांच्या जोरावरच प्रभागात वेगळी आघाडी निर्माण केली आहे. दुसरीकडे वाघ हे उच्चशिक्षित आहेत. नाशिक नगरपालिका असल्यापासून वाघ यांच्या कुटुंबातील कुणी ना कुणी व्यक्ती प्रतिनिधीत्व करीत आहे. त्यामुळे वाघ यांना मोठा वारसा लाभला आहे. महापौर असताना त्यांनी शहरहिताचे अनेक निर्णय घेतले. गेल्या अनेक वर्षांपासून वाघ आणि त्यांचे कुटुंबीय प्रभागात राहतात. शिवाय त्यांचा विविध संस्था-संघटनांपासून कुटुंबांशीही जिव्हाळ्याचे संबंध आहेत. परिसरातील गणेश मंडळांसोबत वाघ यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् रेल्वे स्टेशनच्या ‌भिंती बोलू लागल्या!

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
प्रेमभावनांच्या आविष्कारासाठी सर्वत्र ‘व्हॅलेंटाइन डे’ सेल‌िब्रेट करण्यात तरुणाई गुंतलेली असताना नाशिकच्या कलाप्रेमींनी हॅण्ड फाऊंडेशनमार्फत नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर आयोजित ‘आय लव्ह नाशिक’ या इव्हेंटमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या कलेच्या माध्यमातून नाशिकची स्ट्रेंग्थ चितारली. नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या दर्शनी भिंती व पादचारी पुलांवर अतिशय समर्पक अशा एकूण ६० ग्राफिटी रंगविण्यात आल्या असून, त्यासाठी सुप्रसिद्ध चित्रकार कैलास परदेशी व योगेश वाल्डे यांच्यासह शहरातील ११० चित्रकारांचे हात राबले आहेत.
नाशिकरोड रेल्वे स्टेशन हे नाशिकचे प्रवेशद्वार असून, नाशिकला येणाऱ्या पर्यटकांचे सर्वप्रथम येथेच आगमन होत असते. त्यांच्यासह इतर प्रवाशांना नाशिकची शक्तिस्थळे समजावीत, यासाठी रेल्वे स्टेशनचे प्रवेशद्वार व प्लॅटफॉर्म, पुलाच्या भिंतींवरील मोकळ्या जागेवर ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या दिवशी हॅण्ड फाऊंडेशनमार्फत आयोजित ‘आय लव्ह नाशिक’ या इव्हेंटमध्ये नाशिकच्या तरुण चित्रकारांनी सुमारे ६० ग्राफिटी रंगवल्या. या अत्यंत बोलक्या ग्राफिटींमुळे नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या सौंदर्यात भर पडली आहे. यामुळे रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरणही झाले आहे.
यातून नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर नाशिकची सर्व शक्तिस्थळे अवतरली आहेत. चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, कुंभ साधू, वाइन कॅपिटल, आर्टिलरी सेंटर, भगूरचे स्वा. सावरकर, नांदूरमध्यमेश्वरचे पक्षी अभयारण्य, रामकुंड अशा विषयांवरिल ग्राफिटींचा त्यात समावेश आहे.

प्रबोधनात्मक ग्राफिटी
या उपक्रमात सहभागी चित्रकारांनी व चित्रकला महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक प्रश्नांवर प्रबोधन करणाऱ्या ग्राफिटी रंगवून नागरिकांचे आपल्या कर्तव्यपालनाकडे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यात सेव्ह द गर्ल चाइल्ड, स्त्री सबलीकरण, पाणीबचत, वृक्षसंवर्धन,नो स्मोकिंग, चाइल्ड लेबर, स्वच्छता अभियान, वारली चित्रशैली, साक्षरता, शांतता या सामाजिक विषयांवरील ग्राफिटींचा समावेश आहे. नव्या पादचारी पुलाच्या प्रवेशद्वारावरील गणपती व भगवान शंकर यांच्या प्रतिमा नजर खिळवून ठेवणाऱ्या आहेत.
यांचे राबले हात
या ग्राफिटींतील कुंभमेळ्याची थीम योगेश वाल्डे व त्यांच्या टीममधील जयहिंद आर्टचे सिद्धेश आहेर, साईनाथ निक, प्रकाश दाते, प्रशांत दाते यांनी तर ‘सेव्ह गर्ल चाइल्ड’ या थीमवरील ग्राफिटी कैलास परदेशी यांनी रंगविली आहे. इतर प्रबोधनात्मक ग्राफिटी रंगविण्यासाठी के. के. वाघ ललित चित्रकला महाविद्यालय, चित्रकला महाविद्यालय, के.टी.एच.एम.कॉलेज, मविप्रचे आर्किटेक्चर कॉलेजमधील ११० विद्यार्थ्यांचे हात राबले आहेत. याशिवाय हॅण्‍ड फाऊंडेशनची २८ कलाप्रेमींची टीम ललित महाजन यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १३ दिवसांपासून राबत होती. या उपक्रमात इंडियन रेल्वे फॅन क्लबचे कुणाल खैरनार, न‌िश नवलकर, सुश्रुत सुळेकर, जितेश जेठवा यांनीही स्वयस्फूर्तीने सहभाग नोंदवला. या ग्राफिटींसाठी ‌एशियन पेंटसच्या बेसवर अॅक्रेलिक व ऑइल पेंटचा वापर करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप शहराध्यक्षांकडून अखेर मागविला खुलासा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी भाजप कार्यालयात दोन लाख रुपयांची मागणी केली जात असल्याच्या व्हिडीओची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी या विषयावर त्यांचे तत्काळ म्हणणे मांडावे, असे निर्देश आचारसंहिता कक्षाने मंगळवारी दिले. दोन दिवसांत त्यांचा खुलासा येणे अपेक्षित असल्याची माहिती आचारसंहिता कक्षाच्या अधिकारी सरिता नरके यांनी दिली.

स्वच्छ व पारदर्शी कारभाराचा दावा करणारा आणि पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख सांगणारा भारतीय जनता पक्ष एका व्हिडीओमुळे अडचणीत सापडला आहे. उमेदवारीसाठी दोन लाख रुपयांची मागणी केली जात असल्याचे या व्हिडीओमध्ये पहावयास मिळते. ही बाब निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतली आहे. या सर्व विषयावर शहराध्यक्षांनी त्यांचे म्हणणे मांडावे असे आदेश आयोगाने दिले आहेत.

कारवाईकडे लागल्या नजरा

या प्रकाराबाबत कुणाची तक्रार असेल तर त्या तक्रारीची तसेच व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील सत्यता पडताळण्याची जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्राप्त अहवाल आणि या सर्व विषयावर पक्षाच्या शहराध्यक्षांकडून येणारा खुलासा याची पडताळणी केल्यानंतरच आचार संहिता भंग झाला किंवा नाही हे निश्चित होईल. त्यानंतर कार्यवाहीची दिशा ठरविण्यात येणार आहे. आम्ही तत्काळ खुलासा करण्यास सांगितले असून, फारतर दोन दिवसांत खुलासा येणे अपेक्षित असल्याची माहिती नरके यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हतबल शेतकऱ्याने जाळला अडीच एकर कांदा!

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

कांद्याने नोटाबंदीचा फटका काळ्या पैसेवाल्यांऐवजी सामान्य शेतकऱ्यांना बसल्यानंतर आता कांद्याच्या घसरत्या भावाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कांदा विक्री झाला तरी त्याचे चेक बँकेमध्ये महिना-महिना वटत नाही. त्यात उत्पादन खर्चही निघत नसल्याने हतबल झालेल्या नगरसूल येथील शेतकऱ्याने पाच एकरवरील कांदा जाळला. कांदा काढण्यासाठी पैसे नाही आणि तो काढला तरी मजुराला द्यावे लागणारे पैसेही या पिकातून मिळत नसल्याच्या उद्विग्नतेतून त्याने हा निर्णय घेतल्याचे वास्तव समोर आले आहे.

नगरसूल येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी पाच एकर क्षेत्रात कांदा लागवड केली होती. नोटाबंदीच्या निर्णयामुळे चलनटंचाईचा फटका त्याच्यासह अनेक शेतकऱ्यांना बसला. पैसे उपलब्ध होत नसल्याने त्यांनी त्यातील अडीच एकर कांदे सोडून दिले. उर्वरित अडीच एकर कांद्याचे उत्पादन करूनही त्याचा उत्पादन खर्च तर सोडा, साधा काढणी व बाजारात नेण्याचा खर्चही कांदा विक्रीत पुरा होऊ शकत नसल्याने त्यांनी हे पीकच जाळण्याचा निर्णय घेतला. आधीच वाळून पक्व झालेल्या कांद्याच्या पातीवर उसाचे पाचट पसरवून त्यांनी हा तयार कांदा जाळला. सरकारकडे विविध संघटना व बाजार समित्यांनी या प्रश्नावर वेळोवळी उपाययोजना करण्याची मागणी केली. मात्र, सरकारने या प्रश्नाकडे डोळेझाक करीत दुर्लक्ष केले. आता शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला आहे. कांद्यावर खर्च अडीच-तीन लाख रुपये झाला. त्यात काढणीचा खर्च पन्नास हजार रुपये. एवढे करूनही मार्केटमध्ये कांद्याला भाव नाही. सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा, हीच आमची अपेक्षा आहे, असे डोंगरे यांनी सांगितले.

मी पाच एकर कांदे लावले होते. नोटाबंदीचा फटका बसल्याने त्यातले निम्मे कांदे सोडून दिले. माझे आज रोजी शंभर टक्के माल काढणीवर आला आहे. कांद्यावर माझा अडीच ते तीन लाख रुपये खर्च झाला आहे. मात्र, मार्केटमध्ये त्याचे ६० हजार रुपयेसुद्धा मिळणार नाही. शेतमजुराला देण्यासाठीही माझ्याकडे पैसे नाहीत. मग या कांद्याचे मी काय करू?

- कृष्णा डोंगरे, शेतकरी, नगरसूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..अन् तरळले त्यांच्या नेत्रातून अश्रू!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘तिलाही त्याला भेटायचं होतं... त्याच्यापाशी मन उलगडायचं होतं... झालं गेलं विसरून त्याला पुन्हा आपलं म्हणायचं होतं... त्याचीही अवस्था वेगळी नव्हती... पण पुढाकार कुणी घ्यावा उमगत नव्हतं ,’ कधी काळी विवाहबंधन स्वीकारलेल्या, पण विभक्त झालेल्या अन् होऊ पाहणाऱ्या अनेक पती-पत्नींना खाकी वर्दीआडच्या पोलिसांनी व्हॅलेंटाइन डेचे औचित्य साधत चक्क एकत्र आणले. त्यावेळी भव‌िष्यातील सुखी संसाराची स्वप्ने नव्याने रंगव‌िताना काहींच्या नेत्रांमधून अश्रू पाझरले.

आपल्या आयुष्याच्या जोडीदाराशी कधी नात्यातल्या तर कधी मैत्रीतल्या मध्यस्थाद्वारे अन् कधी थेट कायद्याच्या नोटिशीद्वांरे संवाद साधू पाहणाऱ्या जोडप्यांमध्ये नाशिकचे पोलिस आयुक्तालय

मंगळवारी व्हॅलेंटाइन डेचे औचित्य साधत दुवा बनले. पोलिसांच्या माध्यमातून नाशिकमध्ये पार पडलेला हा राज्यातील पहिलाच प्रेरक प्रयोग असावा, असा दावाही पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी केला.

तंत्रज्ञान, पैसा अन् शिक्षणाने समृद्ध बनत चाललेल्या समाजात नाती मात्र कमकुवत होत आहेत. पोलिसांमध्ये रोजच दाखल होणाऱ्या एकूण गुन्ह्यांच्या संख्येचा मोठा हिस्सा पती-पत्नीच्या नात्यातील मतभेदांनी व्यापल्याची आकडेवारी वर्दीमागल्या पोलिसांनाही अस्वस्थ करते आहे. याच अस्वस्थतेमधून पोलिस निरीक्षक सुनील नंदवालकर यांच्या संकल्पनेतून ‘पुन्हा घरी ...’ या उपक्रमांतर्गत ‘संवाद समृद्धी सहजीवनाचा... चला नातं जपू या!’ हा अनोखा कार्यक्रम साकारला गेला. या संकल्पनेस पोलिस आयुक्त सिंघल यांनीही पाठबळ देऊन सोशल पोलिसिंगव्दारे कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले. त्र्यंबक रोडवरील फ्रावशी अकादमीत पार पडलेल्या या उपक्रमात शेकडो जोडप्यांनी आवर्जून हजेरी लावली.

पावणेदोनशे जोडप्यांचा प्रतिसाद

कौटुंबिक कलहाच्या विविध कारणांमुळे तणावाशी झगडणारी अन् अत्यंत नाजूक अवस्थेत नाते येऊन ठेपलेली तब्बल १७० जोडपी या उपक्रमात हजर झाली. या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांनी समुपदेशन केल्यानंतर दिवसभरात उपस्थितांपैकी सुमारे ७० टक्के जोडप्यांचा प्रतिसाद मिळाल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनिल नंदवालकर यांनी दिली. ही समुपदेशकांनीही या सामाजिक कार्यात सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘गोरक्षा’ कार्यकर्त्यावर मालेगावात हल्ला

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील जुना आग्रा रस्त्यावरील नानावटी पेट्रोलपंपानजीक येथील गोरक्षा समितीचे कार्यकर्ते मच्छिंद्र शिर्के यांच्यावर सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास २५ ते ३० हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. यात शिर्के गंभीर जखमी झाले असून, त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर शहरातील कॅम्प रोड, तसेच जुना आग्रा रोड परिसरात तणावाचे वातावरण होते.

मच्छिंद्र शिर्के सोमवारी दुपारी टाटा सुमो (एम ३९/३२४) वाहनाने शहरातून गिरणापुलाच्या दिशेने जात असताना रस्त्यावरील नानावटी पेट्रोल पंपानजीक कामानिमित्त थांबले होते. त्याचवेळी मोतीबाग नाकाकडून मोटारसायकलवर आलेल्या २५ ते ३० अज्ञात हल्लेखोरांनी शिर्के यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांच्या वाहनाचीही तोडफोड करून ते पसार झाले. या घटनेची माहिती शहरात पसरल्याने घटनास्थळी शिर्के यांचे नातेवाईक, समर्थक व नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने तणावाचे वातावरण होते. हल्लेखोरांच्या अटकेसाठी जमावाने रास्ता रोको केले. मोसमपूल परिसरात नातेवाइकांनी ठिय्या मांडल्याने पुन्हा दुपारी वाहतूक कोंडी झाली होती.

छावणी पोलिस ठाणे परिसरात शिर्केंचे नातेवाईक, समर्थकांनी गर्दी केली होती, तर मोसमपूल परिसरात नातेवाइकांनी ठिय्या मांडल्याने पुन्हा दुपारी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी त्या नातेवाइकांना हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. रुग्णालय परिसरातदेखील गर्दी झाली होती. दिवसभर जुना आग्रा रोड परिसरात तणावाचे वातावरण कायम होते. शहरात मोठी पोलिस कुमक मागवण्यात आली होती. सायंकाळी उशिरा जिल्हा पोलिसप्रमुख अंकुश शिंदे देखील शहरात दाखल झाले. शिर्के यांना जबर मारहाण झाली असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांचा जबाब घेऊन छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. जिल्हा पोलिसप्रमुख शिंदे म्हणाले, की पोलिसांकडून घटनास्थळावरील दवाखाने, दुकाने यांची सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेण्यात आले आहे. त्याआधारे हल्लेखोरांचा तपास घेण्यात येत असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.

वैमनस्यातून हल्ला?

दरम्यान सोमवारी पहाटे मनमाड रोडवरील जळगाव चोंडी गावानजीक गोरक्षा समितीचे सुभाष मालू, मच्छिंद्र शिर्के व त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे मनमाडकडून मालेगावच्या दिशेने येणाऱ्या गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या पिकअप (एमएच १७/टी ७९०५) अडवून या वाहनावरील चालक शेख फारूक शेख शकील (वय २४, रा. इस्लामपुरा) व शेख फरीद अब्दुल रहीम यांना मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद तालुका पोलिस ठाण्यात चालक शेख फारूक यांनी दिली होती. तसेच त्यांच्यावर शहरातील खासगी रुगणालयात उपचार सुरू आहेत. गोरक्षा समितीचे सुभाष मालू यांनीदेखील गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार फिर्याद दाखल केली आहे. सोमवारी पहाटे झालेल्या या घटनेनंतर लगेचच शिर्के यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने वैमनस्यातून हल्ला झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्याला’ सांधायचीय भारत-पोलंडची संस्कृती

0
0

अरविंद जाधव, नाशिक

पोलंडचे क्षेत्रफळ महाराष्ट्राइतके. पोलंड म्हणजे खुल्या मैदानावर राहणारे लोक. या खुल्या मैदानातल्या एका ध्येयवेड्या शिक्षकाला आपल्या देशापेक्षा भिन्न असलेली भारतीय संस्कृती भावली. कुंभमेळ्याच्या निमित्ताने येऊन गेलेला हा शिक्षक भारतीय संस्कृतीच्या ओढीने पुन्हा नाशिकमध्ये येणार आहे. पोलंड आणि भारत या दोन्ही देशांच्या संस्कृतीला जोडण्याचा त्याचा ध्यास आहे. हा ध्येयवेडा शिक्षक आहे थॉमस वॅरवर. पोलंडमधील एका शाळेत तो विद्यार्थ्यांना सोशल सायन्सचे धडे देत आहे. त्याला पोलंडची संस्कृती भारताला नि भारताची संस्कृती पोलंडला द्यायची आहे. त्याची ही धडपड दोन देशांमध्ये सांस्कृतिक एकतेचा पूल सांधणारी ठरू पाहत आहे.

जगातील प्रत्येक देशाची संस्कृती- भाषा वेगवेगळी. भारतात संस्कृतीतले वैविध्य आढळते. ही सामाजिक जडणघडण समजून घेण्यासाठी हाडाचा शिक्षकच हवा. पोलंडमधील थॉमस याच धाटणीचा! भारतीय संस्कृती, येथील विविधेतील एकता त्याला भावते. छायाचित्र, पुस्तके, तसेच मुलाखतींच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान तो पोलंडवासीयांना देतो आहे. दुसरीकडे पोलंडचे समाजमन त्याला भारतीयांना दाखवायचे आहे. यासाठी लवकरच तो भारतात, नाशिकमध्ये येणार आहे.

पोलंड या छोट्याखानी देशात थॉमस एका शाळेत सोशल सायन्सचे धडे विद्यार्थ्यांना देतो. जगाची संस्कृती मुलांना समजण्यासाठी स्वतः परिपूर्ण असावे, अशी थॉमसची धारणा आहे. याच दृष्टिकोनातून त्याने भारताला चार वेळा, तर नाशिकला दोनदा भेट दिली. भारतातील संस्कृतीच्या अंगाने जाणारे प्रत्येक दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याची संधी तो सोडत नाही. नाशिकमध्ये २०१५ मध्ये त्याने भेट दिली होती. कुंभमेळ्याचे काही क्षण त्याने कॅमेऱ्यात टिपले. या दरम्यान त्याने काही व्यक्तींशी चर्चा केली. पोलंडमध्ये परतल्यानंतर त्याने ‘अलब्लॅग’ या शहरात फोटोचे प्रदर्शने भरवले. तिथे त्याने भारतीय संस्कृती, एकता, समाजव्यवस्था, वाढणारी शहरे याबाबत पोलंडवासीयांना अवगत केले. आता पुन्हा भारतात येण्यासाठी वेगळा प्लॅन आखला आहे. पोलंड देशाची माहिती भारतीय मुलांना समजावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्याने ‘मटा’शी बोलताना सांगितले. तो म्हणाला, ‘‘गेल्या वेळी मी नाशिक शहरातील पंचवटी एज्युकेशन संस्थेच्या शाळेला भेट दिली होती. आता पुन्हा शहरातील काही विद्यार्थ्यांशी, संस्कृती अभ्यासाची आवड असलेल्या व्यक्तींशी संवाद साधाणार आहे. अशा प्रदर्शनासाठी शाळा अथवा इतर संस्था इच्छुक असल्यास त्यांनी twyrwas@poczta.onet.pl या मेलआयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन थॉमसने केले आहे. थॉमसने गेल्या वर्षी पोलंडमध्ये भरवलेल्या चित्रप्रदर्शनची झलक http://inmi.pl/indie/299-wernisaz-wystawy-indyjskie-inspiracje.html या लिंकवर पाहता येऊ शकते.

मी आजवर अनेक देश फिरलो. मात्र, भारतीय समाजातील विविधता खूप भावते. या विविधतेत समाज एकसंध असून, त्याचा फायदा सर्वांना होतो हे महत्त्वाचे आहे. पोलंडमध्ये हा विषय खूप गांभीर्याने घेतला जातो आहे. आता मला पोलंडची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी असे वाटते. त्याला यश मिळेल, अशी अपेक्षा आहे.

- थॉमस वॅरवस, शिक्षक, पोलंड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजू शेट्टींचा भाजपला दणका, शिवसेनेला साथ

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

महापालिका निवडणुकीत मित्रपक्षांना गृहित धरून त्यांच्याशी शेवटच्याक्षणी जागावाटपाची चर्चा करणाऱ्या भाजपला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोरदार दणका दिला आहे. जागावाटपाची चर्चाच न करणाऱ्या भाजपची साथ सोडत स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेसोबत नाशिकमध्ये घरोबा केला आहे. त्यामुळे भाजपला मोठा हादरा बसला आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती केल्यानंतर महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही भाजपसोबत युती करायचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला होता. पण जिल्हा परिषद तसंच महापालिका निवडणुकीत जागावाटपात भाजपनं शेट्टी यांना विश्वासात घेतलं नाही. त्यांच्याशी जागावाटपाची साधी चर्चाही केली आहे. उलट युती नसताना भाजप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या फोटो प्रचारात वापरत असल्याचा आरोप युवा स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी केला. ग्रामीण भागात नोटाबंदी, शेतीमालाचे भाव तसच कांद्याच्या आंदोलनांबाबत भाजपविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भाजपनं जागावाटपाची चर्चाच न केल्यानं शेट्टी यांनी भाजपची जिरवण्यासाठी नाशिकमध्ये शिवसेनेसोबत नाशिक जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीसाठी युती केली आहे. शिवाय निवडणूक प्रचारात स्वाभिमानी संघटनेचा फोटो वापरत असल्याप्रकरणी भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याच्या हालचालीही स्वाभिमानीने सुरू केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा वाहतुकीसाठी दररोज रेल्वेच्या तीन रेक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गतवर्षीपेक्षा यंदा कांद्याचे दुप्पट उत्पादन झाले असून, त्याच्या वाहतुकीसाठी रेल्वेकडून पुरेशा रेक उपलब्ध होत नसल्याने व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कांदा वाहतुकीसाठी दररोज किमान चार ते पाच रेक मिळाव्यात अशी मागणी कांदा व्यापाऱ्यांकडून होत असून, रेल्वेने दररोज तीन रेक उपलब्ध करून देण्याबाबत बुधवारी संमती दर्शविली. त्यामुळे रेल्वेद्वारे होणाऱ्या कांदा वाहतुकीचा प्रश्न निकाली निघण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

नाशिकमध्ये यंदा कांद्याचे उत्पादन गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर कांदा पडून आहे. नाशिक जिल्ह्यात दररोज १३ रेक कांदा उपलब्ध होतो. मात्र, वाहतुकीसाठी केवळ दोनच रेक उपलब्ध होत आहेत. याउलट दररोज किमान चार रेक अपेक्षित आहेत. गेल्या १५ दिवसांत रेल्वेने कांदा वाहतुकीसाठी २९ रेक उपलब्ध करून दिल्या. गतवर्षी कांद्याचे उत्पादन कमी असताना याच कालावधीत ६० रेक उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. खरेतर यंदा १२० रेक उपलब्ध होणे आवश्यक होते. परंतु, निम्म्याहून कमी रेक पुरविण्यात आल्याने कांदा खराब होऊ लागला आहे. याबाबतची कैफियत कांदा व्यापाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांच्याकडे मांडली. यावेळी रेल्वेचे अधिकारी देखील उपस्थित होते.


रेक बिहारमध्ये अडकल्या

बिहारमधील फतुहा येथे नाशिकमधून कांदा पाठविला जातो. बहुतांश रेक तेथेच अडकून पडल्याने त्या उपलब्ध करून देण्यास मर्यादा येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सीतापूर, राणीपात्रा, डांकुनी, गौर माल्दा येथेही कांदा पाठवा. तेथून तो आसाम व तत्सम राज्यात पाठविणे सोपे जाईल, असा पर्याय पुढे आला आहे. दररोज तीन रेक कांदा वाहतूक करण्याबाबतचा सकारात्मक पर्याय देखील या बैठकीत पुढे आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोडसाळ विद्यार्थ्यांवर आता ‘वॉच’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शालेय परिघातील वाढत्या गुन्हेगारीचे चित्र बदलण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत खोडसाळ आणि हिंसक विद्यार्थ्यांच्या ब्लॅकलिस्टींगसह शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्यावर आणि कोपऱ्या-कोपऱ्यावर वॉच राहणार असल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिली. या संदर्भातील नियोजनाच्या सूचनाही त्यांनी बुधवारी मुख्याध्यापक अन् प्राचार्यांच्या बैठकीत बोलताना दिल्या.

काही दिवसांपूर्वी ओझरच्या एका शाळेत इयत्ता नववीतील तर पाठोपाठ पंचवटीतल्या एका शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याचा शालेय मुलांसोबतच्या वादातच खून झाल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनेमुळे शहरातील शैक्षणिक वर्तुळही चांगलेच हादरले होते. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांजवळ घातक शस्त्रेही सापडली होती.

भविष्यकाळात या प्रकारच्या घटनांना आळा बसावा यासाठी शिक्षण विभागाने गंभीर पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. या घटनांच्या नंतर शालेय परिघातील हिंसक किंवा अतिखोडसाळ विद्यार्थ्यांच्या ब्लॅक लिस्ट करण्याच्या नियोजनात उपसंचालक जाधव यांनी आणखी काही मुद्दयांची भर टाकली. शालेय शिस्त अबाधित रहावी व विद्यार्थ्यांवर विशेष वचक रहावा, यासाठी त्यांनी क्रीडा शिक्षकांना जबाबदारी सोपविली आहे. हाती येणाऱ्या ‘ऑफ’ तासिकेची सूत्रे आता क्रीडा शिक्षकांच्या हाती राहतील. या कालावधीत क्रीडा शिक्षकांनी शाळेच्या कानाकोपऱ्यात फेरी मारून विद्यार्थ्यांवर बारीक लक्ष ठेवणे अपेक्षित आहे. याशिवाय प्रत्येक आठवड्यातून एकदा अचानक शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी करून दप्तरात धारदार वस्तू वा शस्त्र नसल्याची खात्री करून घ्यावी. दर पंधरा दिवसांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत याच तपासणीची पुनरावृत्ती व्हावी. ब्लॅक लिस्टेड विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करून ताळ्यावर आणावे अशा नव्या जबाबदाऱ्या मुख्याध्यापक व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यांकडे नव्याने सोपविल्या आहेत.



दीडशे शाळांत प्रयोग

हा प्रयोग सुरुवातीला केवळ नाशिक महापालिका हद्दीतच राबविला जाणार आहे. शहरात मराठी व इंग्रजी माध्यमाच्या मिळून सुमारे दीडशे शाळा आहेत. यातील पाचवी ते बारावीच्या वर्गांसाठी हा प्रयोग राबविण्यात येईल. कालांतराने विभागीय स्तरावर याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी ‘मटा’ शी बोलताना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images