Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

उच्चशिक्षित महिलांचे प्रतिस्पर्ध्यांना आव्हान

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदा सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना पुरुष उमेदवारांच्या बरोबरीने उमेदवारी दिली आहे. काही मोठ्या पक्षांच्या संख्यावारीत पुरुष उमेदवारांपेक्षा महिला उमेदवारांचे प्रमाण जास्त आहे. त्यातही काही जागांवर उच्चशिक्षित महिला उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांसमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे महापालिका काबीज करण्यासाठी सर्वच पक्षांनी महिला कार्डचा आदरच राखल्याचे चित्र आहे.

यंदाच्या निवडणूक रणात सुमारे अडीचशेच्या आसपास महिला उमेदवारांची संख्या आहे. गेल्या निवडणुकांच्या तुलनेत यंदा निवडणूक रिंगणातील अनेक महिला उमेदवारांचा शिक्षणाचा स्तर उंचावला आहे. बहुसंख्य महिला उमेदवारांनी किमान दहावीचा स्तर ओलांडला असून बारावी, पदवीधर, पदव्युत्तर, व्यवसायाने डॉक्टर्स आणि इंजिनीअर्स महिलांनीही राजकीय रणात यंदा नशीब आजमावल्याचे चित्र आहे. प्रचाराच्या अखेरच्या तासापर्यंत रविवारी आपापल्या हद्दीतील सर्वच वॉर्ड अन् प्रभागांमध्ये अखेरच्या टप्प्यातील प्रचारावर भर दिला.

आरक्षणानुसार महिलांना राजकारणात किमान ५० टक्के संधी असली, तरीही महापालिकेच्या निवडणुकीत विविध पक्षांच्या राजकीय धोरणाने महिला उमेदवारीचे हे प्रमाण सुमारे ५२ टक्क्यांच्याही वर नेले आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या महिलांनीही काही प्रभागांमध्ये पुरुष उमेदवारांसमोर तोलामोलाचे आव्हान उभे केले आहे. तर सामान्य वर्गातील सुशिक्षित मतदारांशी साध्या पद्धतीने संपर्क साधून भूमिका मांडण्यावर सुशिक्षित उमेदवारांनी प्रचाराची रणधुमाळी संपेपर्यंत भर दिला. विविध प्रभागांमध्ये केवळ महिला मंडळेही स्वतंत्ररीत्या प्रचार करताना प्रचाराच्या कालावधीत आढळून आली. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या यादीतही पुरुष उमेदवारांपेक्षा यंदा महिला उमेदवारांची संख्या अधिक आहे.

नाशकातील महिला उमेदवारांची पक्षनिहाय स्थिती

शिवसेना (एकूण १२२ उमेदवार) – ६६ महिला आणि ५६ पुरुष

भाजप (एकूण १२० उमेदवार) – ६४ महिला आणि ५६ पुरुष

मनसे (एकूण १०२ उमेदवार) – ५३ महिला आणि ४९ पुरुष

काँग्रेस (एकूण ५० उमेदवार) – २६ महिला आणि २४ पुरुष

राष्ट्रवादी (एकूण ६२ उमेदवार) –३० महिला आणि ३२ पुरुष

माकप (एकूण १६ उमेदवार) – ६ महिला आणि १० पुरुष

बसप (एकूण ३६ उमेदवार) –१४ महिला आणि २२ पुरुष

भारिप (एकूण १८ उमेदवार) –६ महिला आणि १२ पुरुष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक महापालिका त्रिशंकूच्या दिशेने?

0
0


vinod.patil @timesgroup.com

नाशिक ः महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीआधी पिछाडीवर असलेल्या सत्ताधारी मनसेने शेवटच्या क्षणी काही प्रमाणात कमबॅक केल्याने महापालिकेची वाटचाल ही त्रिशंकूच्या दिशेने सुरू झाली आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शिवसेनेने आघाडी घेतली असून, भाजप मात्र प्राप्त परिस्थितीचा लाभ उठवून घेण्यात अपयशी ठरला असल्याचे चित्र आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेनंतर मनसे किंगमेकरच्या भूमिकेत असेल असे चित्र सध्या तरी दिसत असले, तरी महापालिकेत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळेल असे चित्र नसल्याने त्रिशंकू स्थिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्रिशंकू परिस्थितीत मनसे किंवा अपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराचा धुरळा रविवारी थंडावला. महापालिकेच्या १२२ जागांसाठी ८२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महापालिकेतील सत्ताधारी मनसेसमोर सत्ता टिकविण्याचे आव्हान आहे, तर शिवसेना-भाजपमध्ये ‘नंबर वन’साठी स्पर्धा सुरू आहे. निवडणुकीची प्रक्रिया ११ जानेवारीपासून सुरू झाली असली, तरी प्रचाराची रंगत शेवटच्या आठवड्यात खऱ्या अर्थाने वाढली. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पूर्ण १२२ जागांसाठी उमेदवार मिळालेले नाहीत. शिवसेनेला तर उमेदवार मिळूनही जवळपास १० उमेदवारांना पुरस्कृत करावे लागले. भाजपकडेही ११९ उमेदवार आहेत. राष्ट्रवादीचे ५४, काँग्रेसचे ४६, तर मनसेचे ९७ उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीमुळे राष्ट्रवादी व काँग्रेसने अगोदरच मान टाकून दिल्याने शिवसेना-भाजपमध्ये सत्ता मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. ४० पैकी २९ नगरसेवकांनी मनसेची साथ सोडल्याने मनसे या धक्क्यातून शेवटपर्यंत सावरलेली नाही.

भाजपला बंडोबांंची भीती

बंडखोरीचा सर्वाधिक फटका भाजपला बसला असून, निष्ठावंतांना डावलल्याने त्यांनीच पक्षाच्या विरोधात बंड ठोकले आहे. मोठ्या प्रमाणात ऐनवेळी पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहेत. उमेदवारी वाटप करताना दोन दोन लाख रुपये मागितल्याचा कार्यालयातील व्हिडीओ व्हायरल झाल्याने भाजपसमोरची संकटे वाढली आहेत. त्यातच उमेदवारी वाटपासाठी मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप भाजपेयींनीच केला आहे. बंडखोरांना थांबविण्यात पक्षाला अपयश आले असून, तीन आमदारांमधील द्वंद्व निवडणुकीतही थांबलेले नाही.


शिवसेनेत डॅमेज कंट्रोल

शिवसेनेत बंडखोरी झाली असली, तरी बहुतांश बंडखोरांना शांत करण्यात नेत्यांना यश आले आहे. परंतु, तिकीट वाटपावेळी झालेल्या हाणामारीने शिवसेनेलाही फटका बसला आहे. मात्र, तरीही शेवटच्या टप्प्यात शिवसैनिक एकवटला असल्याने व वरिष्ठ नेत्यांना डॅमेज कंट्रोल करण्यात यश आल्याने सेनेची स्थिती भाजपपेक्षा भक्कम आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेऊन नाशिकच्या निवडणुकीत अनुकूल वातावरण तयार केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आधीच तलवारी म्यान केल्या आहेत. त्यातच राज ठाकरेंनी जाहीर सभा यशस्वी करून भाजप व सेनेसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी तिरंगी वा चौरंगी लढती होऊन निकाल त्रिशकूंच्या दिशेने जाताना दिसत आहेत.


मनसे, अपक्ष किंगमेकर

महापालिकेच्या सध्याच्या स्थितीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असे चित्र दिसत नाही. त्यामुळे महापालिकेची अवस्था त्रिशंकू राहील, अशी स्थिती आहे. भाजप व सेनेत ‘नंबर वन’साठी चुरस असली, तरी सद्यस्थितीत शिवसेनेने त्यात आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजपला दोन नंबरवरच समाधान मानावे लागेल असे चित्र आहे. मनसेसुद्धा निर्णायक जागा मिळवणार असल्याने सध्या तरी त्यांच्याकडे किंगमेकर म्हणून पाहिले जात आहे. ५ ते ७ ठिकाणी अपक्षही निवडून येण्याची शक्यता असल्याने त्यांचीही भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे अपक्ष आणि मनसे महापालिकेत पुन्हा किंगमेकर ठरणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रोटी डे’ असता, तर गरीब उपाशी झोपला नसता...

0
0


म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भारतीय संस्कृतीत दारी येणाऱ्या याचकालादेखील अन्नदान करण्याची अगदी अनादी काळापासूनची परंपरा आहे. मात्र, आजच्या काळातील स्वार्थी बनत चाललेला माणसाला या गोष्टीची कुठेही जाणीव राहिलेली नाही. आपले असंख्य बांधव पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे भुकेलेल्यास अन्न द्यायचे सोडून विविध डे साजरे करीत पैशाची उधळपट्टी करताना दिसतात. गेल्या आठवड्यातही याचीच प्रचीती आली. मात्र, विविध डेज् साजरे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुजाण नागरिकांकडून ‘एखादा रोटी डे असता, तर गरीब उपाशी झोपला नसता...’ अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायर केल्या जात असल्याचे दिसून आले. त्यापासून बोध घेत समाजाप्रति काही तरी करण्याची करण्याची तळमळदेखील व्यक्त करण्यात आली.

प्रत्यक्ष कृतीची गरज

रस्त्याने म्हणा किंवा प्रवासात माणसांच्या गर्दीत हरवलेल्या उपेक्षितांच्या काही नजरा कायम भिरभिरत असतात. गर्दीतून वाट काढत हात पसरून या नजरा मदतीच्या याचना करतात, काही जण या हातांवर पैसे टेकवतात. मात्र, अनेकदा असे हात दुर्लक्षित होतात. ‘भिकारी’सारख्या हिणकस शब्दांनी त्यांना बाजूला सारत हेटाळणी केली जाते आणि अपमानजनक शब्दांचा मारा केला जातो. आज आपण लग्नामध्ये विविध पार्ट्यांमध्ये लाखो रुपयांचे मूल्य असलेले अन्न वाया घालवतो. निदान वाया जात असल्याचे पाहतो, तरी त्याकडे डोळेझाक करतो. हे वाया जाणारे अन्न वंचितांच्या चेहेऱ्यांवर हसू फुलविण्यासाठी पुरेसे ठरेल, असा साधा विचारदेखील डोक्यात येऊन जातो. मात्र, आता प्रत्यक्ष कृती व्हायलाच हवी, अशी सादही नेटिझन्सकडून घातली गेली. समाजातील काही समाजधुरिणांनी एकत्र येत व सोशल मीडियातून व्हायरल होणाऱ्या या पोस्टवर विचार करण्याची वेळ आली आहे. हे पाश्चात्य डेज््चे वारे बाजूला करून एखादा दिवस ‘रोटी डे’ म्हणून साजरा केल्यास तो प्रत्येकाच्या आयुष्यातील समाधानाचा दिवस ठरू शकेल हे तितकेच सत्य!


माणुसकीचे काय?

गेल्या आठवड्यात अनेकांनी चॉकलेट, टेडी, किस, हग, प्रपोज, रोज, प्रॉमिस, व्हॅलेंटाइन यांसारखे विविध डे साजरे केले. भारतीय संस्कृतीचे भान आजच्या समाजाला खरच राहिले आहे, की नाही, असा सवाल यामुळे निर्माण झाल्याचे दिसून आले. आपली नाती वृद्धिंगत करण्यासाठी वेगवेगळ्या दिवसांचे महत्त्व ठरवले गेलेय. मात्र, माणुसकीचे नाते बळकट करण्यासाठी कधी तरी ‘रोटी डे’ साजरा करण्याचे भान आजच्या तरुणाईसकट इतरांना का पडत नाही, असा सूरही सोशल मीडियावरून व्यक्त झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्षुधाशांतीसाठी गुरुद्वाराचा आसरा!

0
0


प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

महापालिका निवडणुकीच्या यशस्वीतेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्थेची चोख जबाबदारी बजावणाऱ्या पोलिस व गृहरक्षक दलासह होमगार्ड विभागाच्या कर्मचाऱ्यांना मात्र क्षुधाशांतीसाठी रविवारी आसरा घ्यावा लागला तो नाशिकरोडच्या बिटको कॉलेजशेजारील गुरू नानक साहेब गुरुद्वाराचा.

अनेकदा पोलिस कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताच्या निमित्ताने विविध गावी ये-जा करावी लागते. मात्र, स्थानिक पोलिस अपवादात्मक स्थिती वगळता कधीही अशा गुरुद्वारांमध्ये भोजनाचा आस्वाद घेत असल्याचे आठवत नाही. निवडणूक काळात गरज पडल्याने तातडीने अनेकांची सोय या पंजाबी बांधवांच्या लंगरमुळे झाल्याचे यानिमित्ताने दिसून आले.

प्रशासनात बंदोबस्ताचा महत्त्वाचा वाटा उचलणारी पोलिस यंत्रणा व होमगार्ड विभाग यांचेही तितकेच महत्त्व आहे. निवडणुकीत कुठलीही चूक होऊ नये, या उद्देशाने अन्य जिल्ह्यांतून बोलावण्यात आलेले होमगार्ड व पोलिस बांधवांना रविवारी सायंकाळपर्यंत बंदोबस्ताच्या जबाबदारी वाटपाचे काम सुरू होते. त्यामुळे दुपारी भोजनाची सोय होणार या उद्देशाने नाशिकरोडच्या पूज्य गुरू नानक साहेब गुरुद्वारा येथे राज्य राखीव दलाच्या पोलिसांसह होमगार्ड विभागाच्या दोन-अडीचशे कर्मचाऱ्यांनी सकाळी ११ पासूनच गर्दी केली. तेथे लंगरमध्ये दुपारचे भोजन आटोपून घेत कधी बंदोबस्त मिळतो याची वाट ते पाहत होते.

प्रशासकीय यंत्रणेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

निवडणूक म्हटली, की कामात टाळाटाळ करण्याची शासकीय कर्मचाऱ्यांची दिसणारी मानसिकता नवी नाही. मात्र, करड्या शस्तीचे संस्कार घडलेले पोलिस व गृहरक्षक दल अशी टाळाटाळ करताना दिसत नाहीत. मात्र, निवडणुकीसाठी इतर जिल्ह्यांमधून दाखल झालेल्या तब्बल दोन हजारांहून अधिक पोलिसांसह गृहरक्षक विभागाच्या कर्मचाऱ्यांची जेवणाची सोय करण्यात आली नव्हती का, असा प्रश्न गुरुद्वारामध्ये भोजन घेण्यासाठी असलेल्या एवढ्या अधिक कर्मचाऱ्यांना पाहून नाशिककरांच्या मनात निर्माण झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूलथापांना बळी पडू नका

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘मंदिर वही बनायेंगे’चा नारा देत हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम भाजपने केले असून, अशा जातीयवादी शक्तींना दूर करण्याची वेळ आली आहे. भूलथापा देत जनतेची फसवणूक करणाऱ्या पक्षाला निवडून देऊ नका, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.

वडाळारोड येथील प्रचारसभेत ते बोलत होते. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ एकमेव प्रचारसभा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतली. यावेळी आमदार विजय नवल पाटील, आमदार सुधीर तांबे, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर यांच्यासह उमेदवार उपस्थित होते. चव्हाण पुढे म्हणाले, की भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना विकासाचे घेणे-देणे नाही. नाशिक शहराचा विकास केवळ कॉँग्रेसमुळेच झाला. शहरातील महत्त्वाची कामे ही आमच्या काळात झाली असून, केवळ श्रेय लाटण्याचे काम दोन्ही पक्षांतर्फे केले जात आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. या सरकारने जनतेला काहीही दिले नसून, भ्रमनिरस केला आहे. शिवसेना आणि भाजप यांची मिलीभगत असून ‘आपण सारे भाऊ आणि मिळून मिसळून खाऊ’ असे यांचे धोरण आहे. सामान्य माणसांप्रमाणेच या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतीमालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडला आहे. संपूर्ण देशात नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नोटाबंदीच्या नावाखाली यांनी सामान्य माणसाचे हाल केले. कोणत्याही बॅँकेच्या रांगेत उद्योगपती दिसला नाही. हाल मात्र सामान्यांचे झाले. देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र व आपल्याला दारिद्र्य देण्याचे काम या सरकारने केले आहे. नाशिक शहरात तिकीट वाटप करताना कशाप्रकारे पैसे घेतले जातात हे आपण सर्वांनी पाहिले आहे. या लोकांना नाशिककर जनतेने १५ वर्षे सत्ता दिली या काळात विकास तर दूरच मात्र शहर अधोगतीला चालले आहे. आमचे सरकार सत्तेवर आल्यावर गरिबांना घरे दिले जातील, शहर सुंदर केले जाईल असे सांगण्यात आले होते मात्र ती अपेक्षा फोल ठरली.. आज रात्री भाजपाचे लोक तुम्हाला लक्ष्मीदर्शन करायला येतील त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. कुणाला भेटू नका ही संधी येणार नाही, खरे परिवर्तन घडवण्यासाठी काँग्रेेसलाच विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

गर्दी जमविण्यासाठी धावपळ

सभेला अडीच वाजता वेळ देण्यात आली होती. मात्र सभेला श्रोते उपस्थित नसल्याने ती पुढे ढकलण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी ज्याप्रमाणे भाजप कार्यकर्त्यांना धावपळ करावी लागली तशीच धावपळ काँग्रेस कार्यकर्त्यांना करावी लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाची तयारी पूर्ण

0
0

मालेगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २१) रोजी मतदान होत असून यासाठीची सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतदानासाठीचे साहित्याचे वाटप सोमवारी येथील प्रांताधिकारी कार्यालयातून नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात येणार आहे. तालुक्यात एकूण २७७ मतदान केंद्रे असून यातील ९४ संवेदनशील व निमगाव येथील ५ अतिसंवेदनशील केंद्र आहेत. प्रत्यक्ष मतदानासाठी ५५६ मशिन्स वापरण्यात येणार असून एकूण २८ मशिन्स राखीव ठेवण्यात आले आहेत. मतदान प्रक्रियेसाठी ७ हजार ५९४ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी अजय मोरे यांनी दिली .

नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. याठिकाणी प्रांत अजय मोरे व तहसीलदार डॉ सुरेश कोळी, नायब तहसीलदार जगदीश निकम, गिरीश वाखरे यांनी मतदान यंत्राचा वापर, मतदार ओळखपत्र, यंत्र तपासणी, मतदानप्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

तालुक्यात एकूण २७७ मतदानकेंद्र असून निमगाव येथील ५ केंद्र अतिसंवेदनशील असणार आहेत. मतदानप्रक्रियेसाठी क्षेत्रीय अधिकारी १८, मतदान केंद्राध्यक्ष – १,२२०, शिपाई ३०५, अतिरिक्त कर्मचारी अधिकारी ५१ असे एकूण १,५९४ अधिकारी, कर्मचारी कार्यरत असणार आहेत. सोमवारी यासाठी प्रांताधिकारी कार्यालयातून मशीन्स, शाई यासह अन्य साहित्याचे वाटप करण्यात येईल. मतदान केंद्रांवर पोहचण्यासाठी वाहनव्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी, तालुक्यातील सात गट व १४ गणांसाठी एकूण रिंगणात असलेल्या ९४ उमेदवारांचे भविष्य तालुक्यातील एकूण २ लाख ७१ हजार ४६८ मतदार मतदानाद्वारे निश्चित करणार आहेत.

निफाडला ३३९ केंद्रे

निफाड : तालुक्यातील दहा जिल्हा प‌रिषद आणि वीस पंचायत समितीच्या गणासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी

स्वाती थविल व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. विनोद भामरे यांनी दिली. निफाड तालुक्यात ३,२८,५६२ मतदार असून १,७२,४६३ पुरुष आणि १,५६,०९९ स्त्री मतदार आहेत. या निवडणुकीसाठी ३३९ मतदान केंद्रे असून निफाड विधानसभा मतदारसंघात २४८ तर येवला मतदार संघात ९१ मतदान केंद्रे असतील. केंद्रांसाठी वीस क्षेत्रीय अधिकारी नियंत्रण ठेवतील. एकूण ३५ पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. तर ६० मतदान यंत्रेही राखीव ठेवण्यात आली आहेत. आज (दि. 20) निवडणूक कर्मचाऱ्यांना सकाळी ८ वाजेपासून मतदान साहित्य ताब्यात देऊन बसेसद्वारे नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर पोहचवण्यात येणार आहे. तालुक्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. गुरुवारी (दि. २३) सकाळी १० वाजता निफाड येथील पिंपळगाव रोडवरील गणपतदादा मोरे महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे.

नांदगावला १४७ केंद्रे

मनमाड : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नांदगाव येथे प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. या निवडणुकीसाठी तालुक्यातील विविध मतदान केंद्रांवर सोमवारी दुपारनंतर सर्व कर्मचारी रवाना होतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सुलाने, सहाय्यक अधिकारी चंद्रकांत देवगुणे यांनी दिली.

तालुक्यात या निवडणुकीसाठी १४७ मतदान केंद्रे असून त्यातील ३४ केंद्रे संवेदनशील आहेत. या मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष ९८६ कर्मचारी कार्यरत असून त्यात १८ झोनल अधिकारी असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रांवर पोलिस कर्मचारी तैनात असणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. राहुल खाडे यांनी सांगितले.मतमोजणीसाठी एकूण १८ टेबल असतील व ६० अधिकारी, कर्मचारी असणार आहेत, अशीही माहिती प्रशासनाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चौरंगी’ लढतीत विजयमाला कुणाच्या गळ्यात?

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

शेवटच्या क्षणी पक्षनिष्ठा भिरकावून देत दुसऱ्याच पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात उडी, अशा अचंबित करणाऱ्या राजकीय परिक्रमांच्या रंगढंगाचे पैलू समोर आलेल्या येवला तालुक्यातील ‘झेडपी’च्या अंदरसूल गटाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे. निवडणूक रिंगणातील चौघा उमेदवारांमुळे या गटातील निवडणूक वरकरणी चौरंगी असली तरी एकंदरीत वातावरण बघता येथील निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना अन् भाजप उमेदवारांच्या भोवतालीची ‘तिरंगी’ लढत असल्याचे संकेत समोर येत आहेत. या लढतीत विजयमाला नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार? याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

जिल्हा परिषदेच्या गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुका या माजीमंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांच्याभोवती फिरताना तालुक्यातील भुजबळरुपी बळ दोन्ही निवडणूक निकालातून समोर आले होते. ‘झेडपी’चा अंदरसूल गट हा गेल्या दोन्ही निवडणुकात गटातील भुजबळ अन् पर्यायाने घड्याळाची ताकद दर्शवून गेला होता.

मात्र, यावेळेस भुजबळांच्या अनुपस्थितीत निवडणुकीला सामोरे जाताना तालुक्यातील बऱ्याच गट व गणातील अनेक राजकीय स्थित्यंतरे व तिरक्या चालीच्या राजकारणाचे पैलू समोर येत आहेत. त्यामुळेच आता या गटातील राजकीय लढाई लक्षवेधी ठरली आहे. छगन भुजबळ यांचे कट्टर अनुयायी मकरंद सोनवणे हे राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागता मागता अचानक शिवसेनेत प्रवेशकर्ते झाले. सोनवणे यांनी अचानक शिरकाव केल्याने गेली काही वर्षे या गटातील अनेक गावात जनतेच्या प्रश्नांसाठी अग्रेसर असणाऱ्या बाबासाहेब डमाळे यांची ऐनवेळी गोची झाली. गटात सेनेची उमेदवारी आपल्याच अशी ठाम खात्री बाळगत निवडणुकीच्या दृष्टीने गटात चांगलीच तयारी केलेल्या डमाळेंनी भाजपची वाट धरली.

उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच समोर आलेल्या राष्ट्रवादीने तालुक्यातील पक्षाचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांचे कट्टर समर्थक तथा येवला पंचायत समितीचे माजी सभापती महेंद काले यांच्यारूपाने ‘घड्याळ’ समोर केले आहे. राष्ट्रवादीचे तालुक्यातील ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे हे या गटात आपले पुत्र शाहूराजे यांच्या उमेदवारीसाठी इच्छुक दिसत होते. मात्र, राजकीय खेळीच्या तिकिटवाटपात शिंदेंचा पत्ता कापला गेला.

शिंदेनी अपक्ष दाखल करून ठेवलेला गटातील उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी गटातील माणिकरावांची ताकद आणि अनेक गावात सादेला तत्काळ प्रतिसाद देणाऱ्या कार्यकर्त्यांचे मोठे मोहोळ आहे. ही ताकद लक्षात घेतली तर या अंदरसूल गटातील निवडणुकीत शिंदे ऐनवेळी नेमके कुठली खेळी खेळतात यावरही गटाच्या निकालाचे चित्र अवलंबून असणार आहे. काँग्रेसने या गटात पक्षाचे निष्ठावंत रावसाहेब लासुरे यांना ‘हात’ देत मैदानात पुढे केले आहे.

अंदरसूल गट आजवरच्या अनेक निवडणुकातील निकालातुन ‘कास्ट’ फॅक्टरचा प्रभाव कुठेना ना कुठे प्रतिबिंबीत करून गेल्याचे दिसत होते. यावेळच्या निवडणुकीतही तशी चर्चा झडू लागल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे महेंद्र काले, भाजपचे बाबासाहेब डमाळे, सेनेचे मकरंद सोनवणे व काँग्रेसचे रावसाहेब लासुरे यांच्यातील ‘लक्षवेधी’ अन् ‘लक्ष्यवेधी’ चौरंगी लढतीत २१ तारखेच्या मतदानाला सामोरे जाताना ‘झेडपी’च्या या अंदरसूल सर्वसाधारण गटाचा निकाल नेमका काय लागणार, याची सर्वांनाच मोठी उत्कंठा आहे. नव्हे तर, एकप्रकारे आजवर शितावरून भाताची परीक्षा करणारे या गटातील मतदार कोणाला कौल देणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान केंद्रांजवळील नागरिकांनो सावधान!

0
0

नाशिक : मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतरात असलेल्या व्यावसायिकांची तसेच रहिवासी क्षेत्रातील नागरिकांची नोंद पोलिसांकडून केली जात आहे. विशेषतः संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्राजवळ अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. एखाद्या घरात ठराविक पक्षांचे कार्यकर्ते आढळून आले, तर संबंधित घरमालकावर जबाबदारी निश्चित करून कारवाईलाही सामोरे जावे लागणार आहे. पोलिसांनी प्रथमच असे पाऊल उचलले आहे.

शहरात एकूण एक हजार ४०८ मतकेंद्र असून, त्यातील ४४२ ठिकाणांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. यात २७९ संवेदनशील, ८६ अतिसंवेदनशील व ७७ क्रिटीकल केंद्रांचा समावेश आहे. एकूण केंद्राच्या तब्बल ३१ टक्के केंद्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पोलिस बंदोबस्ताचे नियोजन सुरू असून, याच पार्श्वभूमीवर नागरिकांच्या नावांची नोंद पोलिस दप्तरी केली जात आहे.

संवेदनशील, अतिसंवेदनशील तसेच क्रिटीकल अशा वर्गवारीनुसार मतदान केंद्र घोषित करताना पूर्व इतिहास बघितला जातो. गोंधळ किंवा इतर प्रकार टाळण्यासाठी मतदान केंद्राबाहेर १०० मीटरपर्यंत रस्ते अडवले जातात. मात्र, मतदान केंद्राजवळ रहिवासी क्षेत्रासह व्यावसायिक दुकानेसुध्दा असतात. काही मतदान केंद्रे तर थेट रस्त्यावरच आहेत. तेथे रस्ता बंद होऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतरात राहणाऱ्या नागरिकांची नोंद घेतली जात आहे. मतदानाच्या दिवशी राजकीय कार्यकर्ते सदर ठिकाणांचा गैरवापर करणार नाही, या दृष्टीने लक्ष ठेवण्यात येणार आहे. सदर घरमालकांना तसेच व्यावसायिकांना समजवण्यात आले असून, राजकीय कार्यकर्त्यांच्या वावर यामुळे नियंत्रित ठेवण्यात येईल, असा दावा पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी केला. काही मतदान केंद्राजवळ आवश्यकतेनुसार बॅरिकेडिंग केली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

मतदान केंद्रासह परिसरात व्हिडीओ कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. मतदान केंद्र परिसरात असलेले दगड गोटे व इतर संशयास्पद वस्तू हलवण्यात आल्या आहेत. दरम्यान, मतदानाच्या दिवशी मतदारांना मोफत वाहतुकीचे प्रलोभन दाखवण्यात आले, तर उमेदवारांवर थेट कारवाई होणार आहे. नागरिकांना तक्रारी असल्यास त्यांनी नजिकच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा.

- लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कांदा वेळेत पोहचविण्यासाठी विशेष मालगाडी

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

यंदा नाशिकमध्ये कांद्याचे पीक दुपटीने आल्याने हा कांदा बाजारपेठेत वेळेवर पोहचविण्यासाठी रेल्वेने विशेष मालगाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचा कांदा सडण्यापूर्वीच तो बाजारपेठेत पोहचला जावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या रेल्वे चार मालगाड्या चालवते. त्यातील तीन गाड्या मध्यरेल्वेवर आणि एक गाडी दक्षिण मध्य रेल्वेवर चालविण्यात येतात. आता त्यात आणखी एका मालगाडीची भर पडणार आहे. ३० टक्के कांदा वाहून नेण्याची या मालगाडीची क्षमता असेल. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची संमती मिळताच लगेचच ही विशेष मालगाडी सुरू करण्यात येणार असल्याचं रेल्वेच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. सध्या मालगाडीमध्ये कांदा वाहून नेण्यासाठी केवळ चार डब्बे देण्यात आले होते. आता २० फेब्रुवारीनंतर विशेष मालगाडी चालविण्यात येणार असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कांदा बाजारपेठेत पोहचविता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार परिचारकांच्या पुतळ्याचे दहन

0
0

धुळ्यात शिवसेनेकडून कारवाई करण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

भारतीय सैनिकांचा आणि त्यांच्या पत्नीचा अपमान करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या आमदार प्रशांत परिचारकांची राजकारणातून हकालपट्टी करा तसेच त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करीत शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. २०) भाजप आमदार प्रशांत परिचारक यांचा प्रतीकात्मक पुतळा शहरातील महाराणा प्रताप चौकात जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.

आमदार परिचारक हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. सोलापूर येथे भाजप आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत त्यांनी असभ्यपणे हे वक्तव्य केले. विशेष म्हणजे, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या एकाही नेत्याने आमदार परिचारकांना थांबविले नाही. त्यांनी त्यांची चूक लक्षात आणून दिली नाही. भारतीय सैनिक आणि त्यांच्या पत्नीबाबत वक्तव्य करून त्यांनी भारतीय सैनिकांचा आणि तमाम महिला वर्गाचा अपमान केला आहे. त्यांच्याविरोधात पोलिसात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. झाल्याप्रकाराबाबत आमदार परिचारक यांनी माफी मागितली आहे. मात्र त्यांनी केलेल्या वक्तव्य हे त्यांची विकृत मानसिकताच दाखविते. अशा लोकांना घेवून भाजप नितीमत्तेचे धडे कोणत्या तोंडाने लोकांना देत आहे, असा सवाल शिवसेनेने केला आहे.

भाजपने आपल्या पक्षाची अब्रू वाचविण्यासाठी परिचारक यांची आमदारकी काढून घेत त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महेश मिस्तरी, सुनील बैसाणे, भटू गवळी, पंकज गोरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध दारूविक्रीचे १०३ गुन्हे

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर झाल्यापासून आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्काने दारूबंदीचे तब्बल १०३ गुन्हे दाखल केले. यामध्ये तब्बल १५ लाख ८५ हजारांची दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत ७८ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्काने महापालिकेच्या मदतीने ही कारवाई केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने महापालिकेने शहरात अवैध दारू विक्रीसंदर्भात मोठी कारवाई केली. यात ९०० लिटर गावठी दारू, ५७८ लिटर देशी दारू, ३०४ लिटर विदेशी दारू, ७२ लिटर रसायन आणि सहा वाहने जप्त करण्यात आली आहे. यात सुमारे १५ लाख ८५ हजारांचा माल जप्त करण्यात आला.

पैसे वाटपाच्या दोन तक्रारी
आचारसंहिता कक्षाकडे पैसे वाटपाच्या दोन तक्रारी दाखल झाल्या असून त्याची चौकशी सुरू आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या कॉपवर पाच तक्रारी प्राप्त झाल्या असून व्हॉट्सअॅप क्रमांकवर एक तक्रार दाखल झाली आहे. प्रभाग सहा व २० मध्ये पैसे वाटपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याच्यावर भरारी पथकांमार्फत चौकशी सुरू झाली आहे.

पिंपळगावला छापा
पिंपळगाव बसवंत येथे राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाचे दुय्यम निरीक्षक प्रकाश अहिरराव आणि पिंपळगाव पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक सुनील कराळे यांच्या पथकाने पहाटे तीन वाजेच्या सुमारास पिंपळगाव येथील जोपूळ रोडवर एका शेतातील पडीत घरामध्ये छापा मारला. येथे प्रिन्स संत्रा या देशी दारूच्या ५२८ सिलबंद बाटल्या तसेच विदेशी मद्याच्या ५४८ बाटल्या असा एक लाख पाच हजार ६०० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. मात्र, आरोपी फरार झाले. घरमालक आणि जागामालकाचा पिंपळगाव पोलिस शोध घेत आहेत. या कारवाईत उत्पादन शुल्कचे निरीक्षक आय. एन. वाघ, दुय्यम निरीक्षक प्रकाश अहिरराव तसेच उपनिरीक्षक सुनील कडाळे, दुय्यम निरीक्षक एम. डी. गरूड, संतोष कडलग, मुस्तफा तडवी ,सोन्याबापू माने, हवालदार जाधव, मोठ्याभाऊ पवार आदी सहभागी झाले.

तीन कर्मचाऱ्यांच्या तक्रारी
चारसंहिता कक्षाकडे आचारसंहिता भंग प्रकरणी महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात योगेश कमोद, अरुण मोरे आणि भास्कर वंदावते यांचा समावेश आहे. यातील वंदावते याच्या तक्रारीत तथ्य नसून उर्वरीत दोघांची चौकशी सुरू आहे. दोघांनाही नोटिसा पाठविल्या असून त्यांच्याकडून अद्याप खुलासा सादर करण्यात आलेला नाही.

जनलक्ष्मीची तक्रार
प्रभाग सातमध्ये एका उमेदवाराच्या प्रचारासाठी जनलक्ष्मी बँकेचे वाहने वापरली जात असल्याची तक्रार झाली होती. या प्रकरणी बँकेकडून खुलासा प्राप्त झाला असून तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. तसेच संबंधित तक्रार अधिक चौकशीसाठी सहकार विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेवटच्या टप्प्यात आघाडीला सुरुंग

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला अवघे काही तास बाकी असताना प्रभागातील आघाडीला सुरुंग लागल्याचे चित्र बहुतांश प्रभागांत दिसत होते. शेवटच्या टप्प्यात उमेदवारांनी फक्त आपल्याला मत द्यावे, यावर भर देत आपल्या साथीदारांना वाऱ्यावर सोडून दिले. त्यामुळे मतदारांचाही गोंधळ उडाल्याचे चित्र काही ठिकाणी होते. मात्र, प्रबळ पक्षांनी पॅनलप्रमाणेच मतदानाचा आग्रह धरत सर्वांनाच विजयी करण्याचे आवाहन केले. महापालिकेत पक्षांनी प्रभागनिहाय चार उमेदवार दिले आहेत, तर काही ठिकाणी अपक्ष व मित्र पक्षांनी एकत्र येत आघाडी केली आहे. त्यामुळे एका प्रभागातील चार प्रवर्गांतील मते एकाच पॅनलला मिळणार नसल्याचे लक्षात येताच उमेदवारांनी आपली व्यूहरचना बदलत मला तुमचं एक मत द्या, अन्य तीन मते तुम्ही कोणालाही द्या, असा पवित्रा घेतला आहे.

उमेदवारी, प्रचारसभा, रॅलीने प्रचाराची सांगता झाल्यानंतर आता प्रभागाचे चित्रही समोर येऊ लागले आहे. अनेक ठिकाणी भाग, संबंध, मैत्री व जातीचा उमेदवार यामुळे एकाच पॅनलला मते मिळणे अवघड असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उमेदवारांची चलबिचलही सुरू झाली आहे. बदलल्या समीकरणांमुळे काही उमेदवारांनी ‘मलाच मत द्या’चा नारा बुलंद केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऐन निवडणुकीत जातीचा जोर वाढल्यामुळे अनेकांचे धाबेही दणाणले आहे. सुरुवातीला जातीचा फारसा प्रभाव राहणार नाही असे चित्र होते. कामावर व पक्षावर मतदान होईल, असाच सर्वांचा अंदाज होता. मात्र, काही प्रभागांत संपूर्ण निवडणूक वेगळ्या वळणावर गेल्यामुळे या निवडणुकीचे गणितही बदलण्याची शक्यता आहे.

भागाचाही प्रभाव

प्रभागामध्ये आपल्या भागाचाच नगरसेवक व्हावा, यासाठी अनेकांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे इतर उमेदवारांसमोर पेच निर्माण झाला आहे. या नव्या प्रकारामुळे प्रादेशिक वादासारखा प्रश्न प्रभागात उभा राहिल्यामुळे चांगल्या उमेदवाराला त्याचा मोठा फटका बसणार आहे.

दोन त्यांना, दोन तुम्हाला

शेवटच्या टप्प्यात मतदार स्पष्ट बोलू लागल्यामुळे ‘दोन त्यांना, दोन तुम्हाला’ असे वाक्य प्रभागात ऐकू येऊ लागल्यामुळे अनेकांचे गणित बिघडले आहे. त्यामुळे दोन मतांवर दोन म्होरके कमकुवत ठरले तर त्याचा फटका इतरत्र बसू शकतो, याचे गणित मांडणे दिवसभर सुरू होते.

पैशांचाही जोर वाढला

शेवटच्या टप्प्यात पैशांचा जोर वाढल्यामुळे अनेकांचे गणित बिघडले आहे. काही उमेदवारांनी एका मतासाठी मोठी रक्कम देण्याचेही कबूल केल्यामुळे इतर उमेदवारांची झोप उडाली आहे. त्यामुळे त्याला कसा प्रतिबंध करता येईल, यासाठी काहींनी वॉच ठेवण्याचे काम सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओळखपत्रासाठी मतदारांच्या रांगा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मतदान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असला तरी त्यासाठी आवश्यक असते मतदार ओळखपत्र. अनेकांची नावे मतदार यादीत असली तरी त्यांच्याकडे ओळखपत्रच नाहीत. अशा शेकडो मतदारांनी सोमवारी तहसील कार्यालयांमध्ये ओळखपत्र मिळविण्यासाठी गर्दी केली.

नाशिक तालुक्याची निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील तहसील कार्यालयात राबविण्यात आली. अर्ज स्वीकृती, अर्ज छाननी, अर्ज माघारी आणि चिन्ह वाटप यांसारख्या निवडणुकीच्या कामकाजामुळे तहसील कार्यालयात मतदार ओळखपत्र वितरणाचे काम बंद ठेवण्यात आले. अर्ज माघारीच्या दिवशी तहसील कार्यालयाच्या आवारात पोलिस बंदोबस्त तैनात होता. तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार आणि काही कर्मचारी कार्यालयाच्या बाहेरच तळ ठोकून होते. मतदार ओळखपत्र घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कार्यालयात जाण्यास मज्जाव केला. हात हलवित माघारी फिरावे लागल्याने नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण होत होते. मतदानापूर्वीची निवडणूक प्रक्रिया पार पडल्याने आता ओळखपत्र प्राप्त करण्यासाठी मतदारांची जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी होऊ लागली आहे. सोमवारी सकाळपासून तहसील कार्यालय फुल्ल भरले होते.

कामकाज धिम्या गतीने
तहसील कार्यालयाची यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त असल्याने ओळखपत्र वाटप बंद होते. मतदारांना ओळखपत्र मिळविण्यासाठी सोमवारीही किमान प्रतीक्षा करावी लागली. त्यांनी या कार्यालयाबाहेर रांगा लावल्या. अनेक कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नेमणूक झाल्याने या शाखेमध्ये मनुष्यबळ अपुरे होते. त्यामुळे कामकाज धिम्या गतीने सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीचे उमेदवार अब्जाधीश

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यामधील मालेगाव तालुक्यातील निमगाव गटात भाजपकडून उमेदवारी करणारे जगन्नाथ दशरथ हिरे यांची मालमत्ता तब्बल १७१ कोटींची आहे. ते राज्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. राज्यातील पहिल्या १० श्रीमंत उमेदवारांमध्ये नाशिक जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे.

राज्यात १३ जिल्हा परिषदांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत २,९५६ पैकी १,९२९ उमेदवारांच्या मालमत्तेचा गोषवारा एडीआरच्या वेबसाईटवर प्राप्त झाला आहे. यामध्ये ४८० उमेदवार कोट्याधीश असून त्यापैकी १० उमेदवारांची संपत्ती प्रत्येकी २८ कोटींहून अधिक आहे. राजकारणात सक्रिय असणाऱ्या व्यक्तींची संपत्ती हा सामान्य नागरिकांसाठी नेहमीच कुतुहलाचा विषय ठरला आहे. डोळे विस्फारतील एवढी संपत्ती उमेदवारांकडे असते. यंदा प्रथमच या संपत्तीचा तपशील मतदान केंद्राबाहेर लावणे निवडणूक आयोगाने प्रशासनाला अनिवार्य केले. राज्यात मंगळवारी, २१ फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात १३ जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. ६५४ जागांसाठी दोन हजार ९५६ उमेदवारांनी दंड थोपटले आहेत. त्यापैकी १ हजार ९२० उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण महाराष्ट्र

इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी केले आहे. त्यानुसार, २८ कोटींहून अधिक संपत्ती असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

मालेगावातील निमगाव गटात भाजपकडून उमेदवारी करणाऱ्या जगन्नाथ हिरे यांनी आपली मालमत्ता १७० कोटी ९९ लाख ८५ हजार ४१४ रुपये इतकी असल्याचे जाहीर मेले आहे. त्यामध्ये १६९ कोटी ८१ लाख ५५ हजार ७४४ रुपयांची

स्थावर मालमत्ता आहे. तर एक कोटी १८ लाख २९ हजार ६७० रुपये ही चल मालमत्ता असल्याचे दर्शविण्यात आले आहे. याखेरीज नाशिक जिल्ह्यात आणखी दोन उमेदवार करोडपती आहेत.

सौंदाणे गटातील भाजपच्याच उमेदवार मनीषा रत्नाकर पवार यांची मालमत्ता ५६ कोटी ५३ लाख ४९ हजार ५८६ रुपये एवढी असून त्यांच्यावर नऊ कोटी ४० लाखाचे कर्ज आहे. तर पालखेड गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मंदाकिनी दिलीप बनकर यांची मालमत्ता ३६ कोटी ५९ लाख ५३ हजार ४३५ रुपये एवढी दर्शविण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील तीन तर सातारा जिल्ह्यातील दोन उमेदवार कोट्याधीश आहेत. पुणे आणि रायगडातील प्रत्येकी एक उमेदवार कोट्याधीश आहेत.

राष्ट्रवादी सर्वाधिक श्रीमंत
पक्षनिहाय विचार केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक चार उमेदवार कोट्याधीश असून त्याखालोखाल भाजपचे तीन उमेदवारांनी आपली संपत्ती काही कोटींमध्ये असल्याचे जाहीर केले आहे. दोन अपक्ष तर काँग्रेसच्या एका उमेदवाराकडे ३२ कोटी ८० लाख रुपयांची संपत्ती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा दवाखान्यात गर्भपाताचा गोरखधंदा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
अवघे तीस हजार रुपये घेऊन बेकायदा गर्भपात करणाऱ्या एका डॉक्टरचे प‌ितळ उघडे पडले आहे. ओझर आणि मुंबई नाका अशा दोन ठिकाणी सदर डॉक्टर बऱ्याच दिवसांपासून हा उद्योग करीत असल्याचे समोर आले असून, पोलिसांच्या चौकशीनंतर मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. बेकायदा दवाखान्यात चुकीच्या पध्दतीने गर्भपात झालेल्या एका महिलेवर सुरू झालेल्या उपचारानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
डॉ. बळीराम निंबा शिंदे असे संशयित डॉक्टरचे नाव असून, त्याचे मुंबई नाका परिसरात शिंदे हॉस्पिटल नावाचा बेकायदा दवाखाना आहे. बेकायदा गर्भपात रोखण्यासाठी महापालिकेतर्फे सातत्याने हॉस्पिटलची तपासणी केली जाते. १७ फेब्रुवारी रोजी आरोग्याधिकारी डॉ. विजय नथुजी डेकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आरती शेखर चिरमाडे, डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ. प्रशांत शेटे आदींचे पथक संशयित डॉक्टर शिंदे यांच्या दवाखान्यात पोहचले होते. मात्र, येथे आंतररूग्ण पेशंट नसून, फक्त संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत पेशंट तपासले जातात, अशी माहिती डॉ. शिंदे यांनी दिली. एवढेच नव्हे तर तपासणी पथकास इमारतीची पाहणी करण्यास मज्जाव केला. मात्र, तपासणी पथकाने शिंद यांचा विरोध मोडून काढत आपले काम केले. यात सदर दवाखाना किंवा हॉस्पिटलची नोंदणी नसून, पहिल्या मजल्यावर एक महिला उपचार घेत असल्याचे दिसले. सदर महिला पेशंटच्या रिपोर्टबाबत विचारणा केली असता तिच्या पोटात रक्ताची गाठ झाल्याने तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. मात्र, यावेळी महिला पेशंटने तपास पथकास उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासणी सुरू असताना संशयास्पद व्यक्तींची संख्या वाढल्याने महापालिका डॉक्टरांनी तेथून काढता पाय घेतला व याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला. यानंतर, महापालिका प्रशासनाने संबंध‌ित महिला पेशंटवर तातडीने शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. विजय थोरात (एम. एस. सर्जन), डॉ. सचिन जाधव (रेडिओलॉजिस्ट) आणि डॉ. विजय पिंचा (भूलतज्ज्ञ) यांना नोटीस देऊन बोलावून घेतले. अर्थात, या डॉक्टरांनी इमर्जन्सीमुळे उपचार करण्यास प्राधान्य दिले. दरम्यान, या डॉक्टरांच्या चौकशी व लेखी जबाबानुसार डॉ. शिंदे हे बेकायदेशीर गर्भलिंग व गर्भपात करीत असल्याचा ठाम विश्वास महापालिका डॉक्टरांना झाला. त्यानुसार, महापालिका पथक पोलिसांसह शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शिंदे हॉस्पिटल येथे पोहचले. यावेळी उपस्थित काही कर्मचाऱ्यांनी महिला पेशंटला झाला प्रकार सांगू नये, यासाठी दमबाजी करीत डॉ. शिंदे यांना पाचारण केले. मात्र, शिंदे आले नाहीत. यानंतर, महापालिका डॉक्टरांनी संबंध‌ित महिलेस उपचारासाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटल सील करण्याची प्रक्रिया सुरू असताना डॉ. शिंदे यांनी तेथे येऊन महापालिका डॉक्टरांना शिवीगाळ करीत गोंधळ घातला. याप्रकरणी डॉ. विजय डेकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डॉ. शिंदे यांच्या विरोधात बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात करणे, सरकारी कामात अडथळा आणून शिवीगाळ करणे, तसेच मुंबई सुश्रूषा अधिनियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
ओझर येथे गर्भपात
डॉ. शिंदे यांचे ओझर येथे हॉस्पिटल आहे. याच ठिकाणी गर्भपात केला जात असल्याचे महापालिका प्रशासनाच्या चौकशीत पुढे आले आहे. अवघ्या ३० हजार रुपयांमध्ये असुरक्षित पध्दतीने गर्भपात केला गेला. यामुळे महिलेच्या जीवावर बेतले होते. महापालिका तपासणी पथकाने वेळेवर पोहचून संबंध‌ित महिलेवर उपचार केले नसते तर तिच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. डॉ. शिंदे हा उद्योग बऱ्याच दिवसांपासून करीत असल्याचा संशय आहे.

मटा भूमिका
गर्भलिंग तपासणीविरोधात सरकारने कठोर कायदे केलेले असताना व बीड घटनेनंतर अनेक डॉक्टरांना जेलची हवा खावी लागल्यानंतरही वैद्यकीय व्यवसायातील लोक सुधारण्यास तयार नाहीत, हेच डॉ. शिंदे प्रकरणातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. त्यांनी कायदा भंग करतानाच तपासणी करण्यास आलेल्यांना धमकावले देखील. हे म्हणजे चोर, तर चोर वर शिरजोर या प्रकारातील झाले. हे महाशय डॉक्टर नसून, कसाई आहेत याची प्रचिती आली. समाजसेवक म्हणून मिरवणाऱ्या अशा डॉक्टरांविरोधात त्यांच्या संघटनांनी सुध्दा आता ठामपणे उभे ठाकले पाहिजे; अन्यथा आधीच संशयाच्या भोवऱ्यात सापडलेला वैद्यक व्यवसाय पुरता बदनाम होईल. रुग्णाच्या विश्वासाला तडा जाणार नाही एवढीही काळजी पैशांसाठी अंध झालेले डॉक्टर घेणार नसतील तर अशांची जागा ही तुरुंगातच आहे, हे त्यांना ठणकावून सांगण्याची गरज आहे, तरच त्यांना जरब बसू शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातपूर विभागात ९२४ कर्मचारी

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्यांदाच एका प्रभागात चार उमेदवार अशी निवडणूक होत आहे. त्यातच सर्वच पक्षांनी उमेदवार दिल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. मतदानप्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांची सोमवारी मतदान साहित्य घेण्यासाठी लगबग दिसून आली. सातपूर विभागात प्रभाग ८, ९, १० व ११ हे प्रभाग आहेत. या चार प्रभागांसाठी १५४ मतदान केंद्रांवर पोलिसांसह ९२४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातपूर क्लब हाऊस येथेच गुरुवारी, २३ फेब्रुवारी रोजी सातपूर विभागाची मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भालचंद्र बेहेरे यांनी सांगितले.

मतदान केंद्रच बंद

मतदानाचे साहित्य घेऊन अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आलेल्या ठिकाणी हजर झाले होते. यात सातपूर कॉलनीतील आठ हजारात असलेल्या मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचारी गेले असता, केंद्रच बंद असल्याचे समोर आले. यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांना फोन केल्यावर केंद्र उघडण्यात आले. मात्र, केंद्रात टेबल व खुर्च्यांची व्यवस्था नसल्याचेही समोर आले. काही केंद्रांवर वीजपुरवठाच नसल्याचेही समोर आले.

दृष्टिक्षेपात सातपूर विभाग

१५४ मतदान केंद्रे
९२४ कर्मचारी
२३ फेब्रुवारीला सातपूर क्लब हाऊसमध्ये मतमोजणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

याद्यांच्या घोळामुळे वाढला संभ्रम

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेच्या मतदार याद्यांमधील नावांचा घोळ शेवटी मतदानाच्या आदल्या दिवशी पुन्हा उफाळून आला आहे. नाशिकरोड व पंचवटीत अनेक ठिकाणी नावे शोधण्यासाठी मतदारांना तारेवरची कसरत करावी लागत असून, अनेक मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागात असल्याचे समोर आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. नाशिक रोड येथे काही बुथ ऐनवेळी बदलण्यात येऊन मतदान चिठ्ठ्यांचे चुकीच्या पद्धतीने वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी असून नागरिकांसाठी सोमवारचा दिवस नावे शोधण्यासाठी त्रासदायक ठरला.
महापालिका निवडणुकांसाठी मंगळवारी मतदान होत असून प्रशासनाने मतदार यांद्यामध्ये घातलेल्या गोंधळाने उमेदवारांसह मतदारही त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने मतदारांना आपली नावे शोधण्यासाठी व हरकती घेण्यासाठी आठ दिवसांचा वेळ दिला होता. परंतु, या वेळेत निष्काळजीपणा केल्याचा फटका मतदारांना बसत आहे.
फ्लेक्सवर झळकल्या कुंडल्या
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे महापालिकेने प्रत्येक मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या कुंडल्या मांडल्या आहेत. त्यासाठीची व्यवस्था सोमवारीच पूर्ण करण्यात आली. उमेदवाराचे शिक्षण, संपत्ती आणि त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती फ्लेक्साद्वारे प्रत्येक केंद्रावर लावण्यात आली आहे.
चिठ्ठ्या मिळाल्या नाहीत
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे महापालिकेने राजकीय पक्षांसोबतच मतदारांपर्यंत मतदान चिठ्ठ्या वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सहा विभागांत ९०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. गेल्या आठवड्यापासून मतदान चिठ्ठ्या वाटपाचे काम सुरू असले तरी निवडक लोकांकडेच या चिठ्ठ्या पोहचल्या आहेत.
मतदान केंद्राबाहेर मदत कक्ष
ज्या मतदारांना चिठ्ठ्या मिळाल्या नाहीत, ऑनलाइन सर्चमध्ये नाव सापडले नाही अशा मतदारांसाठी महापालिका प्रत्येक मतदान केंद्राबाहेर एक मदत कक्ष सुरू करणार आहे. या ठिकाणी जाऊन नागरिक आपले मतदान शोधू शकतात.
पती-पत्नीचाही केंद्रबदल
मतदार यादीतल्या गोंधळाचा फटका कुटुंबांतील सदस्यांनाही बसला आहे. अनेक प्रभागांमध्ये पतीचे मतदान एका केंद्रावर तर दुसऱ्या मतदान केंद्रावर पत्नीचे मतदान दाखवण्यात आले आहे. काही ठिकाणी पती व पत्नीचे प्रभागही बदलण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवमतदारांनो, सेल्फी पाठवा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नवमतदारांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सनेही पुढाकार घेतला आहे. मंगळवारी मतदान झाल्यानंतर या नवमतदारांनी त्यांचा सेल्फी आणि त्यांच्या मतदार कार्डाचा फोटो ‘मटा’कडे पाठवायचे आहे. यातील निवडक सेल्फीज््ना ‘मटा’मध्ये प्रसिद्धी दिली जाणार आहे.
मतदान करण्याची पहिलीच वेळ असलेल्या नवमतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आज (२१ फेब्रुवारी) मतदान केंद्रांवर याची प्रचितीही येणार आहे. मतदानाचा हक्क बजावण्याचा व त्यातून योग्य वाटेल त्या उमेदवाराला मतदान करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. मतदान केल्यानंतर सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकण्याचा ट्रेण्डही हल्ली जोरात असल्याने नवमतदारांमध्ये त्याची क्रेझ प्रामुख्याने दिसून येईल. अशाच मतदारांसाठी ‘मटा’नेही पुढाकार घेतला आहे. पहिल्यांदाच मतदान केलेल्या व्यक्तींना आपला सेल्फी ‘मटा’कडे पाठवता येणार असून त्यास प्रसिद्धीदेखील दिली जाणार आहे.
मतदान करुन आपला लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला दिला आहे. प्रत्येकासाठीच पहिल्यांदा मतदान करणे हा औत्स्युकाचा विषय असतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉलेज कट्ट्यावरही तरुणांच्या याविषयी गप्पा रंगलेल्या दिसून आल्या. त्यामुळे नवमतदारांना पहिल्यांदा मतदान करण्याविषयी वाटत असलेला उत्साहही दिसून आला होता. मतदान केल्यानंतर प्रत्येकाला आपण आपला हक्क कसा बजावला हे इतरांना दाखविण्यातही आनंद मिळत असतो. त्यामुळे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावर सेल्फी टाकण्यासाठीही प्राधान्य दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाभरात आज मतपरीक्षा

0
0

टीम मटा

राज्यासह जिल्ह्यात आज (दि. २१) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून, निवडणूक कामाची तयारी सोमवारी (दि. २०) दिवसभर प्रत्येक मतदान केंद्रांवर सुरू होती. यामध्ये जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी आज (दि. २१) मतदान होणार आहे. निवडणुककामी असलेले कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर एक दिवसाअाधीच पोहोचले आहेत. या मतदानाच्या वेळी कोणतीही अनूचित घटना होऊ नये यासाठी जिल्ह्यात पोलिसांनी चांगलाच फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

यंत्रणा सज्ज

कळवण : तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून संपूर्ण तालुक्यात १५५ मतदान केंद्रे असणार आहेत. प्रत्येक केंद्रावर सहा कर्मचारी याप्रमाणे

९३० कर्मचाऱ्यांसह राखीव ९६ असे १,०२६ कर्मचारी सोमवारी (दि. २०) आपापल्या मतदान साहित्यासह रवाना झाले आहेत.

प्रशासकीय इमारत आवारात उभारलेल्या कर्मचारी प्रशिक्षण हॉलमध्ये निवडणूक निर्भय व बिनचूक होण्यासाठी केंद्रप्रमुख व कर्मचाऱ्यांची जबाबदारीची २० मिनिटांची प्रात्यक्षिक परीक्षा वर्ग तहसीलदार कैलास चावडे व निवडणूक निर्णय अधिकारी गंगाथरण डी. यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यानंतर ठरलेल्या मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना बसेसने सोडण्यात आले. यासाठी २० बसेस वापरण्यात आल्या. तसेच मतदान काळात काही अनुचित प्रकार घडला तर काय काळजी घ्यावी. व जवळ असलेल्या पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.


बहुरंगी लढतींकडे लक्ष

निफाड : तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या लढती या बहुरंगी होत असून या लढतींकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या वेळी तालुक्यातील १० पैकी ८ गट खुले, ओबीसी झाल्याने उमेदवारांची मोठी संख्या यावेळी पाहायला मिळाली. प्रचाराच्या सुरुवातीला मेळावे आणि बैठका यांचा धडाका लावलेल्या शिवसेनेला नंतर तिकिट वाटपात मानापमान झाल्याने बंडखोरी निर्माण झाल्याने सेनेपुढे या निवडणुकीत गेल्या वेळी जिंकलेले ५ गट शाबूत ठेवण्याचे आव्हान आहे. लासलगाव बाजार समिती आणि शेतकरी संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजेंद्र डोखळे, सुभाष कराड यांची बांधलेली मोट ऐन निवडणुकीच्या काळात तुटल्याने ज्याच्या बळावर विरोधकांना चारीमुंड्या चित करण्यावर पाणी फिरल्याने त्यांना ही लढाई अवघड आहे. राष्ट्रवादीचे दिलीप बनकर यांनी आपल्या पत्नी मंदाकिनी यांना पुन्हा पालखेड गटातून उतरवले आहे. जिल्हा परिषदेच्या १० गटांसाठी ५१ तर पंचायत समितीच्या २० गणांसाठी ८९ उमेदवार रिंगणात आहेत. १५२२६२ स्त्री व १५६३०० पुरुष असे एकूण ३ लाख २८ हजार ५६२ मतदार मतदान करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात १६७ मतदान केंद्रे सज्ज

0
0

म.टा. वृत्तसेवा, येवला

जिल्हा परिषदेच्या पाच गटांसह पंचायत समितीच्या दहा गणातील निवडणुकीसाठी आज (दि. २१) होणाऱ्या मतदानासाठी येवला तालुक्यातील एकूण १६७ केंद्रे सज्ज झाली आहेत. मतदानासाठी वापरण्यात येणारी मतदान यंत्रे तसेच इतर साहित्य घेऊन मतदान केंद्राध्यक्षांसह मतदान अधिकारी, शिपाई असा मोठा ताफा पोलिस बंदोबस्तात सोमवारी (दि. २०) सायंकाळपर्यंत तालुक्यातील गावोगावच्या प्रत्येक मतदान केंद्रांवर पोहचला आहे. येवल्यातील मतदानासाठी निवडणूक यंत्रणेचा अकराशेच्यावर फौजफाटा तैनात केला गेला आहे.

मतदानासाठी नियुक्त केले गेलेले अधिकारी, कर्मचारी यांची सोमवारी, सकाळपासूनच येवला तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. प्रारंभी तहसीलच्या आवारात ‘मॉकपोल’चे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यानंतर मतदान यंत्रे व इतर सर्व साहित्य घेऊन अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले. राज्य परिवहन महामंडळाच्या २२ बसेस, ४० जीप्स अशा एकूण ६२ वाहनांमधून मतदान अधिकारी व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचले.

प्रत्येक मतदान केंद्रावर गट व गणासाठी स्वतंत्र एक याप्रमाणे दोन ‘इव्हीएम’ वापरले जाणार असून प्रत्येक केंद्रावर १ केंद्राध्यक्ष, ४ मतदान अधिकारी, १ शिपाई तसेच पोलिस कर्मचारी अशी यंत्रणा ठेवण्यात आली आहे. येवला तालुक्यात एकूण १,००२ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तालुक्यात एकूण २२ क्षेत्रीय अधिकारी नियुक्त असून निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मधुमती सरदेसाई-राठोड व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नरेशकुमार बहिरम यांनी दिली.

दीड लाख मतदार

येवला तालुक्यातील ‘झेडपी’ च्या पाच गटात १९, तर पंचायत समितीच्या दहा गणात ४५ असे एकूण ६४ उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. त्यांच्या भवितव्याचा फैसला एकूण एकूण १ लाख ५० हजार ६०४ मतदारांच्या हाती असणार आहे. मतदान यंत्रावर गटासाठी शुभ्र मतपत्रिका, तर गणासाठी गुलाबी मतपत्रिका लावण्यात आलेली आहे. मशीनवर ‘नोटा’चा पर्यायदेखील मतदारांना उपलब्ध आहे.मतदान सुरळीत व निर्भय वातावरणात पार पडावे यासाठी पोलिस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस यंत्रणा सज्ज आहे. अंदरसूल, नगरसूल, राजापूर, ममदापूर, गुजरखेडे, पाटोदा, मुखेड, नागडे या ठिकाणांच्या मतदान केंद्रांचा संवेदनशील यादीत समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images