Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

​ ‘मसाप’तर्फे उद्या ‘रंग अक्षरांचे’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कविवर्य सुरेश भट हे गझल या प्रकाराला वैभव मिळावे म्हणून सदैव प्रयत्नशील होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम असावा, अशी त्यांची इच्छा होती. गझलची वाढती लोकप्रियता बघून यंदाच्या डोंबिवलीतील साहित्य संमेलनात गझल कट्टा हा कार्यक्रम आयोजित केला होता.

यामध्ये नाशिकच्या कवींनी आपली छाप पाडली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेतर्फेही मराठी राजभाषा दिनाच्या दिवशी गझल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. २७) सायंकाळी ६ वाजता ‘रंग अक्षरांचे’ हा कार्यक्रम आशानगर सभागृह, व्यापारी बँकेसमोर, बिटको चौकाजवळ, नाशिकरोड येथे आयोजित करण्यात आला आहे.

गझल सादर करतांना कवीचा कस लागतो. या साहित्य प्रकारास मोठ्या प्रमाणात स्वीकारल्यास त्यास राज्यस्तरावर मान्यता मिळेल आणि म्हणून नाशिक शहरातील रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, उपाध्यक्ष दत्ता गायकवाड, प्र. कार्यवाह प्रसाद पवार, जिल्हा प्रतिनिधी नितीन ठाकरे, कोषाध्यक्ष सुदाम सातभाई, प्रशांत केंदळे, दशरथ लोखंडे, कामिनी तनपुरे, सुरेखा गणोरे, सुजाता हिंगे, विश्वास गायधनी, हर्षल भामरे, शिवाजी म्हस्के, रमेश औटे, मानसी घमंडी, मनीषा विसपुते, राहुल बोराडे, महेश वाजे आदींनी केले आहे.


‘शेर’ ठरणार आकर्षण

नाशिकचे वैभव ज्ञानपीठ पुरस्कारविजेते साहित्यिक कुसुमाग्रज यांची जयंती मराठी राजभाषा दिन म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेने या वर्षी मराठी गझलांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये नाशिकचेच ज्येष्ठ कवी गौरवकुमार आठवले आणि ज्यांच्या नावावर गझलांचे रेकॉर्ड आहे असे हरहुन्नरी कवी संतोष हुदलीकर यांच्या गझलांचा कार्यक्रम होणार आहे. गझल पेश करण्याच्या आधी एक शेर सादर करण्याची परंपरा असल्याने त्यासदेखील तेवढेच महत्त्व असते आणि म्हणूनच ही मैफल रंगत जाते. परिसरातील रसिकांना या साहित्याच्या मेजवानीचा लाभ मिळवा यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कालव्याला प्लास्टिकचा वेढा

$
0
0

पाण्यासोबत शेतात जातोय कचरा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गंगापूर डाव्या कालव्याला सध्या आवर्तन सोडण्यात आलेले आहे. या कालव्यात सर्रासपणे कचरा टाकण्यात येत असून त्यात प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे. प्लास्टिक स़डत नसल्यामुळे कालव्याला या कचऱ्याने वेढा दिलेला आहे. अनेक ठिकाणी पाण्यावर तरंगणाऱ्या या कचऱ्यामुळे कालवा तुंबून तो फुटण्याचा धोकाही निर्माण होत आहे. कालव्यातील पाणी शेतीला नेण्यात येत असताना हा प्लास्टिकचा कचरा वाहून जाऊन तो थेट शेतात प्लास्टिक जमा होऊन समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.

कचऱ्याची विल्हेवाट लावताना घरातील कचरा कुठेही फेकून देण्याची प्रवृत्ती वाढत आहे. घरातील कचरा घंटागाडी येईपर्यंत प्रतीक्षा करीत बसण्याचे कोणीही कष्ट घेत नाही. घराबाहेर पडताना प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये हा कचरा कुठेही फेकून देण्यात येतो. ज्या भागात पाण्याचा प्रवाह असतो अशा ठिकाणी कचऱ्याची मोठ्या प्रमाणात विल्हेवाट लावली जाते. नदीप्रमाणेच कालव्यातही कचरा टाकण्याचे प्रमाण मोठे आहे.

कालव्यातील पाणी हे थेट शेतात सोडले जात असल्यामुळे शेतात हा कचरा जातो. सडणारा कचरा असेल तर तो थोड्याच दिवसात सडून त्याचे खत बनते. मात्र प्लास्टिकचा कचरा शेती जाऊन त्या कचऱ्याखाली आलेले पिकाच्या वाढीला अडथळा निर्माण होतो. मशागतीच्या वेळी यंत्रांमध्ये हा कचरा अडकून मशागतीलाही अडथळा होतो. हा कचरा सडत नसल्याने त्याचा पिकांच्या वाढीवर परिणाम होतो.

कालवा फुटण्याचा धोका

हा प्लास्टिक कचरा कालव्याला आवर्तन सुटल्यानंतर पाण्याच्या प्रवाहसोबत वाहत जातो. त्यातील प्लास्टिकचा कचरा काही ठिकाणी विशेषतः ज्या ठिकाणी कालव्याला नाल्याचा

प्रवाह कालव्याच्या प्रवाहाला छेदतो त्या ठिकाणी कालव्याचा प्रवाह हा खोल भागातून खास सोय करून पाणी खालून वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याला सायपण असेही म्हटले जाते. अशा ठिकाणी हा प्लास्टिकचा कचरा साचून राहतो. हा साचलेला कचऱ्याचे प्रमाण वाढून पाणी तुंबते या तुंबलेल्या पाण्यामुळे कालवा फुटण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच टक्के करवाढीचा नाशिककरांवर बोजा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका प्रशासनाने सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी बजेट तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. पालिकेच्या उत्पन्नात होणारी घट ही बजेटच्या पथ्थ्यावर पडली आहे. गेल्या वर्षापेक्षा बजेटमध्ये जवळपास ५० कोटींची घट होणार असून, साधारण १३१० कोटींपर्यंत बजेट स्थिरावणार आहे. बजेटच्या अंमलबजावणासाठी घर व पाणीपट्टीच्या दरात पाच टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सुचविल्याने नव्या सत्ताधाऱ्यांना दरवाढीचा हा कटू निर्णय घ्यावा लागणार आहे.

पालिका निवडणुकांमुळे लेखानुदान मंजूर करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली होती. परंतु, आयोगाने त्यास मंजुरी दिली नसल्याने प्रशासनाने अखेरीस आता बजेट अंतिम करण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या वर्षी १३५८ कोटींचे बजेट सादर केले होते. परंतु, या वर्षीचे उत्पन्न ११७० कोटी गृहित धरण्यात आले आहे. त्यामुळे बजेट हे १३१० कोटींवर स्थिरावणार आहे. बजेटच्या अंमलबजावणासाठी प्रशासनाने घर व पाणीपट्टीत साधारण पाच टक्के करवाढ करावी असा प्रस्ताव तयार केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावभावनांचा भुलय्या ‘अतर्क्य’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालय नाशिक आयोजित पसा नाट्ययज्ञात नाट्यरंगनिर्मित ‘अतर्क्य’ हे नाटक सादर करण्यात आले.

‘अतर्क्य’ ही प्रवास अपूर्ण राहिलेल्या एका लेखकाची कथा आहे. या लेखकाला भ्रष्टाचार खपत नाही, असा त्याचा पिंड आहे. लिखाण करता यावे म्हणून तो जॉब सोडतो. मात्र, त्याचा एकच लेखसंग्रह प्रसिद्ध होतो. घरात उपासमार होत असल्याने बायकोला कामाला जावे लागते. तिलाही कमी पगार असल्याने मग मुलाला दुसऱ्याच्या घरी शिकायला ठेवतात. त्यातून लेखकाची ससेहोलपट वाढत जाते. पुढे एकदा त्याला पैशाने भरलेली बॅग सापडते. मात्र, त्या पैशांना तो हात लावत नाही. बॅगच्या मालकाला शोधण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा अॅक्सिडेंट झाल्याचे त्याला कळते. मात्र, एके ठिकाणी चहा पीत असताना बॅगची अदलाबदल होते आणि लेखकाला पैशांऐवजी कपडे मिळतात. अशा प्रकारे त्याचा प्रवास अपूर्णच राहतो. अशा आशयाचे कथानक या नाटकात दाखविण्यात आले.

सुबोध हर्डीकर लिखित या नाटकाचे निर्मितीप्रमुख बाबा चिटणीस होते. नेपथ्य राहुल शिरवाडकर, रंगभूषा नारायण देशपांडे, वेशभूषा जान्हवी भट, सानिका मेहत्रे, प्रकाशयोजना कृतार्थ कंसारा, संगीत भूषण कासार, तर रंगमंच सहाय्य विजय धुमाळ, दुर्गेश महाडळकर यांनी केले आहे. या नाटकात अर्चना नाटकर, अभिजित कार्लेकर, दीपक ठाकूर, मंदार खांडेकर, भावेन पोकार, विजय धुमाळ व राहुल शिरवाडकर यांनी भूमिका केल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चित्रकारांनी चित्रकलेत आणावी आधुनिकता’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकची चित्रपरंपरा सर्वार्थाने संपन्न असून ज्येष्ठ चित्रकारांनी या नगरीत कलामूल्यांची प्रामाणिकपणे जोपासना केली आहे. त्यांची जाणीव आजच्या चित्रकारांनी ठेवणे गरजेचे आहे व आपल्या चित्रकृतींमध्ये आधुनिकता आणून आपले वेगळेपण सिद्ध करावे, असे प्रतिपादन आर्किटेक्ट धनंजय शिंदे यांनी केले.

साधना आर्ट गॅलरी, दीपालीनगर येथे नाशिकमधील निवडक चित्रकारांच्या ‘व्हीजन-२०१७’ शीर्षकांतर्गत चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ आर्किटेक्ट शिंदे यांच्या हस्ते झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. २४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत रोज सकाळी १० ते रात्री ८.३० या वेळात हे प्रदर्शन चित्ररसिकांसाठी खुले राहणार आहे.

यावेळी बोलताना ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांनी, चित्रकार वा. गो. कुलकर्णी यांनी चित्रकलेत मोठे काम केले, आम्हा सर्वांचे ते गुरूच आहेत. चित्रकारांनी गुरूंचे स्मरण ठेवून कलासाधना करावी व यशस्वी व्हावे, असे मत व्यक्त केले. प्रदर्शनात चित्रकार अशोक ढिवरे, मनीष जोगळेकर, कैलास ह्याळीज, मिनानाथ खराटे, संतोष मासाळ, गणेश कदम, रवींद्र दंडगव्हाळ, वसंत पवार, जितेंद्र सोनवणे, रामभाऊ डोंगरे, सुनील मोरे, नितीन बिल्दीकर, संजय सोनवणे, किरण मोरे, मकरंद बोकील यांच्या चित्रकृती आहेत.

याप्रसंगी मृगनयनी पुराणिक आणि आर्किटेक्ट दीपक देवरे, बबन जाधव, धनंजय गोवर्धने, सुहास जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विशाखा’ चे आज वितरण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महारष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या विशाखा काव्यसंग्रहाच्या नावाने काव्य लेखनासाठी दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विशाखा पुरस्कारांची घोषणा कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी केली. सर्व पुरस्कारमूर्तींना आज, रविवारी (दि. २६) नाशिक येथे होणाऱ्या विशेष समारंभात पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. पुरस्कार्थींचा परिचय असा.

‘बोलु कवतिके’ आज

मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून राज्य शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि मुक्त विद्यापीठाच्या वतीने रविवारी सुरभी, पुणे निर्मित ‘बोलु कवतिके’ सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक रवींद्र साठे, अनुराधा मराठे,

योगिता गोडबोले, श्रीरंग भावे, अशोक काळे यांसारखे दिग्गज सहभागी राहणार असून, प्राजक्ता राज (अत्रे) नृत्ये सादर करतील. केदार परांजपे यांचे संगीत संयोजन असून, तुषार दळवी, मधुरा वेलणकर, प्रवीण जोशी अभिवाचन करणार आहेत. हा कार्यक्रम नि:शुल्क असून, उपस्थितीचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

डॉ. योगिनी सातारकर-पांडे

नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठात भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलात इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार, कै. सावित्रीबाई जोशी पुरस्कार, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्य पुरस्कार मिळाले आहेत.

मोहन कुंभार

 कणकवली (सिंधुदुर्ग) येथे बी. व्ही. देसाई कॉलेजात अध्यापन करतात. त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, अण्णा भाऊ साठे आदर्श साहित्यिक पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार त्यांच्या ‘जगण्याची गाथा’ या काव्यसंग्रहाला प्राप्त झाला आहे.

कवी विष्णू थोरे

 चांदवड (नाशिक) येथील कवी विष्णू थोरे हे शेतकरी असून, साहित्यविषयक पुस्तकांचे मुखपृष्ठही रेखाटतात. त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा काव्य पुरस्कार, अ. ना. देशपांडे, गदिमा तुकोबा मानदेश साहित्य पुरस्कार प्राप्त आहे. चौर्य आणि घाटी या चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...जनस्थान हा ‘जीर्ण पाचोळा’ नव्हे!

$
0
0

कुसुमाग्रज पहाट कार्यक्रमाला बगल; वितरणाला नाही प्रमुख पाहुणे
Prashant.bharvirkar @timesgroup.com

Tweet : @bharvirkarPMT​

ना‌शिक : ज्ञानपीठ पुरस्काराच्या मानधनातून सुरू करण्यात आलेला ‘जनस्थान’ हा मानाचा पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या आत्मकेंद्री कारभारामुळे दिवसेंदिवस ‘जीर्ण पाचोळा’ बनत चालला आहे. यंदाचा जनस्थान पुरस्कार देण्यासाठी तर प्रतिष्ठानला प्रमुख पाहुणेच मिळालेले नसून, कुसुमाग्रज पहाट या परंपरा असलेल्या कार्यक्रमालाही बगल देण्यात आली आहे. त्यामुळे या पुरस्काराने कुसुमाग्रजांच्याच कवितेतील जीर्ण पाचोळ्याचे रूप घेतले आहे की काय अशी शंका नाशिककरांना येऊ लागली आहे.

नाशिक शहराची ओळख ज्या बाबींमुळे आहे, त्यात एक महत्त्वाची आणि मानाचे पान असलेली बाब म्हणजे जनस्थान पुरस्कार. कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने सुरू झालेला हा पुरस्कार आतापर्यंत विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर, इंदिरा संत, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, श्री. ना. पेंडसे, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, बाबूराव बागुल, ना. धों. महानोर, महेश एलकुंचवार, भालचंद्र नेमाडे आणि अरुण साधू अशा दिग्गजांना बहाल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे हा पुरस्कार देण्यासाठीही त्याच तोलामोलाचे दिग्गज बोलावले जात असत. जनस्थान पुरस्कार प्रदान करण्यासाठी आतापर्यंत विजया मेहता, गिरीश कार्नाड, देवेंद्र फडणवीस अशा दिग्गजांना बोलाविले गेले. मात्र यंदाच्या वर्षी पुरस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्याच हस्ते देण्यात येणार आहे. त्यासाठी कुणीही प्रमुख पाहुणा बोलावण्याची तसदी प्रतिष्ठानने घेतलेली नाही. जी बाब प्रमुख पाहुण्यांची तीच प्रतिष्ठानतर्फे कुसुमाग्रज जयंती ते पुण्यतिथी निमित्त होणाऱ्या सप्ताहाची आहे. दरवर्षी या सप्ताहाची सुरुवात कुसुमाग्रज पहाट या संगीतमय कार्यक्रमाने करण्यात येते मात्र यंदा या विशेष कार्यक्रमालाच बगल देण्यात आली आहे. सप्ताहाच्या कार्यक्रमातही शॉर्टकट मारण्यात आलेला आहे.

या सर्वांवर कडी करणारी एक बाब म्हणजे कधीही कोणत्या कार्यक्रमासाठी सहकार्याची अपेक्षा न करणारे प्रतिष्ठान आता विशेष सहकार्य घेऊ लागले असून याची सुरुवात बहुदा जनस्थान पुरस्कारापासून होत आहे. सपकाळ नॉलेज हबचे सहकार्य या पुरस्कार सोहळ्यासाठी घेण्यात आले असून, त्यांचा नामोल्लेख प्रत्येक पत्रिकेवर रबरी शिक्के मारून करण्यात आला आहे. एखाद्या संस्थेचे सहकार्य होत असले तर ती चांगली बाब आहे, परंतु ती आर्थिक स्वरूपात असेल तर प्रमुख पाहुण्यांवर खर्च होऊ नये ही केवळ शोकांतिकाच! त्यामुळे या पुरस्काराला प्रतिष्ठानचे पदाधिकारी तात्यासाहेबांच्याच‍ कवितेतील ‘जीर्ण पाचोळा’ समजलेत की काय अशी शंका डोके वर काढू लागली आहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत. त्या नात्याने ते पुरस्कार देणार आहेत. पहाटचा कार्यक्रम रसिकांच्या उपस्थितीअभावी स्मरण कार्यक्रमात ठेवण्यात आला आहे, तो रद्द केलेला नाही.

- मकरंद हिंगणे, कार्यवाह

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक उपक्रमांतून आदर्श उभा करावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्या कार्यातून तसेच सामाजिक उपक्रमातून आदर्श उभा करावा, असे प्रतिपादन इएसडीएस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पीयूष सोमाणी यांनी केले. जैन सोशल ग्रुपच्या सदस्यांनी गत अनेक वर्षात विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजासाठी एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. नूतन कार्यकारिणी ही परंपरा पुढे सुरू ठेवेल, असा विश्वासही सोमाणी यांनी व्यक्त केला. जैन सोशल ग्रुप नाशिकच्या नूतन कार्यकारिणीच्या पदग्रहण समारोह सोहळ्यात ते बोलत होते. वर्ष २०१७ साठीचे अध्यक्ष प्रणय संचेती व त्यांच्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच राका ग्रीन स्क्वेअर येथे पार पडला.

या कार्यक्रमात सर्वप्रथम मावळते सचिव संदीप कटारिया यांनी गतवर्षीचा अहवाल सादर केला. मावळते अध्यक्ष विजय लोहाडे यांनी गत वर्षाच्या प्रमुख कार्यक्रमांची माहिती दिली. यामध्ये वर्ष २०१६ मध्ये जैन सोशल ग्रुपने मिशन जलसेवा हा कार्यक्रम घेतला होता. या अंतर्गत जैन समाज व अन्य दानशूरांच्या मदतीने त्र्यंबक तालुक्यातील १० आदिवासी पाड्यांना ६० दिवस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी अनेक कायमस्वरूपी कामे करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. चांदवड तालुक्यातही जलयुक्त शिवारासाठी नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. वृक्षारोपण, पर्यावरण जागृती यासाठीही अनेक उपक्रम घेण्यात आले असल्याचे ते म्हणाले.

पदग्रहण समारंभात प्रमुख अतिथी वास्तुविशारद संजय पाटील यांनी जैन सोशल ग्रुपच्या उपक्रमांचे कौतुक करून स्वच्छ भारत अभियानातही त्यांनी सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान प्रख्यात नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांच्या बहारदार नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. संस्थेचे सदस्य संदीप कटारिया, हेमंत दुगड, अमित कोठारी, पवन पटणी व डॉ. सचिन कोचर यांना २०१६ वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबाबत अध्यक्षीय पुरस्काराने गौरविण्यात आले. शपथग्रहण अधिकारी सचिन गांग यांनी प्रणय संचेती यांच्या टीमला शपथ दिली. आपल्या मनोगतात नूतन अध्यक्ष प्रणय संचेती यांनी येत्या वर्षात समाजासाठी व जैन बांधवांसाठी अनेक उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. जैन सोशल ग्रुप २०१७ ची कार्यकारिणीमध्ये सचिवपदी दिलीप पहाडे, उपाध्यक्षपदी प्रवीण संचेती, सहसचिव पदासाठी हेमंत दुगड व अमित कोठारी, कोषाध्यक्षपदी नीलेश भंडारी, जनसंपर्क अधिकारी मुग्धा शहा व भावना कासलीवाल, सल्लागार मोहन बागमार व ललित मोदी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकच्या नगरसेविकेकडे फॉरिनची डिग्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या निवडणुकीत उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या तुलनेने कमी पाहायला मिळते. मात्र, ज्या उच्चशिक्षित उमेदवारांनी निवडणूक लढवली, त्यांना त्यांच्या शिक्षणाचा फायदाच झाला. प्रभाग क्रमांक ९ मधून निवडून आलेल्या भाजपच्या वर्षा भालेराव या त्यापैकीच एक म्हणता येतील. कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीतून पीएच.डी. मिळवलेल्या त्या एकमेव नगरसेविका आहेत.

भालेराव फ्रवशी इंटरनॅशनल अॅकॅडमीमध्ये परीक्षा विभागाच्या इनचार्ज आहेत. ‘असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन टेक्निक फॉर परफॉर्मन्स एन्हान्समेंट इन मिडल स्कूल’ या विषयावर मार्च २०१५ मध्ये त्यांनी पीएच.डी. मिळवली आहे. राजकारण आणि शैक्षणिक या दोन्हींची पार्श्वभूमी असल्याने निवडून येण्याबाबत त्यांना विश्वास होता. आता स्थानिक पातळीवरील शैक्षणिक यंत्रणेत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा त्यांचा मानस आहे. महापालिकेच्या शाळांचा दर्जा, भयमुक्त प्रभाग, स्मार्ट क्लासरूम अशा उपक्रमांसाठी काम करणार असल्याचे त्या म्हणाल्या. शिक्षण या अतिशय महत्त्वाच्या क्षेत्राला पुरेसे महत्त्व दिले जात नसल्याचे मत मांडत शिक्षण विषयाला अनुसरून काम करण्याची इच्छाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

महापालिकेच्या शाळांमध्ये आयसीएससी, सीबीएसई बोर्डाप्रमाणे प्रभावी शिक्षणपद्धती वापरून गुणवत्तावाढीसाठी काम केले जाऊ शकते. शिक्षण हा सर्व गोष्टींचा पाया असल्याने या बाबींवर लक्ष देणे गरजेचे आहे.

– वर्षा भालेराव, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-पुणे लोहमार्गाचे अंतिम सर्वेक्षण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक-पुणे लोहमार्गाचे अंतिम सर्वेक्षण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला असून, त्यासाठी पुणे येथील कंपनी नियुक्त केली आहे. या सर्व्हेसाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी रेल्वेने केली असून, त्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना रेल्वेच्या मुख्य अभियंत्यांनी पत्रही पाठवले आहे. आता अंतिम (लोकेशन सर्व्हे रिपोर्ट) सर्वेक्षण झाल्यानंतर या कामाचा पुढचा टप्पा सुरू होणार आहे.

सर्व्हेचे काम पुण्यातील कोथरुड येथील मे. हायड्रोपनियम सिस्टीम ही कंपनी करणार आहे. त्यांना सर्व्हे करताना स्थानिकांकडून कोणताही अडथळा येऊ नये म्हणून हे पत्र पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहे. नाशिक-पुणे हा पाच ते सहा तासांचा प्रवास नागरिकांच्या दृष्टीने कंटाळवाणा आणि त्रस्त करणारा असल्यामुळे काँग्रेसच्या आघाडी सरकारने नाशिक ते पुणे मार्गाचे सर्वेक्षण केले होते. त्यानंतर हे काम पुन्हा रखडले. मात्र, भाजप आघाडीचे सरकार आल्यानंतर या कामाला चालना मिळाली आहे. यासाठी पैशांची तरतूदही करण्यात आली आहे. या मार्गावर एकूण २५ स्थानके निश्‍चित करण्यात आली आहेत. या मार्गासाठी नाशिकच्या दिशेने रेल्वेलाइन टाकण्यात येणार आहे.

हा अंतिम सर्व्हे झाल्यानंतर मध्य रेल्वेतर्फे हा अहवाल केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला मंजुरी मिळाली, की मग जमिनीच्या किमती व त्या ताब्यात येण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या अंतिम अहवालातूनच या प्रकल्पाला किती खर्च येईल याचा आकडाही समोर येणार आहे.

लोहमार्गासाठी २०० कोटी

नाशिककरांना अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या नाशिक-पुणे लोहमार्गासाठी या केंद्रीय अर्थसंकल्पात २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या लोहमार्गासाठी राज्य व केंद्र सरकारचा प्रत्येकी ५० टक्के सहभाग राहणार आहे.

यांना होणार फायदा

नाशिक-पुणे लोहमार्गामुळे पुणे, शिवाजीनगर, खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, बागडेवाडी, चाकण, राजगुरुनगर, मावळ, निरगुडसर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, नांदूरखडरमल, पिंपळगावडेपा, संगमनेर, मालदाद, नांदूरशिंगोटे, सिन्नर, नाशिकरोड ही शहरे जोडली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात एका दिवसात पाच घरफोड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात एका दिवसात पाच ठिकाणी घरफोड्या करीत चोरट्यांनी तब्बल साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यातील काही घटना शनिवारी दिवसभरात घडल्या असून, निवडणुकीतून मोकळे झालेल्या पोलिसांसमोर आता चोरट्यांचे आव्हान उभे ठाकले आहे.

नाशिकरोड येथील धोंगडेनगरमधील अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ८२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी विजय एकनाथ चिखले (रा. ईश्‍वर निकेतन अपार्टमेंट, धोंगडेनगर, नाशिकरोड) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. शनिवारी (२५ फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास चिखले यांच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दुपारी १२ ते साडेचार वाजेच्या दरम्यान चोरी केली. चोरट्यांनी बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडला. चोरट्यांनी चार तोळ्याचे दागिन्यांसह ८१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केले. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदिरानगर परिसरात शनिवारी दुपारच्या सुमारास संध्या कैलास आहेर (रा. साईसिद्धी पार्क, गुरू गोविंदसिंग, इंदिरानगर) यांचे घर फोडले. आहेर कुटुंबीय दुपारी साडेतीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत घराबाहेर गेले होते. या वेळी चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील साडेनऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि २५ हजार रुपये रोख असा एक लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

दरम्यान, आडगाव शिवारातदेखील घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. शारदा चंद्रकांत निपुंगे (रा. अथर्वपुष्प सोसायटी, शरयू पार्क, आडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २२ ते २३ फेब्रुवारीदरम्यान निपुंगे कुटुंबीय बाहेर गेले होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील ८० हजार रुपये किमतीची ४० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत त्यांनी लंपास केली. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी शनिवारी गुन्ह्याची नोंद केली. पंचवटीतदेखील दोन घरफोड्या झाल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनांमध्ये चोरट्यांनी तब्बल हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. नीलिमा सुनील निकाळे (रा. श्रीनिवास अपार्टमेंट, मेरी लिंकरोड) शनिवारी (दि. २५ फेब्रुवारी) सायंकाळी सव्वापाच ते पावणे सहाच्या दरम्यान घराबाहेर गेल्या असता चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सोन्याचे दागिने लंपास केले. याच दरम्यान चोरट्यांनी रंजना किसन कुंवर (रा. साईसंपदा, साईनगर, पंचवटी) यांच्या घरातून दागिने लंपास केले. या दोन्ही घटनांत ७३ हजार रुपये किमतीचे ३८ ग्रॅम सोन्यांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाइक रॅली’चे महिलांमध्ये आकर्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित ‘ऑल वूमेन बाइक रॅली’चे यंदाही महिलांमध्ये मोठे आकर्षण आहे. रॅलीत सहभागी होण्यासाठी आपल्या मैत्रिणींची नावे नोंदविण्यासाठी महिला उत्स्फूर्तपणे पुढे येत असल्याने त्यांची उत्सुकताही दिसून येत आहे. येत्या रविवारी (५ मार्च) सकाळी ७.३० वाजता ही रॅली भोसला मिलिटरी कॉलेजपासून सुरू होणार आहे.

महिलांमध्ये वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रमांबाबत नेहमीच आकर्षण दिसून येते. रोजच्या धावपळीतून स्वतःसाठी वेळ काढून धमाल करण्याची संधी त्यांना अशा कार्यक्रमांद्वारे मिळत असते. त्यामुळे ‘मटा’च्या ‘ऑल वूमेन बाइक रॅली’चेही महिलांमध्ये आकर्षण आहे. ग्रुप्समध्ये सहभागी होऊन धमाल करण्यासाठी अनेक महिला आठवडाभरापूर्वीच सज्ज झाल्या आहेत. भरजरी पैठणी, नऊवारी साडी, फेटा, नथ, दागिने असा मराठमोळा साज परिधान केलेल्या, तसेच जीन्स, टॉप, लेदर जॅकेट्स, शूज असा मॉडर्न लूक केलेल्या महिलांचा दरवर्षी या रॅलीत सहभाग असतो. यंदाही असाच सहभाग बघायला मिळणार आहे. गेल्या वर्षी या रॅलीत सहभागी होता न आलेल्या महिलांसाठी तर ही सुवर्णसंधी असणार आहे. भोसला मिलिटरी कॉलेजपासून सुरू झालेली ही रॅली कॉलेजरोड, डोंगरे वसतिगृह मैदान, गंगापूर रोड, जेहान सर्कल, नवशा गणपती, बारदान फाटा, साधना मिसळ, मोतीवाला कॉलेज, त्र्यंबक रोड, एबीबी सर्कल व पुन्हा भोसला मिलिटरी कॉलेज असा रॅलीचा मार्ग असणार आहे.

हे आवश्यक

बाइक रॅलीत सहभागी होण्यासाठी वाहन परवाना आवश्यक असेल. रॅलीत १८ वर्षांपुढील महिला सहभागी होऊ शकतात. रॅलीदरम्यान सुरक्षेसाठी हेल्मेट परिधान केलेले असावे, मोपेड किंवा गीअर बाइक चालतील, तसेच एका गाडीवर दोन महिला येऊ शकतात. रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी सामाजिक संदेश देणारी थीम किंवा पेहराव करून आल्यास उत्तम. सामाजिक संदेश देणारी ही रॅली असल्याने शिस्त आणि शांतता अपेक्षित आहे.

नोंदणी आवश्यक

रॅलीत सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक असून, नावनोंदणीसाठी मोबाइलवर BIKERALLYNSK टाइप करून ५८८८८ या क्रमांकावर एसएमएस करा किंवा ६६३७९८७ या नंबरवर संपर्क साधा. http://allwomenbikerally.com या वेबसाइटवरही आपण रजिस्ट्रेशन करू शकता. चला, तर मग तयार राहा बाइक रॅलीचा आनंद लुटण्यासाठी आणि आजच नावनोंदणी करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपची एन्ट्री

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत गटात २ व गणात तब्बल ५ जागा जिंकून शिवसेनेने मुसंडी मारली. तरीही शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या भालूर गडावर मात्र भाजपने यश मिळवत सेनेच्या झंझावातातदेखील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

शिवसेनेतून भाजपत डेरेदाखल झालेले माजी आमदार संजय पवार आणि त्यांचे बंधू राजेंद्र पवार यांनी भालूर गडावर आपला वरचष्मा असल्याचे दाखवत तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा दिमाखाने एन्ट्री केली आहे. नांदगाव तालुक्यातील पंचायत समितीत ३ आणि जिल्हा परिषद गटात १ जागा जिंकून भाजपने तालुक्यातील आपला प्रभाव दाखवून दिला आहे.

माजी आमदार संजय पवार व त्यांचे बंधू राजेंद्र पवार शिवसेनेच्या तिकिटावर भालूर गटातून जिल्हा परिषदेवर या आधी निवडून गेले. मात्र गेल्या काही वर्षात शिवसेना ते राष्ट्रवादी व पुन्हा शिवसेना ते भाजप असा राजकीय प्रवास करणाऱ्या माजी आमदार संजय पवार यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनाच आव्हान निर्माण करत सेनेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरू केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीपेक्षा शिवसेनेलाच लक्ष्य करणाऱ्या पवार बंधूंनी आपल्या नेतृत्वाखाली भालूर गटाची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. संजय पवार यांना तालुक्यात आपले अस्तित्व दाखवण्याची संधी या निवडणुकीने आणून दिली. भालूर गटातील व पंचायत समितीच्या दोन्ही जागा जिंकून भाजपने शिवसेनेला भालूरला त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभूत करून प्रथमच भाजपला या गडावर नंबर वनवर आणून ठेवले. शिवसेना तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे आव्हान मोडून काढत शिवसेनेच्या गटातील उमेदवार आशाबाई जगताप व गणातील उमेदवार श्रावण गोरे व साहेबराव नाईकवाडे यांनी विजय संपादन केला आहे. पवार यांना शह देण्यासाठी कांदे यांच्यासह शिवसेनेचे शिलेदार या पुढील काळात अधिक प्रयत्न करण्याची शक्यता आहे. मात्र या विजयाने संजय पवार, राजेंद्र पवार यांना नवसंजीवनी मिळाली एवढं निश्चित!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदी नव्हे, चलन शुद्धीकरणाचे धोरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने पाचशे व हजारच्या नोटा बंद करण्यामागे काही तरी मोठा विचार ठेवला आहे, ही बाब जनतेने लक्षात घेणे गरजेचे आहे. केंद्राच्या ज्या निर्णयास नोटाबंदी म्हटले जाते, ती प्रत्यक्षात केवळ नोटाबंदी नसून ते चलन शुद्धीकरणाचे धोरण भारताच्या हितासाठीच राबविले गेले आहे हे लक्षात घ्यायला हवे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी व्यक्त केले.

केटीएचएम कॉलेजच्या वाणिज्य प्रयोगशाळा व संशोधन केंद्रातर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. डॉ. गोविलकर म्हणाले, की नोटाबंदी धोरणास चलन शुद्धीकरणाचे धोरण असे म्हणणे योग्य होईल. चौदा ते साडेचौदा लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले ते चलनात होते. मात्र, ते पैसे बँकेत येत नव्हते. परिणामी, देशात समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली होती. ती देशाच्या आर्थिक विकासास घातक होती.

ते म्हणाले, की दरवर्षी देशाचे बजेट राज्यघटनेच्या कलम ११२ नुसार लोकसभेत मांडावे लागते. त्यावर सदस्यांची चर्चा व त्यानंतर त्यांची मंजुरी मिळाल्यावरच सरकारला खर्च करण्यास मुभा मिळत असते. चर्चा व मंजुरी यात बराच कालावधी अंदाजे दोन ते तीन महिने जात असत. त्यामुळे त्याची अंमलबजावणी उशिराने होत असे. तो उशीर आता टाळता येणार आहे. त्याचप्रमाणे दुसरा बदल म्हणजे रेल्वे बजेट आता स्वतंत्रपणे मांडणे बंद केले. कारण पूर्वी ब्रिटिशांच्या काळात रेल्वेवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असे. आता त्याचे प्रमाण कमी झालेले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातच रेल्वे बजेटचा समावेश केलेला आहे. या अर्थसंकल्पाचे आणखी वैशिष्ट्य असे, की या अर्थसंकल्पात योजना खर्च व योजनेतर खर्चाची तरतूद नाही. कारण पूर्वी नियोजन आयोगाच्या योजनेनुसार अर्थसंकल्पात तरतूद केली जात असत. आता नियोजन मंडळच बरखास्त केल्यामुळे याचा विचार केलेला नाही. या अर्थसंकल्पानुसार २१ लाख ४६ हजार कोटी सरकारने खर्च करावयाचे आहेत. त्यातील ११ लाख ५७ हजार कोटी हे अनुत्पादक खर्चासाठी म्हणजे पेन्शन, संरक्षण, सबसिडी व व्याजात जाणार आहे. सर्व करांपासून सरकारला १२ लाख २७ हजार कोटी उत्पन्न मिळणार आहे. सरकार ५ लाख ४६ हजार कोटी कर्ज घेणार आहे. सरकारला या वर्षी ५ लाख २३ हजार कोटींचे कर्जावरील व्याज द्यावे लागणार आहे. आपल्या देशाचे कर्ज हे जीडीपीच्या ५६ टक्के इतके आहे. हेच प्रमाण अमेरिकेत १०४ टक्के आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळजातील भाषा जपायला हवी

$
0
0

ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे प्रतिपादन


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठी भाषा अडचणीत आहे, यात शंका नाही. इंग्रजी शाळेमध्ये आपल्या मुलांना टाकणाऱ्यांना हे चांगलेच माहीत आहे; परंतु रस्त्यावरची भाषा विकत घेताना आपल्या काळजात‌ील भाषा मात्र जपायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विशाखा पुरस्कार २०१६ च्या वितरणात प्रमुख पाहुणे म्हणून कांबळे बोलत होते. महाकवी कालिदास कलामंदिरात हा सोहळा झाला.

कांबळे म्हणाले, की आई व माय मराठी हे एकमेकींचे प्रतिरूप आहे, असे समजून जोपर्यंत तुम्ही वागत नाही तोपर्यंत भाषेला चांगले दिवस येत नाहीत. कुसुमाग्रजांनी आयुष्यभर भाषेसाठी वेगवेगळे उपक्रम घेतले. भारतातील इतर राज्यांतील ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांना नाशिकला बोलावून ते जाहीर कार्यक्रम घडवून आणायचे. म्हणूनच तर त्यांची कविता रेशनकार्डावर गेली. सामान्य माणसाच्या काळजाच्या अस्तित्वावर ज्या कवीची कविता जाते त्याचा जन्मदिन भाषादिन म्हणून साजरा होतो ही अलौकिक बाब आहे, असेही कांबळे म्हणाले.

व्यासपीठावर मुक्त विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलसचिव दिनेश भोंडे, विजया पाटील, मगन पाटील, विशाखा पुरस्कार विजेते योगिनी सातारकर, मोहन कुंभार आणि विष्णू थोरे यांच‌ी उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठ गीत झाले. दिनेश भोंडे यांनी प्रास्ताविक केले. उत्तम कांबळे यांचा परिचय श्याम पाडेकर यांनी करून दिला. निवड प्रक्रियेविषयी विजया पाटील यांनी माहिती दिली.

कार्यक्रमात या तिन्ही कवींचा विशाखा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रथम २१ हजार, द्वितीय १५ हजार तर तृतीय पुरस्कार १० हजार रुपयांचा होता. तो अनुक्रमे डॉ. योगिनी सातारकर, मोहन कुंभार आणि विष्णु थोरे यांना प्रदान करण्यात आला.

या वेळी तिघाही कवींनी सन्मानाला उत्तर देताना आपली एक कविता सादर केली. श्याम पाडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

‘बोलू कवतिके’ कार्यक्रम रंगला

मराठी भाषा गौरवदिन २७ फेब्रुवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून राज्य शासनाचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मुक्त विद्यापीठाच्या वतीने सुरभी, पुणेनिर्मित ‘बोलु कवतिके’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक रवींद्र साठे, अनुराधा मराठे, योगिता गोडबोले, श्रीरंग भावे, यांनी सहभाग घेतला. केदार परांजपे यांचे संगीत संयोजन, तर तुषार दळवी, मधुरा वेलणकर, प्रवीण जोशी यांनी अभिवाचन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘टीडीआर’वर मध्यम मार्ग, मुख्यमंत्र्यांची बैठक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकांमध्ये विकासासाठी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यानी पालकत्वाच्या दिशेने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. वादग्रस्त डीसीपीआरवरून बांधकाम व्यावसायिकांची झालेली कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यानी सोमवारी क्रेडाईच्या सदस्यांसोबत बैठक घेवून कपाट, बाल्कनी, टीडीआरच्या विषयांवर मार्ग काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यांचे रुंदीकरण करून त्यांना नऊ मीटर रस्त्याप्रमाणे एफएसआय देण्याचा आदेश मुख्यमंत्र्यानी दिल्याचा दावा क्रेडाईने केला आहे. तसेच पुण्याप्रमाणेच डीसीपीआरचे नियम सारखे करण्याचे आदेशही दिले असून, प्रिमीयमचा निर्णय आयुक्तांकडे सोपव‌िल्याचा दावा बांधकाम व्यावसायिकांनी केला आहे.

महापालिका निवडणुकांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्र्यानी विकासासाठी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली होती. त्याला नाशिककरांनी चांगला प्रतिसाद देत एकहाती सत्ता दिली. परंतु निकाल लागताच व्हायरल झालेला ड‌ीसीपीआर अधिकृत केल्याने बांधकाम व्यवसायाची कोंडी झाली होती. कपाट, टीडीआर व बाल्कनीचा प्रश्न अधिकच बिकट बनला होता. त्यामुळे भाजपवर टीका सुरू झाली होती. त्यामुळे पालकमंत्री गिरीश महाजन व आमदार बाळासाहेब सानप यांनी मुख्यमंत्र्याना गळ घालत क्रेडाईच्या सदस्यांसह बिल्डरांची बैठक घेण्याची विनंती केली. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांच्यासह पालकमंत्री महाजन, नितीन करीर, आ. सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, अपूर्व हिरे, आयुक्त अभिषेक कृष्णा, इंड‌ियन अॅन्ड आर्किटेक्ट असोशिएशनचे अध्यक्ष प्रदीप काळे, उमेश वानखेडे, उदय घुगे, सचिन गुळवे यांच्या सोबत बैठक घेतली. त्यात बिल्डरांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले आहेत.

सहा व साडेसात मीटर रस्त्यावर एफएसआय वापरास बंदी केल्याने नाशिकचा विकास थांबला होता. त्यामुळे या बैठकीत ६ व ७.५० मीटर रस्त्यांच्या दोन्ही बाजूने दीड व पाऊण मीटर रुंदीकरण करून लहान रस्त्यांना ९ मीटर रस्त्याच्या नवीन नियमाप्रमाणे एफएसआय देण्याचे निर्देश दिले आहेत. डीसीपीआरमध्ये अशी तरतूद केल्याचा दावाही यावेळी केला. कपाटासह जुन्या प्रकरणांच्या निपटारासाठी ट्रान्झिट पॉलिसीचाही अवलंब करून बाल्कनीचा प्रश्न देखील मार्गी लागणार असल्याचा दावा व्यावसायिकांनी केला आहे. पुणे व नाशिकच्या डीसीपीआरमध्ये समानता आणण्याची मागणी बिल्डरांनी केली होती. त्यालाही मुख्यमंत्र्यानी मंजुरी दिल्याचा दावा केला आहे. तसेच पोड‌ियमवर ५० टक्के ओपनस्पेस ग्राह्य धरणे, फ्रंट साईड मार्जीन, प्रोव्ह‌िजन ऑफ अॅमेनिटीज स्पेससारखे विषय सकारात्मक रित्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले आहेत. घराच्या किंमती आवाक्यात राहण्यासाठी प्रिमीयमचा सरकारी दर माफक ठेवण्यासाठी आयुक्तांसोबत चर्चा करून प्रस्ताव ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. संबंधित विषयांसाठी दुसऱ्यांदा बैठक घेण्याची वेळ येवू देवू नका, अशा सुचना मुख्यमंत्र्यानी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

गावठाणला ४ एफएसआय द्या!

नाशिक मध्य मतदारसंघात ५० ते ६० टक्के गावठाण भाग असल्याने क्लस्टर डेव्हलपमेंट अंतर्गत ४ एफएसआय देण्याची मागणी आ. फरांदे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली होती. त्याला मुख्यमंत्र्यानी सकारात्मक प्रतिसाद देत, गावठाणच्या विकासाचा मार्ग सुकर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

कपाट, बाल्कनी सुटणार

एफएसआयचा अतिरिक्त वापर करून कपाट प्रश्न मार्गी लावण्याचा आदेश बैठकीत देण्यात आल्याचा दावा क्रेडाईतर्फे करण्यात आला आहे. बीपीएमसी अॅक्ट २१० नुसार आयुक्तांना रस्त्यांच्या रेषा निश्चिती करण्याचे अधिकार असतात. त्यामुळे त्याचा आधार घेवून कपाट व टीडीआर विषय मार्गी लावता येईल, असा आशावाद बिल्डरांमध्ये निर्माण झाला आहे. तसेच महासभेने ठराव करूनही हा प्रश्न मार्गी लावता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच ९ जानेवारी २०१७ पूर्वी परवानगी घेतलेल्या इमारतींना बाल्कनी अंतर्भुत करता येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३१ कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या गंगापूर गावातील १८ दशलक्ष लीटर क्षमतेच्या मल:निस्सारण केंद्राच्या बांधकामाचा ठेका ३१ कोटी रुपयांना देण्याचा प्रस्तावाला स्थायी समितीने अखेर मंजुरी दिली आहे. त्यामुळे गोदावरीच्या प्रदूषणाला आळा बसणार आहे.

स्थायी समिती सभापती सलिम शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात गंगापूर येथील १८ दशलक्ष लिटर क्षमतेच्या मल:निस्सारण केंद्राच्या बांधकामाला मंजुरी देवून संबंधित कंपनीला काम देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. गंगापूर एसटीपीसाठी जागा अधिग्रहीत करण्यात आली होती. त्यानंतर या एसटीपीचा समावेश हा केंद्राच्या अमृत योजनेत करण्यात आला होता. अमृत योजनेत या प्रकल्पासाठी निधीही मंजूर करण्यात आला होता. तसेच सिंहस्थातील शिल्लक निधीचीही तरतूद करण्यात आली होती. २०४१ ची लोकसंख्या गृहीत धरून पालिकेने मल:निस्सारण केंद्राचे आठ झोन तयार करण्याचा निर्णय घेतला असून, २०२१ पर्यंत सहा झोन पूर्ण केले जाणार आहेत. आतापर्यंत चार झोन पूर्ण झाले असून, पाचवा झोन हा गंगापूर एसटीपी प्लॅन्टचा आहे. त्यामुळे या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. केंद्र यासाठी ३३ टक्के व राज्य सरकार १५ टक्के अनुदान देणार आहे. तर महापालिका स्वनिधीतून ५० टक्के खर्च करणार आहे. गोंडवाना इंजिनीअर्स लिमीटेड या कंपनीची सर्वात कमी रकमेची म्हणजे ३१ कोटी ६५ लाख रुपयांची निविदा आली आहे. संबंधित कंपनीशी वाटाघाटी केल्यानंतर कंपनीने ३१ कोटीत काम करून देण्याची तयारी दर्शवली आहे.

शेवटची सभा अन् इतिवृत्तही

महापालिका निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर गेल्या सभेतील इतिवृत्त मंजूर करण्यासाठी स्थायी समितीची शेवटची सभा सोमवारी झाली. यात गेल्या सभेतील इतिवृत्ताना मंजुरी देण्यात आली. तसेच सोमवारच्या सभेतील इतिवृत्त अडकू नयेत म्हणून सभापतींनी घाईघाईत लगेत तासाभरात सभा आयोजित करून शेवटचेही इतिवृत्त मंजूर करून घेतले. नव्या सदस्यांकडून या पूर्वी मंजूर झालेल्या कामांची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्गी लावलेले अर्थपूर्ण विषय लटकू नये म्हणून सभापतींसह सदस्यांनी खबरदारी घेवून सर्व इतिवृत्तांचा मार्ग मोकळा करून घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांची आज गॅझेटमध्ये नोंद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नवनिर्वाचीत नगरसेवकांचे नाव गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, मंगळवारी, २८ फेब्रुवारी नवनिर्वाचीत नगरसेवकांच्या नावाचे गॅझेट प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. गॅझेटमध्ये नाव नोंदण्यासाठी प्रशासन उपायुक्त मंत्रालयात ठाण मांडून आहेत. गॅझेटमध्ये नाव प्रसिद्ध झाल्यानंतर विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी केली जाणार आहे. तर १४ मार्चपर्यंत नव्या महापौरांची निवड केली जाण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या निकालानंतर आता नवनिर्वाचीत सदस्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रशासन उपायुक्त विजय पगार यांनी नवनिर्वाचीत सदस्यांच्या निवडीचे गॅझेट प्रसिद्ध करण्यासाठी मुंबईत ठाण मांडले आहे. नवनिर्वाचीत सदस्यांचे गॅझेट मंगळवारी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व पक्षांकडून विभागीय आयुक्तांकडे त्यांची गटनोंदणी केली जाणार आहे. गट नोंदणीनंतरच महापौरपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. गटनोंदणीनंतर प्रशासनाकडून विभागीय आयुक्तांना नव्या महापौरांच्या निवडीसंदर्भात पत्र दिले जाईल. त्यानंतर आयुक्तांकडून तारीख निश्चित केली जाणार आहे. सध्याच्या महापौरांची मुदत ही १५ मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे १४ मार्च मार्चपर्यंत नव्या महापौरांची निवड केली जाण्याची शक्यता आहे.

गॅझेट प्रसिद्धीला विरोध

मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेणाऱ्या पराभूत उमेदवारांनी गॅझेट प्रसिद्ध करण्यास विरोध केला आहे. विविध संघटनांनी एकत्र‌ित येवून आयुक्तांसह निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. ईव्हीएम मशीनमध्ये गडबड केल्याने चुकीच्या पद्धतीने मतदान प्रक्रिया झाली आहे. त्यामुळे ही बाब आता न्यायप्रविष्ठ होणार असल्याने नवनिर्वाचीत सदस्यांची नावे गॅझेटमध्ये प्रसिद्द करू नये, अशी मागणी विविध संघटना व पराभूत उमेदवारांनी केली आहे. त्यामुळे गॅझेट प्रसिद्धीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीसाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने चांगली कामगिरी केली असून, शिवसेना एक नंबरचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल असा दावा ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केला आहे. जिल्हा परिषदेत कोणा सोबत युती करायची याचा निर्णय मातोश्रीवरूनच होणार असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे. दरम्यान, मालेगाव तालुक्यात आपण कमी पडल्याची कबुली देत, राजीनामा पक्षप्रमुखांकडे पाठविल्याचे त्यांनी सांग‌ितले.

नाशिक जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नवनिर्वाचीत शिवसेना सदस्यांचा ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शिवसेनेच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय, शालीमार येथे सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बबनरावजी घोलप, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार अनिल कदम, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, नरेंद्र दराडे, धनराज महाले, उदय सांगळे, सुहास सामंत, महानगरप्रमुख दत्ता गायकवाड, संदीप गुळवे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना भुसे यांनी निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.

जिल्हा परिषदेत शिवसेना नंबर वन पक्ष ठरला आहे. शिवसेनेची कामगिरी अन्य पक्षांपेक्षा सरस ठरली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष हा शिवसेनेचाच होणार असून, जिल्हा परिषदेवर भगवा कोणत्याही परिस्थितीत फडकणार आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी कोणाची मदत घ्यायची याबाबतचा निर्णय हा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेच घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. जिल्हा परिषदेत मालेगाव तालुका हा कमी पडला आहे. त्यामुळे मी त्याची जबाबदारी स्विकारली असून, पक्षप्रमुखांकडे राजीनामाही दिलेला आहे. त्यांनी अजून काहीच निर्णय घेतलेला नसल्याचे त्यांंनी यावेळी सांगीतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीपी हरकतींवर आजपासून सुनावणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शहराच्या प्रस्तावित विकास आराखड्यावरील हरकती सुनावणीस मंगळवारपासून सुरुवात होत आहे. गत आठवड्यात २० फेब्रुवारी रोजी नगरपरिषदेने सभा घेऊन आरक्षणांबाबत ठराव केला आहे. १६ सप्टेबर २०१६ रोजी हरकतींसाठी प्रसिद्ध झालेल्या आराखड्यात पूर्वप्रसिद्धीकरिता झालेल्या ठरावानुसार काम झालेले नाही असा नगरसेवकांचा दावा आहे. हरकती दरम्यान सुमारे ४०० हरकत अर्ज आले होते. या हरकती सुनावणीसाठी नगर परिषद लोकप्रतिनिधींसह पर्यावरण आदी यंत्रणांच्या प्रतिनिधींची समिती तयार करण्यात आली आहे. त्यामुळे या समितीच्या सुनावणीकडे शहरसावास‌ीयांचे लक्ष लागले आहे. या समितीत तीन नगरसेवक, पर्यावरण तज्ज्ञ, नगरविकास खात्यातील निवृत्त अधिकारी यांचा समावेश असल्याचे समजते.

नगर परिषद लोकप्रतिनिधींसह, पर्यावरण अभ्यासकांच्या प्रतिनिधींची ही समिती शहरात दाखल झाली आहे. या समितीने आरक्षणांच्या संदर्भातील जागा प्रत्यक्षात पाहाव्यात अशी बहुतांश नागरिक आणि नगरसेवकांची मागणी आहे. डीपी तयार करताना शाही मार्गातील रुंदीकरण, २४ वर्षांपासून कायम ठेवलेली आरक्षणे अशा अनेक बाबतीत ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. त्यासह प्रस्तावीत डीपी नकाशा आणि भूमीअभिलेख नकाशा यांचा ताळमेळ बसत नाही. सिटी सर्व्हे क्रमांकाने नमुद केलेली आरक्षणे आणि त्यांच्या प्रत्यक्षातील जागा यांचादेखील मेळ बसत नाही. प्रस्ताव‌ित डीपी तयार होताना नगरपरिषदेने ४० सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यांची प्रत्यक्षात दखल न घेतल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती. नगरसेवकांनीच यावर हरकती घेतल्याने तेव्हा चर्चा झाल्या होत्या. शासनाचे भूखंड हळूहळू नाहीसे होत असताना त्याकडे दुर्लक्ष करून खासगी जम‌िनीवर आरक्षणे टाकली आहेत. शहराचा विकास होईल अशा जागा हिरव्या पट्ट्यात असून, पर्यावरणास हान‌िकारक ठरेल अशा डोंगर दऱ्यात पिवळे म्हणजेच रहिवासी क्षेत्र दाखविण्यात आले आहे.

सन १९९३च्या आराखड्यातील आरक्षणे अद्याप विकस‌ित झालेली नाहीत. मात्र ती कायम ठेवली आहेत. जम‌िनी संपाद‌ित करण्यास अडचणी निर्माण होतात व विकास कामे होत नाहीत, असा आजपर्यंतचा आराखड्याबाबतचा नागरिकांचा अनुभव आहे. शासकीय जागांवर आरक्षणे असल्यास शासनाच्या विविध योजनांमधील निधी उपलब्ध करून शहराचा विकास करता येणे शक्य होणार आहे. केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेचा लाभ घेण्यासाठी या आराखड्यात वाद निर्माण होणार नाही, असे बदल होणे गरजेचे आहेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आराखडा नवा, तरतूदी जुन्याच

१५ मार्च १९९३ रोजी तब्बल ५१ आरक्षणे होती. त्यातील अवघी दोन ते चार आरक्षणे अंमलात आली. त्यातही काही अद्याप न्यायालयात आहेत. असे असताना नव्याने त‌िच आरक्षणे कायम ठेऊन नेमके काय साधले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाढीव क्षेत्र मिळालेले असताना प्रस्ताव‌ित आरक्षणांमध्ये ३० मी रुंदीचे रस्ते आणि तत्सम जुन्याच तरतुदी कायम आहेत. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शहरासाठी साडेपाचशे कोटींची गरज

सन १९९३ साली शहराचे क्षेत्रफळ १.८९ चौ. कि.मी. आणि ५१ आरक्षणे होती. आता २०१६ च्या प्रस्ताव‌ित योजनेत शहराचे क्षेत्रफळ वाढीव हद्दीसह १३.६८ चौ.कि.मी. आरक्षणे ५६ याकरिता शासन आणि नगरपाल‌िका वगळता खासगी जमीन संपाद‌ित करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी साडेपाचशे कोटींपेक्षा अधिक निधी लागणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images