Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

युतीबाबत आज फैसला

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेला आता राजकीय घडामोडीला वेग आला असून पालकमंत्री गिरीश महाजन व विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर नाशिकला सोमवारी (दि. १३) येणार आहे. त्यांच्या उपस्थितीमध्येच भाजपाची रणनिती ठरणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीनंतर युतीमधील दोन्ही पक्षांचे मतभेद कमी झाल्यामुळे नाशिकमध्ये पुन्हा शिवसेनेबरोबर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक ही २१ मार्चला असून पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची निवडणूक १४ मार्चला आहे. त्यामुळे येथील सत्ता समीकरणात एकमेकांची गरज लक्षात घेऊन सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर या दोन्ही पक्षांधील दूरावा कमी झाला आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष जिल्ह्यात सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र येण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिका व जिल्हा परिषदेत दोन्ही पक्षांनी एकमेकांसमोर निवडणूक लढवण्यामुळे त्यांच्यातील दूरावा कायम होता. त्यामुळे निकालानंतर या दोन्ही पक्षात सत्ता स्थापननेबाबत कोणतीच बोलणी झाली नाही. महापालिकेत बहुमत मिळवल्याने भाजपला शिवसेनेची गरज नाही. पण जिल्हा परिषद व पंचायत समितीत दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज असल्यामुळे पालकमंत्री महाजन यांच्या उपस्थित शिवसेनेबरोबर चर्चा होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेत शिवसेनेला सर्वाधिक २५ तर भाजपाला १५ जागा मिळाल्या. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास त्यांना सत्ता स्थापने सोपे होते. पण दोन्ही पक्षांनी राज्यात विरोधात असलेल्या पक्षांशी संधान बांधून आपली रणनीती ठरवली. पण गेल्या दहा-पंधरा दिवसात राजकीय दोन्ही पक्षातला दुरावा कमी झाल्यामुळे जिल्ह्यातही शिवसेना-भाजप एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. पालकमंत्री महाजन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा आढावा घेऊन सदस्यांसोबत चर्चा करणार असल्याचे समजते. जिल्हा परिषदेत शिवसेनेबरोबर युती करून सत्तेची समीकरण मांडले जाण्याची शक्यता आहे. तर पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीसाठी शिवसेनेची मदत काही तालुक्यात शिवसेनेकडून घेण्याचे समजते.

आज मुदत संपणार
जिल्हाभरातील १५ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींची मुदत सोमवारी, १३ मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे येथे नव्याने निवडून आलेल्या सदस्यांमधून नूतन सभापती व उपसभापती निवड मंगळवारी, १४ मार्च रोजी होणार आहे. पंचायत समितीत ६० सदस्य शिवसेनेकडून निवडून आले आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ३२ तर भाजपाचे २७ सदस्य निवडून आले आहेत. शिवसेनेकडे ७ ठिकाणी बहुमत आहे. तर राष्ट्रवादी व भाजपाला तीन ठिकाणी संधी आहे. तसेच माकपला दोन ठिकाणी सभापती मिळण्याची चर्चा आहे.

जि. प. निवडणूक २१ मार्चला
जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे व उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्या पदाची २० मार्च रोजी मुदत संपणार आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी २१ मार्चला निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेत सर्वात जास्त सदस्य शिवसेनेचे २५ निवडून आले आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी कॉँग्रेस १८, भाजपा १५, कॉँग्रेस ८, माकपा ३ व अपक्ष ४ असे एकूण ७३ सदस्य आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी बहुमत हे ३७ सदस्यांचे आवश्यक आहे.

पालकमंत्री गिरीश महाजन सोमवारी नाशिकला येणार असून यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकारी निवडणुकीवर चर्चा होणार आहे. त्यानंतर निर्णय घेतले जातील.
- किशोर काळकर, विभागीय संघटनमंत्री, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


म्हाडाला मिळेना प्रतिसाद

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबईसह मोठ्या शहरात प्रचंड मागणी असलेल्या म्हाडाच्या घरांकडे नाशिकमध्ये कुणी पहायला तयार नाही. ग्राहक मिळत नसल्याने ९८३ पैकी ८६१ घरे खाली पडून आहेत. विशेष म्हणजे या घरांच्या किंमती बाजारभावपेक्षा जास्त असल्याची ओरड असल्यामुळे म्हाडाने काही स्किममध्ये किंमत कमी करूनही आठ महिन्यात त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याचेही समोर आले आहे.

म्हाडाच्या घरांच्या विक्रीत हरित लवादाचा अडसर होता. पण तो आता दूर झाला आहे. त्यामुळे अर्ज प्राप्त झालेल्या १२२ घरांसाठी आता म्हाडाच्या कागदपत्र पूर्ण करण्याच्या हाललाची सुरू झाल्या आहे. तर उर्वरित ८६१ घरांसाठी म्हाडाला पुन्हा किंमती कमी करावे लागणार आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर कोणत्याही राजकीय पक्ष वा नेत्यांनी या मुद्याकडे गांभिर्याने बघितले नाही. म्हाडाच्या या घराला मागणी नसल्यामुळे नवीन स्किमही रखडणार आहे.

नाशिक म्हाडाने शहरात विविध स्किम तयार केल्या काहींना चांगला प्रतिसाद मिळाला तर काही स्किम मात्र किंमती जास्त असल्यामुळे रखडल्या. म्हाडाने आडगाव, पंचक, मखमलाबाद, म्हसरूळ, पाथर्डी व येथे नव्याने साईड डेव्हल्प करून फ्लॅट बांधले. पण या स्किममध्ये फ्लॅटच्या किंमती बाजारभावापेक्षा जास्त असल्यामुळे त्याला प्रतिसादच मिळाला नाही. त्यानंतर आठ महिन्यापूर्वी ना नफा ना तोटा या तत्त्वावर सगळ्यांना घरे मिळावी यासाठी, म्हाडाने किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पन्न मर्यादा शिथिल केल्यामुळे त्यात कोणालाही प्लॅट घेता येणार असून प्रथम येईल त्याला प्राधान्य त्यात देण्यात आले. तरीही त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

असे आहेत म्हाडाचे फ्लॅट
टू बीएचके फ्लॅटमध्ये बाल्कनीसह बैठक खोली, दोन शयन कक्ष, त्यात एकाच अटॅच टॉयलेट, किचन व एक स्वतंत्र टॉयलेट बाथरुम, ग्रिलसह अॅल्युनियम स्लायडिंग खिडक्या, व्हिट्रीफाईड टाइल्स या सुविधा आहे. तर एक बीएचकेला १ शयनकक्ष कमी असणार आहे. तसेच प्रत्येक इमारतीत सोसायटी कार्यालय, दोन लिफ्ट, प्रशस्त जिन्यासह फायर फायटिंगची सुविधा, सामाईक कव्हर्ड पार्किंग, गार्डन, रस्ते व सामाईक संरक्षक भिंत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातबाऱ्याची प्रतीकात्मक होळी

0
0

म. टा. वृत्तसेवा, इगतपुरी

गेल्या तीन वर्षांपासून कधी दुष्काळ, कधी गारपीट, तर कधी अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी बेजार झाला आहे. त्यातच यंदा शेतमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात आहेत. सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने, सरकारचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सातबाऱ्याची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे,’ ‘स्वामीनाथन आयोग लागू झालाच पाहिजे’, ‘कर्जमाफी करा नाही तर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. महानगरप्रमुख नितीन रोठे पाटील, कार्याध्यक्ष शरद लभडे, हॉकर्स युनियनचे प्रमुख नीलेश कुसमोडे, मनोज भारती, योगेश कापसे, पुंडलिक चव्हाण, दीपक दहीकर, सचिन पवार, सचिन चौघुले, बाळासाहेब सोनवणे, दीपक मोरे, राजेश ढाकणे, शुभम सोनवणे, कैलास घन, धोंडिराम कोंबडे आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी होळीत सातबारा उतारे टाकून शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलेसाठी वाहिलेला ‘राजा’

0
0

एखादी व्यक्ती कलाकार नसते, परंतु कलेविषयी तिला प्रचंड तळमळ असते. कलाकाराला व्यासपीठ मिळावे यासाठी पदरमोड करून ती प्रयत्न करीत असते. कलाकाराची कला जनसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी त्या व्यक्तीची अव्याहतपणे घडपड सुरू असते. असाच एक नाशकातील अवलिया म्हणजे राजा पाटेकर. या व्यक्तीला कलेची जाण तर आहेच, त्याचबरोबर दुसरा कलाकार मोठा व्हावा, ही त्याची तळमळ आहे. राजा पाटेकर यांनी स्वतःच्या जागेत कलादालन सुरू केले असून, ते सर्व कलाकारांना मोफत उपलब्ध करून दिले जाते. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांची सुरू असलेली कलेची धडपड तरुणांनादेखील लाजवणारी आहे.

राजा पाटेकर यांचा जन्म नाशिक शहरात झाला. शालेय शिक्षण पेठ विद्यालयात पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ‘आयटीआय’मध्ये टर्नरचा कोर्स करून अंबड भागात स्वतःची फॅक्टरी सुरू केली. या ठिकाणी देशातील मोठ्या कंपन्यांची जॉबची कामे ते करीत होते. वडील संगीत इंडस्ट्रीमधील प्रख्यात व्हॉयोलिन वादक असल्याने त्यांच्यावर संगीताचे संस्कार घडत गेले. याच काळात त्यांनी विविध गुरूंकडून गिटार, व्हॉयोलिन, तबला अशा विविध वाद्यांचे प्रशिक्षण घेतले. व्यवसायातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी कलेसाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला. नाशिक हे कलेचे माहेरघर, मुंबई-पुण्याखालोखाल नाशिकमध्ये सांस्कृतिक वातावरण चांगले आहे. मात्र, कलेला व्यासपीठ मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या जागा पुरेशा नाहीत. ज्या आहेत, त्या अत्यंत खर्चिक आहेत. उभरत्या कलाकारांना तेथे आपली कला सादर करणे शक्य होत नाही. त्यामुळेच नाशिक शहरातील चित्रकला, शिल्पकलांचा म्हणावा तसा विकास झाला नाही. शिक्षणमहर्षी वा. गो. कुलकर्णी यांनी १९४० मध्ये चित्र-शिल्पांचे रोपटे लावले. कलानिकेतनची स्थापना करून चित्रकला महाविद्यालय सुरू केले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कलाशिक्षक तयार झाले. काही प्रमाणात शिल्पकार तयार होऊन आपापल्या क्षेत्रात नावारुपाला आले. याच काळात नाशिक शहरात आर्ट गॅलरीची गरज भासू लागली. सार्वजनिक वाचनालयात असलेली आर्ट गॅलरी पाडून टाकल्याने चित्रकारांना प्रदर्शनासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. राजू खुळगे, बाळ नगरकर हे राजा पाटेकरांचे खास मित्र. त्यांच्या बरोबर राहून चित्र कसे पाहावे याचे ज्ञान प्राप्त झाले. कलाकारांची कलाप्रदर्शनाची अडचण ओळखून आपल्या बंगल्यात असलेल्या जागेवर त्यांनी आर्ट गॅलरी तयार करण्याचा निश्चय केला. दि. ७ नोव्हेंबर २०१० रोजी त्यांनी आपल्या जागेत पहिले प्रदर्शन भरविले. कला चांगली असेल, तर ती पाहण्यासाठी लोक कुठूनही येतात, या उक्तीनुसार या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनांचा सिलसिला सुरू झाल्यानंतर त्यांनी सावंत बंधू, स्नेहल एकबोटे, नयन नगरकर, शिल्पकार संदीप लोंढे, यतीन पंडित, आर्किटेक्ट संजय पाटील, शिवाजी तुपे, अशा एक ना अनेक कलाकारांची प्रदर्शने भरवली. आजपर्यंत या ठिकाणी शंभरावर प्रदर्शने झाली आहेत. त्याचप्रमाणे तीसच्या वर गाण्यांच्या मैफली झाल्या आहेत. या कलादालनाला आतापर्यंत आंतरराष्ट्रीय चित्रकार वासुदेव कामत, सुहास बहुलकर, श्रीकांत जाधव, शार्दुल कदम, जोत्स्ना कदम, अनिल अवचट, राज ठाकरे, शिल्पकार सदाशिव मराठे आदींनी भेट देऊन राजा पाटेकरांचे कौतुक केले आहे. आज नाशिकमधील निःस्वार्थी कलेचा उपासक म्हणून राजा पाटेकरांचा लौकिक आहे. त्यांनी अनेक चित्रकार-शिल्पकारांवर लघुपट तयार केले असून, विविध फेस्टिवलमध्ये सादर केले आहेत. राजा पाटेकर हे रसिक तर आहेतच, शिवाय ही कला विविध माध्यमांद्वारे प्रेक्षकांपर्यंत कशी पोहोचवायची याचे कसबदेखील त्यांच्याकडे आहे. त्यासाठी ते सोशल मीडियाचादेखील खुबीने वापर करीत असतात. काळानुसार त्यांनी स्वतःला तयार केले आहे. आपल्या यशात ज्येष्ठ चित्रकार सी. एल. कुलकर्णी व ज्येष्ठ गायक शंतनू गुणे यांचा मोठा हात आहे, असे ते आवर्जून सांगतात.



नाशिककरांनो, लिहिते व्हा!

ज्येष्ठ नागरिक म्हटले, की वयाचा उत्तरार्ध आणि त्यामुळे कमी झालेला अॅक्टिव्हनेस असा बऱ्याच जणांचा समज असतो. पण, अनेक ज्येष्ठ हे केवळ वयाने वृद्ध असतात, त्यांचे मन मात्र तरुणच असते. त्यांच्या कामातून, समाजसेवेतून किंवा अन्य अॅक्टिव्हिटीजमधून ते आपण अजूनही तरुण आहोत हे दाखवून देतात. अशाच ज्येष्ठांसाठीचे हे व्यासपीठ म्हणजे आमचा ‘यंग सीनिअर्स’ कॉलम. चला तर मग, तुम्ही जर असे यंग सीनिअर असाल, तर थेट आमच्याशी संपर्क करा किंवा तुमच्या ओळखीत, पाहण्यात असे कोणी असेल, तर त्यांचे नाव सुचवा. योग्य व्यक्तींना या सदरातून नक्कीच प्रसिद्धी दिली जाईल.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग,

तिसरा मजला, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड, ना‌शिक.

समन्वय : फणिंद्र मंडलिक- ९४२३१७४४९५

ई-मेल : fanindra.mandlik@timesgroup.com

(पाकीट आणि ई-मेलवर ‘यंग सीनिअर्स’ उल्लेख करावा.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदूला हुंदका अनावर

0
0

नाशिकमध्ये केले आजीच्या अस्थींचे विसर्जन

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आईवडिलांच्या निधनाने पोरका झालेल्या चंदूला जिने सांभाळ केला, आईवडिलांचे प्रेम दिले त्या आजीच्या आठवणीने धुळ्याचा जवान चंदू चव्हाणला हुंदका अनावर झाला. अत्यंत शोकाकुल वातावरणात चंदूने आजीच्या अस्थींचे रविवारी दुपारी रामकुंडात विसर्जन केले.

आईवडिलांच्या निधनानंतर चंदू चव्हाण याला आजीने (लीलाबाई) माता-पित्याचे प्रेम देऊन सांभाळ केला. चंदू सैनिकात दाखल झाला आणि सर्जिकल स्ट्राइकनंतर अनवधानाने पाकिस्तानात गेला. ही माहिती कळताच आजीला मोठा धक्का बसला आणि त्यातच तिचे निधन झाले. चंदू सुरक्षित परत येईपर्यत तिच्या अस्थीचे विसर्जन न करण्याचा चंदूच्या नातेवाइकांनी निर्णय घेतला होता. चंदू भारतात सुखरूप परतल्यानंतर त्याच्या हस्ते नाशिकच्या रामकुंडात अस्थी विसर्जन करण्याचा निर्णय घेण्यात आला. धुळ्याच्या पुरोहितांनी चंदू सुखरूप परत यावा यासाठी अनेक धार्मिक विधी केले. सरकारच्या प्रयत्नातून चंदू शत्रूच्या तावडीतून सुखरूप परतल्यानंतर रविवारी तो नाशिकला अस्थी विसर्जनासाठी आला होता.

‘आजीइतकेच भारतावर प्रेम!’

चंदूच्या पायाला दुखापत झालेली असल्याने त्याचा भाऊ भूषण चव्हाण याने त्याला आधार दिला होता. अस्थी विसर्जन करताना आजीच्या आठवणीने त्याचा शोक अनावर झाला. अस्थी विसर्जनानंतर रामकुंडात त्याने स्नान केले. ‘‘आईवडिलांचे छत्र हरपल्यानंतर आजीने माया लावली, प्रेम दिले; तसेच माझे प्रेम भारतावर आहे. भारत देश महान आहे’’ असे सांगितले.

‘आजीचा चंदूवर खूप जीव होता...’

चंदूची आतेबहीण मंगला पाटील यांनी सांगितले, की चंदू लहान असताना आई-वडिलांचे निधन झाले. तेव्हापासून आजीनेच चंदूचा सांभाळ केला. तिचा चंदूवर खूप जीव होता. तो पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या बातमीने तिला प्रचंड धक्का बसला. या धक्क्यानेच तिची प्राणज्योत मालवली. चंदू पुन्हा भारतात येईल, याची शक्यता नव्हती. हे दुःख तिला पेलवता आले नाही. चंदूला पुन्हा भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडला पारा ८.५ अंशांवर

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

उन्हाळा सुरू झाला तरी निफाडकरांना गेल्या दोन दिवसांपासून थंडीच्या महिन्याचा अनुभव येत आहे. रविवारी (दि. १२) निफाड येथील कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात ८.५ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात १० अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान आहे

गुरूवार, शुक्रवार या दिवशी वातावरणात गारवा होता. शनिवारी (दि. ११) सायंकाळपासूनच हवा वाहत होती रात्री आठ वाजेपासून थंडी वाजायला लागली होती. त्यामुळे उन्हाळा सुरू झाला तरी अचानक थंडी जाणवायला लागल्यामुळे उबदार कपडे पुन्हा बाहेर निघाले होते. रात्री बाहेर फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी स्वेटर, कानटोपी परिधान केल्याने जानेवारीत दिसलेले चित्र पुन्हा दिसले.

रविवारी पहाटेपर्यंत असलेल्या थंडीची तीव्रता कमी होऊन दुपारी १२ वाजेदरम्यान मात्र उन्हाचा चटकाही जाणवत होता. ऊन आणि थंडी अशा दुहेरी मोसमाची अनुभूती निफाडकरांना या वातावरण बदलाने येत आहे. मात्र, वातावरणाच्या या बदलामुळे आजारी पडणाऱ्यांचीही संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.

द्राक्ष उत्पादक चिंतेत

ऊन थंडीचा हा खेळ एका बाजूला सुरू असताना मध्येच ढगाळ हवामानही येत आहे. त्यामुळे द्राक्ष हंगामात व्यग्र असणाऱ्या द्राक्ष उत्पादकांच्या जिवाची घालमेल होत आहे. काही हवामान तज्ज्ञांकडून बेमोसमी पावसाची शक्यता सांगितल्याने आणि वातावरणात तशा प्रकारचे बदल, शिवाय चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या बेमोसमी गारपिटीचे वृत्त

यामुळे द्राक्ष उत्पादकही धास्तावले आहेत. आपल्या बागेतील द्राक्ष काढणी उरकून घेण्याच्या तयारीत ही द्राक्ष उत्पादक आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवडाभरात पाण्याचे आवर्तन

0
0

मालेगाव तालुक्यातील ११ गावांना मिळणार फायदा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील विविध तालुक्यांसाठी ठरल्याप्रमाणे पाण्याचे आवर्तन सोडले जात आहे. यामुळे माणिकपुंज आणि चणकापूरमधून पुढील आठवड्यात पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

गेली काही वर्ष अल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरू शकली नाहीत. परिणामी शहर तसेच जिल्हावासियांना तीव्र टंचाईच्या झळा सोसाव्या लागली. पिण्याच्या पाण्यासाठीच वणवण करावी लागल्याने शेतीक्षेत्राचा घसा कोरडाच राहीला. पाण्यासाठी कोर्टात याचिका दाखल झाल्याने वादाचे प्रसंगही उद्भवले. गतवर्षी या कालावधीत जिल्ह्यातील लहान व मोठया अशा सर्वच धरणांमध्ये केवळ १९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मात्र जुलै २०१६ नंतर पुढील दोन महिने समाधानकारक पाऊस झाला.

सद्यस्थितीत धरणांमध्ये ४० टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. तरीही जिल्ह्यातील बागलाण, मालेगावसह काही तालुक्यांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. म्हणूनच मालेगाव आणि बागलाण तालुक्यामध्ये मार्चच्या पहिल्याच आठवड्यात टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. उन्हाची तीव्रता वाढेल तसे पाण्याची गरज वाढेल. जलस्त्रोतही आटतील, अशावेळी आणखी काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासू शकते.

या पाणी वाटपाच्या नियोजनानुसार जिल्हा प्रशासनाने पाण्याचे रोटेशन सोडण्यास परवानगी दिली असून, पुढील आठवड्यात माणिकपुंजमधून पिण्यासाठी ३० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाचा फायदा जिल्ह्यातील बाभूळवाडी, साकोरे, मुळडोंगरी, चांदोरा, न्यायडोंगरी, बिरोळा, सावरगाव या गावांना व तेथील ग्रामस्थांना होणार आहे. तर मालेगाव तालुक्यासाठी चणकापूर धरणामधून पुनद नदीद्वारे मंगळवारी (दि. १४ मार्च) रोजी ४७६ दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. या पाण्याचा लाभ सौंदाणे, डोंगरगाव, नांदगाव, मेशी यांना होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलआयसीची मदत; विशेष विद्यार्थ्यांना स्कूल बस

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अमळनेरस्थित एका विशेष मुलांच्या शाळेसाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) नाशिक विभागातर्फे स्कूल बस भेट देण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे डॉ. कुबेर वैद्य यांच्या वतीने गतिमंद मुलांसाठी चार दशकांपासून शैक्षणिक कार्य उभारण्यात आले आहे. या स्कूल बसमुळे गतिमंद विद्यार्थ्यांची वाहतूक अधिक सुरक्षित होणार आहे. एका समारंभात या शाळेला बसच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या.

डॉ. वैद्य यांनी १९८१ मध्ये मतिमंद विद्यार्थी शिक्षण मंडळाची स्थापना केली होती. त्यांची स्वत:ची मुलगी गतिमंद असल्याने विशेष विद्यार्थ्यांच्या पालकांना जाणवणाऱ्या अडचणी ते चांगल्या प्रकारे जाणून होते. यामुळे त्यांनी या कार्यावर लक्ष केंद्रित केले होते. या शाळेचे काम जेथे चालते तेथून परिसरातील खेड्यापाड्यांहून विशेष विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत ने-आण करण्याचा खटाटोप करताना शाळेला अनेक अडचणींना सामोर जावे लागत होते. या अडचणी लक्षात घेऊन डॉ. वैद्य यांनी एलआयसीकडे विनंती करीत स्कूल बसची गरज मांडली होती. एलआयसीच्या सुवर्णमहोत्सवी फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सहभाग घेतला जातो. दहा वर्षांपूर्वी हे फाऊंडेशन स्थापन झाले आहे. नुकतेच हिरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत संस्थेने पेठ तालुक्यातील बेहरपाड्यासारख्या दुर्गम परिसरात पिण्याचे पाणी पुरविले होते. शाळेस बस भेट देण्याच्या सोहळ्यात एलआयसीचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक प्रदीप शेनॉय यांनी ममता शाळेचे संस्थापक डॉ. वैद्य यांच्याकडे चाव्या सुपूर्द केल्या. यावेळी अमळनेरचे एलआयसी शाखा व्यवस्थापक ई. बी. मोरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सावानासाठी १२२ अर्ज विक्री

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
सार्वजनिक वाचनालयासाठी निवडणूक अर्ज भरण्याची आज (दि. १३) अंतिम मुदत असून, संध्याकाळपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. आतापर्यंत १२२ अर्जांची विक्री झाली असून, कार्यकारी मंडळाचे १००, अध्यक्षपदाचे ७ तर उपाध्यक्ष पदासाठी १५ अर्जांचा त्यात समावेश आहे.
अध्यक्षपदासाठी रविवारी मधुकर झेंडे आणि प्र. द. कुलकर्णी यांनी अर्ज नेले असून, उपाध्यक्षपदासाठी आकाश पगार, बी. जी. वाघ, नानासाहेब बोरस्ते आणि अरूण नेवासकर यांनी अर्ज नेले आहेत. कार्यकारी मंडळासाठी हंसराज वडघुले, शरद पुराणिक, चंद्रहास वर्टी, सुभाष सबनीस, शारदा गायकवाड, रमेश जुन्नरे, कृष्णा शहाणे, हेमंत देवरे, मिलिंद चिंधडे, शंकर बर्वे, सुनील कुटे, चैत्रा हुदलीकर यांच्यासह ३७ अर्ज स्वीकृत आहेत.

मतदारयादीत नावे नाहीत
तिघा सभासदांची मार्चपर्यंतची फी भरली असताना तिघांचीही नावे मतदार यादीत नसल्याने हे काय गौडबंगाल आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सावानाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून फेब्रुवारी २०१७ पर्यंतची फी भरण्याचा निकष आहे. परंतु, एका प्रतिष्ठिताने तिघा जणांची मार्चपर्यंतची फी भरूनदेखील त्या तिघा सभासदांची नावे यादीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हे प्रतिनिध‌िक उदाहरण असल्यास आणखी कितीतरी नावे यादीत नसल्याची शक्यताही त्यामुळे निर्माण झाली आहे. यादीत नाव नसल्यास काय करावे हेदेखील वाचनालयात कुणालाही सांगता येत नसल्याने मतदानासाठी काय करावे असे सभासदाला झाले आहे. कारण वाचनालयात विचारल्यास निवडणूक अधिकाऱ्यांना भेटा असे सांगण्यात येते आणि निवडणूक अधिकाऱ्यांना भेटल्यास ते माझे काम नाही, यादी फायनल होऊन माझ्याकडे आली आहे, असे उत्तर मिळते त्यामुळे या सभासदाने कोठे जावे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनविक्रीला नोटाबंदीचा ब्रेक

0
0

नाशिक: नोटाबंदीच्या निर्णयानंतर नाशिकमधील वाहनविक्रीत लक्षणीय घट झाली आहे. विशेषतः डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांत वाहनविक्रीचा ग्राफ निम्म्यापेक्षा अधिक उतरला. यामुळे फक्त नाशिकमध्येच जवळपास ८५ कोटी रुपयांची उलाढाल कमी झाली. फेब्रुवारी महिन्यापासून वाहनविक्रीची गाडी पुन्हा रूळावर येत असून, आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हा तोटा भरून काढण्याची धडपड सुरू आहे.

नोटाबंदीनंतर निर्माण झालेली आर्थिक कोंडी आता काही प्रमाणात सुटू पाहते आहे. मात्र, नोव्हेंबर २०१६मध्ये केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम बाजारपेठेत जाणवला. नाशिकमधील वाहनविक्रीच्या उलाढालीला यादरम्यान मोठा ब्रेक लागला. एप्रिल २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या आर्थिक वर्षात नाशिकमध्ये ७६ हजार ४९० दुचाकींची विक्री झाली होती. एप्रिल २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या ११ महिन्याच्या कालावधीत मात्र हेच प्रमाण ६७ हजार ६६८ इतके राहिले. मुळात वाहनविक्रीचा ग्राफ कमी होत असताना नोव्हेंबर २०१६मध्ये झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयाने या क्षेत्राचे कंबरडे मोडले. दोन वर्षांतील चार महिन्यांचा तुलनात्मकदृष्ट्या विचार करता वाहन विक्रीत १२ हजार २२८ वाहनांची घट झालेली दिसते. नाशिकमध्ये दुचाकी विक्रीचे प्रमाण सर्वाधीक आहे. १२ हजार दुचाकींची सरासरी ६० हजार रुपये किंमत गृहीत पकडली तर ७२ कोटी रुपयांचा फटका बसल्याचे स्पष्ट होते. उर्वरीत २२८ मोठ्या वाहनांची किंमत सरासरी सहा लाख रुपये इतकी मानली तर १३ कोटी ६८ लाख रूपयांचे चलनवलन या महिन्यांमध्ये कमी झालेले दिसते. याबाबत सूत्रांनी सांगितले की, वाहनविक्रीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. आलेला ग्राहक कसातरी गळी उतरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. बँकांकडून वाहन कर्जपुरवठा करणाऱ्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, ग्राहकच समोर येत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर ऑटोमोबाइल क्षेत्र तसेच त्याआधारित रोजगारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नोव्हेंबरपूर्वी टॅक्ट्रर-ट्रकची विक्री

मागील वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे दिवाळीपर्यंत ट्रॅक, ट्रॅक्टर तसेच मोटार कारला चांगली मागणी नोंदवण्यात आली. शहरी भागात व्यावासायिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या डिल‌िव्हरी व्हॅनमुळे (चारचाकी) थोडीफार आर्थिक उलाढाल झाली. आता तर नवीन कारसाठी ग्राहक उपलब्ध नाहीत. संख्यात्मक दृष्ट्या दुचाकींची विक्री फारच घटली असून, तिचा परिणाम बाजारपेठेवर जाणवतो आहे.

आरटीओकडे नोंदणी झालेल्या नवीन वाहनांची संख्या

नोव्हेंबर २०१५- ११८०१ - नोव्हेंबर २०१६-११७२४

डिसेंबर २०१५-११४७३ - डिसेंबर २०१६-८४१४

जानेवारी २०१६-११७४७ - जानेवारी २०१७-४४५४

फेब्रुवारी २०१६-८८६५ - फेब्रुवारी २०१७-७०६४

एकूण- ४३८८५ - ३१६५७

-विक्रीतील घट १२,२२८



आर्थिक वर्षातील वाहनांची नोंदणी

वाहनाचा प्रकार- एप्रिल ते फेब्रुवारी २०१७- एप्रिल ते फेब्रुवारी २०१६

मोटारसायकल-४५,३३०-५१,७६७

स्कूटर-२१,२०३-२३,०१२

मोपेड-१,१३५-१,७११

मोटार कार-१३,३४९-१२,१८०

अॅटोरिक्षा-७०२-१,१५७

ट्रक-८३९-५३७

डिलेव्हरी व्हॅन(चारचाकी) -१,६१६-८६३

डिलेव्हरी व्हॅन(तीनचाकी) -१,००९-१,५६५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिक्लेम नाकारणाऱ्या इन्शुरन्स कंपनीला दणका

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जन्मतः आजार असल्यामुळे तो पॉलिसी घेतल्याच्या पहिले दोन वर्षांसाठी कव्हर होत नसल्याचे कारण देत विमा दावा नाकारणाऱ्या मालेगावच्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला दोन लाख देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक न्यायमंचाने दिला आहे. त्याचप्रमाणे तक्रारदारास शारीरिक व मानसिक त्रासापोटी १० हजार रुपये भरपाई व अर्जाचा खर्च ५ हजार असा एकूण १५ हजाराचा दंडही ठोठावला आहे.

मालेगाव येथील मनीष अश्विनकुमार बोहाडे यांनी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी व इंडिया हेल्थकेअर सर्व्हिसेस (टीपीए) कंपनीविरुद्ध तक्रार ग्राहक न्यायमंचात दाखल केली होती. त्यात त्यांनी म्हटले, की मी दोन लाखांचे विमा संरक्षण असलेली पॉलिसी घेतली होती. या पॉलिसीमध्ये मी, पत्नी व मुलगी यांच्या नावाचा समावेश होता. माझी मुलगी भूमिका हिच्यावर अंधेरी येथील लीलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात सायनस व्हेनोसिस डिफेक्ट या आजारावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी २ लाख ५५ हजार इतका खर्च आला. ती रक्कम मिळवण्यासाठी दावा केल्यानंतर जन्मतः आजार असल्यामुळे पॉलिसी घेतल्याच्या पहिल्या दोन वर्षांसाठी कव्हर होत नसल्याचे कारण देत विमा दावा नाकारला.

या तक्रारीवर मालेगावच्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून युक्तिवाद करताना सांगण्यात आले, की पॉलिसी नूतनीकरण करण्यात खंड पडला. तक्रारदाराची मुलगी भूमिका हिच्या बाबतीत तक्रार निर्माण झाली. त्या वेळी विमा पॉलिसीचे दोन वर्षे पूर्ण झालेले नव्हते. तक्रारदाराने दाखल केलेली उपचारांची कागदपत्रे स्पष्ट करतात, की त्यांच्या मुलीला झालेला आजार कन्जनायटल हार्ट डिफेक्ट आहे. तिला असलेला आजार जन्मजात असल्यामुळे पॉलिसी क्रमांक ४.३ मध्ये दिलेल्या १९ क्रमांकाच्या आजारामध्ये समावेश होतो, ज्यासाठी पॉलिसी घेतल्यानंतर प्रथमच दोन वर्षे विमा लाभ देय नाही. त्यामुळे हा दावा फेटाळण्यात यावा.

या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमंचाने निकाल देताना सांगितले, की कोणताही ठोस असा वैद्यकीय निष्कर्ष नसताना तक्रारदाराच्या मुलीचा आजार कन्जेनायटल म्हणजेच जन्मतः असल्याचा निष्कर्ष काढून विमा दावा नाकरणे सेवेतील कमतरता व अनिष्ट व्यापारी प्रथा आहे. त्यामुळे तक्रारदाराला पॉलिसीप्रमाणे दोन लाख अदा करावेत, त्याचप्रमाणे तक्रारदारास शारीरिक व मानसिक त्रासपोटी १० हजार रुपये भरपाई व अर्जाचा खर्च ५ हजार असा १५ हजार रुपये देण्याचेही आदेश दिले. हा निकाल जिल्हा ग्राहक न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे- कुलकर्णी, कारभारी जाधव यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉटल क्रशिंगद्वारे रेल्वे प्रवाशांची कमाई!

0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

रेल्वे स्थानक आणि रेल्वेमार्गांवर प्रवाशांकडून प्लास्टिकच्या बाटल्या फेकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नामी उपाय म्हणून रेल्वेने बॉटल क्रशिंग मशिन प्रायोगिक तत्त्वावर मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानकात बसविले आहे. बाटल्या फेकण्याएवजी या मशिनमध्ये टाकल्यावर त्यांच्या चिप्स तयार होतात. बदल्यात प्रवाशाला पाच रुपयांचे कूपन मिळत आहे. नाशिकमधील रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या पाहता येथेदेखील हे मशिन बसविण्याची मागणी प्रवासीवर्गाकडून केली जात आहे.

ही आहे वस्तुस्थिती

देशात दररोज अडीच कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. ही संख्या ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. जगात रेल्वेच्या जाळ्याबाबत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. अमेरिका प्रथम, चीन द्वितीय आणि रशिया तिसऱ्या स्थानी आहे. अमेरिकेत रेल्वे खासगी क्षेत्रामार्फत चालवली जाते. तेथे प्रतिकिलोमीटर रेल्वेमार्गावर १३७३ लोकसंख्येचा बोजा आहे. चीनमध्ये रेल्वे सरकारी आहे. तेथे रेल्वेमार्गावर हाच बोजा ११ हजार २१८ प्रवासी इतका आहे. रशियातही रेल्वे सरकारी मालकीची आहे. तेथे रेल्वेमार्गावर लोकसंख्येचा बोजा प्रतिकिलोमीटर १६६९ आहे. मात्र, भारतात हाच आकडा १८ हजार ३९० इतका प्रचंड आहे. त्यामुळेच भारतीय रेल्वे स्थानकात दररोज हजारो टन कचरा फेकला जातो. एकट्या नवी दिल्ली स्थानकात दररोज २००० किलो कचरा संकलित केला जातो.

असे आहे मशिन

स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत रिसायकल मशिन रेल्वे स्थानकावर बसविण्यात येत आहे. कचरा सफाईतून कमाई हे त्याचे वैशिष्ट्य आहे. पर्यावरणाची हानी टाळणे आणि स्थानक स्वच्छ ठेवणे, हा त्याचा उद्देश आहे. हे मशिन एटीएमसारखे आहे. पाण्याची रिकामी बाटली मशिनमध्ये टाकल्यावर बाटलीचे तुकडे होऊन ते पेटीत जमा होतात, तर समोरून डिस्काउंट कूपन येते. प्रवाशाला त्याच्या इच्छेनुसार पाच रुपयांचे डिस्काउंट किंवा मोबाइल रिचार्ज कूपन मिळते.

मशिनची कमाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत हे मशिन तयार करण्यात आले आहे. एका रिसायकल मशिनची किमत सात लाख रुपये आहे. दिवसाला पाच हजार बाटल्यांचे चिप्स करण्याची त्याची क्षमता आहे. मशिन सुरू झाल्यावर बारा सेकंदांत बटण दाबावे लागते. त्यानंतर बाटलीचा बारकोडचा एरिया वर करून बाटली मशिनमध्ये टाकली जाते. बाटलीचे स्कॅनिंग होते व नंतर बाटली कट होऊन सहा सेकंदांत तिच्या चिप्स तयार होतात. त्यापासून कार्पेट, पिशव्या, कपडे बनविता येतात. पाच हजार बाटल्या क्रश झाल्यानंतर मशिन स्वच्छ केले जाते.

दहा स्थानकांवर बसविणार

ज्या स्थानकांवर प्रचंड गर्दी असते तेथे प्रथम हे मशिन बसविले जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकात हे मशिन बसविण्यात आले आहे. सुरुवातीला पश्चिम रेल्वेच्या दहा स्थानकांवर वीस मशिन्स बसविले जाणार आहेत. मुंबई सेंट्रल, वांद्रा लोकल, वांद्रा टर्मिनस, गोरेगाव, अंधेरी, सांताक्रूज, बोरिवाली, भायंदर या स्थानकांचा त्यात समावेश असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.


स्वच्छतेबाबत नाशिकरोड रेल्वे स्थानक देशात सहावे आहे. हे स्थानक चोवीस तास स्वच्छ ठेवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कमर्चारी राबत असतात. मात्र, तरीही मोठ्या संख्येने प्लास्टिकच्या बाटल्या फेकल्या दिसते. त्यामुळे येथे या मशिनची आवश्यकता आहे.

-अपेक्षा रकिबे, विद्यार्थिनी


रेल्वे सुरू झाल्यावरही प्रवासी मार्गावर दुतर्फा बाटल्या फेकतात. त्यामुळे नाशिकमध्ये बॉटल क्रश मशिन बसविण्याची गरज आहे. स्थानकाबरोबरच शहरातील गर्दीच्या ठिकाणीही असे मशिन बसविल्यास प्रदूषणाची समस्या निकाली निघेल.

-भरत जाधव, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांस्कृतिक पावित्र्य जपणारे सभागृह

0
0


रामनाथ माळोदे, पंचवटी

गंगापूररोडवरील नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी साकारण्यात आलेल्या शंकराचार्य न्यासाच्या शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृहाने नाशिकच्या सांस्कृतिक पावित्र्याची जपणूक करणारे सभागृह म्हणून मानाचे स्थान मिळविले आहे. या सभागृहाच्या स्थापनेपासूनच कोणत्याही प्रकारचा आर्थिक हेतू डोळ्यासमोर ठेवण्यात आलेला नाही. ठराविक कार्यक्रमांनाच येथे सादरीकरणासाठी स्थान देण्यात आल्याने, तसेच येथील कार्यक्रम अगदी अचूक वेळेत सुरू करण्याच्या प्रयत्नाने या सभागृहाने नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

२०१२ पासून झाले खुले

सामाजिक समरसतेचे उद्गाते शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्या स्मरणार्थ गंगापूररोडवर भव्य शंकराचार्य संकुलाची उभारणी करण्यात आली. या सभागृहाचे भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्त मंत्री दादा वेदक, लक्ष्मणराव लोंढे, योगेश कनानी यांच्या हस्ते ९ फेब्रुवारी २००७ रोजी झाले. याच मान्यवरांच्या हस्ते २ सप्टेंबर २०१२ रोजी उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष राजाभाऊ मोगल आणि कार्यवाह आनंद जोशी होते. उद्घाटनानंतर हे सभागृह नाशिकच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खुले करण्यात आले.

विचारविनिमयानंतर ठरतात कार्यक्रम

येथील सभागृहात ठराविकच कार्यक्रमांना परवानगी देण्याचे ठरविण्यात आल्याने नाटक, सिनेमा, नृत्य आदी कार्यक्रमांना, तसेच राजकीय सभा, बैठकांना येथे थारा मिळालेला नाही. समाजप्रबोधन करणारी व्याख्याने, रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या मैफली, संस्कार देणारी प्रवचने आदी कार्यक्रमांवर येथे भर दिला जातो. येथे कार्यक्रम घेण्यासाठी आयोजकांना येथील समितीकडे अर्ज करावा लागतो. कार्यक्रमाच्या दर्जाविषयी समितीच्या बैठकीत विचारविनिमिय होतो आणि त्यानंतरच कार्यक्रमास परवानगी दिली जाते. त्यामुळे येथे ठराविकच कार्यक्रम होतात. हॉलमध्ये छोटाशा मंचाची उभारणी करण्यात आलेली आहे. त्यावर व्याख्याने, पुस्तक प्रकाशने, प्रवचन, भजन, शास्त्रीय संगीताच्या मैफली होतात. मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर आर्ट या संस्थेशी शंकराचार्य न्यासाने टायअप केलेले असल्याने त्यांचे दर्जेदार शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम या सभागृहात होत असतात.

ध्वनी व्यवस्थेेतील रसभंग टळणार

श्रोत्यांची संख्या लक्षात घेऊन आसनव्यवस्था वाढविता येईल, अशी व्यवस्था येथे करण्यात आलेली आहे. मंचाची उंची कमी असल्याने मागे खुर्च्यांवर बसलेल्या प्रेक्षकांना कधीकधी मंचावरील कार्यक्रम बघण्यास अडचणी येतात. त्यामुळे प्रेक्षकांना मंच सहज दिसू शकेल, अशी व्यवस्था करण्यात आली. काही वेळेस येथील ध्वनी व्यवस्था काहीशी विस्कळीत होते, त्यावेळी रसिक आणि कलाकारांचा रसभंग होतो. त्यामुळे ध्वनी व्यवस्थेच्या बाबतीत कलाकारांनी विश्वस्तांना सूचना केलेल्या आहेत, त्यांच्या सूचनाची दखल घेऊन ही व्यवस्था सुरळीत करण्यात येत आहे.

दुभाजकांमुळे लांबचा फेरा

जुन्या गंगापूर नाक्याच्या सिग्नलापासून ते थेट पुढच्या चौकापर्यंतच्या रस्त्यावर दुभाजक असल्याने शहरातून येणाऱ्या प्रेक्षकांना लांबवरून वळसा घालून या सभागृहाकडे यावे लागते. सभागृहात येण्यासाठी पूर्वेला प्रवेशद्वार आहे. त्यातून वाहने पार्किंगमध्ये नेण्याची व्यवस्था आहे. या पार्किंगमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांची चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे. कार्यक्रमास जास्त गर्दी झाल्यास वाहनांचीही गर्दी वाढते, त्यावेळी बाहेरच्या बाजूला वाहने पार्क करण्याची वेळे येते. बऱ्याच गोष्टी पारखूनच केल्या जात असल्याने कार्यक्रमाचे आयोजक आणि श्रोतेही समाधानी असतात.



नागरिक म्हणतात...

वेगळेपण जपणाऱ्या शंकराचार्य संकुलातील डॉ. कुर्तकोटी सभागृहाने आपली वेगळेपण टिकविले आहे. जाणकार रसिकांना त्यांची सांस्कृतिक भूक भागविण्याचे काम या सभागृहाच्या माध्यमातून होत आहे. दर्जेदार कार्यक्रमाचा आस्वाद या माध्यमातून घेता येत असल्याचा आनंद आहे.

- कैलास पोटे


कलाकार म्हणतात...

गंगापूररोडसारख्या मुख्य रस्त्यालगत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या सभागृहात दर्जेदार कार्यक्रम देण्याचा प्रयत्न होताना दिसतो. शास्त्रीय संगीतचे कार्यक्रमही रंगतात. भारतीय बैठकीत येथील कार्यक्रमाचा आस्वाद घेताना रसिकांना नक्कीच आनंद होतो. ध्वनी व्यवस्थेतील समस्या सोडविण्याचा प्रयत्न आयोजकांनी सुरू केला आहे.

- सुभाष दसककर, संगीतकार

पदाधिकारी म्हणतात...

हे सभागृह उभारण्यामागचा हेतूच रसिकांना दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम देण्याचा आहे. या सभागृहात व्याख्याने, पुस्तक प्रकाशन, प्रवचन, शास्त्रीय संगीत अशाच कार्यक्रमांना परवानगी दिली जाते. नाटक, डान्स, चित्रपट यांना येथे थारा दिला जाता नाही. येथील कार्यक्रम रसिकांना खुले असतात. हे वैशिष्ट्य जपण्याचे काम आम्ही केले आहे.

- राजाभाऊ मोगल, माजी अध्यक्ष, शंकराचार्य न्यास

कार्यक्रमांचा दर्जा पारखून विशेषतः सांस्कृतिक पावित्र्य जोपासणाऱ्या कार्यक्रमांनाच येथे परवानगी दिली जाते. शास्त्रीय संगीताच्या मैफली आणि प्रबोधनपर व्याख्यानांसाठी या सभागृहाला पसंती दिली जाते. वेळेचे बंधन कटाक्षाने पाळणारे सभागृह म्हणूनही या सभागृहाची ओळख झालेली आहे.

- महेश हिरे, सदस्य, शंकराचार्य न्यास

येथे येणारा रसिक हा खऱ्या अर्थाने कलेशी बांधिलकी असलेला असतो. त्यामुळे येथील कार्यक्रमात कधीही गडबड-गोंधळ झाल्याचे कानावर आलेले नाही. असेच दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन येथे होत राहून नाशिकच्या सांस्कृतिक चळवळीत भरभराटीचे काम या सभागृहाचा माध्यमातून पुढेही होत राहील.

- दशरथ दिंडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटीच्या दिवशीही करवसुली

0
0

त्र्यंबक नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची कसरत; कर आकारणीबाबत नागरिकांच्या तक्रारी

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

येथील नगर परिषदेची वसुली मोहीम सध्याला सुरू आहे. ती मोहीम साप्ताहिक सुटी रविवारसह सर्व सुट्यांच्या कालावधीतही सुरू आहे. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना आपल्या सुट्यांवर पाणी सोडावे लागत आहे. त्यात आता सलग तीन दिवस सुटी आली आहे. मात्र तरीही हे वसुलीचे काम सुरू असल्याने सर्व कर्मचाऱ्यांना कामाला यावे लागत आहे. त्यामुळे ऐन सुटीत परिषदेने करवसुली मोह‌ीम सुरू ठेवल्याने कर्मचाऱ्यांची कसरत झाली आहे. करआकारणीबाबतही काहींच्या तक्रारी असून पाणीपट्टी, घरपट्टीत जास्त आकारणी केली जात आहे.

त्र्यंबक नगर परिषदेची ही वसुली मोहीम मार्च महिन्याचा दुसरा शनिवार, रविवार आणि धुलिवंदन अशा सलग शासकीय सुट्या असतानादेखील कार्यालयात सुरू आहे. यात प्रामुख्याने घरपट्टी, पाणीपट्टी आणि दुकानभाडे यांची वसुली करण्यासाठी कर्मचाऱ्यांना हक्काच्या शासकीय सुट्यांवर पाणी सोडावे लागले आहे. त्र्यंबकेश्वर येथील एकूण परिस्थिती पाहता होळीस जेमतेम आणि धुलिवंदनास पूर्ण व्यवहार बंद असतात. असे असताना नागरिक थकित कर तसेच थकबाकी भरण्यासाठी कार्यालयाची पायरी चढतील का, असा सवाल नागरिकांनीच उपस्थित केला आहे.

पंचायतीचा पुढाकार

या सर्व प्रकराबाबत त्र्यंबकेश्वर ग्राहक पंचायतीने पुढाकार घेतला आहे. पंचायतीच्या माध्यमातून याबाबत दाद मागण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष अमर सोनवणे यांनी सांगितले आहे. नाशिक महापालिका क्षेत्र असताना तेथे सदनिकांना

असलेली घरपट्टी आणि पाणीपट्टी त्र्यंबकेश्वरपेक्षा कमी आहे. त्र्यंबकेश्वर येथे दिवसातून एकवेळ तासभरदेखील पाणीपुरवठा होत नाही. तरीही नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागतात. घरपट्टीच्याबाबत तर चारपट अधिक रक्कम आकारण्यात आलेली आहे. याबाबत प्रशासनाने घरपट्टी आकारणी दर तपासून पाहावेत आणि नागरिकांकडून अवास्तव रक्कम घेतली असेल ती परत करावी याकरिता सरकारकडे दाद मागण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणावर कोयत्याने हल्ला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना कॉलेज रोडवरील इझीडे मॉलजवळील चहाच्या टपरीजवळ घडली. या प्रकरणी प्रज्वल राजेंद्र भामरे (वय १९, रा. १५, राजश्रीपाल, माऊली लॉन्सजवळ, कामटवाडे) याच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आकाश आहेर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रज्वल व त्याचे मित्र शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास टपरीवर चहा पीत असताना आकाश तिथे आला. तुम्ही एकटेच चहा काय पिता, अशी विचारणा करीत त्याने प्रज्वलकडे दारूसाठी पैशांची मागणी केली. प्रज्वलने पैसे देण्यास नकार देताच आकाशने शर्टच्या आतील कोयत्यासारखे धारदार शस्त्र काढून प्रज्वलवर वार केला. प्रज्वलने डाव्या हातावर वार घेतल्याने त्याच्या हाताच्या पंजास जखम झाली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, हवालदार बी. आर. बेळे तपास करीत आहेत.

चौघांकडून एकास मारहाण

गाडीचा कट का मारला, अशी कुरापत काढून रिक्षातील चौघांनी एकास लाथाबुक्क्यांनी, तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना १० मार्च रोजी सातपूर येथील हॉटेल अयोध्याजवळ रात्री पाऊणेनऊ वाजेच्या सुमारास घडली. उमेश अशोक चव्हाण (वय ३६, स्वामी विवेकानंदनगर, पाटीलनगर, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, घटनेच्या दिवशी चव्हाण व त्यांच्या मित्राला गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून एमएच १५/झेड ८७९८ या रिक्षामधील चौघांनी अडवले. शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने आणि फायटरने गंभीर दुखापत केली. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, हवालदार सोर तपास करीत आहेत.

तरुणाची आत्महत्या

आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन करून ३५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी अंबड-सातपूर लिंक रोडवरील संजीवनगरमध्ये घडली. मंगेश आनंदा शेळके असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मंगेशने शनिवारी सायंकाळी घरात विषारी औषध सेवन केले. औषधाचा त्रास सुरू होताच कुटुंबीयांनी त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी अंबड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, हवालदार भालेराव तपास करीत आहेत.

वृद्धाची आत्महत्या

कॉलेज रोड भागातील शिरीष मोरेश्वर खुलगे (वय ६५, रा. कॉलेज रोड) या वृद्धाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खुलगे शनिवारी दुपारी घरात एकटे होते. त्यांनी दुर्धर आजारपणास कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

तरुणीची आत्महत्या

कोठुरे (ता. निफाड) येथील करुणा सागर पवार या २८ वर्षीय तरुणीने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तरुणीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत निफाड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. करुणाने शुक्रवारी, १० मार्च रोजी आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. कुटुंबीयांनी तिला शनिवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचार सुरू करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आई, सख्ख्या बहिणीनेच केला खून

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

जेलरोडमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या संतोष उर्फ पप्पू यादव पाटील (वय ३८) या तरुणाचा खून झाला होता. या खुनाचे गूढ उकलले असून, आई, सख्ख्या बहिणीसह मावसभावाने त्याचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रॉपर्टीच्या लालसेपोटी संतोषचा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना नाशिकरोड न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

संतोष उर्फ पप्पू यादव पाटील याचा गेल्या आठवड्यात मंगळवारी रात्री जेलरोडच्या सायट्रिक पेपर मिल परिसरातील निंबाजीबाबा मंदिराजवळ डोक्यात दगड घालून खून झाल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले होते. संतोषची बहीण मनीषा विनायक पवार (रा. लोखंडे मळा, जेलरोड) हिने आपल्या भावाचा कुणी तरी खून केल्याची फिर्याद नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिली होती. मात्र, तिचा हा बनाव अवघ्या चौथ्या दिवशीच तिच्या अंगलट आला. संतोषच्या खूनप्रकरणी एक संशयित नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या हाती लागताच संतोषच्या बहिणीच्या कटाचे बिंग फुटले. पोलिस निरिक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी सावधपणे तपास करत संतोषच्या बहिणीच्या सांगण्यावरून संतोषचा प्रत्यक्ष खून करणाऱ्या तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

असे लागला शोध

संतोषचे मंगळवारी रात्री आईवडिलांशी दारूसाठी पैशांवरून भांडण झाले होते. त्यानंतर तो घरातून निघून गेला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी बुधवारी (८ मार्च) सकाळी संतोषचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. त्याची बहीण मनीषा विनायक पवार हिच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता. घटनास्थळीही पोलिसांना कोणताही धागा मिळाला नव्हता. मात्र, शनिवारी, ११ मार्च रोजी संतोषचा खून त्याची आई व बहीण मनीषाने मावसभाऊ गणेश बाळासाहेब ढमाले (रा. पवारवाडी) याच्यामार्फत केल्याचे समोर आले. ढमाले याने गुन्हेगार पंकज गायकवाड याला सुपारी देऊन संतोषचा खून केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांना मिळताच त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मजकर व गुन्हे शोधपथकातील कर्मचाऱ्यांच्या साह्याने पंकज गायकवाड याला तत्काळ ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, संतोषची आई व बहिणीने संतोषचा मावसभाऊ गणेश ढमाले याच्यामार्फत सुपारी दिल्याची कबुली पंकजने दिली. पोलिसांनी गणेश ढमालेलाही ताब्यात घेतले. संतोषच्या खुनाची सुपारी संजय पंढरीनाथ पाटील व सुधीर सखाराम खरात (दोघेही रा. सम्राटनगर, जेलरोड) या दोघांना दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांनी संतोषला दारू पिण्यासाठी घरातून दूर नेऊन त्याचा गळा आवळून व नंतर त्याच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याचे उघड झाले आहे.

खुनामागे प्रॉपर्टीचे कारण

संतोषला दारूचे व्यसन होते. शिर्डी येथील प्लॉट व जेलरोडचे घर आपल्या नावे करून देण्यासाठी तो आपल्या आईवडिलांकडे कायम हट्ट धरत होता. संतोषचा लहान भाऊ राजू यादव पाटील वर्षभरापासून परागंदा झालेला आहे. संतोषचाही काटा काढल्यास ही सर्व प्रॉपर्टी आपोआप आपल्याला मिळेल या लालसेपोटी संतोषच्या आईलाही बहीण मनीषाने फूस लावून मावसभाऊ गणेश ढमाले याच्यामार्फत सुपारी देऊन सख्ख्या भावाचा खून केला.

लहान भावाचे काय?

संतोषचा लहान भाऊ राजू यादव पाटील हादेखील एक वर्षापासून परागंदा आहे. तो बेपत्ता झाल्याची तक्रारही उपनगर पोलिस ठाण्यात दाखल आहे. मात्र, अद्याप त्याच थांगपत्ता लागलेला नाही. त्याच्या कुटुंबीयांनीही त्याचा शोध घेतलेला नाही. यावरून त्याचेही संतोषप्रमाणेच काही बरेवाईट झाले असण्याची शक्यता या प्रकरणानंतर चर्चेला आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियामुळे मिळाले बाळाला दूध!

0
0

चिंताक्रांत आईबाबा अन् चिमुकलीच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

पाच महिन्यांच्या बाळाला घेऊन गुजरात ते तिरुवनवेली असा लांबचा प्रवास करणाऱ्या एका दाम्पत्याने बाळासाठी सोबत घेतलेले दूध नासले. त्यात रेल्वेत दुधाची सोय नाही आणि रेल्वे थेट रत्नागिरीला थांबणार असल्याने बाळाला दूध मिळणार कसे?, या प्रश्नाने त्याचे आई-बाबा अस्वस्थ झाले. नेहा बापट या महिलेने ही व्याकूळता पाहून सोशल मीडियावर दूध मिळविण्यासाठी आवाहन केले. कोकण रेल्वेने दखल घेत बाळासाठी कोलाड या रेल्वे स्थानकावर दुधाची व्यवस्था केली. दूध मिळाल्यानंतर रडणारे बाळ आणि त्याच्या दुधासाठी चिंतेत असलेले त्याचे आई-बाबा या दोघांच्याही चेहऱ्यावर मग हास्य फुलले.

कार्तिकी नावाची पाच महिन्यांची चिमुकली आपल्या आई-बाबांसोबत हापा तिरुवनवेली या रेल्वेने प्रवास करीत होती. कार्तिकीला दूध देण्यासाठी तिच्या आईने पर्समधून बाटली काढली, तर दूध नासल्याचे लक्षात आले. आता रेल्वे थेट रत्नागिरीला थांबणार मग दूध कसे मिळणार? या प्रश्नाने पालकांना ग्रासले. यावेळी रेल्वेने प्रवास करणाऱ्या नेहा बापट यांनी फेसबुकवर आवाहन करून मित्र-मैत्रिणींना आर्त साद घातली. मुंबई, पुणे, रत्नागिरी, नाशिकसह अवघ्या महाराष्ट्रातील मित्रांनी चिमुकलीच्या दुधासाठी प्रयत्न सुरू केले. फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर दुधासाठी मोहीम सुरू झाली. रत्नागिरीच्या अनघा निकम-मकदूम, प्राजक्ता ओक देवळाली कॅम्पचे रेल्वे समिती पदाधिकारी रतन चावला, नाशिकचे नितीन पांडे यांच्यासह सर्व मित्रांनी प्रयत्न केले. कोकण रेल्वेलाही ट्विट करण्यात आले. अखेर कोलाड रेल्वे स्थानकावर दूध घेऊन रेल्वेचा माणूस तयार असेल असा संदेश अनघा यांना आला. त्यांनी तो नेहा बापट यांना दिला व सर्वांच्या जीवात जीव आला. कोलाड स्थानकावर ट्रेन थांबली आणि कार्तिकीला दूध मिळाले.

चांगली बाजूही अधोरेखित

नेहा बापट या जागरूक महिलेने फेसबुक फ्रेंड्सशी धावत्या रेल्वेतून साधलेला संवाद आणि त्यांच्या मित्र मैत्रिणींनी त्यांच्या संवादाला दिलेली साथ यामुळे बाळाला दूध मिळाले. सोशल मीडियाची चांगली बाजू पुन्हा नव्याने अधोरेखित झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हॉर्स रेसिंग’चा येवल्यात थरार

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

‘अश्व दौडती वायुवेगे, चुकवीती काळजाचे ठोके, कधी हा पुढे, तर कधी तो पुढे, लक्ष्य गाठण्या जो तो जोमाने धावे, अश्वशर्यतीचा असे हा थरार, शौकिन अनुभवती चित्तथरार!’ या आळींप्रमाणेच येवल्यात अश्वशर्यतीचा थरार प्रेक्षकांनी अनुभवला. केवळ राज्याच्या कानाकोपऱ्यातीलच नव्हे, तर देशातील अनेक ठिकाणचे अश्व यात सहभागी होते. मुन्ना, मोती, चेतक, राणी, बसंती, लक्ष्मी नामक असे तब्बल दीडशेच्यावर विविध जातींचे एकापेक्षा एक सरस जातीवंत ऐटबाज अश्व...हिरवा कंदील मिळताच टाच मारतासरशी पुढे झेपावणाऱ्या अश्वांच्या टापा...अगदी वायुवेगाने धावत होते.

हे चित्र शनिवारी (दि. ११) येवल्यात खास अश्वप्रेमींसाठी सलग दुसऱ्या वर्षी आयोजित केलेल्या अश्वशर्यतीचे. तब्बल पाच तास मोठ्या चुरशीनिशी रंगलेल्या या ‘हॉर्स रेसिंग’चा मोठा चित्तथरार येवलेकरांनी अनुभवताना स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त गुजराथमधील कच्छच्या ‘राणी’ने बाजी मारली.

येवल्यातील काही अश्व शौकिनांनी यंदाही सलग दुसऱ्या वर्षी घोड्यांची शर्यत आयोजित करताना या अश्वस्पर्धेची शनिवारी, दिवसभर येवलेकरांनी अनोखी पर्वणी साधली. ‘ग्रीन सिग्नल’ मिळताच वायुवेगाने धावणारे अश्व, त्यावर जिद्धीने स्वार झालेले मालक अन् क्षणोक्षणीची प्रचंड उत्कंठता यातून उपस्थित हजारो अश्वप्रेमींचे चुकलेले काळजाचे ठोके हे चित्र या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळाले.

येवला शहराजवळील वडगाव रेल्वे गेटनजीकच्या विशाल माळरानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तब्बल पाच तास अश्वस्पर्धा रंगली. राज्यातील सांगली, सातारा, पुणे, नगर, औरंगाबाद, जळगाव, धुळे, जालना, नाशिक, लोणावळा, माथेरान आदी ठिकाणांसह गुजराथमधील कच्छ, भूज या ठिकाणाहून घोडेमालकांनी आपापल्या घोड्यांसह स्पर्धेस हजेरी लावल्याने स्पर्धा लक्षवेधी ठरली. माजी नगराध्यक्ष पंकज पारख, वैजापूर व्यापारी बँकेचे चेअरमन बालुशेठ संचेती, नेरळचे (माथेरान) सरपंच भगवान चंचे, सुभाष पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.

हौसेला नसते मोल

भव्य असे माळरान, पाऊण किलोमीटरचा पार करावयाचा टप्पा होता. प्रत्येक फेरीत आयोजकांकडून हिरवा झेंडा मिळताच आपल्या धन्याला पाठीवर घेऊन अगदी वायुवेगाने धावणारे अश्व...नेमका कुणाचा अश्व जिंकणार? या उत्सुकतेपोटी प्रत्येकाच्याच नजराघोड्यांवरच खिळलेल्या होत्या. स्पर्धेत सहभागी अश्वांनी स्पर्धेदरम्यान फेर धरत दाखविलेल्या अनेक अश्वअदादेखील उपस्थितांना खुश करून गेल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन २३ मार्शल्सची प्रतीक्षा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरातून जाणाऱ्या हायवेवरील जंक्शनसाठी आणखी २३ मार्शल मिळण्याची वाहतूक विभागाला प्रतीक्षा आहे. या अतिरिक्त मनुष्यबळामुळे हायवेवरील वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत मिळू शकते.
उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या हायवेला अनेक ठिकाणी सर्व्हिसरोडने छेदले आहे. यामुळे अंबड ते आडगाव वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक कोंडीसह अपघाताच्या घटना घडतात. प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलिसाची नियुक्ती होणे शक्य नाही. तसेच, सिग्नलही बसवले जात नाहीत. या पार्श्वभूमीवर नॅशनल हायवे अॅथोरटी ऑफ इंडिया आणि वाहतूक विभागाने वाहतूक नियमनासाठी खासगी व्यक्तींची (मार्शल) नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत सहायक पोलिस आयुक्त जयंत बजबळे म्हणाले की, याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. आम्ही सर्व जंक्शन आणि वाहतुकीचा फ्लो पाहून ५५ मार्शलची मागणी केली होती. पैकी ३२ मार्शल एनएचएआयकडून देण्यात आले. या सर्वांना आम्ही वाहतूक नियमांबाबत प्रशिक्षण देऊन काम करण्यास सांगितले. लेखानगरसह इतर काही ठिकाणी या मार्शलमार्फत वाहतूक नियमनाचे काम केले जाते. आता आणखी २३ मार्शलची आवश्यकता असून, ते उपलब्ध झाल्यास उर्वरित सर्वच जंक्शनवर या व्यक्तींमार्फत नियमनाचे काम होऊ शकते.

इंदिरानगर अंडरपासवर होईल फायदा

अंबडच्या गरवारे टी पाँईटपासून पुढे के. के. वाघ इंजिनीअरींग कॉलेजपर्यंत अनेक ठिकाणी अंडरपास तयार करण्यात आले आहेत. त्यातील इंदिरानगर अंडरपास मुंबई नाका आणि द्वारका या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या नेहमीच उद्भवते. या व्यतिरिक्त लेखानगर, औरंगाबाद नाका, नांदूर नाका, पाथर्डी फाटा अशा ठिकाणी वाहनचालकांना कसरत करत रस्ता क्रॉस करावा लागतो. हायवे, दोन सर्व्हिसरोड आणि त्यांना कॉलनीकडून मिळणारे रस्ते अशा धर्तीवर मार्शलची नियुक्ती करण्यात येणार असून, त्याचा फायदा होऊ शकतो असा दावा पोलिसांकडून केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेची आत्महत्या नव्हे, पतीकडूनच खून!

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्पपासून जवळच असलेल्या लहवित येथे राहणारी विवाहिता योगिता नवनाथ काळे हिने ९ मार्च रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंददेखील केली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात योगिताची आत्महत्या नव्हे, तर गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी तिचा पती नवनाथ काळे याला अटक करण्यात आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून त्याने खून केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी तपासादरम्यान ज्या दिवशी तिने गळफास घेतला, त्या दिवशी तिचे शरीर लटकलेल्या अवस्थेत नसून खाली काढून ठेवलेले आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तपासचक्रे फिरवत नवनाथ काळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, चारित्र्याच्या संशयावरून तिचा खून केल्याचे त्याने कबूल केले. शवविच्छेदन अहवालानंतर या खुनाला पुष्टी मिळाली. पोलिसांना खोटी माहिती दिल्याने आणि या प्रकरणी योगिताच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी नवनाथला ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images