Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

समृध्दी महामार्गासाठी संपादनापूर्वीच मोबदला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नागपूर-मुंबई समृध्दी कॉरिडॉरसाठी शेतकऱ्यांकडून होणारा विरोध मावळावा, यासाठी सरकारने आता संपादनापूर्वीच शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या मोबदल्याचे वितरण शेतकऱ्यांना दोन टप्प्यात केले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. आता या महामार्गाची अडथळ्यांची शर्यत कमी होण्याची शक्यता बळावली आहे.

नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा महामार्ग आशिया खंडातील सर्वाधिक मोठा सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे ठरणार असून, लॅन्ड पुलिंग पद्धतीने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परंतु, या महामार्गासाठी जमिनी देण्यास नाशिकसह काही जिल्ह्यांमधून विरोध होत आहे. प्रत्येकवेळी आमच्याच जमिनी का घेता, असा सवाल उपस्थित करीत इगतपुरी आणि सिन्नर या दोन्ही तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. सरकारचे अनेक प्रकल्प पूर्ण होऊनही मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने एक पाऊल पुढे येऊन भूसंपादनापूर्वीच मोबदला देण्याचे जाहीर केले आहे.

समृध्दी महामार्गासाठी सरकारने लॅण्ड पुलिंग पध्दतीसह सर्वच पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवले आहेत. थेट मोबदल्याची रक्कम स्वीकारणे, लॅण्ड पुलिंगनुसार महामार्गात भागीदारी मिळविणे किंवा जुन्या भू-संपादन कायद्यानुसार लाभ घेणे, असे सर्वच पर्याय शेतकरी हितासाठी समोर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी जमिनी देण्यास तयार होतील, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

साठेखतावर निम्मे पैसे!

जिल्ह्यातून ९७ किलोमीटरचा मार्ग जात असून, त्यासाठी संपादित किंवा भू-संचयन करण्यात येणाऱ्या जमिनीसाठी शेतकऱ्यांसोबत थेट व्यवहार केले जाणार आहेत. जमिनीसाठी दर निश्चित झाल्यानंतर साठेखतावर निम्मे पैसे, तर खरेदीच्या वेळी उरलेली रक्कम दिली जाणार आहे. प्रथम पैसे देऊन नंतर जमीन ताब्यात घेतली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीच अशी भूमिका मांडल्याने आता शेतकऱ्यांपुढे नकार देण्यासाठी विशेष कारणेच राहाणार नसल्याने जमीन संपादनास वेग येण्याची शक्यताही वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावी शिवसेनेची सत्ता संपुष्टात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली गेली १४ वर्ष शिवसेनेचे पंचायत समितीवरील असलेले वर्चस्व संपुष्टात आले. भाजपने अपक्ष आणि राष्ट्रवादीला सोबत घेत पंचायत समितीवर बाजी मारली आहे. भाजपच्या सहा सदस्यांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीच्या प्रतिभा सूर्यवंशी सभापती तर अपक्ष अनिल तेजा यांची उपसभापती म्हणून निवड झाली आहे.

१४ सदस्यीय पंचायत समितीमध्ये सेना-भाजपला समसमान ६ जागा मिळाल्या होत्या. तर उर्वरित दोन जागी राष्ट्रवादीच्या प्रतिभा सूर्यवंशी व अपक्ष अनिल तेजा हे निवडून आले होते. त्यामुळे सत्तास्थापनेसाठीचे ८ हे संख्याबळ कोणाकडेही नसल्याने सूर्यवंशी व तेजा यांची भूमिका निर्णायक होती. अखेर सोमवारी सायंकाळी माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत सूर्यवंशी व तेजा यांना भाजपला साथ देण्याचे जाहीर केले. सभापत‌िपदासाठी

प्रतिभा सूर्यवंशी व उपसभापत‌िपदासाठी अनिल तेजा यांना भाजपचा पाठिंबा जाहीर करण्यात आल्याने सायंकाळीच पंचायत समितीवर भाजपाची सत्ता येणार हे निश्चित झाले होते. त्याची औपचारिक घोषणा मंगळवारी झाली. सेनेकडून सभापत‌िपदासाठी मनीषा सोनवणे तर भाजपकडून प्रतिभा सूर्यवंशी यांनी अर्ज दाखल केला. उपसभापत‌िपदासाठी सेनेकडून भगवान मालपुरे तर भाजपकडून अनिल तेजा यांनी अर्ज दाखल केला. माघारीनंतर दोन्ही अर्ज कायम राहिल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले. यात सभापत‌िपदासाठी सूर्यवंशी यांना तर उपसभापत‌िपदासाठी तेजा यांना आठ सदस्यांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांची निवड करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये माकप-शिवसेना-राष्ट्रवादीची मोट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

येथील पंचायत समितीवर लाल बावटा फडकला असून, पाच वर्षांपासून ढिली झालेली माकपची पकड पुन्हा घट्ट झाली आहे. माकप राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून सत्ता काबीज करण्यात आली. अपक्ष आणि काँग्रेस सत्तोबाहेर राहीले आहेत. पंचायत समिती सभापत‌िपदी माकप ज्योती राऊत आणि उपसभापतपिदी राष्ट्रवादीचे रवींद्र भोये यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक प्रक्रियेसाठी माकपचे ज्योती राऊत, देवराम मौळै, राष्ट्रवादीचे रवींद्र भोये, शिवसेनेच्या मनाबाई भस्मा असे चार सदस्य उपस्थित होते. काँग्रेसच्या अलका झोले आणि अपक्ष मोतीराम दिवे हे पंचायत समिती सभागृहाकडे फिरकले नाही. सकाळी ११ वाजता सुरू झालेली निवडणूक प्रक्रिया दुपारी एक वाजेपर्यंत सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार महेंद्र पवार आणि सहायक अधिकारी नायब तहसीलदार मोहन कनोजे यांच्या कडे सभापत‌िपदासाठी ज्योती राऊत आणि उपसभापती पदासाठी रवींद्र भोये यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांनी निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. सभापती राऊत या ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊत हीच्या सावरपाडा या गावाच्या आहेत. त्यांची निवड जाहीर होताच पंचायत समिती आवाराच्या बाहेर सुरू असलेल्या आदिवासी नृत्याने लक्ष वेधून घेतले.

दिंडोरीत शिवसेनेला काँग्रेसची साथ

पंचायत समितीत शिवसेना-काँग्रेस अशी युती होत सभापत‌िपदी शिवसेनेचे एकनाथ गायकवाड तर उपसभापतीपदी काँग्रेसचे वसंत थेटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे नायब तहसीलदार धनंजय लचके यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापत‌िपदासाठी शिवसेनेचे एकनाथ गायकवाड तर उपसभापत‌िपदासाठी काँग्रेसचे वसंत थेटे यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली.

सुरगाण्यात माकपची सत्ता

सुरगाणा पंचायत समितीच्या सभापत‌िपदी बोरगाव गणातून निवडून आलेल्या व उच्चशिक्षित असलेल्या माकपच्या सुवर्णा गांगोडे यांची तर आमदार जे. पी. गावित यांचे पुत्र व भदर गणातून निवडून आलेले इंद्रजित गावित यांची उपसभापत‌िपदी निवड झाली. दोघांचे एकमेव अर्ज असल्याने ही निवड बिनविरोध झाली.

चांदवडमध्ये भाजपला आघाडीची साथ

मनमाड- चांदवड पंचायत समितीच्या सभापत‌िपदी भारतीय जनता पक्षाचे डॉ. नितीन गांगुर्डे यांची, तर उपसभापत‌िपदी राष्ट्रवादीचे अमोल भालेराव यांची शेवटच्या क्षणी बिनविरोध निवड झाली. नाट्यपूर्ण घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसने साथ दिल्याने चांदवडमध्ये भाजपला सत्ता स्थापन करणे शक्य झाले. शिवसेनेकडे दोन सदस्य असूनही त्यांनी भाजपला साथ न दिल्याने शिवसेनेला सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. चांदवडच्या सभापती व उपसभापती पदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे डॉ. नितीन गांगुर्डे यांचा सभापत‌िपदासाठी तर उपसभापत‌िपदासाठी राष्ट्रवादीचे अमोल भालेराव यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेवर भाजपचे बिनविरोध सत्तारोहण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशभरात विजयाचा वारू चौखूर उधळणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा नाशिक महापालिकेवरही प्रथमच झेंडा फडकला आहे. महापालिकेच्या २५ वर्षांच्या इतिहासात महापौर व उपमहापौरपद प्रथमच बिनविरोध निवडले गेले. शहराच्या पंधराव्या महापौर म्हणून भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका रंजना भानसी, तर उपमहापौरपदी प्रथमेश गिते यांची निवड करण्यात आली. दोघांच्या नावाची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.

पालकमंत्री गिरीश महाजन यांची शिष्टाई आणि शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या नियोजनामुळे निवडणूक बिनविरोध झाली. नाशिकच्या महापौरपदी प्रथमच आदिवासी समाजाची महिला विराजमान होत असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीने ऐनवेळी माघारी घेत भाजपचा विजयाचा मार्ग मोकळा केला. गोदाकाठी झालेला हा ऐतिहासिक सत्ताभिषेक पाहण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह सर्व आमदार व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी झाडून हजेरी लावली होती.

महापालिका निवडणुकीत १२२ पैकी ६६ जागा जिंकत प्रथमच भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते. भाजपने महापौरपदासाठी रंजना भानसी, तर उपमहापौरपदासाठी प्रथमेश गिते यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसकडून महापौरपदासाठी आशा तडवी, तर राष्ट्रवादीच्या सुषमा पगारे उपमहापौर पदासाठी निवडणूक रिंगणात होत्या. पीठासन अधिकारी राधाकृष्णन बी यांनी अर्जांची छाननी केल्यानंतर दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले. त्यानंतर माघारीसाठी १५ मिनिटांचा वेळ दिला. बाळासाहेब सानप यांनी काँग्रेसचे शाहू खैरे, राष्ट्रवादीचे गजाजन शेलार, शिवसेनेचे अजय बोरस्ते यांच्याशी चर्चा करीत निवडणूक बिनविरोध करण्याबाबत गुफ्तगू करीत निवड बिनविरोध केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दिलेला शब्द आपण पाळणार असून, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. उत्त्पन्नाचे स्रोत वाढवतानाच पाणीपुरवठा, घंटागाडी व स्वच्छतेला प्राधान्य देऊ.
- रंजना भानसी, महापौर

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहर विकासाला प्राधान्य दिले जाईल. भयमुक्त नाशिक करण्यासह संपूर्ण शहरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याला व सर्वांना सोबत घेऊन शहराचा विकास करण्यास आमची प्राथमिकता राहणार आहे.

- प्रथमेश गिते, उपमहापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरला अमानुष मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मोटारसायकल अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला म्हणूनसंतप्त झालेल्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयातील निवासी डॉक्टर रोहन मामुनकर यांना अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या नातेवाईकांनी रुग्णालयातील पलंग, खुर्च्यांसह इतर साहित्याची मोडतोडही केली असून, याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्यातील एका संशयित आरोपीने मंगळवारी पोलिस कोठडीतच आत्महत्या केल्याने या प्रकरणाला नवे वळण लागले आहे.

चैत्राम उर्फ राजू शिवाजी लष्कर (वय २१, रा. चक्करबर्डी परिसर धुळे) हा तरुण रविवारी मोटारसायकलवरून जात असताना, मोटारसायकल घसरून गंभीर जखमी झाला. होता. त्यावेळी त्याला तत्काळ जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. सिटीस्कॅननंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला न्युरोतज्ज्ञांकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मात्र, जिल्हा रुग्णालयात न्युरोतज्ज्ञ नसल्याने जखमी तरुणाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यादरम्यान राजू लष्कर याचा मृत्यू झाला.

जिल्हा रुग्णालयात न्युरोतज्ज्ञ नसल्याच्या रागातून राजूच्या नातेवाईकांनी निवासी डॉ. रोहन मामुनकर यांना बेदम मारहाण केली. तसेच रुग्णालयातील पलंग, खुर्च्यांसह इतर साहित्याचीही तोडफोड केली.

संशयित आरोपीची कोठडीत आत्महत्या

डॉक्टरावरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्यांपैकी प्रदीप वेताळ याने मंगळवारी, शहर पोलिस ठाण्यातील कोठडीतील शौचालयाच्या खिडकीला चादर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे प्रदीपचे संतप्त नातेवाईक व इतरांनीही शहर पोलिस ठाण्यात मोठी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरीत शिवसेनेची एकहाती सत्ता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी पंचायत समितिवर निर्विवाद बहुमताच्या आधारे भगवा फडकला आहे. सभापत‌िपदी कल्पना हिंदोळे, तर उपसभापत‌िपदी भगवान आडोळे यांची बिनविरोध निवड झाली. सभापतिपद हे आदिवासी महिला राखीव असल्याने या पदासाठी खंबाळे गणातून निवडून आलेल्या कल्पना हिंदोळे यांना संधी मिळाली. तर उपसभापत‌िपदासाठी शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे यांना संधी देण्यात आली. या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकेक अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध जाहीर झाल्याचे घोषित करण्यात आले.

नगरपरिषदेपाठोपाठ सिन्नर पंचायत समितीही सेनेकडे
सिन्नर ः सिन्नर नगरपालिका पाठोपाठ तालुका पंचायत समितीवरही शिवसेनेचा भगवा फडकला आहे. पंचाय‌त समितीच्या सभापत‌िपदी शिवसेनेच्या सुमन राजाराम बर्डे यांची, तर उपसभापती पदासाठी वेणूबाई डावरे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत शिवसेनेच्या गटाला आठ तर भाजपला चार जागा मिळाल्या होत्या. सभापती पद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या गटातील दोन्ही पदे बिनविरोध झाली. भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या गटाच्या ताब्यात असलेली पंचायत समितीवर आता शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे गटाने पटकावली आहे. सिन्नर शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी सिन्नर नगरपालिकेपाठोपाठ सिन्नर पंचायत समितीवर भगवा फडकावीत १२ पैकी ८ जागा पटकावून निर्विवाद वर्चस्व प्रस्तावित केले.

नांदगावात आघाडी सत्तेपासून दूर

मनमाड ः नांदगाव पंचायत समिती सभापत‌िपदी शिवसेनेच्या सुमन निकम यांची तर उपसभापत‌िपदी सुभाष कुटे यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेकडे आठ पैकी ५ सदस्य असल्याने स्पष्ट बहुमताच्या आधारावर शिवसेनेने नांदगाव पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व स्थापन केले. भाजपच्या सभापत‌िपदाच्या उमेदवार मधुबाला खिराडकर यांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. शिवसेनेकडे सत्ता आल्याने नांदगावमधील अनेक वर्षांची काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आली आहे.


येवल्यातून राष्ट्रवादी हद्दपार

येवला ः पंचायत समितीवर मंगळवारी शिवसेनेचा भगवा फडकला आणि गेल्या दहा वर्षांपासूनची राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आली. सभापत‌िपदी आशाताई साळवे, तर उपसभापत‌िपदी रुपचंद भागवत यांची बिनविरोध निवड झाली. दहापैकी सात जागा जिंकत एकहाती सत्ता काबीज केलेल्या शिवसेनेचाच सभापती व उपसभापती होणार निश्चित होते. शिवसेनेच्या तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांनी या पदांसाठी अखेरपर्यंत पत्ते उघडे न केल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सभेच्या काही तास अगोदर बाभूळगाव येथे होत असलेल्या बैठकीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, संचालक किशोर दराडे, माजी आमदार मारोतराव पवार, संभाजी पवार आदी या बैठकीस हजर होते. त्यात सभापती व उपसभापत‌िंची नावे निश्चित करण्यासाठी खल झाला. अखेर प्रत्येकाला दहा-दहा महिन्यांची ‘टर्म’ निश्चित करण्यात आली. सभापती व उपसभापती या दोन्ही पदांवर शिवसेना सदस्यांची पहिल्यांदाच निवड झाली.

निफाड पंचायत समितीवर फडकला भगवा
निफाड ः पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेचे पंडित आहेर, उपसभापत‌िपदी शिवसेनेचेच सहयोगी अपक्ष सदस्य गुरुदेव कांदे यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीवरील आघाडीची सत्ता जाऊन आता शिवसेनेची सत्ता प्रस्थापित झाली आहे. आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्त्वाखाली पाच वर्षांनंतर पुन्हा शिवसेनेची सत्ता आली आहे. सभापती व उपसभापती निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी निफाडचे तहसीलदार डॉ. विनोद भामरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. निफाडमध्ये २० पैकी शिवसेनेचे १० व एक सेनेचे अपक्ष सहयोगी सदस्य, राष्ट्रवादीचे चार, भाजपचे दोन असे एकूण १७ सदस्य उपस्थित होते. सभापती आणि उपसभापत‌िपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने बिनविरोध निवड जाहीर केली.

कळवणमध्ये राष्‍ट्रवादीची सत्ता
कळवण ः पंचायत समिती सभापती व उपसभापत‌िपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीची सत्ता स्थापन झाली. सभापत‌िपदी राष्ट्रवादीच्या कनाशी गणाच्या सदस्या आशा पवार व उपसभापत‌िपदी राष्ट्रवादीचेच बापखेडा गणाचे सदस्य गटनेते विजय शिरसाठ यांची बिनविरोध निवड झाली. फेब्रुवारीत झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारून एकहाती सत्ता काबीज केली. तर काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले असून भाजप, शिवसेना, माकप यांना मतदारांनी नाकारून पंचायत समितीपासून दूर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसकडे सत्तेच्या चाव्या दिल्या. सभापती आणि उपसभापत‌िपदासाठी निर्धारित वेळेत एकमेव अर्ज आल्याने तहसीलदार कैलास चावंडे यांनी बिनविरोध निवड जाहीर केली.

देवळ्यात सत्तांतर; राष्ट्रवादीला शिवसेनेची मदत
कळवण ः देवळा पंचायत समितीच्या सभापत‌िपदी राष्ट्रवादीच्या केसरबाई अहिरे यांची तर उपसभापत‌िपदी शिवसेनेच्या सरला जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या पाच वर्षांपासून देवळा पंचायत समितीवर भाजपची एकहाती सत्ता होती. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, भाजपचे दोन तर शिवसेनेचा एक सदस्य निवडून आले होते. गेल्या पाच वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता होती. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने शिवसेनेच्या सरला जाधव यांच्याशी संपर्क वाढविला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रामायण’वर फडकला भाजपचा झेंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गेल्या अनेक वर्षांपासून हुलकावणी देणारी नाशिक महापालिकेची सत्ता भारतीय जनता पार्टीच्या हाती आली.
केंद्रात, राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर त्याचा प्रभाव नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत झाला आणि नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीला निर्विवाद बहुमत मिळाले. सत्ता स्थापनेसाठी कुणाचीही गरज नसल्याने यंदाची निवडणूक चुरशीची होईल अशी आशा मावळली होती. त्यामुळे सकाळपासूनच टिळकवाडी परिसरातील वातावरण शांत होते. सकाळी ११ वाजता सुरू झालेली निवडणूक प्रक्रिया ११.४५ वाजता संपुष्टात आली. निवडणूक ही केवळ औपचारिकता असल्याने त्याला वेळ लागणारच नव्हता, असे सर्वांनी गृहीत धरले होते. सभागृहात घोषणा होण्याचीच कार्यकर्ते वाट पहात होते. उपमहापौर प्रथमेश ग‌िते यांची निवड होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर लगेचच महापौरपदी रंजना भनसी या निवडून आल्याची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्याची आतषबाजी करण्यात येऊन मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करण्यात आली. टिळकवाडी परिसरात कार्यकर्ते गटागटाने उभे राहून चर्चा करीत होते. निवडणुकीच्या जल्लोषात आम्हीही मागे नाही, हे महिला कार्यंकर्त्यांनी दाखवून दिले. महिलांनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. याच वेळी काही उत्साही कार्यकर्त्यांनी रामायण बंगल्यावर चढून भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकावला. एकीकडे निवडणूक प्रक्रिया सुरू असताना दुसरी कडे कार्यकर्ते एकमेकांचे अभिनंदन करीत होते. महापालिकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रथमेश ग‌िते यांचे रामायण बंगल्यावर आगमन झाले. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे नगरसेवकही रामायण बंगल्यावर आले. त्यानंतर रंजना भानसी यांचे आगमन झाले. त्यांनी रामायण बंगल्यावर असलेले भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी रवींद्र भुसारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनीही भानसी यांना शुभेच्छा दिल्या. महापालिकेच्या रामायण बंगल्यावर भानसी यांनी भारतीय जनता पार्टीचा ध्वज फडकावला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. कार्यकर्त्यांचे अनेक वर्षांपासूने स्वप्न साकार झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर बंधूंना कारावास

$
0
0

मालेगाव गर्भलिंग निदान प्रकरण

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव येथील सीताबाई रुग्णालयाच्या माध्यमातून शिवमंगल सोनोग्राफी केंद्रात गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी डॉ. अभिजीत देवरे व डॉ. सुमित देवरे या दोन डॉक्टर बंधूंना मालेगाव सत्र न्यायालयाने कारावास तसेच दंडाची शिक्षा सुनावली. नुकतेच सांगली जिल्ह्यात १९ अर्भकांचे मृतदेह आढळल्याची घटना ताजी असताना येथील न्यायालयाने अशाच प्रकरणात डॉक्टरांना सुनावलेली शिक्षा महत्त्वपूर्ण म्हणता येईल.

देवरे बंधूंनी गर्भधारणापूर्व व प्रसूतपूर्व निदान तंत्र (गर्भलिंग निदान) प्रतिबंध अधिनियम २००३ चे उल्लंघन केल्याचे निष्पन्‍न झाल्याने डॉ. अभिजीत देवरे याला तीन वर्षे कारावास व १७ हजार रुपये दंड, तर डॉ. सुमित देवरे याला सहा महिने कारावास व सात हजार रुपये दंड तसेच वैद्यकीय परवाना रद्द करण्याची शिक्षा न्या. बेग यांनी सुनावली.

या सोनोग्राफी केंद्रात गर्भलिंग निदान केले जात असल्याच्या तक्रारींची दखल घेत 'लेक लाडकी' अभियानाच्या पथकाने स्टिंग ऑपरेशन करीत २० जुलै २०१३ रोजी हे कारस्थान उघडकीस आणले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


५० नागरी सुविधा ऑनलाइन

$
0
0

पारदर्शक कारभाराच्या दिशेने पाऊल, येस बँकेच्या सहाय्याने एप्र‌िलपासून सुरुवात
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने पारदर्शक कारभाराच्या दिशेने पहिले पाऊल टाकले असून, एप्र‌िलपासून नागरिकांना महापालिकेकडून मिळणाऱ्या जवळपास ५० नागरी सेवा ऑनलाइन होणार आहेत. येस बँकेच्या मदतीने शहरात १९ नागरी सुविधा केंद्र सुरू केली जाणार असून, सुरुवातीचे सहा महिने नागरिकांना मोफत सुविधा मिळणार आहे. या सुविधा केंद्रामध्ये विविध कर भरण्यासह, जन्म-मृत्यूचे दाखले, नगररचना विभागाच्या परवानग्यांसह नागरिकांना तक्रारी करता येणार आहेत. पहिल्या टप्प्यात सहा विभागांसह पालिकेच्या मुख्यालयात ही केंद्रे सुरू होणार आहेत. महापालिका कर्मचारी आणि नागरिकांमधील संवाद कमी करून पारदर्शक कारभारासाठी हे पाऊल उचलले असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली.

महापालिकेच्या वतीने घरपट्टी आणि पाणीपट्टी, विविध कर वसुली याबरोबरच जन्म-मृत्यूचे दाखले, भोगवटा प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, बांधकाम परवानग्या, अग्निशमन दल परवाने, हॉस्प‌िटल्स नूतनीकरण दाखले अशा विविध प्रकारच्या पन्नास सेवा दिल्या जातात. या प्रमाणपत्रांसाठी कागदपत्रे मुख्यालय किंवा सक्षम अधिकाऱ्यांकडे देण्यासाठी नागरिकांना या कार्यालयामंध्ये हेलपाटे मारावे लागतात. त्यातच या सेवांसाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून पैसे माग‌ितले जातात. येथून भ्रष्टाचाराला वाव मिळतो. त्यामुळे पारदर्शक कारभारासाठी नागरिक आणि महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील संवाद कमी करण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी नागरी सुविधा केंद्राचा प्रस्ताव सादर केला होता. त्याची अंमलबजावणी आता एप्र‌िलपासून सुरू होणार आहे.

सेतू कार्यालयाच्या धर्तीवर १९ नागरी सुविधा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात सहा विभागीय कार्यालयांसह मुख्यालयात एक अशी एकूण सात केंद्रे सुरू होणार आहेत. महापालिकेचे विभागीय कार्यालय आणि मुख्यालयात दिल्या जाणाऱ्या मर्यादित सेवा या केंद्राच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. येस बँकेने ही नागरी सुविधा केंद्राच्या सीएसआर उपक्रमातून चालविण्यास घेण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी मनुष्यबळ व सामग्रीही येस बँकेचीच असणार आहे. सुरुवातीला सहा मह‌िने ही सुविधा मोफत असणार आहे. त्यानंतर निश्चित शुल्क आकारले जाणार आहे. महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांत सुरू असलेला कर भरणा आणि दाखले देण्याच्या सेवा नियमितपणे या केंद्रातून थेट किंवा ऑनलाइन पद्धतीने दिल्या जाणार आहेत. नागरिकांना या केंद्रावर जाऊन थेट तक्रारीही करता येणार आहेत.

भ्रष्टाचाराला चाप
नगररचना, वैद्यकीय, आरोग्य विभागातील प्रमाणपत्रासाठी पैशांची देवाणघेवाण होते. प्रमाणपत्रांसाठी थेट नागरिकांना कार्यालयांमध्ये खेटे मारावे लागतात. यातून सुटका होण्यासाठी थेट पैशांचे अमिष दाखवले जाते. त्यामुळे भ्रष्टाचाराला चालना मिळते. परंतु या केंद्रामधून ही सर्व प्रमाणपत्रे ऑनलाइन मिळणार आहेत. त्यामुळे नागरिक आणि यंत्रणेमधील संबंध कमी होऊन भ्रष्टाचाराला चाप बसणार आहे.

एप्र‌िलपासून ही सुविधा केंद्रे कार्यान्वित होणार असून, नागरिकांना घरबसल्या या सेवा ऑनलाइन मिळणार आहेत. त्यामुळे पारदर्शक कारभाराला चालणार मिळणार असून, यंत्रणेवरील ताणही काही अंशी कमी होणार आहे.
- अभिषेक कृष्णा, आयुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घरकुल’चे स्वप्न भंगणार!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

नोटाबंदीतून सावरत नाही तोच सरकारी बँकांच्या आडमुठ्या धोरणामुळे घरकुल योजनेचे लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना महाराष्ट्र बँकेच्या त्र्यंबक व ठाणापाडा शाखेतून महिन्याकाठी अवघे पाच हजार रुपये मिळत असल्याने गरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यात अडथळे येत आहेत. तसेच घरकुलच्या पैशांच्या भरवशावर आहे ते छप्पर मोडून बसलेल्या ग्रामस्थांना आता अवकाळी कोसळल्यास उघड्यावरचा संसार सावरणे कठीण झाले आहे.

त्र्यंबक तालुक्यात २०१५-१६चे इंद‌िरा आवास योजनेचे ७८१, प्रधानमंत्री आवास योजनेचे ९८८, शबरी घरकुल योजनेचे २९६ आणि रमाई घरकुल योजनेचे ४७ असे एकूण २११२ लाभार्थी आहेत. यातील बहुतांश लाभार्थ्यांचे बँक खाते हे महाराष्ट्र बँकेत आहे. एक लाख २० हजार रुपयांपैकी लाभार्थींना ३५ हजारांचा हप्ता मिळाला असून, तो थेट बँक खात्यात जमा झाला आहे. तथापि या रकमेतून लाभार्थ्यांना केवळ पाच हजार रुपये काढता येत आहेत. या पाच हजार रुपयात घर कसे बांधायचे, असा यक्ष प्रश्न लाभार्थ्यांना सतावत आहे. यामध्ये जर या ३५ हजारांत बांधकाम केले नाही तर पुढचा हप्ता मिळणार नाही.

यामध्ये इतर बँकांमध्ये रक्कम काढण्यास अडचण नाही असेदेखील समजते. आज मात्र बँकेत पैसे असूनही तालुक्यातील गरीब जनता घर बांधू शकत नसल्याचे समोर आले आहे. बँक व्यवस्थापने पूर्ण पैसे न दिल्यास बँकेत ठिया आंदोलन करू, असा इशारा घरकुल लाभार्थी तथा डहाळेवाडीचे सरपंच प्रकाश खाडे यांनी दिला आहे.

सर्वच खाती बंद करणार

पंचायत समितीच्या विविध योजनांचेही खाते याच बँकेत आहेत. या सर्वच योजनांच्या लाभार्थ्यांना पैसे मिळण्यात विलंब होत आहे. त्यामुळे एक एप्रिलपासून पंचायत समितीच्या विविध योजनांशी सलग्न असलेली सर्वच खाती बंद करणार असल्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी सांगितले.

जनधन खात्याची अडचण

जनतेने बँकेशी जोडले जावे म्हनून जनधन खाते सुरू करण्यात आले. आज या जनधन खात्यातून पाच हजारांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही, असे सांग‌ितले जाते. शासनाला एकरकमी २० हजार रुपये कसे आले याचा तपशील द्यावा लागणार असल्याचे सांगितले जात आहे. या कटकटीपासून सुटका म्हणून काहींनी जनधन खाते नेहमीचे बचत खात्यात वर्ग केले आहे. मात्र यातही बचत खात्याला किमान रकमेचा चार्ज आकारला जाणार आहे.

घरकुल योजनेचे पैसे लाभार्थ्यास देण्यास बँकेच्या नियमानुसार अडचणी येत आहेत. वरिष्ठ कार्यालयातूनच पैसे देण्यावर निर्बंध आले आहेत. ही गैरसोय नोटाबंदीमुळे झाली असल्याने मी काही करू शकत नाही. याबाबत वरिष्ठांना कळविले आहे.

- ए. आर. कुलकर्णी, शाखा व्यवस्थापक, महाराष्ट्र बँक, त्र्यंबकेश्वर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीबाजाराने वाहतूक कोंडी

$
0
0

शहरात रस्त्यावर भरणाऱ्या बाजारांना हव्यात हक्काच्या जागा

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

रस्त्यावरील भाजीबाजाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे. वाहतुकीच्या कोंडीपासून ते आरोग्यापर्यंतच्या अनेक समस्या या रस्त्यावरील भाजीबाजारांमुळे निर्माण होऊ लागल्या आहेत. विक्रेतेही ग्राहकाला अगदी जवळ कसा भाजीपाला उपलब्ध होईल या हेतूने रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करू लागल्याने हे रस्ते वाहनांसाठी आहेत की भाजीबाजांसाठी आहे, हाच प्रश्न निर्माण झाला आहे.

या बाजारांमध्ये पंचवटीत पेठ रोड, दिंडोरी रोड, म्हसरुळ, मखमलाबाद, आडगाव, नांदूर, गणेशवाडी या भागातील रस्त्यावरील समस्या वाढू लागल्या आहेत. यावर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने अनेकदा कारवाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न भाजीविक्रेते हाणून पाडत असल्याने महापालिका प्रशासनही या रस्त्यावरील भाजीबाजाराच्या प्रश्नाविषयी हतबल झाल्याचे दिसत आहे.

दिंडोरी रोड बाजारात अस्वच्छता

दिंडोरी रोडवरील बाजार हा समितीच्या पूर्व दरवाजाला रोज रस्त्यावरच भरतो. जवळच बाजार समितीतून शेतीमाल खरेदी करायचा आणि तो या रस्त्यावर आणून विकायचा, हे येथील विक्रेते रोजच करतात. त्यामुळे हा बाजार वाहनचालकांना डोकेदुखी ठरत आहे. पेठ रोडलाही अशीच परिस्थिती दिसते. याठिकाणी पुढे भाजी विक्रेते बसतात आणि मागील बाजूस कचरा टाकला जातो. या कचऱ्याने माशा, डास याची उत्पत्ती होते. तशाच अस्वच्छ आणि गलिच्छ वातावरणात येथील भाजी विक्री होत असते.

मखमलाबाद, म्हसरूळालाही समस्याच

मखमलाबाद, म्हसरूळ आणि आडगाव येथे भरणारे भाजीबाजार थेट रस्त्यावर येऊ लागल्याने भाजीबाजाराच्या वेळी या रस्त्याने वाहने घेऊन न गेलेले बरे असेच वाहनचालकांना वाटत असते. नांदूर येथे पूर्वी हनुमाननगर भागात भाजीबाजार भरत असे. तो गेल्या वर्षापासून निलगिरी बाग येथील मोकळ्या प्रशस्त मैदानात भरू लागला आहे. मात्र बाजारासाठी मोठी जागा उपलब्ध असतानाही भाजी विक्रेते थेट रस्त्यापर्यंत भाजीपाला विक्रीसाठी बसू लागले आहेत. त्यांच्या या वृत्तीमुळे विक्रेते आणि ग्राहक या दोघांना त्रास होत आहे.

कोणार्क नगर

कोणार्क नगर या भागातील भाजीबाजार आता थेट जत्रा रोडपर्यंत पसरला आहे. या भाजीबाजारात भाज्या खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहक जेव्हा थांबतो, तेव्हा त्यांच्या वाहनांमुळे रस्त्याची अडवणूक होते. मागून येणाऱ्या वाहनांना अडचण झाल्याने वाहनांच्या लांबवर रांगा लागल्याचे चित्र बाजाराच्या दिवशी बघायला मिळते. त्यामुळे भाजी बाजारांसाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करून भाजीबाजारांमध्ये विक्री करणारे किरकोळ विक्रेते हे आठवडे बाजारात आपल्याला जागा कशी मिळेल, या प्रयत्नात जागांची अगोदर आखणी करून ठेवतात. यामुळे ऐनवेळी आपल्या शेतातून भाजीपाला विक्रीस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना जागा मिळत नाही, मग त्यांना रस्त्यावर कुठेतरी जागा मिळेल तेथे बसण्याची वेळ येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरव समाजाच्या एकता मंचाची बैठक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक गुरव समाज एकता मंचची बैठक नुकतीच जेलरोड येथे उत्साहात झाली. गुरव समाजातील पोटजातींना एकत्र करून समस्या सोडविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. गुरव समाजाच्या मागण्यासाठी मुंबई येथे ३० मार्चला राज्यभरातून समाजबांधवांचा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचे यावेळी नियोजन करण्यात आले.

बैठकीला गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष वसंत बंदावणे प्रमुख पाहुणे तर प्रा. डा. रवींद्र सोनावणे अध्यक्षस्थानी होते. नाशिक जिल्हा गुरव समाजाचे अध्यक्ष रमेश पवार यांनी स्वागत तर भागवतराव गुरव यांनी प्रास्तविक केले. बाजार समितीचे संचालक हेमंत खंदारे, आप्पा बावीसकर, रमेश जाधव, अशोक भालेराव, भास्कर नवगिरे आदींची उपस्थिती होती. समाजातील विविध शाखांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. तसे झाले तरच समाजाचे प्रश्न सुटतील. त्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे, असे वसंत बंदावणे यांनी सांगितले. येत्या २८ मार्चला दुपारी चार वाजता जेलरोडच्या ज्ञानेश्वर मंदिरात गुरव समाज एकता मंचचा शुभारंभ होणार आहे. त्या कार्यक्रमास समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले. संजय गुरव यांनी आभार मानले. मयूर गुरव, सचिन भामरे, अभय ब्राम्हणपूरकर, शिवदास शिंदे, तुळशीराम सोनवणे, सुधाकर सोनवणे आदींनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने महापालिका हद्दीतील अनधिकृत इमारती शोधून त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. अनधिकृत इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्या धोकेदायक असल्यास तत्काळ पाडून टाकण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेने शहरातील अनधिकृत इमारती शोधण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.

हायकोर्टाच्या आदेशान्वये राज्याच्या नगरविकास विभागाने अनधिकृत इमारतींविरोधात कारवाई सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील अनधिकृत इमारती शोधून त्यांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचे फर्मान नगरविकास विभागाने काढले आहेत. या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्या निवासासाठी धोकेदायक असतील, तर त्या पाडून टाकण्याचे आदेशच काढले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाने या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूचे तीन बळी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरासह जिल्ह्यात स्वाइन फ्लू परतला असून, महिनाभरात जिल्ह्यात तिघांचे बळी गेले आहेत. स्वाइन फ्लूमुळे सटाणा तालुक्यात दोघांचा, तर सिन्नरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १४ स्वाइन फ्लूचे रुग्ण आहेत. स्वाइन फ्लूने पुन्हा दस्तक दिल्याने महापालिका व जिल्हा आरोग्य विभाग खडबडून जागे झाले असून, पालिका रुग्णालयांसह जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

जानेवारीत स्वाइन फ्लूचा एक रुग्ण आढळला असून, फेब्रुवारी मात्र स्वाइन फ्लूने सटाणा तालुक्यातील नामपूर इथे एका जणाचा बळी घेतला आहे. नाशिकमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. अचानक बदललेल्या हवामानामुळे मात्र मार्चमध्ये स्वाइन फ्लूने उचल खाल्ली असून, दोघांचा बळी गेला आहे. त्यातील एक रुग्ण हा सांगवी (सिन्नर) येथील असून, दुसरा रुग्ण सटाणा येथील आहे. विशेष म्हणजे मृत पावलेल्या दोन्ही महिला आहेत.

संवेदनशील भाग

जिल्हा आरोग्य विभागाने शहरासह ग्रामीण भागातील काही भाग संवेदनशील म्हणून जाहीर केले आहेत. सिन्नर, चांदोरी, पिंपळगाव बसवंत, सटाण्यासह शहरातील सिडको व सातपूर परिसरातील नागरिकांना काळजी घेण्याचे पालिकेने आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडार समाजाचे प्रशासनाला निवेदन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात रविवारी (दि. १२) निवासी डॉक्टर रोहन म्हामूनकर यांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणाला संशयित आरोपीच्या आत्महत्येने नवीन वळण मिळाले आहे. पोलिस ठाण्यातच आत्महत्या केलेला संशयित प्रदीप वेताळ आणि चैत्राम शिवाजी लष्कर या दोघांच्या मृत्यूने वडार समाज संप्तत झाला आहे. या दोन्ही घटनांना डॉ. रोहन म्हामूनकर हेच जबाबदार असल्याचा आरोप करीत बुधवारी (दि. १५) वडार समाजाकडून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

शहरातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील सर्वोपचार रुग्णालयातील अपघात विभागात रविवारी, रात्री निवासी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. रोहन म्हामूनकर यांना जमावाने अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात वडार समाजातील २५ जणांवर गुन्हा दाखल करून नऊ जणांना अटक केली होती. अटक केलेल्यांपैकी प्रदीप सदाशिव वेताळ या तरुणाने मंगळवारी (दि. १४) दुपारच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यात पोलिस कोठडीत आत्महत्या केली. या घटनेनंतर मृत प्रदीपच्या नातेवाईकांनी शहर पोलिस ठाण्यात आंदोलन केले. दरम्यान, पोलिस अधीक्षक चैतन्या एस. यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या सर्व घडामोडीनंतर वडार समाजातर्फे बुधवारी (दि. १५) सकाळी दोन्ही तरुणांच्या मृत्यूला डॉ. रोहन म्हामूनकर हेच जबाबदार असल्याचा आरोप करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यात, डॉ. म्हामूनकर हे सर्वोपचार रुग्णालयात कामावर कार्यरत असताना, दारूच्या नशेत होते. त्यांनी उपचार करण्यास नकार दिला होता. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करा, असे सांगण्यात आले. त्यामुळे तरुणावर उपचार न झाल्याने संप्तत झालेल्या नातेवाईकांनी डॉ. म्हामूनकर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र, हा सर्व प्रकार झाल्यानंतर प्रदीप वेताळसह सर्वांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे नमूद करण्यात आले आहे. प्रदीप हा सुशिक्षित तरुण होता. परंतु, पोलिसांनी त्याला अटक केल्याने तो घाबरला आणि निराश होऊन त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोपही वडार समाजाने केला आहे. या प्रकरणात डॉ. म्हामूनकर दोषी असून त्यांच्यावर ३०४ व ३०२ नुसार गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

कोट

पोलिस कोठडीत आत्महत्या केलेल्या प्रदीप वेताळ या तरुणाचे बुधवारी शवविच्छेदन करण्यात आले आहे. प्रथमदर्शनी या अहवालानुसार गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून, शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करकण्यात आली आहे.

- दिवाणसिंग वसावे, पोलिस निरीक्षक, शहर पोलिस ठाणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॅन्टोन्मेंटच्या उपाध्यक्षपदी आढाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी भाजपचे वार्ड क्रं. ५ चे नगरसेवक दिनकर आढाव यांची बिनविरोध निवड झाली. सभागृहात बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेड‌ियर प्रदीप कौल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

मावळते उपाध्यक्ष बाबुराव मोजाड यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर कौल यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांच्याकडे उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे काल कॅन्टोनमेंट बोर्डाच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार, ब्रिगेड‌ियर सुधीर सुन्दुबरेकर, मेजर पीयूष जैन, नगरसेवक बाबुराव मोजाड, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, नगरसेविका प्रभावती धिवरे, आशा गोडसे, कावेरी कासार, मीना करंजकर आदी उपस्थित होते. प्रारंभी सीईओ पवार यांनी निवडीसंबंधी मार्गदर्शन केल्यानंतर कार्यवाही सुरू झाली. बोर्डात प्रथम भाजप-रिपाइंची सत्ता असल्याने पक्षाच्या नियमाप्रमाणे मावळते उपाध्यक्ष मोजाड यांनी आढाव यांचे नाव सुचविल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनी दिनकर आढाव यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे घोषित केले. त्यानंतर अध्यक्ष ब्रिगेडियर प्रदीप कौल यांच्या हस्ते निवडपत्र देण्यात आले.

मोजाड यांनी आपल्या कार्यकाळातील कामाचा अहवाल सादर केला. कार्यालयाबाहेर कुटुंबासह समर्थकांनी फटक्याची आतषबाजी व गुलाल उधळीत आढाव यांची मिरवणूक काढली. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार वसंत ग‌िते, लक्ष्मण सावजी, विश्वनाथ काळे, तानाजी करंजकर, सुनील आडके, रतन कासार, भाऊसाहेब धिवरे, चंद्रकांत गोडसे, संजय भालेराव, शामराव कदम यांसह देवळालीकर उपस्थित होते. सभेचे कामकाज उमेश गोरवाडकर यांच्यासह कार्यालयाच्या अधिकारी वर्गाने पहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तरपत्रिका तपासणी बहिष्कार अखेर मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांवर सरकारकडून अखेरीला सकारात्मक उत्तरे पदरात पडल्यानंतर उत्तर पत्रिका तपासणीवरील बहिष्कारास्त्र प्राध्यापकांनी मागे घेतले आहे. परिणामी बारावीच्या पेपरसोबत सुरू झालेल्या या आंदोलन नाट्याची सांगता झाल्याने पालक अन् विद्यार्थ्यांसोबतच सरकारचाही जीव भांड्यात पडला आहे.

बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठच्या प्राध्यापकांनी आंदोलन छेडले होते. दिवसाकाठी अवघी एकच उत्तरपत्रिका प्राध्यापकाने तपासावी असे नियोजन होते. नाशिक विभागातून सुमारे हजारावर प्राध्यापक या प्रक्रियेत सहभागी असल्याने लाखो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्र‌िया अत्यंत संथगतीने सुरू होती. राज्याभरात हे चित्र सारखेच असल्याने यंदा निकाल प्रक्र‌िया याच्या परिणामी लांबण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. शिक्षणमंत्र्यांकडील वारंवार होणाऱ्या बैठकाही फलद्रूप होत नसल्याने ही चिंता वाढतच होती.

अखेरीला बुधवारी झालेल्या बैठकीत या प्रलंबित प्रश्नांविषयी काही निर्णय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर करत सकारात्मक धोरणे दर्शविली. परिणामी प्राध्यापक संघटनेनेही आंदोलन सोडण्याची भूमिका घेऊन उत्तरपत्रिका तपासणीस सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याने हा तिढा आता सुटला आहे. बारावीची परीक्षाही संपत आल्याने आता उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रक्रीयेला गती येणार आहे.

या मागण्यांवर सकारात्मक विचार

शिक्षणमंत्री व संबंधित अधिकारी, संघटनेचे पदाधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनुसार काही मुद्द्यांवर सकारात्मक विचार सुरू झाला आहे. यात २ मे २०१२ नंतर नियुक्त शिक्षकांच्या नियुक्ती मान्यतेसाठी १५ ते १९ एप्रिल २०१७ या कालावधीत विशेष वैयक्तिक मान्यता शिबिरे घ्यावीत, सन् २००३ ते २०११ पर्यंतच्या मंजूर वाढीव पदांवरील नियुक्ती मान्यता राह‌िलेल्या ५९९ शिक्षकांनाही एप्रिल २०१७मधील विशेष मान्यता शिबिरांमध्ये मान्यता देण्यात येईल, सन् २०११-१२ पासूनच्या वाढीव पदांना उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेसाठीची कार्यवाही तातडीने करण्यात येईल, कायम विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना माध्यमिकप्रमाणे अनुदान देण्याबाबत मे २०१७ मध्ये राज्य महासंघासोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाळ्यात गरिबांच्या फ्रीजची एंट्री

$
0
0

मध्य प्रदेशाच्या माठांना मिळतेय ग्राहकांची पसंती

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

उन्हाळ्यात लागणारी तहान भागविण्यासाठी माठातील पाण्याची सर्वोत्तम मानले जाते. त्यामुळेच उन्हाळ्याची चाहूल लागताच माठ विक्रीसाठी बाजारात सज्ज ठेवले जातात. यंदा मध्यप्रदेशात खास मातीपासून तयार करण्यात आलेले माठ नाशिकला विक्रीसाठी आलेले आहेत. फ्रीजसारखा थंडावा देणाऱ्या या माठांना चांगली मागणी असल्याचे विक्रेते सांगत आहेत. गरिबांचे फ्रीज असेही माठांना म्हटले जाते.

पाणी हे आरोग्यदायी असते, दिवसातून किमान दहा मोठे ग्लास पाणी गरजेचे असते, वैद्यकीय सल्ल्यातही पाण्याला महत्त्व दिले जाते. उन्हाळ्यात पाणी प्या म्हणून सांगण्याची गरज भासत नाही, इतकी वारंवार तहान लागत असल्याने पाणी पिणे अनिवार्य ठरत असते. त्यात उन्हामुळे इतर भांड्यात साठवून ठेवलेले पाणी गरम होत असल्याने एकतर फ्रीजमध्ये ठेवण्यात आलेले पाणी प्यावे लागते. पण त्यापेक्षाही कमी खर्चात आणि आरोग्यदायी पाणी माठातील असते असे डॉक्टर सांगतात. हे पाणी उन्हाळ्यात हमखास पिण्याचा सल्लाही दिला जातो. समाजात सध्या आरोग्याविषयी जागरूकता वाढली असल्यामुळे मातीपासून तयार करण्यात आलेल्या माठातील पाण्याला प्राधान्य दिले जात आहे. परिणामी, उन्हाळ्यात माठांना चांगली मागणी मिळत असते.

मातीपासून माठ बनविण्याचे काम नाशिक शहर परिसरातील विविध भागात होत असले तरी त्यापेक्षा वेगळ्या मातीचा वापर करून तयार केलेल्या माठातील पाणी अधिक थंड होत असल्याचा दावा मध्यप्रदेशातील काही कारागिर करीत आहेत. सध्या औरंगाबाद रोडवर खास मध्यप्रदेशात तयार करण्यात आलेले माठ विक्रीसाठी उपलब्ध करू देण्यात आलेले आहेत. या माठातील पाणी फ्रीजच्या पाण्यासारखे थंड होत असल्याचा या कारागिरांचा दावा आहे. त्यासाठी त्यांनी भर उन्हात पाण्याने भरलेला माठ ठेवला आहे. आलेल्या ग्राहकाला त्या माठातील पाणी पिण्याचा त्यांचा आग्रह असतो. हे पाणी उन्हाळ्यात नक्कीच आल्हाददायक वाटते. या माठाच्या आकारानुसार १०० ते ५०० रुपये अशा त्यांच्या किमती आहेत.

हे माठ बनविण्यासाठी काळ्या रंगाच्या मातीचा वापर केला जातो. पाणी जास्तीत जास्त थंड ठेवण्याचे या मातीचे वैशिष्ट्य आहे. लाल रंगाच्या मातीपासून लाल माठ बनविण्यात येतात. काळ्या माठांपेक्षा लाल माठातील पाणी जास्त थंड असते.

लालन कुमार, माठ विक्रेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधाऱ्यांसमोर आव्हानांचा डोंगर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेची बिकट आर्थिक स्थिती आणि बजेटचा घसरता आलेख यामुळे सत्तारुढ भाजपसमोर आव्हानांचा डोंगर उभा राह‌िला आहे. आर्थिक उत्पन्नाचे स्रोत कमी झाल्याने बजेट तीन हजार कोटींवरून थेट तेराशे कोटींवर येऊन ठेपले आहे. तर मुकणेसह जेएनएनयूआरएम आणि स्मार्ट सिटीच्या दायित्वामुळे विकासकामांसाठी निधींची चणचण भासणार आहे.

शहराची वाहतूक कोंडी सोडवणे, गोदावरी व नासर्डीचे प्रदूषण कमी करणे, स्मार्ट सिटीसाठी निधी उभारण्यासह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे खडतर आव्हान सत्ताधाऱ्यांसमोर असून, या कामांसाठी जवळपास एक हजार कोटींची आवश्यकता आहे. एवढ्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत उत्पन्न करण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे.

महापालिका निवडणुकांच्या वेळेस भाजपने नाशिककरांसमोर आश्वासनांचा मोठा पेटारा उघडला होता. तसेच मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी थेट नाशिकच दत्तक घेण्याची घोषणा केली होती. त्यामुळे नाशिककरांनी प्रथमच भाजपच्या हाती एकहाती सत्ता सोपवली. भाजपने जाहीर केलेल्या ध्येयनाम्यात स्मार्ट सिटी, विमानतळ, मेट्रो ट्रेन, पार्किंग, उद्याने, नवीन पार्क उभारणे, सीसीटीव्ही, स्वच्छ व सुंदर नाशिक अशी भली मोठी आश्वासने दिली होती. त्यामुळे सत्तेत आल्यानंतर या आश्वासनांची पूर्तीसाठी सत्ताधाऱ्यांना पावले उचलावी लागणार आहेत. परंतु, तिजोरीत खडखडाट असल्याने ही आश्वासने हवेतच विरतात की काय अशी स्थिती आहे.

जकातपाठोपाठ एलबीटी आल्याने अगोदरच पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यातच आता एलबीटी हद्दपार होऊन जीएसटी लागू होणार आहे. त्यामुळे पालिकेचा कारभार हा शासनाच्या अनुदानावरच अवलंबून राहणार आहे. तसेच मालमत्ता कर, पाणीपट्टी व विकासकरावरच विकासकामे अवलंबून आहेत. उत्पन्न घटल्याने बजेटचा चढता आलेख आता खालावत चालला आहे. त्यामुळे निधीची चणचण पालिकेसमोर आहे. दरवर्षी पालिकेचा स्थायी खर्च हा चारशे कोटींच्या आसपास गेला आहे. तसेच सिंहस्थाचे कर्ज, मुकणे योजना, जेएनएनयूआरएमसाठीचा निधी, अमृत योजनेचा हिस्सा आदिंचा दरवर्षीचा बोझा पालिकेवर आहे. सोबतच जवळपास सहाशे कोटींच्या वर स्पीलओव्हर आहे. तर स्मार्ट सिटीसाठीचा पालिकेला दरवर्षी शंभर कोटींचा अतिरिक्त वाटा द्यावा लागणार आहे. नव्या योजनांसाठी निधीच नसल्याने आश्वासनांची पूर्तता होणार कशी असा प्रश्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यगृहांचे पुनरुज्जीवन व्हावे

$
0
0

नाट्यगृहांचे पुनरुज्जीवन व्हावे

‘महाराष्ट्र टाइम्स’च्यावतीने सुरू असलेल्या कॅम्पेनमध्ये शहरातील नाट्यगृहांची सद्यःस्थिती असा विषय घेऊन रोजच एका नाट्यगृहाविषयी माहिती प्रसिध्द करण्यात आली. कालिदास कलामंदिराविषयीचे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर लगेचच त्याच्या कामाचे टेंडरही निघाले. तसेच रावसाहेब थोरात सभागृह दुरूस्तीच्या मार्गावर आहे. इतरही सभागृहे लवकरच दुरूस्त केली जाणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यासाठी एका समितीची नियुक्तीही करण्यात आली आहे. या कॅम्पेनविषयी महापालिका अधिकारी आणि कलावंत यांचे म्हणणे या राऊण्ड टेबलच्या माध्यमातून जाणून घेण्यात आले.

दुरावस्थेला महापालिका जबाबदार

१९८७ साली नाट्यगृह बांधले तेव्हापासून त्यात कोणताही फरक पडलेला नाही. लोकहितवादी मंड‍ळाने ‘उलगुलान’ हे पहिले नाटक सादर केले, त्यावेळी ज्या अडचणी आल्या त्या आजही तशाच आहेत. नाशिक ही कलाकारांची भूमी आहे. या ठिकाणी कुसुमाग्रजांपासून अनेकांनी वास्तव्य केल्याने एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या नाट्यगृहात प्रवेश करताना प्रेक्षकांना तर प्रसन्न वाटत नाही, परंतु नटालाही कलाकृती सादर करताना आनंद मिळत नाही. स्टेजवर सुविधा नसल्याने कलाकारांना अनेकदा मानसिक त्रासाला तोंड द्यावे लागते. गेल्या काही महिन्यांपूर्वी एनएसडीच्या नाटकांचे या ठिकाणी प्रयोग झाले. त्यांना स्पॉट लावण्यासाठी जागाही नव्हती. त्यांना आवश्यक त्या सुविधा मिळू न शकल्याने त्यांनी नाशिककरांकडे नाराजी व्यक्त केली. महाकवी कालिदास कलामंदिरानंतर महाराष्ट्रात अनेक नाट्यगृहे तयार झाली. मात्र, त्यांची वेळच्यावेळी दुरुस्ती केल्याने त्यांची दुरावस्था झाली नाही. मात्र, कालिदास कलामंदिराच्या स्थापनेनंतर प्रथमच दुरुस्ती करण्यात येत आहे. नाशिकमधील सर्वच नाट्यगृहांच्या दुरावस्थेला नाशिक महापालिकेची उदासिनता कारणीभूत आहे. याठिकाणी नाटक करण्यासाठी येणाऱ्या नटाला जेवणासाठी व्यवस्थ‌ित जागा नाही. प्रयोग झाल्यानंतर दमलेल्या अवस्थेत त्याला उभे राहून जेवण घ्यावे लागते. मध्यंतरी स्टेजच्या खाली तळघरात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, या ठिकाणी हात धुण्यासाठी जागा नाही. त्यामुळे नटांना हात धुण्यासाठी रंगमंचाच्या मागील बाजूला जावे लागायचे. महापालिकेच्या अखत्यारित चांगली जागा आहे. त्याचा विचार करण्यात येऊन सुधारणा कराव्यात. नाशिक महापालिका ९ कोटी रुपये खर्च करुन कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणाचे काम करणार आहे. हे काम करताना स्थानिक कलावंतांना विचारात घेऊन काम करावे, अन्यथा त्याचा काही उपयोग होणार नाही.

-मुकूंद कुलकर्णी, दिग्दर्शक

सोयींबरोबरच सौंदर्याचाही विचार व्हावा

नाशिक शहरातील नाट्यगृहांच्या विकासाचा विचार करायचा झाल्यास तो पाच विभागांत करणे गरजेचे आहे. सर्वप्रथम प्रेक्षकांना काय अभिप्रेत आहे, ही बाब सर्वात महत्वाची आहे. त्यानंतर बाहेरुन येणाऱ्या नटांची गरज, रंगमंचावरील व्यवस्था, येथे असलेल्या टॉयलेट बाथरुमची व्यवस्था, कामगारांमध्ये असलेली कामाबद्दलची आवड, त्यांची मानसिकता यांचा विचार होणे गरजेचे आहे. येथे काम करणाऱ्या कामगारांना स्टेजवर काय हवे आहे, हे माहीत नसते. सवयीने माहिती झाले तरी काम करण्याची इच्छा नसते. हौशी नटांचे काम ऐकायचे नाही, हा तेथील कामगारांनी विडाच उचलला आहे. नाटकात काम करणाऱ्या व्यक्तीने स्टेजवरही काम करायचे आणि झाडूही मारायचा अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. नाट्यगृहात जो व्यवस्थापक असतो तो कधीतरी रंगमंचावर येतो. त्याला नटाला काय हवे, काय नको याच्याशी सोयरेसुतक नसते. यासाठी नाट्यगृहावर व्यवस्थापक नेमताना तो कलेची आवड असलेला नेमावा. त्याचप्रमाणे नाट्यगृह हे एक मंदिर आहे. तेथे प्रवेश करतानाच प्रसन्न वाटले पाह‌िजे, असे वातावरण हवे. नाटकाला येताना सुरुवात होते ती पार्किंगपासून. कालिदाससारख्या ठिकाणी वाहने लावण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने नाटक पाहताना प्रेक्षकांचा अर्धा जीव त्याच्या गाडीजवळ असतो. प्रेक्षकाला निर्धास्तपणे गाडी लावता येईल, अशी सोय करावी. कालिदास कलामंदिराशेजारी असलेल्या कलादालनाखाली पार्किंग आहे. मात्र, ती जागा समोरील रहिवाशांना कपडे वाळत टाकण्यासाठी दिली आहे. त्यामुळे या वास्तूच्या सौंदर्याला बाधा पोहचते. याचा विचार होणे गरजेचे आहे. नाटकासाठी येणाऱ्या प्रेक्षकांकडून पार्किंगचे पैसे न घेता नाटकाच्या तिकिटातच पार्किंगचे पैसे अंतर्भूत करावे. कालिदासमध्ये प्रवेश केल्यानंतर नाटक सुरू होण्याआधी प्रेक्षकांना बसायला पुरेशी जागा नसल्याने उभे रहावे लागते. यासाठी कॉरिडॉरमध्ये त्याची सोय करण्यात यावी. येथील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना लोकांशी कसे वागावे, याचे प्रशिक्षण देण्यात यावे. त्याचप्रमाणे ग्रीन रुम, व्हीआयपी कक्ष यात अनेक गैरसोयी आहेत. त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे. सुधारणा करताना सौंदर्याचाही विचार करावा.

-आनंद ढाकीफळे, वास्तुसौंदर्य तज्ज्ञ

प्रशिक्षित कर्मचारी असावेत

या ठिकाणी कलाकारांची गरज आणि प्रेक्षकांची गरज या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कलाकारांना तांत्रिक बाजू महत्त्वाच्या असतात, तर प्रेक्षकांना बाह्यबाजू. या दोघांचा मेळ जेथे होतो, तेथे सायुज्यता होऊन काहीतरी निर्माण होऊ शकते. सध्या नाशिकच्या नाट्यगृहांना त्याचीच गरज आहे. नाटक पहायला ‘क्रीम ऑडियन्स’ येत असतो त्याच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे. मल्टिप्लेक्सला रसिक जातात, कारण तेथे सुविधा उच्च दर्जाच्या असतात. प्रेक्षकांसाठी खाण्यापिण्याच्या गरजा महत्त्वाच्या असतात. त्यामुळे नाट्यगृहांमध्ये या व्यवस्था आहेत का, असल्या तर त्या काय दर्जाच्या आहेत हे पाहिले पाहिजे. दुसरे म्हणजे नाट्यगृह जे कर्मचारी सांभाळतात ते शिक्षित आहेत का? त्यांना तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण दिलेले आहे का, हे बघणेदेखील क्रमप्राप्त आहे. कारण नाटकवाल्यांना त्यांना समजून घेणारा माणूस हवा असतो. लाइटचे प्रकार ज्याला माह‌ित आहेत, ते सेट करण्याची पध्दती ज्यांना माह‌ित आहे, ते नाटकवाल्यांना जवळचे वाटतात. महापालिकेने तसे कर्मचारी नेमलेले आहेत का? नसतील तर तसे नेमा. त्यांना ट्रेनिंग द्या. महापालिकेने निदान तितका खर्च करावा असे वाटते. प्रशिक्षित कर्मचारी नेमल्यास नाटकवाल्यांनाही सोयीचे होते. एनएसडी, दिल्ली येथे भारंगम महोत्सवात मी नाटक केले. त्यामुळे तेथील तुलनेत येथील अपेक्षा महापालिकेकडे व्यक्त करू शकतो.

-सचिन शिंदे, दिग्दर्शक

स्टेजवरच्या व्यवस्था आधुनिक व्हाव्यात

नाशिकमधील एकही नाट्यगृह व्यावसायिक दर्जाचे नाही. महाराष्ट्रातील अनेक नवीन नाट्यगृहांमध्ये आधुनिक दर्जाच्या सुविधा आहेत. त्याचे भाडे अत्यंत कमी आहे. नाशिकमध्ये कालिदास कलामंदिरात सुविधा नसतानाही अव्वाच्या सव्वा भाडे अकारणी केली जाते. हे भाडे नाटक कंपन्यांना परवडणारे नाही. महापालिकेच्या सर्व नाट्यगृहांमध्ये स्वच्छतेच्या नावाने ओरड आहे. येथील स्वच्छेतचे काम बचत गटांना देण्यात आले होते. परंतु, ते काही कालावधीनंतर काढून घेण्यात आले. त्यामुळे सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य साचले आहे. मल्ट‌िप्लेक्स थिएटरच्या जमान्यात नाटकावर प्रेम करणारा प्रेक्षक आजही आहे. परंतु त्याला व्यवस्थित सुविधा मिळत नसल्याने तो नाटकांकडे दुर्लक्ष करू लागला आहे. थिएटरच्या क्षमतेनुसार येथे शौचालयाची सुविधा नाही. अनेक ठिकाणी पाणी गळते आहे. याबाबत अनेकदा तक्रार करुनही लक्ष दिले जात नाही. दोन खुर्च्यांमधील अंतर अत्यंत कमी असल्याने अनेक लोकांचे कपडे फाटतात. याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. मल्ट‌िप्लेक्समध्ये आज विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात. त्या तुलनेत कालिदास कलामंद‌िरात चांगले पदार्थ मिळत नाहीत, ही शोकांत‌िका आहे. कालिदास कलामंदिरात घुशींचे प्रमाण जास्त झाल्याने खुर्च्यांखालील सांगडा जीर्ण झाला आहे. त्यामुळे खुर्च्या हालतात. काही खुर्च्यांना हात ठेवण्यासाठी जागाही नसते. दरवाजांना पॉज सिस्ट‌िम नसल्याने नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकांचे हिरमोड होतो. प्रेक्षकगृहाप्रमाणेच स्टेजवरच्या वस्तूही कालबाह्य झाल्या आहेत. अनेक स्पॉटमध्ये बल्ब नाहीत. त्यांचे केवळ सांगाडे शिल्लक आहेत. १९८७ साली जो साऊंडचा मिक्सर होता तो आजही तसाच आहे. तांत्रिक साधनांमध्ये अनेक नवनवीन सोयीसुविधा आल्या. परंतु महापालिकेचे नाट्यगृह त्यापासून कोसो दूर आहे. विंगेचे कापड कॉटनचे असणे आवश्यक होते. मात्र ते आता सिल्कचे लावण्यात आले आहे. महाराष्ट्रातील एकाही नाट्यगृहाच्या विंगांना सिल्कचे कापड नाही. कालिदासला मात्र सिल्क कापडाच्या विंगा आहेत. लाइटसाठी आवश्यक असणारा डिमरबोर्ड अत्यंत कालबाह्य झालेला आहे. येथे प्रकाश योजना करताना तारेवरची कसरत करावी लागते. हा बोर्ड काढून तेथे नव्या पध्दतीचे पल्सर बसवण्यात यावेत. अनेकदा प्रेक्षकांचा मोबाइल वाजल्याने कार्यक्रमाचा रसभंग होतो. त्याकरता या ठिकाणी मोबाइल जामर बसवण्यात यावेत, जेणेकरुन नाटक करणाऱ्या प्रेक्षकाला नाटकाचा लाभ घेता येईल. नाशिकमध्ये मोठ्या आकाराची नाट्यगृहे नकोत. छोटी छोटी नाट्यगृहे केली तर फायदा होईल. नाटकाची भाडे आकारणी करताना सत्रानुसार केली जाते. महापालिकेने या ठिकाणचे उत्पन्न वाढावे यासाठी चार सत्रे केली आहेत. नाशिक वगळता महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात चार सत्र नाहीत. सगळीकडे तीन सत्र आहेत. नाशिकलाही तीन सत्र करण्यात यावेत. गायकवाड सभागृह तर मंडप कॉन्ट्रॅक्टरला आंदण दिले आहे. ते अत्यंत चुकीचे बांधले गेल्याने तेथे सभा, राजकीय कार्यक्रम, शाळांचे गॅदरिंग, वधु-वर मेळावे, लग्नकार्य हेच सुरू असते.

-जयप्रकाश जातेगावकर, नाट्य व्यवस्थापक

कलावंतांना बारकावे माह‌ीत असतात

नाशिकच्या सातपूर, इंदिरानगर यासारख्या भागात २०० ते २५० लोकांचा ऑडिटोरियम असणे ही काळाची गरज आहे. प्रायोगिक नाटकवाले सातत्याने प्रयोग करतात. त्यांना काहीतरी नवीन हवे असते. त्यामुळे त्यांना नाट्यगृहे त्या पध्दतीने हवी असतात. आपल्याकडे नाट्यगृहांना खूप दारे आहेत. इतकी दारे कशासाठी, असा प्रश्न पडावा. लाइटस शेकडो प्रकारचे आहेत. परंतु, नाशिकला त्यापैकी किती प्रकार आहेत? कोणत्या विंगेत कोणते कापड वापरायचे, याचेही नमुने आहेत. आपल्याकडे कालिदासला सॅटिनचे कापड वापरण्यात आले आहे. त्याऐवजी कॉटनचे कापड वापरणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे महापालिकेला कोणताही सांस्कृतिक निर्णय घ्यायचा असेल, तर नाशिकच्या कलाकारांची एक टीम हवी. ती मनपाला मार्गदर्शन करेल. कलावंतांना अनेक खाचाखोचा माह‌ित असतात. त्यामुळे त्यांच्या देखरेखीत होणारी कामे ही चांगलीच होणार. आम्हाला कलावंत म्हणून काय हवे आहे, याकडे लक्ष द्यायला हवे. लेवल, विंगेचे डिझाइन कसे असायला हवे, ते आम्हाला अधिक माहीत आहे. म्हणून आमच्यासारख्या कलाकारांचे मार्गदर्शन घेतले पाह‌िजे. मूळात टेंडर मागविण्यातदेखील चुका आहेत, त्याचाही विचार व्हावा.

-विनोद राठोड, प्रकाशयोजनाकार

नाट्यगृहांना झळाळी देऊ

महाकवी कालिदास कलामंदिराचे बुकिंग ऑफिस गेटजवळच्या रूममध्ये हलविण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण त्यामुळे ऑफिस वाढवायला आम्हाला मदत मिळणार आहे. कालिदासच्या अंगणातले बेटही आम्ही कमी करणार आहोत. त्यामुळे तेथून गाडी आत नेताना त्रास होणार नाही. कालिदासचे टेंडर काढण्यात आलेले आहे. खुर्च्या बदलणार आहोतच. दोन खुर्च्यांमधील अंतर एक मीटर करावे, अशी आमची अपेक्षा आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करणार आहोत. फ्लोरिंगही व्यवस्थित करणार आहोत. लाइट, अॅकोस्टिक, फायर फायटिंग ही कामेही प्रस्तावित आहेत. टॉयलेटची संख्या वाढवित आहोत. आधुनिक टॉयलेट करण्याचाच विचार आहे. नाशिकच्या कलाकारांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. त्यांचा विचार घेऊनच पुढे जाणार आहोत. कालिदासचे काम हाती घेणार. तसेच शहरातील इतर नाट्यगृहेही आधुनिक करणार आहोत. पलुस्करची क्षमता कमी आहे. त्याच्या कुवतीप्रमाणे त्याच्यावर खर्च करून काम करणार आहोत. नाशिकरोडचा टाऊन हॉल पडून आहे. तेथे केवळ बक्षीस वितरणाचे कार्यक्रम होतात. त्याऐवजी तेथे कार्यक्रम व्हावेत, अशी अपेक्षा असल्याने त्यातही काही बदल करता येतात का, हे पहाणार आहोत. कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करणार, त्यावेळी दादासाहेब गायकवाड सभागृहात कार्यक्रम व्हावेत अशी महापालिकेची अपेक्षा आहे. गायकवाड सभागृहात काही बदल करून ते नाटकासाठी वापरता येते का, याचा देखील विचार करण्यात येईल. ११ एप्रिल रोजी सबमिशन असल्याने आजच्या राऊंड टेबलमधील सर्व मुद्दे विचारात घेऊन पुढील कार्यवाही करू.

-गौतम पगारे, कार्यकारी अभियंता


कलावंताना विचारात घेऊन कामे होतील

कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण केले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींचे सल्ले घेण्यात येणार आहेत. हे करीत असताना कोणत्याही प्रकारच्या उण‌िवा राहू नयेत, याची खबरदारी घेतली जाईल. त्याचप्रमाणे जनतेचा पैसा जनतेसाठीच वापरला जाणार आहे. स्टेजच्या विंगा कोणत्या साईजच्या असाव्यात, स्टेजवर असलेल्या फळ्या कशा लावायच्या, स्टेजवर किती स्पॉट आवश्यक आहेत, स्पॉटचे प्रकार कोणते, सध्या असलेली सामुग्री व हवी असलेली सामुग्री याची पडताळणी केली जाणार आहे. त्याच प्रमाणे रसिक प्रेक्षकांना रंगमंचावरील कलाकारांचा आवाज चांगला ऐकता यावा यासाठी उत्तम दर्जाची सिस्ट‌िम लावण्यात येणार आहे. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाणार असून, कोणतेही काम करताना स्थानिक कलाकारांना विश्वासात घेऊन कामे केली जाणार आहेत. काम सुरू करण्याअगोदर स्थानिक कलावंत व तज्ज्ञ व्यक्ती यांची बैठक आयोजित करण्यात येणार असून, त्यानंतरच कामाला सुरुवात होणार आहे.
-विनोद माडीवाले, उपअभियंता, नाशिक महानगरपालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images