Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पेशंटच्या नातेवाइकांवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उपचारासाठी दाखल झालेल्या पेशंटच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यासह प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर आणि आधिपरिचारिकेस बेदम मारहाण केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीचा प्रकार गुरूवारी रात्री घडला होता. तर, शुक्रवारी या विरोधात कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला.

नासिर शौकत शाह याला गुरूवारी (दि.१६) दुपारी सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. उपचाराअंती त्यास स्वाइन फ्लू सदृष्य लक्षणे आढळून आली. त्यानुसार शाहला लागलीच स्वाइन फ्लू कक्षात हलविण्यात आले. कक्षातील रूम क्रमांक एकमध्ये उपचार घेत असताना रात्री अचानक त्याची प्रकृती खालावली. पुढील औषधोपचार होईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. ही घटना नातेवाइकांना कळताच त्यांनी हॉस्पिटलमध्ये आरडाओरड करीत गोंधळा घातला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच नासिरचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. या दरम्यान, पेशंटची आई व अन्य नातेवाइकांनी थेट स्वाइन फ्लू कक्षात धाव घेत डॉ. राहुल पाटील आणि आधिपरिचारिका चारुशिला इंगळे यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या घटनेमुळे हॉस्पिटलमध्ये रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी डॉ. पाटील यांच्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये शाहच्या आईसह अन्य दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी नोकारास मारहाण करणे तसेच शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गुरूवारी रात्री घडलेल्या या घटनेचे पडसाद शुक्रवारी सकाळी उमटले. सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना नेहमीच नातेवाइकांच्या रोषास सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करीत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आणि नर्सेस संघटनांनी शुक्रवारी दुपारी कामबंद आंदोलन छेडले. संशयितांना अटक करावी तसेच हॉस्पिटलमध्ये पुरेसे कर्मचारी तैनात करावेत, अशी मागणी करण्यात आली.

कारवाईचा इशारा
सिव्हिलमध्ये पेशंट दगावल्यानंतर असे प्रसंग नेहमीच घडतात. मात्र, कायदा हातात घेऊन काही साध्य होत नाही. अशा प्रकारे कृत्य केल्यास वैद्यकीय अधिनियम २०१० या विषेश कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाते. किंबहुना अशा घटनेत मोठी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे नातेवाईकांनी अथवा आप्तेष्ठांनी संयम राखावा. वैद्यकीय हलगर्जीपणा बाबत काही तक्रार असल्यास नातेवाईकांनी पोलिस अथवा संबंधित आरोग्य यंत्रणेकडे तक्रार करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाइकस्वारावर बिबट्याचा हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील जळगाव येथे बिबट्याने शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी केलेल्या हल्ल्यात २७ वर्षीय महिलेसह एक पुरुष जखमी झाल्याची घटना घडली.

सुंदरपूर येथील दीपक सूर्यवंशी हे पत्नीसह निफाड येथे बाजारात गेले होते. परतत असतांना सूर्यवंशी हे मोटारसायकलने सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान सुंदरपूर येथे परत जात असताना जळगाव-काथरगाव रस्त्यावर कदम वस्तीजवळ रस्त्याच्या कडेला दबा बसलेल्या बिबट्याने अचानक सूर्यवंशी यांच्या मोटारसायकलवर झेप घेतली. गाडीवर मागे बसलेल्या रत्ना (२७) यांच्या पायाला चावा घेतला. अचानक झालेल्या हल्ल्याने दीपक सूर्यवंशी हे पत्नी रत्ना, आपल्या लहान मुलासह गाडीवरून खाली पडले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला तेव्हा जागीच उभ्या असलेल्या बिबट्याने त्यांच्याकडे रोखून पाहिले. नंतर मात्र तो पळून गेला. तात्काळ आलेल्या नागरिकांनी जखमी रत्ना यांना तातडीने निफाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. नंतर त्यांना नाशिकमधल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. रत्ना यांना शनिवारी (दि. १८) घरी सोडण्यात आले.

कोल्हा विहिरीत पडला
निफाड : तालुक्यातील रानवड येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास जिवंतपणे विहिरीबाहेर काढण्यास वन विभागाला यश आले. रानवड येथील सावरगाव रस्त्यालगत असलेल्या शेतात पांडुरंग वाघ हे राहतात. त्यांना शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी घराजवळ कोल्हा दिसला. कोल्हा निघून जाईल, असे त्यांना वाटले. मात्र, तोच कोल्हा शनिवारी (दि. १८) सकाळी घराशेजारील २० ते २५ फूट खोल विहिरीत पडलेला वाघ यांना दिसला. त्यांनी वन विभागाला कळवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूजल पातळी घटल्याने वृक्षसंकट

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक जिल्ह्यातील जवळपास निम्मी म्हणजेच तब्बल सात तालुक्यांमधील भूजल पातळीत घटली आह. त्यामुळे राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी दोन कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमात नाशिक जिल्ह्यात लागवड करण्यात आलेल्यांपैकी ९८.३५ टक्के रोपे जगविण्याचे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी १ जुलै रोजी राज्यात एकाच दिवशी वन महोत्सव राबविण्यात आला. राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत राज्यभरात एकाच दिवशी २ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य होते. या उपक्रमाला नाशिक जिल्ह्यातही सर्वच शासकीय विभागांसह, अशासकिय, निमशासकिय विभाग व सेवाभावी संस्था, नागरिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमात नाशिक जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त रोपांची लागवड झाली. परंतु, आता ही रोपे टिकविण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या उपक्रमात ३० लाख १९ हजार ४८७ इतकी रोपे लागवड झाली. ऑक्टोबर २०१६ अखेर लागवड झालेल्यापैकी २९ लाख ६९ हजार ६६९ इतकी रोपे जिवंत होती. या जिवंत रोपांचे प्रमाण ९८.३५ टक्के इतके होते. पावसाळ्यात उशिरा पाऊस झाला होता. त्यामुळे जिवंत रोपांची टक्केवारी नाशिक जिल्ह्यात वाढली. परंतु आता ही जिवंत रोपे टिकविण्याचे वन खाते, सामाजिक वनीकरण खाते, वनविकास महामंडळ, वन्यजीव विभाग यांच्यासह इतर शासकीय विभागांमार्फत मोठे आवाहन उभे राहिले आहे.

डोंगर-दऱ्यांमध्ये भकास
भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या जानेवारी २०१७ च्या अहवालानुसार जिल्ह्यातील सात तालुक्यांतील ७२ गावांतील भूजल पातळीत १ मीटरपेक्षा जास्त घट आली आहे. त्यामुळे डोंगर-दऱ्यांमधील जलस्त्रोत येत्या काही महिन्यांत कोरडेठाक पडण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर या जिवंत रोपांना वाचविण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. भूजल पातळी घटलेल्या तालुक्यांत बागलाण, इगतपुरी, कळवण, मालेगाव, नांदगाव, नाशिक व येवला या तालुक्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील विभागनिहाय जिवंत रोपे
विभाग........लागवड केलेली संख्या....जिवंत रोपे संख्या......टक्केवारी
- उपवनसंरक्षक पश्चिम भाग....११,६१,५३२....११,४५,९२५....८६.६५
- उपवनसंरक्षक पूर्व भाग........९,३८,५७१....९,३०,६४६....९९.१६
- उपविभागीय वन अधिकारी मालेगाव....५,७६,८००....५,७१,३८१....९९.०६
- इतर शासकिय विभाग....२,८७,४८७....२,६६,९०७....९२.८४
- विभागीय वनविकास महामंडळ....२९,९९७....२९,८६३....९९.५५
- उपसंचालक सामाजिक वनीकरण....२५,०००........२४,८५७....९९.४२
- वन्यजीव विभाग....१००....९०....९०
- एकूण....३०,१९,४८७....२९,६९,६६९....९८.३५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेला दिलासा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील जमा नोटा स्वीकारण्यावरील निर्बंध मागे घेण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असलेल्या ३४१ कोटी रुपये आता स्टेट बँक व आयडीबीआयच्या करन्सी चेस्टमध्ये जमा होणार आहेत.

जमा होणाऱ्या नोटा स्वीकारल्या जात नसल्यामुळे बँकेच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे या निर्णयामुळे जिल्हा बँकेला दिलासा मिळणार आहे. अद्याप याबाबत कोणतेही आदेश आले नसले तरी तसा निर्णय झाल्याची चर्चा रंगली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. येत्या मंगळवारपासून (दि. २१) या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने आठ नोंव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशातील ​जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे राज्यात या जिल्हा बँकेचे आर्थिक कंबरडे मोडले होते.

या बँकेतून गैरप्रकार झाल्याच्याही अनेक तक्रारी होत्या. त्यात नाशिक जिल्हा बँकेचा विषय राज्यभर गाजला. या बँकेत ४७ कोटींच्या नोटांची अदलाबदली आणि २७३ कोटींच्या संशयास्पद ठेवी जमा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आयकर, लाचलुचपत विभागापाठोपाठ नाबार्डनेही नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी केली होती. अशाच तक्रारी राज्यभरातून आल्यानंतर त्यामुळे रिझर्व्ह बँकेने रद्द केलेल्या नोटा या बँकांद्वारे करन्सी चेस्टमध्ये स्वीकारण्यास मनाई केली होती. त्यामुळे या बँकांमध्ये सुमारे चार महिन्यांपासून या नोटा पडून आहेत.

जिल्हा बँकांमधील जमा नोटा स्वीकारण्यावरील निर्बंध मागे घेतल्याची माहिती मिळाली आहे. पण त्याबाबतचे अधिकृत पत्र प्रास्त झालेले नाही. तसे पत्र मिळताच एसबीआय आणि आयडीबायच्या करन्सी चेस्टमध्ये ती रक्कम जमा केली जाईल. गेल्या चार महिन्यांपासून ३४१ कोटींच्या नोटा बँकेकडे पडून आहे. मात्र, आता बँकेला दिलासा मिळेल.
- वाय. आर. शिरसाठ, कार्यकारी संचालक, जिल्हा बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात रंगले पारंपरिक ‘रंगयुद्ध’

$
0
0

सामुदायिक रंगवर्षावात ‘इंद्रधनू’चा मनोहारी नजारा

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवल्यात शनिवारी (दि. १८) सायंकाळच्या पाचच्या सुमारास टिळक मैदानातील दोन्ही बाजूने आमनेसामने उभे ठाकणारे ट्रॅक्टर्स अन् त्यात रंगाने भरलेल्या असंख्य पिंपासह रंगांचा सामना खेळण्यासाठी आतूर झालेली येवलेकर. हे, उत्साहवर्धक चित्र यंदाही दिसले.

निमित्त ठरलं ते रंगपंचमीच्या दिवशी परंपरेप्रमाणे शहरात खेळल्या गेलेल्या रंगपंचमीच्या सामुदायिक रंगांच्या सामन्याचे. रंगपंचमीनिमित्त शहरातील ऐतिहासिक अशा टिळक मैदानासह डी. जी. रोडवर यंदाही हे सामुदायिक रंगांचे सामने मोठया चुरशीने खेळले जाताना येवला शहरवासीयांनी त्याची पर्वणी साधत आनंद द्विगुणीत केला. शहरातील टिळक मैदानात शनिवारी सायंकाळी (दि. १७) मनमाड विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या हस्ते हवेत विविधरंगी फुगे सोडून व माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सामुदायिक रंगपंचमीच्या सामन्याचा प्रारंभ केला गेला. सामन्याला सुरुवात होताच पुढे जवळपास पाऊणतास टिळक मैदानातील दुतर्फा असलेल्या...हळुवार आमने-सामने पुढे सरकणाऱ्या ट्रॅक्टर्सवरील पिंपातून परस्परावर रंगाचा जोरदार वर्षाव होत जणू ‘रंगयुद्ध’ रंगले होते. या जोरदार रंगवर्षावात हवेत नाना रंगांचा अनोखा मिलाप होताना एकप्रकारचे इंद्रधनुष्याची मनोहारी कमानच निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत होते. यावेळी पोलिस निरीक्षक संजय पाटील, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, संजय कुक्कर आदींची उपस्थिती होती. मनमाड विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी यांनी स्वतः ट्रॅक्टरवर उभे राहून रंग उडवून आनंद लुटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाचा दावा फोल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

जलयुक्त शिवार योजनेत नाशिक विभागात पहिल्या टप्प्यात ९४१ गावांची निवड झाली. त्यात ६१०.५० कोटी खर्चून ३८ हजार २६४ कामे करण्यात आली. यामुळे पाणीपातळीत १ ते २ मीटरपर्यंत वाढ झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, ताज्या सर्वेक्षणानुसार, विभागातील भूजल पातळीत घट झालेल्या तालुक्यांची संख्या २८ वरून ३९ पर्यंत वाढली. जलयुक्तच्या पहिल्या टप्प्यातील कामांमधून भूजल पातळी वाढ होण्याऐवजी घट झाल्याचे उघड झाले आहे.

नाशिक जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यात २२९ गावे निवडण्यात आली. या गावांमध्ये १७७.६० कोटी रुपये खर्चून ‘जलयुक्त’ची ७९८१ कामे करण्यात आली. यात लोकसहभागातून २१.३९ कोटी उपलब्ध झाले. याशिवाय दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील २१८ गावांची निवड झाली. या गावांमध्येही ‘जलयुक्त’च्या ७,४८५ कामांची उद्दिष्ट्ये ठेवून ती ती मार्च २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले. या कामांसाठीही ६११ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला. जलयुक्त शिवार योजना अंमलात आल्यानंतर दोन पावसाळे होऊन गेले. त्यामुळे झालेली कामे जिल्ह्यातील काही गावांना फायदेशीर ठरली आहेतच. मात्र, त्याचे प्रमाण अतिशय नगण्यच आहे. तसे नसते तर सप्टेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ या चार महिन्यांच्या कालावधीत भूजल पातळीत एवढी वेगाने घट झाली नसती.

भूजल पातळीत घट

नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर २०१६ मध्ये भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, केवळ मालेगाव या एकाच तालुक्यातील तीन गावांतील भूजल पातळीत घट झाली आहे. मात्र, जानेवारी २०१७ अखेरीस भूजल खात्याने जाहीर केलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील तब्बल ७ तालुक्यांमधील ७२ गावांमधील भूजल पातळी घटली आहे. विशेष म्हणजे या ७२ पैकी ११ गावांमधील भूजल पातळीत ३ मीटरपेक्षा जास्त घट आली आहे.

टिकाऊ कामांची गरज

जिल्ह्यात ‘जलयुक्त’मधून करण्यात आलेली बहुतांश कामे गेल्या पावसाळ्यात होत्याची नव्हती झाली. याप्रश्नी त्या-त्या तालुक्यांच्या आमदारांनीच जलसंधारण मंत्र्यांपुढे तक्रारींचा पाढा वाचला. विशेष म्हणजे ‘जलयुक्त’च्या कामांचे थर्ड पार्टी ऑडीट करण्याचे शासन निर्देश पाळण्यात आले नाही. औरंगाबादच्या दिलासा जनविकास प्रतिष्ठानकडून नाशिक जिल्ह्यातील कामांचे ऑडीट करण्यात आल्याची माहिती खुद्द या खात्याच्या मंत्र्यांनाच नव्हती. ‘जलयुक्त’मुळे पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवण्याचे काम झाल्याने विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, ताज्या सर्वेक्षण आकडेवारीनुसार निम्म्या जिल्ह्याची भूजल पातळी खालावल्याचे लक्षात येते.

जिल्ह्यात घटलेली भूजल पातळी
तालुका......गावांची संख्या

- कळवण......३६
- मालेगाव......२०
- बागलाण......९
- इगतपुरी......३
- नांदगाव......२
- नाशिक......१
- येवला......१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेत सस्पेन्स कायम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषेदच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी एक दिवस बाकी असतांना माकपने आपली भूमिका जाहीररित्या स्पष्ट न केल्यामुळे या निवडणुकीत सस्पेंस कायम आहे. माकपचे तीन सदस्य जिल्हा परिषदेत निवडून आले. आपल्यासोबत एक अपक्ष असल्याचा दावा माकपने केला आहे. त्यामुळे या चार सदस्यांच्या भूमिकेवरच कोणाची सत्ता येते हे ठरणार आहे.

जिल्हा परिषदेत एकूण ७३ सदस्य निवडून आले असून या निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेल्या दोन्ही सत्ताधारी पक्षांनी वेगवेगळी मोट बांधली. शिवसेनेने काँग्रेसला बरोबर घेऊन एका अपक्षाच्या मदतीने आपला आकडा ३४ वर नेला. तर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस तसेच दोन अपक्षांच्या मदतीने आपल्या संख्याबळाचा आकडा ३५ पर्यंत नेला आहे. या दोन्ही पक्षांना बहुमतासाठी लागणारा ३७ चा आकडा पार करण्यासाठी माकपची गरज लागणार आहे. त्यामुळे या सत्ता संघर्षाचा सस्पेन्स कायम आहे. माकपने आपली कोणतीही भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे दोन्ही आघाडीने माकप आपल्याबरोबर असल्याचा दावा केला आहे.

सत्तेच्या राजकारणात राजकीय भूमिकेमुळे माकपची अडचण झाली आहे. एकीकडे शिवसेना तर दुसरीकडे भाजप आहे. धर्मनिरपेक्षतेचे राजकारण करतांना आपणच जातीयवाद पक्ष असल्याचा आरोप केलेल्या भाजप किंवा शिवसेनेला पाठिंबा देणे धोक्याचे ठरू नये, अशी चिंता माकपला सतावू लागली आहे. त्यामुळे कधी आम्ही तटस्थ राहू तर कधी उमेदवार देऊ, अशी उत्तरे माकप नेते देत आहेत. तसेच पाठिंब्याविषयी वेळेवर बघू, असे सांगून या दोन्ही आघाड्यांना ताटकळत ठेवत आहेत.

बहुतांश सदस्य सहलीला

शिवसेना व काँग्रेसचे सदस्य पहिले स्वतंत्ररित्या सहलीला गेले. त्यापाठोपाठ माकपचेही सदस्य गेले. राष्ट्रवादी व भाजपनेही आपले सदस्य शनिवारी (दि. १८) स्वतंत्ररित्या पाठवले. त्यामुळे या निवडणुकीत ऐनवेळी काय घडते याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नासाका’च्या पारदर्शी कारभारावर असणार भर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

सरकारने निश्चित केलेल्या ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव दिला जाईल. नाशिक साखर कारखान्याचे (नासाका) कामकाज पारदर्शक करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी अधिकाधिक क्षेत्र ऊस लागवडीखाली आणावे, असे आवाहन ‘नासाका’ अशासक‌ीय प्राधिकृत मंडाळाचे अध्यक्ष तानाजी गायधनी यांनी केले.

गेल्या चार गळीत हंगामांपासून बंद असलेल्या ‘नासाका’वर सरकारने काही महिन्यांपूर्वी १२ अशासकीय प्राधिकृत सदस्यांचे संचालक मंडळ नियुक्त केले. या मंडळाने गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी येत्या गळीत हंगामापासून कारखाना पुन्हा सुरू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर या संचालक मंडळाकडून ‘नासाका’ कार्यक्षेत्रातील सिन्नर, इगतपुरी, नाशिक व त्र्यंबकेश्वर या तालुक्यांतील सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, वाहतुकदार व कामगार यांच्याशी संपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या प्रारंभी कोटमगाव, मोहगाव व बाभळेश्वर या ठिकाणी झालेल्या ऊस उत्पादक व सभासदांच्या मेळाव्यात गायधनी बोलत होते.

याप्रसंगी अशासकीय संचालक प्रकाश घुगे, कैलास टिळे, सुदाम भोर, श्रीकृष्ण जानमाळी, प्रल्हाद काकड, मोहन डावरे, अरुण जेजुरकर, हेमंत गायकवाड, अनिता सहाणे, कमळाबाई थेटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. बाळासाहेब म्हस्के, अंबादास घुगे,देवराम म्हस्के यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. आगासखिंड येथे सोमवारी (दि. २०) शेतकरी मेळावा होणार आहे.

मेळाव्यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. ‘नासाका’ सुरू व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. यासाठी अशासकीय प्राधिकृत संचालक मंडळाला नासाका कार्यक्षेत्रातील सभासद, ऊस उत्पादक, कामगार या सर्व घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे.
- तानाजी गायधनी, अध्यक्ष, अशासकीय प्राधिकृत संचालक मंडळ, नासाका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे तीन संशयित रुग्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वाइन फ्लूच्या तीन संशयित पेशंटवर सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यात दोन महिला, तर एका पुरुषाचा समावेश आहे.

स्वाइन फ्लूच्या संशयितावर उपचार करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विभाग सुरू असून, यात १७ ते १८ मार्च या दरम्यान एकूण तीन संशयित पेशंट दाखल करण्यात आले आहेत. यातील पुरुषाचे वय ४५ इतके असून, तो इंदिरानगर परिसरातील रहिवासी आहे. दरम्यान, कळवण व नांदगाव येथील अनुक्रमे २४ आणि २५ वर्षांच्या महिलांवर देखील उपचार सुरू आहेत. यातील एक महिला गर्भवती आहे. दरम्यान, संशयित पेशंटचे स्वॅब पुणे येथे पाठवण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.

वाढत्या स्वाइल फ्लूमुळे जिल्हा रुग्णालयात स्वंतत्र कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे. खबरदारीचे उपाय म्हणून आरोग्य विभागाकडून सूचना करण्यात येत आहेत. ग्रामीण भागात स्वाइन फ्लूचा शहरापेक्षा प्रसार जास्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारच्या निर्णयाकडे धरणग्रस्तांच्या नजरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारच्या २००९ च्या शासन निर्णयानुसार नोकर भरतीत प्रकल्प बाधितांना केवळ पाच टक्केच आरक्षण आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील ३७ काश्यपी प्रकल्पबाधितांना नोकरी कशी द्यावी, याबाबतचे मार्गदर्शन महापालिकेने सरकारकडे मागवले आहे. नगरविकास विभागाशी याबाबतचा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पालकमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने प्रकल्प बाधितांच्या बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

काश्यपी धरणासाठी जागेची आवश्यकता असल्याने येथील ग्रामस्थांनी आपल्या हक्काच्या जमिनी या प्रकल्पासाठी दिल्या. धरणग्रस्तांना महापालिकेत नोकरी देऊ, अशी ग्वाही त्यावेळी देण्यात आली होती. २३ तरुणांना नोकरी देण्यात आली. परंतु, अजूनही ३७ धरणग्रस्त कुटुंबांतील सदस्यांना नोकरी मिळू शकलेली नाही. याबाबत धरणग्रस्त गेली अनेक वर्षे पाठपुरावा करीत आहेत. त्यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली. मात्र, अजूनही त्यांचा प्रश्न निकाली निघालेला नाही. करो या मरो शिवाय पर्याय नसल्याचे धरणग्रस्तांच्या लक्षात आल्यानंतर गतवर्षी १५ ऑगस्ट रोजी त्यांनी काश्यपी धरणात उड्या मारून आंदोलन केले होते. पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाची गंभीर दखल घेतली. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यावेळी बैठक बोलावण्यात आली होती. महापालिकेने आपला शब्द पाळून धरणग्रस्तांना नोकरी द्यावी, असे आदेश बैठकीत देण्यात आले. मात्र या आदेशाची अंमलबजावणी करण्यास अनेक मर्यादा असून, या मर्यादा महापालिकेने पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निदर्शनास आणून दिल्या. पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर महापालिकेने पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.

निर्णयाची आडकाठी

२००९ मधील शासन निर्णयानुसार प्रकल्प बाधितांना केवळ पाच टक्के कोटा राखीव आहे. ३७ जागा भरण्यासाठी तब्बल ७५० जागांची मेगा भरती करावी लागेल. परंतु, एवढी भरती शक्य नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस पत्नीची पतीविरोधात छळाची तक्रार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शारीरिक व मानसिक छळ करून फारकत मागणाऱ्या पोलिस खात्यात अधिकारी असलेल्या पतीविरुद्ध त्याच्या पत्नीने नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

सध्या नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असलेल्या रोहिणी पुंडलिक पावशे (वय ३२) रा. पार्थप्रभा अपार्टमेंट, राहुलनगर, जेलरोड यांनी आपल्याच पती विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात शारी‌रिक व मानसिक छळ करणे, लग्नातील दागिने परस्पर विक्री करणे, सासू व नणंद यांच्याकडून मानसिक छळ, जेलरोडचा फ्लॅट व कार नावे करुन द्यावा, आपल्या मैत्रिणीने केलेला बलात्काराचा आरोप व अॅट्रॉसिटीची केस मागे घेण्यासाठी फारकत मागणे, आपल्या आईवड‌िलांना मारुन टाकण्याची धमकी देणे अशा अर्धा डझन आरोपांसाठी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी रोहिणी पावशे यांच्या पतीची २०१४ मध्ये स्पर्धा परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली होती. त्यांची सुरुवातीला शिर्डी पोलिस ठाण्यात नेमणूक झाली होती. रोहिणीस मिळणारा पगार रोहिणीने तिच्या पतीकडे द्यावा यासाठी तिचे पती पुंडलिक धोंडीराम पावशे यांनी आग्रह धरीत तिला मारहाण केली होती. यात सासू गुंताबाई पावसे व नणंद शैला शरद शिंदे (रा. सातपूर) यांचाही सहभाग होता. २०१५ मध्ये फिर्यादी रोहिणीच्या वाढदिवसासाठी तिची औरंगाबाद येथील मैत्रिण दीपमाला अमृत बिलाडे ही शिर्डी येथील साईसंगम या हॉटेलात आली होती. येथे दीपमालाशी रोहिणीचे पती पुंडलिक पावशे यांच्याशी झालेल्या ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमसंबंधांत झाल्याचे लक्षात आल्यावर रोहिणीने त्यासंदर्भात पती पुंडलिक पावशे यांना विचारणा केली. त्यानंतर रोहिणीस फारकतीसाठी पती पुंडलिक पावशे यांनी दबाव टाकत तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. यादरम्यान रोहिणी गरोदर असताना तिला नगर येथे पुंडलिकने मारहाण केल्याने बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे रोहिणीने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. पुढे चालून फेब्रुवारी २०१७ मध्ये दीपमाला बिलाडे हीनेही पुंडलिक पावशेविरोधात औरंगाबादच्या बेगमपुरा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. याशिवाय तिने फिर्यादी रोहिणी, तिचे आईवडील, दोन बहिणींसह मावसभावावर अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हाही दाखल केला. हा गुन्हा सध्या नंदुरबार पोलिस ठाण्यात वर्ग झालेला आहे.

फिर्यादी रोहिणीने फारकत दिल्यास दीपमाला बिलाडेसुद्धा बलात्काराचा व अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्यास तयार आहे, असे सांगून तिचा पती पुंडालिक पावशे याने फिर्यादीवर मानसिक दबाव आणल्याने शेवटी रोहिणी पावशे यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आपल्या पतीसह सासू व नणंदेविरोधात फिर्याद दाखल केली आहे. नाशिकरोड पोलिसांनी रोहिणी पावशे यांच्या फिर्यादीवरुन त्यांचे पती पुंडलिक पावशे, सासू गुंताबाई पावशे व नणंद शैला शरद शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांचा तपोवनात पाणी बचतीचा नारा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीला लाभलेल्या पौराणिक व धार्मिक महत्त्वामुळे नाशिककरांचे गोदेशी एक वेगळचं नातं जडलं आहे. मात्र आता ‘गोदावरीशी नातं जोडूया’ या उपक्रमातंर्गत शंभरहून अधिक नाशिककरांनी तपोवनातील मलशुद्धीकरण प्रकल्पाला भेटत देत ‘सांडपाण्याचे नेमके काय होते’ हे समजून घेत पाणी बचतीचा नारा दिला. सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने होणारे गोदेचे प्रदूषण व मलशुद्धीकरण प्रकल्पांवर होणारा खर्च टाळायचा असेल तर कचरा व सांडपाणी घराबाहेर पडणारच नाही याची काळजी घेण्याची गरज ओळखत सांडपाण्याच्या समस्येच्या स्वरूप लक्षात घेऊन उपस्थितांनी पाणी बचतीचा ठराव केला.

‘गोदावरीशी नातं जोडूया’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र टाइम्स, नाशिक महापालिका व मोहाली येथील इंडियन इन्स्ट‌िट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च यांच्यातर्फे जागतिक पाणी दिनानिमित्त रविवारी तपोवनातील मलशुद्धीकरण केंद्राला भेटीचे आयोजन केले आहे. यावेळी आर्किटेक्चर अॅण्ड सेंटर ऑफ डिझाइन कॉलेजच्या प्राचार्या व जलतज्ज्ञ डॉ. प्राजक्ता बस्ते, जलबिरादरी उत्तर महाराष्ट्र संघटक राजेश पंडित, गोदाप्रेमी नागरिक सेवा समितीचे संस्थापक देवांग जानी, इको हाऊसिंगचे तज्ज्ञ नरेश भडकवाडे व इंडियन इन्स्ट‌िट्यूट विद्यार्थीनी शिल्पा डहाके यांनी उप‌स्थितांशी संवाद साधला. तर महापालिकेचे अधिकारी एक्झ‌िक्युटीव्ह इंजिनीअर बाजीराव माळी व पाणीपुरवठा विभागाचे ए. व्ही. धनाईत, डेप्युटी इंजिनीअर बी. एस. बागूल, सेक्शन इंजिनीअर संदेश ठाकूर व प्लांट इनचार्ज अन‌िल कुलकर्णी यांनी उपस्थितांना प्रकल्पाची माहिती गरज व उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी शंभरहून अधिक नाशिककर सहभागी झाले होते.

सकाळी नऊ वाजता तपोवनातील मलशुद्धीकरण केंद्राच्या कार्यालयात प्रकल्पाच्या माहितीचा स्लाईड शो दाखविण्यात आला. त्यानंतर मलशुद्धीकरण प्रकल्पाचे प्रत्येक टप्प्यावर कसे काम चालते याची प्रत्यक्ष भेट घडवित महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थितांना माहिती दिली. सांडपाण्याच्या प्रक्रियेदरम्यान तयार होणारा खत आणि मिथेनचा वापर पुन्हा कशापद्धतीने केला जातो हेही सांगितले. त्यानंतर उपस्थितांच्या प्रश्नांना तज्ज्ञांनी उत्तरे देत नाशिकच्या विकासासाठी सांडपाणी व्यवस्थापनाची गरज देवांग जानी, राजेश पंडित, प्राजक्ता बस्ते व नरेश भडकवाडे यांनी पटवून दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा नगरपरिषदेचा अर्थसंकल्प सादर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा नगरपरिषदेचा सन २०१७-१८ या आर्थिक वर्षांचा कोणताही करवाढ नसलेला सुमारे २६ लाख ६९ हजार रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प जिल्हाधिकारी नाशिक यांना सादर करण्यात आला. यामध्ये शहर विकासासाठी सुमारे ६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती सटाणा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सटाणा शहरासाठीच्या या अर्थसंकल्पात सटाणा शहर स्वच्छ, सुंदर निरोगी व हरित साकारण्यासाठी शहर विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे, असे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी सांगितले. शहर पाणीपुरवठा योजना मार्गी लावणे, जलवाहिन्या समपातळीवर आणणे, मोकळ्या भूखंडाचे विकसन करणे, चौक व स्मारकांचे सुशोभीकरण करणे, जॉगिंग ट्रॅक ग्रीन ज‌िम उभारणे, स्वागत कमानी उभारणे इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आला आहे. नदी संवर्धन योजनेतंर्गत आरमनदीवर विकास प्रकल्पासाठी ३० लक्ष रुपये, घनकचरा व्यवस्थापनाकरिता १.६५ कोटी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ५५ कोटीच्या योजनेच्या खर्चाच्या प्रस्तावासाठी १.५० कोटींची तरतूद केली आहे. शहरात हरित पट्टे निर्माण करण्यासठी २००० वृक्षांची लागवड व वृक्षसंवर्धनासाठी ३० लक्ष रुपयांची तरतूद केली आहे. या प्रसंगी उपनगराध्यक्षा निर्मला भदाणे, संदीप सोनवणे, महेश देवरे, राकेश खैरनार, दीपक पाकळे, भारती सूर्यवंशी, मुख्याधिकारी हेमलता डगळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिव्ह‌िलमध्ये रेब‌िज लस उपलब्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी रेबिज लस उपलब्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिक‌ित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली. मात्र, मागणी करूनही ४० हजार लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने अखेर खासगी कंपन्यांकडून एक हजार लसी खरेदी करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढवली आहे.

श्वानदंश झाल्यानंतर रुग्ण उपचारासाठी सिव्ह‌िल हॉस्पिटलमध्ये धाव घेतात. अशा रुग्णांना तात्काळ रेब‌िजची लस दिली जाते. हॉस्पिटलमधील रेब‌िज लसींचा साठा काही दिवसांपुर्वी संपुष्टात आला होता. याबाबतची मागणीही सिव्ह‌िल हॉस्पिटलकडून नोंदविण्यात आली. ४० हजार लसींची मागणी करण्यात आली. परंतु, राज्यस्तरावर रेब‌िज लस पुरविणाऱ्या कंत्राटदाराकडून वेळेत लसी उपलब्ध होत नसल्याचे कारण सांगत लस उपलब्धतेबाबत असमर्थता दर्शविण्यात आली. परिणामी सिव्ह‌िल हॉस्पिटलसह जिल्ह्यातही लसींचा तुटवडा निर्माण झाला. ही परिस्थिती हाताळणाऱ्या सिव्ह‌िल हॉस्पिटल प्रशासनाने खासगी कंपन्यांच्या माध्यमातून एक हजार लसींची उपलब्धता केल्याची माहिती जगदाळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस भरतीची आज रंगीत तालीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिस दलाच्या शिपाई व बॅण्ड्समन पदाच्या ९७ जागांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. २० ) रोजी सकाळी १० वाजता रंगीत तालीम आयोज‌ित करण्यात आली आहे. प्रत्यक्ष भरती प्रक्रिया २२ मार्चपासून होणार असून, त्यादृष्टीने पोलिसांचे नियोजन सुरू आहे.

या भरती प्रक्रियेसाठी १६ मार्चअखेरीस शहर पोलिस आयुक्तालयातील शिपाई व बॅण्ड्समन पदाच्या रिक्त जागांपैकी शासन आदेशानुसार ७५ टक्के म्हणजेच अनुक्रमे ७९ व १८ जागांसाठी ही भरती प्रकिया राबविली जात आहे. यासाठी २४ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज स्वीकृती सुरू करण्यात आली. १६ मार्च पर्यंत एकूण नऊ हजार ५९३ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले होते. त्यात ८ हजार १३६ पुरुष तर एक हजार ४५७ महिला इच्छुकांचा समावेश आहे. दरम्यान, गृह विभागाने अर्ज भरण्यासाठी २० मार्चपर्यंत मुदतवाढ दिली असून, उमेदवारांचे अर्ज दाखल होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकूण उमेदवारांचा निश्चित आकडा सोमवारी उशिरा समजेल. दरम्यान, या भरती प्रक्रियेसाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलिस उपायुक्त, तीन सहायक पोलिस आयुक्त, ४२ पोलिस निरीक्षक व इतर अधिकारी तसेच १५७ पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. भरती प्रक्रिया पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी रंगीत तालीम आयोजीत करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लांब उडी, गोळा फेक आणि १०० मीटर पळण्याची परीक्षा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडेल. एक हजार ६०० मीटर धावण्याची स्पर्धा मात्र गंगापूररोडवरील बापू ब्र‌िजजवळील गोदापार्क येथे पार पडणार आहे. दररोज किमान एक हजार इच्छुक उमेदवारांना बोलवण्यात येणार असून, सकाळी सहा वाजेपासून भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यापूर्वी इच्छुक उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतरच मैदानी व लेखी परीक्षा पार पाडली जात होती. यावेळी उमेदवारांना थेट रीस‌िट घेऊन बोलवण्यात आले असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुरापत काढून तरुणास बेदम मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

किरकोळ कुरापत काढून सहा जणांनी मिळून युवकास बेदम मारहाण केली. ही घटना उपनगर परिसरातील शांतीपार्क येथे घडली. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

हर्षद उल्हास जाधव (वय २५, सेंट झेव्हियर्स शेजारी, सूर्योदय सोसायटी, उपनगर) याच्या तक्रारीनुसार, हर्षद १७ मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास त्याचा मित्र गौरव काळे याच्या समवेत आजीला भेटण्यासाठी चारचाकी वाहनातून निघाला होता. शांतीपार्क गार्डनजवळ इतर मित्रांना भेटण्यासाठी ते थांबले असता, तिथे असलेल्या स्वप्निल पगारे आणि गौरव काळे यांच्यात वाद सुरू झाला. याच वेळी संशयित आरोपी निरज तेजाळेने हर्षदकडे सिगारेट देण्याची मागणी केली. तसेच हर्षदला बाजुला ओढीत नेले. यावेळी तिथे आलेल्या अनोळखी तिघांनी हर्षदला खाली पाडले. संशयित अंकुश डांगळेने हर्षदच्या डोक्यात लोखंडी गजाने मारले. इतर संशयितांनी देखील त्यास जबर मारहाण केली. या प्रकरणी हर्षदच्या फिर्यादीनुसार उपनगर पोलिसांनी निरज तेजाळे, स्वप्निल पगारे, अंकुश डांगळे याच्यासह अन्य तिघांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक श्रीराव करीत आहे.

जुगारी गजाआड

भद्रकाली पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करीत पाच जणांना अटक करीत जुगाराचे साहित्य जप्त केले. पंचशीलनगर येथील विजय ममता टॉकीजसामेर जुगार खेळणाऱ्या देवीदास बाबुराव जगताप यास पोलिसांनी अटक केली. संशयित मटका खेळताना सापडला. कथडा भागात जुगार खेळणाऱ्या शकील अकील पठाण व त्याच्या आणखी तीन साथिदारांना देखील पोलिसांनी जेरबंद केले. पोलिसांनी या कारवाईत जुगाराचे साहित्य आणि जवळपास अडीच हजार रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकाची आत्महत्या

मखमलाबादरोडवरील खालकर चाळ येथे राहणाऱ्या प्रकाश ठकाजी जाधव (५०) यांनी शनिवारी संध्याकाळच्या सुमारास विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. बाळासाहेब खालकर यांच्या भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या जाधव यांनी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास विषारी औषध सेवन केले होते. या प्रकरणी खालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

जखमी तरुणाचा मृत्यू

भाजून जखमी झालेल्या २७ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उमेश काळू गायकवाड (कुंभारवाडा, जुने नाशिक) असे त्याचे नाव आहे. ९ मार्च रोजी राहत्या घरी ३५ ते ४० भाजल्याने गायकवाडला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माणसांनी नाकारलेल्यांना ‘त्यांनी’ मायेने स्वीकारलं!

$
0
0

रेल्वे स्टेशनमधील निराधारांना मिळतोय मुक्या प्राण्यांचा आधार

डॉ. बाळकृष्‍ण शेलार, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वेस्थानक म्हणजे भटके, गरीब, साधू यांचे आश्रयस्थान झाले आहे. वंशाच्या दिव्याने घरच्या लक्ष्मीचा सल्ला ऐकून घरातून बाहेर काढलेली वृध्द जोडपीही येथे मोठ्या प्रमाणावर आढळतात. या निराधारांना आपल्यासारखी माणसे लळा लावत नसली, तरी मुकी जनावरे मात्र माया लावत असल्याचे चित्र आहे.

कुंभमेळ्यात वृध्द माता पित्यांना नाशिकसारख्या धार्मिक नगरीत सोडून जाणारे अनेक ‘दिवटे’ असतात. या बिचाऱ्यांना देवदर्शन करुन आल्यावर नाशिकरोड स्थानकाचाच आधार उरतो. लांब पल्ल्याच्या गाड्यांतील प्रवाशीही ओझे झालेल्या मातापित्यांना, दोन-चार दिवसांच्या स्त्री अर्भकांना स्थानकात खुशाल सोडून निघून जातात. शहरातील श्रीमंतांची पोरंही आजारी मातापित्यांना गाडीत आणून रेल्वेस्थानकावर सोडून पळून गेल्याचे पाहिलेले येथील कुली सांगतात. त्यामुळे त्यामुळे या निराधारांना भिकारी म्हणण्यास जीभ धजावत नाही, असेही ते म्हणतात.

नाशिकरोड रेल्वेस्थानकात चार प्लॅटफॉर्म आहेत. चौथा फ्लॅटफॉर्म कुंभमेळ्यात नव्याने बांधण्यात आला आहे. तो इतर तीनपेक्षा मोठा असला तरी तेथे रेल्वेगाडी थांबत नसल्याने त्याचा उपयोग फारसा होत नाही. त्यामुळे तेथे भटके, गरीब, निराधार रात्र घालविण्यासाठी येतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्लॅटफॉर्मवरही या गरीबांचीची गर्दी असते. सकाळी प्रवाशांकडून भीक मागायची, ती कमी पडल्यानंतर मुक्त‌िधाम मंदिरातील भाविक आणि परिसरातील दुकानदारांकडे भीकेसाठी हात पसरायचा. सूर्य पश्चिमेला झुकला की अंधारलेली रात्र काढण्यासाठी पुन्हा रेल्वे स्टेशनचा आसरा घ्यायचा, असा या भटक्यांचा दिनक्रम असतो.

मुक्या प्राण्यांची इमानदारी

प्रवाशांना हे चेहरे रोजचेच झाल्यामुळे ते या लोकांशी फटकून वागतात. त्यामुळे या भटक्या व निराधारांनी कुत्री, माजरांसारख्या मुक्या जनावरांशी मैत्री केली आहे. आपल्या भ‌‌ीकेतील दोन-चार तुकडे ते या अतिथींनाही देतात. निराधार हे स्थानकात जेथे जातील, त्यांच्यामागे ही जनावरे जातात. ते स्थानकाबाहेर भीकेसाठी गेल्यावर त्यांची प्रतीक्षा करतात. रात्री धनी परतल्यावर किंवा दिवसा त्याचा डोळा लागल्यावर त्याच्या ‘ऐवजा’चे रक्षण करतात. स्थानक परिसरात गुंड, लोफर वरचेवर येत असतात. विनयभंग, बलात्कार, चोरी असे प्रकार स्थानकात घडत असतात. त्यामुळे विधवा व वृध्द निराधारांना त्यांचा मोठा आधार वाटतो.


न संपणारी प्रतीक्षा!

पोलिसांनाही या भटक्यांची परिस्थिती माहिती आहे. तेही त्यांच्याप्रती दयाभाव ठेवतात. भुसावळ किंवा मुंबईच्या साहेबाची रेल्वेस्थानकाला व्हिज‌िट असेल तर या निराधारांना हाकलले जाते. ते गेल्यावर पुन्हा रेल्वेस्थानकच त्यांचे घर होते. कधी अचानक आयुष्याची संध्याकाळ झाली, तर मग बेवारस मृतदेह अशी त्यांची नोंद होते. मग सरकारी रुग्णालयात काही दिवस शवागारात मृतदेह पडून राहतो. नंतर एखाद्या स्मशानभूमीत त्यांना चिरविश्रांती घ्यावी लागते, जेथून त्यांना कोणीच हाकलत नाही. त्यांनी जीव लावलेली जनावरे मात्र स्थानकावर त्यांची प्रतीक्षा करत असतात, वंशाच्या दिव्यासारखी!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर सुव्यवस्थेची जबाबदारी सर्वांचीच!

$
0
0

विविध संघटनांची पोलिस आयुक्तांशी चर्चा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर सर्वांचे आहे. शहराचा विकास नागरिकांशी जसा जोडला तसे येथील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांसह नागरिकांवर येते. त्यामुळे आपल्या हक्कांप्रमाणे कर्तव्यांबाबतही जागरूकता ठेवायला हवी, असे मत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी व्यक्त केले.

नाशिक सिटिझन्स फोरमच्या वतीने विविध संघटना प्रतिनिधींनी पोलिस आयुक्तांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. उपस्थितांनी वाहतुकीसंबंधी सर्वाधिक सूचना मांडल्या. नाशिक-औरंगाबाद महामार्गावर येवला येथे ज्या पद्धतीने गार्ड स्टोन लावून पादचारी अथवा स्थानिकांसाठी वेगळी मार्गिका तयार करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरही गार्ड स्टोन लावून पायी जाणारे आणि सायकलिस्ट यांच्यासाठी एक स्वतंत्र मार्गिका तयार केली जावी, असा प्रस्ताव यावेळी पोलिस आयुक्तांपुढे नाशिक सिटिझन्स फोरमच्यावतीने मांडण्यात आला. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शाळा महाविद्यालयांबरोबरच वर्दळीच्या चौकांवर आणि मार्गावरील हॉकर्स गर्दीस आळा घालावा, अपघात टाळण्यासाठी दुभाजकांना असलेले पंक्चर्स आणि स्पीड ब्रेकरबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. शहर आणि ग्रामीण रिक्षांसाठी कलरकोड ठेवावा, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली. दरम्यान, सर्व पदाधिकाऱ्यांकडून आलेल्या सूचनांनंतर पोलिस आयुक्तांनी सांगितले, की नाशिक शहरातील वर्षांनुवर्षांपासून समस्या निर्माण झाल्या आहेत. या गंभीर समस्या सोडविणासाठी पोलिस, महापालिका, हायवे अॅथॉरिटी, आरटीओ अशा विविध विभागांत समन्वयाची गरज आहे. मात्र, अनेकदा जबाबदारी झटकण्याकडे सर्वांचा कल असतो. पोलिसांशी संबंधित असलेली कामे सोडविण्यासाठी निश्चित ठोस प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

उपस्थित पदाधिकारी

बैठकीस निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, मंगेश पाटणकर, आयमाचे राजेंद्र अहिरे, नाईसचे विक्रम सारडा, क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष सुनील कोतवाल, उमेश वानखेडे, अनिल आहेर, बार असोसिएशनचे अ‍ॅड. नितीन ठाकरे, अ‍ॅड. जयंत जायभावे, असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनीअर्सचे विजय सानप, आर्किटेक अँड इंजिनीअर असोसिएशनचे सचिन गुळवे, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्सच नरेंद्र बिरार, द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्सचे प्रदीप काळे, लघुउद्योग भारतीचे एम. जी. कुलकर्णी, नाशिक स्कूल्स असोसिएशनचे सचिन जोशी आदी उपस्थित होते.

या सुधारणा दृष्टिक्षेपात

शहरातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याबाबतचा आराखडा तयार असून, तो वरिष्ठ पातळीवर सादर केलेला आहे. या सीसीटीव्हींसाठी एक बेस सि‌स्टिम तयार करण्यात येईल. तसेच वाढते अपघात टाळण्यासाठी व वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी थ्रीडी झेब्रा क्रॉसिंग बसवण्याची तयारी असल्याचे पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगन्नाथ हिरे राज्यातील सर्वांत श्रीमंत उमेदवार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत एकूण ७३ उमेदवारांपाकी ४५ उमेदवार हे कोट्यधीश असल्याची माहिती समोर आली आहे. त्याप्रमाणे राज्यात सर्वात श्रीमंत सदस्य नाशिक जिल्ह्यातील निमगाव येथील भाजपचे जगन्नाथ दशरथ हिरे हे ठरले आहेत. त्यांची मालमत्ता १७० कोटी रुपये असून, दुसऱ्या क्रमांकावरील सदस्याची मालमत्ता ९५ कोटी इतकी आहे.

असोशिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचने केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या विश्लेषनानंतर ही माहिती समोर आली आहे. या फोरमने राज्यातील १५०९ जिल्हा परिषद सदस्यांपैकी १४३१ उमेदवारांचे प्रतिज्ञापत्राच्या संपत्तीची माहिती एकत्र केल्यानंतर हा निष्कर्ष काढला आहे.

जिल्हा परिषदेत शिवसेनेचे २५, राष्ट्रवादीचे १८, भाजपचे १६, काँग्रेस ८, माकप ३ व ४ अपक्ष निवडून आले आहेत. त्यापैकी ४५ उमेदवार कोट्यधीश आहेत. जिल्हा परिषद इतर बाबतीत श्रीमंत नसली तरी सभागृह मात्र सदस्यांमुळे श्रीमंत असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत साहित्यातून समाजसेवा

$
0
0



संत साहित्यात महामानवांना मनुष्याकडून अभिप्रेत असलेले जगणे प्रत्यक्ष आचरणात कसे आणता येईल, याकरिता अनघा चिपळूकर गेली १६ वर्षे कार्य करीत आहेत. गीता अभ्यास, ज्ञानेश्वरी, एकनाथ, रामदास, संत तुकाराम यांचे साहित्य आजच्या जगण्याला कसे समर्पक आहे, त्याच्या आचरणाने धकाधकीच्या जीवनात मानवाचे जीवन कसे सुसह्य होणार आहे, हे समजावून सांगण्यासाठी १६ वर्षांपासून विनामूल्य अभ्यास वर्गांचे आयोजन त्या करीत अाहेत. त्यांच्या अभ्यास वर्गाचा आजवर तीन ते चार हजार उच्चशिक्षित महिला आणि पुरुषांनी लाभ घेतलेला असून, त्यांचा ज्ञानदानाचा प्रसार वयाच्या साठीनंतर आजही सुरू आहे.


अनघा चिपळूणकर यांच्या कानावर संत साहित्याचे संस्कार बालपणापासूनच पडत गेले. त्या राहत असलेल्या वाड्याशेजारी संत साहित्याचे गाढे अभ्यासक राहत होते. त्यांच्या घरी महाराष्ट्रातील अनेक संत साहित्यिक मंडळींचा राबता असायचा. त्यांच्या वाड्यात होत असलेली भजन-कीर्तने लहानपणी कानावर येत असल्याने या विषयाची गोडी लागली. नंतर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ही गोडी जास्त बहरत गेली. पुढे लग्न झाल्यावर मिरजहून नाशिकला आल्यानंतर सुदैवाने चिपळूणकरांचे घरदेखील धार्मिक प्रवृत्तीचे असल्याने या अभ्यासाला जास्त गती मिळाली. त्यांनी रामदासी कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन आदींचे विविध पैलू अभ्यासले. एकदा गीता वाचल्यानंतर आपण गीतेचा अभ्यास करावा, असे त्यांच्या मनात आले. त्यानंतर पुणे येथे असलेल्या गीता ज्ञान मंडळाच्या परीक्षा देऊन त्यात अव्व्ल क्रमांक मिळवला. गीता ही केवळ परीक्षेसाठी नसून, ती आचरणात आणण्यासाठी आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला व्यवस्थापनाचे धडे दिले आहेत. त्यासाठी त्यांनी तरुण मुलामुलींना गीता शिकविण्यास सुरुवात केली. अनेक महिला दुपारी जेवण झाल्यानंतर टीव्हीवरचे कार्यक्रम पाहत असतात, यावर उपाय म्हणून त्यांनी दुपारी तीन ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील उच्चविद्याविभूषित नागरिकांसाठी ज्ञानेश्वरीचे वर्ग सुरू केले. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील व्यक्तीला ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्या साहित्याचा अभ्यास असतो. मात्र, शहरातील व्यक्तीला इच्छा असूनही त्याकडे वळता येत नाही, ही बाब ओळखून त्यांनी शहरात वर्ग सुरू केले. बघता बघता त्यांना इतका प्रतिसाद मिळाला, की जागोजागी बोलावणे येऊ लागले. प्रशिक्षण घेतल्यानंतर महिलांचे घरातील वागणे-बोलणे सुधारले. घरातील व्यक्ती विचारायला येऊ लागल्या, की आमच्या घरातील महिलेमध्ये इतका बदल कसा झाला? संत साहित्याचा अभ्यास करता यावा यासाठी त्यांनी २५ वर्षे पंढरपूरची वारी केली. चिपळूणकर ताईंकडून दर वर्षी भागवत सप्ताह, ज्ञानेश्वरी सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. हजारोंचा जनसमुदाय या कार्यक्रमाला उपस्थित असतो. त्या म्हणतात, लोकांना देवभोळे बनविण्यापेक्षा संत साहित्यात सांगितलेला विज्ञानवाद महत्त्वाचा आहे, त्यातील कर्माचा सिद्धांत महत्त्वाचा आहे, व्यवस्थापनाचे धडे महत्त्वाचे आहेत. लोकांनी ते अंगीकारले तर खऱ्या अर्थाने चांगला सुसंस्कृत समाज घडण्यास मदत होईल. गीतेमध्ये सांगितले आहे, की आपली कर्तव्ये पार पाडून तुम्ही देवाचे नामस्मरण करा. मला भेटलेले अनेक जण म्हणतात आम्ही ज्ञानेश्वरीची इतकी पारायणे केली, पंढरपूरच्या वारीला इतक्या वेळा जाऊन आलो. परंतु, त्यांच्या आचरणात या गोष्टी कुठेच दिसत नाहीत. पारायणे किती केली, यापेक्षा कशी केली, हे महत्त्वाचे आहे. मी पारायण करीत असताना प्रत्येक ओळीचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजावून सांगत असते. मी जे लोकांना देते ते माझे काहीच नाही. ज्यांनी लिहून ठेवले त्यांनी काही घेतले नाही, तर मी कसे घेऊ? धनाच्या श्रीमंतीपेक्षा संत साहित्याचे विचार माझ्याकडे आहेत, ती माझी श्रीमंती आहे. या कार्याचा पुरस्कार म्हणून श्रृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला आहे. त्याचप्रमाणे अनेक सामाजिक संस्थांनीही त्यांना गौरविले आहे. नम्रपणे त्या म्हणतात, मी अजून शिकते आहे. मला शिकून कीर्तन करण्याची इच्छा आहे!


नाशिककरांनो, लिहिते व्हा!

ज्येष्ठ नागरिक म्हटले, की वयाचा उत्तरार्ध आणि त्यामुळे कमी झालेला अॅक्टिव्हनेस असा बऱ्याच जणांचा समज असतो. पण, अनेक ज्येष्ठ हे केवळ वयाने वृद्ध असतात, त्यांचे मन मात्र तरुणच असते. त्यांच्या कामातून, समाजसेवेतून किंवा अन्य अॅक्टिव्हिटीजमधून ते आपण अजूनही तरुण आहोत हे दाखवून देतात. अशाच ज्येष्ठांसाठीचे हे व्यासपीठ म्हणजे आमचा ‘यंग सीनिअर्स’ कॉलम. चला तर मग, तुम्ही जर असे यंग सीनिअर असाल, तर थेट आमच्याशी संपर्क करा किंवा तुमच्या ओळखीत, पाहण्यात असे कोणी असेल, तर त्यांचे नाव सुचवा. योग्य व्यक्तींना या सदरातून नक्कीच प्रसिद्धी दिली जाईल.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, तिसरा मजला, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड, ना‌शिक.

समन्वय : फणिंद्र मंडलिक- ९४२३१७४४९५

ई-मेल : fanindra.mandlik@timesgroup.com

(पाकीट आणि ई-मेलवर ‘यंग सीनिअर्स’ उल्लेख करावा.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images