Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वनजमिनी आदिवासींच्या नावे करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देवळा तालुक्यातील निंबोळा येथील काही वनजमिनी आदिवासी बांधव अनेक वर्षे कसत असून, त्या आदिवासी बांधवांच्या नावे कराव्यात, अशी मागणी भारतीय लहूजी एकलव्य सेनेने केली आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांना सोमवारी याबाबतचे निवेदन देण्यात आले.

निंबोळा येथील आदिवासींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे, की गावातील काही वनजमिनी आदिवासी भिल्ल समाजाची २१ कुटुंबे गेल्या ३० वर्षांपासून कसत आहेत. वनदाव्यांबाबतची कागदपत्रे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दिली असून, तेथून ती जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आमचे वनदावे तत्काळ मंजूर करून सातबारा उतारे द्यावेत, अशी मागणी दगा तलवारे, शिवराम पवार आणि बाळासाहेब बागूल यांनी निवेदनाद्वारे केली आहे. जमीन चांगल्यारीतीने कसता यावी, यासाठी तेथे पाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी या जमिनींवर विहिरी खोदण्याची, बोअरवेल करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास बेमुदत उपोषण केले जाईल व त्याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची राहील, असा इशारा देण्यात आला आहे.

वडगाव पिंगळा येथेही अन्याय

सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे एका आदिवासी समाजाच्या कुटुंबाची जमीन बिगरआदिवासी कुटुंब कसत आहे. या जमिनी आदिवासी कुटुंबाच्या ताब्यात मिळाव्यात, अशीही मागणी भारतीय लहूजी एकलव्य सेनेने केली आहे. या प्रश्नाबाबत सिन्नर तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन करूनही उपयोग झाला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी न्याय द्यावा, अशी मागणी बाळासाहेब बागूल, भिका पवार आणि गणेश पवार यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेना जिल्हाप्रमुखाच्या गाडीची तोडफोड

$
0
0

धुळ्यातील प्रकार; तक्रार दाखल

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या महिंन्द्रा बोलेरो गाडीवर रविवारी (दि. १९) रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी दगड मारून काच फोडल्याचा प्रकार घडला आहे. हे राजकीय विरोधकांनी केले असून माझ्या कामांवरून मला विचलित केले जात आहे, असा आरोप हिलाल माळी यांनी केला आहे. शिवसेना पक्षात असलेले शिवसैनिक खचून जात नाही. मात्र पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी माळी यांनी बोलताना केली. याप्रकरणी माळी यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

शहरातील जुने धुळे भागात राहत असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या महिंन्द्रा बोलेरो क्रमांक (एमएच १८ एजी - ९००९) या गाडीचा मागील काच रविवारी, मध्यरात्री दोनच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोन जणांनी दगड मारून फोडला. काच फुटल्याच्या आवाजाने नागरिक जागे झाले असता त्यांना दुचाकीवर दोनजण जाताना दिसून आले. मात्र नेमके कोण होते ते मात्र समजू शकले नाही. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना असे प्रकार विरोध केल्याशिवाय राहत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून विरोध जाणीवपूर्वक त्रास देत आहेत, असे हिलाल माळी म्हणाले. परंतु, हे प्रकार यापुढे पुन्हा घडले तर यावर काहीतरी उपाय शोधल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वागतयात्रा ठरणार लक्षवेधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याचे पारंपरिक पध्दतीने स्वागत करण्यासाठी नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने ‘स्वागत यात्रां’चे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील साक्षी गणेश मंदिर, आयुर्वेद महाविद्यालय, पंचवटी द्वारका या ठिकाणांहून २८ मार्च रोजी सकाळी ६ वाजता ही स्वागतयात्रा निघणार आहे. या यात्रेस जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह, महंत रामस्नेहीदास महाराज, महंत रामकिशोरदास महाराज, योगगुरू अरुण एकबोटे, ब्रह्माकुमारी वासंतीद‌िदी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याबरोबरच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी यंदाही गोदापटांगणावर महावादन महारांगोळीचे विशेष आकर्षण राहणार आहे.

संस्कृतीचे संवर्धन व्हावे, त्याबाबत नागरिकांना माहिती व्हावी तसेच, युवावर्गापर्यंत हिंदू संस्कृती आणि परंपरा समजून त्यापुढील पिढीत ती रुजावी, या हेतूने या स्वागत यात्रांचे आयोजन केले जाते. गुढीपाडव्याला सकाळी साक्षी गणेश मंदिर, आयुर्वेद महाविद्यालय, द्वारका या ठिकाणांहून ही स्वागत यात्रा सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी काढण्यात येणार आहेत. याबरोबरच प. पू. गुरूगोविंद सिंगजी महाराज यांच्या ३५० व्या जयंती वर्षानिमित्त शनिवारी (दि. २५) सायंकाळी ६.३० वाजता गोदाघाटावरील गांधी तलाव परिसरात महाढोलवादन करण्यात येणार आहे. त्यात शहर तसेच जिल्ह्यातील १८ ते २० पथके सहभागी होणार आहेत. साधारणत: ६०० ढोल व १२५ ताशे या वादनात सहभागी होणार आहेत.

महारांगोळी
यंदा ‘संतांची मांदियाळी’ या विषयावर २०० बाय १०० फूट आकाराची महारांगोळी रविवारी (दि. २६) रेखाटण्यात येणार आहे. संतांच्या परंपरेमध्ये वारकरी संप्रदायाचे विशेष महत्व आहे. त्यामुळे रांगोळीच्या रेखाटनात वारकरी संप्रदायातील अनेक बाबींचे रेखाटन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही रांगोळी शहरातील १२५ महिला रेखाटणार असून त्यासाठी गेल्या एक ते दीड महिन्यांपासून सराव करत आहेत.गोदाकाठ परिसरात साकारण्यात येणारी महारांगोळी सर्वांसाठीच विशेष आकर्षण ठरणार आहे. या रांगोळीसाठी २०० गोण्या रंग आणि ७० गोण्या रांगोळीचा वापर केला जाणार आहे. ही रांगोळी काढण्यासाठी रविवारी (दि. २६) सकाळी ६ वाजता प्रारंभ होईल.

विविध सामाजिक, सेवाभावी संस्थांचे कार्य समाजापर्यंत पोहचावे यासाठी प्रदर्शनदेखील मांडण्यात येणार आहे. देण्यात आली. या वेळी प्रफुल्ल संचेती, नीलेश देशपांडे, आसावरी धर्माधिकारी, राजेंद्र दरगोडे, मनोज कुलकर्णी, ओंकार भोज आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा बांधिलकीवर मंथन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये महाराष्ट्र युवा परिषद या सामाजिक संघटनेच्या युवा संसदेत विविध विषयांवर मंथन झाले. या संसदेची सुरुवातच युवकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि आजचे राजकारण या प्रश्नांची होळी करून झाली. या कार्यक्रमासाठी सामाजिक विचारवंत सुभाष वारे, महाराष्ट्र युवा परिषदेचे

प्रदेशाध्यक्ष आशिष मेस्त्री व उपाध्यक्ष राजेश गायकवाड, राजेश हिवरे, नितीन मते यांची उपस्थिती होती.

सुभाष वारे यांनी युवा व आरक्षण या विषयावर विचार मांडले. त्यानंतर अमित नारकर यांनी युवकांचे सामाजिक क्षेत्रात योगदान व बांधिलकी या विषयावर मार्गदर्शन केले. त्यासंदर्भातील एकूण प्रवास त्यांनी मांडला. दुसऱ्या सत्रात हरीश इथापे यांनी युवकांचे सामाजिक क्षेत्रात योगदान व बांधिलकी या युवकांच्या प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर आमदार कपिल पाटील व भीम रासकर यांनी युवा संघटनांची गरज व अस्तित्व यावर चर्चा केली. या संसदेसाठी महाराष्ट्रातून २८ जिल्ह्यांतील युवक व युवती, तसेच जिल्हा प्रतिनिधी असे ३०० युवक प्रतिनिधी सहभागी झाले होते.

युवा संसदेच्या दुसऱ्या दिवशी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. संजय अपरांती होते. त्यांनी युवा व प्रशासन या विषयावर विचार मांडले. दुसऱ्या सत्राचे वक्ते निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी विवेचन केले. संसद यशस्वीतेसाठी अमोल नेमणार, किरण मोरे, किरण पावले, ज्ञानदेव कुदनर, मोहित गोवेकर, सुरेश ताठे, प्रिया ठाकूर, दिनेश काळे आदींनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राधाबाईंचं वेदनादायी जगणंं झालं ‘सोन्याचं’!

$
0
0

विठाबाई नारायणगावकर पुरस्काराने होणार आज गौरव

नाशिक : पायात नादावणारे चाळ...हातात हिरवा-पिवळा चुडा...गळ्यात सोन्या-पुतळ्यांची माळ...केसाला मोगऱ्याचा गजरा अन् तोंडात पानाचा तोबरा भरलेला असला की हे रूप कुणाचं आहे हे सांगावं लागत नाही. ‘तमाशातील बाई’ असं बिरूदच तिला लाभलेलं असतं. परंतु, राधाबाईंची कहाणी मात्र यापेक्षा वेगळी आहे. आज सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते विठाबाई नारायणगावकर तमाशा जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा सन्मान होणार आहे. एका नाशिककर कलावंताचा हा सन्मान नाशिकची मान उंचावणारा ठरणार आहे.

राधाबाई कारभारी खोडे-नाशिककर असं त्यांचं नाव. तमाशातील हे मोठं नाव इतकं मोठं की त्यांच्या नावाने आज एक फड उभा आहे. हिराबाई नाशिककर आणि राधाबाई नाशिककर ही तमाशातली दोन मोठी नावं. हिराबाईंनी तमाशाचा फड चांगलाच गाजवला. त्याचप्रमाणे राधाबाईदेखील कमी नाही. गेल्या ४० ते ५० वर्षांपासून त्या तमाशामध्ये काम करीत आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व फडांमध्ये केले काम

राधाबाई नाशिककर तशा उपेक्षितच कलावंत. आयुष्यभर त्यांनी कामाच्या वेदना सोसल्या. वयाच्या १२ व्या वर्षापासून राधाबाई नाशिकला आल्या आणि नाशिकच्याच झाल्या. फुलेनगरमध्ये त्यांचे वास्तव्य. महाराष्ट्रातल्या सर्व फडांमध्ये त्यांनी काम केले.

लय भारी वाटतंय. भयंकर कष्ट केले, त्याचं चीज झालं. देवाने माझं गाऱ्हाणं ऐकलं. हे माझं यश असलं तरी त्याला अनेकांच्या आशीर्वादाची जोड आहे. सरकारचेही लई धन्यवाद की त्यांनी माझी गरिबाची दखल घेतली. हा पुरस्कार मी आई शेवंताबाई पागे यांच्या पायी लावते.

- राधाबाई खोडे, नाशिककर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोलपंपचालकांना नोटिसा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नोटाबंदीनंतर पेट्रोलपंपावर २५ टक्क्यांहून अधिक विक्री वाढल्यामुळे प्राप्तिकर विभागाने पेट्रोल पंप चालकांना नोट‌िसा पाठवून त्यांच्याकडून माहिती मागितली आहे. त्यामुळे पेट्रोलपंप चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. काळा पैसा पांढरा केल्याचा या खात्याला संशय असून, त्यामुळे देशभरातील काही पेट्रोल पंपांवर छापे टाकण्यात आले आहेत.
पेट्रोलपंप मालकांनी बँक खात्यांमध्ये किती पैसा जमा केला आणि किती विक्री केली, विक्री रक्कम आणि बँकेत जमा केलेली रक्कम हा सर्व हिशोब आता प्राप्तिकर विभाग तपासणार आहे. प्राप्तिकर विभागाच्या यावर पेट्रोलपंप मालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या काळात जास्त विक्री झाली असली तरी त्याचा हिशोब आमच्याकडे असतो असे सांगत कंपनीकडून आलेला माल व त्यानंतर तो विक्री झालेला माल याचे मिटर ‌रीडिंग असते. त्यामुळे कंपनीव्यतिरिक्त असे कोणतेही जास्तीचे व्यवहार आम्हाला करता येत नाहीत. त्यामुळे या नोट‌िसा केवळ त्रास देण्याचा प्रकार असल्याचे पंपचालकांचे म्हणणे आहे. प्राप्तिकर विभागाला नोटाबंदीदरम्यान पेट्रोल पंपांकडून विक्री रकमेपेक्षा १५ टक्के रक्कम अधिक बँकेत जमा केल्याचाही संशय आहे. त्यामुळे जमा केलेल्या पैशांची जर योग्य माहिती नाही देता आली तर त्या पेट्रोलपंप मालकावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉलिसीचे करा वनटाइम पेमेंट

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वनटाइम पेमेंट भरून पॉलिसी देण्यात येईल, तसेच तीन वर्षांनंतर पॉलिसीची सर्व रक्कम काढता येईल किंवा १० हजार शिल्लक ठेवल्यास पॉलिसी कायम करून १० वर्षांपर्यंत १५ टक्के व्याजदराने पॉलिसी मिळेल, अशी प्रलोभने दाखवून तब्बल २ लाख २० हजारांच्या चार पॉलिसी काढणाऱ्या ग्राहकाला वनटाइम मोड करून पैसे देण्याचे आदेश ग्राहक न्यायमंचाने एक्साइड लाइफ इन्शुरन्स कंपनीला दिले आहेत.

अागर टाळळी येथील संतोष एकनाथ गरड यांनी याबाबत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात तक्रार केल्यानंतर हा निकाल देण्यात आला. गरड यांनी या तक्रारी म्हटले आहे, की मी २ लाख २० हजार रुपयांच्या चार पॉलिसी घेतल्या. त्यात एक २५ हजारांची होती. त्याची मुदत २० वर्षे, दुसरी ४५ हजार ५०० रुपयांची होती. तिची मुदत २४ वर्षे होती. तिसरी पॉलिसी ६० हजारांची होती. तिची मुदत ३० वर्षे व चौथी ९० हजारांची होती तिची मुदत २० वर्षे होती. या पॉलिसींचा कालावधी पेपर्स मिळाल्यानंतर लक्षात आला. त्यामुळे मी इन्‍शुरन्स कंपनीबरोबर १५ ते २० दिवसांनंतर बोलणी करून वनटाइम मोड करण्याचे सांगितले. कंपनीने आश्वासनही दिले. पण, कंपनीने रक्कम दिली नाही.

या तक्रारीनंतर एक्साइड लाइफ इन्‍शुरन्स कंपनीने युक्तिवाद करताना सांगितले, की गरड यांना वेलकम लेटरसोबत अटी व शर्तींसह पॉलिसी शेड्यूल देण्यात आले होते. पॉलिसीच्या अटी व शर्ती मान्य नसल्यास पॉलिसी डॉक्युमेंटस मिळाल्यापासून १५ दिवसांत पॉलिसीज रद्द करून घेण्याबाबत तक्रारदारांना कळविण्यात आले. मात्र, गरड यांनी १५ दिवसांत पॉलिसी रद्द करून घेतल्या नाहीत. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्याच्या तारखेपासून सरेंडर बेनिफिटसह तीन वर्षांनंतर देण्याची त्यांची जबाबदारी आहे.


विमा कंपनीचे टोचले कान

या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर ग्राहक न्यायमंचाने पॉलिसी व डॉक्युमेंटसोबत अटी व शर्ती पाठवल्या होत्या. याबाबत पोस्टाचा अगर कोणताही पुरावा कंपनीने दाखल केला नाही, असे सांगत विमा कंपनीचे कानही टोचले. यावेळी न्यायमंचाने निकालात म्हटले, की विमा कंपन्यांकडून त्यांच्या एजंटमार्फत वेगवेगळी प्रलोभने दाखवून अटी व शर्तींची माहिती न देताच पॉलिसीज विकल्या जातात, असे सर्वसाधारण अनुभवास येते. त्यामुळे वनटाइम पेमेंटचे प्रलोभन दाखवून पॉलिसी विकल्याच्या तक्रारीत आम्हाला तथ्य वाटते, म्हणून कंपनीने सर्व पॉलिसीची रक्कम तक्रारदाराला द्यावी. त्याचप्रमाणे मानसिक त्रासापोटी पाच हजार व अर्जचा खर्च तीन हजार रुपये अदा करावा, असे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माकप-शिवसेनेची नाशिकमध्ये अनोखी युती?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा परिषदेत शिवसेना, काँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अभूतपूर्व व ऐतिहासिक युती सत्तेवर येण्याची शक्यता बळावली आहे. डाव्या विचारांच्या माकपने शिवसेनेसोबत जाऊ नये, यासाठी सोमवारी दिवसभर गल्ली ते दिल्ली प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतरही माकपने ‘दगडापेक्षा वीट मऊ’ या न्यायाने शिवसेनेबरोबरच राहण्याचा निर्णय पक्का केल्याने आता भगवा, तिरंगा व लाल बावट्याची सत्ता नाशिक जिल्हा परिषदेत येणे जवळपास निश्चित झाले आहे. आज, मंगळवारी सकाळी अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होत असून, रात्री उशिरापर्यंत राजकीय हालचाली सुरूच होत्या.

या निवडणुकीसाठी माकपची भूमिका निर्णायक असली तरी त्यांचा कल शिवसेनेकडेच असल्याने शिवसेना- काँग्रेस आघाडीचा सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे. माकपने राष्ट्रवादी, भाजप आघाडीला सहकार्य करावे, यासाठी दस्तूरखुद्द शरद पवार यांनी माकप नेते सीताराम येच्युरी यांचीही मनधरणी केल्याचे सांगितले जात असून, त्यातून काही वेगळा निर्णय झाला तरच जिल्हा परिषदेत चमत्कार घडू शकेल. राष्ट्रवादीने केरळमध्ये माकपला पाठिंबा दिल्यामुळे जिल्हा परिषदेत माकपने आम्हाला पाठिंबा द्यावा, असे समीकरण मांडले गेल्याची चर्चा आहे. दिल्ली दरबारात होणाऱ्या घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या आशा उंचावल्या आहेत. याचबरोबर राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबरोबर चर्चा करून अध्यक्षपदासाठी पाठिंबा देण्याचा आग्रह धरला आहे. शेवटपर्यंत माकपने आपली भूमिका जाहीररीत्या स्पष्ट केली नसली तरी त्यांचे चार सदस्य शिवसेना कॅम्पमध्ये असल्याने प्रत्यक्ष कृतीतूनच त्यांचा निर्णय स्पष्ट असल्याचे सांगितले जात आहे. माकपने निर्णयाचे सर्वाधिकार आमदार जिवा पांडू गावित यांना दिले असून, त्यांनी कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी व भाजपशी असलेली स्पर्धा लक्षात घेऊन शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्र्यंबक पंचायत समितीत सभापती निवडीत माकपला शिवसेनेने पाठिंबा दिल्याने आता त्याची परतफेड माकप करणार असेल तर त्यात गैर काय, असा सवाल दोन्ही पक्षांतील नेते करीत आहेत.

दरम्यान राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप बनकर यांच्या पत्नी मंदाकिनी बनकर यांना माकपचा पाठिंबा मिळेल, असे राष्ट्रवादीतर्फे सांगितले जात आहे. शिवसेनेतर्फे अध्यक्षपदासाठी सविता पवार, शीतल सांगळे, सुरेखा दराडे यांचे नाव आघाडीवर आहे.

जिल्हा परिषदेत एकूण ७३ सदस्य निवडून आले असून, या निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेल्या दोन्ही सत्ताधारी पक्षांनी वेगवेगळी मोट बांधली. शिवसेनेने काँग्रेसला बरोबर घेऊन एका अपक्षाच्या मदतीने आपला आकडा ३४ वर नेला, तर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच दोन अपक्षांच्या मदतीने आपल्या संख्याबळाचा आकडा ३५ पर्यंत नेला आहे. या दोन्ही पक्षांना बहुमतासाठी लागणारा ३७ चा आकडा पार करण्यासाठी माकपची गरज लागणार आहे. माकपकडे एका अपक्षासह चार सदस्य आहेत.

शिवसेना काँग्रेसचे सदस्य इगतपुरीत

वेगवेगळे सहलीला गेलेले शिवसेना, काँग्रेसचे सदस्य खंडाळ्यात आले; पण ते वेगवेगळ्या हाॅटेलमध्ये होते.मात्र सोमवारी हे सदस्य इगतपुरीला एकत्र आले.याच हाॅटेलमध्ये रविवारी राष्ट्रवादीचे सदस्य होते.ते नाशिकला गेले व या सदस्यांनी या हाॅटेलमध्ये आपला मुक्काम ठोकला.या सदस्यांबरोबर माकपचे सदस्य असल्याचेही बोलले जात आहे. राष्ट्रवादी व भाजपनेही आपले सदस्य शनिवारी स्वतंत्ररीत्या पाठवले. त्यानंतर ते इगतपुरीला एकत्र आले व त्यानंतर हे सदस्य सोमवारी नाशिकच्या एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये एकत्र आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची लढाई राष्ट्रवादी व शिवसेनेत आहे, तर उपाध्यक्षपदासाठी भाजप व काँग्रेसमध्ये लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

दिग्गज नेते नाशिकला

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे पालकमंत्री गिरीस महाजन, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील व ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह प्रमुख नेते दिवसभर नाशिकमध्ये होते. त्यामुळे ते या सर्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोषी कॉलेजेस रडारवर

$
0
0

तंत्रशिक्षण संचालनालय बजावणार कारणे दाखवा नोटीस

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

संस्थेची मान्यता टिकविण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर तद्दन खोटी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयास सादर करून शासनाच्या डोळ्यात धूळफेक करू पाहणाऱ्या संशयास्पद इंजिनीअरिंग कॉलेजांबाबत ‘मटा’ ने प्रकाशित केलेल्या वृत्ताचे सकारात्मक पडसाद उमटताहेत. तंत्रशिक्षण सहसंचालनालयानेही या वृत्ताची दखल घेतली असून, या प्रक्रियेतील दोषी कॉलेजेसना कारणे दाखवा नोटिसा बजावली जाणार आहे.

‘इंजिनीअरिंग कॉलेजांचा कारभारच संशयास्पद’ या मथळ्याखाली ‘मटा’ ने २० मार्च रोजी वृत्त प्रकाशित केले होते. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नाशिक विभागांतर्गतच जिल्ह्यांमधील तब्बल ४७ इंजिनीअरिंग कॉलेजांनी परिषदेने घालून दिलेली मानके धुडकावून लावत मान्यता पदरात पाडून घेण्यासाठी खोटा अहवाल संचालनालयास सादर केला आहे. या सर्व कॉलेजांना संचालनालयाने पाठीशी घालण्याचे प्रयत्न चालविल्याच्या मुद्द्यावर ‘मटा’ ने प्रकाशझोत टाकला होता. एकदा संस्थांनी दिलेली माहिती खोटी असल्याचे डीटीईने धडधडीत वेबसाईटवरील आदेशात मान्य केल्यानंतरही तंत्रशिक्षण विभागाने कुठल्या नियमान्वये या कॉलेजेसना पुन्हा बाजू मांडण्याची संधी दिली.

‘त्या’ अभ्यासक्रमांची फी कमी करावी

व्यावसायिक शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी संबंधित परिषदा कॉलेजेसना मानके नियंत्रित करण्याची गळ घालतात. या मानकांतर्गत प्राधान्याने जमीन, इमारत, पुरेसा शिक्षकवर्ग यासह पायाभूत सुविधांचा विचार केला जातो. मात्र, नाशिक विभागातील व्यावसायिक अभ्यासक्रम देणाऱ्या कॉलेजेसने यातील काही सुविधांना फाटा दिला असेल, तर दोषी कॉलेजेसची चुकीच्या निकषांवर आकारली जाणारी फी एकूण फी मधून वजा करावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.

मटा भूमिका
मान्यतेसाठी घालून दिलेली मानके धुडकावण्याचे धाडस करणाऱ्या नाशिक विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटिसा देण्याची हिंमत दाखविण्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाने ठरविले असले तरी प्रत्यक्षात या कॉलेजेसना पाठिशी घालण्याचाच प्रयत्न केला गेला असल्याने कारवाईबाबत संदिग्धता कायम आहे. चांगल्या हेतूने डीटीईने काही मानके ठरविली होती. पण त्याला हरताळ फासून या कॉलेजेसनी धूळफेक केली. त्याचा बभ्रा झाल्यानंतर आता कारवाईची भाषा केली जात असली तरी शिक्षण सम्राटांच्या दबावापुढे सरकारने नमता कामा नये. यानिमित्ताने खोटारडेपणा करणाऱ्या संस्थांना धडा शिकविण्याची हीच वेळ आहे, ती शासनाने गमावू नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारकरी मंडळ आक्रमक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दारूबंदीबाबत येत्या एप्रिल महिन्यापासून राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय वारकरी महामंडळाने घेतला आहे. दारूबंदीसाठी जिवाचे रान करणाऱ्या कार्यकर्त्यांना राज्य सरकार संरक्षण देत नसल्याने टाळ-मृदंगांसह रस्त्यावर उतरून राज्य सरकारचा निषेध करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी दुपारी नाशिकमधील हुतात्मा स्मारकात झाली. यावेळी अनेक निर्णय घेण्यात आले.

बैठकीला वारकरी महामंडळाचे महासचिव ह. भ. प. प्रभाकर फुलसुंदर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर, महामंडळाचे जिल्हा सचिव पुंडलिकराव थेटे, संत निवृत्तिनाथ महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, डॉ.पी. के. पाटील, बाळासाहेब वीरकर, महामंडळाचे प्रचारप्रमुख राम खुर्दळ, गणेश सोनवणे, सुरेश भोर आदी उपस्थित होते.

जोग महाराज शिक्षण संस्था शताब्दी वर्षानिमित्त २२ ते २९ मार्च या कालावधीत आळंदी येथे हरिनाम सप्ताह होणार आहे. २४ मार्च रोजी नाशिक जिल्ह्यातील वारकरी बांधवांनी आळंदी येथे जाऊन या सप्ताहात सेवा देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. संत निवृत्तिनाथ देवस्थानने कोणताही निर्णय घेताना वारकरी महामंडळाला विश्वासात घ्यायला हवे, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

राज्यभर दारूबंदी व्हावी यासाठी विविध संघटना त्यांच्या पातळीवर प्रयत्न करतात. परंतु, अजूनही अशा प्रयत्नांना अपेक्षित यश येऊ शकलेले नाही. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अनेक संतांनी व्यसनाधिनतेवर त्यांच्या अभंगांमधून कोरडे ओढले आहे. जनजागृतीचे प्रभावी साधन असलेल्या कीर्तन, भारुड, प्रवचन अशा अनेक माध्यमांचा वापर दारूबंदी चळवळीसाठी केला जातो. परंतु, अजूनही सरकारने दारूबंदीचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळेच वारकरी या महामंडळाच्या माध्यमातून सरकारविरोधात चळवळ उभारणार आहेत. टाळ-मृदुंग हाती घेऊन धरणे व तत्सम आंदोलनांद्वारे सरकारचा निषेध करण्यात येणार आहे.


ठिकठिकाणी होणार आंदोलन

दारूबंदीसाठी राज्यात अनेक कार्यकर्ते काम करतात. त्यांना सरकारचा ना आधार आहे ना संरक्षण. सरकारची ही भूमिका चुकीची असून, त्याचाही निषेध करण्यासाठी अशा राज्यव्यापी आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. एप्रिल महिन्यात नाशिक जिल्ह्यातून या आंदोलनांना सुरुवात केली जाणार आहे. राज्यात ठिकठिकाणी अशी आंदोलने केली जाणार असल्याची माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या १६९ जागांसाठी २७ हजार उमेदवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर आणि ग्रामीण पोलिस दलातील १६९ रिक्त जागांसाठी तब्बल २७ हजार ७२० इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केले आहे. अर्ज सादर करण्यासाठी सोमवारी शेवटचा दिवस होता.

शहर पोलिस आयुक्तालयातील शिपाई व बॅण्ड्समन पदाच्या रिक्त जागांपैकी शासन आदेशानुसार ७५ टक्के म्हणजेच अनुक्रमे ७९ व १८ जागांसाठी ही भरती प्रकिया राबविली जात आहे. तर ग्रामीण पोलिस दलासाठी याच निकषाने ७२ जागांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी २४ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज स्वीकृती सुरू करण्यात आली होती. १६ मार्चनंतर त्यात तीन दिवसांची वाढ करण्यात आली. २० मार्च अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने इच्छूकांची धावपळ सुरू होती. शहर पोलिस दलात भरती होण्यास एकूण १४ हजार २२० उमेदवार इच्छूक आहेत. यात, शिपाईपदासाठी १० हजार ६४२ तर ब्रॅण्डसमन पदासाठी एक हजार ४१० उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. याच जागासाठी एकूण दोन हजार १६८ महिला उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. यात शिपाई पदासाठी दोन हजार ८४ तर बॅण्डसमन पदासाठी ८४ महिला आहेत. रात्री १२ वाजेपर्यंत उमेदवारांचा आकडा आणखी वाढू शकतो. शहर पोलिस दलाची भरती प्रक्रिया पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडणार असून, सोमवारी पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांना रूपरेषा समजावून सांगण्यात आली. दरम्यान, ग्रामीण पोलिस दलाच्या ७२ शिपाई पदासाठी १३ हजार ५०० उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. रात्री १२ वाजेपर्यंत यात आणखी दोन-चारशे अर्जांची भर पडू शकते, असे पोलिस अधिक्षक अंकुश शिंदे यांनी सांगितले. ग्रामीण पोलिस दलाची भरती प्रक्रिया आडगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडणार आहे. २२ मार्च रोजी सकाळी पाच वाजेपासूनच सर्व प्रक्रिया सुरू होईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. यासाठी डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजच्या मैदानाचा काही अंशी वापर होणार आहे. दरम्यान, यासाठी चार सहायक पोलिस अधीक्षक, १६ पोलिस निरीक्षक, ३५० पोलिस कर्मचारी व याव्यतिरिक्त काही बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वाहतूक मार्गात बदल

शहर पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेदरम्यान ८०० आणि एक हजार ६०० मीटर धावण्याची परिक्षा गंगापूररोडवरील शहीद अरूण चित्ते (बापू पूल) ते हॉटेल मिर्ची या रस्त्यावर पार पडणार आहे. त्यामुळे २२ मार्च ते पोलिस भरती प्रक्रिया संपेपर्यंत दररोज सकाळी ६ ते ११ आणि सांयकाळी ४ ते ७ या दरम्यान सदर रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मार्चएण्ड’ला बिलांची प्रतीक्षा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

‘मार्चएण्ड’मुळे पाणीपट्टी व घरपट्टी वसुलीसाठी महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असले, तरी शहरातील अनेक नागरिकांना मात्र वर्षानुवर्षे पाणीपट्टी किंवा घरपट्टीची बिलेच मिळालेली नसल्याचे दिसून येते. मात्र, असे असले, तरी महापालिका प्रशासन मात्र सर्व मिळकतधारकांना वेळेत पाणीपट्टी व घरपट्टीची बिले पोहोच केली जात असल्याचा दावा करीत आहे.

सध्या शहरात पाणीपट्टी व घरपट्टी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. बड्या थकबाकीदारांना लाजविण्यासाठी त्यांच्या दारी गांधीगिरीचा मार्ग म्हणून थेट ढोल पथक उभे केले जात आहे. याशिवाय कायदेशीर नोटीस, प्रॉपर्टी सील करणे यांसारखे टोकाचे उपायही केले जात आहेत. या उपायांची मात्रा काहीअंशी लागू होताना दिसून येत आहे.

मात्र, एकीकडे थकबाकीदारांची संख्या वाढत असली, तरी दुसरीकडे काही मिळकतधारकांना पाणीपट्टी किंवा घरपट्टीच मिळत नसल्याचे दिसून येत आहे. काहींना दोन ते तीन वर्षांचे एकत्र बिल येते. या प्रकारांतून महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. महापालिकेची कारवाई नको म्हणून काही नागरिक बिल मिळाले नसतानाही स्वतःहून महापालिका कार्यालयात जाऊन आपल्या मिळकतीच्या करांचा भरणा करताना आढळून येत आहेत.

नाशिकरोडमध्ये उशिराने बिले

नाशिकरोड प्रभागात पाणीपट्टी व घरपट्टीची बिले नागरिकांना उशिराने मिळाली आहेत. त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहेत. एकत्र बिल मिळत असल्याने मोठी रक्कम भरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे यासंदर्भात पुरेशा उपाययोजना करण्याची मागणी परिसरातून केली जात आहे.


नाशिकरोडला ७१ जणांना नोटिसा

नाशिकरोड प्रभागात पाणीपट्टी व घरपट्टीची थकबाकी असलेल्या ७१ मिळकतधारकांना महापालिका प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत. या थकबाकीधारकांनी आपल्याकडील थकबाकीचा भरणा न केल्यास पुढील आठवड्यात संबंधितांच्या मिळकती सील केल्या जाणार आहेत. नाशिकरोड प्रभागात ३० हजार पाणीपट्टीच्या, तर ७० हजार घरपट्टीच्या मिळकती असून या करांचा भरणा करण्यासाठी नाशिकरोड विभागीय कार्यालय, चेहेडी, दसक, पंचक या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे.

पोटनिवडणूक व त्यानंतर झालेली सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक यामुळे पाणीपट्टी व घरपट्टीची बिले नागरिकांना उशिरा पोहोच झाली आहेत. सुमारे चार महिने या विभागाचे काम थांबलेले होते.

-सोमनाथ वाडेकर, विभागीय अधिकारी, महापालिका

महापालिकेकडून घरपट्टी व पाणीपट्टीचे बिले वर्षानुवर्षे मिळत नाहीत. घरपट्टीची बिले तर मिळतच नाहीत. पाण्याचे बिल मोठ्या कालावधीनंतर एकत्र मिळाल्यास भरणा करताना अडचण होते.

-उत्तम कदम, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारच्या धडकेत बारावीचा विद्यार्थी ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव अल्टो कारच्या धडकेत बारावीतील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आडगाव नाक्यावरील स्वामीनारायण शाळेजवळ सोमवारी (२० मार्च) दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी कारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज सुभाष बाविस्कर (वय १९, रा. चव्हाण मळा, साईप्रेम हॉटेलशेजारी, तपोवन, नाशिक) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. विशाल पालवे (रा. चव्हाण मळा, तपोवन, नाशिक) गंभीर जखमी आहे. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी अल्टो कारचालक राजश्री राहुल महाजन (रा. हिरावाडी, पंचवटी, नाशिक) यांच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामीनारायण मंदिराजवळील हॉटेल साईप्रेम रस्त्यावर मनोज बाविस्कर व त्याचा विशाल पालवे दुचाकीजवळ (एमएच १५/ईएन ८३६२) उभे होते. त्या वेळी भरधाव अल्टो कारने (एमएच १५/ईपी १३७७) या दोघांना जबर धडक दिली. कार वेगात असल्याने धडक बसल्यानंतर मनोज रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या संरक्षक जाळीवर फेकला गेला. संरक्षक जाळी त्याच्या मानेत घुसली, तसेच डोक्यालाही गंभीर मार बसला. तेथे असलेले अशोक कापसे यांनी मनोजला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेत जखमी विशालवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मृत्युमुखी पडलेला मनोज हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या केटीएचएम कॉलेजमध्ये बारावीचे शिक्षण घेत होता. त्याच्या मागे आई-वडील व दोन बहिणी असा परिवार आहे. हवालदार डी. पी. भालेराव तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला दिवसाआड पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शहरात मंगळवार (दि. २१)पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. शहरासाठी तीन योजनांवर कोट्यवधींचा खर्च करूनही पाणीप्रश्न सुटलेला नाही. सालाबादाप्रमाणे यावर्षीदेखील नागरिकांना कृत्रीम पाणीटंचाईस सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

शहर परिसरासह संपूर्ण तालुक्यात यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. गौतमी, बेझे धरणात त्र्यंबक शहरासाठी पाणीसाठा आरक्ष‌ित आहे. गौतमी बेझे योजनेसाठी सिंहस्थ नियोजनात सुमारे तीस कोटी रुपये खर्च झाला आहे. काही महिन्यांपूर्वी ही योजना नगर परिषदेने ताब्यात घेतली आहे. अंबोली धरणातदेखील बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. उन्हाळ्यात या धरणातला गाळ काढण्यात आला होता. त्यामुळे पाणीसाठा वाढला आहे. अहिल्या धरणाची खोली गतवर्षीच्या उन्हाळ्यात वाढविण्यात आली. यावर्षी पाऊस चांगला झाला. असे असतानाही दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील त्र्यंबकवास‌ीयांवर एक दिवसाआड पाणी असे संकट का यावे? असा सवाल उपस्थित होत आहे. आज गौतमी, बेझे धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. तर अंबोली धरणावर सर्रास विजपंप सुरू आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही. मात्र त्र्यंबकच्या नागरिकांना वेठीस धरण्यात आले आहे.

त्र्यंबकेश्वर येथे तीन पाणीपुरवठा योजना आहेत. या योजना सुरू करण्याआधी शहरातील नागरिकांसह दररोज येणाऱ्या हजारो भाविकांचादेखील विचार करण्यात आला आहे. येथील आखाडे, आश्रम, देवालय व त्यामध्ये होत असलेले उत्सव आदी सर्वांनाच या कृत्रीम पाणीटंचाईचा फटका बसणार आहे.

दहा वर्षांपासून पाणीटंचाई

शहरास ७० व ८० च्या दशकात दोन वेळेस मूबलक पाणी मिळत होते. त्र्यंबक शहराचा विस्तार वाढला व भाविकांची संख्या वाढली तशी येथे पाणीटंचाईच्या झळा जाणवायला लागल्या. शहरातील मोठा पाझर तलाव असलेले अहिल्या धरण अपूर्ण पडायला लगले म्हणून सन १९९० मध्ये अंबोली धरण पाणीपुरवठा योजना आणली. त्यानंतर दिवसातून एकदा का होईना पाणीपुरवठा सुरळीत होता. मात्र सन २००७ पासून आजपर्यंत दरवर्षी उन्हाळ्यातील तीन महिने एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. सन २००७च्या उन्ह्याळ्यात भार नियमन वाढल्याने धरणांतून पंप‌िंगची अडचण सांगत एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर २००८ मध्ये अंदाजे २५ लाखांच्या आसपास खर्च करून त्र्यंबक ते अंबोलीपर्यंत एक्स्प्रेस विद्युतलाइन टाकण्यात आली. तरीदेखील पुढच्या वर्षी उन्हाळ्यात पुन्हा एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला. आहिल्या धरणावर ८४ लाख रुपये खर्च करून जलशुद्धिकरण व जलकुंभ बांधण्यात आले. सिंहस्थ २०१५च्या निमित्ताने गौतमी-बेझे योजना आली. त्या सोबत शहरातील जुनाट झालेली वितरण व्यवस्था नव्याने सुरू करण्यात झाली.

पाणीपट्टी कमी करण्याची मागणी

सन २०००च्या दरम्यान पाणीपट्टी अवघी ९० रुपये होती. ती आता १२०० रुपये झाली आहे. दरवर्षी यात वाढ करण्यात येत आहे. त्र्यंबक ग्राहक पंचायतीने पाणीपुरवठा एक दिवसाआड केल्याने पाणीपट्टीही कमी करावी, अशी मागणी केली जात आहे.

अपुरे मनुष्यबळ

त्र्यंबक नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. पाणीपुरवठा अभियंता अथवा सक्षम अधिकारी नाही. तीन योजना असतांना पावसाळ्यातही पाणी पुरवठा होत नाही. शहराच्या सर्व भागात समान दाबाने आणि सारखा पाणीपुरवठा होत नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पाणीसाठा आढावा घेण्यात आला. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशाने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाऊस लांबल्यास पुढे अडचण निर्माण होऊ नये म्हणून आज पाण्याची बचत करणे आवश्यक आहे.—डॉ. चेतना केरूरे, मुख्याधिकारी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या वाईनची थायलंडमध्ये चढणार नशा

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। नाशिक

देशाची वाईन राजधानी नाशिक आता पाच दिवसीय 'थायफेक्स' या आशियातील सर्वात मोठ्या 'फूड अँड बेवरेजेस एक्स्पो'मध्ये झळकण्यासाठी सज्ज आहे. बँकॉकमध्ये हा एक्स्पो ३१ मे ते ४ जून २०१७ या कालावधीत होणार आहे. विशेष म्हणजे नाशिकच्या उत्तम वाईनवर पहिल्यांदाच लघुपट तयार करण्यात आला असून त्याचे चित्रीकरण सोमा वाईन विलेजमध्ये पार पडले. या लघुपटाचा कालावधी २५ मिनिटांचा आहे.

या लघुपटात नाशिकच्या वाईनचा द्राक्षबागा ते उत्पादन निर्मितीच्या अंतिम टप्प्यापर्यंतचा रंजक प्रवास चित्रित करण्यात आला आहे.

भौगोलिक निर्देशनानुसार एकूण १० उत्पादने डिस्प्लेसाठी निवडण्यात आली होती. त्यापैकी तीन उत्पादनांची निवड लघुपटासाठी करण्यात आली, ज्यामध्ये नाशिकच्या वाईनचाही समावेश होता. वाईनव्यतिरिक्त अन्य दोन भारतीय उत्पादनांची निवड झाली, त्यात केरळचा नावारा तांदूळ आणि रत्नागिर, तसेच सिंधुदुर्गातील कोकमाचा समावेश आहे.

या एक्स्पोचे आयोजन थायलंडचे डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड प्रमोशन (डीआयटीपी), थाय चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि व्यापारी प्रदर्शने भरवणारी कोयलनमेसी पीटीई लिमिटेड, सिंगापूर यांनी संयुक्तपणे केले आहे.

सोमा वाईन व्हिलेजचे सीएमडी प्रदीप पाच पाटील या बाबत बोलताना म्हणाले, ‘नाशिकमधल्या वाईन यार्डमध्ये (द्राक्षबागा) वाईन कशी तयार केली जाते, याविषयीचा २५ मिनिटांचा लघुपट जगातल्या सर्वांत मोठ्या व्यापारी प्रदर्शनात दाखवला जाणार आहे, ही नाशिककरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. बँकॉक येथे होणाऱ्या जगातल्या सर्वांत मोठ्या अन्न व पेय व्यापार प्रदर्शनात ‘जीआय टॅग’सह नाशिकच्या वाईनची माहिती दाखवण्यात येणार आहे.’

या लघुपटाचे स्पेन येथील दिग्दर्शक बॅटिस्ट मायगॉल यांनी सांगितले की, ‘संघटित सरकार आणि असोसिएशन ऑफ युरोप यांच्या मदतीने आम्ही एक माहितीपट बनवत आहोत. बॅंकॉकमधल्या व्यापारी प्रदर्शनात हा माहितीपट दाखवण्यात येणार आहे. नाशिकची वाईन सर्वोत्कृष्ट का आहे, ती कशी बनवली जाते आणि तिला “जीआय टॅग” कशाबद्दल देण्यात आला आहे, यावर या माहितीपटाचा भर असणार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विवाहितेच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलमध्ये तणाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उपचार सुरू असताना २५ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्यानंतर वडाळा नाका येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत नातेवाइकांची समजूत घातली. हॉस्पिटलच्या दुर्लक्षामुळे पेशंटचा मृत्यू झाला. मोबादल्यात नातेवाईकांकडून भरपाईची मागणी करण्यात आली.

हेमलता निरंजन क्षीरसागर (महालक्ष्मी मंदिराजवळ, जेलरोड) असे उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या विवाहितेच नाव आहे. नाशिकरोड येथील सह्याद्री हॉस्पिटलमधून सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तिला वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. यानंतर दीडशे-दोनशे नातेवाईक गोळा झाले. उपचारादरम्यान हलगर्जीपणा झाल्यानेच हेमलताचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला. नुकसान भरपाई मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही घटना समजताच सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, मुंबई नाका तसेच नाशिकरोड पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी नातेवाईकांची समजूत काढली. दरम्यान, हॉस्पिटलने सर्व आरोप फेटाळून लावत पेशंटची तब्बेत गंभीर होती, असा दावा केला. हेमलताचा २०१५ मध्येच विवाह झाला होता. तसेच या दाम्पत्याला एका वर्षाचा मुलगा असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल कंपन्यांना दिलासा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मालमत्ता कराची वसुलीसाठी महापालिकेने मोबाइल कंपन्याविरोधात सुरू केलेल्या कारवाईला हायकोर्टाच्या आदेशाने पुन्हा सुरूंग लागला आहे. मोबाइल टॉवरचे वीज कनेक्शन तोडू नये, असे आदेश हायकोर्टाने दिले असल्याने आता महापालिकेच्या कारवाईला खीळ बसली आहे.

जीटीएल व एटीसी कंपन्यांना कारवाई थांबवण्यासाठी काही रक्कम महापालिकेकडे जमा करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे मोबाइल टॉवर्सचा वीज पुरवठा पूर्ववत होणार आहे. तर दुसरीकडे आता हायकोर्टाने टॉवर सील ऐवजी जप्त करा, असे आदेश दिल्याने महापालिका गोंधळात सापडली आहे.

सहा कोटीच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने मोबाइल टॉवर सील करण्यास सुरुवात केली होती. त्यात पहिल्या टप्प्यात २७ टॉवर्स सील करत त्यांचे वीज जोडणी तोडले होते. परंतु, त्यामुळे नाशिकमध्ये नेटवर्क कनेक्शन विस्कळीत झाले. या कारवाईच्या विरोधात जीटीएल आणि एटीसी या कंपन्यानी हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने मोबाइल कंपन्याची बाजू ऐकून घेत, महापालिकेला संबंधित मोबाइल टॉवर्सचे वीज कनेक्शन तोडू नये, असे आदेश बजावले आहेत. संबंधित कंपन्याकडून वसुलीसाठी टॉवर सील करण्याऐवजी जप्तीची कारवाई करावी, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे महापालिका पेचात सापडली आहे. या मोबाइल टॉवर्सचे वीज कनेक्शन पूर्ववत करावे लागणार आहे. सील आणि जप्तीच्या कारवाईत काहीच फरक नसल्याने वसुलीसाठी काय करावे अशा पेचात महापालिका पडली आहे. हायकोर्टाने एकीकडे या कंपन्यांना दिलासा दिला असला तरी दुसरीकडे थकबाकीच्या रकमेपैकी काही रक्कम मात्र महापालिकेकडे तात्काळ जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेलाही काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, मोबाइल कंपन्यांनाही दिलासा मिळाला आहे.

जागामालक कारवाईच्या टप्प्यात

महापालिकेने आता कंपन्यांना दिलासा दिल्यानंतर मोबाइल टॉवर्ससाठी जागा देणाऱ्या जागा मालकांनाच कारवाईच्या रडारवर घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या मोबाइल टॉवर्स कंपन्यांनी मालमत्ता कर भरला नाही त्यांच्या जागामालकांना नोटीस बजावली जाणार आहे. प्रसंगी फौजदारी कारवाई करण्याच्या विचारात महापालिका असून त्यामुळे या कंपन्यांवर दबाव येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावानासाठी चिन्हवाटप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालयाच्या पंचवार्षिक निवडणुकीतील उमेदवारांना मंगळवारी चिन्हवाटप करण्यात आले. उमेदवारांकडून अर्ज मागवून त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना चिन्हे देण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माधव भणगे यांनी दिली.

सावाना निवडणुकीसाठी ग्रंथमित्र, जनस्थान आणि परिवर्तन हे तीन पॅनल करण्यात आले आहेत. यातील ग्रंथमित्र पॅनलला ‘फळा’, जनस्थानला ‘कॅमेरा’ तर परिवर्तन पॅनलला ‘पाटी’ हे चिन्ह देण्यात आले आहे. वैयक्तिक निवडणूक लढविणाऱ्यांपैकी रमेश जुन्नरे यांना ‘कपबशी’ हे चिन्ह देण्यात आले आहे. कांतीलाल कोठारी यांना ‘ब्र‌िफकेस’, पद्माकर इंगळे यांना ‘चहाची किटली’, शरद दाते यांना ‘कपाट’ तर संजय येवलेकर यांना ‘गॅस सिलिंडर’ असे चिन्हवाटप करण्यात आले आहे.
मिलिंद जहागिरदार यांनी धर्मदाय आयुक्तांकडे याचिका दाखल केली असून, त्याचा निकाल मंगळवारी लागणे अपेक्षित होते. मात्र, धर्मादाय आयुक्तांनी निवडणूक निर्णय अधिकारी माधव भणगे व सावानाचे अध्यक्ष प्रा. औरंगाबादकर यांना मंगळवारी सुनावणीसाठी हजर राहण्याची सूचना केली होती. पैकी भणगे यांनी निवडणुकीचे चिन्हवाटप असल्याचा अर्ज आयुक्तांकडे केला होता व सावानाकडून अधिकारी व्यक्तीचा जबाब नोंदवून घेण्यासाठी बुधवारची मुदत धर्मादाय आयुक्तांकडून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यातील ३६ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानाच्या गतीचे लोण राज्यभर पसरत असताना येवला तालुका देखील त्यास अपवाद नाही. कलापथकांद्वारे गावोगावी प्रबोधन करणे, गुड मॉर्निंग पथकांद्वारे उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना गुलाबपुष्प देणे, टमरेल जप्ती यासह चित्ररथाद्वारे गावोगाव समाजप्रबोधनामुळे तालुक्यातील तब्बल ३६ गावे हागणदारी मुक्त झाली आहेत.

या गावात पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणेने गेल्या वर्षभरात टाकलेल्या दमदार पावलांची फलनिष्पत्ती म्हणूनच तालुक्यातील इतकी गावे हागणदारी मुक्त झाली आहेत. स्वच्छ भारत अभियानाचे हेच लोन पुढील पंधरवड्यात अधिक प्रभावीपणे पुढे येताना येत्या मार्च अखेर तालुक्यातील जवळपास ५० टक्के गावे संपूर्णतः निर्मलग्रामच्या कक्षेत स्थापित होणार आहेत. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीच्या ग्रामपंचायत विभाग, एकात्मिक बालविकास, शिक्षण व आरोग्य आदी विभागांनी संयुक्तपणे याबाबतीत टाकलेले दमदार पाऊल हेच या आजवरच्या यशाचे गमक म्हणावे लागेल.

स्वच्छतेचा संकल्प

येवला पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरावरून कलापथकाच्या माध्यमातून गावोगावी टप्प्याटप्प्याने करण्यात आलेली प्रभावी जनजागृती, गुडमॉर्निंग पथकांच्या माध्यमातून लोटापरेड करत उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना बसलेला चाप यासह ग्रामीण भागातील जनतेला कळालेले स्वच्छतेचे महत्त्व यामुळेच निर्मलग्रामच्या दृष्टीने येवला तालुक्याने मोठा पल्ला पार केला आहे. सन २०१२ च्या निर्मल भारत पायाभुत सर्वेक्षणानुसार येवला तालुक्यातील एकूण ८८ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ३७ हजार ३५० कुटुंबे आहेत. त्यातील एकूण १७ हजार ९४८ कुटुंब सध्या शौचालयाचा वापर करत आहेत. तालुक्यातील ३६ ग्रामपंचायती या हागणदारीमुक्त होताना उर्वरित ५२ ग्रामपंचायातींमधील १९ हजार ४०२ कुटुंबांकडे अद्यापही शौचालय नसल्याचे चित्र आहे. येत्या मार्च अखेर तालुक्यातील जवळपास ५० टक्के ग्रामपंचायती या संपूर्ण हागणदारीमुक्त होणार असल्याची माहिती पंचायत समितीच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपट महोत्सवाची उद्यापासून मेजवानी

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मेट्रो फाउंडेशन ऑफ इंडिया व कलावैभव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार (दि. २३)पासून नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे यंदाचे नववे वर्ष आहे. दि. २६ मार्चपर्यंत हा फेस्टिव्हल रंगणार असून, त्याचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते होणार आहे. खासदार हेमंत गोडसे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, ‘मविप्र’च्या सरचिटणीस नीलिमा पवार, प्रसिद्ध अभिनेते रणजित, हरीश, उदय टिकेकर, कपिल शर्मा, सिमरन आहुजा, ऋषी भुतानी, किशोरी शहाणे, दिलीप शुक्ला, बलराज विज यांची उपस्थिती राहील.

या फेस्टिव्हलदरम्यान यंदाचा ‘नीफ’ जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक लेख टंडन व अभिनेत्री निम्मी यांना देण्यात येणार आहे. यंदाच्या महोत्सवात ‘नीफ’ विशेष चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. फेस्टिव्हलची सुरुवात सचिन तेंडुलकर याने काम केलेल्या लहान मुलांविषयीच्या चित्रपटाने होणार असून, त्यानंतर कंगणा राणावत अभिनीत स्वच्छ भारत ही फिल्म दाखविण्यात येणार आहे.

खाद्यप्रेमींसाठीही पर्वणी

महोत्सवांतर्गत यंदाही स्थानिक खाद्यप्रेमींसाठी शुक्रवारी (दि. २४) दुपारी १२.३० वाजता देशाविदेशांतील पारंपरिक खाद्यांविषयीची स्पेशल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेलिब्रिटी मास्टर शेफ विष्णू मनोहर यांची उपस्थिती राहील. स्पर्धेनंतर २.३० वाजता विष्णू मनोहर यांची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. नीफ महोत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी महात्मा पायलट बाबा शुक्रवारी ५.३० वाजता उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धा अन् मार्गदर्शन

स्थानिक कलाकारांना चित्रपट क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी दर वर्षी होत असलेल्या नीफ मिस इंडिया स्पर्धेअंतर्गत नीफ मिस नाशिक, मिस्टर नाशिक व मिसेस नाशिक २०१७ या स्पर्धा २४ व २५ तारखांना होणार आहेत. विवाहित स्त्रियांसाठी प्रथमच अशी स्पर्धा होत आहे. स्पर्धकांना चित्रपट व टेलिव्हिजन क्षेत्रातले मार्गदर्शन करण्यात येईल. ही स्पर्धा नीफ फिल्मी कट्टा येथे होणार आहे. नीफ २०१७ मध्ये विशेष नीफ स्टुडिओ उघडण्यात आला असून, नवीन कलाकारांना मार्गदर्शन, मोफत फोटोग्राफी, पोर्टफोलिओ शूट, ऑडिशन लिंक बनवून देण्यात येणार आहे. महोत्सवात ब्ल्यू माउंटन्स, ओंजळभर पाणी, प्रेमाचे नाते, पाझर, लॅण्ड १८५७, पहिले पाऊल वनाचे,
फिरंगी, मितवा जनम जनम के, ब्रिना, रायरंग, जवानी जिंदाबाद या चित्रपटांचे प्रोमोज व ट्रेलर रीलिज करण्यात येणार आहेत. कपिल शर्मा व मुकेश कणेरी यांच्या वेब सीरिजचे उद्घाटनही यावेळी होईल.


सहाशेवर प्रवेशिकांतून निवड

सहाशेहून अधिक चित्रपट प्रवेशिका दाखल झाल्या असून, त्यात ७० आंतरराष्ट्रीय, ५० प्रादेशिक व २०० डॉक्युमेंट्रीज, तसेच इतर शॉर्ट फिल्म्सचा समावेश आहे. या प्रवेशिकांमधून १०० चित्रपट स्क्रीनिंगसाठी निवडण्यात आले आहेत. त्यात २४ तारखेला दुपारी ११.४५ वाजता बियाबान-क्रिष्णकांत पांडे, २५ तारखेला दुपारी १२.१५ वाजता दास्ता-ए-रफी- रजनी आचार्य, २५ तारखेलाच सायंकाळी ७ वाजता कासव- सुमित सुखटणकर हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटांनंतर डॉ. मोहन आगाशे यांच्याशी विशेष चर्चा आयोजित करण्यात आली आहे. या चित्रपटांदरम्यान मनटुस्तान- रहात काजमी हा चित्रपटही दाखविण्यात येणार आहे. नाशिक फोकसअंतर्गत पंधरा चित्रपटही यावेळी दाखविण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images