Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

९ महिन्यांत २४ लाख टन कांदा निर्यात

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

दरातील चढ-उताराचे फटके सोसणाऱ्या कांद्याने गेल्या ९ महिन्यांत २४ लाख टन निर्यातीचा टप्पा पार केला. कांदा निर्यातीने २००९-१० झालेल्या १८.७३ लाख टन निर्यातीचे रेकॉर्ड या २०१६-१७ च्या निर्यातीने मोडले आहे. नाफेडने केलेल्या कांदा निर्यातीचा हा उच्चांक असल्याचे संचालक नानासाहेब पाटील यांनी सांगितले.

कांद्यावरील किमान निर्यात मूल्यदर हे शून्य केल्याने निर्यातीत वाढ झाली आहे. देशातून झालेली २४ लाख टन कांदा निर्यात ही एप्रिल ते डिसेंबर २०१६या महिन्यातील आहे. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत कांदा निर्यातील टप्पा ३० लाख टनचा आकडा पार करण्याची दाट

शक्यता आहे.

कांदा निर्यातीत भरगोस वाढ झालेली असलेली तरी तो पिकवणाऱ्या शेतकऱ्याची झोळी मात्र रिकामीच राहत आहे. यंदा कांद्याचे बंपर उत्पादन होत असल्याने बाजार समितीमध्ये कांद्याची प्रचंड आवक होत आहे. त्यामुळे कांद्याला अवघा चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादकांचा लागवडीचा खर्चही निघत नसल्याने त्यांच्यावरची आर्थिक चिंता कायम आहे.

यंदा निसर्गाने शेतीला चांगली साथ दिल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली. गेल्या वर्षी उन्हाळ कांद्याला उच्चांकी असा चार आकडी म्हणजे ५७०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला होता. मात्र यंदा कांद्याला प्रती क्विंटल ४५० ते ५०० रुपये सरासरी भाव मिळत आहे. घरात मुला मुलींचे लग्न, शिक्षण कसे करावे असे प्रश्न कांदा उत्पादनावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी कुटुंबासमोर आहे. डोक्यावर तर कर्जाचा डोंगर कसा दूर सारायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावर आहे.

या देशात होते कांदा निर्यात

बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, नेपाळ, सिंगापूर, इंडोनेशिया, कतार, कुवेत, मोरिशस, सौदी अरेबिया, बेहरीन, ओमान, व्हियेतनाम, सोशल रिपब्लिक, मालदीव, युनायटेड किंगडम, रियुनियन, थायलंड, ब्रुनेई, रशिया, ग्रीस, हाँककाँग, पाकिस्तान, इटली, नेदरलँड्स, सेशल्स, कोमोरेझ, फ्रान्स, केनिया, कॅनडा, स्पेन, युनायटेड स्टेटस आदी देशांसह एकूण ७६ देशांमध्ये कांदा निर्यात केला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉक्टरने ऑपरेशन अर्धवट सोडले!

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

राज्यात सर्वत्र डॉक्‍टरांनी पुकारलेल्या बंदचा फटका आज खुटवडनगरमधील सुखकर्ता हॉस्पिटलमधील एका रुग्णाला बसला आहे. ऑपरेशन सुरू असतानाच काही वैद्यकीय संघटनांनी हे ऑपरेशन बंद पडल्याचे समजले आहे. संबंधित रुग्णाला काही त्रास झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न रुग्णाची आई मंगला परदेशी यांनी व्यक्‍त केला आहे.

कामटवाडे परिसरातील परदेशी हे घंटागाडीवर कामास असून, त्यांचा एकुलता एक मुलगा अजय हा बिगारी काम करतो. बुधवारी काम करीत असताना त्याच्या हाताला मोठ्या प्रमाणावर इजा झाली होती. त्यानंतर त्यास खुटवडनगर येथील सुखकर्ता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हाताची बोटे निकामी होण्याची शक्‍यता असल्याने डॉ. संदेश चव्हाण यांनी गुरुवारी दुपारी या मुलावर शस्त्रक्रिया करण्याची तयारी केली होती. शस्त्रक्रिया सुरू होताच याठिकाणी काही वैद्यकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन ही शस्त्रक्रिया बंद पाडली. अर्धवट शस्त्रक्रिया करून अजय याच्या हाताला केवळ पट्टी बांधून डॉक्‍टर याठिकाणाहून रवाना झाले. त्यामुळे संबंधित रुग्णाला खूपच त्रास सहन करावा लागला. या प्रकारानंतर अर्धवट शस्त्रक्रियेमुळे या रुग्णाला काही गंभीर समस्या निर्माण झाल्यास कोण जबाबदार असा प्रश्न विचारात रुग्णाच्या नातेवाईकांनी गर्दी केली. या प्रकाराची माहिती मिळताच नगरसेवक मुकेश शहाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत डॉक्‍टर निघून गेल्याचे समजले.

या प्रकरणाबाबत संबंधित डॉक्‍टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. याबाबतचे वृत्त समजताच अनेकांनी या हॉस्पिटलकडे धाव घेतली होती. मात्र, कोणाशीही त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही.

डॉक्‍टरांना देव मानले जात असते. त्यांच्यावर अन्याय होत असला तरी अर्धवट पद्धतीने शस्त्रक्रिया सोडायला लावणे चुकीचे आहे. झालेला प्रकार हा अत्यंत चुकीचा असून त्यामुळे माझ्या मुलाला काही त्रास झाला व त्याची बोटे निकामी झाली तर त्यास जबाबदार कोण? एकुलत्या एक व कमावत्या मुलाच्या हाताचे काही झाल्यास डॉक्‍टरांनी त्याची जबाबदारी घ्यावी.
- चंद्रकला परदेशी, रुग्णाची आई


डॉक्‍टरांवरील हल्ले हे निषेधार्हच आहेत. मात्र, रुग्णाला अशा अर्धवट शस्त्रक्रियेच्या अवस्थेत सोडून जाणे चुकीचे आहे. त्यामुळे झालेला प्रकार निंदनीय असून डॉक्‍टरांकडे विश्वासाने येणाऱ्या रुग्णांनी काय करावे?
- मुकेश शहाणे, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांचे निलंबन मागे घ्या

0
0

धुळे : शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी आवाज उठवल्यामुळे भाजप सरकारने १९ आमदारांचे निलंबन केले. यात धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या आमदार कुणाल पाटील यांना निलंबित केल्याचा निषेध म्हणून गुरुवारी (दि. २३) धुळे शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शन करण्यात आले. यावेळी आमदारांचे निलंबन मागे घेण्यात यावे, याविषयी त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले. याप्रसंगी शहराध्यक्ष युवराज करणकाळ, साबीरशेठ, मुजफ्फर हुसेन, इस्माईल पठाण, अफसर पठाण, वेणूबाई शिरसाठ, भिवसन अहिरे, सदाशिव पाटील, संजय बैसाणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्याचा गुन्हा उघड

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

दिंडोरी येथून विदेशी मद्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला अडवून लुटणाऱ्या पाच संशयित आरोपींना पकडण्यात वाडीवऱ्हे पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून सुमारे ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर वाडीवऱ्हे रायगडनगर शिवारात सिडकोतील पवननगर येथील नीलेश देसले त्यांच्‍या आयशर ट्रकमध्ये (एमएच-४१-जी ७०२९) दिंडोरी येथील मद्य कंपनीचा माल घेऊन मुंबईला जात होते. यावेळी रायगडनगर परिसरात एका काळ्या रंगाचे कारमधून आलेल्या पाच जणांनी ट्रक अडवून देसले यांना मारहाण करून त्यांच्या ताब्यातील मोबाइल जप्त केला होता. त्यानंतर देसले यांना सिन्नर-घोटी मार्गावरील जंगलात सोडून दिले होते. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीसांना नियामत खान अजमत खान, (२८, रा. पखालरोड), अझरुद्दीन महम्मद शेख, (२६, नानावली), आनंद प्रभाकर कोकाटे, (३१, आनंदवल्ली), राहुल संतोषलाल चावला, (२८, आनंदनगर नाशिकरोड) व दिलीप रामचंद्र लालचंदानी, (५१ उपनगर) यांना ताब्यात घेतले. पोलिसांना त्यांच्याकडून आयशर ट्रकसह गुन्ह्यात वापरलेली कार (एम- एच-०४ इएच ५७६९), विदेशी मद्याचा सुमारे ३४ लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला. यातील संशयित आरोपी अझरुद्दीन शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी चाकण व वणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशोर नवले यांच्या पथकाने राबविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासासाठी बीओटीचा टेकू

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘शहराचे पालकत्व घेतो, साथ द्या’ असे सांगून महापालिकेत भाजपला निर्विवाद सत्ता मिळवून देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा शब्द खरा ठरवण्यासाठी महापौर व उपमहापौरांनी बैठकींचा सिलसीला सुरू केला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती खराब असल्याने शहरातील उर्वरित प्रकल्प खासगीकरणातून पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शहरातील उर्वरित रिंगरोड, रस्त्यांची कामे तसेच पालिकेच्या सुविधा खासगीकरणातून करण्याची चाचपणी सुरू झाली असून, त्यांसदर्भात येत्या पंधरा दिवसात प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले आहेत.

महापौर भानसी यांनी पदभार घेतल्यानंतर गुरुवारी बांधकाम विभागाची बैठक घेतली. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, गटनेता संभाजी मोरुस्कर, शहर अभियंता यू. बी. पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. शहरात कोणती कामे तातडीने करणे आवश्यक आहेत, त्याची माहिती सादर करण्याचे आदेश त्यांनी महापौरांनी दिले. शहरात नव्याने काही रस्ते करण्यासह अपूर्ण रिंगरोडचे काम पूर्ण करता येईल असा सल्ला यू. बी. पवार यांनी दिला. रिंगरोड, रस्ते डांबरीकरण, खडीकरणाचे कामांसदर्भात प्रकल्प अहवाल १५ दिवसात सादर करण्याच्या सूचना महापौरांनी केल्या. सोबतच ही कामे खासगीकरणातून करता येतील काय याची तपासणी करा, तसेच नागरिकांना आवश्यक सुविधांची पूर्तता खासगीकरणातून करता येईल काय याचाही तपशील तयार करण्याच्या
सूचना केल्या. चांगल्या प्रकल्पांबाबत विकासात्मक अहवाल तयार करून त्यासाठी लागणारा निधी मुख्यमंत्र्यांकडून मिळवू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

सूचनांचा पाऊस

महापौर, उपमहापौरांनी घेतलेल्या बैठकीत अनेक सूचना आणि विविध विकासकामांबाबत आदेश देण्यात आले. त्यात महापालिकेची आर्थिक स्थिती खराब असल्याने उत्पन्नाचे अधिकाधिक साधने वाढविण्यासाठी प्रयत्न करा, रस्त्यावरील ड्रेबेजची पाहणी करून त्यांची तत्काळ विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र उपअभियंता नियुक्त करण्याच्या करा, रस्त्याच्या साईटपट्ट्याही तातडीने भरा, रिंगरोडचा अहवाल सादर करा, रस्त्याच्यामध्ये असलेले ढापे हे रस्त्याच्या लेवलला करा, स्पिड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारा, रस्त्यात असलेली धोकादायक झाडांबाबत निर्णय घ्या, क्रीडांगण, जॉगिंग ट्रॅक आणि उद्यानांचा विकास सीएसआर उपक्रमातून करा, गोल्फ क्लबचा ट्रॅक कडक झाला असून त्याची तातडीने दुरुस्ती करा आदी सूचनांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी हटाव’वर शेतकरी ठाम

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

नागपूर-मुबंई समृद्धी महामार्गासाठी प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. या महामार्गासाठी सिन्नरसह इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला कडाडून विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्ग हटाव मोहिमेवर शेतकरी ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शुक्रवारी इगतपुरी तहसीलवर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपस्थित प्रांतअधिकारी व तहसीलदारांना निवेदन देऊन शेतकऱ्यांची भूमिका नमूद केली.

इगतपुरी हा प्रकल्पग्रस्त तालुका असून, या तालुक्याने यापूर्वी अनेक राष्ट्रीय व राज्य प्रकल्पांना जम‌िनी देऊन शेतकरी कंगाल झाला आहे. शिल्लक राहिलेल्या जम‌िनी समृद्धी महामार्गासाठी गेल्यास शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी या समृद्धी महामार्गास विरोध केला असून, यापूर्वीही अनेकवेळा गावोगावी बैठका घेऊन हरकती नोंदवल्या आहेत.

शेतकरी कृती समिती व सर्वपक्षीय पदाधिकारी भास्कर गुंजाळ, राजू देसले, वकील संघाचे तालुकाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, शिवसेनेचे निवृत्ती जाधव, जि. प. सदस्य कावजी ठाकरे, सभापती भगवान आडोळे, काँग्रेसचे मधुकर कोकणे, भाजपचे नंदू गाढवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गोरख बोडखे, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, अॅड. दामोधर पागेरे, पं. स. सदस्य सोमनाथ जोशी, विठ्ठल लंगडे, लक्ष्मण गव्हाने आदींच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार अनिल पुरे यांच्याशी चर्चा करुन निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारा बलुतेदारांसाठी ८९ प्लॉटची यादी जाहीर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण भागातील उद्योगांना चालना देण्यासाठी सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथे ग्रामोद्योग वसाहत स्थापन करून या वसाहतीत ९५ प्लॉट्स पाडण्यात आले आहेत. गेल्या वर्षी या प्लॉटवर मुलाखती घेतल्यानंतर स्थगिती आल्यामुळे या प्लॉटचे वितरण वर्षभरापासून रखडले होते. मात्र, आता यापैकी ८९ प्लॉटचे वाटप करण्यासाठी बारा बलुतेदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पैसे भरल्यानंतर हे प्लॉट ग्रामीण उद्योजकांना देण्यात येणार आहेत. या प्लॉटसाठी ३२५ अर्ज आले होते. त्यातील ८९ प्लॉटची यादी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने छाननी करून जाहीर केली आहे. हे प्लॉट ग्रामीण उद्योजकांना देण्यात येणार असून, यामुळे ग्रामीण भागात आपला व्यवसाय करणाऱ्या बारा बलुतेदारांना या ग्रामोद्योग वसाहतीमुळे चालना मिळणार आहे.

सिन्रर येथील ४३,३७४ चौरस मीटरवर तयार झालेल्या या ग्रामोद्योग वसाहतीमध्ये रस्ते, वीज व पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कुंभार, लोहार, सुतार, चांभार, सोनार, कोळी, न्हावी, परीट, शिंपी, वैद्य, तांबोळी यांसारखे व्यवसाय करणारे बलुतेदार काळाच्या ओघात मागे पडले आहेत. काहींनी तर बलुतेदारी सोडून दुसरा व्यवसायही पत्करला आहे. मात्र, या बारा बलुतेदारांना आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाने पुढाकार घेतला असून, त्यांना हे प्लॉट देण्यात आले आहेत.

प्लॉट देताना आरक्षण असल्यामुळे विविध जाती, माजी सैनिक, अपंग व अल्पसंख्याक असे राखीव होते. त्यामुळे काही ठिकाणी अर्ज न आल्यामुळे ७ प्लॉट अजूनही शिल्लक आहेत. या प्लॉटमध्येच समूह उद्योगांसाठी १६१५ चौरस मीटरचा राखीव प्लॉट रेडिमेड गारमेंट क्लस्टरसाठी देण्यात आला आहे, तर नियोजित क्लस्टरचा ५८९ चौरस मीटरचा प्लॉट अद्याप शिल्लक आहे. वसाहतीतील विजेची उपलब्धता, रस्ते, पाणी, पथदिवे आदींची सुविधा आहे. वसाहतीत विविध कामांसाठी येणाऱ्या, तसेच वसाहतीतील उद्योजकांना या सेंटरचा सर्वाधिक फायदा मिळणार आहे. औद्योगिक, तसेच ग्रामोद्योग वसाहतीमुळे माळेगाव परिसराबरोबरच विविध प्रकारच्या उद्योगांना अधिक चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा बाळगली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक पुस्तक द्या... एक घेऊन जा!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निवडणुका लागल्या म्हणजे प्रचाराचे अनोखे फंडे सुरू होतात. त्यात कोण काय करेल हे सांगता येत नाही. सार्वजनिक वाचनालय हे पुस्तकांशी संबंधित असल्याने पुस्तकांनाच धरून काही उपक्रम केला तर अशी अभिनव कल्पना ‘जनस्थान’ पॅनलच्या मनी आली आणि त्यातूनच पुस्तक परिक्रमा हा अनोखा उपक्रम त्यांनी सुरू केला. परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे शुक्रवारी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्रा. रविंद्र कदम आणि अतुल पगार यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.

पुस्तक परिक्रमा या उपक्रमात पुस्तकांची अनोखी मांडणी करून ठेवलेले एक वाहन असून, त्यावरील पुस्तकांमधून एक आवडते पुस्तक वाचकाने घेऊन जायचे आहे. मात्र त्याबदल्यात तेथे त्याच्याकडचे एक पुस्तक त्याने ठेवायचे आहे. अशा प्रकारे हा उपक्रम असून, संपूर्ण नाशिकभर हा उपक्रम करण्यात येणार आहे. गल्लीबोळांमध्ये हे वाहन फिरणार असून आपल्याकडची वाचलेली पुस्तके या वाहनात ठेवायची व त्यातून एक पुस्तक घ्यायचे या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. वाचक अतिशय आवडीने या वाहनामधून पुस्तके नेत असून त्याबदल्यात तेथे एक पुस्तक ठेवत आहे. या वाहनामध्ये २०० ते ३०० पुस्तके असून, यात काही नव्या पुस्तकांचा समावेशदेखील आहे. ही नवी पुस्तके वाचनालयाच्या सभासदांसाठी ठेवण्यात आली असून त्यांना कार्ड दाखवून ती पुस्तके नेता येणार आहे.

या उपक्रमाची संकल्पना विनायक रानडे यांची असून, त्यांनी ग्रंथ तुमच्या दारी हा उपक्रम यशस्वीपणाने राबविलेला आहे. नाशिकमधील हा उपक्रम एव्हाना
दुसऱ्या अनेक देशामंध्येही पोहोचलेला असून, दोन कोटी वाचक त्याचा आस्वाद घेत आहेत. ग्रंथ रथ ही त्यांचीच संकल्पना असून नाशिकमधील विविध भागात हा रथ नेऊन वाचकांना आनंद देण्याचा जनस्थानचा मानस आहे.


पद्माकर इंगळे यांची माघार

सावाना निवडणुकीत वैयक्तीक लढणारे पद्माकर इंगळे यांनी जनस्थान पॅनलला पाठिंबा देत निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांना चहाची किटली हे चिन्ह देण्यात आले होते. जनस्थान हे सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढत असल्याचे लक्षात आल्याने त्यांना पाठिंबा देत असल्याचे इंगळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जियो टॉवरच्या नावाखाली गंडा

0
0


नाशिक ः रिलायन्स जियो कंपनीची सहयोगी कंपनी असल्याचे भासवून बनावट वेबसाइटच्या माध्यमातून टॉवर उभारणीसाठी नागरिकांना गंडवण्यात आल्याचे प्रकरण अद्याप ताज आहे. अशाच प्रकारची फसवणूक पुणे येथेही झाल्याचे समोर आले आहे.

तेथील पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपासासाठी तो सरकारवाडा पोलिसांकडे वर्ग केला आहे. सध्या टेलिकॉम क्षेत्रात काही कंपन्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यात, रिलायन्स जीयोचा समावेश असून, स्वस्त इंटरनेट प्लॅनमुळे या कंपन्यांची सर्वसामान्यांमध्ये चर्चा सुरू आहे. याचच फायदा काही भामट्यांनी उचलला. रिलायन्स जियो कंपनीची सहयोगी कंपनी असल्याचे भासवून बनावट वेबसाइटच्या माध्यमातून नागरीकांना अनामत रक्कम भरण्यास सांगत गंडविले.

गेल्या आठवड्यात एका ग्राहकाने सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये दिली. आता पुण्यातही असा प्रकार समोर आला आहे. याबाबत कंपनीचे व्यवस्थापक अमित लांडगे यांनी पुणे शहरातील चतु:श्रृंगी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून आयटीअ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी हा गुन्हा तपासासाठी सरकारवाडा पोलिसांकडे वर्ग केला आहे. यात इतरही गुन्हे उघडकीस येत आहेत. ‍‍

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

... अन्यथा टीव्हीवर दिसणार ‘मुंग्या’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वारंवार आवाहन करूनही जिल्ह्यातील १५ हजार १३४ केबल ग्राहकांनी अद्याप सेटटॉप बॉक्स बसविले नाही. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून या ग्राहकांकडे टीव्हीवर केवळ मुंग्यांचेच दर्शन होणार आहे. सेटटॉप बॉक्स बसविण्यासाठी ३१ मार्च २०१७ ही अंतिम मुदत आहे. गेल्या १५ दिवसांत दोन हजार २०५ ग्राहकांनी सेटटॉप बॉक्स बसवून घेतले. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद न देणाऱ्या ग्राहकांचे प्रक्षेपण बंद केले जाणार आहे.

केबलचालकांकडून ग्राहकांची होणारी लूट थांबविण्यासाठी सरकारने सेटटॉप बॉक्स बसविण्याची मोहीम राबविण्यास सुरुवात केली. चार टप्प्यात ही मोहीम राबविली जाणार होती. पहिले तीन टप्पे पूर्ण झाले असून आता चौथ्या टप्प्यात खेडोपाड्यांत सेटटॉप बॉक्स बसविण्याचे काम सुरू आहे.

सेटटॉप बॉक्स बसविण्यासाठी ग्राहकाला किमान दीड ते दोन हजार रुपये खर्च करावे लागत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक हा खर्च करण्यास फारसे उत्सुक नाहीत. सेटटॉप बॉक्स बसविण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतच मुदत होती. परंतु, मोहीम १०० टक्के यशस्वी करण्यासाठी तीन महिन्यांनी मुदत वाढविण्यात आली.

३१ मार्च ही अंतिम मुदत असून अजूनही जिल्ह्यातील १५ हजार १३४ ग्राहकांनी सेटटॉप बॉक्स बसविलेले नाहीत. त्यामध्ये सर्वाधिक सहा हजार ९२० ग्राहक निफाड तालुक्यातील आहेत. येवल्यात सर्वात कमी म्हणजेच केवळ ४१ ग्राहकांनी अद्याप सेटटॉप बॉक्स बसविलेले नाहीत.

तीन तालुक्यांत १०० टक्के सेटटॉप बॉक्स

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ आणि नांदगाव या तीन तालुक्यांमधील सर्व केबल ग्राहकांनी सेटटॉप बॉक्स बसवून घेतले आहेत. या तिन्ही तालुक्यांमध्ये मिळून ६६७ केबलधारक आहेत. त्या सर्वांनी सेटटॉप बॉक्स बसविले आहेत. दिंडोरी, कळवण, सुरगाणा या तिन तालुक्यांमध्ये मात्र जिल्हा प्रशासनाकडे नोंदणी असलेल्या केबल ग्राहकांपेक्षाही अधिक ग्राहकांनी अलीकडेच केबलचे कनेक्शन घेऊन सेटटॉप बॉक्स बसविल्याचे प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होते. या तिनही तालुक्यांमध्ये अनुक्रमे १७४, १४० आणि १२२ टक्के केबल ग्राहकांनी सेटटॉप बॉक्स बसविले आहेत. याउलट मालेगाव तालुक्यात २२ टक्के तर निफाडमध्ये २६.३० टक्के ग्राहकांनी सेटटॉप बॉक्स बसविले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला पोलिसांचीही भरतीमध्ये ‘परीक्षा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस भरती प्रक्रिया सुरळीत राहावी म्हणून लावण्यात आलेल्या बंदोबस्तासाठी उशिरा हजर होणाऱ्या तब्बल २३ महिला पोलिस कर्मचाऱ्यांना शुक्रवारी धावण्याची शिक्षा मिळाली. वेळेचे महत्त्व नवीन उमेदवारांनाही समजले पाहिजे यासाठी ही अतिरिक्त ड्रील महत्त्वाची होती, असे पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले.

शहर पोलिस दलात शिपाईपदाच्या ९७ जागांसाठी पोलिस मुख्यालयातील मैदानावर सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. भर दुपारचे ऊन टाळण्यासाठी पहाटेपासूनच भरती प्रक्रिया सुरू होते. यासाठी जवळपास दीडशे पोलिस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले आहे. भरती प्रक्रिया साधारणतः सहा वाजता सुरू होते. त्यापूर्वी संबंधीतांनी हजर राहणे अपेक्षित आहे. मात्र, आज, शुक्रवारी सकाळी तब्बल २३ महिला पोलिस कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर येण्यास उशीर झाला. यावेळी पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी याची गंभीर दखल घेत उशिरा आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना लागलीच अतिरिक्त ड्रिल (धावण्याची शिक्षा) करण्यास सांगितले. भरती प्रक्रियेसाठी हजर असलेल्या उमेदवारांसाठी यामुळे एक चांगला संदेश पोहचला.

नोकरीसाठी रस्सीखेच

पोलिस भरती प्रक्रियेसाठी तब्बल १४ हजार उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. २२ मार्चपासून मैदानी परीक्षा सुरू झाल्या असून, दररोज एक हजार उमेदवारांना बोलविण्यात येत आहे. त्यातील गैरहजर, अनफिट यामुळे सरासरी ४०० उमेदवार मागे पडतात. साधारणतः हजारामागे ६०० उमेदवार लेखी परीक्षेसाठी पुढे येऊ शकतात. हा आकडा फारच मोठा असून, शारीरिक क्षमता चाचणीत ५० टक्क्यांहून जास्त गुण मिळविणाऱ्या १ हजार ४५५ (उपलब्ध जागेच्या १५ पट) उमेदवारांनाच लेखी परीक्षा देता येणार आहे. दरम्यान, लेखी परिक्षेसाठी असलेली ही रस्सीखेच लक्षात घेता उमेदवारदेखील तयारीला लागले आहेत. शिपाई पदासाठी फक्त १२ वी पास शिक्षणाची अहर्त असताना इंजिनीअर, एमएससी, डिप्लोमा, एमबीए असे उच्च शिक्षण घेतलेले उमेदवार या भरतीसाठी रिंगणात उतरले आहेत. यातून बेरोजगाराची गंभीर झलक पाहण्यास मिळते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मधुमेहाबाबत उद्या माहितीपर व्याख्यान

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आरोग्यभारती, नाशिक यांच्यावतीने स्वस्थ जीवनशैली व्याख्यानमालेअंतर्गत मधुमेहावर सर्वंकष प्रबोधन करणारा ‘दोन हात मधुमेहाशी’ या माहितीपर कार्यक्रमाचे रविवार, २६ मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात सकाळी ९ ते १२ या वेळेत कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी सर्वांना मुक्त प्रवेश आहे.

कार्यक्रमात नाशिक येथील मधुमेह तज्ज्ञ डॉ. यशपाल गोगटे, औरंगाबाद येथील मधुमेह तज्ज्ञ वैद्य मुकुंद सबनीस तसेच नाशिक येथील योग प्राध्यापक प्रवीण देशपांडे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमातून मधुमेहावरील सर्व शंकांचे निरसन करणारे चर्चासत्रदेखील होणार आहे. नेत्रविकार तज्ज्ञ डॉ. मनीष बापये, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शीतलकुमार हिरण, किडनीविकार तज्ज्ञ डॉ. देवीकुमार केळकर, शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. परिना बजाज, मधुमेह तज्ज्ञ डॉ. यशपाल गोगटे, वैद्य मुकुंद सबनीस आणि योग प्राध्यापक प्रवीण देशपांडे उपस्थितांचे शंकांचे निरसन करणार आहेत. मधुमेह तज्ज्ञ डॉ. तुषार गोडबोले या चर्चासत्राचे सूत्रसंचालन करणार आहेत.

गैरसमजांचे होणार शास्त्रीय निराकरण

आरोग्यभारती नाशिक शाखेच्या आगामी योजनांतर्गत सूर्यनमस्कार, योगाचा प्रसार, आरोग्य मित्र प्रशिक्षण आणि औषधी वनस्पती माहिती या सारख्या योजनांवर भर देऊन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मधुमेहासंदर्भात समाजात अनेक गैरसमज आहेत. त्या गैरसमजांचे शास्त्रीय पध्दतीने अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून निराकरण व्हावे व मधुमेहावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येणे शक्य व्हावे यासाठी आरोग्यभारती तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती आरोग्यभारती नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. विकास गोगटे आणि सचिव डॉ. विजय भोकरे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारुती देवस्थानात रामनवमी उत्सव

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी मठ, आगर टाकळी येथे श्रीराम नवमी ते हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ४ ते ११ एप्रिल दरम्यान हा उत्सव आहे.

उत्सवामध्ये ४ एप्रिल रोजी श्रीरामनवमीला दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव होईल. जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उदघाटन होईल. याच दिवशी ६ वाजता माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांचे ‘दशरथी राम’ या विषयावर व्याख्यान होईल. ५ एप्रिल रोजी प्रा. डॉ. तुळशीराम गुट्टे यांचे ‘मन करा रे प्रसन्न’, ६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता गोदावरी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आणि ६ वाजता पराग पांडव आणि सहकारी संगीत रामदासायण हा कार्यक्रम सादर करतील. शुक्रवार ७ एप्रिल रोजी डॉ. महेश करंदीकर यांचे ‘अध्यात्माकडून आरोग्याकडे’, शनिवार ८ एप्रिल रोजी डॉ. अविता कुलकर्णी यांचे ‘दासबोधातून प्रपंच आणि परमार्थ’ या विषयावर व्याख्यान होईल. रविवार, ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता देवयानी खपली यांचे ‘दैनंदिन जीवनात रामनामाचे महत्त्व’ तर सायंकाळी ६ वाजता प्रमोद जगताप यांचे ‘जगदगुरू तुकाराम महाराजांची समर्थभक्ती’ या विषयावर व्याख्यान होईल. सोमवार १० एप्रिल रोजी सुनील चिंचोळकर यांचे ‘प्रभू श्रीरामाचे गुणदर्शन’, ११ एप्रिल रोजी सकाळी श्री हनुमान जन्मोत्सव, सकाळी १० वाजता स्वामी जोमानंद महाराज यांचे ‘जीवन देवाचे आचरण माणसाचे’, ४.३० वाजता साधना गोखले यांचे श्री समर्थ व श्री हनुमंत यांच्यातील भावबंध या विषयावर व्याख्यान होईल.

पुस्तक प्रकाशन

सुधीर शिरवाडकर लिखित ‘टाकळी देवस्थान महात्म्य’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवार ११ एप्रिल रोजी ५.३० वाजता होईल. सायंकाळी ६ वाजता डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे ‘शिवरायांचा आठवावा प्रताप’ या विषयावर व्याख्यान होईल. सर्व कार्यक्रम मारुती देवस्थान आगर टाकळी येथे होतील. व्याख्यानांना उपस्थित रहावे, असे आवाहन एन. के. ब्रह्मे, सुधीर शिरवाडकर, ज्योतिराव खैरनार आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६६६ बेरोजगारांना रोजगारसंधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता विभाग, नाशिक महापालिका यांच्यातर्फे सुशिक्षित बेरोजगारांसाठी आयोजित रोजगार मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यात ४ हजार ५०० हून अधिक उमेदवार सहभागी झाले. मेळाव्यातून तब्बल ६६६ उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली.

मेळाव्याच्या पहिल्या दिवशी २ हजार ५०० हून अधिक उमेदवारांनी सहभाग घेतला. दोन दिवसात नाशिक जिल्ह्यासह बाहेरील ४० कंपन्यांनी ६६६ उमेदवारांची मुलाखतींच्या माध्यमातून निवड केली. आता या मुलाखती झालेल्या उमेदवारांना कंपनीकडून संपर्क केले जाणार आहे. दुसऱ्या दिवशी या मेळाव्यात २२ कंपन्यांच्या ४४ प्रतिनिधी उपस्थित होते.

शालिमार येथील महात्मा फुले दालन येथे झालेल्या या मेळाव्यात इयत्ता दहावी, बारावी, पदविका, पदवी, व तांत्रिक अभ्याक्रम, व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले तरुण या मेळाव्यात सहभागी झाले. यात अनेक प्रकारचे जॉब उपलब्ध करून देण्यात आले. लाइफ प्लॅनिंग ऑफिसर, आरएमओ, संगणक ऑपरेटर, सीएनसी ऑपरेटर न्यू प्रॉडक्ट डिझायनर, रिटेल कॅशियर, मॅकेनिक इलेक्ट्रीशियन, बी. टेक, बॉयलर अटेंडट, केमिकल इंजिनीअर, स्टोअर मॅनेजर, मॅकेनिकल ड्राफ्ट्समन, मार्केटिंग एक्झिक्युटीव्ह, फार्मसिस्ट, फिटर, टर्नर व अशा अनेक प्रकारचे टेक्निकल व नॉन टेक्निकल पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी पीआयजीओ (बारामती), डब्ल्यूएनएस, महिन्द्रा सोना, सुला वाईन यार्डस, इपीसी इंडस्ट्रीज, कन्ट्री क्लब, श्री गुरुजी रुग्णालय, नेटवीन सिस्टीम, ऋषभ मोटार्स, मयूर अलंकार, सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल (सर्व नाशिक), व्हीआयपी इंडस्ट्रीज, राईड फाईट फास्टनर्स, शान कार्स (सातपूर), जनरल मील्स, जिंदाल सॉ मिल (सिन्नर), सुदल इंडस्ट्रीज (अंबड) इत्यादी कंपनीनी स्वारस्य दाखवले.

उमेदवारांची नोंदणी आणि मुलाखती महात्मा फुले दालन येथे घेतल्या जात होत्या. या ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी ४० कंपन्यांचे स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आलेले होते. मुलाखती झालेल्या उमेदवारांना कंपनीकडून लवकरच संपर्क साधून कॉल लेटर दिले जाणार आहे.

00
५१ विद्यार्थ्यांची ‘कॅम्पस’मध्ये निवड

नाशिक : के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूत ५१ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली आहे. मनी कॅपिटल हाइट, फेस, रिषभ इन्ट्रमेंट्स, अॅमेझॉन, आयसीआयसीआय, हिंद रेक्टीफायर या कंपन्यांमार्फत ही प्रक्रिया राबविण्यात आली. शिक्षणापूर्वी विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळाव्यात, या उद्देशाने ही प्रक्रिया घेण्यात आली. कॉलेजचे प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर यांनी स्वागत केले. ऑनलाइन टेस्ट, टेक्निकल टेस्ट, वैयक्तिक मुलाखत या पातळींनी ही प्रक्रिया पार पडली. यातून ५१ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना ३ ते ३.५० लाख रुपयांचे पॅकेज देण्यात आले. यामध्ये मनी कॅपिटल हाईटमध्ये १७ विद्यार्थी, फेस ट्रेनिंग अॅकॅडमीमध्ये ८ विद्यार्थी, रिषभ इन्ट्रमेंट्समध्ये २ विद्यार्थी, डेस्केरा पुणे येथे २ विद्यार्थी, अॅमेझॉनमध्ये १३ विद्यार्थी, आयसीआयसीआयमध्ये ६ विद्यार्थी व हिंद रेक्टीफायरमध्ये ३ विद्यार्थ्यांनी निवड झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्रेंच कंपनीचा नाशिकमध्ये प्रकल्प विस्तार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

फ्रान्समधील बहुराष्ट्रीय मद्यार्क कंपनीने नाशिकमधील प्रकल्पाचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. दिंडोरी तालुक्यातील कडवा म्हाळुंगी येथे तब्बल १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करतानाच जवळपास ४०० जणांना रोजगाराची संधी यामुळे प्राप्त होणार आहे. ज्वारी आणि मका यापासून मद्यार्काची निर्मिती केली जाणार असल्याने त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांनाही होणार आहे.

ज्वारी व मक्यापासून मद्यार्कनिर्मिती करणारी फ्रान्सची ही कंपनी दिंडोरीतील प्रकल्पाचा विस्तार तीन पटीने करणार आहे. त्यामुळे मोठी गुंतवणूक व रोजगाराची संधी या भागातील तरुणांना मिळणार आहे, तर शेतकऱ्यांनाही ज्वारी व मक्यासाठी चांगले भाव मिळतील. तब्बल ३५ एकरच्या विस्तारित जागेत हा प्लँट असणार आहे. नाशिक हे देशाचे वाइन कॅपिटल म्हणून ओळखले जात असताना आता मद्यार्कनिर्मितीत जिल्ह्यात विस्तार होणार आहे.

नाशिक जिल्ह्यात मका पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते; पण ज्वारीचे प्रमाण त्या तुलनेत आहे. मात्र, भविष्यात या पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतल्यास त्यांना चांगला भाव मिळू शकेल. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे जाणार आहेत. त्यामुळे ज्वारीपासून मद्यार्कनिर्मिती शेतकऱ्यांच्या फायद्याची असेल. कंपनीची दिंडोरी तालुक्यातील कडवा म्हाळुंगी येथे वायनरी, बॉटलिंग व डिस्टलरी प्लँट आहे. त्यात डिस्टलरीचा विस्तार केला जाणार आहे. सध्या या प्लँटमधून २० केएलपीडी (किलो लिटर प्रतिदिन) क्षमता आहे. आता त्यात तीन पट वाढ होणार असून, ती ६० केएलपीडी होणार आहे. ज्वारीला बायप्रॉडक्‍ट नाही म्हणून ज्वारी, तर मक्याचा वापर बऱ्याच कामासाठी केला जातो. मात्र, या दोन्ही पिकांना यामुळे चांगले दिवस येणार आहेत. या कंपनीबरोबरच इतर कंपन्यांचे नाशिकमध्ये उद्योग येण्याची शक्यता आहे.

फळांचे रस किंवा धान्य आंबवून मद्यार्क तयार केले जाते. या मद्यार्कापासून व्हिस्की, ब्रँडी, रम, जीन यांसारखे प्रकार तयार केले जातात. त्यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण ४० ते ५२ टक्के इतके असते. या अल्कोहोल असलेल्या पदार्थांना स्पिरिट्स म्हणतात आणि ती पेये सोडा, पाणी, फळांचे रस यांच्यामध्ये मिसळूनच घ्यावी लागते. धान्यापासून बनवण्यात असलेले हे मद्यार्क देशभरात सुरू झाले आहेत. नाशिकमध्ये त्यांचे प्रमाण कमी असले तरी येत्या काही दिवसांत त्याची संख्या वाढणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योग नाशिकमध्ये यावे यासाठी प्रयत्न केले जात असताना आहे त्या प्रकल्पामध्ये विस्तार होत असल्यामुळे त्याचा उद्योगांबरोबरच इतरांनाही फायदा होणार आहे.

२६ ला प्रदूषण मंडळाची सुनावणी

कोणताही मोठा उद्योग असला, की त्याचे काम सुरू करण्यासाठी प्रदूषण मंडळाची परवानगी लागते. त्यासाठी २६ तारखेला १० मीटर परिसरातील लोकांशी संपर्क करून ही सुनावणी केली जाणार आहे. त्यानंतर त्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवून त्यांला संमती घेतली जाते.

नाशिकला डिस्टलरी उद्योगाचा विस्तार झाल्यास त्यातून रोजगारनिर्मिती व गुंतवणूक होते. त्यामुळे त्याचा जिल्ह्याला फायदा होईलच. बहुराष्ट्रीय कंपन्या नाशिकवर विश्वास दाखवत असल्याचे यातून सिद्ध होते. येत्या काळात इतरही बहुराष्ट्रीय कंपन्या त्यामुळे नाशिकला येऊ शकतात.

- जगदीश होळकर, माजी अध्यक्ष, इंडियन ग्रेप प्रोसेसिंग बोर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंहस्थ निधीवरील व्याज कुणाचे?

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

नुकत्याच पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वरला कोट्यवधींचा निधी मिळाला. त्यातून विकासकामेही झाली. मात्र आता शिल्लक रक्कमेवर आलेले व्याज कोटींच्या घरात पोहचले. आता निधीवर मिळालेल्या व्याजाची रक्कम कोणाची यावरून नगरपालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे.

त्र्यंबकेश्वर नगरपालिकेला सिंहस्थ विकास कामांसाठी ४७ कोटी ४८ लाख रुपयांचे अनुदान मिळाले होते. येथील देना आणि महाराष्ट्र बँकेत असलेल्या नगरपालिकेच्या खात्यात ही रक्कम असल्याने त्यावर एक कोटी ३८ लाख २५ हजार रुपये इतके व्याज मिळाले आहे. सिहस्थातील ठेकेदारांची बहुतांश देयके देऊन झाली आहेत. आता ही व्याजाची रक्कम शासनाला परत पाठवावी लागणार आहे. मात्र पालिका प्रशासनाने हे व्याज शहर विकासासाठी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

त्र्यंबक शहरास सिंहस्थासाठी भरीव निधी मिळाला व त्यातून अनेक कामे झाली आहेत. तथापि सिंहस्थ पाठोपाठ शहराची हद्दवाढ झाली आणि वाढीव हद्दीत विकास कामे करण्यासाठी गंगाजळी कमी पडत आहे. किंबहुना खर्च जास्त आणि उत्पन्न कमी यामुळे ही स्थानिक स्वराज्य संस्था अडचणीत येते की काय अशी शंका जाणकार व्यक्त करीत आहेत. पाणीपुरवठा, दिवाबत्ती आणि दररोजची सफाई यामध्ये होणारा खर्च प्रचंड असून, दिवसेंदिवस तो वाढत आहे. त्या तुलनेत उत्पन्न अतिशय कमी असून, वसुली करतांना प्रशासनाची दमछाक होत आहे.

यात्राकर अनुदान, वित्तीय आयोग, नगरोत्थान अशा अनुदानांकडे डोळे लावून बसलेल्या पालिकेला सिंहस्थाच्या निम‌ित्ताने विकासाची गंगा अंगणात आणण्याची संधी मिळाली. सिहस्थाच्या निधीवर आलेले व्याज सध्या बँक खात्यात जमा आहे. आता या व्याजाच्या रकमेचा विनीयोग नगरपालिकेस करण्याचा अधिकार मिळाला तर शहर हद्दवाढीनंतर काही कामे करता येतील. शासनाने निधी देतांना त्यावरील व्याजाचा परतावा माग‌ितला असेल व तशा अटी-शर्ती असतील तर मात्र हा कोटीचा व्याजाचा लोण्याचा गोळा पालिकेला मिळणे अवघड आहे.

लोकप्रतिनिधींचे प्रयत्न सुरू

नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांनी तत्कालीन मुख्याधिकारी निवृत्ती नागरे आणि जिल्हा प्रशासनाकडे व्याजाची रक्कम नगरपालिका फंडाच्या खात्यात जमा करण्यात यावी यासाठी अर्ज केला आहे. हे व्याज नगरपालिकेच्या फंडात वर्ग केल्यास प्रलंब‌ित कामांना चालना मिळणार आहे. याकरिता शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे भाजपचे उपतालुकाध्यक्ष दीपक लढ्ढा यांनी सांग‌ितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेवर मात करण्यासाठी भाजपची चाल

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत स्थायीमध्ये वरचढ ठरू पाहणाऱ्या विरोधकांना शह देण्यासाठी सत्ताधारी भाजपकडूनही चाली खेळण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेची आरपीआयसोबतची गटनोंदणी प्रलंबित असताना ३० मार्चला स्थायी समितीच्या १६ सदस्यांच्या निवडीसाठी महासभा घेण्याची तयारी सुरू आहे. नगरसेवकांची नावे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर एक महिन्यात गटनोंदणी आवश्यक असते. ही मुदत २९ मार्चला पूर्ण होत असल्याने ३० मार्च रोजी तत्काळ महासभा घेऊन शिवसेनेचा निर्णय येण्यापूर्वीच नावे घोषित करण्याची घाई भाजपला लागली आहे. त्यामुळे ही महासभा वादात अडकण्याची शक्यता आहे.

नगरसेवकांची नावे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित पक्षांनी गटनोंदणी करून ती नगरसचिव विभागाकडे सादर करावी लागते. त्यानंतर स्थायी समितीच्या सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी महासभा बोलविता येते. सद्यःस्थितीत भाजप, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची गटनोंदणी झाली आहे, तर शिवसेनेने गटनोंदणी केली असली तरी आरपीआयच्या एकमेव सदस्या दीक्षा लोंढे यांना आपल्या गटात जोडण्यासाठी नव्याने अर्ज केला आहे. त्यामुळे या अर्जावर सुनावणी प्रलंबित आहे. अपक्षांच्या खेळीमुळे आता स्थायीमधील सेनेचे गणित बिघडले आहे. गटनोंदणीनुसार आता भाजपचे नऊ, शिवसेनेचे चार, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेचा प्रत्येकी एक सदस्य स्थायीवर जाणार आहे. मात्र, आरपीआयच्या सदस्या शिवसेनेच्या गटात नोंदला गेला तर भाजपचा एक सदस्य कमी होऊन पूर्णांकानुसार शिवसेनेचा पाचवा सदस्य स्थायीवर जाणार आहे. त्यामुळे स्थायीत भाजपचे आठ, तर विरोधकांचे आठ सदस्य असे संख्याबळ होणार आहे.

विरोधकांची ही चाल लक्षात आल्यानंतर भाजपनेही चाल खेळण्यास सुरुवात केली आहे. राजपत्रात नावे प्रसिद्ध झाल्याच्या घटनेला २९ मार्चला एक महिना पूर्ण होत आहे. त्यामुळे ३० तारखेला महासभा घेऊन त्यात नावे जाहीर करण्याची खेळी भाजपने सुरू केली आहे. शिवसेनेच्या गटनोंदणीवर विभागीय आयुक्तांचा निकाल आला नाही तर ३० च्या सभेत भाजपचे नऊ सदस्य जाऊ शकतात. त्यामुळे ही चाल खेळून भाजप विरोधकांवर मात करण्याच्या तयारीत आहे.

कोर्टबाजीत अडकणार स्थायी

विभागीय आयुक्तांच्या निर्णयापूर्वीच भाजपने स्थायी समितीसाठी महासभा बोलवून निवड केल्यास शिवसेना या विरोधात कोर्टात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थायी समिती सदस्य निवडीचा वाद हा पुन्हा कोर्टात अडकण्याची शक्यता आहे. यासाठी शिवसेनेने वकिलांची फौजही तयार केला असून, कोणत्याही परिस्थितीत भाजपचे मनसुबे यशस्वी होऊ न देण्याचा निर्णय घेतला असून त्याला अन्य पक्षांचीही साथ लाभणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता मागेल त्याला नळ कनेक्शन!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नव्या सदनिकाधारकांना नळ कनेक्शन न देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करत मागेल त्याला नळ कनेक्शन देण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. संबंधित सदनिकाधारकास इमारतीची थकबाकी भरल्यानंतरच नवीन नळ कनेक्शन दिले जाणार असले तरी दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर पाणी पोहोचण्याची जबाबदारी पालिकेची असणार नसल्याचेही स्पष्टीकरण दिले आहे. संबंधित सदनिकाधारकास जमिनीवरच स्वतंत्र पाण्याची टाकी करावी लागणार असून, तेथून पाणी लिफ्ट करावे लागणार आहे. दरम्यान, शहरात रात्री होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश देत, पंधरा दिवसांत पाणीपुरवठ्याचे फेरनियोजन तयार करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.

महापौरपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर रंजना भानसी यांनी विभागनिहाय बैठकी सुरू केल्या असून, शुक्रवारी त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. या वेळी उपमहापौर प्रथमेश गिते, भाजपचे गटनेते संभाजी मोरुस्कर, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता चव्हाणके यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या वेळी महापौरांनी उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती घेतली. शहराला ३१ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणात असल्याची माहिती चव्हाणके यांनी दिली. महापालिकेच्या वाट्याचे दोन टीएमसी पाणी गंगापूर आणि दारणा धरणात शिल्लक आहे. त्यामुळे या वेळी पाणीकपात करण्याची गरज नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेने दोन वर्षांपासून शहरात इमारती व सोसायट्यांमध्ये नव्याने नळकनेक्शन देणे बंद केले आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्याचे आदेश देत, नळ कनेक्शन धोरणात बदल करण्याच्या सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच मागेल त्याला नळ कनेक्शन द्या; परंतु सदनिकाधारकाला दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर थेट मोटार नळ कनेक्शनला जोडता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर पाणी पोहोचले नाही, तर ती महापालिकेची जबाबदारी नसेल असेही त्यांनी स्पष्ट केले. इमारतीत कोणाला नवीन कनेक्शन घ्यायचे असेल तर प्रथम थकबाकी भरणे बंधनकारक असून, त्याने जमिनीवरच नव्याने पाण्याची टाकी तयार करावी व तेथून मोटारीने पाणी आपल्या घरात न्यावे, असे सांगत थेट नळ कनेक्शनला मोटार जोडली तर मोटार जप्त करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे आता नवीन नळकनेक्शनचा मार्ग मोकळा झाला आहे.

शहरात नवीन जलकुंभ बांधण्यात आले आहेत. या जलकुंभांतील पाणी संपूर्ण परिसरास योग्य प्रमाणात दिले जाते किंवा नाही, याकडे लक्ष पुरवावे. अजून काही ठिकाणी जलकुंभ बांधणे आवश्यक असेल तर तसा प्रकल्प अहवाल तयार करण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. अमृत योजनेत मंजूर असलेल्या जलकुंभाचा आढावा घेण्याचे, तसेच पाणी वितरणात समानता आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेशही महापौरांनी दिले आहेत.

रात्रीचा पाणीपुरवठा बंद

शहरातील अनेक भागात रात्री १२ ते दोन वाजेदरम्यान पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे ज्या भागामध्ये रात्रीच्या वेळी पाणीपुरवठा केला जातो, त्या भागामधील महिला त्रस्त आहेत. रात्री शहरात केला जाणारा पाणीपुरवठा बंद करून पंधरा दिवसांत त्याचे नियोजन करण्याचे आदेशही महापौरांनी पाणीपुरवठा विभागाला दिले. शहरात रात्री दोन वाजेला होणारा पाणीपुरवठा थांबवून पहाटे पाच वाजेनंतर पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्याचे फर्मान त्यांनी काढले. पंधरा दिवसांत त्याची अंमलबजाणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

महापौरांच्या सूचना

- शहर टँकरमुक्त करा

- गळती तत्काळ थांबवा

- पाणी वितरणात सुसूत्रता राखावी

- आवश्यक त्या ठिकाणी नवीन जलवाहिन्या टाका

- शनिवार, रविवारी अधिकाऱ्यांनी फोन बंद ठेवू नयेत

- नागरिकांच्या तक्रारी तत्काळ सोडवाव्यात

- व्हॉल्वच्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी

- गावठाण भागातील पाण्याची परिस्थिती सुधारण्यात यावी

- नादुरुस्त बोअरिंग दुरुस्त करण्यात यावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी दवाखाने ठरले तारणहार!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंडियन मेड‌िकल असोसिएशनने पुकारलेल्या संपाच्या दुसऱ्या दिवशी पेशंट तसेच नातेवाईकांचे हाल कायम राहिले. खासगी हॉस्पिटल्स तसेच ओपीडीसुध्दा बंद असल्याने अत्यावश्यक सेवेच्या शोधार्थ अनेक पेशंट सिव्ह‌िल हॉस्पिटलपर्यंत पोहचले. संपाच्या दृष्ट‌िकोनातून सिव्ह‌िल प्रशासनदेखील सज्ज राहिले.

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमएने बुधवारपासून अचानक संपाचे हत्यार उपसले. शहरात आयएमएचे बहुतांश डॉक्टर सदस्य असून, या संपामुळे शहरातील वैद्यकीय सेवा कोलमोडून पडली. अत्यावश्यक सेवा उपलब्ध नसल्याने शेकडो पेशंट तसेच त्यांच्या कुटुंबियांना मानसिक त्रास सहन करावा लागला. अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या असून, तातडीच्या केसमध्ये सिव्ह‌िल हॉस्पिटल अथवा संदर्भ सेवा रुग्णालयाचा रस्ता अनेकांना पकडावा लागला. आयएमएने शुक्रवारी संध्याकाळी संप मागे घेतला असून, शहरातील खासगी वैद्यकीय सेवा पुन्हा सुरळीत झाल्याने पेशंटच्या नातेवाईकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

खासगी डॉक्टरांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर आम्ही पुरेशी तयारी केली होती. आमच्याकडे मनुष्यबळाचा प्रश्नच नाही. सिझेरियन तसेच काही तातडीच्या शस्त्रक्रिया वगळता पेशंटच्या संख्येत थोडी वाढ झालेली दिसते.

- जी. एम. होले, अतिरिक्त सिव्ह‌िल सर्जन


बिटको रुग्णालय फुल्ल!

सिन्नर फाटा ः खासगी डॉक्टरांनी मार्डला पाठिंबा देण्यासाठी संप पुकारल्याने शहरात वैद्यकीय आणीबाणीच लागू झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पालिकेच्या बिटको व इतर रुग्णालयांत रुग्णांची नेहमीपेक्षा दुप्पट गर्दी वाढली आहे.

संपाच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत वैद्यकीय उपचार उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची हेळसांड होत असून, मनपाची रुग्णालये अशा रुग्णांसाठी तारणहार ठरू लागली आहेत. शहरातील बहुतांश खासगी रुग्णालये शुक्रवारी पाचव्या दिवशीही बंदच राहिली. त्यामुळे रुग्णांना पालिकेच्या बिटको, सिन्नर फाटा येथील सावित्रीबाई फुले रुग्णालय, दसक-पंचक रुग्णालय या रुग्णालयांचा आधार घ्यावा लागला. या सर्व रुग्णालयांतील ओपीडीत रुग्णांची संख्या गेल्या तीन चार दिवसांत दुप्पटीने वाढली आहे.

कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

खासगी डॉक्टरांचा संप सुरू झाल्यापासून शहरातील रुग्णांची संपूर्ण भिस्त पालिकेच्या बिटको रुग्णालयावर आली आहे. या रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रजेवर गेलेले डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांना कामावर बोलावण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी बिटको रुग्णालयातील वॉर्डबॉय,स्टाफ नर्सेस व डॉक्टर्स यांना डबल ड्युटीचे आदेश देण्यात आले असुन या कर्मचा-यांकडुनही सहकार्य केले जात आहे.या रुग्णालयात आगोदरच ३० टक्के कर्मचारी कमी आहेत.

सेवानिवृत्त डॉक्टर आले धावून

खरा डॉक्टर तोच की जो आपल्या रुग्णाची सेवेलाच ईश्वरसेवा मानतो. याचा प्रत्यय या संपामुळे बिटको रुग्णालयात रुग्णांना आला. खासगी डॉक्टरांनी संप पुकारल्याने साहजिकच पालिकेच्या बिटको रुग्णालयात रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने तेथील उपलब्ध डॉक्टरांवरही कामाचा प्रचंड ताण वाढला होता. अशा आण‌िबाणीच्या परिस्थ‌ितीत या रुग्णालयातून सेवानिवृत्त झालेले डॉ. सीताराम गावित, डॉ. मालपाणी या ज्येष्ठ डॉक्टरांनी स्वेच्छेने रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत. सामाजिक बांधिलकी जपत ऐनवेळी धावून आलेले हे डॉक्टर्स रुग्णांसाठी देवदूतच ठरले आहेत.

११९५ रुग्णांवर उपचार

खासगी डॉक्टरांनी संप पुकारल्यानंतर येथील बिटको रुग्णालयात ११९५ रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर दररोज ८ ते १० रुग्णांची ऑपरेशन्स झाली. सावित्राबाई फुले रुग्णालयातही दररोज सुमारे ५० रुग्णावर उपचार झाले. औषधांचा साठाही पुरेसा ठेवण्यात आला आहे.

खासगी डॉक्टरांच्या संपकाळात बिटको रुग्णालयात रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. सेवानिवृत्त डॉक्टर्सदेखील मदतीला धावून आले आहेत.

-डॉ. जयंत फुलकर, निवासी वैद्यकीय अधिकारी, बिटको रुग्णालय

ईएसआयसीत रुग्णसेवा सुरळीत
सातपूर ः डॉक्टरांनी पुकारलेल्या संपात सातपूर परिसरातीलही डॉक्टरांनी सहभाग घेतल्याने खासगी रुग्णालये बंद होती. मात्र, सातपूरच्या महापालिका व कामगार विमा योजना रुग्णालयात (ईएसआयसी) सुरळीत आरोग्य सेवा मिळाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला. सातपूर भागात फॅमिली डॉक्टरांचा संपात संमिश्र प्रतिसाद होता. परंतु, रुग्णालय असलेल्या डॉक्टरांनी संपात सहभाग घेतल्याने काही प्रमाणात रुग्णांना हाल सहन करावे लागले. यात महापालिकेच्या मायको रुग्णालयात उपस्थित डॉक्टरांनी सर्वच रुग्णांवर उपचार केले. तसेच ईएसआयसी रुग्णालयातदेखील नेहमीप्रमाणे डॉक्टर आपली आरोग्य सेवा देण्यात तत्पर होते. महापालिकेच्या मायको रुग्णालयात बाल रुग्णांना वेळेवर उपचार मिळाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षेसाठी डॉक्टरांचा मोर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्याने राज्यातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपास पाठ‌िंबा देत इंड‌ियन मेड‌िकल असोसिएशनचे सदस्य (आयएमए) शुक्रवारी रस्त्यावर उतरले. आयएमएने शहरातून काढलेल्या निषेध मोर्चास पाठ‌िंबा देत अनेक संघटना त्यामध्ये सहभागी झाल्या. मात्र, या आंदोलनामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचा फज्जा उडाला.

शुक्रवारी वरिष्ठ पातळीवरून संप मागे घेत असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, सकाळी शहरातून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ‘डॉक्टर वाचवा, रुग्ण जगवा’, आम्हाला न्याय हवा, उघडा डोळे बघा नीट, आम्हीच वाचवायचे प्राण तरीही आमच्याच डोक्यात वीट’ यांसारख्या घोषणा देत या मोर्चाला शालिमार चौक परिसरातून सुरुवात झाली. गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, एमजी रोडमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन धडकला. त्यामध्ये सुमारे दोन हजार डॉक्टर्स सहभागी झाले होते. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. धुळे, नाशिक, मुंबई येथेही डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाईकांनी हल्ले केल्याचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिरूध्द भांडारकर, सचिव डॉ. प्रशांत देवरे, डॉ. सुचेता बच्छाव, डॉ.राजश्री पाटील, डॉ. मंगेश थेटे आदींसह आयएमएशी संलग्न डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मोर्चात सहभागी संघटना

निमा, निमा न्यू नाशिक, पंचवटी मेड‌िकल असोसिएशन, फॅमिली फिज‌िशियन असोसिएशन, होमिओपॅथी असोसिएशन, रोटरी क्लब, जायंट्स ग्रुप, आयमा, सायकल असोसिएशन, डेंटल असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, मेड‌िकल प्रॅक्ट‌िशनर्स असो, सातपूर मेडीकल असोसिएशन, असोसिएशन ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरीज डॉक्टर्स, नॅशनल इंटीग्रेटेड मेडीकल असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images