Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

लाचखोर शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी अटकेत

$
0
0

धुळ्यातील घटना; दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शिक्षण संस्थामध्ये नियुक्या करताना नियमांचा भंग केल्याप्रकरणी तक्रारदाराला गुन्ह्यात आरोपी करू नये, यासाठी धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांनी साडेतीन लाखांची लाच मागितली होती. त्यापैकी तक्रारदाराकडून दोन लाख ३० हजार रुपयांची लाच घेताना धुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आणि उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील यांना मंगळवारी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या दोन्ही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक, मान्यता व संबंधितांच्या आस्थापनांचे काम गेल्या तीन वर्षांपासून संबंधित तक्रारदाराकडे आहे. सन २००७ ते २०११ या कालावधीत शैक्षणिक संस्थांमध्ये कायम आरक्षित, खुल्या व इतर पदांवर नियुक्त्या करताना, संबंधित तक्रारदाराने नियमांचा भंग केला होता. याप्रकरणी चौकशी करून उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील यांनी २४ फेब्रुवारीला तक्रारदाराविरुद्ध धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात तक्रारदाराचे आरोपी म्हणून नाव न टाकण्यासाठी शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आणि उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील यांनी त्याच्याकडे साडेतीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती दोन लाख ३० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार मंगळवारी दोन्ही अधिकाऱ्यांना लाच घेताना नंदुरबार जिल्हा लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली.

अधिकारी-कर्मचाऱ्यांचा काढता पाय

शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आणि उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ अटक केल्यानंतर कार्यालयातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून काढता पाय घेतला. त्यानंतर काही वेळाने शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या आवारात शिक्षकांनी गर्दी केली होती. अजून काही लाच घेणारे कर्मचारी व अधिकारी या कार्यालयात आहेत. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी चर्चा दबक्या आवाजात शिक्षकांमध्ये सुरू होती.

चांगला अधिकारी हवा

धुळ्यात आतापर्यंत कारवाई झालेले प्रवीण पाटील हे सातवे माध्यमिक शिक्षणाधिकारी आहेत. यापूर्वी जे. के. ठाकूर, जी. के. पाडवी, भगवान सूर्यवंशी, जी. एन. पाटील, डी. एल. साळुंखे आणि परचुरे अशा सहा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर कोणत्या ना कोणत्या कारणाने निलंबनाची कारवाई झाली आहे. त्यामुळे आता तरी शिक्षण विभागात प्रामाणिक अधिकारी येणे गरजेचे आहे, अशी मागणी शिक्षकांनी ‘मटा’शी बोलताना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमदारांचे निलंबन मागे घ्या

$
0
0

धुळे : शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी आवाज उठवल्यामुळे भाजप सरकारने १९ आमदारांचे निलंबन केले. यात धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या आमदार कुणाल पाटील यांना निलंबित केल्याचा निषेध म्हणून गुरुवारी (दि. २३) धुळे शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शन करण्यात आले. यावेळी आमदारांचे निलंबन मागे घेण्यात यावे, याविषयी त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले. याप्रसंगी शहराध्यक्ष युवराज करणकाळ, साबीरशेठ, मुजफ्फर हुसेन, इस्माईल पठाण, अफसर पठाण, वेणूबाई शिरसाठ, भिवसन अहिरे, सदाशिव पाटील, संजय बैसाणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे बार असोसिएशनच्या वकिलांकडून निषेध

$
0
0

धुळे : गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील फाशीपूल चौकाजवळ गटारीचे काम रखडलेले आहे. या कामाची स्थिती कधी सुरू तर कधी बंद अशी आहे. यामुळे सहा महिन्यांपासून वाहतुकीची कोंडी होवून नागरिकांना मोठा संघर्ष वाहन चालवितांना करावा लागत आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी धुळे बार असोसिएशनच्या वकिलांनी बुधवारी फाशी पूल चौकात गटारीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी आंदोलन केले. मनपा विभागाकडे नागरिकांनी मनपाकडे तक्रार करूनही गटारीचे काम पूर्ण करण्यात येत नाही, अशी तक्रारही यावेळी करण्यात आली. यावेळी अॅड. शामकांत पाटील, अॅड. समीर सोनवणे, अॅड. मधुकर भिसे, अॅड. अमित दुसाणे यांच्यासह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीटीव्ही फुटेज, डीएनए रिपोर्ट मुंबईला

$
0
0

धुळ्यातील आरोपीच्या गळफासप्रकरणी सीआयडी तपासाला गती

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील शासकीय हिरे महाविद्यालयातील निवासी डॉक्टर रोहन म्हामूनकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली होती. यातील संशयित आरोपी प्रदीप वेताळ याने पोलिस ठाण्यातच आत्महत्या केल्याची घटना घडली होती. यासंदर्भात सीआयडीने पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज आणि मृत प्रदीपचे डीएनए रिपोर्ट तपासणीसाठी मुंबईला पाठविले आहेत. तर इतर संशयितांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

डॉक्टर मारहाणीच्या चौकशीत सीआयडी विभागाने शहर पोलिस ठाण्यातील चार गार्ड कर्मचारी, दोन ऑफिस पहारा कर्मचारी, एक सीसीटीएनएस कर्मचारी, मृताचे दोन नातेवाईक, तपासी अंमलदार राजेंद्र माळी यांची चौकशी केली आहे. तसेच मृताच्या शरीरातील काही अंश धुळ्यातील पॅथोलॉजी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले आहे. यापुढे १२ जणांचे जवाब घेण्याचे बाकी असून, ते घेतल्यानंतर व सर्व तपासणीचे अहवाल आणि शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील तपासाला चालना मिळणार असल्याची माहिती धुळे सीआयडी विभागाने दिली आहे. याप्रकरणाचा सखोल तपास उपविभागीय अधिकारी गणेश चौधरी, कर्मचारी नरेंद्र कुलकर्णी, मनोहर जाधव, उमेश येवलेकर, शरद काटके, सुरेश भालेराव हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिरे वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर्स सेवेत

$
0
0

‘आयएमए’च्या संपाचे धुळ्यातही संमिश्र पडसाद

म. टा. वृत्तसेवा, धुळे

येथील निवासी डॉक्टर रोहन म्हामूनकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर राज्यातील निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले. दोन दिवसानंतर नाशिक व ठाण्यातील रुग्णालयातही डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना घडल्या. यामुळे आता ‘आयएमए’सह निवासी डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. मात्र, धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात सर्व डॉक्टर आपली सेवा बजावत आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यातील सर्व डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. मात्र, डॉक्टरांच्या मारहाणीच्या घटनेला धुळ्यातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयापासून सुरुवात झाली. त्याठिकाणी मात्र सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी कामावर आहेत. तर दुसरीकडे राज्यातील सर्व डॉक्टर्स हे काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. तसेच शहरातील सुमारे तीनशेहून अधिक खासगी रुग्णालयांनी बुधवारी (दि. २२) बंद ठेवून राज्यातील काम बंद आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांनी माघारी परतावे लागले.

दुसरीकडे राज्यातील निवासी डॉक्टरांवर सरकारने चालविलेली निलंबनाच्या कारवाईच्या निषेधार्थ आयएमए संघटनेने खासगी रुग्णसेवा बंदचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारपर्यंत हा संप सुरूच होता. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा असल्याची माहिती धुळ्याच्या आयएमए अध्यक्षा विजया माळी यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक-सुमोचा अपघात

$
0
0

चार जणांचा मृत्यू, सुरत-नागपूर महामार्गावरील घटना

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा सुरत-नागपूर महामार्गावरील तालुक्यातील मुकटी गावाजवळ रविवारी (दि. २६) सकाळी झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर दहा जण जखमी झाले आहेत. सूरत-नागपूर महामार्गावरील खड्डे वाचवताना भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या सुमो गाडीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या धडकेनंतर सुमोचा संपूर्ण चक्काचूर झाला. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

गुजरात राज्यातील सूरत शहरातील सिद्दी कुटुंबीय सूरतहून पारोळा येथे साखरपुड्यासाठी जात होते. मुकटी गावाजवळ त्यांच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एका महिलेचा जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये २ महिलांसह २ लहान मुलींचा समावेश आहे. मृत फरजाना बानो सिद्दी (२२), सुमय्या इब्राहीम सिद्दी (१२), फरहद इसा सिद्दी (६), शहाजा बानो सिद्दी (२४) या चौघांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील जखमींवर शहरातील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहालगत मुकटी गावाची जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेजवळ पूल असून त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. ते वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक सुमोवर आदळला. यामुळे ही दोन्ही वाहने ५० फूट खोल शाळेजवळील पुलाच्या खाली कोसळली. सुमोमध्ये ११ जणांचा समावेश होता. ते पारोळ्याला नातेवाईकांकडे जात होते.

संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

अपघातानंतर मुकटी गावातील संतप्त गावकऱ्यांनी यावेळी महामार्गावर रास्ता रोको केला. यावेळी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन दोन्ही बाजूंनी लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्गावरील खड्डा वाचविण्याच्या नादात हा अपघात घडला असून, महार्गावर झालेल्या खड्ड्यांमुळे रोज अपघात होत असल्याचा माहिती गावकऱ्यांनी दिली. या अपघाताला जबाबदार म्हणून राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण विभागाला दोषी ठरवण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणीही गावकऱ्यांनी केली आहे. महामार्ग प्राधिकरणाचे जबाबदार अधिकारी घटनास्थळी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. प्रसंगी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दोन अधिकारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी पोलिसांसमक्ष तत्काळ खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. वेळीच खड्डे बुजवले गेले असते. तर निष्पाप बळी गेला नसता अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलन करणाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्‍ाुळ्यात आगीत होरपळून पाच जणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या पाच कंदील परिसरातील घराला अचानक आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कापड बाजाराच्या बाजूला राम शर्मा यांच्या घराला रविवारी (दि. २६) पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास आग लागली. यात संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र या घटनेबद्दल पोलिसांनी घातपाताच्या दिशेने तपास सुरू केला आहे. घटनास्थळी तत्काळ अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळीसह अधिकारी दाखल झाले होते.

शहरातील शिवाजी मार्केट व अकबर चौकात यामधील धनादाळ बोळीत राम शर्मा हे पत्नी, आई व दोन मुलांसोबत दुमजली घरात होते. या घरात ये-जा करण्यासाठी एकच दरवाजा होता. इतर तिन्ही बाजूनी भिंती असल्याने घरातील एकाही व्यक्तीला घराबाहेर येण्याची संधीच मिळाली नाही. या आगीत राम शर्मा (वय ४५), शोभाबाई छबूलाल शर्मा (वय ६२), जयश्री शर्मा (वय ३५), साई राम शर्मा (वय १२) आणि राधे राम शर्मा (वय १०) यांचा मृत्यू झाला. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र पोलिसांनी काही घातपात आहे का? या दृष्टीनेही तपास सुरू केला आहे.

घटनास्थळी महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचा बंब उशिरा आल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला. घटना घडल्यानंतर बऱ्याचवेळा अग्निशमन विभागाला फोन केल्यावरही बंब दाखल झाला नाही. वेळेवर बंब आला असता तर कोणाचा तरी जीव वाचवता आला असता, अशी माहिती स्थानिकांनी दिली.


अग्निशमन विभाग सुस्त

शहरात गेल्या वर्ष दोन वर्षांच्या कालावधीत आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यावेळी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला नागरिकांनी फोन केला त्यावेळी ते कधीच वेळेवर पोहोचलेले नाहीत. रविवारीही, आगीच्या घटनेत अग्निशमन बंब वेळेवर पोहाचले नाही. त्यामुळे पाच जणांना आपला जीव गमवावा लागला. सुस्त अग्निशमन विभागाला शहरातील सर्व परिसरांची अर्धवट माहिती असून, चालक व कर्मचारी यांचा कोणताही परिपूर्ण अभ्यास नाही. सेफ्टी म्हणून गणवेश, शूज, टोपीही नाही. मनपाने अग्निशमन विभागात तात्पुरते कंत्राटी तत्त्वावर अप्रशिक्षित तरुणांना कामावर नियुक्त केले आहे. त्यामुळे आता प्रशिक्षित अनुभवी व रस्त्यांची माहिती असणारे कामगार नियुक्त करण्याची मागणी होत आहे.

मुस्लिम बांधवांच्या प्रयत्नांना अपयश

राम शर्मा हे राहत असलेल्या ठिकाणी अकबर चौक आहे. त्याठिकाणी मुस्लिम बांधव रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसलेले असतात. रात्री दीड ते दोनच्या सुमारास शर्मा यांच्या घरातून ‘वाचवा-वाचवा’ असा आवाज येत असल्याचे काहींच्या लक्षात आले आणि त्यांनी शर्माच्या घरांकडे धाव घेतली. त्यानंतर मुस्लिम बांधवांनी तत्काळ मनपा अग्निशमन विभागाला फोन करून बंबाची मागणी केली. तर काहींनी वीज वितरण कंपनीला घटनेची माहिती देऊन वीजप्रवाह खंडित करण्यात आला. हे सर्व मदत कार्य सुरू होते. मात्र आगीने उग्ररूप धारण केल्याने घरात प्रवेश करणे शक्य नसल्याने बंबाची वाट पाहावी लागली. अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यावर तब्बल अर्धा तासानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत शर्मा यांच्या कुटुंबातील पाचही जणांचा मृत्यू झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात दोन दुर्घटनांत नऊ जणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरात रविवारी झालेल्या दोन दुर्घटनांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला. तर दहा जण जखमी आहेत.

धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ पाचकंदिलजवळील रहिवासी राम शर्मा यांच्या घराला रविवारी पहाटे दीड-दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा आगीत मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत रविवारी, सकाळी धुळे तालुक्यातील मुकटी गावाजवळ सुरतहून पारोळ्याकडे जाणाऱ्या कुटुंबाच्या गाडीवर महामार्गावरील खड्डे चुकविण्याचा नादात ट्रक आदळल्याने सुमो वाहनातील चार जणांचा मृत्यू झाला; तर दहा जण जखमी झाले. आगीच्या घटनेत धुळे मनपा अग्निशमन विभागाचा बंब वेळेवर दाखल न झाल्याने शर्मा कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. धुळे मनपा अग्निशमन विभागाच्या सुस्त कारभारामुळे या घटनेत काही लोकांचे प्राण वाचवता आले असते, अशी चर्चाही घटनास्थळी होती. तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा सुरत-नागूपरवरील अपघातात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खड्डे बुजवले असते, तर अपघात घडला नसता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकविरा देवीचा चैत्रोत्सव आजपासून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

खान्देश कुलस्वामिनी आदिशक्ती एकविरा देवीचा चैत्र नवरात्रोत्सव आणि यात्रोत्सवाला आज (दि. २८) पासून सुरुवात होत आहे. सकाळी विधीवत पुजा-विधी व शिखरावरील कळसपूजन, ध्वजारोहण करून गुढीपूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी चार वाजता पालखी पूजन होऊन मंदिरापासून शहरातील प्रमुख मार्गावरून पालखी वाजतगाजत काढण्यात येणार असल्याचे मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी सांगितले आहे.

दि. २८ मार्च ते ५ एप्रिलदरम्यान चैत्र नवरात्रोत्सव आणि दि. ९ एप्रिल ते ११ एप्रिलदरम्यान चैत्र यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. दि.११ एप्रिललादेखील श्री एकविरा देवीची पालखीसह मिरवणूक काढून यात्रेला सुरुवात होईल, असे मंदिर संस्थानाकडून कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट्स टाळा

$
0
0

उद्योगजगतात यशस्वी व्हायचे, तर कष्टांना पर्याय नाही. महिलांनी वेळेचे व्यवस्थापन आत्मसात केल्यास त्या उद्योगात निश्चितच यशस्वी होऊ शकतात. फक्त त्यासाठी आपले उद्दिष्ट स्पष्ट असायला हवे. शॉर्टकट्सचा वापर करून कुणी यशस्वी उद्योजक बनू शकत नाही, असा कानमंत्र दिलाय ‘वाइनलेडी’ म्हणून लौकिक प्राप्त करणाऱ्या आणि राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील यांच्याकडून गौरविल्या गेलेल्या उद्योजिका अचला जोशी यांनी.

--

महिला उद्योजिका, तेही वाइन इंडस्ट्रीत, हे कसे जमले?

उद्योजकांत महिला आणि पुरुष असा भेद तितकासा योग्य वाटत नाही. उद्योग कोणताही असो तो करण्याची आंतरिक तळमळ असायला हवी. कधीतरी वाइनची चव चाखली होती. भेट म्हणून मिळालेल्या आणि काहीशा तुरट असलेल्या द्राक्षांची चव या वाइनसारखीच होती. म्हणूनच त्यापासून वाइन बनवून पाहिली. मी बनविलेल्या वाइनची चव त्या वाइनच्या चवीशी मिळतीजुळती होती. त्यातून माझा आत्मविश्वास दुणावला. कुटुंबांत, तसेच नातलगांत डॉक्टर्स, इंजिनीअर्स, लेखक आणि कलावंत असताना मी वाइनसारख्या उद्योगात उतरणे इतरांसाठी थोडे धक्कादायक होते. त्यातूनही प्राध्यापक म्हणून नोकरीची संधी चालून आली असताना ती सोडून मी उद्योगाकडे वळले. कारण, माझे मन मला सांगत होते, की आपण या उद्योगात यशस्वी होऊ शकतो.

--

उद्योगाकडे वळण्यासाठी काय पूर्वतयारी हवी?

उद्योगाकडे वळणाऱ्या व्यक्तीला आपण कोणते प्रॉडक्ट बनविणार आहोत हे नीट माहिती असायला हवे. उद्योगात उतरायचे म्हणजे तुम्हाला मुळात मनापासून तो उद्योग करावासा वाटला पाहिजे. अन्य कुणी करतोय म्हणून आपणही करू असे म्हणून उद्योग करता येत नाही. त्यासाठी तुमच्यामध्ये प्रचंड इच्छाशक्ती असायला हवी. कोण काय म्हणेल यापेक्षा आपल्याला काय वाटते हे अधिक महत्त्वाचे असते. त्याशिवाय उद्योगात पाय घट्ट रोवता येत नाहीत. एकदा आपण निर्धार केला, की येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याचे आणि त्यामधून मार्ग काढण्याचे बळही आपल्याच आत्मविश्वासातून मिळत जाते.

--

उद्योगाकडे महिलांचा ओढा कमी का?

पुरुषांच्या तुलनेत म्हणाल तर हे प्रमाण निश्चितच कमी आहे. पण, काळानुसार म्हणाल तर ते वाढले आहे. पूर्वी उद्योग हा महिलांचा प्रांत नव्हता. परंतु, आता उद्योग क्षेत्रात अनेक महिला उतरल्या आहेत. बचतगट वा तत्सम माध्यमांतून महिलांमधील उद्यमशीलतेला व्यासपीठ मिळाले आहे. अजूनही महिलांना पुरुषी अहंकाराचा सामना करावा लागतो, हे वास्तव आहे. विशेषत: मध्यमवर्गीयांत हा त्रास अधिक जाणवतो.

--

लोणची, पापडांपुरतेच महिलांचे उद्योग मर्यादित का?

मला कुणावर टीका करायची नाही. परंतु, बचतगट हे उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे खूप चांगले व्यासपीठ आहे. बचतगटांशी अनेक महिला जोडल्या जाताहेत. त्या माध्यमातून त्यांचे उद्योगात पाऊल पडतेय हीपण सकारात्मक बाब आहे. लहान प्रमाणात सुरू केलेला उद्योगच कालांतराने बहरतो. मात्र, उद्योग मोठा करण्यासाठीचे व्हीजन बचतगटांमधील महिलांनी बाळगायला हवे. पापड, लोणची असोत किंवा अन्य कोणतेही उत्पादन, त्यामध्ये पर्फेक्शन मिळवायला हवे. ते मिळविले, की आत्मविश्वास दुणावण्यास मदत होईल.

--

बचतगट यशस्वी महिला उद्योजक घडवू शकतात का?

का नाही? निश्चितच घडवू शकतात. प्रत्येक महिलेच्या मनात एक राजहंस असतो, असे मी मानते. महिला म्हणजे चतुरस्र व्यक्तिमत्त्व असते. उद्यमशील महिलांसाठी बचतगट हे उत्तम व्यासपीठ आहे. त्यांनी या व्यासपीठाचा उपयोग करून घ्यायलाच हवा. आपल्यातील सामर्थ्य ओळखून एकमेकींना सहकार्य करायला हवे. त्यातूनच उद्योग बहरत जातो आणि आपलीदेखील प्रगती होते.

--

भांडवलाच्या कमतरतेमुळे महिला मागे राहतात असे वाटते?

उद्योगासाठी भांडवल हवेच. परंतु, ते खूप हवे असे मात्र नाही. भांडवलाची कमतरता हा उद्योजक बनण्यात कधीच अडथळा ठरू शकत नाही. जेवढे भांडवल उपलब्ध आहे तेवढ्यातच उत्पादन घेण्यास सुरुवात करा. हळूहळू पै-पै जोडून त्यामध्ये वृद्धी करा. टाइम मॅनेजमेंट महिलांत अंगभुत असते. ते महिलांना अधिक चांगले जमू शकते. १० मिनिटांत जे खाऊन संपते ते जेवण बनविण्यासाठी दिवसभर रांधणे योग्य नव्हे. महिला प्रामाणिक असतात. बुद्धिवान असतात. या गुणांचा त्यांनी योग्य पद्धतीने वापर करून घ्यायला हवा.

--

वाइनला आपल्याकडे अजूनही तेवढी समाजमान्यता नाही?

वाइन म्हणजे फळांच्या रसाचा अत्युच्च अाविष्कार आहे. रेड वाइन हृदयाला चांगली असते. तिच्या योग्य सेवनामुळे रक्ताभिसरणाला मदत होते. आरोग्याला हितकारक ठरणाऱ्या वाइनला युरोपात लोकमान्यता मिळाली आहे. परंतु, अजूनही आपल्याकडे ती मध्यमवर्गीयांपर्यंत पोहोचलेली नाही. वाइन म्हणजे दारू हा गैरसमज दूर होण्याची आवश्यकता आहे.

(शब्दांकन : प्रवीण बिडवे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अगस्ती नदी घेतेय मोकळा श्वास

$
0
0

सावरगावात लोकसहभागातून जलसंधारण

म. टा. वृत्तसेवा, येवला

नदी, नाले, बंधारे आदींच्या येवला तालुक्यातील विविध ठिकाणी गतवर्षी केलेल्या खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढणे यासारख्या कामातून पुढे पावसाळ्यात दिलासादायक चित्र बघता आता लोकांना जलसंधारणाच्या कामाचं महत्व उमगू लागलं आहे. यातूनच अशा कामांसाठी मान्यवरांसह लोकसहभाग दिसू लागला आहे. अशाच रितीने तालुक्यातील सावरगाव परिसरातून वाहणाऱ्या अगस्ती नदीमधील गाळ काढण्याच्या मोहिमेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. सध्या हे काम प्रगतीपथावर असून, यामुळे अगस्तीच्या पात्रातील साचलेला गाळ बाहेर निघाल्याने नदीने मोकळा श्वास घेतला आहे.

गतवर्षीच्या उन्हाळ्यात येवला तालुक्यातील अनेक ठिकाणच्या छोट्या नद्या, नाले, बंधारे आदींमधील गाळ लोकसहभागातून काढला गेला. या जलसंधारणाच्या कामांची फलनिष्पत्ती पुढे झालेल्या पावसात समोर आली होती. तालुक्यातील सावरगाव येथील अगस्ती नदी पात्राच्या गाळ काढण्याचे काम येथील शेतकरी मच्छिंद्र पवार यांनी हाती घेतले आहे. या गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. नदी पात्रात जेसीबीने हे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

येवला-मनमाडच्या सीमेवर असलेल्या अगस्ती ऋषींच्या डोंगरापासून उगम झालेली अगस्ती नदी येवला तालुक्यातील सावरगाव गावाजवळून प्रवाहित होताना पुढे दक्षिणेकडे मार्ग धरते. सावरगावातून वाहत जाणाऱ्या या अगस्ती नदीत गेल्या अनेक वर्षांपासून अगदी मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने तिची वहन तसेच साठवण क्षमता कमी झाली होती. त्यामुळे याकडे लक्ष देत पवार यांनी मशिनरीच्या सहाय्याने हे काम सुरू केले आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्णत्वास नेताना अगस्ती नदीची साठवण क्षमता दुपटीने वाढणार आहे.

याप्रसंगी सरपंच भाऊसाहेब पवार, बाळासाहेब पवार, दत्तात्रय पवार, गोरख पवार, चेतन पवार, ग्रामसेवक रवींद्र शेलार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामातून आगामी काळात सावरगाव परिसरातील भूजल पातळीत वाढ होऊन भागातील शेतीला त्याचा नक्कीच फायदा होण्यास मदत होणार असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

नदी, नाले व बंधारे यांचा गाळ काढून साठवण क्षमता वाढविण्याची सध्या नितांत गरज आहे. पावसाचे पाणी जमिनीत जिरल्याशिवाय भूजल पातळी वाढणार नाही हे सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. शासन आपल्या स्तरावर आपल्या परीने प्रयत्नशील असताना या कामांसाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे.

-नरेशकुमार बहिरम, तहसीलदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निसाकासाठी सहकारमंत्र्यांना साकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

सरकारने नुकताच अवसायनात काढलेला निफाड सहकारी साखर कारखाना गेल्या चार वर्षांपासून बंद पडलेला आहे. तो पुन्हा सुरू करावा यासाठी गोदावरी परिसर विकास संस्थेच्या सदस्यांनी ऊस उत्पादक व कामगारांसह नुकतीच सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत त्यांनी कारखाना पुन्हा सुरू करण्यात यावा, असे साकडे मंत्र्यांना घालण्यात आले.

गेल्या चार वर्षांपासून निसाका बंद असल्याने परिसरातील शेतकरी, कामगारांचे होणारे हाल याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. यामुळे निर्माण झालेल्या बिकट समस्यांबाबतही सहकार मंत्र्यांना सांगून कारखाना सुरू करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, शेतकरी व कामगारांनी एकजूट करावी असे आवाहन केले. यावेळी योगेश पाटील, प्रकाश महाले, संपत कडलग, भागवत भंडारे, बी. जी. पाटील, प्रभाकर टर्ले, प्रमोद गडाख, बाळासाहेब शिंदे उपस्थित होते.

निसाकाच्या या सर्व समस्यांबाबत शेतकरी व कामगारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी व विचारविनीमय करण्यासाठी एप्रिल महिन्यात सहकार मंत्री निफाडचा दौरा करणार असल्याचे सूतोवाच यावेळी यांनी केले. अशी माहिती ग्रामसमृद्धीचे पदाधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंजनेरीच्या मंदिरांना मिळणार झळाळी

$
0
0

खासगी कंपनीकडून दोन टप्प्यांत होणार काम

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

अंजनेरीच्या पुरातन मंदिरांना दोन वर्षांच्या आत झळाळी प्राप्त होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. केंद्र सरकारकडून अंजनेरी येथील १२ व्या शतकातील या पुरातन मंदिरांचा ठेवा जतन करण्यासाठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र पुरातत्त्व खात्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने मंदिरांची डागडुजी अत्यंत कासव गतीने सुरू होती. मात्र नुकतीच खासदार हेमंत गोडसे यांनी या कामाला भेट देत ते काम पुरातत्त्व खात्याच्या परवानग्या घेत एका खासगी कंपनीला दिले आहे. हेरिटेज कन्सल्टिंग या कंपनीकडून हे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्याचे सांगण्यात आले आहे.

सन १९१६ मध्ये तत्कालीन ब्रिटिश शासनाने अंजनेरीचा समावेश राष्ट्रीय स्मारकांमध्ये केला होता. मात्र याबाबत दुर्लक्षित राहिलेला हा मंदिरांचा अनमोल ठेवा जतन केल्यास तो येणाऱ्या पिढीसाठी ठेवा असेल. त्यामुळेच गतवर्षी एकूण १६.९ कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष कामाला गती प्राप्त झाली नाही. किंबहुना वर्षभरातील बहुतांश दिवस हे काम बंद राहिल्याचेही बोलले जाते. त्यांनी पहिल्या टप्प्यात येथील १६ मंदिरांचे काम हाती घेतले असून, यामध्ये उपलब्ध त्या अवशेषात मंदिरांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. या वेळी एजन्सीचे डॉ. सुब्रह्मण्यम, वाजपेयी आणि बोयापती यांनी स्थळास भेट घेऊन तेथे कशा प्रकारे काम होणार आहे याची माहिती घेतली.

पर्यटकांसाठी विविध सुविधा

येथे मंदिरांच्या परिसरात १०० मीटर अविकसन करण्याच्या अटी आहेत. त्या जागा खासगी मालकीच्या असून, त्यांना भाडे तत्त्वावर कायमस्वरूपी उत्पन्न मिळवून देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे. या सर्व १६ मंदिरांचा एक निसर्गरम्य परिसर तयार करून याठिकाणी वस्तू संग्रहालय, बगिचा करण्याचेही कंपनीच्या विचाराधीन आहे. येथे पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध करून अभ्यासकांना आकर्षण ठरेल असे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात २०१९ पर्यंत ५ मंदिरांची पुनर्बांधणी आणि २०२२ पर्यंत सर्वच्या सर्व १६ मंदिरांसह परिसर विकास पूर्ण होईल, असा विश्वास उपस्थित तंत्रज्ञांनी व्यक्त केला. याबाबतचा प्रोजेक्टेड अहवाल तयार झाला आहे. याप्रसंगी निवृत्ती लांबे, नितीन पवार, कल्पेश कदम, रामनाथ बोडके उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर कांदा चाळ अनुदान वर्ग

$
0
0

१०३ शेतकऱ्यांना सरकारचा अनुदानाने दिलासा

म. टा. वृत्तसेवा, येवला

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या, मात्र मान्यतेअभावी गेली दोन वर्षे शासनस्तरावर अडकून पडलेल्या प्रलंबित कांदा चाळ अनुदानाचे घोडे अखेर गंगेत न्हाहले आहेत. या प्रलंबित निधीस राज्य सरकारचा ‘ग्रीन सिग्नल’ मिळतानाच कृषी विभागाच्या वतीने येवला तालुक्यातील १०३ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण ८६ लाख ५० हजार रुपयांचे हे कांदा चाळ अनुदान तत्काळ वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात आली. यामुळे आता अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांच्या शेतशिवारात मोठ्या कष्टाने पिकविला गेलेला कांदा व्यवस्थित राहून त्याची टिकवण क्षमता काही प्रमाणात तरी वाढावी यासाठी कांदा चाळ अनुदान योजना सुरू केली. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत उभारल्या जाणाऱ्या कांदा चाळ अनुदान योजनेत सन २०१४-१५ या वर्षात सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने येवला तालुक्यातील ६०३ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश केला होता. या पात्र लाभार्थ्यांनी मंजुरी मिळाल्याने आपापल्या शेतशिवारात कांदा चाळीची उभारणी करताना त्यातील ५०३ लाभार्थ्यांच्या पदरात शासकीय अनुदान पडले होते. तर उर्वरित १०३ शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. आता त्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ होणार आहे.

एकूण २४७० मेट्रिक टन साठवण क्षमतेच्या एकूण ८६ लाख ५० हजार रुपये किमतीचे येवला तालुक्यातील या १०३ कांदा चाळ अनुदानाचे प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित होते. प्रलंबित अनुदान लवकर मंजुर व्हावे यासाठी विविध स्तरावर लाभार्थी शेतकऱ्यांकडून निवेदने, आंदोलने आदी मार्गांचा अवलंब केला गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विषय समित्यांसाठी जोरदार रस्सीखेच

$
0
0

जिल्हा परिषदेत वाढली शिवसेनेची डोकेदुखी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठीची निवडणूक झाल्यानंतर आता मंगळवारी (दि. ४) होणाऱ्या विषय समित्यांच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या समित्यांच्या सभापतिपदी आपली वर्णी लागावी यासाठी सत्ताधारी पक्षात जोरदार रस्खीखेच सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. जिल्हा परिषदेमध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या या अर्थपूर्ण समित्या आपल्या ताब्यात असाव्या, असे सर्वांना वाटत असल्यामुळे त्यासाठी आतापासूनच संघर्ष सुरू असला तरी त्यातून काय राजकारण घडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस व माकप व अपक्षांचे दोन सदस्य यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. त्यानंतर माकपने आपल्या दोन सदस्यांची हकालपट्टी केली. राष्ट्रवादी व भाजपला बाजूला ठेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने सर्व तडजोडी स्वीकारत काँग्रेस, अपक्ष व माकपच्या हकालपट्टी झालेल्या सदस्यांना सभापती पदासाठीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता समित्यांच्या निवडीची वेळ जवळ येताच शिवसेनेसमोर अडचण उभी राहिली आहे.

कोणाची वर्णी?

जिल्हा परिषदेत पाच समित्यांच्या सभापती एकाचवेळी निवडले जाणार आहे. त्यात अर्थ व बांधकाम समिती ही उपाध्यक्षांकडे देण्याचा पायंडा आहे. त्यामुळे उर्वरित चार समित्यांमध्ये कोणाची वर्णी लावावी, असा प्रश्न आहे. त्यात अपक्ष व माकपमधून हकालपट्टी झालेल्या दोन सदस्यांना घेतांना त्यांना आश्वासन दिल्यामुळे यातील दोन समित्या जवळपास शिवसेनेकडे नसणार आहेत. त्यात काँग्रेसही आणखी एक समितीची मागणी करणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला एक समिती येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विनता नदीतून बेसुमार वाळूउपसा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

शहराच्या उत्तरेला असलेल्या विनता नदी पात्रातून रात्री बेसुमार वाळूउपसा सुरू आहे. महसूल यंत्रणेचे या अवैध उत्खननाकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे. या अवैध उत्खननामुळे परिसरातील शेतीसाठी असलेल्या पाइपलाइन उघड्या पडल्या आहेत.

निफाड येथे विणता नदीपात्र सध्या कोरडेठाक पडले आहे. या पात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वाळू उपसा सुरू आहे. वाळू उपशामुळे नदीपात्रात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. वाळू उपसा इतक्या मोठ्या प्रमाणात झाला आहे की, या नदीपात्रातून पासआउट केलेल्या शेतीपंपाच्या पाइपलाइन उघड्या पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

या नदीपात्रातून दररोज रात्री बारा वाजेनंतर १० ते १२ ट्रॅक्टर वाळू उपसा होत असल्याचे या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे वाळू उपसा होत असताना महसूलच्या अनेक अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी फोन केले. परंतु त्यांनी त्याकडे डोळेझाक केली आहे. निफाड परिसरात कुंदेवाडी, रौळस या गावांजवळून वाहणाऱ्या कादवा नदीतूनही बेसुमार वाळू उपसा सुरू आहे.

...म्हणून अधिकारी धास्तावले

गेल्या आठवड्यात ओझर येथे वाळू वाहतूक करणाऱ्या टोळीने तलाठी व कोतवाल यांना मारहाण केल्याने महसूल यंत्रणा कार्यवाही करण्यासाठी धजावत नाही. या दहशतीचा परिणाम अवैध वाळू उपसा विरोधात कारवाई करण्यावर झाला आहे. आणि महसूलचे वरिष्ठ अधिकारीही कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आळंदी’साठी ४.३५ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आळंदी मध्यम प्रकल्पाच्या धरण आणि दोन्ही कालव्यांच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत करावयाच्या सुमारे ४.३५ कोटींच्या कामास राज्य सरकारने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे नाशिक तालुक्यातील १० हजार हेक्टर जमीन क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

आळंदी माध्यम हा २७.४८ दशलक्ष घनमीटर क्षमतेचा प्रकल्प असून त्याच्या मुख्य धरणाचे काम १९८३ तर कालव्याची कामे १९९३ मध्ये पूर्ण झाली. हा प्रकल्प १९९४ मध्ये सिंचन व्यवस्थापनाकडे हस्तांतरित करण्यात आला. या प्रकल्पाचे क्षेत्र ६,२९६ हेक्टर असून कालवे वितरकांची लांबी सुमारे ४६.५ किलोमीटर आहे. प्रकल्पाचे बांधकाम ३०-३५ वर्षे जुने असल्याने धरण व कालव्याच्या भरावाचे मजबुतीकरण करावे, सेवापथ आणि बांधकमांच्या दुरुस्तीसाठी भरीव निधी मंजूर करावा, असा आग्रह परिसरातील शेतकऱ्यांनी धरल्यानंतर आमदार बाळासाहेब सानप यांनी याबाबत जलसंपदामंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणूनच सरकारने हा निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आनंदात आहेत.

आळंदी धरण व कालव्यांच्या दुरुस्तीसाठी भरीव निधी मंजूर झाल्याने आडगाव, दरी, मखमलाबाद, मातोरी, चांदशी, म्हसरुळ, सय्यद पिंपरी, जलालपुर आदी परिसरातील आणखी ४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. याबद्दल शेतकरी वर्गाने आनंद व्यक्त केला असून आमदार सानप यांचे आभार मानले आहे. या दुरुस्तीमुळे गळतीलाही मोठ्या प्रमाणात लगाम बसणार असल्याचे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात नववर्षानिमित्त मोटारसायकल रॅली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

हिंदू-नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही नववर्ष स्वागतासाठी स्वागत यात्रा समिती गठीत करण्यात आली. या समितीकडून मोटारसायकल रॅलीसह शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज (दि. २८) सकाळी नऊ वाजता शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रॅलीत सामील झालेल्या प्रत्येक मोटार सायकलवर भगव्या रंगाचे झेंडे लावण्यात येणार असून, या रॅलीत युवक-युवतींसह महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर असणार आहे.

त्यानंतर सायंकाळी पाच वाजता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्यावतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शोभायात्रेत राम दरबार भजनी मंडळ, वारकरी भजनी मंडळ तसेच सजीव देखावे असणार आहेत. त्यात शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राम, सीता, लक्ष्मण यांचा सजीव देखावे सादर करण्यात येणार आहेत. शोभायात्रेत स्वरमुद्रा ढोलताशांचे पथक संचलन हे विशेष आकर्षक असणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा निघून जुना आग्रारोडवरील राममंदिराजवळ या शोभायात्रेचा समारोप होईल. तरी सर्व धुळेकरांनी या शोभायात्रेत मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्वागत समितीचे अध्यक्ष जितेंद्र शहा, योगीराज मराठे, महिला संयोजिका ज्योत्स्ना मुंदडा, संध्या कुलकर्णी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपासासाठी फॉरेन्सिक अधिकारी दाखल

$
0
0

धुळे : शहरातील पाचकंदिल भागात रविवारी (दि. २६) घराला लागलेल्या आगीत शर्मा कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. यात ही घटना अपघात की, घात अशी शंका आल्याने पोलिसांनी सोमवारी (दि. २७) नाशिक येथील फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले होते. या पथकाने घरातील काही नमूने घेतले आहेत. पथकाने गॅस सिलिंडरची तपासणी केली असता सिलिंडरचे रेग्यूलेटर सुरू असल्याने आग घरात पसरली, अशी माहिती पथकाने यावेळी दिली. सिलिंडर ठेवले होते त्याठिकाण्‍ााचे नमूने घेण्यात आले असून, लवकरच आग कशामुळे लागली हे निष्पन्न होईल, असे पथकाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रास्ता रोको प्रकरणी चाळीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल

$
0
0

धुळे : धुळे तालुक्यातील मुकटी गावालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रविवारी (दि. २६) सुमो आणि ट्रक यामध्ये झालेल्या अपघातानंतर मुकटी गावातील ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. महामार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली होती.

आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील शासकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून, शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश केलेल्या जमावबंदीचे उल्लंघन करीत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्यांपैकी चाळीस जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी बी. बी. चौधरी यांनी फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात मुकटी येथील उमाकांत पाटील, सुदाम पाटील, हर्षल साळुंखे, शरद साळुंखे, भरत साळुंखे यांच्यासह अन्य जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>