Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नव्या कायद्याने कपाटप्रश्न मार्गी?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील कपाट प्रश्नामुळे निर्माण झालेली बांधकाम क्षेत्राची कोंडी फोडण्यासाठी महापालिका व सरकार प्रयत्न करत असतानाच, अनधिकृत बांधकामे नियम‌ित करण्याच्या कायद्याने कपाटांचा प्रश्न ८० टक्के मार्गी लागणार आहे. नऊ मीटर रुंदीवरील रस्त्यांवर तयार झालेल्या इमारतींच्या परवानगीला महापालिकेच्या नगररचना विभागाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. आता राज्य सरकारने मंजूर केलेल्या अनधिकृत बांधकाम विधेयकातूनही अनधिकृत बांधकामांना परवानगी मिळू शकेल, असे सूतोवाच महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी केले आहे. या विधेयकामुळे शहरात बांधकामातील कपाटांवरून निर्माण झालेली कोंडी सुटणार असल्याने व्यवसायाला अच्छे दिन येणार आहेत.

अनधिकृत बांधकामांना सरंक्षण देण्यासाठी गेल्या आठवड्यात राज्य सरकारने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना सुधारणा विधेयक मंजूर केले आहे. या धोरणानुसार ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यात आले आहे. पायाभूत सुविधांचा विचार करून अनधिकृत बांधकामे दंड आकारून किंवा शक्‍य असेल तेथे टीडीआर किंवा एफएसआय घेऊन नियमित करता येणार आहेत. त्यामुळे या विधेयकाचाही मोठा फायदा कपाटांमुळे अडकलेल्या इमारतींना होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून बांधकामातील कपाटांची जवळपास सहा हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. एफएसआयचे उल्लंघन झाल्याने नऊ मीटर रुंदीखालील इमारती नियमित करता येत नाहीत. त्यामुळे या इमारतीच अनधिकृत ठरल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी महापालिकेने नव्याने मंजूर केलेला वाढीव एफएसआय, बाल्कनीसाठी देण्यात आलेला पाच टक्के एफएसआय असे एकूण पंधरा टक्के एफएसआयच्या माध्यमातून कपाटांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न महापालिका आणि सरकारने केला आहे.

नागपूर व पुणे शहराप्रमाणे पार्किंग व अॅम‌िनिटीज् प्लॉटवरचे नियम शिथिल करावेत व साडेसात मीटरच्या रस्त्यावरील इमारतींचे कुंपण मागे घेवून ती जागा शासनाकडे हस्तांतरीत करायची व नऊ मीटर रुंदीच्या रस्त्यांचे फायदे मिळवायचे, असा प्रस्ताव तयार केला आहे. सरकारने महापालिकेचा प्रस्ताव मंजूर केल्यास त्यातून ३० टक्केच कपाटांचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. परंतु, अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या विधेयकाच्या माध्यमातूनही सुमारे साठ टक्के इमारती अधिकृत करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे कपाटांचा प्रश्न ८० टक्के मार्गी लागणार असून, याबाबत आयुक्त कृष्णा यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला अधिक चांगले दिवस येणार आहेत.

सरकारकडे प्रस्ताव

नऊ मीटर रुंदी खालील रस्त्यांना टीडीआर लागू नसल्याने कपाटांचा प्रश्न सोडवता येत नाही. इमारतींच्या बांधकामांच्या परवानग्या रखडल्या आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांनी महापालिकेला प्रस्ताव सादर केला आहे. त्यात दुरुस्ती करून सदरचा प्रस्ताव सरकारला गुरुवारी सादर केला जाणार आहे. त्यावर सरकार काय निर्णय घेते, यावर सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यांवर उभ्या राहिलेल्या इमारतींचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सात नागरी सुविधा केंद्र सुरू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने पारदर्शक कारभाराच्या दिशेने पहिले पाऊल टाकले असून, बुधवारपासून ४५ सेवा ऑनलाइन देणाऱ्या नागरी सुविधा केंद्राचा शुभारंभ केला आहे. महापौर रंजना भानसी, आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या हस्ते महापालिकेच्या मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्राचे उद््घाटन करण्यात आले. बुधवारी मुख्यालयासह सात नागरी सुविधा केंद्रांचा शुभारंभ झाला. या सुविधा केंद्रामध्ये विविध कर भरण्यासह, जन्म-मृत्यूचे दाखले, नगररचना विभागाच्या परवानग्यांसह नागरिकांना तक्रारी करता येणार आहेत.

सुरुवातीला सहा मह‌िने येस बँकेच्या मदतीने ही सुविधा मोफत राहणार असून, त्यांनतर मात्र शुल्क आकारले जाणार आहे. शहरात एकूण २२ नागरी सुविधा केंद्रे कार्यान्व‌ित केली जाणार आहेत. महापालिकेच्या वतीने घरपट्टी आणि पाणीपट्टी, विविध कर वसुली याबरोबरच जन्म-मृत्यूचे दाखले, भोगवटा प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, बांधकाम परवानग्या, अग्निशमन दल परवाने, हॉस्प‌िटल्स नूतनीकरण दाखले अशा विविध प्रकारच्या ४५ सेवा दिल्या जातात. या प्रमाणपत्रांसाठी कागदपत्रे मुख्यालय किंवा सक्षम अधिकाऱ्यांकडे देण्यासाठी नागरिकांना या कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. त्यातच या सेवांसाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून पैसे माग‌ितले जातात. येथून भ्रष्टाचाराला वाव मिळतो. त्यामुळे पारदर्शक कारभारासाठी नागरिक आणि महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील संवाद कमी करण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी नागरी सुविधा केंद्राचा प्रस्ताव सादर केला होता. त्याची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली आहे. महापालिका मुख्यालयातील स्वागत कक्षात या नागरी सुविधा केंद्राचा शुभारंभ महापौर रंजना भानसी यांचे हस्ते झाला. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, आयुक्त अभिषेक कृष्णा, गटनेते शाहू खैरे, सलीम शेख, संभाजी मोरुस्कर, गजानन शेलार तसेच नगरसेवक अजय बोरस्ते, यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात १६ नागरी सुविधा केंद्रे कार्यान्वित होणार आहेत. त्यामध्ये मनपा मुख्यालय, तसेच ६ विभागीय कार्यालये व ९ उपकार्यालयांचा समावेश आहे. येत्या दोन दिवसांत नऊ उपकार्यालयांत नागरी सुविधा केंद्रे कार्यान्वित होतील. या नागरी सुविधा केंद्रात मनपामार्फत जवळपास ४५ सेवा पुरविण्यात येणार असून, यामध्ये मनपास येस बँकेचे सहकार्य मिळाले आहे. येस बँकेने सदर नागरी सुविधा केंद्र चालविणेकामी विनामूल्य मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले आहे. या नागरी सुविधा केंद्रामध्ये येस बँकेमार्फत कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्याकरीता बँकेमार्फत डेब‌िट व क्रेड‌िट कार्डद्वारे नागरीकांना करभरणा करणेकामी प्रत्येक नागरी सुविधा केंद्रास प्रत्येकी एक मशिन उपलब्ध करुन दिले आहे. शहरात एकूण २२ नागरी सुविधा केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहेत. सद्य:स्थितीत नागरी सुविधा केंद्रे ही प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली असून, ही केंद्रे व्यवस्थितरित्या कार्यान्वित झाल्यानंतर भविष्यात त्याचा विस्तार वाढविण्यात येईल.

ऑनलाइन सुविधा

नागरिकांना या सुविधा केंद्रामुळे एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे दाखले व परवानग्या उपलब्ध होणार आहेत. या नागरी सुविधा केंद्राबरोबर मनपाने या सेवा नागरिकांना ऑनलाइनही उपलब्ध करुन दिल्या आहेत. नागरिक हे ऑनलाइनदेखील अर्ज भरू शकतात. त्याप्रमाणे विविध दाखले व परवानग्यांसाठी आवश्यक फीचा भरणाही ऑनलाइन करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. प्रथमत: १६ सेवा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत व सर्व ४५ सेवा येत्या १५ दिवसांत ऑनलाइनदेखील नागरिकांना उपलब्ध होतील. ऑनलाइन सुविधेसाठी www.cfc.nmcutilities.in या वेबसाइटद्वारे नागरिकांना त्यांनी सादर केलेल्या अर्जांचे व परवानगीचे स्टेट्स दिसण्याची सुविधा करुन दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेशिस्त वाहनधारकांचा ‘तोरा’ कायम

$
0
0

म. टा प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा न्यायालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील व्यावसायिकांची उचलबांगडी करून प्रशासनाने सीबीएस परिसरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला खरा. परंतु, अनेकदा या रस्त्याचा निम्माअधिक भाग पोलिसांची वाहनेच अडवित असल्याचे पाहून बेशिस्त वाहनधारकही रस्त्यावरच वाहने उभी करण्यात धन्यता मानू लागले आहेत. विशेष म्हणजे सरकारी सुटीच्या दिवशीच हा रस्ता मोकळा श्वास घेत असल्याचे पहावयास मिळते.

सीबीएस येथील वाहतुकीची समस्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. विद्यार्थी, नागरिक यांना जीव मुठीत घेऊनच या रस्त्यावर थांबावे लागते. कोर्टाबाहेरील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी तेथील व्यावसायिकांची दुकाने हटविण्यात आली. कोर्ट ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर वाहने उभी करण्यासही मज्जाव आहे. या मार्गावर कुंपणाला लागूनच कुणी वाहने उभी करू नयेत यासाठी रस्त्याच्या मधोमध दोरी बांधण्यात आली. त्यामुळे या संबध रस्त्यावरील निम्म्याहून अधिक जागेचा उपयोगच होत नाही. वाहनधारकांनी तेथे वाहने उभी करू नयेत, या उद्देशाने ही दोरी बांधली असली तरी या दोरीच्या बाहेर नागरिक वाहने उभी करू लागली आहेत. त्यामुळे आधीच अरुंद ठरणारा हा रस्ता अधिकच अरुंद ठरत असून त्यामुळे येथे सातत्याने वाहतुकीचा बोजवारा उडतोच आहे.

विशेष म्हणजे मोर्चांच्या बंदोबस्तासाठी येणारे पोलिस अधिकारीच सरकारी वाहने उभी करीत असल्याने अन्य वाहनधारकांनाही रान मोकळे ठरते आहे. रस्त्याचा निम्म्याहून अधिक भाग अशी वाहनेच अडवित असल्याने अन्य वाहनधारकांना अडथळ्यांची शर्यत पार करीतच पुढे जावे लागते.

पावती फाडावी लागू नये म्हणून..

जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे अनेक लोक कार किंवा तत्सम वाहने आणतात. अशा वाहनांना जिल्हाधिकारी कार्यालयात उभी करण्याची सोय आहे. परंतु, त्यासाठी वाहनधारकाला पावती घ्यावी लागते. वाहन उभे करण्यासाठी पैसे मोजावे लागू नयेत यासाठी लोक रस्त्यावरच वाहने उभी करणे पसंत करतात. पोलिसही या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाहनधारकांचे फावत असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाघाट दिसू लागला स्वच्छ, निर्मळ!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोदावरीत प्रदूषण करू नका, असे सलग तीन दिवस प्रबोधन आणि त्यानंतर चौथ्या दिवशी दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाल्याने गोदाघाट स्वच्छ आणि पात्रातील पाणी निर्मळ दिसू लागले आहे. बुधवारी गोदापात्रात टॉवेल धुणाऱ्या एका भाविक महिलेला पोलिसांच्या ताब्यात देऊन तिच्याकडून एक हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

दंडात्मक कारवाईच्या धाकाने रामकुंड ते टाळकुटेश्वर पुलापर्यंतचा परिसर स्वच्छ दिसला. विशेष म्हणजे बुधवारच्या बाजाराच्या दिवशी या परिसराची होणारी अस्वच्छता दिसली नाही ही बाब चर्चेची ठरत होती.

बुधवारी महापालिकेच्या सुरक्षा पथकांनी रामकुंड ते टाळकुटेश्वर पुलापर्यंतच्या भागात तैनात करण्यात आल्याने या भागात कोणी गोदापात्र अस्वच्छ करण्याचा प्रयत्नदेखील केला नाही. उपायुक्त रोहिदास दोरकुळकर हे स्वतः गोदापात्राच्या परिसरात फिरून प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याने सुरक्षा रक्षकही अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहेत. त्याच्या या करड्या नजरेमुळेच गोदापात्राचे रुपडे पालटलेले दिसत आहे.
पाण्यात पडलेला कचरा, निर्माल्यही तत्परतेने बाहेर काढला जात असल्याने पाणी एकदम निर्मळ दिसू लागले आहे. बुधवारचा बाजार असूनही परिसरात स्वच्छता होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात एप्रिलअखेर पतसंस्थांचा रणसंग्राम!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एप्रिल महिन्याच्या अखेरीला व मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील ६० पतसंस्थांसाठी ‌जिल्हा उपनिबंधकांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

या प्रक्र‌ियेतील काही पतसंस्थांसाठी बुधवारपासून पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. सन २०१६-१७ ते २०२१-२२ या कालावधीसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ४ फेब्रुवारी २०१७ रोजी काही बँकांच्या निवडणुकीची प्रक्रिया ज्या टप्प्यावर होती, तेथून पुढील प्रक्र‌ियेसाठी जिल्हा उपनिबंधक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी हा सुधारीत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात काही पतसंस्थांची प्रक्र‌िया सुरू होऊन नामनिर्देशनपत्र दाखल होऊन या पत्रांच्या यादीचे प्रकाशनही करण्यात आले होते. यानंतर पत्रांची छाननी होऊन विधीग्राह्य नामनिर्देशपत्रांची सूची प्रसिध्द करण्यात आली होती. या प्रक्र‌ियेपर्यंत जिल्ह्यातील ३९ पतसंस्था पोहचल्या होत्या. या प्रक्र‌ियेच्या पुढील टप्प्यात नामनिर्देशपत्र मागे घेण्यास ५ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत १५ एप्रिल आहे. १७ रोजी चिन्हांचे वाटप करण्यात येईल. ३० रोजी मतदान होणार आहे. हा निवडणूक कार्यक्रम जिल्ह्यातील ३९ संस्थांना लागू असेल. ३० एप्रिलला मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासाने मतमोजणीस सुरुवात होणार आहे.

या पतसंस्थांची निवडणूक
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित
स्कूल ऑफ आर्ट‌िलरी एम्प्लॉईज को ऑपरेट‌िव्ह क्रेडिट सोसायटी लि. देवळाली गाव,
श्रीहरि ओम अर्बन को ऑप. सोसायटी लि. नाशिक
श्री गुरूप्रसाद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, नाशिक
पाथर्डी विविध कार्यकारी सहकारी पतसंस्था मर्यादीत, पाथर्डी
दि सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्था, नाशिक
दि टेल‌िफोन एम्प्लॉईज को ऑप क्रेडिट सोसायटी लि. नाशिक
एअर फोर्स सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादीत, ओझरमिग,
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना कायम कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादीत, विठेवाडी

विश्वास बँकेसाठी ७ मे रोजी मतदान
येथील विश्वास को. ऑपरेट‌िव्ह बँकेसाठी ७ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी ५ या वेळेत मतदान होणार आहे. यासाठी ५ एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली असून, ही प्र्रक्र‌िया १० एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. ११ एप्रिलला या पत्रांची छाननी होणार असून, उमेदवारांना २७ एप्रिलपर्यंत निशाण्यांचे वाटप होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवासी रेल्वे गाड्यांत झळकणार मेनूकार्ड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

मध्य रेल्वेच्या विभागीय सल्लागार समितीचे सदस्य रतन चावला यांनी प्रवाशांना पेंट्रीमधून मिळणाऱ्या पदार्थांचे दर माहित असणे गरजेचे असल्याबाबतचे निवेदन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना दिले होते. त्याची दखल रेल्वे मंत्रालयाने तशा सूचना सर्व विभागीय कार्यालयांत दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

रेल्वेतील अन्न पदार्थांचे अव्वाच्या सव्वा दर आकारून प्रवाशांची लूट होत आहे. यातून अधिकाधिक काळा पैसा त्यांना मिळत असून त्यामुळे रेल्वे बदनाम होत आहे. मेनू कार्डमुळे रेल्वेमध्ये पेन्ट्री कारच्या कंत्राटदारांकडून प्रवाशांची लूट थांबेल व प्रवाशांना योग्य दरात गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थ उपलब्ध होण्यास मदत होईल. रेल्वे मंत्रालयाने पेन्ट्री कारबाबत गांभीर्याने दखल घेतली असून, यापुढे प्रत्येक प्रवाशी गाडीत सुधारित दरपत्रक प्रदर्शित करणे हे सक्त‌ीचे केले आहे. प्रवाशांना आरोग्यदायी पदार्थ किफायतशीर दरात देणे व त्याचे अधिकृत बिल संबंधित प्रवाशास उपलब्ध करून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांनी ही व्यवस्था आपल्या माध्यमातून देखरेखीखाली अधिक बळकट करणे अनिवार्य असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आल्याची माहिती चावला यांनी दिली. २६ जुलैला रेल्वे मंत्रालयाला कळवलं होतं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंगळेंना नाशिकमध्ये प्रवेशबंदी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता व बोनसची रक्कम लाटून बेहिशेबी मालमत्ता जमवत असल्याच्या आरोपाखाली २१ डिसेंबर २०१६पासून अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार व बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. चार महिन्यांसाठी नाशिक शहराबाहेर रहायचे, खटला संपेपर्यंत एपीएमसीच्या कारभारात सहभागी व्हायचे नाही आणि हस्तक्षेपही करायचा नाही, अशा अटी घालून न्या. मृदुला भाटकर यांनी ४० हजार रुपयांच्या हमीदारावर पिंगळेंना जामीन दिला.

आरोपी पिंगळे हे काही सराईत गुन्हेगार नाहीत. त्यांच्यावर हे आरोप राजकीय द्वेषातून झालेले आहेत. शिवाय या प्रकरणात पोलिसांनी तपास पूर्ण करून कनिष्ठ न्यायालयात आरोपपत्रही दाखल केलेले आहे. अशा परिस्थितीत त्यांना तुरुंगात आणखी डांबून ठेवणे संयुक्तिक नाही. शिवाय भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखालील प्रकरणात आरोपीला खटला प्रलंबित असताना इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत डांबून ठेवणे आवश्यक नसते, असे उच्च न्यायालयानेच विविध खटल्यांत स्पष्ट केलेले आहे, असा युक्तिवाद पिंगळे यांच्या वतीने अॅड. अनिकेत निकम यांनी मांडला. तर पिंगळेंना जामिनावर मोकळे सोडल्यास ते साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, असा युक्तिवाद करत सरकारी वकिलांनी विरोध दर्शवला. अखेर न्या. भाटकर यांनी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर पिंगळे यांना सशर्त जामीन मंजूर केला.

या प्रकरणी झाली होती अटक

२५ ऑक्टोबर २०१६ रोजी नाशिकमधील सुमंगल कौशल्य हॉलजवळ सापळा रचून एसीबीने एका खासगी कारला थांबवून छापा टाकला असता त्यात काही गोण्यांमध्ये ५७ लाख ७३ हजार २०० रुपयांची रोकड आढळली होती. या पैशांबाबत कारमधील अरविंद जैन, विजय निकम व दिगंबर चिखले यांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने त्यांना अटक करून चौकशी केली असता ही रक्कम पिंगळे यांच्याकडे नेण्यात येत असल्याचे उघड झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भय बिबट्याचे संपत नाही…

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

दोन दिवसांपूर्वीच तारुखेडले येथील शेतवस्तीतून बिबट्याने पाच वर्षाच्या बालिकेला उचलून नेल्यामुळे तालुक्यातील गोदाकाठ दहशतीखाली आला आहे. येवला वन विभागाने तारुखेडले येथील शेतात दोन पिंजरे लावले असले तरीही या भागातील लोकांमध्ये बिबट्याची प्रचंड भीती भरली आहे. दरम्यान, वनविभागाचा ताफा घटनास्थळी पिंजरा लावत असतांना मयत बालिकेच्या कुटुंबीयांना शोक अनावर झाला होता.

तारुखेडले येथे सोमवारी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिका ठार झाल्याची घटना घडली होती. या गावातील ही दुसरी घटना आहे. शरद जगताप यांच्या शेतातील अशोक हाडगे या शेतमजुराच्या पाच वर्षाच्या मुलीला बिबट्याने ओढून नेले होते. शोध घेतला असता घरापासून काही तिचा मृतदेह आढळून आला होता.

मंगळवारी नाशिकचे पूर्व वन विभागाचे उपवनसंरक्षक रामनुजम यांनी तारुखेडले येथे गुड्डी हांडगे हिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. वन विभागाच्या नियमानुसार शासकीय मदत तातडीने मिळवून देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी सहाय्यक वनसंरक्षक कापसे, येवला वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे, राजापूरचे वनपाल ए. पी. काळे, प्रसाद पाटील उपस्थित होते. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने तारुखेडलेत शरद जगताप यांच्या शेतात दोन पिंजरे लावले आहेत.

ग्रामस्थांचा संताप

नागरिकांच्या ज‌िवावर उठलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी जर पिंजरा लावायचा असला तर वनविभागाकडून लवकर परवानगी मिळत नाही. मिळालीच तर पिंजरा लावण्यापासून, पिंजऱ्यात भक्ष्य ठेवणे, बिबट्या पकडला गेला तर वनविभागाला कळवणे हे सारे ग्रामस्थांनाच पहावे लागते, असे उद्धव जगताप यांनी सांगितले. वनविभागाच्या धोरणावर त्यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

वनविभागाचा वेळकाढूपणा

बिबट्याचा हल्ल्याने निफाड तालुक्यातील गोदाकाठी वस्तीवर राहणारे शेतकरी, शेतमजूर हे प्रचंड दहशतीखाली आले आहेत. आतापर्यंत आठ कोवळ्या ज‌िवांना बिबट्याने भक्ष्य केले आहे. त्यामुळे एका बाजूला बिबट्याची दहशत तर दुसऱ्या बाजूला वनविभागाचा वेळकाढूपणा यामुळे नाग‌रिकांमध्ये प्रचंड संताप होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लालफितीत अडकला सीसीटीव्हीचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्यातील अतिसंवेदनशील शहर अशी ओळख असलेल्या मालेगावात सुरक्षेच्या दृष्टीने वर्षभरापूर्वी मनपाकडून शहरातील मुख्य भागात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी सन २०१६ - १७ च्या अंदाजपत्रकात ३० लाख रुपये इतकी तरतूदही करण्यात आली होती. मात्र या निर्णयाला एक वर्ष उलटले तरीही शहरात एकही सीसीटीव्ही लागलेला नाही. यासाठी करण्यात आलेली तुटपुंजी तरतूद, शासनाकडून अतिरिक्त निधीची प्रतीक्षा आणि लालफितीच्या कारभारात हा निर्णय अडकला आहे.

शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित व्हावी यासाठी शहरातील अनेक संघटना, सामाजिक संस्था, नगरसेवक, पोलिस प्रशासन यांच्याकडून मागणी केली जात होती. या मागणीची दखल घेत महापौर हाजी मोह. इब्राहीम यांनी सन २०१६-१७ च्या मनपा अंदाजपत्रकात यासाठी ३० लाख रुपयांची तरतूद केली होती. तसेच शहरात कोणत्या भागात हे कॅमेरे बसवावेत याबाबत पोलिसांकडून जागांचे प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यानुसार सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकूण २७६ सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव मनपाला देण्यात आला होता.

हा प्रस्ताव मात्र एक वर्षाभरापासून धूळखात पडला आहे. आयुक्त रवींद्र जगताप यांनी अंदाजपत्रकीय तरतुदीनंतर सं‌बंधित यंत्रणेकडून माहिती घेतली असता उच्च दर्जाचे सीसीटीव्ही बसवण्यासाठी अपेक्षित खर्च कोटीच्या घरात असून पालिकेकडून करण्यात आलेली तरतूद तुटपुंजी असल्याचे समोर आले. यासाठी अतिरिक्त निधीची मागणी करणारा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला. तसा प्रस्ताव देखील शासनाकडे पाठवण्यात आला आहे. दरम्यान शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाच्या शासननिर्णयानुसार पालिकेकडून संबंधित कंपनीसोबत पत्रव्यवहार करण्यात येऊन शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेचे प्रेझेंटेशन सादर करून घेण्यात आले. मात्र शासनाकडे पाठवण्यात आलेल्या अतिरिक्त निधीचा अद्यापही धूळखात पडून आहे. दरम्यान याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू असून, येत्या वर्षभरात ही यंत्रणा कार्यान्वित होईल, अशी माहिती आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव महापालिकेला नोटाबंदी लाभदायी!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महानगरपालिकेच्या गृहकर विभागाने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात घरपट्टी व पाणीपट्टी महसुलपोटी मार्चअखेर एकूण २० कोटी ७ लाख ४६ हजार रुपये इतका महसूल जमा केला आहे. सुमारे ४८ कोटीच्या उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ४२ टक्के इतकी करवसुली झाली असली तरी मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ५ कोटींची अधिक करवसुली झाल्याची माहिती येथील गृहकर अधीक्षक अखलाख अहमद यांनी दिली.

गेल्यावर्षी नोव्हेंवर महिन्यात झालेल्या नोटाबंदीचा निर्णय पालिकेच्या पथ्यावर पडल्याने त्यांच्या महसुलात चांगलीच वाढ झाली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर नोव्हेंबर २०१६ या एका महिन्यात पालिकेला घर व पाणीपट्टी महासुलापोटी सुमारे ८ कोटी ८० लाख ५० हजार रुपये जमा झाले होते. गेल्या वर्षातील ही सर्वाधिक वसुलीची रक्कम होती. चलनातून बंद केलेल्या पाचशे व एक हजाराच्या नोटा थकीत कर म्हणून नागरिकांनी पालिकेत भरण्यासाठी त्यावेळी गर्दी केली होती. पालिका प्रशासनाकडूनदेखील नागरिकांना थकीत कर भरण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे अन्य ठिकाणी जरी नोटाबंदीचा फटका बसलेला पाहायला मिळत असला तरी मालेगाव पालिकेच्या तिजोरीत मात्र विक्रमी महसूल जमा झाला आहे.

यानंतरदेखील गृहकर विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सातत्याने करवसुलीसाठी कार्यरत राहिल्याने मार्चअखेर गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ कोटीहून अधिक महसूल जमा झाला आहे. यंदा पालिकेचे कर्मचारी राज्यातील महापालिका निवडणुकांच्या तसेच येथील मनपाच्या मतदार याद्या, वार्डरचना या कामामध्ये सातत्याने अडकून राहिल्याने वसुलीला काही प्रमाणत फटका बसल्याचे दिसते आहे. अन्यथा ही वसुली ५० टक्कांहून अधिक राहिली असती असा अंदाज आहे. गृहकर विभागाने ११ कोटी ८० लाख ४३ हजार इतकी घरपट्टी तर ८ कोटी २७ लाख २ हजार इतकी पाणीपट्टी वसूल केली आहे.

प्रभाग एक आघाडीवर

मार्च महिन्यात एकूण ३ कोटी ७१ लाख ७ हजार रुपये महसूल जमा झाला होता. यात प्रभाग क्र १ मध्ये सर्वाधिक ९ कोटी १५ लाख ४२ हजार ६२४ महसूल जमा झाला आहे. तर प्रभाग ४ मध्ये सर्वात कमी म्हणजेच २ कोटी ८७ लाख रुपये महसूल जमा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये आता सायकल शेअरिंग

$
0
0

बोस्टनच्या धर्तीवर प्रकल्प; गोल्फ क्लब मैदानापासून पायलट प्रोजेक्टला होणार सुरुवात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिकमध्ये शुक्रवारपासून बोस्टनच्या धर्तीवर सायकल शेअरिंग उपक्रम सुरू होणार आहे. टाटा कन्सल्टन्सीच्या सहकार्याने पायलट प्रोजेक्ट म्हणून गोल्फ क्लबवर या सेवेचा शुभारंभ होणार आहे. स्वयंचलित वाहनांचा अधिकाधिक होणारा वापर व त्यातून निर्माण होणारे हवा व ध्वनी प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी नाशिक शहरात शेअरिंग सायकलचा उपक्रम राबविला जाणार आहे.

स्मार्ट सिटी आराखड्यात पॅनसिटी उपक्रमांतर्गत बोस्टनच्या धर्तीवर शेअरिंग सायकलचा पर्याय सुचविण्यात आला आहे. स्मार्ट सिटी साकारताना रस्त्यांवर सायकलसाठी स्वतंत्र ट्रॅकनिर्मिती केली जाणार आहे. तत्पूर्वी, नागरिकांना सायकल चालविण्यासाठी प्रवृत्त करणे, प्रदूषणाला आळा घालणे व सायकलिंगच्या माध्यमातून व्यायामासाठी प्रवृत्त करणे या तिहेरी हेतूने प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. टीसीएसच्या डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर इनोव्हेशन फॉर सोशल इम्पॅक्ट अंतर्गत यावर काम करण्यात आले आहे. स्टार्टअप इंडियांतर्गत पेडल टिमने सायकल शेअरिंगचा हा आराखडा तयार केला आहे. त्यासाठी संपूर्ण शहरभर सर्वेक्षण करण्यात आले.

टीआय कंपनीच्या वतीने सायकलपुरवठा होईल. शहरात सध्या सायकल कुठल्या मार्गावर आहे याचे लोकेशन जीपीएसद्वारे मोबाइलवर दिसेल, अशी माहिती टीसीएसचे संदीप शिंदे यांनी महापालिकेत सादरीकरणादरम्यान दिली. यावेळी महापौर रंजना भानसी, भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर व शहर अभियंता यू. बी. पवार उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात सहा सायकल

प्रायोगिक तत्त्वावर गोल्फ क्लब मैदानावर सायकल शेअरिंग उपक्रम राबविण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात सहा सायकल शेअरिंगसाठी उपलब्ध राहतील. शेअर सायकलचा वापर करणाऱ्यांना प्रथम आधार कार्डद्वारे नोंदणी करावी लागेल. त्यानंतर संबंधितांना स्वाइप कार्ड दिले जाईल. पहिल्या अर्धा तासासाठी दहा रुपये, तर त्यापुढे ठराविक दर आकारले जातील.

तीन ठिकाणी चाचपणी

गोल्फ क्लब मैदानावर प्रायोगिक तत्त्वावरील उपक्रम यशस्वी झाल्यानंतर टीसीएसच्या वतीने रामकुंड, गोदाघाट, तपोवन या ठिकाणीही ही सुविधा सुरू करता येईल काय याची चाचपणी केली जात आहे. डिसेंबरपर्यंत त्याला अंतिम रूप दिले जाण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये प्रथमच शेअरिंग उपक्रम राबविण्यात येणार असल्याने नाशिककरांना उत्सुकता लागली आहे.

असा आहे प्रोजेक्ट

सायकलला जीपीएस सिस्टिम लावणार, बील ऑनलाइन भरता येणार, वापरकर्त्यांना एकदा नोंदणी करावी लागणार, शहरातील तीन भागांत टप्प्याटप्प्याने सेवा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाषेचा पेपर ५०० रुपयांना?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावी, बारावीच्या परीक्षांचे तसेच इतर महत्त्वाचे पेपर सोशल मीडियाच्या माध्यमातून वा प्रत्यक्षपणे फुटल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. मात्र, आता चक्क शालेय परीक्षांचेच पेपर फुटल्याचे समोर येत आहे. गुरुवार, ६ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी २ या परीक्षेचे पेपर बुधवारी येथील एका प्रतिष्ठीत शाळेतील शिक्षिकेने चक्क ५०० रुपयांना भाषा विषयाचा पेपर विकल्याचे विद्यार्थ्यांनीच समोर आणून दिले आहे.

इयत्ता चौथीचे काही विद्यार्थी बुधवारी ट्युशनला गेले असता, ट्युशन चालविणाऱ्या बाई संकलित मूल्यमापन चाचणीच्या भाषा विषयाचे पेपर विकत असल्याचे समोर आले. ‘पालकांकडून पाचशे रुपये आणा व उद्या होणारा इंग्लिश विषयाचा पेपर घेऊन जा’, असे जाहिरपणे ती विद्यार्थ्यांना सांगत होती. हा प्रकार विद्यार्थ्यांनी ताबडतोब पालकांना सांगितला. पाहता पाहता हा विषय ट्युशनमधील सर्व पालकांना समजला. ‘तुम्हाला पेपर हवाय का?’ इथपर्यंत पालकांमध्येही चर्चा रंगल्या. याविषयी काही जागरुक पालकांनी नाव न सांगण्याच्या बोलीवर या बाबी ‘मटा’च्या निदर्शनास आणून दिली. हा प्रकार चौथीच्या ट्युशनमधील विद्यार्थ्यांनी समोर आणून दिला असला तरी पहिली ते आठवीपर्यंतचे पेपर गुरुवारी होणार असल्याने पेपरच्या गोपनियतेवर शंका व्यक्त केली जात आहे.

कसा सुधारणार शैक्षणिक दर्जा?

विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेचा दर्जा तपासण्यासाठी ही परीक्षा घेतली जात असताना शाळेतील शिक्षकांनीच या प्रकारची हेराफेरी करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न यामुळे उभा राहिला आहे. एकीकडे आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास करायचे नाही. दुसरीकडे गुणवत्ता तपासणीसाठी परीक्षा घ्यायच्या अन् शिक्षकांनी या परीक्षेचेही तीन तेरा वाजवायचे, अशा परिस्थितीत शिक्षण क्षेत्रात राज्याचा कितपत विकास होणार, अशा चर्चा यामुळे रंगल्या होत्या.

दहावी, बारावीच्या परीक्षांइतक्या या प्रश्नपत्रिका सील केलेल्या नसतात. शिक्षक याचा गैरफायदा घेऊन अशा गोष्टी करत असतील तर ते स्वीकारार्ह नाही. या शिक्षिका कोण आहेत, हे पालकांनी आमच्या समोर पुराव्यानिशी आणून दिल्यास आम्ही त्यांच्यावर कारवाई करु. - प्रवीण अहिरे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीत भरदिवसा घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीत भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून समारे ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला. ही घटना बुधवारी सकाळी घडली असून, या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कालिदास नारायण पटेल (रा. रौनक अपार्ट. रोहिणीनगर, पेठरोड) यांच्या याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पटेल कुटुंबीय बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र व सोनसाखळी असा सुमारे ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक मगर करीत आहेत.

सिडकोत घरफोडी

सिडकोतील दत्त चौकात चोरट्यांनी बंद घराचा कडी कोयंडा तोडून सुमारे २८ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरी केले. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. गजानन नामदेव गायखे (रा. स्वामी समर्थ केंद्रासमोर) यांच्या तक्रारीनुसार, गायखे कुटुंबीय मंगळवारी बाहेरगावी गेले होते. या दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले मंगळसूत्र, अंगठी व लॉकेट असा सुमारे २८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केला. घटनेचा अधिक तपास हवालदार हाळदे करीत आहेत.

सावरकरनगरला महिलेची चेन स्नॅचिंग

पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना सावरकरनगर भागात घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल केला आहे. संध्या अनिल लालसरे (रा. निरज हाईटस, विश्वास लॉन्सजवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शतपावलीसाठी लासरे घराबाहेर पडल्यानंतर ही घटना घडली. विश्वास बँकेसमोरील अथर्व मंगल कार्यालया समोरून पायी जात असताना दुचाकीवर भरधाव वेगात आलेल्या दोघा आरोपींपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबडले. यानंतर, लालसरे यांनी आराडाओरड केली. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले. या घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत. शहरात सातत्याने चेन स्नॅचिंग, घरफोड्या सुरूच आहेत.

चेतनानगरला तरुणाची आत्महत्या

चेतनानगर येथील रवीकिरण कॉलनीत राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अमोल सुकदेव कातकाडे, असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास अमोलने आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये अज्ञात कारणातून सिलिंग फॅनच्या हुकाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. घटनेचा अधिक तपास हवालदार भोजणे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन दिवसाआड सटाण्यात पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहराला पाणीपुरवठा करणारे ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रासह शहरातील आरम नदीपात्रही कोरडेठाक पडले आहे. शहरातील बहुतांश बोअरवेलचेही पाणी कमी झाले आहे. त्यातच चणकापूर धरणातून मिळणारे आवर्तनही लांबल्याने सटाणा नगरपालिकेने शहरवासीयांना तब्बल तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरात पाण्यासाठी आणीबाणी सुरू झाली आहे.

उन्हाळा म्हटला की सटाणा शहराला पाणीटंचाई नवीन नाही. मात्र गत वर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे जानेवारीत जाणवणारी पाणीटंचाई यंदा तब्बल दोन ते तीन महिने लांबली आहे. असे असले तरी पाणीसाठ्यात होणारी घट आणि येणारे तीन महिने कसे काढायचे, असा प्रश्न आता सटाणावासीयांना पडला आहे.

सटाणा शहराला ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रातून पाणीपुरवठा होतो. गिरणा नदीपात्रात चणकापूर व पुनद धरणातून पाणी सोडण्यात येते. याशिवाय दुसरा पर्याय तालुक्यातील केळझर धरणातील पाणीसाठा आहे. या धरणातून आरम नदीपात्राद्वारे शहराला पाणीपुरवठा होतो. नदीला पाणी सोडले की बोअरवेलला लाभ होऊन पाणीपुरवठा दैनंदिन केला जातो. तसेच गत महिन्यापर्यंत शहराला केळझर व पुनद धरणातून आवर्तन मिळाले. त्यामुळे मार्च महिन्यात पाण्याची दाहकता जाणवली नाही. मार्चअखेर तापमान वाढले आणि पाण्याचे आवर्तन संपले. त्यामुळे पाणीटंचाई जाणवू लागली. पाण्याचे स्त्रोत कमी झाल्याने शहरवासीयांना एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता तब्बल तीन दिवसाआड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेंडू सरकारच्या कोर्टात!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झालेल्या गर्भपात प्रकरणाचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला सादर केला असून, या बाबतचा निर्णय सरकार घेईल, असे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक अर्चना पाटील यांनी स्पष्ट केले. पाटील यांनी बुधवारी चौकशी पूर्ण करून लागलीच हा अहवाल सरकारला सादर केला. दरम्यान, आरोग्य मंत्र्यांनी मुंबईत गुरुवारी आढावा बैठक घेतली. बैठक सुरू असताना आरोग्य मंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून गर्भपात प्रकरणाची माहिती घेतली.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भपात होत असल्याची माहिती २२ मार्च रोजी उघडकीस आली. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने एका गर्भपात प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर सिव्हिलमध्ये अवैध गर्भपात होत असल्याच्या वृत्तास पुष्टी मिळाली. या घटनेची गंभीर दखल राज्य सरकारने घेत राज्यस्तरीय समिती नियुक्त केली. या समितीच्या अहवालानंतर आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालिका अर्चना पाटील यांनीही बुधवारी कसून चौकशी केली. याबाबत पाटील यांनी सांगितले, की चौकशी अहवाल लागलीच राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. चौकशी अहवालानुसार राज्य सरकार निर्णय घेईल. तुर्तास याविषयी जास्त माहिती सांगता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आरोग्य उपसंचालिका लोचन घोडके, सिव्हिल सर्जन सुरेश जगदाळे यांनी गुरुवारी मुंबईला हजेरी लावली. आरोग्यमंत्री दीपक सांवत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. बैठकी दरम्यान, निफाड, पिंपळगाव बसवंत येथील हॉस्पिटलच्या इमारतींसह विभागातील काही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली. याच दरम्यान, आरोग्यमंत्र्यांनी गर्भपात प्रकरणी माहिती घेतली.

डॉ. लहाडेंवर कारवाई निश्चितच

सूत्रांच्या माहितीनुसार, सिव्हिलमधील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील प्रमुख संशयित डॉ. वर्षा लहाडे या सरकारी नोकरीत असताना त्यांनी खासगी हॉस्पिटल सुरू केले होते. तसेच गर्भपात प्रकरणातही काळेबेरं असल्याने त्यांच्यावर निश्चितच कारवाई होऊ शकते. या कारवाईचे स्वरूप लवकरच स्पष्ट होईल, असे संबंधितांनी स्पष्ट केले.

पोलिस उपायुक्तांकडे तक्रार

महापालिका अधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या चौकशीनंतर डॉ. वर्षा लहाडे यांच्याकडून धमक्या येत असल्याची तक्रार महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील डॉ. चिरमाडे यांनी पोलिस उपायुक्तांकडे केली अाहे. डॉ. लहाडे यांच्या हॉस्पिटलची तपासणी थांबवावी. अन्यथा तुमच्यावर अॅट्रोसीटी, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी धमकी डॉ. लहाडे यांच्याकडून देण्यात येत असल्याचे डॉ. चिरमाडे यांनी दिलेल्या तक्रार अर्ज नमूद करण्यात अाले अाहे. दरम्यान, १५ मार्चपासून खासगी हॉस्पिटलची तपासणी सुरू असून, यासाठी पोलिस बंदोबस्त मिळावा, असा अर्ज पोलिस आयुक्तांकडे दिला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी विजय डेकाटे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महसूल अधिकारीही करणार श्रमदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण गावात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केलेली श्रमदानाची चळवळ आता मालेगाव महसूल व पंचायत समितीच्या आधिकारी, कमर्चाऱ्यांनी पुढे सुरू नेण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील निराधार महिलांना शौचालय बांधून देण्याचा उपक्रम तालुक्यातील अधिकाऱ्यांनी हाती घेतल्याची माहिती प्रांताधिकारी अजय मोरे यांनी दिली.

निराधार महिलांना शौचालय बांधून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी केलेले श्रमदान चर्चेचा विषय ठरला होता. यातून प्रेरणा घेत तालुक्यातही असाच उपक्रम राबविण्याचा संकल्प मोरे यांनी केला आहे. त्यासाठी पंचायत समितीद्वारे तालुक्यातील निराधार महिलांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार असून, त्यानंतर लाभार्थ्यांची यादी निश्चित केली जाईल. लाभार्थी यादी निश्चित झाल्यावर संबंधित लाभार्थी महिलेकडे स्वतः येथील महसूल व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी श्रमदान करून खड्डे खोदण्याचे काम हाती घेणार आहेत. येथील पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी यांनी तालुका हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, स्वच्छ भारत अभियानांततर्गत त्यासाठी प्रारंभी जनजागृती करण्यात आली. शौचालय निर्मितीच्या प्रोत्साहनासाठी टमरेल जप्ती अभियानदेखील राबविण्यात येत आहे. उघड्यावर शौचास बसणाऱ्या ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तोरंगण गावात जिल्हाधिकाऱ्यांनी तोरंगण गावाला भेट देऊन गावातील निराधार महिलांना वैयक्तिक शौचालय उभारणीसाठी आवश्यक त्या आकाराचे खड्डे खोदून दिले. याचप्रमाणे इतर ग्रामस्थांनाही शौचालयासाठी श्रमदान करण्याचा संदेश दिला. त्याच धर्तीवर तालुक्यात देखील असा उप्रक्रम हाती घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये ईव्हीएमसाठी गोडाऊन

$
0
0

नाशिक : देशभर मतदानासाठी ईव्हीएम मशिनऐवजी मतपत्रिका वापरण्याची मागणी सुरू असतानाच, नाशिकमध्ये १८ कोटी रुपये खर्च करून ईव्हीएम मशिन ठेवण्यासाठी सयद पिंप्री येथे गोडाऊन बांधले जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्याच्या निवडणुकीसाठी लागणाऱ्या मशिन सुरक्षित ठेवण्यासाठी ३००० चौरस मीटरचे हे गोडाऊन असणार आहे. त्याच्या मंजुरीकामाच्या हालचाली सुरू झाल्या आहे. वर्षभरात हे काम करायचे असल्याने त्यासाठी २० हजार चौरस मीटर जागेची मागणी केली असून, त्याचे एस्टिमेट सार्वजनिक बांधकाम विभागामार्फेत बनवले जात आहे. या गोडाऊनमध्ये पार्किंग, वॉल कंपाऊंड, सुरक्षाव्यवस्था असे सगळेच असणार आहे.

देशभर असे गोडाऊन बांधले जाणार असून, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला हे निर्देश देण्यात आले आहेत. याअगोदर लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी इतर राज्यातून मशिन मागवण्यात येत होत्या. पण आता या मशिन नाशिकमध्येच राहणार असून, त्या सर्व नवीन स्वरूपाच्या असतील. या गोडाऊनमध्ये बॅलेट युनिट ६३००, कंट्रोल युनिट ५३०० व व्हीव्हीपॅट (मतदान झाल्यानंतर रिसीट देणारे मशिन) ५३०० असणार आहेत. त्याचप्रमाणे या गोडाऊनमध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकीची मतमोजणी करता यावी यासाठी ७५० चौरस मीटरचा हॉलही तयार करण्याचा प्लॅन आहे. देशभरात १३ लाख मशिन असणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षितेसाठी ही खासव्यवस्था येत्या काळात होणार आहे. या नव्या स्वरुपाच्या मशिनमध्ये मतदान झाल्यानंतर रिसीट सुध्दा येणार आहेत.

लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी लागणाऱ्या मशिनच या गोडाऊनमध्ये असतील. राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत असलेल्या मशिन येथे नसतील. महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका, नगरपंचयात व ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वापरत असलेल्या मशिन या राज्य निवडणूक आयोगाच्या असतात. त्यामुळे पुढे मुख्य निवडणूक आयोगाने याच मशिन वापरण्यास सांगितले तर या गोडाऊनचा दुहेरी फायदा होणार आहे.

सुरक्षिततेसाठी उपाय

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसह पाच राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका तसेच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान ईव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याच्या आरोप करण्यात आला. ईव्हीएममध्ये छेडछाड करणे शक्य असल्याचा दावाही करण्यात आलेला आहे. या मशिन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असल्याने त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे नवीन मशिन त्याच जिल्ह्यात राहणार आहेत. त्यामुळे हा गैरप्रकार टाळण्यासाठी स्थानिक पातळीवरच हे गोडाऊन उभे करून त्याची जबाबदारी देण्याची ही कल्पना पुढे आली असण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ते’ झाड दुभाजकातील नव्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारी झाडे नुकतीच महापालिकेने काढली आहेत. ही झाडे काढताना सिटी सेंटर मॉल येथील दुभाजकांमध्ये असलेल्या झाडांची कत्तल झाली असल्याचा आरोप काही वृक्षप्रेमींनी केला होता. या पार्श्वभूमीवर मनपाचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. या ठिकाणी दुभाजकांमधील झाडे काढण्यात आली नसून, दुभाजकाला लागून असलेली वाहतुकीला अडथळा ठरणारी झाडे काढण्यात आली आहेत.
शहरातील पेठरोड, गंगापूरोड परिसरात असलेल्या झाडांमुळे अनेक अपघात झाले होते.

या झाडांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. ही बाब मनपाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने काही झाडे काढण्यास परवानगी दिली. ही झाडे काढताना मनपाने वृक्षप्रेमी नागरिकांना देखील विश्वासात घेतले होते. त्याबाबत महापालिकेत बैठक देखील घेण्यात आली होती. त्यानुसार शहरात वाहतुकीला अडथळा ठरणारी झाडे काढण्यात आली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी सिटी सेंटर येथील दुभाजकामध्ये असलेली झाडे तोडल्याचा आरोप काही वृक्षप्रेमींनी केला होता. त्यावर मनपा आयुक्तांनी स्वतः जाऊन पाहणी केली होती.

या ठिकाणी तोडण्यात आलेले झाडे हे दुभाजकात नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. झाडे काढताना कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येत असून, आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. झाडे तोडताना कर्तव्यात कसूर केलेल्या अधिकाऱ्यांवर वेळ पडल्यास कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिलाे. ते झाड दुभाजकामध्ये नसून रस्त्यात वाहतुकीला अडथळा ठरणारे होते, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरांनाही समजून घ्यावे...

$
0
0


आज, शुक्रवारी (दि. ७ एप्रिल) असलेल्या जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)चे राज्य अध्यक्ष डॉ. अशोक तांबे आयएमए, नाशिकच्या एका सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. या औचित्याप्रसंगी समाजाच्या आरोग्याचा कणा जपणाऱ्या डॉक्टर या घटकाविषयी त्यांच्याशी साधलेला हा खास संवाद...

•जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक आरोग्यरक्षणाबद्दल काेणता संदेश द्याल?

➤ सद्यःस्थितीत समाजासमोर नैराश्याचे मोठे आव्हान उभे आहे. आधुनिक जीवनशैलीने माणसाचे जीवन बाह्य उपकरणांनी सुखी बनविले असले, तरीही त्याचे मन अस्वस्थतेकडे जास्त झुकत आहे. खुद्द डॉक्टरांसारखा वर्गही याला अपवाद नाही. तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणावर ही समस्या जाणवत आहे. परिणामी, यंदा आरोग्य दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटन (डब्ल्यूएचओ)नेदेखील ‘डिप्रेशन’ हीच संकल्पना निवडली आहे. कुठल्याही क्षणाने खचून न जाता सकारात्मक ऊर्जा आणि इच्छाशक्तीच्या बळावर मानसिक आरोग्य सुदृढ राखावे.•नैराश्याच्या समस्येसंदर्भात ‘आयएमए’कडे काही उपाययोजना आहेत का?

➤ डॉक्टर या व्यवसायापलाकडे नीतिमत्तेच्या संदर्भाने समाजाचे शारीरिक व मानसिक आरोग्य जपणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आगामी वर्षभरात राज्यभरात नैराश्याच्या स्थितीत बदल घडविण्यासाठी आम्ही जागोजागी प्रबोधनात्मक उपक्रम, जागृती करणारी व्याख्याने, सकारात्मक संदेश देणारी व्याख्याने आदी उपक्रम आयोजित करणार आहोत. राज्यात आमच्या संघटनेचे सुमारे ४० हजारांवर सभासद आहेत. आम्ही हे उपक्रम घेऊन राज्याच्या प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचू.•डॉक्टरांवरील हल्ले वाढले आहेत, ही गंभीर बाब आहे...

➤ होय , ही फारच गंभीर बाब आहे. या स्थितीत डॉक्टरांना कायद्याचे संरक्षण मिळणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. यासंदर्भात नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय कायदा निर्माण होण्याची मागणी आम्ही लावून धरली आहे. आग्रही मागणीनंतर सरकारी दवाखान्यांना संरक्षण पुरविले गेले, तसेच या दवाखान्यांमध्ये समुपदेशकांची नेमणूक व्हायला हवी. अनेकदा मूळ विषय समजावून न घेता पूर्वग्रहदूषित भूमिकेतून हे हल्ले होतात. अशा वेळी प्रक्षोभक प्रतिक्रिया देण्याऐवजी डॉक्टरांनाही समजावून घेऊन परिस्थिती संयमाने हाताळण्यासाठी स्थानिक नेत्यांनीही पुढाकार घ्यावा.•हल्ल्यांबाबत कायदा आणि समाजाकडून प्रमुख अपेक्षा कोणती?

➤ परदेशातील डॉक्टरांच्या तुलनेत आपल्याकडे डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायद्याचे विशेष संरक्षण नाही. शिवाय कडकपणाऐवजी किचकट कायदे निर्माण झाले आहेत. डॉक्टरांना दवाखाना किंवा रुग्णालय थाटण्यापासून ते यशस्वीपणे चालविण्यापर्यंत विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. हे कायदे सुलभ बनावेत. समाजानेही एखाद्या प्रसंगात पूर्वग्रह न बाळगता संवाद आणि समन्वयाद्वारे समस्या समजावून घ्यावी. संवादातून समस्येवर तोडगा काढावा. डॉक्टरांनाही बाजू असते, त्यांनाही समजावून घ्यावे.•रुग्णासाठी डॉक्टर हा देव असतो. मात्र, गर्भपातासारखे प्रकारही काहींच्या हातून राज्यात घडले हे नाकारता येत नाही...

➤ अशा प्रकरणांमध्ये दोषी असणाऱ्या डॉक्टरांचे समर्थन संघटना कधीही करणार नाहीत. डॉक्टरांचा व्यवसायास बदनाम करणारे काही नॉनमेडिकल लोकही अशा उद्योगांमध्ये आढळतात. यासंदर्भातील प्रत्येक दोषी घटकावर शासनाने कडक कारवाई करावी.•डॉक्टरांच्या संप कालावधीत अनेक रुग्णांचे जीवन संकटात सापडले...

➤ डॉक्टरांच्या संपात प्रामुख्याने वैद्यकीय विद्यार्थ्यांचा समावेश होता. अनेक केसेसमध्ये मानवतेच्या नात्याने डॉक्टरांनीही या काळात रुग्णांना सेवा दिली. मात्र, काही घटनांमध्ये डॉक्टरांची बाजू समजावून न घेता एकतर्फी चित्रण मांडण्यात आले. मानवता आणि रुग्णसेवेस कुठल्याही मुद्यापेक्षा प्राध्यान्य देणारे डॉक्टर्स आजही समाजात कार्यरत आहेत, हेही समाजाने समजून घ्यावे. पूर्वी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना अस्तित्वात होती. फॅमिली डॉक्टर ही घराशी ऋणानुबंध असलेली व्यक्ती झाली होती. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णाबाबत त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती समाज स्वीकारत होता. आता ही व्यवस्था रुग्णालयात परावर्तीत झाली आहे. डॉक्टर व रुग्ण यांच्यातील विसंवादाची दरी गैरसमजांमध्ये भर पाडते.•रुग्णालय म्हणजे नफेखोरी, असा रुग्णांचा दृष्टिकोन बनला आहे? आपला अनुभव काय?

➤ वैद्यकीय शाखेचे उच्च शिक्षण, अनुभव घेणे, दवाखाना वा रुग्णालयाची उभारणी, अत्यावश्यक साधनांची उपलब्धता, मनुष्यबळाची उभारणी या अफाट व्यापात केवळ नफा हे उद्दिष्ट नसते, तर सेवा येथे प्रमुखस्थानी असते. मात्र, ही वस्तुस्थिती समजावून न घेता पूर्वग्रहामुळे नफेखोरीचा आरोप थेटपणे केला जातो. पदरमोड करून गरजूंना सेवा देणारे डॉक्टर्स व रुग्णालये आजही आहेत.

(शब्दांकन ः जितेंद्र तरटे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचा स्थापना दिवस उत्साहात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवस शहरभर सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात पक्षाचा स्थापनादिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते विजय साने, सतीश शुक्ल, देवदत्त जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

वसंतस्मृती कार्यालयात प्रारंभी संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, शैलेश जुन्नरे, अरुण शेंदूर्णीकर, सतीश शुक्ल यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. भाजपा युवामोर्चाचे शहराध्यक्ष अजिंक्य साने यांनी प्रतिज्ञावाचन केले. यावेळी डॉ. प्रशांत पाटील, महिला मोर्चा शहराध्यक्षा रोहिणी नायडू, राजेंद्र कोरडे, उदय रत्नपारखी, डॉ. चंद्रशेखर नामपूरकर, डॉ. बसंतीलाल गुजराती, भारती बागूल आदि उपस्थित होते.

इंदिरानगर येथेही पक्षाचा स्थापनादिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सुनील देसाई, सुहास लेंभे, राजश्री शौचे, मंगेश नागरे, तुषार जोशी उदय जोशी, अवधूत कुलकर्णी आदि उपस्थित होते. प्रभाग क्र. १६ आणि प्रभाग क्र. १४ मध्येही स्थापनादिनाचा कार्यक्रम झाला. यावेळी द्वारका मंडलाचे अध्यक्ष सुरेश मानकर, कैलास वैशंपायन, अनिल ताजनपुरे, रवी भालेराव आदी उपस्थित होते. डी.जी.पी.नगर येथे ज्येष्ठ नेते सतीश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण झाले. तसेच विनय नगर, रथचक्र चौक आदी भागांतही पक्षाचा स्थापना दिवस धुमधडाक्यात साजरा झाला.

बिटको चौकात पेढेवाटप
भाजपचे नाशिकरोडचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील बिटको चौकात पेढे वाटून वर्धापन दिन साजरा केला. याप्रसंगी नाशिकरोड भाजप मंडलाध्यक्ष बाजीराव भागवत, युवा मोर्चा अध्यक्ष शांताराम घंटे, नगरसेविका सरोज आहिरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सातपूरला फूट
सातपूर भागात देखील भाजपचा वर्धापनदिन नगरसेविका माधुरी बोलकर यांनी पेढे वाटून साजरी केला. परंतु, यावेळी भाजपात एकी नसल्याचे दिसले. सातपूरचे मंडल अध्यक्ष राजेश दराडे यांनी तुरळक कार्यकर्ते घेत सातपूर कॉलनीच्या श्रीराम सर्कलवर भाजपा वर्धापनदिन साजरा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images