Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शेतकऱ्यांना हवी नोकरी, पेन्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाच्या मोजणीसाठी विरोध कायम ठेवला आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी शेतकऱ्यांशी संवाद साधला. जमिनीला प्रतिगुंठा सात लाख रुपये भाव, कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी, ज्येष्ठांना पेन्शनसह विविध मागण्या करण्यात आल्या. जिल्हाधिकारी आणि सरकारने लेखी आश्वासन दिले तरच मोजणी करू देऊ, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याने शनिवारी मोजणी होऊ शकली नाही.

समृद्धी महामार्ग या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. या जमिनींच्या सर्वेक्षणात अडथळे येऊ लागल्याने प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात हे काम सुरू केले आहे. इगतपुरी येथील शेतजमिनींचे सर्वेक्षण गुरुवारी पूर्ण झाले. त्यामुळे प्रशासनाने आता मोजणीसाठी सिन्नर तालुक्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. मोजणी करण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक शुक्रवारी शिवडे गावात पोहोचले. मात्र, शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर जाळून या मोजणीला तीव्र विरोध केला. त्यामुळे मोजणी होऊ शकली नाही. रविवारी पुन्हा शेतकऱ्यांची मनधरणी करून मोजणीला सुरुवात करण्यासाठी अधिकारी शिवडे गावात पोहोचले. तेथे शिवडे, घोरवड गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, शेतकऱ्यांचा विरोध आजही कायम राहिला. आमच्या जमिनी बागायती असून, त्यामध्ये आम्ही बाराही महिने पीक घेतो. त्यामुळे त्यांची कोणतीही किंमत होऊ शकत नाही. तरीही वाटाघाटीची वेळ आलीच तर जमिनींना योग्य मोबदला मिळायला हवा, असा पवित्रा शेतकऱ्यांनी स्वीकारला आहे. जमिनी देण्याची तयारी शेतकऱ्यांनी दर्शविली असली तरी त्यांना मागण्यांच्या पूर्ततेची लेखी हमी हवी आहे.

शेतीमधील पिकास योग्य मोबदला मिळावा, शेतीमधील झाडे, विहिरी, बोअर, पाइपलाइन, शेडनेट, फळबागा यांच्या योग्य मोबदल्याची मागणी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे केली. प्रकल्पात विहिरी जाणार असल्याने बारमाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, बाधित शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाप्रमाणे सरकारी नोकरी मिळावी, ठरेल ती रक्कम काम सुरू करण्यापूर्वी एकरकमी मिळावी, बाधित शेतकऱ्यांच्या आईवडिलांना किमान १० हजार रुपये पेन्शन दरमहा मिळावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे लेखी आश्वासन जिल्हाधिकारी, तसेच मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. बळाचा वापर करून मोजणी करण्याचा प्रयत्न केल्यास होणाऱ्या परिणामांना पोलिस, प्रशासन आणि सरकार जबाबदार राहील, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

शिवडे गावात तणाव कायम

शिवडे गावात शनिवारीदेखील तणावपूर्ण वातावरण होते. मंदिरात प्रांत, तहसीलदारांनी काही शेतकऱ्यांशी चर्चा केली. मात्र, अधिकारी मोजणीला येतील या धास्तीने त्यांचे कुटुंबीय शेतातच बसून होते. पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री तीन वाजता शेतकऱ्यांना सोडल्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. येथे शनिवारीदेखील रुग्णवाहिका, राज्य राखीव दल हजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोहफुलांपासून वाइननिर्मितीला परवानगी हवी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सुरगाणा तालुक्यातील सर्व भागात आदिवासींचा कल्पवृक्ष मोहफुलाने बहरला आहे. आदिवासींच्या शेतातील बांधावर व जंगलात मोहफुलाची मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. या झाडांना सध्या फुले आली असून, झाडाखाली पडणारी फुले गोळा करण्यासाठी घरातील लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सारेच पहाटेपासूनच व्यस्त असतात. या फुलांना चांगला दर मिळण्यासाठी सरकारने मोहफुलांपासून वाइननिर्मिती करण्यास वाइनरी उद्योगाला मान्यता द्यावी, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे.

जानेवारी ते मे महिन्यात मोहफुलांच्या वृक्षाला बहर येऊन पहाटेच्या वेळेस फुले गळतात. ही फुले गोळा करून वाळवली जातात. नंतर बाजारात विक्रीसाठी नेली जातात व त्यापासून मद्य तयार केले जाते; पण त्याला सरकारकडून अधिकृत परवानगी नसल्यामुळे काही प्रमाणातच त्याची निर्मिती होते. मात्र नेते फक्त आश्वासन देतात; पण मोहफुलापासून वाइनरीला परवानगी नसल्याने ही फुले केवळ औषधनिर्मितीसाठीच जातात. त्यामुळे या फुलांना योग्य दर मिळत नाही. रणरणत्या उन्हात वणवण भटकून गोळा केलेल्या मोहफुलांना कवडीमोल भाव मिळत असल्याने आदिवासी आजही आर्थिक संकटात आहेत.

सरकारने द्राक्ष, उसासारख्या पिकांवर प्रक्रिया करून वाइनरी उद्योगाला मान्यता दिल्याने संपूर्ण महाराष्ट्रात अनेक छोटे-मोठे वाइनरी उद्योग उभे राहिले आहेत. या उद्योगांमुळे कच्चा माल म्हणजे द्राक्ष व उसाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.

...तर आदिवासी भागांतही वाइनरी उद्योग

मोहफुलाच्या वाइनला परवानगी दिली तर सुरगाणा, कळवण व पेठ तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोहफुलांच्या वाइनरीचे उद्योग सुरू होतील. मुख्य म्हणजे यासाठी कच्चा माल येथेच आहे. यामुळे येथील मोहफुलांना चांगला भाव मिळून आदिवासींना आर्थिक मदत होईल. आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात उत्पादन होणाऱ्या, औषधी गुणसंपन्न असणाऱ्या मोहफुलापासून वाइननिर्मितीची वाइनरी उद्योगाला परवानगी द्यावी, अशी मागणी आदिवासी बांधव अनेक वर्षांपासून करीत आहेत. या ठिकाणी कारखाने उघडून सरकारने मान्यता दिल्यास मागासलेल्या सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बेरोजगारांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाइनही पाचशे मीटरच्या कचाट्यात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या पाचशे मीटर आत मद्यविक्रीवर बंदी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फटका वाइन उद्योगालाही बसत असल्याची बाब समोर आली आहे. चालू गळीत हंगामात चढ्या दराने द्राक्ष खरेदी करून गाळप केलेली तब्बल एक लाख लिटर वाइन संकटात सापडली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती ऑल इंडिया वाइन प्रोड्युसर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संकटातून वाइन उद्योगाला सावरण्यासाठी सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्याचिका दाखल करावी आणि वाइन उद्योगाला या निर्णयातून सूट देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

देशभरातील एकूण मद्यविक्री केंद्रापैकी सुमारे ७० टक्के बार व दुकाने ही महामार्गालगत असून, ती आता बंद झाल्याने वाइन विक्रीवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. वाइन उद्योगाबरोबरच त्यावर अवलंबून असणारे द्राक्ष उत्पादक, तसेच वाइनरी आणि शेती कामगारांवरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. नुकत्याच संपलेल्या गाळप हंगामात वाइन उत्पादकांनी शेतकऱ्यांशी करार पद्धतीने वाइनची द्राक्षे जवळपास ४० ते ६० रुपये किलो या दराने खरेदी करून साठा केला आहे. मात्र, या बंदीमुळे तो साठा तसाच पडून राहिला तर शेतकऱ्यांची देणी देणे अवघड होणार आहे. त्याचप्रमाणे पुढील हंगामात येणाऱ्या द्राक्षांचे काय करायचे, असा प्रश्न वाइन उत्पादक आणि वाइन द्राक्ष उत्पादकांना पडला आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत.

गेल्या काही वर्षांत आलेल्या संकटातून वाइन उद्योगाने नुकतीच कुठे कात टाकून उभारी घेत असताना हा मोठा आघात या उद्योगाला सहन करावा लागणार आहे. त्यामुळे वाइन उत्पादकांबरोबर शेतकरीही देशोधडीला लागणार असल्याची भीती पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. वाइन उद्योगाने पर्यटन, रोजगारनिर्मितीला चालना देण्याबरोबरच करार शेतीलाही प्रोत्साहन दिले आहे. नाशवंत द्राक्षांवर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करण्याचा प्रयत्न वाइन उद्योग सातत्याने करीत आहे. राज्य सरकारचे या उद्योगाबद्दलचे धोरणही चांगले असल्याने हा उद्योग भरभराटीस येऊ पाहत असताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला जबर फटका अन्य मद्य प्रकारासोबत वाइनलाही बसला आहे. या निर्णयामुळे थोड्याच अवधीत वाइन विक्रीत मोठी घट नोंदवली गेली असून, या वर्षाचा साठा पडून राहिल्यास पुढील हंगामात गाळप कसे करायचे, असा प्रश्न उत्पादकांना पडला आहे. वाइनला या निर्णयातून सूट देण्यात यावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.

पत्रकार परिषदेस ऑल इंडिया वाइन प्रोड्युसर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष जगदीश होळकर, शिवाजी आहेर, सेक्रेटरी राजेश बोरसे, नीरज अग्रवाल, अशोक गायकवाड, सदाशिव नाथे, माणिक पाटील, मनोज जगताप उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोसायटीच्या निवडणुका प्राधिकरणामार्फत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील सहकारी संस्था समिती सदस्यांच्या, तसेच पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक संस्थेच्या निवडणुका आता या प्राधिकरणामार्फत होणार आहेत. त्यासाठी प्राधिकरणाने राज्यातील या निवडणुका घेण्यासाठी संबंधित उपसहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांना प्रभाग, तालुका सहकारी निवडणूक अधिकारी म्हणून घोषित केलेले आहे.

या नव्या तरतुदीनुसार विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपण्यापूर्वी समितीची निवडणूक घेण्याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण अथवा जिल्हा, प्रभाग, तालुका सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना कळवणे हे प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अत्यावश्यक कर्तव्य आहे. त्यासाठी प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेने संचालक मंडळ मुदत संपण्याच्या सहा महिने अगोदर माहिती संबंधित प्रभाग- तालुका सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करणे आवश्यक आहे.

असे आहे वर्गीकरण

दोनशे किंवा दोनशेपेक्षा जास्त सभासद असणाऱ्या गृहनिर्माण संस्थांचे क वर्गीकरण केलेले असून, २०० पेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या गृहनिर्माण संस्थांचे ड वर्गीकरण केलेले आहे. क वर्गातील सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रिया नियम ७५ मधील तरतुदीनुसार किमान ३५ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करून गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक पार पाडणे बंधनकारक आहे. त्यासाठी क वर्गातील गृहनिर्माण संस्थांनी अचूक व पारदर्शकपणे बनवलेली इ-३ नमुन्यातील प्रारूप मतदारयादी संबंधित प्रभाग, तालुका सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे. क वर्गातील सहकारी संस्थांची अंतिम मतदारयादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मान्यताप्राप्त निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे प्रसिद्ध केली जाणार आहे.

ड वर्गाची निवडणूक गुप्त पद्धतीने

ड वर्गातील गृहनिर्माण संस्थेची निवडणूकप्रक्रिया प्राधिकरणाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उपस्थितीत अधिमंडळाच्या विशेष सभेत गुप्त मतदान पद्धतीने पार पडणे क्रमप्राप्त आहे. तसेच ड वर्गातील गृहनिर्माण संस्थांनी आय नमुन्यातील सभासद नोंदवहीवरून कायद्यातील तरतुदींप्रमाणे, नियमानुसार व उपविधीतील तरतुदीनुसार आर्हताधारक सभासदांची प्रारूप मतदारयादी तयार करून संबंधित सभासदांच्या हरकती, आक्षेप मागवणे आवश्यक आहे. संस्थेने प्राप्ती हरकती, आक्षेपांचे निवारण करून अंतिम मतदारयादी संस्थेच्या नोटीस फलकावर प्रसिद्ध करून यादीची एक प्रत प्रभाग, तालुका सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे.

संचालकांचा कालावधी पाच वर्षे

प्रत्येक सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाचा कालावधी पाच वर्षे एवढाच राहणार असून, या कालावधीनंतर संचालकपद आपोआप रिक्त झाल्याचे समजण्यात येणार आहे, तसेच विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपण्यापूर्वी नवनिर्वाचित समिती सदस्यांनी पदभार घेणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे प्राधिकरणाने निवडणूक निधीपोटी प्रभाग, तालुका सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करावयाची अनामत रक्कम निर्धारित करणे अनिवार्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आओ जाओ ‘सिग्नल’ तुम्हारा!

$
0
0

काट्या मारुती चौकात वाहनांचा चोहोबाजूंनी मुक्त संचार

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

पंचवटी परिसरातील काट्या मारुती चौकात वाहतूक कोंडी नित्याची झालेली आहे. येथील कायमच बंद असलेली सिग्नल यंत्रणाही वाहतूक कोंडीत भर टाकत असून, आओ जाओ ‘सिग्नल’ तुम्हारा, अशा स्थितीमुळे या चौकात चारही बाजूंनी वाहनांचा मुक्त संचार दिसून येत आहे. परिणामी पादचाऱ्यांसह वाहनचालकांना रस्ता ओलांडताना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वार तर जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडताना दिसत आहेत. त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

काट्या मारुती चौक परिसर हा अत्यंत वर्दळीचा परिसर आहे. या परिसरात शाळा आणि कॉलेजेसची संख्यादेखील लक्षणीय आहे. परिणामी विद्यार्थ्यांची येथे कायमच मोठी वर्दळ असते. मात्र, येथे चोहोबाजूंनी एकाच वेळी येणाऱ्या वाहनांमुळे रस्ता क्रॉस करताना विद्यार्थी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय या रस्त्याच्या लगतच पेट्रोलपंप आहे. त्यामुळे तेथे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांमुळेदेखील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

‘राँग साइड’ची भर

निमाणी आणि पंचवटी डेपो ही बसस्थानकेदेखील या मार्गावर आहेत. त्यामुळे सिटी बसेचीही कायम वर्दळ असते. शिवाय अनेकदा चालक सिटी बसदेखील डेपोच्या बाहेर उभ्या करतात. या परिसरातून पंचमुखी हनुमान मंदिरासमोरील रस्ता मुंबई-आग्रा महामार्गाला जोडतो. मोठ्याप्रमाणात नागरिक या मार्गाचा वापर करतात. शिवाय हा मार्ग वन वे असूनदेखील वाहनचालक सर्रास राँग साइड वाहतूक करतात. काही वाहनचालकांकडूनदेखील वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविले जात असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ स्वाधार योजनेला मुदतवाढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेला १३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेला १३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त प्राची वाजे यांनी दिली.

सुरवातीला या योजनेअंतर्गत १६ मार्चपर्यंत नंतर ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता पुन्हा या योजनेत अर्ज भरण्यासाठी १३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना १० वी, १२ वी, पदवी, पदविका परीक्षांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५० टक्के गुण असणार आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी स्थानक नसावा. जे विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता या योजनेचा लाभ घेत असतील त्यांना या भत्त्याचा लाभ मिळणार नाही. विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डाशी लिंक करणे बंधनकारक आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन रेल्वेगाडीचे नाशिकरोडला स्वागत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मध्य रेल्वेने मुंबईहून लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटीई) ते लखनौ या मार्गावर नव्याने सुरू झालेल्या रेल्वेगाडीचे शनिवारी (दि. ८) नाशिकरोड येथे खासदार हेमंत गोडसे यांनी स्वागत केले.

रेल्वे प्रशासनाच्यावतीने ही नवीन गाडी सुरू करण्यात आली असून, लोकमान्य टिळक टर्मिनस ते लखनौ या मार्गावर ही गाडी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर प्रत्येक शनिवारी सायंकाळी साडेपाचला पोहोचणार आहे. नाशिकरोडला आगमन झाल्यावर खासदार हेमंत गोडसे यांनी स्वागत केले. याप्रसंगी झेडआरयुसीसीचे सदस्य रतन चावला, दिग्विजय कापडिया, रेल्वे बोर्डाचे सल्लागार सदस्य नितीन चिडे, राजेश फोकणे, भुसावळ रेल्वे मंडल अधिकारी सुनील मिश्रा, स्टेशन अधीक्षक एम. बी. सक्सेना, रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ निरीक्षक जुबेर पठाण, नाशिकरोड लोहमार्गचे सहाय्यक निरीक्षत नितीन पवार उपस्थित होते. या रेल्वेचे संपूर्ण डबे वातानुकूलित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिकतेचे विचार तळागाळात पोहोचवा

$
0
0

प्रभारी प्रादेशिक उपायुक्त जाधवर यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अनमोल आहेत. या विचारांवरच सामाजिक न्याय विभागाची वाटचाल चालू आहे. हेच सामाजिक समतेचे विचार तळागाळात पोहचविण्यासाठी आज खऱ्या अर्थाने गरज आहे, असे प्रतिपादन समाज कल्याण विभागाचे प्रभारी प्रादेशिक उपायुक्त हेमंत जाधवर यांनी केले. सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह घेण्यात येत आहे. या सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्राची वाजे, जिल्हा जात पडताळणी समितीचे नाशिकचे संशोधन अधिकारी खुशाल गायकवाड, लेखाधिकारी योगेश आंबरे आदी उपस्थित होते. सरकारकडून २०१६ हे वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे केले. या वर्षात सरकारने अनेक समाजोपयोगी उपक्रम व कार्यक्रम राबवत या कार्यक्रमांच्या माध्यमातून समतेचे विचार तळागाळात पोहचविण्याचे काम केले असल्याचेही जाधव यांनी सांगितले. भविष्यातही सामाजिक न्याय विभागामार्फत उपेक्षितांसांठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

उपेक्षित व गरजू अशा मागासवर्गीय समाज घटकांच्या उन्नतीसाठी सामाजिक न्याय विभाग नवीन योजना आणत आहे. या योजनेचे काम प्रभावीपणे झाले पाहिजे यावर नाशिक समाज कल्याण विभागाचा भर राहणार आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त प्राची वाजे यांनी दिली. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक एस. बी. त्रिभुवन यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जीपीएसने घंटागाड्यांना उशीर

$
0
0

विविध भागात साचलेल्या कचऱ्याची समस्या

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक महापालिकेच्या घंटागाड्यांना जीपीएस प्रणाली बसविण्यात आल्यापासून नाशिक रोडमध्ये कचरा साठून राहण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच शहरातील विविध भागात घंटागाड्या उशिराने पोहचत असल्यामुळेच असे प्रकार शहरात घडू लागले आहेत. याकडे तातडीने लक्ष देत ही समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात नवीन घंटागाड्या कचरा संकलनासाठी वापरल्या जात आहेत. शहरात सध्या ३५ घंटागाड्या कचरा संकलन करित असून, या सर्व घंटागाड्या जीपीएस प्रणालीत निश्चित केलेल्या मार्गानुसार कचरा संकलन करीत आहेत. त्यामुळे या घंटागाड्यांना ठरवून दिलेल्या मार्गावरून कचरा संकलनाचे काम करावेच लागत आहे.

दांडी मारणे अंगलट

जीपीएस प्रणाली उपलब्ध होण्यापूर्वी बऱ्याचशा प्रभागांतील ठराविक भागातच घंटागाडी फिरत असे. आता मात्र जीपीएस प्रणालीचा वापर होत असल्याने निश्चित केलेल्या प्रत्येक मार्गावरील कचरा संकलन करणे क्रमप्राप्त आहे. एखाद्या मार्गावर घंटागाडी कर्मचाऱ्यांनी जायचे टाळल्यास त्यांच्या अंगलट येत आहे. त्यामुळे कर्मचारी निश्चित केलेल्या मार्गांवर न चुकता जाऊ लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीच्या बैठकीत कर्जमाफीचा ठराव

$
0
0

संघर्षयात्रा यशस्वी करण्यासाठी निर्धार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून त्या रोखण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सरसकट माफ करावे, असा ठराव शनिवारी (दि. ८) नाशिक जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सर्वानुमते संमत करण्यात आला. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी विरोधकांनी काढलेली संघर्षयात्रा येत्या १७ एप्रिलला नाशिकमध्ये येत असून ही यात्रा यशस्वी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. बैठकीत या यात्रेचे नियोजनही करण्यात आले.

नाशिक जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांच्या अध्यक्षतेखाली व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन या पक्ष कार्यालयात झाली. यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, आमदार जयवंत जाधव, कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, माजी आमदार दिलीप बनकर, प्रदेश पदाधिकारी अर्जुन टिळे, नाना महाले, विष्णूपंत म्हैसधुणे, विजयश्री चुंभळे, निवृत्ती अरिंगळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून मोठ्या प्रमाणात आत्महत्येकडे प्रवृत्त होत आहे. जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापमानात पाच अंशाने घट

$
0
0

सहा वर्षांनंतर ऐन उन्हाळ्यात थंडीची लाट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

किमान तापमानामध्ये एक दिवसाच्या अंतरात तब्बल ५ डिग्री सेल्सिअस अंशांनी घट नोंदविली गेल्याने दिवसा कडक उन्हाळा तर रात्री हिवाळ्याचा अनुभव नाशिककर घेत आहेत. तब्बल सहा वर्षानंतर नाशिकमध्ये शनिवारी (दि. ८) किमान १३.७ डिग्री सेल्सिअस इतके नीच्चांकी तापमान नोंदविले गेले. तर याच दिवशी दिवसा कमाल ३८.१ डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. या संमिश्र वातावरणामुळे मात्र नागरिकांसमोर आरोग्याच्या समस्या डोके वर काढू लागल्या आहेत.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून तप्त तापमानापासून थोडा दिलासा अनुभवणार्‍या नाशिककरांना शनिवारी दिवसभर चांगलाच चटका बसला. कमाल ३४ डिग्रीपर्यंत खाली उतरलेल्या पाऱ्याने शनिवारी उसळी घेत नाशिककरांना पुन्हा लाही लाही केले. शनिवारी, कमाल ३८.१ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. काही दिवसांपूर्वी नाशिकने राज्यातील अव्वल क्रमांकाचे तापमान नोंदविल्यानंतर नागरिकांमध्ये धास्ती वाढली होती. या पाठोपाठ शहरात ढगाळ हवामान आल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला तर शेतकरी वर्गाच्या डोक्यावर संभाव्य पावसाच्या धोक्याची टांगती तलवार होती. या वातावरणात बदल होत गेल्या आठवड्यात सरासरी तापमानाची नोंद कमाल ३६ डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान नोंदविली गेली.


२०११ नंतर किमान तापमानाचे रेकॉर्ड

यापूर्वी नाशिक जिल्ह्यात एप्रिल २०११ मध्ये किमान १३.२ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. यानंतर थेट ८ एप्रिल २०१७ रोजीच १३.७ डिग्री सेल्सिअस इतके तापमान नोंदविले गेले. किमान तापमानात गत आठवड्याच्या तुलनेत ही ५ डिग्री सेल्सिअसची घट आहे. शुक्रवारी किमान तापमान १८.३ इतके नोंदविले होते. किमान तापमानात अचानक ५ डिग्रींची घट झाल्याने रात्री व पहाटेच्या वेळी थंडीचा अनुभव नाशिककर घेत आहेत. तर दिवसभराच्या तापमानाचा पाराही ३६ ते ४० अंशांदरम्यान फिरत असल्याने अंगाची लाही लाही होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हापूसचा पहिला कंटेनर अमेरिकेला रवाना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि फळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणच्या हापूस आंब्याची निर्यात लासलगावमार्गे अमेरिकेला सुरू झाली आहे. लासलगाव येथील भाभा अणू संशोधन केंद्रातून हापूस आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन पहिला कंटेनर शुक्रवारी अमेरिकेला रवाना करण्यात आला.

फळमाशीच्या प्रादुर्भावाचे कारण देत युरोपियन युनियनने भारतातून येणाऱ्या हापूस आंब्यावर २०१३ मध्ये बंदी घातली होती. त्यामुळे फळ बागायतदारांची चिंता वाढली होती. मात्र, ती चिंता आता कायमस्वरूपी मिटली आहे. गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन केले जात असल्याने भारतीय हापूस आंब्याची मोठ्या झपाट्याने अमेरिकेला निर्यात केली जात आहे. पहिल्याच दिवशी साडेसात मेट्रिक टन हापूस आंबा रवाना झाला आहे.

अमेरिकेला पाठविण्यात येणाऱ्या हापूस आंब्यावर लासलगाव येथे विकिरण प्रक्रिया केली जाते. ७ एप्रिल ते १५ जुलै या कालावधीत लासलगावच्या या केंद्रात मुंबईच्या अँग्रो सर्च या कंपनीच्या वतीने आंब्यामध्ये हापूस, केशर, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या जातींच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया केली जाणार आहे. लासलगाव येथे ३१ ऑक्टोबर २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले होते. लासलगाव येथील कृषी उत्पादन संशोधन केंद्र येथे हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला. मात्र, येथे आता फक्त आंब्यावर विकिरण प्रक्रिया होत आहे.

विकिरण काय असते?

लासलगावच्या केंद्रात गॅमा किरणांचा ४०० ते ७०० ग्रे मात्रा विकिरण मारा करून आंबा साठवणूक क्षमता वाढवली जाते. यामुळे आंबा पिकण्याची क्रिया लांबते, कोयीतील कीड नष्ट होते. आंब्यातील सफेद गाठ निमिर्ती थांबते. कीड रोखण्यास हा अतिशय चांगला उपाय मानला जातो. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया झाल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहतो. यंदा ६०० ते ६५० मेट्रिक टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट असल्याचे भाभा अणू संशोधन केंद्राचे प्लांट इन्चार्ज प्रणव पारीख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चीनमध्ये फडकला तिरंगा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चित्रकार व त्याच्या कलेच्या सन्मान म्हणून विदेशात त्याच्या देशाचा ध्वज एक महिना सन्मानार्थ फडकणे यासारखा अनोखा जागतिक बहुमान प्राप्त होणे अत्यंत दुर्मिळ म्हणता येईल. ८ एप्रिल रोजी चीनमधील शांघाय येथे भारताचा तिरंगा दिमाखात फडकविण्यात आला असून, तो ७ मेपर्यंत तब्बल एक महिना फडकत राहणार आहे.
चीनच्या शांघायमधील झोज‌जिाव वॉटर टाऊन येथे शॉनहुवा या वर्ल्ड हेरिटेज आर्ट गॅलरीत चित्रकार प्रफुल्ल सावंत यांच्या ४४ जलरंग माध्यमांतील निसर्गचित्रांचे भव्य चित्रप्रदर्शन, सोलो शोचे उद््घाटन नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी चित्रकार प्रफुल्ल सावंत यांना व त्यांच्या चित्रकलेचा यथोचित आगळावेगळा सन्मान देण्यासाठी आपल्या देशाचा तिरंगा चीनमध्ये चित्रप्रदर्शनाच्या एक महिन्याच्या कालावधीत रोज फडकविला जाणार आहे.
यावेळी चीनमधील विविध मान्यवर, चित्रकार, समीक्षक, चित्ररस‌कि उपस्थित होते. चित्रकार प्रफुल्ल सावंत यांच्या प्रदर्शनातील सर्व ४४ चित्रांवर आधारित जागतिक पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रदर्शनाचे उदघाटन चायनातील सुप्रसिध्द ज्येष्ठ चित्रकार झ‌डिान चेन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी सावंत यांच्या चित्रांची स्तुती केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पीड ब्रेकरवर बस आदळून मणका फ्रॅक्चर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव वेगातील एसटी महामंडळाची बस स्पीड ब्रेकरवर आदळल्याने वयोवृध्द व्यक्तीचा मणका फॅक्चर झाला. याप्रकरणी हलगर्जीपणा दाखवणाऱ्या बसचालकाविरोधात नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रस्त्यावरील स्पीड ब्रेकर वेग आवरण्यासाठी असतात. मात्र, त्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडत असून, प्रवाशांसह वाहनचालकांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे.

अनिल श्रीरंग साबळे (दोडी खुर्द, ता. सिन्नर) यांच्या फिर्यादीनुसार, अपघाताची घटना १० मार्च रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास चिंचोली गाव येथे घडली. या दिवशी अनिल व त्यांचे वडील श्रीरंग साबळ हे एसटी बस क्रमांक एमएच १४ बीटी ४०६२ ने प्रवास करीत होते. मात्र, एसटी चालक बाळासाहेब कचरू घुगे यांनी परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत बस चालवली. चिंचोली गाव येथील स्पीड ब्रेकरवर बस आदळल्याने श्रीरंग साबळे यांच्या मणक्याला इजा झाली. यावेळी दोघे एसटी बसमधील पाठीमागील सीटवर बसलेले होते. भरधाव वेगात स्पीड ब्रेकरवर बस आदळल्याने प्रवाशांना जोरदार दणका बसला. त्यात श्रीरंग साबळे यांच्या ११ व्या मणक्याचे हाड फॅक्चर झाले. यानंतर श्रीरंग साबळे यांच्यावर उपचार करण्यात आले.

डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार अनिल साबळे यांनी नाशिकरोड पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी बस चालक घुगे यांच्याविरोधात कलम २७९, ३३७, ३३८ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. हायवेसह शहरी भागात शक्य तिथे स्पीड ब्रेकर टाकण्यात आले आहेत. या स्पीड ब्रेकरमुळे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी सिडको स्पीड ब्रेकरमुळे झालेल्या अपघातात एका महिलेला जीव गमवावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ बंद उद्योगांचे गौडबंगाल काय?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेला आर्थिक तारणहार ठरणाऱ्या सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीतील भूखंड घेण्यावरून उद्योजकांमध्ये वाद सुरू झाले आहेत. परंतु, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला (बीसीसीआय) असूनही उद्योग मात्र बंद अवस्थेत असल्याचे चित्र आहे. याकडे एमआयडीसी कधी लक्ष देणार, असा सवाल उद्योजकांकडून उपस्थित केला जात आहे.

‘मेक इन इंड‌यिा’ व ‘मेक इन महाराष्ट्र’ची हाक भाजप सरकारने दिली खरी; परंतु, प्रत्यक्षात उद्योगवाढीला नाशिक विभागात वावच मिळत नसल्याचे चित्र आहे. औद्योगिक विकास महामंडळाकडून उद्योजकांना देण्यात आलेल्या अनेक भूखंडांवर बंद उद्योग पहायला मिळतात. त्यातच उद्योग जरी बंद असला, तरी एमआयडीसीकडून केवळ बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेत भूखंड ताब्यात ठेवण्यात काही बड्या उद्योजकांचे फंडेही दिसून येत आहेत. नियमानुसार बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतल्यावर संबंधित उद्योजकाने उत्पादन प्रक्रिया सुरू करणे अनिवार्य आहे. परंतु, असे असताना केवळ नावालाच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेत काही गुंतवणूकदार एमआयडीसीत भूखंड बळकावून बसले आहेत. याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना देखील माहिती असले, तरी वरिष्ठ पातळीवरून संबंधित गुंतवणूकदाराला अभय असल्याचे बोलले जात आहे. सातपूर व अंबड एमआयडीसीत उद्योजकांना भूखंड मिळावेत अशी अनेकदा मागणी केली जाते.

एमआयडीसीकडून मात्र भूखंडच उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. यात वर्षानुवर्ष केवळ बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेऊन उत्पादनच करीत नसलेल्यांवर एमआयडीसीची मेहरबानी का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सातपूर एमआयडीसीत १४ एकरचा भूखंड तब्बल ३५ वर्षांपासून विनावापर पडून आहे. संबंधित गुंतवणूकदार केवळ एमआयडीसीकडून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेत जागेचा भाव वाढविण्याचे काम करत असल्याचा आरोपही काही उद्योजकांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवीन पिढीसाठी दिशादर्शक ग्रंथमित्र

$
0
0

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवनाची सुरुवात झालेले, अनेक प्रकारच्या सुख-दुःखांना शांत वृत्तीने सामोरे गेलेले रामचंद्र काकड सर केवळ धार्मिक संस्कारांच्या जोरावर सर्व कठीण परिस्थितीतून तावूनसुलाखून निघाले. एवढेच नाही, तर गेली चाळीस-पन्नास वर्षे ग्रंथ, ग्रंथ आणि ग्रंथ हा एकच ध्यास घेऊन वाटचाल करीत आहेत. आज वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचे कार्य सुरूच असून, नवीन पिढीला दिशा देणारे आहे.

रामचंद्र काकड यांचा जन्म नाशिकजवळ असलेल्या मखमलाबाद गावात झाला. सातवीपर्यंतचे शिक्षण गावात, तर आठवीपासूनचे शिक्षण त्यावेळच्या नामवंत अशा पेठे विद्यालयात झाले. घरची परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना मखमलाबादपासून पेठे विद्यालयापर्यंत पायी यावे लागायचे. शालेय शिक्षणानंतर त्यांनी एचपीटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी बी.एस्सी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्या काळात बी.एस्सी. झाले असल्याने त्यांना मराठा विद्या प्रसारक समाजाच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी लागली. १२ वर्षे नोकरी केल्यानंतर तेथे फारसे मन न रमल्याने त्यांनी पुन्हा गावी येणे पसंत केले. मखमलाबाद गाव आणि पंचक्रोशीच्या शैक्षणिक, सांस्कृतिक जडणघडणीत काकड सरांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच आज या क्षेत्रात ते आदर्श ठरले आहेत. शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्राला काकड सरांनी आपलेसे केले. ग्रंथालयाच्या माध्यमातून गेली साठ वर्षे सातत्याने सामाजिक अभिसरणाचे काम ते करीत आहेत. अनेक प्रकारच्या कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या पेलताना त्यांनी आपली ग्रंथालयाची ओढ कमी होऊ दिली नाही. शिक्षकीपेशाबरोबरच उत्कृष्ट शेतकरी, उत्कृष्ट वक्ता आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट संघटक म्हणूनही त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. मखमलाबाद गावात मंगल कार्यालयाची उणीव होती म्हणून समाजसेवेची आवड असलेल्या तरुणांना एकत्र करून त्यांनी क्रांतिवीर वसंतराव नाईक समाज विकास मंडळाची स्थापना करून मंगल कार्यालयासाठी जागा घेतली. आज त्या ठिकाणी प्रशस्त मंगल कार्यालय उभे आहे. याच ठिकाणी त्यांनी अनेकांचे सामुदायिक विवाह लावले आहेत. नाशिक येथे कॉलेजात शिकताना आपल्या गावात माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी म्हणून कै. नामदेवराव ठाकरे व मारोतराव बस्ते यांच्या मार्गदर्शनाने गावात छत्रपती शिवाजी विद्यालयाची स्थापना केली. आज ही शाळा महाराष्ट्रातील काही नावाजलेल्या शाळांच्या पंक्तीत जाऊन बसली आहे. लहानपणापासूनच ग्रंथालयाची आवड असल्याने १५ ऑगस्ट १९६९ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात एक छोटे कपाट व शंभर पुस्तके आणि ३ वर्तमानपत्रे यांच्या जोरावर काकड सरांनी वाचनालय सुरू केले. ग्रंथालयात वसंत कानेटकरांच्या ‘तुझा तू वाढवी राजा’ या प्रथम पुस्तकाची नोंद झाली. आज ४८ वर्षांत ग्रंथालयात २६ हजार पुस्तके असून, १८ दैनिके, ८० नियतकालिके, साप्तहिके, पाक्षिके, मासिके येत असतात. २०१९ मध्ये वाचनालयाला ५० वर्षे पूर्ण होत असून, कार्यकारी मंडळ सभासद व दानशूर व्यक्तींच्या साहाय्याने ३५ लाख रुपये खर्च करून नवीन इमारत उभी केली आहे. ग्रंथालय चळवळीत गावापासून राज्य पातळीपर्यंत कार्य करण्याची संधी मिळाल्याने महाराष्ट्र शासनाचा डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या नावाने दिला जाणारा राज्य पातळीवरील उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता, ग्रंथमित्र पुरस्काराने त्यांनी सन्मानित करण्यात आले आहे. ज्या गावात ग्रंथालय बंद पडले आहे त्या गावात जाऊन ते ग्रंथालय सुरू करणे ही त्यांची आवड आहे. आजतागायत अनेक ग्रंथालयांना त्यांनी पुनरुज्जीवन दिले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या ग्रंथालयामार्फत पुणे विद्यापीठाची बहिःशाल व्याखानामाला गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून, या ठिकाणी आजवर अनेक नामवंत वक्त्यांनी हजेरी लावली आहे.

येत्या काही वर्षांत शांतिनिकेतनच्या धर्तीवर मखमलाबाद गावात प्रकल्प साकारण्याचा त्यांचा मानस असून, त्यादृष्टीने ते आखणी करीत आहेत. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन गावात दुसरी-तिसरी फळी निर्माण झाली असून, अनेक तरुणांनी या कार्याला झोकून दिले आहे.


नाशिककरांनो, लिहिते व्हा!

ज्येष्ठ नागरिक म्हटले, की वयाचा उत्तरार्ध आणि त्यामुळे कमी झालेला अॅक्टिव्हनेस असा बऱ्याच जणांचा समज असतो. पण, अनेक ज्येष्ठ हे केवळ वयाने वृद्ध असतात, त्यांचे मन मात्र तरुणच असते. त्यांच्या कामातून, समाजसेवेतून किंवा अन्य अॅक्टिव्हिटीजमधून ते आपण अजूनही तरुण आहोत हे दाखवून देतात. अशाच ज्येष्ठांसाठीचे हे व्यासपीठ म्हणजे आमचा ‘यंग सीनिअर्स’ कॉलम. चला तर मग, तुम्ही जर असे यंग सीनिअर असाल, तर थेट आमच्याशी संपर्क करा किंवा तुमच्या ओळखीत, पाहण्यात असे कोणी असेल, तर त्यांचे नाव सुचवा. योग्य व्यक्तींना या सदरातून नक्कीच प्रसिद्धी दिली जाईल.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, तिसरा मजला, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड, ना‌शिक.

समन्वय : फणिंद्र मंडलिक- ९४२३१७४४९५.

ई-मेल : fanindra.mandlik@timesgroup.com

(पाकीट आणि ई-मेलवर ‘यंग सीनिअर्स’ उल्लेख करावा.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...जय बोलो महावीर की

$
0
0

टीम मटा

लक्ष वेधून घेणारा आकर्षक रथ... बॅण्ड पथकाकडून सादर केली जाणारी सुमधुर भक्तिगीते, ढोल पथकाच्या ठेक्यावर ताल धरणारी तरुणाई आणि ‘श्रीशला नंदन वीर की, जय बोलो महावीर की’चा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात रविवारी भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. शहरासह उपनगरांत विविध धार्मिक, समाजोपयोगी कार्यक्रम झाले.

--

शोभायात्रेने रंगत

विश्वाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान श्री महावीरांचा जन्मकल्याणक महोत्सव आज शहराच्या विविध भागात साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील श्री जैन सेवा संघ आणि जैन सोशल ग्रुपच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. जैन बांधव पांढरे कपडे परिधान करून, तर महिला भगव्या साड्या परिधान करून या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यंदाच्या मिरवणुकीत तरुणाईचा उत्साहदेखील वाखाणण्याजोगा होता.

ठिकठिकाणी स्वागत

दहिपूल येथील श्री धर्मनाथ देरासर येथून शोभायात्रेला सुरुवात झाली. जुन्या तांबट लेनमधील श्री चिंतामणी पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर, भद्रकालीतील श्री दिगंबर जैन मंदिर, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, आर. के. स्थानक, रविवार पेठ, अशोक स्तंभ, गंगापूररोडमार्गे ही शोभायात्रा जुन्या गंगापूर नाक्याजवळील चोपडा बँक्वेट हॉल येथे पोहोचली. मार्गात ठिकठिकाणी या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.

आरोग्य शिबिरात तपासणी

श्री भगवान महावीरांच्या चरणी भाविक लीन झाले. ठिकठिकाणी ‘अहिंसा परमोधर्म की जय’, ‘जैन धर्म की जय’, ‘जोर से बोलो जय महावीर’ आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. चोपडा बँक्वेट हॉल येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचा समाजबांधवांनी लाभ घेतला. उपक्रम यशस्वीतेसाठी पवन पाटणी, महेश शाह, सचिन गांग, मोहनलाल चोपडा आदींनी प्रयत्न केले.

सिडकोत विविध कार्यक्रम

सिडको परिसरातही श्री महावीर जयंती उत्साहात साजरी झाली. पवननगर येथील वर्धमान जैन स्थानकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकल जैन समाज श्री महावीर जन्मकल्याणक समितीच्या वतीने राणा प्रताप चौक येथून शोभायात्रा काढण्यात आली. त्यामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले. विजयनगर, उत्तमनगर, ‌त्रिमूर्ती चौकमार्गे पवननगर येथील जैन स्थानकात या यात्रेचा समारोप झाला. त्यानंतर पवननगर येथे पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. राजमल चोरडिया, प्रकाशचंद नहाटा, सुशीला ओस्तवाल, संजय ओस्तवाल, प्रकाश खिंवसरा, महावीर लुणावत आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.


नाशिकरोडला मिरवणूक

सिन्नर फाटा ः नाशिकरोडमध्ये जैन बांधवांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भगवान महावीरांच्या प्रतिमेच्या मिरवणुकीस येथील आर्टिलरी सेंटररोडवरील जैन भवनापासून प्रारंभ झाला. सुभाषरोडमार्गे डॉ. आंबेडकर पुतळा, शिवाजी पुतळा, बिटको चौक या मार्गाने पुन्हा जैन भवन येथे आल्यावर या मिरवणुकीचा समारोप झाला. या मिरवणुकीत आकर्षक चित्ररथासोबतच शहरातील जैन महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी संघपती सुभाष घिया, नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेचे व्हाइस चेअरमन अशोक चोरडिया, अशोक सातभाई आदी उपस्थित होते. या मिरवणुकीपूर्वी जैन भवनमध्ये साध्वी योगसाधनाजी व साध्वी अपूर्वसाधनाजी यांचे प्रवचन झाले.


सातपूर येथे अनोखे वंदन

सातपूर ः भगवान महावीर जयंतीनिमित्त सातपूर परिसरात विविध धार्मिक व समाजोपयोगी कार्यक्र झाले. परिसरातील आरंभ ग्रुचे लोकेश कटारिया यांच्या संकल्पनेतून मध्यरात्री बारा वाजेला भगवान महावीर यांना वंदन करण्यासाठी ३११ मेणबत्त्या पेटविण्यात आल्या होत्या. याप्रसंगी जैन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवारी दिवसभर शहर परिसरात झालेल्या विविध कार्यक्रमांना समाजबांधवांनी मोठी उपस्थिती लावल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तपोवन’ असुविधांच्या फेऱ्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सातत्याने उशिराने धावणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसमधील अस्वच्छता आणि इतर असुविधांमुळे या गाडीने नियमित प्रवास करणाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. उन्हाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर तरी या गाडीसंदर्भातील असुविधा दूर कराव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. या गाडीचे डबे वाढवावेत, नियमित स्वच्छता ठेवावी अादी मागण्या त्रस्त रेल्वे प्रवाशांनी रेल्वेमंत्र्यांकडे केल्या आहेत.

मराठवाड्याला जाणाऱ्या व तेथून मुंबईला येणाऱ्या तपोवन व जनशताब्दी या दोनच गाड्या दररोज धावतात. त्यामुळे त्या बाराही महिने तुडुंब भरलेल्या असतात. मुंबईहून तपोवन नाशिकला सकाळी पावणेदहाला, तर जनशताब्दी सकाळी नऊला येते. तपोवन नांदेडहून नाशिकला सायंकाळी साडेसहाला येते. मात्र, सोशिक प्रवासी विरोध करीत नसल्याने तपोवनला नेहमीच उशीर होतो.


बोगींची संख्या अपुरी

तपोवन एक्स्प्रेसला कायमच प्रचंड गर्दी असते. या गाडीत एसीचे दोन, जनरलचे तीन आणि रिझर्व्हेशनचे दहा असे पंधराच डबे आहेत. जनरलच्या बोगींची संख्या कमी असल्याने एका बेंचवर तीनएेवजी चार प्रवासी बसतात. दरवाजात, दोन डबे जोडतात ती जागा, शौचालय अशा मिळेल त्या ठिकाणी प्रवासी उभे राहतात. त्यातच फेरीवाले, भिकारी सतत ये-जा करतात. त्यामुळे प्रवास नकोसा होतो. बहुतांश प्रवासी जास्तीचे साहित्य घेऊन प्रवास करतात. त्यामुळे इतरांना उभेही राहता येत नाही. जागा पकडण्यावरूनही प्रवाशांमध्ये दररोज वाद होतात.

पासधारकांची गैरसोय

पंचवटी एक्स्प्रेसमध्ये मासिक पासधारकांसाठी स्वतंत्र दोन डबे आहेत. तथापि, तपोवन गाडीत एकच डबा आहे. त्यात अन्य प्रवासीच घुसखोरी करतात. नाशिकहून निफाड, लासलगाव, मनमाडला नोकरीनिमित्त अप-डाउन करणारे याच गाडीचा आधार घेतात. मात्र, असंख्य पासधारकांना पैसे देऊनही उभे राहूनच प्रवास करावा लागतो. नाशिक ते मनमाड मासिक पास ५८० रुपये आहे. तिकीट तपासनीस नियमित येत नसले, तरीही पासधारक नियमित पास काढतात. या प्रामाणिकपणाच्या बदल्यात त्यांना गैरसोय सहन करावी लागते.

अस्वच्छता कायम

या गाडीच्या बोगी स्वच्छ नसतात. पिण्याचे पाणी उपलब्ध नसते. स्वच्छतागृहे अस्वच्छ असतात. झुरळे, उंदीर व ढेकणांचा नेहमीच त्रास होतो. फेरीवाले प्रवासी उतरण्यापूर्वीच आत शिरतात. गाडीच्या स्वच्छतेसाठी हेल्पलाइन दिलेली आहे. परंतु, बरेचसे प्रवासी कष्टकरी असल्याने ते कोणतीही तक्रार करत नाहीत. त्यामुळे या असुविधांकडो रेल्वे प्रशासनाचा काणाडोळा होताना दिसून येत आहे.

--

तपोवन एक्स्प्रेसला नेहमीच गर्दी असते. जागेवरून प्रवाशांमध्ये वाद होतात. तिकीट काढूनदेखील प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागतो. या गाडीचे जनरलचे डबे वाढविल्यास ही समस्या निश्तिच दूर होऊ शकेल.

-भूषण हिरे, प्रवासी

--

तपोवन एक्स्प्रेसमधील प्रवासी कष्टकरी आहेत. त्यामुळे ते कोणतीही तक्रार करताना दिसत नाहीत. या गाडीत नियमित स्वच्छता ठेवावी, तसेच पाण्याची व्यवस्था करून प्रवाशांची गैरसोय टाळावी.

-आदिनाथ मोरे, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चैत्रपालवी कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठी भाषेचा महिमा हा मराठीदिनापुरता न राहता वर्षभर मराठीचे गोडवे गायले जावे या हेतूने सुरू करण्यात आलेल्या चैत्रपालवी कार्यक्रमाचे दुसरे पुष्प रविवारी गुंफण्यात आले. या वेळी प्रसिद्ध संगीतकार संजय गिते यांनी विविध गीते सादर केली.

बारमाही मराठी या शीर्षकाने कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी सुरू झालेला हा कार्यक्रम आता वर्षभर सुरू राहणार असून, त्यानिमित्ताने रसिकांना या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. दर महिन्याला मराठीबाबत एक नवीन प्रयोग करून तो रसिकांसमोर सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना संजय गिते यांची आहे. यातील प्रत्येक पुष्पात ऋतूनुसार गाणी व कविता सादर करण्यात येणार आहेत.

रविवारी झालेल्या कार्यक्रमात सोर्स म्युझिक अॅकॅडमीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यात सूर निरागस हो, मिटुनी लोचने, चैत्र मास आला, बुद्धी दे, हिरवा निसर्ग, ऋतुरंग उधळी, ही गुलाबी हवा, वाऱ्यावरती गंध पसरला, माझ्या देवीचा रहिवास, कोलंबसाचे गर्वगीत ही गाणी व कविता सादर झाल्या. यातील दोन कविता नाशिकचे कवी विनय पाठारे यांच्या होत्या. त्याला संगीत संजय गिते यांनी दिलेले होते. कार्यक्रमास आयटी तज्ज्ञ सुनील खांडबहाले उपस्थित होते.

पियाली घोष, निषाद गिते, सोनल निकम, राहन दाणी, निशांत भोसले यांनी गीतगायन केले. तबल्यावर नंदकुमार जोशी, गिटारवर संकेत बराडिया, संवादिनीवर संजय गिते यांनी साथसंगत केली. अपर्णा क्षेमकल्याणी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माध्यमिक शिक्षक संघाचा रडीचा खेळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहर माध्यमिक संघाच्या कार्यकारिणीत सामावून न घेतल्याने कार्यकारिणीच्या निवडणुकीत वादंग झाल्याचा प्रकार सारडा कन्या विद्यालयात शनिवारी घडला. संघाच्या अध्यक्षपदी शशांक मदाने यांची निवड करण्यात आली. मात्र, या निवडीवर संघटनेचे मोहन चकोर व एस. बी. शिरसाठ यांनी नूतन कार्यकारिणीच्या निवडीवर आक्षेप घेतला. परिणामी, रविवारी पिंपळगाव बसवंत येथे झालेल्या बैठकीत या संघटनेचे अध्यक्षपद मोहन चकोर यांना देण्यात आले आहे. या बाबी सामंजस्याने घडल्याच्या प्रतिक्रिया संघाचे सभासद देत असले तर खुद्द मदाने यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमिक शिक्षक संघाच्या निवडणुकीत झालेला हा रडीचा खेळ शिक्षकांच्या प्रश्नांपेक्षा राजकारणाला प्राधान्य देत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

नाशिक शहर माध्यमिक शिक्षक संघाच्या कार्यकारिणीची निवडणूक माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. संघाची २०१७ ते २०२० या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यासाठी पाच जणांची समिती नियुक्त करण्यात आली होती. त्यामध्ये माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, शिवाजीराव निरगुडे, एस. के. टिळे, सी. पी. कुशारे, ई. के. कांगणे यांचा समावेश होता. या समितीने अध्यक्षपदी नाशिक एज्युकेशन सोसायटीचे शशांक मदाने, उपाध्यक्षपदी नीलेश ठाकूर, विद्या अहिरे, सचिव बी. के. सानप, सहसचिव एन. डी. सूर्यवंशी, कोशाध्यक्षपदी तौसीफ शेख यांची निवड करण्यात आली. या निवडीवर काही सभासदांनी आक्षेप घेतल्याने सभेत काहीशी वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती पाहता, रविवारी पिंपळगाव बसवंत येथे झालेल्या बैठकीत अध्यक्षच बदलण्यात आले. मदाने यांना बाजूला सारत चकोर यांना हे पद देण्यात आले. याविषयी काही शिक्षक सभासदांशी संवाद साधला असता, मदाने यांनी सामंजस्याने हे पद दूर सारले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, याविषयी मदाने यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी या रडीच्या खेळावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शिक्षकांसमोर आज अनेक प्रश्न, समस्या उभ्या असताना अध्यक्षपदावरून वाद निर्माण करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अध्यक्षपदासाठी नाव जाहीर करून नंतर ते बदलणे अन्यायकारक व अपमानास्पद आहे, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images