Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

खाकी वर्दी भागवतेय पक्ष्यांची तहान-भूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नागरीकरण आणि औद्योगिक विकासाची गरज भागविण्यासाठी वृक्षांवर कुऱ्हाड चालविली जात असल्याने विविध पर्यावरणीय समस्या उद्भवल्या आहेत. पाणीटंचाई व वाढते तापमान हा पर्यावरणीय संतुलन बिघडल्याचाच परिणाम आहे.
याचा फटका पक्षीवर्गालाही बसला आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे पक्ष्यांची आश्रयस्थाने व अन्नाचे स्त्रोत नष्ट होत आहेत. त्याचा परिणाम पक्षांच्या संख्येवर झाला आहे. यावर उपाय म्हणून नाशिकरोड येथील वीज वितरण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांनी ‘सेव्ह द बर्डस्’ अंतर्गत पक्षांसाठी ‘फूड अँड वॉटर स्टेशन्स’ हा अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे खाकी वर्दीतील पक्षीप्रेमीची ओळख झाली आहे.

सोनवणे यांनी यासाठी वेस्टेज कॅनचा वापर केला आहे. विद्युत भवन येथे त्यांनी वेस्टेज कॅनचे ५० ‘फूड अँड वॉटर स्टेशन्स’ तयार करुन त्यात पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. अभिजीत सोनवणे यांच्या उपक्रमामुळे विद्युत भवन परिसरातील पक्षी या ‘स्टेशन्स’वर येऊन अन्न व पिण्याच्या पाण्याची गरज भागवू लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​तीनशे कोटींवर जिल्हा बँकेची मदार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा बँकेला आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी संचालक मंडळाने कर्जवसुलीवर भर देण्याऐवजी आता राज्य सहकारी बँकेकडे असलेल्या तीनशे कोटींवर डोळा ठेवला आहे. जिल्हाबँकेने राज्य सहकारी बँकेकडे असलेल्या तीनशे कोटींच्या राखीव रकमेची मागणी केली आहे. त्यातून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करू, असे आश्वासन जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी दिली आहे.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये गुरूवारी बैठक होणार असून, त्यात निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेने ६० हजार थकबाकीदार शेतकऱ्यांची बँक खाती कर्जाशी लीन केल्याबद्दल व एक हजार ६८ विकास सोसायट्यांचा कर्जपुरवठा थांबवल्याबद्दल शेतकऱ्यांनी अध्यक्षांना बुधवारी घेराव घालून जाब विचारला. जिल्हा बँक कर्जपुरवठा कधी करणार, असा आक्रमक प्रश्न विचारल्यावर, शेतकऱ्यांची मागणी रास्त असली तरी आपल्याकडे उत्तर नसल्याचे सांगून कर्जासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे दराडे यांनी सांगितले. बँकेची थकबाकी तीन हजार कोटींच्यावर गेली असल्याने कर्जपुरवठा करण्यासाठी पैसेच नसल्याचे सांगत, नाबार्ड व राज्य सरकारने हिस्सा दिला नसल्याचा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सहकारी बँकेकडे जिल्हा बँकेचा राखीव असलेला तीनशे कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी केली. परंतु, त्यावर अद्याप उत्तर आलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्री सुभाष देशमुख आज नाशकात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी ,नाशिक

राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख हे बुधवारपासून नाशिक दौऱ्यावर आले असून, गुरुवारी त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीत झाडाझडती होणार आहे. सहकार व पणन विभागाच्या बैठकीत ते काय निर्णय घेतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

या दौऱ्यात ते सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री अॅग्रो कंपनीस भेट देणार आहे. त्यानंतर ते जिल्हयातील १७ कृषी उत्पन्न बाजार समितीचा आढावा गडकरी चौकात आयोजित केलेल्या बैठकीत १० वाजता घेणार आहे. त्यानंतर दुपारी ११.१५ वाजता नाशिक विभागाच्या बैठकीत सहकाराचा आढावा घेणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीची एकूण वाटचाल व त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल अगोदरच ओरड आहे. त्यात अनेक योजनांची अंमलबजावणी ते करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या व या समितीच्या कारभारात सुधारणा व्हाव्या या मागण्या अनेक दिवसांपासून शेतकरी करत आहे.

त्याचप्रमाणे सहकाराच्या नाईसच्या हॉलमध्ये होणाऱ्या बैठकीत नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सहकार विभागाचा आढावाही ते घेणार आहेत. नोटाबंदीमुळे अडचणीत आलेल्या जिल्हा बँका, त्यानंतर या विभागात असलेल्या ठेवीदारांचे प्रश्नापासून बँकेच्या अनागोंदी कारभारावरही या बैठकीत झाडाझडती होणार असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावणेदोन कोटींचा देना बँकेला गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रविवार कारंजा येथील देना बँकेत कर्जदारांनी बनावट कागदपत्रे सादर करून त्याआधारे एक कोटी ७९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयितांवर आर्थिक फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.

देना बँकेचे रविवार कारंजा शाखेचे मुख्य प्रबंधक गानेंद्रकुमार राजदेव वर्मा (रा. ड्रिमसिटी, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित संतोष भाबडू चव्हाण (रा. देवदत्तनगर, अंबडलिंक रोड), सुनीलकुमार दादाजी मोरे (रा. संभाजी चौक), दिनेश एकनाथ निकम व नेहा दिनेश निकम (रा. सुंदरबन कॉलनी, सिडको), प्रमोद जालिंदर रणमाळे व प्रियंका प्रमोद रनमाळे (रा. स्वामी समर्थ केंद्राजवळ, पाटीलनगर, सिडको), शैलेंद्र ध्रुव पाटील (रा. कुलस्वामिनी नगर, खुटवडनगर), विजयराव मोतीराम पाटील व करुणा विजयराव पाटील (रा. मेहेरधाम, पंचवटी), प्रमोद युवराज सूर्यवंशी (रा. उत्तमनगर, सिडको) अशी संशयितांची नावे आहेत. अटी-शर्थींच्या आधीन ठेऊन बँकेने ग्राहकांना एक कोटी ७९ लाखांचे कर्ज वितरीत केले होते. कर्जदारांनी हप्त थकविल्याने बँकेने अशा ग्राहकांच्या मालमत्तेच्या कागदपत्रांची पडताळणी केली. जुलै २०१३ ते एप्रिल २०१७ यादरम्यान, बँकेकडे सादर झालेल्या मालमत्तेची कागदपत्रे बनावट असल्याच्या संशयावरून त्यांच्या विरोधात फिर्याद देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाच्या तडाख्याने नाशिककर हैराण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या आठवड्यात ३५ अंशापर्यंत खाली उतरलेले तापमान पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी ४०.७ अंश सेल्सियस इतक्या कमाल तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली. त्यामुळे तापमानाची पुन्हा चाळिशीकडे सरकत असल्याचे दिसून येत आहे. तर किमान तापमान १६ अंश सेल्सियस असून, त्यामुळे रात्री हवेत गारवा जाणवत आहे. सकाळपासूनच चटके देणारे ऊन व रात्री असलेला गारवा अशा वातावरणामुळे आरोग्याच्या समस्याही डोके वर काढू लागल्या आहेत.

यंदाचा उन्हाळा नाशिककरांसाठी तापदायक ठरणार याचा अंदाज मार्च महिन्याच्या तापमानावरूनच दिला जात होता. मार्च महिन्याच्या अखेरीसच तापमानाने चाळिशी पार केली होती. त्यामुळे एप्रिल व मे महिन्याच्या उकाड्याच्या चर्चेनेच नाशिककर हैरान झाले होते. त्याची प्रचिती एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच आली. मात्र, काही दिवस कमी झालेल्या तापमानाने उन्हापासून दिलासा मिळाला होता.

या आठवड्यात पुन्हा झालेल्या तापमानवाढीमुळे नाशिककरांच्या अंगाची काहिली होत आहे. या परिस्थितीमुळे आवश्यकतेशिवाय दिवसा बाहेर पडणेही टाळण्यात येत आहे. तर ऊन ओसरल्यावर मात्र सायंकाळी शहरातील उद्याने, गोदाघाट, बापू पूल अशा वेगवेगळ्या ठिकाणी विरंगुळा करण्यासाठी शहरवासीयांची पसंती दिसून येत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात तापमानात आणखी काही अंशांची वाढ होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठीतील पहिला १० लाखांचा काव्यसंग्रह

$
0
0

Gautam.Sancheti@timesgroup.com

नाशिक : मराठी साहित्याच्या इतिहासात प्रथमच १० लाखांचा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला असून, यात ८९ कवींच्या कविता आहेत. यातील बहुतांश कविता या नवकवींच्या आहेत. त्यांना प्रत्येकी १० हजारांचे मानधन पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील या शैक्षणिक संस्थेकडून देण्यात आले आहे. त्याची एकत्रित रक्कम ही ८ लाख ९० हजार असून, या काव्यसंग्रहाच्या निर्मितीचा खर्चही एक लाखाहून अधिक आहे. त्यामुळे हा काव्यसंग्रह मराठीतील काव्यसंग्रहांत सर्वाधिक श्रीमंत ठरला आहे.

पुण्यातील पिंपरी येथे गेल्या वर्षी झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमनेलनात ‘कवीकट्टा’मधून सादर झालेल्या एक हजारहून अधिक कवितांमधून या काव्यसंग्रहासाठी ८९ कविता निवडण्यात आल्या होत्या. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन २८ फेब्रुवारी २०१७ रोजी तत्कालिन साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस व स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळेस या काव्यसंग्रहात असलेल्या कवींना दहा हजार रुपयाचे मानधन देण्याची घोषणा पी. डी. पाटील यांनी केली होती. त्यावर कवींचा विश्वास बसला नव्हता, पण ११ फेब्रुवारी २०१७ रोजी या सर्व कवींना प्रत्येकी दहा हजाराचा चेक पदमश्री डॉ. डी. वाय. पाटील इन्स्ट‌िट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अॅण्ड रिसर्चने पाठविला आहे.

मराठी मनाला कवितेने नेहमीच भुरळ घातली आहे. त्यामुळे रसिक मनालाही कविता नेहमीच भिडते. साहित्य संमेलनात कवीकट्याला विशेष महत्त्व देण्यात येते. या संमेलनात कवी कट्याची जबाबदारी महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे यांच्यावर देण्यात आली. संमेलनात १०२४ कवींनी येथे कविता तीन दिवसात सादर केल्या. परीक्षकांनी त्यातील ८९ कवितांची निवड केली. त्याचा हा काव्यसंग्रह करण्यात आला आहे. या काव्यसंग्राहाच्या मुखपृष्ठावर साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह व त्यानंतर ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कवीकट्टा यातून निवडलेल्या एकोणनव्वद कवितांचा संग्रह असे लिहिले आहे.

विक्रीमूल्य नाही...

सर्वाधिक खर्चाचा हा काव्यसंग्रहावर विक्री किंमत मात्र देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा काव्यसंग्रह मराठी रसिक श्रोत्यांना भेट म्हणूनच दिला जाणार असल्याचे दिसते. मात्र वाचकांच्या हाती हा संग्रह केव्हा पडणार याची उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अॅप्स’ बनलेत फिटनेस गुरू!

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायलाही वेळ मिळत नाही, अशी तक्रार अनेक जण करताना दिसतात. हेल्थी फिटनेससाठी नियमित व्यायाम, वेळच्या वेळी जेवण, दिनचर्येत योग्य आहार व पाणी यांची गरज असते. मात्र, नेहमीच्या कामाच्या व्यापात याकडे सर्रास दुर्लक्ष झालेले दिसते. त्यामुळे अनेक समस्या उद्भवताना दिसतात. मात्र, आता स्मार्ट हेल्थसाठी स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या सर्वांनाच त्यांचा मोबाइलवर स्टे फिटसाठीचे अॅलर्ट मिळत आहेत. त्यामुळे असे अॅप्स आता जणू फिटनेस गुरूचेच काम बजावत असल्याची भावना स्मार्टफोन यूजर्स व्यक्त करीत आहेत.

स्मार्टफोनसाठी अनेक हेल्थ अॅप्स उपलब्ध आहेत. या अॅप्सच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीच्या दिनचर्चेनुसार व कामाच्या पद्धतीनुसार हेल्थसाठीचे महत्त्वाचे अॅलर्ट देण्यात येतात. दिवसभरात प्रत्येक व्यक्तीने दिवसाला किती पावले चालायला हवीत, किती ग्लास पाणी प्यायला हवे, कोणत्या वेळी जेवायला हवे याचे अॅलर्ट या हेल्थ अॅप्सच्या माध्यमातून देण्यात येतात. पेडोमीटर अॅपच्या माध्यमातून व्यक्ती दिवसाला किती पावले चालते, त्यातून शरीरातील किती कॅलॅरीज् बर्न होतात, तसेच आणखी किती पावले चालणे गरजेचे आहे, याची माहिती मिळते. प्रत्येक व्यक्तीचे वजन व वयानुसार हे अॅलर्ट दिले जात असल्याने प्रत्येकाला काम करतानाच स्टे फिट राहता येणे शक्य झाले आहे.

हेल्थ डाएटची चलती

हेल्थ डाएट अॅप्सचीही कमालीची चलती स्मार्टफोन यूजर्समध्ये दिसते. प्रत्येक व्यक्तीच्या वजनानुसार कसा आहार असावा, याचे अॅलर्ट व जेवणाची वेळ या माध्यमातून कळविली जाते. या सर्व अॅप्समुळे स्मार्टफोनवर आपल्या शरीराची तपासणी होत असल्याने स्टे फिटचा फंडा आजमावण्यासाठी हा सर्वांत सोपा पर्याय ठरत आहे. हे अॅप्स ऑनलाइन स्वरूपात वापरले जात असून, मोबाइल कायम सोबत असल्याने यातून मिळणारे अॅलर्ट उपयुक्त ठरत आहेत.

पाणी अन् कॅलरीजवर टिप्स

वॉटर ड्रिंक या अॅपच्या माध्यमातून दर एक तासाला किंवा आपण सेट केलेल्या दिनचर्येनुसार ठराविक वेळेनंतर पाणी प्यायचे आहे, असा अॅलर्ट दिला जातो. व्यक्तीने दिवसाला किती पाणी प्यायले आहे व किती पाणी पिण्याची गरज आहे, याचा डाटा या अॅपवर अपडेट होत जातो. या अॅपवर व्यक्तीच्या स्मार्ट हेल्थचा रिपोर्ट रोज रात्री अपडेट होतो. त्यावरून शरीरातील बर्न झालेल्या कॅलरीज् व शरीराला नेमकी कसली गरज आहे, याचा मेसेज व्यक्तीला दिला जातो. अनेक नोकरदार वर्ग व विद्यार्थ्यांना याचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.

झोप अन् मेडिटेशनही...

स्लीप बेटर या अॅपच्या माध्यमातून व्यक्तीच्या झोपेच्या वेळेचा डाटा नोंदवला जातो. व्यक्ती दिवसातून किती तास झोपली, तसेच झोप गाढ होती, की नाही याचाही डाटा अपलोड केला जातो. या अॅपद्वारे व्यक्तीला किती झोप आवश्यक आहे व त्याची वेळ कोणती असावी, याचे अॅलर्ट दिले जातात. मेडिटेशनवरही काही अॅप्स आता उपलब्ध झाले आहेत. मन व चित्त शांत राहावे यासाठी स्टडी म्युझिकसारख्या अॅपचा वापर केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय प्रवेशांवरही नजर

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

बोगस रेशनकार्ड तसेच बनावट दाखले बनविणारे रॅकेट उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर आता शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी येणारे सर्वच दाखले काळजीपूर्वक तपासा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने शाळा आणि कॉलेजेसला दिल्या आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांशी याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला असून, बोगस दाखल्यांच्या आधारे प्रवेश घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आता चाप बसणार आहे.

पंचवटी परिसरात बनावट रेशनकार्ड, तसेच विविध प्रकारचे बोगस दाखले बनवून देणाऱ्या रॅकेटचा सोमवारी पर्दाफाश करण्यात आला. तलाठ्यापासून प्रांताधिकाऱ्यांपर्यंत अनेक अधिकाऱ्यांचे रबरी शिक्के तेथे आढळून आले. त्या रॅकेटकडून सर्रासपणे जातीचे, उत्पन्नाचे, नॉन क्रीमिलियर, राष्ट्रीयत्व, अधिवास यांसारखी प्रमाणपत्र बनविली जात असल्याचेही निदर्शनास आले. येथे बनवून घेतलेले दाखले विविध सरकारी कामकाजासाठी वापरात आणले जाण्याची शक्यता आहे. या बोगस दाखल्यांच्या मदतीनेच शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविला जाण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने सावध भूमिका घेतली आहे. प्रवेश प्रक्रिया राबविताना एखाद्या दाखल्याबाबत संशय आल्यास संबंधीत आस्थापनांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून संबंधीत दाखल्यांची फेरतपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दहावी, बारावीचे निकाल जाहीर होताच प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल. त्यावेळी हे बोगस दाखले वापरात आणण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने ही सतकर्ता बाळगण्याचे ठरविले आहे. उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबतचे पत्र दिले आहे. त्यांच्यामार्फत सर्वच शाळा महाविद्यालयांना आदेश दिले जाणार असून, त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

ओळखायचे कसे?

दाखल्यांची खात्री करून प्रवेश देण्याचे फर्मान जिल्हा प्रशासनाने सोडले असले तरी हे दाखले ओळखायचे कसे, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे शाळा, कॉलेजचे प्रशासन बुचकळ्यात पडणार आहे. दाखल्यांची खातरजमा नक्की कशी करायची, खरे आणि बनावट ओळखायचे कसे हा प्रश्न गंभीर असून त्याची दखल जिल्हा प्रशासनानेच घेणे आवश्यक आहे.

संबंधित केंद्रांवरून मोठ्या प्रमाणावर बोगस दाखल्यांचे वितरण झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दाखल्यांचा उपयोग केला जाऊ शकतो. म्हणूनच शाळा-महाविद्यालयांनी ते व्यवस्थित तपासून घेणे आवश्यक आहे. याबाबतचे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांना दिले असून कार्यवाही करण्यास सांगितले आहे.

- डॉ. शशिकांत मंगरुळे, उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपात्र नगरसेवक जाणार कोर्टात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा निफाड

निफाड नगरपंचायतीतील पहिल्याच लोकनियुक्त नगरसेवकांपैकी अतिक्रमण केलेल्या पाच नगरसेवकांचे पद रद्द झाल्याने नगरपंचयातीतील भाजप-शिवसेनेच्या सत्तेला हादरा बसला आहे.

या पाच नागरसेवकांमध्ये विद्यमान उपनगराध्यक्ष जावेद शेख यांचा समावेश आहे. दरम्यान या निकालावर जैसे थे आदेश घेऊन पाचही नगरसेवक निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी सरसावले आहेत.

व्यवस्थापन शासकीय जागेत अतिक्रमण केल्यामुळे निफाड येथील नगरपंचयातीच्या पाच नगरसेवकांचे पद रद्द करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिले आहेत. निफाड नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची सत्ता आहे. निवडून आलेल्या युतीच्या नगरसेवकांच्या विरोधात मोहन जाधव, साहेबराव बर्डे, अरुण झोटिंग, दिनकर धारराव, गणेश कुंदे यांनी नगरसेविका लक्ष्मी पवार, एकनाथ तळवाडे, आनंद बिवाल, मंगला वाघ व जावेद शेख यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली आहे. या पाचही नगरसेवकांनी शासकीय जागेत अतिक्रमण केल्याने त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे, अशी मागणी याचिकेत केली होती.

या पाचही नगरसेवकांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र ठरविले. या लोकप्रतिनिधींनी अतिक्रमण काढून टाकावे, असेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. एकूण सहा नगरसेवकांविरोधात ही तक्रार होती. यात अलका पवार या शिवसेनेच्या नगरसेविका वनजमिनीवर राहतात. त्या आदिवासी असल्याने त्यांचा अधिकार ग्राह्य धरल्याने त्या सुटल्या आहेत.

सत्तेबाबत प्रश्नचिन्ह

निफाड नगरपंचयातीत भाजप सहा, सेना पाच, राष्ट्रवादी तीन, काँग्रेस, अपक्ष आणि बसपा प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेस, बसपा यांनीही भाजप-सेना युतीला पाठिंबा दिलेला असल्याने नगरपंचायतीवर त्यांची सत्ता आहे. त्यात भाजपचे तीन व शिवसेनेचे दोन नगरसेवक अपात्र ठरल्याने यापुठे नगरपंचयातीच्या सत्तेबाबत प्रशचिन्ह निर्माण झाले आहे. निफाडचे नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार हे प्रकरण कसे हाताळतात, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन चिमुकल्यांना संपवून पित्याने पेटवून घेतले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वैफल्यग्रस्त बापाने आपल्या दोन लहान चिमकुल्यांची गळा दाबून हत्या केली. तिसऱ्या मोठ्या मुलीला मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला. यानंतर स्वतःला पेटवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नाशिकरोड येथे घडली. या नराधमाच्या हल्ल्यातून मोठी मुलगी आणि पत्नी नशिबानेच वाचली. खुनाचे कारण स्पष्ट नसले तरी निराशा आणि आर्थिक विवंचनेतून बापाने हे कृत्य केल्याचा अंदाज आहे. उपनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री सुरू होते. यातील गंभीर बाब म्हणजे खून केल्यानंतर तब्बल तीन तास हा नराधम थंडपणे घरात वावरत होता.

सुनील बेलदार (वय ५०, रा. ऋषानुबंध बंगला, निसर्गदत्तनगर, जगताप मळा, नाशिकरोड) असे या नराधमाचे नाव आहे. त्याने आपला लहान मुलगा देवराज (वय ४), मुलगी वैष्णवी (६) यांची हत्या केली, तर मोठी मुलगी श्रावणी (१२) हिला विषारी इंजेक्शन दिले. मात्र, ती वाचली.

थंड डोक्याने खून

सुनील बेलदारने खासगी कंपनीत काही दिवस इंजिनीअर म्हणून काम केले. नंतर तो पाचवी ते दहावीचे क्लास घेत असे. एक वर्षापासून त्याचे क्लास बंद होते. त्याचे पत्नी अनिताशी वाद होते. त्यामुळे दोन वर्षांपासून ती माहेरी (रुदावली, ता. शिरपूर, धुळे) येथे राहत होती. काल (ता. १२) सुनीलने गोड बोलून तिला नाशिकला आणले. सर्व कुटुंबीयांना घेऊन गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास सुनील हॉटेलमध्ये गेला. जेवणानंतर एकच्या सुमारास पत्नी धुणे धुवत असताना त्याने लहानग्या देवराज व वैष्णवीचा गळा दाबून हत्या केली. मोठी मुलगी श्रावणीला गुंगीच्या गोळ्या व विषारी इंजेक्शन दिले. बराच वेळ झाला तरी मुलांचा आवाज येत नसल्याचे पाहून अनिताला संशय आला. ती मुलांच्या खोलीत जाऊ लागली. मात्र, सुनील तिला जाऊ देत नव्हता. त्याने घराची कडी लावून घेतली होती. चारच्या सुमारास तो चहा करायला गेला. त्याचे लक्ष नसताना अनिता खोलीत गेली, तेव्हा दोन मुलांचे गळे दाबून हत्या केल्याचे दिसले. मोठी मुलगी गुंगीत होती.

मोठीला तरी वाचवा

प्रचंड धक्का बसल्यानंतर सावरलेली अनिता घराबाहेर आली. तिने बाहेरून कडी लावली. रिक्षा स्टँडवर गेल्यावर तिने शैलेंद्र रोजेकर आणि अजित बोटे या रिक्षाचालकांना प्रकार सांगून मोठ्या मुलीला तरी वाचवा, अशी रडत रडत विनंती केली. रोजेकर आणि बोटे तेथे गस्तीवरील पोलिस तांबे यांना घेऊन अनितासोबत गेले. पोलिस आल्याने सुनीलने दरवाजा आतून लावला. नागरिकांनी दरवाजा तोडून संजीवनीला बाहेर काढले. पोलिस पाहून सुनीलने पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेतले. तिन्ही मुलांना रिक्षात घेऊन अनिता बिटको रुग्णालयात गेली. तेथे दोन्ही मुले मरण पावल्याचे स्पष्ट झाले, तर संजीवनीला त्वरित उपचार मिळाल्याने ती वाचली. नंतर ८० टक्के भाजलेल्या सुनीलला घेऊन अन्य लोक बिटकोत आले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

मनोविकृती वाढली

सुनीलची मनोविकृती वाढल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. त्याने आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवले होते. त्याला वैतागून अनिताही माहेरी गेली होती. त्यामुळे सुनील वैफल्यग्रस्त झाला होता. काही दिवसांपासून त्याने दाढी वाढवली होती. शांत डोक्याने त्याने हे खून केल्याचे समजते. पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर यांनी अनिताचा उपनगर पोलिस ठाण्यात जबाब घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मॉडर्न गर्ल’ नाशिकमध्ये एकांतवासात

$
0
0

संपत थेटे/नवनाथ वाघचौरे

नाशिक : ब्लॅक अॅण्ड व्हाइटच्या जमान्यात ‘नेक दिल’, ‘अपराजिता’, ‘मॉडर्न गर्ल’ असे एकसे एक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या साठच्या दशकातील अभिनेत्रीच्या वाट्याला कफल्लक आयुष्य आले आहे. नाशिकमध्ये अवघ्या पाचशे स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटमध्ये त्या दुर्दैवी आयुष्य कुंठत आहेत. मात्र, आयुष्यात आलेल्या कफल्लकपणाचं दुःख नाही, तर जवळच्या लोकांनीच दिलेला दगा जास्त वेदना देणारा असल्याचं त्या म्हणतात. ही शोकांतिका आहे शंभरीच्या उंबरठ्यावर असलेल्या अभिनेत्री स्मृती बिश्वास-नारंग यांची...

१९३० ते १९६० अशी तब्बल तीन दशके त्यांनी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले. लावण्यखणी सौंदर्य आणि दमदार अभिनयाची मोहिनी त्यांनी प्रेक्षकांवर घातली. दुर्दैवाने त्यांची ही रूपेरी आणि भव्य कामगिरी अनुभवणारी पिढीही आता सरत चालली आहे. ज्या रूपेरी पडद्यावर तब्बल तीन दशके आपला प्रभाव सोडला, ती चित्रपटसृष्टीही स्मृती बिश्वास यांना विसरली असल्याचे वास्तवही यानिमित्ताने समोर आले आहे.

हिंदी आणि बंगाली भाषेत एकूण ९० चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल असंख्य पुरस्कारांनीही त्यांना गौरविण्यात आले. २०११ मध्ये दादासाहेब फाळके गोल्डन इरा अॅवॉर्डने त्यांचा गौरवही करण्यात आला. याच दादासाहेब फाळके यांच्या जन्मभूमीत आनंदाने, गौरवाने विसावण्याऐवजी त्यांना अगतिकतेने आसरा घ्यावा लागला आहे.

डॉ. राजीव व जितू या साठीत पोहोचलेल्या त्यांच्या दोन अविवाहित मुलांसह त्या नाशिकमध्ये एका छोटेखानी फ्लॅटमध्ये राहतात. कधी काळी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असलेल्या बिस्वास-नारंग कुटुंबाकडे आता नाशिकमधला पाचशे स्क्वेअर फुटाचा फ्लॅट तेवढा उरला आहे. ख्रिश्चन धर्मप्रसाराचे काम करणाऱ्या बहिणीच्या आश्रयाने तीन वर्षांपूर्वी त्यांनी मुंबईतून नाशिकमध्ये मुक्काम हलवला. कोलकाता-लाहोर-कोलकाता-मुंबई आणि आता नाशिक असा त्यांच्या आयुष्याचा प्रवास थक्क करणारा आहे.

त्यांचे पती डॉ. एस. डी. नारंग ऊर्फ राजा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक होते. १९९० च्या दशकात त्यांचे निधन झाल्यानंतर स्मृती बिश्वास यांच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. देशभरात अनेक ठिकाणी असलेली हजारो कोटींची मालमत्ता केअरटेकर मंडळी, तसेच काही नातेवाइकांनी बळकावल्याचे त्या सांगतात. मुंबईतील बंगले व इतर मालमत्ता बिल्डर, तसेच अंडरवर्ल्डमधील मंडळींनी लुटल्याचीही माहिती त्यांनी दिली. डॉ. नारंग यांचे निधन आणि त्यानंतर घडलेल्या अनुचित घटनांतून संपूर्ण कुटुंबावर मानसिक आघात झालेला आहे. दोन्ही मुलं हाताला मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत आहेत.

‘नाम और शोहरत लेकर क्या करुं..?’

वैद्यकीय उपचारांसाठीही पदरी पैसे नाहीत, मग न्यायालयीन लढा लढून प्रॉपर्टी परत तरी कशी मिळवणार, हा त्यांच्या मुलाचा सवाल मनाला चटका लावून जातो. स्मृती मात्र आजही तितक्याच स्वाभिमानीपणे जगत आहेत. ‘नाम और शोहरत लेकर क्या करुं..?’ ही त्यांची अगतिकता काळजाला घरे पाडते.

फिल्मी कारकीर्द

व्ही. शांताराम, एस. डी. नारंग, जे. के. माहेश्वरी, सत्यजित रॉय, बिमल रॉय, जी. बॅनर्जी, मृणाल सेन, बी. आर. चोप्रा, पी. एल. संतोषी अशा बड्या दिग्दर्शकांची एकेकाळी माझ्या घरी रांग लागलेली असायची, असे स्मृती बिश्वास-नारंग अभिमानाने सांगतात. सुपरस्टार प्राण, अशोक कुमार, एस. डी. नारंग, राज कपूर, देव आनंद, गुरुदत्त, राजकुमार, किशोरकुमार, बलराज साहनी यांसारखे अभिनेते, तसेच नर्गिस, मधुबाला, नूतन या अभिनेत्रींसोबत स्मृती यांनी अभिनयाची छाप सोडली. १९३० मध्ये ‘संध्या’ या बंगाली चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर कोलकात्याहून १९४२ मध्ये लाहोर गाठले व प्राण यांच्यासोबत रागिणी हा पहिला चित्रपट केला. लाहोर फिल्म इंडस्ट्रीत तब्बल ७ सुपरहिट हिंदी चित्रपट त्यांनी केले. १९४७ मध्ये देशाची फाळणी झाल्यावर पुन्हा कोलकाता येथे निर्वासित म्हणून आल्यावर त्यांनी तब्बल २८ बंगाली सुपरहिट चित्रपट केले. १९५२ ते १९६० या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत स्मृती बिश्वास-नारंग याच्या सुपरहिट चित्रपटांची लाटच आली. सुपरस्टार देव आनंद यांना लग्नास नकार देत १९६० मध्ये प्रसिद्ध सिनेनिर्माता व दिग्दर्शक, लेखक डॉ. एस. डी. नारंग यांच्याशी विवाह केल्यानंतर स्मृती यांनी सिनेसृष्टीला कायमचा रामराम ठोकला.

सुपरहिट चित्रपट

नेक दिल, कैसे भुलूं, मुक्ती, चितगाव, अपराजिता, अभिमान, अनुराग, जबान बंदी, सुहान, आरजू, हमदर्द, हमसफर, बाप रे बाप, भागम भाग, डाका, मर्यादा, ताज, तलवार, मॉडर्न गर्ल.

''फिल्म इंडस्ट्री में नाम और शोहरत बहुत मिलती है, लेकिन शांती नहीं. इसलिए जिंदगी से तंग आयी हूँ| मुंबई के महल से नासिक की झोपडी अच्छी है| यहाँ के लोग बहुत अच्छे है|'' - स्मृती बिश्वास-नारंग, ज्येष्ठ अभिनेत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कांद्याचे भाव कोसळलेल्या कळवण तालुक्यात नवीबेज येथील ताराचंद रामभाऊ बागूल या ६५ वर्षीय शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली, तर याच तालुक्यातील आठंबे या गावी भाऊसाहेब चंद्राजी बंगाळ या ५० वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गेल्या दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे प्रशासनही हादरले आहे. लागोपाठ झालेल्या या आत्महत्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांची चिंताही वाढली आहे. या दोन्ही आत्महत्यांप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देऊन अहवाल मागविला आहे. नव्या वर्षात साडेतीन महिन्यांत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा २१ झाला आहे.

नव्या वर्षात साडेतीन महिन्यात जिल्हयातील शेतक-यांच्या आत्महत्याचा आकडा हा २१ झाला आहे. गेल्या वर्षात शेतकरी आत्महत्याचा हाच आकडा ८७ वर गेला होता.कळवण तालुक्यात गेल्या वर्षी आत्महत्याचे प्रमाण कमी होते.पण त्यात आता वाढ होवू लागली आहे.कांद्याला बाजारभाव मिळत नसल्यानं नैराश्यात असलेल्या बागुल यांनी राहत्या घरात त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.त्यानंतर घरातील व शेजा-यांनी बांधवानी कळवण उप जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी ताराचंद यांना दाखल केले. तेथे प्राथमिक औषधोपचार घेतल्यानंतर ताराचंद यांन नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉक लागल्याने कामगाराचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्लॅबचे काम आटोपून इमारतीखाली हातपाय धुण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय कामगाराचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सांयकाळी नाशिकरोड येथील हनुमाननगर भागात घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

गोविंद उर्फ जिवा किरता वळवी (मूळ रा. धडगाव जि. नंदुरबार, हल्ली मोरवाडी, सिडको) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. गोविंद हनुमाननगर येथील राजराजेश्वरी नजिकच्या माळवे या बांधकाम व्यावसायिकाच्या साईटवर स्लॅप टाकण्याच्या कामासाठी गेला होता. सायंकाळी सव्वा पाच वाजता काम आटोपून तो हात पाय धुण्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाठीमागे गेला. स्लॅब ओतण्यासाठी पसरविण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वायरचा धक्का लागला. अन्य कामगारांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ वीज पुरवठा खंडीत केला. मात्र, तोपर्यंत तो गंभीर जखमी झाला. गोविंदाला लागलीच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारी संस्थांच्या नवव्यवसायांना प्रोत्साहन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सहकारी संस्थांनी ग्रामीण भागातील गरजा ओळखून नवीन व्यवसायांना सुरुवात करणे गरजेचे आहे. त्यासाठी अटल महापणन विकास अभियानाद्वारे नवीन व्यवसायांना प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.

सहकार विभागाच्या नाशिक विभागस्तरीय आढावा बैठकप्रसंगी देशमुख बोलत होते. बैठकीस विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील, विभागीय सहकार सहनिबंधक ए. डी. भालेराव, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, जयसिंग ठाकूर, विशाल जाधवर आदी उपस्थित होते. यावेळी देशमुख यांच्या हस्ते अभियानात चांगले काम करणाऱ्या सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना गौरविण्यात आले.

सहकार मंत्री देशमुख म्हणाले, की सहकारी संस्थांच्या व्यवसायांमुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणे शक्य आहे. यासाठी राज्यातील २२ हजार सहकारी संस्थांनी काही जणांसाठी नोकरी निर्माण केल्यास लाखो लोकांना रोजगार मिळू शकतो. व्यवसायामुळे गावातला पैसा गावातच राहील आणि गावाच्या विकासासाठी उपयोगात येईल. वैभवशाली राष्ट्र उभारणीसाठी वैभवशाली गावं निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूया. याचा लाभ आपल्या भागाला, गावालाच होईल.

सहकार विभागाचे जाळे गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत नेण्याची गरज आहे. चांगल्या सहकारी संस्थांच्या मजबुती आणि विकासासाठी शासनाच्या वतीने पुढच्या काळात विविध कामे करण्यात येणार असून व्यवसायांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येतील. एमसीडीसी, राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने थेट कर्जपुरवठा करण्यात येईल, असे देशमुख म्हणाले.

नाशिक विभागाचा आढावा

सहनिबंधक भालेराव यांनी नाशिक विभागातील कामाचा आढावा यावेळी सादर केला. विभागातील संस्थांनी १ लाख ३५ हजार नवीन सभासदांची नोंदणी केली असून बचतगटांना प्रोत्साहन देणे, अभियानांतर्गत नवीन ४० व्यवसायांची सुरुवात करण्यात आल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी जिल्हा उप निबंधक नाशिक, धुळे, जळगाव यांनी जिल्हास्तरीय आढावा सादर केला.

या संस्थांचा गौरव

अटल महापणन अभियानांतर्गत चांगल्या कामाबद्दल सुरगाणा आदिवासी विकास संस्था (तांदूळ व्यवसाय), राजापूर सहकारी विविध विकास सोसायटी, दिंडोरी (शेती औजारे), वडनेर भैरव सहकारी विकास संस्था (कृषी औषधे), हिरकणी बचतगट, कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक(उपहारगृह), रानवड विकास कार्यकारी सहकारी संस्था निफाड (हार्डवेअर) आदी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परीक्षा काळात बॅडमिंटन खेळणाऱ्या मुलीस घरात बोलविल्याने संतप्त झालेल्या तरुणाने मुलीच्या पालकास घरात घुसून बेदम मारहाण केली. ही घटना भाभानगर परिसरात घडली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तरुणास पोलिसांनी अटक केली आहे.

वैभव मोहन बाविस्कर असे संशयित तरुणाचे नाव आहे. एकाच बिल्डिंगमध्ये राहणारे वैभव आणि संबंधित युवती सोमवारी आपल्या सोसायटीच्या आवारात बॅडमिंटन खेळत होते. परीक्षा सुरू असताना मुलगी खेळत असल्याचे बघून वडिलांनी तिला घरात बोलावले. यावेळी संतप्त झालेल्या संशयित वैभवने शिवीगाळ करीत घरात घुसून मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केली. यावेळी खिडकीच्या पडद्यासाठी लावलेला स्टिलचा दांडा त्याने मुलीच्या वडिलांच्या हातावर मारला. यामुळे त्यांचा हात फॅक्चर झाला असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल करीत संशयितास पकडले असून, अधिक तपास उपनिरीक्षक हिरे करीत आहेत.

जमीन व्यवहारात दीड कोटींची फसवणूक

जमीन खरेदी-विक्री व्यवसायात गुंतवणूक करण्यास भाग पाडून तब्बल एक कोटी ३५ लाख २५ हजार रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी सातपूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. किशोर ताराचंद पाटील (रा. फाईन टॉवर, महात्मानगर) या संशयित व्यावसायिकाचे नाव आहे. जगदीश माणिकचंद अग्रवाल (रा. रूद्राक्ष रेसि., कामगारनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अग्रवाल हे गुंतवणुकदार असून त्यांनी २०१२ मध्ये पाटील यांच्याकडे गुंतवणूक केली होती. त्या व्यवहारात भरघोस मोबदला मिळवून दिल्याने अग्रवाल यांचा पाटील यांच्यावर विश्वास निर्माण झाला. दरम्यान, नव्याने असन्यू लाईक या कंपनीने ७५ एकर जमिनीची मागणी केली असून, त्यात गुंतवणूक केल्यास मोठा लाभ होईल, असे आमिष दाखवून पाटील यांनी अग्रवाल व त्यांचा मुलगा माधव अग्रवाल यांच्याकडून वेळोवेळी सुमारे एक कोटी ३१ लाख २५ हजार रुपये गुंतवणूक करून घेतली. मात्र, पैसे मिळाल्यानंतर आजतगायत कुठलीही परतफेड केली नाही. पैसे मिळत नसल्याने अग्रवाल यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.


भाजीपाला खरेदी करून घराकडे परतणाऱ्या वृध्देच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरील चोरट्यांनी ओरबाडून नेली. ही घटना नाशिक-पुणे हायवेवरील श्री श्री रविशंकर मार्गावर घडली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मालती गजानन बनसोड (रा. संजीवनी ब्लड बँकेजवळ) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास बनसोड या भाजीपाला खरेदीसाठी परिसरातील भाजी मार्केटमध्ये गेल्या होत्या. काम आटोपून घराकडे परतत असताना चोरट्यांनी संधी साधली. श्री श्री रविशंकर मागार्वरील संजीवनी ब्लड बँकेसमोरून पायी जात असतांना बनसोड यांच्या समोरून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १४ हजार रुपयांची सोन्याची पोत ओरबडून नेली. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.


दुकानदारावर अॅसिड हल्ला

मालेगाव : बिसमिल्ला बाग भागातील ८० फुटी रोडवरील एका इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकावर दोघा अनोळखी व्यक्तींनी अॅसिड हल्ला केला. या प्रकरणी अब्दुल हमीद अहमद (रा. रविवार वार्ड) यांच्या फिर्यादीवरून पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अब्दुलचे वडील मोहम्मद नजीर उर्फ छोटे सरदार हे ११ मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास इलेक्ट्रोनिक दुकानावर काम करीत असताना कोणीतरी दोन अज्ञात व्यक्तींनी अचानक अॅसिड हल्ला केला. यामुळे रमजान यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या. त्यांना सुरुवातीला खासगी रुग्णालयात आणि नंतर नाशिक येथे हलवण्यात आले. मोहम्मद सरदार हे सामाजिक कार्यकर्ते असून धार्मिक जातपंचायतीत ते सामोपचाराने अनेक प्रकरणात भूमिका बजावतात.

दानपेटीची चोरी

नाशिकरोड : दत्तमंदिर रोडवरील स्वामी समर्थ मंदिरावर गुरुवारी पहाटे चोरांनी डल्ला मारला. मंदिरातील दानपेटीबरोबरच चांदीच्या पादुका त्यांनी चोरल्या. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत दाखल झालेला नव्हता. दत्तमंदिर रोड येथील धोंगडे मळा परिसरात स्वामी समर्थ मंदिर आहे. बुधवारी रात्री मंदिर बंद झाल्यानंतर चोरांनी पहाटे मंदिराच्या दरवाजाचे कडी-कुलुप तोडून आत प्रवेश केला. दानपेटी व चांदीच्या पादुकांसह ३० हजार रुपये लंपास केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नांदगाव जमीन प्रकरणी अव्वल कारकून अटकेत

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवीन अविभाज्य शर्तीच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीबाबत अधिकार नसताना तहसीलदारांनी परस्पर परवानगी देत सरकारची तब्बल पावणे चार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) राष्ट्रीय हमरस्ता विभागाचा अव्वल कारकून अशोक खंडेराव आहेर याला अटक केली. त्याला मालेगाव कोर्टाने २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘एसीबी’ने या प्रकरणी येवल्याच्या प्रांत वासंती माळी, नांदगावचे तत्कालीन तहसीलदार सुदाम महाजन यांच्यासह २३ जणांवर नांदगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. २०१५ मध्ये तत्कालीन तहसीलदार सुदाम महाजन यांनी अधिकार नसताना सुमारे ३०० एकरच्या आसपास नवीन अविभाज्य शर्तीच्या जमीन खरेदी-विक्रीस परवानगी दिली. यामुळे सरकारचा ५० टक्के महसूल बुडला. या बेकायदा कामात तहसीलदार महाजन यांच्या समवेत येवल्याच्या प्रांत वासंती माळी, प्रभारी तहसीलदार प्रणिती दंडिले, दुय्यम निबंधक डी. डी. पंडित, मंडळ अधिकारी अशोक शिलावट, ए. के. आहेर, अव्वल कारकून डी. ए. कस्तुरे,(जमाबंदी), तलाठी व्ही. पी. सोनवणे, व्ही. बी. बोडके, जयेश मलदुडे, व्ही. पी. गायकवाड यांच्यासह अॅड. शिवाजी सानप, अॅड. प्रशांत सानप (कासारी), नाशिक येथील जयंतीभाई पटेल, भावीन पटेल, श्रीमती मणिबेन पटेल, प्रवीणभाई पटेल, अर्जुन माकानी, शिवलाल माकानी, रंजन माकानी, विनोद माकानी, श्रीमती भारती शहा, पोपट पटेल यांच्यावर ठपका ठेवत एसीबीने कारवाई केली. मात्र, एसीबीची ही कारवाई विवादास्पदही ठरली. महसूल विभागाच्या एकाच जीआरचा तसेच हितसंबंधचा जाणिवपूर्वक वापर केला जात असल्याचा आरोप ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यावर अजूनही होतो आहे. या गुन्ह्यात बहुतांश संशयितांना हायकोर्टाने जामीन मंजूर केला. मात्र, ३१ जानेवारी २०१७ रोजी संशयित अव्वल कारकून अशोक खंडेराव आहेर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळून लावला होता. तेव्हापासून आहेर फरार होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कारप्रकरणी सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकास कोर्टाने १० वर्षांची शिक्षा सुनावली. या गुन्ह्यात अन्य दोन महिलांना आठ महिनांची शिक्षा सुनावण्यात आली.

पॉल जोसेफ शिरोळे (५८, रा. जोसेफ व्हिला, लव्हाटे नगर, सिटी सेंटर मॉलजवळ, शरणपूर रोड, नाशिक) असे शिक्षा झालेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एच. मोरे यांनी वसतिगृहाची माजी अधीक्षिका सुमन रणदिवे (रा. आययूडीसी कॉलनी, मनमाड) व उज्ज्वला नागरिक (रा. उषाकिरण सोसायटी, संभाजी चौक, सिडको) यांना प्रत्येकी आठ महिन्यांची सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

मनमाडमधील ख्रिश्चन मेडिकल आणि एज्युकेशन फेलोशिप ट्रस्टच्या मनोरमा सदनमध्ये निराधार मुलींचे वसतिगृह आहे. याठिकाणी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील १७ वर्षीय मुलगी शिक्षण घेत होती. वसतिगृहाची अधीक्षिका रेचेल शेलार या डिसेंबर २०१३ मध्ये नाताळच्या सुटीवर गेल्या होत्या. या दरम्यान, माजी अधीक्षिका सुमन रणदिवे हिने वसतिगृहातील पीडीत मुलीस नाशिकमधील उज्ज्वला नागरिक यांच्याकडे घरकामासाठी पाठविले. जानेवारी २०१३ मध्ये बांधकाम व्यवसायिक पॉल शिरोळे याने तिच्यावर बलात्कार केला. पीडीत मुलीची चुलत बहिण शहापूरला राहते. तिला एका चौकीदाराच्या फोनवरून पीडितेने घटना सांगितली. एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने २ एप्रिल २०१४ रोजी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी बलात्कार तसेच पोस्को कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. पोलिस उपनिरीक्षक आरती खेतमाळीस यांनी या प्रकरणाचा तपास केला. या खटल्यात सरकारी वकील गायत्री पटनाला यांनी १७ साक्षीदार तपासले. डॉक्टर, फिर्यादी, पीडीत मुलगी, तिची मैत्रिण या सर्वांची साक्ष महत्त्वाची ठरली. गुन्हा सिध्द झाल्याने पॉल शिरोळे यास १० वर्षे सक्तमजुरी झाली. संशयित आरोपी मनोरमा सदनच्या अधीक्षिका रेचेल शेलार यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली.

खून प्रकरणी दोघींना जन्मठेप

पतीचा खून करून हत्याचा बनाव रचणाऱ्या पत्नीसह सुनेला कोर्टाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सिन्नर तालुक्यातील सोनांबे येथे २०१० मध्ये घडलेल्या हत्येनंतर पुरावे नष्ट करणाऱ्या शालकाला कोर्टानी तीन वर्षांची शिक्षा ठोठवली. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचिता घोडके यांच्या कोर्टात सुनावणी पूर्ण झाली. २ जुलै २०१० रोजी रात्री पोपट लक्ष्मण कडभाने (५५, रा. चिकेमळा, सोनांबे, ता. सिन्नर) यांचा खून झाला होता. सुरुवातीस ही हत्या चोरट्यांनी केल्याचे दिसत होते. मात्र, पोलिसांनी तपास करून या प्रकरणी कडभाने यांची पत्नी यमुनाबाई कडभाने व सून शुभांगी गणेश कडभाने यांना अटक केली. पत्नी यमुनाबाईवरही संशय घेत असल्याने तसेच सुनेवरही वाईट नजर ठेवत असल्याने या दोघींनी कडभानेच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची बाब तपासी अधिकारी एस. के. घाडगे यांनी तपासाद्वारे समोर आणली. यमुनाबाईचा भाऊ कैलास राजाराम आरोटे (रा. आगासखिंड) याने घटनेचा पुरावा नष्ट केला होता. सरकारी पक्षातर्फे अॅड. गायत्री पटनाला, अॅड. सुप्रिया गोरे यांनी नऊ साक्षीदार तपासले. गुन्हा सिध्द झाल्याने कोर्टाने यमुनाबाई व शुभांगी कडभाने या दोघींना जन्मठेप तर कैलास आरोटे यास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेकडून नळाच्या मोटर जप्त

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको परिसरात भेडसावणारी पाणीसमस्या सोडविण्यासाठी महापालिकेने नळाच्या मोटर जप्तीची मोहीम हाती घेतली आहे. मोटरीचा सर्रासपणे वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून शपथपत्र लिहून घेण्याची मोहीम महापालिकेने राबविली.

महापालिका सिडको विभागीय कार्यालयाच्यावतीने बजरंग चौक, दत्त चौक या परिसरातून दहा ते बारा मोटर जप्त केल्या. मोटर जप्त केलेल्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपये दंड व शपथपत्र लिहून घेण्यात आले. सिडको परिसरात अनेक ठिकाणी पुरेसे पाणी मिळावे म्हणून काही नागरिक सर्रासपणे मोटरींचा वापर करतात. त्यामुळे बऱ्याच जणांना पाणीच मिळत नसल्याचे समोर आले. त्यामुळे विभागीय अधिकारी डॉ. सुनिता कुमावत यांनी आरोग्य व पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सिडकोतील बऱ्याच भागात ही मोटर जप्तीची मोहीम राबविली. मोटर जप्त करून घेतल्यानंतर प्रत्येकी एक हजार रुपये दंड व पुन्हा मोटर वापरण नाही असे शपथपत्र लिहून घेण्यात आले. जप्त केलेल्यांनी पुन्हा मोटरीचा वापर केल्याचे आढळून आल्यास दुप्पट दंड नळ कनेक्शन बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पाण्याचा मुबलक पुरवठा असला तरी काही जणांमुळे सर्वांना पाणी मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सिडकोतील नागरिकांनी आता मोटरींचा वापर करू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ भूलतज्ज्ञावर संशयाची सुई

$
0
0



नाशिक : एमबीबीएसचे शिक्षण घेऊन आरोग्य विभागात नोकरी करणाऱ्या एका डॉक्टराने काम सांभाळत चक्क भूलतज्ज्ञांची पदवी मिळवली. या पदवीच्या आधारे घसघशीत वेतनवाढ घेणाऱ्या या डॉक्टरचे गर्भपात प्रकरणात कनेक्शन असल्याची चर्चा सर्व डॉक्टरांमध्ये सुरू आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वर्षा लहाडे यांच्या प्रयाग हॉस्पिटलमध्ये त्याचे सतत जाणे-येणे होते. दुर्दैवाने आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.

आरोग्य विभागात भूलतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या सदर डॉक्टरचे एका आमदारांशी नामसाधर्म्य असून, त्याचाच फायदा घेत डॉक्टरने बस्तान बांधल्याचे सांगितले जाते. एमबीबीएसपर्यंतचे शिक्षण घेतलेला डॉक्टर नोकरीत असताना भूलतज्ज्ञ झाला. सिव्हिल हॉस्पिटलसह संबंध जिल्ह्यभरात हा चर्चेचा विषय आहे. याच शिक्षणाच्या आधारावर डॉक्टरने घसघसीत वेतनवाढ मिळविली. याबाबत अनेकदा माहितीच्या आधाराखाली सिव्हिल सर्जन यांच्याकडे विचारणा झाली. मात्र, सदर प्रश्नाचे उत्तर नेहमीच टाळले जाते. याच डॉक्टरचे डॉ. लहाडे यांच्या प्रयाग हॉस्पिटलमध्ये सतत येणे-जाणे होते. २४ आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा गर्भ काढून टाकताना सिझेरियन करण्याची वेळ येते. अशा वेळी आरोग्य सेवेचा हा डॉक्टर प्रयाग हॉस्पिटलमध्ये हजर राहायचा. अद्यापपर्यंत या प्रकरणाच्या चौकशीत डॉ. लहाडे व त्यांचे पती वगळता दुसऱ्या व्यक्तीचे नाव पुढे आलेले नाही. अवैध गर्भपात केंद्र चालवल्या प्रकरणी डॉ. लहाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून, सिव्हिलमध्ये झालेल्या गर्भपात प्रकरणात मात्र चौकशी गुंडाळली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

खासगी डॉक्टरांना दुसरा न्याय का?

मुंबई नाका परिसरातील डॉ. बळीराम शिंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपात केल्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी समोर आले होते. त्यावेळी महापालिका प्रशासनाने लागलीच गुन्हा दाखल करीत तत्परता दाखवली. एवढेच नव्हे तर गर्भापत झालेल्या महिलेवर उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टरांना देखील कायद्याच्या कचाट्यात घेण्यात आले. प्रयाग हॉस्पिटलबाबत मात्र दुसरे नियम लावले जात असल्याची चर्चा आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत सुरू आहे.

डॉ. लहाडेंच्या जामिनावर १५ रोजी सुनावणी

अवैध गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या डॉ. वर्षा लहाडे यांच्या अटकपूर्व जामिनावर १५ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. डॉ. लहाडे यांच्याविरोधात म्हसरूळ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी न्यायाधीश एस. आर. शर्मा यांच्या कोर्टात गुरूवारी सुनावणी होती. मात्र, ती पुढे ढकलण्यात आली. बचाव पक्षातर्फे अॅड. राहुल कासलीवाल काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओ परिसरात हाणामारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आरटीओ परिसरात गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास गुंडांनी दहशत पसरवित येथील गॅरेजची तोडफोड केली. जुन्या भांडणाची कुरापत काढून गुंडांच्या मदतीने एका तरुणास मारहाण केली. मारहाण झालेल्या तरुणाने काही गुंडांच्या मदतीने येथील गॅरेजची तोडफोड करीत नुकसान केले. गॅरेज मालकालाही मारहाण केली. या प्रकरणी पंचवटी आणि म्हसरुळ पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

दत्ता लासुरे हा तरुण आरटीओ कार्यालयात किरकोळ काम करतो. आरटीओ कार्नर येथील मानस कार सर्व्हिसमध्ये अशोक पवार व दीपू पवार हे कामास आहे, यातील दीपू पवार आणि दत्ता लासुरे यांच्यात दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणावरून गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास अशोक पवार व दीपू पवार या दोघांनी काही गुंडांना सोबत घेऊन दत्ता लासुरे यास आरटीओ कार्यालयाजवळ मारहाण केली. या मारहाणीमुळे चिडलेल्या दत्ता लासुरे याने फुलेनगर परिसरातील काही तरुणांना घेऊन मानस कार सर्व्हिस या गॅरेज येथे असलेल्या पाच गाड्यांची तोडफोड केली. त्यावेळी त्यांना अशोक आणि दीपू कुठेही दिसत नसल्याने त्यांनी गॅरेजचे नुकसान केले, तसेच गॅरेजचे मालक नीलेश दत्तात्रय जाधव (४०, रा. जुई नगर, आरटीओ कार्नर) यांना लोखंडी राडने मारहाण करीत जखमी केले.

या घटनेने आरटीओ परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. तणावग्रस्त वातावरण होताच टोळक्याने येथून पळ काढला. या घटनेचे माहिती पोलिस ठाण्याला कळविण्यात आल्यानंतर म्हसरुळ पोलिसांना घटनास्थळी येऊन पाहणी केली, काही संशयितांना त्यांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images