Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दोघांचा जामीन अर्ज फेटाळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्टिलरी सेंटरमधील गनर रॉय मॅथ्यू यांच्या आत्महत्या प्रकरणात दिल्ली येथील पत्रकार पूनम अग्रवाल यांच्यासह सेवानिवृत्त लष्करी कर्मचारी दीपचंद कयात यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. पठाण यांनी शनिवारी (दि. १५ एप्रिल) फेटाळून लावला. पोलिस त्यांना कधीही अटक करू शकतात. दोघा संशयितांवर ऑफिशियल सिक्रेट अॅक्टसह (ओएसए) तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

केरळ येथील रॉय मॅथ्यू यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह २ मार्च रोजी आर्टिलरी सेंटरमधील एका बंद बॅरेकमध्ये आढळून आला होता. साधारणतः २५ फेब्रुवारी रोजी मॅथ्यूज यांनी गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करीत चौकशी सुरू केली. त्यात त्याचे दिल्ली येथील द क्यून्ट न्यूज पोर्टलच्या पूनम अग्रवाल यांनी स्टिंग ऑपरेशन केल्याचे समोर आले होते. स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोर्टमार्शलच्या भीतीने रॉयने आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. याबाबत पोलिस आणि लष्कराने केलेल्या चौकशीअंती अग्रवाल यांच्यासह दीपचंद यांच्याविरोधात देवळाली कॅम्प पोलिसांनी कलम गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर दोघांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. कोर्टाने कामकाजासाठी १५ एप्रिल ही तारीख दिली होती. तज्ज्ञ वकिलांनी संशयितांच्या बाजूने युक्तिवाद केला. सरकारी पक्षातर्फे अॅड. पंकज चंद्रकोर यांनी बाजू मांडली. संशयितांकडून कॅमेरा, मेमरी कार्ड जप्त करायचे आहे. संशयितांनी कोणतीही मंजुरी न घेता लष्कराच्या प्रतिबंधित क्षेत्रात चित्रीकरण केले. ही बाब गंभीर असून, त्यांच्या हेतूबाबत चौकशी होणे क्रमप्राप्त असल्याचे स्पष्ट करीत अॅड. चंद्रकोर यांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावण्याची विनंती केली. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने अग्रवाल यांच्यासह दीपचंद यांची विनंती फेटाळून लावली.

अटक की हायकोर्ट?

अग्रवाल आणि दीपचंद यांच्या बाजूने सुप्रीम कोर्ट तसेच हायकोर्टातील ज्येष्ठ वकिलांनी बाजू मांडली. स्टिंग ऑपरेशन झाले तो परिसर रेसिडेन्शल होता. त्यामुळे परवानगीची आवश्यकता नव्हती. तसेच या स्टिंगमुळे कोणी आत्महत्या करावी, असा आमचा हेतू नव्हता, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. मात्र, सरकारी पक्षातर्फे मांडण्यात आलेल्या युक्तिवादानंतर कोर्टाने संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. आता पोलिस संशयितांना अटक करणार की ते हायकोर्टात धाव घेणार या विषयी चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आगामी दोन दिवस आणखी ‘ताप’दायक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात शुक्रवारी ४१ अंशांवर गेलेला तापमानाचा पारा शनिवारी एक अंशाने खाली उतरला. नाशिकमध्ये कमाल तापमान ४०.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले, तर किमान तापमान चार अंशांनी वाढून २०.६ अंशांवर पोहोचले. आगामी दोन दिवसांत मालेगावचे तापमान ४४ अंशांवर, तर नाशिकचे तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. शनिवारी तापमानाचा पारा एक अंशांनी कमी झाला. परंतु, किमान तापमान १६ अंश सेल्सिअसवरून २०.६ अंश सेल्सिअसवर पोहोचले. मालेगावचे तापमान ४२.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. शनिवारी कमाल तापमान शुक्रवारच्या तुलनेत काहीसे कमी झाले असले, तरी उन्हाचा तडाखा कायम असल्याने रस्ते ओस पडले होते.

तफावतीने आश्चर्य

भारतीय हवामान विभागाने शनिवारचे नाशिकचे तापमान ४०.१, तर मालेगावचे तापमान ४२.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले. परंतु, पुणे हवामान विभागाने हेच तापमान अनुक्रमे ४१ आणि ४३.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले. हवामान विभागाच्या दोन कार्यालयांकडून प्राप्त हवामानाच्या मोजमापात बरीच तफावत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन ठिकाणी ऑनलाइन फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑनलाइन बँकिंग तसेच विक्री व्यवहारातून फसवणूक झाल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. ऑनलाइन व्यवहारात फसवणूक होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगत व्यवहार करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

फसवणुकीचा एक घटना वडाळारोड परिसरात घडला. फोनवरून डेबिटकार्डची संपूर्ण माहिती मिळवित ऑनलाइनद्वारे १७ हजार रुपये बँकेतून काढून घेत एकाची फसवणूक करण्यात आली. वडाळा रोड येथे राहणाऱ्या अजीज मोईन राजगारा यांच्या मुलाच्या मोबाइलवर आलेल्या फोनवरून त्यांच्या मुलाने डेबिट कार्डची संपूर्ण माहिती संशयितास दिली. यानंतर, त्यांच्या खात्यातून चोरट्याने परस्पर १७ हजार रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर राजगारा यांनी पोलिसांकडे धाव घेतली. दरम्यान, ऑनलाइनद्वारे कॅमेरा बुक करीत बँकेत दोन वेळा ३० हजार रुपयांप्रमाणे ६० हजार रुपये भरूनही दाम्पत्याची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडाळा पाथर्डीरोड येथील श्रीरामनगर येथे राहणाऱ्या नीलेश यशवंत ठाकरे यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी काही दिवसांपूर्वी ऑनलाइन पध्दतीने एका नामांकित कंपनीचा कॅमेरा बुक करण्यासाठी संशयित किरणकुमार याच्याशी संपर्क साधला होता. कॅमेरा खरेदी करण्यासाठी संशयिताने सांगितल्यानुसार ठाकरे यांनी २२ व २३ फेब्रुवारी २०१७ रोजी दोनदा तीस हजार रुपयांप्रमाणे बँक खात्यात जमा केले. यानंतर किरणकुमार कडे कॅमेऱ्याची मागणी केली. मात्र, संशयिताने कस्टमड्युटी म्हणून आणखी १० हजार रुपये भरण्याचे सांगत कॅमेरा न देता फसवणूक केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडकोत घरफोडी

सिंहस्थनगरातील बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. निर्मल बापू वाघ हे कामानिमित्त बाहेर गेल्या असता चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून सोन्या-चांदीच्या दागिण्यासह रोख रुपये, मोटार असा दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक-ट्रॅव्हल्सची धडक; दहा जण जखमी

0
0

म. टा. वृत्तसेवा धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात सुरत-नागपूर महामार्ग क्रमांक सहावर नवरंग रेल्वे गेटजवळ शनिवारी (दि. १५) ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला. यात दोन्ही वाहनाच्या चालकांसह दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.

इंदौर-सुरत खाजगी बस धुळ्याकडून सुरतकडे जात असताना समोरून भरधाव वेगाने येणारा ट्रक यांची शनिवारी, सकाळी सहा वाजता समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला. यावेळी परिसरातील नागरिकांनी केलेल्या बचाव कार्यामुळे घटनास्थळी जखमींना वेळेवर उपचार मिळाल्याने मोठी जीवितहानी टळली. दरम्यान अपघातांतील सर्व प्रवाशांवर नवापूर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. यात ट्रक चालक राजेंद्र लक्ष्मण बडगुजर (वय ४२, रा. उंदीरखेडा, पारोळा जि. जळगाव), बसचालक सिताराम गिरिष चौथमल (वय ३०, रा. इंदौर, मध्यप्रदेश) तर प्रवाशी मुन्नाश्री बालमुकुंद ठाकुर, (ग्वालियर, मध्यप्रदेश) हे गंभीर जखमी झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश मावची यांनी दिली. तर उर्वरित सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही देण्यात आली.

अपघात झाल्यानंतर महामार्गावरील वाहतूक काळीकाळ ठप्प झाली होती. मात्र काही वेळानंतर ती पूर्ववत सुरू करण्यात आली. याप्रकरणी नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली. या घटनेत ट्रकचालक राजेंद्र बडगुजर हा ट्रकमध्ये अडकून पडला होता. पोलिस घटनास्थळी आल्यांनतर त्याला बाहेर काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होमिओपॅथीद्वारे दिले हजार रुग्णांना जीवदान

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जखमेचे रक्त न गोठण्याची सर्वसामान्यांमध्ये न आढळणारी समस्या घेऊन जगणाऱ्या, वेदनेने तळमळणाऱ्या रुग्णांची अवस्था त्यांना पाहवत नव्हती. अशा रुग्णांसाठी अखेर अल्प खर्चात उपचारपद्धती देण्याचे ध्येय त्यांनी ठेवले. होमिओपॅथी इन हिमोफिलिया (एचआयएच) या नाशिकमध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाने अवघ्या नऊ वर्षांत ३०३ शिबिरे आणि १०२० रुग्णांवर उपचार करत रुग्णांना दिलासा दिला. हिमोफिलियावर उपचारासाठी भारतात सर्वाधिक शिबिरे घेण्याच्या या उपक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड‌्स- २०१६’ मध्येही घेण्यात आली आहे. या उपक्रमाचे मुख्य संशोधक आहेत डॉ. तपसकुमार कुंडू.

या उपक्रमाचा विस्तार नाशिकबरोबरच मुंबई (परळ), ठाणे, अमरावती, नागपूर आणि गुजरातमधील सुरत येथेही झालेला आहे. डॉ. कुंडू यांनी या उपक्रमाची सुरुवात २१ डिसेंबर २००७ रोजी केली. आजतागायत दर रविवारी ही शिबिरे घेण्याचा, त्यात अल्पदराने होमिओपॅथिक औषधे देण्याचा उपक्रम अव्याहत सुरू आहे. त्यांच्यासमवेत डॉ. अफरोज शेख, डॉ. आफिया शेख, डॉ. हिरल शहा, डॉ. ओंकार कुमट व फिजिओथेरपिस्ट म्हणून डॉ. अपर्णा नलावडे यांचे पथक कार्यरत असते.

थ्राम्बोप्लास्टिनची कमतरता हिमोफिलियास कारणीभूत असते. अनिर्बंध रक्तस्राव म्हणजे हिमोफिलिया. हा अनुवंशिक आजार असून, तो सामान्यपणे पुरुषांमध्ये आढळतो. गर्भावस्थेपासून तो विकसित होतो. त्यात जखमेतून वाहणारे रक्त लवकर थांबत नाही. रक्तातील प्रोटिनच्या कमतरतेमुळे ‘क्लॉटिंग फॅक्टर’ अर्थात रक्ताची गाठ तयार होत नाही. त्याला थ्राम्बोप्लास्टिन हा घटक कारणीभूत असतो. त्यात अतिरिक्त रक्त वाहून गेल्यामुळे रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. उपचारांबाबत www.homeopathy in haemophilia.com या वेबसाइटवर माहिती उपलब्ध आहे.

--

हिमोफिलियावर झालेली शिबिरे

११३ नाशिक

११० मुंबई (परळ)

०९ मुंबई (ठाणे)

१२ अमरावती

०५ नागपूर

५३ सुरत (गुजरात)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरपालिकेसमोर धरणे

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

आजपर्यंत घरे न मिळालेल्या सफाई कामगारांना घरे मिळावीत, कालबद्ध पदोन्नती लागू झालेल्या कर्मचाऱ्यांना फरक अदा करावा आदी मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा करूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष केल्याचा आरोप करणाऱ्या येवला नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पालिकेतील भारतीय मजदूर संघाने शनिवारी सकाळी पालिकेच्या प्रवेशद्वारावरच जोरदार घोषणाबाजी करत तासभर धरणे धरले.

येवला नगरपालिका प्रशासन पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करणाऱ्या भारतीय मजदूर महासंघाने आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या हिताच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघाने धरणे तसेच इतर आंदोलनाचा इशारा दिला होता. शनिवारी (दि.१५) सकाळी ११ वाजता येवला नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर जमा झालेल्या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणा देत पालिकेच्या प्रवेशद्वारावरच ठाण मांडले होते. आंदोलनाचे नेतृत्व करणारे भारतीय मजदूर संघाचे शशिकांत मोरे, प्रशांत पाटील, श्रावण जावळे यांच्यासह ईश्वर कायस्थ यांनी केले.

मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळात आंदोलन तीव्र करण्यात येईल. तसेच २१ एप्रिल रोजी मोर्चा, त्यानंतर २५ एप्रिलपासून स्वच्छता कर्मचारी व मुकादम बेमुदत कामबंद आंदोलन करतील, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला. शनिवारच्या धरणे आंदोलनानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात भारतीय मजदूर संघाचे संघाचे पालिकेतील पदाधिकारी, प्रतिनिधी व मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यात एक बैठक झाली.

निधी उपलबद्धतेनुसार पालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता केली जाईल. पालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेवून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत देखील निर्णय घेतला जाईल.

- राहुल वाघ, मुख्याधिकारी, येवला नगरपालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३८ हजार शेतकऱ्यांना फायदा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य शासनाने १०० रुपये प्रतिक्किटंल अनुदान जाहीर केल्यानंतर तब्बल आठ महिन्यांनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत. जिल्ह्यात या अनुदानाचा लाभ ३७ हजार ६५० शेतकऱ्यांना होणार असून, त्यांना १४ कोटी ४६ लाख रुपये मिळणार आहेत.

कांद्याचे भाव कोसळल्यानंतर हमी भाव देण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने हे अनुदान जाहीर केले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीत २०१६ मध्ये जुलै ते ऑगस्ट या दरम्यान कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. यासाठी शासनाने परिपत्रक काढून अनुदानाला मंजुरी दिल्याचे म्हटले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहारही वगळले असून याचा शेतकऱ्यांना फटका बसणार आाहे.

या अनुदानाचे प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी संबंधित बाजार समितीवर टाकण्यात आली आहे. प्रस्ताव तयार केल्यानंतर ते तालुका सहाय्यक निबंधक तपासतील व नंतर ते जिल्हा उपनिंबधकाकडे पाठविले जातील. त्यानंतर पात्र प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर ती यादी पणन संचालनालकडे जाणार आहे. त्यानंतर हा निधी जिल्हा उपनिबंधकाकडे वर्ग होणार आहे.

यादी करण्यापूर्वीच त्रुटी

यादी करण्याचे निर्देश दिले असतांना यादी अगोदरच तयार केल्याची चर्चा आहे. यादी तयार होण्याअगोदरच या परिपत्रकात नाशिक जिल्ह्यातील ५०२ प्रकरणात सातबारा उतारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी अन्य कुटुंबीयांच्या नावे आहे. कुटुंबीयांच्या सहमतीने समितीकडे शपथपत्र सादर केल्यानंतर सातबारा उतारा ज्यांच्या नावे असेल त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा होणार असल्याचे म्हटले आहे.

आवश्यक कागदपत्रे

लाभ २०० क्विंटलपर्यंतच, लाभ २०० क्विंटलपर्यंतच, कांदाविक्री पट्टी, सातबारा उतारा, बँक खाते आवश्यक, विक्री केलेल्या बाजार समितीत अर्ज करणे अनिवार्य, परराज्यातून आवक झालेल्या व्यापाऱ्यास ही योजना लागू नाही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील एटीएममध्ये खडखडाट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यातील बँकांमध्ये पुन्हा चलनटंचाई निर्माण झाल्याने एटीएममध्येही खडखडाट आहे. जिल्ह्यातील ६००, तर शहरातील ४५ एटीएम बंद असून, सोमवारपर्यंत (दि. १७ एप्रिल) रिझर्व्ह बँकेकडून नाशिककरांसाठी चलन उपलब्ध होईल, अशी शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तवली आहे.

रिझर्व्ह बँकेने बँकांच्या चलनपुरवठ्यात कपात केली आहे. बँकांकडून एटीएमपेक्षाही खातेदारांनाच प्राधान्य दिले जाऊ लागल्याने एटीएम सेंटर्समध्ये चलनाचा तुटवडा जाणवू लागला आहे. जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के एटीएम सेंटर्स बंद आहेत. जिल्ह्यात विविध बँकांचे ९०६ एटीएम सेंटर्स आहेत. त्यापैकी ६०० सेंटर्स बंद आहेत. शहरात ९० एटीएम सेंटर्सपैकी ४५ सेंटर्स बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. चलनटंचाईच्या समस्येवर तोडगा म्हणून स्टेट बँकेने रिझर्व्ह बँकेकडे सुमारे ३५० कोटी रुपयांची मागणी केली आहे. सध्या एसबीआयकडे जिल्ह्यात ६० कोटी रुपये, तर शहर शाखांकडे १२ कोटींची रोकड शिल्लक आहे. सोमवारी रिझर्व्ह बँकेकडून चलनपुरवठा न झाल्यास चलनटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

खातेदारांना प्राधान्य

एटीएममधून कोणत्याही बँकेचा खातेदार पैसे काढू शकत असल्याने एटीएम कार्डधारक शक्य तेवढी रक्कम काढून घेऊ लागले आहेत. परिणामी त्या त्या बँकेच्या खातेदारांना रक्कम मिळण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. अशा परिस्थितीत स्वतःच्या खातेदारांना प्राधान्य देण्याचा निर्णय बँकांनी घेतला असून, एटीएम सेंटर्समध्ये अधिक रक्कम न ठेवण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​शुल्क समितीला निर्णयाचा अधिकार

0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिकच्या विभागीय शिक्षण शुल्क समितीने समितीच्या कार्य कक्षेला आव्हान देणारा अशोका व केंब्रिज शाळेचा दावा फेटाळत समितीला पालकांच्या शुल्कविषयक तक्रारी ऐकून त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. शुल्क नियंत्रण कायद्याअंतर्गत दिलेला अशा प्रकारच्या हा महाराष्ट्रातील पहिलाच निकाल असल्याचे यानिमित्त बोलले जात आहे. शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाने या निर्णयाचे स्वागत करत आतातरी पालकांच्या तक्रारीवर सुनावणी होऊन त्यांना न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
अशोका व केंब्रिज शाळांमधील पालकांनी या शाळांनी २०१४-१५, २०१५-१६ व २०१६-१७ या वर्षात केलेल्या शुल्कवाढीविरोधात नाशिकच्या विभागीय शिक्षण शुल्क समितीकडे तक्रार केली होती. या तक्रारींची दखल घेत समितीने शाळांना आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. आपल्या उत्तरात शाळांनी पालकांना अशी तक्रार अधिकारच नाही व पालकांच्या तक्रारींची दखल घेणे समितीच्या न्याय कक्षेत येत नाही, असा प्रतिवाद केला होता. तक्रार करण्याचा अधिकार केवळ शाळा व्यवस्थापनाला किंवा शिक्षक पालक समितीलाच आहे, असा दावा शाळांतर्फे करण्यात आला होता.
याबाबत पालकांच्या बाजू मांडताना अॅड. मिलिंद निकम यांनी समितीच्या हे निदर्शनास आणून दिले की शुल्क नियंत्रण कायदा २०११चा उद्देशच मनमानी पद्धतीने फी वाढ करून पालकांना त्रास देणाऱ्या शाळा व्यवस्थापनांच्या एकाधिकारशाहीला चाप लावणे हा आहे. त्यामुळे पालकांना या समितीकडे शुल्क नियंत्रण कायद्या अंतर्गत तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पालकांचे हे म्हणणे मान्य करीत विभागीय शुल्क समितीला पालकांच्या तक्रारीची दखल घेण्याचा अधिकार आहे, असा निर्णय समितीने दिला. मुंबई उच्च न्यायालयात शाळांच्या संघटनेने शुल्क नियंत्रण कायद्याला आव्हान दिल्याचे अशोका व केंब्रिज शाळेच्या वतीने अॅड. नागनाथ गोरवाडकर यांनी सांगितले. मात्र, उच्च न्यायलयाने विभागीय शिक्षण शुल्क समितीच्या कामकाजाला स्थगिती दिलेली नसल्याने पालकांच्या तक्रारींवर यापुढे सुनावणी घेण्याचा निर्णय समितीने दिला आहे.

न्यायाची अपेक्षा

नाशिकच्या विभागीय शुल्क नियंत्रण समितीच्या कामकाजास धिम्या गतीने का होईना सुरुवात झाली असल्याने शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले आहे. अशोका व केंब्रिज शाळेने नेहमीप्रमाणे वकीलांमार्फत समितीच्या कार्यकक्षेलाच आव्हान दिले होते. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी पुढे सरकत नव्हती, असे मंचाच्या वतीने सांगण्यात येत आहे. आता कार्यकक्षेचा मुद्दा निकाली निघाल्यानंतर समितीने हे कामकाज जलद गतीने चालवून पालकांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व्हिसरोड पथदीपांविना

0
0

आडगाव ः मुंबई-आग्रा महामार्गाचे काम पूर्ण होऊन पाच वर्ष उलटले तरी कोणार्क नगर ते के. के. वाघ कॉलेज सर्व्हिस रोडवर एका बाजूने पथदीपच नाहीत. याठिकाणी पथदीप बसवण्याचा प्रशासनाला विसर पडल्याचे चित्र आहे.

रस्त्याच्या समोरच्या बाजूला असलेले अनेक पथदीप बंद असल्याने रात्रीच्या वेळी रोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. या समस्येकडे स्थानिक नगरसेवक, महापालिका प्रशासन यांनी पूर्णतः दुर्लक्ष केल्याने यावर उपाययोजनाची मागणी नागरिकांनी केली आहे. या महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा व स्थानिकांचा प्रवास सोयीचा व्हावा या हेतूने महामार्गाच्या दुतर्फा सर्व्हिस रोड करण्यात आला. मात्र या महामार्गाचे काम पूर्ण होऊन पाच वर्ष झाले पण अजूनही या परिसरात पथदीप नाहीत.

अपघातांचे सत्र सुरूच

चार ते पाच दिवसांपूर्वी हॉटेल पेशवासमोर अकरा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. रात्रीच्या वेळी पथदीप नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अंधार असतो. वाहनचालकांना यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. परिणामी, हे अपघात घडतात. तरी प्रशासनाने या समस्येची दखल घेत पथदीप बसवावेत, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विषय समित्यांना ग्रीन सिग्नल

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका प्रशासनाने तीन प्रभाग समित्यांचा विस्तार मनुष्यबळाअभावी फेटाळल्यानंतर भाजपने आता तीन नवीन विषय समित्यांच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. सत्तापदांचा लाभ अधिकाधिक नगरसेवकांना होण्यासाठी महापालिकेत आरोग्य, विधी व शहर सुधार समिती स्थापन करण्यास शनिवारी महासभेने मंजुरी दिल्यामुळे शहरात आता मुंबई व पुण्याच्या धर्तीवर या तीन समित्या अस्तित्वात येणार आहेत. या समित्यांच्या स्थापनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केला असला, तरी शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महापालिकेत सत्तापदे वाढणार आहेत. दरम्यान, प्रभाग समित्यांचे काय होणार, असा सवालही विरोधकांनी उपस्थित केला आहे.

शहराच्या लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार लक्षात घेता प्रभाग समित्या सहावरून नऊ करण्याचा प्रयत्न भाजपने केला होता. परंतु, अपुऱ्या मनुष्यबळाच्या आधारे तीन नवीन प्रभाग समित्यांची निर्मिती शक्य नसल्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेवर सादर केला. महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत या प्रस्तावावर तब्बल दोन तास चर्चा झाली. शिवसेनेचे विलास शिंदे यांनी प्रभाग समित्यांऐवजी तीन नवीन विषय समित्या स्थापन करण्याची सूचना मांडली. राष्ट्रवादीच्या गजानन शेलार यांनी प्रभाग समित्या सहावरून नऊ करण्यास पाठिंबा दिला. प्रभाग समित्या वाढल्या पाहिजेत असे सांगत नागरिकांच्या सोयीसांठी प्रभाग वाढविण्याची मागणी केली. गुरुमित बग्गा यांनी प्रस्तावातील त्रुटींमुळे प्रस्तावच चुकीचा असल्याचा दावा केला. उद्धव निमसे यांनी प्रभागऐवजी विषय समित्या वाढविण्याची मागणी केली. डॉ. हेमतला पाटील यांनी विषय समित्यांचा खर्च कसा करणार, असा सवाल विचारत आर्थिक ताळेबंद सादर करण्याची मागणी केली. राष्ट्रवादीच्या सुषमा पगारे यांनी सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवला. मनुष्यबळ नसेल, तर मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकचा विकास कसा होणार, असा सवाल त्यांनी केला. पारदर्शक व गतिमान कारभाराची जाणीवही त्यांनी सत्ताधाऱ्यांना यावेळी करून दिली.

विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनीही विषय समित्यांच्या बाजूने कौल दिला. नऊ समित्या झाल्या पाहिजेत, असे सांगत मनुष्यबळ नसेल, तर त्या करून काय फायदा होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महापालिकेत तत्काळ नोकरभरती करण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्याची मागणी त्यांनी केली. भाजपचे गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी विधी व आरोग्य समितीची शहराला गरज असल्याचा दावा केला. त्यामुळे महापौर रंजना भानसी यांनी प्रशासनाचा प्रस्ताव मान्य करीत उपसूचनांच्या आधारे तीन विषय समित्यांच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहर सुधार, विधी व आरोग्य अशा तीन नव्या समित्या अस्तित्वात येणार आहेत. परिणामी प्रशासनावर ताण येऊन तीन अध्यक्षांसह तीन उपाध्यक्षांसाठी मनुष्यबळ व कार्यालये अस्तित्वात येणार आहेत.

--

नोकरभरतीसाठी ‘सीएम’ना साकडे

महासभेत प्रभाग समित्यांच्या विस्तावरून नोकरभरतीचा विषय पुन्हा समोर आला आहे. महापालिकेत जवळपास १६०० पदे रिक्त असून, सफाई कर्मचाऱ्यांची १९०० पदे रिक्त आहेत. त्यामुळे या पदावंर भूमिपुत्रांना न्याय देण्याची मागणी सर्वच सदस्यांनी केली. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनीही सर्वांनी मिळून मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्याची मागणी केली. महापौरांनी आकृतिबंध नव्याने सादर करणार असल्याचे यावेळी सांगितले, तसेच सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

-

विरोधी पक्षनेतेपदी बोरस्ते

महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी अजय बोरस्ते यांची शनिवारी निवड करण्यात आली. गेल्या महासभेतच शिवसेनेने त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याचे पत्र दिले होते. परंतु, त्यावेळेस घोषणा होऊ शकली नाही. शनिवारी महापौरांनी त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे विरोधकांचा किल्ला लढवण्याची जबाबदारी बोरस्ते यांच्यावर आली आहे. बोरस्ते सलग चार वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे शिवसेनेत ज्येष्ठ असून, त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाजपच्या पारदर्शक कारभारावरचा लगाम आता त्यांच्या हातात आहे. महापौरांनी त्यांच्या निवडीनंतर त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, भाजपने सभागृहनेतेपदाची निवड पुन्हा लांबणीवर टाकली आहे.

--

महिला-बालकल्याणची धुरा नवख्यांच्या हाती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांची निवड शनिवारी महासभेत करण्यात आली असून, भाजप व शिवसेनेने नव्याने निवडून आलेल्या महिला सदस्यांना समितीवर पाठविले आहे. महिला व बालकल्याण समितीवर नियुक्त करण्यात आलेल्या नऊ पैकी सात सदस्या नवीन आहेत. शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर आणि राष्ट्रवादीच्या समीना मेमन यांनाच कामाचा अनुभव आहे. त्यामुळे भाजप सभापतिपदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकणार, याकडे लक्ष लागले आहे.

महिला व बालकल्याण समितीत फारसे आर्थिक व्यवहार होत नसल्याने या समितीवर जाण्यासाठी नगरसेविका फारशा इच्छुक नव्हत्या. महिला व बालकल्याण समितीपेक्षा स्थायी समितीवर जाण्यासाठी महिला सदस्या अधिक इच्छुक होत्या. परिणामी राजकीय पक्षांसमोर कोणाला पाठवायचे, असा पेच होता. त्यामुळे शनिवारच्या महासभेतील घोषणेकडे लक्ष लागून होते. भाजपचे पाच, शिवसेनेचे तीन, आघाडीचा एक सदस्य समितीवर निवडले जाणार आहेत. भाजपच्या वतीने प्रियंका घाटे, भाग्यश्री ढोमसे, सरोज अहिरे, शीतल माळोदे, कावेरी घुगे यांना, तर शिवसेनेच्या वतीने सत्यभामा गाडेकर, नयना गांगुर्डे, पूनम मोगरे यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एक सदस्याचा कोटा होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वतीने समीना मेमन यांना संधी देण्यात आली आहे. समितीवर नियुक्त झालेल्या महिला सदस्यांमध्ये सत्यभामा गाडेकर व समीना मेमन यांनाच महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव आहे. भाजपने पाचही नवख्या महिलांना संधी दिली आहे. त्यामुळे सभापतिपदी कोणाची वर्णी लागते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावानाच्या विटेला हात तर लावून बघा!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालय नाशिकचे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी वाचनालय पाडून त्या जागेवर १२-१५ मजली इमारत उभी करून तेथे पार्किंगसह विविध सुविधा, अद्ययावत थिएटर, विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी सुविधा देऊ, असे विधान ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केले असल्याने त्यावरून शहरातील साहित्यिक क्षेत्रात गदारोळ उठला आहे. ‘सावाना’चे माजी उपाध्यक्ष वासुदेव दशपुत्रे यांच्यासह अनेक जणांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवत उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे.

सावाना ही मातृसंस्था असून, ती पाडण्याची भाषा प्रमुख सचिव करतातच कसे? निवडून येऊन अद्याप दहा दिवसही झाले नाहीत, तरी असे भाषण करतातच कसे? असे अनेक प्रश्न यानिमित्त विचारले गेले असून, वाचनालय सभासदांची पत्रेदेखील येण्यास सुरुवात झाली आहे. त्यात पहिलेच पत्र मुकुंद बेणी यांचे असून, २५ कोटींचे इमले बांधून कोणाची वाचनसंस्कृती जोपासणार आहात, असा सवाल बेणी यांनी केला आहे. जहागीरदार टीमने वाचनालयात थोड्याफार सुधारणा केल्या, तर या महाशयांनी आकाशपाताळ एक केले होते. आता तेच मुख्य सचिव वाचनालयाची पवित्र वास्तू पाडावयास निघाले आहेत. कोणत्याही मार्गाने पैसे कमवायचे हेच यांचे ध्येय आहे, असेही बेणी यांनी पत्रात म्हटले आहे. सावाना सभासदांना फक्त चांगली पुस्तके हवी आहेत, त्यांना वातानुकूलित बहुमजली पार्किंग इमारतीशी काही घेणे-देणे नाही. परंतु, वाचनालयाच्या भूखंडावर डोळा ठेवूनच अनेकांनी येथे प्रवेश केला आहे, असेही मुकुंद बेणी यांनी पत्रात नमूद केले आहे.



एक वीट तर काढा, मग बघतो!

पूर्वसंचिताने जे उभे केले आहे तेथे मॉल संस्कृती उभी राहता कामा नये. मला खूप वाचकांचे फोन आले. वाचक चिडलेले आहेत. त्यांचा रोष अजिबात परवडण्यासारखा नाही. त्याचा उद्रेक होण्याची वेळ आली आहे. चार मजली पार्किंग कशासाठी? दहा विटांसाठी मी पहिले ११ रुपये दिले आहेत. औरंगाबादकर, दातार यांनी पैसे जमा केले, त्यातून वाचनालयाची इमारत उभी राहिली, ती मॉल संस्कृती उभी करण्यासाठी नव्हे. आम्ही एकांकिका करून पैसे जमा केलेत. तुम्ही दुरुस्ती, डागडुजी करा. पण, एकदम वाचनालय पाडण्याची भाषा? जुने झाले म्हणून कोर्ट पाडले काय? महापालिकेची जुनी इमारत पाडली आहे का? शहराच्या पार्किंगची जबाबदारी आम्ही का म्हणून घ्यायची? सामान्य वाचकाला वाचते करा, जे महत्त्वाचे आहे ते करा. ‘सावाना’ची एक वीट तर काढा, मग बघतो!

-वासुदेव दशपुत्रे, माजी उपाध्यक्ष, सावाना

--

काय म्हणालेत श्रीकांत बेणी...

सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी ‘मटा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, की ‘योजना मांडल्यास लगेच उलटसुलट चर्चेला हितसंबंधी मंडळी सुरुवात करतील. परंतु, आज ना उद्या हे करावेच लागणार आहे. ‘सावाना’ची बाहेरील रंगरंगोटी पाहून भुलू नका, एकदा आतील भागातील इमारतीची दुरवस्था बघा. त्यानंतर काय ते ठरवा. माझ्या मते आताची संपूर्ण इमारत पाडून १२ ते १५ मजली भव्य इमारत येथे उभी राहू शकते. त्यामध्ये चार मजले पार्किंगची व्यवस्था केल्यास टिळकरोड, एम. जी.रोड आणि शिवाजीरोडवरील वाहने पार्किंगचा प्रश्न सोडविता येईल आणि त्यामुळे शासनाकडून इमारत बांधणीसाठी भरघोस निधी मिळू शकेल. या नूतन इमारतीत १००० प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित नाट्यगृह, दोन अॅम्फी थिएटर्स, भव्य पुस्तक देवघेव विभाग, डिजिटल लायब्ररी, भांडारकर प्राच्य विद्यापीठाप्रमाणे भव्य पोथी विभाग, अद्ययावत कलादालन, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अभ्यासिका, चांगले कॅन्टीन अशा सर्व सुविधा करता येणे शक्य आहे. त्यासाठी गरज आहे किमान २५ कोटींची. इच्छा असे तिथे मार्ग दिसे. गरज आहे इच्छाशक्तीची!’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या बॅरिकेड्सचे रस्त्यावर अतिक्रमण

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

गुडीपाडव्याच्या निमित्ताने सातपूर गावात बारागाड्यांची यात्रा जोरदार होत असते. यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाकडून यात्रेला येणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेड्स लावण्यात येतात. परंतु, ही यात्रा होऊन १५ दिवस उलटूनही त्र्यंबकरोडवर पोलिसांच्या बॅरिकेड्सचे अतिक्रमण झाल्याचे चित्र आहे. तरी महापालिका व पोलिस प्रशासनाने हे रस्त्यावरील बॅरिकेड्स त्वरित हटवावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

गुडीपाडव्याला सातपूर गावात बारागाड्यांची यात्रा पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. पाडव्याची यात्रा सुखरूप पार पाडावी याकरिता महापालिका व पोलिस प्रशासनाकडून नियोजन केले जाते. तसेच बारागाड्या ओढण्याचा मान असलेल्या निगळ परिवार व ग्रामस्थांकडूनदेखील यात्रेची जोरदार तयारी केली जाते. पारंपरिक बारागाड्यांच्या यात्रेत सुरक्षेसाठी चोख व्यवस्था केली जाते. बारागाड्या ओढणाऱ्या गणेशाला बघण्यासाठी यात्रेकरूंची मोठी गर्दी होत असल्याने या गर्दीत दुर्घटना होऊ नये, याकरिता हे बॅरिकेड्स लावण्यात येतात. परंतु, बारागाड्यांची यात्रा झाली तरीही हे बॅरिकेड्स त्र्यंबकरोडला अतिक्रमण ठरत आहेत. आता अतिक्रमण हटविणार कोण, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

एकीकडे त्र्यंबकरोडच्या आयटीआय सिग्नल ते पपया नर्सरीपर्यंत अगोदर अनधिकृत व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचे चित्र आहे. त्यात भर म्हणूनकी काय पोलिसांचे बॅरिकेड्सचे अतिक्रमण वाहनचालकांना सहन करण्याची वेळ येत आहे. महापालिका व पोलिस प्रशासनाने बॅरिकेड्सचे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

------------------

सुरक्षेसाठी लावण्यात आलेले बॅरिकेड्स पंधरा दिवसांपासून त्र्यंबकरोडवरच पडून आहेत. यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करण्याची वेळ येत आहे.

- सुमीत काळे, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्रिपदे सोडा; मग पाठिंबा द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांकडून होणाऱ्या विरोधाला समर्थन देण्यासाठी गेलेल्या खासदार हेमंत गोडसे यांना शनिवारी शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. शिवसेनेचेच मंत्री या महामार्गाच्या प्रकल्पावर अध्यक्ष आहेत. पहिल्यांदा ही मंत्रिपदे सोडावीत; मगच आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्या, अशी सडेतोड भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे गोडसे यांना काढता पाय घ्यावा लागला.

शेतकऱ्यांची संमती न घेता महामार्गासाठी जमिनींची मोजणी करणाऱ्या सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी शेतकरी संघर्ष कृती समिती आणि नाशिक जिल्हा किसान सभेतर्फे शिवडे येथे मेळावा घेण्यात आला होता. मेळाव्याला खासदार हेमंत गोडसे, राजू देसले आदी उपस्थित होते. यावे‍ळी सरकार आणि प्रशासनाचा निषेध करण्यात आला. सिन्नर तालुक्यात आमदार आणि खासदार शिवसेनेचेच आहेत. इतकेच नव्हे, तर जिल्हा परिषदेच्या सदस्यादेखील सिन्नरच्या आहेत. मात्र, यापैकी कुणीही या प्रश्नावर अधिकाऱ्यांशी चर्चा करायला आले नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. परिणामी, शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या खासदार गोडसे यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. महामार्गासाठी सुपीक जमिनी देणार नाही, असा ठराव मेळाव्यात करण्यात आला. २६ एप्रिल रोजी शहापूर येथे दहाही जिल्ह्यांतील शेतकरी एकत्रित येऊन जनआंदोलन करणार आहेत.

‍मुलं रस्त्यावर आणू नका

आमच्या वडिलांनी आत्महत्या केल्यामुळे आम्ही रस्त्यावर आलो आहोत. सुपीक जमिनी सरकारच्या घशात घालून तुम्ही तुमच्या पुढची पिढी रस्त्यावर आणू नका, अशी भावनिक साद यावेळी मेळाव्यात आलेल्या तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी घातली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिसऱ्या सोडतीतील प्रवेशप्रक्रिया सुरू

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक
वंचित व गरजू बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या शिक्षणहक्क (आरटीई) प्रक्रियेची तिसरी सोडत नुकतीच काढण्यात आली असून त्यात ३५९ विद्यार्थ्यांची वर्णी लागली आहे. या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली. २० एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असून पालकांना आवश्यक कागदपत्रे जमा करुन विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करता येणार आहे.
नाशिकमध्ये यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त शाळांनी नोंदणी केली असल्याने प्रवेशाच्या संख्याही जास्त आहेत.फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेल्या या प्रक्रियेची एप्रिल मध्यापर्यंत तीन सोडत काढण्यात आल्या आहेत. एप्रिल अखेरपर्यंत चौथी व पाचवी सोडत देखील काढण्यात येणार
आहे.

पहिल्या सोडतीतील निवड :
३१३७ - प्रवेश २८२२
दुसऱ्या सोडतीतील निवड :
१०६३ - प्रवेश ४०२
तिसऱ्या सोडतीतील निवड :

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कलिंगड थेट ग्राहकांच्या दारी

0
0

कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांकडून विक्री

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

उन्हाळ्याच्या दिवसात थंड शितपेय घेण्यापेक्षा अनेकजण शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कलिंगडालाच अधिक महत्त्व देतात. परंतु, शेतकऱ्यांची कलिंगडाला मार्केटमध्ये कवडीमोल भाव मिळत असल्याचे चित्र आहे. यामुळे सातपूर भागात शेतकऱ्याचे कलिंगड थेट ग्राहकांच्या दारी विक्रीसाठी आणले आहेत. सेंद्रिय खतापासून उत्पादन केलेल्या कलिंगडाला ग्राहकांचीही पसंती लाभत असल्याचे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढोली येथील शेतकरी पोपट महाले यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. कमी किमतीत दर्जेदार कलिंगड ग्राहकांना देत असल्याचेही महाले म्हणाले.

उन्हाळ्याच्या दिवसात अनेकजण पाण्याची भूक भागविण्यासाठी शितपेयांचे सेवन करताना दिसतात. यात अनेक ग्राहक मात्र कलिंगडाला पसंती देतात. शहरातील बाजारात विक्रीला आलेले कलिंगड केमिकल पावडरने फुगविलेलेच अधिक असतात. असे कलिंगड शरीराला अपायकारक ठरू शकतात. त्यातच दर्जेदार कलिंगडाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला मार्केटमध्ये कवडीमोल भाव मिळत असतो. यावर उपाय म्हणून वाढोली येथील शेतकरी महाले यांनी चक्क स्वतःच्या स्विफ्ट गाडीत कलिंगड विक्रीसाठी थेट ग्राहकांच्याच दारी आणले आहेत. रोज सकाळी ९ वाजेला घरातून कलिंगडाची गाडी भरून सातपूर भागात अशोकनगर परिसरात महाले कलिंगड विकत असतात. घरातील सदस्य महाले यांना कलिंगड विक्रीसाठी मदत करत असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीटंचाईवरून सभागृहात गदारोळ

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या पाणी टाक्या व जलशुद्धीकरण केंद्रांना सुरक्षारक्षक पुरविण्याच्या विषयाने शनिवारी महासभेत गंभीर वळण घेतले. सुरक्षारक्षकांचा विषय सदस्यांनी पाणीटंचाईवर आणत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. जुने नाशिकमध्ये दोन वेळा पाणी येत असताना जाणूनबुजून एक वेळ पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप अपक्ष नगरसेवक मुशीर सय्यद यांनी केला. शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनी सातपूरमधील भाजपचे नगरसेवक पाणी पळवीत असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली. त्यामुळे पाणीटंचाईची गंभीर दखल घेण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले.

शहरात अतिरेक्‍यांकडून धोका असल्याने महापालिकेच्या पाण्याच्या टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र, बूस्टर पंपिंगवर खासगी सुरक्षारक्षक नियुक्त करण्याच्या महासभेत प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यावर मुशीर सय्यद यांनी सुरक्षारक्षकांचा विषय सोडून जुने नाशिकमध्ये जाणूनबुजून एक वेळ पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप केला. पाणीपुरवठा विभागाकडून एक वेळ पाणीपुरवठा होत असल्याची कबुली देण्यात आली. यामुळे संतापात सभात्याग करताना सय्यद यांनी सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास पुढील महासभेत पीठासीन अधिकाऱ्यांसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. सिडकोतील नगरसेविका किरण गामणे यांनी सातपूरचे भाजपचे नगरसेवक पाणी पळवीत असल्याचा आरोप केला. सत्ताधारी भाजपची हीच का पारदर्शकता, असा खोचक सवाल करून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

उद्यान, जलकुंभावर रंगतात पार्ट्या

सिडकोतील नगरसेविका कल्पना पांडे यांनी उद्याने व जलकुंभावरील भयानक परिस्थितीचे वर्णन सभागृहात केले. जलकुंभावरील कर्मचारी पत्ते खेळतात, पार्ट्या होतात. उद्यानांमध्ये सुरक्षारक्षक नसल्याने नासधूस चालत असल्याची व्यथा त्यांच्या मांडली. या भागात तातडीने सुरक्षारक्षक देण्याचे आश्‍वासन महापौर रंजना भानसी यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेविकेच्या पतीकडून मारहाण

0
0

नाशिकरोड ः शिवजयंतीची वर्गणी दिली नाही म्हणून येथील आर्टिलरी सेंटररोडवर हॉटेलचालकास गंभीर मारहाण करून हॉटेलची तोडफोड करण्यात आली. हॉटेलचालकाची दीड लाखाची सोन्याची चेन लुटून नेण्यात आली. मारहाण करणाऱ्यांमध्ये शिवसेनेच्या नगरसेविका ज्योती खोले यांचे पती श्याम खोले यांचा समावेश आहे.

हॉटेलचालक अनिस युनूस सैय्यद यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्टिलरी सेंटररोडवर भाजपचे पदाधिकारी सैय्यद युनूस यांचे चॉईस हे हॉटेल आहे. श्याम खोले, सुनील जाधव, अतुल सूर्यवंशी व सोनू गायकवाड ११ हजारांची मागील वर्गणी मागितली. हॉटेलमालकाने एवढी मोठी रक्कम वर्गणी म्हणून देण्यास साफ नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या संशयितांनी भांडण सुरू केले. हॉटेलची तोडफोड केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. बाबासाहेबांचे विचार तळागाळात पोहोचवा

0
0




म. टा. प्रतिनिधी, नाशिक
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आदी मुल्यांचा उदघोष होणे गरजेचे आहे. तसेच समाजातील धर्मांधता दूर करून डॉ. बाबासाहेबांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे आज आवश्यक बनले आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हाधिकारी बी. जी. वाघ यांनी केले.
‘साहित्य मंडळ नाशिक’ संस्थेतर्फे येथील शासकीय कन्या विद्यालयात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर पत्रकार विश्वास देवकर, कवी उत्तम कोळगावकर उपस्थित होते.
मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘विशाखा’ समितीच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या व राष्ट्रीय सन्मान प्राप्त प्राचार्य सरोज जगताप व राज्यसेवा परीक्षेत यशस्वी झालेल्या हर्षद पगारे यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना बी. जी. वाघ यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेबांनी समाजाचे मुख्य दु:ख जाणले होते. त्यामुळे त्यांनी समाज शिक्षित करून बुद्धी स्वातंत्र्याचा आग्रह धरला. मात्र आज काही मंडळी बुद्धीस्वातंत्र्याचा हक्क नाकारात असून त्यामुळे अनेक विचित्र प्रकरणे घडत आहे. शैक्षणिक क्षेत्रात विद्यापीठांना असलेले स्वातंत्र्य नष्ट होत चालले असून ही खेदाची बाब असून विकासाच्या नावावर स्वातंत्र्य आणि समतेचा बळी घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
साहित्य मंडळाचे सचिव अभिमन्यू सूर्यवंशी यांनी संस्थेच्या उद्दिष्टे मांडली. साहित्य मंडळ नाशिकचे उपाध्यक्ष विजय पवार, कार्याध्यक्ष डॉ. धर्मेद्र मुल्हेरकर, यशवंत पाटील, माजी आयएएस अधिकारी येवलेकर, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घटनाकारांना वंदन

0
0


टीम मटा

शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांत निळ्या झेंड्यांसह पताका लावून सुशोभित केलेले रस्ते अन् चौक… विविध संस्था, संघटनांमध्ये सुरू असलेले प्रतिमापूजन व इतर कार्यक्रम… ठिकठिकाणी निघालेल्या मिरवणुका... वाद्यांचा गजर... ‘जय भीम’च्या जयघोषात थिरकणारी तरुणाई... अशा हर्षोल्हासात शुक्रवारी शहर परिसरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली.

--

नाशिकरोडला उसळला जनसागर

सिन्नर फाटा ः ‘जय भीमचा नारा अन् डीजेच्या दणदणाटात नाचत नाशिकरोड येथे शुक्रवारी रात्री सार्वजनिक मिरवणूक उत्साहात पार पडली. नाशिकरोड व उपनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल ४० सार्वजनिक मंडळांनी या मुख्य मिरवणुकीत सहभाग नोंदविल्याने स्टेशनकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने फुलले होते. येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शहरातील भीमसैनिकांचा रात्री मोठा जनसागर उसळला होता.

सिन्नर फाटा, जेलरोड, दत्त मंदिर, देवळालीगाव या सर्व रस्त्यांनी विविध सार्वजनिक मंडळांनी मुख्य मिरवणुकीत सहभाग घेतला. शांतता समिती, नाशिकरोड भाजप मंडल, प्रबुद्ध मित्रमंडळ, सम्यक संघ, प्रेस कामगार मंडळ, बहुजन समाज पक्ष, रिपाइं यांच्यासह इतर सार्वजनिक मंडळांनी मुख्य मिरवणुकीत सहभागी भीमसैनिकांचे स्वागत केले. शांतता समितीतर्फे आमदार बाळासाहेब सानप, पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकुर, निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, नारायण न्याहाळदे, सदस्य पांडुरंग गुरव यांनी भीमसैनिकांचे स्वागत केले.

या मुख्य मिरवणुकीसाठी बिटको चौक व शिवाजी पुतळा येथे, तसेच ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात होता. सिन्नर फाट्याच्या दिशेने येणा-या वाहतुकीत बदल केला होता.

--

महापालिका मुख्यालय

नाशिक ः महापालिकेतर्फे राजीव गांधी भवन येथे महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. उपमहापौर प्रथमेश गिते, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते संभाजी मोरुस्कर, विलास शिंदे, सलीम शेख, उपायुक्त विजय पगार, हरिभाऊ फडोळ, मुख्य लेखापरीक्षक महेश बच्छाव, शहर अभियंता उत्तम पवार, जनसंपर्क अधिकारी यशवंत ओगले, हिरामण जगझाप आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

--

भाजप कार्यालय

नाशिक : भारतीय जनता पक्षातर्फे वसंतस्मृती कार्यालयात नगरसेवक योगेश हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजनाद्वारे अभिवादन करण्यात आले. राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. आंबेडकरांना ओळखले जाते. त्यांच्या विचारांची कास सर्वांनी धरणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन हिरे यांनी केले. शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, अरुण शेंदुर्णीकर, शशांक हिरे, राजू मोरे, पवन भगूरकर, रोहिणी नायडू, सुजाता करजगीकर, पुष्पा शर्मा, भारती बागुल, संजय गालफाडे, सुरेश बर्वे, संपत जाधव आदी उपस्थित होते.

--

मनसे कार्यालय

नाशिक ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजगड या मध्यवर्ती कार्यालयात डॉ. प्रदीप पवार, प्रदेश उपाध्यक्ष तथा शहराध्यक्ष अॅड. राहुल ढिकले, माजी महापौर अशोक मुर्तडक, सलीम शेख यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. उल्हास धनवटे, खंडू बोडके, अनंता सूर्यवंशी, श्रीराम कोठुळे, किशोर वडजे, डॉ. किरण कातोरे, राम बिडवे, रामदास दातीर, अॅड. अतुल सानप, पद्मिनी वारे, भानुमती आहिरे, कामिनी दोंदे, जयश्री पवार, हर्षा फिरोदिया आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

--

इंदिरानगर परिसरात उत्साह

सिडको ः इंदिरानगर परिसरातील कलानगर येथे भीमशक्ती संघटनेतर्फे प्रतिमापूजनानंतर बुद्धवंदना झाली. पी. एस. गायकवाड, संदीप जाधव, उमर पठाण, कारभारी बालसाने, विक्रम पटेकर आदींसह भीमसैनिक उपस्थित होते. सदिच्छानगर येथे भीमगर्जना मित्रमंडळातर्फे झालेल्या अभिवादन कार्यक्रमावेळी महेंद्र धबडगे, बंडू सावंत, कैलास देहाडे, बाळा शिंदे, कल्याण लोखंडे, विश्वास शिंदे, विकास कोकणे, आकाश कोकणे, प्रसाद कनकुटे, राज जोशी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. पांडवनागरी परिसरातील रिक्षा स्टॅण्ड मित्रमंडळातर्फे अध्यक्ष रवी सावंत,गजानन कुमावत,जीवन सावंत,सागर कुमावत,बंडू सावंत,गुणवंत बोरसे,जमील शेख, सुनील भोईर आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.

रथचक्र चौक येथील लोककवी वामनदादा कर्डक मित्रमंडळ, रिक्षाचालक-मालक संघटनेतर्फे अभिवादन करण्यात आले. नगरसेवक सतीश सोनवणे, नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. राहुल जाधव, अनिल मोरे, दीपक जाधव, राजेंद्र गांगुर्डे, संजय पोटकुले आदींसह परिसरातील नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते, राजीवनगर परिसरातील राजगृह बुद्धविहारात बुद्धवंदना झाली. कृष्णा शिंदे, रवी निकाळजे, किरण नरगळे, दीपक वावळ, राहुल वाकळे आदी उपस्थित होते.

--

अमृतधाम परिसर

आडगाव ः अमृतधाम परिसरातील महापालिका शाळा क्रमांक ४५ व ६५, तसेच आडगांव येथील शाळा क्रमांक ६९ व ७० येथे अभिवादनपर कार्यक्रम झाले. विडी कामगारनगरमधील शाळेत मुख्याध्यापिका सुरेखा खांडेकर व केंद्रप्रमुख सोमनाथ गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. पहिली ते आठवीच्या विद्यार्थिनींनी भाषण व भीमगीते सादर केली. परिसरातून प्रभात फेरी काढण्यात आली. शाळेतील सर्व शिक्षक उपथित होते. आडगाव येथील शाळा क्रमांक ६९ व ७० मध्ये मुख्याध्यापिका मंगला शिंदे व समीना तांबोळी यांच्यासह मान्यवरांनी प्रतिमापूजन केले. सर्व शिक्षकवृंद उपस्थित होता. आडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. आम्रपाली जाधव, पूनम पंडित, साक्षी देशमुख, तनिषा पगारे, प्राची जाधव, तृप्ती जाधव आदींसह अन्य विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भाषणे केली. शाळेचा माजी विद्यार्थी अक्षय जाधव याच्या स्मरणार्थ आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. राजर्षी शाहू विचारमंचातर्फे खाऊवाटप झाले. मुख्याध्यापक एम. बी. हिंडे, पर्यवेक्षक आय. जे. त्र्यंबके, रवींद्र जाधव, बाळासाहेब जाधव, जे. पी.धूम, एस. एन. शेवाळे आदी उपस्थित होते.

--

वाहतूक संघटना

आडगाव : वाहतूक चालक-मालक प्रतिनिधी संघटनेतर्फे आरटीओ कार्यालयात प्रतिमापूजन झाले. संजय निकम, कैलास बारावकर, अय्याज काझी, मनोज जाधव, जितू तुंगार, धनंजय साठे, किरण गोसावी, मजहर सय्यद, बापू सोनवणे, गोविंद लोखंडे, प्रमोद चौधरी, प्रदीप अय्यर, विनोद सानप आदी उपस्थित होते.

--

समतावाडी, भगूर

देवळाली कॅम्प येथील समतावाडी परिसरात विहिंपचे पश्चिम महाराष्ट्र प्रांतपाल एकनाथ शेटे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे अनावरण करण्यात आले. सीताराम जाधव, दामू रुपवते, धोंडिराम चंद्रमोरे, बौद्धाचार्य संतू गाडे, बी. डी. खडताळे आदी उपस्थित होते. एकनाथ शेटे ५० वर्षांपासून येथे प्रतिमापूजन व ध्वजवंदनास उपस्थित राहत असल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

--

नॉव्हेल्टी फाउंडेशन

येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये नॉव्हेल्टी फाउंडेशनतर्फे नगरसेवक भगवान कटारिया यांच्या होते प्रतिमापूजन झाले. राहुल खडताळे यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. राजू येलवंडे, बी. डी. खडताळे, वैभव जाधव, विश्वास जगताप, सचिन खडताळे आदी उपस्थित होते.

--

साउथ व सिद्धार्थ बॉइज

लहवित व साउथ येथील युवा कार्यकर्त्यांनी लहवित ते देवळाली कॅम्प अशी दुचाकी रॅली काढली. सोना मोरे, चेतन गायकवाड, परेश शेजवळ, सचिन जगताप आदींसह परिसरातील युवकांनी सहभाग घेतला.

--
नामको कॅन्सर हॉस्पिटल

आडगाव ः नामको कॅन्सर हॉस्पिटलमध्ये महापौर रंजना भानसी यांच्या उपस्थितीत अभिवादनपर कार्यक्रम झाला. महापौरांच्या हस्ते मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद््घाटन झाले. सोहनलाल भंडारी, शशिकांत पारख, अशोक साखला, कांतिलाल जैन, सर्व विश्वस्थ आदी उपस्थित होते.

--

संभाजी ब्रिगेड

संभाजी ब्रिगेडतर्फे गणेशवाडीतील महानगर कार्यालयाजवळ अभिवादनपर कार्यक्रम झाला. योगेश निसाळ, प्रफुल्ल पाटील, अजिज पठाण, माधुरी भदाणे, रामभाऊ जाधव, किरण मानकर, सचिन बीडकर आदी उपस्थित होते.

--

सातपूर परिसरात अभिवादन

सातपूर ः सातपूर परिसरात विविध कार्यक्रम झाले. मध्यरात्री सातपूर गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते हार घालत अभिवादन करण्यात आले. स्वारबाबानगर येथील पुतळ्याचे सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अनिवाश सोनवणे यांच्या हस्ते पूजन झाले. नगरसेविका दीक्षा लोंढे, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, गोकुळ निगळ आदींसह नागरिक उपस्थित होते.

पुष्पाकुंज डेंटल केअरतर्फे अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. डॉ. राहुल सोनवणे यांनी गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून शालेय वस्तू वाटप केल्याचे सांगितले.

सातपूर गावातील मोठा राजवाडा येथील पूर्णाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. माजी नगरसेविका सविता काळे, सुजाता काळे, रवी काळे, भिवानंद काळे, काळू काळे, अरुण काळे आदी उपस्थित होते.

शिवाजीनगरला नगरसेवक दिनकर पाटील, रवींद्र धिवरे, नगरसेविका डॉ. वर्षां भालेराव, हेमलता कांडेकर यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. सातपूर कॉलनीत नगरसेवक सलीम शेख, योगेश शेवरे यांनी प्रतिमापूजन केले. परिसरात दिवसभर उत्साह दिसून आला.

--

मिरवणुकीने रंगत

स्वारबाबानगर येथून सायंकाळी ७ वाजता मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लक्षवेधी रथ सहभागी झाले होते. माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या मान्यवरांचे स्वागत केले. मिरवणुकीत महिलांसह बालकांनी मराठी व हिंदी भीमगीतांवर ताल धरला होता. सातपूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images